मी आणि माझ्या आठवणी


‘माह्या नवर्या–ने काही केलं नाहीजी… त्यांना नेऊ नकाजी…’ अशी ती बाई आर्त स्वरात त्या पोलिसाच्या समोर आडवी होत, विनवणी करत होती.
तो पोलिस यवतमाळच्या भर बाजारातून तिच्या नवर्या ला, बैलाचे वेसण धरुन शेतकरी जसा ओढत नेतो; तसा तो घाणेरड्या शिव्या देत, त्याची बखोटी पकडून ओढत नेत होता. त्या बाईची केविलवाणी स्थिती पाहून आम्ही सर्वच गर्भगळीत झालो होतो.
त्या बाईबद्दल मला फार कळवळा होता. कारण मी निळोण्याच्या शाळेत शिकत असतांना आम्हा चौधर्या.च्या मुलांना मोठ्या आपूलकीने प्यायला पाणी द्यायची. कधीकधी तिच्या घरी आम्ही दुपारच्या सुट्टीत भाकरी खात होतो.
आमची शाळा सकाळी ११ वाजता सुरु व्हायची. अन् संध्याकाळी ५ वाजता टनऽऽ टनऽऽ घंटी वाजली की सुटायची. ही घंटी कोलामाचा पोरगा नित्यनेमाने वाजवायचा. एखाद्यावेळेस रस्त्यातच घंटीचा आवाज आला की आमची मोठी धावपळ होत असे.
ही शाळा मारुतीच्या देवळात भरायची. ते दगड विटाने बांधलेलं होतं. आकाराने मोठं होतं. वर टीनं होते. मध्यभागी गाभारा होता. त्यात दगडाचा मारुती देव होता. शेंदराच्या थरामुळे चांगलाच फुगला होता. भोवताल बरीच रिकामी जागा होती. तेथे पहिलीपासून ते चौथी पर्यंतचे वर्ग भरत. हीच आमची शाळा ! ही शाळा जणू काही आमचं दुसरं घरच होतं. गुरुजी म्हणजे कुटुंब प्रमुख आणि मुलं म्हणजे भाऊबंध, असंच वाटत होतं ! आम्ही जमिनीवर तरटपट्टी टाकून बसत होतो. टिनावर पावसाचा टपटप आवाज यायचा. उन्हाने गरम होऊन अंगातून घामाच्या धारा वाहायच्या, तर हिवा-दवात अंगात थंडी भरायची.
गाभार्या त घंटी बांधली होती. शनिवारी मारुतीचा दिवस असल्याने या दिवशी लोक पूजा करण्यासाठी नित्यनेमाने येत. आधिच चोपडे झालेल्या दगडाला तेलात शेंदूर भिजवून अधिकच चोपडे करीत. त्यामुळे तो दगड तुकतुकीत दिसायचा. येतांना-जातांना घंटी वाजवीत. त्यामुळे देवळात आवाजाचा गोंधळच गोधळ राहायचा. पूजा झाल्यावर नारळ फोडत, एक तुकडा देवाजवळ ठेवून दुसरा तुकडा आम्हाला देत. त्यामुळे त्यादिवशी शिरणी खाण्याची मजाच व्हायची.
आमच्या जातीच्या मुलांना गाभार्या.त चुकूनही जाऊ देत नसत. तसं आम्हालाही अनुभवाने माहित झालं होतं की यांच्या देवळात जाऊ नये म्हणून ! कारण आमच्यामुळे देव बाटतो. ‘वाऽऽरे… असा कसा हा बाटणारा देव !’ हे कोडं मात्र उलगडत नव्हतं.
चारही वर्गाला आमचे गुरुजी एकटेच शिकवीत. एका वर्गाला पाढे पाठ करायला तर दुसर्या वर्गाला धडा वाचायला सांगत. तिसर्याब वर्गाला गणिते सोडवायला तर चौथ्या वर्गाला कविता पाठ करायला सांगत. अशी त्यांची कसरत चालू राहायची. मध्येच कुणी खोडी केली, ओरडला, अभ्यास केला नाही; तर त्याच्या हातावर छडी पडायची, पाठीवर धपाटा, नाहीतर पोटाचा चिमटा घेत.
मला एकदाच मार बसला होता. गोष्ट अशी होती की मोहल्ल्यातील सर्व मुलं तुळशीरामदादाच्या घरासमोरील पडक्या घरात खेळत होते. खेळण्याच्या नादात त्यादिवशी शाळेत जायचं राहून गेलं. गुरुजींनी चौधर्या चे मुलं शाळेत का आले नाहीत, म्हणून बंजार्यायच्या मुलाला गावाला पाठवीले. आम्ही खेळण्याचा मनमुरादपणे आनंद लुटत होतो. तेव्हा त्या पोराला पाहून आमची धांदल ऊडाली. काय कारण सांगावे ते कळत नव्हते. प्रत्येकांनी काही ना काही चिठ्ठीत लिहून दिले. मी लिहिले की, ‘कोणीच मुलं आली नाहीत, मग मी एकटाच कसा येऊ?’
दुसर्याग दिवशी शाळेत गेल्यावर गुरुजींनी एकेकाची हजेरी घेतली. खाली पाडलेल्या बोकड्याच्या मानेवर खाटिक सुरी फिरवताना जसे इतर बोकडे तिरक्या नजरेने पहातात; तसेच आम्ही मास्तरकडे व मार खाणार्याक पोरांकडे पाहत होतो.
माझा नंबर आल्यावर डोळे वटारून मला म्हणाले,
‘का रे रामराव….? तू चिठ्ठीत काय लिहिले…? मी एकटाच कसा येऊ…? मलाच विचारतो, कसा येऊ म्हणून?’ असे म्हणत त्यांनी माझे हात छडीने लाल लाल करुन टाकले.
’छडी लागे छमछम विद्या येई घमघम !’ अशी त्यावेळेस म्हण होती. त्यामुळे आम्ही निमुटपणे त्यांच्या छडीचा प्रसाद बाळकडूच्या रुपात घेत होतो. त्यानंतर मात्र मी त्यांच्या हातचा मार कधी खाल्ल्याचं आठवत नाही.
शाळेच्या समोर मैदान होतं. तेथे आम्ही कबड्डी, खोखो, लंगडी, लगोर्याम खेळत होतो. गुरुजी आम्हाला कबड्डी, खोखोच्या खेळाचा सराव तेथेच करुन घ्यायचे. या खेळाने चपळाई, धेर्य, चलाखी व युक्ती असे गुण अंगात भिनते, असे गुरुजी सांगत. गुरुजी कवायती पण तेथेच शिकवीत. आमची शाळा सुटते न सुटते, तर खेळण्याच्या ध्यासाने आमच्या अंगात नुसता उत्साह संचारायचा.
शाळेच्या पाठीमागे परसात लहानसा बगीचा होता. त्यात मोगरा, गुलाब, झेंडू, असे फुलझाडं होते. जवळून वाहणार्या, ओढ्याचं पाणी आणून आम्ही झाडाला देत होतो. शाळेच्या बाजूला चिंचेचं मोठं डेरेदार झाड होतं. त्याच्या भरगच्च दाट सावलीत आम्ही खेळत होतो.
शाळेत लस टोचणारे आले की आमची मोठी घाबरघुंडी उडायची. कुठे पळून जावे की काय, असे वाटत होते. त्यात कधी देवीची तर कधी कॉलर्याचची लस असायची. ते टोचतांना हाताकडे पाहत नव्हतो. भारी आग व्हायची. डोळ्याला भरभरून पाणी यायचं. एकेकाचा नंबर लागत होता. ज्याला टोचले त्याचा रडवलेला चेहरा पाहून बाकीच्यांची पाचावर धारण बसायची. त्यावेळी तो जात्यात तर आम्ही सुपात आहोत, असं वाटायचं. सुई टोचून झाल्यावर गुरुजी मजाक करुन हासवित.
आठ दिवसातून एकदा तरी आम्ही शेणा-मातीने शाळा सारवित होतो.
गुरुजींचे घर यवतमाळला आठवडी बाजाराजवळ होतं. वडगावला खेळायला जातांना ते आम्हाला एक-दोनदा घरी घेऊन गेले होते. म्हणून त्यांचे घर माहित झाले होते.
गुरुजी यवतमाळवरून रोज जाणे-येणे करीत होते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने कधीकधी घरी न जाता शाळेतच थांबत. शाळा सुटल्यावर पैजाम्याचा खालचा टोक गुंडाळून त्याला क्लिप बाधून घेत; तेव्हा आम्ही समजून जायचो की गुरुजी आता जाण्याच्या तयारीत आहेत. मग ते सायकलवर टांग मारून भुर्रकन निघून जात; तेव्हा त्यांच्या पाठमोर्याा आकृतीकडे, सायकलच्या चाकाकडे मोठ्या कुतूहलतेने पाहत दप्तरपाटी पाठीवर घेऊन, आम्हीपण मुलं गावाला जाण्यासाठी घोळक्याने निघत होतो.
परीक्षा जवळ आली की गुरुजी रात्रीची शाळा घेत. अशा वेळेस जास्तीच्या भाकरी बांधून आणत होतो. गुरुजी आम्हाला खेळ खेळायला वडगाव या गावाला बैलगाडीने घेऊन जात. तेथे सर्व शाळेच्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या. गुरुजी या खेळाचे पंच राहत. त्यामुळे आम्हाला मोठा अभिमान वाटत असे.
गुरुजींनी एकदा मानकापूर गावाचे हरिभाऊ गाडगे यांच्या नकलाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या काळात त्यांच्या नकला जबरदस्त गाजल्या होत्या. खेड्यामधे कमालीची पसरलेली निरक्षरता, जातीभेद, शिवा-शीव, अस्वच्छ्ता, अंधश्रध्दा, व्यसनाधीनता, खोट्या रुढी आणि परंपरा इत्यादी अनेक विषयावर ते लोकशिक्षण करीत. त्यादिवशी आमच्या गावाचे लोक कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. माझा मोठादादा, शामराव देखील आला होता. शाळेच्या प्रांगणात स्टेज टाकला होता. रात्रीला कार्यक्रम होता. कार्यक्रमात त्यांनी अनेक नकला सादर केल्या. त्यातील एक नकल माझ्या चांगली आठवणीत आहे. ती म्हणजे केळवालीची…! लुगडं नेसलेली, भांग-पट्टा केलेली, नटखट, हुबेहुब बाईसारखी शोभणारी, काखेत केळाचं टोपलं घेऊन, केळऽवालीऽऽ ओरडत स्टेजवर अवतरली.
‘केळऽवाली…! केळं घ्याऽ केळं… एक आणा डझन…’ असं ती मोठ्या आवाजात म्हणाली. सार्यांंच्या नजरा तिच्यावर खिळल्या. त्याचं बाईचं सोंग पाहून सर्वजण क्षणभर अवाक् झाले.
गुरुजी माझ्यावर फार माया करीत. असा काही कार्यक्रम असला की मला पुढं करीत.
‘केळवाली आली की तू जायचं. तिला एक पैसा देऊन केळ मागायचं.’ गुरुजींनी मला सुचना दिल्या होत्या.
‘मावशीबाई, हे घ्या पैसे. मला एक केळ द्या.’ मी स्टेजवर जाऊन तिला म्हणालो.
‘घेऽऽ रे… माह्या पोरा… कोणत्या वर्गात शिकतो, तू?’
‘चौथीत…’
‘तुहाऽऽ मास्तर कोण आहे रे…?’
‘बबन गुरुजी…’
‘असं होय. चांगला मास्तर आहे.’
मग रडवेला चेहरा करून आर्त स्वरात सांगायला लागली.
‘मी तुह्यासारखाच लहान होती, नं तेव्हा मीपण शाळेत जात होती. पण माह्या लहान भावाला राखण्यासाठी मला शाळा सोडावी लागली. म्हणून माह्यावर केळे विकण्याची पाळी आली.’
समोर बसलेल्या मुलींकडे पाहून म्हणाली. ‘मुलींनो… आपल्या लहान भावाला, बहिणीला राखण्यासाठी किंवा घरच्या, शेती-वाडीच्या कामासाठी शाळा सोडू नका. शिका… खूप शिका… डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे खूप शिका… शिकल्यावर गुरुजीसारखे मास्तर बनता येईल. नाहीतर पटवारी, ग्रामसेवक तरी बनता येईल.’
ते बबन गुरुजींच्याच कुणबी जातीचे होते. तरीही ते बाबासाहेब आंबेडकरांचे गुणगान करायला कचरले नाहीत. नाहीतर निळोण्यातील कुणबी लोक आमचा विटाळ करीत. एखाद्यावेळी त्यांना पाणी मागितलं की दुरूनच आमच्या ओंजळीत पाणी ओतत. बबन गुरुजी मात्र त्यातले नव्हते.
त्यावेळी खेड्यामध्ये मास्तर, पटवारी, ग्रामसेवक हेच मोठे शिकलेले लोक दिसत. म्हणून त्यांचेच नावं समोर येत. त्यामुळेच की काय खेड्यातील मुलांचं शिक्षणाचं ध्येय अगदी मर्यादित राहत. त्यांचं विश्वच तेवढं असायचं. कारण पुढील शिक्षण कसं घ्यावं. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, कलेक्टर कसं बनावं, हे त्याला काहीच कळत नव्हतं.
ती नकलेत हावभाव करुन काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगत होती. त्यात गमती-जमती, हलका-फुलका विनोद असायचा. त्यामुळे लोक खदखदा हसत. तिची नक्कल संपेपर्यंत मला तेथेच बसवून ठेवायची. एक केळ संपले, की दुसरे द्यायची. पुढे बसलेले मुलं माझ्याकडे मिष्किलपणे पाहून ‘मजा आहे तुझी…’ असे डोळ्याने खुणावून आपल्या असुयेच्या भावना व्यक्त करत. मग नकला संपल्यावर तेवढ्या रात्री दादासोबत गावाला गेलो.
एकदा असंच त्यांच्या नकलाचा कार्यक्रम आमच्या गावापासून तीनक मैल दूर असलेल्या पांढरी गावाला आयोजीत केले होते. आम्ही त्यांच्या नकला आधीच पाहिल्याने पुन्हा पाहण्याची उत्सुकता वाढली होती. त्यामुळे आमच्या गावातील बरेच लोक ते पाहण्यासाठी आले होते. मला त्या केळवाली मावशीबाईने ओळखले. तिने त्या नकलेमध्ये मलाच बोलावीले. मग माझी केळं खाण्याची त्यावेळीसुध्दा मजाच झाली होती. तेव्हापासून काही मुलं मला ’केळवाली’ म्हणून चिडवीत होते.
केळावरुन आठवलं, आम्ही गणेशच्या बगिच्यातील जांब चोरुन खाल्ल्याची ती गोष्ट. शनिवारी सकाळची शाळा असायची; तेव्हा आम्ही जांबाच्या बगिच्यात जायचो. त्याला एखादा मुलगा चार आण्याचे जांब विकत मागायचा. ते तोडण्यासाठी त्याला, ‘हे नाही. ते नाही. त्या झाडाचं द्या.’ असे म्हणत दूर आंतमध्ये घेऊन जायचा. मग इकडे लपून बसलेले मुलं जवळच्या झाडाचे अर्धेकच्चे जांब तोडून दप्तरात भरायचे. तो आल्याची चाहूल लागली की हे मुलं धूम ठोकीत. मग रस्त्याने आम्ही ते जांबं मस्त खात खात जात होतो.
त्यादिवशी घरी आल्यावर गाव कसं सुनं सुनं वाटत असे. कारण सारे लोक शेतात काम करायला जात. मग गावात आमचंच राज्य असायचं.
पोमा लभानाच्या आवाराच्या कुपाचे कोवळे कोवळे कारले तोडून आणायचो. सकाळच्या स्वयंपाकानंतर चुलीत गरम गरम राख व निवे राहत होते. त्याच्या हुपीमध्ये बाई कारले भाजायची. त्यात तिखट, मिठ टाकून मस्तपैकी चटणी बनवायची. मग शिक्यात ठेवलेल्या दवडीतील भाकर काढून कारल्याच्या चमचमीत चटणीसोबत खाण्यात काही औरच मजा यायची.
मग आमच्या घरी चित्राबाई, सुदमताबाई, जनाबाई, सरस्वती, चांगोणा, वच्छलाबाई, सिताबाई, लक्ष्मी अशा मुलींचा रंगतदार खेळ सुरु व्हायचा. कधी बाहूल्यांचा तर कधी खेळभांडे, खडे फेकणे, काकणाचा, लगोर्यााचा, टिकरचा असे अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात मुली गुंग होवून जात.
एकदा तर नवरीन-नवरदेवाचा जिवंत खेळ खेळले होते. गमतीचे बाहूला-बाहूली ऎवजी मलाच नवरदेव व एका मुलीला नवरीन बनवून खेळ मांडला होता. आमच्या दोघांचं लग्न लाऊन देण्यात त्या रमून गेल्या होत्या. लग्नानंतरच्या नवरा-बायकोचा संसार आमच्याकडून मांडून घेतला होता. अशी त्या खेळाची मुली मस्त गंमत घेत होत्या.
त्यादिवशी शाळा सुटल्यावर खूप पाऊस आला होता. पाऊस उघडण्याची चिन्हं दिसत नव्हते. त्यामुळे घरी जावे की नाही याच विवंचनेत आम्ही थांबलो होतो. वाघाडी नदीच्या जवळून आलेले लोक नदीला भयानक पूर आल्याचे सांगत होते. रात्र पण वाढत चालली होती. म्हणून आम्ही मामाची शेती सोन्या कोलाम वाहत होता, त्याच्या घरी मी बाई, चित्राबाई, व सुदमताबाई राहिलो होतो. बाकीची मुले आणखी कुठेतरी थांबले होते.
पावसामुळे थंडी पडली होती. हातपाय गारठून गेले होते. कोलामाच्या बायकोने हातपाय शेकण्यासाठी आम्हाला विस्तव पेटवून दिला. तिने दुरुनच जर्मनच्या कळकटल्या ताटात आम्हाला भाकरी खायला दिले. रात्रभर हातपाय गुंडाळून शेकोटीजवळ झोपलो होतो. सकाळी बाहेर ठेवलेल्या फुटक्या कप-बशीत आम्हाला चहा दिला. आमची राहणीमान त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली; तरीही हे लोक आमचा विटाळ का करीत? ते काही समजत नव्हतं. शाळा शिकत असतांना अशाही काही प्रसंगांना आम्हाला सामोरे जावे लागत होते.
आम्ही निळोण्यात पाय टाकला की महारवाड्यातून शाळेत येत होतो. मग येतांना-जातांना सोमा कोतवाल, नामदेवदुध्या किंवा बाईची वर्गमैत्रीन निर्मला असं कुणाकडे तरी पाणी पीत होतो. दुपारी जेवणाची सुट्टी झाली की त्यांच्याकडेच कुणाकडे तरी भाकर खाण्यासाठी जात होतो. शीदोरीचे फडके गावाला जातांना वाघाडी नदीवर धूत होतो.
करंजीच्या झाडाजवळ सोमा कोतवालाचं घर होतं. त्यांच्या घरी दुकान असल्याने त्यांचेकडून गोळ्या, बिस्किट किंवा लेखणी विकत घेत होतो. तो आमच्याशी अतीव जिव्हाळ्याने बोलत असे. शिकणार्याख पोरांबाबत त्याला मोठा कळवळा वाटत असे.
कधीकधी नदीला पूर आला की आम्ही निर्मलाच्या घरी थांबत होतो. तिने एकदा आम्हाला तिच्या शेतात नेले होते. तेव्हा तिच्या शेतात भुईमूंगाच्या शेंगा काढणे सुरु होते. त्यावेळी आम्ही मस्तपैकी शेंगा खाल्ल्या होत्या.
तसं नामदेवदुध्याचं घर शाळेच्या जवळच होतं. तो दुधाचा धंदा करत होता. म्हणून त्याला ’नामदेवदुध्या’ म्हणत. यवतमाळला तो दूघ विकण्यास जात होता. त्याच्याकडे म्हशी पाळलेल्या होत्या. त्याच्या घराशेजारून आम्ही जात-येत असतांना तो नेहमी शेण-मूत काढतांना, चारा टाकतांना किंवा म्हशीच्या अंगावर पाणी टाकतांना दिसायचा. त्याचं घर आतून-बाहेरून पांढर्यात मातीने सारवलेलं व अंगणात सडा टाकलेला असं चकचकीत दिसत होतं. त्यामुळे त्याच्या घराकडे पाहिल्याशिवाय आम्हाला राहवत नसे.
त्याच्या घराचं आणखी एक आकर्षण म्हणजे त्याची बायको. त्याची बायको आम्हाला फार आवडायची. मोठ्या बहिणीसारखी वाटायची. तिच्या वागण्या-बोलण्यातली शालीनता आम्हाला सुखावून जात असे. ती दिसायला काळसावळी, सडसडीत, अन् ऊंचपूरी. नाकीडोळी चरचर होती. पाय झाकेपर्यंत चापून-चोपून लुगडं नेसायची.
तरुणच जोडपं होतं ते ! त्यांच्या घरात खेळणारं-बागडणारं एखादं मुल अद्यापतरी दिसत नव्हतं.
आम्ही पोरं दुपारच्या सुट्टीत भाकरी खाण्यासाठी तिच्या घरी जात होतो. तेव्हा कधीकधी तिचं घर बंद असलेलं दिसायचं. त्यावेळी ती दुरूनच डोक्याच्या दोन्ही बाजूला झुकलेला वेडावाकडा गवताचा भारा आणतांना दिसायची. तिने अंगणात भारा आदळला की तिचे विस्कटलेले डोक्याचे लांबसडक काळेभोर केसं अधिकच सुंदर दिसत. मग ती आमच्याकडे पाहून खुद्कन हसत आमचं स्वागत करीत असे.
‘या… खूप वेळ झाला का? भाकरी खायच्या आहेत ना ! गवत आणायला गेली होती. जरा उशीरच झाला. बसा. मी पाणी आणून देते.’ असं आपुलकीने म्हणायची.
मग आम्ही अंगणाच्या ओट्यावर नाहीतर घरात बसून फडक्यात बांधून आणलेल्या भाकरी खात होतो.
एकदा मनाला झिणझिण्या आणणारं दृश्य पाहून आम्हाला भोवळ आल्यासारखे वाटले. तिचा नवरा तिच्या उरावर बसून तिला उघड्यावर मारत असल्याचे आम्ही त्यादिवशी पाहिले होते. बरं झालं, तिने आम्हाला पाहिलं नाही. नाहीतर ती फार ओशाळली असती ! आणि आम्हीही लाजेखातर तिच्या घरी जाणे बंद केले असते !
तिच्याशी काय बिनसलं होतं का? की तो दारु पिऊन होता, की तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता की आणखी काय… काय माहिती…? असा कसा त्याला इतका राग आला होता का? ज्यामुळे तो इतका खवळला !
हे दृश्य पाहतांना आमचं संवेदनशील मन गलबलून गेलं होतं. आमच्या डोळ्याच्या कडा नकळत आसवाने भिजू लागलं. मनांत वाटायचं, इतके क्रूरपणे हा माणूस वागतोच कसा? बाई काय केवळ त्याची बायको म्हणून त्याच्या जीवनात आली? काय कुणी आई तर कुणी बहिण तर कुणी मुलगी म्हणून त्याच्या जीवनात आली नाही का? कष्टाने भरडून निघालेल्या तिच्या हळव्या मनाला त्याने भक्कम आधार द्यायला नको का? तेव्हाच तिच्या जीवनाला नवीन पालवी फुटून तिचे जीवन अंतर्बाह्य फुलून निघेल ना…! असे काहिसे विचार जेव्हा ही घटना आठवे, त्या त्या वेळी माझ्या मनात येत असे.
ती बाईपण त्याचा मार कसा सहन करत होती, याचं आश्चर्य वाटायचं ! ‘नवर्याघनं मारलं, पावसानं झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची’. अशी त्या बाईची बिकट परिस्थिती झाली असावी. तिचंही काही चुकलं असेल ! एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणतात. पण ऎवढी शिक्षा…? काही का असेना, आम्हाला त्या बाईची फार कीव यायची.
त्याची निर्दयता पाहून आम्हाला संताप आल्याशिवाय राहत नसे. पण दुसरीकडे तो दिसला की आम्हाला त्याची थर्र भीती वाटत होती. कारण तो भीती वाटण्यासारखाच दिसत होता. तो दिसायला काळासा, उंचीने बायकोपेक्षा बुटका, दाढीवर खुरटे केसं वाढलेले, डोळे मोठे आणि नेहमी तराळलेले ! असं जरी असलं तरी त्याचं शरीर मात्र कष्टानं कमावलेलं भरदार असं दिसत होतं.
त्याकाळी खेड्यात घरच्या बायकांना माणसं खूप राबवून घेत. माणसं बाहेरचं कितीही मरणाचं काबाडकष्ट करतील, मणभर किंवा त्याही पलीकडे जाऊन लाकडं फोडतील, जिवापलीकडचं ओझं उचलून नेतील, ऊन-पावसात, थंडी-वार्यांत मरमर राबतील, शेतीचं किंवा मजूरीचे वाटेल ते कामे करतील, परंतु घरी आले, की राजे बनत. घरातली पडलेली एक काडी सुध्दा उचलत नव्हते.
घरची बाई मात्र बाहेरचे, शेतीचे किंवा मजूरीचे कामे करण्याशिवाय झाकटीला उठून शेणाचा सडा टाकतील, पोतार्याएने घर सारवतील, झाडझूड करतील, विहिरीचं पाणी भरतील, खरकटे भांडे घासपुस करतील, चूल पेटवता पेटवता फुंकणीने फु्कून नाका-तोंडात जाणारा विस्तवाचा धूर झेलतील, चहाचा आयता कप माणसाजवळ नेऊन देतील, त्याच्या आंघोळीचं पाणी चुलीवर ठेवतील, तापलेलं पाणी आंघोळीच्या गोट्यावर नेऊन देतील, लहान पोरांचं हागलं-मुतलं काढतील, स्वयंपाक करतील, सर्वांना जेवणाचं ताटं वाढून देतील, कपडे धुतील असे कितीतरी नानातर्हेकचे कामे त्यांना करावे लागत होते. तिच्या जीवाची पर्वा न करता नवरा तिला असे राबवून घेत. जणू काही तिने माणसाला जन्म देऊन मोठा गुन्हाच केला होता, की काय?
बाई आणि माणूस हे संसारातील दोन चाकं ! दोन्हीही सारख्या दर्जाचे असल्याशिवाय संसाराचा गाडा व्यवस्थित तरी कसा चालू शकेल? अन् त्याशिवाय त्यांची प्रगती तरी कशी होणार? असे काहीतरी विचार तेव्हा नव्हे पण नंतरच्या काळात मात्र माझ्या मनात घोंगावत असत.
त्या दिवशी यवतमाळच्या आठवडी बाजारात आम्ही लिंबाच्या झाडाखाली उतार्यायवर बसलो होतो. या उतार्या्वर निळोण्याचे व चौधर्यातचे लोक बसत. तेव्हा तो प्रसंग घडला होता.
नामदेवने काय गुन्हा केला होता काय, माहीत? पण तो पोलिस त्याला जबरदस्तीने ओढत नेत असल्याचे आम्ही सगळे लोक निर्विकारपणे, हताशपणे पाहत होतो. ते दृष्य पाहतांना सर्वजण हळहळ करीत होते. त्या माऊलीचा त्या मारकुंड्या नवर्या बद्दल किती लळा होता, हे त्यावेळेस मला जाणवलं ! स्त्री मनातील हळुवार भावनांचे मिश्रण तिच्या अंतरी असल्याचे दिसले.
खरंच, एखादा नवरा कसाही असो, तो एखाद्या प्रसंगी हिंसक झाला, क्रूर झाला किंवा लहान मुलासारखा हट्टी, चवचाळ, खट्याळ, नाठाळ, घायाळ झाला, तरी त्याच्या बायकोला सांभाळून घ्यावे लागते. याची प्रचिती मला त्या बाईच्या वागणुकीतून दिसून आली.
तिचा नवरा जरी मारकुंडा असला तरी ती मात्र खरोखरच मायाळू बायको होती, यात काही तिळमात्र शंका नव्हती. तिची माया पाहून माझं मन द्रवलं, हे काही सांगायला नको.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: