मी आणि माझ्या आठवणी


खेड्यामध्ये खरंच अनोखं असं वातावरण अनुभवाला यायचं. माझ्या बाबासारखे अनेक शेतकरी उन्हाळ्यात आग ओगणार्याअ सूर्याच्या किरणाने बायका-पोरांसोबत भाजून निघत असतांना, त्याची तमा न बाळगता उन्हाळवाही करायचे. चोपुन-चापून शेतीची मशागत करुन येणार्या पावसाच्या आगमनाचं उत्सुकतेने वाट पाहत राहायचे.
आई वाळलेल्या पर्हाशट्या, तुरीचे खुस्पटं किंवा ज्वारीचे फणकटांचे ढीग रचून संध्याकाळच्या वेळी सावली पडल्यावर पेटवून द्यायची. मग तो आगीचा लोळ पाहतांना अंगावर शहारे उमटत. त्या गंजीतील किडे, माकोडे, अळ्या होरपळून मरतांना जिवाची तगमग होत होती. आजूबाजूच्या बहुतेकांच्या शेतामध्ये असंच जंगलाला वणवा लागल्या सारखं दृष्य दिसायचं.
एखाद्यावेळी खरंच दुरवर डोगराच्या जंगलात वणवा पेटलेला दिसला की माझ्या मनात भीतीचा गोळा उमळायचा. कुणीतरी वाटसरु मुद्दाम पेटवीत होता की, बिडी शिलगवतांना आगपेटीच्या काडीने पेटत होता, की लाकडाच्या घर्षणामुळे पेटत होता, ते काही कळत नव्हतं. ती आग पुर्याप जंगलभर पसरत होती. त्यामुळे लहान-मोठ्या जंगली प्राण्यांची, पक्ष्यांची, सरपटणार्याय जीवांची आश्रयस्थाने नष्ट होवून जात; तेव्हा मनाला चुटचुट लागून जात होती.
गाई-ढोरांचे शेण आणि कचर्याटचं खत शेतात आणून टाकत. मी लहानपणी खताच्या डालीवर डाव-डाव करायला जात होतो; तेव्हा बारीक कण नाका-डोळ्यात व कानात शिरत असे. बैलगाडी हाकणार्यात धुरकर्यारचं गुणगुणणं, वावर येईपर्यंत कानात घुमत राहायचं.
शेतकर्यांरप्रमाणेच उन्हाने रापलेली-तहानलेली माती सुध्दा पावसाचे स्वागत करण्यासाठी आसुसलेली राहत होती. पावसाच्या आगमनाने धरतीचं तन-मन कसं उत्फुल्लित होवून जात होतं.
त्याकाळी रोहिणी नक्षत्रातच घनघोर पाऊस बरसत असे. ऊन्हाळभर रखरख असलेल्या शिवारात पाऊस पडला की जमिनीची गर्भधारणा झाल्यासारखे वनस्पती भराभर उगवून वर यायला लागत. काही अंकुरलेल्या चिमुकल्या रोपावर टरफलाची टोपी दिसून येई तर काही सुईसारखी सरळ बाहेर येत. त्यात कुसळी, काशा, हराळी, कंबरमोडी, काटमाटी, बरबडी, चिकाटा, वाभिट, गोखरु, डोरली, वाघनखं, परडी, धोतरा, कामीनी, फटाके, ऎरंडी, चरोटा, रानभेंडी, पाया-पोटर्यााला चिकटणारे कुत्रे, अशा कितीतरी वनस्पतीच्या जाती असायच्या. त्यांची इवलीइवली रोपे पावसाच्या सरीबरोबर डोलतांना दिसत; तेव्हा असं वाटायचं की जणू काही त्यांना झालेला आनंद नाचूनगाऊन दाखवीत आहेत. त्या कोवळ्या अंकुराचा वास मस्त नाकात घुमायचा तर वेडावून टाकणारा मातीचा गंध चोहीकडे दरवळायचा. गावाचा, नद्या-नाल्याचा व वावराचा चेहरामोहरा बदलून जायचा. पांदणभर पाण्याची चिलकी वाहत राहायची. त्या पाण्यात धपकण उड्या मारायला किंवा फतक फतक चालायला मोठी मजा वाटायची.
लहान-मोठ्या वृक्षांना लपेटलेल्या, हिरव्यागच्च पानांनी नटलेल्या, वेली-महावेली हिरवी शालू नेसून पावसाचे एक-एक थेंब झेलत, नखशिखांत भिजून आपल्याच नादात डुलतांना दिसत. त्यांच्या खांद्यावर उमललेल्या कळ्या-फुले सूर्याकडे टकमक पाहतांना दिसत. जणू काही आपल्या बाळांना वर उचलून खेळवत असल्याचा भास व्हायचा. त्यापैकी भोवरा, दोडके, काकडी, कोहळे, भोपळे, शेलणे, उतरन, काचकोरल्या वेली इतक्या झपाट्याने वर चढून जायच्या की पाहता पाहता पूर्ण झाडाला वेढून घेत. अशा वेली कुंपण-कुपाट्यावर चढल्या की त्याचं वाळकं रुप बदलून हिरवेगार होत असे.
पावसाची चाहूल लागताच जमिनीच्या कुशीत पहूडलेले असंख्य जीव सुध्दा वनस्पतीसोबतच घाईघाईने बाहेर येऊ लागत. त्यात मुंग्या, माकोडे, किडे, कोळी, अळ्या, झुल्लरं, विंचू साप, गोमी, गोगलगायी, गांडुळं, गोसावी, काजवे, पतंग, फुलपाखरे, सोनपाखरं, पाणघोडे, नाकतोडे अशा कितीतरी प्रकारचे जीव निसर्गाशी एकरुप होत.
गांडूळ, अगदी गुबगुबीत दिसणारा प्राणी, आतील माती बाहेर जमिन कशी सुपिक बनवीत होते.
गोगलगाईला स्पर्ष केला की स्वत:ला गुंडाळून घ्यायची. जणू मेली, अशी सोंग करायची. आम्ही तिला पैसा म्हणत होतो. एक दुसरीच्या पाठीवर बसून डावडाव करतांना आम्हाला मोठी गंमत वाटायची. तीचे बिटूकसे पिल्ले रस्त्यात पायाला आडवे आडवे होत चालत. पिल्लांचे गोचकेच्या गोचके जागोजागी पडलेले दिसायचे. बिच्चारी, त्यांची माय इतके पिल्ले कशी देत असेल, कोण जाणे? एका गोचक्यात शेकडोंपेक्षाही कितीतरी जास्त संख्या असेल. त्यांचा ताफा शिस्तीत सरकतांना पाहून आश्चर्यच वाटायचं. त्यांच्या झुंडीवर पाय पडला की चेंदामेंदा होत. त्यांच्या जीवाला माणसाच्या दृष्टीने काय किंमत?
मी अशीच गोष्ट वाचली होती की ‘मुंगी आपल्या पिलाला सांगते, बाळ तू भिंतीच्या कोपर्यात कोपर्यायने चालत जा. कारण मनुष्य नावाच्या प्राण्याला आपल्याकडे पाहण्यासाठी डोळे नसतात. ते आपल्याला चिरडून जात असतात.’
तसंच इतर वेळेस नाही पण ह्यावेळेस दिसणारा किडा म्हणजे गोसावी. हा मखमली रेशमाच्या दाट केसांनी लपटलेला, गुबगुबीत, लालभडक व संथगतीने चालणारा. त्याला पकडण्यासाठी आम्ही त्याच्या मागेमागे लागत होतो. त्याला आजीबाई कुंकवाच्या डब्बीत ठेवीत. त्यामुळे कुंकू लालगर्द बनते, असे म्हणत. त्याच्यात औषधी गुण असल्याचे सांगत. अर्धांगवायूवर उपयोग करीत. नवदांपत्यांना उत्तेजक म्हणून देत. पर्यावरणाच्या दृष्टीने तो पालापाचोळा कुजवीण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भुमिका वठवीत.
काही सोनकिडे माणसाच्या घाणीचे गोळे ढकलत नेतांना पाहत होतो. कुणीतरी उघड्यावर केलेली घाण निस्तारण्याचं काम ते इमानेइतबारे करीत. कुणी म्हणायचं की हेच किडे रात्रीला काजवा बनून अंधारात ऊजेड पाडण्याचं काम करीत. म्हणूनच उपरोधिकपणे म्हणत की, ‘काजवा, तू काळाकुट्ट अंधार पडला तरच तुझा मिणमिणता उजेड प्रकाशमान भासतो. नाहीतर दिवसा तू क्षुद्र किडाच असतो.’
अशा प्रकारचे अनेक किडे शेतकर्यां ना शेतमाल पिकवीण्यासाठी जीवाभावाची मदतच करीत. नजरेला न दिसणारे मातीतले जीवाणू सुकलेल्या पाल्या-पाचोळ्याचा भुगा करून व मृत प्राणी, प्राण्यांच्या विष्ठांचे विघटन करून त्यातील खनिज घटक वनस्पतींना मिळवून देण्याची किमया करीत. त्यामुळे मातीचा कस वाढून जमीन सुपीक बनवीत. मधमाशा पण फलोत्पादनासाठी अनिवार्य असत.
सोनपाखरु, सोनेरी रंगाचे पंख असलेला मनमोहक छोटासा पाखरू. तो रंगीबेरंगी रेशमासारखे फुले आणि बारीक काटे असलेल्या चिल्हाटीच्या झाडावर नेमका बसलेला दिसायचा. त्याला ह्या झाडाचे बारीक पाणे खायला आवडत असावे. आम्ही त्याला आगपेटीच्या रिकाम्या डब्बीत ठेवीत होतो. डबी उघडून पाहिली की त्यात सोपीच्या आकाराचे बारीक अंडे दिसायचे. आम्ही त्याला सुताने बांधून वर फेकत होतो. मग तो वर उडायचा. अन् तसाच खाली यायचा. अशा खेळात आम्ही त्याची मजा घेत होतो.
रंगिबेरंगी फुलपाखरं व पिवळ्या रंगाच्या पिफोल्या या फुलांवरुन त्या फुलावर उडतांना नजरेस पडल्या की आम्ही सुखाऊन जात होतो. पावसाळ्याच्या आगमनानंतर माकोडे-वाळव्यांना पंख फुटत. ते मोठ्या प्रमाणात जिकडे-तिकडे उडतांना दिसत. त्यांचे पंख तुटून जमिनीवर इतस्तत: पसरलेले दिसायचे. काही पाखरं यांना हवेतल्या हवेत अलगदपणे टिपून घेत. पाण्याच्या डोबर्याेत लपून बसलेले बेंडुकांच्या जाती प्रकट होऊन डरावऽऽ डरावऽऽऽ असा कल्ला सुरु करीत. रात्रीच्या सुनसान वातावरणात त्यांचाच आवाज सर्वदूर घुमत राहत असे.
पाऊसही किती खट्याळ ! कधी लहरी, कधी नाजूक, कधी हलकासा, कधी मोत्यासारखा टपटपणारा, तर कधी प्रत्येकवेळी, प्रत्येकक्षणी तो वेगवेगळाच भासणारा…! कधी सरसर, कधी टिपटिप, कधी रिपरिप, कधी धुवांधार-मुसळाधार, कधी बेभान-वेडापिसा-धसमुसळा, कधी अंधारलेला, कधी उन्ह-पावसाच्या खेळात दंग झालेला, कधी गडगडाट करणारा, कधी विजेच्या प्रकाशाने न्हाऊन निघणारा, तर कधी रौद्ररूप धारण करून तांडव नृत्य करणारा पाऊस अगदी विलक्षण वाटायचा.
हा नटखट पाऊस स्त्री देहाशी झोंबाझोंबी अन् तिला ओलेचिंब करुन, तिचं वस्त्रात लपलेलं उत्तान भाग पारदर्शक करुन वात्रटपणा-चावटपणा करतांना दिसायचा. कधी तो प्रियकरासारखा गुंजारवत, कधी प्रेयसीसारखा नखर्यादत, कधी प्रेमळ बायकोसारखा छमछम करीत, कधी आईच्या मायेसारखा हळवा होत तर कधी रागावलेल्या बापासारखा तुटून पडायचा ! असे कितीतरी रूपे पाहून सारं काही अनोखं वाटायचं.
पाऊस टपटपू लागला की हिरव्याकंच झाडांच्या इवलाल्या पानांवरून गळणार्याप थेंबाचे संगीत वाजू लागत. सारं रान पावसाच्या या अजब संगीताच्या तालावर फेर धरुन नाचत.
आमची त्यावेळची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे सुट्टी असली की गावाला येऊन घरखर्चाला आधार म्हणून मी व जनाबाई, आई-वहिनीसोबत लोकांच्या कामाला जात होतो. मी एकदा असंच पांढरी गावाच्या रस्त्याने श्रावणच्या वावरात हातात विळा, फडकं व पोतं घेऊन निंदायला जात होतो. आमच्या सोबत एक-दोन बाया दुधपित्या चिल्या-पिल्याना घरी ठेऊन आल्या होत्या. त्या बिच्चार्याध, दुपारी बाळांना दुध पाजायला जात.
त्यावेळी ओली माती, अधूनमधून होणारा पावसाचा शिडकावा अन् हिरव्या रंगाने नटलेला परिसर अशा सार्याू माहोलामध्ये रस्ताच जणू भारावून गेल्यासारखा वाटत होता. रस्त्याच्या धुर्यारवर मेडसिंगचं झाड होतं. त्याच्या खाली पडलेल्या मोगर्याहसारख्या पांढर्या शुभ्र फुलांच्या सड्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. वार्यासच्या झुळकीने हे वन-फुले टपाटप खाली पडत होते. जणू काही आभाळातले तारे जमिनीवर अवतरले की काय, असे वाटत होते. त्याचा सुगंधीत वास वार्यााच्या झोताने सगळीकडे पसरला होता. मी एकटाच तो नजारा पाहात घुटमळत थांबलो होतो. माझ्या सोबतचे सारे लांब दूर निघून गेले होते. त्यांचं रोजचंच असल्याने त्यांना काही अप्रुप वाटत नव्हतं. मला मात्र त्या दृष्याने मोहित करुन टाकलं होतं.
संध्याकाळी परत येतांना झाडाखाली पहुडलेले सारे फुलं कोमेजून गेले. पण त्यांनी दिलेला सौंदर्याचा आनंद मात्र कोमेजला नव्हता. माझ्या तरल मनाच्या भावभावनांचा फुलोरा त्यातून दरवळत होता. माझ्या मनात विचार आला की, एका दिवसाचं आयुष्य घेऊन जगणारं हे फुलं किती आनंद देवून गेले. आपण इतकं मोठं आयुष्य घेऊन जगतो, मग आपण किती मोठा आनंद द्यायला पाहिजे, नाही का? रस्त्याने मी जायचा, तेव्हा मला हे झाड नेहमीच खुणावत असे. त्या झाडापासून दूर गेल्यावरही मागे वळून पाहत राहावसं वाटे.
त्यावेळी निंदनासाठी तासाला एक आणा किंवा जास्त गवत वाढले असेल, तर जास्त मिळत. पिकाच्या ओळीला तास किंवा पाथ म्हणत. चिखल-पाण्यात, ओणव्याने निंदतांना पायाच्या पोटर्याग दुखत. कंबर मोडल्यासारखी व्हायची. कधीकधी चिखलात रुतून बसलेला काटा हळूच पायात घुसला की जीवाची तळमळ व्हायची. पायाच्या बोटाला चिखल्या होत. सतत भुरभुरणार्यास पावसाने माझ्या अंगावरचे सारे कपडे, केसं व उघडं अंग ओले होत. पण पावसात ओलेचिंब होण्यातही मोठी अपूर्वाई वाटत होती. निंदतांना अंबाडी, चरोटा, कुंजरा, काटमाटी भाजी दिसली की खुडून ओट्यात टाकत होतो.
निंदतांना लव्हा जातीचं गवत दिसलं की लगेच उपटून गंमत करत होतो. कोणी बाई गरोदर असली की तिला मुलगा होईल की मुलगी ते ठरविण्यासाठी त्या गवताला चिरत होतो. ते सरळ चिरलं की मुलगा, आडवे-तिडवे चिरले की मुलगी, असं काहीतरी ठोकताळे बांधत होतो. अशा काही गमती-जमतीमुळे थकलेल्या जिवाची तगमग थोडीफार कमी व्हायची.
कधी लाजरीचं चिमुकलं झाड पाहून मन कसं आनंदीत होत असे. या झाडाला बोट लावता क्षणीच पाने मिटून जायचे. जणू काही लाजेने चूर होत असल्याचे भासत होते. जशी बाई लाजून घसरलेला पदर सावरून घेते, तशी ती आपले पाने मिटवून घेत होती. कधी कामून्याचं झाड दिसलं की त्याचे फळे खाल्ल्याशिवाय राहत नव्हतो. कधी फटाक्याच्या झाडाचे पातळ कवच दाबून फटकन् फोडत होतो.
कधी पायावर मऊ माती घेऊन हाताने थापटून पाय काढून घेतला की खोपडी तयार व्हायची. ते पाहून नवनिर्मितीच्या आनंदाने मन भरून येत असे. वावरात कॉवऽऽ कॉवऽऽ करीत सारे कावळे एका जागी बसत. जणु काही त्यांची महत्वाची मिटींग भरली की काय, असं ते दृष्य दिसायचं. डोमकावळा काळा कुळकुळीत, अंगाबांध्याने सुदृढ व क्वचीत दिसायचा. इतर कावळ्यांना काही वाण नव्हती. दुपारी भाकर खाऊन ओढ्याचं, झर्यातचं किंवा वावरातील विहिरीचं पाणी पिऊन तहान भागवीत होतो.
आभाळातले ढग वाहत जातांना वेगळाच नजारा पाहायला मिळत होता. काळे-पांढरे ढगं धूम पळतांना दिसत. त्याचा आकार सतत बदलत राहात. त्या ढगांत माणसाचं, प्राण्याचं किंवा झाडाचं असं काहीतरी चित्रविचित्र प्रतिकृती तयार होत व क्षणातच विरुन दुसरी प्रतिमा तयार व्हायची. असं ते विस्मयकारी दृष्य पाहतांना नजर काही केल्या हटत नव्हती.
एखाद्यावेळेस आभाळ गच्च भरून आलं की मनात उदासिनतेच्या कळा पसरून अनामिक हुरहूर वाटत होती. आत्तापर्यंत न दिसणारे ढग आभाळात घिरट्या घालू लागले की पाहता पाहता सर्वदूर काळोख पसरत असे. इतकं की पुढचं दृष्य अंधूक दिसायला लागायचं आणि क्षणार्धात आभाळ फाटल्यासारखा पाऊस धो-धो कोसळू लागायचा. लख्खकन चमकणार्या् विजांच्या तारा वाकड्या-तिकड्या होवून आमच्या डोळ्यासमोर नाचत आणि ढगांच्या गडगडाटाने कानठळ्या बसवत. अशावेळेस पोत्याची घोंगशी करून झाडाखाली किंवा शेतातल्या इरल्यात बसून पाऊस, वारा व विजेशी टक्कर द्यावे लागत असे. ओलं झालेलं शरीर थंडीने कुडकुडायला, गारठल्यासारखं होत असे. विजा पडतांना झाडाखाली थांबायला घाबरत होतो.
कोसळणार्याल पावसाबरोबरच पावसाच्या आठवणीने माझेही मन ओलेचिंब भिजून जात असे. मी व अज्याप असंच एकदा यवतमाळला जात होतो. तेव्हा आमचे खूप हाल झाले होते. गावावरुन निघतांना आकाश निरभ्र होतं. परंतु गोधणीच्या जवळपास मात्र ढग आभाळात जमू लागले होते. दिवस कलायला अवकाश होता. तरीही सर्वदूर अंधार दाटला होता. पाहता पाहता पावसाचे टपोरे थेंब झोंबायला लागले. धो धो पाऊस सुरु झाला. मुसळधार पाऊसच होता तो ! वारा, पाऊस व दाट काळोख यामुळे जवळचा माणूस दिसेनासा झाला होता. जोर्याात वाहणार्याा वार्या.ने वातावरणात गारवा पसरवला होता. पायात चप्पल नाही की डोक्यावर छत्री नाही. आम्ही ओलेचिंब भिजलो. दोघेही झाडाच्या बुंध्यापाशी थांबलो. आम्हाला खेटूनच विज चमकून गेली. विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट सारखा सुरु होता. त्यामुळे भीतीने कापरे भरायला लागले. नाल्याला धडधड करीत पुराचे लोंढे वाहत आले व पाहता पाहता दोन्ही थड्या भरून गेल्या. आम्ही ज्या रस्त्यावर थांबलो होतो, त्यावर पाणी चढलं होतं. त्यामुळे आम्ही मागेमागे चढावावर सरकत गेलो. पूर ओसरेपर्यंत थांबलो. अंगात थंडीने कुडकुडी भरली होती. ओल्या कपड्यानेच होस्टेलला आलो. अशी ही पावसाची आठवण मला चाटून गेली.
दुसरी आठवण म्हणजे गारपिटीची. ऐन तिन्ही सांजेची वेळ झाली होती. त्यावेळी मी घरीच होतो. लहान होतो. आभाळ भरून आलं. क्षणातच अवकाळी पावसाचा जोर वाढला. सोसाट्याच्या वादळी वार्या सह आलेल्या पावसाने सारा परिसर चिंब भिजला. त्या पाठोपाठ मोठमोठ्या जीवघेण्या गारांचा मारा सुरु झाला. सारा आसमंत थरारला. सार्यां्ची धांदल उडाली. अंगणात गारांचा सडा पडला. कुणाचे घरं पडले. भिंती पडल्या. टीनं उडले. कौलं फुटले. झोपड्यांवरचे गवत विस्कटले. शिवारातले पिकं उध्वस्त झाले. गाई-ढोरं, पाखरांना तडाखा बसला. कडब्याचा बाड विखरून पडला. बैलांचा चारा जमीनदोस्त झाला. मोठे हाल झाले लोकांचे ! ह्या गारपिटीचा तर मी धसकाच घेतला होता.
आसमंतातील ढगाचा पडदा हटला की मागे लपून बसलेले लाल, तांबूस, गुलाबी, सोनेरी, पिवळसर अशा रंगानी सारं अवकाश प्रकट होत होतं; तेव्हा मन सुखावून गेल्याशिवाय राहवत नसे. ओलेल्या आसमंताचं भारावलेपण, झाडांच्या पानातून टपकणारे थेंब, हवेच्या झोताने थेंबाचा वर्षाव, तरारून फुललेली गवतफुले, पक्ष्यांचा पंख झटकण्याचा आवाज, पावसाच्या गारव्यात रंगलेलं कोवळं उन्ह, हवेच्या झुळकेने डोलणारे हिरवेगार सळसळते गवत अन् संध्याकाळची केशरी उन्ह हे सगळं अनुभवतांना गदगदून येत असे.
वावरातून घरी परततांना अंधारलेल्या संध्याकाळची चाहूल लागायची. मन हुरहूर करीत काटेरी, दगडा-धोंड्यांचा, चिखलाचा, उंच-सखल निसरड्या-घसरणीचा, वाहत्या पाण्यातून, झाडाझुडपातून व घाण वासाने माखलेला हागणदारीचा रस्ता तुडवीत जाणे भाग पडत असे. घराच्या ओढीने अशाही अवघड रस्त्याने जायला जरा हुरूपच येत असे.
खेड्यात पाण्या-पाउसाचा अंदाज घेणारेही महाभाग कमी नव्हते. ते वातावरणातील उकाडा, वाहणारा किंवा कुंद वारा, त्याची वाहण्याची दिशा, मुंग्या-माकोडे व चिमण्या-कावळे-पाखरांची हालचाल यावरून कमी-जास्त पावसाचा अंदाज बांधत.
कधी सततचा, कधी जोराचा, कधी सरीचा, तर कधी झड असे पावसाचे अनेक तर्हात आम्ही पाहत होतो. रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रात पडणारा तर्हेतवाईक पाऊस दिसायचा, आला तर भरपूर नाहीतर अजिबात नाही असा तो ! पुनर्वसू नक्षत्रात पडणारा पाऊस हा जोरदार, मुसळधार व जोशपूर्ण असायचा; म्हणून त्याला तरणा म्हणायचे. तर पुष्य नक्षत्रात पडणारा पाऊस हा सारखा पण रिमझिम पडणारा, शेतीसाठी फारसा उपयोगाचा नसणारा, त्यात जोश नसणारा म्हणून म्हातारा म्हणायचे.
मघा नक्षत्रात कधी खूप पाऊस पडायचा. नाहीतर काहीच नाही. असं विचित्र नक्षत्र ! म्हणून लोक म्हणायचे, ‘ना लागती मघा तं वरती बघा, नाही तं चुलीपाशी हागा.’ कधी इतका पाऊस पडायचा की हागायला बाहेर जाणे मुश्कील होत असे. मग हा पाऊस जोरदार कडाडणारा, त्रास देणारा म्हणून सासूचा पाऊस तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस शांतपणे व शेतीला उपयोगी म्हणून सुनांचा पाऊस म्हणत. उत्तरात बरसला की, ‘बरसल्या उत्तरा, भात न खाये कुतरा.’ असे म्हणत. म्हणजे इतका विपुल धान पिकायचा की सांगूच नका !
हस्त नक्षत्र mhaम्हणजे घटक्यातच हत्तीच्या हजार सोंडेने धारा सोडून तावून तापून जीव नकोसा झालेल्या पृथ्वीला शांत करणारा पाऊस ! शेतीला उपयुक्त असणारा. म्हणून ‘पडतील हस्त तर शेती होईल मस्त’ असे म्हणत. चित्रा नक्षत्रात पडणारा पाऊस शेतीचे नुकसान करणारा तर स्वाती नक्षत्रात पडणारा पाऊस मस्तच असणारा. म्हणून ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ असे म्हटले जात.
आषाढ-श्रावणातली पोळ्याच्या जवळपासची पावसाची झड तर भारी जड जायची. दिवसरात्र थुईथूई पाऊस पडायचा. कित्येक दिवस सूर्याचं दर्शन होत नसे. बाहेरचा कामधंदा मंदावून जात असे. मजुरांच्या मजुर्याऊ पडायच्या. जेवणाचे फाके पडायचे. घरात सारखं कोंडून राहावे लागत असे.
पावसाची वावसळ आल्याने घरा-दारात सर्वीकडे चिकचिक राहात होतं. घराच्या भिंतीतून ओलावा झिरपत होता. चिखलाने माखलेले पाय घेऊनच घरी यावे लागत होते. पावसाची पिरपिर, भिजलेली माती, घरात सर्वत्र आलेली ओल, चिकचिक, ओले कपडे, त्याचा कुबट वास यामुळे जीव गुदमरून जात असे. थंडीने अंग थाटरुन जायचं. मग चुलीत जाळ करुन शेकत बसावे लागे.
घरातला दाळदाणा सरुन जायचा. वावरातून काटमाटी, चरोटा किंवा मसाल्याचे पाने आणून त्यावरच दिवसं कंठावे लागत असे. मुठभर पिठाच्या भाकरी, नाहीतर ज्वारीच्या कण्या, नाहीतर आंबिल-घाटा खावे लागत असे. कसेतरी उधार-उसणवारी करुन दाळ-दाणा आणून पोट भरावे लागत असे. नाहीतर उपास-तापास करुन कळ काढावे लागत असे. अशी झड कधीकधी महिनाभर राहत होती. तरीही झड काही केल्या थांबत नसे. तेव्हा कास्तकार-मजुरांचे हाल पाहावल्या जात नव्हते.
पिवळे फटक, वाढ खुंटलेले, रोगाला बळी पडलेले, टोंगळाभर गवत वाढलेले शेत पाहून शेतकर्यांटच्या डोळ्यात अश्रू तराळल्याशिवाय राहत नसे.
गावा-वावरातल्या विहिरी पाण्याने तुडूंब भरुन जात. हातानेच पाणी भरता येत होते. माझ्या मोठ्याआईच्या अंगणातून जमिनीला कठ्ठा फुटून पाझार लागला होता. असा झरा वाहतांना पाहून गंमतच वाटत होती. वावरातही पाणी साचून राहत असे. दलदल तयार व्हायची. टोंगळ-टोंगळभर गाडण होत होतं. वावरातही पाण्याचे झरे व चिलक्या तयार होत असे.
अशा झडीत चिखल-गाटा अन् काटेही तुडवत जावे लागे. चिखलातील छो्ट्या-मोठ्या दगडावर पाय ठरत नसे. कसंतरी कसरत करीत शरीराचा तोल सांभाळत जावे लागत असे. असा हा झडीतला पाऊस नकोसा वाटायचा; पण जेव्हा नसायचा तेव्हा मात्र तो असावा म्हणून मन आसुसलेलं असायचं.
कास्तकारांची शेती म्हणजे बिनभरवशाची ! कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. कधी रोगराई, तर कधी कीड. कधी पूर तर कधी गारपीट. कधी अतिउन्ह तर कधी अतिथंडी. एखाद्या साली निसर्गाने साथ दिली, तरी व्यापारी आणि सावकार त्यांना लुटायचे सोडत नव्हते. सरकार तर त्यांच्या दुखण्यावर कधी फुंकर घालीत असल्याचे दिसत नसे.
पावसाबाबत मी छान गोष्ट ऐकली होती. एक माणूस आपल्या मुलीकडे जातो. तेव्हा ती आभाळाकडे पाहत असल्याचे त्याला दिसते. तो तिला म्हणतो, ‘बाई, तू अशी का पाहते.’
‘काय करू बाबा, मी ओले मडके वाळवत ठेवले. पण आकाशात ढगं दिसत आहेत. पाऊस आला की सारे मडके विरून जातील. म्हणून काळजीत पडली आहे.’
मग तो दुसर्या मुलीकडे जातो. तेथे पण मुलगी आभाळाकडे पाहत असल्याचे त्याला दिसते. तो तिला म्हणतो, ‘बाई, तू अशी का पाहते.’
‘काय करू बाबा, आकाशात एकही ढग दिसत नाही. मी वावरात सरकी डोबली. पाऊस नाही आला की जमिनीत कुजून जाईल. म्हणून काळजी वाटते.’
एकीला पाऊस नको असते तर दुसरीला पाहिजे असते. अशी दोघींची वेगवेगळी अवस्था पाऊस करून टाकते. पण झडीची गोष्ट मात्र निराळीच ! पावसाची पिरिक-पिरिक कधी संपते, याचीच आम्ही वाट पाहत अर्धमेले होत होतो.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: