मी आणि माझ्या आठवणी


कथा चोविसावी – कोंबड बाजार

 

आई कधीमधी आम्हाला बर्‍याच गोष्टी सांगायची. तिने एकदा सांगितलेली गोष्ट मला चांगली आठवते. ती म्हणाली,

‘तू दूधपिता असतांना पोलिसांनी आम्हाला पकडले. तुहा बाबा वाडीतल्या लवणात घरी पिण्यासाठी मोहाची दारु काढत. त्यांनी दारुच्या दोन शिश्या नहाणीतल्या नांदीमध्ये ठेवल्या होत्या. त्यात माही नवीन चोळी भिजवत ठेवली होती. तेवढ्यात पोलिसांची धाड पडली. त्यांनी शिश्या व माही चोळी जप्त केली. कोर्टात केस सुरु झाली. तुह्या बाबाने शहरातला फाटक, बामण वकील लावला. त्याकाळी बामणाचेच वकील राहत. त्या केसच्या तारखेवर हजर होण्यासाठी आम्ही सकाळीच तुले कडेवर घेऊन यवतमाळला निघालो.

पावसाचे दिवसं होते. एकाएकी आभाळात ढग जमा झाले. सर्वदूर काळोख पसरला. लागलीच मोठ्ठाले थेंब पडू लागले. आम्ही मोहाच्या झाडाचा आसरा घेतला. तुले पोटाशी धरुन शेवाने लपेटून घेतलं. घोंघावणार्‍या वार्‍याचा आवाज मी म्हणत होता. जोर्‍याचा थंड वारा वाहत होता. कानशिलं थंडगार पडत चालले होते. त्या धुवांधार पावसाचा सामना करत आम्ही जीव मुठीत घेऊन, खोडाजवळ एकमेकांना धरुन बसलो. मनात देवाचा धावा करीत होती.

‘देवा, आम्हाला वाचव रे… सोडव या केसमधून… मी तुले नारळ फोडीन…’ विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट कानठळ्या बसवित होत्या. आम्हाला पावसाने खूप झोडपलं. ओलेचिंब झालो. पाऊस थांबला. तुह्या तोंडावरचा शेव हळूच काढून पाहिला. तू निपचित पडून होता. हालत नव्हता की डुलत नव्हता. मला धक्काच बसला. मग मी जोरात हंबरडा फोडला. मला वाटलं, ‘माह्या रामरावने जीव सोडला.’ माहा कळवळा पाहून तुह्या बाबाचंही काळीज कापायला लागलं.

तुह्या बाबाने पाहिलं की तुही दातखूडी बसली होती. अंग थंडगार पडलं होतं. त्याईनं तुह्या जबड्यात बोटं घालून तोंड उघडलं. तुह्या तोंडात जोराने फुंका मारल्या. तू हळूच हालचाल करु लागला. ते पाहून आमच्या दोघांच्याही जीवात जीव आला. मंग आम्ही चिखल तुडवत रस्त्याने लागलो. धो-धो कोसळणार्‍या पावसाने नदी-नाले गढूळ पाण्याने तुडुंब भरुन वाहायला लागले होते. जीवाची पर्वा न करता नदी-नाले ओलांडून यवतमाळ गाठलं.

संकटमोचनच्या मारुती देवळाच्या पायरीवर दोघांनीही माथा टेकवून  कोर्टात गेलो. तिथे सुनावणी झाली. आम्हा दोघांनाही दहा-दहा रुपये दंड ठोठावला. घरी येतांना मारुतीच्या पायरीवर नारळ फोडलं. आंत जाऊन देवाचे तोंड पाहण्याची बंदी होती ना !’ ही गोष्ट ऎकल्यावर मी गहिवरुन आलो. खरंच किती छळलं या देवांनी आमच्या पूर्वजांना…!

आई सांगत होती, ‘एकदा गावातल्या चिंचेच्या झाडाजवळ बाबाला दारुच्या बाबतीत पोलिसांनी पकडलं. जनाबाई पण तेथे होती. ती लहान होती. पोलीस बाबाला मारत असल्याचे पाहून बाईने रडून रडून आकांत मांडला होता.’

बाबाने पण एक गोष्ट सांगितली. एकदा वाडीच्या लवणात रात्रीच्या वेळेस दारु काढतांना पोलीस आल्याचे लक्षात आले. मग तो पळत सुटला. वाडीच्या काट्याच्या कुपावरुन उडी मारुन पोलिसांना चकमा दिला. अशा बिकट प्रसंगी काय काय धाडस करावे लागत होते, नाही ? अशा आई-बाबाने सांगितलेल्या कहाण्या ऎकून मी सुन्न होत होतो.

त्याकाळी खेड्यात दारु हे पेय आल्या-गेल्या पाहूण्यांचं, मानपान करण्याचं प्रतीक मानल्या जात होतं. जसे पाहूणा घरी आला की चहा, पानसुपारी, बिडी, चिलीम, तंबाखू जे चालत असेल ते देण्याची प्रथा होती. तसेच पाहुणचारात मटण, लंब्यारोट्याच्या जेवणासोबत दारू पाजत. आमच्या घरी बाजाराच्या किंवा पोळा-शिमग्यासारख्या सणाच्या करीला असं जेवण असायचं. त्यादिवशी शामरावदादा किंवा बाबा एकटाच दारु न पिता घरात समानता पाळायचा. जेवणाआधी सर्वांनाच थोडी थोडी दारु प्यायला देत.

आई सांगत होती. ‘मी भाकरी थापत होती. तुह्या बाबाने मला कपात दारु दिली. मी कप बाजूला ठिवला. तू रांगत रांगत जाऊन कधी कपातली दारु पिला, ते कळलंच नाही. जव्हा तुला लुंडमुंड झाल्याचं पाहिलं, तव्हा माह्या लक्षात आलं की, तू कपातली दारु पिल्याने तुही अशी दशा झाली.’ अशी ती गोष्ट आई हांसत हांसत सांगायची. म्हणजेच मी अगदी बाळ असतांनाच दारुची चव घेतली, असंच म्हणा ना !

मी दारुची चव घेतली, यात वादच नव्हता. भरीत भर म्हणून तंबाखू खाण्याचा दुर्गुण खेड्यातल्या मुलांच्या संगतीने माझ्यातही आला होता. पण अज्यापचा जीव कधीच बाटला नव्हता. तो एकतर गावापासून दूर आई-बाबाजवळ शिकायला राहायचा. पाचव्या वर्गापासून तो यवतमाळला राहायचा. त्याला खेड्यातील फारसे लंगोटी मित्र मिळाले नव्हते. त्यामुळे दारु पिणारे, बिडी ओढणारे, तंबाखू खाणारे व गंजिफा खेळणार्‍या वाईट पोरांची संगत त्याला मिळाली नव्हती. आई-बाबा त्याच्या या चांगल्या सवयी जपत होते.

त्याला दारु, बिडी, तंबाखाचा फार तिटकारा होता. आई तंबाखू घोटून खात होती. बाबा चिलीम ओढत होता. एखाद्यावेळेस आईने तंबाखाची चंची आणायला सांगितली की तो एकतर कानाडोळा करायचा; नाहीतर दोन काड्याच्या चिमटीत धरून आणायचा. अशी त्याची गोष्ट आई मोठ्या कौतूकाने सांगत असे. बाबा तर त्याला चिलमीची शापी कधी भिजवून आणायला सांगतच नसे. ते काम आम्हाला करावे लागे. बाईला वाटायचं, अज्यापला काम करायचं जिवाकडे येत असेल, म्हणून ती त्याला गमतीने म्हणायची,

‘कोडगा राजा, अन् माहे कष्ट कोणी नका खाजा.’ मग त्याच्याकडे पाहून आम्ही हसत होतो.

मी सुट्टीत घरी आलो की मोठ्याबाबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात होतो. मोठेबाबा म्हणजे माझ्या बाबाचा मोठाभाऊ पांडू. तेव्हा तो बाजीवरून उठून बसत, गुलाबला म्हणायचा,

‘अरे, रामराव आला. दारु आण त्याच्यासाठी.’ गुलाब कपात दारु आणून द्यायचा. मग कडवट तोंड करुन एका दमात पिऊन टाकत होतो. गुलाब हा मोठ्याबाबाचा लहान मुलगा. माझ्यापेक्षा थोडा मोठा ! तो शिकला नाही. मोठेबाबा दारु काढून विकत होता. मला आठवते, एकदा गुलाबला सायकलवर बसवून यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन आलो होतो. त्याची लघवी थांबली होती. त्याला चालता येत नव्हतं. दवाखान्यात आलो; तेव्हा रात्र झाली. त्याला भरती करून घेतलं. मी त्यारात्री दवाखान्याच्या व्हरांड्यात झोपलो. सकाळी बरे वाटल्यावर सुट्टी मिळाली.

एकदा मी धनपाल सोबत तुकारामकाकाच्या शेतात डवरण्याच्या कामावर गेलो होतो. त्याचे शेत वाघाडी नदीच्या काठावर होते. दिवसाच्या तिसर्‍या प्रहारापर्यंत काम केल्यानंतर बैलाला चारायला धुर्‍यावर नेले. तेव्हा काका दारु काढण्याच्या घाईत असल्याचे मला दिसले. तसे दारु कसे काढतात, ते मी बरेचदा पाहिलं. परंतु आता ही प्रक्रिया अगदी जवळून पाहण्याची संधी चालून आली होती.

त्याने नदीला लागून असलेल्या चिलकीत तीन दगडाची चूल मांडली. माच टाकलेला पिंपा आणला. तो पिंपा त्याने आधीच तीन दिवसापासून मोहफुले टाकून सडविण्यासाठी खड्ड्यात गाडून ठेवला होता. तो तीन दगडाच्या चुलीवर मांडला. पिंपाच्या झाकणाच्या कोपर्‍यात कापलेल्या ठिकाणी वेळूची नळी ओल्या चिकणमातीत भिजवलेल्या फडक्याच्या पट्टीने व्यवस्थित लावले. नळीचे दुसरे टोक वाहत्या पाण्यात ठेवलेल्या गुंडीत सोडले. गुंडीला दगडाचा आधार दिला. त्याच्या तोंडाला ओले फडके गुंडाळले. चुलीत विस्तवाचा जाळ पेटवला. पिंपातला सडलेला मोह उकडू लागला. त्याची वाफ नळीद्वारे गुंडीत येत होती. गुंडी वाहत्या पाण्यात असल्याने वाफ थंड होऊन, त्याचे रुपांतर द्रवात होत गेलं. तो द्रवपदार्थ म्हणजेच दारु ! आहे की नाही गंमत ! पाण्याला उष्णता देणे म्हणजे बाष्पीभवन व त्या वाफेला थंड करणे म्हणजे द्रवीकरण हा विज्ञानाचा प्रयोग आम्ही शाळेत करत होतो. तेच तत्व येथेही अवलंबील्या गेल्याचे दिसत होते. काकाने आम्हाला आवाज दिला.

‘डोणे घेऊन या रे… पोरं हो…’ पडत्या फळाची आज्ञा मानून, आम्ही हातात पळसाच्या पानाचे डोणे घेऊन गेलो. काकाने पहिल्या धारेची दारु डोण्यात ओतली. आम्ही ती तोंडात जणू मीठ कोंबल्यासारखं तोंड वेडंवाकडं करुन घटाघटा पिलो. ती घेतल्याबरोबर त्याची नशा अशी काही चढली की सांगूच नका ! कारण ती पहिल्या धारेची – शुध्द मोहाची दारू होती ना !

एकदा पोळ्याच्या दिवशी, बरबडा या गावला गेलो. आमचं शेत किसना मक्त्याने वाहायचा. त्यामुळे त्याच्याकडे आमचे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यानेही मला अशीच पहिल्या धारेची दारु पाजली होती. एकदा त्याने विचारले, ‘रामराव, तुले कोंबड बाजार पाहायचं आहे का?’

मी कोंबड बाजाराचे नाव ऐकले होते, पण कधी पाहण्याचा मोका आला नव्हता. म्हणून मलाही उत्सुकता होती. मी काहीएक विचार न करता लगेच ‘हो’ म्हटले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या घरी गेलो, तेव्हा अर्जुन पण तेथे आला होता. त्याला मी म्हटले,

‘तू बी येणार आहेस?’ त्याने ‘हो’ म्हटले. त्यामुळे आणखी एकाची संगत मिळाल्याने मजा येईल म्हणून मी आनंदाच्या डोहात पोहायला लागलो. मग काय, आम्ही मस्त रमत-गमत वावरातील उभ्या पिकाच्या वाटेने तर कधी धुर्‍या-धुर्‍याने चालत गेलो. बरंच लांब होतं.

किसनाच्या हातात एक धष्ट-पुष्ट, डोक्यावर लालजर्द तुरा असलेला लाख्या रंगाचा चकचकीत पिसं असलेला कोंबडा होता. हा कोंबडा मस्त त्याच्या पोटाला बिलंगून मोठ्या ऐटीत बसला होता. एखादा चिमुकला पोरगा कडेवर घेऊन सांभाळत न्यावा, तसा त्या कोंबड्यावर किसना लक्ष ठेवून चालत होता. आम्ही पायी पायी आणि तो मस्त डावडाव करत आहे, हे पाहून त्याचा मत्सर वाटत होता. आम्हाला तो खिजवत आहे, असा मला भास व्हायचा. मग हळूच त्याच्या चमकदार डोक्यावर टिचकी मारल्याशिवाय मला राहावत नव्हतं. अशावेळी तो क्वॉकऽऽ क्वॉकऽऽ करून मला दाद द्यायचा. किसनाच्या दुसर्‍या हातात कापडाची थैली होती. तिच्याकडे बोट दाखवून मी त्याला विचारलं,

‘किसनदादा, या झोर्‍यात काय आहे?’ त्याने थैलीचं तोंड उघडून मला दाखविलं. त्यात हिरव्या रंगाची पळसाच्या पानाचं बुच लावलेलं जाड काचेची मोठी शिशी दिसली.

‘दारूची शिशी?’ मी चेहर्‍यावर उत्सुकता दाखवून म्हटलं.

‘हो… तिथे गेल्यावर आपल्याला लागेल ना… म्हणून घेतली.’

हा कोंबड बाजार खोरासनीच्या किर्र जंगलात नाल्याजवळच्या मोकळ्या सपाट जाग्यावर भरला होता. नाल्याला थोडं वाहतं पाणी होतं. उंच वाढलेल्या आजनाच्या, सागाच्या व पळसाच्या झाडाची सावली तेथे पडली होती. म्हणून बाहेरून उन्हातून आल्याने तेथे थंडगार वाटत होतं. तेथे पोहचल्यावर किसनाने जसा कोंबडा आणला होता. तसेच तेथील बहुतेक लोकांनी कोंबडे आणले होते. काहींनी पायाला दोरी बांधलेल्या कोंबड्यांना झाडाच्या बारीक बुंध्याला बांधले होते तर काही लोकांच्या हातात होते. ते पाहून मी अचंबित झालो. यवतमाळच्या इतवारच्या बाजारात नर-मादी असे लहान-मोठे कोंबडे खेड्यातील लोक विकायला आणत. तो बाजार मी पाहिला होता. पण असा अनोखा बाजार मी पहिल्यांदाच पाहात होतो. काही लोक जुगार खेळण्यात तर काही दारू पिण्यात तर काही कोंबड्याची लढाई पाहण्यात मशगूल झाले होते.

कोंबड्याच्या पायाला धारदार काती बांधून एकमेकाच्या कोंबड्याच्या चोचीला चोच मारुन कोंबड्याना डिवचत. त्यामुळे दोन्ही कोंबडे लढाईचा पवित्रा घेत. मग त्यांना जमिनीवर सोडल्याबरोबर एकमेकाना उडून उडू्न कातीने घायाळ करुन टाकत. त्यात ज्याला मार जास्त लागला, तो मान टाकून द्यायचा. प्रतिस्पर्धी कोंबड्याला विजयी घोषीत करीत. त्याला हरलेला कोंबडा मिळत असे. मग त्याला घरी नेऊन कापून खात. किती हा अघोरी प्रकार !

पाहाणारे लोक दोन्ही कोंबड्याच्या लढाईची मोठी मजा घेत. ते बिचारे घायाळ होत. तरीही एकमेकावर तुटून पडत. तशी लोकांना आणखी आणखी मजा वाटायची. एखाद्या कोंबड्याचा जोर कमी पडतांना दिसला की त्याच्यावर प्रतिकूल प्रतिक्रीया उमटवीत. म्हणतात ना की, ‘शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी’ अशी बिचार्‍या कोंबड्याची गत होई. विजयी कोंबड्यावर ज्यांना पैसे मिळाले, ते आनंदाने उसळून एकमेकाशी मिठ्या मारीत होते तर हरलेले लोक हिरमुसले झाले होते.

बाजूलाच दारु विकल्या जात होती. लोक दारु पिऊनच त्या खेळात भाग घेत होते. मला पण किसनाने सोबत आणलेली दारु प्यायला दिली होती. दारु पिऊन मौजमजा करण्यात लोकांना फार ख़ुशी वाटत होती. असा बाजार चोरुन लपूनच भरवल्या जात होता. पोलिसांच्या धाडीच्या भीतीची तलवार मात्र सारखी डोक्यावर लटकत होती. म्हणून मी सारखा इकडे-तिकडे दूरवर नजर टाकून भिरभिर पाहत होतो. असं काही संशयास्पद हालचाल दिसली की पळता आले पाहिजे; म्हणून काळजी घेत होतो. संध्याकाळी दिवस कलेपर्यंत हा बाजार सुरू राहणार होता. किसन्याचा कोंबडा हरला होता, म्हणून तो नाराज झाला होता. म्हणून आम्ही दिवस बुडण्याच्या आधीच तेथून काढता पाय घेतला.

घरी परततांना रस्त्यात माझ्या मनात विचारचक्र फिरू लागले. आमच्या गावातील लोक असेच कोंबड्याला काती बांधल्यासारखे अहंकार, जातीभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता अशासारख्या विकाराच्या आहारी जाऊन एकमेकांशी झुंजत राहत; तेव्हा हे गाव पण मला कधीकधी कोंबड बाजारच वाटतं होतं. घरी आलो तेव्हा अंधार पडला होता. पण हा कोंबड बाजार माझ्या चांगला लक्षात राहिला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: