मी आणि माझ्या आठवणी


कथा तेविसावी – पुढार्‍यांनी दादाला नासवलं

 

माझा मोठाभाऊ शामराव, ह्याला आम्ही दादा म्हणत होतो. तो तिसर्‍या वर्गापर्यंतच शिकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. त्यावेळी गावागावात समाज जागृती होत होती. दादा भाषणं द्यायचा. चळवळीत अग्रेसर होता. शिवाय रिपब्लिकन पार्टी या पक्षात काम करायचा. एवढंच नव्हे, तर तो भजनं-कव्वाली म्हणायचा. पेटी-हारमोनीयम अन् फिड्डल उत्कृष्टपणे वाजवायचा.

कोणतंही काम असलं की दादा धावून गेला नाही, असं कधीच घडत नसे. गावातल्या समारंभात गॅसबत्ती पेटवण्यासारखं साधं काम सुध्दा त्यालाच करावे लागे. दादाने गॅसबत्ती पेटवली की सारा परिसर प्रखर तेजाने उजळून निघत असे. दादाच्या कार्यामुळे त्याला मोठा मान मिळत होता. पंधरा वर्षे तो गावाचा सरपंच राहिला. त्याआधी ढिवरु सरपंच असतांना तो उपसरपंच होता. त्याच्या सरपंचपणाचं काम दादाच पाहत होता. दादाच्या कामाची खरंच कुणाला सर येत नव्हती.

ढिवरु हा व्यक्ती अत्यंत सालस, मनमिळावू व साधा-सरळ स्वभावाचा होता. अंगात सदरा, धोतर आणि डोक्याला पटका हा त्याचा पेहराव… मी कुठे भेटलो की माझी जिव्हाळ्याने विचारपूस करायचा. त्याचा मोठा मुलगा रामधन कलावंत होता. तो भजन मंडळात उत्कृष्ट तबला व तमाशात ढोलक वाजवत होता. दुसरा लहान मुलगा मात्र गुंड प्रवृतीचा. गुलाबाला जसे काटे असतात ना, तसाच हा काहीसा प्रकार.    दामूने सांगितले नसते, तर त्याची गोष्ट आम्हाला कळलीच नसती. त्यावर्षी पिकाच्या हंगामात विधवा तरुण बाई दूधपित्या पोराला व वार्धक्याकडे झुकलेल्या बापाला घेऊन सुगी करायला आली होती. ती चेहर्‍याने गोल, रंगाने उजळ, गोरी आणि बुटक्या बांध्याची होती. ते माझ्याच घरी कोठ्यात राहत. एका रात्री सारे झोपले असतांना, कुणीतरी तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करीत असल्याचे तिला जाणवले. ती ओरडल्याने तो व्यक्ती पळून गेला. दुसर्‍या दिवशी सामान-सुमानाचं बोचकं घेऊन, चुपचाप गाव सोडून गेले. एकदा तोंड भाजल्यावर कशाला ती थांबणार? या गोष्टीची बोंबाबोंब झाली नाही. पण आम्ही मुलं देवळाच्या पारावर गप्पागोष्टी करीत असतांना दामूच्या तोंडून ही गोष्ट न कळत निघून गेली. त्या बाईवर अतिप्रसंग करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून तो हाच होता, असा तो गोष्टीच्या भरात सांगून गेला. ‘माझ्याच खांद्यावर पाय ठेऊन तो रामरावच्या घराच्या भिंतीवर चढून आतमध्ये गेला. पण त्या बाईला स्पर्श करताच आरडा-ओरड झाल्याने तो तसाच आवाराच्या दरवाजाची कडी काढून बाहेर पळत आला.’ ही गोष्ट ऎकून आम्ही हबकूनच गेलो होतो.

ढिवरु दोन-तीन वर्ग शिकलेला असेल. गावातले बाबा, दमडू, गोविंदा, दशरथ तेवढेच शिकले होते. त्यांच्या नंतरची पिढी म्हणजे दादा, रामधन, नामदेव, उध्दव, किसना, लक्ष्मण, तुळशिराम हे पण जास्त शिकलेले नव्हते. फक्त रामदास सातवीपर्यंत शिकला होता. त्याला मास्तरची नोकरी लागणार होती. परंतु त्याच्या आई-वडीलांनी घर सोडून जाण्यास मनाई केली, असे तो सांगत होता. खेड्यातील वातावरण असंच असतं. त्यांचं जीवन म्हणजे कोंबडीच्या पिल्लांसारखं. कोंबडीचं पिल्लू आईच्या मागेमागे राहते. त्याने उडण्याचा प्रयत्‍न केला की आई त्याला टोचते. त्यामुळे त्याची उडण्याची उर्मी तेथेच जिरुन जाते. असाच काहिसा प्रकार खेड्यातील मुलांचा होतो. त्याने घरापासून दूर जायचे म्हटले की आई-बापाची माया जाऊ देत नाही. त्यामुळे उंच भरारी घेण्याची त्याची उर्मी मरुन जाते.

गावातील नंतरची पिढी म्हणजे प्रल्हाद-दादा प्रि.आर्टस्, मी बी.कॉम, बाबाराव एम.ए. बि.लिब, तर माझा लहानभाऊ अज्याप एम.बी.बी.एस. एम.एस. असे उच्च शिक्षीत मुलं निपजत होते. ‘बामणाघरी लेवणं अन् महाराघरी गाणं.’ असं म्हटल्या जात होतं. आता ‘महाराघरी लेवणं’ पण आलं. म्हणून ‘शेणाचे हात लावले लेखणीला.’ असे भीमगितात म्हटल्या जायचे, ते खरंच आहे. जे हात नेहमी शेणाने भरलेले राहायचे, त्या हातात लेखणी आली. ही किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणली.

प्रामाणिकपणा, तळमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे गावकरू दादालाच सरपंचपद बहाल करीत. त्याला हे काम अंगवळणी पडल्याने, तोही प्रत्येकवेळी तयार व्हायचा. सरपंचपदाच्या झुलीमुळे तो शेती-वाडीचे फारसे कामे करत नव्हता. म्हणून घरचे लोक दु:ख आणि कष्टात जगत होते. त्यामुळे आम्ही त्याला पुन:पुन्हा सरपंच बनायला विरोध करत होतो. त्याकाळात सरपंचांना मानधन पण मिळत नव्हतं. ‘दमडीची नाही मिळकत अन् घडीची नाही फुरसत’ अशी दादाची तर्‍हा होती.

तो बॅंक, कर्ज, तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कोर्ट-कचेर्‍या, पोलीसस्टेशन असे  दुसर्‍यांचे कामे करायचा. त्याशिवाय ग्रामपंचायतीचे दैन्यंदिन कामे पण असत. कुणाला दाखला दे, कुणाचे भांडण-तंटे सोडव. अशा कामात सतत मग्न राहायचा. लोकांच्या कामासाठी त्याला अधिकार्‍यांचे व पक्षाच्या पुढार्‍यांचे हात ओले करावे लागे, तर कधी दारु आणि कोंबडीच्या पार्टीची व्यवस्था करावी लागे. मग समाजसेवेच्या बदल्यात त्याला काय मिळालं? जळजळणारं विषारी दारुचं व्यसन…!

ह्या कामासाठी त्याला यवतमाळला मुक्काम करावे लागे. दादा पाटीपूर्‍यात पक्षाच्या कार्यालयात थांबायचा. कार्यालयावरून आठवलं, या ठिकाणी पाटील यांचं हॉटेल होतं. तेथे मटणाचं रस्सेदार, चवदार व चरचरीत जेवण मिळायचं. असेच चवदार मटण टांगाचौकात मुसलमानाच्या हॉटेलमध्ये पण मिळायचं. मी दादासोबत असलो की कधी या नाहीतर त्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा. सोनडवलेसाहेब रिपब्लीकन पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यांची भाषण करण्याची एक लकब होती. ते आपली मान हळूहळू फिरऊन संथगतीने भाषण देत. रिपब्लीकन पार्टीच्या पुढार्‍यांनी बाबासाहेबांनी जीवनभर बाळगलेली व भगवान बुध्दांनी शिकवीलेली नैतिकता न रुजविता त्यांनी कार्यकर्त्यांना व्यसनाधीन बनविले होते, असा कटू अनुभव मी घेतला. दादाला पण पुढार्‍यांच्या दुषित संसर्गामुळे दारुचं व्यसन जडलं होतं. चांगल्या व्यक्तीच्या संगतीने माणूस कळसास पोहचतो, पण वाईट संगतीने जीवनाचा पाय चिखलात रुततो, असंच काहीसं दादाच्या जीवनाचं झालं.

पुढार्‍यांनी गावोगावी दारु-स्पिरीटचे दुकानं थाटले होते. स्पिरीट अत्यंत ज्वलनशील प्रवाही पदार्थ ! ती पिल्याने नशा जरी येत असली, तरी पोटातल्या आतडीचे काय होत असेल, याची कल्पनाच करवत नाही ! समाजाचं स्वास्थ बिघडविण्यासाठी हेच महान पुढारी कारणीभूत आहेत. म्हणून मी त्यांनाच दोष देतो. पुढार्‍यांनी राजकीय चळवळीच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन घडवून न आणता समाजात लाचारी आणि व्यसनाधिनतेचे पीक उगविले. माझ्या दादाला यांनी दारुच्या व्यसनात बुडवलं, हे भिषण सत्य मी लपवू शकत नाही. असे कितीतरी गावोगावचे शामराव यांनी नासवले असतील. ज्यांनी एकेकाळी आपल्या गायकीच्या आणि पेटीच्या सुरांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चळवळीचा वणवा पेटविला, अशा निष्ठावंत आणि कलावंत दादाला ह्या पुढार्‍यांनी मातीत लोटण्याचे काम केलं. मीही जर शिक्षणामध्ये नसतो तर कदाचीत दारुच्या व्यसनाने मलाही नासवलं असतं.

मी विचार करायचो की, कुठे गेले ते बाबासाहेबांची प्रेरणा पेरणारे व लोकांमध्ये स्फुल्लिंग पेटवणारे भजन मंडळे? कुठे गेला तो पंचशील झेंड्याजवळ त्रीशरण, पंचशील, वंदनेसाठी एकोप्याने जमणारा, धम्मरस ग्रहण करणारा समुह? कुठे गेला तो प्रत्येकाच्या जीवनाला शिस्त लावणारा, समाजात आदर्श निर्माण करणारा, बाबासाहेबांनी स्थापन केलेला समता सैनिक दल? बाबासाहेबांनी दाखविलेल्या उच्च नैतिक मूल्यव्यवस्थेच्या अधिष्ठानावर वाटचाल करणारे पुढारी का निपजले नाहीत? भगवान बुध्दाच्या शिकवणीनुसार धम्मराज्याची स्थापना करण्याच्या दिशेने का धाव घेतली नाही? बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा का शिकविले नाही? भारत बौध्दमय करणे दूरच, उलट वैयक्तिक स्वार्थापायी समाज रसातळाला जात आहे, याची कुणालाच चिंता राहिली नाही. अशा गहण प्रश्‍नाने मला सतावून सोडले होते.

अंगात भिनलेल्या दारुच्या नशेत हात जोडून, ‘सुरामेरय मज्ज पमाद ठाना वेरमनी, शिक्का पदम समाधीयामी.’ असे पंचशील म्हणतांना मी पाहिले. ‘मी नशा आणणार्‍या कोणत्याही नशिल्या पदार्थाचे सेवन करणार नाही.’ असा अर्थ त्यांना कुठे माहीती होता? दारुचा घोट घेण्यापूर्वी, ‘घ्या, जयभीम…!’ असे मोठ्या अभिमानाने म्हणणारे लोक मी पाहिले. ज्या बाबासाहेबांनी आपल्या जीवनात इंग्लंड, अमेरिकासारख्या देशात शिकायला राहून कधी दारुला हात लावला नाही, तेव्हा ‘जयभीम’ म्हणतांना यांची जीभ का आटूरत नाही? असे अनेक प्रश्न माझ्या मनात थैमान घालीत असत.

खेड्यापाड्यातील अडाणी लोकांना काय कळतं, यातलं? दिवसभर काबाडकष्ट करणारा, उन्हा-तान्हात, पाण्या-पावसात व हिवा-दवात मरमर राबणारा, दिवसभराचा शिणभाग घालविण्यासाठी दारुच्या नशेत बुडून जातो. धम्म जर त्याच्या रक्तात भिणवल्या गेला असता तर तो मानसिकदृष्ट्या सशक्त बनून दारु, बिडी, चिलिम, तंबाखू सारख्या अपायकारक व्यसनाच्या आहारी गेला नसता !

तुटपूंज्या कमाईतला काही भाग नशेसाठी खर्च करणे, कुटुंब विस्कळीत होऊन घरी वादाला तोंड फुटणे, बायको-मुलांची आबाळ होणे, मुलांच्या शिक्षणाकडे, आजारपणाकडे दुर्लक्ष होणे, दारिद्रता हात धुवून मागे लागणे, अशा दुष्टचक्रात फासून जातो. शिक्षण नाही, शिक्षणाअभावी रोजगार नाही, रोजगाराअभावी अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य नाही. मग रखडत जीवन जगून मृत्यूच्या वाटेने जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. त्याचे जगणेच यातनामय होऊन जाते. हे समाजाचं चित्र, पुढार्‍यांना का दिसत नाही?

काही शिकलेल्या, नोकरीदार वर्गाने तर समाजाची नाळच तोडून टाकली. मोलमजुरी करुन पोट भरणारा भाऊ, शहरात राहणार्‍या या भावाला म्हणतो, ‘तू काय, मोठा झालास? आमची तुला काय चिंता?’ असं जेव्हा रक्‍ताचं नातं तुटायला लागतं, तेथे समाजाचं नातं तर दुरच राहीलं? याला जबाबदार कोण? हा पांढरपेशा शिकलेला व राजकारण करणारा पुढारी असा दोन्हीही…! नाही का? शिक्षणाने अवगत झालेलं हे सारं तत्वज्ञान मी मनातल्या एका कोपर्‍यात कोंबून ठेवत होतो. याला काही उपाय आहे का याचा शोध घेत होतो.

मी कॉलेजमध्ये शिकत असतांना दारुचे दुष्पपरिणाम माझ्या लक्षांत येत होते. त्यामुळे कधीमधी दारू पिणारा मी, त्यादिवशी दादाने दिलेली दारु मात्र झिडकारली.

‘हे काय अमृत आहे? तू पण पितो, आम्हाला पण देतो. तुला तर तलफच लागली… घरी खाण्यापिण्यात, कपडेलत्यात, चांगलं-चुंगलं राहण्यात काटकसर करतो. अन् दारु पिण्यासाठी विनाकारण खर्च करतो. काय फायदा आहे, यात? उलट किती नुकसान…! त्याने काळीज खराब होते. आता तरी दारु सोड व घराकडे लक्ष दे.’ असं मी एकादमात दादाला सुणावले होते. पूर्वी तो इतका दारु पीत नव्हता. पुढेपुढे मात्र रोज प्यायला लागला. परंतु इतरांसारखा कुणाला त्रास देत नव्हता, की भांडत नव्हता. ही त्याच्याबाबतीत जमेची बाजू होती. याचंच आम्हाला समाधान वाटत होतं. परंतु दारुचे व्यसन व सरपंचपदाचे भूत मानगुटीवर बसल्याने घरातील कामे करण्याची त्याची वृती राहीली नव्हती. त्यामुळे आमची घरची परिस्थिती डबघाईला आली होती.

आमच्या गरिबीला आणखी कारण म्हणजे आमच्या संयुक्त कुटुंबात खाणार्‍याचे तोंडे डझनभर झालीत. ‘कुटुंब लहान सुख महान, तर कुटुंब मोठं तर सुख खोटं’, हे कळत असूनही वळत नव्हतं; असंच म्हणावे लागेल, दुसरं काय? खेड्यातील मजेशिर गोष्ट त्यावेळी मला पाहायला मिळाली. ती अशी की, कुटुब नियोजनाच्या जागृतीअभावी कधीकधी सासू-सुन, आई-मुलगी एकाच मोसमात बाळंतीन होत.

आमच्या गरिबीचं आणखी एक कारण माझ्या लक्षात आले, ते म्हणजे देवदासदादा मेल्यानंतर आमच्या घरातील ताकद निघून गेली होती. चौध-याला बाबाच्या नावाने चार एकर शेत असतांना आणखी चार एकर शेत दादाच्या नावाने बरबडा येथे घेतले. खरं म्हणजे घ्यायला काही हरकत नव्हती. पण काही दिवसाने शिल्लक रकमेतून घ्यायला पाहिजे होतं. त्यासाठी त्याने जे बैलं, गायी-ढोरं, बकर्‍या, बैलगाडी, घरावरचे टिनं, लाकूडफाटा, कौलं असे सर्वकाही विकवाक केले, ते अनाठायी होतं. गंमत म्हणजे दादाने एवढेच केले नाही, तर त्याने स्वत:ची वाजवण्याची पेटी सुध्दा मनोशोधनला विकून टाकली. समाधानाची बाब एवढीच की घरातील धान्याच्या चार ढोल्या तशाच एकमेकाला भिडून उभ्या होत्या. त्या आमच्यासाठी झरोकाच होत्या. त्यातून आमचा भूतकाळ डोकाऊन पाहत होतो. त्या आमच्या वैभवाचं प्रतिक आणि साक्षीदार होत्या. त्यात एकेकाळी काठोकाठ धान्य भरून राहायचं, आता त्याची जागा टाकाऊ सामानाने घेतली होती.

त्यानं शेत तर घेतलं, परंतु वाहायला आवश्यक साधनेच राहीले नव्हते. ‘ज्याच्या घरी नाही पास, त्याच्या जिनगानीचा नास’ या म्हणीप्रमाणे दादाचं झालं ! बैलाशिवाय शेती वाहता येत नाही, ही गोष्ट त्याला माहिती नव्हतं, असं नाही ! पण बैलं सुध्दा विकून टाकणे म्हणजे फारच झालं ! एकीकडे आम्हाला कीव येत होती, तर दुसरीकडे यातना होत होत्या. सांड्या बैलाला सहदेवला विकला, तर बोढीला खाटकाला विकला. त्यावेळी आमचा मोठा जीव तुटला. शेवटी बैलाचा जीव जीवनभर मरमर खपण्यासाठी व थकल्यावर मानेवर कसायाची सुरी चालवून घेण्यासाठीच अवतरला होता की काय, कोण जाणे !

सांड्या बैल बगळ्यालाही हेवा वाटेल असा पांढराशुभ्र. बोढी लाख्या रंगाची. तशी ही जोडी विजोडच होती, म्हणा ! सांड्या तरणाबांड, तर बोढी म्हातारपणाकडे झुकलेला ! पण जेव्हा ही जोडी गाडीला जुतलेली मी पाहत होतो, तेव्हा मोठ्या दिमाखाने मान हलवत, एकेक पाऊल उचलत चालत होती. तेव्हा जणू काही दंडारीत हातात हात घालून नाचत आहेत, असेच वाटत असे. सांड्या मोठा गुणी ! दादाने सागाचा जंगल विकत घेतला; तेव्हा त्याने म्हणे, खुंटीचं दावण तोडून वाघाच्या मागे धावला होता. तो वाघ घाबरुन पळून गेला. ‘पायलीचे पंधरा नि खंडीचे अठरा काय कामाचे…? माहा सांड्या एकटाच मोलाचा’ असा दादा मोठ्या गर्वाने सांगत होता. खरं म्हणजे प्रजोत्पादनासाठी गायीच्या मागेमागे फिरणारा, स्वतंत्र बाण्याचा, धष्ट-पुष्ट, खाऊन-पिऊन पोकलेल्या बैलाला सांड्या म्हणत. आमचा हा सांड्या पण तसाच दिसायचा; पण फरक येवढाच की याच्या नाकात वेसन टोचून त्याला शेतीला जुंपलं होतं.

आता दादाकडे बैलं व इतर साधने नसल्याने, तो मक्त्या-बटईने शेती लाऊन घालायचा किंवा भाड्याने बैल-खाटं घेऊन वाहायचा. त्यामुळे शेतीत फारसं पीक मिळत नव्हतं. शेतीसाठी मिळणारे सरकारी बि-बियाने, रासायनिक खते, औषधी व औषधफवारणीचे उपकरणे दुसर्‍यांना विकत होता. खाऊटी कर्ज, बॅंकाचं व सरकारचं कर्ज घरी खाऊन बसत होता. त्यामुळे त्याच्यावर नुसता कर्जाचा डोंगर उभा झाला होता. आई त्याला चिडून म्हणायची, ‘या पोरानं खाऊ-खाऊ ढोबरं केलं.’ खरंच होतं…! ना शेत चांगलं ना घर चांगलं…! सरपंचासारखं एवढं मोठं पद असतांना, त्याच्या घरी काळोख पसरावा…! मग याला ‘दिव्याच्या खाली अंधार’ असंच म्हणावं लागेल ना !

त्यानंतर बाबा उदास झाला. त्याचं मन रमत नव्हतं. शेतीची परवड झाल्याने तो गावात राहत नव्हता. तो गावोगांवी फिरून व्यापार-उदीम करायचा. मग चौधर्‍याला दादाचे कुटुंब तेवढे राहत होते.

खरंच, माझ्या बहुगूणी दादाला शहरातल्या धुर्त व स्वार्थी पुढार्‍यांनी नासवल्यामुळेच आम्हाला असे गरिबीचे दिवसं भोगायला आले होते !

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: