मी आणि माझ्या आठवणी


कथा पंचविसावी – कधीही न विसरणारा दिवस

 

गावातील लोक आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी यवतमाळला जात. तेथे पाटीपूर्‍यात मिरवणूक, कव्वाली, भाषणे इत्यादी भरगच्च कार्यक्रम होत. तेथील रोशणाईने आमचे डोळे अक्षरश: दिपून जायचे. त्या सोहळ्याचा झगमगाट व भारावलेल्या वातावरणाने आमचं मन उचंबळून यायचं. हा दिवस म्हणजे आमच्यासाठी खुशीचा व पर्वणीचा दिवस असायचा. खेड्यापाड्यातील लोक बैलबंडी, रेंग्या, दमण्या जुतून किंवा पायीपायी न चुकता येत.

प्रसिद्ध कव्वालीकार ‘नागोराव पाटनकर’ यांच्या कव्वालीचा कार्यक्रम सर्वांनाच आवडत असे. गायनाच्या सुरुवातीला फिड्डलच्या वाद्यांमधून झंकारणारे धुंद सूर हृदयाला भिडून जात होते. पटाचाराची कहाणीने अक्षरश: रडू कोसळत असे. इतकं ते गाणं भावनाशील आणि काळजाला थेट भिडणारं होतं.

त्यावेळी बाबाने कोळंबीला आमराई विकत घेतली होती. तेथे आई, बाबा, देवदासदादा सोबत मीपण राहत होतो. हे गाव आमच्या चौधरा गावापासून तिनक कोस दूर होतं. देवदासदादाने बैलगाडीवर कच्चे आंबे यवतमाळला आणले होते. मीपण त्याच्यासोबत आलो होतो. गाडी जवळपास सोडून आम्ही हा कार्यक्रम पाहत होतो. तेथे खाण्याच्या वस्तू खूप होत्या. दादा मला भजे, गुलगुले, आलुबोंडा, जिलेबी अशासारखे पदार्थ खाऊ घालत होता. त्यामुळे माझी मजाच मजा झाली होती.

कोळंबीबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या गावापासून या गावापर्यंत घनदाट सागाचं जंगल पसरलं होतं. हे झाडं इतके उंच की असं वाटायचं, ‘आभाळ जरी कोसळलं तरी हे झाडं त्याला वरचेवर झेलून घेतील अन् जमिनीवर बागडणारे जीव-जंतूचे प्राण वाचतील.’

बाबांनी त्या जंगलातली गोष्ट सांगितली होती.

’कोळंबीवरुन ढोराचे वाळलेले कातडे डोक्यावर घेऊन मी यवतमाळला विकण्यासाठी जात होतो. भर जंगलातून जात असतांना चार-पाच जंगली कुत्र्यांचे झुंड आडवे झाले. त्या कुत्र्यांना पाहून माझी घाबरगुंडी ऊडाली. पण प्रसंगावधान राखून एका मोठ्या खडकावर कातडे जोरात आदळले. त्याचा इतका भला मोठा आवाज झाला की ते कुत्रे घाबरुन पळून गेले.’

ही गोष्ट त्यावेळसची आहे ज्या वर्षी मी नववीत शिकत होतो; तेव्हा शामरावदादाने जांब गावातील आमराई घेतली होती. हे गाव माझ्या गावापासून दीड कोस दूर होतं. तेथे दळायला जात होतो. तेव्हा पाण्यावर चालणारी चक्की होती. तिचा दुरुनच कुकऽऽ कुकऽऽ आवाज यायचा. त्यावरुन चक्की चालू असल्याचे दुरुनच संकेत मिळायचे. कधीकधी या गावाच्या कोडवाड्यात ढोरं कोंडण्यासाठी किंवा कोंडलेले ढोरं सोडवून आणण्यासाठी जात होतो. बस, ऎवढ्या कामासाठी या गावाचा संबंध येत होता.

आंबे राखण्यासाठी दिवसभर राहत होतो. वानरांनी, पाखरांनी आंब्याची नासाडी करु नये किंवा कोणी चोरु नयेत म्हणून प्रत्येक झाडाजवळ जाऊन फिरफिर फिरुन लक्ष ठेवावे लागे. उन्हाळा असल्याने सूर्य खूप तापत होता. त्याच्या आगीने अंगाची लाही-लाही व्हायची. डोकं विस्तवावर ठेवलेल्या तव्यासारखं गरम व्हायचं. पाय निखार्‍यावर ठेवल्यासारखे भाजून निघायचे. दोन्हीही कानाला गरम झांका लागायच्या. पेटत्या ज्वालेकडे पाहिल्यावर डोळ्याची जशी आग होते, तशीच उन्हाकडे पाहिल्यावर आग होत होती. राहून राहून गरम लघवी व्हायची. सारखी उन्हाळी लागत होती. घामाने पूर्ण अंग ओलंचिंब होऊन जायचं. कुत्र्याने लघवी केल्याप्रमाणे घामाचे ओघळ कपड्यावर उमटत. कपड्याचा कुबट वास नाकात दाटून यायचा. दुपारी सूर्य जणू आग ओकत आहे, असंच वाटायचं. त्याच्या तावात सारी जमीन होरपळून निघत होती. गाई-ढोरं झाडाच्या सावलीत तोंडाची हनुवटी हालवत, रवंथ करत पाय दुमडून विसावत. पाखरं इवलसी चोच फाकून धापा टाकत झाडाच्या फांद्यावर बसलेले दिसत. कुत्रे तोंडातून लाळ गाळत व डोळे मिटून, मुंडकं समोरच्या दोन्ही पायात खुपसून शांतपणे झोपेच्या डुलक्या घेतांना दिसत.

झाडं…! ते पण पानगळीने उघडे-नागडे पडले होते. नुकतीच फुटलेली हिरवीकंच कोवळी पालवी अंगाखाद्यावर खेळवून अंग झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. अशाही परिस्थितीत वाटसरुं व चीट-पाखरांना सावली देत होते. पण स्वत: मात्र उन्हाने भाजून जागा सोडीत नव्हते. यालाच म्हणतात खरा परोपकार, नाही का?

कधीबधी वावटळ व गराड सुटलं की अक्षरश: धुमाकूळ सुरु राहत असे. त्यात पालापाचोळा व मातीचे कण गरगर फिरून आभाळाकडे दूरवर उडून जात. त्याची तिव्रता इतकी जबरदस्त की पाला-पाचोळ्यासारखं आपणही उडत जाऊ की काय, अशी भीती वाटायची ! नाका-डोळ्यात धूळ व बारीक कचरा घुसल्याने डोकं कसं भणभणून जात असे. डोक्याचे केसं विस्कटून जाई.  शिवाय चेहरा व उघडं अंग माती-गागर्‍याने माताळून जाई. कधी अकाली पाऊस, तर कधी गारा पडायच्या. त्यातच वाराधून व गराड सुटायचं. आंब्याच्या डांग्या तटातट तुटून पडायच्या. खाली कैर्‍याचा सातरा पडायचा. त्या वेचता वेचता रात्र व्हायची. दुसर्‍या दिवशी शहरात विकायला न्यावे लागे. इतकं काम अंगावर येऊन पडत असे. त्यामुळे जीवाची मोठी तळमळ, तडफड व  मन:स्ताप होत असे.

अशीच आमराई यवतमाळ-आर्णी रोडवर तरोडा गावाला शामरावदादाने नामदेव व उध्दवच्या भागिनदारीत घेतली होती. ती राखायला मलाच घेऊन गेला होता. तेथील तट्ट्याच्या झोपडीत आम्ही राहत होतो. दादा स्वयंपाकात सुगरण असल्याने जेवण बनविण्याचं काम त्याच्याचकडे राहात होतं. तो दाळ-भाजी खुड्या मिरच्याची बनवायचा. कारण वावरात मिरच्या-मसाला वाटायला कुठे आला पाटा-वरंवटा? पण ही खडीदाळ इतकी चवदार बनवायचा की हात-बोट चाटत खाल्ल्याशिवाय राहवत नसे.

दादा जांबच्या आमराईत रात्रीला जागल करायचा. मी पाहिलं, त्याला ‘भीती’ कधी वाटतच

नव्हती ! आमराई गावापासून दूर होती. तरीही तो एकटाच मळ्यावर राहायचा. कधीकधी शहरात गेला की तेथून परत येतांना रात्र व्हायची. तरीही तो अंधार्‍या रात्री एकटाच यायचा. अशा वेळी आई म्हणायची,

‘मोठा हिंडगोडा, बाप्पा…! अंधार न अंधार पडून जाते. तरी पत्ता राहत नाही. तुले कायचाच भेव लागत नाही. मोठा वाघ आहेस…! दिवसा-ढवळ्या अंधार पडायच्या आत येत जाणं, माह्या बाप्पा !’ अशी ती अंतकरणातून उसळून आलेली काळजी व्यक्त करीत होती.

त्याच्या जवळची दुसरी आमराई गावातल्या दयारामने घेतली होती. मी त्याला आबाजी म्हणत होतो. लोक दयाराम बुढ्ढा म्हणायचे. म्हातारा होता. केसं पार पिकून गेले होते. तोंडावर, हाता-पायावर नांगरटलेल्या वावराप्रमाणे सुरकुत्यांचे जाळे दिसत. तरीही टणक होता. काठीच्या आधाराने थोडा वाकत पण झपाझप पावले टाकत चालायचा. कष्टातलं शरीर होतं त्याचं ! तो वेळप्रसंग पाहून नातूच्या नात्याने कधीमधी माझी थट्टा-मस्करी करायचा.

तो आमच्या गावातील उद्योगी व्यक्ती होता. जसे आंब्याच्या मोसमात आंब्याचा व्यापार करायचा, तसाच इतर मोसमात निंबू, सिताफळ, जांब विकायचा. परंतु त्याने कोणाकडे मोलमजूरी केल्याचे मी कधी पाहिले नाही. त्याच्या घरी एकेकाळी दुकान होते. गावातील लोकांना उधारीत सामान घेण्याची मोठी सवय… लोकं काय, उधारीत हत्ती पण विकत घेतील. पण वसुली होत नव्हती. काही बेईमान पैसे पचवत. त्यांच्याशी भांडण करणे शांत वृतीच्या लोकांना सहसा जमत नसे. म्हणून कदाचित त्यांनी दुकान बंद केले असावे. आमच्याही आंब्याचे पैसे बर्‍याच जणांनी दिले नव्हते.

आंबा पाडाला आल्यावर आंबे तोडून घ्यावे लागत होते. हे काम गावातील सुरेभान व सुखदेव करीत होते. त्याला मजुरी म्हणून तोडलेल्या आंब्याच्या प्रमाणात काही आंबे द्यावे लागत असे.

एखाद्यावेळी झाडावर पाने गुंडाळलेले दिसत. ही कामे मोठ्या कलाकुसरीने तेलमुंग्या करीत. त्यात ते त्यांचं अन्न-धान्य साठवीत. ह्या मुंग्या चावल्या की मोठी आग व्हायची. म्हणून मी झाडावर चढायला भीत होतो.  दादा घरीच आंबे पिकविण्यासाठी गवतावर आंब्याचे थर रचून माच टाकायचा. मग गवताचा कचरा व आंब्याचा वास घरभर पसरायचा. पिकलेले आंबे गावातील लोक उधारीत नेत. बाकीचे यवतमाळच्या मंडईत न्यावे लागे. तेथे रात्रीला आंब्याची छाटणी करून पिरॅमिड सारखा ढीग रचून ठेवावे लागे. सकाळी दलाल चिल्लर विक्रेत्यांना हर्रास करीत.

मी सकाळीच आमराईत येत होतो. दयारामआबा जेवण करून यायचा. त्याचं पिण्याचं पाणी फडके गुंडाळलेल्या भोपळ्यात भरून आणीत होता. येतांना माझी भाकर घेऊन यायचा. तो येईपर्यंत त्याचे आंबे मीच राखत होतो.

घरुन अनवाणी पायानेच रस्ता तुडवत येत होतो. खेड्यातील गरीब लोकांप्रमाणे माझ्याही पायात चप्पल राहत नव्हती. कारण ती अत्यावश्यक गरज आहे व त्यासाठी पैसा खर्च केलाच पाहिजे, असे कोणालाच वाटत नसे. अनवाणी पायानेच उन्हा-तान्हात, पाण्या-पावसात नद्या-नाल्यात, माती-चिखलात, दगड-धोंड्यात, डोंगर-दर्‍यात, झाडा-झुडपात, गवता-काडीत व काट्या-कुट्यात चालण्याची सवय झालेली होती. चांगल्या चप्पला सहसा खराब रस्त्याने टिकत नसत. बरेच लोक रबरी टायरच्या वापरीत. दयारामआबाजी सुध्दा त्याच वापरीत होता. त्या लवकर झिजत नसत. स्वस्त राहत. मला मात्र लाज वाटायची. चामडी चप्पला वजनाने जड आणि फटक-फटक वाजत. त्याच्या टाचेला घोड्याच्या पायाला ठोकतात, तसा नाला लावीत. अशाही चप्पला मी घालत नव्हतो. खरं म्हणजे घालत नव्हतो, म्हणण्यापेक्षा विकत घेण्याची ऎपत नव्हती, असंच म्हणता येईल. त्यापेक्षा अनवाणी पायाने चालण्याची खूप सवय झाली होती. गाडीच्या चाकाने, गायी-ढोरांच्या खुराने गुळगूळीत झालेल्या मातीवर अनवाणी पाय ठेवला की जणू काही विस्तवाच्या जळत्या निखार्‍यावर पाय टाकला, असे वाटत असे. रस्त्यावरील बारीक-सारीक गोट्यावर पाय अधिकच भाजून निघत असे.

चुकून काट्यावर पाय पडला की होणार्‍या वेदना विचारून नका ! मग ‘काट्याने काटा काढावा’ लागत होता. नाही निघाला तर घरी गेल्यावर सुई टोचून काढत होतो. तरीही नाही निघाला, तर खोरलेल्या जागेत खायचे तेल सोडून दुसर्‍या दिवशी पिळून काढावे लागे. लहान-सहान काटे तर तसेच पायात मुरत. काटा मुरल्याने कुणाला कुरुप होत असे. बाबाच्या तळपायाला असाच कुरुप झाला होता. कुरुपाचे मास धारदार पात्याने कापून घेत होता. वेळेवर काढला नाहीतर ’काट्याचा नायटा’ होते, अशातला तो प्रकार होता.

एकदा मी वाल्ह्याच्या खारीतून माझ्या वावरात जात होतो. त्यावेळी पर्‍हाटीचे कोंब बाहेर आले होते. म्हणून कुणी त्या वाटेने जाऊ नये, यासाठी त्याने मुद्दाम बाभळीचे उलटे काटे रोवून ठेवले होते. मी नेहमीप्रमाणे उड्या मारत चाललो असतांना, काटा पायात कचकन घुसला. त्याने इतक्या तिव्र वेदना झाल्या की मी गपकन खाली बसलो. काट्याला बोचणं तेवढं कळतं !  पण रुतणार्‍याला काय वेदना होत असतील, हे त्याला कुठे ठाऊक?

दुपार झाली की विहिरीजवळच्या झाडाखाली भाकर खात होतो. पाडाच्या रसासोबत भाकर खाण्यात काही औरच मजा यायची. मीठ-मिरची सोबत खोबर्‍या सारखा लागणारा कच्चा आंबा खायला आणखी मजा यायची.      कोळंबीच्या आमराईच्या विहिरीत खूप झींगे होते. मी बालटीने पाणी काढून, तोंडाला फडके लाऊन डोहणात ओतत होतो, तेव्हा फडक्यात झिंगे जमा होत. असा झिंग्यासोबतचा खेळ बराच वेळ चालत राहायचा. संध्याकाळी आई मस्तपैकी त्याची चमचमीत चटणी बनवायची. भगवान बुध्दांच्या शिकवणीतील ‘प्राणीमात्राची हिंसा करु नये’ हे तत्व त्यावेळेस खरं तर उमगलंच नव्हतं.

दुपारचं वातावरण कसं शांत वाटत होतं. फक्त झाडाच्या पाना-फांद्यातून अवखळपणे वाहणार्‍या वार्‍याचे मंजुळ गाणे तेवढे ऎकायला येत. मग भाकर खाल्ल्यावर आलेली सुस्ती घालविण्यासाठी झाडाच्या सावलीत टॉवेल टाकून आराम करायचो. मुंग्या, माकोडेसारखे किडे अंगावर चदून त्रास देत, तर दुसरीकडे मातीचे बारीक खडे पाठीला रुतत. अंग टाकल्यावर थोड्या वेळाने तोंडावर ऊन यायची. त्यामुळे सारखी जागा बदलावी लागे.

मी त्यावेळी खेड्यातील लोकांप्रमाणे मीही स्वस्तातला टॉवेल गळ्याभोवती गुंडाळून घेत होतो. हा टॉवेल डोक्याला बांधायला, कानं झाकायला, घाम, हातपाय पुसायला व झोपतांना उपयोगात यायचा.

वानरांचा कळप झाडावर चढले की खाली उतरवीणे महाकठीण… आंब्याची नासाडी करीत. एका झाडावरुन हाकलले की दुसर्‍या झाडावर पळत. हातातली गुल्लेर पाहून शेंड्यावर जाऊन बसत. कधीकधी घरी जातांना वानरांच्या झुंडी येत. तेव्हा हुसकावून लावणे गरजेचे होत असे. रात्रभर जरी चिडीचूप असले, तरीही सकाळी काय धिंगाणा घालतील, काही सांगता येत नव्हतं !

एकदा गोधणीला बाबाने आमराई घेतली. तेथे एका वानराला गुल्लेरचा दगड लागला होता. तो मुर्च्छित होऊन पडला. त्याला पाणी पाजले. पण वाचला नाही. गुल्लेरच्या दगडाने कितीतरी पाखरं, मीठ्ठू मेलेत, त्याची गणतीच नाही ! पाखरं आंबा चोचीने टोचे मारुन अर्धवट खात. एक फोडला की दुसरा खात. पाखरांनी खाल्लेला आंबा गोड लागतो, अशी आई सांगत होती. म्हणून पाखरांचे उष्टे आम्ही आंबे आम्ही खात होतो.

त्यादिवशी आंबेडकरजयंतीची सारेजण लगबगीने तयारी करीत होते. मी सुध्दा जाण्याच्या कल्पनेने सुखाऊन गेलो होतो. मी शहरातल्या शाळेत शिकत असल्याने वर्गमित्र भेटतील; म्हणून चांगले कपडे असले पाहिजे, असं वाटायचं. मी येण्यापूर्वी कपडे धुण्याचा गोटा साबण विकत आणला होता.  खेड्यात हाच साबण मिळायचा. कारण तो स्वस्त होता.

माझ्याकडे अंगात घातलेला पैजामा व शर्ट असा एकच ड्रेस होता. दोन्हीही पांढर्‍या रंगाचे. पैजामा पायाजवळ चिरला होता. काट्याकुट्यातून जातांना फाटला असावा. तो देशाच्या नकाशाप्रमाणे चित्रविचीत्ररित्या फाटल्याने शिवता येत नव्हता. म्हणून फाटलेल्या चिंध्या एकमेकाला बांधल्या होत्या. कधीकधी रागाने, मीच जिर्ण झालेला कपडा फाडून टाकायचा. कारण कपडे फाटल्याशिवाय आम्हा भावंडांना दादा नवीन कपडे घेऊन द्यायचा नाही, असा प्रघात होता. सणावाराला किंवा शाळा सुरु झाली की नवीन कपडे मिळत. तोपर्यंत जुन्याच कपड्याने भागवावे लागत होते.

एखाद्या वेळेस बाबा चिंधी बाजारात न्यायचा. श्रीमंत लोक हे कपडे वापरुन थोडाफार फाटला, डाग पडला किंवा मयत झाला तर बोहारणीला विकत. मग ते या बाजारात विकायला आणत. त्याला ‘चिंधीबाजार’ म्हणत. गरीब लोक बिनदिक्कतपणे हे कपडे विकत घेत. त्यावेळेस कोणीतरी वापरलेले आहेत, अशी भावना मनात येत नव्हती. कपडे म्हणजे कपडे ! ते जुने असो, की  नविन ! त्यातच आम्ही खुशीने हुरळून जायचो. एक-एक कपडा घालून पाहत होतो. तो लहान-मोठा झाला की दुसरा घालत होतो. अशा कपडे घालण्या-काढण्याच्या प्रक्रियेत मोठी मजा वाटायची. जेव्हा नवीन कपडे शिवण्यासाठी टेलर माप घेत असे, तेव्हा तो क्षण अत्यंत खुशीचा वाटत असे. गालातल्या गालात बर्‍याच वेळपर्यंत आनंदाच्या उकळ्या फुटत राहायच्या.

शेतीत काम करणारे लोक गायी-ढोरांना पाणी पाजायला, दुपारी आणि संध्याकाळी विहिरीवर आणीत. शेत नांगरून-वखरून झाले की लाकडी नांगर किंवा वखर काडवणावर टाकून बैलं ओढत घरी घेऊन जात. त्यांचे आऊतं विहिरीजवळूनच जात असल्याने लक्ष ठेवावे लागे. फुटक्या बालटीने पाणी काढून डोहणीत ओतत. पाणी काढता काढता अर्धेक पाणी विहिरीतच सांडत. बालटी कॊणी नेऊ नये; म्हणून मुद्दाम फुटकी ठेवली असावी. मी सुध्दा ही बालटी तोंडाला लाऊन पाणी पित होतो. पाण्यात कधीकधी कचरा किंवा वळवळ करणारे जंतू दिसायचे. मग खांद्यावरच्या मळकट टॉवेलाने पाणी गाळून पीत होतो.

वानरे पण विहिरीवर येत. कारण नदी-नाल्याचे पाणी आटले होते. मी त्यांची गंमत पाहत राहायचा. एकेक वानर विहिरीत उतरून बाकीचे पहारा देत. त्यांचे उष्टे व गढूळ पाणी पिण्यास काहीच वावगे वाटत नव्हते.

दुपारचा सूर्य थोडा कलल्यावर मी अंगातला पैजामा व शर्ट काढून कमरेला टॉवेल गुंडाळला. कपडे भिजवून दगडी साबणाने दगडावर घासायला लागलो. त्याला फेस येत नव्हता. दगडीच साबण तो…! काही केल्या उगाळत नव्हता. कपड्यावर आंब्याच्या रसाचे पिवळसर व तेलकट डाग ठिकठिकाणी पडले होते. शिवाय कुत्र्याच्या मुतासारखे घामाचे ओघळ पडलेले होते. त्यामुळे कितीही घासले, तरी काही केल्या निघत नव्हते. इतकी दुरावस्था झाली होती. एव्हाना ह्रुदयात दाटून आलेला हुंदका आवरता आला नाही. मग…! मग, मला एकाएकी रडू कोसळले. डोळ्यातून टपटप आसू गळायला वेळ लागला नाही. सारखा स्फुंदत स्फुंदत रडत होतो. एकीकडे कपडे खसाखसा घासत होतो तर दुसरीकडे फुसफुसून रडत होतो. तरी कपड्याचा मळ, डाग जसा होता, तसाच !  संध्याकाळ होत आली. मी आता जाऊ शकत नाही, याची तिव्रतेने जाणीव झाली. रडण्यामुळे गालावर ओघळणारे आसू टॉवेलने पुसता पुसता घाईस आलो. मी कितीही सावरण्याचा प्रयत्‍न केला, तरी डोळ्यातून वाहणारे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. मग तसेच मनसोक्तपणे वाहू दिले. शेवटी धुतलेले कपडे थोडेसे सुकल्यावर तसेच अंगावर घालून घेतले.

दयारामआबाजी झाकट पडल्यावर खाकरत-खाकरत माझ्याजवळ आला. आम्ही रोज दोघेही त्यावेळेस घरी जाण्यास निघत होतो. तो म्हणाला,

‘का रे, आज आंबेडकरबाबाच्या जयंतीला गेला नाहीस…?’

मी मान हलवून, ‘नाही’ म्हटले.

पुढे तो काहीच बोलला नाही. कदाचित त्याने माझी केविलवाणी अवस्था ओळखली असावी. दारिद्र्यात पिचलेल्या लोकांना एकमेकांच्या भावनांची मोठी कदर असते ! मुक्या मुक्यानेच ते एकमेकांचे दु:ख समजून पोटात ठेवतात ! दु:खाचे अश्रू डोळ्यातच आटवून अन् दु:खाचे घोट पोटात रिचवून मी अंधारलेला रस्ता तुडवत चालत होतो. चालता चालता आबाजीने बंडीतल्या खिशातून चंची काढली. त्यातला तंबाखू अन् चुना काढून घोटला. त्यातला चिमुटभर मला दिला. मी तो ओठाच्या चिमटीत ठेवला. दु:ख विसरण्यासाठी त्याने मला तंबाखाची घुटी दिली असावी. पण मी तो प्रसंग नाही विसरू शकलो…!  कधीही नाही…! तो दिवस आठवला की माझे डोळे आताही पाणावल्याशिवाय राहत नाही. माझ्या जीवनातील कधीही न विसरणारा, तो दिवस होता !

 

 

 

Advertisements

Comments on: "कथा पंचविसावी – कधीही न विसरणारा दिवस" (1)

  1. Terrible !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: