मी आणि माझ्या आठवणी


‘धांव… रामराव ! अंधार पडत आहे.’ जनाबाईचा आवाज काळजीने कांपत होता. मग आम्ही दोघेही बहिण-भाऊ पटातल्या बैलावानी सुसाट वेगाने धावत सुटलो. तसा हा रस्ता बैलगाडीचा अन् सपाट होता. तरानातले रस्ते असेच. आमच्या डोंगरासारखे दाट झाडीचे, चढ-उताराचे, दगडा-गोट्याचे, दर्या्खोर्याकचे भयान वाटणारे नसतात. आम्हाला रस्त्यात एकही चिटपाखरु किंवा काळं कुत्र दिसलं नाही. इतका तो रस्ता सामसूम झाला होता. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला शेत्या पसरलेल्या होत्या. बाभळीचे झाडं-झुडपं हिरव्या बारीक पानांनी व पिवळ्या फुलांनी नटलेले दिसत. एक-दोन ठिकाणी तुरळक नाले लागले. त्याचा खोलगट भाग व झाडीमुळे भीती वाटत होती. नाल्यातल्या पाण्यात बुडणार्या् सूर्याचे तिरपे किरणे पडले होते. त्यात झाडाच्या सावल्या झिरपलेल्या दिसत होत्या.
आम्ही देवगावला बसमधून उतरलो; तेव्हा सूर्य क्षितिजाला जावून टेकला होता. त्याने सोनेरी, तांबडे, लाल, पिवळे असे निरनिराळे रंग उधळलेले होते. त्या किरणांचा तेवढा उजेड पडला होता. हा उजेड जसंजसा अंधुक व्हायला लागला, तसतशी आमची छाती धडधड करायला लागली. सळसळत येणारा संध्याकाळचा गार वारा अंगाला झोंबत होता. तसं आम्ही घरून लवकर निघालो. पण बसस्थानकावर भारी गर्दी आणि बसेसच्या कमी फेर्या . लवकर बस मिळाली नाही. म्हणून उशीर झाला.
दादाने आम्हाला पाटलाचे पैसे देण्यासाठी धाडले होते. या गावाला जायचं म्हणजे देवगावपर्यंत बसने, तेथून पैदल रस्ता. हे गाव तेथून दोनक कोस दूर असेल. पूर्वी आम्ही दोन-चारदा येऊन गेलो. पण रस्ता तेवढा दाट ओळखीचा झाला नव्हता. आम्ही गावाजवळ आलो; तेव्हा अंधार पडला होता. पळता-पळता दमासून गेलो होतो. कमालीचा थकवा आला होता. घशाला कोरड पडली होती. एकाठिकाणी रस्त्याच्या कडेला मांडवात कंदिलाचा उजॆड दिसला. आम्ही त्याला उसळगव्हानबद्दल विचारले. तो म्हणाला,
‘थोडावेळ थांबा. मीपण येतो. बैलाला चारा घालतो..’ हे ऐकून आमच्या मनातली भीती एकदम पळाली. तो जर दिसला नसता, तर आम्ही एवढ्या अंधारात कसे गेलो असतो, या कल्पनेने धास्तावून गेलो. आता आम्ही सुटकेचा श्वास सोडला. त्याने बैलाला कडबा टाकला. आता तो मोकळा झाला. हातात कंदील घेऊन आम्हाला म्हणाला,
‘माह्या मागेमागे या.’ कंदिलाच्या उजेडात पायरस्त्याने आम्ही त्याच्या मागेमागे जाऊ लागलो. येथूनच उसळगव्हानचा रस्ता फूटला होता.
‘कोणाकडे जाता?’
‘बाबाकडे… त्याने पाटलाचा ऊस घेतला. आम्ही त्यांचीच मुले आहोत.’ बाई म्हणाली.
‘हो… का? मी पाटलाचा गडी आहे. तुमचे बाबा ऊसाच्या मळ्यात – झोपडीत राहतात. चला… तुम्हाला घेऊन जातो.’ तो म्हणाला.
बाबा गावोगावी भटकंती करायचा. तो आमराई, उसाचा मळा, पपई, जांबा-संत्राचा बगीचा विकत घ्यायचा. त्याच्यासोबत ‘विंचवाचं बिर्हा ड पाठीवर’ म्हणतात, तसं आई व लहान भाऊ, अज्याप असे तिघे राहत. मी व बाई उमरसर्या-ला शिकायला होतो. हे गाव माझ्या भावजयीचं माहेर पण होतं. तिचा एकूलता एक भाऊ येथे राहत होता. त्याला कुष्ठरोग झाला होता. आई-बाप वारल्याने ते एकटेच राहत.
वहिनीच्या आईचे मरण्यापूर्वी दोन्ही डोळे गेले होते. ती एक कथाच होती ! त्यांना तसं चांगलं दिसत होतं. पण झावर-झावर दिसते, म्हणून त्यांनी एका वैद्याकडे गावठी उपचार घेतले. त्याच्या औषधाने त्या दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या झाल्या. बरं झालं, आई त्या वैद्याकडे गेली नाही. कारण तीदेखील त्यांच्या सांगण्यावरुन जाणार होती. पण तिला फुरसत न मिळाल्याने राहून गेलं. नाहीतर… आई पण आंधळी झाली असती…! या कल्पनेने आम्ही घाबरलो होतो. तिच्यावर घोंघावणारं संकट टळल्याने, आम्हाला काळजी राहिली नव्हती.
एखाद्यावेळेस वहिनीचे मावसभाऊ तुकाराम, पुंडलीक, व मामेभाऊ शंकर यांच्याकडे या गावाला पाहूणपणाला जात होतो. त्यावेळी त्यांच्याकडे मस्तपैकी रोट्या, रसाचा व मटणाचा पाहूणचार व्हायचा. माझ्या मोठ्याआईचा मुलगा तुळशीराम याचा शंकर साडभाऊ होता. तो सातवीपर्यंत शिकलेला होता. तो आमच्या गावाला यायचा, तेव्हा त्याला पण आमच्या घरी मस्तपैकी पाहूणचार असायचा. शामरावदादासोबत त्यांच्या गप्पा-गोष्टी खूप रंगायच्या. त्यांच्या गोष्टी सुरु असतांना मी मधातच त्यांना चौथीचे गणीते सोडवून मागत होतो.
या गावाला बाबाने पाटलाकडून ऊसाशिवाय कांदे, वाळलेल्या मिरच्या विकत घेऊन ट्रकने यवतमाळला विकायला आणले होते. तेथे भाड्याची खोली करुन हा माल भरला होता. बाजाराच्या दिवशी कांदे व मिरच्या विकायला दादा गावावरून येत असे. तेव्हा तो मला सोबत घेत असे. त्यावेळी ढिगातला कांदा बराचसा सडला होता. त्यामूळे खूप घाण वास यायचा. हे सडलेले कांदे निवडून फेकून द्यावे लागत असे. नाहीतर सडके कांदे दुसर्यांिना सडविल्याशिवाय राहत नसे. म्हणून चांगल्या लोकांनी वाईट लोकांच्या संगतीला राहू नये, अशी शिकवण या कांद्याच्या उदाहरणाने मिळत होती.
आम्ही पोहचलो, तेव्हा अज्याप एकटाच झोपडीत कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात अभ्यास करत होता. तो त्यावेळेस दुसरीत होता. आई-बाबा ऊसं विकायला गेले होते. त्यांना घरी यायला बरीच रात्र झाली होती. सकाळी उठलो. मी ऊसाचा मळा पाहून हरखून गेलो. आई-बाबा सकाळपासूनच ऊस तोडण्याच्या कामाला जुंपले होते. त्यावेळी थंडीचे दिवसं होते. आईने हिरवेगार व उंच वाढलेला ऊस विळ्याने तोडून आम्हाला खायला दिला. त्यादिवशी आई-बाबा पुलगावच्या बाजारात उसं घेऊन गेले होते. मीपण त्यांच्यासोबत गाडीवर बसून गेलो होतो.
जेवतांना भाकर कचर कचर लागत होती. म्हणून आईला विचारले,
‘आई, भाकर कचर कचर का लागते?’
‘हे पीठ तुह्या बाबाने चक्कीवरुन विकत आणले. ते खाली सांडलेले असल्याने कचर कचर लागते.’ आई म्हणाली.
एकदा अज्यापच्या शाळेतल्या मित्राने बाबाला हे पीठ विकत घेतांना पाहिले. तेव्हा त्याच्या मित्राने म्हटले,
‘हे पिठ मांग-महार खातात. तुम्ही कशाला विकत घेता?’ त्यामुळे अज्याप ओशाळला होता.
त्यानंतर जवळच्या बोरवघळ गावाला बाबाने संत्रा, पपई व आमराई विकत घेतली. सुट्टीत आम्ही या गावाला येत होतो. तेव्हा पपया, संत्रा व आंबे खायची मजाच मजा यायची. बगिच्यात बाबाने झोपडी बांधली होती. अज्याप तेथून उसळगव्हानला शाळेत जाणे-येणे करायचा. पपयाच्या फळाने झाडं लदबदलेले असायचे. बाबाने बगिच्यात गावातला मुलगा पपया राखायला व तोडायला गडी म्हणून ठेवला होता. आम्ही झाडाची मस्तपैकी पिकलेली पपई तोडून खात होतो. कारण झाडाला पिकलेली पपई फारच गोड लागत होती.
बाबाने भाड्याच्या बैलगाडीने पपया यवतमाळला विकायला आणल्या होत्या. तेव्हा मी त्याच्यासोबत बैलगाडीवर बसून तितक्या लांब आलो होतो. तसेच त्याने त्याच बगिच्यात संत्राचा बगीचा पण विकत घेतला होता. झाडाला लागलेले मोठ-मोठे पिकलेले संत्रे तोडून खात होतो. त्या बगिच्याचा मालक गावचा पाटील होता. आम्ही गेल्यावर बाबा पाटलीनबाईला सांगायचा,
‘माह्ये पोरं आलेत, मालकीनबाई.’
‘कवा आलेत?’
‘आलेत काल रातच्याला.’ बाबाने असं सांगितल्यावर ती तिच्या घरची तेलाची चपचप रस्सेदार, चवदार भाजी आमच्यासाठी गड्याच्या हाताने पाठवून द्यायची. आम्ही ती भाजी मग मस्त चाटूनपुसून खात होतो. बगिच्यात विहीर होती. त्या विहिरीत गड्याने मला पोहायला शिकवले होते. मग तासनतास पोहत राहायला मला भारी मजा वाटायची. शेवटी आई खूप रागावित होती.
‘झालं असेन न पोहणं? आता निघ नं बाहेर.’ आई म्हणायची.
त्यानंतरच मी विहिरीच्या बाहेर पडत होतो. मी त्यापुर्वी विहिरीत कधी पोहलेलो नव्हतो. वाघाडी नदीच्या डोहात मात्र पोहत होतो. ह्या बगिच्यानंतर त्याच गावातला दुसरा पपईचा बगीचा विकत घेतला होता. बाबाने त्या बगिच्यात मळा बांधला होता. आई-बाबा व अज्याप तेथे राहायला गेले होते. तेथे विहीर पण होती. त्या विहिरीचे पाणी बगिच्याला त्याचा गडी मोटेने द्यायचा. पाण्याने भरलेली मोट विहिरीच्या बाहेर आली की पोट फुगलेल्या गर्भार बाईसारखी दिसायची. हौदात पाणी ओतल्यावर बाळंत झालेल्या बाईसारखी मोकळी झालेली दिसत होती. बैलं खाली उताराने जाणे, त्या पाठोपाठ भरलेली मोट येणे आणि बैलं मागेमागे चढावावर सरकत जाण्याबरोबर रिकामी मोट विहिरीच्या आत जाणे, असं हे चक्र पाहून मी पण चक्रावून जात होतो. यालाच राहाटगाडगे म्हणतात, असे मी ऐकले होते.
गंमत म्हणजे मला त्यावेळी विंचू चावला होता. झालं असं की, रात्रीच्या वेळी आईने फोडणीसाठी कांदा द्यायला सांगितला. मी मळ्यावरच्या डेळीला टांगलेल्या टोपलीत हात टाकला. त्याबरोबर काहीतरी सणकण चावल्याचं जाणवलं. मी बाबाला सांगितल्यावर त्याने कंदिलाने पाहिले, तर त्यात विंचू होता. त्यानेच माझ्या बोटाला डंख मारला होता. मरणाच्या वेदना होत होत्या. मी रडायला लागलो. बाबाने गावातून मोहाची दारु आणून मला पाजली. त्या नशेत मी रात्र कशीतरी काढली. विंचू चावण्याची ही माझी दुसरी वेळ होती. त्यापूर्वी गोधणीला मुड्याच्या बाडात मुडे फेरतांना चावला होता.
त्यानंतर बाबाने आमराई विकत घेतली. आम्हाला उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्याने आम्ही पण आलो होतो. बाबाने येथेही झोपडी व मळा बांधला होता. आम्ही रात्रीला सारेजण उघड्या मळ्यावर झोपत होतो. दिवसभराच्या उन्हामुळे रात्रीला उकाडा होत असे. हवा कुंद होई. झाडाचं पान हालत नसे. उकाड्याने जिवाची तगमग होत होती. आकाशाचा भला मोठा आवाका व वैभव पाहून जीव गुदमरल्यासारखं वाटत होतं. मग असंख्य तार्यांवचा चमचम करणारा सुंदर नजारा पाहत, वार्या.ची झुळूक आलीच तर त्याच्या गारव्यात व झाडाची सळसळ ऐकतच मी झोपी जात होतो. खरंच अंधार जर नसता तर हे चंद्र, तारे तरी दिसले असते का? अंधारामुळेच या चंद्र-तार्यांेना महत्व आले. म्हणजेच दु:खामुळे सुखाला गोडी आली, असेच म्हणावे लागेल.
सकाळी अगदी झुंजुमुंजूला जाग आली, की आकाशात प्रखर तेजाने तळपणारा शुकतारा हसत असल्याचा भास होत होता. मग त्यासमवेत लुकलूकणार्याा तार्यां ना पाहण्यात मन तल्लीन होऊन जात असे. पहाटवारा झुळझुळ वाहायला लागायचा. मंद गारवा उघड्या अंगाला स्पर्शून जायचा. मग पाखरं अवतीभोवती निरनिराळ्या स्वरात गुंजन करत झोपू देत नव्हते. सूर्याच्या कोवळ्या बिंबाचे स्वागत करतांना पक्षी बेहोश होवून वार्यागसंगे डोलणार्या. झाडांच्या फांदीवर बसून गात; तेव्हा अख्खा परिसर मंत्रमुग्ध होवून नवचैतन्य पसरल्याचे भासत होते.
वानरांचा कळप आला की आंब्याची मोठी नासाडी करीत. बाबाने एका कोलामाला राखायला ठेवले होते. तो आल्यावर बाबाला त्याच्याजवळ घटकाभर बसल्याशिवाय करमत नव्हतं. मग दोघेही चिलीम ओढत गप्पागोष्टी करीत. त्याच्या जवळ मोठी तिरकामठ होती. त्यात तो तिराऎवजी लहानसा दगड ठेवून वानराच्या दिशेने नेम धरुन मारायचा. कितीही उंच झाडावर वानर बसलेला असला; तरीही त्याचा दगड तेथपर्यंत पोहचत असे. त्यामुळे वानरं घाबरुन पळून जात. बाबाने आम्हालाही रबराच्या गुल्लेर बनवून दिल्या होत्या. आम्हीपण त्याने पाखरांना व वानरांना हाकलत होतो.
वानराच्या हालचालीकडे मी निरखून पहात होतो. कळपात भड्या राहायचा. त्याची भरीव शरीरयष्टी, भरदार जाड मांड्या, दणकट हात, काळेशार तोंड आणि तेवढेच काळेशार कान व चेहर्याषभोवती गच्च भरलेले सोनेरी पांढरे केस व लांब शेपटी पाहून मन थक्क होवून जात असे. थबकत थबकत चालतांना त्याची शेपटी गोल वळसा घेऊन त्याच्याच पाठीवर टेकत होती. चालतांना त्याचा बेधडकपणा, जागृतपणा खुलून दिसायचा. त्यावरून तो कळपाचा नायक असावा हे समजायला वेळ लागत नसे. ‘हूपऽऽ हूपऽऽ’ आवाज करत तो या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत राहायचा. बाकीचेही वानरं धडाधड उड्या मारीत होते. त्यांच्या वजनाने फांदी खालीवर होत असे.
बाया जशा एकमेकींच्या डोक्याच्या केसातील उवा पाहून नखाने मारत. तसेच ह्या वानरी पण एकमेकांच्या अंगावरचे केसं बोटाने बाजूला सारत, गोचिडी-उवा शोधून तोंडात पटकन घालत. शांतवेळी वानरी आपल्या पिल्लांना मोकळे सोडत. मग हे पिल्ले चिऽऽ चिऽऽ आवाज करीत इकडून तिकडे व तिकडून इकडे उड्या मारत एकमेकांशी किलोंट्या करीत. खेळून दमले की आईच्या कुशीत शिरत. ते पिल्लू वानरीनच्या पोटाला घट्ट बिलंगून राहत. मग तिने कितीही जोराने उंचावरुन उडी मारली, तरीही पिल्लू पडत नसे.
असाच वानरांचा कळप जांब या गावाच्या आमराईत पण येत होता. त्यावर्षी बाबाने पेरुचा बगीचा व नंतर आमराई विकत घेतली होती. सुट्टीत आम्ही येत होतो. हे गाव उमरसरयावरून तेथून तिनक कोस दूर होतं. तेवढ्या दुरुन आम्ही रस्ता तुडवत पायीपायी येत होतो. सुरुवातीला चालतांना हुरुप यायचा. पण नंतर थकून जायचं. आईच्या भेटीची ओढ राहत असल्याने हा थकवा विसरुन जात होतो.
बाबाने बगिच्यात झोपडी बांधली होती. तेथे भाजीपाल्याचं माळवं होतं. आई ताजे ताजे टमाटे, वांगे, मिरची तोडून व मस्तपैकी खुडखूडी भाजी बणवायची. या भाजीची चव काही वेगळीच वाटायची. या बगिच्यात पण मोट होती. मालक यवतमाळचा फाटक वकील होता. तो ब्राम्हण होता. बाबा या वकिलाकडेच कोर्टाची कामे करीत असल्याने बाबाच्या ओळखीचा झाला होता.
जांबाचा मोसम संपल्यावर आमराई विकत घेतली होती. ही आमराई बगिच्यापासून चार-पाच वावरं दूर होती. मी आणि बाई तेथे आंबे राखायला जात होतो. एकेदिवशी सकाळीच आमराईत गेलो; तेव्हा रस्त्याच्या बाजूच्या झाडाचे आंबे तीन दानगट पोरं दगडाने पाडत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांना हटकले असतांना तेच आमच्या अंगावर धाऊन आले. आम्ही घाबरलो. तरीही धीर करुन बाबाला बोलावून आणतो; म्हणून धमकावीत बगिच्यात धावत-पळत आलो. बाबाला घेऊन आलो; तेव्हा ते पोरं पळाले होते. त्यानंतर मी एकटाच आमराई राखायला जात होतो. बाईला आणत नव्हतो.
बोरवघळची आमराई पुलगाव-देवगाव रोडवर असल्याने जाणारे-येणारे आमराईत येत. त्यांना पाडाचे किंवा माचात पिकलेले आंबे विकत होतो. हौसी पोरं-पोरी आंबे खातांना एकमेकांची चेष्टा करीत. आम्ही पण भाकरी सोबत पिकलेले आंबे चुरपून चुरपून खात होतो. कधीकधी बाबा पिकलेले पण अर्धवट सडलेले आंबे देत होता. त्यातील सडलेला भाग सोडून बाकीचा खात होतो.
पिकलेल्या आंब्याचे टोपले डोक्यावर घेऊन हिरपूर गावाला वाट तुडवत विकायला नेत होतो. या गावाला बाबाचा नातेवाईक उकंडा राहत होता. त्यांचा जगन नावाचा मुलगा शिकत होता. त्याला म्हणे, पाटील कुटुंबाने दत्तक घेतलं होतं. म्हणून तो आपलं आडनाव पाटील सांगायचा. तो आमराईत अधे-मध्ये यायचा. शनिवारी घारफळच्या बाजारात जात होतो. ओझ्याच्या भाराने मान मोडल्यासारखी व्हायची. डोकं चेचल्यासारखं व्हायचं. पाय अतोनात दुखायचे. पायाच्या पोटर्याा भरुन यायच्या तर पाठ व कमर वाकून जायची. तहानेने व भूकेने जीव कासाविस होई. असे हालहाल होत असे. कधी डोक्यावरुन टोपलं उतरते, त्याक्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. याच घारफळच्या बाजारात यवतमाळचा तंबाखूचा धंदा करणारा मारवाडी व्यापारी यायचा. तो दुसर्या् दिवशी रविवारी यवतमाळच्या बाजारात दुकान मांडायचा. बाबा त्याच्याजवळ आमच्यासाठी खाऊ, पैसे किंवा आणखी काहीतरी वस्तू पाठवित असे.
उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा मी यवतमाळच्या बाजारात जात होतो; तेव्हा कच्चे आंबे विकणार्यांेची ओळ दिसायची. त्यावेळी बाबाने विकत घेतलेल्या आमराईतल्या रायत्याच्या आंब्याची आठवण ताजी होत होती. सर्व आंबे उतरल्यावरही हा आंबा तसाच राहत होता. त्याला रायत्याचा आंबा म्हणत. त्याआधी बाकीचे आंबे विकूनही टाकले होते. तो आंबा मात्र पावसाच्या आगमनाची वाट पाहत होता. जशी एखादी उपवास करणारी बाई, चद्राचं मूख पाहिल्याशिवाय जेवत नाही; तसंच या आंब्याचं होतं की काय, कॊण जाणे?
त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तो पाडाला आल्यावरही नरम होत नव्हता; तर तो कच्च्या आंब्यासारखा दणकट, भरलेला व हिरवागार दिसत होता. खायला आंबट. असा आंबा रायते बणविण्यासाठी खासच असतो. त्याला भाव पण चांगला येतो. म्हणून त्याचे आंबे उशीरा तोडत. या आंब्याला उतरवले, तेव्हा माझी शाळा सुरु झाली होती. त्यावर चांगली कमाई झाली होती. कारण तो महाग खपला होता. हे आंबे यवतमाळला विकायला आणले होते.
एकदिवस आतापर्यंत न दिसणारे ढग आभाळात घिरट्या घालू लागले होते. वातावरण कसं मोहक झालं होतं. अवकाळी पावसाचे टपोरे थेंब टपटपू लागले होते. आंब्याच्या झाडांच्या इवलाल्या पानांत थेंबाचे संगीत वाजू लागले होते. सारी आमराई पावसाच्या या अजब संगीताच्या तालावर फेर धरुन नाचू लागली होती. मध्येच वाराधून, वावटळ-गराड सुट्लं होतं. विजा चमकत होत्या. चांगल्या टपोर्या. गारांचा पाहता पाहता सातरा खाली पडल्या होत्या. जमीन पांढर्यार शुभ्र गारांनी झाकल्या गेली होती. थंडगार वातावरणाने अंगात हुडहुडी भरली होती. थंडी व चिखल झाल्याने आम्ही झोपडीतच आई-बाबाचे लुगडे-धोतर अंगावर लपेटून चिडीचूप बसलो होतो. रात्रीला मी व बाई गावातल्या बाबाच्या ओळखीच्या एकाघरी झोपायला गेलो होतो.
मुसळधार पावसाने नाल्याला पूर आला होता. पहिला पूर असल्याने नदीच्या डोहातल्या मासोळ्या वरच्या बाजूला पोहत पोहत या नाल्यात आल्या होत्या. पूर ओसरल्यावर गावातले काही पोरं ते पकडीत होते. म्हणून मीपण पकडल्या होत्या. आईने त्याची रस्सेदार भाजी बनवली होती.
हवेच्या व गारांच्या जबरदस्त माराने खूप कैर्याा तुटून पडल्या होत्या. त्यामुळे आमची मोठीच तारांबळ उडाली होती. दुसर्याा दिवशी पडलेले कैर्याड वेचून एकत्र केल्या. बाबाने बैलबंडीत भरुन जवळच्या बाजारात विकायले नेले.
झोपडीत आंब्याचा माच टाकला होता. पावसामुळे माचात खूप विंचू पडले होते. त्यामुळे आम्ही झोपडीत जायला व माचात हात घालायला घाबरत होतो. बाबा मात्र मोठ्या हिंमतीने माचात हात घालून पिकलेले आंबे बाहेर काढायचा. मग त्याच्या बोटाला विंचू डंख मारीत. तेव्हा तो तोंडात बोट घालून विष पिऊन घ्यायचा. त्याला कितीतरी विंचू चावले असतील, त्याची गणतीच नव्हती ! म्हणतात ना की ‘गायक्याने गाय टाकली म्हणून मालकाला थोडेच टाकता येते?’ अशीच गत बाबाची झाली होती. मी व बाईने झोपडीतील विंचू मोजले, तेव्हा लहान-मोठे शंभराच्या वर तरी भरले असतील ! जणू काही विंचवाचा पाऊसच पडला होता की काय, असंच भासत होतं !
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: