मी आणि माझ्या आठवणी


कथा एकतिसावी – ही विहीर चहा कशी देईल?

         

            मी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश घेतांना कोणता विषय घ्यावा, असा प्रश्‍न इतरांसारखा मलाही पडला. त्यावेळेस आमचा समज झाला होता की जर सायन्स विषय घेतला तर हमखास नापास होते. कारण हा विषय इंग्रजीत असल्याने कठीण असते. कितीही अभ्यास केला, तरीही पास होत नाही. नापास झाल्यावर स्कॉलरशीप मिळणार नाही. स्कॉलरशीप नाही तर शिक्षण बंद होईल. कारण आमचं शिक्षण हेच मुळी स्कॉलरशीपच्या भरोशावर… ‘स्कॉलरशीप’ हेच आमचे आई-बाप, आणि ती सवलत मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खर्‍या अर्थाने आमचे जीवनदाते…! म्हणून हा विषय घेऊन नापास होण्यापेक्षा, सोपा असणारा कॉमर्स विषय  घ्यावा. तो जर जमला नाही, तर आणखी सोपा असणारा आर्टस् विषय घ्यावा, अशी आमची मानसिकता झाली होती. मी सायन्स किंवा आर्टस् विषयाऎवजी कॉमर्स हा मध्यम मार्गाचा विषय घेतला. मनाची आवड नसतांना सुध्दा…!

खरं म्हणजे सायन्स विषय माझा आवडता होता. रसायनशास्त्रात मला शंभर पैकी अंशी गुण मिळून प्राविण्य मिळाले होते. गणितात त्र्याहत्तर आणि भौतिकशास्त्रात पासष्ट गुण मिळाले होते. परंतु नापास होण्याच्या भीतीने मी हा विषय घेतला नाही. आम्हाला एवढंच माहित होतं की शाळेतून निघाल्यावर कॉलेजमध्ये जायचं. बाकी आणखी काही कोर्सेस आहेत, ते आम्हाला अजिबात माहिती नव्ह्तं. इंजिनिअर किंवा मेडिकलला कसं जायचं, ते तर आमच्या गावीही नव्हतं.

आम्ही कॉलेजजवळील होस्टेलमध्ये राहत होतो. हे होस्टेलही कॉलेजचं असल्याने विद्यार्थ्यांसाठी चांगली सोय झाली होती. ते जर नसतं तर ग्रामीण क्षेत्रातील इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं शिक्षणासाठी शहरात येऊ शकले नसते. होस्टेलमध्ये चाळीसारख्या तीन बराकी होत्या. प्रत्येक बराकीत दहा ते पंधरा खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत मुले दाटीवाटीने राहत. मी शेवटच्या बराकीत राहत होतो. प्रत्येकांकडे सामान ठेवायला आपापल्या पेट्या होत्या. माझ्याकडे लाकडी पेटी, जी वसंतराव नाईक होस्टेलमध्ये होती, तीच ! ह्या पेटीत नुसतं दारिद्र ओसंडून वाहत होतं. होतंच काय त्यात लाख मोलाचं…! तरीही त्याला कवडीमोलाचं कुलूप लावत होतो.

लवकर आलेल्या मुलांना झोपायला पाट्याच्या किंवा दोर्‍यांनी विणलेल्या खाटा मिळत. मला पहिल्या वर्षी दोरीची खाट मिळाली. नंतरच्या वर्षी मात्र जमिनीवर झोपलो. कारण होस्टेल चालकांनी बाजा दुरुस्त न केल्याने त्या झोपण्याच्या लायकीच्या राहिलेल्या नव्हत्या. जमिनीवरचे मुरून उकरल्या जावून खडे बाहेर पडत. मग झोपतांना अंगाला टोचत. छतावरच्या टिनामुळे हिवाळ्यात मरणाची थंडी, पावसाळ्यात टपटप वाजणारं पावसाचं पाणी, तर उन्हाळ्यात उकडणारी गरमी होत होती.

होस्टेलमध्ये मागासवर्गिय समाजातील ज्यांना स्कॉलरशिप मिळत होती, अशा जातींचे मुलं होते. त्यात बौध्द, मातंग, बंजारी, गोंड, गवारी व परधान होते. बौध्द समाजाचे मुलं सर्वात जास्त होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा !’ असा मंत्र दिला. त्याचे अनुसरण सर्वात जास्त बौध्द समाजानेच केला होता. होस्टेल सुविधा व स्कॉलरशिपमुळे ग्रामीण मुलांच्या उच्च शिक्षणाचा बंद असलेला दरवाजा किलकीला झाला. नाहीतर ग्रामीण मुले फार तर चौथीपर्यंतच, जसे आधीची पिढी शिकायची, तेवढेच शिकले असते. कारण पाचवीनंतरच्या शाळा शहरी भागात होत्या. स्कॉलरशिप दरमहिना मिळत नसल्याने स्वत: जवळून खर्च करणं कठीण होतं. त्यामुळे शहरातील शिक्षण हे होस्टेल व स्कॉलरशिपशिवाय कधीच शक्य नव्हतं. यवतमाळला दोन कॉलेज होते. एक दाते व दुसरं अमोलकचंद कॉलेजचं. दातेकॉलेजला होस्टेलची व्यवस्था नव्हती. फक्त अमोलकचंद कॉलेजला होती. त्यामुळे या कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी खेड्यातील मुलांची अतोनात गर्दी उसळत होती.

अशी होस्टेलची सोय मुलींना नव्हती. नाहीतर मुली सुध्दा शहरात शिकायला आल्या असत्या. कॉलेजमध्ये ज्या काही मुली होत्या, त्या शहरी भागातील होत्या. आमच्या कॉमर्स फॅकल्टीमध्ये मुली औषधालाही दिसत नव्हत्या. सायन्समध्ये तुरळक मुली दिसत तर ज्या मुली दिसत त्या आर्टस् फॅकल्टीमध्ये होत्या.

आमच्या होस्टेलचे वार्डन सुरुवातीला शर्मा सर होते. ते मुलांना सकाळी उठवून रांगेत उभे करायचे. त्यांना ‘ये सुबह कभी तो आयेगी’ हे जीवनात आशा निर्माण करणारे गाणे म्हणायला लावीत. त्यामुळे मनाला उभारी यायची. ते व्यायामपटू असल्याने मुलांना व्यायाम पण शिकवीत. त्यामुळे शरीर आणि मन ठणठणीत होत असल्याची अनुभूती यायची. तसेच ते कॉलेजमध्ये हिंदी विषय शिकवीत. त्यांच्यानंतर वार्डन म्हणून खर्चे सर आलेत. ते कॉलेजमध्ये कॉमर्सचा विषय शिकवीत.

आमच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचे पुढारी म्हणजे शिंदोडे, भेले, खांडेकर, केराम… ते कॉलेजच्या निवडणुकांमध्ये उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार करीत. निवडणुकीच्या काळात मुलांची मजा असायची. एखादा उमेदवार आम्हाला कॅंटीन मध्ये घेऊन जायचा. तेथे आलुबोंडे खाऊ घालायचा. त्या बदल्यात मते मागायचा. एकदा होस्टेलमधील साळवे नावाचा मुलगा वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आला. त्यावेळेस आमची छाती फुलून गेली होती. जणू काही प्रत्येकाला वाटायचं, की मीच स्वत: निवडून आलो.

काही कॉंग्रेस पक्षाच्या पुढार्‍यांचे मुले आमच्या होस्टेलमध्ये प्रचाराला येत. हे मुलं गुटगुटीत, गोरेगोमटे, कडक इस्त्रीचे कपडे घातलेले असल्याने आमच्यापेक्षा वेगळे आणि उठून दिसत. त्यांचे आई-बाबा त्यांचे वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरे करीत. आमच्या आई-बापांना आमची जन्मतारीखच माहीत नव्हती, वाढदिवस तर दूरच ! या मुलांपैकी जे प्रत्येक वर्षाला एक-दोनदा तरी नापास होत, त्यांना होस्टॆलचे मुले  चिडवीत.

‘आपणच काय ते xxxxचे सुपुत्र? आणखी किती वर्ष या वर्गात मुक्काम आहे?’ असे म्हणून भोवताल जमा झालेले मुले खिदळत.

आमच्या होस्टेलवर त्यावेळी बोरकर नावाचा मजबूत बांध्याचा, सावळ्या रंगाचा मुलगा यायचा. तो दाते-कॉलेजमध्ये शिकत होता. तो आला की माझ्याच खोलीत सारे मुले जमत. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल भाषण द्यायचा. तो बोलायला बिलकुल घाबरत नव्हता. आंबेडकरी चळवळीत चांगला मुरलेला वाटत होता. तो दलितांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात तुटून पडायचा. ‘शेळी होवून शंभर वर्षे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगा. बकर्‍याचा बळी दिला जातो वाघाचा नाही.’ असे बाबासाहेबांचे वाक्य सांगून, न घाबरता सवर्णांच्या अत्याचाराचा मुकाबला केला पाहिजे, असा ठणकावून सांगत होता. त्यामुळे आम्ही उत्तेजित होवून आमच्या धमनीतलं रक्त सळसळत असे, इतका तो मुद्देसूद आणि जहाल बोलत होता.

होस्टेलवर फक्त दोन वेळचं जेवण मिळत. नाही चहा की नाही नास्ता ! नास्ता तसा आम्ही घरीही करीत नव्हतो, पण चहा पीत होतो. म्हणून चहाची तलफ फक्त घरी येत होती. होस्टेलवर साधी आठवणही येत नव्हती. आमच्या होस्टेलच्या मेसच्या मॅनेजरचे नाव शर्मा होतं. नेहमी पैजामा, शर्ट घालायचा. मनोहर पुरीवाला यांनी जेवणाचा ठेका घेतला होता. त्यांच्याकडे ते काम करीत होते. जेवणाची वेळ झाली की मॅनेजर शिटी वाजवायचा. शिटी वाजली रे वाजली की आम्ही ताट, वाटी व ग्लास घेऊन वाजवत वाजवत मेसमध्ये जात होतो. काही मुले लगीनघाई असल्यासारखे जागा मिळाली पाहिजे म्हणून पळत सुटायचे. काही मुले आधीची बॅच जेऊन उठण्यापूर्वीच दरवाज्याच्या बाहेर घुटमळत. जेवणारे उठले की बाकडे पुसण्याच्या आधिच आंतमध्ये घुसत.

ताटात पोळ्या किंवा हायब्रिड-ज्वारीच्या भाकरी वाढल्या की त्या एकमेकाला मारुन, झाडून घेत. कारण त्याला बरचसं पीठ डिकलेले असायचं. त्याचा पोपडा काढून चांगल्या तर्‍हेने निरखून पाहत. त्यात दिसणार्‍या अळ्या किंवा सोंडे नखाने खरवडून खाली टाकत. बाकी ताटात ठेवत होतो. ज्या चुकून राहत होत्या, त्या पोटात जात. पोरं एकमेकांना मग गमतीने म्हणायचे,

‘खाणा बे… अळ्या-सोंडे… काय होते…? मटण खाताच ना…! मग हेही मटण समजा…! उलट चांगलं पोष्टिक आहे…! बिना हाडाचं…!’

स्वयंपाक बनविणारे व वाढणारे उत्तरप्रदेश, बिहारचे भैय्ये लोक होते. काही मजाकी पोरं उगीच मराठीत शिव्या देवून त्यांची टवाळकी करीत. त्या लोकांना मराठी समजत नसल्याने ते त्यांच्या तोंडाकडे नुसतेच पाहत.

तिचतिच भाजी खाऊन आम्हाला कमालीची शिसारी आली होती. बाजारात जी भाजी स्वस्त असायची, ती रोजच्या रोज खायला मिळायची. मग त्याचा रस्सा किंवा वरची तर्री तेवढी खाऊन ताट धुवायला बाहेर आल्यावर बाकी भाजी टाकून देत. नळाजवळ नुसत्या भाज्यांचा सडा पडलेला दिसायचा. मग आम्हाला हटकून घरच्या रुचकर जेवणाची आठवण होत होती.

माझा लहानभाऊ, अज्याप नेहमी माझ्याकडेच राहत होता. त्यामुळे माझ्या होस्टेलचे मुलं, ‘जुमळे म्हणजे ते दोघे लहान भाऊ’ असे म्हणून ओळखत. त्याचं चोखामेळा होस्टेल रेल्वे स्टेशनजवळ असल्याने, शाळेपासून खूप दूर होतं. त्याची शाळा, गव्हर्नमेंट हायस्कूल माझ्या होस्टेलपासून जवळ होतं. म्हणून तो बर्‍याचदा माझ्याकडेच राहत होता. दुसर्‍या वर्षी त्याला पाखरेच्या होस्टेलमध्ये टाकले होते. तेथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था आमच्या पेक्षाही निकृष्ट होती. तेथे वरणामध्ये दाळीचा एकही कण न दिसता, नुसतं पातळ पाणी दिसायचं. पावसाळ्यात मुलांना ओल्याजागेवर झोपावे लागत होते. अशी त्यांची दुर्दशा होती.

त्याच्यासाठी मी डब्बा आणून दोघेमिळून खात होतो. कधीकधी आमच्या मेसचा मॅनेजर शर्माजी यांना पटवून एखादी पोळी जास्तीची देण्यास विनवीत होतो. तो तसा स्वभावाने खूप चांगला. आमची त्याला किव यायची. कधीकधी माझे मित्र डब्बा आणत किंवा पोळ्या, भाकरी खिशात टाकून आणत. अशा प्रकारची चोरी बहुदा सारेच मुलं करीत. त्याबद्दल कोणाला काहीच वावगं वाटत नव्हतं. ही गोष्ट मॅनेजरला पण माहित होतं. पण मुलांची परिस्थिती पाहून तोही त्याकडे कानाडोळा करायचा. रविवारी फक्त सकाळी जेवण मिळायचं. संध्याकाळी जेवण बंद राहायचं. महिन्यातून एकदा बहुदा सणाच्या दिवशी फिस्ट मिळायची. त्या वेळी जेवणात भात, भजे, जिलेबी असे पदार्थ मिळत. संध्याकाळी जेवणाला सुट्टी राहायची. मग पोरं मस्त पोट फुगेस्तो जेऊन घेत.

माझा रोजचा ड्रेस म्हणजे पांढरा पैजामा आणि शर्ट… कोणाची तरी लोखंडी इस्त्री आणून त्यात मेसच्या भट्टीतील कोळशाचे निवे टाकून कपड्याला इस्त्री करीत होतो. शाळेत असतांना जर्मनच्या गडूत निखारे टाकून शाळेच्या ड्रेसची इस्त्री करीत होतो. आम्ही होस्टेलचे मुलं एन.सी.सी. मध्ये मुद्दामच भाग घेत होतो. त्यामुळे पँट आणि शर्ट घातल्याचा आनंद मिळत होता. या ड्रेसमध्ये मिल्ट्रीटाईपचे जाडजूड दोन खाकी पँट, दोन पूर्‍या बाह्याचे शर्ट, बूट व पायमोजे मिळत. आमच्या शरीराच्या मानाने हे कपडे ढिलेढाले होत. मग कोणी टेलरकडून हा ड्रेस आल्टर करुन घेत. आम्ही या कपड्याचा वापर थंडीपासून बचाव करण्यासाठी करत होतो. शिवाय हेच कपडे घालून झोपत होतो.

एन.सी.सी. शिकवायला कधीकधी कळणावत सर मिल्ट्रीड्रेस घालून ग्रॉउंडवर येत. मराठी विषय शिकविताना घातलेला साधा ड्रेस व आताचा ड्रेस पाहून वेगळेच वाटत. तसेच मिल्ट्रिमधील निवृत झालेले सर शिकवायला येत. त्यांना कोणाही मुलांचे नावे माहिती नसत, म्हणून परेड चालू असतांना कोणी चुक केली की, ‘ए लंबू, कैसा चलता है? ए काला जवान, ठिकसे चल नही सकता क्या?’ असे म्हणायचे. त्यांचे असे विचित्र कॉमेंट्स ऎकून आमचे मोठे मनोरंजन होत असे. परेड सुरु असतांना मुलं गमती-जमती करीत. एकदा एका मुलाची गंमत आमच्या चांगलीच अंगावर आली होती. त्यावेळी आम्ही हातात बंदुका घेऊन मार्चिंग करीत होतो. एक मुलगा ‘जय हनुमान’ असे म्हणून जोरात ओरडला.

‘किसने कहा?’ सर रागाने गरजले. परंतु कोणीही सांगत नव्हते. मग त्यांनी सगळ्यांनाच धारेवर धरुन शिक्षा केली. दोन्ही हातात बंदुक धरून हात वर करुन पळायला लावले. २६ जानेवारीला पोस्टल ग्रॉऊंडवर पोलिसांसोबत मार्च करत मुख्य पाहूण्याला बंदूका घेऊन मानवंदना द्यावी लागत होती. माझी या परेडसाठी निवड झाल्याबद्दल मला मोठा आनंद झाला होता. त्यासाठी पंधरा दिवस, कॉलेजच्या ग्रॉऊंडवर प्रॅक्टीस करावी लागली. एन.सी.सी.मुळे आमच्या जीवनात शिस्त आली. शिस्त असली तर जीवन घडते नाहीतर बिघडते, असे म्हणतात. म्हणून त्याचा थंडीपासून बचाव करण्यासाठी जरी उपयोग करीत असलो, तरी दुसरा हाही फायदाच होत होता. मी एन.सी.सी.ची ‘सी सर्टीफिकेट’ परीक्षा सुध्दा पास केली.

आमचं होस्टेल जंगलाला लागून होतं. पूर्वी पाठीमागे घनदाट जंगल होतं. आमच्या गावावरून येणारा रस्ता येथूनच यायचा. जंगलतोडीमुळे नंतर तो विरळ झाला. सागाचे काही एकट-दुकट आणि पळसाचे काही खुरटे झाडं तेवढे दिसत. एकावर्षी सागाची कटाई केल्यावर त्याच्या फांद्याच्या सुडी होस्टेलजवळ रचून ठेवल्या होत्या.

माझं कॉलेज सकाळी असायचं. हिवाळ्यात सकाळी कुडकुडत तयारी करावी लागायची. तेवढ्या सकाळी नाल्यावर जायचं मोठं जीवाकडे यायचं. आंघोळ व कपडे धुण्यासाठी दुपारी जात होतो.

अंगातली थंडी घालविण्यासाठी आम्ही काही मुलं झाकटीलाच कॉलेजच्या ग्रॉउंडवर रनींग करत होतो. सिंगलबार-डबलबारवर व्यायाम करत होतो. त्यावर्षी हिवाळ्यात खूप थंडी पडली होती. कडाक्याच्या थंडीमुळे आम्ही गारठून जात होतो. अंगात एन.सी.सी.चे जाड कपडे… वर अंगावर चादरीला जोडून पोत्याची फारी… तरीही अंगातली थंडी जात नव्हती. त्यामुळे खोलीत शेकण्यासाठी जाळ करीत होतो. जाळेच्या उष्णतेने अंगात तात्पुरती गरमी आल्यावर झोपायला जात होतो. थंडी लागली की पुन्हा उठून शेकत बसायचो. माझ्यासारखेच कुणीतरी आधिच बसलेले असायचे. कधीकधी पुस्तक घेऊन वाचत बसायचो. असा आमचा कार्यक्रम रात्रभर चालत असे. लाकडाच्या सुडी आम्ही संपवून टाकल्या होत्या.

माझे भाऊजी, श्रावण त्यावेळी लोणी गावाच्या शाळेवर शिक्षक होते. हे गाव यवतमाळ-अकोलाबाजार रोडच्या आतमध्ये दोनक मैलावर होतं. ते त्याच गावात भाड्याची खोली घेऊन राहत. मी कधीमधी त्यांच्याकडे जात होतो. त्यांचा पगार झाला की ते यवतमाळवरुन पूर्ण महिण्याचा किराणा घेऊन येत. बाईकडे मी गेलो की माझाभाऊ अंगाने बारीक आहे. त्याला पोष्टिक खायला मिळत नाही. म्हणून ती मला लपूनछपून खोबर्‍याची वाटी साखरेसोबत रोज सकाळी खायला देत होती. परत जायच्या वेळेस खोबर्‍याच्या वाट्या व साखर बांधून देत होती. मी होस्टेलवर रोज सकाळी एकेक तुकडा साखरेसोबत गुपचूप खात होतो. तेव्हा बाईचा कळवळा पाहून माझं अंत:करण भरुन येई.

भाऊजींचे वडील पुलगावच्या डेपोमधून रिटायर झाले होते. त्या पैशातून त्यांनी यवतमाळला आरोग्य मंदीरजवळ जागा घेऊन लहानसं घर बांधलं होतं. माझी पुतणी वणीता खूप आजारी पडली होती. ती अगदी लहान होती. तिचे हातपाय बारीक व पोट फुगले होते. बाबाने घरी गावरानी इलाज करुन पाहिला. परंतु तिची तब्येत आणखीच दिवसोंदिवस बिघडत चालली होती. म्हणून आई-बाबा तिला यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन आले होते. भाऊजींचे वडील व त्यांचे कुटुंब यवतमाळचे घर सोडून खेड्यावर राहायला गेले होते. म्हणून माझे आई-बाबा याच घरी राहायला आले होते. मी कॉलेज सुटलं की त्यांच्या कडे जात होतो. घरापर्यंत चिखलच चिखल राहत होता. घराच्या पलीकडे लोक उघड्या मैदानात परसाकडे बसत. त्यांचे उघडे ढुंगणं व डुकरं पाहिले की किळस येत असे. पाय ठेवण्यासाठी लहान-लहान दगडं लोकांनी रस्त्यात टाकून ठेवले होते. त्यावर कसेतरी तोल सांभाळत जाणे-येणे करीत. मी सुध्दा कसरत करत जात होतो. पाऊस आला की घरातही ओल राहायची. मी येतांना ओला झालो की अंगात हुडहुडी भरायची. मग चुलीजवळ जावून शेकत बसत होतो.

या घरी आलो की एक गोष्ट आठवायची. बाईचं लग्न रात्रीला झालं. दुसर्‍या दिवशी नाहा-नवरा व शेवयाचं जेवण झाल्यावर सार करायची वेळ आली. सारा गाव जमा झाला होता. बाई मोठ्यांच्या पाया पडत होती. त्यावेळी त्यांच्या कंठात हुंदके दाटून येत होते. आई-बाबाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. लहानाची मोठी केलेली, तळहातावर जपलेली, लाडाची लेक, आपल्या काळजाचा तुकडा दुसर्‍याच्या स्वाधीन करतांना त्यांना किती दु:ख होत असेल ! आई, बाबा, दादा, वहिनी यांच्या गळ्यात पडून बाईला हमसून हमसून रडतांना पाहून मी गलबलून जात होतो. माझ्या व अज्यापच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला गोंजारीत होती. ते सारं दृश्य करूण रसाने भरून गेलं होतं.

लग्नानंतर भाऊजी बाईला न्यायला आले होते. त्यावर्षी आम्ही गोधणी गावाला आमराईत राहत होतो. माझ्या गावावरून तुळशीरामदादाच्या बैलगाडीने त्यांना घेऊन मी, अर्जुन, धनपाल व गुलाब आमराईपर्यंत आलो. बाईला सार करायचे असल्याने आई गावाला आली होती. बाबा एकटेच आमराईत थांबले होते. बाबाला पाहून बाईला रडण्याचा हुंदका आवरता आला नाही. बाबाही हळहळला. माझंही मन गहिवरुन आलं. तेथून आम्ही भाऊजींच्या घरी आलो.

संध्याकाळी आम्ही सिनेमा पाहायला गेलो. घरी येतांना अवकाळी पावसात सापडलो. त्यामुळे पार भिजून गेलो. आमचे पाय चिखलाने लदबद भरले होते. अंधारात काहिच दिसत नव्हते. कसंतरी अंदाजाने एकेक पाय टाकत घरापर्यंत आलो. आमच्या अशा अवस्थेने घर-अंगण खराब होईल, म्हणून मामाजी आमच्यावर कातावले होते. जेवण करायला हाक दिली; तेव्हा आम्हीपण त्यांच्यावर राग काढण्यासाठी मुद्दामच रुसलो.

‘आमच्या बैलाला पहिल्यांदा चारा खाऊ घाला. तेव्हाच आम्ही जेऊ.’ असे रागातच म्हणालो. खरच मामाजी त्याचवेळेस अंधारात कुरुकरू बाहेर पडले व बाजारातून बैलाला चारा विकत घेऊन आले. आम्ही त्यांची तडप व तत्परता पाहून मनातून पार ओशाळलो होतो.

बाबानेही त्यावेळी या घराच्यासमोर लहानशी जागा घेतली होती. त्या जागेवर पंचायत समितीचा चपराशी आम्हाला न विचारता घर बांधायला लागला. बाबाच्या लक्षात आल्यावर आम्ही सर्वजण तेथे गेलो. त्या अर्धवट बांधलेल्या घरात आम्ही ठाण मांडलं

‘ही जागा व घर आमचं आहे. तुम्ही निघून जा… नाहीतर माझं घर बळकावलं म्हणून पोलिस स्टेशनला रिपोर्ट करतो.’ असे बाबाने त्याला धमकावले. तेव्हा तो घाबरुन गयावया करायला लागला. त्याला कुण्यातरी व्यक्तीने सांगितले म्हणे, की ती जागा त्याची आहे व तेथे तू घर बांध. म्हणून तो बांधत होता. शेवटी बाबाने नको ती झंझट, म्हणून त्याला विकून टाकली.

त्यावर्षी आमच्या कॉमर्स विषयाची परीक्षा एका महिन्याने लांबली होती. होस्टेलची मेस बंद पडणार होती. तरीही आमच्या तेरा मुलांसाठी प्रत्येकांनी चाळीस रुपये भरल्यास मेस चालू ठेवतो; असे मॅनेजरने आश्वासन दिले होते. हे पैसे भरण्याची आमची ताकद नव्हती. अन् स्कॉलरशिपमधून मेसचे पैसे कापून उरलेले पैसे अजूनही मिळाले नव्हते. त्यावेळी स्कॉलरशिप वर्षातून दोनदा मिळत होती. एकदा दिवाळी व दुसर्‍यांदा परीक्षा झाल्यावर. कॉलेजच्या शिकवणीचा, लायब्ररीचा, विद्यार्थी निधी व इतर निरनिराळे फीचा खर्च व होस्टेलच्या रुमचे  भाडे व मेसचे पैसे कापून उरलेले चाळीस-पन्नास रुपये मिळत. हे पैसे बाबाला देत होतो. खरं म्हणजे जेव्हा वह्या-पुस्तके घ्यायचे असतात; तेव्हा द्यायला पाहिजे होते. पण तसे होत नव्हते.

या अचानक उद्‍भवलेल्या समस्याने आम्ही मुले चिंतेत पडलो. म्हणून मी, पाटील, हजारे व आणखी काही विद्यार्थी कॉलेजचे प्राचार्य मनोहर खेरकर सरांना भेटलो. त्यांना अडचण सांगितली. त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना भेटायला सांगितले. आम्ही अध्यक्षांना भेटायला बगिच्यात गेलो. होस्टेलपासून त्यांचा बगीचा खूप दूर होता. ते राजकीय पुढारी असल्याने सहसा भेट होत नव्हती. तरीही आम्ही त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. परीक्षा जवळ आल्याने अभ्यासाकडे पण लक्ष द्यावे लागत होते. गंमत सांगायची म्हणजे आम्ही खोलीत मयालीवर व पाट्यावर परीक्षेची तारीख जिथे-तिथे लिहून ठेवत होतो. ही तारीख सतत नजरेसमोर राहावी, हा उद्देश असायचा.

शेवटी मोठ्या मुश्किलीने ते भेटले. आम्ही गेलो तेव्हा ते आतमध्ये बोलत होते. त्यांच्या भोवताल चकचकीत पांढरे खादीधारी कपडेवाल्यांनी गर्दी केली होती. आम्हाला तेथे जायला संधीच मिळत नव्हती. म्हणून बाहेरच उभे होतो. त्यांना कसं भेटायचं याचा विचार करीत होतो. तेवढ्यात ते बाहेर आले आणि घाईतच जायलाच निघाले. त्यांच्या सोबतच आतमधील सारी मंडळी वारुळातील मुंग्यांसारखी बाहेर आली. मोठ्या हिंमतीने मी त्यांना म्हणालो,

‘सर, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे.’ त्यांनी त्यांच्या पी.ए. कडे बोट दाखवून त्यांना भेटायला सांगितले.

‘नाही… आम्हाला तुमच्याशीच बोलायचं आहे. आम्ही अमोलकचंद कॉलेजच्या होस्टेलचे मुलं आहोत.’ मग ते थोडे थबकले.

‘सांगा…? काय ते पटकन सांगा? मला वेळ नाही…’ असं ते म्हणाले.

तोपर्यंत ते त्यांच्या घराजवळच्या विहिरीजवळ आले होते. आम्ही त्यांना अडचण सांगितली.

‘तुम्हाला स्कॉलरशिप मिळते ना?’

‘हो. मिळते… पण अद्याप मिळाली नाही. आणि एक महिना वाढल्याने त्या महिन्याची स्कॉलरशिप देखील मिळणार नाही.’

‘मग मी काय करु?’

‘सर… तेरा मुलांचा प्रश्‍न आहे. तेवढ्या एक महिन्याच्या पैश्याची व्यवस्था केली की आमचा प्रश्‍न मिटतो.’

‘नाही… माझ्या हातात काही नाही. मी काही करु शकत नाही.’

आम्ही त्यांना परत विनंती केली. त्यांनी पुन्हा नकार देऊन आम्हाला उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘ही विहिर आहे. त्यात पाणी आहे. तिला तुम्ही चहा मागितला तर देईल काय?’ असा अकल्पित प्रतिप्रश्‍न ऎकून आम्ही अवाक् झालो. असं गोड बोलून ते आमची बोळवण करतील, असं वाटलं नव्हतं.

ते हिंदी भाषिक असूनसुध्दा अस्खलीत मराठी बोलत. शिवाय पट्टीचे गोडबोले होते. आम्ही होस्टेलचे मुलं गमतीने त्यांना गोडबोलेच म्हणत होतो. पाहायला गोरागोमटा, गुबगुबीत ! अशा माणसाला आमच्या खेड्यात ‘देखणा बैल दिसाले अन् ढिल्ला निघाला कामाले’ असे म्हणत. शेवटी हिरमुसले होऊन आम्ही होस्टेलला परत आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी प्राचार्यांना भेटून ही गोष्ट सांगितली.

त्यांनी म्हटले, ‘ठीक आहे. मीच पाहतो, काय उपाय करता येईल ते… तुम्ही नाराज होऊ नका. चांगला अभ्यास करा. मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो. काही काळजी करु नका.’

खरंच, चांगले होते ते ! ते एकटेच कॉलेजच्या क्वॉर्टरमध्ये राहत. अविवाहीत होते. रंगाने सावळे, पण सुट, बुट व टॉयवर चार-चौघात उठून दिसत. रुबाबदार होते. आम्ही मुलं त्यांना घाबरत होतो. व्हरांड्यात कधी जातांना-येतांना दिसले की आम्ही पटकन मागे फिरत होतो. कोणाच्या शर्टाचं बटन उघडं दिसलं की त्याला थांबवून बटन लावून देत. पण ते तसे प्रेमळही होते. त्यांना गरीबांच्या परीस्थितीची जाणीव होती. त्यांनीच होस्टेलचे पैसे भरले. हे पैसे कुठून आणले? कसे भरले? ते आम्हाला काही कळले नाही. पण आम्ही त्यांचे शतशः मनोमन उपकार मानले.

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: