मी आणि माझ्या आठवणी


कथा सतरावी – घसरता घसरता सावरलो

 

त्या प्रसंगाने खरंच मला खूप धडा शिकविला. जीवनातला एखादा प्रसंग माणसाला मुळापासून हलवून आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन जाते म्हणतात. तसंच मी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. तेव्हापासून मी वाईट सवयीपासून परावृत होत गेलो. हा प्रसंग घडला नसता, तर कदाचित माझ्या जीवनाचे प्रयोजनच हरवले असते. ही घटना कित्येक दिवस माझ्या काळजात पक्की रुतून बसली होती. बोटात शिलक घुसावी व ती जागा सारखी सलत राहावी, तशी ही गोष्ट मला सलत राहत होती.

ही गोष्ट कथन करण्यापूर्वी काही आठवणी सांगितल्याशिवाय मला राहवत नाही.

त्यादिवशी कापूस विकून दादा मला पैसे देणार होता. म्हणून शाळा सुटल्यावर मी तडक धोब्याच्या दुकानावर आलो.

‘दादा आला का?’ मी धोब्याला विचारले.

‘हो. आला. त्याने तुला थांबायला सांगितले.’

त्याची पत्र्याची टपरी आमच्या चौधरा गावाच्या रस्त्यावर होती. दूरवरून चालून येतांना थकवा आल्यावर लोक येथे लिंबाच्या झाडाखाली विसावा घेत. म्हणून तो चांगला ओळखीचा झाला होता.

मी बाहेर बेंचवर दप्तर ठेवून बसलो. दादाची भिरभिर वाट पाहतांना कधी रोडवर तर कधी धोब्याकडे नजर जायची. त्याच्या कानात अर्धवट ओढलेल्या बिडीचं थोटूक लटकवलेलं होतं. तो निखार्‍यावर शिलगावून मधामधात पीत होता.

वाट पाहतांना, हां हां म्हणता रात्र वाढत गेली. तरीही दादा आला नाही. धोब्याचे दुकान बंद करायची वेळ टळून गेली. तरी पण तो इतकावेळ थांबला होता. तेवढ्या रात्री मी उमरसर्‍याला एकटा जाऊ शकत नव्हतो; म्हणून त्याने दुकान बंद करुन त्याच्या सोबत यायला सांगितले.

त्याचं घर आठवडी बाजाराच्या कोपर्‍यात होतं. घराजवळ आलो; तेव्हा भाजीपाल्याच्या कचर्‍याच्या घाणेरड्या वासानेच माझं स्वागत झालं. त्याचं घर व राहणीमान पाहून तो अत्यंत गरीब असावा असे वाटत होते.

त्याने मला घरात न येऊ देता पडवीत थांबायला सांगितलं. त्याला माझी जात माहित असल्यानेच मला दूर ठेवत होता. पण त्याने मला तसंच वार्‍यावर न सोडता घरी आणले, हेही काही कमी नव्हतं. धर्मव्यवस्थेने त्याला बाट करायला शिकविले; पण त्याच्यात माणुसकी जिवंत होती.

त्याची जात खालचीच, हे मला शाळेत कळले होते. कारण धोब्याचा मुलगा माझ्या वर्गात शिकत होता. त्याला माझ्यासारखीच स्कॉलरशिप मिळत होती. आम्ही दोघेही खालच्याच जातीचे असतांना तो माझा बाट का धरतो, ते मला कळत नव्हते.

त्याने मला जर्मनच्या जुनाट ताटात भाकरीच्या घोटल्या खायला दिल्या. मला दिवसभराची भूक लागली होती. त्यामुळे तोंडातल्या तोंडात जरी घास फिरत होता, तरी भूकेची आग विझविण्यासाठी ते खाणं मला भाग होतं.

टिनाच्या पत्र्याचं लहानसं घर, पडवीच्या समोर तट्ट्याची नहाणी होती. तेथून लघवीचा येणारा उग्र वास सहन होत नव्हता. मच्छराचा गुंगऽऽ गुंगऽऽ आवाज व त्याच्या चावण्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही. सकाळीच उठून घरी आलो.

आल्या-आल्या बाई चिंतातूर स्वरात म्हणाली,

‘कुठे होता रे… रात्रभर…’

‘अवं बाई… दादाची वाट पाहिली. तो आलाच नाही. मग धोबी… घरी घेऊन गेला. तेथेच थांबलो.’

‘जेवला होता का तसाच झोपला उपाशी…?’ पुन्हा काळजी तिच्या चेहर्‍यावर उमटली.

’हो… घोटल्या खाल्ल्या…’

’बरं झालं…! नाहीतर माझ्या जीवाला किती घोर लागून गेला होता, म्हणून सांगू… !’ असं म्हणून पायावर चढलेला विंचू झटकून टाकावा तसं तिने काळजी झटकून टाकली. नंतर कळले की दादाला कापसाचा चुकारा दलालाकडून फार उशिरा मिळाला. म्हणून लवकर आला नव्हता.

तसंच मी व माझी मामेबहीण, सुदमताबाई सकाळची शाळा करुन घरी आलो. त्यावेळी आम्ही मोठीआत्या, बकू हिच्या घरातील एका खोलीत राहत होतो. माझी बहीण व चित्राबाई – सुदमताबाईची मोठी बहीण, दुपारच्या शाळेत गेल्या होत्या.

मी शाळेचं दप्तर खुंटिला अडकवून हात-पाय धुतले. जेवायला बसतांना सुदमताबाईने गंज पाहिला. त्यात फिक्कं वरण दिसलं. पण दवडीत भाकरी नव्हत्या. त्याचवेळी तिच्या भुवया गुल्लेरच्या रबराप्रमाणे ताणल्या गेल्या. आता भाकरी बनविण्याची पाळी आपल्यावर आली हे तिला कळून चुकलं.

तिने कुरकुरत चूल पेटवली. धगधगणार्‍या लाकडाचा धुराने वैतागून गेली. भाकर थापायला लागली की तुटून जायची. ती मोडून पुन्हा करायची. पुन्हा तुटून जायची. यातच केसाच्या बटाने तिला त्रास देणं सुरु केलं. तिचे सुटलेले केसं, भरलेल्या पिठाच्या हातांने मागे सारण्याची तिची तारांबाळ पाहतांना मला कसंच तरी वाटत होतं. ती रडकुंडीला आली. चित्राबाई व जनाबाईला ती ठेवणीतल्या शिव्या देत होती. मी तिच्याजवळ बसून तिची ही केविलवाणी अवस्था निमुटपणे पाहत होतो.

मला आठवते, मी लहान असतांना सुदमताबाईसोबत खेळभांड्याचा, चाटल्या-बुटल्याचा व बाहुली-बाहुल्याचा खेळ वाडीमध्ये खेळत होतो. त्यावेळी आम्ही दोघे जोडीने खूप खेळायचो. ती खोटी खोटी स्वयंपाक करतांना मला बाजार आणायला जा म्हणायची. मी जायला निघालो की थांबवून, ‘हे आणजो, ते आणजो’ अशी सांगत राहायची. मी जातपर्यंत माझा पाय काही केल्या बाहेर पडू देत नव्हती. कधीकधी परत आलो तरी ‘भजे आणजो, गुलगूले आणजो’ अशी तिची लांबन सुरुच राहायची. अशी आमची गंमत मामी सांगायची.

लहानपणी ती हसत-खेळत खेळातला स्वयंपाक करायची. आता मात्र खरोखरचा स्वयंपाक करतांना तिला रडवलं होतं ! कशातरी तुटक्या-ताटक्या, जळक्या-जुळक्या भाकरी तिने बनविल्या. त्याच भाकरी आमच्या भुकेजलेल्या पोटाला गोड लागत होत्या. संध्याकाळी दोघ्यांही बाईंना ही गोष्ट सांगितली. ‘सयपाक करायला कसा नेट लागते, आता कसं कळलं…?’ अशा कडवट प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केल्या. ही गोष्ट आठवली की आताही मला हसू येतं.

नागपंचमीला गावातले उत्साही लोक झाकटीलाच विक्रमदादाच्या घरी जमत. तेथे ‘हरेरामा… राघोबारे…’ अशा बार्‍या म्हणत. नंतर वारुळावर जावून नारळ फोडत. आजूबाजूला लाह्या, खोबर्‍याचे बारीक तुकडे व दूध शिंपडत. नागोबा वारुळाच्या बाहेर येऊन खातो व नारळ्याच्या दिवटीतले दूध पितो, असा समज. अशा भ्रामक समजुतीमुळे दूध व इतर पदार्थ किती वाया जात असेल, कुणास ठाऊक? रुढी-परंपरेच्या नावाने ही नासाडी होत होती.

सोपानदादाच्या घरचे महाशिवरात्रीचा उपवास धरत. त्यांच्या घरी राहत असल्याने आम्ही पण उपवास धरला. सकाळी रताळं खाऊन कसातरी दिवस काढला. पण रात्रीला माझ्या पोटात कावळे बोंबलायला लागले. आता ढोर मरेल केव्हा अन् कावळ्याचा उपास सुटेल केव्हा, असं मला झालं. मी बाईला लहानसं तोंड करून हळूच म्हटले,

‘बाई, भूक लागली.’

‘तरी मी म्हणत होती… रामराव, उपवास नको धरु. तुला सोसणार नाही. पण ऎकलं कुठं?’

‘बरं, भाकर टाकून देते. खाऊन घे.’ असं म्हणल्याबरोबर माझ्या चेहर्‍यावर हास्य फुलवून गेलं.

एकदा सावित्रीबाईच्या मुलाचा नवस फेडण्यासाठी ढुंगणापूर देवस्थानावर पैदल गेलो. हे ठिकाण दोनक कोस दूर होतं. शेतातून पायरस्त्याने वडगाव, लोहारा व ढुंगणापूरला गेलो. जातांना घरी मूठभर दाळ होती. ती शिजवून बाईने मला खाऊ घातली. बाई मात्र कटोकट उपाशी होती.

तेथे स्वयंपाक केला. देवाची पूजा झाल्यावर जेवण करुन दुपारी परत निघालो. इतक्या दूर चालल्याने पाय दुखत होते. उन्हामुळे जीवाची लाही लाही होत होती. पाणी जास्त पिल्याने चालतांना पोटातले पाणी हालत होते. म्हणून उलटून फेकत होतो. त्यामुळे मी काहीतरी चमत्कार करत आहे, अशा भावनेने माझ्याकडे सर्वजण पाहत होते.

देवबा, सखूआत्याचा मोठा मुलगा. तो पोलिस होता. मारुतीचा कट्टर भक्त. तो मला रुईचे फुलं तोडून आणायला सांगायचा. मग हे फुलं, पाण्याचा गडवा, नारळ, तेलाची वाटी, शेंदूर असे काही सामान माझ्याकडे देऊन मारुतीजवळ जात होतो. मला पूजा होईपर्यंत तेथेच थांबण्याची शिक्षा होत होती.

बौध्द धम्म स्विकारल्यानंतरही हे लोक जुनेच सण, उपास-तापास व देवपूजा का करीत होते? ते मला कळत नव्हतं. मी मात्र उभ्या जन्मात कोणत्याच देवाची पूजा केली नाही. आमच्या घरी कोणीच देवाला मानत नव्हते.

या गावातील बाया-माणसं बिड्या बांधण्याचे काम करीत. कधी यवतमाळला भारत बिडी कारखान्यात, तर कधी नामदेवच्या कोठ्यावर जाऊन बिड्या बांधत. कधी घरीच बांधून कोठ्यावर नेऊन देत. येतांना पानाचे मुडे, तंबाखू व सुताची लडी घेऊन येत. रात्रीला मुडे पाण्याने भिजवून ठेवत. सकाळी पानं कापून फडक्यात गुंडाळून ठेवत. सुताच्या लडीचा गुंडाळा करुन घेत. बिडी बांधतांना पायाच्या बैठकीवर सूप ठेवत. त्यात कापलेल्या पानात दोन्ही हाताच्या बोटाने सुपामधील तंबाखू भरून, विशिष्ट पध्दतीने सूत बांधून, वरचे टोक नखाने किंवा पात्याने बंद करीत. ही प्रक्रिया शरिराच्या लयबद्द तालाने करीत असल्याने, मी मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडे पाहतच राहत होतो. ते या कामात खूप व्यस्त राहत. म्हणून त्यांचे चिल्लर-चाल्लर कामे करण्यासाठी कोणीतरी जवळ असलं की त्यांना बरं वाटायचं. त्यामुळे तंबाखू घोटून देण्यापासूनचे अनेक कामे करावे लागत होते.

बाई पण हे काम शिकली होती. ती सुट्टीच्या दिवशी कुणाच्यातरी नावाने बिड्या बांधत होती. त्याचे पैसे तिला मिळत. बाई कधीकधी कुणाच्या शेतात कामाला जात होती. त्यामुळे घरखर्चाला मदत होत होती. सुट्टीच्या दिवशी नाल्याजवळील झाडीतून पळसाच्या डांग्या तोडून, भारे डोक्यावर घेऊन येत होतो. झोपडीजवळ सांदीत सुड रचून वाळल्यावर चुलीत जाळत होतो.

असंच एकदा मोळ्या घेऊन येतांना आई पण होती. ती आमच्या समोर होती. आम्ही मागे पडलो. त्यावेळी पोलिस आडवा होऊन तिला दरडावून विचारपूस करीत होता. आई घाबरली. तेवढ्यात मी आलो. तो पोलिस दुसरा तिसरा कोणी नसून विक्रमदादा होता. तो नुकताच ड्युटी करून आला होता. आम्ही मोठ्या माणसांना ‘दादा’ व बायांना ‘बाई’ म्हणत होतो.

‘काय झालं दादा?’ मी त्याला दादा म्हटल्यावर आई एकदम चमकली.

‘ही कोण?’ तो म्हणाला.

‘माझी आई…!’

‘असं होय. मला माहीतच नाही. घाबरू नको, आई…! मी विक्रम…’ हे ऐकून आईची भीती निघून गेली. अशी त्याने आईची गंमत केली होती.

त्यावेळी तंबाखू व बिड्यांशी सारखा संपर्क येत असे. त्याच्या उग्र वासाचा नाका-तोंडाला सवय झाली होती. बहुतेकजण चुन्यासोबत घोटलेल्या तंबाखूचा गोळा तासनतास ओठात धरुन ठेवत. त्याचा रस लाळेवाटे पोटात गेल्याने अंगात गुंगी व तरतरी येत असे. एखाद्यावेळी तंबाखू खायला मिळाला नाही, तर जीव कासावीस होत असे.

हिवाळ्यात कापलेल्या पानांचा शेकण्यासाठी उपयोग करीत. सकाळी त्यावर तंबाखू जाळत. त्याचा उग्र वास जिकडे तिकडे पसरायचा. या प्रक्रियेला ‘मिसरी’ म्हणत. त्याने दांत घासल्याने अंग फिरल्यासारखे वाटत असे.

बहुतेक माणसं बिड्या ओढत. ही सवय सर्वांनाच जडलेली असते. माझा दादा व बाबा पण बिडी ओढत. मला कधीकधी बिड्या आणायला दुकानात पाठवित. कधी विस्तवावर बिडी पेटवून आणायला सांगत. मोठ्यांच्या काम सांगण्यामुळेच लहानांना वाईट सवयी सहज लागून जायच्या.

मला पण बिडी पिण्याची अनावर इच्छा होत होती. मी एकदा बाई घरी नसतांना बिडी ओढून पाहिली. सुरुवातीला ठसका लागला. तरीही पुन्हा तिव्र इच्छा झाल्यावर लपून-छपून बिड्या ओढण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बिडीचा धूर नाका-तोंडातून बाहेर काढायला मस्त मजा वाटत होती.

त्यादिवशी रात्रीला बाई भाजीला फोडणी देऊन आत्याबाईच्या घरी गेली. मला बिडी पिण्याची अनावर आठवण झाल्याबरोबर माझं मन रोमांचित झालं. मी लपवलेली बिडी घाईघाईने काढली. चुलीतल्या विस्तवावर शिलगावली. दोन-तीन झुरके मारले असतील, नसतील, तर बाई अचानक आली. माझी चोरी तिने पकडली ! मी इतका ओशाळलो की सांगूच नका ! मग काय…? बाईने अशी खरडपट्टी काढली की परत मी बिडीला कधी हात लावला नाही. मला जर बाईने फटकारले नसते, तर कदाचित मीही बिडी फुंकणार्‍यांच्या पंगतीत जाऊन बसलो असतो. त्यानंतर बिड्याऎवजी तंबाखू खायला लागलो.

माझ्या घरी बाई, आई, वहिनी व मी तंबाखाचे सेवन करत होतो. खेड्यामध्ये हे व्यसनं सार्वत्रीक झालेले होते. मी दादा व बाबाच्या आड लपून खात होतो. मी घरी असलो की आई किंवा वहिनीला घोटून मागत होतो. त्यात त्यांचा जिव्हाळा व मायेचा ओलावा पाझरायचा. माझा लहान भाऊ अज्यापला मात्र तंबाखूचा वासही सहन होत नव्हता.

माझे दोस्त-मित्र तंबाखू खात होते. आम्ही खिशामध्ये ‘चुनाळू’ बाळगत होतो. ही दोन कप्पे असलेली टिनाची डब्बी. एका कप्प्यात चुना तर दुसर्‍या कप्प्यात तंबाखू. कोणी तंबाखू खात असला की तो घोटलेला तंबाखू दुसर्‍याला देत होता. म्हणून गंमतीने म्हणत की, ‘श्रीकृष्ण म्हणे अर्जुनाला, लाव तंबाखाला चुना, तूच माझा मित्र जुना !’

तंबाखात अनेक घातक विषारी द्रवे असतात. म्हणून तंबाखाचे सेवन करणे शरीराला अपायकारक आहे, ही गोष्ट त्यावेळी कळत नव्हती. बाकीचे लोक खातात म्हणून आपणही खाल्ले तर काय बिघडते…? असेच सर्वांना वाटायचे.

गावातली एक व्यक्ती बिडी कारखान्यात चहा बनवून कामगारांना विकत होता. त्याला घरी यायला रात्र व्हायची. तो येतांना दारु पिवून हलत-डुलत व हातातील चहाच्या केटलीला झोका देत यायचा. तेव्हा त्याचं हे विचित्र रुप पाहून गावातले कुत्रे भुंकत आणि त्याच्या मागे लागत. मग तो कुत्र्याला म्हणायचा, ‘क्यो बे… मुझे पहचाना नही क्या…?’ गणपतीला जसे वाजंत्री वाजत-गाजत घरी आणून सोडतात, तसे हे कुत्रे त्याला घरापर्यंत आणून सोडत. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्यावर आम्ही समजून जात होतो की आता xxxx ह्या माणसाचं आगमण झालं असेल. मग आम्हाला हसू यायचं

शनिवारी चुकारा मिळाला की खुशीत राहत. त्याचवेळी एक बाई फुटाणे, चकल्या विकायला आणत होती. ते घेऊन घरी येत. मग मुलं खुश होत. बाई पण आणायची; तेव्हा मीपण खुश होत होतो.

रविवारी बिडीचे काम बंद असे. बाया त्यादिवशी डोक्यावर टोपलं घेऊन बाजाराला जात. त्यात भाजीपाला व किराणा भरून आणत. माणसं एकतर गावात जुगार खेळायला बसत किंवा काहीजण बाजारात जाऊन धंदा करीत. हरीदास, जनार्दन, सोपान, शामराव, चोखोबा, विक्रम, महादेव, वामन, रामदास, पुंडलीक असे मोठ-मोठे माणसं, त्यादिवशी पत्त्याचा जुगार खेळत.

महादेव – जो पत्ते खेळतांना कधीकधी दिसायचा, त्याच्याबाबतीत विशेष सांगायचं म्हणजे तो पोटदुखीने ढोरासारखा रडत होता. त्याने घराच्या आड्याला फाशी घेतली. त्यावेळी मी फार हळहळलो. त्याचे बाबा माझ्या बाबाचा नातेवाईक लागत होता.

त्यांच्या जुगाराच्या अड्ड्याजवळ मुलांसोबत मीपण कुतूहलतेने पाहत राहायचो. आम्ही त्यांचा खेळ तासनतास पाहण्यात रमून जात होतो. ते सहसा ‘परेल’चा खेळ जास्त खेळत. आम्ही सुध्दा लपून-छपून खेळत होतो. त्यामुळे आम्हालाही गंजीफा खेळण्याचा नाद लागला होता. पैसे जिंकण्याच्या हावेपोटी हा नाद गोचिडासारखा चिकटून बसत असे. मला जुवा खेळतांना एक-दोनदा सोपानदादाने पकडले होते.

‘यापुढे जुवा खेळतांना दिसला नाही पाहिजे.’ असा त्यांनी दम दिला. तरीही पत्ते खेळण्याचा नाद काही केल्या सुटत नव्हता. मी त्याला भीत होतो. तो जरी रागिट स्वभावाचा वाटला तरी तो मनाने खूप चांगला होता.

जनार्धनदादा बिड्याच्या चुकार्‍याचे पैसे हरला होता. त्यामुळे जुव्याच्या रागापाई तो एकाएकी कोणालाही न सांगता निघून गेला. त्याची बायको धाय मोकलून रडत होती. दोघेही नवरा बायको तरुण होते. त्याच्या जाण्यामुळे सर्वच लोक चिंताग्रस्त झाले होते. गावामध्ये शोककळा पसरली होती. जिकडे-तिकडे त्याची शोधाशोध सुरु झाली. पण कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.

काही दिवसांनी त्याचे घरी पत्र आले. तो जुव्याचा धसका घेऊन मिल्ट्रीत भरती झाला. त्यावेळी भारत आणि चिनच्या दरम्यान युध्द सुरु होतं. त्यामुळे त्याला लगेच सैनिकाच्या भरतीमध्ये विनासायास प्रवेश मिळाला होता.

एकेदिवशी तो सुट्टीवर आला. तेव्हा त्यांनी गोळ्या-बिस्किटे आम्हा मुलांना दिले. त्याच्या येण्यामुळे आम्ही खुश झालो होतो. तो सैनिकात कसा भरती झाला, याचा किस्सा रंगवून रंगवून सांगत होता. तो जेव्हा परत जायला निघाला, तेव्हा पुरा गाव त्याला सार करण्यासाठी लोटला होता.

त्यादिवशी जनाबाई व चित्राबाई शाळेत गेल्या होत्या. मी सकाळची शाळा करुन आलो. जेवण करून आम्ही मुले जुवा खेळण्यासाठी बसत होतो. दुपारनंतर मोठी माणसं गावात दिसत नसत. त्यामुळे आमचंच राज्य राहत होतं. जुव्याच्या नादाने आम्ही मुले पुरते झपाटल्या गेलो होतो. डाव सुरु झाला. माझ्याजवळ होते-नव्हते पैसे हरवून बसलो. त्यावेळी एक, दोन, तीन, पाच, दहा असे नवीन पैसे होते. जवळचे सर्व पैसे हरल्याने मी हिरमुसला झालो. तरीही खेळण्याची खुमखूमी कमी झाली नव्हती.

मी विमनस्क अवस्थेत खोलीवर आलो. चित्राबाईची लहानशी पत्र्याची पेटी दिसली. मी त्यात हुडकायला लागलो. त्यात काही पैसे दिसले. क्षणभर ‘हे पैसे घेऊ की नाही’ असा विचार डोक्यात घोळत राहीला. पण एक मन म्हणत होतं की, ‘पैसे जिंकले की हे पैसे पेटीत ठेवून देईन.’ आणि हरलो तर…? या विचाराने माझा थरकांप उडाला ! तरी मनाचा हिय्या करून, माझे हात त्या पेटीत स्थिरावले. थरथरत्या हाताने चार आणे काढून घेतले. जन्मात कधी चोरी केली नव्हती; पण जुव्याचा नाद काही स्वस्थ बसू देत नव्हता.

पुन्हा खेळायला बसलो. दुर्दैवाने हरलो. आता काय करावे सुचत नव्हतं. मी फार मोठा अपराध केला होता. कशाला जुव्याच्या मागे लागलो, असं सारखं राहून राहून वाटत होतं. माझ्या आई-बाबाने शाळा शिकण्यास पाठविले. अन् मी कोणत्या मार्गाने चाललो, याची तिव्रतेने जाणीव झाली. मी भीत भीत घरी आलो. आता बेचैन अवस्थेत माझं मन कुठेच लागत नव्हतं. अभ्यासावर तर मुळीच लागत नव्हतं. चित्राबाईने पेटी उघडून पाहिलं तर नाही ना? असा विचार मनात घोळायचा. ‘चोराच्या मनात चांदणे’ म्हणतात, त्याप्रमाणे माझ्या मनाची घालमेल सुरु होई. माझा जीव सारखा धाकधूक करीत होता.

चित्राबाईने दुसर्‍या दिवशी पेटी उघडून पाहिली. अन् जोरात किंचाळली…! ‘माझे चार आणे काय झाले?’ असे म्हणून रडायला लागली. मी तोंडात मिठाची गुळणी धरुन बसल्यागत तीचे केविलवाणे रडणे मुकाट्याने पाहत होतो. तिच्या रडण्याने माझं मन आतल्याआत रक्तबंबाळ होत होतं.

बाहेरच्यांनी चोरले असावे, असे तिला वाटले. कुणालाही माझ्यावर शंका आली नाही. कारण सर्वांचाच माझ्यावर विश्वास होता. पण मी विश्वासघात केला. ही सल माझ्या मनाला टोचत होती. जशी अळी पान कुरतुडून कुरतुडून खाते, तशी अपराधाची भावना माझं मन कुरतुडून खात होतं. वरुन चांगला पण आतून वाईट सवयीच्या आहारी गेल्यावर, तो चोरीसारखे अभद्र व अनैतिक कृत्याला कसा बळी पडतो, हे त्याचं ज्वलंत उदाहरण होतं.

त्या चार आण्याला किती महत्व, हे तिच्या हमसून हमसून रडण्याने अनुभवलं होतं. जणू तिचं भावविश्व हरपल्यासारखं झालं होतं. त्यानंतर जेव्हाकेव्हा माझं मन जुवा खेळण्यास अधीर व्हायचं, तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने आठवीत होती. त्या आठवणीने आतल्या आत पिळल्यासारखे होत होते.

पण जीवनाच्या रुळावरुन घसरता घसरता मी खरोखरच सावरुन गेलो.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: