मी आणि माझ्या आठवणी


कथा दुसरी – जातीची गुंतावळ

 

जशी प्रत्येक गावात जातीची गुंतावळ असते, तशीच आमच्याही गावात होती. आमच्या गावाचं इतर गावापेक्षा एक ठळक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे येथे फक्त दोन जातीचे लोक राहत. अर्धे बौध्द व अर्धे बंजारी…! तिसर्‍या जातीचं एकही घर नव्हतं.

बौध्द म्हणजे पूर्वाश्रमीचे महार ! हिंदू धर्माच्या अस्पृश्य जातींपैकी एक जात ! महत्वाची कामे इतर जातीच्या वाट्याला गेल्यावर उरलेली पडेल व वेठ्बिगारीचे कामे या जातीच्या वाट्याला येत. त्यामुळे प्रत्येक गावाला महाराची गरज भासायची. म्हणूनच ‘गाव तेथे महारवाडा’ अशी म्हण पडली असावी. इतर गावांप्रमाणे आमच्याही गावाची वस्ती गावकुसाबाहेर खालच्या बाजूला होती. वरची म्हणजे सूर्य ज्या बाजूने निघते ती आणि खालची म्हणजे सूर्य ज्या बाजूला बुडते ती ! सूर्याचे पहिले किरण स्पृश्यांच्या वस्तीवर पडले पाहिजेत, म्हणजे ते शुध्द राहतील. किरणं जर अस्पृश्यांच्या वस्तीवर पडून मग त्यांच्या वस्तीवर पडले तर ते बाटून जातील. असा तो विचित्र प्रकार !

गावात दोन जाती जरी असल्या तरी त्यात पोटजाती पण होत्या. त्यामुळे जातीची ही गुंतावळ आणखीनच खोलपणे गुंतल्या गेली होती. आमच्या जातीतील कुटुंब लाडवान, बावणे आणि बारके या पोटजातीत विभागल्या गेले होते. लाडवनात प्रादेशिक स्तरावर माहुरे, झाडपे, हिंगणघाटे असे प्रकार होते. ह्या लोकांचे आपसात सारे व्यवहार होत; पण जात रिवाजाप्रमाणे सोयरिकी मात्र होत नव्हत्या. लग्न हे फक्त पोटजातीच्या अंतर्गतच करावे, असे कडक बंधन होते. नाहीतर त्याच्या घराला जातीच्या बाहेर टाकल्या जात होते. त्यामुळे हा नियम तोडायला कोणाची हिंमत होत नव्हती.

हीच प्रथा बंजारा जातीत देखील होती. गावात राठोड, चव्हाण, पवार, तुरी, आडे, जाधव व नाईक या आडनावाचे कुटुंब राहत. राठोड हे कोल्हा, भूकीया, रातळा, खाटरोत, चव्हाण हे पालत्या तर पवार हे झरपाला पोटजातीत येत. ज्यांचे लग्न इतर पोटजातीत जुळत नाहीत, त्यांना तुरी किंवा आडे ह्या आडनावाचे चालत. म्हणूनच मोठ्या आडनावाच्या समुहातून या दोन आडनावाला वेगळे काढण्यात आले होते. जाधव आडनावाचे बहुदा कारभारी राहत. नाईक आडनावाचा व्यक्ती तांड्याचा नायक राहायचा. राठोड आडनावाचे उच्च समजल्या जात.

बंजारी लोकांची संस्कृती, रितीरिवाज, पेहराव, बोलीभाषा, सणवार सगळं काही बौध्दापेक्षा वेगळंच होतं. माणसांचा पेहराव जरी आमच्या लोकांसारखा असला तरी  बायांचा मात्र ठसठशीत उठून दिसेल, असा वेगळाच होता. त्या घागरा किंवा लेहंगा घालत. हा घागरा इतका घेरदार की संकटकाळात त्यात एखाद्या व्यक्तीला लपविता येत होतं, असे म्हणत. लहान लहान आरसे असलेली चोळी किंवा कंचोळी घालून छातीचा पुढील भाग झाकलेला, तर मागील भाग पूर्णत: उघडा असलेला, डोक्यावर रोवलेले दोन शींगे, त्यावर खालपर्यंत लोंबलेली चुनरी किंवा ओढणी असा पेहराव असायचा. त्या कपाळावर, हनुवटीवर व हातावर गोंदवून घेत.

या बायांना दागिन्याची भारी हौस ! कानाच्या दोन्ही बाजूंना कानशिलावर सोडलेल्या केसाच्या बटांना चांदीसारख्या धातुचे दागिने, हातात हातभरुन पांढर्‍या बांगड्या, बोटात आंगठ्या, पायात पितळेचे किंवा तांब्याचे तोडे, नाकात मोठ्या आकाराची नथ, गळ्यात हार, डोक्याला मध्ये भांग, केसाच्या मागच्या बाजूला लोकरीचे लहान लहान गोंडे, असे त्या विविधतेने सजायच्या. म्हणूनच स्त्रियांच्या वेशभूषा व पेहरावावरून हा समाज सहजरीत्या ओळखल्या जात होता.

ही जमात गो-पूजक असल्याने माणसं आपल्या नावात शेवटी ‘सिंग’ असा सन्मानजनक शब्द लावत. त्यामुळेच आमच्या गावात हरसिंग, रामसिंग, चंदूसिंग, भदूसिंग अशा नावाचे लोक होते. बाया डोक्यावर दोन शींगे रोवून त्यावर ओढणी अडकवत, हे त्यामुळेच !

पहिल्यांदा सासरी जाणारी मुलगी तांड्यातील नातेवाईकाच्या घरोघरी जाऊन रडण्याचा कार्यक्रम करीत. त्या एकमेकींचा गळा धरुन, ’याडी… हं… हिय्या…’ असे आर्त स्वरात रडत. तेव्हा ते करुणेनं ओतप्रोत भरलेलं दृष्य पाहून माझंही मन ओघानेच हेलाऊन जात होतं.

सुनांना सासरी जाच होत होता, असे लोक सांगत. एव्हढेच नव्हे तर सासू-सासरे सुनांकडून हात-पाय चेपून घेण्याची परंपरा असल्याचे सांगत. अशा छळवणुकीच्या कथा सासरी गेलेल्या मैत्रिणीकडून ऐकल्याने पहिल्यांदा सासरी जाणार्‍या मुली फार घाबरत. म्हणूनच त्या केविलवाणी रडत.

एकदा एक मुलगी सासरी जाण्यासाठी बैलगाडीत बसतच नव्हती. मोठ्या मुश्किलीने गाडीत बसल्यावरही ती गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले होते.

त्यांच्या लग्नातल्या गमती-जमती सांगण्याजोग्या आहेत. नवरदेवाची भारी मजा करीत. त्याला कोयपरावर बसवून आंघोळ घालीत. आंघोळ झाल्यावर त्याच्या समोर एक माणूस येरणी – मातीचं पसरट भांडं, त्याच्यासमोर झुलवत. ती फोडल्यावरच त्याची त्यातून सुटका होत असे.

नवरीला कुणाच्या घरी लपवून ठेवत. नवरदेव बिचारा, तिला हुडकण्यासाठी डफडं वाजविणार्‍या ढाल्यासोबत फिरत राही. त्या डफड्याचा कडकडाट पूर्ण गावात उमटत असे.

या लोकांना लभानी, गोरमाटी किंवा गोरबंजारा असेही म्हणत. गो म्हणजे गाय, र म्हणजे रक्षण किंवा राखण करणे, बनज म्हणजे व्यापार. म्हणून बनजारा म्हणजे व्यापार करणारा. पुढे या जमातींनी बैलांच्या पाठीवर सामानाची ने-आण करण्याचा धंदा सुरु केला.

जसे रीतिरिवाज, सणवार, पेहराव आमच्यापेक्षा वेगळे, तसेच त्यांची भाषा पण वेगळीच…! गोरबोली…! आमच्या येटाळातील लोकांना त्यांची भाषा समजत होती. काहींना बोलतादेखील यायचं. मला सुध्दा समजत होती. काही वाक्य बोलतही होतो. पण तेवढं सराईतपणे बोलता येत नव्हतं.

ते आमचा बाट करीत. त्यांच्या भांड्याला किंवा खाण्याच्या वस्तूला शिवू देत नसत. घरात येऊ देत नसत. त्यांना जर नाईलाजाने चहा किंवा पाणी द्यायचे असले, तर त्यांचेकडे आमच्यासाठी वेगळी फुटकी कप-बशी व जर्मनचा गिलास ठेवलेला असायचा.

ते आमच्याकडे आले की काहीही पीत नसत, की खात नसत. त्यांना आम्हाला शिवी हासडायची असली की ‘धेड’ म्हणत. हे शब्द आमच्या कानावर तप्त गोळ्याप्रमाणे आदळायचे. पायाची आग मस्तकात जायची, इतकी चीड या शब्दाची वाटत होती !

आम्हाला होस्टेल मध्ये जेथे जेथे बंजारी मुले असायचे, त्यांचेकडून असा जातीभेद जाणवला नाही. आमच्याही गावात नंतरच्या काळात मात्र हा बाट कमी कमी होत गेला.

एकदा गावात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम होता. त्यावेळी बंजारी समाजाचे तिवसा गावाचे मनमोहन राठोड यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. एक बंजारी व्यक्ती बाबासाहेबांचे गाणे म्हणतो, यावर विश्वास बसत नव्हता. पण खरोखरच जेव्हा त्यांनी पुढार्‍यांच्या भाषणानंतर भीमगिते व बुध्दगिते गायीले; तेव्हा मला अचंबा वाटला.

त्यांनी ह्या गाण्याशिवाय ‘सेवालाल महाराज की जय’ म्हणत ‘सेवाभाय आणि मरयम्मा याडी’ यांच्या जीवनावर, नागडा, थाळी व झांज वाजवत परंपरागत पध्दतीने बंजारी गीत गायिले; तेव्हा अख्ख वातावरण उत्साहाने आणि चैतन्याने भारून गेलं होतं. हा कार्यक्रम पाहायला लभाण लोकांसहित सारा गाव उलटला होता.

त्यांच्या भजन मंडळाचे लोक, शामरावदादा – त्यावेळी गावाचा सरपंच व समाजाचा पुढारी असल्याने, आमच्या घरी चहा-पाणी घ्यायला आले होते. त्यात गावातील केशव व आणखी काही बंजारी सुध्दा आले होते. ह्या दोन जातीच्या मनोमीलनाचा माहौल पाहून जणू काही जातीभेदाच्या भिंती तटातट तूटत आहेत की काय असा भास होत होता.

बंजारा समाजात लोककथा आहे की भगवान बुध्दाच्या काळात तपसू आणि भल्लिक हे दोघे व्यापारीभाऊ बैलाच्या ताफ्यासह तांडा घेऊन जात असतांना भगवान बुध्द तपश्यर्या करीत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी भगवान बुध्दाला सुकामेव्याचा आहार दिला. भगवान बुध्दांनी त्यांना दिक्षा दिली व ’ताडो, शिळो कर’ असा आशिर्वाद दिला.’

’ताडो, शिळो कर’ याचा अर्थ, ’तुमचे दु:ख कमी होवो.’ असा आशिर्वाद देण्याची प्रथा आजही बंजारा समाजात प्रचलित आहे. म्हणून हा समाज बौध्द धर्मीय असावा, असा निष्कर्ष निघतो.

असं म्हणतात की, बंजारी लोक मुळत: निसर्गाची पूजा करीत. सूर्य आणि पृथ्वीचे पूजक होते. नंतरच्या काळात मात्र देव-देवी पूजायला लागलेत.

आमच्या घरासमोर मारुतीचे देऊळ होते. त्याची देखभाल करण्यासाठी खास व्यवस्था केलेली होती. त्याला देवस्थान म्हणत. त्याचे सभासद गावातील शेतकरी होते. माझेही बाबा सभासद होता. देवस्थानाच्या मालकीचं वावर कुणीतरी मक्त्या-बटईने वाहून देवाच्या खात्यात पैसा जमा करीत. या पैशाचा वापर शेतकर्‍यांना व्याजाने कर्ज देण्यासाठी करीत. मग पैशाचा विनियोग देवळाची देखभाल आणि धार्मिक कार्यक्रमासाठी करीत.

अशीच व्यवस्था शाळा व मुलांच्या शिक्षणासाठी केली असती तर…? त्यामुळे शिक्षणाचे लोन खेड्यापाड्यात सर्वदूर पसरले असते, नाही का…? पण नाही…! मग लोकांना अडाणी, देवभोळेपणा व अंधश्रद्धेत कसे गुंतून ठेवता आले असते?

देवळाच्या गाभार्‍यात देव म्हणून मोठा दगड ठेवला होता. त्याला मारुती म्हणत. त्याची पूजा करायला हरसिंगलभान धोतर नेसून, उघड्या अंगाने दर शनिवारी सकाळी यायचा. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळचं बोट नेहमी सरळ राहत असे. ते कधी वाकत नव्हतं. त्याच बोटाने तो खायच्या तेलात शेंदूर भिजवून दगडाच्या देवाला चोपडायचा. मग नारळ फोडायचा. खोबर्‍याचा लहानसा तुकडा तेथे ठेवायचा. बाकी ’शिरणी’ म्हणून वाटायचा. मी लहान असतांना शिरणी खाण्यासाठी घुटमळत राहत होतो.

धनपत नावाचा राजपूत जातीचा अनाथ माणूस हरसिंग लभानाच्या घरी राहून गाई-ढोरांचे शेण-मूत काढत होता. तो तोतरा बोलत होता. तो मारुतीला धुण्याचं व दिवा लावण्याचं काम नित्यनेमाने करत होता. तो भाकरी मागून आणायचा व देवळात काला करून खायचा.

आमच्या येटाळातील कोणीही देवांची पूजा करीत नसत. बाबासाहेबांनी बौध्द धम्म दिला, तेव्हापासून देव पूजणे सोडले. तसेही देव बाटते म्हणून आम्हाला देवळात येऊ देत नसत. आम्ही पोरं – कोणी नाही असं पाहून गाभार्‍यात जात होतो. देवाला हात-पाय लाऊन मुद्दाम बाटवत होतो. वर बांधलेल्या घंटीला लटकून झोके घेतांना लाथा मारत होतो. असे करतांना देवाची यत्किंचितही भीती वाटत नव्हती.

मी एखाद्यावेळी दरवाज्यावर उभा असलो की कुत्र देवळात शिरलेलं दिसायचं. मी त्याच्या हालचालीकडे पाहत राहायचो. तो इकडे-तिकडे हुंगत हळूच मागची टांग वर करून देवावर धार सोडायचा. मला मोठं विचित्र वाटायचं. तो दगड म्हणजे देव आहे; हे त्या कुत्र्याला का कळत नाही? ठीक आहे, कुत्र्याला एकवेळ कळत नसेल, पण देवाला तरी त्याचे हे प्रताप का दिसत नव्हते? म्हणूनच मला त्याच्या देवपणाबद्दल शंका येत होती.

पूर्वी याच देवळाच्या पारावर आमच्या येटाळातील लोक देवाचे भजनं करीत. कोणीतरी साधू एकतारी तंबोर्‍यावर भजनं म्हणत. त्यात लोक तल्लीन होवून जात. गोविंदामामा पोथी वाचायचा. बौध्द धम्म घेतल्यावर भजनं व पोथीवाचन सोडून दिले. त्याची जागा भीम-बाबा व बुध्दाच्या भजनांनी घेतले.

मला आठवते, एकदा मोहल्ल्यातील सारे लोक जेवणखाण करून झोपले होते. सारा गाव सामसूम झाला होता. अशा वेळी कुत्रे अचानक ओरडायला लागले. त्यावेळी निवडणुकीचा माहौल होता. बाबासाहेबांच्या हत्तीचा प्रचार करण्यासाठी बाहेरून पुढारी आले होते. तेवढ्या अर्ध्यारात्री त्यांनी दादाला आवाज दिला. दादा खडबडून जागा झाला. त्याने समाजाच्या लोकांना बोलावून याच पारावर मिटिंग घेतली होती. मी पण डोळे चोळत, कावराबावरा होत मिटिंग संपेपर्यंत बसलो होतो.

बंजाराच्या मोहल्ल्याला ‘तांडा’ आणि प्रमुखाला नायक म्हणत. रुपसिंग त्यावेळी नायक होता. त्यांचा उपप्रमुख म्हणजे ’कारभारी’. हा ’कारभारी’ पांडू होता. गावात जसा कोतवाल गावकीचे कामे करतो, तसाच तांड्याच्या कामासाठी ’ढाल्या’ असायचा. तो तांड्यातील उत्सवात डफळी वाजवायचा. तांड्याचा नायक व कारभारी यांचा तो भाटासारखा गुणगौरव करायचा. त्याला नीच कुळातला समजत.

तांड्यात जात पंचायत घोंगडीवर बसत असे. म्हणून घोंगडीला मोठा मान होता. ढाल्या सर्वांना बिड्या व आगपेटी द्यायचा. त्या ओढल्यानंतर पंचायत सुरु व्हायची. जोपर्यंत न्याय-निवाडा होत नाही, तोपर्यंत उठता येत नसे. मग रात्र झाली, तरीही तेथेच खाणे, पिणे व झोपणे अशा क्रिया पार पाडावे लागत. नायक उठला की पंचायत संपत असे.

माझे बाबा सांगत होता की, ‘हे लोक चोर्‍या-मार्‍या करीत. धनगर बकर्‍या-मेंढ्या घेऊन आलेत की त्या चोरत. कुणाच्या शेतातील कणसं, कापूस चोरत.’ मात्र इतिहासात असा उल्लेख आहे की ही जमात मुळची राजस्थानची. ब्रिटीशपूर्व काळात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा बैलाच्या पाठीवर गोणी लादून या गावचा माल त्या गावाच्या व्यापाराला पोहचविण्याचं काम करीत. बैलांना चारा मिळावा म्हणून डोंगर-जंगलात राहत. इंग्रजांनी जेव्हा चोरटी जमात म्हणून सेटलमेंटच्या तीन तारेच्या कुंपणात डांबायला लागले, तेव्हा ते जिकडे तिकडे पांगलेत. गावोगाव भटकू लागलेत. गावाच्या पाटलाकडे हजेरी देणे बंधनकारक केले. कालांतरांनी ते स्थायीक झालेत.

शहरातील सधन सावकार विशेषतः ब्राम्हण-मराठे-भाटी कर्जाची फेड थकविल्यामुळे खेड्यातील गरिबांचे वावरं गिळंकृत करीत. मग ते कुळाने, मक्त्या-बटईने त्यांनाच वाहायला देत. असेच गावातील बरेच लोक कुळाने शेती वाहत होते. बंजारी लोक सुध्दा याच प्रकारे दुसर्‍यांच्या मालकीच्या शेती कसत होते. तसे हे लोक खूप कष्टीक. नंतर कुळकायदा निघाला. ‘कसेल त्याची जमीन’ या कायद्यामुळे कुळधारक शेतमालक झाले. कित्येक वर्षापासून जमीनदारांनी कष्टकरी माणसाला सालदार, महिनदार, रोजंदार, कुळधारक म्हणून वेठबिगार बनविले. ते या प्रथेतून मुक्त झाले.

या समाजाचा समावेश भटक्या जमातीमध्ये होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या रेट्यामुळे, इंग्रजांच्या काळातील गोलमेज परिषदेच्या अथक प्रयत्‍नामुळे व त्यानंतर त्यांनी स्वतंत्र्य भारताच्या संविधानात तरतूद केल्यामुळे मागासवर्गियांना शिक्षणामध्ये सवलती व नोकरीमध्ये राखीव जागांचा फायदा मिळाला. तसाच या समाजाला सुध्दा मिळाला. परंतु प्रस्थापित समाज व्यवस्थेने बाबासाहेबांचे हे कार्यकर्तृत्व त्यांनाच काय, बौध्द समाज सोडला तर कुणालाच कळू दिले नाही.

म्हणूनच जातीची गुंतावळ तोडण्याचं महत्वाचं काम कुणी केलं असेल तर ते खर्‍या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषानेच !  ही गोष्ट  कधीतरी त्यांना कळेलच…!

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: