मी आणि माझ्या आठवणी


कथा दहावी – काय करत होता गा देवा…?

 

माझा मोठेबाबा, पांडू याच्या घराकडे जातांना चिंचेचं झाड लागत होतं. हे झाड खूप वयस्कर होतं. त्याच्या फांद्या जणू काही पक्षाने पंख पसरल्यासारखे विस्तीर्ण दिसत होत्या. हे झाड सदासर्वदा हिरव्याकंच बारीक पानाने गच्च भरलेले दिसायचं. तो बाराने नखशिखांत मोहरून जायचा. त्याच्यावर लोंबलेल्या चिंचा ठसठशीत दिसायच्या.

हे झाड म्हणजे आम्हा मुलांना खेळण्याचं व लोकांना बसण्याचं एक सार्वजनिक ठिकाणच होतं. मस्त करमत होतं तेथे ! या झाडाच्या जवळून पांढरी गावाकडे जाणारा रस्ता म्हणजे पांदण ! मोठेबाबा गावाचा कोतवाल. तो मेलेले ढोरं याच पांदणीने ओढत ओढत नेत होता. दशरथमामाच्या गोटाळी-वावराच्या मोंढ्यात कातडं सोलून घ्यायचा. मग यवतमाळला नेऊन विकायचा. त्याच्या भोवताल जमा झालेले कुत्रे, कावळे व गिधाडे, हे सारे आगंतूक पाहूणे खाद्यावर ताव मारण्यासाठी वाट पाहात.

कुत्र्यांना एकमेकांवर वसकतांना व भांडतांना पाहून मला मोठं नवल वाटत होतं. सारे मिळून गोडीगुलाबीने का खात नाहीत? शेवटी कुत्रेच ते…! त्यांची जातच तशी… नाही का? पण गिधाड म्हणजे निसर्गातील सफाई कामगारच !

पूर्वी आमच्या मोहल्ल्यातील लोक मेलेल्या ढोराचं मांस आणण्यासाठी सुरे, टोपले घेऊन जात. जेवढ्या डल्ल्या खाता येईल तेवढ्या खात. ऊरलेल्या दोरीवर वाळवून खुला करून ठेवीत. मी अगदी लहान असतांना आठवते की बाबा वाडीत दोरीवर मांस वाळवत ठेवायचा. मग त्या भाजून खात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की, ‘मेलेलं ढोर ओढू नका. त्याचं मांस खाऊ नका.’ त्यांनी मळलेल्या वाटा सोडून नव्या वाटेने जायला सांगितले. नव्या वाटा जरीही खाचखळग्याचा व खडतर होत्या, तरीही समाज उन्नतीकडे वाटचाल करायला शिकला होता. मोठेबाबाने नंतर कोतवालकी सोडली. बरबड्याच्या काशा होलाराने कोतवालकी धरली.

आम्ही मुले झाडाच्या खाली व फांद्यावर दमछाक होईपावेतो खेळत राहायचो. झाडाचा बार तोडून चटणी करुन खात होतो. गाभुरलेल्या चिंचा खाण्यात वेगळीच मजा यायची.

चिंचेच्या खोडाजवळ तेल-शेंदूर माखलेले दगडं एका रांगेत ठेवले होते. हे दगडं म्हणजे गावाची ‘मातामाय’ देवी ! एकदा अज्याप तापाने खूप फणफणला होता. त्याला गोवर निघाला होता. आई ताटात पूजेचं सामान: हळद, कुंकु, हिरव्या बांगड्या, पिवळा कपडा, पिवळा दोरा, काळ्या रंगाचा करदोडा, लाकडाची फणी, लाकडाचं बाहुलं, नारळ, दह्या-दुधाचं बोणं व कापसाच्या वातीचा दिवा घेऊन मातामाय जवळ आली. सोबत माझी बहिण जनाबाई पण होती.

ह्या देवीला रक्ताची चटक लागली होती. तिला लावलेलं शेंदूर व कुंकू म्हणजे रक्ताचं प्रतीक ! तिच्या समोर कोंबडे व बकरे कापत. तिची पूजा करतांना आईने एक बांगडी कचकण फोडली. फुटलेल्या काकणाने स्वत:च्या छातीला ओरपली. चिरलेल्या जागेतून रक्त वाहू लागलं. ते रक्त बोटावर घेऊन आईने मातामायच्या दगडावर शिंपडून चोपडलं. आईने तर स्वत:चं रक्तच अर्पण करून तिची भूक भागवली. ते दृष्य खरोखर अंगावर शहारे आणणारं होतं ! माझ्या डोळ्यापुढे अंधारीच आली ! आपला मुलगा आजारातून बरा व्हावा; म्हणून स्वत:ला जखमी करुन घेणं हे कृत्य खरोखरंच आईच्या जगतात अनोखं असंच उदाहरण असेल, नाही का? देवीचं व्रत धरलं की केस विचरता येत नाही. अंगणात सडा टाकता येत नाही. अशी कशी ही देवी जिला स्वच्छतेचं इतकं वावडं होतं !

आईने एक गोष्ट सांगितली. ‘माहा शामराव पोटात होता. त्यावेळी यात्रा-जत्राचं भारीच वेड होतं. देवाचं दर्शन घ्यायचं. कबूल केलेला नवस फेडायचं. शेतातला माल-टाल निघाल्यावर हातात दोन पैसे खुळखूळत. त्यातून यात्रेच्या बाजारात खरेदीची हौस भागवायची. मी व तुहा बाबा कोटेश्वरच्या यात्रेला पायी-पायीच मजल दरमजल करत निघालो.

कोटेश्वर देवस्थान आपल्या गावापासून दहा-बारा कोसाच्या पलीकडे होतं. मधात वाकी गावाला धुरपताबाई – तुही आका, हिच्या घरी मुक्काम केला. आम्ही कोटेश्वरला पोहोचलो, तेव्हा अंधार पडला होता. मंदिराच्या आवारात जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. आम्हीही त्या पंगतीत बसलो. कुणीतरी आम्हाला कोणत्या जातीचे म्हणून विचारले. आम्ही ‘महार’ असल्याचं सांगितल्यावर हातातली काठी उगारुन म्हणाला, ‘महारड्यानो, तुम्ही पंगत बाटवली. ऊठा येथून नाहीतर पाठ सोलून काढीन.’ त्यायच्या भीतीने आम्ही मंडपाच्या बाहेर आलो.

थोड्यावेळाने धुवांधार पाऊस सुरु झाला. मग आमचे हाल पाहवत नव्हते. भरपावसात उपासीपोटी ती रात्र कशी-बशी जागून काढली. थंडीने अंगात हुडहुडी भरली होती. पण त्या कोटेश्वरात कोटी-कोटीने ठाण मांडलेल्या एकाही देवाला आमची किव कशी आली नाही? असा प्रश्न मनात उमटत होता. ’आईने सांगितलेल्या अशा अनेक गोष्टीत तिने सोसलेल्या दु:खाचे दाहक चटके व असह्य मनोव्यथा ऐकून माझ्या उरात उमाळा दाटून येत असे.

त्यावेळी खेड्यात कॉलरा, पटकी, देवी, प्लेग असे अनेक साथीचे रोग येत. त्यात लोक पटापट मरत. बाबा अशीच एक गोष्ट सांगत होता. ‘त्या वर्षी गावात मरगड आली होती. उलटी, हागवणीने लोक पटापट मरत. एकाला उचललं की दुसरा मरुन तयार राहायचा. मयती उचलायला लोक घाबरत. त्यातच पांड्याची नवरी म्हणजे माही भावजय पण मेली.’

मला आठवते, गावामध्ये देवीची साथ आली होती. त्यात दादारावचे दोन मुले एकाच वेळेस मेले. अनुसया वहिनी – तुळशीरामदादाची बायको, हीला पण देवीच्या आजाराने घेरलं होतं. कपडा अंगाला चिकटतं म्हणून तिला लिंबाच्या पानावर झोपवत. यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात तिला नेले होते. ती वाचली. पण लभान तांड्यात बरेच मुलं मरण पावले. कारण ते दवाखान्यात इलाज न करता देव-देवींच्या मागे लागले होते. आमच्या घराच्या समोरील देवळात कोंबडे, बकर्‍यांचा बळी देण्यापूर्वी पूजा करण्यासाठी घेऊन येत. मग खारीत नेऊन कापत. हे पाहून मला वाटायचं की खरंच देव कोंबड्या-बकर्‍यांचा बळी मागत असेल का, की हे माणसेच आपल्या खाण्यापिण्याची सोय करीत असतील !

एकदा बंजारा बाईच्या अंगात भूत आल्याचं कळल्यावर मी सुध्दा उत्सुकतेपोटी पहायला गेलो. तेथे गोविंदा – वार्धक्याकडे झुकलेला, पांढरी लांब दाढी वाढलेली, त्याला दाढ्यासाधु म्हणत, तिला पळसाच्या फोगाने मारत तोंडाने काहीतरी बडबड करत होता. ते दृष्य पाहून अंगावर काटे आले. ती बाई जीवाच्या आकांताने रडत होती. तिचे हातपाय थरथर कापत होते. माराच्या भीतीने ती अंग चोरुन घ्यायची. तिला काहीतरी आजार झाला असावा. पण भूत-खेत उतरवण्याच्या पायी तो तिचे हाल करत होता. ते न पाहवल्यामुळे मी घरी परत आलो.

एकदा वावरातून येतांना लभान बाईला साप चावला. रस्त्यात टोंगळभर गवत वाढलेलं. त्यामुळे रस्ता झाकून गेला होता. अंदाजाने चालतांना तिच्या पायाला साप चावला. ती घरी आली. घरच्यांनी दाढ्यासाधुला बोलावीले. त्याने साप उतरविण्याचा प्रयोग सुरु केला. तिचा पाय सुजला होता. शरीर काळे-निळे पडत चालले होते. तोंडातून फेस येऊ लागला होता. परंतु त्याच्या मंत्राला काही यश आले नाही. मी घरी आलो न आलो, तर रडण्याच्या करुण किंकाळ्याचा आवाज माझ्या हदयाला येऊन भिडल्या. ती बाई मरण पावली, हे कळून चुकलं. खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याने तिचा घात झाला. तसंही तिला दवाखान्यात न्यायची सोय नव्हती, म्हणा…! योग्य उपचाराअभावी तिचा अनाठायी जीव गेला. ही गोष्ट माझ्या तरल मनाला फार चाटून गेली होती.

एकदा बाबा रात्रीला बरबड्याच्या शेतातून घरी आला. त्याला घामाघूम झाल्याचं पाहिलं. मी विचारलं. ‘बाबा, तुम्हाला एवढा घाम का आला?’

‘अरे, मला बरडाजवळ आगिचा लोळ उठलेला दिसला. म्हणून मी घाबरुन पळत आलो.’

त्यावेळी भयान रात्र होती. दिवसा सूर्य आग ओकत होता. म्हणून दिवसभराच्या उष्णतेने जमीन किंवा जमिनीत असलेले धातू तापले असावेत. त्यामुळे अंधार्‍या रात्रीत उष्णता बाहेर पडत असल्याने कदाचित आग दिसत असावी. असं काहीतरी वैज्ञानिक कारण मी बाबाला सांगितले होते.

त्यावर्षी आमच्या शेतात भुईमूंग पेरला होता. त्यादिवशी संध्याकाळी दादाने मळ्याजवळ शेंगा भाजल्या. एक अनोळखी व्यक्ती धनपाल सोबत भाजलेल्या शेंगा खात असतांना मी पाहिलं. मी हळूच धनपालला त्या अनोळखी व्यक्ती बद्दल विचारले. त्याने सांगितले की,

‘तो भगत आहे. मामाच्या गावावरून आला. आपल्या गावात एक बाई करणी करते नं म्हणून तिला वेसण घालण्यासाठी आणलं.’

ही बातमी घरोघरी पोहचल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी धनपालच्या घरी जत्राच भरली होती. मी पण कुतूहलापोटी गेलो होतो. त्याच्या घरी देव्हारा मांडला होता. तो लाकडी पाटावर उभा राहून डोळे वटारुन पाहत होता. धोतर खोचलेला व अंगात बंडी घातलेला. डोक्याचे लांब केसं मोकळे सोडले होते. कपाळाला कुंकू व हळद माखली होती. मी आदल्या दिवशी पाहिलेले रुप व आताचे रुप काही वेगळेच दिसत होते. तो अचकट-विचकट तोंड करुन अख्खा निंबू तोंडाने फोडून रस पीत होता. ‘जय मातामाय’ ओरडून कमरेचा वरचा भाग एका लयीत घुमवत होता. त्याचं ते रौद्ररुप भयानक वाटत होतं. त्याच्या भोवताल बाया जमल्या होत्या. प्रत्येकीकडे जर्मनच्या ताटाची आरती, त्यात कुंकू, तेलाचा दिवा, उदबत्त्या व चिल्लर पैशाची नाणी ठेवलेले होते. कोणी म्हणत मुल-बाळ होत नाही. कोणी म्हणत बिमारी बसत नाही. असं प्रत्येकजणी आपापले गार्‍हानी घुमणार्‍या देवासमोर मांडीत होत्या.

माझ्या वहिनीने वनिताला आणले होते. वनिता अगदी लहान होती. तिचे पोट फुगले होते. हातपाय बारीक झाले होते. तिची अनेक वेळा दीठ काढली. पण काही उपयोग झाला नाही. खेड्यात काही झालं की दोन तीन मिरच्या अंगावर ओवाळून चुलीतल्या जाळात टाकत. ठसका नाही लागला की, ‘दिठच होती बाप्पा’ असे म्हणून दीठ निघाल्याचं समाधान चेहर्‍यावर झळकवीत.

तिला बाबाने गावठी झाड-पाल्याचं औषधपाणी देऊन पाहिलं. तिला सरकारी दवाखान्यात नेलं. तरी तिचा आजार काही केल्या बसत नव्हता. म्हणून वहिनी भगताकडे घेऊन गेली. भगताने सांगितले की, ‘गावातल्या बाईने तिला ‘करणी’ केली. मातामायला दहीबोणं घेऊन जा. उपवास कर. कोंबडं काप.’ असाच इलाज तो जसा इतर बायांना सांगायचा, तसाच वहिनीला सुध्दा सांगितला.

भगताचा हा सारा प्रकार पाहून मी थक्क झालो. मला तिथे विरोध करण्याची हिंमत झाली नाही, पण घरी आल्यावर वहिनीला बोलल्याशिवाय राहावलं नाही.

‘वहिनी, ह्या भगताचं ऐकून वनिता काही बरी होणार नाही. कोणत्याही रोगावर औषधीचा उपचार करावा लागतो. तो नुसतं मातामायची भक्ती व कोंबडं कापायाला सर्वांनाच सांगतो. प्रत्येक रोगावर हाच इलाज कसा? असं जर असतं तर सरकारने दवाखाने न काढता नुसते मातामायचे देव्हारे गावोगावी मांडले असते. म्हणून आपला वेळ, पैसा व शक्ती खर्च करण्यात काहीही अर्थ नाही. आपल्या अवतीभवती निसर्गात ज्याकाही घडामोडी होतात, त्यामागे कोणते तरी कारण असते. ते समजणे आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्याने दैवी चमत्कार वाटतो. आपल्या अज्ञानाचा फायदा भगत लोक घेतात. आता भगताच्या मागे लागू नको. वनिता औषधानेच बरी होईल.’ असे काहीतरी विचार मी तिला सांगितले होते. माझ्या वाचनाने मलाही थोडंफार ज्ञान अंधश्रद्धेबाबत अवगत झालं होतं.

सुरेभानने मोईतूराची बायको केली होती. जवान होती ती ! त्याच्या पहिल्या बायकोचं नाव राधा. हिलाही राधाच म्हणत. तशी ती नखरेल वाटत असल्याने बाया तिला नावं ठेवीत. ती सुरेभान सारख्या गरीब व भोळ्याभाबड्या माणसासोबत खरेच संसार करील काय, अशी शंका घेत. म्हणूनच ती अंगात देवी येण्याचं नाटक रचून ढोंग करीत होती. गावातील लोक तिला ’पिसी’ म्हणून चिडवित. ती जेव्हा घुमायला लागायची, तेव्हा तीचे घुमणे मोठ्या कुतूहलाने पहात होतो. तिच्या भोवताल गावातल्या बाया जमा होत व काहीबाही विचारीत. ती घुमता घुमता हिंदी भाषेत बडबड करायची. आम्हा मुलांना तिची अनामिक भीती वाटायची. पण मजा सुध्दा यायची. खरोखरच, एके दिवशी ती पळून गेली.

आमच्या गावात दसर्‍याच्या दहा दिवस आधी कोतवालाच्या घरी ‘इनाई’ बसवत. ही एक गावदेवी होती. शेतातून बाया गाणं म्हणत माती आणायच्या. त्याची इनाईदेवीची मूर्ती बनवीत. दहा दिवस रोज तिची पूजा करीत. दहाव्या दिवशी तिला नदी-नाल्यात शिरवायला घेवून जात.

‘माही लाडाची गवरा, थालीभर पाणी नेजाजी…

माही झोपेची गवरा, तिला उशी मांडी देजाजी…

माही भुकेची गवरा, संग शिदोरी नेजाजी…’

असे गाणे म्हणत. म्हणजेच त्यावेळच्या अज्ञानी समाजात काव्य किती प्रगत होतं, याची प्रचिती येते. शहरात इनाईदेवीच्या हातात विणा असलेलं वाद्य मी पाहिलं होतं. या विण्याचे भोक्ते म्हणजेच त्याकाळचा कलावंत असलेला महार-मांग समाज होता, असंही म्हणता येईल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ‘लेवण्याचा’ ठेका बामणाकडे असेल, पण गाण्या-बजावण्याचं वेड मात्र महाराला होतं. म्हणूनच ‘मान घे मानाई, महाराघरची इनाई’ या खेड्यातील म्हणीवरुन महारांची कलासक्ती आणि त्यांचं गाण्याशी नातं निर्देशित करते.

दसर्‍याच्या दिवशी मी त्याकाळी भयानक प्रकार पाहिला. भुरा कोतवालाच्या घरून हल्याला वाजतगाजत हरसिंग लभानाच्या घरी नेत. त्याला त्याबाबतीत मान होता. तो पूजा करून हल्याच्या मानेवर धारदार सुरा मारायचा. मग रक्तबंबाळ झालेल्या हल्याला कोतवालाच्या घरी आणत. लोक त्याच्या मानेतून निघणार्‍या रक्ताचे आपल्या घराच्या भिंतीवर हाताच्या पंजाची छाप उमटवित. त्यामुळे घरात रोगराई येत नाही, असा समज होता. नंतर हल्याला कापत व हिस्से पाडून शिजवून खात. किती अघोरी प्रकार होता हा ! अशाप्रकारे गावातील लोक अंधश्रध्देत आकंठ बुडालेले होते.

मी लहान होतो. त्यावेळची गोष्ट आहे. मला चांगलंच आठवते. उन्हाळ्याचे दिवसं होते ते. गावातील लोक रात्रीचे जेवण आटोपून नुकतेच झोपेच्या आहारी गेले होते. काळाकुट्ट अंधार पसरला होता. मध्येच सार्‍या कुत्र्यांचं एका सुरात इरावनं सुरु झालं. त्यांचं इरावनं भीतीदायक वाटत होतं. आम्ही अंगणात झोपलो होतो. डोळ्याला डोळा लागतो न लागतो तर इतक्यात जिकडे तिकडे गलबला उठला. लोकांचा एकदम कल्ला, विस्तवाचा तडतड आणि ठीणग्याचा चट्चट् आवाज ऎकून आम्हीही खडबडून जागे झालो. पाहतो तर घराच्या पाठीमागे आगीचे लोंढेच्या लोंढे आणि धुराचे लोट ऊठलेले दिसत होते. आगीच्या ठिणग्या आकाशाला जाऊन भिडत होत्या. आकाशाचा रंग लालवट आणि धुराने काळवंडल्यासारखे दिसत होते. गवताचे घरं भुरुभुरु जळत होते. लक्ष्मणमावसाच्या घराच्या पलीकडील घरांना आगीने लपटले होते. आधिच पाण्याची टंचाई, त्यात ही आग…! आग विझवायला पुरेसं पाणी नव्हतं. तरीही माणसं-बाया, पोरं हातात जे मिळेल ते साहित्य: बालट्या, गुंडं, चरव्या, मडके, पिपे, गंज, घागरी, टमरेल, चिंपटं, यात होतं नव्हतं तेवढं पाणी घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीत होते. कुणी उगीचच आगीवर माती फेकत होते. तरीही आग काही केल्या आटोक्यात येत नव्हती. वार्‍याच्या झोताने आग आणखीनच वाढत होती. आमचा अर्धा मोहल्ला आगीच्या कचाट्यात सापडला होता. आमचे घर धरून त्या रांगेतील काही घरे वाचले होते.

सकाळी जिकडे तिकडे राख, जळलेला लाकूडफाटा, फुटलेले कौलं, वाकलेले टिनं इतस्तत: पडलेले होते. ते दृष्य पाहावल्या जात नव्हतं. जे काही किटूक-मिटूक घरात होतं, ते सारं जळून खाक झालं होतं.

ही आग आमच्याच समाजाच्या मोहना नावाच्या माणसाने लावली, अशी चर्चा गावात होती. तो दिसायला उंचापूरा, धिप्पाड व चार-चौघात उठून दिसणारा होता.

तो गावात काहीतरी नवीनच घेऊन यायचा. त्याने आणलेल्या वस्तू नवलाईने पाहायला, आम्ही मुले त्याच्या घरी जात होतो. आम्हाला मोठं कुतूहल वाटायचं. एकदा त्याने गाणे वाजवायचा ग्रामोफोन आणला होता. त्याला जोडलेल्या भोंग्यातून गाणे उमटत. आम्हाला मोठी गंमत वाटायची.

तो समाजासोबत न राहता बाबासाहेबांनी दिलेल्या बुध्द धर्माला विरोध करीत होता, असे लोक म्हणत. गावातल्या बाया, ‘आपलंच घर नि हागून भर, असा हा बुहारा मोहना पटकन मरतही नाही.’ अशा शिव्या-शाप देत.

तो लभानलोकांना साथ द्यायचा. समाजातील लोकांनी गावकीचे मेलेले ढोरं ओढण्यासारखे अपमानजनक कामे करणे सोडल्याने लभान लोक चिडून होते. म्हणून ते मोहना सारख्या माणसांना हाताशी धरत.

एक दिवस पंचशील झेंड्याजवळ जात-पंचायत भरली. त्यात त्याला समाजविरोधी कृत्यामुळे जातीच्या बाहेर टाकले होते. म्हणून तो गावातून निघून गेला.

मी यवतमाळला शाळा शिकत होतो; तेव्हा कधीकाळी भेटला की माझी मोठ्या आस्थेने विचारपूस करायचा.

माझ्या मोठ्याबाबाचे पूर्ण घर जळलं होतं. त्याच्या घरी चौरंग पाटावर शेंदूर, तेल लाऊन तुकतुकीत व गोलगोल असलेले पाच दगडं ठेवले होते. त्याला पाच पांडवाचा देव म्हणत. आमच्या जुमळे घराण्याचे पूर्वज त्या दगडाला पुर्वापार पूजत आलेले होते.

त्या दगडाला पाहून मोठ्याबाबाचा मुलगा, बापुरावदादा म्हणाला,

‘आमचं घर जळत होतं, तेव्हा तू काय करत होता गा देवा….? तू का नाही आमच्या घराला वाचवलं…?’ असं म्हणून दादाने देवं उचलले. एका टोपल्यात टाकले व वाघाडी नदीत जावून बुडवून आला. तेव्हापासून आमच्या घरातील सर्व देव पळून गेले, ते कायमचेच !

‘हजारो वर्षापासून आमचे पूर्वज देव पूजत आलेत. जत्रा-यात्रेला गेलेत, उपास-तापास केलेत, पण कोणत्याही देवाने आमची सुधारणा केली नाही. म्हणून तुम्ही हे सारे देव सोडून द्या व आपल्या मुलांना शिकवा. खूप शिकवा.’ असे बाबासाहेब समाजाला शिकवून गेले.

बाबासाहेब म्हणजे आमच्या गावाच्या लोकांचा ‘जीवकी प्राण’!  त्यांच्या शब्दाखातर गावातील लोकांनी देव पूजणे नेहमीसाठी सोडून दिले. त्यामुळेच अंधाराचे जाळे फिटून प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्यात.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: