मी आणि माझ्या आठवणी


कथा सोळावी – कुत्रा चावला पण वाचलो

 

खरं, म्हणजे तो पिसाळलेला कुत्रा नव्हताच मुळी ! त्यामुळेच त्या मांत्रिकाचे फावले. नाहीतर त्याच्या मंत्राचा काहीही उपयोग झाला नसता !  तो जर पिसाळलेला असता, तर माझं काही खरं नव्हतं. त्याच्या  लाळेतील रेबिजचे जंतू शरिरात पसरून, मी पण पिसाळलो असतो व मरणाच्या दाराकडे माझी वाटचाल सुरु झाली असती !

त्यावेळी मी आणि जनाबाई शिक्षणासाठी उमरसऱ्याला राहत होतो. आम्हा दोघा बहीण-भावाचं जीवन घडविण्यामध्ये उमरसरावासीय लोकांचा फार मोठा सहभाग होता.

उमरसरा हे गाव यवतमाळ शहराला लागून असल्याने बाहेरील गावाचे मुले येथे शिक्षणासाठी राहत. खेड्यातील मुलांनी शहरात येऊन उच्च शिक्षण घ्यावेत; असं येथील लोकांचे उदात्त धोरण होतं. म्हणून ते राहण्याची व व्यवस्था करीत. मला तर हे गाव एखाद्या कुटुंबासारखं वाटत होतं.

कोळंबी गावाचा पांडूरंगदादा कॉलेजला शिकत होता. तो अन्नपूर्णाबाईच्या घरी राहायचा. तिच्या घरातील आई कौसलबाई, भाऊ विक्रम आणि सारेच आपुलकीने वागवीत. चिखली गावाचा परशराम हा पण कॉलेजला शिकत होता. तो चोखोबाच्या घरी राहत होता. महादेव, नाना पण शिकत होते. महादेव गाणे म्हणायचा. मेहराबादचा श्रीराम व घारफळचा काळुराम आमराईतल्या उमरसर्‍यात राहत होते. त्यांच्यासोबतच माझ्या मावस बहिणीचा मुलगा अर्जुन सहावीत शिकायला होता.

यापूर्वी आम्ही घर सोडून कुठे राहिलो नाही. त्यामुळे घरची आठवण फार सतावत असे. इतकी की कधीकधी वाटायचं की पाखरासारखे पंख असते तर उडत उडत गावाला जाऊन आलो असतो. मग सुट्ट्या पडल्या की आम्ही घरी गेल्याशिवाय राहत नव्हतो.

एकदा अर्जुन, मी व जनाबाई गावाला जात असतांना भगवानच्या वावराजवळच्या वळणावर आलो. त्यावेळी अर्जुनचे बाबा अचानक आमच्यासमोर येऊन टपकला. आम्ही त्यांना दाजी म्हणत होतो. त्यांचा एक हात मनगटापासून मुडपलेला होता. ‘का रे… का आलास? मी तुला सांगितलं होतं ना, घरी येत नको जाऊ म्हणून… तरीही आलास?’ असे दरडावून अर्जुनला बोलला. त्याच्या उत्तराची वाट न पाहता त्यांनी हातातल्या छत्रीनेच अर्जुनला बदडायला सुरुवात केली. त्यांनी इतके मारले की आमच्या डोळ्यातून आसू ओघळायला लागले. आम्ही ‘मारु नका दाजी…’ म्हणून विनवणी करत होतो. पण तो काही आवरत नव्हता. शेवटी मारुन मारुन छत्रीचा दांडा तुटून गेला ! इतका मार खाऊनही अर्जुनच्या डोळ्यातून तसुभरही थेंब बाहेर पडला नाही ! बिच्चारा…! मुकाट्याने बापाचा मार खात होता.

‘बईन मायमी…! हा लेकाचा सारखा घरी येतो… तिकडे त्याची शाळा पडते… चांगलं मन लाऊन शिकत नाही… त्याला म्हणलं, घरी येत नको जाऊ… पण ऎकत नाही…’ असं म्हणून धुंड्या हाताने मारत होता. शेवटी तोंडाने बडबड करत गेला. मी त्या प्रसंगाने धास्तावून गेलो. मुक्या मनानेच आम्ही तिघेही घरी आलो.

तेव्हापासून त्याने शाळा सोडून दिली ती कायमचीच ! आत्याला पुरेसे पैसे व दाळ-धान्य त्याचा बाबा देत नव्हता. म्हणून ती सारखी अर्जुनच्या मागे कटकट लावत होती. अर्जुनच्या बालमनाला ते सहन होत नव्हतं. म्हणून तो सारखा घरी येत होता. बापाला सांगीतलं तर बाप मनावर घेत नव्हता.

तसा तो हुशार होता. त्याची स्मरणशक्ती दांडगी होती. पण बापाने त्याला समजून घेतलं नाही. शाळा सोडल्यावर त्याला जे शेतीला जुंपलं, ते कायम त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत चिकटून गेलं ! आयुष्यात आलेली संधी हुकली की ती परत कधी येत नाही, असेच त्याच्या बाबतीत घडलं. याचं मला फार वाईट वाटत होतं.

आम्हाला परशराम, पांडूरंग व हरिदासदादा गणितं सोडवून द्यायला मदत करायचे. या सर्वांना दादा म्हणत होतो. हरिदासदादा परीक्षा जवळ आली की आम्हाला अभ्यासाला मदत करायचा.

तो आम्हाला पलीकडील जंगलात घेऊन जायचा. तेथील झाडाच्या सावलीत किंवा झाडावर चढून एकांतात अभ्यास करत होतो. जवळूनच झुळझुळ पाण्याचा प्रवाह वाहत जात होता. तेथील थंडगार पाणी पिऊन मन शांत करत होतो. निसर्गाच्या सानिध्यात एकांत मिळाला की मन कसं एकाग्र व स्थिर होत होतं. त्यामुळे अभ्यास चांगला होत होता, हे सांगायलाच नको ! त्यावेळी पुस्तकातला कण न कण वेचत बुद्धीत साठवीत होतो.

आम्ही रात्रीला प्रल्हादच्या घराच्या अंगणात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत होतो. संत तुकाराम जसे म्हणाले होते की ‘असाध्य ते साध्य, करीता सायास, कारण अभ्यास !’ हे आम्हाला तंतोतंत लागू पडत होतं. आही पुस्तक डोक्याच्या खाली घेऊन झोपत होतो. पुस्तक उशाला घेतल्याने त्यातील अभ्यास डोक्यात घुसते, असा समज होता. सकाळी पुन्हा अभ्यासाला भिडत होतो. त्यावेळी एका सिनेमातील गाणे नेहमी लागायचे. त्या गाण्याच्या चालीवर आम्ही पण गमतीने म्हणत होतो.

‘अभ्यास करनेके लिये, हम सारी रात जागे।

अल्ला जाणे, क्या होगा आगे।।

ह्या गावातील सारी घरे कुडा-मातीचे, कौलं किंवा टिनाचे होते. सर्व घरे बौध्दांचे होते. फक्त एक घर मुसलमान तेल्याचं होतं.

आमची परीक्षा आली की आई स्वयंपाकासाठी आमच्याकडे यायची. ती आल्यावर आम्हाला मोठ्ठा आनंद व्हायचा !  तिच्या उपस्थितीमुळे वातावरण किती सुरक्षित, प्रसन्न आणि आनंददायी व्हायचं ! गावाला आम्ही आईशिवाय कधी राहिलो नाही. येथे आईशिवाय राहणं म्हणजे पोरकं असल्यासारखं वाटत असे. मला आठवते, कधी अपरात्री जाग आली आणि अंधाराची भीती वाटू लागली की आईच्या कुशीत शिरत होतो. झोपेतच ती जवळ ओढून माझ्या पाठीवर हात फिरवत धीर देत होती. मग त्या मायेच्या स्पर्शाने माझी भीती कुठल्याकुठे पळून जात होती. म्हणूनच मला गावाची फार ओढ लागत होती. जशी एखादी मुलगी सासरी कितीही रमली, तरीही माहेरची ओढ काही केल्या संपत नाही, तसंच ! गावाला जायचं म्हटलं की माझं मन असंच गाईकडे जाणार्‍या वासरासारखं नाचू-बागडू लागत होतं.

सुरुवातीच्या काळात आमची परिस्थिती बर्‍यापैकी होती. त्यावेळी बाबा दमडूमामाची शेती वाहत होता. शेतीतील माल तो रविवारच्या बाजारात विकायला आणत असे. तेव्हा आम्ही भाजीपाला विकण्यासाठी मदत करत होतो. ओरडून ओरडू्न बाजारातल्या गिर्‍हाईकांचे लक्ष वेधून घेण्यातही मजा वाटत होती. दांडी-पारड्याने भाजी मोजून देतांना मोठेपणाचा आव येत असे.

बाजार म्हटलं की जिकडे तिकडे गजबज, कालवाकालव, आवाजाचा गोंगाट, मरणाची गर्दी, घाई, ओळखीच्या लोकांची आपुलकीने विचारपूस, चहा-सोडा पाजणे, बीडी-तंबाखूची देवान-घेवाण, अशा गोष्टी आल्याच ! सोड्याचं नाव निघाल्याने मला आठवते ती सोड्याची तीन चाकी गाडी, जोर लावत ढकलत जाणारा तो कळकट माणूस, दाटीवाटीने ठेवलेल्या काचेच्या बाटल्या, बाटल्यात अडकेलेली काचेची गोळी, तिला आत ढकलण्यासाठीचा रबरी बुच, बुच दाबल्यावर आसमंत चिरत जाणारा आवाज, गिर्‍हाईकाने बाटली तोंडाला लाऊन दिलेली समाधानाची ढेकर ! हे दृश्य माझ्या मनात कोरून गेलं.

आई घरुन भाकर आणीत असे. बाबा मासळी बाजारातून भाजलेल्या मासोळ्या आणायचा. आई त्याची टमाटे, कांद्याची पाल व हिरव्या मिरच्या चिरुन कच्चीच छानशी चटणी बनवीत असे. मग आम्ही भाकरीसोबत मस्त खात होतो. त्याचा स्वाद माझ्या जिभेवर बरेच दिवसपर्यंत तरळत राहत असे. मला या भाजलेल्या मासोळ्या तेव्हापासून फार आवडायला लागल्या होत्या.

बाजार ओळीच्या कोपर्‍यात करीमची चक्की होती. आमच्या गावाचे लोक दळण-भरडण याच चक्कीवर करीत. या चक्कीजवळून जातांना बाईच्या पायाला पुराणी टोचल्याची आठवण ताजी होत असे. दादाने धान भरडण्यासाठी आणले होते. भरडून झाल्यावर तांदळाचे पोते गाडीवर टाकले. बाई पुराणीची काडी हातात घेऊन पोत्यावर बसली होती. शामरावदादा सामान आणायला गेला होता. बाई बसल्या बसल्या पुराणीची काडी खालच्या पोत्यावर टोचण्याचा खेळ खेळीत होती. असं करतांना एकाएकी पुराणी तिच्या पायाला अंगठ्याजवळ टोचली. तिला भयानक वेदना होत होत्या. घरी आल्यावर शेक-निवा केला. परंतु पायाचं दुखणं काही केल्या बसलं नव्हतं. उलट पिकून आल्याने तेवढी जागा टरटर फुगली होती. त्यामुळे ती भयानक वेदनेने तळमळत होती.

तिला दादाने सरकारी दवाखान्यात आणले. त्यांनी ती जागा बधिर न करता हाताने जोरात दाबून पू काढला. असह्य वेदना होत असल्याने बाई ढोरासारखी रडत होती. दादाने मग तिला हॉटलात नेऊन मटण खाऊ घातले. हे दुखणं पुन:पुन्हा उमळत असल्याने तिला कित्येक दिवस हा त्रास झाला होता.

एक वेडी बाई आमच्या दुकानाजवळ येऊन बसत होती. आई तिला तंबाखू, चुना, टमाटे खाण्यास देत होती. तिला पैसे पण द्यायची.

मी आईला विचारले, ‘आई, ही वेडी का झाली? ती सारखी माह्या सोन्याऽऽ माह्या सोन्याऽऽ  का म्हणते.’

‘तिची एक कहाणी आहे, पोरा…’ आई कहाणी सांगायला लागली.

‘ती खेड्यात राहात होती. नवरा मेल्याने रांडमुड झाली. तिला आठ-दहा वर्षाचा एकुलता एक पोरगा होता.

एके दिवशी तो आईला म्हणाला, ‘माय, मी बाजारात जाऊन येतो.’

‘जा. पण बरोबर घरी ये, सोन्या…’

‘हो.’ असं म्हणून तो दोस्तांसोबत निघून गेला.

बस… त्याचा तो शेवटचा आवाज तिने ऎकला. तेव्हापासून तो घरी आलाच नाही. म्हणून ती दर बाजाराला येऊन भिरभिर पोराला पाहत असते व सोन्याऽ सोन्याऽऽ म्हणून हाक मारत असते. पोराच्या मायेपोटी ती वेडी झाली.’

कधीकधी दादा शनिवारी मुक्कामाने यायचा. घरचं कोणी असलं की आम्हाला फार बरे वाटत असे. दुसर्‍या दिवशी दादा सोपानदादाच्या भागिनदारीत ऊसं विकत घ्यायचा. मीपण ऊसं विकायला त्यांना मदत करीत होतो.

दिवस बुडतीला जाऊन अंधार पडायला लागला की दिवसा फुललेला बाजार कसा ओस पडल्यासारखा वाटायचा. मग सायकलचा टायर जाळून त्याच्या उजेडाने काही मुलं बाजारात फिरतांना तेवढे दिसत. भाजीपाला किंवा पडलेल्या पैशाचा ते शोध घेत.

त्यादिवशी रात्रीला मग दादा, सोपानदादा व त्याचा मोठाभाऊ शामरावदादा असे तिघांची दारु पिण्यासाठी मैफल बसायची. बाजाराचा दिवस म्हणजे सार्वत्रीक मटणाचा दिवस ! मटण घ्यायला कमेल्यात गेलं की ओट्यावर बकर्‍याची कातडी सोलून उलटे टांगलेले, मुंडी नसलेलं धुडं दिसायचे. असं ते दृश्य पाहिल्यावर वाटायचं की बकर्‍यांनी माणसाला कापून त्याला जर उलटं टांगलं तर माणसाची काय अवस्था होईल? कल्पनाही करवत नाही.

कमेलात पाऊल टाकल्याबरोबर मटण विकणार्‍यांची कावकाव पहिल्यांदा ऐकू यायची. नुसता गलबला. कुणी भाऊ, कुणी दादा, काका असे नातं दाखवून गिर्‍हाईकाला हाका मारीत. ‘इकडे या. मटण पहा. कसं ताजं. आत्ताच कापलं. अस्सल बोकड्याचं.’ असे म्हणून आपापल्या मटणाची तारीफ करीत आणि गिर्‍हाईकाला पटविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. काहींचे बांधलेले गिर्‍हाईकं असत. गिर्‍हाईक दुसरीकडे गेला की एकमेकांचे उणे-दूणे काढत. ‘काय भाऊ, ते शिळे मटण घेता.’ असे म्हणत. मग धारदार चापट सुरीने मांसाचे लचके तोडून पारड्यात टाकत. जाड बुंध्याच्या ठोकळ्यावर बारीक तुकडे करून गिर्‍हाईकाला देत. असं त्यांचं काम नवख्या माणसाला मोठं नवलाईचं वाटत असे.

त्यादिवशी घरोघरी मटणाचा खमंग वास यायचा. बाई मिरची-मसाला भाजून पाट्यावर वाटायला दोन घराच्या सामटीतून आत्याच्या घरी जायची. मग झणझणीत फोडणी द्यायची. त्या मटणाची चव काही विचारूच नका. मस्त चवदार…! हातबोट पुसून खाण्यासारखी !

दादाचे दुकानं ठरलेले होतं. किराणा भाट्याच्या दुकानात, कपडे सिंदीच्या दुकानात, मटण लक्ष्मण खाटकाकडे, शिलाई भाऊराव टेलरकडे, कटींग सरोज टॉकीजसमोरच्या केशकर्तनालयाकडे. आम्हाला अडचण येऊ नये म्हणून दादाने या दुकानदारांना सांगून ठेवले होते. त्यामुळे ते आमच्याकडून नगदी पैसे घेत नसत. कपडे मात्र दादाच घेऊन द्यायचा. बाकी सामान उधारीवर घ्यायला आम्हाला मुभा होती.

अन्नपूर्णाबाईच्या घरासमोर मोकळी जागा होती. तेथे पंचशील झेंडा होता. तेथे समाजाचे सामुहीक कार्यक्रम होत असत.

पीठ दळून आणण्याचं काम बाईने माझ्यावर सोपविलं होतं. मी भाट्याच्या दुकानातून ज्वारी उधारीवर घेऊन दत्तचौकाच्या चक्कीवर येत होतो. तेथे सुपाने पाखडून व खडे-कचरा निवडून दळत होतो. मग पिठाचं गाठोडं डोक्यावर घेऊन घरी येत होतो.

माझ्या आत्याच्या घरचे लोक चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्याकडे आम्ही राहत असतांना कधी दुजाभाव केला नाही. फक्त त्यांना काम प्रिय होते. आम्ही त्यांनी सांगितलेले कोणतेही काम करत होतो. ‘नाही’ कधी म्हणत नव्हतो. हाच आमच्या दोघा बहीण-भावाचा स्वभावगुण त्यांना आवडला होता. ते बिड्या बांधत असतांना सर्व वस्तू त्यांना जाग्यावर पाहिजे असत. ठरलेल्या बिड्या तेवढ्या विशिष्ट वेळात बांधून झाल्या पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असायचा. नाहीतर बिड्यामध्ये तूट येणे परवडत नसे.

‘रामराव, हे आण रे, ते आण रे, हे कर, ते कर,’ असं सारखं चालू राहायचं. त्यांना तंबाखू घोटून द्यावं लागत असे. कधी तेंदुच्या पानाचे मुडे भिजवून, तर कधी पानं कापून द्यावे लागे.

सोपानदादा व त्याचा भाऊ शामरावदादा रविवारच्या बाजारात धंदा करीत. शामरावदादाचा सांबार-अद्रक विकण्याचा धंदा ठरलेला होता. त्यांचे सोबत मीपण सकाळीच जात होतो. तो सांबार-अद्रक ठोकमध्ये आणायला जायचा, तेव्हा मला दुकानावर बसावे लागे. फुलनबाई – त्याची बायको आल्यावर मला सुट्टी व्हायची. सोपानदादा ऊसं घ्यायचा. तेव्हा त्याचे सोबत मला विकण्याचे काम करावे लागे.

एकदा सोपानदादाने गोधणीकडे जाणार्‍या कोठ्यावर काकडीच्या वेलाचा ताटवा विकत घेतला होता. तेव्हा तो मला काकड्या तोडायला घेऊन जायचा. तेथे कोवळ्या कोवळ्या काकड्या खायला मिळत असे. काकड्या तोडून बैलगाडीत भरुन शहरात विकायला आणत असे. मग गाडीनेच फिरुन ‘काकड्या घ्याऽऽ काकड्या… असे ओरडून गिर्‍हाईकांना सांगावे लागत असे.

आमच्या शेजारी भाड्याने कांबळे नावाचे तरुण जोडपं राहत असे. तो यवतमाळला सरकारी कार्यालयात नोकरीला होता. ती बाई आमच्यावर अपार जीव लावायची. ती आमच्यासाठी बरेचदा बनविलेली भाजी आणून द्यायची. तेल आणि निंबुच्या रसात मीठ टाकून तळलेल्या हिरव्या मिरच्या हमखास आणून द्यायची. ह्या मिरच्या भाकरीसोबत खायला खूपच झणझणीत लागायच्या.

ते दोघेही एकमेकांच्या खोड्या करीत. लहान मुलं जसे खेळतात, तसे दंगामस्ती करीत. त्यांना मुल-बाळ नव्हतं. म्हणून कदाचित दु:खं विसरण्यासाठी ते लहान मुल बनून खेळण्या-बागडण्याची हौस भागवीत असावेत. त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक क्षणाचा ते दोघेही मनसोक्त आनंद घेतांना मला मोठं कौतुक वाटायचं. त्यामुळे मला ते जोडपं जबरदस्त आवडलं होतं.

जेव्हा ते गाव सोडून गेले, त्यावेळेस आमच्या घरातलं कुणीतरी सोडून गेलं की काय, असेच वाटत होतं. खरंच, त्यांच्या सारखंच आपण खेळकरपणा आपल्या मनाच्या कोंदनात रुजवायला, भिनयायला हवा ! हसण्या-खेळण्याने माणसाचं जीवन होतं, सुसह्य आणि उल्हासित ! त्यामुळे क्षणभर का होईना दु:खाचा विसर पडतो. असं ते जीवनाचं गमक मला शिकवून गेले.

उमरस‍र्‍याच्या मागे नाल्याच्या पलीकडच्या वावरात आणखी एक-दोन घरं होते. त्याला जुना उमरसरा म्हणत. तेथे शेतामध्ये लक्षीबाई राहायची. तिचा मुलगा आमच्या सोबतचा मित्र होता. त्यांच्या शेतात पेवंडी बोरं होते. ते खायला आम्ही जात होतो.

एकदा मी दुपारी शाळेतून घरी येत होतो. रस्त्याने येता येता पाठीमागून कुत्रा कसा आला कळलेच नाही. त्याने माझ्या पायाच्या घोट्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला; तेव्हा कुठे कळले. त्याचे दोन दात रुतले होते. त्यातून रक्त बाहेर येत होतं. रस्त्यात पडलेल्या चिंधीने रक्त पुसून घेतलं. चालतांना खूप त्रास होत होता. कसातरी लंगडत लंगडत घरी आलो. त्यावेळस आम्ही वामनदादाच्या घराच्या खोलीत राहत होतो. तो घरीच बिड्या बांधत होता.  मी लंगडतांना त्यानं पाहिलं.

‘रामराव, काय झालं रे?  लंगडून का राहिलास?

‘कुत्रा चावला, दादा.’ असं सांगून चावलेली  जागा त्याला दाखवली.

‘अरे हो…! त्याला चुना लाव.’ त्याने दिलेला चुना मी चोपडला.

‘तू  मारवाडी चौकात जा. तेथे सोनाराच्या दुकानात  कारागीर असतो. तो मंत्र टाकतो. जातांना लिंबाच्या दोन-चार डहाळ्या व फूटाणे घेऊन जा. तो मंत्र टाकून खायला देतो. काही होणार नाही. घाबरु नको.’ त्याने बोलून मला धीर दिला.

मी जेवण करुन मारवाडी चौकात गेलो. तेथे आजूबाजूला विचारपूस केल्यावर मांत्रिकाचा शोध लागला.

‘माझ्या पायाला कुत्रा चावला.’ त्या मांत्रिकाला सांगून चावलेली जागा दाखविली.

त्याने माझ्याजवळचे फुटाणे हाताच्या मुठीत घेतले. तो तोंडाने काहीतरी पुटपुटत फुटाण्यावर फुंक मारुन मला खाण्यास दिले. मी सर्व फुटाण्याचा बोकणा भरला. नंतर लिंबाच्या डहाळ्या घेऊन चावलेल्या ठिकाणी वरुन खाली फिरवत होता आणि  तोंडाने काहीतरी पुटपुटत होता.

‘जा घरी आता… काही होणार नाही…’

मी घरी आलो. संध्याकाळी बाई शाळेतून घरी आली. तिला मी सांगितले. ती घाबर्‍या-घुबर्‍या झाली. तिने खायच्या तेलात हळदीची पूड घालून कोमट केलं व चावलेल्या जागेवर लावलं. काही दिवसांनी ती जखम बसली. पण त्याच्या खुणा मात्र कायमच्या राहिल्यात.

 

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: