मी आणि माझ्या आठवणी


कथा तिसरी –  ऒंगळवाणे रुप

 

 

एखाद्या डोंगरावर फेरफटका मारतांना हिरवळ कुठेच दिसू नये. उलट तेथील कुसळ्यांनी त्रस्त व्हावे, अशीच माझ्या खेड्याची स्थिती होती.

मी जेव्हा बरडावर जावून माझ्या गावाकडे नजर टाकत होतो, तेव्हा ‘दुरुन डोंगर साजरं दिसते.’ या म्हणीप्रमाणे माझं चिमुकलं गाव खरोखरच सुंदर दिसत होतं. पण जेव्हा गावात पाय ठेवत होतो, तेव्हा त्याचं ओंगळवाणं रुप नजरेस येत होतं. म्हणून ‘दुरुन डोंगर साजरं दिसते’ अशी म्हण पडण्यापेक्षा ‘डोंगरावरुन गाव साजरं, पण जवळ गेल्यावर कुरूप’ अशी म्हण असती, तर माझ्या गावाला तंतोतंत लागू पडली असती. गावातील अंतरंगाचं ओंगळवाणे दृष्य पाहून मला किळस येत असे.

माझंच गाव काय, कोणत्याही खेड्याची अशीच गत ! जेथे जागा मिळेल तेथे घर, खताचा उकीरडा…! घरांची, रस्त्यांची रचना मुळातच निटनेटकी नाही. गावाची ग्रामपंचायत तेवढी संवेदनशील आणि जागृत नाही. कोणी कुठेही जागा दिसेल, तेथे घर बांधावं व वाटेल तेथे खताचा खड्डा खोदावा. त्याचं सोयरसुतक कुणाला नाही.

माझ्या गावातील प्रमुख रस्ते म्हणजे एक लभान तांड्यातून पांढरीकडे जाणारा, दुसरा पांढरीकडून व तिसरा जनार्दनदाजीच्या घरापासून माझ्या घराला लागून यवतमाळकडे जाणारा. खाबडखूबड, दगड-गोट्याचे, माती-गागर्‍याचे, पावसाच्या पाण्याने चिरा पडलेले तर गाडीच्या लोखंडी येटाने घासल्याने खोलगट झालेले ते रस्ते होते. जेव्हा दगडाच्या उटा लागत; तेव्हा बैलांना गाडी ओढतांना खूप ताण पडल्याशिवाय राहत नसे.

बोळी-बोळीतून जाणारा पायरस्ता. पाणी-चिखलात दगडावर पाय ठेवून कसंतरी चाचपडत, तोल सावरत जावे लागत असे. कुठे दोन घराच्या मधात निमुळती पायवाट असायची; तर कुठे कुपाट्याच्या बाजूने रस्ता असायचा. तेव्हा लाकूड-काड्यांचा किंवा घराच्या भिंतीचा आधार घेत मोठ्या हिकमतीने रस्ता पार करावा लागत असे. नाहीतर कधी घसरुन पडेल याचा नेम राहत नसे. पावसाळ्यात अशा रस्त्याने जायचं म्हणजे छातीत धस्स व्हायचं. कारण घसरन…! मग पायाचे नखे जमिनीत रुतवल्याशिवाय जाताच येत नव्हतं.

रात्रीला जायचं काम पडलं की मनात चर्र व्हायचं. अंधारात अंदाजा अंदाजाने पाय टाकत जावे लागत असे. नाहीतर पायाला हमखास दगडाची ठेच लागायची. विंचू-सापाची भीती तर डोक्यावर सतत टांगलेली राहायची.

काळोख्या रात्रीला काय घडेल ते सांगूच नका ! एकदा जेवणखाण आटोपून गावकरी झोपण्याच्या तयारीत होते. तेव्हा किसनदादा हातात चिंपट घेऊन पांदणीच्या रस्त्याने परसाकडे जात होता. तेवढ्यात गावात वाघ येत असल्याची हूल पसरली होती. म्हणून घाबरला होता. त्यावेळी त्याला नेमके दोन चमकणारे डोळे दुरून येतांना दिसले. त्याला वाटले बहुतेक वाघच असावा. म्हणून तसाच धावत-पळत माघारी आला. येतांना ‘वाघ आला, वाघ आला’ असा ओरडत होता. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले लोक दरवाजा किलकिला करून घरातूनच पाहत होते. डोळे चमकणारा प्राणी हलत-डुलत गावात शिरला. लोकांची घाबरगुंडी उडाली. किसनदादाच्या घरासमोरूनच तो घरामागे गेला व तुळशीरामदादाच्या बैलाच्या गोठ्यात शिरला. तेव्हा कळले की तो वाघ नसून तुळशीरामदादाचा ‌गोर्‍हा होता. अशाही काही गंमती-जमती अंधार्‍या रात्री घडत होत्या.

गावाची अवस्था अत्यंत भकास, बकाल वाटत होतं. गावात विज, पाण्याचे नळ, सडक, नाल्या, शौचालय असं काही नाही. सिमेंट कॉंक्रिटचे एकही घर नाही, सारे कुडामातीचे…! शहरासारख्या कोणत्याही सुविधा नाहीत.

माझं गाव म्हणजे नुसता वणवा…! वेदनांना घेऊन जळणारं…! पोटाची आग विझवण्यासाठी वणवण पळणा़रं…! जगण्यासाठी कुतरओढ करणारं…! कष्टांच्या खाच खळग्यातून सतत झरझरणारं…! फाटक्या अन् मळलेल्या कपड्यात वावरणारं…! गरिबीने पोळलेलं…!

खेड्यातही राहणारे माणसंच असतात, ना ! त्यांनाही मन आणि भावना असतात. चारचौघांसारख्या त्यांनाही सुखाच्या कल्पना असतात. पण किमान जीवन जगण्याच्या गरजा ते पूर्ण करु शकत नाहीत. जगण्याची कसरत करतांना त्यांचा अवघा जीव अदमुसा होत असते.

सगळीकडे कचरा, गवत-काडी, चिखल, जीव-जंतूचा सुळसुळाट, धुळ, खकाना व गागरा…! घराघरातून निघणारा धुपट, डोळ्याची चुरचूर आग व शेण-खताचा कुबट वास नित्याचीच…! गावाची अशी बकाल अवस्था पाहून मन कासावीस झाल्याशिवाय राहत नसे. कधी लोक रोगराईला बळी पडतील काही सांगता येत नव्हतं.

दिवसभराच्या सूर्याचा पाश तुटायला आला की गावाचा परिसर उदासीनतेने घेरून गेल्यासारखे वाटत होते. मग चहूबाजूंनी अंधार कणाकणानी साठून सारा गाव अंधारात गुडूप होवून जायचा. किर्र अंधाराचे साम्राज्य सुरु झाल्यावर आणखीनच भयान वाटायचं.

गावातून बाहेर किंवा बाहेरुन गावात यायचं म्हणजे पांदणीशिवाय दुसरा रस्ता नव्हता. पावसाळ्यात याच पांदणीने वाहणार्‍या लेंडीच्या पाण्याला आम्ही मुले दगड-मातीचा बांध घालून अडवित होतो. मग त्यात मनसोक्त खेळत होतो.

रिमझीम पावसात कोणी परसाकडे केली की लेंडीच्या पाण्यात घाण इतस्तत: पसरुन जात असे. त्यावर पाय पडल्यावर फसकन घाण मिश्रीत पाणी अंगावर उडल्याशिवाय राहत नसे. असा तो किळसवाणा प्रकार नेहमीचाच होता.

पाऊस असो की नसो माणसं एकवेळ हातात चिंपटं, टमरेल घेऊन परसाकडे वावराच्या तासात, शेताच्या धुर्‍यावर किंवा लवणावर जातील; पण बाया-पोरींना मात्र पांदणीच्या रस्त्यावर, गोदरीत बसावे लागत होते. कोणी येतांना दिसला की लाजेने मान खाली घालून, तो दृष्टीआड होईपर्यंत उभे राहावे लागे. इतकी नामुश्की त्यांच्या वाट्याला येत होतं. असा प्रकार पाहून ओशाळल्या सारखं होत असे.

चिलटं डोळ्यापुढे गुणगुणत, कधी डोळ्यात घुसत. डासही कानाजवळ गुंगऽ गुंगऽऽ करीत आणि कडाकडा चावा घेत. ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डोबरे, सांडपाणी, शेणाचे पोवटे, खताचा उकंडा, शौचाची घाण, कचरा, गवत यामुळे चिल्ट-डासाची झपाट्याने पैदास होणार नाही तर काय होणार?

मोरीतल्या पाण्यात तुरुतूरु चालणार्‍या अळ्या पाहून कमालीची घृ्णा वाटत असे.       ग्रामपंचायतीकडे नाल्या, रस्ते बांधण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी पैसे राहत नसत. कारण घरकरापासून फारसं उत्पन्न मिळत नसे. एखाद्या योजनेचा प्रस्ताव सरकारकडे पाठवायचा तर पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त लोकवर्गणी जमा करण्याची अट सरकार घालत असे. लोकांच्या गरिबीमुळे ऎवढे पैसे उभारणं शक्य तरी होतं काय?

लहान मुलं एकाठिकाणी बसून खातील, असं कधी होत नव्हतं. आईने चुरुन दिलेला चिमण्या पिलांचा घास फिरुन खाण्यात त्यांना मोठी मजा वाटत असते. त्यामुळे अन्नाचे कण जागोजागी विखरुन पडत. चिमुकले पोरं घरात कुठेही ‘शी’ करीत. त्यावर राख टाकून खपरेलाने खरडून काढून, जागा सारवेपर्यंत माशांचा गोंगाट सुरु राहायचा.

गंभीर आजार असलेल्या किंवा बाळंत बाईला बाहेर परसाकडे जाणे अशक्यच होत असे. अशा वेळेस कुठेतरी कोपर्‍यात व्यवस्था करीत. गुरेढोरे, कुत्रे, मांजरी, कोबड्या व त्यांची पिल्ले यांची अस्वच्छता, अशा अनेक कारणामुळे रोगराई पसरण्यास वेळ लागत नव्हता.

आमच्या खेड्यातील पिण्याच्या पाण्याचं तर विचारुच नका ! आमच्या मोहल्ल्यात ज्ञानेश्वरच्या घराजवळची दगडाने बांधलेली एक व चिरकुट्याच्या घराच्या आवारात दुसरी विहीर होती. लभानपूर्‍यात पण विहीर होती. पावसाळ्यात ह्या विहिरी काठोकाठ भरुन जायच्या. हातानेही पाणी काढता येईल, असं…! हे पाणी गढूळ आणि अत्यंत दुषीत राहत असे.

माझा मोठाभाऊ गावाचा सरपंच असल्याने सरकारकडून मिळालेले जंतु मारण्याचे पोटॅशियम परमंगनेटचे पुडे माझ्याच घरी राहत. ते विहिरीच्या पाण्यात टाकल्यावर त्याचा रंग लाल व चव कडवट लागत असे. त्यामुळे काही बाया-माणसं मोठे कुरकूर करीत. कधीकधी बाया विहिरीच्या बाजूलाच कपडे धूत. पाणी भरतांना भोवताल सांडलेले पाणी पुन्हा विहिरीत झिरपत असे.

उन्हाळ्यात तर आमच्या त्रासाला पारावर राहत नसे. जवळपासच्या विहिरी कोरड्याठक पडायच्या. त्यामुळे पाण्याचं मोठं दुर्भिक्ष निर्माण व्हायचं. उन्हातान्हात पायपीट करुन दुरुन पाणी आणावे लागे. त्याच्या ओझ्याने मान मोडून गेल्यासारखी, कंबर चेचल्यासारखी व्हायची; तर पायामध्ये गोळे आल्यासारखे वाटायचे. विहिरीत उतरुन डोबर्‍यात जमलेलं घोट घोट पाणी बालटीत टाकावे लागे. रात्रीला विहिरीत झर्‍याचं पाणी जमत, तेव्हा पाणी भरण्यासाठी लोकांच्या डोळ्याला डोळा  लागत नसे.

एकदा तर पाण्यापायी माझ्या जीवावर बेतलं होतं. आताही त्या गोष्टीची आठवण झाली की माझ्या अंगावर सरसरून काटे उभे राहतात. उन्हाळ्यात मामाच्या वाडीतील विहीर आटली होती. तिला सुरुंग लावून फोडण्याचे काम सुरु होतं. अशी नवलाईची गोष्ट असली की मला पाहायला मोठी मजा वाटत होती. विहिरीतील खडकात सुरुंग करतांना व स्फोट झाल्यावर विहिरीत पडलेला दगडाचा मलमा बाहेर काढतांना, मी व अर्जुन विहिरीच्या काठावर बसून मन लावून पाहत होतो.

तेवढ्यात पाणी भरायला आई आली. डोबर्‍यात जमा झालेलं झर्‍याचं घोट घोट पाणी गीलासाने बालटीत टाकून देण्यासाठी मी विहिरीत उतरलो. त्याचवेळी सिंदीच्या टोपल्यात दगडं भरून बाहेर काढण्याचे काम चालू होते. त्यावेळी अचानक टोपलं तिरकं झाल्याने त्यातील मोठा दगड निसटून खाली माझ्या दिशेने पडत असतांना अर्जुनचे एकाएकी लक्ष गेले.

‘मामा बाजूला सरक… दगड पडत आहे.’ असा अर्जुनचा जोरात आवाज माझ्या कानावर आदळल्याने मी झटक्यात बाजूला सरकलो, म्हणून वाचलो. नाहीतर दगडाने माझ्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याशिवाय राहिला नसता.

आई पाण्यानं भरलेला गुंड डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवणार, त्याचक्षणी अर्जुनचा कल्ला ऐकून थबकली. एव्हाना झालेला प्रकार तिच्या लक्षात आल्यावर रडायला लागली. मी विहिरीतून बाहेर आल्याबरोबर तिने माझ्या दोन्ही गालाचे व कपाळाचे पटापट मुके घेतले. अर्जुनकडे कृतज्ञतेने पाहत, ‘तुयाच्यानं माहा रामराव वाचला रे…!’ असे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले.

वाल्ह्याच्या वावरात दोन विहिरी होत्या. त्यापैकी एक त्याची स्वत:ची होती. या विहिरीवर बौद्धांना पाणी भरायला मनाई होती. दुसरी विहीर खास बौद्धांसाठी ग्रामपंचायतने खोदली होती. या विहिरीजवळ पेवंडी आंब्याचं झाड होतं. आम्ही मुले लवणात उतरुन चुपचाप दगडाने आंबे पाडत होतो. हा आंबा खोबर्‍यासारखा गोड लागायचा. त्याच्या शेतात लवणाजवळ दुसर्‍या आंब्याचं घेरेदार झाड होतं. त्याला ‘कारु’ आंबा म्हणत. हा इतका गोड की तो खाल्ल्यावर त्याचा मधूर स्वाद कितीतरी वेळपर्यंत तोंडात दरवळत राहायचा ! तुपासारखा रस लागत होता. तो पिकल्यावर त्याचा रंग हिरवाच दिसायचा. अशा प्रकारचा वैशिष्टपूर्ण आंबा माझ्या पाहण्यात कुठेही आला नाही.

नाल्याच्या पलीकडे सुखदेवच्या वावरात आणखी विहीर होती. ही विहीर दगडाने बांधली होती. त्यात डोकावून पाहिलं की पिंपळाचे झाडं उगवलेले दिसत. रात्रीला याही विहिरीवर माणसं पाणी भरत.

त्यावर्षी वाल्ह्याच्या आंब्याचे झाडं दादाने विकत घेतल्याने मी राखण करत होतो. रात्रीला लोक आंबे तोडतील; म्हणून धास्ती वाटत होती. मी धनपालला सांगून शक्कल लढवली. कोणी पाणी भरायला आले की आम्ही अंधारात झाडावर चढून हुऽ हुऽऽ आवाज काढत फांद्या हालवीत होतो. त्यावेळी पाणी भरणारे लोक भुताटकीच्या भीतीने काही वेळ घाबरुन गेल्यासारखे वाटत. परंतु रात्रीला पाणी भरणे काही थांबलेलं नव्हतं. त्यांची पण मजबूरी होती. कारण शेतीवाडीचे काम करणारे दिवसा पाणी भरायला वेळ देवू शकत नव्हते. म्हणून बिच्चारे, रात्रीला मजबुरीने पाणी भरत.

बरबड्याच्या एका उघड्या विहिरीला भरपूर पाणी असायचं. ती नाल्याजवळ असल्याने त्याला  झर्‍याचा ओलावा राहत होता. पाणी भरतांना बरेच पाणी काठावर सांडत. मग तेच खराब पाणी परत विहिरीत मिसळत होते. शिवाय ही विहीर उंबराच्या झाडाजवळ असल्याने, त्याची फळे विहिरीत पडत. मग त्या विहिरीचे पाणी आणखीनच घाण होत होते. तरीही लोकांना हे पाणी नाईलाजाने प्यावे लागत होते. पोवार पाटलाच्या कोठ्याजवळ विहीरा होता. तो दूर असल्याने भरपूर पाणी असायचं. आम्ही तेथे भर उन्हात जात होतो. काही शेतकरी बैलगाडीवर टिनाचा ड्राम बांधून पाणी भरून आणीत. मी सुध्दा तुळशीरामदादाच्या किंवा दमडूमामाच्या ड्रामवर जात होतो. मग त्यातील एक-दोन गुंड पाणी घरी आणण्यास सवलत मिळत होती.

मी एकदा दादाला नहाणीतल्या उघड्या नांदीतलं थंड पाणी पितांना पाहिले; तेव्हा त्याला म्हटले,

‘दादा, नांदीतलं पाणी पीत नको जाऊ… उघडं आणि घाण असते. त्याने रोग होतात.’

‘मला काही होत नाही. काही काळजी करु नको…’ आरोग्याबाबत इतकी बेफिकीरी परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांच्यात येत असावी, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.

अशा अस्वच्छतेमुळे कॉलरा, मधूरा, मलेरीया, हगवन यासारख्या आजाराला खेड्यातील लोक बळी पडत. मग उपचारासाठी शहरात जाण्याच्या भानगडीत कोणी पडत नसत. कारण तीन कोस जाणे-येण्याचे हेलपाटे मारणे व त्यासाठी मजूरी पाडणे कोणाला परवडत नव्हतं.

सरकारी दवाखान्यात चांगली व्यवस्था होईल, असा काही भरोसा देता येत नव्हता. तेथील कर्मचार्‍यांकडून हिडीस-फिडीस करतांना आलेला पूर्वानुभव ! बिमारी कोणतीही असो, सर्वांनाच लाल पाणी व पांढर्‍या गोळ्या…! तेही तीन दिवसांसाठी…! बिमारी नाही बसली तर पुन्हा मजूरी पाडून जाणे-येणे शक्य तरी होतं का? खेडूत लोकांना झटपट इलाज पाहिजे. म्हणून डॉक्टरांना म्हणत,

‘साहेब, सूई टोचा. उद्या कामावर जाता आले पाहिजे.’ पण डॉक्टरांच्या अभ्यासात सर्वानांच सूई टोचणे बसत नसेल तर त्यांनी तरी काय करावं?

खाजगी दवाखान्यात ऎवढा पैसा खर्च करण्याची कुवत नाही. फारच पाणी गळ्यापर्यंत आले, तरच नाईलाजाने उसनेपासने करून खाजगी दवाखान्यात जात. पण डॉक्टरचं व औषधी-पाण्याचं बिल पाहून पोटात भीतीचा गोळा उभा राहिल्याशिवाय राहत नसे. हप्‍त्याभराची मजूरी त्यांना या खर्चापोटी द्यावे लागत होते. मग आता खावे काय, अशी चिंता पडून जात होती.

अशा अडचणीपासून दूर राहण्यासाठी मग लोक झाडपाला किंवा गावठी इलाजाला पसंद करीत. अंधश्रध्दाळू लोक साधुबूवा-भगताच्या फुक-फाकीला व मंत्र-तंत्रालाही बळी पडत.

मुलांच्या शिक्षणाची अशीच आबाळ होत होती. एकटाच मास्तर, पहिली पासून चौथी पर्यंत शिकवित होता. एकाच खोलीत चारही वर्ग भरत होते. तो यवतमाळवरुन जाणे-येणे करायचा. आमच्याच आवारातील कोठ्यात शाळा भरत होती. नंतर माझ्या घराच्या बाहेर रस्त्याजवळ कुडा-मातीची व वर टिना असलेली लांब खोली बांधली होती. त्यात ती शाळा भरत होती. अशा किती सांगावं नि किती नाही, इतक्या समस्यांनी ह्या गावाला घेरलं होतं.

असं या गावाचं विद्रूप रुप पाहून मन विषष्ण होत असे. तरीही हे गाव कसंही असो, त्याचेशी अतूट नातं निर्माण झालं होतं. गावातील जवळकीच्या नात्यातून मला भावनिक उब मिळत होती. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी या गावात साठवलेल्या होत्या. या गावात नात्यागोत्याचे, दाट ओळखीचे, जिवाभावाचे माणसं राहत होते. म्हणूनच या गावावर खूप प्रेम बसलं होतं.

पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की, खेड्यात झाडून सारेच लोक मागासलेल्या जातीचे ! हेच खेड्यातील लोकांचं खरं दुखणं होतं. हे लोक शहरातील लोकांना आयतं अन्न पुरवितात, पण स्वत: मात्र मुंग्या-माकोड्यासारखे मरमर काबाडकष्ट करुन जीवन जगतात, बिच्चारे…! परिस्थितीने गांजल्यामुळे या लोकांची हक्काची जाणीव बोथट झाली होती.

दुसरं असं की एकही उच्चवर्णीय व्यक्ती शेतमजूरीच्या कामावर जातांना दिसत नाही. म्हणूनच खेड्यांचा विकास व दारिद्रय निर्मुलनाला कोणतेही सरकार का प्राधान्य देत नाही, याचा उलगडा होतो. खेड्यापाड्यात जर उच्चवर्णीय समाज राहीला असता व तो जर असा दारिद्रय आणि दु:खात खितपत पडलेला दिसला असता तर खेड्यातल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने निश्चितच प्रयत्‍न केल्याचे चित्र दिसले असते. कारण ती त्यांची गरज असती. नाही का?

उलट शहरातील हे उच्चभ्रू लोक खेड्यातील गरिबांना कामचुकार, आळशी, दारूबाज असे नावे ठेवून ते गरीब का याचं उत्तरं देतात. या लोकांनी एखादं वर्ष तरी या लोकांसारखं न कंटाळता जीवन जगून पाहावं म्हणजे गरिबीच्या वेदना काय असतात ते कळेल ! ज्याचं जळतं त्यालाच कळतं ! बाळंतिनीच्या कळा या वांझोट्यांना काय माहिती?

तेच तेच काम घाणीच्या बैलाप्रमाणे करावे लागत असल्याने, त्यात काय उत्साह असणार? ना त्यात नावीन्य, ना नवनिर्मितीचा आनंद, ना कामाचा उचित मोबदला, ना त्यांच्या कामाचा उत्पादन व्यवस्थेशी जुळलेला संबंध व त्यामुळे आलेली विरक्ती हे काही कारणे आळशी असण्यामागे दडले असू शकतात. ह्या गोष्टी शहरी लोकांना नाही कळणार ! रात्रंदिवस हिवादवात, पाण्यापावसात, उन्हातान्हात मरमर काबाडकष्ट करीत असल्याने आलेला शिणभाग भागविण्यासाठी, तसेच अस्वच्छ वातावरण, अनुचित संस्कार, अशिक्षितपणामुळे दारूच्या व्यसनांना सहज बळी पडत असतील तर त्यांना कितपत दोष देता येईल? उचित संस्काराच्या अभावामुळे त्यांच्या आयुष्याच्या इमारतीला भक्कमपणा येणार तरी कसा? ‘जावे त्यांच्या वंशा’ म्हणजे कळायला वेळ लागणार नाही !

माझ्या या गावाचं असं ओंगळवाणं रुप नष्ट होऊन टूमदार शहरासारखं विलोभनीय रुप कधीतरी बहाल होईल का, कोण जाणे…?

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: