मी आणि माझ्या आठवणी


कथा सत्ताविसावी – बालक दिनाचा कार्यक्रम

 

माझा लहानभाऊ, अज्यापचं भाषण सुरु झालं; अन् माझ्या मन:पटलातील आठवणीचा एकेक पडदा उकलत गेला.

उन्हाळ्यात मोठ्याबाबाचा मुलगा, बापुराव बाबाला भेटला. त्याचा सासरा यवतमाळच्या जिनामध्ये काम करायचा. त्यांनीच फिटरचं काम लावून दिलं. त्याची पहिली बायको शांता मरण पावली होती. माणिक हा पहिलीचा मुलगा. लहान होता. एकदा मी असंच मोठ्याआईच्या घरी गेलो. मला पाहून तिचे डोळे डबडबले. अन् हुंदका फुटला. मला जाणीव होती की दु:ख शब्दाने व्यक्त करता आले नाही तर डोळ्यातून अश्रू वाहतात. तिचं रडणं पाहून म्हणालो,

‘मोठीआई, का रडतेस? काय झालं…? सांगशील तर…’

मी गावाला आलो की कोणी नाही कोणी, असंच मनात साचलेलं दु:ख मोकळं करत. मी शिक्षणात असल्याने मला शहाणा समजत की काय, कोण जाणे? मग अशा काही आशाळभूत नजरेने माझ्याकडे पाहत, जणू काही सार्‍या समस्यांचा उपाय माझ्याकडेच आहे.

‘अरे, आपला माणिक ना… निघून गेला. कुठे गेला माहित नाही.’ अशी मोठीआई रडतच म्हणाली.

‘किती दिवस झाले…?’

‘झाले असतील, आठ्क दिवस.’

‘का गेला…? माहित आहे का…?

‘नाही. पण सावतर माय व बापाच्या दुर्लक्षामुळे त्याला थारा मिळाला नाही. आमचीही परिस्थिती बेताची. आम्ही पण त्याचा सांभाळ करू शकलो नाही. कुठे गेला असेल बिच्चारा…!’ असे म्हणून तिने मोठा सुस्कारा टाकला. आई-बापाच्या वागणुकीमुळे त्याला शिकता आलं नाही की चांगलं राहता आलं नाही. त्याचं जीवन असंच भरकटत गेलं. त्याची कहाणी ऐकून मीही अंतर्मुख झालो.

बापुरावदादा ज्या शेतात भाड्याने राहत होता, त्या शेतमालकाला मारवाड्याचं शेत कुळकायद्यात मिळालं होतं. ते वाहायला तो अनुभवी माणूस शोधत होता. दादाच्या नजरेसमोर बाबा दिसला. कारण मामाची शेती गेल्यावर धंदा-व्यापारानिमित्त पायाला भिंगरी बांधल्यागत बाबा गावोगावी फिरत होता.

त्याने बाबाला विचारले,

‘काका, यवतमाळला शेत आहे. त्याच्या मालकाला निम्म्याबटईने द्यायचं आहे. तू वाहशील का?’

बाबाला वाटले की एकाठिकाणी असले तर मुलं पण सोबत राहून शाळा शिकतील. यवतमाळ शहरातच वावर असल्याने बरंच आहे. त्यामुळे होकार दिला.

आमचं आता ऊमरसरा गाव सुटणार, हे निश्चित झालं. या गावाला मी व बाई शिक्षणासाठी पाचव्या वर्गापासून राहत होतो. या गावाने आम्हाला भरभरुन दिलं. या गावाच्या कडू-गोड, चांगल्या-वाईट, सुखद-दु:खद अशा अनेक आठवणी मनाच्या कोंदणात कोरुन ठेवल्या. या गावाने आम्हाला जीवनाचा गाडा ओढतांना उदंड अनुभव दिले. शहाणपण शिकवलं. असं गाव आमच्या विस्मृतीत जाणार, या जाणीवेने काळीज कांपत होतं. दुसरीकडे आनंदाची गोष्ट अशी की आम्हाला यानंतर आई-बाबांच्या सहवासात राहायला मिळणार होतं.

त्या माणसाने त्याच्या घराजवळील टिनाची खोली भाड्याने दिली. पण त्यात कोणतीही सुविधा नव्हती. मी, आई-बाबा, अज्याप व बाई त्या एकाच खोलीत राहत होतो. त्यावेळी मी नववीत होतो. बाई आठवीत होती तर अज्याप चौथीत शिकत होता. उमरसर्‍यासारखं माझी शाळा येथूनही लांबच पडत होती.

हे शेत वंजारी फैलात होतं. मी दोन-तिनदा कधी बाबासोबत तर कधी शामरावदादासोबत बैलगाडीवर बसून कॉटन मार्केटमध्ये आलो होतो. त्यामुळे मला हा परिसर माहिती होता. या परिसरातच दळणाची चक्की होती. तेथे मला ज्वारी दळायला नेहमी जावे लागे. एकदा दळणाला पैसे कमी पडले; म्हणून तितक्या लांब घरी जाऊन पैसे आणण्याच्या विचाराने माझ्या अंगाचा तिळपापड झाला. बाबा तंतोतंत पैसे देतात; म्हणून मी त्याच्यावर वैतागलो होतो.

आमच्या खोली शेजारी आणखीन दोन खोल्या होत्या. म्हणजे तीन खोल्यांची कुडा-मातीची व छप्परावर टिनं असलेली चाळच होती, म्हणा !  पहिल्या खोलीत आम्ही, दुसर्‍या खोलीत बापुरावदादा अन् तिसर्‍या खोलीत त्याचा साळा धनपाल, असे तीन कुटुंब राहत होतो. धनपालसोबत त्याची आई राहत होती. तो कॉलेजला शिकत होता. त्याच्या बाबतीत आठवणीत राहील अशी गोष्ट घडली. त्याला तेंदू व्यापाराकडून चक्करचे काम मिळाले होते. धामणगाव रोडवरील करळगाव व आसपासच्या काही गावाला त्याला सायकलने जावे लागत होते. एक वर्ष हे काम शामरावदादाने पण केले होते. फकिरादाजी तर हे काम दरवर्षी करायचा. त्यावेळी धनपालला झोला गावाला मुलगी पाहायला बोलाविले होते. तो मला घेऊन गेला. फिरायला मिळते म्हणून मीही जायला हरखून गेलो होतो.

यवतमाळवरुन करळगावपर्यंत डांबरी रोड होता. परंतु तेथून कच्चा रस्ता लागला. कधी बैलगाडीचा तर कुठे पायरस्ता, कधी गावाच्या पांदणीतून तर कधी वावरातून, कधी नांगरटीतून तर कधी धुर्‍याधुर्‍याने जाणारा होता. गाडीच्या चाकाने, गायी-ढोराच्या खुराने गुळगूळीत झालेल्या मातीच्या रस्त्याने आम्ही गागरा उडवत सायकलने चाललो होतो. कुठेकुठे आजूबाजूला काट्याचे मोडकडीस आलेले कुंपण होते, तर कुठे बोरीच्या किंवा चिल्हाटीच्या फासा टाकून ठेवल्या होत्या. आम्हाला भर दुपारच झाली होती. उन्हाळ्याचे दिवसं असल्याने सूर्य आग ओगत होता. पुरं अंग घामाने भिजून गेलं होतं. अंगाचा उघडा भाग मातीच्या खकाण्याने मळकट व चिक्कट झालं होतं. अशा अवघड रस्त्याने तो मला पुढच्या दांडयावर बसवून सायकल कसाबसा चालवित होता. चालवितांना सायकल घसरत होती. आम्ही पडता पडता वाचत होतो. पण एकेठिकाणी मात्र त्याला तोल सांभाळता आला नाही. आम्ही दोघेही भाडभूड आदळलो. बरे झाले, काट्याच्या फासावर पडलो नाही. तरीही मला एकदोन ठिकाणी काटे रुतले व हाता-पायाला खरचटले होते. त्याला ओशाळल्यासारखे झाले होते. तो म्हणाला,

‘रामराव, आपण पडलो, असं कुणाला सांगू नको.‘

‘नाही सांगत.’ असं म्हटल्याने तेवढेच त्याला बरे वाटले.

आम्ही शेवटी पोहचलो. मुलीच्या वडिलांनी आगत-स्वागत केले. हात-पाय धुवायला पाट टाकला. आम्ही मातीने माखलेले हातपाय, तोंड धुऊन गादी टाकलेल्या बाजेवर बसलो. थोड्यावेळाने जेवायला बोलावीले. आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. कारण आम्हाला कसून भुका लागल्या होत्याच. त्या मुलीने जेवण वाढले. जेवणामध्ये दाळ, भात, पोळी, भाजी, चटणी – जे घरी एखाद्यावेळेस क्वचितच जेवत होतो, अशी चांगली मेजवाणी मिळाली. आम्ही मस्त जेवणावर ताव मारला. जेवता जेवता धनपालने पोरीला पाहून घेतले. जेवणानंतर पान-सुपारी घेऊन लगेच निघण्याची तयारी केली.

‘कळवतो तुम्हाला…’ असं म्हणून धनपालने वेळ मारून नेली. खरं म्हणजे त्याला लग्न करायचंच नव्हतं. तरीही मौजमजा म्हणून मुलगी पाहायला गेला होता.

शेतमालकाला मोठा मुलगा होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता.  स्वभावाने चांगला होता. म्हणून मला आवडत असे. त्याने मला सायकलवर बसवून जोडमोहा येथे खटेश्वरच्या यात्रेला नेले होते.

त्यावर्षी लागोपाठ दोन वर्षे पाऊस न पडल्याने जबरदस्त दुष्काळ पडला होता. गरिबांच्या हातातोंडाशी गाठ पडली होती. दुकानदार अव्वाच्या सव्वा भावाने लपवा-छपवी करत धान्य विकत. आम्ही पैशाअभावी घेऊ शकत नव्हतो. कंट्रोलच्या दुकानात ज्वारी, तांदूळ कमी प्रमाणात मिळत. त्याऐवजी हरबरा, वटाणे, बरबटी हे कडधान्य मिळायचं. रेशन कार्डावरील धान्य शामरावदादा उचलत होता. त्यामुळे आमचे हालच होत होते. सरकार बाजाराच्या दिवशी माणशी दोन किलो जव, हरबरे किंवा मैदा विकत. त्यासाठी खेड्यापाड्यातले लोक सकाळपासून रांगा लावत. त्यानेही भागायचं नाही. मग रताळी खाऊन कशीबशी भूक भागवत होतो. ‘कावरली गाय अन् काटे खाय’ अशी परिस्थिती झाली होती. तसेच सरकारने अमेरिकेतून लाल रंगाची ‘मिलो’ ज्वारी आयात केली होती. ही ज्वारी म्हणे तेथील डुकरांचं खाद्य होतं. ते आता भारतातील लोक खात होते. ही ज्वारी कंट्रोलच्या दुकानात मिळत होती.

एका रविवारी आम्हाला खायला दुसरं काहीच नव्हतं. फक्त रताळं होते. तेच उकळून खाल्ले. त्याने पोट काही भरलं नव्हतं. भाकर ते भाकरच, त्यानेच पोट भरते ! त्यावेळी बाई म्हणाली,

‘आत्ता कोणी पाहूणा आला, तर मज्जाच येईल, नाही का?’ खरंच आम्ही अंगणात सातर्‍या-बोथर्‍या टाकून झोपण्याच्या तयारीत असतांना फकिरादाजी टपकले. त्याला पाहून आम्ही हंसायला लागलो.

तो म्हणाला, ‘कावून बा, मला पाहून हसता?’

‘तसं नाही दाजी… आम्ही रताळे खाऊन झोपलो. तुम्हालापण तेच खावे लागेल. म्हणून वाईट वाटते. त्यामुळे हसायला आलं, ऎवढंच ! ’  बाई हसत हसत म्हणाली.

‘मी घरून भाकर आणली. तुम्हाला पाहिजे असंल तर या. घास घास खायला.’ असं त्याने म्हणल्यावर मी व बाईने दोन-चार घास खाल्ले. त्यावेळेस भाकर किती गोड लागत होती, म्हणून सांगू !

आई-बाबाने पूर्ण उन्हाळभर शेताची भर उन्हात अंगातून निथळणार्‍या घामाचे शिंपन करुन मशागत केली. त्याची पडीत शेती बाबाने मोठ्या मेहनतीने सुपीक करुन दिली. कारण शेत बर्‍याच वर्षापासून कोर्टकचेर्‍याच्या भानगडीत अडकल्याने तेथे काटेरी वनस्पतीचे बनच्या बन उगवले होते.

आम्ही सकाळपासून लोखंडी नांगराने शेत नांगरीत होतो. शेत नांगरतांना खिळे, बोल्ट, सळ्या असे काही-बाही लोखंडाच्या वस्तू जमिनीतून निघत. त्याशेतात पूर्वी कापसाचा जीन होता. त्याच्या शेतात विहीर होती. त्या विहिरीवर निरनिराळ्या जातीच्या बाया पाणी भरायला येत. तेथेही जातीभेद पाळीत. आम्ही नवीन असल्याने त्यांना आमची जात समजली नव्हती. शिवाय बाई विहिरीवर जायची; तेव्हा साडीचा उलटा शेव घ्यायची. त्यामूळे तिला परदेशी समजत. मग बाई त्यांचा बाट करण्याची भूमिका वठवायची. त्या गुंड उचलण्यास मदत करायला सांगत,  तेव्हा बाई म्हणायची,

‘नाही बाई… मला बाट होते.’ बाट करणार्‍या बायांवर बाई सुड उगवून मजा घ्यायची. म्हणजे जात कळल्यावरच त्यांना बाट होत होता, ऎरवी नाही…! आहे की नाही गंमत…!

त्या विहिरीचं पाणी डिझेल पंपाने उपसून भाजिपाल्याला देत होतो. त्याच्या शेतात आम्ही टमाटे, वांगे, सांबार, मेथी असा भाजीपाला लावला होता. आम्ही सर्वांनी विशेषत: आई-बाबांनी हाडाची काडे करुन, घाम गाळून शेतातून सोन्यासारखं पिक काढलं. म्हणून जीव दुखत होता. ऐवढे करूनही शेवटी काय झालं? जेव्हा पिक हातात आलं, तेव्हा त्या माणसाचे डोळे फिरले. त्याचं खरं रुप दिसलं. तरीही त्याच्या बाबतीत लोक सांगत होते की तो दिसते तसा नाही. मोठा फसवा आहे. तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सार्‍या सवलती घेत होता. पण बाबासाहेबांनी ज्या पक्षाला ‘जळतं घर’ म्हटलं, त्याच पक्षाच्या वळचणीला राहून सत्तेचे फायदे उपटत होता. त्याने दलित हॉऊसींग सोसायटी काढून काही लोकांची फसवणूक केली, असेही लोक सांगत.

तो भाजीपाला परस्पर विकून टाकायचा. त्याचा हिशोब पण देत नव्हता. त्याने आम्हाला ठकवलं होतं. खरं म्हणजे त्याला शेत तयार करुन आम्हाला हाकलून द्यायचं होतं. शेवटी तसंच झालं. आम्ही त्यावर पाणी सोडून तलावफैलात राहायला आलो. तलावफैल म्हणजे तलावाच्या काठावर वसलेली वस्ती. जवळच मारवाड्याचा कापसाचा जीन होता. या जीनात काम करणार्‍या गोरगरिब-मजुरांनी ही वसाहत वसवली होती. आम्ही बागडे यांच्या कुडा-मातीची एक लहानशी खोली भाड्याने घेऊन ठाण मांडलं होतं.

तेथील आगळा-वेगळा अनुभव म्हणजे सकाळी तलावाच्या काठावर परसाकडे बसलेल्या लोकांची भाऊ-गर्दी. अर्थात मीपण त्यात होतो. तेथे सुरक्षित जागा शोधणं मोठं जिकिरीचं काम. कारण माणूस व डुकराची एकमेकात मिसळलेली विष्ठा जिकडे-तिकडे पसरलेली… जागोजागी मचमच करणार्‍या व उगीच हुंगणार्‍या डुकरांना टाळणं मोठं अवघड… याच तलावात शहरातील सांडपाणी वाहत येत होतं. त्यामुळे हिरवट रंगाचा तवंग तरंगतांना दिसायचा.

तलावाच्या बाजूला मोठी विहीर होती. त्यातूनच शहराला पाणी पुरविल्या जात होतं. म्हणजे हेच घाण पाणी विहिरीत झिरपल्या जात नसेल, कशावरून? पण तेथे पाणी शुद्धीकरणाच्या मशिनी लावल्या होत्या, म्हणा !

घरात अभ्यासाला मोठी अडचण होत होती. रात्रीला कंदिलाच्या उजेडात आणि दिवसा सुट्टीच्या दिवशी तलावाजवळील आंब्याच्या सावलीत मी अभ्यास करीत होतो.

परिस्थिती कशी पालटते पहा ! एक काळ असा होता की बाबा शेतातला माल मंडईत ठोक भावात विकायचा. यवतमाळची बाजारपेठ कमी पडे, तेव्हा अमरावतीला पाठवायचा. आता मात्र आई-बाबावर मंडईतून भाजीपाला विकत आणून तो चील्ल्लरमध्ये विकण्याची पाळी आली होती. दोघेही सरोज टाकीजवळील रोडच्या बाजूला दांडीपारडे घेऊन बसत. रविवारच्या बाजारात लिंबू संभार, अद्रक, वटाणा असे काहीतरी विकण्याचा धंदा करीत. मीपण त्यांच्यासोबत राहून मदत करीत होतो.

एकदा आई सांगत होती, ‘आम्ही घरी येत असतांना आमच्या समोर दोन मुलं चालत होते. त्यांच्या गोष्टी आम्हाला स्पष्टपणे ऎकू येत. वर्गात कोण कोण हु्शार आहेत, अशा त्यांचा विषय होता. ते तुझ्याच वर्गातले असले पाहिजेत. कारण जुमळे पण हु्शार आहे. असा तुझ्या नावाचा ऊल्लेख ऎकून आमची छाती गर्वाने फुलली.’ ही गोष्ट सांगून आईने माझं कौतुक केलं. मी वाचलं होतं की, आई-बापानी कौतुकाची थाप मुलाच्या पाठीवर मारली की तो मुलगा यशस्वी जीवनाकडे वाटचाल करीत असतो.

मी वर्गात पहिल्या रांगेत बसत होतो. बसण्यासाठी बेंच होता. समोर डेस्कवर पुस्तक-वही ठेवता येत होतं. आंत दप्तर ठेवायला जागा होती. बसण्याची अशी खास व्यवस्था मी पहिल्यांदा पाहिली होती. आमच्या निळोण्याच्या शाळेत जमिनीवर मांडी घालून तरटपट्टीवर बसत होतो. शाळेत श्रीमंताचे, शेटे-भाट्याचे, बामणाचे गुबगुबीत, छान-छान कपडे घातलेले मुलं होते. त्यांची भाषा आमच्यापेक्षा वेगळीच. काही मराठीत तर काही हिंदीत बोलत. अशा नवलाच्या गोष्टी मला शाळेत पहायला मिळत. त्यामुळे मी काहीसं बुजाडून जात होतो. नंतर हळूहळू बदललेल्या वातावरणात रुळून गेलो.

माझ्या सोबत मारवाड्याचा सुनिलकूमार बसायचा. तो रोज कडक इस्त्रीचे कपडे घालून यायचा. त्याच्या कपड्याला व डोक्याच्या केसाला सुगंधी तेलाचा वास घमघमायचा. त्याच्या वह्या, पुस्तके, अत्यंत निटनिटके व कव्हर लावलेले. त्यावर नाव, वर्ग, विषयाचं नाव, शाळेचं नाव असं छापलेले लेबल पाहून मीदेखील तसेच लेबल लावत होतो. त्याचे पुस्तकं व दप्तर नवीन-कोरे… माझे मात्र जुने… त्याचं मोठं घर… खालच्या तळमजल्यावर दुकान… नोकर-चाकर, पंखा, लाईट, गाडी असं सारं काही होतं. त्याचा श्रीमंती थाट पाहून मी चकित झालो होतो. त्याला मिळालेलं चांगलं वातावरण, सोयी-सुविधा व संस्कारात त्याचं व्यक्तिमत्व घडत होतं. माझ्या व्यक्तिमत्वावर मात्र गरिबीची झांक होती. असं वाटायचं त्याला जे मिळत आहे ते मला का नाही मिळत? त्याचे बापजादे श्रीमंत म्हणून तो श्रीमंत ! माझे आई-बाप गरीब म्हणून मी गरीब ! हेच त्याचं कारण होतं ना !

त्याचे अक्षर मोत्याच्या दाण्यासारखे सुंदर होते. त्याला पण माझ्या जवळ बसायला आवडत असे. कारण माझे अक्षर त्याच्यासारखेच दिसत होते. त्यामुळे आमचं छान जमायचं. तो पाहायला जसा सुंदर, गोरापान तसाच बुध्दीने पण हुशार. त्याच्या घरी त्याला शिकविण्यासाठी शिक्षक येत असल्याचे त्याच्याकडून कळले होते. इतर मुलं त्याचा थाट-माट व हुशारी पाहून खार खात. त्याचा मत्सर व हेवा करीत. त्यामुळे त्याला फारसे मित्र नव्हते. तो माझा मित्र असल्याचे पाहून माझे मनोबल वाढत असल्याचे जाणवत होते. माझ्या वर्गात आणखी कमलकिशोर नावाचा मारवाड्याचा हुशार मुलगा होता. वर्गात या दोघांची चढाओढ लागायची. आणखी धोपे, कुळकर्णी नावाचे हुशार मुलं होते. त्यानंतर माझा चौथा किंवा पाचवा क्रमांक लागत होता.

त्यावेळी आम्हाला जोशी, गाडे, चिद्दरवार, कासलीकर, पनके असे सर होते. चिद्दरवार सर हेडमास्तर होते. कासलीकर सर शास्त्रीय संगीतकार व गायक होते. खेळण्यात मी असा-तसाच होतो. मी कधी खेळण्यात भाग घेतला नाही. निळोण्याच्या शाळेत मात्र मी कबड्डी व खोखोचा खेळ खेळत होतो. माझ्या वर्गात चिकटे नावाचा कुणब्याचा मुलगा होता. त्याच्या सोबत मी हात-लावणीचा खेळ खेळत होतो. तो फार चपळ. त्याने मला एकदा घरी नेले. त्याच्या घरी तो व त्याची आजी राहत होते. तोपण खेड्यातून आला होता. त्याने मला जेवू घातले. आजीने छान जेवण बनविले. बसायला पाट दिला. जेवणात पोळी, भाजी, भात, दाळ, चटणी व वरुन तेल असे पदार्थ होते. असं पंचपक्वानाचं-नव्हाळीचं जेवण मी पहिल्यांदा जेवलो होतो. नंतर काही दिवसांनी तो माझ्यापासून दूर राहत असल्याचे जाणवत होते. त्याला माझी जात समजली असावी. जेथे जाईन तेथे ही जात माझी पिच्छा सोडत नव्हती. चांगली चिकटून बसली होती. याची मला सारखी खंत वाटत राहायची.

माझ्या वर्गात माझ्याशिवाय ‘जुमळे’ आडनावाचा दुसरा मुलगा होता. मुलं आम्हाला भाऊ-भाऊ समजत. तो शिंपी जातीचा होता. ‘जुमळे’ हे आडनाव इतर जातीत असल्याने माझी जात लवकर कळत नसे. एकदा का खरी जात कळली की मुलं माझ्यापासून दूर दूर राहत.

शाळेत जोशी सर इंग्रजी शिकवीत होते. सरांनी प्रश्न विचारले तर उत्तर देण्यासाठी हुशार मुलांसोबत मी सुध्दा हात वर करत होतो. एकदा त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा मी हात वर केला. त्यावेळी प्रश्नाचं उत्तर कदाचित चुकलं असेल म्हणून की काय, सरांनी मला दाटलं.

‘उथळ पाण्याला खळखळाट फार. बस खाली…’ असं कुत्सितपणाचं बोलणं ऎकून मी हिरमुसला झालो. माझ्या अंगात नैराश्याची छटा पसरली. तेव्हापासून सहसा मी कचरत होतो. त्यानंतरच्या जीवनात आत्मविश्वास हरवून बसायला हीच गोष्ट कारणीभूत ठरली की काय, कोण जाणे !

शाळेचं व आत्ताच्या घराचं अंतर जवळपास वंजारी फैलाएवढंच होतं. जातांना बुरडाचे घरं लागायचे. ते बांबूचे टोपले, डाले, परडे, सुपं, कोंबड्याचे बेंडवे, तट्टे असे काहीबाही विणतांना दिसत. त्यांचं कलाकुसरीचं काम पाहण्यासाठी मी थबकत होतो. माझ्या वर्गातल्या सुलभेवारचं घर पण येथेच होतं. त्याचादेखील हाच धंदा होता. आमच्या गावाचा पोलीस पाटील, पोवार येवढ्यातच राहत होता. बाबाचं त्याचेशी दाट ओळख होती. तो त्याच्याकडे चिलीम ओढायला जायचा. त्याचं कोळंबीच्या रस्त्यावर वावर आणि कोठा होता. आम्ही त्याच्या वावरात निंदण-खुर्पण करायला जात होतो. रस्त्यात शेटे सरांचं घर लागत होतं. ते ड्राईंगचा विषय शिकवीत. त्यांचा पुतण्या माझ्याच वर्गात होता. त्याच्या घरापर्यंत आल्यावर आम्ही दोघेही मिळून शाळेत जात होतो.

अज्याप नगरपरिषदेच्या शाळेत होता. तसा तो शाळेत फार हुशार… त्याचा चौथीत नगरपरिषदेच्या सार्‍या शाळांमध्ये पहिला नंबर आला होता. ३०० पैकी २९७ गुण पडले होते. त्याची हुशारी व बुध्दीमत्ता पाहून त्याचा वर्गशिक्षक व मुख्याध्यापक त्याच्यावर अपार जीव लावीत. आईने त्याच्या लहानपणची गोष्ट सांगितली होती. त्याला पहिल्या वर्गात टाकलं; तेव्हा बिमार पडला होता. म्हणून तो शाळेत जाईनासा झाला. एकदा आईसोबत वावरात जागलीला आला. तेवढ्या रात्री धीयाऽ धीयाऽऽ असा आवाज एैकू आला. कोणीतरी बैलांना घेवून पांदणीने गावात येत होता. तो आवाज ऎकून अज्याप म्हणाला,

‘आई, तो कोण आहे? एवढ्या रात्री बैलाला हाकलत आहे?’

‘हो रे, बाबा… शाळा नाही शिकलं की एवढ्या रातच्यानं बैलाला घेऊन यावं लागते.’

तेव्हा आईने शिक्षणाचा विचार त्याच्या लहानग्या अंतर्मनात बाळकडूच्या रुपात नक्कीच पाजलं असावं, ऎवढं मात्र खरं !

१४ नोव्हेंबरला शहरातील नगरपरिषदेच्या सर्व शाळांमिळून बालकदिनाचा कार्यक्रम आयोजित झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची खूप गर्दी झाली होती. त्यांचा पाखरांसारखा किलबिलाट सुरु होता. त्यांच्या पाठीमागे शिक्षक, निमंत्रित पाहुणे आणि शेवटी मी आणि बाहेरचे मुलं हा कार्यकम पाहात होतो. झेंडा वंदन झालं. तिरंगा झेंडा मोठ्या डौलाने फडकला.

अज्याप स्टेजवरील खुर्चीत ऎटीत बसला होता. तो कार्यक्रमाचा अध्यक्ष होता. त्याला भाषण देण्यासाठी शिक्षकांनी तयार केलं होतं. त्याने खादीचा पांढर्‍या रंगाचा नेहरु शर्ट, चुडीदार पायजामा व टोपी घातली होती. त्याच्या शर्टावर गुलाबाचं फूल ऊठून दिसत होतं. त्यामुळे तो रुबाबदार वाटत होता. त्याने शिक्षकांनी लिहून दिलेलं भाषण चांगलं पाठ केलं होतं.

तो भाषण करण्यासाठी उठला. चांगलं खणखणीत आवाजात भाषण ठोकलं. सार्‍यांची मनं जिंकला. भाषण संपल्यावर उपस्थितांनी भरभरुन टाळ्या वाजवल्या. ते पाहून माझा उर अभिमानाने व आनंदाने भरुन आला.

 

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: