मी आणि माझ्या आठवणी

पंछी बिछड गये…


             मी माझ्या गावांतील एका मुलीवर निरागसपणे प्रेम करीत होतो. हो… अगदी निरागसपणे…!

            असं म्हणतात की, प्रेमाची भावना प्रत्येकांच्या मनात सुप्तपणे वसत असते. ही निसर्गाची देण आहे. सुंदर फुलांकडे सर्वाचं लक्ष जात असतेच. सृष्टीतील जीवांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे यासाठी फुलं सुध्दा सुंदर सुंदर रंगाचे, छटांचे पखरण करीत असते. मानवी जीवन या सत्याला अपवाद आहे असे वाटत नाही. कारण निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

      प्रेमाचं नातं जुळायला प्रसंग कसे घडत जातात आणि धागेदोरे नकळत कसे जुळत जातात ते काही सांगता येत नाही. पण दोन आसुसलेली मनं एकत्र आले आणि त्यांच्यात प्रेमाच्या तारा जुडल्या की अतुट असं नातं निर्माण होतं  ऎवढं मात्र खरं!

           ज्यांना या प्रेमप्रवाहात उतरण्याची संधी मिळते, ते एकतर प्रेमाच्या धारेत मनसोक्त पोहतात; नाहीतर काठावर फेकले जातात. ते एकतर न्हावून निघतात नाहीतर उन्हातल्या दगडाप्रमाणे तसेच कोरडे राहतात. कुणाचं पर्यवसान प्रेमविवाहात होतं तर कुणाचं प्रेमविरहात! ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा तर प्रश्‍नच  नाही…! काही-काहींच्या बाबतीत मात्र असंच काहीतरी घडत असतं. बस्स इतकंच…!

      माझं ते कॉलेजचं  शेवटचं वर्ष होतं.             कॉलेजचं एक एक वर्ष पुढे सरकून शेवटी बी.कॉम फायनला येऊन पोहचलो.

            माझं बालपण व त्यानंतरचं  किशोरावस्था तर कधिचच संपलेलं होतं याची जाणीव कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतांनाच  मला झाली होती. आता मी  तारूण्यावस्थेत  पदार्पण केलं होत.

            आमच्या कॉलेजमध्ये मुलं-मुली एकत्रीतपणे शिकत होते. काही अपवाद सोडले तर कॉलेजचे मुलं स्वैरपणे व मुक्‍तपणे वागत होते. एकमेकांच्या अंगावर  प्रेमाचा सडा शिंपडणारं…! कॉलेजच्या गॅदरींगमध्ये अशा गोष्टींचा अविष्कार दिसून पडायचा.

      आम्ही खेड्याच्या वातावरणातून आल्यामुळे कदाचीत प्रेमात पडण्याची भावना आमच्यामध्ये वृध्दिंगत झाली नसावी.

      आम्ही होस्टेलर्स, पैजामाछाप व खेडवळ चालीचे असल्यामुळे कॉलेजच्या मुलीं आमच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या.

      ते एकप्रकारे आमच्यासाठी चांगलेच होते म्हणा! त्यामुळे आमचं लक्ष अभ्यासाकडे जास्त असायचं.

      आमच्या गांवात माझा एक मित्र धनपाल याने त्याच्या घराच्या शेजारच्या मुलीवर प्रेम केले व लग्नाच्या बेडीत अडकला. तो माझ्याबरोबर चवथ्या वर्गापर्यंत शिकला होता. तो पुढे शिकला नाही. त्याने गांवामध्ये टेलरींगचा धंदा सुरु केला होता.

      दुसरा एक मित्र भगवान याने सुद्धा गावांतील एका मुलीवर प्रेम केले व तिच्याशी लग्न करुन मोकळा झाला.

      त्यामुळे आमच्या गांवात प्रेमाची परंपरा होतीच.

      आणखी माझ्यासमोर एक उदाहरण होतं ते असं की, माझी मामेबहीन चित्राबाई, ही आमच्या सोबत उमरसरा येथे शिकायला होती. तिचं नांव चित्ररेखा, पण कुणी तिला रेखा म्हणायचे. आम्ही तिला चित्राबाई म्हणत होतो.

      तेथे कोळंबी गांवचा पांडुरंगदादा कॉलेजला शिकायला होता.  त्याला चित्राबाई फार भावली. त्यांनी तिला मागणी घातली. ती आधी पांडुरंगदादाकडे अवघड गणीतं सोडवून घेण्यासाठी जात असे. पण तिला मागणी घातल्यानंतर मात्र ती लाजायला लागली. म्हणून गणीतं सोडवून आणण्यासाठी माझ्या बहिणीला-जनाबाईला सांगत होती.

      लग्नाच्या गोष्टीची कुणकुण गांवात वार्‍यासारखी पसरायला वेळ लागली नाही.  `आपल्या चित्राबाईला म्हणे कोळंबीच्या मुलाने मागणी घातली.’ असे बाया तंबाखू-पान खातांना एकमेकींना हळूच सांगत होत्या.  कोळंबीचे नांव काढले की सर्वांचे कांन सश्यासारखे टवकारत असत.

      ‘बाप्पा… कोळंबीला पोरगी देते म्हणे…! काही डोक्सबिक्स तर फिरलं नाही ना… सावकाराचं…?’ अशा प्रकारच्या चर्चेचं पिक गांवात उगवलं होतं. गांवातील लोकं मामाला सावकार म्हणत असत.

      मामाच्या घरी अंगणात गांवपंचायत भरली.  ‘नाही… कोळंबीला आपल्या चित्राला द्यायची नाही.’ आगलावेमामा गरजला.

      ‘कां नाही द्यायची. पोरात काही खोट आहे कां?’ शामरावदादा उसळून म्हणाला.

      ‘नसेल खोट… म्हणून काय तिला विहिरीत ढकऊन द्यायची काय? सर्वांना माहितच आहे की, त्या गांवात पोरीला भाय राबऊन घेतात. पोरीला सासुरवास करतात.’ आगलावेमामानं स्पष्टीकरण दिल.

      ‘पोरगा काय नेहमी त्या गांवात थोडाच राहणार आहे? तो खूप शिकला आहे. त्याला आता नोकरी लागेल. मग तो नोकरीच्या गांवला जाईल.’ असं पुढे शामरावदादाने पुष्टी जोडली.

      ‘बरं… मग तो कोळंबीला कधितरी घरी आल्याशिवाय राहील काय? मग तर तिला सासुरवास होईल नं…’ श्रावणमामाने आगलावेमामाला समर्थन देत म्हटलं.

      ‘कोळंबीचं नांव जरी डंक्यावर असलं तरी पोराचं घर चांगलं आहे. त्याचा बाप साधुबुवा आहे. नाही दारु पित न् मांस खात… नाही कुणाच्या अधा-मधात राहत… पोरगा लय सुदा आहे. शिकला सवरला आहे. त्याला पोरगी द्यायला काय हरकत आहे? दोघांचा जोडा जुळत आहे. मग आणखी काय पाहीजे?’ शामरावदादा समजुतीच्या सुरात पुन्हा म्हणाला.

      ‘आता कोळंबीला सासुरवास होतं असं म्हणाल तर, आपलंही गांव भानगोडं म्हणून नावाजलेलं आहे. आपल्याही गांवात कुणी पोरी द्यायला पाहत नाही.’ असं तुळशीरामदादा नेमकं आपल्या गांवच्या उण्यावर बोट ठेवत बोलला.

      आगलावेचा गटाचा विरोध मात्र कायम राहीला. नाही म्हणजे नाही… असंच त्यांच्या बोलण्याचा सारा रोख होता.

      मला वाटतं ज्याच्या संबंधात पंचायतीमध्ये चर्चा चालत असे  त्याला काही बोलता येत नव्हत की काय? त्यामुळे मामाच्या  पोटच्या पोरीच्या भवितव्याशी ही गोष्ट जुळलेली असतांना सुध्दा, त्याचं काय मत आहे हेही कुणी त्याला विचारत नव्हतं. पंचायतीतील बाकीचे लोकंच त्या बाबतीत न्यायनिवाडा करीत होते. ही बाब माझ्या लहानश्या मनाला फार खटकत होती. मामाच्या मनात मात्र  या संबंधाला मुळीच विरोध दिसत नव्हता.

      ‘कुणी काहीही म्हणो, आमच्या चित्राला आम्ही तेथेच देऊ… जर या घराच्या अंगणात मांडव टाकायला कुणाचा विरोध असेल तर मी माझ्या घरी मांडव टाकीन व  तेथे लग्न लाऊन देईन. पण हे लग्न मोडू देणार नाही…’ असं ठणकावत ऊध्ववकाकाने जाहीर करुन टाकलं.

      शामरावदादा, तुळशीरामदादा व उध्दवकाका हे या लग्नाच्या बाजूने भक्कमपणे उभे ठाकले होते. त्यामुळे विरोधकांची दाळ काही केल्या शिजली नाही.

      उध्दवकाका चित्राबाईचा सख्खा मामा होता. म्हणून त्याच्या बोलण्याला जबरदस्त वजन प्राप्त झाले होते. अधिकारवाणीने तो बोलत होता.

      शेवटी लग्नामध्ये आलेल्या अडथळ्याची कठीन अशी शर्यत  पार पाडण्यात पांडुरंगदादा व चित्राबाई सफल झाले, असेच म्हणावे लागेल.  ’मिया बिबी राजी, तो क्या करेगा ‘आगलावे’ काझी…” अशी त्या आगलावेमामाची केविलवाणी परिस्थिती झाली होती.

      कोळंबीला पोरी देऊ नयेत, कारण तेथे सुनवारीला खूप कामात राबवून घेतात म्हणे! परंतु तेथील मुली हमखास मागवाव्यात,  कारण त्या मुली फार कष्टिक असतात. म्हणूनच कदाचीत बाबाने देवदासदादासाठी कोळंबीची यशोधरा नांवाची मुलगी मागितली असावी. याच कारणाने  आमच्या गावातील गोविंदा यांनी या लग्नाला जोरात विरोध केला होता. तो ‘आगलावे“ या त्याच्या आडनांवापमाणे  कोणत्याही गोष्टीत तेल टाकून आग लावण्याचा धंदा करीत असे. तो गांवाच्या पंचायतीमध्ये न्याय-निवाडा करीत असे. तो नेहमी कोणत्याही गोष्टीत तिरकाच चालायचा. तो इतरांपेक्षा युक्तीवादाने बोलण्यात पटाईत होता. त्याने काही काळ पाटीलकी केली होती असं मी एकलं होतं. म्हणून  लोक त्याला ‘पाटील’ असेही म्हणत असत. तो बाबाच्या नात्यामध्ये लागायचा. म्हणून मी त्याला मामा म्हणत होतो.

      तो दिसायला काळासावळा पण रुबाबदार होता. त्याचं कपाळ मोठं होतं. त्याचे कानं पण सुपासारखे मोठे दिसत होते. त्याच्या कानावर केसाचं जंगल वाढलेलं होत. डोळ्याच्या भुवया जाडजूड होत्या. तो दोन-तिन वर्ग शिकला असेन, पण त्याला चांगलं लिहिता वाचता येत होतं. त्याला मोडी लिपी पण चांगली अवगत होती. लोकं त्याच्याकडून पत्र लिहून-वाचून घेत असत. तसंच त्याचेकडून अर्ज,   पोलीस ठाण्याचा रिपोर्ट असे काहीतरी लिहून घेत असत. असा तो लंगड्या गाईत शहाणा होता. अडाणी लोकांच्या तो कामाला येत असे.

      आणखी एक मजेशीर कहानी आमच्या कॉलेजमध्ये घडली होती. एका गायकवाड नांवाच्या बौध्द मुलाचा एका ब्राम्हणाच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. त्या मुलीच्या वडीलाने मुलगी पळवून नेली, असा त्याच्यावर आरोप करुन कोर्टात केस नेली होती. त्या केसची सुनावणी सुरु असतांना होस्टेलची तरुणाई उत्सुकतेपोटी ऎकायला जात असत. या बाबतची चर्चा संपुर्ण होस्टेलभर पसरली होती. मी सुध्दा एक-दोनदा कोर्टात गेलो होतो. त्यावेळी कोर्टात शांतता कशी असते ते पाहण्याची उत्कट अशी उत्सुकता लागली होती. कारण ‘शांतता कोर्ट चालू आहे’ असं काहीतरी नाटक त्यावेळी लागलं होतं. म्हणून कोर्टाची कार्यवाही, तेथील वकील लोकं कसे युक्तीवाद, वादविवाद करतात, कठड्यात उभे असलेल्या लोकांना कसे प्रश्‍न विचारतात, खुर्चीत बसलेल्या न्यायाधीशाचा कसा रुबाब असतो,  त्यांचा स्टेनोटायपिस्ट कसा टाईपींगचे काम करीत असतो, ते सर्व मी पहिल्यांदा पाहत होतो. तो मुलगा केस जिंकण्याच्या जिद्दीला पेटला होता. केस लढविण्यासाठी त्याने नागपूरचे चांगले चांगले नावाजलेले वकील लावले, असे ऎकले होते. त्या मुलीला वकील लोकं उलट सुलट प्रश्‍न विचारुन भांबावून सोडत असत. शेवटी ती केस त्या मुलाने जिंकली होती असे कळले.

      अशा प्रकारच्या प्रेमप्रकरणाचे उदाहरणं माझ्या समोर होते.

      असं म्हणतात की, तरुण वय अशा नाजूक प्रेमसंबंधाला लवकर बळी पडतं. कारण भिन्न लिंगीचं जबरदस्त  नैसर्गिक आकर्षण असतं, त्या वयात…! हे त्याच्या मागचे कारण असते.

      खरं म्हणजे कुणा मुलीच्या प्रेमभाव बंधात गुरफुटून जावे हे माझ्या स्वभावात मुळीच नव्हत. कारण माझ्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात मी कमालीचा लाजाळु होतो. परक्या मुलींशी बोलायला भयंकर लाज वाटायची. अबोलपणा, संकोची वृती, खेडवळपणा, प्रतिकूल परिस्थितीचा रेटा यामुळे मला न्युनगंडाने घेरले होते की काय असे वाटत होते.

      चारचौघात बोलायला फार घाबरत होतो. कधी कोणत्या  मिटींगमध्ये किवा कार्यक्रमामध्ये किवा सार्वजनीक कामामध्ये भाग घेतला नाही. काही कुणी बोलायला सांगितले की माझे हातपाय लटपटा कापायला लागत असे. छाती धडधडायला लागायची.

      मी कॉलेजमध्ये असतांना जसं लायब्ररीत वाचन करण्यास जात होतो. तसंच कॉलेजच्या लायब्ररीतून पाठ्यपुस्तका व्यतिरीक्त कथा-कादंबर्‍या वाचायला आणीत होतो. मी ह.ना.आपटे, वि.स.खांडेकर यांच्यासारख्या प्रसिध्द लेखकांचे अनेक पुस्तके वाचलीत. आणखी काही लेखकाचे पुस्तके वाचलीत. त्यांचे नांव आठवत नाहीत. जीवनातील आनंद माणसाने मनसोक्तपणे लुटला पाहीजे. आयुष्यात मिळालेला प्रत्त्येक क्षण उत्कटतेनं, समरसून जगलं पाहिजे, सुंदरतेच्या कुसुमावरचं दवबींदू चुंबून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं वाचता वाचता  चांगल दिसेल ते वेचत होतो. मी त्यांच्या पुस्तकातील आवडलेले लिखाणातील टिप्पने एका वहीत काढून ठेवत होतो. नंतरच्या आयुष्याच्या रहाटगाडग्यात ती वही कुठे गेली माहीत नाही. त्यात एक वाक्य मला खूप भावले होते. ते म्हणजे, ‘मुकं जनावर असलेली बकरी काटे सोडून बाभळीचा पाला तेवढा अलगदपणे खाते.’ असं ते जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी पुस्तकात मांडलं होतं. निसर्गदत्त सौंदर्याचा आस्वाद घेणे हे माझ्या मनोवृतीत त्यामुळेच आले की काय कोण जाणे?

      मला फक्त सुंदरतेचं  आकर्षण होतं. मग ते निसर्गातील सौंदर्य असो की स्त्रीत्वातील सौंदर्य असो…

      म्हणून मी ठरवलं होतं की, लग्न करीन तर सुंदर मुलींशी…!

      मला अशी मुलगी गवसली नसती तर मी प्रेमाच्या भावविश्‍वात पडलो नसतो. माझं ध्येय होतं फक्त नोकरीपुरतं शिक्षण घेणं व आपलं कुटूंब सुखी करणं. बस्स एवढच…! प्रेम हे माझ्यासाठी केवळ अपघात होतं. तेही संधी चालून आली म्हणून…!

      मी जीच्यावर मनापासून प्रेम करीत होतो, ती खरोखरच सुंदर होती. ती कळी असतांनाच माझ्या मनाला भुरुळ पाडून गेली होती. आता तर ती कळी कणाकणाने उमलत चालली होती.

      होतीच तशी सुंदर…! कोमल…! मोहक चेहर्‍याची…! गौर वर्णाची…! लांबसडक केसाची…! लावण्ण्याने मुसमूसलेली… सौंदर्याची खान,  चंद्रालाही हेवा वाटावा असं तीचं गोड रुप होतं. गरीबाघरी या परीने कसा जन्म घेतला कोण जाणे?  चिखलामध्ये कमळाने कां जन्म घेतला? कोळशाच्या खाणीत हिरा कसा निपजला? असं कोणी विचारते कां?

      ती गांवातच शाळा शिकली होती. पुढे ती शाळा शिकू शकली नाही.

      आमच्या गावांत फक्त पहिलीपासून ते सहावीपर्यंत वर्ग भरत  होते.

      गावांतील मुली सहसा पुढील शिक्षण घेत नव्हत्या. कारण गरिबीची परिस्थिती! पुढील शिक्षण घ्यायचं म्हणजे शहरात जावे लागे. शहर दूर असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य नव्हते. अन् शहरात राहण्याची सोय नाही. त्यामुळे  मुलींचे पुढले शिक्षण खुंटून जायचे.

      मी सहसा सुट्टीमध्ये किवा सणासुदीला घरी आलो की, पहिल्यांदा आल्या आल्या शेतात जात होतो. तेथे हिरवेगार उभे असलेले पिके पाहण्यात मौज वाटायची.  पण जातांना तीच्या घराकडे डोकाऊन पाहिल्याशिवाय माझं मन राहवत नव्हतं. प्रसिध्द कयीयत्री बहिणाबाई आपल्या कवितेत लिहितात की,

‘मन वढाय वढाय, जसं पिकावरी ढोर !

किती हाकला हाकला, फिरी येते  पिकावर !!

असेच ते मंतरलेले दिवसं होते.  कधी दिसायची… कधी नाही दिसायची… कदाचित ती कामावरून घरी आली नसावी… दिसलीच तर मन सुखाऊन जायचं…  नाही दिसली तर मनाला हुरहूर लागायची…! कधी दिसलीच तर नजरा नजर तेवढी व्हायची. वाटे आमची नजरच बोलत आहे! प्रत्यक्ष बोलण्याची कधिच हिंमत होत नव्हती. काय बोलावे तेच कळत नव्हते. शिवाय कोणी पाहिलं तर…? अशी अनामीक भिती वाटत राहायची. असं आमचं लाजरं-बुजरं…अबोल… मुकं मुकं… निस्तब्ध  प्रेम होतं…!

एका गाण्यानं अगदी मला भारावून टाकले होते.

      ‘पान जागे… फुल जागे… भाव नयनी जागला… चंद्र आहे साक्षीला…’

      खरंच, आमच्या निरागस प्रेमाला कुणाचीच साक्ष नव्हती! होतं ते फक्त निसर्गाची…! पानाची, …! फुलाची…!

      माझं कॉलेजचं होस्टेल आमच्या गावच्या रस्त्याच्या बाजूला होतं. होतं थोडं दूर… परंतु गांवच्या रस्त्याने जाणारे-येणारे लोक दिसत असत.

      रविवारच्या बाजार-हाटाला गांवाचे  लोक शहरांत येत असत. मी खिडकीत बसून येणार्‍या लोकांना पाहत राहायचो. कित्येक दिवसाच्या मनाच्या कोपर्‍यात दडवून ठेवलेल्या आठवणी उफाळून बाहेर यायच्या. आपल्या लोकांची  जबरदस्त ओढ असायची! आपलं घर, गांव सोडून बाहेर शिक्षणासाठी राहणार्‍या सर्वच मुलांची अशीच गत होत होती. ’होमसिकने”पणा म्हणतात तसं…! घरच्या आठवणीचे आजारपण…!

      होस्टेल मध्ये सर्व मुलं नविन, एकमेकांचे अपरिचीत, म्हणून आलेला एकटेपणा…! ही एकटेपणाची जानीव त्याला कुरतडत राहायची. आपल्याला कुणीच नाहीत का? आपण अनाथ आहोत कां? असेव सर्वांना वाटत राहायचं.

      हप्‍त्याचा बाजार असल्यामुळे गांवचे कोणीना कोणीतरी येत होतेच. मला घरच्या लोकांकडून पैसे पाहिजे असल्यामुळे व त्यांना भेटायची जबरदस्त अनामिक ओढ असल्यामुळे  मला बाजारात जावेच लागे.

      बाजारात आमच्या गांवचे लोकं एका विशिष्ट ठिकाणी थांबत असत. त्या ठिकाणाला ’ऊतारा’ असे म्हणत. मसाला,  तंबाखुच्या साथीजवळ एक मोठं कडुनिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या सावलीत  निळोण्याचे व आमच्या गांवचे लोक त्या उतार्‍यावर थांबत असत.

      ‘ती’ जर कदाचित बाजाराला आलीच तर दुधात साखर पडल्याचा योग यायचा.

      मागच्या उन्हाळ्यात मी चिरकुट्यामामाच्या घरी शेंगा फोडण्यासाठी गेलो होतो. पैसे मिळविण्यासाठी मी हे काम करीत होतो.

      उन्हाळ्यात शेतकरी भुईमूंग पेरण्यासाठी घरी ठेवलेल्या भुईमुंगाच्या शेंगा फोडून घेत. शेराच्या किंवा पायलीच्या हिशोबाने ते दाणे मोजून मजूरी देत. शेंगा फोडता फोडता काही दाणे फुटून जात तेव्हा त्या फूटीपैकी काही दाणे घरी नेऊ देत असत.

      ‘आलास… भेटायला आलास ना?’ माझा मीत्र खट्याळपणे बोलला. ती पण तेथे आधीच आल्यामुळे तो असा मला बोलला होता.

      ‘नाहीरे, शेंगा फोडायला आलो.’

      ‘राहू दे… राहू दे… मला माहीत आहे.’

      अशाप्रकारे तो माझा मित्र तिची किंवा माझी मध्ये मध्ये उडवित राहायचा. तेव्हा ‘ती’ माझ्याकडे पाहून खुदकून हसायची.

      आमचं गुपित बहुदा त्याला माहित झालं असावं. त्याला कुणाशी बोलायला काहीच वाटत नसायचं. तो बिनधास्त बोलायचा. तो अत्यंत हजरजवाबी होता. मी पाहीले की, तो कधिच लाजत नव्हता. त्याच्या सारखं वागणं मला कधिच जमले नाही.

      आमचे प्रेम हे नेहमी अबोल आणि निस्तब्ध झर्‍यासारखे वाहत राहायचे. ते कधिही उघडे पडले नाही किंवा कोणाला माहिती झाले नाही. फक्त त्या माझ्या जवळच्या मित्राला माहित झाले होते.

      त्यानेच मला एकदा सांगितले होते की, ‘अरे तु ज्या मुलीवर इतका जिवापाड प्रेम करतो, ती तर कुणाची तरी होत आहे.’

      ‘कुणाची?’ मी एकदम ऊसळून बोललो.

      मला ज्याची भिती वाटत होती तेच आता मला ऎकावे लागणार की काय असे वाटत होते.

      माझ्या पश्चात गांवामध्ये घडणार्‍या गोष्टी तो मला सांगत असायचा.

      ‘आपल्याच गांवातील xxxx या मुलांसोबत तिच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या आहेत.’ असं तो म्हणाला.

      खरही असेल कदाचीत! कारण तो मुलगा तिच्याच पोटजातीचा होता. पाहायला माझ्यापेक्षा बरा होता. शहरात त्याला त्याच्या नातेवाईकाकडे शिकायला पाठविले होते. परंतु तो फारसा शिकला नाही. गांवात येऊन तो शेती करु लागला. त्याच्याकडे बर्‍यापैकी शेती होती. परंतु कुटूंब मोठं आणि एकत्रीत असल्यामुळे शेतीचं उत्पन्न त्यांच्या कुटूंबांना पुरत नव्हतं.

      तेव्हापासून माझं मन लागत नव्हतं. हे कधीना कधी तरी घडणारच होतं असं मी माझ्या मनाला समजावीत होतो.

      मी धनपाल किंवा भगवानच्या  पावलावर पाउल ठेवून चालू शकत नव्हतो, याची मला जाणीव होती.

      कारण एकतर माझं शिक्षण पुर्ण व्ह्ययचं होतं. शिकल्यानंतर मला नोकरी शोधणे हे माझे ध्येय होतं. नोकरी लागल्यानंतरही काही वर्षे नोकरीच्या पैशात दादाची डबघाईला आलेली परिस्थिती सुधरावी लागणार होती. अज्यापला शिकवावे लागणार होतं. आई-बाबाने आयुष्यभर खूप कष्ट उपसले होते. आता ते थकत चालले होते. अशा अनेक अडचनी माझ्या समोर उभ्या होत्या. त्यामुळे माझ्या लग्नाला खूप वेळ होता.

      तीचे तारुण्य उफाळत चालले होते. तिचे आई-वडील तिचं लग्न करण्याचा जरुर विचार करतील, हे स्वाभावीक होतं.

      आणखी एक अवघड जागी दु:खणं होतं. ते म्हणजे ती आमच्याच जातीची पण दुसर्‍या पोटजातीची होती. त्या काळात पोटजातीच्या पलीकडे जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. तसा विचार स्वप्नातही कोणी करीत नव्हते.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाती-पोटजाती अंताचे विचार अजुनही समाजात रुजले नव्हते.

      मी आणि माझा होस्टेलचा मित्र पाटील असे दोघेही कॉलेजला एकाच वर्गात शिकत होतो. आम्ही दोघेही तहसील कार्यालयाच्या जवळील नगर पालीकेच्या सार्वजनीक लायब्ररीमध्ये रोज नियमीत जात होतो. तेथे आम्ही वर्तमानपत्रे व मासिके वाचत राहायचं. एखाद्या दिवशी जर गेलो नाहीतर मला हुरहूर वाटायची. आमच्या रोजच्या जीवनाचा तो एक भाग बनला होत्ता.

      एकदा वर्तमानपत्रात पोष्टामध्ये लिपीकाच्या जागा निघाल्याची जाहीरात वाचली. त्यासाठी आम्ही दोघांनीही  अर्ज केला. माझी त्या पदासाठी मुंबई येथे नेमणूक झाल्याचं मला पत्र मिळालं. माझ्यापुर्वी माझा एक दुसरा होस्टेलचा मित्र  आडेला असेच नेमणूकीचे पत्र आले होते. तो तेथे जावून परत आला होता. तो सांगत होता की, मुंबईला काही खरं नाही. तेथे राहण्याची व्यवस्था होत नाही. घर भाड्याने घेण्यासाठी खूप पैसे द्यावे लागतात. तेथील जीवन फार महागडं आहे. आपल्यासारख्यांना तेथे जगण अत्यंत अवघड आहे. तेथे फार धकाधकीचं जीवन आहे. म्हणून त्याने ती नोकरी सोडली होती. त्याचा अनुभव ऎकून मी सुध्दा मुंबईला जाऊन ती नोकरी धरायचा विचार सोडून दिला,

      या दरम्यान माझी महाराष्ट राज्य विद्युत मंडळामध्ये लिपीकाच्या पदासाठी लेखी परीक्षा झाली होती, माझ्या सोबत होस्टेलचे आणखी काही मुले होती. माझा  लेखी परीक्षेतील इंग्लिशचा पेपर खूप चांगला गेला होता. इंग्रजी निबंध व अनसिन पॅसेज खूप चांगला सोडवला होता, त्यामुळे मला इकडेही नोकरी मिळेल अशी आशा वाटत होती.

      मला लगेच महाराष्ट राज्य विद्युत मंडळाचे नोकरीचे पत्र आले. माझ्यासोबत माझा मित्र आडे याला सुध्दा नेमणूकीचे पत्र आले होते. आम्हाला चंद्रपूर विभागात नेमणुक दिली होती. तेथून आम्हाला सविस्तर पोस्टींग मिळणार होते.

      अखेर मला नोकरी मिळाली…! किती दिवसापासून उराशी बाळगलेलं नोकरीचं स्वप्न आता साकारलं गेलं याचा मला खूप आनंद झाला होता. पण माझी बी.कॉम फायनलची परिक्षा अद्याप व्हायची होती. मध्येच मला कॉलेज सोडून जावे लागणार होते. पण मी नोकरीनंतर सुध्दा बी.कॉमची पदवी घेतल्याशिवार राहणार नाही असं मी मनोमन ठरवीलं होतं.

      मी घरी आलो. घरातील सर्वांना ही बातमी सांगितली. माझ्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला हो्ता.

      माझ्या नोकरीची गोष्ट वार्‍यासारखी गांवात पसरली. वयाच्या एकविसाव्या वर्षी मला ही नोकरी लागली होती.

      गांवामध्ये यापुर्वी प्रल्हाददादाला नोकरी लागली होती. त्यानंतर मला… गांवात मात्र मीच त्यावेळी जास्त शिकलेला होतो. प्रल्हाददादा प्री- आर्टस् पर्यंत शिकला होता. मी मात्र बी.कॉम फायनल पर्यंत पोहचलो होतो. कॉलेजपर्यंत पोहचलेले त्यावेळी केवळ आम्ही दोघेच होतो.

      प्रल्हाददादा शहरात जाऊन शिकत होता. मॅट्रीक पास झाल्यानंतर त्याने अमोलकचंद कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली होती. पण शिकत असतांना त्याला नोकरी लागली होती. शिक्षण अर्धवट सोडून तो नोकरीच्या जागी कामावर रुजू झाला होता. कारण शिक्षणापेक्षा त्याला नोकरीची जास्त गरज होती. तो बाबाच्या जवळच्या नात्यामध्ये लागत होता.

      मला नोकरीवर रुजू होण्यासाठी पगार होईपर्य़ंत पन्नास रुपये पाहिजे होते. घरी पैसे नव्हते. मी माझ्या मामाच्या घरी गेलो.

      ‘मामा मला नोकरी लागली. त्यासाठी मला पन्नास रुपये पाहिजे होते. मी पगार झाला की तुझे पैसे आणून देईन.’

      ‘नाही…रे पैसे नाहीत…’  थोडा वेळ विचार करुन बोलला. मी हिरमूसला झालो. मला तो असा नकार देईल असे स्वप्नातही वाटले नाही.

      मी त्याला यापूर्वी कधिच पैसे मागितले नव्हते. त्यानेच एकदा मी न मागता पैसे दिले होते. मी शहरात शाळेत असतांना मी मधल्या सुट्टीत दादाला पाहण्यासाठी तहसील ऑफीस जवळ आलो होतो. तेथे मामा दिसला.

      ‘दादा आला का?.’ मी मामाला विचारले,

      ‘नाहीरे… कारे काही काम होतं का?’ मामा म्हणाले.

      ‘हो… कंपासपेटी व वह्या घ्यायला मला पैसे पाहिजे होते.’

      त्याने मला त्यावेळी पांच रुपये काढून दिले. बस्स… त्यानंतर त्याला पैसे मागण्याची ही दुसरी वेळ होती. शिवाय मला नोकरी लागली म्हणून  त्यालाही खचीतच आनंद झाला असेल. त्याची मुलगी हिरा लग्नाच्या वयात आली होती. माझ्या बाबतीत त्यांनी अपेक्षा धरली होती हेही मला कळले होते. मी जर होकार दिला तर तो हूंडा द्यायला तयार आहे, असेही मला कळले होते. म्हणून त्या ओलाव्याने मला  मामा निश्चीतच पैसे देतील अशी माझी अपेक्षा होती. तरीही त्यांनी मला नकार दिला होता.

      मला असे कळले होते की त्याने दादाला बरेच पैसे दिले होते. तो खूप कर्ज करुन बसला होता. त्याचे कर्ज  दादाने अद्यापपर्यंत परत केले नव्हते. त्यावरून मामी नेहमी मामाशी भांडत असे. म्हणून मामीला घाबरुन त्याने मला नकार दिला असावा असे वाटते.

      आणखी एक कारण असं होतं की पुर्वीच्या शेतीच्या वादाने आमचे संबंध आधीच ताणल्या गेले होते. आमच्या बाबत मामीला कमालीचा आकस होता.

      मी खरोखरच कधी नव्हे इतका निरुत्साही झालो होतो. तोंडापाशी आलेला घास पैश्याअभावी निघून जातो की काय याची मला धास्ती वाटायला लागली होती. ‘भरोश्याच्या म्हशीने हेला दिला’ असा प्रकार मामाच्या बाबतीत घडला होता.

      त्यानंतर मला एक आशेचा किरण दिसला. माझी भिस्त आता तुळशीरामदादावर टिकली होती. तो माझ्या मोठ्या आईचा मुलगा होता. माझ्या आईची मोठी बहीण-धुरपताबाई ही  सुध्दा गावांतच राहत होती. तो आम्हाला अडीअडचणीला मदत करायचा.

      मी त्याच्याकडे गेलो. त्याला मी नोकरी लागल्याबद्दल सांगितले. परंतु जाण्यासाठी व तेथे राहण्या-खाण्यासाठी आमच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले.  त्यालाही मला नोकरी लागल्याबद्दल खूप आनंद झाला.

      ‘माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. परंतु सोन्याची आंगठी सोनाराकडे गहान टाकून मी तुला ऊद्या पैसे आणून  देतो.’ असा  त्याने मला भरोसा दिला.

      दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्याने खरेच मला चाळीस रुपये घरी आणून दिले. माझा महत्वाचा प्रश्‍न मिटल्यामुळे मी खुषीत होतो.

      बाबा त्यावेळी घरी कांदाभजी, आलुभजी व मिरचीची भजी बनऊन वाघाडी नदीच्या धरणावर दुपारी चार-पाच वाजताच्या दरम्यान  विकायला नेत असत. तेथे धरणाच्या बांधावर काम करणारे मजूर लोक व बांधकाम करणारे कंपन्याचे लोकं ते विकत घेऊन खात असत. त्यांना मात्र उधारीवर भजे द्यावे लागत असे. कारण एकतर कामाच्या ठिकाणी त्यांचे सोबत पैसे नसायचे. त्यांच्या मजुरीचे पैसे शनिवारी मिळत असत. त्या दिवशी बाबा उधारीचे पैसे वसूल करीत असे.

      आमच्या गावांतील व आजुबाजूच्या गांवातील बरेच लोक तेथे दगड-मातीचे काम करण्याकरीता जात असत. माझी पुतनी संघमित्रा तेथे काम करण्याकरीता जात होती. ‘ती’ मुलगी सुध्दा तिथे काम करीत होती.

      ‘माझ्या पोराला बाबुची नोकरी लागली.’ असा तो भजे देत देत लोकांना आवर्जून सांगत होता. त्यावेळी बाबुची व सरकारी नोकरी लागणं म्हणजे अख्ख जग जिंकल्यासारखं वाटत असे. खेड्यातील भावविश्व तेवढ्यापुरतंच मर्यादीत होतं. कारण गांवात त्यांनी तलाठी, ग्रामसेवक, मास्तर असेच नोकरीतील लोकं पाहिलेले असते. त्यापेक्षा आणखी मोठंमोठे नोकरीचे पदे असतात हे त्यांना माहितीच नव्हते.

      मी दुसर्‍या त्यादिवशी बाबासोबत धरणावर गेलो. तेथील ओळखीचे लोक हर्षोत्साने माझ्याकडे पाहत होते. गांवच्या एका मुलाला नोकरी लागली या उत्कट भावनेने ते हरखून गेले होते. अनोळखी लोकं, हाच काय तो ‘भजेवाल्याचा पोरगा’ म्हणून कौतुकाने पाहत होते.

      भजे घेण्यासाठी तेथे सर्व लोक जमले होते. बाबा पळसाच्या पानावर त्याना चार चार आण्याचे भजे उधारीत देत होता व त्यांची नांवे वहीत टिपून घेत होता.

      त्या ‘मुली’ने सुध्दा बाबाकडून भजे घेवून माझ्याजवळ आली. तिचं गोरं रुप दिवसभराच्या कामाने व उन्हाने काळवंडून गेलं होतं.

      ‘बाबुची नोकरी मिळाली?’ अशी ती बोलतांना मी  तिच्या चेहर्‍यावरचे आनंदाचे भाव टिपले होते.

      ‘हो.’ मी ऎवढे बोलून निस्तब्ध झालो.

      तिच्या भेटीमुळे माझ्या अंगावर ऊठणारे हलकेसे रोमांच आता निस्तेज होऊ लागले होते. म्हणूनच माझ्यात आता तिच्याशी बोलण्याची ताकद उरली नव्हती.

      मी काहीतरी तिच्याशी बोलेन अशी वाट पाहत काही वेळ माझ्याजवळ थबकली होती. शेवटी मी काहीच बोलत नाही असं पाहून ती चरफडत, हिरमुसली होऊन  भजे खात असलेल्या मजुरांच्या गर्दीत जाऊन बसली.

      तिच्या लग्नाच्या चर्चा गांवातल्याच एका मुलाशी चालू असल्याबाबत माझ्या मित्राने सांगितलेली गोष्ट मी विसरलो नव्हतो.  मात्र तिच्या या भेटीमुळे  स्मृतीत साठवलेल्या आठवणीच्या लाटा माझ्या मनात नव्याने हेलकावे खाऊ लागले  होते.

      मी नेमणुकीच्या आदेशाप्रमाणे चंद्रपूर येथे गेलो. सोबत माझा मित्र आडे होता. तेथील ऑफीसने मला ब्रम्हपुरी या गांवला जाण्याचा आदेश दिला. ब्रम्हपुरीला गेल्यावर तेथे कामावर रुजु झालो. राहण्यासाठी तेथे भाड्याची खोली शोधायला लागलो. जातीच्या विषारी तिरस्कारामुळे इतर जातीचे लोक खोली देत नव्हते.

      बौध्द मोहल्यात तेवढ्या चांगल्या खोल्या उपलब्ध नव्हत्या. कारण भाड्याने देण्याइतपत सिमेंट-कॉंक्रीटचं घर बांधण्याची त्यांची ऎपतच नव्हती. काही दिवस लॉजवर राहून आपल्याच बौध्द मोहल्ल्यात रामटेके यांचे घर  मिळाले. त्यावेळी सुरुवातीला फक्त विस रुपये भाडे होते. दोन लहान लहान खोल्या होत्या. त्यांच्याकडे छोटसं दुकान पण होत.

      आमच्या ऑफीसमध्ये काम करणारे बौध्द समाजाचे लाडे बाबुने मला या कामी बरीच मदत केली होती. ते मला ऑफिसच्या कामामध्ये सुध्दा मार्गदर्शन करीत असत. त्यांच लग्न झालं होतं. परंतु त्यांची पत्‍नी नागपूरलाच राहायची.  नागपूरला त्यांच स्वत:च घर होतं. ब्रम्हपूरीला ते एकटेच राहायचे.  एकदोनदा त्यांनी मला त्यांच्या नागपुर येथील घरी नेले होते.

      मी नव्यानेच लागल्यामुळे माझ्या खात्यावर सुट्ट्या जमा झाल्या नव्हत्या. त्यामुळे सुट्ट्या पण मिळत नव्हत्या. शिवाय ब्रम्हपुरीला जाण्यासाठी त्यावेळी नागपूरहून जावे लागे. ब्रम्हपूरी ते नागपुर जवळपास तीन ते चार तास व  नागपूर पासून यवतमाळला येण्यास जवळपास तेवढाच वेळ म्हणजे ब्रम्हपूरी ते  यवतमाळला जवळपास सात ते आठ तास लागत होते. इतका तो लांबचा प्रवास होता.

      आईला नागपुरला येण्यास मी घरी पत्र पाठविले होते. मी नागपूरला होस्टेल मधील बोन्द्रे नांवाच्य मित्राकडे आदल्या दिवशी येऊन  थांबलो होतो. तो नागपूरला शिकत होता. खोली करुन राहत होता. त्याने माझी चांगली व्यवस्था केली होती. मला त्याने एक सिनेमा पण दाखविला होता.

      तो माझा एक चांगला मित्र होता. आम्ही कॉलेजच्या होस्टेलमध्ये असतांना त्याच्या गांवला भाड्याच्या सायकलीने गेलो होतो. त्याचे गांव यवतमाळ पासून जवळपास चाळीसएक किलोमिटर असेल. सायकल चालवून चालवू्न खूप दमलो होतो.

      दुसर्‍या दिवशी आई बरोबर एस.टी. ने नागपूरच्या स्टॅंडवर आली होती. तिला घेऊन मी ब्रम्हपूरीला गेलो.

      दिवाळीच्या सुट्टीत मी व आई गांवला आलो. तेव्हा कळले की, गांवातील अनेक लोकं गांव सोडून गेले होते. ज्यांची शेती धरणात गेली त्यांना सरकारने दुसरीकडे शेत दिले होते.  घरासाठी जमीन व  घर बांधण्यासाठी पैसे देऊन त्यांचेसाठी नविन गांव वसवले होते. काहींनी शेती न घेता पैसे घेऊन कोणत्यातरी गांवला जाऊन राहीले होते. त्यामुळे अशा लोकांनी गांवची घरे अगदी स्वस्तात बंजारी लोकांना विकले होते. आमच्या मोहल्ल्यात आता बंजारी लोक राहायला आले होते. आमच्या लोकांशी बाट धरणारे लोक आता आमच्या मोहल्यात आमच्याच लोकांच्या घरी राहत असल्याचे पाहून आम्हाला अचंबा वाटत होता. फक्त बोटावर मोजण्याऎवढे बौध्द लोक आता गांवात राहीले होते.

      ‘ती’ सुध्दा तिच्या आई-बाबासोबत घरदार विकून व गांव सोडून निघून गेली होती. तिच्याकडे शेती नव्हती. परंतु तिच्या नातेवाईकाची शेती धरणात गेली होती. ज्यांच्या आधाराने त्यांचे कुटूंब आमच्या गांवात राहायला आले होते, तेच नसल्यामुळे ते सुध्दा गांव सोडून गेले होते.

      जातांना कदाचीत माझी आठवन काढून आपल्या  मनात म्हणत असावी की,

      ‘साधी-सुधीऽऽऽऽ… तुने धरली नाही…

      तुझी माझी प्रीत कधी… फळली नाही…!

      माझं त्या भावविश्वासतलं एकदाचं व शेवटचं प्रेम होतं.

      ‘पंछी बिछड गये मिलनेसे पहिले.’  अशीच काहीतरी कथा आमच्या बाबतीत घडली होती…

      ‘ती’ कुठे गेली? तिचे पुढे काय झाले? तिचे लग्न कुणाशी झाले? कुणाच्या पदरात पडली? इत्यादी प्रश्‍नाने माझ्या मनांत काहूर माजवलं होतं. अन् ते शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहिलं ते राहिलचं! कारण बुजत चाललेल्या जखमेच्या खपल्या पुन्हा ऊघडून पाहून जीव कासाविस होऊ नये, म्हणून मी सुध्दा या प्रश्‍नाची उत्तरे शोधण्याचा कधिच प्रयत्‍न केला नाही. पण एवढं मात्र खरं की, ज्या मुलाबाबत तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरु असल्याचे मी ऎकले होते, त्या मुलाशी  तिचे लग्न झालेच नाही.

      माझ्या जीवनात आलेली एक सुंदर मुलगी नियतीने माझ्याकडुन हिसकाऊन घेतले होते. ते शल्य मला सतत बोचत होते. त्यामुळे मी मनोमन ठरविले होते की, मी ज्यावेळी लग्नाच्या बाजारात ऊतरीन त्या वेळी तिच्या तोडीस तोड असलेली, किंबहूना तिच्या पेक्षा काकनभर  अधिक सुंदर असलेल्या अश्या मुलीशीच लग्न करीन.  मग ती गरीब असो की अशिक्षीत असो. मला तर हुंडा घ्यायचाच नव्हता… यदाकदाचीत ती जरी दुसर्‍या पोटजातीची निघाली तरीही मी प्रवाहाच्या विरोधात जाऊन बंड करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा निर्धार केला होता.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: