मी आणि माझ्या आठवणी


कथा पस्तिसावी – पंछी बिछड गये

 

एकदा सहज गोष्टी-गोष्टीत माझ्या मित्राने सांगितले,

‘अरे, त्या मुलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरु आहेत.’

‘कुणासोबत?’ मी एकदम उसळून बोललो.

ज्याची मला भीती वाटत होती, तेच ऎकावे लागणार की काय? अशी शंका मनात दाटून आली. माझ्या पश्चात गावात घडणार्‍या गोष्टी तो मला सांगत होता.

‘आपल्याच गावातील xxxx सोबत तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरु आहेत.’

मला वाटलं, खरंही असेल ! कारण तो तिच्याच पोटजातीचा… त्याच्याकडे शेती होती पण कुटुंब मोठं असल्याने पुरत नव्हतं. म्हणून ते आर्थिक विवंचनेत राहत. बस्स, एवढीच काय ती कमतरता त्याच्यात होती. तेव्हापासून माझं मन कशात लागत नव्हतं. पण हे कधी ना कधीतरी घडणारच, असं मी मनाला समजावीत होतो.

धनपाल, भगवान किंवा केशव, जसे प्रेमविवाह करून मोकळे झालेत, तसे मी करू शकत नव्हतो, याची मला जाणीव होती. कारण एकतर माझं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं. त्यानंतर नोकरी शोधणं; हे माझे ध्येय होतं. दादाची डबघाईला आलेली परिस्थिती सुधारावी लागणार होती. अज्यापला शिकवावे लागणार होते. आई-बाबाने आयुष्यभर अफाट कष्ट उपसले. त्यांना आयुष्याच्या संध्याकाळचे दिवसं खडतरपणे काढावे लागू नयेत. असे अनेक प्रश्न आं वासून माझ्यासमोर उभे होते. त्यामुळे मी लग्नाचा विचारही करू शकत नव्हतो.

तिचं तारुण्य उफाळत चाललं होतं. म्हणून तिचे आई-वडील तिचं लग्न करण्याचा जरुर विचार करतील, हे स्वाभावीक होतं. माझ्यासमोर दोन भावना उभ्या ठाकल्या. एक प्रेमाची तर दुसरी कर्त्यव्याची ! प्रेमापेक्षा कर्त्यव्याची भावना सरस वाटली ! म्हणून मला कठोर होणं भाग होतं.

माझी मोठीआई – जेव्हा तिने मला त्या मुलीसोबत पाहिलं, तेव्हा म्हणाली होती,

‘रामराव, ही पोरगी तुह्यासारख्या शिकलेल्या पोराला मोठी शोभून दिसली असती. काही खोट नाही तिच्यात ! बावनकशी सोनं आहे… सोनं ! पण आपण पडलो लाडवण, ना ! म्हणून जमत नाही. नाहीतर मीच तुला म्हटलं असतं, रामराव, काही कुठी फिरू नको. तू हीच पोरगी माग.’ माझ्या मनातली व्यथा ती कशी बोलून गेली काय माहित?

ती जरी माझ्याच जातीची; पण दुसर्‍या पोटजातीची होती. हेही अवघड जाग्यावरचं दु:खणं होतं. त्याकाळात पोटजातीच्या पलीकडे जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. तसा विचार स्वप्नातही कोणी करीत नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाती-पोटजातीच्या अंताचे विचार अजूनही समाजात रुजले नव्हते. प्रेमभावना माणसाला हवेत तरंगत ठेवते तर सामाजिक व्यवस्था जमिनीवर पाय ठेवून चालत असते, याची मला जाणीव होती. म्हणून तिच्यासोबत लग्नाचा विचार मनात आणणे म्हणजे लवनाच्या या काठावरून दुसर्‍या काठावर उडी मारण्यासारखे कठीण काम होतं !

मी आणि माझा मित्र, पाटील दोघेही एकाच वर्गात शिकत होतो. आम्ही नगरपालीकेच्या सार्वजनिक लायब्ररीमध्ये नियमीत जात होतो. एखाद्या दिवशी गेलो नाही की चुकल्यासारखे वाटत असे. आमच्या रोजच्या जीवनाचा तो एक भाग बनला होता. नोकरीच्या जाहिराती पाहून दोघेही अर्ज करीत होतो. एकदा मला पोष्टात लिपीकाच्या पदासाठी मुंबई येथे नेमणुकीचं पत्र मिळालं. माझ्यापूर्वी आडेला असेच पत्र आले होते. तो तेथे जाऊन परत आला. तो सांगत होता, की मुंबईला राहण्याची व्यवस्था होत नाही. घर भाड्याने घेण्यासाठी खूप पैसे मोजावे लागते. तेथील जीवन फार महागडं आहे. त्याचा अनुभव ऎकून, मी सुध्दा मुंबईला जायचा विचार सोडून दिला.

दरम्यान माझी महाराष्ट राज्य विद्युत मंडळामध्ये लिपीकाच्या पदासाठी लेखी परीक्षा झाली. माझा पेपर खूप चांगला गेल्याने व शिवाय राखीव जागेची सवलत, शामरावदादाने तगड्या पुढार्‍याकडे लावलेला लग्गा…! यामुळे मला इकडेही नोकरी मिळेल; अशी दाट शक्यता वाटत होती.

त्यावेळी मी मामाढोंगेच्या दुकानात गेलो. तो म्हणाला,

‘रामराव, तुझे पाकीट आले.’ असे म्हणून पेटीत ठेवलेलं पाकीट माझ्याजवळ दिलं. मी नोकरीच्या अर्जात हाच पत्ता देत होतो. मी आतील पत्र वाचलं. मला नोकरी मिळाल्याचं त्यात लिहिलं होतं. माझ्या चेहर्‍यावर हास्य उमटलं. माझ्या हालचालीवर मामाढोंगेचं बारीक लक्ष होतं. माझा चेहरा प्रफुल्लित झाल्याचे पाहून त्यालाही वाटलं की काहीतरी विशेष असलं पाहिजे. तो म्हणाला,

‘रामराव, काय आहे रे… सांगशील की नाही?’

‘मामा, मला नोकरी मिळाली.’

‘अरे व्वा…! कुठे?’

‘विद्युत मंडळात.’

‘वाऽऽ वाऽऽ छान झालं ! आता तुमचे दिवसं पालटले, बाबा…’

अखेर मला नोकरी मिळाली…! किती दिवसापासून उराशी बाळगलेल्या नोकरीचं स्वप्न, साकारल्याने माझा चेहरा आनंदाने फुलून गेला. मी होस्टेलवर आलो. आडेला पण असंच पत्र आल्याचं कळलं. आमच्या नोकरीची बातमी सर्व मुलांना कळली. सारेजण आमची विचारपूस करीत होते. आम्हाला चंद्रपूर विभागात नेमणूक मिळाली. तेथून सविस्तर पोस्टींग मिळणार होती. नंतर कळलं की आमच्यासारख्यांना मुद्दामहून मागास, दुर्गम आणि दूरच्या ठिकाणी पाठविण्यात आले होते. इतरांना यवतमाळ किंवा आसपासचे ठिकाण दिले होते.

आतापर्यंत तुडविलेल्या काटेरी वाटेवरचा प्रवास संपणार होता. ‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’च्या वेदनादायक आठवणी, माझा भुतकाळ ठरणार होता. यापुढील प्रवास निश्चितच अंथरलेल्या मखमली गालीच्या वाटेने सुरु होणार होता. याचा मला विलक्षण आनंद झाला. हा आनंद मी कुठे झाकू शकत नव्हतो. माझा उत्साह कमालीचा उतू जात होता. माझी बी.कॉम फायनलची परीक्षा अद्याप व्हायची होती. मधातच कॉलेज सोडून जावे लागणार होते. पण नोकरीनंतर सुध्दा पदवी घेतल्याशिवार राहणार नाही; असं मनोमन ठरवीलं.

मी घरी आलो. सर्वांना ही बातमी सांगितली. माझ्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई-बाबांना त्यांच्या कष्टांचे चीज झाल्याचं समाधान, त्यांच्या चेहर्‍यावर झळकलेले दिसत होतं. माझ्या नोकरीची गोष्ट वार्‍यासारखी गावात पसरली. अगदी कमी वयात मला नोकरी लागली, याचे सर्वांनाच अप्रूप वाटत होते.

गावामध्ये यापूर्वी प्रल्हाददादाला नोकरी लागली होती. त्यानंतर मला. गावात मीच जास्त शिकलेला होतो. प्रल्हाद-दादा प्री- आर्टस् अन् मी बी.कॉम फायनलपर्यंत पोहचलो होतो. कॉलेजची इमारत पाहिलेले, त्यावेळी केवळ आम्ही दोघेच होतो. प्रल्हाददादा शिक्षण अर्धवट सोडून नोकरीच्या जागी रुजू झाला. तो बाबाच्या मामेबहिणीचा पोरगा होता.

मला नोकरीवर जाण्यासाठी पैसे पाहिजे होते. घरी दादा किंवा बाबाकडे काहीच पैसे नव्हते. मला आशेचा किरण तुळशीरामदादा दिसला. तो माझी मोठीआई, धुरपताबाई हिचा मुलगा. तो गावातच राहत होता. तो आम्हाला अडीअडचणीला मदत करायचा. मी संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. तो, मोठीआई व अनुसयावहिनी घरीच होते. मी नोकरी लागल्याबद्दल सांगितले. त्यांनाही खूप आनंद झाला. परंतु जाण्यासाठी व राहण्या-खाण्यासाठी पैसे नसल्याची अडचण सांगितल्यावर तो म्हणाला,

‘माह्याकडे आत्तातरी पैसे नाहीत. पण…’ असं अर्धवट वाक्य त्याच्या तोंडातून बाहेर पडलं, तेव्हा माझ्या अंगावर बॉम्बगोळा पडून उध्वस्त होतो की काय, असं मनाला चाटून गेलं.

‘उद्या सोन्याची अंगठी गहान ठेऊन, तुला पैसे आणून देतो.’ असं जेव्हा म्हणाला; तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला. दुसर्‍या दिवशी खरेच त्याने मला चाळीस रुपये आणून दिले. माझा महत्वाचा प्रश्‍न मिटल्याने मी आता खुशीने नाचत होतो.

बाबा वाघाडी नदीच्या धरणावर दुपारी चार वाजताच्या दरम्यान भजी विकायला जात होता. तेथे काम करणारे मजूर विकत घेऊन खात. आमच्या व आजूबाजूच्या गावातील बरेच मजूर तेथे काम करीत. ती मुलगी सुध्दा तिथे काम करत होती. मी एखाद्यावेळी धरणावर गेलो, की मजुरांच्या अफाट गर्दीत मी तिला दूरपर्यंत नजर टाकून शोधत होतो.

‘माह्या पोराला बाबूची नोकरी लागली.’ असे बाबा भजे देत देत लोकांना आवर्जून सांगत होता. त्यावेळी साधी चपराश्याची नोकरी लागणं पण फार अप्रूप होतं. नोकरी म्हणजे बिनापाण्याची शेती. गावातला महादेव हा रोडवर मुकादम होता. त्याला म्हणायचे,

‘तुवं काय पाहायचं, बाप्पा…! नाही पाऊस पडला तरी तुहा पगार काही बुडत नाही. पण आमची शेती मातर बुडते. तुही नोकरी म्हणजे बारमाही शेतीच.’

लग्नाच्या बाजारात नोकरीवाल्यांची एकाएकी किंमत वाढत असे. श्रीमंत पोरींचे बाप कफल्लक पण आता नोकरीवर लागलेल्या पोरांच्या मागे हुंडा घेवून फिरत. सरकारी नोकरी म्हणजे अख्ख जग जिंकल्यासारखं वाटत असे. खेड्यातील भावविश्व एवढ्याशा नोकरीतच समाधान मानत. त्यापेक्षा आणखीन मोठमोठ्या नोकर्‍या असतात, हे त्यांना माहीतच नसतं.

मी दुसर्‍या दिवशी बाबासोबत धरणावर गेलो. तेथील ओळखीचे लोक हर्षोत्साने माझ्याकडे पाहत होते. गावाच्या मुलाला नोकरी लागली, या उत्कट भावनेने हरखून गेले होते. अनोळखी लोक हाच काय तो ‘भजेवाल्याचा पोरगा’ म्हणून कौतुकाने पाहत. भजे घेण्यासाठी सारे लोक जमले होते. बाबा पळसाच्या पानावर चार आण्याचे भजे उधारीत देत होता व त्यांची नावे वहीत टिपून घेत होता. ती मुलगी पण भजे घेऊन माझ्याजवळ आली. तिचं गोरं रुप दिवसभराच्या काबाडकष्ट व उन्हाने काळपटून गेलं होतं.

‘नोकरी लागली, ना.’ हे ऐकतांना मी तिच्या चेहर्‍यावरचे आनंदाचे भाव टिपले. तिच्या मनातल्या भावना तिच्या चेहर्‍यावर प्रकट झाले होते. इतरांपेक्षा तिला नक्कीच अधिक आनंद झाला होता, यात वाद नव्हता.

‘हो.’ ऎवढे बोलून मी निस्तब्ध झालो. मी आणखी काहीतरी तिच्याशी बोलेन, याची वाट पाहत थोडा वेळ थबकली. शेवटी काहीच बोलत नाही; असं पाहून ती चरफडत, हिरमुसली होऊन मजुरांच्या गर्दीत जाऊन बसली. क्षणभर मी तिच्याकडे पाहिलं; तेव्हा तिच्या डोळ्यात दाटून आलेली आर्तता दुरुनही स्पष्टपणे जाणवत होती. पण तिच्या नजरेला नजर भिडविण्याची हिंमत माझ्यातून लोप पावत चालल्याचे जाणवत होते. तिच्या भेटीने स्मृतीत साठवलेल्या आठवणीच्या लाटा, माझ्या मनात हेलकावे खाऊ लागले. तिच्या लग्नाच्या चर्चा गावातल्याच मुलाशी चालू असल्याची मित्राने सांगितलेली गोष्ट विसरलो नव्हतो. म्हणून मला तिच्याबद्दल असुया वाटायला लागली.

मी नोकरीच्या आदेशाप्रमाणे चंद्रपूरला गेलो. सोबत आडे पण होता. तेथील ऑफीसने मला ब्रम्हपुरी तर आडेला गडचिरोलीला जायचा आदेश दिला. मी ब्रम्हपुरीला खोली शोधायला लागलो. जातीच्या विषारी तिरस्कारामुळे इतर जातीचे लोक खोली देत नव्हते. आमच्या ऑफीसमध्ये काम करणारे बौध्द समाजाचे लाडे बाबू मोठ्या आत्मीयतेने मला मदत करीत होते.

ऑफिसच्या कामात पण लाडे यांच्याशिवाय शेंदरे, ब्राम्हणकर, घरडे, जोशी बडेबाबू आणि तुराबअलीसाहेब मोलाचं मार्गदर्शन करीत. घरं शोधतांना माझ्या लक्षात आले की बौध्द मोहल्यात तेवढ्या चांगल्या खोल्या उपलब्ध नव्हत्या. कारण भाड्याने देण्याइतपत सिमेंट-काँक्रीटचे, संडास-बाथरुमचे घरं बांधण्याची त्यांची ऎपतच नव्हती. काही दिवस लॉजवर राहून रामटेके यांचं घर मिळालं. त्यात दोन लहान लहान धुरकट खोल्या होत्या. संडास नव्हता. बाथरूम होतं पण बिना छप्पराचं. त्यावेळी त्या घराचं विस रुपये भाडं होतं.

मी नुकताच लागल्याने सुट्ट्या मिळू शकत नव्हत्या. म्हणून मी आईला नागपूरला येण्यास पत्र पाठविले. मी नागपूरला बोन्द्रे नावाच्या मित्राकडे थांबलो होतो. तो माझा चांगला मित्र होता. आम्ही कॉलेजच्या होस्टेलमध्ये असतांना त्याच्या गावाला भाड्याच्या सायकलीने गेलो होतो. दुसर्‍या दिवशी आई, बरोबर एस.टी. बसने नागपूरच्या स्टॅंडवर आली. तिला घेऊन मी ब्रम्हपूरीला आलो;

माझ्या खोलीशिवाय त्या घरी आणखी दोन कुटुंब राहत होते. मी पहिल्या, गणवीर दुसर्‍या व रामटेके तिसर्‍या खोलीत राहत होते. घरमालक वरच्या मजल्यावर राहत. त्यांचेकडे बौध्द भिक्खू भंते धम्मसुंदरजी येत. त्यांना मी भोजन व पैसे दान देत होतो. बौध्द धम्माबद्दल त्यांचेशी चर्चा करीत होतो. त्यामूळे त्यांच्याशी माझी खूप जवळीक निर्माण झाली होती.

गणवीर हे बिडी कारखान्यात चहा बनविण्याचं काम करीत. त्यांना दोन मुली व एक मुलगा. त्यांच्या लहान मुलीला कडेवर घेऊन वागवीत होतो. मोठी मुलगी नालंदा, दहावीला शिकत होती. मुलगा महेंद्र, दुसरीत होता. महिन्याच्या शेवटी शेवटी पगाराचे पैसे संपत; तेव्हा आईला म्हणायचो,

‘आई, बाबुजीकडून वीस रुपये उसनवार घेऊन ये.’ मी त्यांना बाबूजी म्हणत होतो. खूप चांगले होते ते ! मी पगारातील काही पैसे अज्यापला व दादाला पाठवित होतो. उरलेल्या पैशात आम्ही दोघं मायलेकरं भागवीत होतो. अज्याप यवतमाळला गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होता. तो त्याच शाळेच्या होस्टेलमध्ये राहायचा. त्यावेळी मला केवळ दोनशे चवदा रुपये पगार मिळत होता. पहिला पगार झाला; तेव्हा आईला पैसे देत म्हणालो,

‘आई, माझा पगार…! हे घे… ठेव तुझ्याकडे.’ माझ्या हातातून पैसे घेतांना तिच्या डोळ्यात अश्रू तराळलेले मी पाहिले. ते पाहून मीही भावूक झालो. तिला धरून खाली बसलो. मी तिच्या डोळ्यातले आसू पुसले.

‘आई, नको रडू… आत्ता आपले दिवसं पालटले.’

तिला गरीबीतले दिवसं आठवले. पोरगा शिकला, नोकरीला लागला अन् पगार घेऊन आला ! कसा सोन्यासारखा दिवस उगवला ! हे सारे तिला स्वप्नवत वाटले. आमच्या घराण्यात पहिल्यांदा असं घडलं; म्हणून तिचे डोळे पाणावले ! तिच्या व्याकुळलेल्या आयुष्याला नवीन झळाळी प्राप्त झाली.

मी आईला घेऊन कपड्याच्या दुकानात गेलो. तिला लुगडं, चोळी व माझ्यासाठी कपडे घेतले. तेव्हापासून माझा पैजामा-शर्ट जाऊन पॅन्ट-मनिला आला. त्यावेळी माझ्या जीवनातलं परिवर्तन पहिल्यांदा जाणवलं.

तिसर्‍या खोलीतले रामटेके पोष्टात बाबू होते. माझ्यासारखेच अविवाहित ! त्याच्याकडे त्याची आई व दोन लहान भाऊ राहत. त्याचा भाऊ गणेशला चांगले मार्क्स पडल्याने, मेडिकलला प्रवेश मिळणार होता. पण अॅडमीशन घेण्यासाठी तेवढे पैसे नव्हते. म्हणून विवंचनेत पडले होते. त्यावेळी मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी संघाचा कोषाध्यक्ष झालो होतो. माझी तडप व इमानदारी पाहून त्यांनी ही जबाबदारी – मी नवीन असतांना सुध्दा माझ्यावर सोपवली होती. ही युनियन कम्युनिस्ट पक्षाचे ए.बी.बर्धन चालवीत होते. मी त्यावेळी मिटिंगमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होतो. युनियनचे सेक्रेटरी राऊत बाबू होते तर अध्यक्ष जोशी बडेबाबू होते. युनियनचे पैसे पोष्टातल्या माझ्या खात्यात जमा करून ठेवत होतो. ही गोष्ट रामटेकेला माहिती होती. म्हणून त्याने मला पैसे मागितले. मी द्यायला तयार झालो, पण कुणाला न सांगण्याच्या अटीवर. त्यांनी भरोसा देण्यासाठी हातातली घड्याळ व सायकल गहाण ठेवण्यास तयारी दाखवली. पण मी ते न घेता त्याला तीनशे रुपये दिले. ते पैसे नंतर त्यांनी इमानदारीने परत केले, ही गोष्ट निराळी !

आम्ही दिवाळीच्या सुट्टीत पहिल्यांदा गावाला जाणार म्हणून दोघेही मायलेकं मोठ्या खुशीत होतो. मी बाबा, दादा, वहिनी व दादाच्या पोरांसाठी कपडे विकत घेतले. नव्हाळीतलं म्हणून लुचई तांदूळ व हातसडीचे पोहे पण घेतले. हे तांदूळ बारीक आणि खायला अप्रतिम होते. आमच्या गावाकडे हे तांदूळ मिळत नसत. हा तांदळाचा प्रदेश असल्याने सुकाळ होता. आमच्या घराजवळच गुजरी भरत होती. त्या बाजारात शेतकरी बैलगाडीने गोण्यात टाकून तांदूळ विकायला आणीत. त्यामुळे तांदळाची रांगच रांग दिसत होती.

मी व आई यवतमाळला बसगाडीतून बाजाराजवळील थांब्यावर उतरलो. तो दिवस बाजाराचा होता. आम्ही नाक्यावर आलो. तेथे बाजार करून आलेले लोक गाठोडे घेऊन थांबलेले दिसले. धरणावरचे कंपनीचे ट्रक मजुरांची ने-आण करीत असल्याने आम्हीपण वाट पाहत थांबलो. मी समोर पाहिलं; तेव्हा भंगीसमाजाचे घरं-झोपड्या आणि डुकराचे मास विकणारे दुकाने दिसले. मी शिकायला होतो, तेव्हा हेच दृश्य या ठिकाणी दिसत होतं. हे लोक डुकरं पकडत; तेव्हा डुकराची केविलवाणी परिस्थिती पाहावल्या जात नव्हती. त्यांना पकडल्यावर त्यांचे चारही पाय व तोंड बांधत, तेव्हा डुकर चीऽऽ चीऽऽ आवाज करीत मोठा आकांत मांडत.

मास खाण्याची जुनी आदत सुटत नव्हती. म्हणून गरीब लोक गावठी डुकराचं मास खायला लागले, असे मी ऐकले होते. ऐवढेच नव्हेतर बकर्‍यापेक्षा स्वस्त आहे; म्हणून ढोरांच मास सुध्दा लपूनछपून खायला लागल्याची कुजबुज होती. बकरा आणि ढोर यांचे कमीले बाजारात जवळजवळ होते. त्यामुळे कोणी ढोराच्या कमेल्यात शिरतांना पाहीलंच तर चुकून गेलो, असं म्हणून मोकळे होत. बकर्‍याचं मास खाणे हे श्रीमंतीपणाचं व प्रतीष्ठेचं लक्षण मानलं जाई. पण हे मास विकत घेणे गरीबांच्या आवाक्याबाहेरचं झालं. कारण ब्राह्मणांसकट सारेच खायला लागल्याने फारच महाग झाले. तरीही गरीब लोक बकर्‍याचे टाकाऊ वधडी-केणं स्वस्त राहत म्हणून खात. कधीकधी बाबापण आणत होता. मी या विचारात गढलो असतांना ट्रक कधी आला ते कळलंच नाही. आई म्हणाली,

‘बाबू, दोन झोरे घे अन् चढ वर. मी गठुडं घेते.’ लोकांसोबत आम्ही ट्रकमध्ये चढलो. आई खाली लाकडी पाट्यावर बसली. मी फळ्याला धरून उभा राहिलो. ट्रकमधून उडणारी धूळ नाका-तोंडात घुसत होती. ट्रक अकोलाबाजार रोडच्या मार्गाने जाऊ लागला. मागे पडणारा डामरी रोड रेखीव वाटत होता. बर्‍याच दिवसानंतर पाहिल्याने रोड, घाट, आजूबाजूचे झाडं, गावं नवीन-नवीन वाटत होते. जसं युवतीला तारुण्याची चाहूल लागली की कसं बदलल्या-बदलल्या सारखं वाटतं, तसंच काहीसं झालं.

घाटाच्या जंगलात दाटीवाटीने उभे असलेले सागाचे झाडं, वावरातील धुर्‍यावरचे निरनिराळे झाडं, भोसा-बोधगव्हान गाव, सावरगडचा बरड हे सारं मला बदलल्यासारखं वाटत होतं. सृष्टी तीच पण तिचं सौंदर्य बदललेलं दिसत होतं. हे बदललेलं सौंदर्य माझ्या डोळ्याला खूप भावून गेलं होतं. पांढरीच्या अलीकडे धरणाचा रस्ता फुटला होता. वाघाडी नदीच्या काठाकाठाने ट्रक धावत धरणापर्यंत आला. आजूबाजूला कामगारांच्या झोपड्या दाटीवाटीने पसरल्या होत्या. एकाठिकाणी ट्रक थांबला. सारे लोक घाईघाईने उतरले. आम्ही मायलेक पण उतरलो.

बाबाचं जवळच किराणा आणि चहा-भज्याचं हॉटेल थाटलेलं दिसलं. त्याच्या भेटीनं माझं थकलेलं मन ताजेतवाने झाल्यासारखं वाटलं. आम्हाला पाहून बाबा हरखून गेला. त्याने आपुलकीने फराळ व चहा-पाणी दिला. विशेष सांगायचं म्हणजे बाबाने – त्यावेळी एका गिर्‍हाईकाची गहाणात पचलेली घड्याळ, मला भेट म्हणून दिली. जीवनात पहिल्यांदा मी हाताला घड्याळ बांधली. तेव्हा मी मनोमन सुखावून गेलो होतो. ह्या घड्याळीला चाबी द्यावी लागत होती. चाबी संपली की घड्याळीचे काटे थांबत. चाबी दिली की पुन्हा सुरु होत. अशी त्या घड्याळाची गंमत होती.

धरणावरून घरी पायी पायी चालत आलो. चौधरा गाव तेथून बरंच दूर होतं. घरी पोहचलो; तेव्हा रात्रच झाली. मी चालून चालून पार थकून गेलो होतो. आम्ही बर्‍याच दिवसाने घरी आलो; म्हणून सारेच आनंदित झाले. त्यांच्यासाठी आणलेले नवीन कपडे पाहून सुखावून गेले.

गावात बराच बदल झाल्याचं आढळलं. नोकरी लागल्याने माझी किंमत वाढली होती. जसं नवथर गोर्‍हा शिकून कसबी बैल बनला, की त्याची किंमत वाढते, तशी ! जो-तो माझ्याशी प्रेमाने व मानसन्मानाने बोलत होता. ऎवढंच नव्हे तर, ‘माही पोरगी मागल, तर मी एवढा हुंडा देईन.’ अशी दमडूमामा व चिरकूटमामा यांच्यात चढाओढ लागली होती, असे माझ्या कानावर आले होते.

आणखीन एक बदल मला जाणवला, तो म्हणजे अनेक लोक गाव सोडून निघून गेले होते. ज्यांची शेती धरणात गेली; त्यांना सरकारने दुसरीकडे शेत दिले होते. घरासाठी जमीन व घर बांधण्यासाठी पैसे देऊन जोडमोहा गावाजवळील विठ्ठलवाडी गाव वसवले होते. काहींनी शेती न घेता पैसे घेऊन दुस-या गावाला स्थलांतरित झाले होते. काही लोक शहरात जावून राहिले होते. नाहीतरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होतेच की, खेडे सोडा अन् शहरात जा. त्याप्रमाणे…! ह्या लोकांनी आपली घरे अगदी स्वस्तात बंजारी लोकांना विकले. आमच्या मोहल्ल्यात बंजारी लोक राहायला आले. आमच्या लोकांशी बाट धरणारे आमच्याच घरी राहत असल्याचे पाहून, मला अचंबा वाटत होता. फक्त बोटावर मोजण्याऎवढे बौद्धाची घरे तेवढे उरले होते. तेही त्यांची शेतीवाडी धरणात न गेल्याने गाव सोडू शकत नव्हते, म्हणून.

ती मुलगी सुध्दा आई-बाबासोबत गाव सोडून गेली होती. जातांना कदाचित माझी आठवण काढून आपल्या मनात म्हणत असावी,

‘साधी-सुधी xxxx तुने धरली नाही…

तुझी माझी प्रीत कधी… फळली नाही…!

माझं भावविश्वासतलं एकदाचं व शेवटचं प्रेम होतं ते ! ‘पंछी बिछड गये मिलनेसे पहिले.’ अशीच काहीशी कथा आमच्या बाबतीत घडली होती.

ती कुठे गेली? कुणाच्या पदरात पडली? इत्यादी प्रश्नाने माझ्या मनांत काहूर माजवलं होतं. अन् ते शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहिलं, ते राहिलचं…! कारण बुजत चाललेल्या जखमेच्या खपल्या पुन्हा ऊघडून पाहून जीव कासाविस होऊ नये, म्हणून मी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा कधीच प्रयत्‍न केला नाही. पण एक सत्य मात्र कळलं की, ज्या मुलाबाबत तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरु असल्याचे ऎकले होते, त्या मुलाशी तिचे लग्न झालंच नाही.

मी नेमकं तेवढ्यात एका गाण्याची ओळ ऐकली. अन् ती माझ्या मनात खोलवर भिडली.

‘किसिका प्यार लेके तुम | नया जहाँ बसाओगे ||

ये शाम जब भी आयेगी | तुम हमको याद आओगे ||’

असंच काहीसं आमच्याही बाबतीत जीवनाच्या अंतापर्यंत होत राहील, एवढं मात्र नक्की !

माझ्या जीवनात अवतरलेली निरागस मुलगी कायमची दुरावली. हे शल्य मला सतत बोचत होतं. ही दुखरी हुरहूर माझ्या मनात खोलवर ठुसठूसत राहिली, ती कायमचीच !

मी त्यानंतर मनोमन ठरविलं की ज्यावेळी लग्नाच्या बाजारात उतरीन; त्यावेळी तिच्या तोडीस तोड असलेल्या मुलीशीच लग्न करीन. मग ती गरीब असो की अशिक्षीत ! मला तर हुंड्याच्या फंदात पडायचंच नव्हतं. यदाकदाचित जरी ती दुसर्‍या पोटजातीची असली; तरीही मी प्रवाहाच्या विरोधात जाऊन बंड करण्यास मागेपुढे पाहणार नाही; असा निर्धार केला.

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: