मी आणि माझ्या आठवणी


कथा एकोणतिसावी – भीक मांगण्याचा धंदा

 

त्याच्या आवाजाने माझं डोकं ठणकलं. ‘धरम वाढा. ओ माय…’ असे म्हणत घरात डोकावून पाहायला लागला. मला त्याचा रागच आला. मी म्हटले,

‘एवढा धडधाकड आहेस, दादा… कशाला भीक मागतोस? काम-धंदा करुन पोट भरत जा… ना… असं म्हणून मी त्याला हाकलून लावलं.

तो मुकाट्याने कुरुकुरु चालायला लागला. तो गेल्यावर माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. त्याचं मन दुखविल्याने माझ्याच मनाला जखमा झाल्या. असं बोलायला नको होतं, त्याला ! भीक मागणं हा त्याचा धंदा. मी बोलून काय उपयोग? माझ्या बोलण्याने तो थोडाच धंदा सोडून देणार? माझ्या चेहर्‍यावर क्षणभर अपराधीपणाच्या छटा उमटल्या. मला अस्वस्थ वाटत होतं.

ह्या किंगरीवाल्या प्रमाणेच आमच्या गावात अनेक प्रकारचे भटके लोक आपापल्या धंद्याचे, पारंपारीक लोककलेचे, संस्कृतीचे रुपं घेऊन पोट भरण्यासाठी येत. त्यांच्या येण्यामुळे रखरखणारे गाव भरल्यासारखे वाटायचे. त्यात भराडीशिवाय, गोसावी, बहरुपी, गोरखनाथ, अल्लकनिरंजन, पांगूळ, दरवेश, मदारी, पंचाळ, मसणजोगी, नंदिवाले, म्हाली, मनेरीवाला, कसार, गोंदवणारे, सरोदी, ओढरीनी, म्हसी भादरणारे मांगगारुडी, पारधी-पारधीनी, ठावे बणविणारे सरदार असे कितीतरी जण असायचे.

केसाच्या जटांचा बुचडा बांधलेला, नुसतं कमरेला गुंडाळून बाकी उघडाबंब असलेला, कानात बाळ्या घातलेला, कपाळावर-खांद्यावर-पोटावर-पाठीवर राख फासलेला, मण्याच्या किंवा कोणत्यातरी झाडांच्या फळांनी ओवलेल्या हातभर माळा गळ्यात घातलेला, असा गोसावी-बैरागी येत. काही गोसावी घोळदार भगव्या रंगाचे कफनी घातलेले, बोकड्यासारखे केसं व दाढी-मिशा वाढवलेले, दंडावर व कपाळावर भस्माचे आडवे पट्टे काढलेले, गळ्यात रुद्राक्षाची माळा घातलेले असत. काही गोसाव्यांकडे किंगरी राहायची. ते किंगरीच्या सुरात गाणी म्हणत. कोणाकडे शंख असायचा. त्यांना भीक वाढली की मोठ्याने शंख फूकत. काही नुसतेच रस्त्याने जात, तर काही दारावर येत. काही हात पाहून भविष्य सांगत. जातांना जमा झालेले दाळ, धान्य कुणाला विकून टाकत.

उन्हाळ्यात पंचाळाचं बिर्‍हाड यायचं. प्रपंचाचं सामान, कोंबड्या व पोरं गध्याच्या पाठीवर टाकून आणत. गावात येणार्‍या पंचाळाला दोन बायका होत्या. एक बायको ऎरणीवर घण मारायची तर दुसरी स्वयंपाक-पाणी करायची. दोन बायकांमुळे पोरांचे लेंढार वाढले होते. तो रागावला की बायकां-पोरावर जोराजोराने कातावीत होता. आमच्या घरासमोरील देवळाजवळ त्याची पाल असल्याने त्यांची आरडा-ओरड, भांडण आम्हाला घरुनच ऎकू येत. दोन बायकांना सांभाळणे किती जिकिरीचे काम आहे, हे त्याच्याकडे पाहून लक्षात यायचं. तो शेतकर्‍यांना उपयुक्त असलेले विळे, वखरं-डवराच्या फासी, कुर्‍हाडी, किकरं, पटास, वासला इत्यादि लोखंडी साहीत्याला पाजविण्याचे व गाडीच्या येटाला पाणी देण्याचे कामे करायचा. तो निघून गेला तरी त्याची ओळख काही दिवस राहत होती. पालातली सारवलेली जागा, त्याच्या भोवताल घातलेलं मातीचं आळं, पालाला ठोकलेल्या लोखंडी सळाखीचे दरं, ऐरणीचा खड्डा, गाडीच्या येटाला गरम करण्याची जागा इत्यादी जसं जखम बसली तरी त्याची चोंद दिसते, तसंच वाटायचं. तो पंचाळ आला, की बाबा त्याला ‘काय देवा, आलात.’ असे म्हणायचे. बाबा कुणाशीही संवाद साधतांना, ‘काय देवा, कसं काय चाललं’ असा म्हणायचा.

गावात हप्त्यामध्ये एकदातरी काखेत धोकटी घेऊन म्हाली यायचा. तो काळाकट, उंचा-पुरा, दणकट बांध्याचा, मळकट सदरा घातलेला व फाटलेल्या चिंध्याचं धोतर नेसलेला, दाढी वाढलेली, डोक्याचे केस पिंजारलेला असायचा. त्याच्याकडून मी कटींग किंवा टक्कल करुन घेत होतो. दादा, बाबा पण दाढी-कटींग करुन घेत. तो आल्याबरोबर धोकटीतून कळकटलेली वाटी काढून माझ्यासमोर धरायचा. मी कोमट केलेलं पाणी आणून द्यायचो. लगेच तो मला खांद्यापासून ते मांडीपर्यंत त्याच्या मळकटलेल्या फडक्याने झाकून टाकायचा. मग बाबासोबत त्याच्या इकडल्या-तिकडल्या गोष्टी काम होईस्तोवर संपत नसे.

गावात मोरपिसाची टोपी घालून वासुदेव यायचा. त्याला दान दिले की ’गुरुदान पावले, देवा… दान पावले’ असं एका पायावर नाचू नाचू म्हणायचा. बाया सुपात ज्वारीचे धान्य दान द्यायला आले की त्याचा सोबती घरच्या माणसाचे नाव विचारुन घ्यायचा. मग तो खाणाखूना करुन झाडावरच्या सोबत्याला सांगायचा; तेव्हा तो झाडावरचा जोराने नावाचा उच्चार करून दान पावलं, म्हणायचा.

नंदीबैलवाला गळ्यात अडकविलेल्या ढोलकीला कमानदार काडीने गुबूऽ गुबूऽऽ वाजवत नंदीला घेऊन यायचा. नंदीच्या पाठीवर मस्त रंगीबेरंगी झूल, झुलीला घुंगरू, गळ्यात घंटा, सिंगाला रंगीत रिबीन, कपाळ हळद-कुंकवाने भरलेलं, पायाच्या घोट्याजवळ रंगीत कापड बांधलेलं असा सजवलेल्या नवरदेवासारखा थाट वाटायचा. त्याच्या गळ्यातील घंटाचा आणि घुंगराचा आवाज नाजूक आणि मोहक वाटायचा. तो माझ्या घराजवळील रिकाम्या जागेत ठाण मांडायचा. ढोलकीचा आवाज ऐकून सारेजण जमायचे. मग तो नंदीबैलाचा खेळ दाखवायचा. त्याच्या ढोलकीच्या तालावर नंदी मान डोलायचा. नंदी त्याच्या अंगावर पाय ठेऊन नाचायचा. कुणाचं कुडतं, शेला, धोतराची ओळख सांगितल्यावर नंदीबैल त्या व्यक्तीजवळ जायचा. मग तो नंदीला घेऊन घरोघरी फिरायचा. घरवाल्या बाया नंदीच्या पायावर पाणी टाकून, कपाळाला हळद व कुंकू लावून ओवाळत. नंदीला नैवद्य चारत, सुपात आणलेलं धान्य झोळीत टाकत. ‘माह्या लेकराला सुखी ठेव.’ असं काहीतरी म्हणत. नंदीने मान हलवल्यावर त्या सुखावून जात.

बहरुपी विविध सोंग घेऊन गावात यायचा. कधी हनुमानासारखं तर कधी पोटात सुरी खुपसून यायचा. तो पोलिसाच्या वेशात आला की तो पोलिस आहे की बहुरूपी आहे हे लक्षात येत नसे. कुणाला धाक दाखवून घाबरवून सोडायचा. त्यांचा रडवेला चेहरा पाहून बहुरूपी म्हणायचा, ‘मी खरोखरचा पोलिस नाही. बहुरूपी आहे.’ असं सांगितल्यावर चेहर्‍यावर हसू यायचं. हसणार्‍याला रडवणं व रडवणार्‍याला हसवणं ही त्यांची कला खरोखरच वाखाणण्याजोगी वाटत होती. आम्ही मुलं त्याच्या मागेमागे फिरत होतो. लोकांच्या जीवनात हास्य फुलविणारं निरनिराळं रुप पाहून आमचं चांगलच मनोरंजन होत असे.

मांगगारुडी म्हशी भादरायचा. बैलाला नाला ठोकायचा. गोर्‍याचं आंड ठेचून द्यायचा. त्यावेळी गोर्‍हं जीवाच्या आकांताने तळमळतांना पाहून मला मोठा कळवळा येत असे. त्याच्या नाकाला छिद्र पाडून वेसन घालत. मग त्याला शेतीच्या कामाला जुंपत. त्यांच्यासोबतच्या बाया गावात भीक मांगत.

गोंदवणार्‍या बाया-माणसं येत. कुणी हातावर किंवा छातीवर गोंदवून घेत. पोरी सहसा कपाळावर, हनुवटीवर किंवा गालावर टिंब काढत. गोंदवल्याने मुलीचे सौंदर्य वाढते असे म्हणत. पण त्यापेक्षा धार्मिक आणि अंधश्रध्देच्या भावना जास्त गुंतलेल्या असायच्या. माणूस मेल्यावर काही नाही पण गोंदवलेलं येतं, असे सांगत. मीपण माझ्या उजव्या हातावर माझे नाव ‘रामराव’ गोंदवून घेतले होते.

जाते-पाटे टाकवणार्‍या, लुगडे नेसलेल्या पण चोळ्या न घातलेल्या वडारीन-ओढरीन बाया येत. त्या म्हणत, ‘सितेला हरणाच्या कातडीची चोळी घालायला मिळाली नाही. म्हणून आम्ही चोळ्या घालत नाही.’ काय ही विचित्र संस्कृती, धर्ममार्तंडानी त्यांचेवर लादलेली ! याबाबतीत आणखी एक गोष्ट मी ऐकली. एका वडाराला सीता आंघोळ करीत असलेला दगड पाहिजे होता. तिची आंघोळ झाल्यावर दगड फोडून अर्धा घेऊन गेला. ही गोष्ट सीतेला माहित झाल्यावर तिने शाप दिला की तुझ्या बायांना यापुढे चोळ्या घालता येणार नाही. तेव्हापासून वडार जातीवर हा शाप सुरु आहे.

आठवड्यातून एकदातरी बांगड्याचं, टोपलं घेऊन कासार ओरडत गावात यायचा. पसरट टोपल्यात दाटून-चेपून निरनिराळ्या रंगाच्या, आकाराच्या बांगड्या ठेवलेल्या असायच्या. आमच्या घराचं अंगण मोठ्ठं, गावात मध्यभागी व रस्त्याजवळ असल्याने तो आमच्याच घरी ठाण मांडायचा. तो आल्याची चाहूल लागताच आमच्या घरी गावातील पोरी-बायाची रीघ लागायची.

बांगड्या भरायला कासारबुवा तरण्याताठ्या बाया-पोरीचा हात आपल्या हातात घेऊन जसा रस मोकळा होण्यासाठी आंबा चिंबवतात तसा तो दाबायचा. त्यामुळे हाताचे खडे नरम होऊन बांगडी सहज भरता येत होती. मग तिचा हात आपल्या हाताने कुरवाळत तिच्या हाताच्या आकाराच्या व आवडीच्या रंगाच्या बांगड्या भरायचा. हे दृश्य पाहून कुणालाही संकोच वाटत नसे. इतकेच नव्हे तर तिचा नवरा जरी तेथे हजर असला तरी परका माणूस आपल्या बायकोचा हात धरतो हे पाहून त्याला सुध्दा काहीच वाटत नव्हते. ऐवढेच काय, खेड्यात मी असेही दृश्य पाहिले की बाळाला दुध पाजतांना कोणतीही माता आपले स्तन कधीही झाकत नसत. याबाबत कुणाच्याही मनात दुषित अशा भावना नसायच्या. ह्या गोष्टी खरोखरच खेडूत जीवनात अधोरेखित करण्यासारखं आहे.

तसेच काचेच्या पेटीत ठेवलेले बायांचे आभूषणे विकणारा ‘मनेरीवाला’ पण मधामधात गावात यायचा. पोळा-दिवाळी-होळीसारख्या सणाच्या आधी तर नक्कीच यायचा. त्याच्या पेटीत कानातल्या बिर्‍या, टॉप्स नाकातले खडे, नथ, बोटातल्या आंगठ्या, गळ्यातल्या गळसोळ्या, गाठ्या, पायातल्या पायपट्ट्या व मनीडोरले असे काहीबाही राहत असे. त्यासाठी बाया-पोरींची मोठी झुंबड उडायची. कोणी विकत घ्यायच्या तर कोणी नुसतेच पाहत राहायच्या किंवा सूचना देत राहायचा. ‘हे घे, ते घे, हे नको, ते नको, अस्सं….!’ मला पण त्यांची तारांबळ पाहण्यात मोठी मजा वाटायची.

सरदाराचं कुटूंब येत होतं. तो पिंपळाच्या झाडाजवळ पाल टाकायचा. सागाच्या लाकडाला जंतर मशिनवर कातरून नक्षीदार ठावे बनवित होता. त्याचं कलाकुसरीचं काम पाहण्यात तल्लीन होत होतो. त्याच्याजवळ छर्र्याची बंदूक होती. तो जंगलातून शिकार करून आणत होता. तो कबुतरासारखे दिसणार्‍या हिरव्या रंगाच्या ‘हरियाल’ची शिकार करीत होता. या पक्षाला ‘पारवे’ म्हणत. या पक्ष्यांची गंमत म्हणजे त्यांना शोधायला गेलो तर क्वचितच दिसतील, पण एखादा जरी दिसला तरी त्याच्यासोबत शेकडो पारवे दिसतील. या पक्ष्यांचे मोठ्या झाडावर बसलेले थवे एकाचवेळी उडाल्यावर ते झाड थरथरल्याचा भास व्हायचा. असेच थवे मी मोठ्या पोपटांचे सुध्दा पाहिले. ते उडाले की त्यांच्या पंखाचा फडफडणारा आवाज व आकाशात विमानासारखा दिसणारा पट्टा पाहून माझं मन रोमांचित होवून जात असे.

गावात बाटरं, तितरं, ससे घेऊन फासेपारधी बाया-माणसं येत. ‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’. म्हणून त्याला ओळखत होतो. आम्ही निळोण्याला शाळेत जायचो, तेव्हा गायीवर बसलेला, खांद्यात जाळ्याची लाकडी पेटी व हातात भोकाचा चौकोनी कापडाचा फलक घेतलेला पारधी दिसत. त्यांच्या पेटीत तितरं पक्षी असायचे. मी ऎकलं होतं की तो त्यांना विकत नव्हता, तर त्याचा उपयोग इतर तितर पक्षी पकडण्यासाठी करायचा. काय युक्ती करत होता तो, पहा ! तो यांना म्हणे, राना-शेतात ठेऊन त्याच्या आजूबाजूला फासे टाकत. मग विशिष्ट पध्दतीने शिट्टी वाजवून त्यांना जोराजोराने ओरडायला लावत. कॅक्यारऽऽ कॅर…! असा जातभाईचा आवाज ऎकून जवळपास चरत असलेले इतर तितर पक्षी पळत येऊन, त्या जाळ्यात अलगद अडकत. मग लपून बसलेला पारधी त्यांना पकडून पायाला करकचून बांधत. स्वत: अडकलेल्या तितरांवर आपल्या जातभाईंना सुध्दा अडकविण्याची पाळी आणावी, ही गोष्ट किती भयानक

वाटते ! नाही का? माणसाची अक्कल कुणाला फसविण्यासाठी कशी चालते, पहा !

दरवेश अस्वलाला घेऊन यायचा. त्याच्या गळ्यातील पट्ट्याच्या घुंगराचे छन्ऽऽ छन्ऽऽ नाद आला की आम्ही पोरं हातातला खेळ सोडून पाहायला येत होतो. दान दिल्यावर अस्वलाचे केस उपटून ताईतमध्ये टाकून घरवाली बाईला द्यायचा. अशाच भरगच्च आणि काळेभोर केसं असलेल्या अळीच्या जातीला पण आम्ही अस्वल म्हणत होतो. ही अळी अंगावर चढली की खाजवत असे. असंच कुडतं किंवा पोरीचं झबलं घातलेल्या वानर-वानरीनला मदारी घेऊन आला की त्याचं पण कुतूहल वाटायचं. जेव्हा ते घरोघरी फिरत तेव्हा आम्ही पोरं देखील या प्राण्यांच्या गमती-जमती पाहत फिरत होतो.

आमच्या गावात मसनजोगी – कुठेकुठे पिंगळा म्हणत असल्याचे मी वाचले होते. आम्ही त्याला डुबरीवाला म्हणत होतो. टिनमिनी वाजवत, गाणे म्हणत सकाळीच अंधार असतांना कोंबड्याच्या पहिल्या बागेला यायचा. त्याला दान दिल्यावर तो डुबरीने कुर्रऽऽर्र असा आवाज करीत वाजवायचा. तो आला की मला त्याच्या गाण्याने, टिनमिनीने पटकन जाग यायची. त्याचं अंग काळ्या घोंगडीने पायापर्यंत झाकलेलं असायचं. खालपर्यंत घंटी लोंबकळलेली असायची. चालतांना ती ‘टीनऽऽ टीनऽऽ’ वाजत राहायची. तो आला की गावातले कुत्रे भुंकत त्याच्या पाठीमागे लागत. त्याची डुबरी म्हणजे डमरु पेक्षा लहान. तो ही डुबरी विशिष्ट लयीत वाजवत असल्याने झोपेतही हा आवाज माझ्या कानात घुमत राहायचा. तो आला की बाबा उठायचा. हातात कंदील घेऊन आवाराचं दार उघडायचा. दोघेही अंगणात बसत. मग बाबा चिलीम पेटवून पीकपाणी व पोरा-बाळाविषयी गप्पागोष्टी करत आळीपाळीने चिलीम ओढत. मी त्यांच्या गोष्टी झोपेतच ऐकत होतो. शेवटी पैसे, दाळ-धान्य देऊन बाबा त्याला निरोप द्यायचा. अशाप्रकारे कुणाचंही आगतस्वागत करण्याची बाबाची ही नेहमीची रीत होती. तो म्हणे, मसनखुटीत राहत, प्रेतावरच्या अंगावरचे कपडे घालत, तो मेलेल्या माणसांच्या जिन्नसावर आपली जिंदगानी करत.

त्याकाळी महार-मांग जातीच्या अस्पृष्य लोकांना शिवता येत नव्हतं. त्यांना स्पर्श केला किंवा त्यांची सावली अंगावर पडली तर सवर्ण लोकांना बाट व्हायचा. अस्पृश्यांसारखेच अदृश्य जमाती पूर्वीच्या मद्रास राज्यात असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिल्याचे मी वाचले होते. त्यांना सवर्ण हिंदुंनी पाहू नये, त्यांनी रात्रीच्या काळोखात आपले जीवन जगावे, म्हणून ते आपल्या पोटापाण्याची तजवीज करण्यासाठी फक्त रात्रीलाच फिरत. दिवस निघायच्या आत ते आपले व्यवहार बंद करुन आपापल्या घरात लपून बसत. अशी त्यांची बिकट परिस्थिती धर्मव्यवस्थेने करुन ठेवली होती.

गावात बेलदार यायचा. तो खोदलेल्या मातीत वाळलेलं गवत व शेण मिसळून पाणी टाकून रात्रभर भिजवून ठेवायचा. माती भिजवण्यासाठी दूर लवणावरुन म्ह्शी-हल्याच्या पाठीवर पखालीत पाणी भरुन आणायचा. पाणी आणता आणता काही पाणी सांडत असल्याने रस्ता ओला होऊन जायचा. बिचार्‍या म्हशी-हल्याला पाणी आणायला किती हेलपाट्या माराव्या लागत असेल, कोण जाणे? म्हणूनच ‘बेलदाराचा हेला, पाणी वाहू वाहू मेला’ अशी म्हण पडली असावी. तो कोंबड्याच्या बागेला उठून तेवढ्या सकाळीच चिखल तुडवायचा. मोठमोठ्या ओल्या मातीचे ऊंडे एकावर एक रचून भिंत उभी करायचा. त्याचं काम मी अगदी तन्मयतेने पाहत राही.

मी लहान असतांना दमडूमामाच्या घरी एक बुवा बायकोला घेऊन घोड्याच्या बग्गीत यायचा. गावातले लोक त्याला ‘गुरुमहाराज’ म्हणत. मामाचा, बाबाचा व गावातील काही लोकांचा तो गुरु होता. मामाच्या घरची परिस्थिती चांगली होती व गावातला मानवाईक होता; म्हणून तो बुवा त्याच्या घरी उतरायचा. त्याची मोठी वरवर व मानसन्मान होत असे. त्याचे पितळेच्या कोयपर्‍यात पाय धूत व पायावरचे पाणी तिर्थ म्हणून पीत. त्याचे पाय पुसून चार कलदार ठेवत. लोक असे का करीत, ते माझ्या लहानग्या मनाला काही उमगत नसायचे. गोविंदामामा कधीबधी म्हणायचा,  ‘गुरुबिगर ग्यान नही.’ हा कबिराचा दोहा त्याच्या तोंडातून नेहमी बाहेर पडायचा. म्हणजे हा गुरु आपल्या अडाणी शिष्यांना काय ज्ञान सांगायचा कुणास ठाऊक? तो व त्याच्या सोबतची बायको बाजीवरच्या पांढर्‍याशुभ्र धोतरावर बसत. ‘तन, मन, धन, कर गुरुला अर्पण.’ असं तो काहीसं म्हणत असे. कु्णाला गुरु करायचा असला, तर तो कानात पुटपुटत त्याचा कान फुंकायचा. म्हणून त्याला ‘कानफुक्या गुरु’ असेही म्हणत. लोकांनी बौध्द धम्म घेतल्यानंतर मात्र त्याचे गावात येणे बंद झाले.

पीक निघायचा मोसम आला की काहीजण बायका-मुलांसहित सुगी करण्यासाठी गावात येत. ज्यांच्या ओळखीचे किंवा नातेवाईक असतील, त्यांच्या कडे बस्तान मांडत. काही बिर्‍हाडं आमच्याकडे पण राहत. सुगी झाली की झाडावर बसलेल्या पाखरांच्या थव्याप्रमाणे उडून जात. ‘अशी पाखरं येती आणिक स्मृती ठेवूनी जाती’ या गाण्यात म्हटल्याप्रमाणे ‍! त्यातील काही लोभस पात्र आठवणीत राहून जात. काटेरी रानात क्वचित एखादं सुंदर फुल उमललेलं दिसलं की मन कसं प्रफुल्लित होवून जातं, तसंच माझंही झालं होतं. दारीद्र्यात पिचलेल्या पण सडपातळ शरीरयष्टी, कमनिय बांधा, लांबसडक केसभार व थोडा गौरवर्ण असलेल्या त्या मोहक मुलीने माझ्या तरल मनाला भुरळ पाडून पाखरासारखी उडून गेली होती. विशेष सांगायचं म्हणजे संध्याकाळी कामावरून आली की ती घरातला गुंड उचलायची. एकामागून एक पाणी भरून गुंड आणून नांदीत रीचवायची. तिची ही कामातील हलकाई, चपळाई पाहून मला मोठं कौतुक वाटे. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यामुळे तरुण वयाचं आकर्षणही असू शकते ! सुंदर फूल कुणाला आकर्षीत करीत नाही? अशीच काहीसी अवस्था माझीही झाली होती.

हो… किंगरीवाल्या भराडीची गोष्ट राहिलीच. तो काखेत झोळी घालून किंगरी वाजवत, गाणे म्हणत घराच्या अंगणात आला. त्यावेळी मी व माझ्या दोन पुतण्या, अमिता व संघमित्रा असे तिघेच घरी होतो. बाकी घरातले सर्वच शेतीवाडीच्या कामाला गेले होते. अमिता रांगती होती, तर संघमित्रा तिच्यापेक्षा मोठी होती. अमिता पाळण्यात झोपली होती. संघमित्रा बाहेर अंगणात खेळत होती. माझं जेवण व्हायचं होतं. म्हणून मी जर्मनच्या ताटात चरोट्याची भाजी व भाकर घेतली. मी तोंडात घास टाकणार, तर कुत्रा दरवाज्यात हजर. कोणी जेवत असलं की कुत्रा नेमका त्याचवेळेस टपकतो. त्याला कसा वास येतो, कुणास ठाऊक? त्याला भाकरीचा कुटका टाकल्यावर त्याने पटकन मटकावून खाल्ला. पुन्हा माझ्याकडे तोंड वासून पाहत बसला. मला राग आला. म्हणून हाडऽ हाडऽऽ म्हणायला लागलो, तर पाळण्यात झोपलेली अमिता उठली व रडायला लागली. तिला दोरीने हालवून पुन्हा कसंतरी झोपवलं. तिकडे बाहेर खेळत असलेल्या संघमित्राने घरात येऊन भोकांड पसरलं. मी तिला चूप राहण्यासाठी ओरडत होतो. परंतु तिचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. तिच्या रडण्यामुळे अमिता पाळण्यातून उठेल, म्हणून तिला दोन-चार चापट्या मारल्या. पण तिने अधिकच चवताळून रडण्याचा सूर मोठा केला. तेवढ्यातच किंगरीवाला भराडी दारात आला.

भटक्या जमातीत मोडणारे हे लोक भीक मागायला फिरत. त्यांच्या किंगरीतून सुंदर असे सूर झंकारत. महाराष्ट्रातील भराडी म्हणजे नाथजोगी. नवनाथाचे भक्त. हा समाज नाथजोगी, डवरीगोसावी, बहरुपी, भराडी अशा विविध नावाने ओळखल्या जात. त्यांचा पेहराव म्हणजे डोक्याला पागोटी, धोतर व लांब सदरा, गळ्यात झोळी. हातावर आणून, पानावर खाणारे हे लोक, जेथे जातील तेथे पाल टाकून राहूटी करत. आमच्याही गावात बरडाजवळच्या गोठाणावर पालं पडत. या लोकांचे जीवन पाहून माझ्या मनात कारुण्य दाटून यायचं. त्यांना गाव नाही, शेतीवाडी नाही, घरदार नाही, शिक्षण नाही, रोजगार नाही, औषधोपचार नाही, शुध्द पाणी नाही, कपडा-लत्ता नाही, सुरक्षा नाही, विंचू-काट्याची भीती नाही, मानसन्मान नाही असं त्यांचं जगणं पाहून माझ्या मेंदूला झिणझिण्या पडत.

मी विचार करु लागलो, असा कसा त्यांचा हा भीक मांगण्याचा धंदा धर्मव्यवस्थेने या जमातीवर  लादला? दुसर्‍याच्या उपकारावर का म्हणून त्यांनी जगावे? आपल्या देशात असे कितीतरी लोक भीक मागून खातात. यांची शक्ती, कार्यक्षमता किती वाया जात असेल? त्यामुळे देशाचं किती नुकसान होत असेल? असे नानाविध विचार माझ्या डोक्यात येऊन विरुन जात. पण तो किंगरीवाला मात्र माझ्या आठवणीत कायमचा राहीला.

 

 

 

Advertisements

Comments on: "कथा एकोणतिसावी – भीक मांगण्याचा धंदा" (1)

  1. प्रा.सुरेश अंधारे said:

    जणू मिच लेखक आहे असे क्षणभर वाटून गेले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: