मी आणि माझ्या आठवणी


कथा पाचवी – घरात अवदसा शिरली

 

मी विचार करायचो की आमचं ‘जुमळे’ आडनाव कसं पडलं? शेवटी या आडनावाची व्युत्पत्ती ‘जमीनजुमला’ वरुन झाली असावी, या अनुमानाला मी पोहोचलो. जमीन म्हणजे स्थायी व जुमला म्हणजे अस्थायी संपत्ती. त्याचे राखण करणार्‍यास जुमलेदार म्हणत असल्याचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या काळात होत असल्याचा मी इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते. म्हणून आमचा संबंध राजेरजवाड्याशी असला पाहिजे, असं माझं मत झालं. त्यामुळे माझा उर अभिमानाने भरुन आला.

तसेच हे आडनाव इतर जातीत दिसतील; पण आमच्या जातीत मात्र नसल्यासारखेच… असं का? यावर मी विचार करायला लागलो; तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या पूर्वजापैकी एखाद्या बाईने जुमळे आडनावाच्या शिंपी-तेली अशा परजातीच्या माणसाशी घरठाव तर जोडला नसावा ना ! त्यामुळेच त्याचं आडनाव तिच्या लेकरांना मिळालं, परंतु तिची जात मात्र बदलली नसावी. होऊ शकते… आडनाव बदललं पण जात नाही बदलली !

दुसरं असं की, जुमळे आडनावाचे घरं कमी का? मी यवतमाळला कॉलेजच्या होस्टेलमध्ये असतांना खडकी (सुकळी) गावाचा कृष्णा जुमळे शिकायला होता. ही गोष्ट बाबाला सांगितली. तेव्हा तो म्हणाला की त्याच्या आजोबांना विठोबा व बळीराम नावाचे आणखी दोन भाऊ होते. बळीरामाच्या हातून पाटलाची गाय मारल्या गेल्याने, तो घाबरुन रातोरात पळून गेला. बाबाचे आजोबा घाटंजी जवळील वरुड गावाला राहत. कदाचित त्यांच्यापैकीच पळून गेलेल्या बळीरामाचं वेल असावं, असे बाबा सांगत होता.

पूर्वी निरनिराळ्या गावाला राहणारे जुमळेचे कुटुंब हिंगणघाट जवळील गिरडला भरणार्‍या बुवा फरीदच्या यात्रेला दरवर्षी जमत, असे बाबा सांगत होता. यात्रेवरून आल्यावर ‘दम दम साहेब’ म्हणत पाच घरी फिरून धान्य गोळा करीत. ते एकत्र शिजवून काला करीत. त्याला ‘मलिंदा’ म्हणत. हा देवाचा प्रसाद म्हणून खात. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर यात्रेला जाण्याची व मलिंदा खाण्याची प्रथा बंद झाली.

आमच्या कुटूंबामध्ये आई-बाबा, मोठाभाऊ शामराव, वहिनी अनुसयाबाई, बहीण जनाबाई नंतर मी व माझ्यापेक्षा लहानभाऊ अज्याप असा आमचा खटला होता. मायेच्या, प्रेमाच्या व ऋणानुबंधाच्या नाजूक आणि चिवट धाग्यांनी आमच्या संयुक्त कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते.

माझ्या आईचं नाव अलुकाबाई व बाबाचे नाव कोंडू – ज्यांनी मला पहिला घास भरविला, बोबडे बोल शिकविले, दुडूदुडू चालायला शिकवले, तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवले, डोळ्यातील आसू पुसले, आजारपणात रात्रीचा दिवस केला, माझ्यावर अपार माया केली, माझं कौतुक करतांना त्यांच्या आनंदाला पारावर ऊरत नव्हता; असे आई-बाबा साधे व खेडवळ वळणाचे होते. मी हे जग पाहू शकलो, माझ्या जीवनाला अर्थ मिळाला केवळ त्यांच्यामुळेच ! प्रेम आणि मायेचा अखंड झरा म्हणजे माझे आई-बाबा !

आई-बाबानी आम्हा लेकरांना आधार, ताकद, शक्ती, प्रेरणा आणि जगण्याचा अतुट धागा दिला. ऎवढेच नव्हे तर संस्कार, कौटुंबिक परंपरा आणि संस्कृती असं सारंसारं भरभरुन दिलं. त्यांनी आमच्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांना सीमाच नव्हती.

 

आई लुगडं व चोळी घालायची तर बाबा धोतर नेसायचा. हे धोतर नागमणीचं जाडं, भरडं असायचं. कुठं जायचं असलं की पापलीनचं पातळ व चकचकीत पांढर्‍या रंगाचं धोतर नेसायचा. तो एकटांगी नेसून हातात सोगा घेऊन मोठ्या दिमाखात फिरायचा. अंगात कुडतं घालायचा. लुगडं किंवा  धोतर जेथे फाटलं असेल तेथून चिरुन दोन भाग करीत. फाटलेला भाग काढून सुई-दोर्‍याने दांड भरत. आईसाठी नवीन लुगडं आणलं की ती पहिल्यांदा जवळच्या बाईला नेसायला देत होती. नंतरच ती नेसत होती. याला घडी मोडणे म्हणत. ही पध्दत खेड्यात प्रचलित होती.

बाबा बाहेर गावाला गेला की डोक्याला धोतराचा पटका बांधायचा. तो कधी केसं विंचरतांना भांग पाडत नव्हता; तर केसं फणीने मागे वळवायचा. त्याच्या कानावर व हाता-पायावर केसं वाढलेले होते. त्याचं कपाळ व कान सुपासारखे मोठे होते.

माझ्या आईला ‘लुली’ म्हणत. मी तिला विचारले,

‘आई, तुझं नाव अलुकाबाई असतांना लुली कां म्हणतात?’

‘लहानपणी मी लुळ्यासारखी राहत होती, म्हणून लुली म्हणतात.’ असे तिने गमतीने सांगितले.

आई काहीच शिकलेली नव्हती. पण ती शिकलेली असावी असा माझ्या बालमनाचा समज झाला होता. म्हणून मी तिला अभ्यासाबद्दल विचारत होतो.

पाटीवर गणित मांडून बरोबर आहे का म्हणून विचारल्यावर म्हणायची,

‘नाही रे बाबू… चुकलं तुझं.’ मी पुसून पुन्हा गणित मांडून दाखवायचा.

‘आई, आता बरोबर आहे का?’

‘हो… रे बाबू… आता बरोबर आहे,’ अशी ठासून माझ्याकडे कौतुकाने पाहायला लागली की तिच्या नजरेत मला सारं काही मिळायचं.

वास्तवीक शिक्षणाच्या दृष्टीने आई आंधळीच ! परंतु माझे गणित पक्कं व्हावे; म्हणून ती डोळसपणे अशी करायची. त्यामुळे खरोखरच माझा गणित विषय पक्का झाला होता. त्यात आईचा मोठा वाटा होता. मला मॅट्रीकला  शंभर पैकी त्र्याहत्तर गुण मिळाले, कदाचित त्यामुळेच !

बबन गुरुजीनी कविता पाठ करायला सांगितली होती. माझं पाठांतर फार कच्च. आई मला व बाईला सकाळीच कोंबड्याच्या पहिल्या बागेला उठवायची. मी डोळे चोळतच उठायचा. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात डोळे फाडून फाडून पुस्तकात पाहायचा व कविताची घोकंपट्टी करायचा. पण काही केल्या पाठ होत नव्हती. मग मी मुळूमुळू रडत होतो. आईला माझी मोठी कीव यायची. ती म्हणायची,

‘नाही पाठ होत तर राहू दे… मी तुह्या मास्तराला सांगते… माह्या पोराला मारु नका म्हणून…’ आईच्या समजावण्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझं एकदम हलकं हलकं होवून जायचं.

आई कपाळाला मेण लावून, त्यावर मोठं कुंकू लावत होती. ती काळ्या मण्याची, आखूड पोताची  गाठी घालायची. ती ही गाठी घोड्याच्या शेपटीच्या लांब केसात ओवत होती. त्यामुळे ती लवकर तुटत नाही व घोड्याच्या केसाचा मान असतो, अशी सांगत होती.

काही भटके लोक आमच्या गावाला राहूटीला आले की त्यांच्या घोड्यांच्या पाय झाडण्यापासून सावध राहून शेपटीचे केसं उपटून आईला नेऊन देत होतो.

गाठी तुटत नाही हे आईचे म्हणणे ठीक होते; पण त्याचा मान असतो हे कोडं मात्र उलगडत नव्हतं. नंतर आर्य आणि अनार्याच्या संघर्षाचा इतिहास माझ्या वाचण्यात आला; तेव्हा कळले की परदेशातून घोडे घेऊन आलेल्या आर्यांनी मूलनिवासी लोकांवर कहर करुन माणसांना मारले. त्यांनी येतांना बायकांना आणले नव्हते. मग येथील बायकांना ओढून नेत. त्यावेळी सहज उपलब्ध होत असलेल्या घोड्याच्या केसाची दोरी, त्या बाईच्या गळ्यात टाकत. या प्रकाराला ‘वहतू’ म्हणत. मारलेल्या माणसाचे रक्त बाईच्या कपाळावर लावत. तेव्हापासून रक्ताच्या रंगाचे लाल कुंकू लावण्याची प्रथा पडली. तसेच काळा रंग गुलामीचे प्रतीक असल्याने लग्न झालेल्या बाया काळ्या मण्याची गाठी घोड्याच्या काळ्या केसात ओवून गळ्यात घालत. हे त्यामागील खरं इंगीत होतं. म्हणूनच ब्राम्हणांच्या बाया सुध्दा शुद्रांमध्येच मोडत.

एवढंच नव्हे तर आमचे लोक कमरेला काळ्याच रंगाचा करदोडा बांधत. दुसर्‍या रंगाचा चालत नसे. मीपण असा करदोडा कमरेला बांधून मिरवीत होतो. उद्देश हाच की त्यामुळे आमचे लोक सहज ओळखू यावेत, दुसरं काय?

त्यावर्षी अकोलाबाजारला जाणार्‍या रोडवर गिट्टी टाकण्याचे काम निघाले होते. तेथे आई, बाबा, दादा, वहिनी सकाळीच भाकर व मडक्यात पाणी घेऊन जायचे. ते गिट्टी फोडण्याचे काम करीत. मी सुध्दा खांद्यावर बसून नाहीतर दुडुदुडु धावत जात होतो. तेथे दिवसभर खेळत राहायचो.

आई तिच्या जीवनातील गमती जमती सांगायची. असेच आईने शामरावदादाची मजेशीर गोष्ट सांगितली होती. दादा लहान असतांना खेळून खेळून दमून जायचा. मग त्याला झोप यायची.

‘मा… तुह्या ‘बा’ला सांग न् की, माह्यासाठी बाभी-माभीच्या झाडाला पाळणा बांधून दे, म्हणून.’ तो आईला  म्हणायचा.

खरं म्हणजे माझ्यासाठी बाभळीच्या झाडाला पाळणा बांधून दे, असं तू बाबाला सांग, असं त्याला म्हणायचं होतं. पण त्याला तसं म्हणता येत नव्हतं. म्हणून त्याच्या सांगण्यात नकळत विनोद होत असे. मग बाबा झाडाच्या फांद्याना दोरी बांधून त्याच्यासाठी झोपाळा करुन द्यायचा.

त्याची दुसरी आणखी गोष्ट आईने सांगितली होती. तो थंड्या पाण्याला गरम पाणी व गरम पाण्याला थंड पाणी म्हणायचा. त्याची आंघोळ करतांना आई त्याच्या अंगावर कोमट पाणी टाकायची; तेव्हा तो, ‘थंड आहे… थंड आहे…’ असं म्हणत तुडूंग तुडूंग नाचायचा. मग आईला वाटायचं की त्याला आणखी गरम पाणी पाहिजे असेल. म्हणून ती गंगाळात आणखी गरम पाणी ओतायची. मग तसतसा तो आणखी आणखी नाचायचा.’ अशा गंमती ऐकल्यावर आम्ही मोठे हंसत होतो.

दादा आईला ‘मा’ म्हणायचा व बाबाला ‘बा’ म्हणायचा. आम्ही लहानपणी कदाचित मा-बा म्हणत असेल; पण शाळेत गेल्यावर मात्र शहरी भाषेत आई व बाबा असेच म्हणत होतो.

आईने आणखी तिच्या आयुष्यात येऊन गेलेला खडतर प्रसंग सांगितला.

‘त्याकाळी दुष्काळी परिस्थितीने लोक कावून गेले होते. दाळ-दाण्याचा एक कणही खायला मिळत नव्हता. अशावेळी कडूलिंबाचा कडू-डक पाला खाऊन दिवसं काढण्याची पाळी आली होती. असंच जंगलात काही मिळते काय, म्हणून मी, बापुरावची माय गिरजाबाई, प्रल्हादची माय झिबलाबाई, गोविंदाची नवरी पदमाबाई अशा बाया: बोरं, चारं, आवळे, टेंभरंसारख्या रानमेव्याच्या शोधात खरोल्याच्या जंगलात गेलो होतो. जंगलात फिरता-फिरता कधी दिवस बुडाला ते कळलेच नाही. अंधार पडायला लागला, तेव्हा आमच्या पोटात भीतीचा गोळा उभा झाला. आम्हाला रस्ता पण गवसत नव्हता. एवढ्यात खरोल्याचा एक माणूस देवदुतासारखा जातांना दिसला. त्याने आम्हाला चौधर्‍याचा रस्ता दाखवीला. तवा कुठे आम्ही जेवण रातच्याला घरी आलो.’ खरंच आईने सांगितलेल्या प्रसंगाने मला पुरते हलवून सोडले होते.

माझे बाबा लहान-सहान आजारावर घरघूती व झाडपाल्याचा उपयोग करायचा. तो चिलिमीचा कीट काढून त्याच्या भोवताल गुळ लाऊन किरम झालेल्या चिमुकल्याच्या नरड्यात बोटाने ढकलून द्यायचा किंवा शापीचे पाणी पाजायचा. चीलीमीचा किट इतका तीक्ष्ण आणि कडू असायचा की क्षणभर सुध्दा तोंडात ठेवणे कठीण जायचं. त्यात तंबाखूचा अंश असल्याने अंग गरगर फिरायचं. म्हणूनच त्याला गुळाचा लेप लावून द्यायचा. तापावर महारुक किंवा लिंबाच्या सालीचा काढा द्यायचा. हळद, आले, सहद, लसून, रुई व उंबराच्या झाडाचं दूध असे आणखी बऱ्याच औषधी त्याला माहिती होत्या. डोके दुखीवर मसाल्याच्या पानाचा टोप बांधत असे. एकदा दयारामच्या नाताने पांढर-वांढर डोळे केले. त्यावेळी बाबाने शोधून आणलेल्या झाडपाल्याचा रस पाजल्यावर तो बरा झाला. म्हणून बाबाच्या जडीबुटीच्या औषधी मोठ्या गुणकारी होत्या.

बाबा एखाद्यावेळेस बाजारातून हिंगुळ व मटण विकत आणायचा. मटणात हिंगुळ टाकून तो एकटाच खायचा. त्याने अंगात स्फुर्ती व शक्ती टिकून राहते, ढोरासारखे कष्ट केले तरी अंग दु:खत नाही, असे म्हणत. मात्र इतरांना खायला मनाई होती. कारण हिंगुळ फार कडक असल्याने पचत नव्हतं.

जंतावर इंद्रायणीच्या फळाचा उपयोग करायचा. मामाच्या वावरात घोटीच्या आंब्याजवळ वेल होतं. या वेलाला इंद्रायणीचं लालजर्द रंगाचं फळ लागायचं. त्याची चव अत्यंत कडू होती. त्याला घरी आणून आड्याला बांधून ठेवत. आम्ही कंबरमोडीच्या पाल्याचा रस जखमेवर लावत होतो. खेड्यात आणखी एक समज होता की, उधईच्या वारुळात पांढरीशुभ्र आणि गुबगुबीत अशी राणी अळी असते. तिला खाल्ल्याने अंगात शक्ती येते आणि कोणत्याही बिमार्‍या होत नाहीत. खेड्यातील बाया बाळांना अफूचा घुटका देऊन पाळण्यात झोपून ठेवत. खेडूत लोकांमध्ये मुळातच अंगभूत प्रतिकारक्षमता टिकून राहत असते.

माझे बाबा फार कष्टाळू आणि हरहुन्नरी होता. तसाच दयाळू वृतीचा पण होता. तो मांस खायचा; परंतु त्याने कधीही हिंसा केली नाही, की कधीही कोंबडा कापल्याचं मी पाहिलं नाही. एकदा पारध्याकडून सात-आठ बाठरं पक्षी विकत घेतले होते. त्यावेळी आमचे जेवण उरकल्याने संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी म्हणून त्यांचे पाय एकमेकाला बांधून पिवशीत खुंटिला लटकवून ठेवले होते. ते सर्व जीवंत होते. बाबा घरात आल्यावर त्यांना दिसले. त्यांची अवस्था पाहून बाबांना करुणेचा गहिवर आला. त्यांना वाडीत नेऊन, पाय मोकळे करुन सोडून दिले. ते पक्षी भुर्रकन उडून गेले.

दुसर्‍या प्रसंगात गोधणीच्या कोलामाच्या वावरात एक घार सशाला टोचत असल्याचे बाबाने पाहिले. त्यांनी सशाला घारीच्या तावडीतून सोडवून लवणाचे पाणी पाजले. सशाला तरतरी आल्यावर बरडावर नेऊन सोडले. त्याच्या ऎवजी दुसरा कोणी असता तर घरी आणून शिजवून खाल्ले असते ! असा त्याचा कनवाळू स्वभाव होता. ‘जगा आणि जगू द्या’ अशी त्याची वृती होती.

बाबा त्यावेळी मामाची शेती वाहत होता. दोन्हीही दादा, वहिनी व आईला सोबत घेऊन एका मुठीने शेतात काम करुन भरपूर पीक काढीत. जीव ओतून, मरणाचं काम करुन सोनं पीकवीत.

तसेच बाबा इतरही धंदा-व्यवसाय करत होता. कधीकधी गावोगावचे आंबे बारावरच विकत घेऊन व्यापार करत होता. बाबा पावसाळ्यात वाडीतल्या घोटीच्या आंब्याजवळ लवणाच्या काठावरच्या मोठ्ठाल्या पानाचे मसाल्याचे पाने तोडून भर पावसात यवतमाळला विकायला घेऊन जात होता. एकदा तर त्यांनी वाडीत कौलाचा कारखाना टाकला होता.

बाबाने हिवाळ्यात शिवाआबाजीचे नाल्याजवळील शेत केले होते. त्यात वटाणा पेरला होता. हिवाळ्यातली थंडी व नाल्याच्या ओलावामुळे वटाण्याचं भरपूर पीक आलं होतं. मग पोतेच्या पोते भरुन बाजारात विकायला न्यायचा. आम्ही भावंडं राखायला आईसोबत जात होतो. सकाळी तेथे सर्वदूर धूकं पसरलेलं दिसायचं, इतकं की जवळचा माणूस दिसत नव्हता. झाडाच्या पानावर दवाचे बिंदू जमा झालेले असायचे. त्या दवबिंदूने हातपाय ओले होत होते. या दवाचा फायदा हरभरा व वाटाण्याच्या पिकाला होत होता. म्हणून निसर्गानेच त्यांच्या जगण्याची अशी व्यवस्था केली होती की काय, कोण जाणे? त्या डुंग्यात दिवसभर मस्त करमत असे. एकतर नाल्याच्या काठावरील झाडावर मस्त खेळायला मिळत होतं. तेथे आजनाचे झाडं होते. त्याच्या मोठमोठ्याल्या फांद्या नाल्याच्या पात्रात तर काही जमिनीवर टेकल्याने, या झाडावर चापडूबल्याचा खेळ खेळण्यात आम्ही मस्त रमून जात होतो. शिवाय वाटाण्याच्या कोवळ्या कोवळ्या शेंगा खायला मिळत होत्या. अशा भाजलेल्या कोवळ्यालच लुसलुशीत शेंगा तोंडाने ओरपून खायला फारच मजा यायची.

बाबा मामाची शेती वाहत असल्याने आमची आर्थिक परिस्थिती इतरांपेक्षा बर्‍यापैकी होती. गावात रुबाब होता. आमचं घर धन-धान्याने भरलेले राहायचं. खायला-प्यायला चांगलं चुंगलं मिळत होतं. चांगले कपडेलत्ते घालत होतो. झोपायला दोरीने विणलेल्या बाजा राहत होत्या. असे आमचे वैभवाचे दिवसं होते.      कुळकायदाच्या भीतीने मामाने शेती परत मागितली. आमच्या पोटापाण्याचं एकमेव साधन निघून गेलं. त्याआधी देवदासदादाही जळून मेल्याने आमच्यातून निघून गेला. बाबा हताश झाला होता. शामरावदादा निराश झाला होता. जसं मेढीचा बैल बसला की बाकीचे बैल फिरत नाहीत, तसे झाले होते. आमचं पूर्वीचं वैभव आता हळूहळू ओसरायला लागलं होतं.

घराच्या भिंतीना पोपडे धरून पडायला लागले होते. चिरलेल्या भिंतीचे ढेकळं निखळून पडत होते. भोंगराच्या घरासारखं दहा ठिकाणी भोकं पडत होते. घरावरचं खपरेल इकडे तिकडे सरकल्याने सूर्याचे किरणं थेट घरात शिरत होते. त्याचे पांढरे ठिपके जागोजागी पडत. सूर्यकिरणांच्या प्रकाशात धुळीचे सुक्ष्म कण तरंगत दिसत. ते पाहण्यात मग मी गढून जात होतो.

घर फिरले की वासेही फिरतात, त्याप्रमाणे घरातील बाजींच्या दोर्‍या तुटायला लागलेत. त्याचे गातं तुटून मोडकळीस आलेत. एकेक बाज चुलीत जाळायच्या कामात येऊ लागले. दादाने कधी नवीन बाजा बणविल्या नाहीत की तुटलेल्या नारळाच्या दोर्‍या बदलविल्या नाहीत. एक बाज राहिली होती, तिच्या दोर्‍या तुटून झोलणा झाली होती. बाबा दोर्‍या ताणून ताणून बांधायचा व त्यावरच झोपायचा. खाली जमिनीवर त्याला झोप येत नव्हती. आम्ही मात्र जमिनीवर झोपायची सवय केली होती.

कोठ्यातील गुरं-ढोरं गेल्याने आम्ही त्याचा उपयोग उठण्या-बसण्यासाठी व झोपण्यासाठी सुरु केला. ग्रामपंचायतीचं ऑफिस म्हणजे हाच कोठा ! खुर्ची, टेबल व लाकडी आलमारी एवढंच त्यांचं फर्निचर ! ग्रामसेवक याच कोठ्यात बस्तान मांडून कामकाज पाहत होता. ग्रामपंचायतीच्या किंवा राजकीय मिटींगा ह्याच ठिकाणी भरत होत्या. दादाच्या सरपंच पदासोबत मिळालेल्या रेडीओने आमचा उर भरून आला होता. तो याच कोठ्यात टेबलवर स्थिरावला होता. ह्या रेडीओमुळे ग्रामपंचायतीच्या संपत्तीत आणखी एकाची भर पडली होती. बाहेर खांबावर भोंगा लावला होता. त्यातून रेडीओचा आवाज गावभर पसरत होता. मी ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बसून अभ्यास करायचो किंवा रेडीओ ऐकत राहायचो. त्यामुळे माझी मज्जाच झाली होती. गाड्याबरोबर नळाची यात्रा म्हणतात तशी…!

सकाळी रेडीओ सुरु केला की भक्तीगीतांशिवाय दुसरे गाणे लागत नव्हते. खरं म्हणजे मला देवाचे गाणे मुळातच आवडत नव्हते. पण सार्वजनिक असल्याने इलाज नव्हता. मला जरी आवडत नसले तरी गाण्यातील लयबद्धता, सुरेलता फारच भावत होती. ‘उषकाल झाला. उठी गोपाला, उठी गोविंदा.’ असे गाणे मला मंत्रमुग्ध करीत होते. सकाळी सकाळी देवाधर्माचे गाणे ऐकून मला मोठी चीड यायची. आकाशवाणी ऐकणारे इतर धर्मातील लोक नसतात असा काही समज आकाशवाणीचा झाला होता की काय, कोण जाणे? संध्याकाळी शेतकर्‍यांसाठी कार्यक्रम लागायचा. ‘आमची माती आमची शेती.’ असे शेतीबाबत माहिती सांगणारे चांगले कार्यक्रम असायचे. माझा मामा हा कार्यक्रम सुरु झाला की आमच्या घरासमोरील देवळाच्या पारावर येवून बसायचा व कान देवून कार्यक्रम संपेपर्यंत ऎकत राहायचा. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवेदक ‘रामराम मंडळी’ म्हणायचा. मला मोठा राग यायचा. मी पत्र लिहून विचारले, ‘रामराम म्हणण्यापेक्षा नमस्कार का नाही म्हणत? कारण तुमचा कार्यक्रम ऎकणारा सर्वच रामराम म्हणणारे शेतकरी नाहीत.’ तरीही त्यांनी रामराम म्हणणे काही सोडले नव्हते. मी आकाशवाणीच्या मराठी, हिंदी बातम्या हमखास ऎकायचा. ह्या रेडिओमुळे आम्हाला फारच करमायचं व दादा सरपंच असल्याचा गर्व व्हायचा.

दुपारच्या वेळेस भावगिते ऎकण्याचा मला फार मोह व्हायचा. ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती’, ‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसांची’, ‘असा बेभान हा वारा’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतद: प्रेम करावे’, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, अशा कितीतरी भावमधूर संगीतरचना व त्या स्वरांतून पाझरणारे अप्रतीम भाव मला अतिशय मोहवून टाकत. हे गाणे सतत माझ्या ओठावर खेळत राहायचे. गाण्यासोबत मीपण गुणगुणत राहायचा. नाहीतर तोंडाचा चंबू करून शिट्टीच्या आवाजावर गाण्याची धून वाजवत होतो. हिंदी सिनेमातील गाणे पण आवडत. त्यातील संगीताची सुमधुरता, आवाजाची फेक, लयबध्दता, गोडवा, कारुण्य, माधुर्य अशा रसरसतेने भरलेले गाणे तन्मयतेने ऎकत होतो. त्यातील सुरांची मोहकता जाणवायची; पण शब्द आठवत नसायचे, असेही काहीसं होत होतं.

ग्रामपंचायतीच्या ऑफिसशिवाय या कोठ्यात शाळेची भर पडली. मास्तर बसायला ग्रामपंचायतीच्याच खुर्चीचा उपयोग करायचा. फक्त कागदपत्र ठेवण्यासाठी त्यांनी लाकडी पेटी आणली होती. सुगी करायला आलेल्या बिर्‍हाडांनी याच कोठ्यात आश्रय घेतला होता. स्वयंपाक व झोपण्या-उठण्यासाठी याच कोठ्याचा उपयोग करीत. अंगणासमोरचा दुसरा कोठा आता राहीलाच नव्हता. कारण लाकूड-फाटा, कवेलू, सपरीवरचे टिनं दादाने विकवाक करुन टाकले होते. कोठ्यातले गाई, बैलं, बकर्‍या व बैलगाडी दादाने विकून टाकले होते.

आई-बाबा गावोगावी फिरुन व्यापार-उदीम करीत असल्याने गावाला फक्त दादाचे कुटुंब तेवढे राहत. वहिनी आणि त्याच्या मोठ्या मुली लोकांच्या कामाला जात. मी व बाई सुट्ट्यात मजुरीचे कामे करुन दादाच्या फाटलेल्या संसाराला ठिगळं लावण्याचा प्रयत्न करीत होतो. आम्हाला गंमत वाटायची. खेड्यात नवरा मास्तर असला की त्याच्या बायकोला मास्तरीन म्हणत, पाटलाच्या बायकोला पाटलीन म्हणत. म्हणून आमच्या वहिनीला लोक सरपंचीनबाई म्हणत; तेव्हा आम्हाला हसू येत असे. आता वहिनीची अवस्था ‘पाटलाची बायको पायघोळ नेसे अन् फाटलं तुटलं की वरवर खोसे.’ अशी झाली होती.

आता घरामध्ये अवदसा शीरत गेली. गरिबी हात धुऊन मागे लागली. आमच्या जगण्याच्या वाटेवर अंधार दाटून आला. त्यामुळे आमच्या शिक्षणाची आबाळ होत गेली. घराला घरपण राहिले नव्हते. राहिल्या होत्या केवळ पडक्या भिंती ! त्याच्याकडे उदासपणे पाहात गतकाळाचे हरवलेले वैभव आम्ही शोधत होतो.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: