मी आणि माझ्या आठवणी


कथा चौथी – झोपेचं खोबर झालं

 

उन्हाळ्यात रात्रीला कधी चंद्र-तार्‍यांचा लख्ख आणि शीतल उजेड, तर कधी दाट अंधार पडलेला. मग दिवा-कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात आम्ही सारेजण अंगणात जेवण करीत असू. असा नित्यक्रम कधीच चुकला नाही. तसंही आम्ही दिवस बुडला की अंगणात येवून बसायचो. मग गप्पा-गोष्टीचं पेव फुटायचं. अशावेळेस कुत्र घरात घुसलं तरी कुणाच्या लक्षात येत नव्हतं. खाणे-पिणे, झोपणे इत्यादी कार्यक्रम अंगणातच होत होते. कारण कमालीच्या उकाड्याने घरात क्षणभर थांबणे जड जात होते.

नेहमीप्रमाणे आमचं जेवण आटोपलं. जेवणानंतर जनाबाई ‘खाणं-घेणं रामाचं, दुखणं आलं बिनकामाचं.’ असं म्हणायची. कारण पोरी-बाळींना जेवणाचे भांडे आवरणं, घासणं, जागा झाडझूड करणं असे अनेक कामे करावे लागत. त्यांना आई सांगतील तसं मुकाट्याने कामे करावे लागत असे. नाहीतर पोरगी सासरी गेल्यावर, ‘तुह्या मायने तुले हे नाही शिकवलं, ते नाही शिकवलं अशी सासू टोमणे मारत्ते.

.     मग गप्पागोष्टी करतांना बाबा चिलीम तर दादा बिडी ओढायचा. मी, आई, बाई व वहिनी तंबाखू खात होतो. सारेजण दादा व बाबा यांच्यासमोर तंबाखू खात. मी मात्र लाजत होतो. खाण्याचा तंबाखू मिळाला नाही; तर चिलिमीचा बारीक तंबाखू खात. खेड्यामध्ये अशा सवयी लहानपणापासून लागत.

मग अंगणातच दिवसभरच्या श्रमाने शिणलेल्या शरीराला निद्रेच्या स्वाधीन करण्यासाठी सार्‍यांची लगबग सुरु व्हायची. पोतं, गोधडी, वाकळ, बाबाचं फाटलेलं धोतर किंवा आईचं लुगडं असं काहीबाही टाकून आणि अंगावर असंच पांघरुन ओढून घेत होतो. वर आकाशात चंद्र-तार्‍यांना पाहिल्याशिवाय मला झोपच लागत नसे. चंद्र-तार्‍यांच्या झगमगाटात घर उजळलेलं पाहतांना माझं मन मोहरून जात होतं. आकाशात सर्वीकडे चमकणार्‍या चांदण्या-तारे निरखून पाहत असे. काही तेजस्वी, काही लुकलुकणार्‍या तर काही अत्यंत मंद दिसणार्‍या असायच्या. मधातच एखादा तारा सर्रकन तुटून खाली पडायचा. आकाशातलं विहंगम, मनोहारी व चमत्कारीक दृश्य पाहून मनातले सारे मळभ दूर होत होते. उघड्या आकाशातील मोजता येईना, येवढ्या चांदण्या जिकडे तिकडे चमचम करीत दिसायच्या. एखाद्या वेळेस प्रकाश देण्याचं काम चांदण्यावर सोपवून चंद्र आसमंतात लुप्त होत असे.

कधीकधी चालू-बंद होणारा, लाल-पिवळा ठिपका चालतांना दिसे. तो चकचकणारा उजेड उडानखटोल्याचा दिवा असायचा. बुढीचे खाटले पाहण्यासाठी माझं मन भिरभिरत राहत असे. माझं ते रोजचं खासच आकर्षण ! चार चांदण्या म्हणजे आजीच्या खाटेचे चार ठावे व त्याला लागून लागोपाठ तीन चांदण्या म्हणजे चोरं…! तिच्या बाजीचे ठावे सोन्याचे, म्हणून ते चोरं आजीची झोपण्याची वाट पाहत. बिच्चार्‍या… आजीची चिंचेच्या झाडाचे पाने हातरता हातरता रात्र निघून जात होती. पण चोरांना चोरी करण्याची संधीच मिळत नव्हती. अशी ती गोष्ट त्या सात चांदण्याबाबत सांगत.

आकाशगंगेची रम्यता डोळे भरुन पाहतांना रात्र कणाकणाने समोर सरकत अधिकाधिक गडद होत जात असे. भुंकणारे कुत्रेही शांत होवून जात. मग सारा आसमंत गंभ्रीर आणि शांत होवून जात असे. अशा त्या निरव वातावरणात आमच्या पूर्वीच्या वैभवशाली दिवसांच्या मधूर आठवणी मनाच्या आत साठलेल्या कोपर्‍यातून उसळी मारुन एकाएकी वर येत. मग मनाला उभारी देणार्‍या आठवणींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर सरकू लागला की मी त्यात हरवून जात होतो.

घर म्हटले की प्रत्येकाचा जिव्हाळा अधिकच फुलून येतो. आमचं घर म्हणजे आपुलकीचं माहेरघर. त्यात मायेच्या माणसांचा वावर होता. मला वात्सल्याचा ओलावा, सुरक्षितता, आधार आणि विसावा मिळत होता. माझ्या आयुष्यातल्या अनेक कडूगोड आठवणी, घटना, प्रसंग या घराशी निगडीत झाल्या होत्या. या घराच्या साक्षीने मी लहानाचा मोठा झालो. अगदी कळत नव्हते; त्या वयापासून या घराशी अतूट नाते जुळले होते.

आम्ही आई-बाबा यांना इतकेच नव्हे तर मोठ्या माणसांना सुध्दा ऐकेरी भाषेत बोलत होतो. ‘तुम्ही’ म्हणण्याऐवजी ‘तू’ अशा भाषेत ! हीच भाषा आमच्या अंगवळणी पडली होती. ती प्रेमाची, मायेची व आपलेपणाची वाटत होती. म्हणून आम्हाला आवडत होती. शहरी भाषा म्हणजे ‘तू’ ऐवजी ‘तुम्ही’ म्हणनं हे जरी माणापानाचं असलं तरी आम्हा खेडूत लोकांना मात्र अवघड वाटत होतं.

असं म्हणतात की घरातले जुने जीव जातात, त्या जागी नवीन येतात. असं चक्र मानवी जीवनात अव्याहतपणे सुरु असतं. कोरून ठेवलेले प्रसंग येणारी पिढी वाचून, त्या घराचा इतिहास समजून घेतात. पण आमच्या घरात आई-बाबाच्या आधीची पिढी अस्तित्वातच नव्हती ! बाबाच्या लहानपणी त्यांचे आई-बाबा मरण पावले. आईचे बाबा, ती लहान असतांनाच वारले. तिची आई मामाकडे राहत होती. तीपण मी लहान असतांना मेली.

आमचं घर आधी कुडामाती व गवताचं होतं. असं घर गरिबीचं तर माती-दगडाच्या व टिनाचे किंवा खपरेलचं घर ऎश्‍वर्याचं प्रतीक मानलं जाई. बाबाने कुडामातीचं घर पाडून त्याठिकाणी भिंती, खपरेल आणि टीनं टाकून बांधलं. आमचं घर टुमदार झाल्याने गावात मान उंचावला होता. विशेष सांगायचं म्हणजे घरावरचे खपरेल घरीच बनविले होते. त्यासाठी बाबाने लवणाजवळ दशरथमामाच्या वावराला लागून असलेल्या वाडीच्या कोपर्‍यात कौलाचा कारखाना टाकला होता. घरातले सारेजणांनी या कामाला वाहून घेतलं होतं. घर बांधण्याचं काम स्वत:च बाबाने देवदासदादा, शामरावदादा व आई-वहिनीच्या मदतीने केलं. बाबाला व दादाला वाडकाम येत असल्याने दरवाजे, खिडक्या, छपराचा इमला व आडं त्यांनीच बांधल्या.

नव्या घराचा दरवाजा सूर्यमुखी होता. बरडाच्या झरोक्यातून नाचत नाचत येणार्‍या सूर्याचा पहिलावहिला किरण माझ्या घरावर पडायचा. मग कोवळ्या कोवळ्या सोनेरी किरणांनी माझं घर-अंगण न्हावून निघायचं. सूर्य जसा वर जायचा, तशा अंगणातल्या सावल्या बदलत जायच्या. त्यावरून आम्ही वेळेचा अंदाज बांधत होतो. या घरातल्या स्वयंपाकाच्या खोलीत मातीची चूल व उल्हा मांडला होता. फोडणी दिल्यावर गंज उल्ह्यावर ठेवून देत. त्यामुळे रिकाम्या चुलीवर भाकरी करता येत होत्या. चुलीला लागून ओटा होता. याच ओट्यावर बसून आई स्वयंपाक करायची. पावशीने कांदा चिरतांना आईच्या डोळ्यात येणारं पाणी मी कित्येकदा पाहिलं. चुलीतला जाळ तोंडाने फुका मारून पेटवताना होणारा सुऽऽ सुऽऽ आवाज मी ऐकला. नाका-डोळ्यात घुसणारा धुपट व डोळ्याच्या धारा वाहतांना पाहिलं. त्यामुळे माझेही डोळे चुरचुर होत होते. सारा धुपट घरभर पसरत होता.

आई भाकरी थापायची; तेव्हा विस्तव फुलून यायचा. तव्यावरची भाकर निव्यावर पडली की टर्र फुगायची. आई फुगलेली भाकर ताटलीत टाकून मला द्यायची. मी त्यात बोट खुपसून गुदमरलेली वाफ बाहेर काढत होतो. अशी गरम गरम भाकर खाण्यात मोठी मजा वाटत असे.

ओट्याजवळ भिंतीला लागून कोपर्‍यात धान्य, कडधान्य, आंबट-गोड वड्या, उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या भाज्यांच्या खुला, हरभर्‍याच्या भाजीचा घोळणा असे काहीबाही खाण्याच्या वस्तू मडक्याच्या उतरंडीत साठवल्या होत्या. तसेच शेवया, सरगुंडे, कुरुडे, पापड़ं असे बनविलेले पदार्थ त्या मडक्यात ठेवल्या होत्या. मग ते आंब्याच्या रसासोबत खायला मोठी मजा यायची.

मागील भिंतीला लहानशी खिडकी होती. तेथून तुकारामकाकाच्या न्हाणीतील उंबराचं झाड दिसत होतं. या खोलीत पाणी पिण्यासाठी पितळेचा गुंड व थंड पाण्याचं मडकं होतं. मांजरीच्या धाकानं भाकर-तुकडा बांधून ठेवण्यासाठी वरती शिकं बांधलं होतं. मिरची-मसाल्याचं वाटण करण्यासाठी दगडाचा पाटा व लोडा होता. भिंतीच्या डेळीच्या खुंटीला खायच्या तेलाची शिशी अडकवलेली होती. यात जवसाचं तेल असायचं. त्यावेळी हेच तेल वापरीत. सणावाराला किंवा तळणाला भुईमुंगाचं तेल वापरीत. हे तेल जवसाच्या तेलापेक्षा महाग असे. या शिशीत सारज प्राण्याचा काटा टाकलेला असायचा. हा प्राणी खरोल्याच्या जंगलात सापडायचा. त्याच्या अंगावर अणुकुचीदार टोक असलेले काटे असत. संकटाच्या काळात तो हे काटे भाल्यासारखे उभे करून शत्रूवर फेकून मारत असल्याची गंमत सांगत. त्याचे काटे विषारी, तरीही तेलात टाकून ठेवायचे. त्यामुळे तेल खराब होत नाही, असे म्हणत.

त्याला लागूनच माजघर होतं. त्याचा वापर जेवण्यासाठी व झोपण्यासाठी करीत होतो. खाली जमिनीवर सातरी टाकून तेथे झोपत होतो. कोणी सपरीत झोपत. घरात पसरलेल्या मिट्ट अंधारात झोपण्याआधी एकदातरी मिणमिणत्या दिव्याच्या ज्योतीकडे पाहिल्याशिवाय माझे डोळे पेंगाळत नसे. या खोलीच्या मधात मयालीला बंगई टांगलेली होती. ती नारळाच्या दोरीने विणलेली होती. त्यावर बसून बेसूर आवाजात गाणं गुणगुणल्याशिवाय मला राहवत नसे.

अंगणातून घरात येतांना समोर भिंतीला बाबासाहेब आंबेडकरांचा व भगवान बुध्दाचा फोटो टांगलेला एकदम नजरेस पडत होता. हे दोन्ही फोटो पाहिल्यावर मनात नकळत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची. घरात शिरता शिरताच मी पहिल्यांदा फोटोजवळ जात होतो. दादाने फोटोच्या मागे ठेवलेल्या लग्नपत्रिका, पत्र किंवा पावत्या असं काहीबाही वाचून पाहण्याचा मला पहिल्यांदा मोह होत होता. या फोटोच्या बाजूला माझ्या बाबाचा काळ्या कोटावर काढलेला लहानसा फोटो टांगलेला होता. एकदा फोटो काढणारा माणूस गावात आला. त्यावेळी बाबाने हा फोटो काढला होता. तो डब्ब्याच्या आत डोकं घालून फोटो काढतांना आम्हाला मोठं कुतूहल वाटत होतं. भिंतीला लागून पीठ दळण्याचं जातं होतं. त्यावर आई किंवा वहिनी सकाळच्या प्रहरी ज्वारीचं पीठ, कण्या भरडत असे. मग त्याचा गरगर फिरण्याचा नाद व त्यांचं हळूच गुणगुणणं झोपेतच माझ्या कानात घुमत असे.

बाबाने धान्य ठेवण्यासाठी नांदीच्या आकाराचे चार पांढर्‍या मातीच्या कोठ्या बनविल्या होत्या. त्या या खोलीत एका रांगेत एकमेकाला भिडून ठेवल्या होत्या. त्या माणसाच्या पुतळ्यासारख्या दिसत. आणखी भिंतीच्या कोपर्‍यात चार पायाची लाकडाची घोड्शी होती. त्यावर पोत्याच्या फार्‍या, झोपण्याच्या सातर्‍या-बोथर्‍या ठेवत होतो. न्हाणीघरात जाण्यासाठी लाकडी पत्र्याचं कवाड होतं. दादा उन्हाळ्यात दुपारच्या वेळी पोत्याची फारी टाकून याच दाठ्ठ्यावर अंग टाकायचा.

कुणीतरी म्हणायचं, ‘अवं, हळू बोल. बाबा उठेल.’ अंथरूणावर कुणीतरी झोपल्यासारखं दिसायचं. पण बराच वेळ झाला तरी काही हालचाल न दिसल्याने शंकेची पाल चुकचुकायची. तेव्हा हलवून पाहिलं, तर गुंडाळलेले कपडे दिसायचे. म्हणजे आपल्याला चकविलं हे लक्षात यायचं. मग सारेच हसायला लागत. अशा गमती-जमतीने आमच्या घरात हास्याचे फवारे उडत.

न्हाणीघरात आंघोळीला बसण्यासाठी व धुणं धुण्यासाठी मोठा चौकोणी दगड होता. पाणी साचविण्यासाठी मोठी नांद गाडलेली होती. आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी चूल घातली होती. चुलीवर टिनाचा पिपा ठेवला होता. बाजूला जलतणासाठी लाकडाच्या झिलप्या रचल्या होत्या.

सपरीसमोर मोठं अंगण होतं. त्याच्या दाठ्ठ्याला काकणाचा हार तोरणासारखा बांधला होता. हा हार बाईने चिमणीच्या दिव्याच्या ज्योतीवर काकनं वितळवून गुंफला होता. बाहेर अंगणात भिंतीच्या बाजूने ओटा होता. गप्पागोष्टीसाठी बसण्याची हक्काची जागा म्हणजे हा ओटाच !     अंगणासमोर गायी-बैलासाठी गोठा बांधला होता. त्याला आम्ही कोठा म्हणत होतो. तेथूनच आवाराच्या बाहेर जाण्यासाठी मोठा लाकडी दरवाजा होता. डाव्या बाजूला, न्हाणी घराला जोडून आणखी एक कोठा बांधला होता. पूर्वी या दोन्ही कोठ्यात गाई, बकर्‍या व बैलजोडी बांधत. त्यावेळी आमच्याकडे दुभदुभत्यांची रेलचेल होती. एका कोपर्‍यात टिकाशी, फावडे, सब्बल, विळे, वखरा-डवराचे फासे, गाडीचाकाचे आकं, आरे, जू, चर्‍हाटं, काडवणं, डवरा, वखर, नांगर, पुराण्या, शिवळा, विळतं, कुर्‍हाडी, वासला, किकरं, पटाशी असे नानाप्रकारचे शेतीकामाचे सामान ठेवले होते.

अंगणात एका बाजूला दगडाचं उखळ गाडलं होतं. सुगीत धान निघाला की मुसळाने कांडून तांदूळ काढीत. अशा हातसडीच्या भाताला मस्त सुगंध यायचा व खायला पण चवदार लागायचा. उन्हाळ्यात घरातला दगडी पाटा व लोडा अंगणातल्या ओसरीजवळ यायचा. घराजवळच्या बाया-पोरी या पाटावर मसाला, मिरच्या वाटायच्या, तेव्हा खमंग वास सुटायचा.

दिवाळीला दादा दिवणाल्या आणून त्यात खायच्या तेलात कापसाच्या वाती पेटवून अंगणाबरोबरच घर, न्हाणी व कोठ्याचा कोपरा न् कोपरा रोषणाईने उजळून निघायचा. फटाक्याच्या आतिशबाजीने हे अंगण आणखीच न्हावून निघत असे. बाई व वहिनी पूर्ण अंगणभर रांगोळ्या घालीत.

याच अंगणात वहिनी रोज झुंजूमुंजूला उठून गंगाळात कालवलेल्या शेणाचा सडा टाकीत होती. शिंपडण्याचा आवाज झोपेतच माझ्या कानात घुमत असे. शेणाचा कुबट वास नकोसा होत असे. कधीकधी शेणाचा गिलावा फड्याने पसरवी. पांढर्‍या मातीने घर पोतार्‍याने सारवून घ्यायची.

सडासारवण झाल्यावर हात-पाय धुवून चिलिमीतल्या जळलेल्या तंबाखाच्या गुलाने दात घासायची. आम्ही गोवरीच्या राखुंडीने किंवा लाकडाच्या कोळशाच्या भुकटीने दातं घासत होतो. तोंड धुतल्यावर चूल पेटवून चहा मांडायची. चुलितल्या काड्या-गोवर्‍याचा धूर घरभर पसरुन नाका-तोंडात घुसत असे. मग घसा खवखव करायचा व डोळ्याची आग न् आग व्हायची.

कधीकधी गुळ, चहा-पत्ती आणायला जनार्दनदाजीच्या दुकानात मलाच जावे लागे. तोपर्यंत सर्वजण तोंड धूवून चुलीजवळ येवून बसत. भगून्यातला चहा जर्मनच्या गिलासात ओतून गप्पागोष्टी करत पीत होतो. चिल्ल्या-पिल्ल्यांना आई किंवा बाबा ताटलीतल्या चहाला फूक मारुन पाजत.

अवकाळी पडणार्‍या पावसातील टपोर्‍या गारा याच अंगणात वेचून खात होतो. विजांचा कडकडात झाला की घरात पळत सुटायचो. आई त्यावेळी अंगणात विळा फेकायची. त्यामुळे घरावर विज पडत नाही, असे ती सांगायची. अंधारुन आलं की विजेच्या झोताचं अंगणात लख्ख प्रकाश पडायचं.

याच अंगणात आई धान्य वाळवीत होती. ते राखण्याचं काम मी करीत होतो. चिमण्या एक-एक करीत खाली उतरत. दुरूनच दोन्ही पायाने टुऽऽण टुऽऽण उड्या मारत कधी माझ्याकडे तर कधी इकडे-तिकडे पाहत वाळवणाकडे येत. ह्या चिमण्या चिवचिव करत अंगणातले धान्य टिपायला फार उतावीळ होत. शुऽऽक शुऽऽक करत हातवारे केले की भुर्रकन उडून जात. अशी मी त्यांची गंमत पाहत मजा घेत होतो. कधी कावळे घरावर बसून कावकाव करीत; तेव्हा बाई म्हणायची,

‘अवं माय…! आपल्याकडे पाव्हणा येणार…!  कावळ्याने निरोप आणला वाटतं…!’

आम्ही भावंडं याच अंगणात गप्पागोष्टी मारत होतो. खेळातल्या दंगामस्ती, मारामार्‍या, रुसवे-फुगवे हे सारं या अंगणाने पाहिलं होतं.

याच अंगणात आई लाकडी पाटावरच्या शेवया, सरगुंडे, कुरड्या, पापड्या खास आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी करायची. त्याचप्रमाणे गोड-वड्या, आंबट-वड्या, वांगे-वालासारख्या भाज्यांच्या खुलांचं वाळवण करीत होती.

याच अंगणात दादा व बाईच्या लग्नाचे मांडव घातले होते. जेवणाच्या पंगती उठल्या होत्या. मुलीला सासरी पाठवतांना आई-बाबाच्या डोळ्यात वाहणारे अश्रू या अंगणाने पाहिले होते.

लगोर्‍या, लंगडी, फुगडी, खडे वर फेकणे, बांगड्याचे फुटलेले काकणं वर्तुळात टाकून बाहेर काढणे, चौसर सारखा अष्टचंगाचा खेळ, ‘कोणी यावे टिचकी मारुन जावे,  अंधा अंधा पाणी दे.’ असे मजेशीर खेळ, ‘मामाचं पत्र हारवलं ते मला सापडलं’ असं म्हणत भोवताल फिरण्याचा रंजक खेळ, लपणा-छपणीचा – पहिली टीप, दुसरी टीप असा रंगतदार खेळ, ओणवा झालेल्या मुला-मुलीच्या पाठीवरून उडी मारणे असे कितीतरी विविध खेळ मुलं-मुली या अंगणात खेळत असत.

कधीकधी अंगणात बसून मुली एकमेकींच्या डोक्यातील उवा, लिक्टा किंवा लिखा काढण्यात मग्न होवून जात. संध्याकाळी दिवस बुडण्याच्या आधी पोरी दिवसभर हात-पाय, तोंडावर बसलेली मातीची धूळ धुवून आरशात चेहरा पाहत नट्टा-पट्टा, साजश्रृंगार याच अंगणात करीत.

वावरातल्या कडब्याच्या बाडातले जाड जाड धांडे आणून, त्याच्या पेरकांड्याची बैलबंडी, रेंगी. घर, सायकल, ट्रक असं काहिबाही बनविण्यासाठी याच अंगणात तासनतास गुंग होवून जात होतो.

इथेच मी उन्हाळे-पावसाळे पाहिले. इथेच उन्हाचे चटके सहन केले. इथेच पावसाने ओलाचिंब होत होतो, अन् इथेच मी हिवाने कुडकुडत होतो.

मोठादादा एकदा सपरीमध्ये अभ्यासाला घेवून बसला. तो म्हणाला,

‘माझ्यावर भिक मागायची पाळी आली, तरी तुला शिकवीन. पण रामराव, तुझे शिक्षण बुडू देणार नाही.’       खरंच आहे…! आई, बाबा, दादा यांची ममता व दूरदृष्टीमुळे, तसेच बाबासाहेब आंबेडक्ररांच्या शिकवणीमुळे पिढ्यानपिढ्या डोक्यावरच्या शेणाची पाटी उकिरड्यावर फेकल्या गेली आणि माझ्या हाती लिहिण्याची पाटी आली, असंच म्हणता येईल.

अशा कितीतरी आठवणी या अंगणाने, माझ्या घराने कोरुन ठेवल्या होत्या. त्या डोळ्यासमोर आल्या की मन हळवं होत असे. मला जेव्हा-केव्हा करमत नसे, तेव्हा घरातून अंगणात व अंगणातून घरात असं उगीचच आत-बाहेर लुडबूड करत राहत होतो. घर-अंगणातल्या सुख-दु:खाचे क्षण त्यावेळी बोलके होत होते. मग ते माझ्याशी बोलू लागत. त्यातच मी हरवून जात होतो.

‘पावसाचा अंदाज दिसते…’ असं दादा बोलला. तेव्हा कुठे मी आठवणीच्या तंद्रितून जागा झालो.       खरंच, आकाश कुंद झालं. वारा थांबला होता. झाडाचं एकही पान हलल्याचा आवाज येत नव्हता. जीवाची तगमग वाढत होती. श्वासाची उत्सुकता ताणली जात होती. वातावरणात उकाडा वाढत होता. पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. एवढ्यात ढग जमा होवू लागले. ढगांनी आभाळाला वेढून घेतलं. चांदण्या बिच्चार्‍या…! चुपचाप ढगाआड लपून बसल्या. पाण्याचे टपोरे शिंतोडे पडू लागले. घरात जावून गरमीने उकडण्यापेक्षा आणखी वाट पाहावी, म्हणून तसाच चिडीचिप होवून झोपण्याचं सोंग घेतलं. पण पाण्याचे थेंब पडणे काही केल्या थांबत नव्हते.

पावसाचा जोर वाढत होता. हवेत गारवा जाणवत होता अन् त्याच बरोबर मातीचा सुगंधही मोहून टाकत होता. तसंच आम्ही पटापट उठलो. आपापली सातरी-बोथरी घेऊन घरात पळालो. घर कुठेकुठे गळत होतं. त्यामुळे घरात आलेली ओल, चिकचिक, ओले कपडे, त्याचा कुबट वास हे दृष्य आमच्या पाचवीलाच पुजायला असायचं.

असं आमच्या झोपेचं आणि त्याच बरोबर जीवनांचही खोबरं होत होतं.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: