मी आणि माझ्या आठवणी


कथा अकरावी – बुध्दाने पुन्हा जन्म घेऊ नये

 

आमच्या गावात पोळ्याशिवाय दिवाळीचा सन साजरा व्हायचा. शामरावदादा बाजारातून दिवणाल्या विकत आणायचा. त्यात खायच्या तेलात कापसाच्या वाती पेटवून घराच्या कोपर्‍यात, अंगणात, नहाणीत व कोठ्यात नेवून ठेवायला मला सांगत होता. त्या लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशाने क्षणभर का होईना अंधार दूर करण्याचा प्रयत्‍न केल्या जात होता.

त्यादिवशी गाईंना खेळविण्यासाठी सजविल्या जात. गाई म्हणजे खेडूत लोकांची धन-संपत्ती – जसं शहरी लोकांचं सोनं-नाणं, तसं ! गावातले सर्वजण आनंदाने हा सण साजरा करण्यात मग्न राहत. गायकी सकाळी गोठाणावर गायी जमा करून गावात घेऊन यायचा. माणसांचा गलबला, डफड्याचा, गाई-ढोरांच्या हंबरण्याचा व गळ्यातील घुंगराचा आवाज आला की मी धावतच देवळाजवळ येऊन थांबत होतो. गायकी गायींना डफड्याच्या तालावर, वाजत-गाजत देवळाच्या भोवताल तीनदा फिरवायचा. गायीसोबत बकर्‍या व म्हशी सुध्दा राहत. त्यांच्या पायाने उधळणारी धूळ जिकडे-तिकडे धिंगाणा घालीत असे.

आणखी गंमत म्हणजे डफडेवाला, डफडं म्हशीच्या समोर समोर करायचा. त्या म्हशी भेदरून भ्याऽऽ भ्याऽऽ करीत, त्याच्या मागेमागे धावत. ते दृष्य पाहण्यात मजेशीर वाटत होते. कोणी गजगोट्यात बारुद भरुन गाईंच्या समोर फोडत. त्याच्या आवाजाने गाईंची दाणादाण उडत असे. आम्ही मुले टिकल्या फोडत होतो. बारीक बारीक फटाके पेटवून गाईच्या समोर फेकत होतो. काही लोक मोठ्ठाले फटाके पेटवून धमाल उडवित.

बाबाने आवाराच्या बाहेर कोपर्‍यात खड्डा खोदला होता. तेथे गायी-ढोरांचं शेण आणून टाकायचा. मग त्यादिवशी गायीच्या खुराने शेण तुडविल्या जावून बारीक मऊशार होत असे.

गायकी एक गाय सोडून बाकीच्यांना साथीदारासोबत रानात चरायला पाठवून द्यायचा. त्या गायीला वाजत-गाजत गावात आणायचा. त्यादिवशी सकाळीच शेणाचं गोधण घरोघरी अंगणात थापत. त्याचेवर झेंडूचे फुले टोचून ठेवत. भोवताल रांगोळी काढीत. गायकी गायीच्या पायाने गोधणाला व शेणाने बनवीलेल्या मशासुर राक्षसाच्या प्रतिकाला तुडवायचा. संध्याकाळी गोधणाचे पाच पांडव बनवून त्यावर झेंडूचे फुले टोचून ठेवत.

वहिनी गाईची पूजा करून पुरणपोळीचा घास भरवायची. सुपातल्या ज्वारीचे व पैशाचे दान गायक्याला द्यायची. सोबतचा कोलाम सुमधुर आवाजात बासरी वाजवायचा. दुसरा डडांग… चीकणूक… डडांग… असा डफड्याचा आवाज काढायचा. या आवाजाने वातावरण मस्त भारावून जात होते.

त्यादिवशी जेवणात पुरणपोळी असायची. भज्याचा खमंग वास यायचा. पुरणपोळी व त्यावरील साजुक तू्पाचा वास नाकात घुमायचा. सोबत कढीचा फुरका. तसेच चकल्या, करंज्या व अनारसे असे कितीतरी पदार्थ वहिनी बनवित असे. मला अनारसे खासच आवडायचे. तसेच काशी कोहळ्याचे गोड-गोड बोंडं तळत. असा गोडधोड जेवणाचा बेत त्यादिवशी घरोघरी राहत होता. संध्याकाळी दिवस कलल्यावर अंगणभर जनाबाई व वहिनी रांगोळी काढीत. रात्रीला जेवणाच्या आधी सारेजण फटाके फोडण्यासाठी अंगणात जमत. कोणी फुरफूर्‍या… सुरसूर्‍या… फुलझड्या… हातात घेऊन पेटवीत तर कोणी भुईचक्र… झाडं… पेटवीत. कोणी बारीक फटाके उडवीत. कोणी मोठे बॉम्ब फोडत तर कोणी रॉकेट उडवत.

सुरुवातीला आमची परिस्थिती चांगली होती; तेव्हा भरपूर फटाके फोडायला मिळत. काही गरीब मुलं फटाक्याचा आवाज आला की पळतच आमच्या घराकडे येत. जवळपास थांबून मोठ्या कौतुकाने पाहत. न फुटलेले फटाके उचलून घेत.

दिवाळीच्या वेळेस यवतमाळवरुन भाजीपाला विकून बैलगाडीने गावाकडे येतांना शहरातल्या घरोघरच्या अंगणात लोक फटाके फोडतांना दिसत. जिकडे तिकडे फटाक्याचा आवाज कानात घुमत होता. त्याचा रंगिबेरंगी उजेड डोळ्याला दिपवून टाकायचा. त्यावेळी मला मोठं कुतूहल वाटायचं. गाडी शहराच्या बाहेर पडेपर्यंत हा अनोखा नजारा पाहायला मिळत होता. शहराच्याबाहेर आल्यावर अंधारधूक पडून जायचं. मग दुरुनच आकाशात दिसणार्‍या लख्ख प्रकाशाचं विहंगम दृष्य हळूहळू मंद होत गेला की मनाला हुरहूर वाटत असे. तरीही अंधारलेल्या आकाशात शहराच्या दिशेने दुरुनच एखादा उजेड चमकून गेला की स्तब्ध असलेलं मन खडबडून जागं होत असे.

दुसर्‍या दिवशी पाडव्याला वहिनी बाजीवर बसवून उटण्याने सकाळीच आंघोळ घालून द्यायची. त्यावेळी खूप थंडी लागत असे. दिवाळीत झेंडूच्या फुलाचा फार वापर व्हायचा. त्याच्या पाकळ्या काढून त्यातून निघणारा गाभा खात होतो. तो खोबर्‍या सारखा लागत असे. दिवाळीत मोराचे पिस गायीच्या शिंगाला बांधत. मला मोराच्या पिसाचं भारी वेड. त्याला मी पुस्तकाच्या पानात जपून ठेवत होतो. फावल्या वेळात त्याच्या मुलायम केसांचा हळूवार स्पर्श गालाला कितीदा तरी लावत होतो.

मांडावसच्या सणाला शेतकरी शेताच्या कामासाठी नवीन गडी ठेवीत. शेतकर्‍यांसाठी हे नवीन वर्ष राहायचं. दसरा झाल्यावर पाचेक दिवसाने माडी पोर्णिमा यायची. खेड्यामध्ये या सणाला सुध्दा फार महत्व असायचं. यादिवशी पोर्णिमा राहत असल्याने रात्रीला चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश पडायचा. रात्रीला जेवण करुन लोक बाहेर बसत. अंगणामध्ये पोरीबाळी खेळत. त्यांच्या खेळ-गाण्याने रंगत वाढत असे. बाया-माणसं, पोरीबाळी गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, गमती-जमती करणे, मनोरंजण करणे अशा मौज-मजेच्या कार्यक्रमात आपले मन रमवित. गुणी लोकांना आपापली कला प्रदर्शीत करण्याची संधी मिळत असे. लोकांचेही मनोरंजण होत असे. असे तीन-चार दिवस धामधुमीचे संपले की परत शेतीच्या मशागतीचे दिवसं सुरु होत.

खेड्यामध्ये टेलिफोन नसल्याने लोकांना कुतूहल वाटत होते. त्यावेळी शहरातील लोकं टेलिफोनवर बोलत असल्याचे मी पाहत होतो. म्हणून मी, अर्जुनला घेऊन टेलीफोनची नक्कल करायचं ठरवलं.

मी एकीकडे माझ्या कानाला हात लाऊन हॅलो हॅलो म्हणत होतो. दुसरीकडे अर्जुन कानाला हात लाऊन दुसर्‍या हाताने हालवल्याची ऍक्टींग करत होता. मी त्याला म्हणत होतो,

‘अरे, मी तुला हॅलो हॅलो म्हणतोय, तू बोलत का नाहीस?

‘तू सांगितल्याप्रमाणे मी हालवत आहे, ना…’

‘अरे, तसं नाही. फोनवर बोलतांना सुरुवातीला हॅलोऽऽ हॅलोऽऽ म्हणतात. नंतर बोलायचं असते.’       त्यावर लोक पोट धरुन हसत.

तुळशीरामदादा व गुलाबदादा माडी पौर्णिमेला अंगणात जाड दोरींचा पाळणा बांधीत. पाळणा इतका मोठा व उंच असायचा की त्यावर दोघ्याजणी उभ्यानेच झोका घेत. त्यांचा झोका आभाळाच्या दिशेने उंचच उंच जायचा. झोका घेतांना,

‘झुनझुनू पाखरा, जा माह्या माहेरा,

माहेरच्या वाटेनं कमानी दरवाजा…!’ असे काहीतरी गाणे म्हणत. त्या मस्त आनंदाने बागडत व मुक्तपणे झोके घेत. सुनवारी आपल्या मनातले जळमटं ह्यावेळी काढून टाकत. आम्हा मुलांना संधी मिळाली की आम्ही सुध्दा पाळण्यावर बसून झुलण्याची मजा घेत होतो.

काहीजणी फुगड्याचा व हाताला हात धरुन गोल गोल फिरण्याचा खेळ खेळत. त्या एकमेकींच्या कमरेला हात धरून नाचत जाऊन गाणं म्हणत.

वैदुदादा वैदुदादा घरावरी चाल गा, चाल गा…

बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा…

माही सासू म्हणते गा, म्हणते गा…

तुले खुटयाची मैस देते गा, देते गा…

असे काहीसे गाणे म्हणत; तेव्हा मी मंत्रमुग्ध होवून ऐकत असे.

आम्हीही पोरं: मी, अर्जुन, धनपाल, कुंडलीक, सुखदेव, दामु, रमेश, शंकर असे माझ्या बरोबरीचे, माझ्या घरासमोरील देवळाच्या पारावर उजेड्या रात्री उगीच इकडल्या-तिकडल्या गप्पा-गोष्टी झाडत, तंबाखू खात बर्‍याच वेळपावेस्तो मन रिझवीत होतो. कधीकधी गप्पा-गोष्टींना इतका उत यायचा की रात्र किती निघून गेली ते कळायचं नाही. तरीही आमच्या गोष्टी काही संपत नसायच्या. एखाद्या वेळेस अंगणात झोपलेल्या शामरावदादाला चेव आला की आवाराचा दरवाजा उघडून आमच्यावर बावरायचा.

‘झाल्या असतील ना गोष्टी… पोट्टे हो…? जा ना बे… आपापल्या घरी… रामराव, चाल ये घरात.’ तेव्हा कुठे आमची रंगात आलेली मैफील एकाएकी तुटून जायची.

एकादिवशी मोठी आफतच आली होती. कुणाच्या डोक्यातून भन्नाट कल्पना प्रसवली, कोण जाणे? तो म्हणाला,

‘चलता का बे…? सिनेमा पाहायला…’

आता खेड्यात कुठे आला सिनेमा? तरीपण आमच्या पुढून गेलेलं ते नवविवाहीत जोडपं पाहून, त्याच्या म्हणण्याचा रोख आमच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. ते रात्रीला जेवण करुन जुन्या घरी झोपायला जात. त्यांनी ज्यांचं घर विकत घेतलं, त्याला समाजाने जातीबाहेर टाकलं होतं; म्हणून तो शेतात राहायला गेला. त्याने म्हणे, त्याच्या कुत्र्याचे नावे गावातील लोकांच्या नावासारखे ठेवले होते. कोणी त्याच्या घरापुढून जातांना दिसले की,

‘ऎ पांड्या, कोंड्या, दमड्या, गोविंद्या यारे भाकर खायले.’ असं मुद्दामच कुचेष्टेने जोराजोरात ओरडून कुत्र्यांना बोलावीत होता. अशा रीतिने वाळीत टाकणार्‍या म्होरक्या लोकांवर तो आपल्या रागाचा वचपा काढीत होता.

मग आमची सार्‍यांची फलटन त्याच्या घरापर्यंत गेली. तिथे गेल्यावर एकाने घरामागील डेळीवर चढून भिंतीच्या भोकातून आतमध्ये डोकावून पाहीलं न पाहिलं तर आतून बोंबलण्याचा आवाज आला,

‘कोण आहे रे, भडव्यांनो…?’

ते ऎकून आमची गाळणच उडाली. तो पुढे आणखी काहीतरी शिव्या देत होता. पण ते ऎकण्यासाठी आम्ही थांबलोच होतो कुठे? तसंच धूम ठोकून थेट घरी आलो. अंगणातल्या सातरीवर अंग टाकलं. मोठी धाप लागली होती. छाती धडधड करत होती.

सकाळीच तो माणूस माझ्या घरी आला. दादाला सांगायला लागला.

‘रातच्याला पोट्टॆ पारावर बसतात. त्यात तुहा भाऊपण होता. हे पोट्टे माह्या घरामागच्या भोकातून पाहत होते…’

मी अंगणात तोंड धुतांना त्याची तक्रार मुकाट्याने ऎकत होतो. लाजेने मी पार ओशाळलो होतो. दादा मग माझ्याकडे वळून मुसळधार पावसाप्रमाणे बरसला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता.

‘का रे, लगन करुन देऊ का तुवं? गांडीत नाही गू न् चालला हागाले…! पुन्हा पारावर दिसला का तंगडं मोडून ठेवीन.’ रागावलेल्या आवाजातील त्याचं खऊट बोलणं माझ्या काळजाला चिरत गेलं. दादा फारच चिडला की असं जिव्हारी झोंबणारं बोलायचा. त्याचा एक-एक शब्द माझ्या काळजाला डंख मारून जात होता. खाली मान घालून चुपचाप ऎकण्याशिवाय दुसरं काय करु शकत होतो? माझ्या हातून खरंच मोठी चूक घडून गेली, याची मला तिव्रतेने जाणिव झाली. अपराधाच्या पश्चातापाने माझे ओठ थरथरत होते. अनवधानाने का असेना, असा किळसवाना प्रसंग घडून गेला की बरेच दिवस मनाला चुटचुट लागून जात होती.

त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला. शेतकरी जसे मोकाट जनावरं वावरात घुसू नये म्हणून कुंपण घालतात, तसेच मीही माझ्या मनाभोवती कुंपण घातलं. तेव्हापासून उशिरा रात्रीपर्यंत पारावर बसणे टाळत गेलो.

होळीचा सण म्हणजे मौजमजेचा सण ! या सणाला रंगच चढत असे. आम्ही मुलं घणमाकड गाडून त्यावर दिवसभर फिरत राहत होतो. होळी म्हणजे खेड्यातला शिमग्याचा सण ! मोठ्ठाले पोरं घनमाकडीवर जोराजोरात फिरतांना अश्‍लील व विनोदी भाषेचा वापर करुन बोंबा मारत. जसं- ‘होळी रे होळी अन् पाटलाच्या xxx बंदूकीची गोळी.’ अशा प्रकारच्या बोंबा असायच्या.

घनमाकडाचा किरकिर आवाज लांब दूर पर्यंत ऎकू जात. याच मैदानात आम्ही होळी पेटवित होतो. होळीत पेटविण्यासाठी निरनिराळ्या आकाराच्या हाताच्या पंजाने थापलेल्या गोवर्‍याचा हार आधीच बनवून, वाळवून ठेवत होतो. सकाळी निव्यावर काही लोक पाणी गरम करून आंघोळ करीत. त्याने अंगाला खाजखुजली होत नाही, असे म्हणत. होळीच्या दिवशी बत्ताश्या, गाठ्या गळ्यात मिरवीत, एक-एक गाठ, बत्ताशी खाण्यात मोठी फुशारकी वाटत असे.

धुळवडीच्या दिवशी पळसाच्या फुलाचा रंग एकमेकांच्या अंगावर उडविण्यात आम्ही रमून जात होतो. हा करीचा दिवस म्हणजे मौजमजेचा दिवस. गावातील माणसं दारुच्या धुंदीत तर्र होऊन मस्तपैकी मटणावर ताव मारुन स्वत:ला हरवून जात. मटणासोबत रोट्या, पयले व भात असायचा. खेड्यातील लोकांना सणासुदीलाच गव्हाचे व तांदळाचे पदार्थ खायला मिळत. ऎरवी रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरी व मीठ-मिरचीच राहत असे.

हा सण बंजारी लोकांचा महत्वाचा सण होता. हा सण त्यांच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक, आनंददायक, रसिकता व चैतन्यमय वातावरण निर्माण करणारा राहत असे. त्यातील हास्यविनोदाने तणावमुक्त होवून जात. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपतांना ही जमात सळसळत्या उत्साहात अगदी न्हाऊन निघत. आमच्या गावात त्यांची होळी सकाळी पेटत असे. इतर समाजाचे लोक संध्याकाळी पेटवत. पण बंजारी मात्र सकाळी का पेटवत? यामागे कहाणी सांगत की, एका प्रकरणात पंचायतीमध्ये आदल्या दिवशी न्यायनिवाडा करण्यासाठी बसले असतांना, दुसर्‍या  दिवसाची सकाळ उजाडली. म्हणून ते सकाळी पेटवीत.

पौर्णिमीच्या उजेडात गावाजवळच्या लांडग्याच्या वावरात होळी रचत. मग सकाळी सूर्य निघायच्या आधी होळी पेटवत. या दिवशी बाया माणसं गोरमाटी भाषेत लेंगी गीत गाण्यात व नाचण्यात मशगुल होवून जात. या गाण्यात बाया माणसांना व माणसं बायांना अश्‍लील भावभावनांना वाट मोकळी करुन देत. या गीतात दीर-भावजय, प्रियकर-प्रेयशी अशा नात्यातील नाजूक, शृंगारिक व भावबंधाचे वर्णन उमटलेले दिसे. स्त्री-पुरुषातील भावनांचे तरंग या होळीगीतातून सहज व्यक्त होत. मग त्यात नात्यागोत्याचं कोणतही बंधन राहत नसे. केवळ शृंगारीक भावनांचे रांगडं व उघडे प्रदर्शन मनसोक्तपणे होत असे. होळीची राख एकमेकांना लाऊन थट्टामस्करी, हास्यविनोद करीत घरी जात.

रंग खेळणे म्हणजे ‘फाग’ ! दीर-भावजय, साळा-साळी अशा थट्याच्या नात्यात रंग खेळण्याची रसिकता आणखीनच दिसून येत असे. दारू, गांजा, भांग याच्या नशेत चूर होवून हा दिवस साजरा करीत. रंग खेळतांना एखाद्याची बायको जरी उचलून तिला रंगात भिजवले, तरी तिच्या नवर्‍याला त्यात काहीच वावगे वाटत नसे, इतका मोकळेपणा या सणात त्यांना मिळत होता.

एकदा रात्रीच्या वेळी नाच-गाण्याचा खेळ रंगात आला असतांना लभानाच्या पोराने एका पोरीला उचलून उन्मादाच्या मस्तीत त्याच्या घरातील कापसाच्या गंजीवर आदळल्याचे आम्ही पाहिले होते. श्रीकृष्णदेवाची रासलिला – कधी पाहिली नाही; पण त्यातलाच हा नमूना तर नव्हता ना, अशी पुसटशी कल्पना चाटून गेली होती.

होळीच्या पूर्वीपासूनच नायक, कारभारी व इतरांकडे नाच-गाणे करुन पैसे व धान्य गोळा करीत. रहदारीचा रस्ता असेल तर जाणार्‍या-येणार्‍यांकडून सुध्दा पैसे वसूल करीत. त्या पैशातून व आणखी सामुहिक वर्गणी करुन बोकड्याच्या मटणाचं दूर कुठेतरी नदीकाठी किंवा एखाद्या झाडाखाली सामुहिक जेवण करीत. अशातर्‍हेने आलेला थकवा दारु पिऊन व मटण खाऊन या सणाची सांगता करीत.     खरं म्हणजे ह्या होळीमध्ये लाकडे व शेणाच्या गोवर्‍या जाळत असल्याने कितीतरी नुकसान होत होतं. त्याची गिणतीच नाही ! शिवाय जिकडे तिकडे धूर पसरल्याने सारं वातावरण खराब होवून जात होतं. ही बाब सण साजरे करणार्‍या धर्मव्यवस्थेच्या मार्तंडांना का कळत नाही? असे कसे यांचे सण की ज्यामुळे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान व अशुध्द वातावरण तयार करण्यास कारणीभूत होतं? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होता.

गावातला आणखी एक सण म्हणजे आषाडी पौर्णीमेचा – आखाडीचा सण…! या दिवशी गोड-धोड पदार्थ बनवीत. या सणाला आंब्याचा रस, रोट्या, पयले, भात, कुर्ड्या, पापड्याचा बेत राहत असे.

या दिवशी मुलीला सासरकडे राहू देत नसत. तिला माहेरी घेऊन जात. जर ती माहेरी जाऊ शकली नाही, तर गावातच नातेवाईकाकडे ठेवत. एकदा माझ्या वहिनीला मामाच्या घरी राहत असल्याचे पाहिले. मला अचंबा वाटला. वहिनीला कोणी बोलले काय़? तिच्याशी कोणी भांडले काय? अशा नाना शंका-कुशंकानी मला घेरले होते.

मी दादाला म्हणालो,

‘दादा, वहिनी मामाच्या घरी का राहत आहे?’

‘अरे, आखाडी आहे ना ! तिला आपल्या घरी ठेवता येत नाही. म्हणून मामाच्या घरी आहे.’

तेव्हा मला कळले की ही एक रुढी-परंपरा पूर्वापार चालत आलेली होती. त्यामागील खरं कारण काय ते कुणाला माहित नव्हतं.

नंतर मला एक गोष्ट कळली, ती ही की या दिवशी सिद्धार्थाची आई, महामाया हिला गर्भ प्रसवला. सिद्धार्थाला पुढे बुध्दत्व प्राप्त झाले. त्यांनी समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच विज्ञान, तार्कितता व विचारशिलतेच्या आधारावर धम्म चळवळ जणमानसात राबविली व रुजवली. परंतु सनातन संस्कृतीला या तत्वाचं वावडं होतं. म्हणूनच पती-पत्‍नीचा संबंध त्यादिवशी येऊ नये व भगवान बुध्द पुन्हा जन्माला येऊ नये; म्हणूनच की काय एकमेकांपासून त्यांना दूर ठेवण्याची रुढी-परंपरा कदाचित रुजवली असावी, अशी शंका घ्यायला काही हरकत नव्हती.

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: