मी आणि माझ्या आठवणी


देवदासदादा म्हणजे आमच्या घरातली खरोखरच ताकद होती. तो पाहायला सुंदर, शरियष्टीने सुदृढ व उंचपुरा होता. तो लिहीण्या-वाचण्यापुरतं बाराखडी शिकला होता. आई सांगत होती, ‘देवदासला शाळेत टाकले; परंतु राहून-राहून आजारी पडायचा. म्हणून शाळाच सोडून दिली.’ तेव्हापासून शेतीच्या कामाचे जू त्याच्या मानेवर बसलं ते कायमचंच ! तो झाकटीलाच शेणगोठा करायचा. मग दिवसभर शेतीच्या कामात गुंतून जायचा.
तो उत्कृष्ट बासरी वाजवायचा. बैलं चारतांना, घरी येतांना वाजवतच यायचा. गावातील लोक दुरुनच बासरीचा मंजूळ आणि मोहक धुन ऎकून ‘ही देवदासची बासरी’ असे त्यांच्या तॊडून सहज शब्द बाहेर पडत. इतका तो आवाज लोकांच्या ओळखीचा झाला होता.
खेड्यात दोस्त-मित्र व नात्या-गोत्यातील लोकांमुळे चिकटणारे दारू, बिडी, तंबाखू सारखे व्यसन त्याला नव्हते. त्याच्या चांगल्या स्वभावामुळे तो लोकांना खूप आवडायचा. त्याच्यातील आणखी वाखाणण्यासारखा गुण म्हणजे नेमबाजीत त्याचा हात कुणी धरीत नव्हता. तो गोळया खेळतांना सहज व अचूक बेंदा फोडायचा. कितीही दूरची गोळी असली की बरोबर नेम धरुन मारायचा व आपल्या प्रतिस्पर्ध्यावर राज आणायचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. त्यावेळी ठिकठिकाणी गावागावात सभा होऊन समाज जागृती होत होती. आमच्याही गावात मी लहान असतांना सभा झाली होती. सभेच्या ठिकाणी मंडप टाकला होता. सुरक्षेच्या दृष्टीने सभोवताली लाकडी-बल्ल्यांचा कंपाऊंड टाकला होता. त्या सभेत रामराव व सिता यांचं लग्न बौध्द पध्दतीने लाऊन देण्यात आल्याचं मला आठवते.
इतर गावांप्रमाणे आमच्याही गावात समता सैनिक दल स्थापन झाले होते. देवदासदादा या दलाचा कॅप्टन होता. ह्या दलाच्या आखाड्यात गावातले तरुण मुलं व्यायाम करीत, दांडपट्टा शिकत व मल्लखांबावर कसरत करीत.
डॉ. बाबासाहेबांची चळवळ व जागृतीमुळे समाजातील लोकांनी मेलेले ढोर ओढणे, त्याचे मास खाणे, गावकीचे निच व हलक्या दर्जाचे कामे करणे सोडले होते. आता लाचारी सोडून ताठ मानेने राहत. त्यांच्यातला स्वाभिमान व मानसन्मान जागृत झाला होता. माणसासारखे जीवन जगण्याचा प्रयत्ना करीत होते. मुलांना शाळा शिकवू लागले. कोणी केलेला अपमान सहन करीत नसत, तर ताडकन उत्तर देत. असे आमुलाग्र परिवर्तन समाजात घडून आल्याने जातीयवादी लोक चिडून हल्ला करीत. त्यांना संरक्षण देण्याचे काम हा दल करीत असे. म्हणून त्यावेळी खेड्यापाड्यात, गावोगावी ह्या दलाचा मोठा आधार झाला होता. आमच्याही गावातील असा बदल लभान लोकांच्या डोळ्यात खुपायला लागला होता. मग जेव्हा-केव्हा संधी मिळेल, तेव्हा ते कुरापती काढीत. म्हणून समाजाला संरक्षण देण्याचे काम हा दल करीत होता.
ह्या दलात तरुण पोरांचा भरणा होता. पांढरा शर्ट, दोन्ही खांद्यावर पट्ट्या, दोन खिसे, खाकी फुल पॅंट, शर्ट खोवलेला, कमरेला तपकिरी रंगाचा पट्टा, पायात त्याच रंगाचा जुता, डोक्यात निळ्या रंगाची टोपी आणि हातात वेताची काठी असा गणवेश असायचा. कप्तानाजवळ शिटी असायची. हा दल कार्यक्रमस्थळी दोन-दोनच्या रांगेमध्ये घोषणा देत, पोलीस दलासारखे मार्चिंग करीत निघायचे. त्यामुळे संपुर्ण वातावरण भारावून जात होते. समाजात विलक्षण असे बळ निर्माण व्हायचे. लोकांमधील ऊत्साह उदंड वाहत राहायचा. विरोधकांच्या मनात धडकी भरायची. समाजाचा एकोपा, उत्साह, शिस्त, बाबासाहेब व त्याच्या चळवळीप्रती निष्ठा इत्यादी गोष्टीचे प्रदर्शन असायचे. ह्या दलाचा गावोगावी दरारा निर्माण झाला होता. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूक निघायची; तेव्हा मुलं दांडपट्टा व कसरतीचे प्रात्यक्षिक करुन दाखवीत. त्यावेळी पाहणार्यांहच्या डोळ्याचे पारणे फिटायचे. यवतमाळ शहरातील पाटीपूर्यााचा दादाराव वस्ताद पोरांना मल्लखांब, दंडबैठका, दांडपट्टा, कवायत, लाठीकाठी, तलवारबाजी, जंबियाबाजी, कुस्त्या इत्यादी व्यायामाचे व कसरतीचे प्रकार शिकवीत होता. त्यामुळे तरुण वर्गाचे आरोग्य धडधाकट राहून व्यसनापासून अलिप्त राहत.
एकदा बाभुळगाव गावाला प्रचंड सभा भरली होती. त्या सभेला बहुतेक चळवळीचे मोठं-मोठे पुढारी आले असावेत. कारण त्याठिकाणी गावोगावचे समता सैनिक दल मार्चिंग करत आले होते. दादा पण दल घेऊन चालला होता. मी दुडक्या चालीने जात होतो. जातांनाचा डांबरीरोड, दुतर्फा लिंबाचे झाडं, घाटातला नागमोडी रस्ता, धावडा-सागाचा घनदाट जंगल, उलंगवाडी झालेले वावरं, कुठे भाजी-पाल्याचा, संत्रा-पपयाचा बगीचा, मोट असलेल्या विहीरी, रोडने जाणारे बसेस, सायकली, मोटार-गाड्या पाहून मी बुजाडून जात होतो.
एकदा गावातील दल रात्रीच्या सभेला बाहेर गावाला गेले होते. त्यामुळे गावात तरूण पोरं राहिले नव्हते. ही संधी साधून लभानांनी बाया-पोरं व म्हातार्या -कोतार्या लोकांवर हल्ला केला. कुणीतरी सभेच्या ठिकाणी धावत-पळत जावून दादाला ही गोष्ट सांगितली. तसाच तो दल घेऊन सुसाट वेगाने धावत आला. गावाच्या शिवेवर येताच घोषणा सुरु केल्या.
‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की… जयऽऽ’ ‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जाएगा…’ अशा घोषणा ऐकू आल्याबरोबर आमच्या जीवात जीव आला. सारा आसमंत घोषणांच्या निनादाने भरून गेला. त्यामुळे आमच्या मोहल्ल्यातील बंद झालेले दरवाजे पटापट उघडले तर लभानांचे दरवाजे पटापट बंद झाले. आमच्या मनात प्रकाश उजळला तर त्यांच्या मनात अंधार दाटून आला. काही क्षणाआधीची परिस्थिती उलटी झाली. आता त्यांच्यावर बाजू पालटली. मग काय, समता सैनिक दल म्हणजे सळसळत्या रक्ताचे तरुणच ते ! त्यांचा उत्साह आभाळाला धडका मारू लागल्यात. त्यांच्या हातातील काठ्या तलवारीसारखे तळपू लागलेत. अंगात ‘जयभीम’चं वारं संचारलं. खूप दिवसापासूनचा लभानांच्या विटाळाने मनात धुमसत असलेला अपमान बाहेर पडू लागला. सारा दल घोषणा देत लभानपुर्यालत शिरला. त्यांची धावाधाव-पळापळ सुरु झाली. कुणी माणसं गावाबाहेर पळू लागले. कुणी ढोल्यात, कुणी कापसाच्या गंजीत तर कुणी गाई-बैलाच्या गोठ्यात लपले. पोरांची, बायांची रडारड सुरु झाली. पोरांनी त्यांची दाणादाण उडवून दिली.
आमच्या घरासमोरील देवळाच्या मैदानावर त्यांच्या घरातील कपडे, गोधड्या आणून आग लावून होळी पेटवत. जिथे कुठे लोक लपलेले असतील; तेथून शोध घेत, त्यांची धुलाई करत. कापसाच्या गंजीत काठी टोचली की त्यात लपलेले माणसं, कुत्र्यासारखे कुईऽऽ कुईऽऽ आवाज करीत, अशी ते गंमत सांगत. पण कुणालाही फारशी इजा होईल अशी मारझोड केली नाही. बरेच लभान लोक कुणी शेतात, कुणी जंगलात तर कुणी शेजारच्या गावाला पळालेत. इतकी धास्ती त्यांच्यात निर्माण झाली होती. लहान मुले व बाया तेवढ्या घरी राहिल्या होत्या. त्यांना कुणीही त्रास दिला नाही. कारण तशी मानवतेची शिकवण या पोरांना देण्यात आली होती. दंगलीमुळे गावात तंग वातावरण झाले होते. पोलिसांनी दलाच्या मुलांना व लभानाच्या लोकांना पकडले होते. परंतु आपसातील समझोत्यामुळे प्रकरण मिटले. दंगलीचं वातावरण शांत झाल्यावर लभान लोक गावात परत आलेत. तेव्हापासून ते आमच्याशी वचकूनच वागत.
दादाच्या आठवणी सांगायच्या म्हणजे – घोटीच्या वावरात भुईमूंग पेरला होता. तेथे मळा होता. दादा तेथून राखण करायचा. मी त्याच्या सोबत असलो की मला अभ्यास करायला लावायचा. माझ्यावर तो फार जीव लावायचा.
‘चल रामराव… आपण फिरायला जाऊ.’ असं दादाच्या तोंडून नुसतं फिरायचं नाव निघालं की माझ्या उत्साही जीवांच्या मनातला मोर थुईथुई नाचायला लागत असे. एकदा भारी गावाला भजनाचा कार्यक्रम होता. हे गाव तीनक कोस दूर होतं. तेथे मला खांद्यावर बसवून सवंगड्याच्या सोबत रात्रीच्या अंधारात वाट शोधत घेऊन गेला होता.
दादा बैलं चारून आला की भोर पक्षांना पकडून आणत होता. वाडीतल्या विहिरीजवळ भाजून मिठ, मिरची टाकून मस्तपैकी चटणी बनवित होता. मग भाकरीसोबत कुटूर कुटूर खायला जिभेची मज्जाच व्हायची ! मला हा पक्षी फार आवडत असे. त्याची बारीक आणि नाजूक चोच विलक्षण वाटायची. त्याचं तुरुतुरु चालणं, तीन बोटाचे नक्षीसारखे उमटलेले चिन्ह खूप सुंदर दिसत. त्याचा ‘होऽ होऽऽ‘ करणारा साद, हुंकार ऎकण्यासाठी मी जवळ जाऊन पाहत होतो; तेव्हा भुरर्कन उडत जाणारा हा पक्षी मला नेहमीच भुरळ पाडत असे. दादा या पक्ष्याला कसा पकडतो ते पाहण्यासाठी मी त्याच्या सोबत एकदा गायरानात गेलो होतो. त्याने चिल्हाटीच्या काट्याच्या झाडावर, गुंतलेल्या बारीक फांद्यात, काट्या-कुट्या अंथरलेल्या, नारळाच्या अर्ध्या डोलाच्या आकाराचा खोपा शोधला. त्यात दोन पांढरेशुभ्र कांचेच्या गोळीच्या आकाराचे अंडे टाकलेले होते. त्यावरुन हा भोरीचाच खोपा आहे; हे कळायला त्याला वेळ लागला नाही. त्यावर त्याने घोड्याच्या केसाचा विणलेला फासा ठेवला. आदल्या दिवशीच्या फास्यात अडकलेल्या भोरीला सोडवून तिचे पाय बांधले.
‘दादा मला पाहू दे ना…!’ मी उत्सुकतेने म्हणालो.
त्याने तो पक्षी माझ्या हातात दिला. मी इतक्या जवळून, हातात घेऊन यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. मी तिचं मनोहारी आणि निरागस रुप नजरेत तनामनात साठवतांना देहभान विसरुन गेलो होतो. तिच्या पंखावरुन हात फिरविल्यावर रेशमी स्पर्शाचा अनुभव अत्यंत विस्मयकारी वाटत होता. दादाने त्या पक्षाला खांद्यावरच्या शेल्याच्या कोपर्याअत गाठ मारुन बांधले.
पावसाळ्याच्या सुरुवातीला नाल्यामध्ये खेकडे निघत. एकदा दादा, बापुरावदादा व उध्दवकाका रात्रीला बॅटर्याड घेऊन खेकडे पकडायला गेले होते. त्यांनी पिपाभर मोठमोठे गार खेकडे पकडून आणले. असं म्हणतात की ‘खेकडे एकमेकांचे पाय ओढतात. कुणाला वर जाऊ देत नाही.’ खरंच पिप्यातले खेकडे वर जायचा प्रयत्नत करीत; तेव्हा दुसरे खेकडे त्यांचे पाय ओढून खाली पाडीत. त्यालाही वर जाऊ देत नसत व स्वत:ही जात नसत. असाच काही लोकांचा स्वभाव असतो, म्हणतात. जे वर जाऊ पाहतात त्यांना खाली ओढत असतात. असं जे खेकड्याचं उदाहरण देऊन सांगतात, ते खरंच आहे !
उन्हाळ्यात जंगलात आई, वहिनी, बाई व दोन्हीही दादा चारं तोडायला जात. मीपण जात होतो. पिकलेले चारं खातांना खूप मजा यायची. हे चारं यवतमाळला नेवून विकत. अर्धवट पिकलेल्या चारांना सडवून, हलक्या हाताने मोगरीने कांडून वाळवून घेत. मग जात्यात भरडून चारोळ्या सुपाने पाखडून, निवडून घेत. याच चारोळ्यात गूळ टाकून अखजी व सणावाराला पोळी बनवून खात. ही पोळी फारच चवदार आणि स्वादिष्ट लागत होती. मोठ्याआईच्या वावरात चाराचे मुबलक झाडं असल्याने सणावाराला तिच्या घरी चाराची पोळी हमखास करीत. त्यावेळी मुद्दामच मी पोळी खायला तिच्या घरी जात होतो.
दादा बैलाच्या चार्यावचा भारा डोक्यावर घेवून आणायचा; तेव्हा ज्वारीचे हिरवे धांडे आमच्यासाठी घेऊन यायचा. हे धांडे उसासारखे गोड लागत. दादा कोवळ्या ज्वारीचा वाणीचा हुरडा भाजून आणायचा. आम्ही त्याच्यावर तुटून पडत होतो. त्याच्या सोबत वावरात गेलो की ज्वारीचे कणसं निखार्यायच्या हुपीमध्ये भाजायचा. त्याला दगडाने घासल्यावर, मऊ, लुसलुशीत दाणे बाहेर पडत. मग गरमागरम हुरडा टमाट्या-मिरचीच्या चटणीसोबत मिटक्या मारत खात होतो. ज्वारीच्या कणसात वाणी जातीच्या कणसाची चव दुधासारखी लागत होती आणि त्याचे दाणे पटापट निघत. दादा वटाण्याच्या लुसलुशीत ताज्या शेंगा भाजून द्यायचा तर कधी हिरव्यागार घाट्याच्या हरभर्यााचा हुळा भाजून द्यायचा. तर कधी गव्हाच्या हिरव्यागार उंबळ्या भाजून द्यायचा. त्याच्या सोबत गेलो की काही ना काही तरी सटर-फटर खायला मिळायचं. कधीकधी त्याचे भारे घरी आणून तुराट्या-सणकाड्यावर भाजायचा. मग आम्ही घरातले सर्वजण खाण्यासाठी धाऊन येत होतो.
दादा जंगलातून कटूले तोडून आणायचा. एकदा तर त्याने टेकोडे तोडून आणले होते. त्याची ओळख पटवण्यात दादा पटाईत होता. कारण काही विषारी पण असू असतात. ही रानभाजी पावसाळ्यात छत्रीसारखा आकार असलेला डोंगराळ व लालवट मातीवर उगवित होते. वहिनी त्याची भाजी मटणासारखी चमचमीत बनवित होती. या टेकोड्याला शहरात अळंबी किंवा मशरुम्स म्हणत.
कोळंबी गावाला आंबे घेतले; तेव्हा गंमतच झाली होती. आंब्याच्या झाडाजवळ विहीर होती. शेजारी मळा होता. आई, बाबा दूरच्या दुसर्याा आमराईत राहात. या आमराईत दिवसा दादा व मी राहत होतो. रात्रीला डोहनीतलं पाणी पिण्यासाठी वाघ येत असल्याने मी घाबरत होतो. म्हणून दादा मला गावात कळसस्कर आडनाव असलेल्या बाबाच्या नातेवाईकाकडे झोपायला नेऊन द्यायचा. मग तेवढ्या रात्रीला परत जायचा. तो रात्रभर एकटाच राहत होता. असा तो हिंमतवान होता !
कोळंबीचं नाव निघालं म्हणून आठवलं. बाबाचा कोळंबीचा नातेवाईक आमच्या गावाला जुवा खेळायला यायचा. मोठेबाबाच्या घरी जुवा भरायचा. दोघेही नवरा-बायको जुव्यात बसत. रातभर न दिवसभर जुवा चालत होता. कधी जिंकत, कधी हारत. मुळचे तालेवान असल्याने त्यांना हरण्यात काही वाईट वाटत नसे. बाबा गोष्टीत सांगत होता की त्याकाळी अख्खा शिजलेला कोंबडा हाडासहित खाण्याची शर्यत लागत होती. त्याचा कोणतातरी मावसा चांगला अरकाट होता. तो खायचा म्हणे ! आहे कि नाही गंमत ! पण मला अशा गोष्टी जरा विचित्रच वाटत असे.
एकदा आमचं जुनं घर मोडून नवीन बांधत असतांना भिंतीतील दरातून फूसऽ फूसऽऽ… करणारा सापाचा आवाज येत होता. त्याने उंदीर खाल्ल्यामुळे त्याचं पोट फुगलेलं होतं. म्हणून तो सुस्त झाला होता. त्याला बाहेर काढून दादाने मारला होता. तसंच एकदा दादाला साप डसला होता. साप चावलेल्याला ‘काडी लागली’ म्हणत. त्याला देवळाच्या पारावर फिरवून गावातलाच दाढ्यासाधू मंत्र टाकत होता. हा साधू म्हणजे कपिलचा बाप, गोविंदा. दादाला वाळलेली लाल मिरची खाऊ घालत होता. दगडाने त्याच्या पाठीवर हलक्या हाताने मारत होता. साधूच्या मंत्रामुळे दादा बरा झाला, असाच सर्वांचा समज झाला. कदाचित तो साप बिनविषारी असेल.
दादाचं लग्न कोळंबी गावाच्या यशोधराशी झालं होतं. त्याच्या लग्नात नवरदेवाचा लहान भाऊ म्हणून माझी फार वरवर होत होती. माझ्या गावापासून कोळंबी गावापर्यंत बैलगाडी, रेंग्या व दमण्यावर वरात नेली होती. त्याचं लग्न होऊन एक महिना पांच दिवस झाले होते. नव्या नवरीला अजूनही नांदायला आणले नव्हते.
त्यावेळी त्याच्या जीवनातली ही जीवघेणी दुर्घटना घडली. त्यादिवशी त्याने दिवसभर वाडीत खत भरला. त्याला भारी गावाला कार्यक्रमाला जायचे असल्याने संध्याकाळी कपडे धुतले. दादाला बासरीशिवाय पेटी वाजवण्याचा शौक होता. म्हणून अधुन-मधून तो शामरावदादाची पेटी वाजवून पाहत असे.
वाडीतल्या कौलाच्या कारखान्यावर तो व मुगलाईतील झटाळ्या गावाचा मामा रात्रीला जागलीला जात. त्या मामानेच कौलं कसं बनवायचे ते शिकविले होते. गावामध्ये तसा एकही कौलाचा कारखाना नव्हता. जांब गावावरुन कौलं आणीत. पण ते फार लांब पडत असे. त्यामुळे गावातच कौलाची उपलब्धतता होत असल्याने आमच्याकडे गिर्हा.इकं भरपूर लागले होते.
त्यादिवशी जेवणं झाल्यावर वाडीत जायची दादाने तयारी केली. पण म्हणतात ना, ‘राजा शिकारीला निघाला अन् कुत्रा हागदोडीत गेला.’ मामाला चिलीमीची तलफ आली. चिलीम ओढायला त्याला बराच वेळ लागत होता; म्हणून दादाला तोपर्यंत पेटी वाजवायची इच्छा झाली. त्यासाठी तो घरातल्या दुकानाच्या खोलीत गेला. त्यावेळी दुकान नव्हते. पण पूर्वी बाबाने दुकान टाकले होते. गावातल्या उधारीमुळे दुकान बंद पडले होते.
दादाच्या लग्नासाठी बरचसं सामान आणले होते. बाबा त्यावेळी मामाची शेती वाहत असल्याने परिस्थिती चांगली होती. त्यामुळे खर्चाची काही ददात नव्हती. कारण बाबा, शामरावदादा व देवदासदादा असे तिघेही मिळून एकोप्याने शेतातलं काम करीत. त्याच्या लग्नातील बरचसं सामान उरले होते. ते दुकानाच्या खोलीत ठेवले होते. त्यात मातीच्या तेलाचा पिपा पण होता. खोलीमध्ये अंधार असल्याने कंदील पेटविला. पण त्यातलं तेल बुडाला टेकल्याने पिपा जवळ ओढला.
तेल भरतांना उजेड पाहिजे; म्हणून कंदील न विझविता तसाच जळता ठेवून आडवा केला व त्यात हापसीने तेल भरायला लागला. परंतु दुर्दैवाने कंदील भडकला. म्हणून त्याला जोरजोरात फुंकर मारुन विझवायचा प्रयत्न करू लागला. पण आग पिप्यापर्यंत पोहचली. आगीने खोली भडकू नये, म्हणून पिप्याच्या कडीला पकडून बाहेर फेकायचा प्रयत्नज करु लागला. पण कडी तुटून तेलाचा झेलकावा त्याच्या अंगावर आला. तसाच तोही भडकला. मग पळत बाहेर आला. घरासमोरच्या देवळाच्या भोवताल चक्कर मारत तसाच वाडीच्या दिशेने पळू लागला. मात्र वाडीच्या फाटकाजवळ खाली कोसळला. आगीचा लोळ पाहून गावातील सारे लोक चक्राऊन गेले. सर्वजण त्याच्या मागे मागे धाऊ लागले. त्याला लोकांनी उचलून गोविंदामामाच्या घराच्या अंगणात नेले. तेथे त्याच्या अंगाला दही चोपडले. घरातली बाज नेऊन, त्यावर मऊ कपडे टाकून त्याला झोपविले. ती बाज उचलून त्यारात्री यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. त्याच्या सोबत गावातले बरेच लोक गेले होते. हे अकल्पीत दृष्य पाहून सार्यां ची झोप उडाली होती.
दुसर्या दिवशी सकाळी मी बाई, आई, वहिनी व लहानसा अज्याप बैलगाडीने यवतमाळला निघालो. गोधणी गावाच्या पलीकडील घाटावर गेलो नसेन, तर लक्ष्मनमावसा दुरुनच येतांना दिसला. त्याला पाहून आमच्या पोटात धस्स झालं. तो गाडीजवळ आला. त्याला धाप लागली होती.
‘बाई, आपला देवदास…’ असं म्हणतांना त्याच्या ओठाशी आलेलं शब्द थबकले होते. डोळ्याच्या पापण्या थरथरत होत्या. मग सारा जोर एकवटून पुन्हा तेच वाक्य त्यानं पूर्ण केलं. ‘बाई, आपला देवदास गेला वं !’ असे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडते न् पडते, तर आईने हंबरडा फोडून गाडीच्या खाली उडी घेतली. आमचाही कंठ दाटून आला.
गाडीला जुंपलेले दोन्हीही बैलं ठक उभे राहीले. एक बोढी व दुसरा सांड्या होता. त्यांचाही दादावर अपार लळा होता. दादा दिसत नव्हता; म्हणून मुक्या जनावरांनी आपल्याला चारा-पाणी घालणारा सखा राहिला नाही; असे जाणले असावे. म्हणूनच की काय, दोन्हीही बैलांच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. इतका जीव दादांचा बैलावर व बैलाचा दादावर होता.
आम्ही सरकारी दवाखान्याच्या आवारात आलो. दादाचा पांढर्या धोतराने झाकलेला निर्जीव देह लिंबाच्या झाडाखाली ठेवला होता. आमच्या कुटुंबातील पहिल्यांदाच एक जीव गेल्याचं मी अनुभवत होतो. आम्ही सर्वजण जिवाच्या आकांताने रडत होतो. पोटच्या पोराला अकाली गमावल्याचं दु:ख आई-बाबांना किती विषण्ण करणारं होतं, ते शब्दात सांगता येत नाही ! अशा कोसळलेल्या परिस्थितीत आपण किती असहाय्य आहोत, याची जाणीव मनाला असह्य होतं होती. तरुण पोराला हरवण्याचं दु:ख कोणत्याही आई-वडीलांना पचवणं कठीणच आहे ! त्याच्या मरणाने त्यांना पार उन्मळून टाकले होते. त्यांच्या जगण्यातला सारा उत्साह मावळून गेला होता.
त्याला तलावफैलात बापुरावदादाची सासुरवाडी होती – तेथे घेऊन आले. तेथेच त्याची उत्तरक्रिया केली. कारण जळलेले मृतशरीर लवकर खराब होते. म्हणून शव गावाला आणता येत नव्हतं.
दादाच्या निर्जीव देहाला शिडीबरोबर उचलतांना आमच्या उरात दाटून आलेला उमाळा भडभडून बाहेर पडला. त्याला घेऊन जातांना आम्ही गुंडाळलेल्या प्रेताकडे सारखं पाहत होतो. शेवटी दिसेनासं झालं; ते कायमचंच ! दादाच्या शरीराचं अस्तित्व तेव्हापासून आमच्या डोळ्याआड झालं.
दवाखान्यातला पांढरा कोट घातलेला व छाती-पोट तपासण्याचं यंत्र गळ्यात अडकवलेला डॉक्टर पाहून आमच्याही घरात असा कोणी डॉक्टर होऊ शकत नाही का? असा प्रश्नह मला समजायला लागल्यापासून सारखा सतावीत होता. म्हणून मी माझा लहान भाऊ – अज्यापला डॉक्टरच्या रुपात पाहत होतो.
दादा मेला, तेव्हा अज्याप टुणूटुणू चालत होता. तो पांदणभर रडत फिरत होता. त्याचे डोळे बहुतेक भिरभिर, त्या पांदणीच्या रस्त्याने दादाचा शोध घेत असावे.
त्यानंतर बाबा यशोधरावहिनीला घेऊन आला. काही दिवस ती आमच्याकडे राहिली. ती आमच्या सोबत कौलं थालायची. मला ती फार आवडली होती. तिने आमच्या सर्वांवर लळा लावला होता. दादा असता तर ती आमच्याच घरी राहिली असती. पण तो गेल्यामुळे ती सुध्दा आमच्या घराला पारखी झाली. बाबाने तिला लग्नात केलेले दागिने परत घेतले नाही. दादाची आठवण म्हणून तिलाच ठेवायला सांगितले. ती परत गेली, तेव्हा आमच्या डोळ्याच्या कडा आपोआप ओलावल्या होत्या.
आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात जे यश मिळालं होतं, त्यात दादाचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या हिंमतीने शामरावदादा व बाबा शेतीवाडीचे कामे पार पाडीत. कोणत्याही कामाचा बोजा देवदासदादा लिलया पेलत होता. पण आता त्यांची अवस्था वावटळीत उन्मळून पडलेल्या झाडासारखी झाली होती. त्यांची कंबर खचली होती. हात-पाय गळल्यासारखे झाले होते. देवदासदादाच्या आठवणीने आई झुरणीला लागली होती. खरंच, आमच्या घरातली ताकद निघून गेली नि आम्ही दुर्बळ झालो होतो.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: