मी आणि माझ्या आठवणी


कथा सातवी – शाळेसाठी पायपीट

 

आमच्या गावात शाळा नव्हती. दीड कोसावर निळोणा गावाला चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा होती.

एकदा बबन गुरुजी आमच्या गावात आले. त्यावेळेस मी खेळत होतो.

‘अरे इकडे ये… तुझं नाव काय?’ गुरुजींनी मला विचारले.

‘हे माह्या हातावर लिवले आहे.’ कोणी माझे नाव विचारले की माझ्या उजव्या हातावर गोंदलेले नाव दाखवायला मी हुरळून जात होतो.

‘रामराव…?’

‘हो…’

‘शामरावचा भाऊ  का?’

‘हो.’

‘चल तुझ्या घरी.’ माझ्यासोबत खेळणारे मुलेही माझ्या मागेमागे आलेत.

‘याला शाळेत टाकता का?’ गुरुजींनी बाबाला प्रश्न केला.

‘लहान आहे. त्याचा हात पाठीमागून कानाला लागत नाही जी…’

‘त्याची जन्म तारीख माहीत आहे?’

‘नाहीजी… कोणाला माहीत? पण तो शिरीकुष्णदेव जलमला त्या वक्ताचा आहे.’ आई म्हणाली. म्हणून माझे पाळण्यातले नाव ‘श्रीकृष्ण’ व दुसरे नाव ‘रामराव’ ठेवले, अशी आई सांगत होती. पण पुढे ‘रामराव’ हेच नाव प्रचलीत झाले.

‘बरं, कोतवाल बुकात नाव असेल तर पाहून घेईन. उद्यापासून येऽरेऽ शाळेत. चांगले कपडे घालून ये.’ माझ्या मळकट कपड्याकडे व शेंबड्या नाकाकडे पाहून गुरुजी म्हणाले.

मी मान हालवून ‘हो’ म्हणालो. गुरुजींनी गावातील आणखी काही मुलांचे नाव टाकून घेतले.

तेव्हापासून मी निळोण्याच्या शाळेत जायला लागलो. ही शाळा बबन गुरुजींचे वडील – पां. श्रा. गोरे यांनी आणली होती. ते मुळचे निळोण्याचे, पण नोकरीसाठी यवतमाळला स्थायिक झाले होते. ते थोर कवी व साहित्यिक होते. त्यांची ‘कात टाकलेली नागीन’ ही कादंबरी निळोण्याच्या परिसरावर-ग्रामीण जीवणावर लिहिलेली होती. त्यांची एक कविता चौथ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला होती.

‘उठुनी गृहिणी लगबगा, सडा सर्माजन करीत राहतात.

मोट सुटली बैल मोकळे झाले, गडी सारे एकत्र जमुनी आले.

बसुनी वाहत्या कडेला, सोडू लागले न्याहरी… ही त्यांच्याच कवितेतील ओळ आहे.

त्याशिवाय त्यांची हृदयाला भिडणारी कविता म्हणजे ‘विटंबना’. त्यातील काही ओळी आठवतात.

‘डोळे पाठपोठ एक सोसता उपास, घातला ना मुखी कुणी उष्टा घास,

पाणी साखरेचे तोंडात टाकता, मेल्यावर मला काय रे लाजवता?

होता या कुडीत जोवरी हा जीव, केली न त्याची मनी कुणी कीव,

जित्यापणी गोडी मनात नसता, मेल्यावर का रे बंधन तोडता?’

खरेच आहे ! जीवंतपणी कोणी विचारत नाहीत; पण मेल्यावर मात्र त्याच्या तोंडात पाणी टाकतात. ही जगाची रीत पाहून मला का रे लाजवता? अशी ती मृत व्यक्ती भावना व्यक्त करते. अशी कविवर्य पां.श्रा.गोरे यांनी मांडलेली वास्तवता थक्क करून जाते.

शिक्षणाच्या बाबतीत लोकांची ओढ कमी असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी असायची. म्हणून गुरुजींना आजूबाजूच्या खेड्यावर जाऊन विद्यार्थ्यांची जुळवाजूळव करण्यासाठी अतोनात परिश्रम घ्यावे लागत होते. त्यांच्या अथक प्रयत्‍नामुळेच आमच्या पुढील शिक्षणाचा मजबूत पाया रचला गेला. त्यामुळे खरंच, त्यांचे उपकार न विसरण्यासारखे आहेत.

आमचे गुरुजी एकटेच, पहिली ते चौथ्यावर्गापर्यंत शिकवीत. ते पांढर्‍या रंगाचं शर्ट, पैजामा व पांढरीच टोपी घालत. त्यावेळी प्राथमिक शाळेचे सर्वच मास्तर असाच पोषाख घालत असल्याचे दिसत.

आम्ही आठ-दहा मुले शाळेत जायला एकत्र  निघत होतो. त्यात माझी मामेबहिणी चित्राबाई व सुदमताबाई, माझी मोठी बहीण जनाबाई, मुलींमध्ये सरस्वती व मुलांमध्ये भगवान, धनपाल, नाना व बंजार्‍याचे रामसिंग, वामन, वाल्ह्या असे होते.

शाळेत रमत गमत जातांना-येतांना डोळ्यांना सुखावणारा निरव, रंगतदार, रमणीय निसर्ग, आभाळात दाटून आलेले ढग, चिलकीचे व नदीचे झुळझुळणारे-खळखळणारे पाणी, पाना-फुलांनी बहरलेली झाडीवेली-झुडपं, मस्तीत उडणारे-बागडणारे, सुरेख आवाजात गुंजन करणारे व झाडांच्या फांद्यावर हवेच्या झोतात झुलणारे पक्षी पाहतांना आम्हाला खूप मजा यायची. आम्ही एखाद्या उंडाळणार्‍या वासरासारखे  मनमुरादपणे आनंद लुटत, आमच्याच मस्तीत रस्त्याने जात होतो.

आम्ही एकमेकाशी ‘अ’ व ‘ची’ ची भाषा बोलत होतो. ‘मला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला…म’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला…म’ म्हणत होतो. ही विचित्र भाषा बोलतांना आम्हाला इतकी सवय झाली होती की आम्ही सहजपणे न अडखडता बोलत होतो.

एकमेकांना कोडी घालत होतो. ‘पाणी नाही पाउस नाही, रान कसं हिरवं? कात नाही चुना नाही, तोंड कसं रंगलं? सांग… सांग… काय…? उत्तर होतं, पोपट…’ ‘अंधार्‍या खोलीत म्हातारी मेली, पाचजण लेक असून दोघांनी नेली. सांग… सांग… काय…? उत्तर होतं, नाकातला शेंबूड…’ असे ते कोडे असत.

आम्हाला शाळेत पोहचायला दिडक तास लागत होता. गावातून पायवाटेने निघालो की लांडग्याचं, किसन्याचं, भगवानचं वावर लागायचं. नंतर बैलगाडीचा रस्ता. रस्त्याच्या डाव्या बाजूला पांडु लभानाचं, उजव्या बाजूला कचरु व लंगड्या चिफसाहेबाचं. खेडूत लोक पोलीसठाण्याच्या साहेबाला चिफसाहेब म्हणत, तसा तो चिफसाहेब होता की कोण जाणे? नंतर वाघाडी नदीजवळचं अवधुतचं वावर लागायचं.

आम्ही मुलं निसर्गसौंदर्य न्याहाळत, डोळ्यात साठवत जात होतो. निरनिराळ्या झाडांचा रंगीबेरंगी मखमली फुलोरा जसे- चिल्हाटीचा गुलाबी, बाभळीचा पिवळा, हिवर्‍याच्या पांढरा मनाला भुरळ पाडत असे. आजूबाजूचा हिरवा शालू पांघरलेला परिसर पाहून आमचे डोळे सुखाऊन जात. एखाद्या सकवार स्त्रीच्या नाजूक छटा या हिरवळीत गुंफल्या गेल्याचा भास व्हायचा. निसर्गाचं असं मुक्त उधळण पाहून चालण्याने आलेला थकवा दूर पळून जात असे. श्रावण मासातला सप्तरंगी इद्रधनुष्य, सूर्य-ढगाचा उन-सावलीचा खेळ आम्हाला मोहरून टाकत असे. आजूबाजूच्या शेतात उन्हां-पावसात, हिवा-दवात कष्ट करणारे शेतकरी-शेतमजूर पाहून आमचा पुढेपुढे जाण्यातला उत्साह दृढ होत असे.

पाहा ना, रंगाच्या किती विविध छटा ! एक हिरवेपणाचं उदाहरण घेतले तर – तुरीचा वेगळा, पर्‍हाटीचा वेगळा, गवताच्या पात्याचा वेगळा, झाडांच्या पानांचा वेगळा ! कुठे गच्च हिरवेपणा, कुठे गर्द हिरवेपणा, कुठे लुसलुशीत हिरवेपणा,  तर कुठे निव्वळ-फिक्कट हिरवेपणा ! गंमतच आहे, नाही !

आम्ही निसर्गाच्या वर्षभर बदलणार्‍या चैतन्यमय स्वरूपाचं मनमुरादपणे आनंद लुटत होतो. त्याच्याठायी शिगोशिग भरलेले व नित्यनेमाने उधळणार्‍या आनंदाच्या पखरणात आमचं मन गुंतून जात असे. शेतात, धुर्‍यावर, डोंगरमाथ्यावर व नदी-नाल्याच्या काठावर उगवलेल्या वनराईच्या पाना-फुलांचा-फळांचा आस्वाद घेतघेत शाळा कणाकणाने जवळ करीत होतो.

कुणाच्या भुईमूंगाच्या वावरात धुर्‍यावरच्या काट्या सरकवून, चोर पावलानं घुसत होतो. मग डहाळ्या उपटून शेंगा रस्ताभर खातखात जात होतो. कधी मुंगाच्या, उडदाच्या, पाटाच्या शेंगा, तर कधी वाळकं, काकड्या तोडून खात होतो. हिवाळ्यात हरभरा व वटाणाचे डुंगे दिसले की आम्ही हरखून जात होतो. मग हिरव्या घाट्यांनी भरलेला हरभरा व वटाण्याचे सोले खायची मोठी मजा येत होती. कधी तुरीच्या तासात शिरुन हिरव्या टर्र भरलेल्या शेंगा ओरबाडून खिश्यात भरुन घेत होतो. मग त्याचे पिवळी फुले आमच्या अंगा-खांद्यावर खेळून धिंगाणा घालत असे. अशा चोरलेल्या पण कष्टाने तोडलेल्या शेंगा ऎटीत, रस्ताभर खात होतो.

रस्त्याच्या काठाला येणाचे, खैराचे, भराडीचे, धावड्याचे, सागाचे, बाभळीचे, पळसाचे, पांजर्‍याचे, चिल्हाटीचे, हिवर्‍याचे, कडूलिंबाचे विविध जातीचे झाडं होते. पण सागाच्या जातीचे जास्त झाडं होते. त्याच्या पानाला घासले की रक्तासारखा घट्ट रस निघायचा.

येणाच्या झाडाला रेशमाचे कोश लटकलेले दिसत. त्याला तोडून आम्ही मखमली सूत काढण्याचा प्रयत्‍न करीत होतो. याच कोशातून फुलपाखरं बाहेर पडत असल्याचे पुस्तकात वाचले होते. धावड्या-बाभळीचा डिंक खायला आम्ही धडपडत होतो. लिंबाच्या झाडाचा डिंक त्याच्या गुणधर्माप्रमाणे कडू लागायचा. तो पुस्तकाचे पाने चिकटवायला वापरत होतो.

झाडावर कधी बसलेले तर कधी उडत असलेले निरनिराळ्या जातीचे, रंगाचे पक्षी पाहण्यात आम्ही गुंग होवून जात होतो. त्यांच्या सुरेख चोचीतून बाहेर पडणार्‍या, लयदार मंजुळ स्वरांनी आसमंत पुलकित झाल्यासारखे वाटत असे. त्यांच्या चमकदार रंगीबेरंगी पंखाचे पिसं पाहून आम्ही मोहीत होवून जात होतो. असं म्हणत की पक्ष्यांना लाभलेल्या विविध रंगाचा उपयोग शत्रूपासुन लपून राहण्यासाठी व जोडीदाराचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत.

कुहूऽऽ कुहूऽऽ असा कर्णमधूर आवाज आला की त्या दिशेने आम्ही धावत-पळत सुटायचो. कारण ही कोकीळा गर्द झाडीत, पाना-फांद्याने बहरलेल्या मोठ्या झाडावर कोणालाही दिसणार नाही – जसं वेलीवर उमललेल्या फुलाचा सुगंध सर्वत्र पसरावा पण ते दिसू नये, अशा अवघड जागी लपलेली असायची. कदाचित आपला काळा रंग जगाला दिसू नये, म्हणूनच ती संकोचीत होती की काय, कोण जाणे? झाडाजवळ गेलं की तिचा आवाज बटन दाबलेल्या रेडीओसारखा एकाएकी बंद होवून जायचा. जसं तिथे कोणीच नाही, असं वाटायचं. पण तिला पाहतो नं पाहतो तर ती क्षणातच भुर्रकन उडून नाहिसी व्हायची, तेव्हा आम्ही अचंबित होत होतो.

एखाद्या झाडावर पोपटाचा थवा टीवऽऽ टीवऽऽ करत बसलेला दिसायचा. झाडाजवळ गेलं की कलकलाट करून उडून जात. तेव्हा ते झाड थरथरत असल्याचं दिसायचं. कधीकधी दुरुनच टकटक आवाज यायचा. जवळ जाऊन पाहिले, तर सुतार पक्षी आपल्या लांब चोचीने झाडाच्या खोडाला टोचे मारतांना दिसायचा. मग आम्ही त्याच्याकडे पाहत थबकत होतो.  निलकंठ पक्षी पाहायला अतिशय सूंदर ! त्याची पोपटासारखी हिरवी हिरवी चोच मन मोहून टाकत असे. एखादं पाखरु शेपटी उंचावून व शेंडी फुगवून आपल्या चोचीतून मंजूळ आवाज काढायचा, शीळ घालायचा, त्याचीच नक्कल करीत आम्ही पण त्याच्या सारखाच आवाज काढून पाहत होतो.

कधीकधी रस्त्यावर सावली धावतांना दिसायची. वर पाहिले तर आकाशात उंच उडणार्‍या घार किंवा गिधाडासारख्या मोठ्या पक्षांची सावली असायची. मग आम्ही सावलीच्या दिशेने उगीच पळत होतो. एखाद्यावेळी टुणटूण उड्या मारत रस्त्याने चालत जाणारं पाखरू दिसलं की आम्ही सुध्दा त्याचेच अनुकरण करीत उड्या मारत चालत होतो. कधीकधी अचानक आमच्या जवळूनच बाटरं किंवा तितर पक्षी – ज्यांना पारधी लोक पकडीत, भुर्रकन थव्याने उडून गेले की आमच्या जिवाचा थरकांप उडत असे.

खोप्यातल्या पिल्लांना पक्षिनी अन्न भरवितांना आम्ही कित्येकदा पाहिलं. त्या पिल्लांना आकाशात भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ यावं; म्हणून पक्षीन अशी करीत होती. तसेच आम्हीही पण उंच भरारी घ्यावी अन् आमच्या अंगात बळ यावं; म्हणून आमचे आई-बाबा आम्हाला शिक्षणरुपी अन्न भरवित होते.

एखाद्यावेळेस मोहाच्या झाडावर घुबड बसलेला दिसायचा. त्याची गंमत अन् भीती पण वाटायची. तो जाग्यावरून किंचितही न हलता आपली मान तेवढी गर्रकन पूर्णपणे फिरवून आमच्याकडे वटारलेल्या मोठ्या डोळ्याने पाहायचा. त्यावेळी सर्रकन अंगावर भीतीचे काटे उभे राहत. आम्ही जिकडे वळायचो तिकडे मान फिरवून तो पाहायचा. मग त्याची भीती वाटणार नाही, तर काय? हा घुबड २७० अंशाच्या कोनात मान कशी वळवतो, हे एक रहस्यच वाटायचं. शिवाय तो म्हणे, लहान मुलांचे कपडे नदीवर नेवून धुतो व झाडावर वाळू घालतो. ते जसजसे वाळायला लागते, तसतसे मुलगा वाळायला लागतो. त्याला दारू पाजली की तो माणसासारखा बोलतो. अशा काहीतरी दंतकथा या घुबडाच्या बाबतीत खेड्यात सांगितल्या जात होत्या. खरं काय नी खोटं काय, कोणी पाहिलं?

रस्त्याच्या कडेला माकोडे घरं बांधण्यात गुंग झाल्याचे दिसत. जमिनीच्या आतून इतकुला मातीचा कण तोंडात धरुन आणीत व बाहेर कणावर कण टाकून ढिग रचत. त्यांचं ते अविरत व सततचं काम पाहून स्तंभित होत होतो. अशाच प्रकारे उदळ्या मोठमोठे वारूळ निर्माण करीत असतील, नाही का?

उन्हाळ्यात रखरखत्या उन्हाच्या काहिलीने सारी झाडांची पाने झडून जात. त्या पानझडीने सारी धरती ओकीबोकी, उघडीनागडी झाल्यासारखी वाटायची. पण त्यातही काही वृक्षांचं नव्या पालवीच्या दागीण्याने सजलेले देखणं रूप मनात भरल्याशिवाय राहत नसे. पळस, पांजरा व काट-सावरीचे झाडं लाल-नारिंगी रंगाच्या फुलांनी बहरुन गेल्याचं अन् बारीकशा पांढर्‍या फुलाने मोहरलेल्या लिंबाच्या झाडाचे मोहक दृष्य पाहून थकलेल्या मनाला नवी झळाळी प्राप्त झाल्यासारखी वाटत असे.

सारेच पाने गळून पडलेले, पोपटाच्या चोचीप्रमाणे फुलांच्या पाकळ्याची ठेवण असलेले, गडद चकाकणार्‍या नारिंगी रंगाच्या फुलांनी भरभरुन वेढलेले पळसाचे झाडे पाहून शिमग्याचा सण जवळ आल्याची चाहूल लागायची. तेव्हा या झाडांचं देखणं रुप पाहून मन कसं रोमांचित होवून जात असे.

काटसावरीची पाच पाकळ्यांची, गडद गुलाबी रंगाची, मखमली स्पर्शाची फुलं मन वेधून घेतल्याशिवाय राहत नसे. त्याजागी आलेले बोंड फुटून कापसासारखे तंतू बाहेर पडून हवेच्या झोताने उडतांना पाहिल्यावर मन मोठं प्रफुल्लीत होवून जात असे. त्याला पकडायला हात सरसावत, तोंडाजवळ आणून फूक मारून दूर भिरकावण्यात भारी मजा वाटत असे. चिलीम ओढण्यासाठी याच काटसावरीच्या कापसाच्या कफाला चकमकीने पेटवून उपयोग करीत.

कुठेकुठे रस्त्याने भोवर्‍यासारखे गुळगूळीत मातीचे भक्के जागोजागी दिसत. त्यात गवताची पाती हळूच टाकल्यावर विसावलेला इवलासा गुबगूबीत हत्ती तोंडाने धरून बाहेर आलेला दिसला की आम्हाला मोठी गंमत वाटत होती. रस्त्याच्या गुळगूळीत मातीत तुरुतूरु चालणार्‍या निरनिराळ्या पक्षांच्या पायाचे ठसे एखाद्या चित्रकाराने नक्षीकाम करावे तसे दिसायचे, तर कुठेकुठे गाई-ढोरांच्या किंवा उनाड पोरांच्या मुताच्या रेघोट्या मातीवर उमटलेल्या दिसत.

कधीकधी वारा-वावटळ किंवा अवकाळी पावसाचे लोंढे रस्त्यात पसरलेला पाला-पाचोळा झाडा-झुडपाच्या बुंध्यापासी नेवून ढीग रचत. त्याचवेळी रस्त्यावरची माती खरवडून नेल्याने कुणाचे पडलेले नाणे अचानक दिसले की काहीतरी घबाड सापडल्यासारखे आम्ही आनंदित होत होतो. कधी आमच्या समोरुन करडा-पिवळ्या रंगाचा व तांबड्या मानेचा सरडा तुरुतूरु धावत येऊन धुर्‍याकडे जातांना दिसायचा. कधी मोठ्या ऐटीत मान खाली-वर करून थांबत थांबत जातांना पाहून आम्हाला मोठी गंमत वाटायची.

एखादी खारुताई – तिला खिराडी म्हणत होतो, ती दोन्ही पायावर उभी राहून आमच्याकडे रोखून पाहत थबकायची व क्षणातच झाडाच्या बुंध्याकडे पळून जायची. तिची चंचलपणा पाहून आम्हाला मोठं नवल वाटायचं. कधीकधी धुर्‍यावरच्या झुडपात आम्ही उगीगच दगडं भिरकावीत होतो. तेव्हा एखाद्यावेळी झुडपातून सुऽऽ सुऽऽ आवाज करीत ससा पळतांना दिसत होता. एकाठिकाणी रांगोळीचा काचेसारखा दिसणारा दगड आम्हाला खुणावत राहायचा. त्याची आम्ही रांगोळी बनवीत होतो.

शनिवारी शाळा सकाळची असायची तेव्हा दुपारी घरी येतांना किसन्याच्या वावरातील आंब्याच्या झाडावर चाप-डुबल्याचा खेळ खेळत होतो. रस्त्याने जास्तीत जास्त दूर कुणाचा दगड जाऊन पडतो, याची आम्ही शर्यत लावत होतो.

पावसाळ्यात कुठेकुठे रस्त्यावर चिखलामुळे घसरण होत होती. कुठे पायाच्या घोट्यापर्यंत तर कुठे टोंगळ्यापर्यंत गाडण व्हायचं. अशा वेळेस धुर्‍याच्या काठा-काठाने किंवा शेतातून नवीन पायवाट तयार व्हायची. असा रस्ता जरी अवघड असला तरीही आम्हाला मजा वाटायची. पाण्याच्या तडाक्याने रस्त्यावरची माती, मुरूम, बारीकसारीक खडे वाहून जात असे. उन्हाळ्यात झाकलेले मोठेमोठे दगडं सताड उघडे पडत. कुठेकुठे लहानमोठे खड्डे पडत. त्यामुळे रस्ता चालण्यालायक राहत नसे. रस्त्यातच चीलक्या तयार होवून प्रवाह तयार व्हायचा. मग चिलकीचे पाणी उडवत आम्ही जात होतो. त्यावेळी आकाशाच्या दिशेने उडणारे पाण्याचे तुषार पाहतांना मंत्रमुग्ध होवून जात होतो.

चिलकीचे पाणी गाडीरस्त्याने वाहत थेट वाघाडी नदीपर्यंत जात असे. हे पाणी धबधब्यासारखं गिरक्या घेत खाली डोबर्‍यात पडलं की पांढराशुभ्र फेस यायचा. तो फुलाप्रमाणे हाताच्या ओंजळीत धरुन फुका मारला की विरुन जात किंवा कोणी जवळ उभं असलं की त्याच्या अंगावर फेकून मारण्याचा चावटपणा करत होतो. कधीकधी वाहत्या पाण्यातूनच चालत जात होतो, दबादबा उड्या मारत होतो, तेव्हा मोठी मौज वाटायची.

पाण्यात पोहणार्‍या बारीक मासोळ्यांच्या मागे आम्ही उगीच धावत होतो. खरं म्हणजे ते बेंडूकाचे पहिल्या अवस्थेतील पिल्ले होते. काही दिवसाने ते अर्धवट बेंडूकासारखे तर अर्धवट मासोळीसारखे दिसत. शेवटच्या अवस्थेत शेपटी गळून पूर्ण बेंडूकाचा आकार दिसायचा; तेव्हा हा क्षणोक्षणी होणारा बदल आम्हाला मोठा चमत्कारीक वाटायचा. कधीकधी लहान-मोठे आकाराचे खेकडे दिसत, तर कधीकधी सळसळत पोहत जाणारा साप पण दृष्टीस पडायचा. तेव्हा आमच्या अंगावर सर्रकन काटे उभे राहायचे. पाण्यामध्ये सूर मारून नजर फिरत नाही तर झटकन इकडचे-तिकडे फिरणारे टनक कवचाचे पाणबुड्या किटकाची पोहण्याची कला पाहून थक्क होवून जात होतो, तर विंचवासारखा दिसणारा पाणकिडा पाहून अंग शहारल्यासारखे होत असे.

पावसाळ्यात बरेचदा भिजण्याची पाळी यायची. मग घरी येईपर्यंत ओल्या कपड्याने कुडकुडत राहत होतो, तर भिजलेल्या कपड्याने वर्गात बसावे लागत असे. पावसाने भिजू नये म्हणून आम्ही सागाच्या झाडाच्या फांदीच्या दोन मोठ्या पानाला काही पाने जोडून छत्रीसारखा आकार देऊन डोक्यावर धरत होतो. कधीकधी वाघाडी नदीला पूर येत असे. तेव्हा पूराचा भर उतरेपर्यंत तासनतास नदीच्या काठावर थांबावे लागत असे. नदीत उतरतांना काठावरील निसरड्या रस्त्याने घसरुन पडतो की काय, अशी भीती वाटत असे.

हिवाळ्यात सकाळी थंडीने कुडकूडत शाळेत जावे लागे. त्यावेळी माझे हातपाय उलत होते. इतके की त्यातून रक्त निघायचं. कुणी म्हणायचे, वायजाळ झाला. घरा-दारात, दिवस-रात्र शेण-चिखल व माती-गागर्‍याशी सामना असतांना  हात-पाय उलणार नाही, तर काय होणार?

उन्हाळ्यात पायाला चटके लागायचे, तर उघडे हात-पाय, डोके भाजून निघायचे. पूर्ण शरीरभर घामाच्या धारा वाहत राहायचे. तोंडावर आलेला घाम दोन ओठाच्या फटीतून हमखास तोंडात जायचा. मग तोंड कसं खारट खारट लागून चिक्कट होवून जात असे. घश्याला कोरड पडायची. कधीकधी वावटळीत-गराडात सापडलो की पालापाचोळ्यासारखे आम्ही पण उडून जाऊ की काय, अशी भीती वाटायची. धुळीच्या कणांनी शरीर माखून जायचं, तर डोळे लालबूंद व्हायचे.

हा रस्ता कुठे पायवाटेचा, तर कुठे बैलगाडीच्या-खाचराचा होता. रस्त्यावर विखुरलेल्या बारीक खड्याने आमच्या पायाच्या तळव्याची आग होत होती. कधी अनवाणी पायाला काटे टोचायचे, तर कधी काट्याकुट्याने कपड्याला खोसपे लागून फाटायचे. कधी अंगाला ओरखडे पडून भळभळ रक्त निघायचे.

नदीच्या तीरावर निळोणा गावाची स्मशानभूमी होती. कधीकधी प्रेत गाडतांना किंवा जाळतांना दिसायचं. मग त्याठिकाणी त्याची हमखास आठवण आल्याशिवाय राहत नसे. दिवसा तेवढी नाही; पण अंधार पडला की फारच भीती वाटायची. एखाद्या ठिकाणी दगडं नि काट्या ठेवलेले दिसले की ती जागा गरोदर बाईच्या पोटासारखी फुगलेली दिसायची. म्हणजे तेथे प्रेत नुकतच गाडलं असावं, याची जाणीव व्हायची. मग तिकडे पाहिलं नं पाहिल्यासारखे करुन भरभर पाय टाकत आम्ही तेथून निघून जात होतो.

नदीच्या पलीकडे निळोण्याच्या शिवारापर्यंत रस्ताभर गोटेच गोटे होते. ह्या गोटाळ रस्त्याने जातांना मोठी कसरतच करावी लागे. केव्हा तोल जाऊन खाली पडेल याचा नेम नव्हता. एखाद्यावेळी बेसावध असतांना कित्येकदा पाय ठेचाळत होता. एकदा ठेच लागली की परत परत त्याच दुखर्‍या अंगठ्यालाच ठेच लागायची, हे विशेष ! मग आम्ही रक्तबंबाळ अंगठ्यावर मुताची धार सोडत होतो. नाहीतर कंबरमोडीच्या पाल्याचा रस टाकत होतो. मग चिंधीने बांधून घेण्याशिवाय  दुसरा कोणता उपाय आमच्याकडे होता?

गावाजवळ हागदोडी लागत होती. नाकपुड्या दाबल्याशिवाय घाण वासाला रोखता येत नव्हतं. त्यामुळे दम कोंडल्यासारखं व्हायचं. एखाद्यावेळी शाळेच्या घंटीचा आवाज ऎकू आला की आमची मोठीच धावपळ व्हायची.

असे हे काट्याकुट्याचे, लहान-मोठे दगडाचे, चढउताराचे खडबडीत रस्ते, उन्हा-तानात, पाण्या-पावसात, हिवा-दवात दप्तर-पाटीचे ओझे घेऊन पाय तुडवत शाळेत जात होतो. असे ते शाळेचे दिवसं आठवले की मन त्या आठवणीत हरवून गेल्याशिवाय राहत नाही. असा हा आमच्या शिक्षणाचा मार्ग खडतर व खाचखळग्याने काठोकाठ भरला होता. .

 

 

Advertisements

Comments on: "कथा सातवी – शाळेसाठी पायपीट" (1)

  1. शांताराम ठोंबरे said:

    खूप छान

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: