मी आणि माझ्या आठवणी


कथा विसावी – पैसे हरविले

 

मी सोपानदादाच्या कार्डावरचं रेशन आणायला उमरस‍र्‍याला निघालो. शामरावदादाने दिलेली वीस रुपयाची नोट पैजाम्याच्या खिशात टाकली. परत नोट व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. कमरेच्या करदोड्याला बांधलेली किल्ली चाचपडून पाहिली. ती पण जाग्यावर होती. मग मी निश्चिंत झालो. किल्ली हरवू नये म्हणून करदोड्याला बांधत होतो. खेड्यातील लोक असेच करीत.

आम्हाला रेशनच्या कार्डावर धान्य घ्यावे लागे. हे दुकान कधी सावरगड तर कधी घोडखिंडीला असायचं. दोन कोस दूर… तेथून ओझं घेऊन यावे लागे.

रस्त्याने जातांना मला झाडं-झुडपं पाहण्याचा छंद जडला होता. नदी-नाल्याच्या काठाकाठाने मी हिरवळ न्याह्याळीत जायचा. तेथे उगवलेल्या इवलाशा वनस्पतीचे पानं, फुलं तोडून वहीत ठेवत होतो. वाळल्यावर त्याचं रुप वेगळंच दिसायचं.

नदी-नाल्याने फिरायला मोठी मजा वाटायची. मी लहानपणी खेकडे पकडायला गावातल्या पोरांसोबत जात होतो. लवणाला पावसाळ्याचा पहीला पूर आला की आम्ही पोरं हातात लोखंडी सळई घेऊन खेकडे धरण्याच्या मोहिमेवर निघत होतो. लवणाच्या काठाकाठाने दरं असायचे. त्यात डोकावून पाहिले की लपलेले दिसायचे. आमची चाहूल लागताच बाहेरचे खेकडे पटकन दरात घुसत. आम्ही दराच्या वरच्या बाजूने सळई रोवायचो. मग त्यांना आत जाता येत नसल्याने, पकडणे सोपं व्हायचं. कधी लक्ष नसले की खेकडे नांगीच्या चिमटीत आमच्या हाताचे बोट पकडून चावा घेत. कधीकधी साप दिसला की घाबरून दूर पळून जात होतो. पकडलेले खेकडे घरी आणून आई मस्त रस्सेदार भाजी करुन द्यायची.

कधीकधी मी बरबडा गावाच्या नाल्यानं जायचो, तेव्हा दरात काळेभोर डोकडे लपलेले दिसायचे. याच नाल्याच्या देव-विहिर्‍याजवळ उंबराचे झाड होते. पिकलेल्या लालजर्द उंबरांना फोडून आत दडून बसलेल्या इवल्या इवल्या पाखरांना फुंकेने उडवून खाण्यात मोठी मजा वाटायची. हे फळ ओल्या अंजिरासारखे दिसत. त्यामुळे या दोघांची जातकुळी एकच असावी. उंबराच्या झाडाला कधी फूल धरल्याचं मी पाहिलं नाही. फुलाशिवाय फळधारणा होणे, हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल ! झाडाच्या सालीला अनकुचीदार दगडाने टोचले की चीक निघायचा. तो आम्ही जांघेच्या किंवा गळ्याच्या सुजेवर, गलगंडावर लावत होतो.

मी त्यादिवशी असाच रमत गमत जात होतो. सूर्याच्या कडक उन्हाने घाम येत होता. एखादी हलकीसी वार्‍याची झुळूक आली की मस्त थंडगार वाटत असे. झाडाच्या सावली सावलीने मी माझ्याच धुंदीत जात होतो. वाघाडी नदी ओलांडल्यानंतर निळोण्याची शीव लागली. माझं चौथीपर्यंतचे शिक्षण याच गावात झालं. यवतमाळला जातांना-येतांना याच रस्त्याची पायधूळ लागत होती. त्यामुळे या नदीच्या, गावाच्या, रस्त्याच्या बर्‍याच स्मृती खोलवर जुळल्या होत्या. भूतकाळातील आठवणीत कधी मी गढून गेलो, ते मला कळलेही नाही.

शाळेत असतांना बबन गुरुजी नागपंचमीच्या दिवशी नागाचे चित्र पाटीवर काढून आणायला सांगत.      सोबत दुध, लाह्या फुटाने व नारळ घेऊन येत होतो. गुरुजी फळ्यावर नागाचे चित्र काढत. त्याची पूजा करीत. नारळ फोडून मुलांना प्रसाद वाटत. लाह्या, फुटाने दुधात भिजवून बाहेर फेकत. त्यात निव्वळ दुधाची व लाह्या-फुटाण्याची नासाडी होत होती. निदान शाळेतल्या शिक्षकांनी तरी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून मुलांवर चुकीचे संस्कार टाकायला नको होते, असं मला समजायला लागल्यापासून प्रकर्षाने जाणवलं होतं.

गुरुजी आम्हाला वाघामाईच्या टेकडीवर डब्बा पार्टीसाठी घेऊन जात. त्यावेळेस आम्ही खूप हुरळून जात होतो. ही टेकडी शाळेपासून दूर होती. चालतांना आजूबाजूचे झाडं व शेतातील डोलणारे पीक पाहून आमचं मन मोहीत होऊन जात असे. टेकडीच्या पायथ्याशी शेंदूर लावलेला दगड होता. त्याची आख्यायीका लोक सांगत. पूर्वी या परिसरात घणदाट जंगल होतं. वर मोठमोठे घराएवढाले दगडं होते. त्याला कपारी होत्या. याच गुहेत वाघं राहत.

एक बाई रोज वाघाची पूजा करायला टेकडीवर जात होती. तेव्हा टेकडीवर चढणे-उतरण्यासाठी तिला खूप त्रास होत होता. म्हणून तिने वाघामायला विनंती केली,

‘तू पायथ्याशी राहायला ये.’

तेव्हा वाघामाय म्हणाली,

‘हो. मी खाली येते. पण मी येतांना मागे फिरून पाहू नको.’

ती बाई खाली उतरत असतांना वाघामाय तिच्या मागोमाग येऊ लागली. वाघामायच्या येण्यामुळे गडऽऽ गडऽऽ असा आवाज येऊ लागला. म्हणून तिने मागे फिरून पाहिले, अन् खाली कोसळून मेली. म्हणून तेव्हापासून वाघामाय खालीच आहे. तो दगड म्हणजे वाघामाय ! अशी ती कथा होती.

आम्ही एकमेकांचा आधार घेत, झाडांच्या फांद्या धरत, टोंगळ्यावर हात टॆकवत, हसत खेळत वर चढत गेलो. वर जाऊन भाकरी खाल्ल्या. वनभोजनात मस्त मजा आली. तेथील दगडावर चढून बसलो. पूर्वी वाघ ज्या कपारीत राहत, त्यात आम्ही डोकावून पाहत होतो. आम्ही भोवताल फिरुन खाली न्याहाळत होतो. यवतमाळला जाणारा रस्ता, निळोण्याची शाळा, वाघाडी नदी व आमच्या गावाचा  रस्ता दिसत होता.

आणखी गोष्ट आठवली. माझी चौथ्या वर्गाची परीक्षा तळेगावला झाली. ती बोर्डाची होती. आईने कथेतल्या भुकलाडू-तहानलाडू सारखे दोन दिवस पुरेल इतक्या गोड पापड्या, शंकरपाळे, अनारसे व करंज्या बनवून दिल्या. बाबाने काही मुलांसोबत बैलगाडीने पोहचवून दिले. मी चांगल्या मार्काने पास झालो. गुरुजी माझ्यावर खुश झाले. माझ्या घरचे सारेच आनंदीत झाले.

निळोणा गाव गेल्यावर गोधणी गावाच्या रस्त्याने निघालो. दोन शेताच्या धुर्‍याच्या मधोमध हा बैलगाडीचा रस्ता होता. हा नाल्यासारखाच खोल होता. पावसाळ्यात मस्त झुळझुळ पाणी वाहत राहायचं. मग पाणी उडवत जातांना मोठी मजा वाटत असे. थोडं दूर जात नाही तर एका ठिकाणी एकदम माझे पाय थबकले. मी त्यावेळी कसा घाबरलो, याची आठवण आल्याबरोबर हसू आलं. त्यावेळी मी व बाबा या रस्त्याने चाललो होतो. धुर्‍यावर हिरवेगार झाडे दाटीवाटीने उभे होते. पावसाळ्याचे दिवसं असल्याने वातावरणात ओलसरपणा आला होता. शेतातील ज्वारीचे हिरवेकंच धांडे पोटर्‍यावर आले होते. आम्ही दोघेही आपल्याच धुंदीत रपारप पाय टाकत जातांना बाबाला अचानक अगदी डोक्याच्या वर झाडाच्या फांदीला साप लटकलेला दिसला. बाबा तसाच ओरडला.

‘अरे, थांब रामराव…  फांदीवर साप आहे.’

मी वर पाहिले, तर एक लांबलचक साप झाडाच्या फांदीवर दिसला. त्या सापाला पाहून माझे शरीर क्षणभर थरारले. थोडावेळ निरखून पाहिल्यावर रस्त्याच्या कडेने आम्ही निघून गेलो. त्यानंतर गोधणीची शीव लागली. याच गावात मला विंचू चावल्याची गोष्ट आठवली.

माझा मोठेबाबा तेंदूच्या पानाचा ठेका घेत होता. ही पाने बिडी बांधण्यासाठी उपयोगात आणत. उन्हाळ्यात गावातील लोक पुडके बांधण्याचे काम करीत. शेतीचे कामे संपल्यावर खेड्यात दुसरे कामे राहत नसल्याने त्यांना हा रोजगार मिळायचा. हे काम पावसाचे पाणी पडेपर्यंत चालत होता. गावातल्या बाया झाकटीला उठून जंगलात-वावरात जात. दुपार होण्याच्या आधीच पानाचं भलंमोठं गठूडं डोक्यावर घेऊन येतांनाचं दृष्य जिकडे-तिकडे दिसायचं. मग घरातले सारेचजण पाने चवडण्याच्या कामाला भिडत. पळसाच्या बारीक वाकाने पुडे बांधत. शेतकरी या वाकाचे चर्‍हाट, दोरखंड बनवून शेतीच्या कामाला वापरीत. गायीढोरांची दावण याचीच करीत. बैलाने शेतातला माल खाऊ नये; म्हणून त्याच्या तोंडाला ज्या मुसक्या बांधत, त्या याच वाकाचे. पोळ्याला बैलाला सजवितांना कपाळावर ज्या मठाट्या बांधत, त्या सुध्दा याच वाकाचे.

पाने चवडतांना काही बुजरूक बाया, माणसं राजा-राणी, बहीण-भावाच्या रंजक कथा सांगत. कथा सांगून त्या बदल्यात काम करुन घेत, असा तो हिशोब असायचा. आम्ही सहसा मोठ्याआईच्या कथा ऐकायला जात होतो. माझी मोठी आई – गिरिजाबाई. तिच्या कथा सरस राहत. तिची एक कथा संपली की दुसरी ऐकावशी वाटे. जणू अरेबियन नाईट्सच्या कथा ! मी या कथांचा इतिहास वाचला; तेव्हा दंग झालो. इराणचा शहरयार राजा स्त्री जातीवर सूड उगविण्यासाठी रोज एका स्त्रीशी विवाह करून सकाळी तिला मारून टाकत असे. एकदा वजिराची मुलगी शाहराजाद हिची पाळी आली; तेव्हा ती राजाला चातुर्याने अशा कथा सांगत होती की दुसरी कथा ऐकण्यासाठी तिला जिवंत ठेवावे लागे.

तिच्या एका कथेची मला अजूनही आठवण आहे. ती म्हणजे चिलिया बाळाची ! ही कथा ऐकून आम्ही अक्षरशः रडत होतो. इतकी ती दु:खाने ओतप्रत भरलेली होती. एका बाईच्या दान-धर्माची ख्याती सर्वदूर पसरलेली असते. म्हणून देवाला तिची परीक्षा घ्यायची असते. देव तिच्या घरी पाच गोसाव्याच्या रुपात येतो. ती बाई दरवाज्यात आलेल्या गोसाव्यांना दान देण्यासाठी सुपात धान्य घेऊन येते. गोसावी तिला म्हणतात,

‘माते, आम्हाला खूप भूक लागली. आम्हाला चमचमीत जेवणाची इच्छा झाली. तेव्हा जेवणात मास खाऊ घाल.’ तिला गावात कुठेही मास मिळत नाही. ती निराश होते. पाहुण्यांना मास कसं खाऊ घालू, या विवंचनेत पडते.

तिला बाहेर खेळतांना तिचा चिलिया बाळ दिसते. तिच्या एकुलत्या-एक बाळाचं मास जेवू घालू की काय, असा अघोरी विचार तिच्या मनात येते. ती हृदयावर दगड ठेवून बाळाला हाक मारते. ज्याला तळहातावरील फोडाप्रमाणे वाढवीलं, त्यालाच मारायला उठल्यावर तिच्या जीवाला काय वाटलं असेल? पण तिचा नाईलाज झाला. तिच्या मनात उमटलेल्या भावना ती दाबून ठेवते.

बाळ घरात आल्यावर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधते. हातात धारदार मोठा सुरा घेऊन त्याचं गोजिरवाणं मुंडकं एका दणक्यात उडवते. मुंडकं परातीत झाकून ठेवते. त्याची आठवण राहावी म्हणून ! उरलेल्या नाजूक आणि कोमल अवयवाचे तुकडे करतांना तिचं मन हळवं होत जातं. मनात आतापर्यंत कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर येतो. तसं तिच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहायला लागतात. त्या आसवांच्या पाण्यात ती बाळाला शिजवते. शिजणार्‍या भांड्यातून बाळाचं रडणं ऐकू येतं. तेव्हा तिचं काळीज आणखीनच फाटते. स्वयंपाक झाल्यावर ताटं वाढते. गोसावी म्हणतात,

‘माते, तुझ्या बाळाला बोलव. त्याला घेऊन आम्ही जेवणार.’ माता काळजीत पडते. ती म्हणते,

‘तो जिवंत नाही. त्याचंच मास मी तुम्हाला खाऊ घालत आहे.’

‘तू, माता आहेस की वैरीण? तू आपल्या बाळाला मारून आम्हाला खाऊ घालतेस?’ असं म्हणून तिला दूषण देवून जेवायला नकार देतात.

‘तू, बाळाला बोलव, तेव्हाच आम्ही जेवू.’ असा ते हट्ट धरतात.

ती काकुळतीला येऊन परत परत विनंती करते. पण ते ऐकत नाहीत. शेवटी तिच्या तोंडून चिलिया बाळाचा उच्चार होतो आणि काय आश्चर्य ! आईचा आवाज ऐकून बाळ दुडूदुडू धावत येतो. त्याला जिवंत पाहून तिला खूप आनंद होतो. अशी ती गोष्ट ! विशेष सांगायचं म्हणजे – बाळाला हाक मारतांना, त्याला कापताना, शिजवताना मोठीआई अधूनमधून विशिष्ट लयीत गाणं म्हणायची. त्यामुळे आमच्या हृदयात दाटून यायचं आणि नकळत डोळ्यातून आसवं टपकायला लागत. तिची कथा संपली की कधी आमच्या चेहर्‍यावर क्षणभर आश्चर्य आणि समाधान फुलत असे, तर कधी दु:खात डुबून जात होतो. तिची सांगण्याची कसब खरंच वाखाणण्याजोगी होती. कधी चटकदार, चित्तवेधक, विनोदी, तर कधी कारुण्यांनी भरलेली असायची.

संध्याकाळी लांडग्याच्या वावरात सारेजण पुडके घेऊन येत. या जागेला बाड म्हणत. तेथे प्रत्येकांचे पुडके मोठेबाबा मोजून घ्यायचा. वहीवर लिहून घेण्याचे काम मलाच करावे लागे. कारण नाही त्याला किंवा त्याचा मुलगा गुलाब, ह्याला लिहीता-वाचता येत होतं. शनिवारपर्यंतच्या पुडक्यांचा हिशोब करुन चुकारा द्यायचा. एकतर मालक नाहीतर त्यांचा चक्कर पैसे घेऊन यायचा. गावोगावी जाऊन देखरेख करणार्‍या नोकराला चक्कर म्हणत.

पुड्याचा ठेका यवतमाळचा चंदुशेठ किंवा नथवाणी किंवा डायाभाई यापैकी कोणीतरी धनदांडगा मारवाडी घ्यायचा. हा मालक जीप घेऊन गावात आला की आम्ही मुले जीपच्या मागेमागे मातीची धूळ नाका-डोळ्यात घेत पळत होतो. तो येतांना आम्हा मुलांना पेपरमिंटच्या गोळ्या वाटायचा; तेव्हा तो आम्हाला खूप दयाळू वाटायचा. जमा झालेले पुडके उन्हाने वाळवून ढिग रचून ठेवत होतो. शेवटी हंगाम संपल्यावर किंवा पुडके जास्त जमा झाल्यावर बारदान्यात भरुन मालकाच्या गोदामावर पोहचवून देत होतो. या कामाच्या बदल्यात मोठ्याबाबाला कमिशन मिळायचं. मोठेबाबा हेच काम दुसर्‍याही गावात करीत होता. त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी घरीच राहत होतो. मग तो मलाच घेऊन जात होता.

एकदा भरदुपारी मी मोठेबाबासोबत गोधणीला गेलो होतो. तेथे त्याने बाड घेतला होता. तहानेने माझे तोंड सुकून आले होते. भुकेने कासावीस झालो होतो. मोठेबाबाला सांगितल्यावर तो मला कोलाम पोडातल्या एका घरी घेऊन गेला. त्या घरात एक कोलाम बाई पुडे बांधीत होती.

‘माह्या पोराले भाकर-चटणी देवं बाई… चालून चालून दमला बिच्चारा… कडाडून भूक लागली त्याला.’ मोठेबाबा तिला म्हणाला.

तिने घरातून अर्धी ज्वारीची भाकर व मिरची, मिठ व कांदा आणून दुरूनच माझ्या हातावर टाकली. मी भकाभका खाल्ल्यावर पोटाची आग थोडीफार विझली. तिला पाणी मागितल्यावर बाहेरच्या कुडाजवळचा जर्मनचा गिलास आणायला सांगितला. तो खास आमच्यासारख्या अस्पृष्य लोकांसाठी ठेवला होता. तो मी आणल्यावर तिने घरातून आणलेलं पाणी दुरुनच ओतलं. मी पाणी मुकाट्याने गटागटा पिलो. तिची राहणीमान गचाळल्या-गबाळल्या सारखी होती. तरीही ती कां बाट करत होती? ते कळत नव्हतं. जातीभेदाचे असे विषारी फळे अगदी लहानपणापासून मी चाखत होतो.

मग आम्ही पुडक्याच्या बाडात गेलो. तेथील काम पाहून दणाणून गेलो. पण कामाला घाबरायचं नसतं. हे मी अनुभवाने शिकलो होतो. थोडं थोडं जरी उरक केला तर कधीतरी संपून जातं, हे मला माहित होतं. मग आम्ही पुडके फेरण्याचे काम सुरु केले. हे काम फार सांभाळून करावे लागत असे. कारण अवकाळी पाऊस येऊन गेला की पुड्याच्या खाली विंचू राहत. थोडं जरी लक्ष नसलं की कधी डंख मारेल याचा नेम नसायचा. तरीही एका विंचवाने डाव साधलाच ! माझ्या पायाला डंख मारुन कुठे गायब झाला, कळलंच नाही. विंचू चावल्याबरोबर सारे देव आठवायला लागले. मरणाची आग होत होती. पाय दगडासारखा जड झाला होता. पायाला मुंग्या आल्यासारखे वाटत होते. वेदनेची कळ मेंदूपर्यंत गेली होती. मी ठणाण… रडायला लागलो. तिव्र वेदनेने तळमळत होतो.

मोठ्याबाबाने एका कोलामाला बोलाविले. तो कांदा आणि पाणी घेऊन आला. त्याने सगळा कांदा खायला दिला. तोंडाने मंत्रासारखे पुटपुट करुन माझ्या पायावर हात फिरवून गिलासात फूंक मारत होता. नंतर पाणी पिण्यास दिले. तरीही त्याच्या मंत्रा-तंत्राने विष उतरल्याचं जाणवलं नाही. मी संध्याकाळी तसाच लंगडत लंगडत गावाला आलो. रात्रभर भयानक त्रास झाला. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ठणक होती. त्यांनतर हळूहळू वेदना कमी होत गेल्या. विंचवाचं विष चोविस-तीस तासापर्यंत राहतं, असं म्हणतात. त्यावेळी पहिल्यांदाच मी हा जीवघेणा वेदना अनुभवत होतो. दुसर्‍या दिवशी हळूहळू तिसर्‍या प्रहारापर्यंत बरे वाटायला लागले.

एकदा यवतमाळला जवाहरलाल नेहरू आले होते. त्यांची सभा नॉर्मल स्कूलच्या मैदानावर भरली होती. त्यावेळी शामरावदादा मला घेऊन आला होता. खूप गर्दी होती. त्यागर्दीत मुंगीच्या पावलाने सरकत सरकत दादाने मला स्टेजजवळ नेले होते. तरीही दिसत नव्हते. म्हणून मला उचलून खांद्यावर घेतले. मग माझं डोकं दादाच्या डोक्यापेक्षा उंच झालं, तेव्हा कुठे दिसले. पुढील जीवनात मी जी काही उंची गाठू शकेन, त्याला दादाच्या खांद्याचा आधार निश्चितच असेल, हे त्यावेळी कदाचित मला कळलं नसेल !

मी अशाच आठवणीच्या धुंदीत असतांना उमरसरा कधी आलं, ते कळलंच नाही. गावात आलो. अंगण कसं गोठानासारखं खराब झालं होतं. झोपडीच्या दरवाज्याचं कुलूप करदोड्याला बांधलेल्या किल्लीने काढून आत शिरलो. घरात नजर फिरविली. घर रखरख झालेलं दिसत होतं. भिंतीचे पोपडे निघाले होते. शाळेत असतांना याच झोपडीत मी व जनाबाई राहत होतो. तेव्हा बाई हे घर सारवून चकचक ठेवत होती. अंगणात रोज सडा टाकत होती. त्यामुळे अंगण कसं साफसूफ राहत होतं.

चालून चालून मी पार थकून गेलो होतो. जमिनीवर पोतं टाकून शिणलेल्या अंगाला व मरगळलेल्या मनाला झोकून दिलं. घटकाभर आराम केला. पोटात भूक पेटली होती. एका मातीच्या गाडग्यात काळेभोर उडीद दिसले. बाई कुणाच्या वावरात शेंगा तोडायला जायची; तेव्हा वाटणीत शेंगा मिळत. तेच गाडग्यात भरून ठेवायची. चूल पेटवून जर्मनच्या गंजात मुठभर उडीद शिजवले. एखाद्यावेळी बाई नसली की मी उडीद नाहीतर तुरीच्या घुगर्‍या तेल, मीठ, तिखट टाकून शिजवत होतो. त्यानेच माझी भूक भागवीत होतो. याहीवेळेस तसेच करून पोटाची आग विझवली.

मग मी सोपानदादाच्या घरी रेशनकार्ड घेण्यासाठी जाणार, तेव्हा खिशात हात घातला. दादाने दिलेली वीस रुपयाची नोट खिशात दिसली नाही. मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यापुढे अंधारीच आली. दिवसाढवळ्या काळोख पसरल्यासारखं वाटलं. तो काळोख झरझर माझ्या मनात शिरला. मी अस्वस्थ झालो. डोळ्यातून घळघळ पाणी वाहायला लागलं. पुन:पुन्हा खिसा चाचपडून पाहत होतो. कुठे पडली कूणास माहीत? क्षणभर डोक्याला हात लावून बसलो. वीस रुपये म्हणजे परिस्थितीच्या मानाने त्याची किंमत फार मोठी होती. अंगातलं सारं अवसान गळून गेलं. माझे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. माझी स्थिती नदीतल्या पुराच्या भोवर्‍यात सापडल्यासारखी झाली. दादाला काय सांगणार या विवंचनेत सापडलो होतो. मी पुन्हा पाय तुडवत विमनस्क अवस्थेत चौधर्‍याला परत गेलो. दादाला पैसे हरविल्याबद्दल मोठ्या हिंमतीने सांगितले.

‘दादा, तू दिलेले पैसे माझ्या खिशातून कुठेतरी पडले. त्यामुळे रेशन आणता आले नाही.’ असं चाचरत चाचरत बोलतांना खालचा ओठ दाताखाली दाबत, त्याच्या प्रत्युत्तराची वाट पाहत थांबलो. मला वाटले, दादा माझ्यावर भयानक रागावेल. पण झालं उलटंच ! त्याने मला धीर देत म्हटले,

‘असू दे…! हरविले तर हरविले…! काही वाईट वाटून घेऊ नको.’ दादा मोठ्या मनाचा ! त्याने मला दडपणातून बाहेर काढले. मग मला गहिवरुन आल्याशिवाय राहविलं नाही.

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: