मी आणि माझ्या आठवणी

Posts tagged ‘तिखाडी गवत’

कथा पहिली – बाटोडं, माझं गाव


कथा पहिली –  बाटोडं, माझं गाव

 

माझं गाव चौधरा… अगदी लहानसं खेडं… शंभरक घराचं… या गावाचे नाव ‘चौधरा’ कसं पडलं हे सांगणे तसे कठीण ! कारण तसा काही इतिहास ऎकीवात नाही. ऎवढं मात्र खरं की इतर गावाच्या नावाची पुनरावृत्ती बर्‍याच ठिकाणी झालेली दिसतील, पण या गावासारखे नाव महाराष्ट्राच्या मराठी मुलुखात तरी कुठेही शोधून दिसत नाही.

आमच्या गावातील माणसांचा पांढर्‍या रंगाचं धोतर व कुडतं, आतमध्ये बंडी, डोक्याला धोतराच्या पानाचा किंवा शेलाचा पटका, खांद्यावर शेला असा पेहराव असायचा. बाया नऊवारी लुगडं, चोळी, गळ्यात काळी पोत, चांगल्या घरच्या असतील तर पायात चांदीची पायपट्टी, सोन्याची एकदाणी, हातात चांदीच्या किंवा खुराच्या पाटल्या, पायात कडे असा पेहराव घालत. अलीकडे शिकलेल्या मुली पाचवारी गोलसाडी, पोलका, ब्लॉउज घालीत. लभान बायांचा मात्र वेगळाच पेहराव होता.

आमच्या गावाशेजारी समुद्रातील बेटांसारखा डोंगर उभा होता. या डोंगराला ‘बरड’  म्हणत होतो. डावीकडे दुसरा डोंगर खरोल्याच्या जंगलापर्यंत गेला होता. म्हणजे आमचं गाव या दोन डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं. डोंगराच्या पायथ्याशी जुनाट लिंबाचं झाड फांद्या पसरवून उभं होतं. तेथेच गोठाणावर गायकी गायी जमा करून रानात घेऊन जात असे. म्हणजेच निसर्गाने आमच्या गावाच्या जनावरांना जगण्याची खास व्यवस्था केली होती, असेच म्हणावे लागेल.

एखाद्या स्त्रीने दागिनं घातल्यावर जसं तिचं देखणेपण उठून दिसतं, तसंच आमचं गाव या डोंगरामुळे उठून दिसायचं. आमच्या गावाचं सौंदर्य खुलविणारं दागिनंच होतं मुळी…! म्हणून मला फार गर्व वाटत होता. पावसाळ्यात हिरवळीमुळे त्याचं सौंदर्य आणखीनच विलोभनीय वाटत असे. हा डोंगर म्हणजे गावाची ओळख होती. कुणीही डोंगरापासचं ‘चौधरा’ म्हटलं की चटकन ओळखत. म्हणून मला त्याचं मोठं आकर्षण होतं.

लोक आमच्याकडील लोकांना ‘डोंगरातील’ म्हणायचे तर यवतमाळच्या पलीकडे जिकडे डोंगर नसायचं – सपाट जमिनी होत्या, त्यांना ‘तरानातील’ म्हणायचे. हे लोक आमच्या गावात येत; तेव्हा हा भेद कळला. ते स्वतःला उच्च समजत व आमच्याकडील लोकांना हिणवत. पण जेव्हा हे लोक सुगी करण्यासाठी आमच्याकडे येत; तेव्हा ते उच्च कसे ते मला कळत नसे.

मी यवतमाळला शिकतांना अधूनमधून घरी येत होतो. त्यावेळी पहिल्यांदा बरडावर फेरफटका मारण्याची उत्सुकता लागत होती. खूप दिवसापासून बरडावर गेलो नाही की सारखं अस्वस्थ वाटायचं.

मग मी आईला म्हणायचो, ‘आई, मी बरडावर चाललो.’

‘जा… पण जरा पाहून जा. तेथे विंचू-काटा, सरपं असतात… आणि लवकर ये.’

‘हो. लवकर येतो.’ असं म्हणून मी बरडाकडे जायला निघायचो.

लिंबाच्या झाडाजवळून चढतांना सपाट मोकळं पठार होतं. तेथून टोंगळ्याला हात टेकवत, तोल सावरत चढायला हुरुप वाटायचा. वरती माथ्यावर लहान-मोठे दगडं निसर्गाने जागोजागी मांडून ठेवलेले होते. मोठ्या दगडावर चढून बसायला मजा वाटत होती. डोंगरावर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी निरनिराळ्या जातींची उंच झाडे होती. माझ्या उंचीपेक्षाही मोठ्या दगडावर जावून बसलो. त्याला मोठं व्हायला किती वर्ष लागले असतील, कोण जाणे ?  असा विचार मनात चमकून गेला.

मनाला शांती पाहिजे असेल, आजूबाजूला घडणार्‍या क्रौर्यापासून मन थिजले असेल, तर या दगडावर येऊन बसावं ! आनंदाचा, शीतलतेचा प्रसन्न शिडकावा करणारा हा अनुभव अत्यंत विस्मयकारी वाटत होता. आपल्याच मनातले विचार मोकळे करावे, आपण आपल्याशी संवाद साधावा, भाव-भावनांचा निचरा करावा असे ते जिवाभावाचे व हक्काचे ठिकाण वाटत होते. मला या बरडावर यायला फार आवडत असे. माझ्या अबोल व लाजर्‍याबुजर्‍या स्वभावामुळेच मला कदाचित निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असावं.

वर डोंगरावर कितीतरी प्रकारचे झाडं होते. कुठे श्वास घेतांना गुदमरेल अशी दाट झाडी, तर कुठे श्वास मोकळेपणाने घेता येईल असा सपाट भाग होता. माझ्या बाजूलाच कुणीतरी कुर्‍हाडीचे घाव घालून सागाच्या झाडाच्या फांद्या, फुलं, पानं असा सारा साजश्रुंगार उतरवून त्याला बोडकं करून टाकलं होतं. त्याला पाहुन माझे मन द्रवल्याशिवाय राहिलं नाही. इतकं असूनही त्याच्या बुडाजवळ फुटलेली पालवी पाहून, मला वाटले खरेच कुणी कितीही घाव घातले; तरी परत फुलायचा वसा मात्र सोडीत नाहीत. फुलून पुन्हा दिमाखाने उभे होतात, जोमाने बहरतात. याचं मला नवल वाटलं.

मला धावड्याचा डिंक खूप आवडायचा. म्हणून त्याला शोधण्याचं वेडच लागून जायचं. तोंडात टाकल्यावर त्याची चिक्कट चव अविट वाटायची. घरी आणून विस्तवाच्या निखार्‍यावर भाजत होतो किंवा तेलात तळत होतो. मग तो फुललेला डिंक आणखीनच चवदार वाटायचा. डोंगराच्या माथ्यावरुन खाली उतरतांना दगड-गोटे, काट्या-कुट्या, पाला-पाचोळ्याला कधी तुडवत तर कधी चकमा देत, तर कधी झाडांच्या फांद्यांना लोंबकळत कसरत करत मी त्या दाट झाडीतून खाली उतरत होतो.

झाडीमध्ये मी मधमाश्याचे मोहळ शोधायचा. एखाद्या झाडाजवळ माशा घोंघावतांना दिसल्या की गर्द फांद्याच्या किंवा काटेरी झुडूपाच्या आतमध्ये डोकावून पाहिल्यावर काळेभोर मोहोळ फांदीला लटकलेलं  दिसायचं. अडचणीच्या व सहज दिसणार नाही अशा ठिकाणी ह्या माशा मुद्दाम सुरक्षेच्या दृष्टीने मोहळ बांधीत. तरीही त्याला न जुमानता आम्ही झाडून लदबदलेलं सहद व पोळी खात होतो. मध पिल्यावर त्याचा जो चोथा असायचा; त्याला मेण म्हणत. बाया कुंकू लावतांना आधी हा मेण कपाळाला लावीत. त्यामुळे कुंकू चिकटून बसत असे.

मी डोंगराच्या खाली भोवताल दूरपर्यंत नजर टाकली. बरडाच्या खाली पायथ्याला खेळण्यासाठी भरपूर जागा होती. तेथे उन्हाळा-हिवाळ्यात आम्ही मुलं गिल्ली दांडू खेळत होतो. रस्त्याच्या कडेला धुर्‍यावर कॅक्टसचे झुडपं होते. त्याच्या लाल फळाला काडीचा झोडपा मारला की दूर जावून पडायचं. मग त्याला पाला-पाचोळा व काट्या-कुट्यात शोधून चोखू-चोखू खात होतो.

पांडू लभानाच्या वावरात बिब्याचं घेरेदार झाड होतं. उन्हाळ्यात त्या झाडाजवळ गेल्याशिवाय राहत नव्हतो. त्याच्या तेलाने झाडाच्या खालची जमीन तेलकट झालेली दिसायची. कधीकधी पिकलेले फुलं तोडून खात होतो. त्याच्या फळाला टोचल्यावर तेल निघायचं. हे तेल अंगाच्या त्वचेला लागलं की उतून यायचं. त्याला जाळल्यावर टपटप तेल गळायचं. हे तेल औषधी म्हणून उपयोगात आणीत. जाळलेल्या बिब्याला फोडल्यावर बी काढली म्हणजे गोडंबी ! ते खायला चवदार लागायचं. बिब्याचं झाड, फूल, फळ, तेल सारे काही कोकणातल्या काजू सारखंच दिसत असल्याचं, मी कुठेतरी वाचलं होतं. त्यामुळे या दोघांची जातकूळी एकच आहे की काय?

जवळच लांडग्याचं वावर होतं. त्याचं मूळ नाव बन्शी. पण त्याला लांडग्या का म्हणत, ते मलाही माहीत नव्हतं. तसंच किसना, परशा, भगवान यांचे वावरं, गावातील लोकांची निरनिराळी घरे, ज्ञानेश्वरच्या घराजवळची सार्वजनिक विहीर, दुसरी चिरकुटमामाच्या आवारातील विहीर, अलग-अलग दिसणारा बौध्दवाडा व लभानतांडा, या दोन समाजाला दुभंगणारा बैलगाडीचा रस्ता, रामदासच्या घराजवळचा पंचशीलचा झेंडा, शिवाआबाजीच्या घराजवळचा खूप वयाचा, अफाट पसरलेला, ठसठशीत पिंपळवृक्ष, गुलाबदादाच्या घराजवळचं चिंचेचं मोठं झाड, सुखदेवच्या घराजवळचं बोरीचं झाड, श्रावणमामाच्या घराजवळचं चिंचेचं झाड, माझ्या देखण्या वाड्यासमोरचं मारुतीचं देऊळ व शेंड्यावर भगवा कापड बांधलेला उंच लाकडाचा झेंडा. असा तो आजूबाजूचा परिसर मी न्याहाळीत होतो.

गावाशेजारी शेताला लागून नाला होता. तो वाहत जावून वाघाडी नदीला मिळाला होता. सावरगडला जातांना हाच नाला ओलांडून जावे लागत होतं. त्यावेळी आडवीतिडवी निमुळती पायवाट लागायची. खाली पाहिल्यावर खोल खाई दिसायची. एखाद्या वेळेस पाय घसरला की खाईत पडण्याची भीती वाटायची. हा भाग पूर्ण गवताने झाकून गेलेला असायचा. एकदा मला स्वप्न पडलं की मी त्या खाईत पडलो. वर येण्यासाठी धडपड करीत होतो. मी खूप रडत होतो. नंतर जाग आली तेव्हा कळले की अरे, हे स्वप्न होतं !

त्या हिरवळीवर सुगंधीत वासाचं तिखाडी गवत पाहून मी सुखावून जात होतो. त्या सुवासिक वासाने मन कसं मोहरून जायचं. घरी चहात टाकल्यावर त्याचा सुगंध कितीतरी वेळ ओठावर दरवळत राहायचा. असं ते अनोखेपणा पाहून मला निसर्गाचं मोठं नवल वाटत होतं.

तसेच नाल्याच्या काठावर कुसळी गवत दूरवर पसरलेले होतं. ते सुईसारखे कपड्याच्या आतमध्ये शिरुन पाया-पोटर्‍याला टोचत. आम्ही या गवताचा मजेशीर प्रयोग करत होतो. वाळलेल्या कुसळ्याला पोकळ भोपळ्यात टाकून पाण्याचा शिडकावा मारला की गलंडत-गलंडत चालत असे.

अशा अनेक आठवणीने डोक्यात थैमान घातलेलं होतं. गतस्मृतीचा चित्रपट मनचक्षूसमोर सरकत जात होता.

एकदा शामरावदादा बैलं चारुन संध्याकाळी घरी येत होता. त्याला एका झाडावर पतंग लटकलेली दिसली. ती बहुदा कटलेली, यवतमाळवरुन उडत आली असावी. त्याच्या हातात पतंग पाहून मी आतूर झालो. मला देवून म्हणाला,

‘मांजा, केशवच्या धुर्‍याच्या सागावर पडला आहे. सकाळी घेऊन ये.’

मी सकाळी मांजा आणायला गेलो. तो खूप लांबच लांब या झाडावरुन त्या झाडावर तोरण बांधल्यासारखा पसरलेला होता. सर्व मांजा मी काडीला गुंडाळून घेतला. बरेच दिवस ती फाटेपर्यंत गोठाणावर जाऊन उडवत होतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडण्यापूर्वी बहुदा सर्व आंबे उतरवून घेतल्याने कोंबडीसारखे खुडूक होवून जात. पाऊस पडल्यावर आम्ही पोरं अशा झाडांजवळ फिरत होतो. एखाद्यावेळेस पानाच्या मागे आंबा लपलेला दिसायचा. तेव्हा मोठे हरखून जात होतो. मग झाडावर चढून किंवा एकामागे एक दगडं फेकून पाडत होतो. ह्याच आंब्याच्या कोयी पावसाळ्यात उगवून आल्यावर त्याची पुंगी बनवून गावभर वाजवत फिरत होतो.

बरबड्याला जातांना सागरगोट्याचा काटेरी वेल होता. त्याच्या फळाला बारीक काटे होते. त्यातून सागरगोट्या काढायचे म्हणजे दिव्यच काम. सागरगोट्याबाबत म्हणत, ‘वरचे टरफल काटेरी, आत मात्र सागरगोटा.’ मग मनात यायचं की संसार पण असंच असेल, नाही का? ‘वरून वादावादी, आतून आत्मीयता !’

लांडग्याच्या वावराच्या धुर्‍यानं मी परसाकडे जात होतो. तिकडे ज्येष्टमधाचा वेल होता. त्या वेलीला लागलेल्या लाल रंगाच्या गोलसर आकाराचे सुंदर दिसणारे गुंजा तोडत होतो. तसेच वेलाच्या काड्या व पाने खाल्ल्यावर तोंडाला सूरस चव यायची.

थोडी रात्र झाल्यावर वटवाघळं झुरर्कन इकडून तिकडे व तिकडून इकडे उडत जायचे. आम्ही पोरं तुराट्या हालवत त्यांना पाडायचा खेळ खेळत होतो.

सुखदेवच्या घराजवळ बोरीचं झाड होतं. बोरं पिकल्यावर आम्ही पोरं त्यावर चढत होतो. हातापायाला, बोटाला काटे जरी बोचत असले, अंगातला कपडा जरी फाटत असला, तरी त्याची फिकीर न करता पिकलेले व गाभूळलेले बोरं शोधून खाण्यात मोठी मजा वाटत होती. तासनतास झाडावर राहण्याचा आमचा उद्योग चालायचा. त्या झाडाच्या खाली पडकी विहीर होती. त्या विहिरीला पाणी नव्हते. ती कचरा काडीने अर्धवट बुजवलेली होती. कधीकधी त्या विहिरीत उडी घेऊन मजा-मस्ती करत होतो.

एकेवर्षी कुणीतरी खोडकर व्यक्तीने या झाडावर अधरवेल आणून टाकली होती. ती हळूहळू पसरून पूर्ण झाडाला वेढा घातला होता. ह्या वेलाची गोष्टच निराळी ! तिला पाने फुले नसत. नुसती बोडकी. पिवळ्या रंगाची, बारीक दोरीसारखी ! एखाद्या झाडावर लहानसा तुकडा जरी टाकला, तरी ती इतकी झटपट पसरते की काही दिवसातच ती झाडाला पूर्णपणे वेढून घेते. फार चिवट. लवकर मरत नाही. म्हणून कुणाला त्रास द्यायचा असला म्हणजे खेड्यात उपद्रवी लोक या वेलाचा हमखास उपयोग करीत.

गुलाबदादाची बायको म्हणजे पार्वतीवहिनी, मला दिराच्या नात्याने थट्टामस्करी करायची. त्याच्या घराजवळच्या चिंचेच्या झाडाखाली आम्ही कधीकधी पत्ते, भक्क्यात पैसे टाकण्याचा खेळ खेळायचो. कधी सागरगोट्या, चिंचोके तर कधी पळसाच्या पापड्याच्या चापट बिया – ज्याला आम्ही पैसे म्हणत होतो, ते खेळायचो.

चिंचेच्या कोवळ्या बाराची चटनी करुन खात होतो. झाडावर चढून गाभुरलेल्या चिंचा पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटायचं. त्याची बोटकं चोखून खाण्यास मोठी मजा वाटायची.

वाल्ह्याच्या आंब्याच्या खारीतल्या पाराजवळ दगडाचे देव मांडले होते. त्याच्याजवळ लाकडाचा झेंडा रोवला होता. आम्ही पारावर बसून पोळ्याच्या करीला गंजिफा खेळत होतो.

दगडाची निंबूच्या आकाराएवढी गोल गोळी ढोपरानं ढकलत भक्क्यापर्यंत नेणारा खेळ खेळत होतो. भोवरा फिरवण्याचा आणखी एक खेळ खेळत होतो. तो जमिनीवर फिरायला लागला की त्याला बोटावर उचलून हाताच्या पंज्यावर फिरवत होतो. हे कौशल्य सर्वांनाच जमत नव्हते. मी मात्र सरावामुळे या खेळात चांगलाच तरबेज झालो होतो. आम्ही मुलं आणखीन तीरकामठीचा खेळ खेळत होतो.

आणखी देवळाजवळ कबड्डीचा व खोखोचा खेळ खेळत होतो. माझ्या घरासमोरील देवळाजवळ त्यावेळचा ढब्बू व भोकाचा पैसा भक्क्यात टाकण्याचा खेळ खेळत होतो. तसेच कांचेच्या गोळ्या भक्क्यात टाकण्याचा खेळ खेळत होतो. माझा नेम बर्‍यापैकी होता. म्हणून मी दोन्ही खेळात जिंकत होतो. माझ्यापेक्षा धनपालचा नेम अचूक होता. जमीन ओली असली की आम्ही मुलं लोखंडी कांब जमिनीत खूपसण्याचा खेळ खेळत होतो.

ज्ञानेश्वरच्या घराजवळ उंचच उंच वाढलेलं जुनाट लिंबाचं झाड होतं. उन्हाळ्यात त्याचे पाने झडून जात. मग झाडावर सहज चढता येत होतं. त्या झाडावर कावळ्याच्या घरट्यातील अंडे पाहण्यासाठी मोठी उत्सुकता वाटायची. झाडावर चढतांना कावळ्यांची जोडी कावऽऽ कावऽऽ कल्ला करीत, माझ्या भोवताल घिरट्या मारत. डोक्यावर टोचणे मारण्यासाठी अगदी जवळ जवळ येत. कदाचित कावळे म्हणत असतील, ‘आम्ही काडी काडी जमा करून घरटी बांधतो, अन् तुम्ही लोक आमचे घरं उध्वस्त करता?’ काय म्हणून…?

कावळ्याच्या घरट्यात कोकीळा अंड टाकतात, असं मी पुस्तकात वाचलं होतं. म्हणून कोकीळेचं अंड आहे की काय ते पाहण्याची मोठी उत्कंठा लागायची. कावळा तसा चतुर पक्षी समजल्या जातो. पण त्यालाही ही कोकिळा फसविते, म्हणजे फारच झालं ! त्याला त्याच्या चतुरपणाचा गर्व चढू नये म्हणून निसर्गाने असा डाव रचला असेल, काय सांगता येते?

लभान तांड्याकडे जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूला विस्तीर्ण पसरलेलं पिंपळाचं झाड होतं. उन्हाळ्यात जुने पाने झडून किरमिजी रंगाचे नवीन पाने येत; तेव्हा हे झाड सुंदरतेनं नटलेलं दिसायचं.

हे झाड म्हणजे जसं जूनं-जाणतं माणूस घरात असलं म्हणजे कसं सुरक्षित वाटतं, तसेच या झाडाकडे पाहिले की आम्हाला वाटायचं. या झाडाने गावातले दोन समाज विभागून टाकले होते. झाडाच्या पलीकडे लभाणतांडा तर अलीकडे बौध्दपूरा ! या झाडाला कोणाचाही भेदभाव नव्हता. जसे त्यांना सावली द्यायचा, तसेच आम्हाला पण द्यायचा.

पाखरं झाडावर बसून गुणगुणत, लालझुरूक फळांचं आस्वाद घेत. दुपारी उन्हाच्या चटक्यापासून स्वत:चं रक्षण करीत. गुरंढोरं सावलीत दाटीवाटीने बसत. आम्ही पण मस्तपणे खेळत होतो. त्यामुळे हे झाड जणू काही मायेचं छत्र धरून उभं आहे, असंच वाटायचं. याच झाडावर संध्याकाळच्या वेळी पाखरांचे थवेच्या थवे किलकिलाट करतांना पाहून अंधार पडण्याची जाणीव अस्वस्थ करीत असे. रात्र झाल्यावर मात्र त्यांचा गोंगाट एकाएकी बंद झाला की गावात किर्र अंधार शांतता पसरायची.

अशा प्रकारच्या आठवणीच्या तंद्रीत मी धुंद झालो असतांना, अचानक कुणीतरी झोपेतल्या माणसाला खलंखलं हालवून ऊठवावं, तसं मला झालं. मी तंद्रीतुन जागा झालो. पाहतो तर भलामोठा साप सळसळ करत चालला होता. माझं सर्वांग शहारुन गेलं !

हाताच्या कवेत मावेल अशा दगडाला जोर लाऊन ढकलून पाहण्याचा मला छंद जडला होता. कारण त्याच्या खाली एखाद्यावेळेस विंचू तर कधी इंगळ्या तर कधी गोमी दिसायच्या. मला त्यांची फार भीती वाटायची. असं काही दिसलं की अंगावर सरसरून काटा यायचा. तरीही त्यांना पाहण्याची मोठी ओढ दाटून यायची. शेतात गेलो की तेथेही असेच उगीच दगडं ढकलून काय काय जीवजंतू वास्तव्य करतात, ते पाहण्याचा उद्योग करत होतो.

विंचू नांगी वर करून चालतांना, तिच्या हालचालीकडे डोळ्यात तेल घालून पाहत होतो. एखाद्या वेळी गाफील असतांना अनकुचीदार सुईसारख्या काट्याने डंख मारला तर…? बापरे… किती भयानक आग ! चोवीस तास पर्यंत विष उतरत नाही. मग बारीकशा काडीने पकडून, इकडून-तिकडे व तिकडून-इकडे उगीच करत, त्याचेशी खेळत राहण्यात मोठी मजा वाटायची. शत्रूला आपण कसं खेळवतो, असा तो अघोरी आनंद होता !

एकदा विंचू इवलासा पिल्लाला पाठीवर बसवून चालत असतांना मला मोठी गंमत वाटली. ‘विंचूच्या पाठीवर बिर्‍हाड’ अशी म्हण का पडली; याचा अर्थ कळायला मला वेळ लागला नाही. म्हण काही का असेना, आम्ही जसं खाचर, वखर नाहीतर डवर्‍यावर बसून डावडाव करीत होतो, तसंच हे पिल्लू पण मस्तपणे मजेत डावडाव करीत असल्याचं पाहून मला हेवा वाटत होता.

एखाद्यावेळी वाळलेला विंचू दिसायचा. त्याला जीवच नसायचा. अशा टोकरलेल्या विंचूबाबत मी ऐकले होते की माय जेव्हा पिल्लाला जन्म देते; तेव्हा तिचे पिल्लेच तिला खाऊन टाकतात. म्हणूनच ‘इंचू जंदला अन् टोकर झाला’ म्हणतात. मला वाटायचं, व्वा रे… विंचवाची जात, अशी कशी? जी माय जन्माला घालते, तिलाच खाते !

मी एकदा उन्हाळ्यात झाडं-झुडपं पाहत खरोल्याच्या जंगलापर्यंत गेलो. तेथे टेंभराच्या झाडावर पिकेलेले फळे तोडण्यासाठी चढलो. हाफपॅंटच्या खिशात मावेल इतके टेंभरं तोडले. मी खाली उतरतांना नजरेसमोर लाल-झुरुक इंगळी खॊडावर दिसली. त्याच क्षणी उडी मारली. बापरे…! चावली असती तर…? मी त्या कल्पनेने इतका घाबरुन गेलो की मला दरदरुन घाम फुटला ! अंगावर सरसरुन काटे उभे झाले. असं म्हणतात की इंगळीत बारा विंचवाचे विष असते. म्हणजे किती जहरी असेल, नाही !

दगडाच्या खाली गोमी दिसल्यावर घाबरून जात होतो. गोमीला अनेक पाय, इतके की एखादा पाय तुटला, तरी गोमीचं काही बिघडत नाही, अशी म्हण आहे. ही गोम चावली की खूप आग होते, म्हणतात. पण कुणाला चावल्याचे मी कधी पाहिलं नाही. एकदा मोहाच्या झाडावर समोरच साप दिसला होता. असे जीवावर बेतणारे काही प्रसंग येऊन गेले होते. त्या आठवणी उफाळून आल्या की अजूनही पोटात भीतीचा गोळा उभा राहतो.

आता मला घरी जाण्याचे वेध लागले. मी डोंगरावर आलो, तेव्हा डोक्यावर सूर्य होता. आता डोंगराच्या सभोवताली गवसणी घालत असतांना सूर्य कधी मावळतीला गेला, ते कळलेच नाही. असं वाटे की सूर्य कधी बुडूच नये. कारण सूर्य बुडायला लागला की उदास, गंभीर, काहीशी उग्र आणि भीतीदायक छाया परिसरात पसरलेली दिसायची.

पाहता पाहता सूर्य पूर्णपणे लुप्त झाला. जणू काही त्याला काळोखाने गिळून घेतले… आमचं सारं गाव अंधारात गुडूप झालं. संध्याकाळचा गार वारा वाहू लागला.

मी गावात पदार्पण केलं की माझं मन आनंदाने फुलून यायचं. या गावाबद्दल मला एक प्रकारचं अवर्णनीय असं प्रचंड आत्मीयता व प्रेम वाटायचं. हे जरी खरं असलं; तरी त्याचीही दुसरी काळी बाजू होती. त्याची आठवण झाल्यावर माझं मन उदास, कावराबावरा होत होतं.

मी डोंगरावर बसलो होतो; तेव्हा हे गाव दुरून साजरंच दिसत होतं. पण गावात आल्यावर जातिभेदाचा शाप असल्याची तीव्र जाणीव झाली. लभानजात आमच्या जातीचा बाट करीत. त्यामुळे आमची मानहानी होत होती. मन विषन्न व्हायचं. तळमळ, तडफड, मनस्ताप व्हायचा नुसता !

मी ज्या गावात जन्म घेतला, अंगाखांद्यावर खेळलो, लहानाचा मोठा झालो, माती-चिखलाने पाय रंगले, नखशिखांत चिंब भिजलो असं ते गाव जातीभेदाने दुभंगलं होतं. कुजून गेलं होतं. अमानवी जाती-भेदांच्या कचाट्यात सापडून धर्मव्यवस्थेच्या रोगट संस्कारामुळे बाटोडं झालं होतं. ही गोष्ट माझ्या संवेदनशील मनाला सतत टोचत राहत होती.

 

 

 

Tag Cloud

%d bloggers like this: