मी आणि माझ्या आठवणी


कथा चौतिसावी – निस्तब्ध प्रेम

 

मी कॉलेजचं एकेक वर्ष पुढे सरकत जाऊन बी.कॉम. फायनलला येवून पोहचलो. या काळात   तारुण्याच्या सार्‍या खुणा माझ्या शरीरभर ठसठशीत उमटल्या होत्या. एव्हाना भिन्न लिंगाबाबत वाटणारं अमाप कुतूहल आणि नैसर्गिक आकर्षण माझ्याही बाबतीत लपून राहिलं नाही. ऐन वसंतात झाडा-वेलीवर जसे तांबूस पालवी फुटतात, तसेच याच वयात मुलांमुलींमध्ये एकमेकांच्या शारीरिक आकर्षणाचे स्फुलिंग धगधगतात आणि प्रीतीच्या कळ्या उमलू लागतात, यात काही नवीन नाही.

माझ्या कॉलेजमध्ये मुलं-मुली एकत्रीत शिकत. काही अपवाद सोडले तर ते अगदी स्वैर व मुक्‍तपणे वागत. एकमेकांच्या अंगावर प्रेमाचा सडा शिंपडत ! गॅदरींगमध्ये अशा गोष्टींचा अविष्कार नेमका दिसून पडायचा. आम्ही खेड्याच्या वातावरणातून आल्याने कदाचित प्रेमात पडण्याची भावना आमच्यात वृध्दिंगत झाली नसावी. आम्ही होस्टेलर्स, पैजामाछाप व खेडवळ चालीचे ! त्यामुळे कॉलेजच्या मुलीं आमच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या. ते आमच्यासाठी चांगलंच होतं, म्हणा ! जीवनाचं वैराण वाळवंट होण्यापेक्षा फुलबाग फुलविण्यासाठी आमचं लक्ष अभ्यासाकडे लागत होतं.

पण कसं घडलं काय माहित? मी गावातील एका मुलीवर निरागसपणे प्रेम करायला लागलो. हो… अगदी निरागसपणे ! प्रेमाची भावना कुणामध्ये नसते? प्रेमाची विण नवरा, बायको, बाप, आई, बहीण, भाऊ, नंदा, भावजय, दिर अशा अनेक जिवाभावाच्या नात्यामध्ये गुंफलेली असते. नाजूकतेचं प्रतिक असणार्‍या फुलांकडे सर्वाचं लक्ष का जातं? त्याला पाहून आपलं मन प्रसन्न का होतं? सृष्टीतील जीवांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे; यासाठी फुलं सुध्दा सुंदर सुंदर रंगाचे, रूपाचे, गंधाचे, आकाराचे पखरण करीत असतेच, ना ! मानवी जीवन या सत्याला थोडंच अपवाद असू शकतं? कारण निसर्गाचाच तो अविभाज्य घटक आहे ना…!

सुंदरतेचं आकर्षण कुणाला नसतं? जगात जे जे सुंदर आणि विलोभनीय, त्यावर सारेच प्रेम करतात. म्हणून प्रेम हे नैसर्गिक भावना आहे. दोन जीवात नाजूक वीण गुंफायला प्रसंग कसे घडत जातात ते काही सांगता येत नाही. पण अशी आसुसलेली मनं एकत्रित आले आणि भावबंधाच्या तारा जुडल्या, की अतूट नातं निर्माण होतं;  ऎवढं मात्र खरं ! त्यालाच तर प्रेम म्हणत नाही, ना ! पण सहज नात्यातून निर्माण होणारं प्रेम आणि दोन जीवाच्या शारिरीक आकर्षणाने निर्माण होणारे प्रेम हे वेगवेगळं असतं, असं फार तर म्हणता येईल !

आमच्या गावात पण प्रेमाचे अंकुर फुटले होते. माझा मित्र धनपालने घराशेजारच्या गोदावर प्रेम केलं व लग्नाच्या बेडीत अडकला. भगवानने प्रभावतीवर प्रेम केलं व दोनाचे चार हात करून मोकळा झाला. तांड्यातही केशवने सुंदरासोबत प्रेमविवाह केला. आणखीन माझ्यासमोर उदाहरण होतं; ते म्हणजे माझी मामेबहीण चित्राबाईचं. ही आमच्यासोबत उमरसरा येथे शिकायला होती. तिचं खरं नाव चित्ररेखा, पण कोणी तिला रेखा तर कोणी चित्रा म्हणायचे. आम्ही तिला चित्राबाई म्हणत होतो. त्याचवेळी कोळंबी गावाचा पांडुरंगदादा पण कॉलेजला शिकत होता. तो आम्हाला अभ्यासात मदत करायचा. त्याला चित्राबाई फार भावली. त्यांनी तिला मागणी घातली. ती आधी त्याच्याकडे अवघड गणितं सोडवून घेण्यासाठी जात होती. पण नंतर लाजायला लागली. म्हणून माझी बहीण जनाबाई हिला सांगत होती. लग्नाच्या गोष्टीची कुणकुण वार्‍यासारखी गावात पसरली. कोळंबीचे नाव काढलं, की सर्वांचे सशासारखे कानं टवकारत. मग बाया तंबाखू-पान खातांना व माणसं बिडी-चिलीम ओढतांना एकमेकांना हळूच विचारत,

‘बाप्पा…! कोळंबीला पोरगी देते म्हणे ! काही डोक्सबिक्स फिरलं तर नाही ना, सावकाराचं?’ अशा चर्चेचं पीक गावात उगवलं. मामा अडीनडीला सावकारी देत होता. म्हणून सावकार म्हणत. त्यादिवशी आई अंगणातच ज्वारी पाखडत बसली होती. मीपण ओट्यावर बसून कधी आईकडे तर कधी पुस्तकाकडे पाहत अभ्यास करत होतो. बयनामावशी आवाराच्या दरवाज्यावर दिसताच आई म्हणाली,

‘यवं… बयनाबाई, लयी दिसाने आली. ये बस. पान खाय.’

‘मी बसायला नाही आली, मायबाई…! मी इकडून चालली, म्हणूनशानी तुह्या घराकडे पाय वळला. एक गोष्ट तूले विचारायची होती…’

‘कोणती वं…?’ असं प्रश्नार्थक चेहरा करून आई तिच्याकडे पाहत म्हणाली.

‘अवं चित्राला…’ चित्राचं नाव काढल्याबरोबर कोणती गोष्ट ते आईच्या लगेच लक्षात आलं. सूप खाली ठेवत आई म्हणाली,

‘ये बस. सांगतो… तुले काय म्हणायचं ते समजलं मले.’

ती आईजवळ बसली. आईने कमरेला खोचलेली पिवशी काढली. त्यातून चुना, कात व तंबाखाच्या डब्ब्या काढल्या. पिवशीत पुन्हा हात टाकून मुडपलेलं विड्याचं पान काढलं. सरळ करून लुगड्याच्या शेवानं पुसून घेतलं. त्याला मधातून चिरून दोन तुकडे केले. पायाच्या टोंगळ्यावर ठेवून चुना लावला. काताचे बारीक खडे टाकले. पिवशीचं तोंड पुन्हा उघडून सुपारीचं खांड व अडकित्ता काढला. अडकित्त्याने खंडाचे तुकडे करून पानावर टाकले. चिमुटभर तंबाखू टाकून पानाची घडी तिच्या हातात दिलं. तिनं कपाळाजवळ नेत ‘जयभीम’ म्हणून तोंडात टाकलं. आईने पण ‘जयभीम’ म्हणून प्रतिसाद दिला. दोघ्याही पानं चघळायला लागल्या. मधातच तुटलेली गोष्ट पुन्हा सुरु झाली.

‘हं, मघाशी काय म्हणत होती, तू…?’ तिच्याकडे पाहून आई म्हणाली.

‘नाही…! मले समजलं की चित्राला म्हणे, कोळंबीला देणार हायेत…! तुही भाची, म्हणुनशानी रुजवात करायला आली, मायबाई…!’

‘हो वं बाई… खरं आहे. माह्या पोरानं सांगितलं मले तसंच !’

‘पण… कोळंबीला? बरं नाही ना !’

‘तू कावून काळजी करतं वं? आहेत ना शहाणेसुरते पाहायला !’ असं तिला आई रागातच बोलल्याने ती पटकन उठली. तिच्या वटवटीमुळे माझंही मन लागत नव्हतं. ती गेल्याने मी परत अभ्यासाला लागलो.

मामाच्या घरी अंगणात जातपंचायत भरली.

‘नाही… कोळंबीला आपल्या चित्राला द्यायची नाही.’ गोविंदामामा गरजला.

‘का नाही द्यायची…? पोरात काही खोट आहे का?’ शामरावदादा उसळून म्हणाला.

‘नसेल खोट, म्हणून काय तिला विहिरीत ढकलून द्यायची काय? सार्‍यांना माहितच आहे ! त्या गावात पोरीला भाय राबऊन घेतात. पोरीला सासुरवास करतात.’ गोविंदामामानं स्पष्टीकरण दिलं.

‘पोरगा काय नेहमी त्या गावात थोडाच राहणार? तो खूप शिकला. त्याला नोकरी लागली की तो जिथे जाईल, तिथं पोरगी जाईल.’ असं पुढे दादाने पुष्टी जोडली.

‘कोळंबीचं नाव जरी डंक्यावर असलं, तरी पोराचं घर चांगलं आहे. त्याचा बाप साधुबुवा आहे. नाही दारु पित न् मांस खात. नाही कुणाच्या अध्यात राहत न् मध्यात राहत. पोरगा लय सुदा आहे. शिकला-सवरला आहे. मी म्हणतो, त्याला पोरगी द्यायला काय हरकत आहे? दोघांचा जोडा चांगला जुळत आहे. मग आणखी काय पाहीजे…?’ दादा समजुतीच्या सुरात म्हणाला.

‘आता कोळंबीला सासुरवास आहे, म्हणाल तर आपलंही गाव भानगोडं म्हणून नावाजलेलं आहे, ना ! आपल्याही गावात कोणी पोरी द्यायला पाहत नाही.’ असं तुळशीरामदादा – माझ्या मोठयाआईचा मुलगा, नेमकं गावाच्या उण्यावर बोट ठेवत बोलला.

गोविंदामामाच्या गटाचा विरोध कायम राहीला. नाही म्हणजे नाही ! असंच त्यांच्या बोलण्याचा सारा रोख दिसत होता. हे लोक उगीचंच फाटे फोडत असल्याचं मला सारखं जाणवत होतं. कोळंबीला पोरी देऊ नयेत, कारण सुनवारीला घरा-दाराच्या कामात राबवून घेतात म्हणे ! परंतु तेथील मुली हमखास मागाव्यात. कारण त्या कष्टीक असतात. म्हणूनच बाबाने देवदासदादासाठी कोळंबीची यशोधरा नावाची मुलगी मागितली असावी.

कोळंबीला दिलेल्या मुलीला भारी त्रास होतो, हेच गोविंदामामाला विरोध करण्याचं निमित्त सापडलं. एखादा माणूस चालत्या गाडीत खीळ घालत असेल तर लोक त्याला नावं ठेवतीलच की ! अशी वृत्ती असणा-याला ‘खेड्यात आऊत पाड्या नि लगन मोडया’ असंही उपरोधिकपणे म्हणायला लोक मागेपुढे पाहत नसत. तसा तो हुशार होता. गावाच्या पंचायतीमध्ये न्याय-निवाडा करायचा. तो इतरांपेक्षा युक्तीवादाने बोलण्यात पटाईत होता. त्याने काही काळ पाटीलकी केली होती; म्हणून लोक त्याला ‘गोविंदापाटील’ असेही म्हणत. तो बाबाचा सख्खा मामेभाऊ होता.

तो दिसायला काळासावळा पण रुबाबदार. हाडापेराने मजबूत, धारदार नजर, कधी गुळगुळीत तर कधी खुरटलेली दाढी. भरदार मिशा. मानेपर्यंत वाढलेलं केसं, पाठीमागे काढलेला भांग. मोठं कपाळ. कानं सुपासारखे मोठे – मोठ्या कपाळाचे व कानाचे लोक मुळात हुशार असतात, असे खेड्यातील लोक सांगत. त्याच्या कानावर केसाचं जंगल वाढलेलं. डोळ्याच्या भुवया जाडजूड. दोन्हीही कानं टोचलेले. खेड्यात बायांसारखे माणसांचे पण कान टोचत. त्यामुळे काही नवल नव्हतं. काही-काही माणसं टोचलेल्या कानात भिकबाळी घालत. तो दोन-तीन वर्ग शिकला असेन, पण चांगलं लिहिता वाचता येत होतं. त्याला मोडीलिपी चांगली अवगत होती. लोक त्याच्याकडून पत्र लिहून-वाचून घेत. तसंच सरकारी खात्याचा अर्ज, पोलीस ठाण्याचा रिपोर्ट असे काहीबाही लिहून घेत. गावातल्या अडाणी लोकांना, तो नेहमी कामाला येत होता. म्हणून एकवेळ अज्ञान्याची समजूत काढता येईल पण हट्टाने पेटलेल्या ज्ञानी माणसाची समजूत कशी काढावी, हे कुणाला कळत नव्हतं. सर्वांची त्याच्यासमोर हात टेकवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

मला वाटत होतं, की ज्याच्या संबंधात चर्चा चालत होती, त्याला काही बोलता येत नव्हतं की काय? त्यामुळे मामाच्या पोटच्या पोरीच्या भवितव्याशी ही गोष्ट जुळलेली असतांना, त्याचं काय मत आहे; हेही कोणी त्याला विचारत नव्हतं. बाकीचे लोकच न्यायनिवाडा करीत होते. ही बाब माझ्या तरल मनाला फार खटकत होती. मामाच्या मनात मुळीच विरोध असल्याचं मला वाटत नव्हतं.

‘कोणी काहीही म्हणो, आमच्या चित्राला आम्ही तेथेच देऊ. जर या घराच्या अंगणात मांडव टाकायला कुणाचा विरोध असेल, तर मी माझ्या घरी मांडव टाकीन व तेथे लग्न लाऊन देईन. पण हे लग्न मोडू देणार नाही.’ असं ठणकावत ऊध्ववकाकाने जाहीर करुन टाकलं.

शामराव, तुळशीराम व उध्दव यांनी जबरदस्त खींड लढवून लग्नाच्या बाजूने भक्कमपणे उभे ठाकले. त्यामुळे विरोधकांची दाळ शिजली नाही. उध्दवकाका चित्राबाईचा सख्खामामा. म्हणून त्याच्या बोलण्याला वजन प्राप्त झाले होते. अधिकारवाणीने तो बोलत होता. खेड्यात पोरीच्या मामाला फार मान असतो. शेवटी अडथळ्याची जटील शर्यत पार पाडण्यात पांडुरंगदादा व चित्राबाई सफल झाले, असेच म्हणावे लागेल. ‘मिया बिबी राजी, तो क्या करेगा गोविंदा-काझी…!’ अशी विरोधकांची केविलवाणी परिस्थिती झाली होती.

आणखी मजेशीर कहाणी आमच्या होस्टेलमध्ये पसरली. गायकवाड नावाच्या बौध्द मुलाने ब्राम्हणाच्या मुलीशी प्रेमविवाह केला. मुलीच्या वडीलाने मुलगी पळवून नेली, असा आरोप करुन कोर्टात केस केली. त्या केसची सुनावणी सुरु असतांना होस्टेलची तरुणाई उत्सुकतेपोटी कोर्टात जायची. मी सुध्दा एक-दोनदा कोर्टात गेलो. त्या मुलीला वकील लोक उलट-सुलट प्रश्‍न विचारुन भांबावून सोडत. शेवटी ती केस त्या मुलाने जिंकली, असे कळले.

खरं म्हणजे कुणा मुलीच्या प्रेमभाव-बंधात गुरफुटून जावे; हे माझ्या स्वभावात मुळीच नव्हतं. कारण माझ्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात मी कमालीचा लाजाळू होतो. कुण्या परक्या मुलींशी बोलायला भयंकर लाज वाटायची. माझ्या लाजाळूपणाचा किस्सा सांगायचा म्हणजे शहरात राहणारी माझ्या आईच्या मावसबहिणीची मुलगी माया, ही एकदा आमच्या भेटीला आली. ती मामाकडे थांबली होती. ती जवळपास माझ्याच वयाची असावी. ती माझ्या घरी आली; तेव्हा मी तापाने आजारी होतो. म्हणून मी बाजीवर झोपलो होतो. ती माझेजवळ बिनदिक्कतपणे बसली. माझ्या कपाळावर हात फिरविला. मला स्पर्श करून माझ्याशी बोलली. ती मुलगी असून इतकी धाडसी कशी; याचंच मला कौतुक वाटत होतं. मी मात्र मुलगा असून इतका अवघडलो, की सांगायची सोय नाही. ती कधी जाते याचीच वाट पाहत होतो.

अबोलपणा, संकोची वृती, खेडवळपणा, प्रतिकूल परिस्थितीचा रेटा यामुळे मला न्युनगंडाने जबरदस्त घेरले होते. चार-चौघात बोलायला फार घाबरत होतो. कधी कोणत्या मिटींगमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये भाग घेतला नाही. कोणी बोलायला सांगितले, की माझे हातपाय लटपटा कापायला लागत. छाती धडधडायला लागायची. घशाला कोरड पडायची.

माझ्या वर्गात गुल्हाने नावाचा मुलगा होता. तो जांबुवंतचा चेला. त्याच्या मनगटात जांबुवंत सारखं धातूचं कडं होतं. बोलायची पद्धत पण तशीच ! त्यावेळी जांबुवंतचा खूप बोलबाला होता. त्याने एकदा नगरपरिषद हॉलमध्ये कॉलेज-होस्टेलच्या विद्यार्थ्यांची मिटींग बोलावीली होती. विषय होता- विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाबाबत. इतरांसोबत मलाही त्याने आग्रहाने बोलायला सांगितले. मोठ्या हिंमतीने, नाही-नाही म्हणता मी बोलायला उभा झालो खरा; पण माझे पाय लटपटा कापायला लागले. तोंडातून कसेतरी अडखळत एकेक शब्द बाहेर पडत. मी त्यावेळी काय बोललो ते आठवत नाही. पण माझी चांगलीच त्रेधातिरपट उडाली होती. एवढं मात्र आठवते. माझा असा स्वत:बद्दलचा अनुभव पाहून मी चारचौघात उभा राहून बोलायला घाबरत होतो.

मी कॉलेजच्या लायब्ररीतून पाठ्यपुस्तकाचे पुस्तके अभ्यासासाठी आणीत होतो, तसेच कथा-कादंबर्‍या पण वाचायला आणीत होतो. मी ह.ना.आपटे, ना.सी.फडके, वि.स.खांडेकर यांच्यासारख्या प्रसिध्द लेखकांचे पुस्तके वाचले. विशेष म्हणजे ह.ना.आपटे यांची भाषा व विचारसरणी याबरोबरच त्यांनी रेखाटलेल्या व्यक्ती आणि प्रसंगातील विविधता मला फार आवडली होती. तरीही ह्या कथा-कादंबर्‍या जास्तीतजास्त शहरी धाटणीच्या आणि उच्चभ्रू जीवनावर लिहिलेल्या वाटत. क्वचित एखादी कथा किंवा कादंबरी ग्रामीण जीवनावर चितारलेली दिसायची. मला वि.स.खांडेकर यांचे साहित्य  आवडण्याचं कारण की त्यांची भाषा अलंकारिक असायची. जशी सर्वसाधारण स्त्रीने अलंकार परिधान केल्यावर ती जशी सुंदर दिसते, तशी त्यांची कलाकृती सुंदरतेने नटलेली वाटायची. नगरपरिषदेच्या वाचनालयात जाऊन प्रभात, यशवंत, किर्लोस्कर, रत्नाकर, मौज सारखे मासिकं व दिवाळी अंकातल्या नवकथा वाचल्यात. या कथा-कादंबर्‍यांनी मला पुरतं झपाटून टाकलं होतं.

जीवनातील आनंद माणसाने मनसोक्तपणे लुटलं पाहीजे. आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण उत्कटतेनं, समरसून जगलं पाहिजे, सुंदरतेच्या कुसुमावरचं दवबींदू चुंबून घेतलं पाहिजे; अशा प्रकारचं वाचता वाचता चांगल दिसेल, ते ते वेचत होतो. मी त्यांच्या पुस्तकाच्या लिखाणातील आवडलेले टिप्पने वहीत काढून ठेवत होतो. निसर्गदत्त सौंदर्याचा आस्वाद घेणे, हे माझ्या मनोवृतीत त्यामुळेच आलं की काय, कोण जाणे? जगण्यामध्ये आनंद असला पाहिजे; तरच जीवन सार्थक नाहीतर निरर्थकच, ना !

मी कुठंतरी वाचलं, की पाहणार्‍याच्या दृष्टीत सौंदर्य नसेल तर त्या वस्तुतील सौंदर्याला काय अर्थ? किती बरोबर होतं ते ! माणसाच्या तरल मनाच्या भावभावनांचा फुलोरा सौंदर्यातून दरवळतो, म्हणून तो सौंदर्यप्रेमी बनतो. असंच ना…! म्हणून मलाही सुंदरतेचं फार मोठं आकर्षण होतं. मग निसर्गातील सौंदर्य असो, की स्त्रीत्वातील सौंदर्य ! म्हणून अशी सुंदर मुलगी गवसली नसती, तर मी प्रेमाच्या भावविश्‍वात कधीच पोहलो नसतो. माझं ध्येय होतं, नोकरीपुरतं शिक्षण घेणं व आपलं कुटुंब सुखी करणं. बस्स एवढंच…! प्रेम हे माझ्यासाठी केवळ अपघात होतं.

मी ज्या मुलीवर मनापासून प्रेम करत होतो, ती खरोखरच खेड्याच्या मानाने सुंदर होती. तिच्या सुंदरतेत अबोल भाव दडला होता. जो माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला होता. तिचा मोहक चेहरा, बोलके डोळे, बांधेसूद शरीर, फार नव्हे पण माफक गौर वर्ण, लांबसडक केसं यामुळे भाळलो होतो.

मी सुट्टीमध्ये घरी आलो की, पहिल्यांदा शेतात जात होतो. तेथे हिरवेगार उभे असलेले पिके पाहण्यात मौज वाटायची. पण जातांना-येतांना त्या मुलीच्या घराकडे डोकावून पाहिल्याशिवाय माझं मन राहवत नव्हतं. अशावेळी कवीयत्री बहिणाबाई यांच्या कवितेतील ओळी मला नेमक्या आठवत –

‘मन वढाय वढाय, जसं पिकावरी ढोर !

किती हाकला हाकला, फिरी येते पिकावर !!

कधी दिसलीच तर मन फुलून जायचं, नाहीतर हूरहूर लागून कोमेजून जायचं ! दिसलीच तर नजरा नजर तेवढी व्हायची. वाटे आमची नजरच बोलत आहे ! प्रत्यक्ष बोलण्याची कधीच हिंमत होत नव्हती. ओढ तर होती; पण उघडपणे बोलायची हिंमत नव्हती. काय बोलावं, कसं बोलावं काही कळत नव्हतं. कुणी पाहिलं तर कुजबुज सुरु होईल, अशी भीती ! असं ते आमचं लाजरं-बुजरं… अबोल… मुकं-मुकं… अव्यक्त… निस्तब्ध… प्रेम होतं ! कधी वाटायचं की आमच्या मधात कृतीम काचेची भिंत उभी आहे. आम्ही एकमेकांना काचेतून पाहत होतो. पण बोलता येत नव्हतं. अशावेळी ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ अशी मनाची समजूत करून घेण्याशिवाय दुसरा मार्गच गवसत नव्हता. निशब्धता पण मोठी बोलकी, नाही का? ती समजते, ज्याची त्यालाच…! कशाला पाहिजेत प्रत्येकवेळी शब्द? डोळ्याने पण बोलता येते…! भावनेनेही समजता येते…!

एकदा तिच्याशी एकांतात भेटण्याचा योग आला होता. पण तोही व्यर्थ ठरला. त्यादिवशी घरी मी एकटाच होतो. अभ्यासाचं पुस्तक वाचत होतो. पश्चिमीकडे सूर्य वळल्याने घराची अर्धी सावली अंगणात पडली होती.

‘संगम… संगम…’ संघमित्राला ‘संगम’ म्हणत. ध्यानीमनी नसतांना साखरेसारखा गोड शब्द कानावर पडल्याने माझ्या मनातल्या कळ्यांची फुले झालीत. आवाराचा दरवाजा ढकलून अंगणात आली. मीही तसाच घाईगडबडीने हातात पुस्तक घेऊन अंगणात आलो. दोघांची नजरानजर झाली.

‘संगम नाही घरी?’

‘नाही. ती वहिनीसोबत सरवा वेचायला गेली.’

‘मला वाटलं, असेल घरी.’ असं म्हणतांना तिच्या चेहर्‍यावरचं स्मित हास्य मला दिसलं.

त्याचबरोबर माझाही चेहरा उजळला. एकमेकांकडे पाहत आम्ही नुसतेच उभे होतो. मग ती माझ्या हातातल्या पुस्तकाकडे पाहून म्हणाली,

‘झालं नाही… शिक्षण?’

‘बस्स, हे शेवटचं वर्ष आहे.’ मी म्हणालो.

थोडावेळ शांतता पसरली. शांततेचा भंग करून मी तिला म्हणालो,

‘एक सांगू… तू या साडीत खूप सुंदर दिसतेस !’

ती लाजेनं चूर झाली. खरंच, तिच्या अंगावरची हलकीसी पिवळसर रंगाची साडी – निळसर आकाशाला मंद चांदणे खुलून दिसावे, तशी तिच्या गोर्‍या रंगाला खुलून दिसत होती. नुकत्याच वयात आलेल्या नवतरुणीसारखी भासत होती. पदराचा टोक धरून माझ्यासमोर उभी राहिली. गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत दिसत होती.

तेवढ्यातच मोठ्याआईचा आवाज आला.

‘अनुसया, अनुसया काय करतं वं?’

‘वहिनी घरी नाही, मोठीआई.’

मोठ्याआईची उपस्थिती पाहून तिची चुळबूळ सुरु झाली. खेड्यात मुलींनी मुलांसोबत असं एकांतात असणं वाईट समजले जातं. म्हणून तिला अवघडल्यासारखे होत होतं, हे माझ्या लक्षात आलं. म्हणूनच की काय ती मानेनं, ‘जाते.’ अशी खुणावत पाठमोरी झाली. दरवाज्यातून पाय बाहेर काढतांना एकवेळ चोरट्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं, अन् क्षणात दिसेनाशी झाली. खरं म्हणजे मोठीआईने आमच्या भेटीत व्यत्यय आणल्याचा मला रागच आला. पण सांगणार कसं? एका गाण्यानं मला अगदी भारावून टाकलं होतं.

‘पान जागे… फूल जागे… भाव नयनी जागला… चंद्र आहे साक्षीला…!’ खरंच, आमच्या निरागस प्रेमाला कुणाचीच साक्ष नव्हती ! होतं ते फक्त निसर्गाची…! पाना,  फुलाची…!

माझं होस्टेल माझ्या चौधरा गावाच्या रस्त्याच्या बाजूला होतं. रविवारच्या बाजार-हाटाला लोक जेव्हा येत; तेव्हा खिडकीत बसून मी पाहत राहायचो. कित्येक दिवसाच्या मनाच्या कोपर्‍यात दडवून ठेवलेल्या आठवणी उफाळून बाहेर येत. घराच्या आठवणीने डोळे अश्रुंनी डबडबून जात. आपल्या लोकांची जबरदस्त ओढ असायची ! आपलं घर, गाव सोडून बाहेर शिक्षणासाठी राहणार्‍या सर्वच मुलांची अशीच गत होती. घरच्या आठवणीने बेजार होऊन जात. ‘होमसिकनेस’पणा म्हणतात तसं ! होस्टेलचे सारी मुलं नवीन, अपरिचीत त्यामुळे आलेला एकटेपणा ! ही एकटेपणाची जाणीव त्याला कुरतडत राहायची. आपल्याला कोणीच नाहीत का? आपण अनाथ-निराधार आहोत का? असेच सर्वांना वाटत राहायचं. मग, मग…! चंद्र-तार्‍यांना तरी कुठे असतो आधार? तरीही उजेड देऊन इतरांना आधार देतातच ना ! आपल्यालाही तसंच, नाही कुणाला – निदान आपल्या कुटुंबाला तरी आधार देता येणार नाही का? असा विचार मनात आला की, समाधान वाटत होतं.

हप्‍त्याच्या बाजारासाठी माझ्या घरचे कोणीतरी येतच होते. घरच्या लोकांना भेटण्याच्या आतुरतेने माझं मन प्रत्येकवेळी बाजारात ओढून नेत असे. बाजारात गावाचे लोक एका विशिष्ट ठिकाणी थांबत. त्या ठिकाणाला ‘ऊतारा’ म्हणत. मसाला-तंबाखूच्या साथीजवळ मोठं लिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या सावलीत निळोण्याचे व आमच्या गावाचे लोक थांबत. या उतार्‍यावर नाहीतर भर बाजारात फिरून त्या मुलीचा शोध घेण्याचा छंद मला जडला होता. कोणाला विचारण्याची सोयच नव्हती ! भिरभिर पाहतांना दुरून जरी दिसलीच तर दुधात साखर पडल्याचा योग यायचा. जवळ गेल्यावर नजरेला नजर भिडली की मनात गुदगुल्या होत. मग त्या आठवणीचे नाजूक रेशीम धागे उलगडण्यातच सारा दिवस निघून जायचा.

उन्हाळ्यात शेतकरी भुईमुंगाच्या शेंगा फोडून घेत. तीपण शेंगा फोडायला यायची. त्यामुळे माझे पाय नकळत तेथे ओढल्या जायचे. हे काम करायला आणखी गावातले मुलं-मुली जमत. सहसा कोणी बुजरूक माणसं हे काम करीत नसत. त्यागर्दीत चोरनजरेनं माझ्याकडे पाहून ती खुद्कन हसायची. तिचं असं दिलखुलास हसू मी माझ्या मनात जपून ठेवत होतो. असेच काहीसे मंतरलेले अन् वेडेपणाचे ते दिवसं होते.

आमचं असं हे निस्तब्ध प्रेम संथ नदीच्या प्रवाहासारखं वाहत होतं. आम्ही ते आमच्या पोटात जपून ठेवत होतो. कधी उघडे पडू दिले नाही.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: