मी आणि माझ्या आठवणी


कथा बत्तिसावी – मंगल की अमंगल कलश

 

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठाची स्थापना मराठवाड्यात करण्यात येत असल्याची घोषणा झाली. तेव्हा हे विद्यापीठ विदर्भात व्हावे; म्हणून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले. त्यावेळी यवतमाळला जांबुवंतराव धोटे, नानाभाऊ ऎंबडवार व त्यांचे कार्यकर्ते आंदोलन पेटविण्यात सक्रिय झाले होते. ही मागणी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने आम्ही मुलं आंदोलनात सामील होण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी संचारबंदी सुरु होती. आसपासच्या चौकात जिकडे तिकडे पोलिस तैनात केले होते.

आम्ही पोलिस स्टेशनच्या समोरील नगरपरिषदेच्या लायब्ररीमध्ये थांबलो होतो. मी आणि पाटील रोज संध्याकाळी याच लायब्ररीत येत होतो. नवरात्रीच्या काळात समोरच्या मोकळ्या जागेत व्याख्यानमाला होत होती; तेव्हाही न चुकता येत होतो. आंदोलनकर्त्यांना पोलिस व्हॅनमध्ये घेऊन येत. त्यात होस्टेलचे मुलं दिसतात काय म्हणून काळजी वाटत होती. तेथून आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं. कारण पोलीसांचा लाठीमार सुरु होता. मोठया हिंमतीने तेथून बाहेर पडलो. परंतु एका खेडूत माणसाला पोलिस लाठीने मारत असल्याचे पाहून आमचं काळीज अस्वस्थ झालं. म्हणून पुन्हा लायब्ररीत घुसलो. आम्ही सकाळीच आल्याने भुकेने कासावीस झालो होतो. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली की आंदोलनात अमरावती व अकोला जिल्ह्यात गोळीबार होऊन नऊजण शहीद झाले. या संघर्षानंतर अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा झाली. म्हणजे विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या सिंचनातून या कृषी विद्यापीठाची निर्मिती झाली, असेच म्हणावे लागेल.

त्यानंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक, हे या कृषी विद्यापीठाचा मंगल कलश नागपूर वरून घेऊन येत असल्याने होस्टेलच्या सर्व मुलांना सकाळी-सकाळी हाकलत नेण्यात आले. त्याशिवाय आम्हाला जेवण मिळणार नव्हते. ‘मुकी बिचारी, कुणीही xx हाक ना बोंब.’ अशी आमची अवस्था होती. आम्ही सगळी मुले लगबगीने सकाळीच उठलो. तोंड धुवायला व सकाळची विधी आटोपण्यासाठी नाल्यावर हजेरी लावली. होस्टेलजवळ थोडं दूर तलाव होतं. त्याच्या बांधाखाली खड्डा खोदलेला होता. त्यातील झर्‍यातून पाणी बाहेर येत होतं. याच ठिकाणी आम्ही तोंड धूत होतो. पाणी पीत होतो. हाच झरा पुढे वाहत जाऊन नाला बनला होता. त्याच नाल्यावर आम्ही सकाळच्या विधीसाठी, तोंड धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी जात होतो. थंडी असो, उन असो, की पाऊस, त्याशिवाय दुसरं ठिकाण नव्हतं. म्हणण्यापुरतं मेसजवळ दोन बाथरुम होते. पण काही उपयोग नव्हता. कारण पहिल्या बराकीला लागून असल्याने त्यांचीच गर्दी व्हायची. कधीकधी पाणी पण राहत नव्हतं. नाल्यावर जाण्यासाठी उतारातून अरूंद असा दगड-मूरमाटीचा व दोन्ही बाजूने कचरा-काडीने झाकलेला रस्ता होता. एकदा या रस्त्यावर साप वेटोळे घालून बसला होता. अगदी जवळ गेल्यावरच तो दिसत असल्याने मुलं त्याच्यावरून उड्या मारून पलीकडे जात होते. नाल्यावर एक-दोन ठिकाणी चापट व मोठे दगडं होते. त्याचा वापर कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी करीत होतो. काही मुले तलावावर पण कपडे धुवायला व पोहायला जात. दुपारी दूर ठिकाणी नाल्याशेजारी आम्ही अभ्यास करायला जात होतो. एकदा एका मुलाच्या अंगावर झाडावरून साप पडला. तेव्हापासून पहिल्यांदा वरती पाहूनच बसत होतो.

आमच्या होस्टेलमध्ये कधीकधी गमतीजमती घडत. त्यातली गमतीची पण भीतीदायक गोष्ट आठवते. एकदा कोणीतरी तलावात बुडालं. त्याचे कपडे काठावरील दगडावर वाळत होते. कपडे धुतल्यावर तो पोहायला गेला व बुडाला असे तेथील लोक सांगत होते. तो होस्टॆलचा तर नव्हता, ना? म्हणून आमच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली. आम्ही मुलं त्याला पाहण्यासाठी लोटलो होतो. संध्याकाळपर्यंत त्याचं प्रेत सापडलं नव्हतं. पण तो आमच्या होस्टेलचा नव्हता; हे कळाल्यावर आम्ही निशंक झालो.

त्यादिवशीची रात्र अंधारकुट्ट होती. त्या भीतीदायक वातावरणामुळे सन्नाटा पसरला होता. कुत्र्यांच्या भेसूर ओरडण्याने भयानकता अधिकच वाढली होती. रात-पाखरांच्या फडफडणार्‍या आवाजाने मनात धडकी भरत होती. त्यामुळे आम्ही मुले कमालीचे घाबरलो होतो. त्या भीतीच्या दडपणाखाली मुलं झोपी गेले. आमची बराक शेवटी व जंगलाला लागून असल्याने आणखीनच भयान वाटत होतं. अर्ध्या रात्री अचानक आमच्या बराकीतील पहिल्या रुमपासून ते शेवटच्या रुमपर्यंत एकेक मुलगा जोराने ‘होऽ होऽऽ‘ ओरडत रुमच्या बाहेर पडत होते. काय झाले कोणाला कळत नव्हतं. सर्वच भेदरलेले होते.

सारं शांत झाल्यावर कळलं की बाजूच्या रुममधील एक मुलगा पायाला हात धरुन बसला होता. त्याला स्वप्नात पायाला साप चावल्याने तो झोपेतच ओरडला. त्याच्यामुळे बाजूचा मुलगा ओरडून उठला व ओरडतच बाहेर पडला. हे ओरडून उठणं आणि ओरडूनच बाहेर पडण्याचं लोण संपूर्ण बराकीत क्षणात पसरलं. सारं होस्टेल जागं झालं. दुसर्‍या आणि तिसर्‍या बराकीतील मुलं काय झाले म्हणून पाहायला आले. कित्येक दिवसपर्यंत हा चर्चेचा विषय झाला होता. हा प्रसंग आठवला की आजही हसू येतं !

दुसरी मजेशीर गोष्ट आठवली. ती ही की, मी रूममध्ये असतांना एकेक मुलगा बाहेर जातांना दिसत होते. कुतूहलापोटी मीपण बाहेर पडलो. त्यावेळी बरेच मुले लांब दूर पर्यंत पाहत असलेले दिसले. त्यांच्या कुजबुजीवरून कळले, की एक मुलगा व मुलगी सोबत-सोबत नाल्याच्या पलीकडील टेकड्यांवर जातांना दिसले. आता ते गायब झालेत. त्या टेकड्यावर पळसाच्या पालव्याचं विरळ जंगल होतं. सर्वांच्या नजरा त्यांना पाहण्यासाठी खिळल्या होत्या. पाहतांना मध्येच कुणीतरी गंमतीने म्हणायचं, ‘अरे, ते पहा त्यांचे डोके दिसत आहेत.’ मग सार्‍यांचे लक्ष तिकडे वळायचं. पण कुणीच दिसत नव्हतं. काही दोन-चार अतिउत्साही मुले रणांगणावर जाणार्‍या सैनिकांच्या भावमुद्रेने त्यांना शोधायला निघाले. ते फिरफिर फिरून परत आले. शेवटी अंधार पडला. मगच सारी गर्दी तेथून हटली. त्या दोघांना ज्याने पाहिले त्याने उल्लू तर बनविले नाही ना, अशी शंका येत होती. पण तरुणाईला या नाजूक गोष्टीने मात्र भुरळ पाडली होती. बर्‍याच दिवसपर्यंत आम्ही जेव्हा-जेव्हा तिकडे जात होतो; तेव्हा-तेव्हा असं काही जोडपं दिसते का म्हणून उगीचच पाहत होतो.

होस्टेलमध्ये अधूनमधून चोर्‍या होत होत्या. फार नाही, पण कोणाची वाटी, कोणाचं गिलास, ताट किंवा पुस्तक चोरीला जात.

आम्हाला पैशाची नेहमीच चणचण भासत होती. दिवाळीनंतर कापसाचा जीन सुरु झाला की आम्ही काही मुले बजाजच्या जिनामध्ये रात्रपाळीवर काम करायला जात होतो. त्यात मी, हजारे, आडे आणि कोणीतरी मुलं होते. त्यावेळी दोन रुपये तिस पैसे मजुरी मिळत होती. आमचं कॉलेज सकाळचं असल्याने दुपारी दोन वाजता जीनात जाणे शक्य होत असे. रात्री बारा वाजता सुट्टी होत होती. तोपर्यंत मेस बंद होत होती. मग रात्रीच्या जेवणाची समस्या उद्‍भवत होती. आम्ही सकाळी जेवण करतांना पैजाम्याच्या खिशात पोळ्या, भाकरी लपून-चोरुन आणत होतो. रात्री आठ वाजता जेवणाला सुट्टी झाल्यावर भजे विकत घेऊन त्याच्या सोबत खात होतो. कामाच्या रगाड्यात हे खाणं आम्हाला मोठं रुचकर वाटत होतं. काही दिवस माझा लहान भाऊ अज्याप माझ्या नावाचा डब्बा आणून त्यातला काही खाऊन बाकी माझ्यासाठी आणून द्यायचा. हा जीन या टोकावर तर होस्टेल त्या टोकावर. इतक्या दूर रात्रीला येऊन परत जायचा. म्हणून मी काळजीत पडत होतो. त्यामुळे नंतर त्याला येऊ दिले नाही.

जिनात काम करतांना खूप घाईस आलो होतो. दुसर्‍या कामगाराच्या बदल्यात मुकादम आम्हाला काम सांगत होता. सुरुवातीला काही दिवस रेच्यावर, नंतर बोर्‍यात रुई भरण्याचे काम केले. त्यावेळी कापसाचे बारीक बारीक कण नाका-डोळ्यात जात होते. त्यामुळे घसा खवखव करून खेस लागत होती. नंतर मोठ्या टोपल्याने सरकी ढिगावर नेऊन टाकायचं काम केलं. तेथे रेच्यापेक्षा थोडी जास्त मजुरी मिळत होती. पण तेवढं ओझं पेलणे खूप त्रासाचं होतं. घाण्याला जुंपलेल्या बैलापेक्षाही हे काम अधिक कष्टमय वाटत होतं. कधी सुट्टीचा भोंगा वाजते, याचीच मी वाट पाहत होतो. लोक रोजचे रोज कसे काम करतात; याचा मला अचंबा वाटत होता. काय करतील बिच्चारे, त्यांचं पोटच त्यावर अवलंबून होतं !

आणखी मी नोकरीसाठी पण शोध घेत होतो. मी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज व सोशल वेल्फेअर खात्याचं कार्ड काढलं होतं. दोनदा कार्डाचं नूतनीकरण करून सुध्दा काहीच उपयोग झाला नाही. त्यावेळी अनायसे राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरु होता. एक महिन्याच्या वर होवून सुध्दा संप मिटण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. म्हणून सरकारने एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मार्फत अंशकालीन भरती सुरु केली होती. माझ्यासोबत होस्टेलच्या काही मुलांनी लीपिक आणि इतर जागांसाठी अर्ज केले होते. आम्ही रोज ऑफिसला येऊन निवड झालेल्यांची यादी पाहत होतो. पण आम्ही त्या जागांसाठी पात्र असून सुध्दा आमच्यापैकी कुणाचीही निवड झाली नाही.

कालांतराने यातील गंमत कळली ती ही की, या भरतीत जास्तीत जास्त ब्राम्हण समाजाचे उमेदवार घेण्यात आले. अंशकालीन भरती असल्याने आरक्षण लागू पडत नाही, असे सांगत होते. नंतर त्यांना नियमित करण्यात आले. काही जागृत मागासवर्गीय कर्मचारी संघटनानी आवाज उठविल्याने विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी वारंवार झालेल्या संपकाळात ज्या १,९५,००० कर्मचार्‍यांची भरती झाली; त्यापैकी १,०५,००० कर्मचारी हे एकजात ब्राम्हण असल्याचे खळबळजनक माहिती उजेडात आली. असं हे संप आणि भरती करण्यामागचं तंत्र असल्याचं उघड झालं. त्यानंतर अंशकालीन भरती करायची नाही, असं धोरण सरकारने जाहीर केल्याने दीर्घकालीन संप करणे बंद झाले. मागासवर्गीयात योग्य व पात्र उमेदवार मिळत नाही, असे खोटे कारणं सांगून नेमणूक केल्या जात नव्हती. मग आरक्षित जागांवर सर्रासपणे अनारक्षित उच्चवर्णीय कर्मचार्‍यांची भरती केल्या जात होती. त्यामुळे आरक्षित जागांचा अनुशेष सतत साचल्या जात होता.

मी एकदा होस्टेलचा मित्र काळे सोबत रिझर्व्ह बॅंकेच्या नोकरीसाठी अर्ज केला. दोघांचीही लेखी परीक्षा नागपूरला होती. काळेची बहीण नागपूर येथे रामनगर मोहल्ल्यात राहत होती. म्हणून आम्ही धामणगाववरुन पॅसेंजर रेल्वेने नागपूरला गेलो. मी त्यावेळी पहिल्यांदा रेल्वेत बसलो. रेल्वेचा प्रवास करण्याचा अनोखा अनुभव मी पहिल्यांदा घेतला. नागपूरसारख्या मोठ्या शहरात मी पहिल्यांदाच गेलो होतो. सकाळी आम्हाला उठविण्यात आलं. तेव्हा सूर्य उगवायचा होता. उठल्याबरोबर परसाकडे जाण्यास सांगितले. मी काळेसोबत हातात चिम्पट घेऊन मैदानात गेलो. एखाद्या पोवट्यावर पाय पडून पाय भरणार तर नाही ना, याची धाकधूक वाटत होती. म्हणून हळूहळू पाय टाकत चाललो होतो. काळेने मला एकाठिकाणी बसायला सांगितले. तेथे बाई बसली की माणूस ते काही अंधारात कळत नव्हतं. दिवस उघडल्यावर पंचाईत नको; म्हणूनच आम्हाला अंधारात जायला सांगितले होते. अशी ती गंमत अनुभवाला आली होती. माझी परीक्षेची काहीच तयारी नव्हती. कोणाचं मार्गदर्शन नाही की पुस्तक नाही. त्यामुळे ती परीक्षा आमच्यासाठी सोपी नव्हती. पुढं काय झालं, ते काही कळलंच नाही.

मला कॉलेजमध्ये मराठी विषय कळणावत व कोलते सर शिकवीत. दोघेही हा विषय खूप छान शिकवीत. हा विषय खरं म्हणजे मला मनापासून फार आवडायचा. या विषयाचा तास मी कधीच चुकवीत नव्हतो. कळणावत सर म्हणाले होते की सर्वचजण साहित्यामध्ये जगत असतात. परंतु जे लोक कागदावर उमटवितात ते साहित्यिक ठरतात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत प्र.के.अत्रेंचा धडा होता. त्यात बाबासाहेबांना दगडं मारणारे हात, त्यांचं देशासाठी केलेलं उत्तुंग कर्तृत्व पाहून गळ्यात हार घालीत होते, असं लिहिलं होतं. हा धडा शिकवितांना मी अक्षरशः भारावून जात होतो. इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ते शिकवीत होते.

इंग्रजी विषय केकरे व सहस्त्रबुध्ये सर शिकवीत. सहस्त्रबुध्ये सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते उंचपुरे व धिप्पाड दिसत. बोलतांना ‘अॅ अॅ’ असा उच्चार करीत. पण दोघेही सर छान शिकवीत. हिंदी विषयाला बैस सर होते. अर्थशास्त्र विषयाला महाजन सर होते. खूप चांगले शिकवीत. अर्थशास्त्रातील सद्यस्थितीतील अद्ययावत माहिती आणि आकडेवारी देत. अर्थशास्त्रात साखर उद्योगधंद्याच्या बाबतीत एक प्रकरण होतं. ते एकदा म्हणाले, ‘देशात साखरेचा इतका वापर होतो की उद्योगपतींनी एका किलोवर एक नया पैसा जरी वाढविला तरी त्यांच्या नफ्यात एक कोटी रुपयाची भर पडते. त्यांनी सांगितलेलं हे गणित ऐकून आम्ही अवाक झालो. अशाप्रकारे उद्योगपती, भांडवलदार देशातील जनतेची किती लुबाडणूक करीत असतील ! म्हणजेच चंबळ खोर्‍यातील डाकू आणि यांच्यात फरक तरी कोणता? एखाद्यावेळी अर्थशास्त्र हा विषय कॉलेजचे प्राचार्य खेरकर सर शिकवीत. कॉमर्सचे विषय शेंदुर्णीकर, माडेवार, वानखडे, डोंगरे व खर्चे सर शिकवीत. शेंदुर्णीकर सर ठुसक्या बांध्याचे व आपल्याच नादात चालतांना दिसत. विद्यार्थ्यांना बोलायचं असलं की ‘बाबांनो’ हा शब्द प्रथम त्यांच्या तोंडातून निघायचा. आम्ही मुलं एखाद्या वेळेस त्यांच्या क्लासला गेलो नाही तर दुसर्‍या मुलाला विचारीत होतो की, ‘बाबांनो’ सरांनी आज काय शिकवलं?’ डोंगरे सर त्यावेळी नवीन होते. एखाद्या मुलासारखे तरुण आणि लहानसे दिसत.

मला महागाचे पुस्तके विकत घेणे शक्य होत नव्हते. म्हणून क्लासमध्ये सर जे शिकवीत त्याचे नोटस् घेत होतो. व्यवस्थित ऎकू यावे व शिकवीण्य़ावर लक्ष केंद्रित व्हावे; म्हणून समोरच्या बाकावर बसत होतो. त्या नोटसवर अभ्यास करुन परीक्षेची तयारी करत होतो.

कॉलेजमध्ये दरवर्षी गॅदरींगचा कार्यक्रम व्हायचा. त्यात अनेक कार्यक्रम आयोजित होत होते. वक्तृत्व, गितगायन, खेळ, रांगोळी, नाटक, ऑर्केस्ट्रा, अभिरुप लोकसभा, स्वशासन, वक्त्यांचे व्याख्यान इत्यादी भरगच्च कार्यक्रम या स्नेहसंमेलनात असायचे. कॉलेजचे मुलं कोणाला काय म्हणतील काही सांगता येत नव्हतं. गॅदरींगच्या नाटकात एक मुलगी ‘आसावरी’ नाव असलेल्या मुलीची भूमिका करीत होती. तिला मुले आसावरी म्हणत. कॉलेजमध्ये आणखी एक मुलगी हुबेहूब हिंदी सिनेमात गाजलेल्या वहिदा रहेमान या अभिनेत्रीसारखी दिसत होती. म्हणून मुलं तिला वहिदा रहेमान म्हणत.

स्वशासनमध्ये एक दिवस प्राचार्य व प्राध्यापकवर्गाची भूमिका विद्यार्थी पार पाडत. आमच्या वर्गातला मुलगा आम्हाला शिकवीत असतांना मजेशीर विनोद घडला. भारतातील लोकसंख्या वाढ व त्याचे दुष्परिणाम असा काहीसा विषय होता. तो म्हणाला, ‘भारतात दर मिनिटाला बाई मुलाला जन्म देते. म्हणून लोकसंख्या वाढते. याला उपाय काय?’ हे ऐकून लगेच एक मुलगा उठून म्हणाला, ‘सर, आहे एक उपाय. आपण त्या बाईला शोधून काढलं पाहिजे आणि तिला सांगितलं पाहिजे, की बाई तू दर मिनिटाला मुलाला जन्म देत नको जाऊ.’ हे ऐकून सारी मुलं हसायला लागले.

पहिल्या दिवशी नामांकित वक्ता बोलावीत. त्यावर्षी कोणीतरी चांगलाच वक्ता होता. नाव नक्की आठवत नाही. पण त्यांनी जे सांगितलं, त्यातील गोष्ट मला अजूनही स्मरते. त्यांनी सांगितले की, मी बाहेरून घरात आलो. दरवाज्यात पाय टाकत नाही तर कंदिलाला पायाची ठेच लागून कलंडला. मी येथे कंदील कोणी ठेवला म्हणून ओरडलो. घरातले सारे चिडीचूप झाले. पण माझ्या लहानशा नातवाने हिंमत केली. मला म्हणाला की, आजोबा तुम्हाला हा कंदील दिसला नाही का? असं म्हणून त्याने माझ्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घातलं. ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपण क्षणोक्षणी जागृत असलं पाहिजे, उगीच आपल्या चुकांचं खापर दुसर्‍याच्या माथी मारू नये, असाच उपदेश करण्याचा उद्देश दिसला.

आम्ही होस्टेलचे मुलं गॅदरींगमध्ये भाग घ्यायला कचरत होतो. तसे आमच्या होस्टेल मध्ये एकावर एक सरस कलावंत होते. कोणी गाणं म्हणत, कोणी बासरी वाजवत. कोणी ताट-वाट्या वाद्यासारखे वाजवीत. कोणी बाकड्याचा उपयोग तबला वाजविण्यासाठी करीत.

राठोड नावाचा मुलगा, ‘गंगा मेरी मा का नाम, बापका नाम  जयसिंग’ हे गाणं म्हणत ताट-वाटी वाजवत, सुराच्या तालात जेवायला जायचा. त्याच्या आईचं नाव खरंच गंगा असल्याचं सांगत होता. त्याचा आवाज गोड होता. त्यावेळी हे सिनेमाचं गाणं फार प्रसिध्द झालं होतं. त्याच्या बाबतीत एक आठवण आहे. तो पहेलवान होता. कुस्ती खेळायचा. पण कोणासंग, माहित आहे? त्या रात्री तो थेट भूताशी कुस्ती खेळल्याचं सांगत होता. होस्टेलच्या बाजूला राखेचा मोठा ढीग पडला होता. त्या ढिगावर तो कुस्ती खेळला म्हणे ! आहे की नाही गंमत…! कोणाचा विश्वास बसेल यावर?

माझ्या दादाचा साळा उसळगव्हाणचा – पुंडलीक हा माझ्याच रुममध्ये राहायचा. तो पण छानपैकी गाणं म्हणायचा. कांबळे नावाचा मुलगा रेडीओवर प्रसारीत होत असलेल्या, बिनाका गितमालाचा अनॉउंसर ‘अमीन सयामी’ यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करायचा. होस्टेलमधील कुणीही मुलाने गॅदरींगमध्ये भाग घेतल्याचे आठवत नाही; पण मी मात्र पहिल्यांदा आणि एकदाच रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. खरं तर हे क्षेत्र मुलींचं होतं. मी हॉलमध्ये रांगोळी काढायला गेलो; तेव्हा तेथील सार्‍या मुली पाहून मला अवघडल्यासारखे झाले होते. आमच्या पोरीत हा पोरगा कसा, अशा आश्चर्यकारक चेहर्‍याने माझ्याकडे पाहतांना तेव्हा मला शरमल्यासारखे झाले होते. मी खाली मान घालून मुकाट्याने चित्र काढायला लागलो. खरं म्हणजे मला चित्र काढायची भारी हौस होती. बाईच्या लग्नात मी माझ्या घराच्या भिंतीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुध्द यांचे चित्र काढले होते. म्हणून मला रांगोळीच्या नावाने चित्रच काढायचे होते. त्यासाठीच मी या रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता.

मी काढलेलं चित्र नदीत पोहणार्‍या बदकाचं होतं. नदीच्या काठावर झाड व त्यावर चढलेली वेल. एक टोक खाली जिथे बदक पोहत आहे, वर आकाश – अशी ती मनमोहक कलाकृती साकारली होती ! बाकी मुली ठिबक्याची रांगोळी काढीत होत्या. मला वाटलं, बक्षीस बहुदा मुलींनाच मिळेल. मिळालंच तर एखादं प्रोत्साहनपर सर्टिफिकेट मिळेल. परंतु परीक्षकांनी माझ्या चित्राला तिसरा क्रमांक दिला. माझ्या दृष्टीने तिसरा क्रमांक म्हणजे पहिल्या क्रमांकासारखेच मोलाचे वाटत होते. माझं चित्र उठावदार, रंगसंगती व उत्साहाने सळसळणारं होतं. बहुदा ते परीक्षकांना भावलं असेल.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरु झाला. मी विद्यार्थ्यांच्या घोळकात बसलो होतो. बक्षीस घेणार्‍यांच्या चेहर्‍यावर विलक्षण आनंद झळकल्याचे दिसत होते. माझ्याही मनात आनंदाचे क्षण रेंगाळत होते. कधी माझ्या नावाचा पुकारा होईल ह्याची अधीरतेने वाट पाहत होतो. तो क्षण अत्यंत उत्कंठतेचा होता. शेवटी माझं नाव घेतलं. त्याचक्षणी माझ्या अंगात आनंदाची लहर चमकून गेली. मी स्टेजवर गेलो. पूर्ण मंडपात विशेषतः मुलांकडून कडाडून टाळ्या पडल्या ! तेव्हा स्पर्धेमध्ये माझ्या सारख्या मुलाने भाग घेऊन मुलींच्या एकाधिकारशाहीला कडवे आव्हान दिले. या भावनेने मुलांनी टाळ्या वाजवून अनोखेपणे दाद दिली तर नसावी ना ! असं मला उगीचच वाटून गेलं. कॉलेजमधले असे अनेक क्षण बहरलेले होते. आमच्यासारख्या गरीब मुलांना विद्यार्थी जीवनात त्रास आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे जरी खरं असलं तरीही ह्या जीवनातला रोमांच, स्वच्छंदपणा, रसिकता भरभरून अनुभवतांना वेगळाच आनंद आणि आल्हाद देवून जात होतं.

एकदा माझ्या कॉलेजची परीक्षा सुरु होती. ऎन पेपर सोडवितांना माझ्या कानाचं दुखणं उमळलं. ‘जिथे वाघाची भीती, तेथेच दिवस बुडला’, तर कसं होईल? तशीच माझी गत झाली. कसातरी पेपर सोडवून आठवडी बाजारातील सोंधी नावाच्या शिखाच्या दवाखान्यात गेलो. बाबा नेहमी त्याच्या दवाखान्यात जात होता. म्हणून त्याच्याशी ओळख होती. तसं माझा कान लहानपणापासून दु:खत होता. जेव्हा तो उमळायचा; तेव्हा मी नुसता रडत राहायचा. दिवस कसातरी जायचा, पण रात्र मात्र सरकत नव्हती. झोप येत नव्हती. इकडे-तिकडे, आत-बाहेर कानाला धरुन फिरायचा, माझं विव्हळणं कोणाला पाहवलं जात नव्हतं. आई कासाविस होत होती. मग वहिनीला काळजीच्या सुरात म्हणायची,

‘अनुसया, पोरगं मोठं रडते वं !. त्याच्या कानात तुवं दुध टाक वं मायबाई !’ मग वहिनी शिंपीत दुध काढून, माझ्या दुखर्‍या कानात टाकत होती. कधीकधी आई खायचं तेल कोमट करुन टाकायची. तरीही काही आराम पडत नव्हता.

अरे हो…! मंगल कलशाची गोष्ट राहूनच गेली. तर आम्ही सर्व मुलं कळंब नाक्यावर दुतर्फा रांगेत उभे राहून मुख्यमंत्र्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होतो. आम्हाला फुलांच्या पाकळ्या व तिरंगा झेंडा दिला होता. दुपार झाली, तरी मुख्यमंत्र्याचा ताफा अजूनही आला नव्हता. चातकासारखी वाट पाहत होतो. एकेक क्षण डोंगरएवढा वाटत होता. तहान व भुकेने कासावीस झालो होतो. उन्हाचा ताप व उकाड्याचा घाम…  नुसता कंटाळा आला होता !

आम्ही सारी मुलं हवालदिल झालो असतांना त्यांच्या गाड्यांचा ताफा धुरळा उडवत कधी आला ते कळलंच नाही. ‘आले… आले…’ असा एकच हलकल्लोळ मचला. सर्वांची तारांबळ उडाली. ‘वसंतराव नाईक की जय’ असा जयघोष सुरु झाला. घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाटाने आसमंत दुमदुमून गेला. हातातली फुले त्यांचेवर उधळल्या गेली. त्यावेळी आम्हाला वाटले की, यासाठी जीव कोणी गमावला व फुलांची उधळण कोणावर होत आहे? कृषी विद्यापीठाची स्थापना जर आधिच झाली असती, तर त्या नऊ मुलांचा हकनाक प्राण गेला नसता व पोलिसांच्या लाठीमारात कोणाला मार खावा लागला नसता…! ‘कोणी वंदा अथवा निंदा, बेशरमपणा हा आमचा धंदा’ असा हा राजकारणाचा नमुना मला दिसून आला.

त्यांच्या मोटारीचा लांबलचक ताफा मुंगीच्या पावलाने पुढे पुढे सरकत होता. त्या गर्दीत आमच्या सोबत पोलिस पण फरफटत चालत होते. मुलं पोलिसांच्या डोक्यातली टोपी हळूच हातातल्या कांबीने सरकवीत. टोपी सावरतांना ते सारखे घाईस येत. बिच्चारे पोलिस …! ते तरी काय करणार? धिंगाणा होऊ नये; म्हणून मुकाट्याने बुक्क्याचा मार सहन करत होते ! आम्ही त्यांची गंमत पाहून तोंडातल्या तोंडात खुसखुशीत हसत होतो. असा तो मंगल कलशाचा किस्सा होता. पण त्या कलशाला मंगल म्हणावं की अमंगल म्हणावं; याची चर्चा बरेच दिवसपर्यंत आम्ही मित्र मंडळी करीत होतो.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: