मी आणि माझ्या आठवणी


कथा एकोणिसावी – डोळे खाडकन उघडले

 

मी यवतमाळ शहरात पाऊल टाकलं; तेव्हा एक गोष्ट तिव्रतेने जाणवली, ती ही की आपण वेगळ्याच दुनियेत आलो. हे शहर आणि माझं खेडं यात जमीनअस्मानाचं अंतर असल्याचं दिसलं.

शहरात मोटारी-फटफट्या, गुळगुळीत डामराचे रस्ते, सिमेंट काँक्रीटचे टुमदार बंगले, एका रांगेत वसलेले, चमचमीत फरशीचे, आवाराला भिंती… तर आमच्या खेड्यात बैलबंड्या-रेंग्या, खरबरीत-दगड-माती-धुळीचे रस्ते, गवता-कुडाचे, शेणा-मातीने सारवलेले, काट्या-कुट्याच्या कुंपणाचे घरं…

शहरात साफसफाई, सांडपाण्याचे गटारे, प्रशस्त गल्ल्या, नळाचे शुध्द पाणी, वीजेचा लख्ख प्रकाश… तर गावात केरकचरा-खताचा उकंडा, उघड्यावरच सांडपाणी, अरुंद रस्ते, दूषित पाणी, अंधाराचे साम्राज्य…

शहरात गोल साड्या, घट्ट ब्लाउज, सुंदर केसाच्या चटकदार बाया, पॅंट-शर्ट घातलेले माणसं, श्रीमंताचे गुबगुबीत पोरं… तर गावात लुगडं, ढीलं-ढालं चोळ्या, विस्फारलेल्या बटाच्या निस्तेज बाया, धोतर-कुडतं-बंडी घातलेले माणसं, उघडे-नागडे, मलूल चेहर्‍याचे, मातीने माखलेले पोरं…

शहराचा झगमगाट आणि श्रीमंती थाट पाहून आमच्या गावचं बकालपण हरवून बसलो होतो. शहरासारखं सौख्य आमच्या गावाला कधीतरी लाभेल काय? हा विचार माझ्या मनात नेहमी घुमत राहायचा.

मी व जनाबाई, दोघेही बहिण-भाऊ उमरसर्‍याला राहायला आल्याबरोबर आमची शाळा सुरु झाली. जे विद्यार्थी पुढल्या वर्गात जात, त्यांची पुस्तके अर्ध्या किंमतीत घेत होतो. नाहीतर विजय बुक डेपो मधून पाऊन किंमतीत घ्यायचो.

माझी शाळा, त्याकाळची म्युनीसिपल हायस्कूल…! आझाद मैदानाजवळची… उमरसर्‍यापासून तिनक मैल दूर… रोज सकाळी वह्या-पुस्तकांची थैली कधी हातात तर कधी खांद्यावर टाकून तितक्या दूर पाय तुडवत जात होतो. बाईची चौथीची प्राथमिक शाळा तहसील ऑफीसच्या समोर होती. पाचवीपासून काटेबाईच्या शाळेत गेली.

पाचवीपासून हिंदी व इंग्रजीचा विषय सुरु झाला. शिक्षकांनी ए.बी.सी.डी पाठ करायला सांगितले होते. त्याची हुर्दुक झोपेतही राहत होती. सकाळी उठवल्यावर बाई सांगायची की, ‘झोपेत तू ए.बी.सी.डी म्हणत होता.’ येथे गुरुजींना ‘सर’, हजेरी देतांना ‘येस सर’ म्हणणे ह्या सार्‍या गोष्टी मला नवीनच होत्या. आमच्या निळोण्याच्या शाळेत असं काही नव्हतं.

उमरसर्‍याला एकच विहीर होती. ती यवतमाळच्या रस्त्यावर बदाडात होती. पावसाळ्यात तुडुंब भरायची. सुट्टीच्या दिवशी कपडे धुवायला याच विहिरीवर येत होतो.

शाळेत जातांना बब्बी पहेलवानाचं घर लागत होतं. तो एखाद्यावेळी डुलत डुलत चालतांना दिसायचा. आणखी दुसरा जांबुवंत पहेलवान होता. दोघेही उंच-पुरे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारे. जांबुवंतची व्यायामशाळा काणेच्या दवाखान्याजवळ तर बब्बीची दत्त चौकात होती. मी तेथील व्यायामाचे प्रकार आणि कुस्तीचे डावपेच पाहण्यात रमून जात होतो. या दोघात विस्तव जात नसल्याचं ऎकलं होतं. त्यांच्या कुस्तीच्या सुरस कथा मुलं सांगत. एकदा सरोज टॉकीजमध्ये दोघांची मस्त फ्रीस्टाईल कुस्ती सुरु झाली. सिनेमा पाहणार्‍यांनी सिनेमापेक्षा त्यांच्या कुस्तीतच जास्त रस घेतला होता, म्हणे !

मी घरी येतांना दातेच्या घराजवळच्या इंग्रजी चिंचाच्या झाडाचे लाललाल पिकलेल्या टपोर्‍या चिंचा तोडत होतो. मग खात खात घरी येत होतो. तेव्हापासून इंग्रजी विषयापेक्षा इंग्रजी चिंचाच जास्त आवडायला लागल्या होत्या.

मला नेहमी ब्रूक बॉंड टीची लाल रंगाची, दोन चाकी गाडी, खाकी ड्रेस घातलेला माणूस ढकलतांना दिसायचा. दुसरा देखणा माणूस – तो साहेब असावा, सूट-बुटातला, हातात हँड बॅग असलेला चालतांना दिसायचा. दुकान आलं की आत जायचा. मग नोकर चहाचे पुडे काढून दुकानात घेऊन जायचा. मला जेव्हाकेव्हा ही गाडी दिसायची; तेव्हा माझं लक्ष तिकडे हमखास वळायचं.

आणखी घंटीचा आवाज आल्यावर समजून जात होतो की, होय न होय ही रसवंतीच असली पाहिजे. ही तीन चाकी गाडी, त्यावर चरक आणि उसाचे पेंडके ठेवलेले. कधी चरकाच्या दांड्याला माणूस फिरवायचा तर कधी बैल फिरवायचा.

मला कधी रस्त्याच्या कडेने घोळका दिसायचा. काही तरणाबांड, पांढरे शुभ्र कपडे घातलेले, देखणे पोरं-पोरी खांद्यात भात्याची पेटी अडकवून एका सुरात गाणे म्हणायचे. ते लहान लहान पुस्तिका वाटत. त्यात येशू ख्रिस्ताचा उपदेश असायचा. रस्त्यावर येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याचा हा अनोखा प्रकार मला फार भावला.

सरकारी दवाखान्याजवळील रोडच्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली पांढर्‍या रंगाच्या कापडावर, पालखट मांडून, कपाळावर उभं गंध लावलेला, अंगात पांढराशुभ्र शर्ट घातलेला व एकटांगी धोतर नेसलेला, डोक्यात टोपी व खांद्यावर शेला ओढलेला ज्योतिष्य बसलेला दिसायचा. तेथे लाकडी काड्याच्या पिंजर्‍यात पोपट, पाकिटाची चवड, निरनिराळ्या देवाच्या तसबीर्‍या, लिहिण्याची पाटी, लेखणी व पंचाग ठेवलेले दिसायचे. मला त्याचं मोठं कुतूहल वाटायचं. मी ते पाहायला थोडावेळ तरी थबकत होतो. जाणार्‍या-येणार्‍याकडे पाहात तो, ‘ज्योतिष्य पहा, भविष्य पहा’ असं हलक्या आवाजात बोलायचा. त्याच्याकडे गिर्‍हाईक आला की त्याचा पेहराव पाहून तसा बोलायचा. ‘या साहेब, भाऊ, दादा’ असं म्हणायचा. पैसे टाकले की पिंजर्‍यातील पोपटाला बाहेर काढायचा. पोपट उगीच पाकिटाच्या भोवती फिरायचा. मग एक पाकीट चोचीत धरून बाजूला ठेवायचा. ज्योतिष्य पाकिटातील कागद बाहेर काढून त्यात पाहात भविष्य सांगायचा. ते सारं पाहून मला मोठी गंमत वाटायची.

तसंच मला एक दृश्य नेहमी दिसायचं. रस्त्याने माणसाची विष्ठा बादलीत घेऊन जाणारी बाई किंवा माणूस ! कधी ती बादली हातात तर कधी डोक्यावर… एखाद्यावेळी छोट्याशा ढकलगाडीत ती बादली असायची. हे दुरूनच दिसलं की आम्ही जवळून जात नव्हतो. त्या विष्ठेचा घाणेरडा वास यायचा. नाक दाबून जात होतो. हे लोक कसे काम करीत असतील, याचं आश्चर्य वाटायचं आणि कीव पण यायची. घाणीतून अवतरलेलं शहराचं हे दुसरं रूप पाहून मनाला झिणझिण्या येत होत्या. आमच्या खेड्यात असं नव्हतं. कुणीही कुणाची विष्ठा घेऊन जात नव्हतं. खरं म्हणजे कुणीही घरात संडास करीत नव्हतं तर ते बाहेर जात. बाया गोद्रित, माणसं वावरात, धुर्‍यावर किंवा लवणाच्या काठावर… शहरात तर वेगळंच पाहिलं. घाण आपण करावी अन् साफ मात्र दुसर्‍यांनी करावी ! किती विचित्रपणा होता, हा !

मला आठवतं, तो म्हणजे चिरफाड बंगला. हा बंगला माझ्या शाळेच्या रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर नव्हता; पण एखाद्यावेळी मी उगीच दुसऱ्या रस्त्याने जात होतो. तेथून जातांना माझा जीव वर-खाली व्हायचा. पण मला त्याचं नेहमी कुतूहल वाटायचं. चार भिंतीच्या आत प्रेत असलं की बाहेर लोकांची गर्दी व पोलिस दिसत. या ठिकाणाला बंगला का म्हणत, ते मला उमगत नसे. पण ज्या फाटक्या माणसाकडे राहण्यासाठी घर नाही, अशा माणसाला निदान शेवटच्या क्षणी तरी बंगल्याचं सुख मिळावे; म्हणून या वास्तूला बंगला तर म्हणत नसावे ना, असा विचार माझ्या मनात यायचा.

एखाद्यावेळी टांगाचौकात पेवंडी आंबा विकत घेऊन सालपटासकट खात होतो. हे आंबे मला फार आवडत. कधीकधी मारवाडी चौकात जाऊन गरम गरम भाजलेले फुटाणे घेऊन खात होतो. शाळेच्या बाहेर खरमुरे विकणारा माणूस ‘खरमुरेऽऽ’ असा लयबद्ध आणि विशिष्ट आवाजात ओरडायचा. त्याने चोळून फुक मारलेले खरमुरे पाच पैशात विकत घेऊन खात होतो. हे खारवलेले शेंगदाणे खूप छान लागत. कधीकधी काचेच्या डब्ब्यातलं गुलाबी रंगाचं कापसासारखं गोल गोळा असलेलं ‘बुढ्ढीका बाल’ घ्यायचा मोह टाळता येत नव्हता. तोंडात टाकलं की अलगद विरघळून जायचं.

शहरातील गणपती, दुर्गोत्सवाच्या वेळी मुर्त्या, रोषणाई पाहून माझे डोळे दिपून जायचे. त्यातील ऑर्केस्ट्रा, गीतगायन, नृत्य, नाटक, नकला, सिनेमा इत्यादी कार्यक्रम पाहायला मी जात होतो.

गणपती पाहतांना लहानपणची गोष्ठ आठवायची. ज्यादिवशी गणपती शिरवित, त्यादिवशी आमच्या गावातील पोरी-पोरं संध्याकाळी यवतमाळला येत. रात्रभर वाजतगाजत जाणार्‍या गणपतीची मिरवणूक पाहण्यात आम्ही दंग होवून जात होतो. एकेदिवशी मी गणपती पाहायला जाण्यासाठी रडत होतो. त्याचवेळी जनामामी आमच्या घरी आली. मला रडतांना पाहून म्हणाली,

‘कावून रडता गा…?’

‘त्याला गणपती पाहायचे आहेत.’ आई म्हणाली.

‘हात्त… तिच्या. एवढंच…! काय बाप्पा…! त्या नासुकल्या गणपतीसाठी रडता…? तुमचा मोठेबाबा गणपतबुवा आहे ना गावात. त्यालाच पाहून घ्याऽऽ ना…? त्याला पाहिलं काय न् गणपती पाहिलं काय, सारखंच…! कशाला पाय तुडवत तीन कोस यवतमाळला जाता अन् तीन कोस परत येता?’ तिचे ते गमतीशीर बोलणं ऐकून मी उगामुगा झालो होतो.

एकदा माईंदे चौकात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. मी सोपानदादासोबत पाहायला गेलो होतो. त्यावेळी तेथील मोकळ्या मैदानात दुर्गादेवी बसली होती. एका गायिकेने, ‘रसिक बलमाऽऽऽ दिल क्यो लगाया तुने.’ हे जिवाच्या आकांताने गायलेली भावसंगीतातील अप्रतिम गाणं मला फार भावलं होतं. तसंच ‘कुहुऽऽ कुहुऽऽ बोले, कोयलीया.’ हे द्वंदगीत अगदी गोड आणि सुरेल आवाजातलं मनाला भिडलं होतं. मधामधात मुलींचा डॉंन्स. असा तो सुरेख नजारा डोळे भरून पाहतांना बेधुंद होत होतो. जणू मी सिनेमाच पाहत आहे, असा भास होत होता.

त्यावेळी कार्यक्रम पाहून घरी आल्यावर खूप रात्र झाली. तेवढ्या रात्री अभ्यास करायचा कंटाळा आला होता. सकाळी शाळेत जायला निघालो. रस्त्यात शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास केला नसल्याचे लक्षात आले. तेव्हा दरदरुन घाम फुटला. आता काय करावे, काही सुचत नव्हते. मी पार धास्तावून गेलो.

मी घाबरलेल्या अवस्थेत शाळेच्या आवारापर्यंत गेलो. परंतु माझे पाय एकाएकी माघारी फिरले. सापळ्यात अडकलेल्या उंदरासारखी माझी अवस्था झाली. त्यातून कसं निघावं, तो मार्ग सापडत नव्हता. धागा तुटलेला पतंग जसा भरकटतो, तसेच माझ्या मनाचे झाले होते. मी विमनस्क अवस्थेत धामणगाव रोडने कॉटन मार्केटपर्यंत गेलो. तेथे आवारात दुर्गादेवी बसली होती. मी दुर्गादेवीकडे पाहिलं. मनात आलं, तिला माझी व्यथा सांगितली असती. पण जाऊ द्या ! ती निर्जीव आहे, ना !

मन कुठं स्थिर राहतं. तो भूतकाळात शिरतं. या ठिकाणी शेतकरी भुईमूगाच्या शेंगा, तुरी, ऊडीद, ज्वारी, कापूस असा शेतातला माल विकायला आणत. मीपण दोन-तीनदा कधी बाबासोबत तर कधी दादासोबत आलो होतो, ते सारं आठवलं. तेथे माल टाकण्यासाठी सिमेंटचे ओटे बांधलेले होते. त्यावर माल उबडून दलाल व व्यापार्‍यांची वाट पाहत बसत होतो.

दलाल व व्यापारी मालाची हर्रास करीत. व्यापारी म्हणेल तो भाव दलाल तोंडाने म्हणायचा. शेवटी एक-दोन-तीन म्हणून माल विकून टाकायचा. दलाल आणि व्यापारांच असं साटंलोटं आमच्या काही लक्षांत येत नव्हतं. माल शेतकर्‍याचा आणि विकायचा तो दलाल. जणू काही तोच मालक ! हे पाहून मला वाटे, शेतकर्‍यांचं जीवन म्हणजे मुंगीसारखं ! कष्टांनं जिवापेक्षा जड असलेला एकेक कण कोठारात नेऊन टाकावा. पण कुणीतरी फस्त करून आपल्याला उपाशी ठेवावं ! संध्याकाळी दलाल मालाला आलेल्या किंमतीतून दलाली, मापार्‍याचा खर्च, ओट्याचं भाडं, सरकारचे कर असं सटरफटर कापून आलेला बाकीचा चुकारा देत होता.

मला नेहमी प्रश्‍न पडायचा, ‘जो कष्ट उपसतो, त्याच्याच स्वप्नांचा चुराडा होतो. जो कापूस पिकवतो, तोच नागवा राहतो. असं का?’ शेतकर्‍याला आपल्या मालाची किंमत का ठरविता येत नाही? त्याने किती खर्च केला? त्याने बायको-पोरांसह किती कष्ट उपसले? याची काहीही किंमत नव्हती. घामात भिजवून काढलेला माल डोळ्यादेखत मातीमोल भावात विकल्या जात होता. तेव्हा काळजाचं पाणी पाणी होत होतं. दुसरीकडे कारखानदार आपल्या वस्तूची किंमत ठरवूनच बाजारात आणत होता. पण शेतकरी आपल्या वस्तूची किंमत ठरवू शकत नव्हता. असं का? व्यापारी शेतकर्‍याच्या मालाचा भाव पाडूनच खरेदी करीत व एकदा का त्यांच्या ताब्यात गेला की त्याच्या किंमती भराभर वाढत. अशीही गंमत मी त्यावेळी पाहत होतो. अशा अनेक निरुत्तर प्रश्‍नाच्या गराड्यात मी सापडलो होतो.

मी दुर्गादेवीच्या अवतीभवती फिरुन वेळ काढत होतो. शाळा सुटण्याची वेळ झाल्यावर घरी जाण्यास निघालो. कुणाला दिसू नये, म्हणून दुरुनच नजर टाकून पाहत पाहत घरी गेलो.

दुसर्‍या दिवशी तीच गत झाली. दप्तर घेऊन शाळेत न जाता रेल्वे स्टेशनवर गेलो. तेथून दोन जिवाची शकुंतला रेल्वेगाडी झुकूडऽऽ झुकूडऽऽ करत मुर्तिजापूरला जात होती. स्टेशनवर फक्त इंजिन होतं. त्यात एक माणूस टोपल्यानं दगडी कोळसा भरत होता. दुसरा फावड्याने धगधगत्या विस्तवात टाकत होता. त्याचसोबत इंजिनमध्ये पाणी भरत होता. म्हणजे या इंजिनचं खाणंपिणं चालू होतं. कोळशाच्या जळणाचा दर्प चरचरीत वाटत होता. दुरूनच मांगगारुड्यांच्या वस्तीतला कलकल ऐकू येत होता. मी या रेल्वेस्टेशनचं दृश्य पहात फिरत होतो. एवढ्यात उमरसर्‍याच्या शामरावदादाने – ज्याच्या घरी मी राहत होतो, त्याने पाठीमागून आवाज दिला. तो कोठून आला, काय माहीती? मात्र त्याचा आवाज ऎकून माझी पाचावर धारण बसली.

‘अरे, रामराव… इकडे कुठे फिरत आहेस? शाळेत गेला नाहीस?’

मी काहीच बोललो नाही. शाळेत न जाता मी इकडे फिरत आहे; हे त्याने ओळखले. मला त्याने खडसावले. खोटं कधी लपून राहत नाही. कधीतरी बाहेर येतंच. तसंच माझं झालं. मी शाळेत का जात नाही म्हणून तो खोदून खोदून विचारत होता. त्याच्या समोर मी बोलायला घाबरत होतो.

‘तुझी खरोखरच काय अडचण आहे, ते सांग. म्हणजे दूर करता येईल. तुझ्या माय-बापाने शिकून मोठा होशील, म्हणून मोठ्या आशेने तूला पाठविलं. तू शिकला नाहीस, तर तूला काबाडकष्ट करण्यात जीवन घालवावे लागेल. आम्ही शिकलो नाही, म्हणून बिड्या बांधत आहे. त्यातच आमचं जीवन बर्बाद होत आहे. तू असा करु नको. चांगला शीक म्हणजे नोकरी लागेल. त्यामुळे तुझं जीवन सुखात जाईल.’ असा तो समजवण्याच्या सुरात एका दमात बोलून गेला.

त्याच्या बोलण्याचा माझ्याही मनावर परिणाम झाला. त्याच्या शब्दातून अतीव कळवळा झिरपत असल्याचे मला जाणवत होते. खरोखरच, आई-बाबाने मला येथे शिकायला पाठविले आणि मी कोणत्या मार्गाने जात आहे, या गोष्टीची तिव्रतेने जाणीव झाली. माझं मन हेलावलं. त्याला मी शाळेत का जात नाही, ते डोळ्यात पाणी आणून सांगितलं. माझं मन इंजिनच्या कोळशाप्रमाणे आतल्याआत जळत होतं. घुसमटत होतं. पण त्यांनी आधार दिल्याने माझ्या मनाला थोडी उभारी आली.

‘घरी चल. मी चिठ्ठी लिहून देतो. ती मास्तराला दाखव म्हणजे काही करणार नाही.’ असा धीर दिला. त्याच्या मागेमागे मी घरी गेलो. घरी गेल्यावर त्यांनी चिठ्ठीत लिहीले की, ‘हा मुलगा खेड्यातून शिकायला आला. तो माझ्या घरी राहतो. तो गेल्या दोन दिवसापासून आजारी होता. त्यामुळे शाळेत येऊ शकला नाही. तरी त्याला क्षमा करावी.’

ही चिठ्ठी मी वर्गशिक्षकाला दिली. ती वाचत असतांना मी त्यांच्या चेहर्‍याच्या हावभावाकडे डोळे रोखून अधिरतेने पाहत उभा होतो. वाचून झाल्यावर, ‘ठीक आहे. बस जागेवर.’ असे म्हणाले.

त्याचवेळेस माझ्या डोक्यावरचं सारं ओझं खाडकन उतरलं. मला आता हलकं हलकं वाटायला लागलं. मी हर्षभरीत होऊन माझ्या जागेवर येऊन बसलो. माझं अंधारलेलं जीवन आता उजळू लागलं. या प्रसंगाने माझी जीवननौका कुठेतरी भरकटण्याआधी माझे डोळे खाडकन उघडले, म्हणून बरं झालं !

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: