मी आणि माझ्या आठवणी


दमडूमामाचे शेत गेल्यावर आमच्याकडे चार एकर शेती राहीली. ह्या वावरात जातांना लवण लागत होता. पावसाळ्यात दोन्ही थड्या भरुन पाणी वाहत असे. धो धो पाऊस येऊन गेला की पूर पण येत असे. गावातल्या बाया धुणे धुवायला येत. काठावर कचईचे झाडं होते. त्याला देवळाच्या घुमटासारखे हिरवेकंच चिमुकले, टणक कवचाचे फळ लागत. तेव्हा काळेशार खळखळणारं पाणी व कचईचे तुरुंबे पाहतच राहावासे वाटे. इतके ते सुंदर दिसत !
हा लवण उन्हाळ्यात कोरडा पडायचा. वाळूच्या थंडाव्यात व थडीच्या सावलीत आम्हाला खेळायला मोठी मजा वाटायची. एकदा नाग-नागिणीचा लाग दिसला. ते एकमेकांना चिपकून शरीर उचलतांना पाहून जणू काही नाचत आहेत असे वाटायचे. त्यांचे फुत्कार अंगावर शहारे आणीत. इतक्या जवळून त्यांचा रंगलेला विलोभनीय मिलन सोहळा मी पहिल्यांदाच पाहिला होता. एरवी साप दिसला की लोक मारायला उठत. तेव्हा माझं तरल मन दु:खत होतं. साप हा शेतकर्याकचा मित्र. तो अन्नधान्य फस्त करणार्या उंदरांना खातो. सापांमुळे अन्नधान्याचं नैसर्गिकरीत्या संरक्षण होतं. ही गोष्ट खेडूत लोकांना माहिती नाही, असं नाही. पण करणार काय? माणूस साप चावून मरू नये म्हणून मारावे लागते. पण साप चावल्यावर जर वेळीच वैदकीय उपचार खेड्यातच उपलब्ध होवून वाचत असेल तर सापाला अभय मिळाल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढंच खरं आहे.
वाल्ह्याच्या वावरात बौध्दपुर्याातील लोकांसाठी ग्रामपंचायतीने विहीर खोदली होती. या विहिरीला फारसं पाणी लागलं नव्हतं. पण पावसाळ्यात खूप पाणी राहत होतं. मी वावरात जातांना त्यात डोकावल्याशिवाय राहत नव्हतो. कारण पोहत असलेले किंवा काठाच्या दरातून तोंड बाहेर काढलेले दोन-चार सापं मला दिसत. शिवाय गहिरे, गडद निळे पाणी मला आकर्षित करीत होते. ते पाहून जणू आकाश पाण्यात उतरले की काय असा भास होत होता.
एकदा शंकरबुढयाने रात्रीच्या वेळेस या विहिरीत जीव दिला. त्याला कुष्ठरोग झाला होता. त्याला खेड्यात महारोग म्हणत. त्याने आजाराला कंटाळून जीव दिला की घरच्याच लोकांनी त्रासून त्याला विहिरीत आणून टाकले, असे कोणी शंका घेत. या घटनेनंतर विहिरीजवळून जायला भीती वाटत होती. लवण ओलांडला की रामधनचं वावर लागायचं. नंतर आमचं. त्याच्या वावरात विहिरीजवळ कवठाचं झाड होतं. त्याचे पिकलेलं कवठ मी खात होतो. आमच्या शेतातली काही जमीन भरकाड होती. ओलित नसल्याने पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागे. त्यामुळे फारसं उत्पन्न होत नसे.
शेतात शामरावदादा बहुदा हायब्रीडची ज्वारी पेरायचा. पुर्वी गावरान ज्वारी होती. तिचे धांडे उंच व जाड असत. कणीस पण मोठं. ती खायला चवदार वाटायची. ज्वारी सोंगून कणसं खुडल्यावर येथल्याच बाडात कडबा ठेवत. मी लहान असतांना पेरखंडाचे घर, बैलगाडी असे काहीबाही बनविण्यासाठी तासनतास या बाडात बसत होतो. एकदा फणकटात पायाच्या घोट्याजवळ फण टोचल्याने खांडूक झालं होतं. त्याची चोंद कायमची राहिली. नंतरच्या हरीतक्रांतीच्या काळात हायब्रीडची ज्वारी आली. ही ज्वारी उंचीने मध्यम पण तण कमी वाढत असे. कमी दिवसात पीक हाताला येत असे. खायला तेवढी चवदार वाटत नव्हती, परंतु पीक मात्र भरपूर येत होतं. ही ज्वारी एकसारखी वाढून कणसं सरळ आभाळाकडे जात; तेव्हा जणू काही काळपट चादर हातरल्यासारखी दिसत असे.
पाखरा-चिमण्यांचे थवेच्या थवे कणसावर येऊन बसत. त्यांना घाबरविण्यासाठी दादा बुजाडणं करायचा. बुजाडण म्हणजे माणसासारखा बनविलेला पुतळा ! मी मळ्यावरून गोफणीने दगडं भिरकावित होतो, नाहीतर फुटलेल्या पिंपाला बदड बदड झोडपून त्या आवाजाने पाखरं उडवित होतो.
मला वावराच्या धुर्याड-धुर्यापने फिरायला मोठी मजा वाटत होती. रानझेंडूचे टिचुकले झाडं धुराभर दाटीवाटीने पसरलेले, लहान-मोठ्या आकाराचे व लाल-पिवळे-पांढर्यार रंगाचे, नाजूक आणि मोहक फुले वार्या च्या झोतावर डोलतांना पाहून माझं मन भरून येत असे. धुर्यानवर उगवलेल्या वेलीपैकी जिवतीच्या वेलीला सुंदर पांढर्याभ रंगाचे फुले लागत. त्याच्या पाकळ्या व दोडे खायला छान लागायचे. बोरीच्या झाडासारखे काटे असलेल्या व आंबटसुर लागणारे आरुण्या पण खायला मस्त वाटत. दशरथमामाच्या शेताला लागून असलेल्या धुर्याआवर घाटुर्ण्याचे बुटके झाडं दिसत. त्याचे फळं खायला कुटूर कुटूर लागत. मी त्याला शोधायला धुर्यापने फिरल्याशिवाय मला राहवत नसे.
याच धुर्यानवर शेंबडीचं झाड होतं. त्याच्या पिकलेल्या पिवळ्या रंगाच्या फळाचा गर चिक्कट आणि शेंबडासारखा होता. म्हणूनच ‘शेंबडी’ नाव पडलं असावं. हे फळ खायला गोड लागत. या वावराला ‘शेंबडीचं वावर’ म्हणत. केशवलभानाच्या शेताला लागून असलेल्या धुर्या वर आवळ्याचं झाड होतं. त्याचे हातपूरते आवळे जमिनीवर पाय उंचावून किंवा फांद्या वाकऊन तोडत होतो. त्याच्या जवळच बेहड्याचं व बाहाव्याचं झाड होतं. बेहड्याच्या झाडाला लागणारे फळं बकर्याी खात. वरचं मास खाऊन आतील बी टाकून देत. मग फोडून त्यातील गाभा खात होतो. ते काहिसं गुळचट लागत. पण जास्त खाल्ले की अंग फिरल्यासारखे वाटत होते. याच धुर्याावर बोरीचे झुडपं होते. मी पिकलेले आंबट-गोड बोरं खात होतो. दादा त्याच्या फांद्या उन्हाळ्यात तोडत होता. त्याचा फास रचून कुपासाठी वापर करायचा.
बाहाव्याच्या झाडाला ऎन उन्हाळ्यातल्या दुपारच्या रणरणत्या उन्हात मस्तपैकी पिवळ्या कळ्यांचे आणि फुलांचे झुमकेदार तुरुंबेच्या तुरुंबे दुरुनच पाहतांना डोळे थंडगार झाल्यासारखे वाटत. त्या झाडाला पिवळ्या गोळ्यांचे झुंबर जागोजागी बांधले की काय, असे वाटायचे. उन्हात पडणार्याग पावसाच्या सोनेरी सरीसारखे, टप्पोर्या थेंबासारखे ते दिसत. आम्ही त्याच्या फुलांची भाजी करून खात होतो. त्याचे फळ म्हणजे लांबच लांब शेंगा. त्या वाळल्यावर त्यातला आतील पापुद्र्याचा भाग काढला की पोकळ होत असे. त्याचा पापुद्रा पण खायला गोड लागायचा. त्याला भोकं पाडून बासरीसारखे वाद्यं बनवून वाजवीत होतो. मला बासरी शिकायची इच्छा होती. पण नाही जमलं !
तसेच धुर्यायवर बाभळीचं झाड होतं. त्याला भरभरुन पिवळ्या रंगाचा फुलोरा यायचा. झाडाच्या फांद्यावर देवचिमण्या खोपे बांधून आपला जीव झाडावर टांगत. ह्या देवचिमण्या गवताच्या बारीक बारीक काड्या चोचीमध्ये धरुन आणतांना, त्याचा सुरेख खोपा विणतांना, त्यांचे कलाकुसरीचे काम मी अधाशीपणे पाहत होतो. काही दिवसाने त्यांचे चिल्ले-पिल्ले चोची बाहेर काढतांना दिसायचे. हवेच्या रोखाने झुलणारे खोपे पाहून असं वाटायचं की, जणू काही पिल्ले झुलत्या बंगल्यात राहत होते. कुणी कंटक त्यांच्या घरावर हल्ला करु नये म्हणून देवचिमण्या बाभळीसारख्या काटेरी व अवघड झाडावर किंवा नदीकाठीच डोहाच्या बाजूनेच खोपे बांधत.
दुसर्याक धुर्या वर जुनाट, मोठं लिंबाचं झाड होतं. त्याच्या खोडाला पोखरुन पोपटाने ढोल्या बनविल्या होत्या. एकदा दामूने ढोलीत हात घालून पोपटाचे दोन पिल्ले पकडले होते. याच झाडाच्या खोडावर पिंपळाचं रोपटं उगवून मोठं झालं होतं. एका झाडावर दुसरं झाड पाहून मला मोठं कुतूहल वाटत होतं. दुसर्यालच्या जीवावर पोसल्या जाणार्यांपना बांडगुळ म्हटल्या जाते, ते हेच असावं हे मला कळलं होतं.
धुर्यालनं कटुल्याच्या वेली होत्या. त्याची भाजी छान लागायची. हेच कटूले दादा बाजारात विकायला घेऊन जायचा. पावसाळ्यात सर्पाचं झाड उगवत. त्याला लाल-पिवळ्या रंगाच्या छटा असलेलं मकई सारखं कणीस लागायचं. या झाडाजवळ सर्पाचा वावर राहत असल्याने त्याला सर्पाचं झाड म्हणत.
सुरुवातीच्या काळात बैलं-खाटं होते. तेव्हा दादा शेत घरीच वाहायचा. एकदा दादाला विचारून कोठ्यातला वखर, काडवणीवर टाकून, दोन्ही बैलाचे कासरे धरुन पांदणीने शेतात घेऊन गेलो. सुरुवातीला काही तासं वखरतांना बैलाने मोलाचे सहकार्य केले. पण नंतर बोढीने आपल्या असहकार्याचं आंदोलन सुरु केलं. तिने खाली पाय दुमडून फतकल मांडलं. सांड्या बैल उभा तर ही बोढी खाली बसलेली ! दोघांच्या मानेवरचं जू खाली वर झालेलं. मी त्या बोढीचं शेपूट कितीही पिरगाळलं, पुराणीने कितीही ढोसलं, तिच्यावर कितीही ओरडलं, तरीही ती काही केल्या उठत नव्हती. मी रडकूंडीला आलो. तेवढ्यात दादा आला म्हणून बरं झालं. त्याने ते दृष्य पाहिलं व माझ्याकडे पाहून हसला.
‘अरे, तू त्यांच्यासाठी नवीन आहेस. म्हणून आवरत नाहीत. दे कासरे माझ्याकडे.’ असं म्हणून त्याने बोढीला आवाज दिल्याबरोबर बोढी ताडकन उठली आणि तुरुतुरु चालायला लागली. वारे मुकं जनावरं…! ‘जिसका बंदर वोही नचाये’ असं जे म्हणतात, तेच खरं आहे. मी लहान असतांना वखरावर बसून डावडाव करत होतो. तिफणीने पेरणी झाली की बीया मातीत झाकण्यासाठी झाडाच्या फांदीची फसाट लावत. त्यावर बसून डावडाव करत होतो.
पेरणीच्या काळात शेतकर्यांरना पेरणी करा असं ओरडून सांगणारा पक्षी म्हणजे पावशा ! एखाद्या झाडावर बसून सारखं ‘पेरते व्हाऽऽ, पेरते व्हाऽऽऽ’ असा साद घालत असल्याचे मी खूपदा ऎकलं. खरं म्हणजे ‘पेरते व्हा’ म्हणण्याऎवजी ‘पेरऽऽ पेवाऽऽ’ असाच आवाज माझ्या कानात घुमायचा. पाण्यावर उमटलेले तरंग जसे चक्राकार होऊन प्रसरण पावतात, तसाच या पाखराचा पहिल्या पट्टीतला मधुर आवाज हळूहळू वाढत जाऊन शेवटच्या पट्टीत जायचा; तेव्हा माझं स्तब्ध असलेलं मन उंच शिखराकडे उडत जात असल्याचा भास व्हायचा.
मी वाचलं होतं की, ‘चातक पक्षी उन्हाळभर तहानलेला असतो. पहिल्या पावसाच्या थेंबाने तो तहान भागवतो.’ परंतु हा पक्षी कोणता? कसा दिसतो? ते मला कधी कळलेच नाही ! कदाचित ती कविकल्पना पण असू शकते. जर असलाच तर तो हाच ‘पेरऽऽ पेवाऽऽ’ म्हणणारा पक्षी असावा, असे वाटते.
नंतरच्या पडत्या काळात शेती वाहण्यासाठी साधने राहिले नसल्याने दादा भाड्या-भुसार्यातने शेत वाहत होता. उन्हाळ्यात शेतात वाढलेल्या पालव्या मी व बाई कुर्हा डीने तोडत होतो. खोल जमिनीत रुतून बसलेले कुंदा-हरळीच्या मुळा खोदुन जाळत होतो. खेड्यात एक म्हण होती. ‘ज्याच्या वावरात हरळी-कुंदा, त्याने करू नये शेतीचा धंदा’ खरुजेचा चट्टा जसा पसरते, तसेच हे गवत पसरत जाते. म्हणून त्याला वेळीच नष्ट करावे लागत होते. तसेच दगडं-गोटे वेचून धुर्याावर टाकून द्यायचो. ‘बांध नाही शेताला नि पीक नाही हाताला’ म्हणून आम्ही फुटलेली बांधी बुजवित होतो. अशीच कामे दादाने जेव्हा चार एकर शेती बरबड्याला घेतली, तेव्हा पण करत होतो.
एकावर्षी बरबड्याच्या वावरात भुईमूंग पेरला. त्यावर्षी पावसाने डोळे वटारले. आम्ही वावरात जाऊन आभाळाकडे एकटक पाहत बसायचो. कधी आभाळात ढग जमतील व पावसाचा वर्षाव सुरु होईल, असं वाटायचं. पण वरूणराजाने मेहेरनजर दाखविली नाही. शेवटी पेरलेले दाणे पाखराने व किड्या-मुंग्याने खाऊन टाकले. नंतर पाऊस आल्यावर ज्वारीची दुबार पेरणी केली. पण पुरेशा पावसाअभावी त्यावर्षी नापिकी झाल्याने आमचे हालच झाले होते.
एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही की आम्ही लहानपणी गावात ‘धोंडी’ मागत होतो. आम्हाला भोंगळं करुन लिंबाच्या डहाळ्या कमरेला गुंडाळीत. लिंबाच्या डहाळ्या बांधलेल्या काडीला मध्यभागी उलटा बेंडूक टांगून, त्याचे टोक हातात धरुन घरोघरी,
‘धोंडी धोंडी पाणी दे, धान-कोंडा पिकू दे,
धोंडीचा हिवसा, पाणी आला दिवसा…!’ असं म्हणत नाचत होतो. सोबत मुलं-मुली राहत. आमच्या अंगावर पाणी ओतत व दाळ-दाणा, पीठ झोळीत वाढत. संध्याकाळी स्वयंपाक बनवून आम्ही सामूहीकपणे जेवत होतो.
एकदा दादाने दशरथमामाच्या शेतातील खळ्यात ज्वारीचे कणसं टाकून पाथीसाठी मला बोलाविले होते. मेडीला जुतलेल्या बैलाच्या मागेमागे मीपण फिरत होतो. त्यांच्या पायाच्या खुराने ज्वारीचं कणसं चुरल्या जाऊन दाण्याबरोबर भूस बाहेर पडत. हा भूस नाका-डोळ्यात घुसत होता. उघड्या अंगा-खांद्यावर चिकटून बसत होता. काचकोरली टाकल्यासारखे अंग खाजवत असे. दादा आजूबाजूला पडलेल्या कणसाला दाताळ्याने ओढायचा. मधातच बिडी पेटवून फुकत राहायचा.
त्यारात्रीला दादा बैलं खुंट्याला बांधून भाकर आणण्यासाठी घरी गेला. मी एकटाच खळ्यावर होतो. जवळच्या इरल्यात थंडीने कुडकुडत दादाची वाट पाहत बसलो होतो. बराच वेळ झाला तरी दादा आला नव्हता. शेताला लागून असलेल्या लवणाच्या काठावर मसणखुटी होती. माझ्या आजीला, आईच्या आईला तेथेच गाडलं. बाभळीच्या झाडाखाली. स्मशान हे माणसाचं शेवटचं ठिकाण. येथेच माझी आजी कायमची विसावली.
त्याकाळी गावात प्रेताला कधीही जाळत नसत, तर खोल खड्डा खोदून त्यात गाडत. वर दगड-मातीचा भराव टाकून उचलणीचे दगडं ठेवत. त्यामुळे खड्ड्यात मुर्दा अजूनही झोपून आहे की काय, असं वाटायचं. तसा मी लहान असल्याने आजीच्या मयतीला गेलो नव्हतो. पण दादाने मला सागितले की आजीला येथेच गाडलं. म्हणून ती जागा मला माहित झाले. त्या रस्त्याने एकट्याला जायची भीती वाटायची. जर जायची पाळी आलीच तर त्याजागेकडे पाहत नव्हतो. पाहिलंच तर तिरकस नजरेने पाहत होतो. त्यावेळी बायांना मयतीला मसनखुटीत येऊ देत नसत. का येऊ देत नसत, ते मला माहित नाही. पण तशी प्रथा होती.
आजी मेली तेव्हाचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं झालं. अशावेळी भीतीची गोष्ट नेमकी आठवते. आजी मामाकडे राहत होती. तिचं नाव नगाई. ती म्हातारी झाली होती. तिच्या आजूबाजूला मी व सुदमताबाई दोघेही खेळत होतो. मरणाच्या आधी आजीने आम्हाला खाण्याचे पान मागितले. तिला तंबाखू-पानाची तलफ होती. आम्ही विड्याचे पाने देण्याऎवजी तुळशीचे पाने दिले व ते खाल्ल्यावर तिने लगेच प्राण सोडला. आजी म्हणजे पिकलं पान, कधीतरी तुटून पडणारच ! ही नैसर्गिक प्रक्रिया माझ्या ध्यानात होती. तरीही ही गोष्ट आठवल्याबरोबर, माझं अंग शहारलं. त्यातल्या त्यात दादा लवकर न आल्याने मी आणखीनच घाबरलो. तो येईपर्यंत जीव मुठीत घेऊन बसलो होतो. तो आल्यावर कुठे जीवात जीव आला. इतका मी अंधाराला व काल्पनिक भुता-खेताच्या गोष्टीला घाबरत होतो !
घरची गरिबी व खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी मी व जनाबाई जेव्हा-केव्हा सुट्टीत घरी यायचो; तेव्हा गावात मिळेल ते काम करत होतो. मी व बाई लोकांच्या शेतात बी डोबणे, पेरणी करणे, निंदन करणे, वखर, नांगर, तिफण, डवरण, फसाट हाकलणे, ज्वारीचे कणसे तोडणे, मळणी करणे, भुईमुंगाच्या ओल्या शेंगाची तोडाई करणे, मुंग, उडीद तोडणे, धान-तूर सवंगणे, कापूस, कापसाची मेंगी, भुईमूंगाचा सरवा वेचणे, बांध घालणे, झाडाझूडपाच्या पालव्या छाटणे इत्यादी अनेक कामे करत होतो.
एकदा मी बाईसोबत तुळशीरामदादाच्या वावरात कापूस वेचायला गेलो. पहिला वेचा असल्याने अनुसयावहिनीने सीतादेवी केली होती. तिने कापसाच्या फांदीला चीटूकला पाळणा बांधून त्यात लहानसा दगड टाकला. झाडाच्या बुंद्याजवळ दोन लहान दगडं ठेऊन हळद व कुंकु लावले. मग दुध-दही-भाताचं बोणं वावरात शिंपडलं. त्यामुळे कापसाचे पीक भरपूर येते, असा समज ! अंधश्रदेच्या आहारी जाऊन अन्नाची नासाडी करणे, दुसरं काय?
उन्हाळ्याच्या सुट्टीत शहरातून भाड्याच्या सायकलने कुल्फ्या आणून गावात व आजूबाजूच्या खेड्यात विकत होतो. तसेच बर्फाची लादी आणून, रंद्याने बारीक कीस पाडून, गोळा बनवून, त्यावर गोड रंगीत पाणी शिंपडून विकत होतो. मी यवतमाळच्या बसस्टॅंडवर निर्वासित-सिंद्याची मुले गोळ्या, बिस्केट विकतांना पाहत होतो. त्यांच्याच प्रेरणेने मी सुट्टीच्या दिवशी गोळ्या, बिस्केट, नानखटाई, डबलरोटी आणून गावात विकत होतो. खेड्यातील लोक सकाळीच कोंबड्याच्या बागेला, झाकटीलाच उठत. बाया सडा-सारवण व माणसं गाई-ढोरांच शेण काढण्यात मग्न होत. अशा वेळेला उठून, डोळे चोळत डबलरोटी गावात फिरुन विकत होतो.
आमच्या येटाळात डोमा व काशीनाथ तर लभाणपूर्या त परभ्या लभाण वाढईकाम करायचे. ते शेती कामासाठी लागणारे अवजारे म्हणजे तिफण, डवरा, वखर, नांगर, काडवण, बैलगाडी, तिचे चाकं, धुरं, घरातल्या बाजा असे बरेच कामे करीत. ते वासल्याने लाकडाला तासतांना, किकरं-पटाशीने खोरुन घेतांना, आरीने कापतांना, गिरमीटने छिद्र पाडतांना आणि रंध्याने गुळगुळीत करतांना मी मन लाऊन पाहत होतो. मधामधात वासला, किकरं-पटाशीला खरपावर पाणी टाकून घासत. मी त्यांच्या कामातील हे बारकावे आत्मसात करुन घेत होतो. तसेच दादा कधीकधी सुतार काम करायचा. तो कुणाच्या घराचा इमला बांधण्याचे काम घेत होता. मग मी त्याच्या कामात हातभार लावायचो. मीपण खरोल्याच्या जंगलातून सागाचे लाकडे आणून बाजा बनवीत होतो. कधी गावात तर कधी शहरात नेऊन विकत होतो.
गावात ग्रामपंचायतीची विहीर बांधणे सुरू होते. त्यावेळी दादा सरपंच होता. हि विहीर पांढरी गावाच्या रस्त्याने, लवणाच्या काठावर खोदली होती. त्यावेळी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. मी व बाई या कामावर जात होतो. मी एकनाथदाजी सोबत रेती आणण्यासाठी वाघाडी नदीवर जात होतो.
एकवेळ अशी होती की एकनाथदाजी – जेव्हा बाबा मामाची शेती वाहत होता, त्यावेळी आमच्याकडे गडी म्हणून काम करीत होता. आता मी त्याच्याच सोबत मजूर म्हणून काम करत होतो. नियतीने आमच्यावर अशी पाळी आणली. तो बाबाच्या नात्यातील भिकाचा जावई लागत होता. म्हणून मी त्यांना दाजी म्हणत होतो. मी नदीतील रेती काढून बैलबंडीत भरून द्यायचो. मग तो घेऊन जायचा. भर उन्हात हे काम करावे लागत होते. एकनाथदाजीला अशा कामाची सवय होती. मला सवय नसल्याने त्रास व्हायचा.
उन्हाने रेती जबरदस्त गरम व्हायची. हाता-पायाला चटके लागत. पायात चप्पल नसायची. मग पळसाचे मोठमोठे पाने तोडून चप्पल बनवीत होतो. ही चप्पल जास्त वेळ टिकत नव्हती. लवकरच फाटायची. मग पुन:पुन्हा बनवावी लागत होती. दुपारनंतर शेवटच्या फेरीत मीपण बैलबंडीच्या मागेमागे अनवाणी पायाने निघत होतो. मग तोच पळसाच्या पानाचा प्रयोग ! रस्ता तुडवतांना थकवा येत होता. घशाला कोरड पडत होती. अंगात त्राण उरत नव्हता. अवघा जीव क्षणोक्षणी मेटाकुटीला येत होता. उन्हातान्हात राबल्याच्या सार्या खुणा चेहर्याषवर उमटत. रापलेल्या, करपलेल्या, ताणलेल्या चेहर्याअवर दु;खाचा उद्वेग नुसता पसरत होता.
माझं जीवन म्हणजे अंगाला उन्हाचे चटके देणारं, जीवाची लाही लाही करणारं, घशाला कोरड पाडणारं, घामाने ओलंचींब करणारं, कानाला गरम झाका झोंबणारं, हात-पाय भाजणारं, मस्तक गरम करणारं, डोळ्याची आग करणारं बनलं होतं. घाम गाळल्याशिवाय दामाची किंमत कळत नाही, याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेत होतो. पण हेही दिवसं पालटतील; अशी लहर मनांत चमकून जात होती. त्याच उमेदीने पुन्हा आयुष्याचा खडतर रस्ता तुडवणे सुरु होत होते.
पैसे मिळविण्यासाठी आणखीन काही ऊपाय शोधले होते. एकदा अंगणात मांडव टाकून बाईने कारल्याच्या बिया लावल्या. त्यावर रोज पाणी टाकत होतो. चार-पाच दिवसातच कोंब ऊगवून आले. त्या आमच्या डोळ्यासमोर भरभर मांडवावर चढून गेल्या. पाहतां पाहतां पूर्ण मांडव वेलीने वेढून गेला. तिला आलेल्या कळ्या, पिवळी फुले व चिमुकले कारले पाहून आमच्या आनंदाला ऊधान भरुन आले. काही दिवसातच भरघोस कारले दिसायला लागले. आम्ही बाजाराच्या दिवशी सकाळीच कारले तोडत होतो.. दादा बाजारात विकून हप्त्याचा बाजार करून आणत होता.
तसेच बाईने कोंबड्या पाळल्या. या कोंबड्या व पिल्लांचा मोठा त्रास… खुडंS खूडंSS म्हणत सारखं हाकलत राहावे लागे. दिवसभर बाहेर चरणार्या. कोंबड्या संध्याकाळ झाली की बरोबर घरी येऊन खोलीत घुटमळत राहत. तेव्हा त्यांची स्वामीनिष्ठा पाहून मला मोठं कुतूहल वाटायचं. त्यांना डाल्याने बेंडल्यावरच त्यांची कुरकुर बंद होत असे. कोंबड्यांची अंडे आम्ही घरी खात नव्हतो, तर टोपलीत उबविण्यासाठी ठेवत होतो. कोंबडी अंड्यातून पिल्ले निघेपर्यंत त्यावर बसून राही. पिल्ले मोठे झाले की दादा कोंबडे आणि खुडक कोंबड्या बाजारात विकायला नेऊन, त्या पैशातून बाजार करुन आणत असे.
एकदा कोंबड्यावर मरगड आली. कोणत्यातरी अनामिक रोगाने मरत होत्या. त्यांना कुठलंही गावठी औषध लागत नव्हतं. मग झुरुन मान खाली टाकण्याआधीच कापून खात होतो. ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ या म्हणी प्रमाणे आमच्या जेवणात कोंबडीचं जेवण असायचं.
आम्ही मोहाचे फुले वेचायला सकाळीच झाकटीत जात होतो. झाडाखाली फुलांचा सातरा पडलेला असायचा. ओल्या फुलात दाळ टाकून भड्डा करुन खात होतो. मोहाला जनावरं पण खात. त्याला वाळवून लोक दारु काढीत. मोहाच्या फळाची पीकलेली साल खायला गोड लागत असे. त्याच्या टोया यवतमाळचा मुसलमानतेली विकत घ्यायचा. तो त्याचं तेलघाणीत तेल काढीत होता.
मी उन्हाळ्यात टोया विकण्याचं काम करत होतो. हे झाडं जंगलाच्या शेतात राहत. झाडावर चढून फळं तोडून अणुकुचीदार दगडाने फोडून घेत होतो. असं करतांना हाताला चीक डिकत होता. मग हा चिकटा काढण्याचा उद्योग बनून जायचा. वाळल्यावर विकायला नेत होतो. एकदा असंच फळं तोडतांना माझ्या समोरच हिरवागार साप फांदीवर दिसला. मी फार घाबरलो. तसाच उडी मारुन झाडाच्या बाहेर पळालो. असेही काही जीवघेणे प्रसंग येत होते.
मी उन्हाळ्यात लोकांच्या घरावरील खपरेल फेरण्याचे काम करत होतो. त्यावेळी माझे नाव त्यावर कोरलेले दिसते काय, म्हणून पाहण्याचा छंद जडला होता. कारण आम्हीच ते खपरेल बनविले होते. एकदा आम्हाला उपाशी झोपावे लागले. झालं असं की दिवसभर खपरेल फेरण्याचे काम केल्यावर उशिरा पैसे मिळाले. घरी रांधून खायला काहीच धान्य नव्हते. मी त्या दिवशी संध्याकाळी वहिनीला पैसे देऊन मामीच्या घरी तांदळाच्या कणी आणण्यासाठी पाठवीले.
‘माय, पायलीभर कणी देतं कावं?’ कणी म्हणजे तांदूळाचा बारीक चुरा.
वहिनी मामीला माय म्हणायची.
‘आत्ता…? दिवा लावल्यावर…? नाई बाई, मी नाई देत.’ मामी फनकार्यााने म्हणाली.
‘अवं, पैसे आणले… फुकट नाई मागत…’
‘तरी… नाई बाई, मी नाई देत, एवढ्या रातच्याला…!
‘घरात काई नाई. देणं वं माय. काऊन अशी करतं?’ वहिनी काकुळतीने म्हणाली.
‘मला नको सांगू. मी म्हणते, दाळ-दाणा भरून नाही ठेवावं का घरी? कायले या वक्ताला कुणाच्या घरी फिरा लागते.’
‘तुवं खरं आहे वं माय, पण पैसे नाही पाहिजे का? आत्ता रामरावने तुकाराममामाजीचे कौलं फेरले म्हणून पैसे मिळाले.’
‘तुमचा सदानकदाचा असाच घणाणा राहते, बाप्पा…! या वखताला मी नाही देत.’ असे म्हणून मामीने वहिनीला झिडकारलं. दगडाला पाझर फुटेल, पण मामीला फुटत नव्हता.
आता रातची संज कशी भागेल, या काळजीत वहिनी लहानसं तोंड करुन घरी आली. गावात मामीच्या घराशिवाय दुसरीकडे कुठे मिळण्यासारखं नव्हतं. त्यादिवशी घरातली चूल रुसून बसल्याने पेटलीच नाही. खेड्यात दिवा लागणीच्या आधीच सामान घ्यावे लागत होते. नाहीतर घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते, असा समज आहे. अशा अंधश्रद्धेने आम्हाला त्या दिवशी कटोकट उपाशी ठेवलं. एकीकडे दिवसभराच्या कष्टाने, दगदगीने रात्रीला झोपतांना अंग कसं आंबून गेल्यासारखं वाटत होतं, तर दुसरीकडे रिकाम्या पोटाने झोप येत नव्हती.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: