मी आणि माझ्या आठवणी


कथा तिसावी  –  भांडणाच्या वाटेला जाऊ नको…!’

 

मी घरी अभ्यास करत असतांना लभानाचा मुलगा आला. त्याने पाटलाने बोलाविल्याचा निरोप दिला. केशव पाटील बंजारी समाजाचा… तांड्यात त्याचा वाडा होता. मी वाड्यात पाय टाकला तेव्हा  लहानपणची आठवण ताजी झाली. एकदा आईचा पदर धरून येथे आलो होतो. त्यावेळी अंगणात ज्वारीचा पेव होता. त्याच्या आईला माझी आई म्हणाली,

‘कुडवभर ज्वारी देवं बाई…’

‘हो. देते… थांब जराकशी…’

तिचा गडी पेवात घुसून गंगाळात ज्वारी घेऊन आला. त्याने आईने पसरलेल्या फडक्यात ज्वारी मोजून दिली. आईने गठुडं बांधून डोक्यावर घेतलं आणि घरी आलो. या आठवणीचा चित्रपट डोळ्यासमोरून झर्रकन सरकून गेला. मी भानावर आल्यावर अंगणात बाजीवर खाकी वर्दीतला पोलिस बसलेला दिसला. त्याच्या बाजीवर वेताची काठी व पिशवी पडलेली होती.

‘तूच, का रे रामराव?’ असं तो म्हणाल्यावर मी मान हालवली.

‘तुझ्या नावाने समन्स आहे. तू भांडणात होता, ना? म्हणून तुला कोर्टात यायचे आहे.’ असे म्हणून त्याने कागद दिला. मी घरी जायला वळत नाही तर तो म्हणाला, ‘अरे थांब, मला दारुची शिशी आणून दे.’

दारु आणि पोलिस असं विसंगत सुत्र पाहून मी अचंबित झालो. मी कुतूहलाने त्याच्याकडे ‘आ’ वासून थोडावेळ पाहातच राहिलो. मनात म्हटले, ‘पोलिसदादा, तुम्ही पण?’       पाटलानेही कसनुसं तोंड केलं. कदाचित शिकलेल्या पोराला असे घाणेरडे काम सांगणे त्यालाही आवडले नसावे. माझी संभ्रमीत अवस्था पाहून म्हणाला,

‘काका आहे ना घरी?’ माझ्या बाबाला तो काका म्हणायचा.

‘हो.’

‘त्याला सांग. तो देईल आणून.’

मी घरी आलो. बाबा भजे बनवीत होता. तो वाघाडीच्या धरणावर काम करणार्‍या लोकांसाठी भजे विकायला घेऊन जात असे.

‘मला समन्स आला. पोलीसाने दारुची शिशी आणायला सांगितली. मी काय करु?’ बाबाला विचारले.

‘त्याने पैसे दिले नसेलच. फुकटात पाहिजे लेकांना. हरामखोर कुठले !’ बाबाने त्याला शिवी हासडली. त्याचा हात भज्याच्या चुणाने भरलेला होता. त्यामुळे तो जाऊ शकत नव्हता. म्हणून मला म्हणाला,

‘सुखदेवच्या घरी जा. त्याला सांग, बाबाने दारुची शिशी मागितली म्हणून. देईल तो.’

सुखदेवकाकाचं नाव घेतल्याबरोबर मला ती काळिज पिळवटून टाकणारी घटना आठवली. मिरगाची चाहूल लागण्यापूर्वीच कास्तकारांनी वावराच्या आंतरमशागतीचे बहुतेक कामे आटोपते घेतले होते. पेरणीचे सारी कामे जवळपास उरकण्याची धांदल उडाली होती. ‘खांद्यावर जुपनं न् उभ्यांनच मुतनं’, अशी त्यांची अवस्था झाली होती. पावसाचे टपोरे थेंब उन्हाने तप्त झालेल्या मातीला सुखावून टाकल्यावर इवली इवली रोपटे डौलाने उभी राहिले होते. अशावेळी खेड्यात सहसा दिवसा कोणी दिसत नाहीत. दिवसभर वावरात राहत. मग गावातले लहान-सहान पोरं बेवारसपणे कुठेतरी भटकत.

त्यादिवशी सूर्य बुडाला. तरीही सुखदेवकाकाचे प्रकाश व सिध्दार्थ असे दोन मुले घरी आले नव्हते. ते दोघेही हारोपाठी जन्मलेले सहा-सात वर्षे वयाचे होते. त्यांना शोधण्यासाठी कंदील व बॅटर्‍या घेऊन माणसं पांदणीने व वावरात जाणार्‍या रस्त्याने फिरत होते. ‘प्रकाशऽऽ, सिध्दार्थऽऽ’ असे जोरजोराने हांका मारीत होते. आम्हीपण पोरं त्यांच्या मागेमागे काही दूरपर्यंत जाऊन परत फिरलो होतो. पण त्या रात्री त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

नानाचं पांढरीकडे जाणार्‍या रस्त्याने बदाडात डूंगं होतं. त्यात पेरलेल्या धानाचे सुईसारखे कोंब उगवून वर आले होते. त्यात विहिरा होता. विहीर्‍यात हात पुरतं पाणी होतं. सकाळी श्रावणची बायको, सुभद्रा पाणी नेण्यासाठी आली. ती जवळ गेल्यावर जोराने किंचाळली. तिला दोन्हीही मुलांचे निर्जिव देह पाण्यावर तरंगत असलेले दिसले. ती तशीच घाईघाईने भीतीने बावरलेल्या अवस्थेत गावात आली. रस्त्यात भेटेल त्याला सांगत सुटली. ही बातमी वार्‍यासारखी गावात पसरली. सारा गाव पाहायला लोटला. मीपण धावत-पळत गेलो. पोरांचा बाप अन् आई रडत-भुकतच आले. आपल्या पिल्ल्यांना डोळाभर पाहून त्यांचं काळीज फाटलं.

‘माह्या चिमण्यांनो, कावून येथे झोपलात रे…’ असे म्हणून माऊलीने हंबरडा फोडला. विहीर्‍याभोवती कुजबुज करणारी गर्दी एकदम स्तब्ध झाली. सर्वांच्या नजरा त्या हंबरड्याकडे वळल्या.

‘रातभर पाण्यातच होते, का रे… कावून घरी आले नाहीत रे… आम्ही किती वाट पाहत होतो रे…’ असे तिचे कारुण्यांनी ओतप्रोत भरलेले शब्द आमच्या कानावर आदळल्याने काळीज गलबलून आलं. मग सार्‍यांनी एकच गलका केला. आपल्या दाटलेल्या हुंदक्याला सर्वांनी वाट मोकळी करून दिली. सारा परिसरच रडत असल्याचे जाणवत होते. काही बायांनी तिला कवटाळून धरले. तरी ती आगुटत नव्हती. न जाणो ती विहीर्‍यात उडी मारेल, काय सांगता येते? अशी भीती वाटत होती. बाप कसातरी सावरला. माणसाचं मन कठोर पण बायांचं मन नाजूक… कसेतरी बायांनी तिला धरून घरी घेऊन गेलेत. यवतमाळवरुन पोलिस येईस्तोवर दोघेही त्याच अवस्थेत विहिरीत पडून होते. पोरांचा बाप दूर गुडघे मोडून एकाठिकाणी बसला होता. कधी मान वर करून दगडासारखा एकटक शून्यात पाहत होता तर कधी गुडघ्यात डोकं खुपसून हुंदके देत होता. रडून रडून त्याच्या डोळ्यातील पाणी आटून गेलं होतं. त्याचं सांत्वन करण्याचं कुणामध्येही बळ उरलं नव्हतं.

त्या पोरांचे मरण पाहून आई-बापाला काय वाटलं असेल, कल्पनाही करवत नाही ! त्यांच्यावर नुसतं आभाळ कोसळलं. त्यांचा आर्त टाहो आणि आक्रोश पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाही. शेवटी लोकांनी कितीही सहानुभूती दाखविली तरी ज्यांचं दु:ख त्यांनाच सोसावे लागते ! ते दृष्य अगदी मन हेलावणारं होतं. सारं वातावरण सुन्न झालं. वारा पण ते भयावह दृष्य पाहून थबकला होता. झाडा-झुडपांनी पानांची हालचाल बंद केली होती. सारा परिसर दु;खमग्न झाल्याचा आभास निर्माण झाला होता. एकंदरीत स्मशान शांतता पसरली होती.

दोघाही भावांचे शव एकमेकांच्या हातात हात घालून उबडे पाण्यावर पडले होते. त्या चिमण्या जीवांची एकमेकांवरील निरागस माया पाहून सर्वांना भडभडून आले. त्यांचे निष्पाप, खोडकर, खेळकर जग कायमचं निस्तब्ध झालं. त्यांचे कान कुरतडलेले होते. बहुतेक खेकड्यांनी खाल्ले असावे. पाण्यात पळसाच्या पानाचे डोणे पडले होते. कोणी म्हणत, चकव्याने ढकलले असावे. कोणी म्हणत, पाणी प्यायल्या गेले व घसरले असावे. असे तर्कवितर्क लोक करीत होते. नंतर कळले की त्या पोरांसोबत माझा मामेभाऊ मनोशोधन व मावस बहिणीचा मुलगा नाना पण होता. हे पोरं भद्या लभानाच्या वावरात जांभळं खायला गेले होते. आम्हीही पोरं असेच त्याच्या वावरात जांभळं खायला जात होतो. लहान असतांना या पोरांसारखे हिंडगोडे होतो.

ते सांगत, ‘आम्ही नानाच्या वावरापर्यंत आलो. तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी पळसाचे डोणे घेऊन विहिर्‍यावर आलो. सिध्दार्थ वाकून डोण्याने पाणी घ्यायला गेला. तसाच तो घसरला व पडला. तो दादाऽ दादाऽऽ ओरडत पाण्यात गटांगळ्या खात होता. म्हणून त्याचा मोठाभाऊ, प्रकाश ह्याने वाकून त्याचा हात धरल्याबरोबर तोही पडला. दोघेही बुडायला लागले. ते पाहून आम्ही पार घाबरलो व तेथून पळ काढला. पण ही गोष्ट त्यादिवशी कुणालाही सांगायची हिंमत झाली नाही.’

पोलिस आल्यावर पंचनामा करुन त्यांची प्रेते बाहेर काढण्यात आली. बैलगाडीत लिंबाच्या डहाळ्या तोडून टाकण्याचे काम आम्ही पोरं करत होतो. दोन्हीही प्रेते यवतमाळला चिरफाड करण्यासाठी घेऊन गेलेत. तेथेच स्मशानात गाडून परत आलेत. बरेच दिवसपर्यंत सारा गाव हळहळला होता.

ते दृष्य डोळा भरुन पाहिल्याने, रात्री मला झोप आली नाही. डोळे मिटले की तेच दृष्य डोळ्याच्या चक्षूसमोर उभं राहायचं. रात्रीला बाहेर पडायला भीती वाटायची. कित्येक दिवसपर्य़ंत त्याची भयानकता काही केल्या डोळ्यासमोरुन दूर होत नव्हती. हा प्रसंग माझ्या डोळ्यातून हृदयात शिरला आणि तेथेच रुतून बसला. आजही तो हृदयदावक प्रसंग आठवला की अंगावर शहारे उठल्याशिवाय राहत नाही.

याच आठवणीच्या तंद्रित असतांना मी काकाच्या घरी पोहोचलो. तो त्यावेळी मोहाची दारु काढून विकण्याचा धंदा करत होता. त्याच्या घरी कोणीतरी गिर्‍हाईक बसला होता. मी त्याला म्हटले,

‘बाबाने दारुची शिशी मागितली.’ तो घराजवळील शेणखताच्या उकंड्यावर गेला. त्यातून हिरव्या रंगाची मोठी काचेची शिशी बाहेर काढली. शिशीला पळसाच्या पानाचे बूच लावले होते. त्याला चिकटलेलं शेणखत हाताने पुसत माझ्याकडे दिली. मी शिशी घेऊन पाटलाच्या घरी गेलो. तो पोलिस माझीच वाट पाहत होता. त्याने माझ्या हातातली शिशी घेतली.

‘तारखेवर हजर राहशील.’ ताकीद दिल्यासारखा मला म्हणाला.

‘हो.’ मी म्हणालो.

मी त्यादिवशी लोकांबरोबर तहसील कोर्टाच्या आवारात लिंबाच्या झाडाखालच्या दगडावर बसून पुकार्‍याची वाट पाहत होतो. झाडाने पाना-फांद्याची छत्री उभारून बसलेल्या लोकांसाठी सावली केली होती. तरीही काही निसटलेले सूर्याची गरम किरणे आमच्या अंगावर पडतच होते. जस-जसा वेळ होत होता, तस-तसा माझा जीव वरखाली होत होता. वाट पाहता पाहता कंटाळून गेलो होतो. तेथे बसलेले एकेक माणसं आवारातल्या हॉटेलमध्ये जात, चहा-भजे खाऊन, बिडी ओढून परत येऊन बसत. भांडणाच्या वेळेस एकमेकांचे वैरी आता आपसात मिसळलेले दिसत. दरवाज्याच्या आत स्टुलावर बसलेला चपराशी उठून उभा झाला की कान टवकारून त्याच्याकडे पाहत होतो. आतमधला बाबू आरोपींचे नावे सांगत होता व चपराशी धारदार आवाजाने पुकारा करतांना परिसर दणाणून टाकत होता. शेवटी बर्‍याच वेळाने आमच्या नावाचा पुकारा झाला; तेव्हा सारेजण लगबगीने उठून आतमध्ये गेले.

तहसीलदारसाहेब खुर्चीत बसले होते. त्यांच्या बाजूला बाबू आणि टेबलवर टाईपिंग मशीन होती. आम्ही सारेजण एका रांगेत उभे राहिलो. साहेबांनी आम्हा सर्वांना निरखून पाहिले.

‘तूझे नाव काय रे?’ माझ्याकडे डोळे रोखून विचारले.

‘रामराव.’

‘पूर्ण नाव सांग.’

‘रामराव कोंडूजी जुमळे.’

‘काय करतो?’

‘शिकत आहे.’

‘कोणत्या वर्गात?’

‘बी.कॉम पार्ट टू ला.’

‘तूपण भांडणात होता काय?’

‘नाही साहेब. भांडण सोडवत होतो.’

‘भांडण सोडवत होता… म्हणजे नेमकं काय करत होता?’

त्यादिवशीची हकिगत माझ्या डोळ्यासमोर तरळली. गावात सुधारण्याचा दुष्काळ पण भांडणाचा सुकाळ होता. काहिना काही झगडा, धतिंगपणा अधुनमधून सुरु राहत असे. काही लोकांना त्याशिवाय करमतच नव्हतं की काय, कोण जाणे? थोडं बाचाबाची, तोंडा-तोंडी, हमरी-तुमरी झाली, की तंटा-बखेडा कधी उभा होईल, त्याचा नेम नसे. मग दात-ओठ खात, ओटे खोचून, ‘चाल ये बेऽऽ, तुह्या बईण-मायची तं… जास्तच अंगात आली का रे, भोसडीच्या. तुही जिरवु का?’ अशी तोंडाची चक्की सुरु होत होती. जीभ ही दोन-तीन इंचाची खरी, पण पाच-सहा माणसाला झोडपण्याची तयारी ठेवत होती, हे त्यावेळी मला अनुभवास आलं. भाडणाला जोर चढला की विचारुच नका ! जे हातात सापडेल, मग दगड-गोटा असो, की कुपाट्याची बल्ली असो, ते घेऊन दुय्यम सामना सुरु होत असे. तसं आमच्या गावामध्ये दगड-गोट्याला काही वान नव्हती. हात लावाल तेथे दगडं मिळत. बंदुकीच्या गोळ्यासारखे हे दगडं काम करीत. त्यामुळे आमच्या गावाला ‘भानगोडं चौधरा’ म्हणून चारी दिशेला ओळखल्या जात होतं. भांडण फक्त बौध्दपुर्‍यातच होत होतं, असं नाही. तर लभानतांड्यातही होत होतं. त्यांच्यातही दोन पार्ट्या होत्या. एक हरसिंगची व दुसरी कमलूची ! दोघांमध्ये विस्तव जात नव्हता.

ज्यादिवशी गावात भांडण झालं, तो दिवाळीचा दिवस होता. त्यादिवशी सगळीकडे उत्साहाचा माहोल होता. नुकताच गायक्याचा लवाजमा घरी येऊन गेला. सूर्य डोक्यावरुन खाली कलला होता. आम्ही जेवायला बसलो. रोज खायला न मिळणारा भात नव्हाळीसारखा त्यावेळी होता. ऎरवी आमच्या रोजच्या जेवणात भाकर असायची. गव्हाची पोळी, भात हे आम्हाला सणासुदिला किंवा बाजाराच्या दिवशी खायला मिळत. त्यादिवशी जेवणात पुरणपोळी… सोबत खमंग भजे… पुरणपोळी व साजूक तुपाचा सुवास नाकात घुमला होता. आणखी कढीचा फुरका… असा तो जेवणाचा मस्तपैकी बेत होता. शिवाय चकल्या, करंज्या, अनारसे असे कितीतरी पदार्थ होते. त्यादिवशी घरोघरी असाच गोडधोड जेवणाचा आस्वाद लोक घेत होते. एक-दोन घास तोंडात गेला असेल-नसेल, तर बाहेर कल्ला ऎकू आला. भांडण सुरु झाले याचा तो संकेत होता. नेमकं गावामध्ये सणासुदिलाच भांडण उभं राहत होतं.

‘भांडण पेटलं वाटते. मी जाऊन पाहतो. तुम्ही कोणी बाहेर येऊ नका. रामराव, तू येऊ नको. भाडणात दगडं मारतात.’ दादा म्हणाला. दादा भरल्या ताटावरून न जेवता तसाच उठला.

‘अरे शामराव… जाऊ नको. त्यांच्या भांडणात पडू नको. पहिले जेऊन घे.’ आई म्हणाली.

‘मां, भांडण सुरु झालं… वाईट लवकर पसरतं, पाण्यात थेंब पडल्याप्रमाणे ! चांगलं पसरायला वेळ लागतं. त्यामुळे मला गेलंच पाहिजे.’

‘जाऊ देणं… तुला काय करायचं. तोंडाच्या बाता अन् ढुंगण खाये लाथा, अशी त्यांची गत आहे.’ आई दादाला काकुळतीनं समजावत म्हणाली.

‘नाही मां, कुणाचा मुडदा पडला की निस्तारायला मोठा त्रास होतो. तू काळजी करू नकोस. जातो मी…’ दादा गावाचा सरपंच असल्याने त्याला राहवलं नाही. तो बाहेर गेल्याने आम्हालाही काळजी वाटायला लागली. म्हणून आम्ही पण जेवण अर्धवट टाकून दमडूमामाच्या घराजवळ आलो.

पांदणीने गोटमार चालू होती. अलीकडून रामधन गटाचे तर पलीकडून श्रावण गटाचे लोक एकमेकांवर दगडं  फेकत होते. आई-बहिणीवर शिव्या देत होते. दोन्ही बाजूने जोरात धुमचक्री चालू होती. जणू काही दोन राष्ट्राच्या सैनिकामध्ये लढाई सुरु आहे की काय, असंच ते दृश्य होतं. मधात दादा उभा होता. तो हातवारे करुन दगडं मारु नका; म्हणून ओरडून सांगत होता. त्याला दगडं लागतील, म्हणून आम्ही घाबरलो होतो. ‘हल्याच्या टकरीत वावराचा नास’ म्हणतात, तशीच दादाची गत झाली होती. तेवढ्यातच सुखदेव हातात कुर्‍हाड घेऊन पळत येत होता. तो माझाच दोस्त… त्याला मी अडविले. त्याच्याजवळची कुर्‍हाड हिसकाऊन मामाच्या आवारात फेकून दिली.

थोडयावेळाने अंधार पडल्यावर दोन्ही बाजूची गोटमार मंदावत गेली. मग एकमेकांच्या तक्रारी पोलिसपाटलाकडे केली. त्याने पोलिसठाण्याला रिपोर्ट पाठविला. पोलिसांनी दोन्हीही पार्ट्यावर गुन्हा नोंदवीला. माझा काहीही गुन्हा नसतांना मलाही गोवण्यात आलं. अशी सारी कहाणी सविस्तरपणे मी तहसीलदाराला सांगितली.

‘हो साहेब… हा माझा लहान भाऊ… मी गावाचा सरपंच… तो भांडणात नव्हता. तो कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याला विनाकारण भांडणात गोवण्यात आले,’ दादाने काकुळतीने स्पष्टीकरण दिले.

‘अस्सं काय…?’ तहसीलदारांनी इतरांकडे जळजळीत नजर टाकली आणि गरजले.

‘कोणी टाकले या पोराचे नाव?’ कोणी काहीच बोलत नव्हतं. दाभणाने तोंड शिवल्यासारखे सारेच चिडीचूप झाले होते. कळीचा नारद कोण? ते सगळ्या गावकरुंना चांगलं माहित होतं. पण तोंड उघडून दुश्मनी घ्यायला कोणी तयार नव्हतं. तो आडनावाप्रमाणे आग लाऊन नामनिराळा राहत होता. ‘ज्वारीच्या तासात जाईल, पण पान लागू देणार नाही.’ असा त्याचा स्वभाव होता.

‘काढून टाका याचं नाव. तुम्हाले काही कळते की नाही? मुर्ख आहात का तुम्ही? तो कॉलेजमध्ये शिकत आहे. तुमच्या भांडणामूळे रेकॉर्ड खराब झालं; तर नोकरी मिळणार नाही, त्याला..!. याचा तुम्ही विचार केला नाही. अरे, गावातील एका मुलाला नोकरी लागली, तर सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. पण तुम्ही तर त्याच्या मार्गात काटे पेरायला लागले. हे बरोबर आहे का?’ तहसीलदार एकदम भडकले. सारेजण त्यांचे विखारी बोलणे ऎकून खजील झाले. ‘एकाची करणी व सर्वाला भरणी’ असं म्हणतात, ते खरं आहे. ‘भांडणात वाळल्याबरोबर ओलंही जळतं’ अशी माझी गत झाली.

दोन्ही पार्ट्यामध्ये तहसीलदाराच्या वयापेक्षा जास्त वय असलेले लोक होते. ‘शहाण्याला शब्दाचा मार’ म्हणतात, त्याप्रमाणे तहसीलदार त्यांच्या इज्जतीचा पार चेंदामेंदा करत होते. माझे नाव विनाकारण गोवल्याने सपशेल तोंडघशी पडल्याचे भाव त्यांच्या मलूल पडलेल्या चेहर्‍यावरुन दिसत होते. तहसीलदाराने खडे चारल्याने त्यांचा नक्षा पार उतरून गेला होता.

‘जा… अर्जनविसकडून अर्ज लिहून आण व त्यावर ज्यांनी तुझ्या नावाचा रिपोर्ट केला, त्यांच्या सह्या घेऊन मला दे.’ मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे अर्ज लिहून व सह्या घेऊन त्यांच्या टेबलवर ठेवला.

‘जा आता. यापुढे तुला कोर्टात यायची गरज नाही. तुला नोकरी करायची आहे ना?’

‘हो साहेब.’

‘मग लक्षात ठेव. यापुढे तू भांडणाच्या वाटेला जाऊ नको. त्यामुळे तुला नोकरीसाठी अडचण येईल. चांगला अभ्यास कर व मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळव. माझ्या शुभेच्छा आहेत तुला…!’

‘हो साहेब.’

बाहेर येऊन दादाची वाट पाहत बसलो. खरोखरच, माझं धूसर होणारं भवितव्य त्यांनी वाचविलं. म्हणून मी त्यांचे मनात खूप आभार मानले. असेही सहृदय अधिकारी प्रशासनात असू शकतात, याची जाणीव झाली !  प्रत्येक घटनेनंतर काही ना काही शिकायला मिळतेच, हे खरंच आहे ! तेव्हापासून मी भांडणाच्या थोड्याशाही धगीपासून चार हात दूर राहत होतो. कारण त्यावेळी तहसीलदाराचं वाक्य मला नेमकं आठवायचं, ‘यापुढे तू भांडणाच्या वाटेला जाऊ नको.’

तरीही मी एका बिकट प्रसंगात सापडलो होतोच ! संध्याकाळ होत आली. पाखरांची किलबील मंदावत होती. गाई-ढोरं गावात येत होते. वावरात गेलेल्या बाया माणसांची घरी येण्याची वेळ झाली. त्यावेळी सहजच मी आवाराच्या कवाडाला टेकून ऊभा होतो. मी नेहमीच विरंगुळा म्हणून चौकटीला हात धरुन उभा राहत होतो. बाहेर जाणार्‍या-येणार्‍यांना पाहत राहण्यात मोठी उत्कंठा वाटायची. त्यात माझं मन रमत होतं. कोणीतरी मला विचारायचा,

‘कधी आला, रामराव?’

‘थोडावेळ झाला.’ असं त्यांना सांगितल्यावर मला बरं वाटायचं.

त्यावेळी सुरेभानकाका माझ्या समोरुन घामाघूम होऊन उन्हातून आलेल्या कुत्र्यासारखा धापा टाकत पळत गेला. त्याच्या मागोमाग किसनदादा बैलाच्या मागे लागल्यासारखा हातात दगड घेऊन धावत आला. ते दृष्य पाहून माझ्यात काय विरश्री संचारली, कुणास ठाऊक? मी त्याचा हात पकडला आणि हातातला दगड झटका देऊन खाली पाडला. शिकार्‍याच्या हातून शिकार निसटून गेली, म्हणजे कसा बावरतो ! तसाच तो वाटला. तो रागाने लालबूंद झाला. माझ्यावर डोळे रोखत, माझे मनगट त्याने करकचून धरले.

किसना धडधाकड तरुण होता. व्यायामाने शरीर कसलेलं होतं. मनगटं पिळदार होते. तो वाघासारखा रुबाब दाखवायचा. कधी खुशीत असला की त्याच्या कोठ्यात बसून आम्हाला वाघाचे चित्र काढून दाखवायचा. तो खरंच, दिवाळीच्या दिवशी वाघ बणायचा. आपल्या उघड्याबंब शरिरावर पट्टेदार, ढाण्या वाघासारखा रंग, मिशा व शेपटी लाऊन मिरवायचा. तेव्हा त्याचा हा खेळ पाहून आम्ही रोमांचित होत होतो.

तसा तो मला फार मानायचा. त्याच्या दृष्टीने मी गावात एकटाच मोठं शिक्षण घेत असल्याने, तो माझं कौतूक करायचा. तो बाबाच्या चुलत नात्यात लागत होता. पण आता त्याचं मला वेगळच रौद्र रुप पाहायला मिळालं. मी पुरता त्याच्या कचाट्यात सापडलो होतो.

‘तू माझा हात का धरलास?’ असा दरडावून म्हणाला. त्याला काय उत्तर द्यावे, ते सुचत नव्हतं. मी पार गांगरुन गेलो. आता माझी खैर नाही. ‘आ बैल, मुझे मार’ याप्रमाणे मीच हे संकट ओढवून घेतलं ! सुरेभानकाकाला मदत करणं दूरच. धर्म करता कर्म उभं राहिलं. मला दरदरून घाम फुटला. असं म्हणतात, की संकटाच्या काळात माणसाची खरी शक्ती प्रकट होते. एखादं भुंकणारं कुत्र मागे लागलं की अंगात जोर नसलेला हडकुळा माणूस सुध्दा जिवाच्या आकांताने धूम ठोकतो, तसंच काहिसं झालं.

पुन्हा माझ्या अंगात कोणतं वारं शिरलं, काय माहित? सारं बळ एकवटून त्याच्या हाताला असा काही हिसका मारला, की मी अलगद त्याच्या तावडीतून निसटलो. बर्‍याच वेळपर्यंत धापा टाकत घरात निमुटपणे बसून राहिलो. त्यावेळी मला वाचविणार्‍या त्या तहसीलदाराचे शब्द माझ्या कानावर आदळले, ‘यापुढे तू, भांडणाच्या वाटेला जाऊ नको…!’

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: