मी आणि माझ्या आठवणी


कथा अठ्ठाविसावी – मॅट्रिकचा निकाल

 

मी पहिल्यांदा थर्ड क्लासची यादी पाहिली. त्यात माझं नाव नव्हतं. नंतर सेकंड क्लासची पाहू लागलो. त्यातही दिसेना. मला वाटलं, नापास झालो. खूप घाबरलो. तेवढ्यात एक मुलगा ओरडून म्हणाला, ‘अरे जुमळे, तुझं नाव, हे इकडे फर्स्ट क्लासमध्ये आहे.’ मला खरंच वाटेना…! मी पुन:पुन्हा खात्री करुन घेतली. मग आनंदाचा मोरपिसारा माझ्या मनात थुईथुई नाचायला लागला. पहिल्यांदा जीवनात काहीतरी गवसल्याचं सौख्य माझ्या चेहर्‍यावर उमटलं.

माझे परीक्षेत सारे पेपर चांगले गेले होते. त्यामुळे मी मॅट्रीकची परीक्षा नक्कीच पास होईन, अशी दुर्दम्य आशा होती. परंतु थर्ड क्लासमध्ये होईन, असे उगीचच वाटत होते. म्हणून जेव्हा नोटीस बोर्डवरची यादी पाहायला लागलो; तेव्हा माझी उत्कंठा शिगेला पोहचली. मला सर्व मिळून सदुसष्ट पॉइंट चार टक्के मार्क्स् पडलेत. केमेस्ट्रीत अंशी टक्के म्हणजे डिस्टींक्शन, गणीतात त्र्याहत्तर टक्के व इतरही विषयात चांगले मार्क्स् पडलेत.

ही बातमी सांगायला गोधणीला जाण्याची मला मोठी घाई झाली. बाबाने तेथे जांबाच्या बगिच्यानंतर आमराई विकत घेतली होती. माझं मन आनंद-तरंगावर झुलत आणि उल्हासाच्या भरात टणान् उड्या मारत निघालं. आनंदाच्या धुंदीत पाऊल टाकतांना भूतकाळातील आठवणीने माझ्या मनात किती दाटी केली, म्हणून सांगू? ते सारं चलचित्र माझ्या डोळ्यासमोर सर्रकन उभं झालं.

मी दहावीला तर माझा लहान भाऊ अज्याप पाचवीला… मी म्युनीसिपल हायस्कूलमध्ये तर तो गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये… आम्ही दोघेही वसंतराव नाईक होस्टेलमध्ये राहत होतो. शालेय जीवनात पहिल्यांदा होस्टेल पाहिलं, ते येथेच ! तसंच पहिल्यांदा विजेची ओळख झाली, ती पण

येथेच ! एरवी शहरातील दिवे पाहिले; पण विजेच्या लखलखत्या दिव्याखाली प्रत्यक्ष वावरलो असेल तर ते याच ठिकाणी ! हे होस्टेल बंजारा समाजाचे प्रतापसिंग आडे यांनी नव्यानेच उघडले होते. त्यांनी आणखी काही गावात शाळा, होस्टेल काढले होते. त्यामुळे खेड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी चांगला हातभार लावला होता. हे होस्टेल सुरुवातीला दारव्हा रोडवर होते. त्यावेळी पावसाळा असल्याने तेथील जागा ओली व्हायची. तरीही आम्ही ओल्या जागेवर खाली झोपत होतो. काही दिवसाने बाडबिस्तर डोक्यावर घेऊन पायीपायीच धामणगाव रोडवरच्या नव्यानच बांधलेल्या वास्तुमध्ये राहायला गेलो. अज्यापची शाळा लांब होती. त्यामानाने माझी शाळा जवळ होती. आमचे दोघांचेही सामान लाकडी पेटीत ठेवत होतो. ही पेटी बाबाने घरीच बनवून दिली. ती मी गावावरून डोक्यावर घेऊन आलो होतो.

शाळेत अनवाणी पायानेच आम्ही दोघेही चालत जात होतो. बाबा जूनी, ठिगळं लावलेली छत्री घेऊन द्यायचा. पण अशी छत्री वापरायला लाज वाटत होती. एकदा होस्टेलमधील काही मुले थोड्याफार नवीन-जुन्या चप्पला घालून येत होते. तेव्हा त्यांच्यात हळूच कुजबूज चालायची. माझ्या लक्षात आले की हे चप्पला चोरुन आणत असावेत.

‘का रे, चप्पला कुठून आणता?’ मी विचारले.

‘तुला पाहिजे का? पाहिजे असेल तर चल संध्याकाळी माझ्या बरोबर.’

माझ्या शांत मनात खळबळ माजली. विचाराच्या वादळात गुरफटून गेलो. कधी मन हो म्हणायचं, कधी नाही म्हणायचं. काय करावं ते सुचत नव्हतं. माझं मन स्थिर होईना. चप्पलासारख्या वस्तू चोरुन आणणे ही गोष्ट माझ्या सद्सद्‍वीवेक बुध्दिला पटत नव्हती. पण चप्पल घ्यायची ऎपत नसल्याने आम्ही अनवाणी पायानेच चालत होतो. हे शल्यपण मनाला टोचत होतं. चप्पला घालणार्‍या लोकांकडे पाहिल्यावर आम्हाला हेवा वाटत होता. त्यामुळे चोरीची का असेना आमच्याही पायात चप्पला असाव्यात; अशी ईर्षा मनात उफाळून येत असे. त्या ईर्षेपायी चोरीसारखे अश्‍लाध्य कृत्य करायला आम्ही अगतीक झालो होतो. गरिबीने गांजलेले लोक म्हणूनच चोरी करायला धजावत असतील; हे त्यांच्या गुन्हेगारीमागील कारण असावं. हे गुढ त्या प्रसंगाने मला उमगलं. हृदयावर दगड ठेऊन व मनाचा हिय्या करुन शेवटी मी त्याच्या सोबत चालत गेलो. त्याने मला महादेव मंदिराजवळ नेलं. तेथे महाशिवरात्रीचा उत्सव असल्याने यात्राच भरली होती. मंदिराच्या बाहेर जागोजागी चप्पला-जोड्यांचे ढिगच्या ढीग पडले होते. आम्ही आजूबाजूला चोरट्या नजरेने वहाणाकडे पाहत घुटमळत राहत होतो.

‘घाल ही आणि जा पटकन. लांब दूर थांब. मी येतोच.’ माझ्या पायाच्या आकाराची चप्पल एकाने काढून ठेवल्याबरोबर तो हळूच म्हणाला.

त्यालाही चप्पल पाहिजे होती. कारण त्याने आधी जी चप्पल आणली, ती न आवडल्याने कुणाला तरी दिली. म्हणून तो संधीची वाट पाहत थांबला. माझ्याही मनाची पूर्ण तयारी झाली. मी पटकन पायात घातली आणि कुरुकुरु चालायला लागलो. मी दूरवर जाऊन त्याची वाट पाहत ऊभा राहीलो. एवढी चांगली देखणी चप्पल मी पहिल्यांदा पायात घातली खरी, पण मनात विचाराचं काहूर माजलं होतं. चप्पलवाला समजा एकाएकी माझ्यासमोर टपकला, तर माझी काय अवस्था होईल? या भीतीने माझ्या सर्वांगाला घाम फुटला. छाती धडधड करीत होती. चौर्यकर्म मनाला कसं भुरळ पाडतं, पण त्याचे परिणाम मात्र दु:खद असते, ही भावना माझ्या मनात खदखदायला लागली. स्वत:च्या मालकीच्या वस्तूचा उपभोग घेण्यात जेवढा आनंद आणि सुरक्षितता मिळते; तेवढा चोरीच्या वस्तूत मिळत नाही, ही जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती.

तो मुलगा अजुनही आला नव्हता. त्याला पकडले तर नाही ना? अशी शंका-कुशंका मनात घिरट्या घालू लागली. त्याला पकडले असेल, तर तो माझंही नाव सांगेल. मग मीही पकडला जाईन. पुढे लोकांची शिवीगाळ, मारझोड, पोलीस स्टेशनची जीवघेणी वागणूक व शेवटी जेलची हवा, बापरे…! ही सारी भयाणता माझ्या डोळ्यासमोर तराळल्याबरोबर भीतीने लोळागोळा झालो.

गुन्हेगार म्हणून जीवनात काळा धब्बा लागेल. आत्तापर्यंत केलेला शिक्षणासाठीचा सारा खडतर प्रवास मातीमोल होऊन जाईल. पुढचं सारं भविष्य बरबाद होईल. कुणाला तोंड दाखवणे मुश्किल होईल. जेलात सडत राहावं लागेल. कशाला या फंदात पडलो? असं वाटायला लागलं. त्यापेक्षा अनवाणी पायानेच चाललेले बरे ! म्हणून मी लिंबाच्या झाडाजवळ गेलो. तेथे चप्पल काढून ठेवणार एवढ्यात आवाज आला.

‘अरे, जुमळे काय करतोस?’

‘मी चप्पल काढून ठेवणार होतो. तू लवकर आला नाहीस, ना? म्हणून घाबरलो. मला वाटले, तूला पकडले की काय? नको ही ब्याद.’ असे म्हणून मी काढायला लागलो.

‘अरे, घाबरु नकोस. घाल चप्पल आणि चल पटंपटं…’ असं तो निर्ढावलेल्या सुरात म्हणाला. काय करावे ते कळायच्या आतच त्याने माझा हात पकडून ओढत ओढत नेऊ लागला. मी घाबरत घाबरत होस्टेलमध्ये आलो. पण मला सारखी धाकधूक वाटत होती. रस्त्यात कोणी माझ्या पायाकडे पाहत तर नाही ना? अशी शंका मनाला चाटून जात होती.

तहसील ऑफीसच्या समोरील रोडला लागून ढोंगेचं दुकान होतं. त्याला ढोंगेमामा म्हणत. त्याच्या सोबत त्याचे दोन मुलं, मोठा अंबादास व लहान देविदास राहत. दोघेही मोठे लाघवी व गिर्‍हाईकाशी प्रेमळपणाने वागणारे ! ते सायकली भाड्याने देत. मीपण तेथूनच सायकल घेत होतो.

शामरावदादा सरपंच असल्याने नेहमीच ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त यवतमाळला यायचा. सरपंच म्हणजे बिनपगारी नोकर ! तो ड्युटीवर असल्यासारखा येत होता. तो आला की दुकानातल्या लाकडी पेटीवर पेपर वाचत बसायचा. दादाचं व मामाचं खूप जमायचं. बिडी ओढत ओढत दोघेही मस्त गोष्टी करीत. त्याचं आमच्या गावाजवळील बरबडा गावाला शेती होती. तो दादासारखाच अर्ध्याक वयाचा, मध्यम बांध्याचा, काळासावळा, दाढी-मिशीवर खुरटे आणि डोक्यावर भुरकटलेले केसं, पैजामा आणि शर्ट घातलेला. मी दुकानावर जायचो; तेव्हा त्याला म्हणायचो,

‘मामा, दादा आला का?’

‘हो. आला आहे. बस येईल तो.’

मग मी लाकडी पेटीवर बसून पेपर वाचत होतो. वाचून झाल्यावर उगीच इकडे तिकडे पाहत होतो. समोरच्या रोडने जाणार्‍या-येणार्‍यांना न्याहाळत होतो. प्रत्येकांची लगीनघाई दिसून यायची. काही हसतमुख, काही विवंचनेत, काहींचे उदास चेहरे, आपल्याच तोर्‍यात, विचारात गढून गेलेले दिसत. लोकांच्या पायांकडे नजर लावून बसलेला चर्मकार, पान-टपरीवाला, हॉटेलमालक, भाजीवाला, फ्रुटवाला, टांगेवाला असे सारेच आपापल्या गिर्‍हाईकांची आतुरतेने वाट पाहात असल्याचे दिसत.

माणसाचं मन कधी स्थिर राहतं का? कधी भूतकाळात तर कधी भविष्यकाळात शिरतं. आत्ताही तसंच झालं. रस्त्यावर धावणारी मोटारगाडी जणू माझ्याच मालकीची, मीच चालवीत आहे, असे दिवसाढवळ्या स्वप्न पाहत होतो. हे स्वप्न तुटते न तुटते, लगेच माझं मन इथल्या परिसरातील जुन्या आठवणीत शिरलं. मग एकेक गोष्ट आठवायला लागली.

बाजूला हॉटेल होतं. तेथील भजे मस्त खुमासदार व चटकदार लागत. गुलगुले मस्त गोड लागत. आम्ही गावावरुन आलो की भजे घेऊन घरच्या भाकरीसोबत पडवीत खाली बसून खात होतो. एकदा मी हॉटेलात गेलो होतो. उभ्या-उभ्याने पाणी पिल्यावर जर्मनचा गिलास कसा कलंडला का? ते पाहून हॉटेलमालक खेकड्यासारखा चवताळून आला आणि माझ्या कानफडात थाडकन थापड हाणली. मला क्षणभर चक्कर आल्यासारखे वाटले. मग सावरून मुकाट्याने बाहेर पडलो. मी ज्या-ज्या वेळी हॉटेलजवळून जायचा; त्या-त्या वेळी ही गोष्ट आठवायची. तेव्हा कसंच तरी वाटायचं.

कधीकधी समोरच्या मोकळ्या जागेत गारूडी बासरी आणि डमरु वाजवून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचा. पोरसोरं व माणसं त्याच्या भोवताल जमत. मग त्याच्या हातचलाखीने लोक आश्चर्यचकित होत. मधामधात बासरीचा व डमरूचा आवाज घुमायचा. रंगिबेरंगी कुडतं घातलेले वानर गमतीजमती करायचा. त्याच्या हातात कटोरा देऊन लोकांकडून पैसे जमा करायचा. कधी दोरीचा साप बनवून मुंगसासोबत लढाई लाऊन देण्याची बतावणी करायचा. मग हळूच दंतमंजनच्या पुड्या काढून विकायचा. कुणाच्यातरी थुंकीत दातातला किडा मंजनाने निघाला, असा भासवत होता. पण दोरीच्या सापाने मुंगूसासोबत कधी लढाई करुन दाखवायचा नाही. फक्त लालूच दाखवून लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवायचा. सोबतच्या मुलावर हात फिरवून व मंत्र टाकून जादूने बेशुद्ध केल्याचा आंव आणायचा. त्याला जमिनीवर झोपवून, अंगावर कपडा टाकून म्हणायचा,

‘जमुरे’

‘कहो, उस्ताद.’ जमुरे म्हणजे गडी व उस्ताद म्हणजे धनी असे त्यांचे नातेसंबंध. एखाद्याला हात लावून म्हणायचा,

‘जमुरे, इसे पहचान… इसने क्या पहना है?’ मग तो बरोबर पॅंट-पायजमा घातला की धोतर नेसला, तसं सांगायचा. लोक भारावून जात. खेळ संपायच्या आधी अशा युक्त्या-क्लुप्त्या, हातचलाख्या करुन पैसे गोळा करायचा. मीपण त्याचे खेळ पाहण्यात दंग होऊन जात होतो.

दारिद्र्याने पिचलेल्या गरिबांना डमरुवाल्या जादुगारासारखे राजकारणी लोक फसवत असतील, नाही का? त्यांच्या ‘गरिबी हटाव’च्या आश्वासनाला बळी पडून आपल्या उध्दाराची वाट पाहत पिढ्यान् पिढ्या मतदान करुन त्यांच्याकडे सत्ता सोपवित असतील. मग सत्तेचा वापर लोकांच्या उद्धारासाठी न करता केवळ स्वतःच्या कमाईसाठी करीत असावेत. जसा डमरूवाला करतो तसा ! म्हणून मला या दोघांचाही धंदा सारखाच वाटत होता !

एकदा घोडखिंडी गावाच्या चिंपटमहाराजानेही अशीच बनवाबनवी करुन जंगलातून जमा केलेल्या सशाच्या लेंड्या औषधी म्हणून विकल्या होत्या. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.’ असे म्हणतात तेच खरं !

कोल्हाट्याचा खेळ दिसला की मी तेथेच खिळून बसत होतो. मी त्याबाबतीत वाचलं होतं की कोल्ह म्हणजे काठी व अहाटी म्हणजे उड्या मारणे. या खेळात लहानसी चार-पाच वर्षाची मुलगी बापाने वाजविलेल्या ढोलकीच्या व आईने बदडलेल्या ताटाच्या आवाजाच्या तालावर करामती करुन दाखवायची. तिच्या कसरती पाहून मी तोंडात बोटं घालत होतो. ती एका छोट्याशा रींगातून आपलं संपूर्ण शरीर आळोखेपिळोखे देऊन अलगद काढायची. आपल्या शरीराला इतकी वाकवायची की जणू काही तिचं शरीर रबराचं बनलेलं होतं ! ढोलकी व ताटाच्या निनादावर काठीचा आधार घेऊन, डोक्यावरच्या चुंबळीवर एकावर एक असे दोन गडवे ठेवून दोरीवर मागे-पुढे सरकणे व मध्येच नाचणे, एका पायावर उभी राहणे अशी तिची कसरत पाहत मी तल्लीन होऊन जात होतो. काठीच्या आधारानेच ती मुलगी आपलं संतुलन सांभाळत होती. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सुध्दा सदसदविवेकबुद्धीची व सारासार विचाराची काठी घेऊन जर चाललो, तर खाली कोसळण्याची भीती राहणार नाही. असं सत्य ती शिकवून गेली होती. तिची हिंमत, निर्धार आणि दृढता मनात साठवून नव्या उमेदीने मी वर्गात जाऊन बसत होतो.

दादा मला सोडा फॅक्टरीच्या दुकानात घेऊन जायचा. या चौकात घोडे जुतलेले टांगे उभे राहायचे. म्हणून टांगा चौक म्हणत. ह्या टांग्यावाल्यांनी सायकलरिक्षे येऊ दिले नाहीत. म्हणून इतर शहरात दिसणारे सायकलरिक्षे यवतमाळला कधीच दिसले नाहीत. हे दुकान शेतकरी-कामकरी पक्षाचा पुढारी-जामणकर यांचं होतं. दादा सरपंच व रिपब्लीकन पार्टीचा पुढारी… म्हणून त्याची दाट ओळख होती. दादा हिरव्या रंगाच्या शिशीतलं, तळाशी निळी गोळी असलेला सोडा मला पाजत असे. याच चौकात मुसलमानाचं मटणाचं हॉटेल होतं. दादा कधीकधी जेवायला घेऊन जायचा. येथील मटणाची चव वेगळीच व लज्जतदार लागत होती. त्याची आठवण झाली की ती चव जिभेवर तरळायची.

आठवणीच्या भरात मला आणखी गोष्ट आठवली. उमरसर्‍याचा माझा मित्र प्रभू याने मला सायकल शिकवली. सायकल शिकतांना दोन-तीनदा चांगलाच आपटलो. पडणे आणि सावरणे हा जीवनातल्या चढ‍उताराचा अविभाज्य भाग असल्याचं; त्यावेळी मला जाणवलं. मी जिद्द सोडली नाही. शेवटी शिकलोच ! मग माझ्या आनंदाला पारावार उरला नाही ! मी आता स्वत:च सायकल आणून सराव करत होतो. परिपूर्ण होण्यासाठी सराव आवश्यक असते ना, म्हणून !

एके दिवशी आम्ही दोघेही भाड्याच्या सायकलीने अकोलाबाजार रोडने माझ्या चौधरा गावाला गेलो. पांढरीपर्यंतचा गिट्टी-मुरुमाचा व नंतरचा कच्चा रस्ता होता. त्यावेळी पावसाचे दिवसं होते.  म्हणून कुठे कुठे चिखल व टोंगळाभर गाडण झाले होते. सायकलच्या चाकाला चिखल डिकल्याने ती जाग्यावरुन हालत नसे. मग चिखल काढण्यात बराच वेळ खर्ची पडायचा. आम्ही घरी आलो, तेव्हा आई-बाबा, दादा-वहिनी वावरात होते. त्यांना मी सायकल शिकल्याचे सांगितल्यावर त्यांनाही आनंद झाला.

दादा आल्यावरच मी विस्मृतीतून जागा झालो. तो भेटला की खूप दिवसापासूनचा घरच्यांचा विरह सौम्य व्हायचा.

होस्टेलपासून थोडं दूरच्या विहिरीवरून आम्ही पाणी आणत होतो. तेथे कपडे-अंग धूत होतो. विहिरीशेजारी रिठ्याचं झाड होतं. त्याला साबनासारखा फेस यायचा. तो कपड्याला व अंगाला लावत होतो. रिठ्याला दगडावर घासून एकमेकाला चटके देण्यात मजा घेत होतो.

होस्टेलमध्ये अनेक जातीचे मुलं होते. त्यात मी, अज्याप व धवणे बौध्द, पवार, आडे, दोन राठोड, शंकर व नामदेव हे बंजारी, कुमरे गोंड, सिध्दीकी मुस्लिम, वाणी कुणबी, सरोदे हा सरोदी तर शिरगिरे धनगर जातीचा होता. कुमरे व नामदेव कबड्डीचे नावाजलेले खेळाडू होते. सारे मु्लं गरिबीचे चटके सोसतच शिक्षण घेत होते. धवणे व शिरगिरे दोघेही मजाकी होते. त्यांच्या हसवण्यामुळे आमचं मन कसं प्रसन्न होत होतं ! माणसानं आनंदी राहावे म्हणजे दु:ख सहन करण्याची ताकद मिळते; अशी शिकवण ते नकळत देऊन जात. शिरगिरेला काहीही बोललं, शिव्या दिल्या, तरी त्याला राग मुळीच येत नव्हता. असा तो निर्विकार स्वभावाचा होता. स्वत:चा आनंद स्वत:च निर्माण करावा. कोणी देईल याची कशाला वाट पाहावी? ही त्याची वृती मला फारच भावली होती.

सरोदे उन्हाळ्याच्या सुट्टीत सरोदीचा धंदा करत होता. सरोदी म्हणजे लोकांचे भविष्य पाहणारी जात. कास्तकारांचे पीक-पाणी निघाले की यांची सुगी सुरु व्हायची. मग हे गावोगावी भटकंती करीत. एकटांगी धोतर, पांढरा सदरा, खांद्यावर पांढरा शेला, गळ्यात थैला व कपाळावर उभा कुंकवाचा टिळा. असं त्यांचं सोज्वळ रुप. तो अडाणी, देवभोळे, अंधश्रदाळू खेडूतांना कसा गंडवत होता, हे मोकळेपणाने सांगायचा. त्यातील गमती जमती मस्त खुलवून सांगत होता.

‘एखाद्या धनवान बाई-माणसाला हेरुन, त्यांना भविष्याच्या बाबतीत घाबरुन सोडत होतो. मग त्यांच्या जीवनात अरिष्ट आणणार्‍या राहू, केतू, शनी सारख्या ग्रहांना शांत करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे किंवा सोन्याच्या अंगठ्या लुबाडत होतो. त्यातूनच मी वर्षभर शिक्षणाचा व कुटुंबाच्या पालनपोषणाचा खर्च भागवत होतो.’ असं तो छाती फुगवून सांगायचा.

येथे मात्र कोणीही जातीभेद पाळत नव्हते. सर्वजण एकाच पंक्तीत जेवत. एकत्र अभ्यास करीत. हॉलमध्ये एकत्रच झोपत. आम्ही बसलो की गप्पा-गोष्टी, गमती-जमती, हास्यविनोद व गाणे म्हणण्यात रंगून जात होतो.       एकदा नामदेवने स्वत:च मालमसाला टाकून व तेलाची चमचमीत फोडणी देऊन आलूची मस्त भाजी बनवली. आम्ही अशी तेलाची चपचपीत भाजी पहिल्यांदा पाहिली. आम्ही पाच-सहाजण त्याच्या वाईहातोला गावाला भाड्याच्या सायकलीने डब्बा पार्टीला गेलो होतो. त्याचं गाव दहा-बारा कोस असेल. त्याने अंगणात टाकलेल्या बाजेवर आम्हाला आपुलकीने बसविले. प्यायला चांगल्या गिलासाने पाणी दिले. तो बंजारी असूनही भेदभाव करीत नव्हता. ते पाहून आमच्या गावाच्या बंजाराच्या मनातून अशी बाट न करण्याची भावना कधी निघून जाईल, असा विचार माझ्या मनात शिरुन गेला. एकदा आम्ही मुले भाड्याच्या सायकली काढून कळंबच्या यात्रेला पण गेलो होतो. कळंब हे गाव यवतमाळपासून जवळपास विसक मैल दूर असेल. सायकल चालवून पार थकून गेलो होतो. तेथे टुरिंग टॉकीजमध्ये सिनेमा पाहिला. नंतर आम्ही एका मठावर जाऊन जेवण केले व तेथेच झोपलो. दुसर्‍या दिवशी सकाळी परत आलो.

होस्टेलची कामे म्हणजे स्वयंपाकासाठी लाकडं आणणे, पीठ दळून आणणे, भाजीपाला आणणे, होस्टेल सारवणे, विहिरीवरुन पाणी भरणे हे आम्हीच मु्ले करीत होतो.

मी नववी पास झाल्यावर आता शिक्षणाला कुठे राहावे, असा प्रश्‍न पडला होता. मी एकदा ‘सिंहगर्जना’ पेपर वाचला. त्यात वसंतराव नाईक होस्टेलची जाहिरात वाचल्याने माझ्या आशा पल्लवीत झाल्या. मी मनवर सरांची भेट घेतल्यावर प्रवेश मिळाल्याने आनंदीत झालो.

आम्हाला जेवणात कधी हायब्रीड, मिलोच्या भाकरी तर कधी मैद्याच्या-गव्हाच्या पोळ्या व सोबत भाजी किंवा पातळ वरण मिळत असे. एखाद्या सणाला नव्हाळीचं गोडधोड खायला मिळायचं; तेव्हा आमची मजाच व्हायची. एकदा मनवर-वार्डनने फिस्ट द्यावी म्हणून मोठ्या मुलांनी त्याच्या मागे तगादा लावला. पण तो काही केल्या मानत नव्हता. म्हणून रात्रीला त्याच्या खोलीच्या दरवाज्यावर थाप किंवा दगडं मारायचे. असे भानामतीचे प्रकार होत आहेत, असे भासवून त्याला घाबरवून सोडत. एकदा सर्वजण झोपलो असतांना अज्यापला बाहेरच्या दरवाज्यापर्यंत चालत जातांना मी पाहिले होते. तो झोपेत चालतो म्हणून मी घाबरलो होतो. तेव्हा आम्ही सगळे बसलो असतांना धवणे या मुलाने आपल्या अंगात देव आल्याचं नाटक करुन घुमत होता.

‘या जागेची वास्तुशांती करा. नाहीतर एका-एकाला खाऊन टाकीन.’ असं घुमतांना बडबडत होता. शेवटी एक दिवस फिस्ट देऊन वार्डनला झुकावेच लागले ! पण धवणेचं अंगात देव येण्याचं बिंग मात्र फुटलं होतं.

कधीकधी होस्टेलचे चालक प्रतापसिंग आडे येत. ते आले की आम्ही सारेजण चिडीचूप होऊन जात होतो. त्यांची मराठी भाषा म्हणजे बंजारी-गोर भाषेचं मिश्रण असायचं. एकदा ते वसंतराव नाईकांना घेऊन आले होते. त्यावेळी ते महाराष्टाचे मुख्यमंत्री होते. त्यांना पाहून आम्हाला मोठा गर्व वाटला. त्यांची गाडी होस्टेलच्या दरवाज्याजवळ येऊन थांबली. त्यांना अगदी जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं होतं. त्यांनी आमची विचारपूस केली. ते दिसायला सुंदर, गोरेपान व जाडजूड बांध्याचे होते. एखाद्या राजबिंड्यासारखं त्यांचं रुप होतं. त्यांनी कोट, पॅंट घातला होता. त्यांच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाने आम्ही अक्षरश: भारावून गेलो होतो. त्यांच्याकडे आम्ही मोठ्या कुतूहलाने पाहत होतो. ते आमच्याच मागासवर्गीयांपैकी असल्याने आमचा उर मोठ्या अभिमानाने भरुन आला होता.

त्यांच्याबाबतीत मी पेपरमध्ये वाचलं होतं की त्यांनी ‘कसेल त्याची जमीन, ज्यांच्या हातात रुमणं तो शेतकरी’ यासाठी कुळकायदा, अतिरिक्त जमीन, वहिवाटी, नवाटी असे कित्येक कायदे करुन शेतमजुरांना शेतकरी बनविले होते. त्यांनी भरपूर उत्पन्न देणारे हायब्रिडचे पिक आणले होते. मजुरांना  रोजगारांची हमी देणारी योजना आणली होती. ते बंजारा समाजातील पहिले वकील व सत्तेचे अनेक पदे भुषवणारे राजकीय पुढारी होते. त्यामुळे ते बंजारा समाजाचे दैवत मानले जात.

एकदा निवडणूक आली होती. तेव्हा प्रतापसिंग आडे यांनी आम्हा मुलांना तिकीटचे पैसे देऊन आपापल्या गावाला काँग्रेसच्या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी पाठविले होते.         मी व अज्याप गावाला न जाता गोधणीला गेलो होतो. तेथे बाबाने जांबाचा बगीचा घेतला होता. कोणत्या झाडाचे जांब गोड लागतात, ते बाईला विचारुन झाडावर चढत होतो. पिकलेले जांब तोडून तेथेच फस्त करत होतो.

तसंही मी गावाला जाऊन काँग्रेसचा प्रचार केलाही नसता. त्यावेळी राजकारणातलं फारसं कळत नव्हतं. पण ‘काँग्रेस हे जळते घर आहे, त्यात जाऊ नका.’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याचे मी दादाकडून ऎकले होते. म्हणून तो काँग्रेसचा विरोध करीत होता. मलाही या पक्षाबाबत कधीही आपूलकी वाटली नाही.

माझी मॅट्रीकची परीक्षा तोंडावर आली; तेव्हा मी खूप अभ्यास करीत होतो. माझ्यासोबत एकदोन मुलं मॅट्रीकला होते. त्यांच्यासोबत रात्रभर जागत होतो. झोपेच्या डुलक्या येऊ नये, म्हणून चहा करुन पीत होतो. सारखं तासनतास पुस्तकात डोकं खुपसून राहतांना चहाची सोबत मोलाची वाटत होती. माझ्या परीक्षेचं केंद्र गव्हर्नमेंट हायस्कूल होतं. ही शाळा बरीच लांब होती. इतक्या दूर मला परीक्षा संपेपर्यंत रोज पैदल जावे लागत होते.  मी पेपर सोडवत असतांना माझं लक्ष समोरच्या बाकड्यावर बसलेल्या डेहनकर मुलाकडं जायचं. तो इकडे तिकडे पाहून हळूच खिश्यातून कागदाचा चिटोरा बाहेर काढून पेपरात लिहायचा. त्याला कॉपी करायची कशी हिंमत होत होती, काय माहित? मी कॉपीचा विचार कधीच मनात आणला नाही.

माझ्या घरी कोठ्यात शाळा भरायची. माझी पुतणी संघमित्रा तेव्हा सहाव्या वर्गात शिकत होती. ती म्हणाली,

‘काका, गुरुजींनी प्रश्‍नपत्रिका पेटीत ठेवल्या आहेत. पाहतं का?’

‘नाही. असं चोरीचं काम करु नये.’ मी म्हणालो.

प्रश्‍नपत्रिका माझ्याच घरी असल्याने हे कृत्य मी सहज करी शकलो असतो.

गोधणीचा नाला आला; तेव्हा मी आठवणीच्या तंद्रीतून जागा झालो. नाल्याला लागुनच आमराई होती. मी आईला पास झाल्याचं सांगितलं. तिला खूप आनंद झाला. तिने झोपडीतून गुळाचा खडा आणला आणि माझ्या तोंडात पटकन टाकला. त्याचबरोबर माझ्या गालाचा व कपाळाचा पटापट मुका घेतला. आईला खूप दिवसाने भेटलो किंवा माझं कौतुक करायचं असलं की ती अशीच माझ्या गालाचा व कपाळाचा मुका घेत असे. त्यावेळी आईने मला खाऊ दिला की काय असंच वाटयचं.

आई शिवाय अज्याप, बाई, बाबा सारेच माझ्या भोवताल जमा झालेत. त्यांना ही गोड बातमी कळायला वेळ लागला नाही. सारेच खुश झालेत. सर्वांनी माझं भरभरुन कौतूक केलं. मी सार्‍यांच्या कौतूकात नहात होतो.

शिक्षणातला महत्वाचा टप्पा मी पार केला. त्या आनंदाची अनुभूती शब्दात सांगणं कठीणच ! अतीव आनंदाने माझे डोळे पाझरायला लागले. एखादी भावना मग ती आनंदाची असो की दु;खाची, व्यक्त करता आले नाही तर छातीत दाटून अश्रुद्वारे बाहेर पडतात. अशीच गत माझी झाली होती.

खरंच ते रोमांचक आणि आनंदायी क्षण माझ्या डोळ्यासमोर आले की आजही त्याच दिमाखात झळाळल्याशिवाय राहत नाही. असा तो मॅट्रिकचा निकाल मी माझ्या मनाच्या खोल गाभ्यात साठवून ठेवला आहे.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: