मी आणि माझ्या आठवणी


कथा बारावी – पोळ्याची कर की कहर

 

आमच्या गावात सणावाराला उधान यायचं. गावातील उदास मनाच्या काळोख्या आयुष्यात चैतन्याची सळसळ हे सणवार निर्माण करीत. रोजच्या रुक्ष जीवनात क्षणभर का होईना आनंद देऊन जात. म्हणूनच म्हणत की मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे ! त्यामुळे खेड्यापाड्यातही उत्सव-सणावाराला बहर येत असल्यास नवल नाही ! पोळा किंवा दिवाळीच्या सणाला आम्ही मोठे उल्हासीत होत होतो. कारण याच सणाला आम्हाला नवीन कपडे घालायला मिळत.

या सणाच्या तोंडावर येणारा बाजार म्हणजे मुलींना पर्वणीच असायची. त्यांना कानात घालायच्या बिर्‍या, टॉप्स, रिंग्ज, नाकात टाकायच्या नथण्या, बेसर, गळ्यात घालण्यासाठी गाठ्या, हार, केसाला लावण्यासाठी क्लिपा, रिबिना, हातातल्या बांगड्या, बोटातल्या आंगठ्या, पायातल्या तोरड्या असं काहीबाही सामान नटण्यासाठी खरेदी करायच्या असतात, ना ! म्हणून हा बाजार त्यांच्या मनाला भुरळ पाडत असे.

पोळा हा खेड्यातला महत्वाचा सण ! बैलं खेड्याच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असा प्राणी. पाणी-पाऊस, ऊन-वारा, हीव-दव, दिवस-रात्र तो शेतकर्‍याच्या सोबत मरमर राबतो. बैलं म्हणजे त्यांचा सखाच ! शेतकरी त्याला नांगर-वखर-डवर्‍याला जुंपतात. भरली गाडी ओढतात, मळणी करतात, कोणत्याही कामाचे ढिगारेचे ढिगारे उपसतात, त्यांच्या कष्टाची गणती आणि मोलच नाही ! त्यांच्याच जीवावर शेती होते. पण त्यांना पहिजे असते पोटाला चारा व पाणी अन् पाठीवरुन फिरणारा ममतेचा हात ! बैलाविषयी उपकार व्यक्त करणारा हा सण चैतन्य आणि आनंदाची उधळण करीत असतो. श्रावणातील सणावारामुळे होणारी गोड-धोड पदार्थाची लयलूट याच सणाने स्थिरावतो.

आदल्या दिवशी रात्रीला शेतकरी किंवा गडी पळसाच्या पानाने तेल किंवा तुपात हळद भिजवून बैलाचे खांदे शेकत. ‘आज आवतन घ्या… उद्या जेवायला या…’ असे म्हणून बैलाला पोळ्याचे आमंत्रण देत. त्यावेळी शेतकरी गड्याच्या खोळीत ओंजळीने धान्य टाकून ‘खोळ भरो’ तर गडी ‘वाडा भरो’ असे म्हणत. ह्यावेळी गड्याला नवीन कपडे भेट देत.

दुसर्‍या दिवशी सकाळी बैलांना चारून आणल्यावर नदी, ओढ्यावर नेवून धुत. दुपारी घरी आणून सजवित. त्यांच्या शिंगाला निरनिराळ्या रंगाचे बेगड, चमकी लावत. कपाळाला मटाट्या बांधत. कोणी वाकाच्या दोरीने बेलपाने बांधत. कोणी दोन्ही शिंगाच्या मधोमध बेगडाचं बार्शिंग तर कोणी कागदाचा रंगीत पंखा बांधत. कोणी त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी झूल टाकत. नाहीतर हाताचा पंजा गेरुच्या रंगात बुडवून, त्याचे ठसे पाठीवर उमटवित. आपापल्या ऎपतीप्रमाणे बैलाच्या सजावटीवर खर्च करीत. कोणी बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरू-घंटा बांधत. मग घुंगरू-घंटाचा निनाद सारखा कानात घुणघूणत राहायचा.

पोळ्याच्या दिवशी नेमका थुईथुई पाउस पडायचा. अशा पावसात भिजायला मजा येत होती. उदासलेल्या वातावरणात मन उत्साही होऊन जात होतं. बैलाच्या खुराने ओली माती उखरली जायची.

रमेशच्या घरापासून ते जनार्दनदाजीच्या घरापर्यंत खंबे गाडून आंब्याचे तोरण बांधत. त्याच्या खाली बैलं धरुन राहात. हरसिंगलभान नारळ फोडून पूजा करायचा. तो एका टोकावरुन दुसर्‍या टोकापर्यंत खोबरं, लाह्या व भिजवलेल्या हरभर्‍याची गोड शिरणी घेऊन वाटत जायचा.

पोळा रंगात आला की लोकांच्या दादर्‍या, झडत्या सुरु होत.

कानावर हात ठेऊन म्हणत,

‘काळ्या वावरात, कुंद्याच्या खटी,

बैल बांधले दाटोदाटी,

कोंड्या म्हणते, बुडाली शेती,

दमड्या म्हणते, लाव छातीले माती…

एक नमन गवरा पारवती… हर बोला… हर हर महादेव…!’

कोंड्या म्हणजे माझे बाबा व दमड्या म्हणजे मामा !

दुसरीकडून लगेच कुणाचा तरी आवाज यायचा,

आभाळ गडगडे,  शिंग फडफडे
शिंगात पडले हो… खडे
तुही माय काढे, तेलातले वडे
तुवा बाप खाये, हो… पेढे
एक नमन गवरा पार्बती हर बोला हर हर महादेव…!

ही दादरा संपते न संपते कुणीतरी आणखी सुरु करायचा.

चाकचाडा बैलगाडा
बैल गेला पवनगडा
पवनगडाहून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
गुरूने बनविली चकती
दे माह्या बैलाचा झाडा

मग जा हो, आपल्या घरा

एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेव…!

मग सारेच एकाच सुरात ‘हर हर महादेव’ म्हणत सारा आसमंत दणाणून टाकत. असे कितीतरी दादरे-झडत्या एकावर एक सुरु होत. अशाप्रकारे बुडालेल्या शेतीच्या व्यथा झडत्याच्या माध्यमातून व्यक्त करीत तर कुणी गावगाड्यातील राजकारणावर उपहासात्मक किंवा कुणाची टर उडविण्यासाठी टिकात्मक झडत्या म्हणत, मस्त मनोरंजन करीत. असाच हशा-मजाकीचा माहोल सारा पोळाभर दरवडत राहायचा.

पाटलाच्या घरुन गुडी यायची. पांढर्‍या कपड्यात ओल्या हळदीचा पेंड आणत. बैल धरणार्‍याकडे थोडी थोडी वाटत. ते ती फडक्यात बांधून तोरणावरून फेकून दुसर्‍या बाजूने झेलत. मग ही पुरचूंडी घराच्या आड्याला बांधून ठेवत. ही हळद घटसर्पासारख्या रोगावर चालते, असे सांगत. तसेच एका पुरचूंडीत एक पैसा बांधून तो पैसा तोरणावरून फेकत. मग ही पैशाची पुरचूंडी घराच्या आड्याला बांधून ठेवत. त्यामुळे इडापिडा टळते, असा लोकांमध्ये समज होता.

गावचा पाटील मखराच्या बैलाच्या दोन्ही शिंगाला विस्तवाचे टेंबे बांधून घेऊन येत. त्याला पोळाभर फिरवीत. पूजेचे सोपस्कार आटोपले की तोरण तोडत. तोरण तुटला की पोळा फुटला. मग बैलाचे कासरे हातात धरून पळापळी सुरु व्हायची. प्रत्येकजण आपापले बैल घेऊन पहिल्यांदा मालकाच्या घरी जात. मग इतर ओळखीच्या किंवा नात्यातील घरी जात.

शेतकरी आपल्या अंगणात गाडीचे जू टाकून ठेवत. त्याला दोन्ही टोकाला वाकाच्या दोरीने बेलपाने बांधत. तसेच गंगाळाच्या मानेला बेलपाने बांधून, त्यात पाणी भरून ठेवत. पोळा सुटल्यावर बैलजोडी अंगणात आली की घरची बाई त्याच्या चारही पायावर गंगाळातील पाणी टाकून पूजा करीत. आरतीत आणलेला पुरणपोळीचा घास बैलाच्या तोंडात टाकत. मग बैलाचे कासरे धरणार्‍याला पैसे देत. मालक गड्यांना आपल्या घरी जेवण-खाऊ घालत.

मी गड्यासोबत पोळ्यात जायचा. एक बैल धरत होतो. त्यामुळे मला पण थोडे थोडे पैसे मिळत. ह्या पैशाने मी गंजिफा खेळत होतो. त्याशिवाय शामरावदादा, बाबा पण देत. त्यामुळे पैसेच पैसे हातात खुळखूळत. त्यादिवशी गोडधोड जेवणाचा बेत असायचा. जेवणात पुरणपोळी, तुप, कढी, भजे, भात असे पंचपक्वानाचे पदार्थ राहत.

त्यारात्री कुठेना कुठे तरी जुव्याचा अड्डा असायचा. बहुदा नामदेवकाकाच्या घरी आम्ही मुलं जात होतो. तेथे अर्ध्या रात्रीपर्यंत तर कधी रात्रभर जुगार चालायचा. त्याच्या घरात एकच खोली होती. तेथेच त्याचे कुटुंब झोपत असे. तो जिंकलेल्या डावापैकी काही पैसे जागेचं व पत्त्याचं भाडं म्हणून घेत असे. त्याला कट्टा म्हणत. कट्टा वसूल करण्याची सर्वठिकाणी पध्दत रुढ होती. कधीकधी तोपण आमच्यासोबत खेळत असे. हारला की त्याला संताप यायचा. मग आम्हाला हाकलून द्यायचा. ‘जा बे पोट्टे हो… आता बंद करा खेळणं… डोळ्याला जागरण न् xxxx उपास.’ असा खऊटपणे बोलायचा. मग आम्ही पोरं हिरमुसले होऊन घरी परत जात होतो. दुसर्‍या दिवशीची पहाट निघण्याची वाट पाहत होतो.

सकाळीच कोंबड्याच्या बागेला लोकांचं ओरडणं ऎकू यायचं. ‘इडा-पिडा घेऊन… जायऽऽ गे मारबत…. रोगराई घेऊन जायऽऽ गे मारबत… माशा चिल्ट, डासं, जादू-टोणे घेऊन जायगे मारबतऽऽ.’ असे ओरडत. दादा देखील असंच काहीतरी म्हणायचा. एखाद्याचं कुणाशी पटत नसेल, तर तो द्वेषबुध्दीने त्या व्यक्तीचे नाव घेऊन, जसं – कोंड्याला घेऊन जायगे मारबत असेही म्हणायला मागेपुढे पाहत नसत. त्यामुळे मग भांडणाला तोंड फुटत असे. दिवस उजाडल्यावर दरवाज्याजवळ कोतवालाने ठेवलेल्या पळसाच्या फांद्या उचलून खतावर रोवून देत.

दुसरा दिवस म्हणजे ‘करी’चा ! हा मोठा खुषीचा दिवस ! कारण त्यादिवशी दारु पिणे, मटण खाणे व जुवा खेळणे बिनदिक्कतपणे व सार्वत्रिरीत्या चालत असे.

यादिवशी जुवा का खेळल्या जातो, काय माहित? जणू काही खेड्यापाड्यातील लोकांनी जुव्याच्या व्यसनाला निरंतर चिकटून राहावे व जीवनात कमावलेलं किडूकमिडूक गमावून बसावे; असं काही धर्मव्यवस्थेने ठरवून दिलं होतं की काय? म्हणून त्यादिवशी लोक दिवसभर जुव्याच्या नादी लागत. एकदा का जुव्याची लत लागली की त्यातून बाहेर पडणं मोठं जिकिरीचे होऊन जात असे. त्यादिवशी सकाळपासून वाल्ह्याच्या खारीतल्या पारावर किंवा एखाद्या पडक्या घरी किंवा सुखदेवच्या वावरातील विहिरीजवळील कवठाच्या झाडाखाली असं कुठंतरी आम्हा मुलांची जुव्याची मैफल बसायची. तहान-भूक विसरून खेळण्यात दंग होऊन जात होतो.

मुली सुध्दा पत्ते खेळत. त्या बहुधा जोड्या लावण्याचा खेळ खेळत. त्या कधी सीताबाईच्या तर कधी वच्छलाबाईच्या घरी खेळत. सीताबाईचं घर शेवटी होतं. तिच्या घराचा आवार पाहतच राहावेसे वाटे. कारण आवाराचा कूप जुईच्या वेलाने लदबदलेला होता. वच्छलाबाईचं घर माझ्याच घराशेजारी होतं.

कधीकधी झेंडी-मुंडीचा खेळ खेळत होतो. झेंडी-मुंडी हा मुलांचा व बायांचा मजेशीर खेळ होता. माझी बहिण जनाबाई बहुदा मुलींसोबत हा झेंडी-मुंडीचा खेळ खेळत होती.

पोळ्याच्या करीला मोठमोठे माणसं पण जुवा खेळतांना दिसत. दादा व बाबा मात्र कधीच जुव्याचा खेळ खेळतांना मी पाहिले नाही.

ह्यादिवशी लोक दारु पिऊन तर्र राहात. तेव्हा हमखास गावात कुणाचा नाही कुणाचा तरी मारका-झगडा होत असे. गावात भांडण-तंटा होऊ नये म्हणून कधीकधी पोलिसाची ड्युटी लागत असे. परंतु पोलीस सुध्दा त्यादिवशी मुभा असल्यासारखं जुगाराच्या खेळाकडे दुर्लक्ष करीत होता..

करीच्या दिवशी गावात बकरा कापून हिस्से पाडत. मग गावात जिकडे-तिकडे मटणाचा खमंग वास सुटत असे. मटणासोबत रोट्या-भाताचा बेत असायचा. लोक मस्तपैकी दारु पिऊन मटणाचा आस्वाद घेत बेधुंद होत. आमच्याही घरात अशीच जेवणाची मेजवाणी राहायची.

त्यादिवशी वहिनी रोट्या बनवित असे. कुठे कुठे रोट्याला मांडे पण म्हणत. रोट्या बनविण्याचं काम मोठं कौशल्याचं. मळलेलं पातळ कणीक हाताने लांबवून तापलेल्या रानण्यावर टाकत. ह्या रोट्या फारच खुमासदार लागत. त्या मटण किंवा आंब्याच्या रसासोबत नाहीतर तिखट दाळीसोबत खात. त्या खमंग स्वादाची नुसती आठवण जरी झाली तरी तोंडाला पाणी सुटत असे.

कधीकधी वहिनी गव्हाच्या पिठाचे ‘पयले’ बनवीत होती. ह्या पण खायला रुचकर लागत.

यादिवशी लोक कोंबडं-बकर्‍याचं मास खाण्यासाठी प्राण्यांची हिंसा करीत, दारू पिऊन मस्त झिंगत, आपसात काहीतरी कुरापत काढून भांडत व जुगार खेळून पैसे गमावत.

हा सण भगवान बुध्दांच्या पंचशिलेच्या तत्वातील, ‘पानाती पाता वेरमनी’ म्हणजे मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही व ‘सुरामेरय पमादठाना वेरमनी’ म्हणजे मी दारु सारख्या नशा आणणार्‍या पदार्थाचे सेवन करणार नाही; असे दोन्हिही शील लोकांना तोडायला भाग पाडत. मग अशा दिवसाला कर म्हणावे की कहर म्हणावे, तेच कळत नव्हतं.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: