मी आणि माझ्या आठवणी


समर्पण…

ज्यांनी मला जीवन प्रवाह दिलाअसे माझी आई अलुकाबाईबाप कोंडुजी यांच्याशिवाय ज्यांनी मला बालपणापासून घडविलंअसे माझे दादा शामराववहिनी अनुसयादिवंगत दादा देविदासमाझी एकुलती एक मोठी बहीण जनाबाई यांना सदर आत्मकलाकृती समर्पित

मनोगत
मी महावितरण कंपनीच्या नोकरीत असतांना सामाजिक कार्यात झोकून दिल्याबरोबरच लिखाणकाम पण करीत होतोच. काही सामाजिक-धार्मिक पत्रिकांमध्ये अधून-मधून लेख-कथा प्रकाशित होत होत्या. माझ्या घरातील मंडळीना माझा हा छंद माहित असल्याने मी लेखाधिकारी पदावरून निवृत झाल्यावर साहजिकच ‘तुम्ही काहीतरी लिहीत जा…’ असा आग्रह धरला. म्हणून माझी मुलं प्रज्ञाशील, संघशील, करुणा व पत्नी कुसुम यांच्या अतूट प्रेमामुळे ‘मी काहीतरी लिहिलं पाहिजे’ असं मनोमन वाटायला लागलं.
निवृतीनंतरचा काळ म्हणजे भरपूर फावला वेळ ! बर्या च दिवसापासून जीवनातील कथा चितारण्याचा विचार माझ्या मनात रुंजी घालत होत्या. खरोखरच, मी जेव्हा गतस्मृतीच्या पेटार्यालत डोकाऊन पाहिले; तेव्हा मलाही वाटले की माझ्या आयुष्यातील गहिरे अनुभव म्हणजे कादंबरी बनू शकते.
म्हणून दूर-दूर निघून गेलेल्या जीवनाला एकदातरी ओथंबलेल्या डोळ्याने मागे वळून पाहण्याची उत्कंठा मनात निर्माण झाली. मी जे जगलो ते कथेला जोडून सांगितले तर निरस वाटणार नाही; म्हणून एकेक प्रसंग कथेमध्ये गुंफण्याचा प्रयत्नस करत गेलो.
मी यवतमाळला अमोलकचंद कॉलेजमध्ये शिकत असतांना मराठीचे प्राध्यापक, ‘शरद कळणावत सर’ म्हणाले होते की, ‘सारेचजण साहित्यात जगतात; परंतु जे कागदावर उमटवितात ते साहित्यिक ठरतात. आपलं आणि इतरांच जगणं, सभोवतालचं वातावरण, अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती, तडजोडी, उद्भंवणारा संघर्ष, निरीक्षण, अनुभूती इत्यादी अनेक गोष्टी कलाकृतीच्या रुपात कागदावर रेखाटल्या म्हणजे तो साहित्यिकाच्या रांगेत जाऊन बसतो.’
मी दैन्य आणि दारीद्रयामध्ये जीवन जगत राहिलो असतो, तर मी लिहू शकलो नसतो. कारण ते रोजचेच जीवन झाले असते. ‘रोज मरे त्याला कोण रडे !’ याप्रमाणे जीवनप्रवास सुरु असता. त्याकाळात ज्या परिस्थितीत मी जगत होतो, हे त्या समुहाचं सार्वत्रिक जीवन होतं. सर्वचजण असे जगतात, मग माझ्या जगण्यात असं काय आगळंवेगळं आहे, ते मी लोकांना सांगू…? परंतु त्यावेळचं जगणं आणि आताचं जगणं यामध्ये आमुलाग्र बदल झाल्याने मला ते कागदावर उतरविण्यास प्रेरीत केलं.
पूर्वी माझ्या पायात चप्पल नव्हती, आता घातल्याशिवाय फिरत नाही.
पूर्वी पैजामा, शर्ट घालत होतो, आता सूट, बूट घालतो.
पूर्वी कपड्यांना इस्त्री नव्हती, आता इस्त्रीशिवाय राहत नाही.
पूर्वी खेड्यात कुडामातीचं घर होतं, आता शहरात आलीशान फ्लॅतट आहे.
पूर्वी घरकाम आम्हीच करीत होतो, आता मोलकरणी आहेत.
पूर्वी पाय तुडवत जात होतो, आता स्वत:च्या वाहनाने जातो.
पूर्वी गाडीचे स्वप्न पडत होते, आता प्रत्यक्षात कार चालवितो.
पूर्वी उडानखटोल्याकडे कुतूहलाने पाहत होतो, आता विमानात बसतो.
पूर्वी कुठे फिरत नव्हतो, आता देश-परदेशात पर्यटण करतो.
पूर्वी माती-गोटे, चिखल-शेणाशी सामना होता, आता काहीही नाही.
पूर्वी तंबाखू व घोटभर दारुचा शौक होता, आता चार हात दूर आहे.
पूर्वी कुठलंही पाणी पीत होतो, आता बिसलेरी व मशीनचं पाणी पितो.
पूर्वी उपेक्षीतांचं जीवन जगत होतो, आता सन्मानजनक जीवन जगतो. पूर्वी तुटपूंजी कमाई होती, आता शिल्लक पडेल इतका पगार होता.
पूर्वी अंधारात प्रकाश शोधत होतो, आता झगमगाट असतो.
पूर्वी गर्मीत उकडत होतो, आता पंख्याची शितल हवा खातो.
पूर्वी जमिनीवर झोपत होतो, आता मऊशार गादीवर विसावतो.
पूर्वी घरात शिक्षण नव्हतं, आता शिक्षणाची परंपरा निर्माण झाली.
माझा लहान भाऊ-अज्याप याने डॉक्टर, मुलगी-करुणा हिने इंजिनीयर, मधला मुलगा–संघशील याने डॉक्टर तर मोठा मुलगा-प्रज्ञाशील याने कायद्याची पदवी घेतली. म्हणजेच माझ्या घरात डॉक्टर, वकील, इंजिनीअरसारखी उच्च शैक्षणिक परंपरा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार निर्माण झाली. शिक्षण हे माझ्या जीवनात सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार ठरलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
ज्यावेळी प्रज्ञाशील यू.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला, तेव्हा ‘आय.बी.एन.-लोकमत’ टी.व्ही. चॅनलवर व निरनिराळ्या वर्तमानपत्रात ती बातमी झळकली.
विशेष सांगायचं म्हणजे ही बातमी ‘लोकमत’ वर्तमानपत्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आवृतीमध्ये सविस्तरपणे प्रकाशीत झाली होती. आमच्या गावातील मुले दु्ध विकायला सकाळीच यवतमाळला येत होते. त्यांना ‘लोकमत’ मध्ये ‘चौधरा’ या गावाचा उल्लेख असल्याचे सांगितल्यावर त्यांच्या आनंदाला इतके उधाण आले, की प्रत्येकांनी तो पेपर विकत घेतला आणि सांगायला लागलेत की, ‘आमच्या गावाचा मुलगा कलेक्टर झाला.’ त्यामुळे लोकांचा उर अभिमानाने व गर्वाने भरुन आला होता !
अशा प्रकारचा बदल कसा झाला? हा बदल घडवून आणण्यात कोण-कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्यात? आजच्या पिढीला ज्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यात, त्या काही त्यांना एकाएकी व आपोआप मिळाल्या नाहीत. त्यामागे मागील पिढीचा त्याग, कष्ट, निर्धार व डॉ. बाबासाहेब आंबेडकराची शिकवण आणि प्रेरणा याचे मोठे पाठबळ आहे. ही बाब आजच्या व येणार्या पिढीला कळणे आवश्यक आहे. तेव्हाच आमचे मोल त्यांना कळेल, असे मला वाटते. हा उद्देश मी लिखाणामागे ठेवला आहे. सागरसाहेबांनी आपल्या शायरीत म्ह्टल्याप्रमाने मलाही इतकेच म्हणायचे आहे की,
‘हमारा दर्द ना बाटो, मगर गुजारीश है |
हमारे दर्द को महसूस कर लिया जाये ||’
म्हणजे माझ्या दु:खात वाटेकरी नाही झालात तरी चालेल, पण त्या दु:खाची जाणीव असू द्या.
आणखी असंही म्हणता येईल की,
‘आमचं दु:ख झेलू नका, पण त्या दु:खाची अवहेलना करू नका…!’
ऐवढेच… माझ्यासाठी खूप आहे…!
आजच्या काही उच्चशिक्षित पिढीचा असा समज होत आहे की, आम्ही आमच्या अंगभूत गुणवत्ता, बुध्दीमत्ता व परिश्रमाच्या जोरावर यश मिळविले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध येतो कुठे? आम्हाला कुठे स्कॉलरशिप व राखीव जागांचा फायदा मिळाला?
खरं म्हणजे ज्या संधी आजच्या पिढीला मुक्तपणे व स्वतंत्रपणे उपभोगता येत आहेत, ज्यामुळे ते मोठमोठ्या पगारावर व पदावर विराजमान झालेले आहेत, तशा संधी त्यांच्या वाडवडीलांना, जातीव्यवस्थेमुळे – आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत गांजल्याने उपलब्ध झाल्या नव्हत्या. परंतु आंबेडकरी चळवळीच्या प्रखर तेजाने त्यांचा मार्ग प्रकाशमय झाला. त्यांना स्कॉलरशिप मिळाल्याने शिकू शकले. राखीव जागा मिळाल्याने नोकरी व बढती मिळाली. परिणामत: आर्थिक परिस्थिती सुधारली. म्हणून त्यांच्या मुला-बाळांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्या. ही देण केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. हे मर्म त्यांना कळणे अत्यंत आवश्यक आहे. हाही उद्देश या लिखाणामागे आहे.
जे दु:ख, कष्ट, दैनावस्था पूर्वीच्या पिढीला भोगाव्या लागल्यात, त्या आजच्या पिढीच्या वाट्याला आल्या नाहीत आणि येऊदेखील नयेत, म्हणून तशी कामना ठेवून आमची पिढी धडपडत आहे. परंतु काही अपवाद सोडला तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे ऋण मानायला तयार नाहीत. कारण त्यांनी आंबेडकरी साहित्य वाचले नाहीत. आपल्या सामाजिक इतिहासाचा, पूर्वजांच्या परिस्थितीचा व कर्तृत्वाचा मागोवा घेतला नाही. म्हणून त्यांचा असा समज होत आहे. म्हणून त्यांच्या यशोशिखराचा भक्कम रोवलेला पाया त्यांना दिसला पाहिजे, असाही उद्देश या लिखाणामागे आहे.
तसेच प्रत्येकाच्या जीवनात चांगले-वाईट, सुखदायक, दु:खदायक, मनाला चटका लावणारे, हृदयात धडकी भरणारे, हळूवार भावनेने गुंफलेले असे अनेक प्रसंग येत असतात. त्यातून मनुष्य काहीना काहीतरी शिकून पुढील आयुष्याची शिदोरी बांधत असतो. त्याचे हेच अनुभव दुसर्या ला मार्गदर्शक ठरु शकतात. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा !’ हाही उद्देश या लिखाणामागे आहे.
खेड्यातील कमालीचे बकालपण, अस्वछता, रोगराई, व्यसनाधिनता, त्यामुळे कुटूंबाची होणारी वाताहत, ससेहोलपट, भांडण-तंटॆ, कोर्ट-कचेर्याव, पोलिसांकडून होणारी पिळवणूक व मिळणारी अपमानास्पद वागणूक, लोकांमध्ये खोलपर्यंत मुरलेली अंधश्रध्दा, अज्ञान, परंपरेचा पगडा, राजकारण, फुटीरता इत्यादी अनेक बाबींनी जीवनमान दुषित केलेले असते. म्हणून ही वास्तवता लोकांसमोर यावी हा उद्देश सुध्दा या लिखाणामागे आहे.
माझ्या लिखाणात आलेले प्रसंग घरच्या लोकांना काही वेळेला सांगितले असतीलही…! परंतु ते त्रोटक स्वरुपात सांगितले. आता मी ते विस्तृतपणे, खुलून आणि मोकळ्या मनाने चितारले आहेत.
कदाचित जवळचे लोक असाही आरोप करतील, की यातील काही गोष्टी तुम्ही आम्हाला कधी सांगितल्या नव्हत्या. खरं आहे ! माझ्या जीवनाची दोरी पुढे ओढत नेतांना काही नाजूक, हळुवार प्रसंग रस्त्यामध्ये आलेत; काही कळत नकळत चुका घडल्यात; त्या मी मनाच्या कोपर्यायत दडवून ठेवल्या होत्या, जे आता आयुष्याच्या अखेरच्या पर्वात उघड केले आहे.
मी जे काही या कथानकात मांडले, ते जसं घडलं तसंच प्रांजळपणे मांडले ! जसं जगलो, तसंच रेखाटले ! मी त्यात अतिशयोक्ती किंवा कल्पनेची भरारी मारली नाही. फक्त साहित्यिक शब्दाचा साज चढविला. बस एवढंच !
मी आयुष्याच्या आत दडलेले आठवणीचे पानं उलगडून पाहतांना जे कडू-गोड प्रसंग घडलेले दिसले, त्या प्रसंगाला साजेसे संवाद कुठे-कुठे टाकले. तो मुळ संवाद असेल असं मात्र म्हणता येणार नाही. कारण स्मरणशक्तीला कितीही जोर दिला तरी जसेच्या तसे ते संवाद आठवणे कठीण आहे.
मी माझ्या जीवनात बांधलेल्या भाकरीच्या फडक्याची एकेक गाठ सोडून पाहील्यावर, त्यात अनेक जिवाभावातील लोकांचा संदर्भ आला. कुठे नाव प्रकट केले तर कुठे नाही ! त्यांना किंवा त्यांच्या सगे-सोयर्यां ना जर कुठे खटकलेच तर ते मला उदार अंत:करणाने क्षमा करतील, अशी आशा बाळगतो.
माझं हे स्वकथन नोकरी लागेपर्यंतच्या जीवन प्रवासा पुरतं आहे. त्यानंतरच्या वाटचालीचं चित्रण लिखाणात मुद्दाम येऊ दिलं नाही. कारण त्यानंतर मी हळूहळू काटेरी वाटेच्या आवर्तनातून बाहेर पडून माझं जीवनमान सुधारु लागलं होतं. म्हणून मी या लिखाणाला ‘अशा तुडविल्या काटॆरी वाटा’ या शिर्षका पुरतेच मर्यादीत ठेवले आहे.
असं काहिसं कष्टाचं, कधी खचलेलं, कधी उभारलेलं, कधी उत्साहाचं, कधी खुडलेलं, कधी गर्द दु:खाचं तर कधी हळूवार सुखाचं, कधी मंद तर कधी प्रखर तेजाचं, कधी अंधाराने झाकोळलेलं तर कधी प्रकाशाने न्हाऊन निघालेलं, असं गतकाळातलं जीवनचित्र मी आपल्यासमोर उभं केलं.
कधीकधी गतस्मृती आठवून आता मला हसू येतं, पण त्याच कारणासाठी मी त्यावेळी गदगदून रडलो होतो. अशी माझी ‘रडकथा’ आहे. कधी गरिबांच्या मनातील श्रीमंतीत मोहरून गेलो होतो तर कधी श्रीमंतांच्या गरिबीत कोमेजून गेलो होतो.
माझ्या स्वकथनाचा ठेवा जोपासण्यास ज्ञात-अज्ञात अशा ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, अशा सर्वांचा मी आभारी आहे.
आर.के.जुमळे,
मो.९३२६४५०५०६
पत्ता- ए२-२०५ रामी हेरिटेज, कृषिनगर मुर्तीजापूर रोड, अकोला, ४४४१०४

Advertisements

कथा पहिली –  बाटोडं, माझं गाव

 

माझं गाव चौधरा… अगदी लहानसं खेडं… शंभरक घराचं… या गावाचे नाव ‘चौधरा’ कसं पडलं हे सांगणे तसे कठीण ! कारण तसा काही इतिहास ऎकीवात नाही. ऎवढं मात्र खरं की इतर गावाच्या नावाची पुनरावृत्ती बर्‍याच ठिकाणी झालेली दिसतील, पण या गावासारखे नाव महाराष्ट्राच्या मराठी मुलुखात तरी कुठेही शोधून दिसत नाही.

आमच्या गावातील माणसांचा पांढर्‍या रंगाचं धोतर व कुडतं, आतमध्ये बंडी, डोक्याला धोतराच्या पानाचा किंवा शेलाचा पटका, खांद्यावर शेला असा पेहराव असायचा. बाया नऊवारी लुगडं, चोळी, गळ्यात काळी पोत, चांगल्या घरच्या असतील तर पायात चांदीची पायपट्टी, सोन्याची एकदाणी, हातात चांदीच्या किंवा खुराच्या पाटल्या, पायात कडे असा पेहराव घालत. अलीकडे शिकलेल्या मुली पाचवारी गोलसाडी, पोलका, ब्लॉउज घालीत. लभान बायांचा मात्र वेगळाच पेहराव होता.

आमच्या गावाशेजारी समुद्रातील बेटांसारखा डोंगर उभा होता. या डोंगराला ‘बरड’  म्हणत होतो. डावीकडे दुसरा डोंगर खरोल्याच्या जंगलापर्यंत गेला होता. म्हणजे आमचं गाव या दोन डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं. डोंगराच्या पायथ्याशी जुनाट लिंबाचं झाड फांद्या पसरवून उभं होतं. तेथेच गोठाणावर गायकी गायी जमा करून रानात घेऊन जात असे. म्हणजेच निसर्गाने आमच्या गावाच्या जनावरांना जगण्याची खास व्यवस्था केली होती, असेच म्हणावे लागेल.

एखाद्या स्त्रीने दागिनं घातल्यावर जसं तिचं देखणेपण उठून दिसतं, तसंच आमचं गाव या डोंगरामुळे उठून दिसायचं. आमच्या गावाचं सौंदर्य खुलविणारं दागिनंच होतं मुळी…! म्हणून मला फार गर्व वाटत होता. पावसाळ्यात हिरवळीमुळे त्याचं सौंदर्य आणखीनच विलोभनीय वाटत असे. हा डोंगर म्हणजे गावाची ओळख होती. कुणीही डोंगरापासचं ‘चौधरा’ म्हटलं की चटकन ओळखत. म्हणून मला त्याचं मोठं आकर्षण होतं.

लोक आमच्याकडील लोकांना ‘डोंगरातील’ म्हणायचे तर यवतमाळच्या पलीकडे जिकडे डोंगर नसायचं – सपाट जमिनी होत्या, त्यांना ‘तरानातील’ म्हणायचे. हे लोक आमच्या गावात येत; तेव्हा हा भेद कळला. ते स्वतःला उच्च समजत व आमच्याकडील लोकांना हिणवत. पण जेव्हा हे लोक सुगी करण्यासाठी आमच्याकडे येत; तेव्हा ते उच्च कसे ते मला कळत नसे.

मी यवतमाळला शिकतांना अधूनमधून घरी येत होतो. त्यावेळी पहिल्यांदा बरडावर फेरफटका मारण्याची उत्सुकता लागत होती. खूप दिवसापासून बरडावर गेलो नाही की सारखं अस्वस्थ वाटायचं.

मग मी आईला म्हणायचो, ‘आई, मी बरडावर चाललो.’

‘जा… पण जरा पाहून जा. तेथे विंचू-काटा, सरपं असतात… आणि लवकर ये.’

‘हो. लवकर येतो.’ असं म्हणून मी बरडाकडे जायला निघायचो.

लिंबाच्या झाडाजवळून चढतांना सपाट मोकळं पठार होतं. तेथून टोंगळ्याला हात टेकवत, तोल सावरत चढायला हुरुप वाटायचा. वरती माथ्यावर लहान-मोठे दगडं निसर्गाने जागोजागी मांडून ठेवलेले होते. मोठ्या दगडावर चढून बसायला मजा वाटत होती. डोंगरावर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी निरनिराळ्या जातींची उंच झाडे होती. माझ्या उंचीपेक्षाही मोठ्या दगडावर जावून बसलो. त्याला मोठं व्हायला किती वर्ष लागले असतील, कोण जाणे ?  असा विचार मनात चमकून गेला.

मनाला शांती पाहिजे असेल, आजूबाजूला घडणार्‍या क्रौर्यापासून मन थिजले असेल, तर या दगडावर येऊन बसावं ! आनंदाचा, शीतलतेचा प्रसन्न शिडकावा करणारा हा अनुभव अत्यंत विस्मयकारी वाटत होता. आपल्याच मनातले विचार मोकळे करावे, आपण आपल्याशी संवाद साधावा, भाव-भावनांचा निचरा करावा असे ते जिवाभावाचे व हक्काचे ठिकाण वाटत होते. मला या बरडावर यायला फार आवडत असे. माझ्या अबोल व लाजर्‍याबुजर्‍या स्वभावामुळेच मला कदाचित निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असावं.

वर डोंगरावर कितीतरी प्रकारचे झाडं होते. कुठे श्वास घेतांना गुदमरेल अशी दाट झाडी, तर कुठे श्वास मोकळेपणाने घेता येईल असा सपाट भाग होता. माझ्या बाजूलाच कुणीतरी कुर्‍हाडीचे घाव घालून सागाच्या झाडाच्या फांद्या, फुलं, पानं असा सारा साजश्रुंगार उतरवून त्याला बोडकं करून टाकलं होतं. त्याला पाहुन माझे मन द्रवल्याशिवाय राहिलं नाही. इतकं असूनही त्याच्या बुडाजवळ फुटलेली पालवी पाहून, मला वाटले खरेच कुणी कितीही घाव घातले; तरी परत फुलायचा वसा मात्र सोडीत नाहीत. फुलून पुन्हा दिमाखाने उभे होतात, जोमाने बहरतात. याचं मला नवल वाटलं.

मला धावड्याचा डिंक खूप आवडायचा. म्हणून त्याला शोधण्याचं वेडच लागून जायचं. तोंडात टाकल्यावर त्याची चिक्कट चव अविट वाटायची. घरी आणून विस्तवाच्या निखार्‍यावर भाजत होतो किंवा तेलात तळत होतो. मग तो फुललेला डिंक आणखीनच चवदार वाटायचा. डोंगराच्या माथ्यावरुन खाली उतरतांना दगड-गोटे, काट्या-कुट्या, पाला-पाचोळ्याला कधी तुडवत तर कधी चकमा देत, तर कधी झाडांच्या फांद्यांना लोंबकळत कसरत करत मी त्या दाट झाडीतून खाली उतरत होतो.

झाडीमध्ये मी मधमाश्याचे मोहळ शोधायचा. एखाद्या झाडाजवळ माशा घोंघावतांना दिसल्या की गर्द फांद्याच्या किंवा काटेरी झुडूपाच्या आतमध्ये डोकावून पाहिल्यावर काळेभोर मोहोळ फांदीला लटकलेलं  दिसायचं. अडचणीच्या व सहज दिसणार नाही अशा ठिकाणी ह्या माशा मुद्दाम सुरक्षेच्या दृष्टीने मोहळ बांधीत. तरीही त्याला न जुमानता आम्ही झाडून लदबदलेलं सहद व पोळी खात होतो. मध पिल्यावर त्याचा जो चोथा असायचा; त्याला मेण म्हणत. बाया कुंकू लावतांना आधी हा मेण कपाळाला लावीत. त्यामुळे कुंकू चिकटून बसत असे.

मी डोंगराच्या खाली भोवताल दूरपर्यंत नजर टाकली. बरडाच्या खाली पायथ्याला खेळण्यासाठी भरपूर जागा होती. तेथे उन्हाळा-हिवाळ्यात आम्ही मुलं गिल्ली दांडू खेळत होतो. रस्त्याच्या कडेला धुर्‍यावर कॅक्टसचे झुडपं होते. त्याच्या लाल फळाला काडीचा झोडपा मारला की दूर जावून पडायचं. मग त्याला पाला-पाचोळा व काट्या-कुट्यात शोधून चोखू-चोखू खात होतो.

पांडू लभानाच्या वावरात बिब्याचं घेरेदार झाड होतं. उन्हाळ्यात त्या झाडाजवळ गेल्याशिवाय राहत नव्हतो. त्याच्या तेलाने झाडाच्या खालची जमीन तेलकट झालेली दिसायची. कधीकधी पिकलेले फुलं तोडून खात होतो. त्याच्या फळाला टोचल्यावर तेल निघायचं. हे तेल अंगाच्या त्वचेला लागलं की उतून यायचं. त्याला जाळल्यावर टपटप तेल गळायचं. हे तेल औषधी म्हणून उपयोगात आणीत. जाळलेल्या बिब्याला फोडल्यावर बी काढली म्हणजे गोडंबी ! ते खायला चवदार लागायचं. बिब्याचं झाड, फूल, फळ, तेल सारे काही कोकणातल्या काजू सारखंच दिसत असल्याचं, मी कुठेतरी वाचलं होतं. त्यामुळे या दोघांची जातकूळी एकच आहे की काय?

जवळच लांडग्याचं वावर होतं. त्याचं मूळ नाव बन्शी. पण त्याला लांडग्या का म्हणत, ते मलाही माहीत नव्हतं. तसंच किसना, परशा, भगवान यांचे वावरं, गावातील लोकांची निरनिराळी घरे, ज्ञानेश्वरच्या घराजवळची सार्वजनिक विहीर, दुसरी चिरकुटमामाच्या आवारातील विहीर, अलग-अलग दिसणारा बौध्दवाडा व लभानतांडा, या दोन समाजाला दुभंगणारा बैलगाडीचा रस्ता, रामदासच्या घराजवळचा पंचशीलचा झेंडा, शिवाआबाजीच्या घराजवळचा खूप वयाचा, अफाट पसरलेला, ठसठशीत पिंपळवृक्ष, गुलाबदादाच्या घराजवळचं चिंचेचं मोठं झाड, सुखदेवच्या घराजवळचं बोरीचं झाड, श्रावणमामाच्या घराजवळचं चिंचेचं झाड, माझ्या देखण्या वाड्यासमोरचं मारुतीचं देऊळ व शेंड्यावर भगवा कापड बांधलेला उंच लाकडाचा झेंडा. असा तो आजूबाजूचा परिसर मी न्याहाळीत होतो.

गावाशेजारी शेताला लागून नाला होता. तो वाहत जावून वाघाडी नदीला मिळाला होता. सावरगडला जातांना हाच नाला ओलांडून जावे लागत होतं. त्यावेळी आडवीतिडवी निमुळती पायवाट लागायची. खाली पाहिल्यावर खोल खाई दिसायची. एखाद्या वेळेस पाय घसरला की खाईत पडण्याची भीती वाटायची. हा भाग पूर्ण गवताने झाकून गेलेला असायचा. एकदा मला स्वप्न पडलं की मी त्या खाईत पडलो. वर येण्यासाठी धडपड करीत होतो. मी खूप रडत होतो. नंतर जाग आली तेव्हा कळले की अरे, हे स्वप्न होतं !

त्या हिरवळीवर सुगंधीत वासाचं तिखाडी गवत पाहून मी सुखावून जात होतो. त्या सुवासिक वासाने मन कसं मोहरून जायचं. घरी चहात टाकल्यावर त्याचा सुगंध कितीतरी वेळ ओठावर दरवळत राहायचा. असं ते अनोखेपणा पाहून मला निसर्गाचं मोठं नवल वाटत होतं.

तसेच नाल्याच्या काठावर कुसळी गवत दूरवर पसरलेले होतं. ते सुईसारखे कपड्याच्या आतमध्ये शिरुन पाया-पोटर्‍याला टोचत. आम्ही या गवताचा मजेशीर प्रयोग करत होतो. वाळलेल्या कुसळ्याला पोकळ भोपळ्यात टाकून पाण्याचा शिडकावा मारला की गलंडत-गलंडत चालत असे.

अशा अनेक आठवणीने डोक्यात थैमान घातलेलं होतं. गतस्मृतीचा चित्रपट मनचक्षूसमोर सरकत जात होता.

एकदा शामरावदादा बैलं चारुन संध्याकाळी घरी येत होता. त्याला एका झाडावर पतंग लटकलेली दिसली. ती बहुदा कटलेली, यवतमाळवरुन उडत आली असावी. त्याच्या हातात पतंग पाहून मी आतूर झालो. मला देवून म्हणाला,

‘मांजा, केशवच्या धुर्‍याच्या सागावर पडला आहे. सकाळी घेऊन ये.’

मी सकाळी मांजा आणायला गेलो. तो खूप लांबच लांब या झाडावरुन त्या झाडावर तोरण बांधल्यासारखा पसरलेला होता. सर्व मांजा मी काडीला गुंडाळून घेतला. बरेच दिवस ती फाटेपर्यंत गोठाणावर जाऊन उडवत होतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडण्यापूर्वी बहुदा सर्व आंबे उतरवून घेतल्याने कोंबडीसारखे खुडूक होवून जात. पाऊस पडल्यावर आम्ही पोरं अशा झाडांजवळ फिरत होतो. एखाद्यावेळेस पानाच्या मागे आंबा लपलेला दिसायचा. तेव्हा मोठे हरखून जात होतो. मग झाडावर चढून किंवा एकामागे एक दगडं फेकून पाडत होतो. ह्याच आंब्याच्या कोयी पावसाळ्यात उगवून आल्यावर त्याची पुंगी बनवून गावभर वाजवत फिरत होतो.

बरबड्याला जातांना सागरगोट्याचा काटेरी वेल होता. त्याच्या फळाला बारीक काटे होते. त्यातून सागरगोट्या काढायचे म्हणजे दिव्यच काम. सागरगोट्याबाबत म्हणत, ‘वरचे टरफल काटेरी, आत मात्र सागरगोटा.’ मग मनात यायचं की संसार पण असंच असेल, नाही का? ‘वरून वादावादी, आतून आत्मीयता !’

लांडग्याच्या वावराच्या धुर्‍यानं मी परसाकडे जात होतो. तिकडे ज्येष्टमधाचा वेल होता. त्या वेलीला लागलेल्या लाल रंगाच्या गोलसर आकाराचे सुंदर दिसणारे गुंजा तोडत होतो. तसेच वेलाच्या काड्या व पाने खाल्ल्यावर तोंडाला सूरस चव यायची.

थोडी रात्र झाल्यावर वटवाघळं झुरर्कन इकडून तिकडे व तिकडून इकडे उडत जायचे. आम्ही पोरं तुराट्या हालवत त्यांना पाडायचा खेळ खेळत होतो.

सुखदेवच्या घराजवळ बोरीचं झाड होतं. बोरं पिकल्यावर आम्ही पोरं त्यावर चढत होतो. हातापायाला, बोटाला काटे जरी बोचत असले, अंगातला कपडा जरी फाटत असला, तरी त्याची फिकीर न करता पिकलेले व गाभूळलेले बोरं शोधून खाण्यात मोठी मजा वाटत होती. तासनतास झाडावर राहण्याचा आमचा उद्योग चालायचा. त्या झाडाच्या खाली पडकी विहीर होती. त्या विहिरीला पाणी नव्हते. ती कचरा काडीने अर्धवट बुजवलेली होती. कधीकधी त्या विहिरीत उडी घेऊन मजा-मस्ती करत होतो.

एकेवर्षी कुणीतरी खोडकर व्यक्तीने या झाडावर अधरवेल आणून टाकली होती. ती हळूहळू पसरून पूर्ण झाडाला वेढा घातला होता. ह्या वेलाची गोष्टच निराळी ! तिला पाने फुले नसत. नुसती बोडकी. पिवळ्या रंगाची, बारीक दोरीसारखी ! एखाद्या झाडावर लहानसा तुकडा जरी टाकला, तरी ती इतकी झटपट पसरते की काही दिवसातच ती झाडाला पूर्णपणे वेढून घेते. फार चिवट. लवकर मरत नाही. म्हणून कुणाला त्रास द्यायचा असला म्हणजे खेड्यात उपद्रवी लोक या वेलाचा हमखास उपयोग करीत.

गुलाबदादाची बायको म्हणजे पार्वतीवहिनी, मला दिराच्या नात्याने थट्टामस्करी करायची. त्याच्या घराजवळच्या चिंचेच्या झाडाखाली आम्ही कधीकधी पत्ते, भक्क्यात पैसे टाकण्याचा खेळ खेळायचो. कधी सागरगोट्या, चिंचोके तर कधी पळसाच्या पापड्याच्या चापट बिया – ज्याला आम्ही पैसे म्हणत होतो, ते खेळायचो.

चिंचेच्या कोवळ्या बाराची चटनी करुन खात होतो. झाडावर चढून गाभुरलेल्या चिंचा पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटायचं. त्याची बोटकं चोखून खाण्यास मोठी मजा वाटायची.

वाल्ह्याच्या आंब्याच्या खारीतल्या पाराजवळ दगडाचे देव मांडले होते. त्याच्याजवळ लाकडाचा झेंडा रोवला होता. आम्ही पारावर बसून पोळ्याच्या करीला गंजिफा खेळत होतो.

दगडाची निंबूच्या आकाराएवढी गोल गोळी ढोपरानं ढकलत भक्क्यापर्यंत नेणारा खेळ खेळत होतो. भोवरा फिरवण्याचा आणखी एक खेळ खेळत होतो. तो जमिनीवर फिरायला लागला की त्याला बोटावर उचलून हाताच्या पंज्यावर फिरवत होतो. हे कौशल्य सर्वांनाच जमत नव्हते. मी मात्र सरावामुळे या खेळात चांगलाच तरबेज झालो होतो. आम्ही मुलं आणखीन तीरकामठीचा खेळ खेळत होतो.

आणखी देवळाजवळ कबड्डीचा व खोखोचा खेळ खेळत होतो. माझ्या घरासमोरील देवळाजवळ त्यावेळचा ढब्बू व भोकाचा पैसा भक्क्यात टाकण्याचा खेळ खेळत होतो. तसेच कांचेच्या गोळ्या भक्क्यात टाकण्याचा खेळ खेळत होतो. माझा नेम बर्‍यापैकी होता. म्हणून मी दोन्ही खेळात जिंकत होतो. माझ्यापेक्षा धनपालचा नेम अचूक होता. जमीन ओली असली की आम्ही मुलं लोखंडी कांब जमिनीत खूपसण्याचा खेळ खेळत होतो.

ज्ञानेश्वरच्या घराजवळ उंचच उंच वाढलेलं जुनाट लिंबाचं झाड होतं. उन्हाळ्यात त्याचे पाने झडून जात. मग झाडावर सहज चढता येत होतं. त्या झाडावर कावळ्याच्या घरट्यातील अंडे पाहण्यासाठी मोठी उत्सुकता वाटायची. झाडावर चढतांना कावळ्यांची जोडी कावऽऽ कावऽऽ कल्ला करीत, माझ्या भोवताल घिरट्या मारत. डोक्यावर टोचणे मारण्यासाठी अगदी जवळ जवळ येत. कदाचित कावळे म्हणत असतील, ‘आम्ही काडी काडी जमा करून घरटी बांधतो, अन् तुम्ही लोक आमचे घरं उध्वस्त करता?’ काय म्हणून…?

कावळ्याच्या घरट्यात कोकीळा अंड टाकतात, असं मी पुस्तकात वाचलं होतं. म्हणून कोकीळेचं अंड आहे की काय ते पाहण्याची मोठी उत्कंठा लागायची. कावळा तसा चतुर पक्षी समजल्या जातो. पण त्यालाही ही कोकिळा फसविते, म्हणजे फारच झालं ! त्याला त्याच्या चतुरपणाचा गर्व चढू नये म्हणून निसर्गाने असा डाव रचला असेल, काय सांगता येते?

लभान तांड्याकडे जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूला विस्तीर्ण पसरलेलं पिंपळाचं झाड होतं. उन्हाळ्यात जुने पाने झडून किरमिजी रंगाचे नवीन पाने येत; तेव्हा हे झाड सुंदरतेनं नटलेलं दिसायचं.

हे झाड म्हणजे जसं जूनं-जाणतं माणूस घरात असलं म्हणजे कसं सुरक्षित वाटतं, तसेच या झाडाकडे पाहिले की आम्हाला वाटायचं. या झाडाने गावातले दोन समाज विभागून टाकले होते. झाडाच्या पलीकडे लभाणतांडा तर अलीकडे बौध्दपूरा ! या झाडाला कोणाचाही भेदभाव नव्हता. जसे त्यांना सावली द्यायचा, तसेच आम्हाला पण द्यायचा.

पाखरं झाडावर बसून गुणगुणत, लालझुरूक फळांचं आस्वाद घेत. दुपारी उन्हाच्या चटक्यापासून स्वत:चं रक्षण करीत. गुरंढोरं सावलीत दाटीवाटीने बसत. आम्ही पण मस्तपणे खेळत होतो. त्यामुळे हे झाड जणू काही मायेचं छत्र धरून उभं आहे, असंच वाटायचं. याच झाडावर संध्याकाळच्या वेळी पाखरांचे थवेच्या थवे किलकिलाट करतांना पाहून अंधार पडण्याची जाणीव अस्वस्थ करीत असे. रात्र झाल्यावर मात्र त्यांचा गोंगाट एकाएकी बंद झाला की गावात किर्र अंधार शांतता पसरायची.

अशा प्रकारच्या आठवणीच्या तंद्रीत मी धुंद झालो असतांना, अचानक कुणीतरी झोपेतल्या माणसाला खलंखलं हालवून ऊठवावं, तसं मला झालं. मी तंद्रीतुन जागा झालो. पाहतो तर भलामोठा साप सळसळ करत चालला होता. माझं सर्वांग शहारुन गेलं !

हाताच्या कवेत मावेल अशा दगडाला जोर लाऊन ढकलून पाहण्याचा मला छंद जडला होता. कारण त्याच्या खाली एखाद्यावेळेस विंचू तर कधी इंगळ्या तर कधी गोमी दिसायच्या. मला त्यांची फार भीती वाटायची. असं काही दिसलं की अंगावर सरसरून काटा यायचा. तरीही त्यांना पाहण्याची मोठी ओढ दाटून यायची. शेतात गेलो की तेथेही असेच उगीच दगडं ढकलून काय काय जीवजंतू वास्तव्य करतात, ते पाहण्याचा उद्योग करत होतो.

विंचू नांगी वर करून चालतांना, तिच्या हालचालीकडे डोळ्यात तेल घालून पाहत होतो. एखाद्या वेळी गाफील असतांना अनकुचीदार सुईसारख्या काट्याने डंख मारला तर…? बापरे… किती भयानक आग ! चोवीस तास पर्यंत विष उतरत नाही. मग बारीकशा काडीने पकडून, इकडून-तिकडे व तिकडून-इकडे उगीच करत, त्याचेशी खेळत राहण्यात मोठी मजा वाटायची. शत्रूला आपण कसं खेळवतो, असा तो अघोरी आनंद होता !

एकदा विंचू इवलासा पिल्लाला पाठीवर बसवून चालत असतांना मला मोठी गंमत वाटली. ‘विंचूच्या पाठीवर बिर्‍हाड’ अशी म्हण का पडली; याचा अर्थ कळायला मला वेळ लागला नाही. म्हण काही का असेना, आम्ही जसं खाचर, वखर नाहीतर डवर्‍यावर बसून डावडाव करीत होतो, तसंच हे पिल्लू पण मस्तपणे मजेत डावडाव करीत असल्याचं पाहून मला हेवा वाटत होता.

एखाद्यावेळी वाळलेला विंचू दिसायचा. त्याला जीवच नसायचा. अशा टोकरलेल्या विंचूबाबत मी ऐकले होते की माय जेव्हा पिल्लाला जन्म देते; तेव्हा तिचे पिल्लेच तिला खाऊन टाकतात. म्हणूनच ‘इंचू जंदला अन् टोकर झाला’ म्हणतात. मला वाटायचं, व्वा रे… विंचवाची जात, अशी कशी? जी माय जन्माला घालते, तिलाच खाते !

मी एकदा उन्हाळ्यात झाडं-झुडपं पाहत खरोल्याच्या जंगलापर्यंत गेलो. तेथे टेंभराच्या झाडावर पिकेलेले फळे तोडण्यासाठी चढलो. हाफपॅंटच्या खिशात मावेल इतके टेंभरं तोडले. मी खाली उतरतांना नजरेसमोर लाल-झुरुक इंगळी खॊडावर दिसली. त्याच क्षणी उडी मारली. बापरे…! चावली असती तर…? मी त्या कल्पनेने इतका घाबरुन गेलो की मला दरदरुन घाम फुटला ! अंगावर सरसरुन काटे उभे झाले. असं म्हणतात की इंगळीत बारा विंचवाचे विष असते. म्हणजे किती जहरी असेल, नाही !

दगडाच्या खाली गोमी दिसल्यावर घाबरून जात होतो. गोमीला अनेक पाय, इतके की एखादा पाय तुटला, तरी गोमीचं काही बिघडत नाही, अशी म्हण आहे. ही गोम चावली की खूप आग होते, म्हणतात. पण कुणाला चावल्याचे मी कधी पाहिलं नाही. एकदा मोहाच्या झाडावर समोरच साप दिसला होता. असे जीवावर बेतणारे काही प्रसंग येऊन गेले होते. त्या आठवणी उफाळून आल्या की अजूनही पोटात भीतीचा गोळा उभा राहतो.

आता मला घरी जाण्याचे वेध लागले. मी डोंगरावर आलो, तेव्हा डोक्यावर सूर्य होता. आता डोंगराच्या सभोवताली गवसणी घालत असतांना सूर्य कधी मावळतीला गेला, ते कळलेच नाही. असं वाटे की सूर्य कधी बुडूच नये. कारण सूर्य बुडायला लागला की उदास, गंभीर, काहीशी उग्र आणि भीतीदायक छाया परिसरात पसरलेली दिसायची.

पाहता पाहता सूर्य पूर्णपणे लुप्त झाला. जणू काही त्याला काळोखाने गिळून घेतले… आमचं सारं गाव अंधारात गुडूप झालं. संध्याकाळचा गार वारा वाहू लागला.

मी गावात पदार्पण केलं की माझं मन आनंदाने फुलून यायचं. या गावाबद्दल मला एक प्रकारचं अवर्णनीय असं प्रचंड आत्मीयता व प्रेम वाटायचं. हे जरी खरं असलं; तरी त्याचीही दुसरी काळी बाजू होती. त्याची आठवण झाल्यावर माझं मन उदास, कावराबावरा होत होतं.

मी डोंगरावर बसलो होतो; तेव्हा हे गाव दुरून साजरंच दिसत होतं. पण गावात आल्यावर जातिभेदाचा शाप असल्याची तीव्र जाणीव झाली. लभानजात आमच्या जातीचा बाट करीत. त्यामुळे आमची मानहानी होत होती. मन विषन्न व्हायचं. तळमळ, तडफड, मनस्ताप व्हायचा नुसता !

मी ज्या गावात जन्म घेतला, अंगाखांद्यावर खेळलो, लहानाचा मोठा झालो, माती-चिखलाने पाय रंगले, नखशिखांत चिंब भिजलो असं ते गाव जातीभेदाने दुभंगलं होतं. कुजून गेलं होतं. अमानवी जाती-भेदांच्या कचाट्यात सापडून धर्मव्यवस्थेच्या रोगट संस्कारामुळे बाटोडं झालं होतं. ही गोष्ट माझ्या संवेदनशील मनाला सतत टोचत राहत होती.

 

 

 


कथा दुसरी – जातीची गुंतावळ

 

जशी प्रत्येक गावात जातीची गुंतावळ असते, तशीच आमच्याही गावात होती. आमच्या गावाचं इतर गावापेक्षा एक ठळक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे येथे फक्त दोन जातीचे लोक राहत. अर्धे बौध्द व अर्धे बंजारी…! तिसर्‍या जातीचं एकही घर नव्हतं.

बौध्द म्हणजे पूर्वाश्रमीचे महार ! हिंदू धर्माच्या अस्पृश्य जातींपैकी एक जात ! महत्वाची कामे इतर जातीच्या वाट्याला गेल्यावर उरलेली पडेल व वेठ्बिगारीचे कामे या जातीच्या वाट्याला येत. त्यामुळे प्रत्येक गावाला महाराची गरज भासायची. म्हणूनच ‘गाव तेथे महारवाडा’ अशी म्हण पडली असावी. इतर गावांप्रमाणे आमच्याही गावाची वस्ती गावकुसाबाहेर खालच्या बाजूला होती. वरची म्हणजे सूर्य ज्या बाजूने निघते ती आणि खालची म्हणजे सूर्य ज्या बाजूला बुडते ती ! सूर्याचे पहिले किरण स्पृश्यांच्या वस्तीवर पडले पाहिजेत, म्हणजे ते शुध्द राहतील. किरणं जर अस्पृश्यांच्या वस्तीवर पडून मग त्यांच्या वस्तीवर पडले तर ते बाटून जातील. असा तो विचित्र प्रकार !

गावात दोन जाती जरी असल्या तरी त्यात पोटजाती पण होत्या. त्यामुळे जातीची ही गुंतावळ आणखीनच खोलपणे गुंतल्या गेली होती. आमच्या जातीतील कुटुंब लाडवान, बावणे आणि बारके या पोटजातीत विभागल्या गेले होते. लाडवनात प्रादेशिक स्तरावर माहुरे, झाडपे, हिंगणघाटे असे प्रकार होते. ह्या लोकांचे आपसात सारे व्यवहार होत; पण जात रिवाजाप्रमाणे सोयरिकी मात्र होत नव्हत्या. लग्न हे फक्त पोटजातीच्या अंतर्गतच करावे, असे कडक बंधन होते. नाहीतर त्याच्या घराला जातीच्या बाहेर टाकल्या जात होते. त्यामुळे हा नियम तोडायला कोणाची हिंमत होत नव्हती.

हीच प्रथा बंजारा जातीत देखील होती. गावात राठोड, चव्हाण, पवार, तुरी, आडे, जाधव व नाईक या आडनावाचे कुटुंब राहत. राठोड हे कोल्हा, भूकीया, रातळा, खाटरोत, चव्हाण हे पालत्या तर पवार हे झरपाला पोटजातीत येत. ज्यांचे लग्न इतर पोटजातीत जुळत नाहीत, त्यांना तुरी किंवा आडे ह्या आडनावाचे चालत. म्हणूनच मोठ्या आडनावाच्या समुहातून या दोन आडनावाला वेगळे काढण्यात आले होते. जाधव आडनावाचे बहुदा कारभारी राहत. नाईक आडनावाचा व्यक्ती तांड्याचा नायक राहायचा. राठोड आडनावाचे उच्च समजल्या जात.

बंजारी लोकांची संस्कृती, रितीरिवाज, पेहराव, बोलीभाषा, सणवार सगळं काही बौध्दापेक्षा वेगळंच होतं. माणसांचा पेहराव जरी आमच्या लोकांसारखा असला तरी  बायांचा मात्र ठसठशीत उठून दिसेल, असा वेगळाच होता. त्या घागरा किंवा लेहंगा घालत. हा घागरा इतका घेरदार की संकटकाळात त्यात एखाद्या व्यक्तीला लपविता येत होतं, असे म्हणत. लहान लहान आरसे असलेली चोळी किंवा कंचोळी घालून छातीचा पुढील भाग झाकलेला, तर मागील भाग पूर्णत: उघडा असलेला, डोक्यावर रोवलेले दोन शींगे, त्यावर खालपर्यंत लोंबलेली चुनरी किंवा ओढणी असा पेहराव असायचा. त्या कपाळावर, हनुवटीवर व हातावर गोंदवून घेत.

या बायांना दागिन्याची भारी हौस ! कानाच्या दोन्ही बाजूंना कानशिलावर सोडलेल्या केसाच्या बटांना चांदीसारख्या धातुचे दागिने, हातात हातभरुन पांढर्‍या बांगड्या, बोटात आंगठ्या, पायात पितळेचे किंवा तांब्याचे तोडे, नाकात मोठ्या आकाराची नथ, गळ्यात हार, डोक्याला मध्ये भांग, केसाच्या मागच्या बाजूला लोकरीचे लहान लहान गोंडे, असे त्या विविधतेने सजायच्या. म्हणूनच स्त्रियांच्या वेशभूषा व पेहरावावरून हा समाज सहजरीत्या ओळखल्या जात होता.

ही जमात गो-पूजक असल्याने माणसं आपल्या नावात शेवटी ‘सिंग’ असा सन्मानजनक शब्द लावत. त्यामुळेच आमच्या गावात हरसिंग, रामसिंग, चंदूसिंग, भदूसिंग अशा नावाचे लोक होते. बाया डोक्यावर दोन शींगे रोवून त्यावर ओढणी अडकवत, हे त्यामुळेच !

पहिल्यांदा सासरी जाणारी मुलगी तांड्यातील नातेवाईकाच्या घरोघरी जाऊन रडण्याचा कार्यक्रम करीत. त्या एकमेकींचा गळा धरुन, ’याडी… हं… हिय्या…’ असे आर्त स्वरात रडत. तेव्हा ते करुणेनं ओतप्रोत भरलेलं दृष्य पाहून माझंही मन ओघानेच हेलाऊन जात होतं.

सुनांना सासरी जाच होत होता, असे लोक सांगत. एव्हढेच नव्हे तर सासू-सासरे सुनांकडून हात-पाय चेपून घेण्याची परंपरा असल्याचे सांगत. अशा छळवणुकीच्या कथा सासरी गेलेल्या मैत्रिणीकडून ऐकल्याने पहिल्यांदा सासरी जाणार्‍या मुली फार घाबरत. म्हणूनच त्या केविलवाणी रडत.

एकदा एक मुलगी सासरी जाण्यासाठी बैलगाडीत बसतच नव्हती. मोठ्या मुश्किलीने गाडीत बसल्यावरही ती गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले होते.

त्यांच्या लग्नातल्या गमती-जमती सांगण्याजोग्या आहेत. नवरदेवाची भारी मजा करीत. त्याला कोयपरावर बसवून आंघोळ घालीत. आंघोळ झाल्यावर त्याच्या समोर एक माणूस येरणी – मातीचं पसरट भांडं, त्याच्यासमोर झुलवत. ती फोडल्यावरच त्याची त्यातून सुटका होत असे.

नवरीला कुणाच्या घरी लपवून ठेवत. नवरदेव बिचारा, तिला हुडकण्यासाठी डफडं वाजविणार्‍या ढाल्यासोबत फिरत राही. त्या डफड्याचा कडकडाट पूर्ण गावात उमटत असे.

या लोकांना लभानी, गोरमाटी किंवा गोरबंजारा असेही म्हणत. गो म्हणजे गाय, र म्हणजे रक्षण किंवा राखण करणे, बनज म्हणजे व्यापार. म्हणून बनजारा म्हणजे व्यापार करणारा. पुढे या जमातींनी बैलांच्या पाठीवर सामानाची ने-आण करण्याचा धंदा सुरु केला.

जसे रीतिरिवाज, सणवार, पेहराव आमच्यापेक्षा वेगळे, तसेच त्यांची भाषा पण वेगळीच…! गोरबोली…! आमच्या येटाळातील लोकांना त्यांची भाषा समजत होती. काहींना बोलतादेखील यायचं. मला सुध्दा समजत होती. काही वाक्य बोलतही होतो. पण तेवढं सराईतपणे बोलता येत नव्हतं.

ते आमचा बाट करीत. त्यांच्या भांड्याला किंवा खाण्याच्या वस्तूला शिवू देत नसत. घरात येऊ देत नसत. त्यांना जर नाईलाजाने चहा किंवा पाणी द्यायचे असले, तर त्यांचेकडे आमच्यासाठी वेगळी फुटकी कप-बशी व जर्मनचा गिलास ठेवलेला असायचा.

ते आमच्याकडे आले की काहीही पीत नसत, की खात नसत. त्यांना आम्हाला शिवी हासडायची असली की ‘धेड’ म्हणत. हे शब्द आमच्या कानावर तप्त गोळ्याप्रमाणे आदळायचे. पायाची आग मस्तकात जायची, इतकी चीड या शब्दाची वाटत होती !

आम्हाला होस्टेल मध्ये जेथे जेथे बंजारी मुले असायचे, त्यांचेकडून असा जातीभेद जाणवला नाही. आमच्याही गावात नंतरच्या काळात मात्र हा बाट कमी कमी होत गेला.

एकदा गावात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम होता. त्यावेळी बंजारी समाजाचे तिवसा गावाचे मनमोहन राठोड यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. एक बंजारी व्यक्ती बाबासाहेबांचे गाणे म्हणतो, यावर विश्वास बसत नव्हता. पण खरोखरच जेव्हा त्यांनी पुढार्‍यांच्या भाषणानंतर भीमगिते व बुध्दगिते गायीले; तेव्हा मला अचंबा वाटला.

त्यांनी ह्या गाण्याशिवाय ‘सेवालाल महाराज की जय’ म्हणत ‘सेवाभाय आणि मरयम्मा याडी’ यांच्या जीवनावर, नागडा, थाळी व झांज वाजवत परंपरागत पध्दतीने बंजारी गीत गायिले; तेव्हा अख्ख वातावरण उत्साहाने आणि चैतन्याने भारून गेलं होतं. हा कार्यक्रम पाहायला लभाण लोकांसहित सारा गाव उलटला होता.

त्यांच्या भजन मंडळाचे लोक, शामरावदादा – त्यावेळी गावाचा सरपंच व समाजाचा पुढारी असल्याने, आमच्या घरी चहा-पाणी घ्यायला आले होते. त्यात गावातील केशव व आणखी काही बंजारी सुध्दा आले होते. ह्या दोन जातीच्या मनोमीलनाचा माहौल पाहून जणू काही जातीभेदाच्या भिंती तटातट तूटत आहेत की काय असा भास होत होता.

बंजारा समाजात लोककथा आहे की भगवान बुध्दाच्या काळात तपसू आणि भल्लिक हे दोघे व्यापारीभाऊ बैलाच्या ताफ्यासह तांडा घेऊन जात असतांना भगवान बुध्द तपश्यर्या करीत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी भगवान बुध्दाला सुकामेव्याचा आहार दिला. भगवान बुध्दांनी त्यांना दिक्षा दिली व ’ताडो, शिळो कर’ असा आशिर्वाद दिला.’

’ताडो, शिळो कर’ याचा अर्थ, ’तुमचे दु:ख कमी होवो.’ असा आशिर्वाद देण्याची प्रथा आजही बंजारा समाजात प्रचलित आहे. म्हणून हा समाज बौध्द धर्मीय असावा, असा निष्कर्ष निघतो.

असं म्हणतात की, बंजारी लोक मुळत: निसर्गाची पूजा करीत. सूर्य आणि पृथ्वीचे पूजक होते. नंतरच्या काळात मात्र देव-देवी पूजायला लागलेत.

आमच्या घरासमोर मारुतीचे देऊळ होते. त्याची देखभाल करण्यासाठी खास व्यवस्था केलेली होती. त्याला देवस्थान म्हणत. त्याचे सभासद गावातील शेतकरी होते. माझेही बाबा सभासद होता. देवस्थानाच्या मालकीचं वावर कुणीतरी मक्त्या-बटईने वाहून देवाच्या खात्यात पैसा जमा करीत. या पैशाचा वापर शेतकर्‍यांना व्याजाने कर्ज देण्यासाठी करीत. मग पैशाचा विनियोग देवळाची देखभाल आणि धार्मिक कार्यक्रमासाठी करीत.

अशीच व्यवस्था शाळा व मुलांच्या शिक्षणासाठी केली असती तर…? त्यामुळे शिक्षणाचे लोन खेड्यापाड्यात सर्वदूर पसरले असते, नाही का…? पण नाही…! मग लोकांना अडाणी, देवभोळेपणा व अंधश्रद्धेत कसे गुंतून ठेवता आले असते?

देवळाच्या गाभार्‍यात देव म्हणून मोठा दगड ठेवला होता. त्याला मारुती म्हणत. त्याची पूजा करायला हरसिंगलभान धोतर नेसून, उघड्या अंगाने दर शनिवारी सकाळी यायचा. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळचं बोट नेहमी सरळ राहत असे. ते कधी वाकत नव्हतं. त्याच बोटाने तो खायच्या तेलात शेंदूर भिजवून दगडाच्या देवाला चोपडायचा. मग नारळ फोडायचा. खोबर्‍याचा लहानसा तुकडा तेथे ठेवायचा. बाकी ’शिरणी’ म्हणून वाटायचा. मी लहान असतांना शिरणी खाण्यासाठी घुटमळत राहत होतो.

धनपत नावाचा राजपूत जातीचा अनाथ माणूस हरसिंग लभानाच्या घरी राहून गाई-ढोरांचे शेण-मूत काढत होता. तो तोतरा बोलत होता. तो मारुतीला धुण्याचं व दिवा लावण्याचं काम नित्यनेमाने करत होता. तो भाकरी मागून आणायचा व देवळात काला करून खायचा.

आमच्या येटाळातील कोणीही देवांची पूजा करीत नसत. बाबासाहेबांनी बौध्द धम्म दिला, तेव्हापासून देव पूजणे सोडले. तसेही देव बाटते म्हणून आम्हाला देवळात येऊ देत नसत. आम्ही पोरं – कोणी नाही असं पाहून गाभार्‍यात जात होतो. देवाला हात-पाय लाऊन मुद्दाम बाटवत होतो. वर बांधलेल्या घंटीला लटकून झोके घेतांना लाथा मारत होतो. असे करतांना देवाची यत्किंचितही भीती वाटत नव्हती.

मी एखाद्यावेळी दरवाज्यावर उभा असलो की कुत्र देवळात शिरलेलं दिसायचं. मी त्याच्या हालचालीकडे पाहत राहायचो. तो इकडे-तिकडे हुंगत हळूच मागची टांग वर करून देवावर धार सोडायचा. मला मोठं विचित्र वाटायचं. तो दगड म्हणजे देव आहे; हे त्या कुत्र्याला का कळत नाही? ठीक आहे, कुत्र्याला एकवेळ कळत नसेल, पण देवाला तरी त्याचे हे प्रताप का दिसत नव्हते? म्हणूनच मला त्याच्या देवपणाबद्दल शंका येत होती.

पूर्वी याच देवळाच्या पारावर आमच्या येटाळातील लोक देवाचे भजनं करीत. कोणीतरी साधू एकतारी तंबोर्‍यावर भजनं म्हणत. त्यात लोक तल्लीन होवून जात. गोविंदामामा पोथी वाचायचा. बौध्द धम्म घेतल्यावर भजनं व पोथीवाचन सोडून दिले. त्याची जागा भीम-बाबा व बुध्दाच्या भजनांनी घेतले.

मला आठवते, एकदा मोहल्ल्यातील सारे लोक जेवणखाण करून झोपले होते. सारा गाव सामसूम झाला होता. अशा वेळी कुत्रे अचानक ओरडायला लागले. त्यावेळी निवडणुकीचा माहौल होता. बाबासाहेबांच्या हत्तीचा प्रचार करण्यासाठी बाहेरून पुढारी आले होते. तेवढ्या अर्ध्यारात्री त्यांनी दादाला आवाज दिला. दादा खडबडून जागा झाला. त्याने समाजाच्या लोकांना बोलावून याच पारावर मिटिंग घेतली होती. मी पण डोळे चोळत, कावराबावरा होत मिटिंग संपेपर्यंत बसलो होतो.

बंजाराच्या मोहल्ल्याला ‘तांडा’ आणि प्रमुखाला नायक म्हणत. रुपसिंग त्यावेळी नायक होता. त्यांचा उपप्रमुख म्हणजे ’कारभारी’. हा ’कारभारी’ पांडू होता. गावात जसा कोतवाल गावकीचे कामे करतो, तसाच तांड्याच्या कामासाठी ’ढाल्या’ असायचा. तो तांड्यातील उत्सवात डफळी वाजवायचा. तांड्याचा नायक व कारभारी यांचा तो भाटासारखा गुणगौरव करायचा. त्याला नीच कुळातला समजत.

तांड्यात जात पंचायत घोंगडीवर बसत असे. म्हणून घोंगडीला मोठा मान होता. ढाल्या सर्वांना बिड्या व आगपेटी द्यायचा. त्या ओढल्यानंतर पंचायत सुरु व्हायची. जोपर्यंत न्याय-निवाडा होत नाही, तोपर्यंत उठता येत नसे. मग रात्र झाली, तरीही तेथेच खाणे, पिणे व झोपणे अशा क्रिया पार पाडावे लागत. नायक उठला की पंचायत संपत असे.

माझे बाबा सांगत होता की, ‘हे लोक चोर्‍या-मार्‍या करीत. धनगर बकर्‍या-मेंढ्या घेऊन आलेत की त्या चोरत. कुणाच्या शेतातील कणसं, कापूस चोरत.’ मात्र इतिहासात असा उल्लेख आहे की ही जमात मुळची राजस्थानची. ब्रिटीशपूर्व काळात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा बैलाच्या पाठीवर गोणी लादून या गावचा माल त्या गावाच्या व्यापाराला पोहचविण्याचं काम करीत. बैलांना चारा मिळावा म्हणून डोंगर-जंगलात राहत. इंग्रजांनी जेव्हा चोरटी जमात म्हणून सेटलमेंटच्या तीन तारेच्या कुंपणात डांबायला लागले, तेव्हा ते जिकडे तिकडे पांगलेत. गावोगाव भटकू लागलेत. गावाच्या पाटलाकडे हजेरी देणे बंधनकारक केले. कालांतरांनी ते स्थायीक झालेत.

शहरातील सधन सावकार विशेषतः ब्राम्हण-मराठे-भाटी कर्जाची फेड थकविल्यामुळे खेड्यातील गरिबांचे वावरं गिळंकृत करीत. मग ते कुळाने, मक्त्या-बटईने त्यांनाच वाहायला देत. असेच गावातील बरेच लोक कुळाने शेती वाहत होते. बंजारी लोक सुध्दा याच प्रकारे दुसर्‍यांच्या मालकीच्या शेती कसत होते. तसे हे लोक खूप कष्टीक. नंतर कुळकायदा निघाला. ‘कसेल त्याची जमीन’ या कायद्यामुळे कुळधारक शेतमालक झाले. कित्येक वर्षापासून जमीनदारांनी कष्टकरी माणसाला सालदार, महिनदार, रोजंदार, कुळधारक म्हणून वेठबिगार बनविले. ते या प्रथेतून मुक्त झाले.

या समाजाचा समावेश भटक्या जमातीमध्ये होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या रेट्यामुळे, इंग्रजांच्या काळातील गोलमेज परिषदेच्या अथक प्रयत्‍नामुळे व त्यानंतर त्यांनी स्वतंत्र्य भारताच्या संविधानात तरतूद केल्यामुळे मागासवर्गियांना शिक्षणामध्ये सवलती व नोकरीमध्ये राखीव जागांचा फायदा मिळाला. तसाच या समाजाला सुध्दा मिळाला. परंतु प्रस्थापित समाज व्यवस्थेने बाबासाहेबांचे हे कार्यकर्तृत्व त्यांनाच काय, बौध्द समाज सोडला तर कुणालाच कळू दिले नाही.

म्हणूनच जातीची गुंतावळ तोडण्याचं महत्वाचं काम कुणी केलं असेल तर ते खर्‍या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषानेच !  ही गोष्ट  कधीतरी त्यांना कळेलच…!

 

 


कथा तिसरी –  ऒंगळवाणे रुप

 

 

एखाद्या डोंगरावर फेरफटका मारतांना हिरवळ कुठेच दिसू नये. उलट तेथील कुसळ्यांनी त्रस्त व्हावे, अशीच माझ्या खेड्याची स्थिती होती.

मी जेव्हा बरडावर जावून माझ्या गावाकडे नजर टाकत होतो, तेव्हा ‘दुरुन डोंगर साजरं दिसते.’ या म्हणीप्रमाणे माझं चिमुकलं गाव खरोखरच सुंदर दिसत होतं. पण जेव्हा गावात पाय ठेवत होतो, तेव्हा त्याचं ओंगळवाणं रुप नजरेस येत होतं. म्हणून ‘दुरुन डोंगर साजरं दिसते’ अशी म्हण पडण्यापेक्षा ‘डोंगरावरुन गाव साजरं, पण जवळ गेल्यावर कुरूप’ अशी म्हण असती, तर माझ्या गावाला तंतोतंत लागू पडली असती. गावातील अंतरंगाचं ओंगळवाणे दृष्य पाहून मला किळस येत असे.

माझंच गाव काय, कोणत्याही खेड्याची अशीच गत ! जेथे जागा मिळेल तेथे घर, खताचा उकीरडा…! घरांची, रस्त्यांची रचना मुळातच निटनेटकी नाही. गावाची ग्रामपंचायत तेवढी संवेदनशील आणि जागृत नाही. कोणी कुठेही जागा दिसेल, तेथे घर बांधावं व वाटेल तेथे खताचा खड्डा खोदावा. त्याचं सोयरसुतक कुणाला नाही.

माझ्या गावातील प्रमुख रस्ते म्हणजे एक लभान तांड्यातून पांढरीकडे जाणारा, दुसरा पांढरीकडून व तिसरा जनार्दनदाजीच्या घरापासून माझ्या घराला लागून यवतमाळकडे जाणारा. खाबडखूबड, दगड-गोट्याचे, माती-गागर्‍याचे, पावसाच्या पाण्याने चिरा पडलेले तर गाडीच्या लोखंडी येटाने घासल्याने खोलगट झालेले ते रस्ते होते. जेव्हा दगडाच्या उटा लागत; तेव्हा बैलांना गाडी ओढतांना खूप ताण पडल्याशिवाय राहत नसे.

बोळी-बोळीतून जाणारा पायरस्ता. पाणी-चिखलात दगडावर पाय ठेवून कसंतरी चाचपडत, तोल सावरत जावे लागत असे. कुठे दोन घराच्या मधात निमुळती पायवाट असायची; तर कुठे कुपाट्याच्या बाजूने रस्ता असायचा. तेव्हा लाकूड-काड्यांचा किंवा घराच्या भिंतीचा आधार घेत मोठ्या हिकमतीने रस्ता पार करावा लागत असे. नाहीतर कधी घसरुन पडेल याचा नेम राहत नसे. पावसाळ्यात अशा रस्त्याने जायचं म्हणजे छातीत धस्स व्हायचं. कारण घसरन…! मग पायाचे नखे जमिनीत रुतवल्याशिवाय जाताच येत नव्हतं.

रात्रीला जायचं काम पडलं की मनात चर्र व्हायचं. अंधारात अंदाजा अंदाजाने पाय टाकत जावे लागत असे. नाहीतर पायाला हमखास दगडाची ठेच लागायची. विंचू-सापाची भीती तर डोक्यावर सतत टांगलेली राहायची.

काळोख्या रात्रीला काय घडेल ते सांगूच नका ! एकदा जेवणखाण आटोपून गावकरी झोपण्याच्या तयारीत होते. तेव्हा किसनदादा हातात चिंपट घेऊन पांदणीच्या रस्त्याने परसाकडे जात होता. तेवढ्यात गावात वाघ येत असल्याची हूल पसरली होती. म्हणून घाबरला होता. त्यावेळी त्याला नेमके दोन चमकणारे डोळे दुरून येतांना दिसले. त्याला वाटले बहुतेक वाघच असावा. म्हणून तसाच धावत-पळत माघारी आला. येतांना ‘वाघ आला, वाघ आला’ असा ओरडत होता. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले लोक दरवाजा किलकिला करून घरातूनच पाहत होते. डोळे चमकणारा प्राणी हलत-डुलत गावात शिरला. लोकांची घाबरगुंडी उडाली. किसनदादाच्या घरासमोरूनच तो घरामागे गेला व तुळशीरामदादाच्या बैलाच्या गोठ्यात शिरला. तेव्हा कळले की तो वाघ नसून तुळशीरामदादाचा ‌गोर्‍हा होता. अशाही काही गंमती-जमती अंधार्‍या रात्री घडत होत्या.

गावाची अवस्था अत्यंत भकास, बकाल वाटत होतं. गावात विज, पाण्याचे नळ, सडक, नाल्या, शौचालय असं काही नाही. सिमेंट कॉंक्रिटचे एकही घर नाही, सारे कुडामातीचे…! शहरासारख्या कोणत्याही सुविधा नाहीत.

माझं गाव म्हणजे नुसता वणवा…! वेदनांना घेऊन जळणारं…! पोटाची आग विझवण्यासाठी वणवण पळणा़रं…! जगण्यासाठी कुतरओढ करणारं…! कष्टांच्या खाच खळग्यातून सतत झरझरणारं…! फाटक्या अन् मळलेल्या कपड्यात वावरणारं…! गरिबीने पोळलेलं…!

खेड्यातही राहणारे माणसंच असतात, ना ! त्यांनाही मन आणि भावना असतात. चारचौघांसारख्या त्यांनाही सुखाच्या कल्पना असतात. पण किमान जीवन जगण्याच्या गरजा ते पूर्ण करु शकत नाहीत. जगण्याची कसरत करतांना त्यांचा अवघा जीव अदमुसा होत असते.

सगळीकडे कचरा, गवत-काडी, चिखल, जीव-जंतूचा सुळसुळाट, धुळ, खकाना व गागरा…! घराघरातून निघणारा धुपट, डोळ्याची चुरचूर आग व शेण-खताचा कुबट वास नित्याचीच…! गावाची अशी बकाल अवस्था पाहून मन कासावीस झाल्याशिवाय राहत नसे. कधी लोक रोगराईला बळी पडतील काही सांगता येत नव्हतं.

दिवसभराच्या सूर्याचा पाश तुटायला आला की गावाचा परिसर उदासीनतेने घेरून गेल्यासारखे वाटत होते. मग चहूबाजूंनी अंधार कणाकणानी साठून सारा गाव अंधारात गुडूप होवून जायचा. किर्र अंधाराचे साम्राज्य सुरु झाल्यावर आणखीनच भयान वाटायचं.

गावातून बाहेर किंवा बाहेरुन गावात यायचं म्हणजे पांदणीशिवाय दुसरा रस्ता नव्हता. पावसाळ्यात याच पांदणीने वाहणार्‍या लेंडीच्या पाण्याला आम्ही मुले दगड-मातीचा बांध घालून अडवित होतो. मग त्यात मनसोक्त खेळत होतो.

रिमझीम पावसात कोणी परसाकडे केली की लेंडीच्या पाण्यात घाण इतस्तत: पसरुन जात असे. त्यावर पाय पडल्यावर फसकन घाण मिश्रीत पाणी अंगावर उडल्याशिवाय राहत नसे. असा तो किळसवाणा प्रकार नेहमीचाच होता.

पाऊस असो की नसो माणसं एकवेळ हातात चिंपटं, टमरेल घेऊन परसाकडे वावराच्या तासात, शेताच्या धुर्‍यावर किंवा लवणावर जातील; पण बाया-पोरींना मात्र पांदणीच्या रस्त्यावर, गोदरीत बसावे लागत होते. कोणी येतांना दिसला की लाजेने मान खाली घालून, तो दृष्टीआड होईपर्यंत उभे राहावे लागे. इतकी नामुश्की त्यांच्या वाट्याला येत होतं. असा प्रकार पाहून ओशाळल्या सारखं होत असे.

चिलटं डोळ्यापुढे गुणगुणत, कधी डोळ्यात घुसत. डासही कानाजवळ गुंगऽ गुंगऽऽ करीत आणि कडाकडा चावा घेत. ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डोबरे, सांडपाणी, शेणाचे पोवटे, खताचा उकंडा, शौचाची घाण, कचरा, गवत यामुळे चिल्ट-डासाची झपाट्याने पैदास होणार नाही तर काय होणार?

मोरीतल्या पाण्यात तुरुतूरु चालणार्‍या अळ्या पाहून कमालीची घृ्णा वाटत असे.       ग्रामपंचायतीकडे नाल्या, रस्ते बांधण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी पैसे राहत नसत. कारण घरकरापासून फारसं उत्पन्न मिळत नसे. एखाद्या योजनेचा प्रस्ताव सरकारकडे पाठवायचा तर पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त लोकवर्गणी जमा करण्याची अट सरकार घालत असे. लोकांच्या गरिबीमुळे ऎवढे पैसे उभारणं शक्य तरी होतं काय?

लहान मुलं एकाठिकाणी बसून खातील, असं कधी होत नव्हतं. आईने चुरुन दिलेला चिमण्या पिलांचा घास फिरुन खाण्यात त्यांना मोठी मजा वाटत असते. त्यामुळे अन्नाचे कण जागोजागी विखरुन पडत. चिमुकले पोरं घरात कुठेही ‘शी’ करीत. त्यावर राख टाकून खपरेलाने खरडून काढून, जागा सारवेपर्यंत माशांचा गोंगाट सुरु राहायचा.

गंभीर आजार असलेल्या किंवा बाळंत बाईला बाहेर परसाकडे जाणे अशक्यच होत असे. अशा वेळेस कुठेतरी कोपर्‍यात व्यवस्था करीत. गुरेढोरे, कुत्रे, मांजरी, कोबड्या व त्यांची पिल्ले यांची अस्वच्छता, अशा अनेक कारणामुळे रोगराई पसरण्यास वेळ लागत नव्हता.

आमच्या खेड्यातील पिण्याच्या पाण्याचं तर विचारुच नका ! आमच्या मोहल्ल्यात ज्ञानेश्वरच्या घराजवळची दगडाने बांधलेली एक व चिरकुट्याच्या घराच्या आवारात दुसरी विहीर होती. लभानपूर्‍यात पण विहीर होती. पावसाळ्यात ह्या विहिरी काठोकाठ भरुन जायच्या. हातानेही पाणी काढता येईल, असं…! हे पाणी गढूळ आणि अत्यंत दुषीत राहत असे.

माझा मोठाभाऊ गावाचा सरपंच असल्याने सरकारकडून मिळालेले जंतु मारण्याचे पोटॅशियम परमंगनेटचे पुडे माझ्याच घरी राहत. ते विहिरीच्या पाण्यात टाकल्यावर त्याचा रंग लाल व चव कडवट लागत असे. त्यामुळे काही बाया-माणसं मोठे कुरकूर करीत. कधीकधी बाया विहिरीच्या बाजूलाच कपडे धूत. पाणी भरतांना भोवताल सांडलेले पाणी पुन्हा विहिरीत झिरपत असे.

उन्हाळ्यात तर आमच्या त्रासाला पारावर राहत नसे. जवळपासच्या विहिरी कोरड्याठक पडायच्या. त्यामुळे पाण्याचं मोठं दुर्भिक्ष निर्माण व्हायचं. उन्हातान्हात पायपीट करुन दुरुन पाणी आणावे लागे. त्याच्या ओझ्याने मान मोडून गेल्यासारखी, कंबर चेचल्यासारखी व्हायची; तर पायामध्ये गोळे आल्यासारखे वाटायचे. विहिरीत उतरुन डोबर्‍यात जमलेलं घोट घोट पाणी बालटीत टाकावे लागे. रात्रीला विहिरीत झर्‍याचं पाणी जमत, तेव्हा पाणी भरण्यासाठी लोकांच्या डोळ्याला डोळा  लागत नसे.

एकदा तर पाण्यापायी माझ्या जीवावर बेतलं होतं. आताही त्या गोष्टीची आठवण झाली की माझ्या अंगावर सरसरून काटे उभे राहतात. उन्हाळ्यात मामाच्या वाडीतील विहीर आटली होती. तिला सुरुंग लावून फोडण्याचे काम सुरु होतं. अशी नवलाईची गोष्ट असली की मला पाहायला मोठी मजा वाटत होती. विहिरीतील खडकात सुरुंग करतांना व स्फोट झाल्यावर विहिरीत पडलेला दगडाचा मलमा बाहेर काढतांना, मी व अर्जुन विहिरीच्या काठावर बसून मन लावून पाहत होतो.

तेवढ्यात पाणी भरायला आई आली. डोबर्‍यात जमा झालेलं झर्‍याचं घोट घोट पाणी गीलासाने बालटीत टाकून देण्यासाठी मी विहिरीत उतरलो. त्याचवेळी सिंदीच्या टोपल्यात दगडं भरून बाहेर काढण्याचे काम चालू होते. त्यावेळी अचानक टोपलं तिरकं झाल्याने त्यातील मोठा दगड निसटून खाली माझ्या दिशेने पडत असतांना अर्जुनचे एकाएकी लक्ष गेले.

‘मामा बाजूला सरक… दगड पडत आहे.’ असा अर्जुनचा जोरात आवाज माझ्या कानावर आदळल्याने मी झटक्यात बाजूला सरकलो, म्हणून वाचलो. नाहीतर दगडाने माझ्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याशिवाय राहिला नसता.

आई पाण्यानं भरलेला गुंड डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवणार, त्याचक्षणी अर्जुनचा कल्ला ऐकून थबकली. एव्हाना झालेला प्रकार तिच्या लक्षात आल्यावर रडायला लागली. मी विहिरीतून बाहेर आल्याबरोबर तिने माझ्या दोन्ही गालाचे व कपाळाचे पटापट मुके घेतले. अर्जुनकडे कृतज्ञतेने पाहत, ‘तुयाच्यानं माहा रामराव वाचला रे…!’ असे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले.

वाल्ह्याच्या वावरात दोन विहिरी होत्या. त्यापैकी एक त्याची स्वत:ची होती. या विहिरीवर बौद्धांना पाणी भरायला मनाई होती. दुसरी विहीर खास बौद्धांसाठी ग्रामपंचायतने खोदली होती. या विहिरीजवळ पेवंडी आंब्याचं झाड होतं. आम्ही मुले लवणात उतरुन चुपचाप दगडाने आंबे पाडत होतो. हा आंबा खोबर्‍यासारखा गोड लागायचा. त्याच्या शेतात लवणाजवळ दुसर्‍या आंब्याचं घेरेदार झाड होतं. त्याला ‘कारु’ आंबा म्हणत. हा इतका गोड की तो खाल्ल्यावर त्याचा मधूर स्वाद कितीतरी वेळपर्यंत तोंडात दरवळत राहायचा ! तुपासारखा रस लागत होता. तो पिकल्यावर त्याचा रंग हिरवाच दिसायचा. अशा प्रकारचा वैशिष्टपूर्ण आंबा माझ्या पाहण्यात कुठेही आला नाही.

नाल्याच्या पलीकडे सुखदेवच्या वावरात आणखी विहीर होती. ही विहीर दगडाने बांधली होती. त्यात डोकावून पाहिलं की पिंपळाचे झाडं उगवलेले दिसत. रात्रीला याही विहिरीवर माणसं पाणी भरत.

त्यावर्षी वाल्ह्याच्या आंब्याचे झाडं दादाने विकत घेतल्याने मी राखण करत होतो. रात्रीला लोक आंबे तोडतील; म्हणून धास्ती वाटत होती. मी धनपालला सांगून शक्कल लढवली. कोणी पाणी भरायला आले की आम्ही अंधारात झाडावर चढून हुऽ हुऽऽ आवाज काढत फांद्या हालवीत होतो. त्यावेळी पाणी भरणारे लोक भुताटकीच्या भीतीने काही वेळ घाबरुन गेल्यासारखे वाटत. परंतु रात्रीला पाणी भरणे काही थांबलेलं नव्हतं. त्यांची पण मजबूरी होती. कारण शेतीवाडीचे काम करणारे दिवसा पाणी भरायला वेळ देवू शकत नव्हते. म्हणून बिच्चारे, रात्रीला मजबुरीने पाणी भरत.

बरबड्याच्या एका उघड्या विहिरीला भरपूर पाणी असायचं. ती नाल्याजवळ असल्याने त्याला  झर्‍याचा ओलावा राहत होता. पाणी भरतांना बरेच पाणी काठावर सांडत. मग तेच खराब पाणी परत विहिरीत मिसळत होते. शिवाय ही विहीर उंबराच्या झाडाजवळ असल्याने, त्याची फळे विहिरीत पडत. मग त्या विहिरीचे पाणी आणखीनच घाण होत होते. तरीही लोकांना हे पाणी नाईलाजाने प्यावे लागत होते. पोवार पाटलाच्या कोठ्याजवळ विहीरा होता. तो दूर असल्याने भरपूर पाणी असायचं. आम्ही तेथे भर उन्हात जात होतो. काही शेतकरी बैलगाडीवर टिनाचा ड्राम बांधून पाणी भरून आणीत. मी सुध्दा तुळशीरामदादाच्या किंवा दमडूमामाच्या ड्रामवर जात होतो. मग त्यातील एक-दोन गुंड पाणी घरी आणण्यास सवलत मिळत होती.

मी एकदा दादाला नहाणीतल्या उघड्या नांदीतलं थंड पाणी पितांना पाहिले; तेव्हा त्याला म्हटले,

‘दादा, नांदीतलं पाणी पीत नको जाऊ… उघडं आणि घाण असते. त्याने रोग होतात.’

‘मला काही होत नाही. काही काळजी करु नको…’ आरोग्याबाबत इतकी बेफिकीरी परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांच्यात येत असावी, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.

अशा अस्वच्छतेमुळे कॉलरा, मधूरा, मलेरीया, हगवन यासारख्या आजाराला खेड्यातील लोक बळी पडत. मग उपचारासाठी शहरात जाण्याच्या भानगडीत कोणी पडत नसत. कारण तीन कोस जाणे-येण्याचे हेलपाटे मारणे व त्यासाठी मजूरी पाडणे कोणाला परवडत नव्हतं.

सरकारी दवाखान्यात चांगली व्यवस्था होईल, असा काही भरोसा देता येत नव्हता. तेथील कर्मचार्‍यांकडून हिडीस-फिडीस करतांना आलेला पूर्वानुभव ! बिमारी कोणतीही असो, सर्वांनाच लाल पाणी व पांढर्‍या गोळ्या…! तेही तीन दिवसांसाठी…! बिमारी नाही बसली तर पुन्हा मजूरी पाडून जाणे-येणे शक्य तरी होतं का? खेडूत लोकांना झटपट इलाज पाहिजे. म्हणून डॉक्टरांना म्हणत,

‘साहेब, सूई टोचा. उद्या कामावर जाता आले पाहिजे.’ पण डॉक्टरांच्या अभ्यासात सर्वानांच सूई टोचणे बसत नसेल तर त्यांनी तरी काय करावं?

खाजगी दवाखान्यात ऎवढा पैसा खर्च करण्याची कुवत नाही. फारच पाणी गळ्यापर्यंत आले, तरच नाईलाजाने उसनेपासने करून खाजगी दवाखान्यात जात. पण डॉक्टरचं व औषधी-पाण्याचं बिल पाहून पोटात भीतीचा गोळा उभा राहिल्याशिवाय राहत नसे. हप्‍त्याभराची मजूरी त्यांना या खर्चापोटी द्यावे लागत होते. मग आता खावे काय, अशी चिंता पडून जात होती.

अशा अडचणीपासून दूर राहण्यासाठी मग लोक झाडपाला किंवा गावठी इलाजाला पसंद करीत. अंधश्रध्दाळू लोक साधुबूवा-भगताच्या फुक-फाकीला व मंत्र-तंत्रालाही बळी पडत.

मुलांच्या शिक्षणाची अशीच आबाळ होत होती. एकटाच मास्तर, पहिली पासून चौथी पर्यंत शिकवित होता. एकाच खोलीत चारही वर्ग भरत होते. तो यवतमाळवरुन जाणे-येणे करायचा. आमच्याच आवारातील कोठ्यात शाळा भरत होती. नंतर माझ्या घराच्या बाहेर रस्त्याजवळ कुडा-मातीची व वर टिना असलेली लांब खोली बांधली होती. त्यात ती शाळा भरत होती. अशा किती सांगावं नि किती नाही, इतक्या समस्यांनी ह्या गावाला घेरलं होतं.

असं या गावाचं विद्रूप रुप पाहून मन विषष्ण होत असे. तरीही हे गाव कसंही असो, त्याचेशी अतूट नातं निर्माण झालं होतं. गावातील जवळकीच्या नात्यातून मला भावनिक उब मिळत होती. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी या गावात साठवलेल्या होत्या. या गावात नात्यागोत्याचे, दाट ओळखीचे, जिवाभावाचे माणसं राहत होते. म्हणूनच या गावावर खूप प्रेम बसलं होतं.

पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की, खेड्यात झाडून सारेच लोक मागासलेल्या जातीचे ! हेच खेड्यातील लोकांचं खरं दुखणं होतं. हे लोक शहरातील लोकांना आयतं अन्न पुरवितात, पण स्वत: मात्र मुंग्या-माकोड्यासारखे मरमर काबाडकष्ट करुन जीवन जगतात, बिच्चारे…! परिस्थितीने गांजल्यामुळे या लोकांची हक्काची जाणीव बोथट झाली होती.

दुसरं असं की एकही उच्चवर्णीय व्यक्ती शेतमजूरीच्या कामावर जातांना दिसत नाही. म्हणूनच खेड्यांचा विकास व दारिद्रय निर्मुलनाला कोणतेही सरकार का प्राधान्य देत नाही, याचा उलगडा होतो. खेड्यापाड्यात जर उच्चवर्णीय समाज राहीला असता व तो जर असा दारिद्रय आणि दु:खात खितपत पडलेला दिसला असता तर खेड्यातल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने निश्चितच प्रयत्‍न केल्याचे चित्र दिसले असते. कारण ती त्यांची गरज असती. नाही का?

उलट शहरातील हे उच्चभ्रू लोक खेड्यातील गरिबांना कामचुकार, आळशी, दारूबाज असे नावे ठेवून ते गरीब का याचं उत्तरं देतात. या लोकांनी एखादं वर्ष तरी या लोकांसारखं न कंटाळता जीवन जगून पाहावं म्हणजे गरिबीच्या वेदना काय असतात ते कळेल ! ज्याचं जळतं त्यालाच कळतं ! बाळंतिनीच्या कळा या वांझोट्यांना काय माहिती?

तेच तेच काम घाणीच्या बैलाप्रमाणे करावे लागत असल्याने, त्यात काय उत्साह असणार? ना त्यात नावीन्य, ना नवनिर्मितीचा आनंद, ना कामाचा उचित मोबदला, ना त्यांच्या कामाचा उत्पादन व्यवस्थेशी जुळलेला संबंध व त्यामुळे आलेली विरक्ती हे काही कारणे आळशी असण्यामागे दडले असू शकतात. ह्या गोष्टी शहरी लोकांना नाही कळणार ! रात्रंदिवस हिवादवात, पाण्यापावसात, उन्हातान्हात मरमर काबाडकष्ट करीत असल्याने आलेला शिणभाग भागविण्यासाठी, तसेच अस्वच्छ वातावरण, अनुचित संस्कार, अशिक्षितपणामुळे दारूच्या व्यसनांना सहज बळी पडत असतील तर त्यांना कितपत दोष देता येईल? उचित संस्काराच्या अभावामुळे त्यांच्या आयुष्याच्या इमारतीला भक्कमपणा येणार तरी कसा? ‘जावे त्यांच्या वंशा’ म्हणजे कळायला वेळ लागणार नाही !

माझ्या या गावाचं असं ओंगळवाणं रुप नष्ट होऊन टूमदार शहरासारखं विलोभनीय रुप कधीतरी बहाल होईल का, कोण जाणे…?

 

 

 


कथा चौथी – झोपेचं खोबर झालं

 

उन्हाळ्यात रात्रीला कधी चंद्र-तार्‍यांचा लख्ख आणि शीतल उजेड, तर कधी दाट अंधार पडलेला. मग दिवा-कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात आम्ही सारेजण अंगणात जेवण करीत असू. असा नित्यक्रम कधीच चुकला नाही. तसंही आम्ही दिवस बुडला की अंगणात येवून बसायचो. मग गप्पा-गोष्टीचं पेव फुटायचं. अशावेळेस कुत्र घरात घुसलं तरी कुणाच्या लक्षात येत नव्हतं. खाणे-पिणे, झोपणे इत्यादी कार्यक्रम अंगणातच होत होते. कारण कमालीच्या उकाड्याने घरात क्षणभर थांबणे जड जात होते.

नेहमीप्रमाणे आमचं जेवण आटोपलं. जेवणानंतर जनाबाई ‘खाणं-घेणं रामाचं, दुखणं आलं बिनकामाचं.’ असं म्हणायची. कारण पोरी-बाळींना जेवणाचे भांडे आवरणं, घासणं, जागा झाडझूड करणं असे अनेक कामे करावे लागत. त्यांना आई सांगतील तसं मुकाट्याने कामे करावे लागत असे. नाहीतर पोरगी सासरी गेल्यावर, ‘तुह्या मायने तुले हे नाही शिकवलं, ते नाही शिकवलं अशी सासू टोमणे मारत्ते.

.     मग गप्पागोष्टी करतांना बाबा चिलीम तर दादा बिडी ओढायचा. मी, आई, बाई व वहिनी तंबाखू खात होतो. सारेजण दादा व बाबा यांच्यासमोर तंबाखू खात. मी मात्र लाजत होतो. खाण्याचा तंबाखू मिळाला नाही; तर चिलिमीचा बारीक तंबाखू खात. खेड्यामध्ये अशा सवयी लहानपणापासून लागत.

मग अंगणातच दिवसभरच्या श्रमाने शिणलेल्या शरीराला निद्रेच्या स्वाधीन करण्यासाठी सार्‍यांची लगबग सुरु व्हायची. पोतं, गोधडी, वाकळ, बाबाचं फाटलेलं धोतर किंवा आईचं लुगडं असं काहीबाही टाकून आणि अंगावर असंच पांघरुन ओढून घेत होतो. वर आकाशात चंद्र-तार्‍यांना पाहिल्याशिवाय मला झोपच लागत नसे. चंद्र-तार्‍यांच्या झगमगाटात घर उजळलेलं पाहतांना माझं मन मोहरून जात होतं. आकाशात सर्वीकडे चमकणार्‍या चांदण्या-तारे निरखून पाहत असे. काही तेजस्वी, काही लुकलुकणार्‍या तर काही अत्यंत मंद दिसणार्‍या असायच्या. मधातच एखादा तारा सर्रकन तुटून खाली पडायचा. आकाशातलं विहंगम, मनोहारी व चमत्कारीक दृश्य पाहून मनातले सारे मळभ दूर होत होते. उघड्या आकाशातील मोजता येईना, येवढ्या चांदण्या जिकडे तिकडे चमचम करीत दिसायच्या. एखाद्या वेळेस प्रकाश देण्याचं काम चांदण्यावर सोपवून चंद्र आसमंतात लुप्त होत असे.

कधीकधी चालू-बंद होणारा, लाल-पिवळा ठिपका चालतांना दिसे. तो चकचकणारा उजेड उडानखटोल्याचा दिवा असायचा. बुढीचे खाटले पाहण्यासाठी माझं मन भिरभिरत राहत असे. माझं ते रोजचं खासच आकर्षण ! चार चांदण्या म्हणजे आजीच्या खाटेचे चार ठावे व त्याला लागून लागोपाठ तीन चांदण्या म्हणजे चोरं…! तिच्या बाजीचे ठावे सोन्याचे, म्हणून ते चोरं आजीची झोपण्याची वाट पाहत. बिच्चार्‍या… आजीची चिंचेच्या झाडाचे पाने हातरता हातरता रात्र निघून जात होती. पण चोरांना चोरी करण्याची संधीच मिळत नव्हती. अशी ती गोष्ट त्या सात चांदण्याबाबत सांगत.

आकाशगंगेची रम्यता डोळे भरुन पाहतांना रात्र कणाकणाने समोर सरकत अधिकाधिक गडद होत जात असे. भुंकणारे कुत्रेही शांत होवून जात. मग सारा आसमंत गंभ्रीर आणि शांत होवून जात असे. अशा त्या निरव वातावरणात आमच्या पूर्वीच्या वैभवशाली दिवसांच्या मधूर आठवणी मनाच्या आत साठलेल्या कोपर्‍यातून उसळी मारुन एकाएकी वर येत. मग मनाला उभारी देणार्‍या आठवणींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर सरकू लागला की मी त्यात हरवून जात होतो.

घर म्हटले की प्रत्येकाचा जिव्हाळा अधिकच फुलून येतो. आमचं घर म्हणजे आपुलकीचं माहेरघर. त्यात मायेच्या माणसांचा वावर होता. मला वात्सल्याचा ओलावा, सुरक्षितता, आधार आणि विसावा मिळत होता. माझ्या आयुष्यातल्या अनेक कडूगोड आठवणी, घटना, प्रसंग या घराशी निगडीत झाल्या होत्या. या घराच्या साक्षीने मी लहानाचा मोठा झालो. अगदी कळत नव्हते; त्या वयापासून या घराशी अतूट नाते जुळले होते.

आम्ही आई-बाबा यांना इतकेच नव्हे तर मोठ्या माणसांना सुध्दा ऐकेरी भाषेत बोलत होतो. ‘तुम्ही’ म्हणण्याऐवजी ‘तू’ अशा भाषेत ! हीच भाषा आमच्या अंगवळणी पडली होती. ती प्रेमाची, मायेची व आपलेपणाची वाटत होती. म्हणून आम्हाला आवडत होती. शहरी भाषा म्हणजे ‘तू’ ऐवजी ‘तुम्ही’ म्हणनं हे जरी माणापानाचं असलं तरी आम्हा खेडूत लोकांना मात्र अवघड वाटत होतं.

असं म्हणतात की घरातले जुने जीव जातात, त्या जागी नवीन येतात. असं चक्र मानवी जीवनात अव्याहतपणे सुरु असतं. कोरून ठेवलेले प्रसंग येणारी पिढी वाचून, त्या घराचा इतिहास समजून घेतात. पण आमच्या घरात आई-बाबाच्या आधीची पिढी अस्तित्वातच नव्हती ! बाबाच्या लहानपणी त्यांचे आई-बाबा मरण पावले. आईचे बाबा, ती लहान असतांनाच वारले. तिची आई मामाकडे राहत होती. तीपण मी लहान असतांना मेली.

आमचं घर आधी कुडामाती व गवताचं होतं. असं घर गरिबीचं तर माती-दगडाच्या व टिनाचे किंवा खपरेलचं घर ऎश्‍वर्याचं प्रतीक मानलं जाई. बाबाने कुडामातीचं घर पाडून त्याठिकाणी भिंती, खपरेल आणि टीनं टाकून बांधलं. आमचं घर टुमदार झाल्याने गावात मान उंचावला होता. विशेष सांगायचं म्हणजे घरावरचे खपरेल घरीच बनविले होते. त्यासाठी बाबाने लवणाजवळ दशरथमामाच्या वावराला लागून असलेल्या वाडीच्या कोपर्‍यात कौलाचा कारखाना टाकला होता. घरातले सारेजणांनी या कामाला वाहून घेतलं होतं. घर बांधण्याचं काम स्वत:च बाबाने देवदासदादा, शामरावदादा व आई-वहिनीच्या मदतीने केलं. बाबाला व दादाला वाडकाम येत असल्याने दरवाजे, खिडक्या, छपराचा इमला व आडं त्यांनीच बांधल्या.

नव्या घराचा दरवाजा सूर्यमुखी होता. बरडाच्या झरोक्यातून नाचत नाचत येणार्‍या सूर्याचा पहिलावहिला किरण माझ्या घरावर पडायचा. मग कोवळ्या कोवळ्या सोनेरी किरणांनी माझं घर-अंगण न्हावून निघायचं. सूर्य जसा वर जायचा, तशा अंगणातल्या सावल्या बदलत जायच्या. त्यावरून आम्ही वेळेचा अंदाज बांधत होतो. या घरातल्या स्वयंपाकाच्या खोलीत मातीची चूल व उल्हा मांडला होता. फोडणी दिल्यावर गंज उल्ह्यावर ठेवून देत. त्यामुळे रिकाम्या चुलीवर भाकरी करता येत होत्या. चुलीला लागून ओटा होता. याच ओट्यावर बसून आई स्वयंपाक करायची. पावशीने कांदा चिरतांना आईच्या डोळ्यात येणारं पाणी मी कित्येकदा पाहिलं. चुलीतला जाळ तोंडाने फुका मारून पेटवताना होणारा सुऽऽ सुऽऽ आवाज मी ऐकला. नाका-डोळ्यात घुसणारा धुपट व डोळ्याच्या धारा वाहतांना पाहिलं. त्यामुळे माझेही डोळे चुरचुर होत होते. सारा धुपट घरभर पसरत होता.

आई भाकरी थापायची; तेव्हा विस्तव फुलून यायचा. तव्यावरची भाकर निव्यावर पडली की टर्र फुगायची. आई फुगलेली भाकर ताटलीत टाकून मला द्यायची. मी त्यात बोट खुपसून गुदमरलेली वाफ बाहेर काढत होतो. अशी गरम गरम भाकर खाण्यात मोठी मजा वाटत असे.

ओट्याजवळ भिंतीला लागून कोपर्‍यात धान्य, कडधान्य, आंबट-गोड वड्या, उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या भाज्यांच्या खुला, हरभर्‍याच्या भाजीचा घोळणा असे काहीबाही खाण्याच्या वस्तू मडक्याच्या उतरंडीत साठवल्या होत्या. तसेच शेवया, सरगुंडे, कुरुडे, पापड़ं असे बनविलेले पदार्थ त्या मडक्यात ठेवल्या होत्या. मग ते आंब्याच्या रसासोबत खायला मोठी मजा यायची.

मागील भिंतीला लहानशी खिडकी होती. तेथून तुकारामकाकाच्या न्हाणीतील उंबराचं झाड दिसत होतं. या खोलीत पाणी पिण्यासाठी पितळेचा गुंड व थंड पाण्याचं मडकं होतं. मांजरीच्या धाकानं भाकर-तुकडा बांधून ठेवण्यासाठी वरती शिकं बांधलं होतं. मिरची-मसाल्याचं वाटण करण्यासाठी दगडाचा पाटा व लोडा होता. भिंतीच्या डेळीच्या खुंटीला खायच्या तेलाची शिशी अडकवलेली होती. यात जवसाचं तेल असायचं. त्यावेळी हेच तेल वापरीत. सणावाराला किंवा तळणाला भुईमुंगाचं तेल वापरीत. हे तेल जवसाच्या तेलापेक्षा महाग असे. या शिशीत सारज प्राण्याचा काटा टाकलेला असायचा. हा प्राणी खरोल्याच्या जंगलात सापडायचा. त्याच्या अंगावर अणुकुचीदार टोक असलेले काटे असत. संकटाच्या काळात तो हे काटे भाल्यासारखे उभे करून शत्रूवर फेकून मारत असल्याची गंमत सांगत. त्याचे काटे विषारी, तरीही तेलात टाकून ठेवायचे. त्यामुळे तेल खराब होत नाही, असे म्हणत.

त्याला लागूनच माजघर होतं. त्याचा वापर जेवण्यासाठी व झोपण्यासाठी करीत होतो. खाली जमिनीवर सातरी टाकून तेथे झोपत होतो. कोणी सपरीत झोपत. घरात पसरलेल्या मिट्ट अंधारात झोपण्याआधी एकदातरी मिणमिणत्या दिव्याच्या ज्योतीकडे पाहिल्याशिवाय माझे डोळे पेंगाळत नसे. या खोलीच्या मधात मयालीला बंगई टांगलेली होती. ती नारळाच्या दोरीने विणलेली होती. त्यावर बसून बेसूर आवाजात गाणं गुणगुणल्याशिवाय मला राहवत नसे.

अंगणातून घरात येतांना समोर भिंतीला बाबासाहेब आंबेडकरांचा व भगवान बुध्दाचा फोटो टांगलेला एकदम नजरेस पडत होता. हे दोन्ही फोटो पाहिल्यावर मनात नकळत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची. घरात शिरता शिरताच मी पहिल्यांदा फोटोजवळ जात होतो. दादाने फोटोच्या मागे ठेवलेल्या लग्नपत्रिका, पत्र किंवा पावत्या असं काहीबाही वाचून पाहण्याचा मला पहिल्यांदा मोह होत होता. या फोटोच्या बाजूला माझ्या बाबाचा काळ्या कोटावर काढलेला लहानसा फोटो टांगलेला होता. एकदा फोटो काढणारा माणूस गावात आला. त्यावेळी बाबाने हा फोटो काढला होता. तो डब्ब्याच्या आत डोकं घालून फोटो काढतांना आम्हाला मोठं कुतूहल वाटत होतं. भिंतीला लागून पीठ दळण्याचं जातं होतं. त्यावर आई किंवा वहिनी सकाळच्या प्रहरी ज्वारीचं पीठ, कण्या भरडत असे. मग त्याचा गरगर फिरण्याचा नाद व त्यांचं हळूच गुणगुणणं झोपेतच माझ्या कानात घुमत असे.

बाबाने धान्य ठेवण्यासाठी नांदीच्या आकाराचे चार पांढर्‍या मातीच्या कोठ्या बनविल्या होत्या. त्या या खोलीत एका रांगेत एकमेकाला भिडून ठेवल्या होत्या. त्या माणसाच्या पुतळ्यासारख्या दिसत. आणखी भिंतीच्या कोपर्‍यात चार पायाची लाकडाची घोड्शी होती. त्यावर पोत्याच्या फार्‍या, झोपण्याच्या सातर्‍या-बोथर्‍या ठेवत होतो. न्हाणीघरात जाण्यासाठी लाकडी पत्र्याचं कवाड होतं. दादा उन्हाळ्यात दुपारच्या वेळी पोत्याची फारी टाकून याच दाठ्ठ्यावर अंग टाकायचा.

कुणीतरी म्हणायचं, ‘अवं, हळू बोल. बाबा उठेल.’ अंथरूणावर कुणीतरी झोपल्यासारखं दिसायचं. पण बराच वेळ झाला तरी काही हालचाल न दिसल्याने शंकेची पाल चुकचुकायची. तेव्हा हलवून पाहिलं, तर गुंडाळलेले कपडे दिसायचे. म्हणजे आपल्याला चकविलं हे लक्षात यायचं. मग सारेच हसायला लागत. अशा गमती-जमतीने आमच्या घरात हास्याचे फवारे उडत.

न्हाणीघरात आंघोळीला बसण्यासाठी व धुणं धुण्यासाठी मोठा चौकोणी दगड होता. पाणी साचविण्यासाठी मोठी नांद गाडलेली होती. आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी चूल घातली होती. चुलीवर टिनाचा पिपा ठेवला होता. बाजूला जलतणासाठी लाकडाच्या झिलप्या रचल्या होत्या.

सपरीसमोर मोठं अंगण होतं. त्याच्या दाठ्ठ्याला काकणाचा हार तोरणासारखा बांधला होता. हा हार बाईने चिमणीच्या दिव्याच्या ज्योतीवर काकनं वितळवून गुंफला होता. बाहेर अंगणात भिंतीच्या बाजूने ओटा होता. गप्पागोष्टीसाठी बसण्याची हक्काची जागा म्हणजे हा ओटाच !     अंगणासमोर गायी-बैलासाठी गोठा बांधला होता. त्याला आम्ही कोठा म्हणत होतो. तेथूनच आवाराच्या बाहेर जाण्यासाठी मोठा लाकडी दरवाजा होता. डाव्या बाजूला, न्हाणी घराला जोडून आणखी एक कोठा बांधला होता. पूर्वी या दोन्ही कोठ्यात गाई, बकर्‍या व बैलजोडी बांधत. त्यावेळी आमच्याकडे दुभदुभत्यांची रेलचेल होती. एका कोपर्‍यात टिकाशी, फावडे, सब्बल, विळे, वखरा-डवराचे फासे, गाडीचाकाचे आकं, आरे, जू, चर्‍हाटं, काडवणं, डवरा, वखर, नांगर, पुराण्या, शिवळा, विळतं, कुर्‍हाडी, वासला, किकरं, पटाशी असे नानाप्रकारचे शेतीकामाचे सामान ठेवले होते.

अंगणात एका बाजूला दगडाचं उखळ गाडलं होतं. सुगीत धान निघाला की मुसळाने कांडून तांदूळ काढीत. अशा हातसडीच्या भाताला मस्त सुगंध यायचा व खायला पण चवदार लागायचा. उन्हाळ्यात घरातला दगडी पाटा व लोडा अंगणातल्या ओसरीजवळ यायचा. घराजवळच्या बाया-पोरी या पाटावर मसाला, मिरच्या वाटायच्या, तेव्हा खमंग वास सुटायचा.

दिवाळीला दादा दिवणाल्या आणून त्यात खायच्या तेलात कापसाच्या वाती पेटवून अंगणाबरोबरच घर, न्हाणी व कोठ्याचा कोपरा न् कोपरा रोषणाईने उजळून निघायचा. फटाक्याच्या आतिशबाजीने हे अंगण आणखीच न्हावून निघत असे. बाई व वहिनी पूर्ण अंगणभर रांगोळ्या घालीत.

याच अंगणात वहिनी रोज झुंजूमुंजूला उठून गंगाळात कालवलेल्या शेणाचा सडा टाकीत होती. शिंपडण्याचा आवाज झोपेतच माझ्या कानात घुमत असे. शेणाचा कुबट वास नकोसा होत असे. कधीकधी शेणाचा गिलावा फड्याने पसरवी. पांढर्‍या मातीने घर पोतार्‍याने सारवून घ्यायची.

सडासारवण झाल्यावर हात-पाय धुवून चिलिमीतल्या जळलेल्या तंबाखाच्या गुलाने दात घासायची. आम्ही गोवरीच्या राखुंडीने किंवा लाकडाच्या कोळशाच्या भुकटीने दातं घासत होतो. तोंड धुतल्यावर चूल पेटवून चहा मांडायची. चुलितल्या काड्या-गोवर्‍याचा धूर घरभर पसरुन नाका-तोंडात घुसत असे. मग घसा खवखव करायचा व डोळ्याची आग न् आग व्हायची.

कधीकधी गुळ, चहा-पत्ती आणायला जनार्दनदाजीच्या दुकानात मलाच जावे लागे. तोपर्यंत सर्वजण तोंड धूवून चुलीजवळ येवून बसत. भगून्यातला चहा जर्मनच्या गिलासात ओतून गप्पागोष्टी करत पीत होतो. चिल्ल्या-पिल्ल्यांना आई किंवा बाबा ताटलीतल्या चहाला फूक मारुन पाजत.

अवकाळी पडणार्‍या पावसातील टपोर्‍या गारा याच अंगणात वेचून खात होतो. विजांचा कडकडात झाला की घरात पळत सुटायचो. आई त्यावेळी अंगणात विळा फेकायची. त्यामुळे घरावर विज पडत नाही, असे ती सांगायची. अंधारुन आलं की विजेच्या झोताचं अंगणात लख्ख प्रकाश पडायचं.

याच अंगणात आई धान्य वाळवीत होती. ते राखण्याचं काम मी करीत होतो. चिमण्या एक-एक करीत खाली उतरत. दुरूनच दोन्ही पायाने टुऽऽण टुऽऽण उड्या मारत कधी माझ्याकडे तर कधी इकडे-तिकडे पाहत वाळवणाकडे येत. ह्या चिमण्या चिवचिव करत अंगणातले धान्य टिपायला फार उतावीळ होत. शुऽऽक शुऽऽक करत हातवारे केले की भुर्रकन उडून जात. अशी मी त्यांची गंमत पाहत मजा घेत होतो. कधी कावळे घरावर बसून कावकाव करीत; तेव्हा बाई म्हणायची,

‘अवं माय…! आपल्याकडे पाव्हणा येणार…!  कावळ्याने निरोप आणला वाटतं…!’

आम्ही भावंडं याच अंगणात गप्पागोष्टी मारत होतो. खेळातल्या दंगामस्ती, मारामार्‍या, रुसवे-फुगवे हे सारं या अंगणाने पाहिलं होतं.

याच अंगणात आई लाकडी पाटावरच्या शेवया, सरगुंडे, कुरड्या, पापड्या खास आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी करायची. त्याचप्रमाणे गोड-वड्या, आंबट-वड्या, वांगे-वालासारख्या भाज्यांच्या खुलांचं वाळवण करीत होती.

याच अंगणात दादा व बाईच्या लग्नाचे मांडव घातले होते. जेवणाच्या पंगती उठल्या होत्या. मुलीला सासरी पाठवतांना आई-बाबाच्या डोळ्यात वाहणारे अश्रू या अंगणाने पाहिले होते.

लगोर्‍या, लंगडी, फुगडी, खडे वर फेकणे, बांगड्याचे फुटलेले काकणं वर्तुळात टाकून बाहेर काढणे, चौसर सारखा अष्टचंगाचा खेळ, ‘कोणी यावे टिचकी मारुन जावे,  अंधा अंधा पाणी दे.’ असे मजेशीर खेळ, ‘मामाचं पत्र हारवलं ते मला सापडलं’ असं म्हणत भोवताल फिरण्याचा रंजक खेळ, लपणा-छपणीचा – पहिली टीप, दुसरी टीप असा रंगतदार खेळ, ओणवा झालेल्या मुला-मुलीच्या पाठीवरून उडी मारणे असे कितीतरी विविध खेळ मुलं-मुली या अंगणात खेळत असत.

कधीकधी अंगणात बसून मुली एकमेकींच्या डोक्यातील उवा, लिक्टा किंवा लिखा काढण्यात मग्न होवून जात. संध्याकाळी दिवस बुडण्याच्या आधी पोरी दिवसभर हात-पाय, तोंडावर बसलेली मातीची धूळ धुवून आरशात चेहरा पाहत नट्टा-पट्टा, साजश्रृंगार याच अंगणात करीत.

वावरातल्या कडब्याच्या बाडातले जाड जाड धांडे आणून, त्याच्या पेरकांड्याची बैलबंडी, रेंगी. घर, सायकल, ट्रक असं काहिबाही बनविण्यासाठी याच अंगणात तासनतास गुंग होवून जात होतो.

इथेच मी उन्हाळे-पावसाळे पाहिले. इथेच उन्हाचे चटके सहन केले. इथेच पावसाने ओलाचिंब होत होतो, अन् इथेच मी हिवाने कुडकुडत होतो.

मोठादादा एकदा सपरीमध्ये अभ्यासाला घेवून बसला. तो म्हणाला,

‘माझ्यावर भिक मागायची पाळी आली, तरी तुला शिकवीन. पण रामराव, तुझे शिक्षण बुडू देणार नाही.’       खरंच आहे…! आई, बाबा, दादा यांची ममता व दूरदृष्टीमुळे, तसेच बाबासाहेब आंबेडक्ररांच्या शिकवणीमुळे पिढ्यानपिढ्या डोक्यावरच्या शेणाची पाटी उकिरड्यावर फेकल्या गेली आणि माझ्या हाती लिहिण्याची पाटी आली, असंच म्हणता येईल.

अशा कितीतरी आठवणी या अंगणाने, माझ्या घराने कोरुन ठेवल्या होत्या. त्या डोळ्यासमोर आल्या की मन हळवं होत असे. मला जेव्हा-केव्हा करमत नसे, तेव्हा घरातून अंगणात व अंगणातून घरात असं उगीचच आत-बाहेर लुडबूड करत राहत होतो. घर-अंगणातल्या सुख-दु:खाचे क्षण त्यावेळी बोलके होत होते. मग ते माझ्याशी बोलू लागत. त्यातच मी हरवून जात होतो.

‘पावसाचा अंदाज दिसते…’ असं दादा बोलला. तेव्हा कुठे मी आठवणीच्या तंद्रितून जागा झालो.       खरंच, आकाश कुंद झालं. वारा थांबला होता. झाडाचं एकही पान हलल्याचा आवाज येत नव्हता. जीवाची तगमग वाढत होती. श्वासाची उत्सुकता ताणली जात होती. वातावरणात उकाडा वाढत होता. पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. एवढ्यात ढग जमा होवू लागले. ढगांनी आभाळाला वेढून घेतलं. चांदण्या बिच्चार्‍या…! चुपचाप ढगाआड लपून बसल्या. पाण्याचे टपोरे शिंतोडे पडू लागले. घरात जावून गरमीने उकडण्यापेक्षा आणखी वाट पाहावी, म्हणून तसाच चिडीचिप होवून झोपण्याचं सोंग घेतलं. पण पाण्याचे थेंब पडणे काही केल्या थांबत नव्हते.

पावसाचा जोर वाढत होता. हवेत गारवा जाणवत होता अन् त्याच बरोबर मातीचा सुगंधही मोहून टाकत होता. तसंच आम्ही पटापट उठलो. आपापली सातरी-बोथरी घेऊन घरात पळालो. घर कुठेकुठे गळत होतं. त्यामुळे घरात आलेली ओल, चिकचिक, ओले कपडे, त्याचा कुबट वास हे दृष्य आमच्या पाचवीलाच पुजायला असायचं.

असं आमच्या झोपेचं आणि त्याच बरोबर जीवनांचही खोबरं होत होतं.

 

 


कथा पाचवी – घरात अवदसा शिरली

 

मी विचार करायचो की आमचं ‘जुमळे’ आडनाव कसं पडलं? शेवटी या आडनावाची व्युत्पत्ती ‘जमीनजुमला’ वरुन झाली असावी, या अनुमानाला मी पोहोचलो. जमीन म्हणजे स्थायी व जुमला म्हणजे अस्थायी संपत्ती. त्याचे राखण करणार्‍यास जुमलेदार म्हणत असल्याचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या काळात होत असल्याचा मी इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते. म्हणून आमचा संबंध राजेरजवाड्याशी असला पाहिजे, असं माझं मत झालं. त्यामुळे माझा उर अभिमानाने भरुन आला.

तसेच हे आडनाव इतर जातीत दिसतील; पण आमच्या जातीत मात्र नसल्यासारखेच… असं का? यावर मी विचार करायला लागलो; तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या पूर्वजापैकी एखाद्या बाईने जुमळे आडनावाच्या शिंपी-तेली अशा परजातीच्या माणसाशी घरठाव तर जोडला नसावा ना ! त्यामुळेच त्याचं आडनाव तिच्या लेकरांना मिळालं, परंतु तिची जात मात्र बदलली नसावी. होऊ शकते… आडनाव बदललं पण जात नाही बदलली !

दुसरं असं की, जुमळे आडनावाचे घरं कमी का? मी यवतमाळला कॉलेजच्या होस्टेलमध्ये असतांना खडकी (सुकळी) गावाचा कृष्णा जुमळे शिकायला होता. ही गोष्ट बाबाला सांगितली. तेव्हा तो म्हणाला की त्याच्या आजोबांना विठोबा व बळीराम नावाचे आणखी दोन भाऊ होते. बळीरामाच्या हातून पाटलाची गाय मारल्या गेल्याने, तो घाबरुन रातोरात पळून गेला. बाबाचे आजोबा घाटंजी जवळील वरुड गावाला राहत. कदाचित त्यांच्यापैकीच पळून गेलेल्या बळीरामाचं वेल असावं, असे बाबा सांगत होता.

पूर्वी निरनिराळ्या गावाला राहणारे जुमळेचे कुटुंब हिंगणघाट जवळील गिरडला भरणार्‍या बुवा फरीदच्या यात्रेला दरवर्षी जमत, असे बाबा सांगत होता. यात्रेवरून आल्यावर ‘दम दम साहेब’ म्हणत पाच घरी फिरून धान्य गोळा करीत. ते एकत्र शिजवून काला करीत. त्याला ‘मलिंदा’ म्हणत. हा देवाचा प्रसाद म्हणून खात. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर यात्रेला जाण्याची व मलिंदा खाण्याची प्रथा बंद झाली.

आमच्या कुटूंबामध्ये आई-बाबा, मोठाभाऊ शामराव, वहिनी अनुसयाबाई, बहीण जनाबाई नंतर मी व माझ्यापेक्षा लहानभाऊ अज्याप असा आमचा खटला होता. मायेच्या, प्रेमाच्या व ऋणानुबंधाच्या नाजूक आणि चिवट धाग्यांनी आमच्या संयुक्त कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते.

माझ्या आईचं नाव अलुकाबाई व बाबाचे नाव कोंडू – ज्यांनी मला पहिला घास भरविला, बोबडे बोल शिकविले, दुडूदुडू चालायला शिकवले, तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवले, डोळ्यातील आसू पुसले, आजारपणात रात्रीचा दिवस केला, माझ्यावर अपार माया केली, माझं कौतुक करतांना त्यांच्या आनंदाला पारावर ऊरत नव्हता; असे आई-बाबा साधे व खेडवळ वळणाचे होते. मी हे जग पाहू शकलो, माझ्या जीवनाला अर्थ मिळाला केवळ त्यांच्यामुळेच ! प्रेम आणि मायेचा अखंड झरा म्हणजे माझे आई-बाबा !

आई-बाबानी आम्हा लेकरांना आधार, ताकद, शक्ती, प्रेरणा आणि जगण्याचा अतुट धागा दिला. ऎवढेच नव्हे तर संस्कार, कौटुंबिक परंपरा आणि संस्कृती असं सारंसारं भरभरुन दिलं. त्यांनी आमच्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांना सीमाच नव्हती.

 

आई लुगडं व चोळी घालायची तर बाबा धोतर नेसायचा. हे धोतर नागमणीचं जाडं, भरडं असायचं. कुठं जायचं असलं की पापलीनचं पातळ व चकचकीत पांढर्‍या रंगाचं धोतर नेसायचा. तो एकटांगी नेसून हातात सोगा घेऊन मोठ्या दिमाखात फिरायचा. अंगात कुडतं घालायचा. लुगडं किंवा  धोतर जेथे फाटलं असेल तेथून चिरुन दोन भाग करीत. फाटलेला भाग काढून सुई-दोर्‍याने दांड भरत. आईसाठी नवीन लुगडं आणलं की ती पहिल्यांदा जवळच्या बाईला नेसायला देत होती. नंतरच ती नेसत होती. याला घडी मोडणे म्हणत. ही पध्दत खेड्यात प्रचलित होती.

बाबा बाहेर गावाला गेला की डोक्याला धोतराचा पटका बांधायचा. तो कधी केसं विंचरतांना भांग पाडत नव्हता; तर केसं फणीने मागे वळवायचा. त्याच्या कानावर व हाता-पायावर केसं वाढलेले होते. त्याचं कपाळ व कान सुपासारखे मोठे होते.

माझ्या आईला ‘लुली’ म्हणत. मी तिला विचारले,

‘आई, तुझं नाव अलुकाबाई असतांना लुली कां म्हणतात?’

‘लहानपणी मी लुळ्यासारखी राहत होती, म्हणून लुली म्हणतात.’ असे तिने गमतीने सांगितले.

आई काहीच शिकलेली नव्हती. पण ती शिकलेली असावी असा माझ्या बालमनाचा समज झाला होता. म्हणून मी तिला अभ्यासाबद्दल विचारत होतो.

पाटीवर गणित मांडून बरोबर आहे का म्हणून विचारल्यावर म्हणायची,

‘नाही रे बाबू… चुकलं तुझं.’ मी पुसून पुन्हा गणित मांडून दाखवायचा.

‘आई, आता बरोबर आहे का?’

‘हो… रे बाबू… आता बरोबर आहे,’ अशी ठासून माझ्याकडे कौतुकाने पाहायला लागली की तिच्या नजरेत मला सारं काही मिळायचं.

वास्तवीक शिक्षणाच्या दृष्टीने आई आंधळीच ! परंतु माझे गणित पक्कं व्हावे; म्हणून ती डोळसपणे अशी करायची. त्यामुळे खरोखरच माझा गणित विषय पक्का झाला होता. त्यात आईचा मोठा वाटा होता. मला मॅट्रीकला  शंभर पैकी त्र्याहत्तर गुण मिळाले, कदाचित त्यामुळेच !

बबन गुरुजीनी कविता पाठ करायला सांगितली होती. माझं पाठांतर फार कच्च. आई मला व बाईला सकाळीच कोंबड्याच्या पहिल्या बागेला उठवायची. मी डोळे चोळतच उठायचा. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात डोळे फाडून फाडून पुस्तकात पाहायचा व कविताची घोकंपट्टी करायचा. पण काही केल्या पाठ होत नव्हती. मग मी मुळूमुळू रडत होतो. आईला माझी मोठी कीव यायची. ती म्हणायची,

‘नाही पाठ होत तर राहू दे… मी तुह्या मास्तराला सांगते… माह्या पोराला मारु नका म्हणून…’ आईच्या समजावण्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझं एकदम हलकं हलकं होवून जायचं.

आई कपाळाला मेण लावून, त्यावर मोठं कुंकू लावत होती. ती काळ्या मण्याची, आखूड पोताची  गाठी घालायची. ती ही गाठी घोड्याच्या शेपटीच्या लांब केसात ओवत होती. त्यामुळे ती लवकर तुटत नाही व घोड्याच्या केसाचा मान असतो, अशी सांगत होती.

काही भटके लोक आमच्या गावाला राहूटीला आले की त्यांच्या घोड्यांच्या पाय झाडण्यापासून सावध राहून शेपटीचे केसं उपटून आईला नेऊन देत होतो.

गाठी तुटत नाही हे आईचे म्हणणे ठीक होते; पण त्याचा मान असतो हे कोडं मात्र उलगडत नव्हतं. नंतर आर्य आणि अनार्याच्या संघर्षाचा इतिहास माझ्या वाचण्यात आला; तेव्हा कळले की परदेशातून घोडे घेऊन आलेल्या आर्यांनी मूलनिवासी लोकांवर कहर करुन माणसांना मारले. त्यांनी येतांना बायकांना आणले नव्हते. मग येथील बायकांना ओढून नेत. त्यावेळी सहज उपलब्ध होत असलेल्या घोड्याच्या केसाची दोरी, त्या बाईच्या गळ्यात टाकत. या प्रकाराला ‘वहतू’ म्हणत. मारलेल्या माणसाचे रक्त बाईच्या कपाळावर लावत. तेव्हापासून रक्ताच्या रंगाचे लाल कुंकू लावण्याची प्रथा पडली. तसेच काळा रंग गुलामीचे प्रतीक असल्याने लग्न झालेल्या बाया काळ्या मण्याची गाठी घोड्याच्या काळ्या केसात ओवून गळ्यात घालत. हे त्यामागील खरं इंगीत होतं. म्हणूनच ब्राम्हणांच्या बाया सुध्दा शुद्रांमध्येच मोडत.

एवढंच नव्हे तर आमचे लोक कमरेला काळ्याच रंगाचा करदोडा बांधत. दुसर्‍या रंगाचा चालत नसे. मीपण असा करदोडा कमरेला बांधून मिरवीत होतो. उद्देश हाच की त्यामुळे आमचे लोक सहज ओळखू यावेत, दुसरं काय?

त्यावर्षी अकोलाबाजारला जाणार्‍या रोडवर गिट्टी टाकण्याचे काम निघाले होते. तेथे आई, बाबा, दादा, वहिनी सकाळीच भाकर व मडक्यात पाणी घेऊन जायचे. ते गिट्टी फोडण्याचे काम करीत. मी सुध्दा खांद्यावर बसून नाहीतर दुडुदुडु धावत जात होतो. तेथे दिवसभर खेळत राहायचो.

आई तिच्या जीवनातील गमती जमती सांगायची. असेच आईने शामरावदादाची मजेशीर गोष्ट सांगितली होती. दादा लहान असतांना खेळून खेळून दमून जायचा. मग त्याला झोप यायची.

‘मा… तुह्या ‘बा’ला सांग न् की, माह्यासाठी बाभी-माभीच्या झाडाला पाळणा बांधून दे, म्हणून.’ तो आईला  म्हणायचा.

खरं म्हणजे माझ्यासाठी बाभळीच्या झाडाला पाळणा बांधून दे, असं तू बाबाला सांग, असं त्याला म्हणायचं होतं. पण त्याला तसं म्हणता येत नव्हतं. म्हणून त्याच्या सांगण्यात नकळत विनोद होत असे. मग बाबा झाडाच्या फांद्याना दोरी बांधून त्याच्यासाठी झोपाळा करुन द्यायचा.

त्याची दुसरी आणखी गोष्ट आईने सांगितली होती. तो थंड्या पाण्याला गरम पाणी व गरम पाण्याला थंड पाणी म्हणायचा. त्याची आंघोळ करतांना आई त्याच्या अंगावर कोमट पाणी टाकायची; तेव्हा तो, ‘थंड आहे… थंड आहे…’ असं म्हणत तुडूंग तुडूंग नाचायचा. मग आईला वाटायचं की त्याला आणखी गरम पाणी पाहिजे असेल. म्हणून ती गंगाळात आणखी गरम पाणी ओतायची. मग तसतसा तो आणखी आणखी नाचायचा.’ अशा गंमती ऐकल्यावर आम्ही मोठे हंसत होतो.

दादा आईला ‘मा’ म्हणायचा व बाबाला ‘बा’ म्हणायचा. आम्ही लहानपणी कदाचित मा-बा म्हणत असेल; पण शाळेत गेल्यावर मात्र शहरी भाषेत आई व बाबा असेच म्हणत होतो.

आईने आणखी तिच्या आयुष्यात येऊन गेलेला खडतर प्रसंग सांगितला.

‘त्याकाळी दुष्काळी परिस्थितीने लोक कावून गेले होते. दाळ-दाण्याचा एक कणही खायला मिळत नव्हता. अशावेळी कडूलिंबाचा कडू-डक पाला खाऊन दिवसं काढण्याची पाळी आली होती. असंच जंगलात काही मिळते काय, म्हणून मी, बापुरावची माय गिरजाबाई, प्रल्हादची माय झिबलाबाई, गोविंदाची नवरी पदमाबाई अशा बाया: बोरं, चारं, आवळे, टेंभरंसारख्या रानमेव्याच्या शोधात खरोल्याच्या जंगलात गेलो होतो. जंगलात फिरता-फिरता कधी दिवस बुडाला ते कळलेच नाही. अंधार पडायला लागला, तेव्हा आमच्या पोटात भीतीचा गोळा उभा झाला. आम्हाला रस्ता पण गवसत नव्हता. एवढ्यात खरोल्याचा एक माणूस देवदुतासारखा जातांना दिसला. त्याने आम्हाला चौधर्‍याचा रस्ता दाखवीला. तवा कुठे आम्ही जेवण रातच्याला घरी आलो.’ खरंच आईने सांगितलेल्या प्रसंगाने मला पुरते हलवून सोडले होते.

माझे बाबा लहान-सहान आजारावर घरघूती व झाडपाल्याचा उपयोग करायचा. तो चिलिमीचा कीट काढून त्याच्या भोवताल गुळ लाऊन किरम झालेल्या चिमुकल्याच्या नरड्यात बोटाने ढकलून द्यायचा किंवा शापीचे पाणी पाजायचा. चीलीमीचा किट इतका तीक्ष्ण आणि कडू असायचा की क्षणभर सुध्दा तोंडात ठेवणे कठीण जायचं. त्यात तंबाखूचा अंश असल्याने अंग गरगर फिरायचं. म्हणूनच त्याला गुळाचा लेप लावून द्यायचा. तापावर महारुक किंवा लिंबाच्या सालीचा काढा द्यायचा. हळद, आले, सहद, लसून, रुई व उंबराच्या झाडाचं दूध असे आणखी बऱ्याच औषधी त्याला माहिती होत्या. डोके दुखीवर मसाल्याच्या पानाचा टोप बांधत असे. एकदा दयारामच्या नाताने पांढर-वांढर डोळे केले. त्यावेळी बाबाने शोधून आणलेल्या झाडपाल्याचा रस पाजल्यावर तो बरा झाला. म्हणून बाबाच्या जडीबुटीच्या औषधी मोठ्या गुणकारी होत्या.

बाबा एखाद्यावेळेस बाजारातून हिंगुळ व मटण विकत आणायचा. मटणात हिंगुळ टाकून तो एकटाच खायचा. त्याने अंगात स्फुर्ती व शक्ती टिकून राहते, ढोरासारखे कष्ट केले तरी अंग दु:खत नाही, असे म्हणत. मात्र इतरांना खायला मनाई होती. कारण हिंगुळ फार कडक असल्याने पचत नव्हतं.

जंतावर इंद्रायणीच्या फळाचा उपयोग करायचा. मामाच्या वावरात घोटीच्या आंब्याजवळ वेल होतं. या वेलाला इंद्रायणीचं लालजर्द रंगाचं फळ लागायचं. त्याची चव अत्यंत कडू होती. त्याला घरी आणून आड्याला बांधून ठेवत. आम्ही कंबरमोडीच्या पाल्याचा रस जखमेवर लावत होतो. खेड्यात आणखी एक समज होता की, उधईच्या वारुळात पांढरीशुभ्र आणि गुबगुबीत अशी राणी अळी असते. तिला खाल्ल्याने अंगात शक्ती येते आणि कोणत्याही बिमार्‍या होत नाहीत. खेड्यातील बाया बाळांना अफूचा घुटका देऊन पाळण्यात झोपून ठेवत. खेडूत लोकांमध्ये मुळातच अंगभूत प्रतिकारक्षमता टिकून राहत असते.

माझे बाबा फार कष्टाळू आणि हरहुन्नरी होता. तसाच दयाळू वृतीचा पण होता. तो मांस खायचा; परंतु त्याने कधीही हिंसा केली नाही, की कधीही कोंबडा कापल्याचं मी पाहिलं नाही. एकदा पारध्याकडून सात-आठ बाठरं पक्षी विकत घेतले होते. त्यावेळी आमचे जेवण उरकल्याने संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी म्हणून त्यांचे पाय एकमेकाला बांधून पिवशीत खुंटिला लटकवून ठेवले होते. ते सर्व जीवंत होते. बाबा घरात आल्यावर त्यांना दिसले. त्यांची अवस्था पाहून बाबांना करुणेचा गहिवर आला. त्यांना वाडीत नेऊन, पाय मोकळे करुन सोडून दिले. ते पक्षी भुर्रकन उडून गेले.

दुसर्‍या प्रसंगात गोधणीच्या कोलामाच्या वावरात एक घार सशाला टोचत असल्याचे बाबाने पाहिले. त्यांनी सशाला घारीच्या तावडीतून सोडवून लवणाचे पाणी पाजले. सशाला तरतरी आल्यावर बरडावर नेऊन सोडले. त्याच्या ऎवजी दुसरा कोणी असता तर घरी आणून शिजवून खाल्ले असते ! असा त्याचा कनवाळू स्वभाव होता. ‘जगा आणि जगू द्या’ अशी त्याची वृती होती.

बाबा त्यावेळी मामाची शेती वाहत होता. दोन्हीही दादा, वहिनी व आईला सोबत घेऊन एका मुठीने शेतात काम करुन भरपूर पीक काढीत. जीव ओतून, मरणाचं काम करुन सोनं पीकवीत.

तसेच बाबा इतरही धंदा-व्यवसाय करत होता. कधीकधी गावोगावचे आंबे बारावरच विकत घेऊन व्यापार करत होता. बाबा पावसाळ्यात वाडीतल्या घोटीच्या आंब्याजवळ लवणाच्या काठावरच्या मोठ्ठाल्या पानाचे मसाल्याचे पाने तोडून भर पावसात यवतमाळला विकायला घेऊन जात होता. एकदा तर त्यांनी वाडीत कौलाचा कारखाना टाकला होता.

बाबाने हिवाळ्यात शिवाआबाजीचे नाल्याजवळील शेत केले होते. त्यात वटाणा पेरला होता. हिवाळ्यातली थंडी व नाल्याच्या ओलावामुळे वटाण्याचं भरपूर पीक आलं होतं. मग पोतेच्या पोते भरुन बाजारात विकायला न्यायचा. आम्ही भावंडं राखायला आईसोबत जात होतो. सकाळी तेथे सर्वदूर धूकं पसरलेलं दिसायचं, इतकं की जवळचा माणूस दिसत नव्हता. झाडाच्या पानावर दवाचे बिंदू जमा झालेले असायचे. त्या दवबिंदूने हातपाय ओले होत होते. या दवाचा फायदा हरभरा व वाटाण्याच्या पिकाला होत होता. म्हणून निसर्गानेच त्यांच्या जगण्याची अशी व्यवस्था केली होती की काय, कोण जाणे? त्या डुंग्यात दिवसभर मस्त करमत असे. एकतर नाल्याच्या काठावरील झाडावर मस्त खेळायला मिळत होतं. तेथे आजनाचे झाडं होते. त्याच्या मोठमोठ्याल्या फांद्या नाल्याच्या पात्रात तर काही जमिनीवर टेकल्याने, या झाडावर चापडूबल्याचा खेळ खेळण्यात आम्ही मस्त रमून जात होतो. शिवाय वाटाण्याच्या कोवळ्या कोवळ्या शेंगा खायला मिळत होत्या. अशा भाजलेल्या कोवळ्यालच लुसलुशीत शेंगा तोंडाने ओरपून खायला फारच मजा यायची.

बाबा मामाची शेती वाहत असल्याने आमची आर्थिक परिस्थिती इतरांपेक्षा बर्‍यापैकी होती. गावात रुबाब होता. आमचं घर धन-धान्याने भरलेले राहायचं. खायला-प्यायला चांगलं चुंगलं मिळत होतं. चांगले कपडेलत्ते घालत होतो. झोपायला दोरीने विणलेल्या बाजा राहत होत्या. असे आमचे वैभवाचे दिवसं होते.      कुळकायदाच्या भीतीने मामाने शेती परत मागितली. आमच्या पोटापाण्याचं एकमेव साधन निघून गेलं. त्याआधी देवदासदादाही जळून मेल्याने आमच्यातून निघून गेला. बाबा हताश झाला होता. शामरावदादा निराश झाला होता. जसं मेढीचा बैल बसला की बाकीचे बैल फिरत नाहीत, तसे झाले होते. आमचं पूर्वीचं वैभव आता हळूहळू ओसरायला लागलं होतं.

घराच्या भिंतीना पोपडे धरून पडायला लागले होते. चिरलेल्या भिंतीचे ढेकळं निखळून पडत होते. भोंगराच्या घरासारखं दहा ठिकाणी भोकं पडत होते. घरावरचं खपरेल इकडे तिकडे सरकल्याने सूर्याचे किरणं थेट घरात शिरत होते. त्याचे पांढरे ठिपके जागोजागी पडत. सूर्यकिरणांच्या प्रकाशात धुळीचे सुक्ष्म कण तरंगत दिसत. ते पाहण्यात मग मी गढून जात होतो.

घर फिरले की वासेही फिरतात, त्याप्रमाणे घरातील बाजींच्या दोर्‍या तुटायला लागलेत. त्याचे गातं तुटून मोडकळीस आलेत. एकेक बाज चुलीत जाळायच्या कामात येऊ लागले. दादाने कधी नवीन बाजा बणविल्या नाहीत की तुटलेल्या नारळाच्या दोर्‍या बदलविल्या नाहीत. एक बाज राहिली होती, तिच्या दोर्‍या तुटून झोलणा झाली होती. बाबा दोर्‍या ताणून ताणून बांधायचा व त्यावरच झोपायचा. खाली जमिनीवर त्याला झोप येत नव्हती. आम्ही मात्र जमिनीवर झोपायची सवय केली होती.

कोठ्यातील गुरं-ढोरं गेल्याने आम्ही त्याचा उपयोग उठण्या-बसण्यासाठी व झोपण्यासाठी सुरु केला. ग्रामपंचायतीचं ऑफिस म्हणजे हाच कोठा ! खुर्ची, टेबल व लाकडी आलमारी एवढंच त्यांचं फर्निचर ! ग्रामसेवक याच कोठ्यात बस्तान मांडून कामकाज पाहत होता. ग्रामपंचायतीच्या किंवा राजकीय मिटींगा ह्याच ठिकाणी भरत होत्या. दादाच्या सरपंच पदासोबत मिळालेल्या रेडीओने आमचा उर भरून आला होता. तो याच कोठ्यात टेबलवर स्थिरावला होता. ह्या रेडीओमुळे ग्रामपंचायतीच्या संपत्तीत आणखी एकाची भर पडली होती. बाहेर खांबावर भोंगा लावला होता. त्यातून रेडीओचा आवाज गावभर पसरत होता. मी ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बसून अभ्यास करायचो किंवा रेडीओ ऐकत राहायचो. त्यामुळे माझी मज्जाच झाली होती. गाड्याबरोबर नळाची यात्रा म्हणतात तशी…!

सकाळी रेडीओ सुरु केला की भक्तीगीतांशिवाय दुसरे गाणे लागत नव्हते. खरं म्हणजे मला देवाचे गाणे मुळातच आवडत नव्हते. पण सार्वजनिक असल्याने इलाज नव्हता. मला जरी आवडत नसले तरी गाण्यातील लयबद्धता, सुरेलता फारच भावत होती. ‘उषकाल झाला. उठी गोपाला, उठी गोविंदा.’ असे गाणे मला मंत्रमुग्ध करीत होते. सकाळी सकाळी देवाधर्माचे गाणे ऐकून मला मोठी चीड यायची. आकाशवाणी ऐकणारे इतर धर्मातील लोक नसतात असा काही समज आकाशवाणीचा झाला होता की काय, कोण जाणे? संध्याकाळी शेतकर्‍यांसाठी कार्यक्रम लागायचा. ‘आमची माती आमची शेती.’ असे शेतीबाबत माहिती सांगणारे चांगले कार्यक्रम असायचे. माझा मामा हा कार्यक्रम सुरु झाला की आमच्या घरासमोरील देवळाच्या पारावर येवून बसायचा व कान देवून कार्यक्रम संपेपर्यंत ऎकत राहायचा. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवेदक ‘रामराम मंडळी’ म्हणायचा. मला मोठा राग यायचा. मी पत्र लिहून विचारले, ‘रामराम म्हणण्यापेक्षा नमस्कार का नाही म्हणत? कारण तुमचा कार्यक्रम ऎकणारा सर्वच रामराम म्हणणारे शेतकरी नाहीत.’ तरीही त्यांनी रामराम म्हणणे काही सोडले नव्हते. मी आकाशवाणीच्या मराठी, हिंदी बातम्या हमखास ऎकायचा. ह्या रेडिओमुळे आम्हाला फारच करमायचं व दादा सरपंच असल्याचा गर्व व्हायचा.

दुपारच्या वेळेस भावगिते ऎकण्याचा मला फार मोह व्हायचा. ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती’, ‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसांची’, ‘असा बेभान हा वारा’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतद: प्रेम करावे’, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, अशा कितीतरी भावमधूर संगीतरचना व त्या स्वरांतून पाझरणारे अप्रतीम भाव मला अतिशय मोहवून टाकत. हे गाणे सतत माझ्या ओठावर खेळत राहायचे. गाण्यासोबत मीपण गुणगुणत राहायचा. नाहीतर तोंडाचा चंबू करून शिट्टीच्या आवाजावर गाण्याची धून वाजवत होतो. हिंदी सिनेमातील गाणे पण आवडत. त्यातील संगीताची सुमधुरता, आवाजाची फेक, लयबध्दता, गोडवा, कारुण्य, माधुर्य अशा रसरसतेने भरलेले गाणे तन्मयतेने ऎकत होतो. त्यातील सुरांची मोहकता जाणवायची; पण शब्द आठवत नसायचे, असेही काहीसं होत होतं.

ग्रामपंचायतीच्या ऑफिसशिवाय या कोठ्यात शाळेची भर पडली. मास्तर बसायला ग्रामपंचायतीच्याच खुर्चीचा उपयोग करायचा. फक्त कागदपत्र ठेवण्यासाठी त्यांनी लाकडी पेटी आणली होती. सुगी करायला आलेल्या बिर्‍हाडांनी याच कोठ्यात आश्रय घेतला होता. स्वयंपाक व झोपण्या-उठण्यासाठी याच कोठ्याचा उपयोग करीत. अंगणासमोरचा दुसरा कोठा आता राहीलाच नव्हता. कारण लाकूड-फाटा, कवेलू, सपरीवरचे टिनं दादाने विकवाक करुन टाकले होते. कोठ्यातले गाई, बैलं, बकर्‍या व बैलगाडी दादाने विकून टाकले होते.

आई-बाबा गावोगावी फिरुन व्यापार-उदीम करीत असल्याने गावाला फक्त दादाचे कुटुंब तेवढे राहत. वहिनी आणि त्याच्या मोठ्या मुली लोकांच्या कामाला जात. मी व बाई सुट्ट्यात मजुरीचे कामे करुन दादाच्या फाटलेल्या संसाराला ठिगळं लावण्याचा प्रयत्न करीत होतो. आम्हाला गंमत वाटायची. खेड्यात नवरा मास्तर असला की त्याच्या बायकोला मास्तरीन म्हणत, पाटलाच्या बायकोला पाटलीन म्हणत. म्हणून आमच्या वहिनीला लोक सरपंचीनबाई म्हणत; तेव्हा आम्हाला हसू येत असे. आता वहिनीची अवस्था ‘पाटलाची बायको पायघोळ नेसे अन् फाटलं तुटलं की वरवर खोसे.’ अशी झाली होती.

आता घरामध्ये अवदसा शीरत गेली. गरिबी हात धुऊन मागे लागली. आमच्या जगण्याच्या वाटेवर अंधार दाटून आला. त्यामुळे आमच्या शिक्षणाची आबाळ होत गेली. घराला घरपण राहिले नव्हते. राहिल्या होत्या केवळ पडक्या भिंती ! त्याच्याकडे उदासपणे पाहात गतकाळाचे हरवलेले वैभव आम्ही शोधत होतो.

 


कथा सहावी – कलाकारांची खाण

 

अशी म्हण आहे की, ‘बामणाच्या घरी लेवणं, कुणब्याच्या घरी दाणं तर महार, मांगाच्या घरी गाणं !’ स्वत:च्या कलाकृतीतून जीवनातील आनंद फुलविण्याचं उपजत कौशल्य या महार-मांग समाजाजवळ होतं. मांगा-महाराच्या जातीला संगीत कलेचा मोहक सुगंध होता. या जातीत जन्माला आलेल्या माणसाच्या नसानसात संगीतकला भिणलेली होती. त्यामुळे ह्या जाती म्हणजे लोककला व कलावंताची खाण होती, असेही म्हणता येईल.

खेळ, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, नाट्य, चित्र, मूर्तीकाम, भाषण-व्याख्यान अशा कितीतरी कला आहेत. त्यापैकी एक ना एक कुणाला तरी अवगत असतेच. जगात दु:ख आहे, पण ती सुसह्य होण्यासाठी कला देखील आहे. त्याशिवाय जगणारा माणूस विरळाच असेल, नाही का?

आमच्या घरात पण कलाकार लोक होते. बाबाला तमाशाचा नाद होता. त्याने लोककलेचा वसा घेतला होता.

देवदासदादा सुमधुर बासरी वाजवून आजूबाजूचा परिसर बेधुंद करून टाकायचा. त्याला पेटी-फिड्डल वाजवण्याचा पण शौक होता. इतर गावांप्रमाणे आमच्याही गावात समता सैनिक दल स्थापन झाले होते. देवदासदादा या दलाचा कॅप्टन होता. ह्या दलाच्या आखाड्यात गावातले तरुण मुलं व्यायाम करीत, दांडपट्टा शिकत व मल्लखांबावर कसरत करीत.

शामरावदादा पेटी-फिड्डल ऐवढेच नव्हेतर कव्वाली व गाणे सुध्दा अस्खलीत म्हणायचा. दादाचा आवाज पहाडी व काळजाला पाझर फोडणारा होता.

मला व अज्यापला मात्र यापैकी कोणतीही कला अवगत नव्हती. कारण आम्ही दोघेही शिक्षणात रमलो होतो. त्यामुळे आम्ही संगीतकलेपासून कोसो दूर राहिलो. मला बासरी शिकायची फार इच्छा होती; पण साधलं नाही ! असं जरी असलं तरी आम्हाला विद्येची कला मात्र तेवढी अवगत होती.

दादा, प्रसिद्ध कव्वालीकार ‘नागोराव पाटनकर’ यांचा शिष्य व निस्सीम चाहता होता.

कव्वालीच्या बाबतीत मी वाचलं होतं की कव्वाली हा शब्द उर्दू भाषेतून आला आहे. ‘कव्वा’ म्हणजे अल्लाचं गुणगान करणं. अशा गायकाला कव्वाल म्हणत. आंबेडकरी विचारधारेत देवाचं गुणगान करणं बसत नाही. म्हणून त्याऐवजी बाबासाहेबांचे गुणगान कव्वालीत होत होतं.

आमच्या गावात भजन मंडळ होतं. दादाशिवाय, नामदेव, रामधन, किसन, उध्दव, लक्ष्मण असे बरोबरीच्या वयाचे लोक भजन मंडळात होते.

दादाला गावातील लोक ‘मास्तर’ किंवा ‘पेटकर’ म्हणत. गावात त्याची शिक्षकासारखी भूमिका असायची म्हणून मास्तर आणि पेटी वाजवायचा म्हणून पेटकर ! त्याच्याच नावाने भजन मंडळ ओळखल्या जात होतं. त्यांच्या भजनात नेहमीच नागोराव पाटनकरांची कव्वाली, शेरशायरी, तसेच कवी राजानंद गडपायले यांच्या गितांचा भरपूर समावेश असायचा. दादा कव्वाली व गिते छान गात होता.

‘थांबारे… दलितांनो,

असा निष्टूर करुनिया बेत,

नका रे… उचलू भिमाचे प्रेत !’ या कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या गाण्याने लोकांच्या डोळ्याला अक्षरश: पाणी येत असे.

नामदेव व रामधन हे दोघे आळीपाळीने तबला वाजवीत. नामदेव तबल्याशिवाय कव्वाली व गाणे म्हणत होता. कुणीतरी झांज वाजवत होते. बाकी लोक टाळ व चिपळ्या वाजवीत. मूळ गायकाने एक पद म्हटले की तेच पद एकसाथ सर्वजण म्हणत. त्यामुळे ते गाणे काळजाला जाऊन भिडत असे.

त्यांचे भजन मंडळ आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जबरदस्त गाजले होते. त्यांच्या भजनात आंबेडकर चळवळीतील जागृती गितांचा, भीम व बुध्द गितांचा भरपूर समावेश असायचा. त्यांच्या भजनाने मनाला खरोखरच चटका लागून जायचा. खेड्यातील लोकांना तेच एक मनोरंजनाचे व जागृतीचे साधन होते. बुध्द-भिमांचे विचार, त्यांचे कार्य व कर्तृत्व, त्यांचा आदर्श त्या गितांतून प्रकट होत असे. त्यांच्या खणखणीत आवाजातील सूर व संगीताचा साज सर्वत्र निनादत राहायचा.

आणखी भारी गावाचा आंधळा माणूस आमच्या गावाला कधीकधी यायचा. त्याला कुंडलिक बुवा म्हणायचे. तो उत्कृष्ट पेटी वाजवायचा व गाणे पण छान म्हणायचा. त्याच्या गुणाकडे पाहून मला मोठं कौतुक वाटायचं.

त्यावेळी लग्नकार्य रात्रीला लागत असे. लोकांच्या जेवणाच्या पंगती उठल्या की लगेच भजनाची तयारी सुरु व्हायची. भजनं ऎकण्यासाठी लोक लग्नमांडवात जमायचे. खेड्यात सोयीअभावी लग्नाला आलेल्या सर्व लोकांची झोपण्याची व्यवस्था करणे थोडेच शक्य होते? म्हणून ते भजनं ऎकण्यासाठी रात्रभर जागे राहत. मुलं-बाळं, म्हातारे-कोतारे तेथेच पाय दुमडून आडवे होत.

कोणीकोणी लग्नात लॉउडस्पिकर लावत. तेव्हा गावातले काही लोक घरुनच गाणे ऎकत. त्यांच्या वाद्याच्या व आवाजाच्या स्वरांनी सारं आसमंत पुलकित होवून जात असे. अशावेळी त्यांच्या मनात आनंदाची पहाट उगवली नसेल, तरच नवल !

मी सुध्दा त्यांच्या भजनाच्या गाण्यांनी भारावून जात होतो. त्यामुळे मला गिते रचण्याची प्रेरणा मिळायची. तसा मी एकांतात बसून प्रयत्‍न करुन पाहत होतो. परंतु नाही जमले ..!.

माझ्या मोठ्याआईचा मुलगा, तुळशीराम ह्याने त्याची लहान बहीण, जमुणाबाईचा धुमधडाक्याने लग्नाचा सोहळा केला होता. त्याने भाड्याने यवतमाळवरुन बैलबंडीवर जनरेटर व लॉउडस्पिकर आणला होता. लग्नमंडपात व बाहेर ट्युबलाईटच्या प्रकाशाचा झगमगाट पसरला होता. त्यावेळी आम्ही पोरं अशी सुंदर रोषणाई पहिल्यांदाच पाहत असल्याने आनंदाने उड्या मारत होतो.

लॉउडस्पिकरच्या भोंग्याचा मोठा आवाज आणि भीम-बुध्दांच्या गाण्यांचा सुमधूर साजाने संपूर्ण गाव खडबडून जागे झाल्यासारखे वाटत होतं.

त्यावेळी काळ्या रंगाचे तावे होते. त्यावर सुई ठेवून तवा फिरला की भोंग्यातून गाणी उमटत. ते पाहून आम्हाला नवल वाटत होते.

‘तब मानव तू मुखसे बोल… बुध्दम शरणम गच्छामी’ हे अंगुलीमान सिनेमाचे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. हा सिनेमा यवतमाळला लागला होता, तेव्हा शामरावदादा गावातील लोकांना पाहण्यासाठी घेऊन गेला होता. आम्ही पण घरातले सर्वजण गेलो होतो.

लॉउडस्पिकरवर त्याकाळी आणखी लागणारे गाणे म्हणजे –

‘भीमरायाने सोडीयले गाव. पहा मरणाने साधीयला डाव रे…!’

‘होता तो भिम माझा, कोहिनूर भारताचा, बुध्दाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा…!’

‘क्रांतीविर महापुरुष जन्मा आले धरतीवर, भीमराव आंबेडकर, धन्य ते भीमराव आंबेडकर.’

‘हे खरंच आहे खरं, भीमराव आंबेडकर… बाबासाहेब आंबेडकर… नाव हे गाजतय हो जगभर.’

‘जरी संकटाची काळरात्र होती, तरी भिमराया तुझी साथ होती…’

असे कितीतरी सदाबहर बुद्ध-भीम गितं माझ्या मनात रुंजी घालत असत.

आणखी सांगायचं म्हणजे या लग्नात मोठी गंमतच झाली होती. जमुणाबाईला हिवरा-दरणे या गावाला दिलं होतं. तिच्या लग्नाची कलती वरात रात्रीला बैलगाड्या, दमण्या, रेंग्या घेऊन निघाली. मी पण एका गाडीत बसलो. किर्र काळोखाच्या जंगलातून, झाडाझुडपातून, नदीनाल्याने आमच्या बैलगाड्या चाकांचा खडखडात करीत, अंधार चिरत जात होत्या. अशावेळी धुरकर्‍याने सांगितले की नाल्याच्या काठावर वाघ बसून आहे. त्याचे डोळे टॉर्चचा लाईट लागल्यासारखे चमकत होते. मी तर भीतीने अर्धामेला झालो होतो. तेथून काही दूर आमची गाडी निघून गेल्यावर जीवात जीव आल्यासारखे वाटले. अशा भीतीदायक वातावरणात आमचा प्रवास सुरु होता.

त्यावेळी तहानेने तोंड सुकून आले होते. उन्हाळ्याचे दिवसं असल्याने खेड्यात पाण्याचे फार दुर्भिक्ष राहत होते. पाणी कुठे प्यायला मिळेल काय, याची चिंता लागली होती. रस्त्यात असंच एक खेडं लागलं. गावाच्या कोपर्‍यातील एका झोपडीच्या बाहेर अंगणात पाण्याने भरलेला माठ ठेवला होता. आम्ही गाडीतून खाली उतरून त्या झोपडीजवळ गेलो.

‘कोण आहेरे… माह्या नातरांनो…’ असा त्या झोपडीतून आजीबाईचा आवाज आला.

आमच्या सोबत तुळशीरामदादाचा चुलत भाऊ, हरीभाऊ होता. तो मोठा गमत्या होता.

‘थांबा रे… आजी लय चांगली आहे. ती सगळ्यांना पाणी पाजते. गडबड करु नका. धीर धरा.’ असं म्हणून तो तिला हरभर्‍याच्या झाडावर चढवीत होता. खरंच, त्याच्या गोड-गोड बोलण्याने तिच्यावर काय जादू झाली, माहित नाही ! पण मडक्यातलं पाणी संपेपर्यंत तिने सर्वांची तहान भागवली.

सकाळी सूर्य उगवल्यावर आम्ही हिवर्‍याला पोहोचलो. हे गाव वर्धा नदीच्या काठावर असल्याने मी मुलांसोबत मस्त नदीच्या पाण्यात सचैल पोहत होतो. या गावाला बाभळीचे झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याचे, मी पहिल्यांदाच पाहत होतो.

नदीच्या काठावर सिंदीचे झाडं होते. त्याचे दोन पाने तोडून एकावर एक ठेऊन पिपाणी बनवत होतो. ती वाजवत वाजवत लगीनघरी जात होतो. माझ्यासारखे आणखी काही पोरं तसेच करायचे. जिकडून तिकडून येणारा तोच-तोच आवाज ऐकून लोक कंटाळून जात. मग ते आमच्यावर खेकसत.

उंच झाडाला लागलेल्या सिंदोडेचे पिवळे-पिवळे घोस पाहून आमचं मन तिकडे खेचल्या जात होतं. पण झाडाजवळ जाणे म्हणजे मारक्या बैलाजवळ जाण्यासारखंच कठीण काम होतं. कारण सिंदीचे अणकु्चीदार टोकं असलेले पाने व बाभळीचे मोठ्ठाले काटे – गुरांच्या कोठ्यातील गव्हाणात ठाण मांडून बसलेला कुत्रा जसा ढोरांना गवत खाऊ देत नाही व स्वत:ही खात नाही – तसेच हे पाने व काटे आमची वाट अडवून बसले होते. तरीही हिंमतीने तिथपर्यंत जाऊन दगडाने पिकलेले फळं पाडून आम्ही खात होतो.

म्हणूनच संत कबीराने या झाडाची उपमा देऊन समाजातील उंच पदावर पोहचलेल्या माणसांबद्दल चपखलपणे लिहिलं असावं.

‘बडा हुवा तो क्या हुवा, जैसे पेड खजूर !

पंछिको तो छाया नही, फल लागे अतीदूर  !!

बाबा तमाशात उत्कृष्ट ढोलक वाजवायचा. गळ्यामध्ये ढोलक अडकवून दोन्ही हाताच्या बोटाने वाजवत होता. हाताच्या करंगळीला व अंगठ्याच्या जवळच्या तर्जनीला बारीक काडी बांधून एखाद्या सिनेमाच्या तमाशात जशी ढोलकी टन्… टन्… आवाज करत असते, तसाच आवाज बाबाच्या ढोलकीतून येत होता. मग त्याच्या ढोलकीचा सुरेल व मोहक आवाज माझ्या कानात बर्‍याच वेळपर्यंत घुमत राहायचा. घरातला बाबा आणि तमाशात गळ्यात ढोलकं अडकवलेला बाबा, असे दोन वेगवेगळे रूपं पाहून मी अचंबित होत होतो.

खरं म्हणजे बाबाने तमाशात काम करु नये, ढोलक वाजवू नये, असेच  माझ्या आईला व घरच्यांना वाटत असे. मामा व मोठीआई त्यामुळेच बाबाचा तिरस्कार करीत होते. माझ्या मनात मात्र तमाशातील ती रंजक कला ठसून गेली होती.

ढोलक वाजविणे ही सुध्दा कलाच आहे. मग तो तमाशातला असो की सिनेमातला ! कलेच्या दृष्टीकोनातून त्याकडे समाजाने पाहायला पाहिजे होतं. पण बदललेल्या वैचारिक वातावरणात समाजाचा दृष्टीकोन पण बदलला होता.

असे म्हणतात की, सुख-दु:खाचे प्रतिबिंब सहजपणे कलेत उमटत असतात. कला ही मानवी जीवनाचा अविष्कारच नाही तर ती आपल्या सांस्कृतीक जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. ही गोष्ट त्यावेळी कुणाच्या लक्षात येत नव्हती.

तमाशाच्या फडात आमच्या गावाचा अभिमन, हा नाच्याचं काम करायचा. त्याला ‘अभ्या’ म्हणत. तो मेकअप करून लुगडं नेसायचा, तेव्हा एखाद्या बाईसारखा हुबेहूब दिसायचा. स्त्रियांमधील नाजूकता व सुकूमारता त्याच्यामध्ये उठून दिसत असे. पायाला घुंगरू बांधून नाचायचा, तेव्हा त्याच्या घुंगराच्या स्वरांनी सारा परिसर उन्मादक झाल्यासारखे वाटायचे, तर प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर उत्साहाचे भाव  तरळू लागल्याचे चित्र उमटत असे.

माझा मोठेबाबा चोणकं वाजवायचा. तोच गवळण मधील मावशी बनून सोंग काढायचा.

हा तमाशा सुगीच्या काळात गावोगावी किंवा यात्रा-जत्रेला जात असत. त्यावेळी कास्तकार व मजुरांच्या हातात पैसा खुळखूळत असल्याने तमाशात चांगली कमाई होत होती.

बाहेर गावी जाण्यापूर्वी गावातच तमाशाचा रंगीत तालीम म्हणून एक प्रयोग करीत. हा प्रयोग सहसा महादेवच्या अंगणात रात्रभर चालायचा. कारण तेथे लोकांना बसायला भरपूर जागा होती. गावातले तमाशाची रुची असणारे लोक पाहायला येत. आम्ही मुलं पण हौसेने पाहायला जात होतो.

त्यातील नाच्याचा वेधक नृत्याचा अविष्कार, त्यांची प्रसन्न भावमुद्रा, पेहरावातील आकर्षक रंगसंगती, शृंगार व ढोलकी, चोणकं, टाळ यांचा मनोवेधक आवाज मनाला भुरळ पाडीत असे.

इतीहासात डोकाऊन पाहिलं असता अशी माहिती मिळाली की मुस्लिम सैनिकांच्या मनोरंजनासाठी गावकुसाबाहेरच्या लोककलावंताचे फड निर्माण केले गेले. म्हणूनच तमाशात गावकुसाबाहेर राहणारे महार, मांग या हिंदू धर्मातील जातीतील कलावंत मोठ्याप्रमाणात काम करीत. तमाशात बाईला नाचवित नसत, तर एखादा देखणा, मिसरुड न फुटलेल्या तरुणाला नाचवित असत.

तसा तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा हीन दृष्टीकोन होता. कारण सगळे तमासगीर हे अस्पृ्श्य जातीतून जन्माला आले होते. म्हणून ज्यांचे जगणे अस्पृ्श्य, त्यांची कला पण अस्पृ्श्य ! ऐवढेच नव्हेतर या समाजातील बाईच्या वेषात नाचणार्‍याला तुच्छ भाषेत ‘नाच्या’ म्हणत. परंतु उच्चवर्णीय नाचणार्‍या माणसाला सभ्य भाषेत ‘गंधर्व’ म्हणत, असे मी ऐकले होते.

मी पाहिलं की तमाशातलं गाणं, वादन, नृत्य, विनोद, कथासार खेड्यातील लोकांचं रंजन करणारं होतं. त्याकाळी खेड्यात करमणुकीचे साधनं नव्हते. हे लोक ती पोकळी भरून काढत. ते कंटाळलेल्या जीवाला विरंगुळा देत. थकल्या-भागलेल्या अडाणी व गरीब लोकांचे दु:ख विसरुन हसवत ठेवत. त्यावेळी कोणतीही यात्रा-जत्रा तमाशाशिवाय भरुच शकत नव्हती.

तमाशात गण, गवळण, लावणी, सवाल जवाब आणि वग असायचं. वगातील सोंगाड्या प्रेक्षकांचं ताण घालवण्याचे, विरंगुळा देण्याचे, करमणूक करण्याचं कार्य करायचा. तो ठसकेबाज व बोलण्यात इरसाल असायचा.

पुरुषी धाटणीचा, तोच तोचपणामुळे अभ्या नाच्यात आता रस उरलेला दिसत नव्हता. त्यामुळे तमाशाला उतरती कळा लागली होती. एवढ्यात एकेदिवशी साक्षात स्त्री नाचनारीन आमच्या गावात अवतरली. तिचं नाव होतं कवतिकी. गावातल्याच कलावंतांना घेऊन तिने फड उभा केला. तिचं मेकअप नंतरचं देखणं आणि उभारलेलं स्त्रीपण पाहून सारेच स्तंभित झाले होते. तरुण कलावंताना तर तिने वेडच लावलं होतं. ते तिच्या मागेमागे चावटपणे गोंडा घोळत. एवढं मात्र खरं, तिच्या स्त्रिपणामुळे तमाशाला आणखीनच ठसठशीतपणा व जिवंतपणा आला होता. परंतु हाही तमाशा बदलत्या वैचारिक वातावरणामुळे जास्त दिवस टिकला नाही.

दिवाळीत गायी खेळत, त्यादिवसापासून दादा व त्याचे साथीदार दिवसभर गावात घरोघरी नाच-गाण्याचा उत्सव करुन वावरातलं पीक-पाणी काढण्यात शिणून गेलेल्या कष्टकरी लोकांचं मस्त मनोरंजन करीत. दिवाळीतले दोन-चार दिवसं उत्साहाने आणि चैतन्याने ओथंबून गेल्या सारखे वाटत. कधीकधी आजूबाजूच्या गावाला पण दौरा करुन येत.

खेड्यातील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आणखी रात्रभर चालणारा लोकनृत्याचा प्रकार म्हणजे दंडार. त्यात दोन चमू समोरासमोर ठाकत. त्यांच्यात एक-दोनजण तरी बायांसारखं लुगडं किंवा साडी नेसून दंडारीत रंग भरीत. त्यामुळे बाया-माणसांचा संमिश्र, बिनधास्त वाटणारा नाच वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा वाटत होता. टिपर्‍या व बासरी-डफड्यांच्या सुंदर तालावर नाचणार्‍यांचे पाय तालबध्दरित्या थिरकत, तेव्हा आनंदाची भरती येऊन, मन बेभान होवून पाखरासारखं वार्‍यावर उडत आहे की काय, असं वाटायचं. एक चमू टिपर्‍या वाजवत, नाचत नाचत व गाणे म्हणत पुढे जात; तर दुसरा त्याचवेळी मागे जात. मग एक चमू पुढे तर दुसरा मागे…! असा तो दंडारीचा खेळ सकाळपर्यंत चालायचा.

त्यात मधा-मधात नकला व जादूच्या खेळाचा अंतर्भाव असायचा. बाबा जादूच्या खेळामध्ये सुध्दा तरबेज होता. तो तोंडातून कागदाची लांबलचक पट्टी दोन्ही हाताने ओढून काढायचा; तेव्हा प्रेक्षक तोंडात बोटं घालायचे. दादा पण या दंडारीत भाग घेऊन तालबद्द नाचायचा. हा दंडारीचा लोकनृत्याचा प्रकार फारच रंजक वाटत होता.

अशा कलांकारांची खाण आमच्या कुटुंबांत वसलेली पाहून माझं मन गर्वाने मोहरुन जात असे.

 

 


कथा सातवी – शाळेसाठी पायपीट

 

आमच्या गावात शाळा नव्हती. दीड कोसावर निळोणा गावाला चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा होती.

एकदा बबन गुरुजी आमच्या गावात आले. त्यावेळेस मी खेळत होतो.

‘अरे इकडे ये… तुझं नाव काय?’ गुरुजींनी मला विचारले.

‘हे माह्या हातावर लिवले आहे.’ कोणी माझे नाव विचारले की माझ्या उजव्या हातावर गोंदलेले नाव दाखवायला मी हुरळून जात होतो.

‘रामराव…?’

‘हो…’

‘शामरावचा भाऊ  का?’

‘हो.’

‘चल तुझ्या घरी.’ माझ्यासोबत खेळणारे मुलेही माझ्या मागेमागे आलेत.

‘याला शाळेत टाकता का?’ गुरुजींनी बाबाला प्रश्न केला.

‘लहान आहे. त्याचा हात पाठीमागून कानाला लागत नाही जी…’

‘त्याची जन्म तारीख माहीत आहे?’

‘नाहीजी… कोणाला माहीत? पण तो शिरीकुष्णदेव जलमला त्या वक्ताचा आहे.’ आई म्हणाली. म्हणून माझे पाळण्यातले नाव ‘श्रीकृष्ण’ व दुसरे नाव ‘रामराव’ ठेवले, अशी आई सांगत होती. पण पुढे ‘रामराव’ हेच नाव प्रचलीत झाले.

‘बरं, कोतवाल बुकात नाव असेल तर पाहून घेईन. उद्यापासून येऽरेऽ शाळेत. चांगले कपडे घालून ये.’ माझ्या मळकट कपड्याकडे व शेंबड्या नाकाकडे पाहून गुरुजी म्हणाले.

मी मान हालवून ‘हो’ म्हणालो. गुरुजींनी गावातील आणखी काही मुलांचे नाव टाकून घेतले.

तेव्हापासून मी निळोण्याच्या शाळेत जायला लागलो. ही शाळा बबन गुरुजींचे वडील – पां. श्रा. गोरे यांनी आणली होती. ते मुळचे निळोण्याचे, पण नोकरीसाठी यवतमाळला स्थायिक झाले होते. ते थोर कवी व साहित्यिक होते. त्यांची ‘कात टाकलेली नागीन’ ही कादंबरी निळोण्याच्या परिसरावर-ग्रामीण जीवणावर लिहिलेली होती. त्यांची एक कविता चौथ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला होती.

‘उठुनी गृहिणी लगबगा, सडा सर्माजन करीत राहतात.

मोट सुटली बैल मोकळे झाले, गडी सारे एकत्र जमुनी आले.

बसुनी वाहत्या कडेला, सोडू लागले न्याहरी… ही त्यांच्याच कवितेतील ओळ आहे.

त्याशिवाय त्यांची हृदयाला भिडणारी कविता म्हणजे ‘विटंबना’. त्यातील काही ओळी आठवतात.

‘डोळे पाठपोठ एक सोसता उपास, घातला ना मुखी कुणी उष्टा घास,

पाणी साखरेचे तोंडात टाकता, मेल्यावर मला काय रे लाजवता?

होता या कुडीत जोवरी हा जीव, केली न त्याची मनी कुणी कीव,

जित्यापणी गोडी मनात नसता, मेल्यावर का रे बंधन तोडता?’

खरेच आहे ! जीवंतपणी कोणी विचारत नाहीत; पण मेल्यावर मात्र त्याच्या तोंडात पाणी टाकतात. ही जगाची रीत पाहून मला का रे लाजवता? अशी ती मृत व्यक्ती भावना व्यक्त करते. अशी कविवर्य पां.श्रा.गोरे यांनी मांडलेली वास्तवता थक्क करून जाते.

शिक्षणाच्या बाबतीत लोकांची ओढ कमी असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी असायची. म्हणून गुरुजींना आजूबाजूच्या खेड्यावर जाऊन विद्यार्थ्यांची जुळवाजूळव करण्यासाठी अतोनात परिश्रम घ्यावे लागत होते. त्यांच्या अथक प्रयत्‍नामुळेच आमच्या पुढील शिक्षणाचा मजबूत पाया रचला गेला. त्यामुळे खरंच, त्यांचे उपकार न विसरण्यासारखे आहेत.

आमचे गुरुजी एकटेच, पहिली ते चौथ्यावर्गापर्यंत शिकवीत. ते पांढर्‍या रंगाचं शर्ट, पैजामा व पांढरीच टोपी घालत. त्यावेळी प्राथमिक शाळेचे सर्वच मास्तर असाच पोषाख घालत असल्याचे दिसत.

आम्ही आठ-दहा मुले शाळेत जायला एकत्र  निघत होतो. त्यात माझी मामेबहिणी चित्राबाई व सुदमताबाई, माझी मोठी बहीण जनाबाई, मुलींमध्ये सरस्वती व मुलांमध्ये भगवान, धनपाल, नाना व बंजार्‍याचे रामसिंग, वामन, वाल्ह्या असे होते.

शाळेत रमत गमत जातांना-येतांना डोळ्यांना सुखावणारा निरव, रंगतदार, रमणीय निसर्ग, आभाळात दाटून आलेले ढग, चिलकीचे व नदीचे झुळझुळणारे-खळखळणारे पाणी, पाना-फुलांनी बहरलेली झाडीवेली-झुडपं, मस्तीत उडणारे-बागडणारे, सुरेख आवाजात गुंजन करणारे व झाडांच्या फांद्यावर हवेच्या झोतात झुलणारे पक्षी पाहतांना आम्हाला खूप मजा यायची. आम्ही एखाद्या उंडाळणार्‍या वासरासारखे  मनमुरादपणे आनंद लुटत, आमच्याच मस्तीत रस्त्याने जात होतो.

आम्ही एकमेकाशी ‘अ’ व ‘ची’ ची भाषा बोलत होतो. ‘मला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला…म’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला…म’ म्हणत होतो. ही विचित्र भाषा बोलतांना आम्हाला इतकी सवय झाली होती की आम्ही सहजपणे न अडखडता बोलत होतो.

एकमेकांना कोडी घालत होतो. ‘पाणी नाही पाउस नाही, रान कसं हिरवं? कात नाही चुना नाही, तोंड कसं रंगलं? सांग… सांग… काय…? उत्तर होतं, पोपट…’ ‘अंधार्‍या खोलीत म्हातारी मेली, पाचजण लेक असून दोघांनी नेली. सांग… सांग… काय…? उत्तर होतं, नाकातला शेंबूड…’ असे ते कोडे असत.

आम्हाला शाळेत पोहचायला दिडक तास लागत होता. गावातून पायवाटेने निघालो की लांडग्याचं, किसन्याचं, भगवानचं वावर लागायचं. नंतर बैलगाडीचा रस्ता. रस्त्याच्या डाव्या बाजूला पांडु लभानाचं, उजव्या बाजूला कचरु व लंगड्या चिफसाहेबाचं. खेडूत लोक पोलीसठाण्याच्या साहेबाला चिफसाहेब म्हणत, तसा तो चिफसाहेब होता की कोण जाणे? नंतर वाघाडी नदीजवळचं अवधुतचं वावर लागायचं.

आम्ही मुलं निसर्गसौंदर्य न्याहाळत, डोळ्यात साठवत जात होतो. निरनिराळ्या झाडांचा रंगीबेरंगी मखमली फुलोरा जसे- चिल्हाटीचा गुलाबी, बाभळीचा पिवळा, हिवर्‍याच्या पांढरा मनाला भुरळ पाडत असे. आजूबाजूचा हिरवा शालू पांघरलेला परिसर पाहून आमचे डोळे सुखाऊन जात. एखाद्या सकवार स्त्रीच्या नाजूक छटा या हिरवळीत गुंफल्या गेल्याचा भास व्हायचा. निसर्गाचं असं मुक्त उधळण पाहून चालण्याने आलेला थकवा दूर पळून जात असे. श्रावण मासातला सप्तरंगी इद्रधनुष्य, सूर्य-ढगाचा उन-सावलीचा खेळ आम्हाला मोहरून टाकत असे. आजूबाजूच्या शेतात उन्हां-पावसात, हिवा-दवात कष्ट करणारे शेतकरी-शेतमजूर पाहून आमचा पुढेपुढे जाण्यातला उत्साह दृढ होत असे.

पाहा ना, रंगाच्या किती विविध छटा ! एक हिरवेपणाचं उदाहरण घेतले तर – तुरीचा वेगळा, पर्‍हाटीचा वेगळा, गवताच्या पात्याचा वेगळा, झाडांच्या पानांचा वेगळा ! कुठे गच्च हिरवेपणा, कुठे गर्द हिरवेपणा, कुठे लुसलुशीत हिरवेपणा,  तर कुठे निव्वळ-फिक्कट हिरवेपणा ! गंमतच आहे, नाही !

आम्ही निसर्गाच्या वर्षभर बदलणार्‍या चैतन्यमय स्वरूपाचं मनमुरादपणे आनंद लुटत होतो. त्याच्याठायी शिगोशिग भरलेले व नित्यनेमाने उधळणार्‍या आनंदाच्या पखरणात आमचं मन गुंतून जात असे. शेतात, धुर्‍यावर, डोंगरमाथ्यावर व नदी-नाल्याच्या काठावर उगवलेल्या वनराईच्या पाना-फुलांचा-फळांचा आस्वाद घेतघेत शाळा कणाकणाने जवळ करीत होतो.

कुणाच्या भुईमूंगाच्या वावरात धुर्‍यावरच्या काट्या सरकवून, चोर पावलानं घुसत होतो. मग डहाळ्या उपटून शेंगा रस्ताभर खातखात जात होतो. कधी मुंगाच्या, उडदाच्या, पाटाच्या शेंगा, तर कधी वाळकं, काकड्या तोडून खात होतो. हिवाळ्यात हरभरा व वटाणाचे डुंगे दिसले की आम्ही हरखून जात होतो. मग हिरव्या घाट्यांनी भरलेला हरभरा व वटाण्याचे सोले खायची मोठी मजा येत होती. कधी तुरीच्या तासात शिरुन हिरव्या टर्र भरलेल्या शेंगा ओरबाडून खिश्यात भरुन घेत होतो. मग त्याचे पिवळी फुले आमच्या अंगा-खांद्यावर खेळून धिंगाणा घालत असे. अशा चोरलेल्या पण कष्टाने तोडलेल्या शेंगा ऎटीत, रस्ताभर खात होतो.

रस्त्याच्या काठाला येणाचे, खैराचे, भराडीचे, धावड्याचे, सागाचे, बाभळीचे, पळसाचे, पांजर्‍याचे, चिल्हाटीचे, हिवर्‍याचे, कडूलिंबाचे विविध जातीचे झाडं होते. पण सागाच्या जातीचे जास्त झाडं होते. त्याच्या पानाला घासले की रक्तासारखा घट्ट रस निघायचा.

येणाच्या झाडाला रेशमाचे कोश लटकलेले दिसत. त्याला तोडून आम्ही मखमली सूत काढण्याचा प्रयत्‍न करीत होतो. याच कोशातून फुलपाखरं बाहेर पडत असल्याचे पुस्तकात वाचले होते. धावड्या-बाभळीचा डिंक खायला आम्ही धडपडत होतो. लिंबाच्या झाडाचा डिंक त्याच्या गुणधर्माप्रमाणे कडू लागायचा. तो पुस्तकाचे पाने चिकटवायला वापरत होतो.

झाडावर कधी बसलेले तर कधी उडत असलेले निरनिराळ्या जातीचे, रंगाचे पक्षी पाहण्यात आम्ही गुंग होवून जात होतो. त्यांच्या सुरेख चोचीतून बाहेर पडणार्‍या, लयदार मंजुळ स्वरांनी आसमंत पुलकित झाल्यासारखे वाटत असे. त्यांच्या चमकदार रंगीबेरंगी पंखाचे पिसं पाहून आम्ही मोहीत होवून जात होतो. असं म्हणत की पक्ष्यांना लाभलेल्या विविध रंगाचा उपयोग शत्रूपासुन लपून राहण्यासाठी व जोडीदाराचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत.

कुहूऽऽ कुहूऽऽ असा कर्णमधूर आवाज आला की त्या दिशेने आम्ही धावत-पळत सुटायचो. कारण ही कोकीळा गर्द झाडीत, पाना-फांद्याने बहरलेल्या मोठ्या झाडावर कोणालाही दिसणार नाही – जसं वेलीवर उमललेल्या फुलाचा सुगंध सर्वत्र पसरावा पण ते दिसू नये, अशा अवघड जागी लपलेली असायची. कदाचित आपला काळा रंग जगाला दिसू नये, म्हणूनच ती संकोचीत होती की काय, कोण जाणे? झाडाजवळ गेलं की तिचा आवाज बटन दाबलेल्या रेडीओसारखा एकाएकी बंद होवून जायचा. जसं तिथे कोणीच नाही, असं वाटायचं. पण तिला पाहतो नं पाहतो तर ती क्षणातच भुर्रकन उडून नाहिसी व्हायची, तेव्हा आम्ही अचंबित होत होतो.

एखाद्या झाडावर पोपटाचा थवा टीवऽऽ टीवऽऽ करत बसलेला दिसायचा. झाडाजवळ गेलं की कलकलाट करून उडून जात. तेव्हा ते झाड थरथरत असल्याचं दिसायचं. कधीकधी दुरुनच टकटक आवाज यायचा. जवळ जाऊन पाहिले, तर सुतार पक्षी आपल्या लांब चोचीने झाडाच्या खोडाला टोचे मारतांना दिसायचा. मग आम्ही त्याच्याकडे पाहत थबकत होतो.  निलकंठ पक्षी पाहायला अतिशय सूंदर ! त्याची पोपटासारखी हिरवी हिरवी चोच मन मोहून टाकत असे. एखादं पाखरु शेपटी उंचावून व शेंडी फुगवून आपल्या चोचीतून मंजूळ आवाज काढायचा, शीळ घालायचा, त्याचीच नक्कल करीत आम्ही पण त्याच्या सारखाच आवाज काढून पाहत होतो.

कधीकधी रस्त्यावर सावली धावतांना दिसायची. वर पाहिले तर आकाशात उंच उडणार्‍या घार किंवा गिधाडासारख्या मोठ्या पक्षांची सावली असायची. मग आम्ही सावलीच्या दिशेने उगीच पळत होतो. एखाद्यावेळी टुणटूण उड्या मारत रस्त्याने चालत जाणारं पाखरू दिसलं की आम्ही सुध्दा त्याचेच अनुकरण करीत उड्या मारत चालत होतो. कधीकधी अचानक आमच्या जवळूनच बाटरं किंवा तितर पक्षी – ज्यांना पारधी लोक पकडीत, भुर्रकन थव्याने उडून गेले की आमच्या जिवाचा थरकांप उडत असे.

खोप्यातल्या पिल्लांना पक्षिनी अन्न भरवितांना आम्ही कित्येकदा पाहिलं. त्या पिल्लांना आकाशात भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ यावं; म्हणून पक्षीन अशी करीत होती. तसेच आम्हीही पण उंच भरारी घ्यावी अन् आमच्या अंगात बळ यावं; म्हणून आमचे आई-बाबा आम्हाला शिक्षणरुपी अन्न भरवित होते.

एखाद्यावेळेस मोहाच्या झाडावर घुबड बसलेला दिसायचा. त्याची गंमत अन् भीती पण वाटायची. तो जाग्यावरून किंचितही न हलता आपली मान तेवढी गर्रकन पूर्णपणे फिरवून आमच्याकडे वटारलेल्या मोठ्या डोळ्याने पाहायचा. त्यावेळी सर्रकन अंगावर भीतीचे काटे उभे राहत. आम्ही जिकडे वळायचो तिकडे मान फिरवून तो पाहायचा. मग त्याची भीती वाटणार नाही, तर काय? हा घुबड २७० अंशाच्या कोनात मान कशी वळवतो, हे एक रहस्यच वाटायचं. शिवाय तो म्हणे, लहान मुलांचे कपडे नदीवर नेवून धुतो व झाडावर वाळू घालतो. ते जसजसे वाळायला लागते, तसतसे मुलगा वाळायला लागतो. त्याला दारू पाजली की तो माणसासारखा बोलतो. अशा काहीतरी दंतकथा या घुबडाच्या बाबतीत खेड्यात सांगितल्या जात होत्या. खरं काय नी खोटं काय, कोणी पाहिलं?

रस्त्याच्या कडेला माकोडे घरं बांधण्यात गुंग झाल्याचे दिसत. जमिनीच्या आतून इतकुला मातीचा कण तोंडात धरुन आणीत व बाहेर कणावर कण टाकून ढिग रचत. त्यांचं ते अविरत व सततचं काम पाहून स्तंभित होत होतो. अशाच प्रकारे उदळ्या मोठमोठे वारूळ निर्माण करीत असतील, नाही का?

उन्हाळ्यात रखरखत्या उन्हाच्या काहिलीने सारी झाडांची पाने झडून जात. त्या पानझडीने सारी धरती ओकीबोकी, उघडीनागडी झाल्यासारखी वाटायची. पण त्यातही काही वृक्षांचं नव्या पालवीच्या दागीण्याने सजलेले देखणं रूप मनात भरल्याशिवाय राहत नसे. पळस, पांजरा व काट-सावरीचे झाडं लाल-नारिंगी रंगाच्या फुलांनी बहरुन गेल्याचं अन् बारीकशा पांढर्‍या फुलाने मोहरलेल्या लिंबाच्या झाडाचे मोहक दृष्य पाहून थकलेल्या मनाला नवी झळाळी प्राप्त झाल्यासारखी वाटत असे.

सारेच पाने गळून पडलेले, पोपटाच्या चोचीप्रमाणे फुलांच्या पाकळ्याची ठेवण असलेले, गडद चकाकणार्‍या नारिंगी रंगाच्या फुलांनी भरभरुन वेढलेले पळसाचे झाडे पाहून शिमग्याचा सण जवळ आल्याची चाहूल लागायची. तेव्हा या झाडांचं देखणं रुप पाहून मन कसं रोमांचित होवून जात असे.

काटसावरीची पाच पाकळ्यांची, गडद गुलाबी रंगाची, मखमली स्पर्शाची फुलं मन वेधून घेतल्याशिवाय राहत नसे. त्याजागी आलेले बोंड फुटून कापसासारखे तंतू बाहेर पडून हवेच्या झोताने उडतांना पाहिल्यावर मन मोठं प्रफुल्लीत होवून जात असे. त्याला पकडायला हात सरसावत, तोंडाजवळ आणून फूक मारून दूर भिरकावण्यात भारी मजा वाटत असे. चिलीम ओढण्यासाठी याच काटसावरीच्या कापसाच्या कफाला चकमकीने पेटवून उपयोग करीत.

कुठेकुठे रस्त्याने भोवर्‍यासारखे गुळगूळीत मातीचे भक्के जागोजागी दिसत. त्यात गवताची पाती हळूच टाकल्यावर विसावलेला इवलासा गुबगूबीत हत्ती तोंडाने धरून बाहेर आलेला दिसला की आम्हाला मोठी गंमत वाटत होती. रस्त्याच्या गुळगूळीत मातीत तुरुतूरु चालणार्‍या निरनिराळ्या पक्षांच्या पायाचे ठसे एखाद्या चित्रकाराने नक्षीकाम करावे तसे दिसायचे, तर कुठेकुठे गाई-ढोरांच्या किंवा उनाड पोरांच्या मुताच्या रेघोट्या मातीवर उमटलेल्या दिसत.

कधीकधी वारा-वावटळ किंवा अवकाळी पावसाचे लोंढे रस्त्यात पसरलेला पाला-पाचोळा झाडा-झुडपाच्या बुंध्यापासी नेवून ढीग रचत. त्याचवेळी रस्त्यावरची माती खरवडून नेल्याने कुणाचे पडलेले नाणे अचानक दिसले की काहीतरी घबाड सापडल्यासारखे आम्ही आनंदित होत होतो. कधी आमच्या समोरुन करडा-पिवळ्या रंगाचा व तांबड्या मानेचा सरडा तुरुतूरु धावत येऊन धुर्‍याकडे जातांना दिसायचा. कधी मोठ्या ऐटीत मान खाली-वर करून थांबत थांबत जातांना पाहून आम्हाला मोठी गंमत वाटायची.

एखादी खारुताई – तिला खिराडी म्हणत होतो, ती दोन्ही पायावर उभी राहून आमच्याकडे रोखून पाहत थबकायची व क्षणातच झाडाच्या बुंध्याकडे पळून जायची. तिची चंचलपणा पाहून आम्हाला मोठं नवल वाटायचं. कधीकधी धुर्‍यावरच्या झुडपात आम्ही उगीगच दगडं भिरकावीत होतो. तेव्हा एखाद्यावेळी झुडपातून सुऽऽ सुऽऽ आवाज करीत ससा पळतांना दिसत होता. एकाठिकाणी रांगोळीचा काचेसारखा दिसणारा दगड आम्हाला खुणावत राहायचा. त्याची आम्ही रांगोळी बनवीत होतो.

शनिवारी शाळा सकाळची असायची तेव्हा दुपारी घरी येतांना किसन्याच्या वावरातील आंब्याच्या झाडावर चाप-डुबल्याचा खेळ खेळत होतो. रस्त्याने जास्तीत जास्त दूर कुणाचा दगड जाऊन पडतो, याची आम्ही शर्यत लावत होतो.

पावसाळ्यात कुठेकुठे रस्त्यावर चिखलामुळे घसरण होत होती. कुठे पायाच्या घोट्यापर्यंत तर कुठे टोंगळ्यापर्यंत गाडण व्हायचं. अशा वेळेस धुर्‍याच्या काठा-काठाने किंवा शेतातून नवीन पायवाट तयार व्हायची. असा रस्ता जरी अवघड असला तरीही आम्हाला मजा वाटायची. पाण्याच्या तडाक्याने रस्त्यावरची माती, मुरूम, बारीकसारीक खडे वाहून जात असे. उन्हाळ्यात झाकलेले मोठेमोठे दगडं सताड उघडे पडत. कुठेकुठे लहानमोठे खड्डे पडत. त्यामुळे रस्ता चालण्यालायक राहत नसे. रस्त्यातच चीलक्या तयार होवून प्रवाह तयार व्हायचा. मग चिलकीचे पाणी उडवत आम्ही जात होतो. त्यावेळी आकाशाच्या दिशेने उडणारे पाण्याचे तुषार पाहतांना मंत्रमुग्ध होवून जात होतो.

चिलकीचे पाणी गाडीरस्त्याने वाहत थेट वाघाडी नदीपर्यंत जात असे. हे पाणी धबधब्यासारखं गिरक्या घेत खाली डोबर्‍यात पडलं की पांढराशुभ्र फेस यायचा. तो फुलाप्रमाणे हाताच्या ओंजळीत धरुन फुका मारला की विरुन जात किंवा कोणी जवळ उभं असलं की त्याच्या अंगावर फेकून मारण्याचा चावटपणा करत होतो. कधीकधी वाहत्या पाण्यातूनच चालत जात होतो, दबादबा उड्या मारत होतो, तेव्हा मोठी मौज वाटायची.

पाण्यात पोहणार्‍या बारीक मासोळ्यांच्या मागे आम्ही उगीच धावत होतो. खरं म्हणजे ते बेंडूकाचे पहिल्या अवस्थेतील पिल्ले होते. काही दिवसाने ते अर्धवट बेंडूकासारखे तर अर्धवट मासोळीसारखे दिसत. शेवटच्या अवस्थेत शेपटी गळून पूर्ण बेंडूकाचा आकार दिसायचा; तेव्हा हा क्षणोक्षणी होणारा बदल आम्हाला मोठा चमत्कारीक वाटायचा. कधीकधी लहान-मोठे आकाराचे खेकडे दिसत, तर कधीकधी सळसळत पोहत जाणारा साप पण दृष्टीस पडायचा. तेव्हा आमच्या अंगावर सर्रकन काटे उभे राहायचे. पाण्यामध्ये सूर मारून नजर फिरत नाही तर झटकन इकडचे-तिकडे फिरणारे टनक कवचाचे पाणबुड्या किटकाची पोहण्याची कला पाहून थक्क होवून जात होतो, तर विंचवासारखा दिसणारा पाणकिडा पाहून अंग शहारल्यासारखे होत असे.

पावसाळ्यात बरेचदा भिजण्याची पाळी यायची. मग घरी येईपर्यंत ओल्या कपड्याने कुडकुडत राहत होतो, तर भिजलेल्या कपड्याने वर्गात बसावे लागत असे. पावसाने भिजू नये म्हणून आम्ही सागाच्या झाडाच्या फांदीच्या दोन मोठ्या पानाला काही पाने जोडून छत्रीसारखा आकार देऊन डोक्यावर धरत होतो. कधीकधी वाघाडी नदीला पूर येत असे. तेव्हा पूराचा भर उतरेपर्यंत तासनतास नदीच्या काठावर थांबावे लागत असे. नदीत उतरतांना काठावरील निसरड्या रस्त्याने घसरुन पडतो की काय, अशी भीती वाटत असे.

हिवाळ्यात सकाळी थंडीने कुडकूडत शाळेत जावे लागे. त्यावेळी माझे हातपाय उलत होते. इतके की त्यातून रक्त निघायचं. कुणी म्हणायचे, वायजाळ झाला. घरा-दारात, दिवस-रात्र शेण-चिखल व माती-गागर्‍याशी सामना असतांना  हात-पाय उलणार नाही, तर काय होणार?

उन्हाळ्यात पायाला चटके लागायचे, तर उघडे हात-पाय, डोके भाजून निघायचे. पूर्ण शरीरभर घामाच्या धारा वाहत राहायचे. तोंडावर आलेला घाम दोन ओठाच्या फटीतून हमखास तोंडात जायचा. मग तोंड कसं खारट खारट लागून चिक्कट होवून जात असे. घश्याला कोरड पडायची. कधीकधी वावटळीत-गराडात सापडलो की पालापाचोळ्यासारखे आम्ही पण उडून जाऊ की काय, अशी भीती वाटायची. धुळीच्या कणांनी शरीर माखून जायचं, तर डोळे लालबूंद व्हायचे.

हा रस्ता कुठे पायवाटेचा, तर कुठे बैलगाडीच्या-खाचराचा होता. रस्त्यावर विखुरलेल्या बारीक खड्याने आमच्या पायाच्या तळव्याची आग होत होती. कधी अनवाणी पायाला काटे टोचायचे, तर कधी काट्याकुट्याने कपड्याला खोसपे लागून फाटायचे. कधी अंगाला ओरखडे पडून भळभळ रक्त निघायचे.

नदीच्या तीरावर निळोणा गावाची स्मशानभूमी होती. कधीकधी प्रेत गाडतांना किंवा जाळतांना दिसायचं. मग त्याठिकाणी त्याची हमखास आठवण आल्याशिवाय राहत नसे. दिवसा तेवढी नाही; पण अंधार पडला की फारच भीती वाटायची. एखाद्या ठिकाणी दगडं नि काट्या ठेवलेले दिसले की ती जागा गरोदर बाईच्या पोटासारखी फुगलेली दिसायची. म्हणजे तेथे प्रेत नुकतच गाडलं असावं, याची जाणीव व्हायची. मग तिकडे पाहिलं नं पाहिल्यासारखे करुन भरभर पाय टाकत आम्ही तेथून निघून जात होतो.

नदीच्या पलीकडे निळोण्याच्या शिवारापर्यंत रस्ताभर गोटेच गोटे होते. ह्या गोटाळ रस्त्याने जातांना मोठी कसरतच करावी लागे. केव्हा तोल जाऊन खाली पडेल याचा नेम नव्हता. एखाद्यावेळी बेसावध असतांना कित्येकदा पाय ठेचाळत होता. एकदा ठेच लागली की परत परत त्याच दुखर्‍या अंगठ्यालाच ठेच लागायची, हे विशेष ! मग आम्ही रक्तबंबाळ अंगठ्यावर मुताची धार सोडत होतो. नाहीतर कंबरमोडीच्या पाल्याचा रस टाकत होतो. मग चिंधीने बांधून घेण्याशिवाय  दुसरा कोणता उपाय आमच्याकडे होता?

गावाजवळ हागदोडी लागत होती. नाकपुड्या दाबल्याशिवाय घाण वासाला रोखता येत नव्हतं. त्यामुळे दम कोंडल्यासारखं व्हायचं. एखाद्यावेळी शाळेच्या घंटीचा आवाज ऎकू आला की आमची मोठीच धावपळ व्हायची.

असे हे काट्याकुट्याचे, लहान-मोठे दगडाचे, चढउताराचे खडबडीत रस्ते, उन्हा-तानात, पाण्या-पावसात, हिवा-दवात दप्तर-पाटीचे ओझे घेऊन पाय तुडवत शाळेत जात होतो. असे ते शाळेचे दिवसं आठवले की मन त्या आठवणीत हरवून गेल्याशिवाय राहत नाही. असा हा आमच्या शिक्षणाचा मार्ग खडतर व खाचखळग्याने काठोकाठ भरला होता. .

 

 


कथा आठवी – दगड तरंगला नाही

 

मी निळोण्याला शिकत असतांना चौथ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात ‘रामाच्या नावाने कोण वाया गेले?’ असा धडा होता. त्यात दगडावर ‘राम’ लिहून पाण्यात सोडला की तो तरंगतो, असे लिहले होते.

त्यादिवशी हा धडा गुरुजी शिकवायला लागले. खरंच, दगड पाण्यावर तरंगतो का? असं अकल्पीत कधी घडतं का? रामाच्या नावात एवढी जादू आहे का? अशा नाना प्रकारच्या प्रश्‍नाने माझ्या मनात गदारोळ माजवीला होता.

म्हणून हा प्रयोग करुन पाहण्यासाठी माझं मन अधीर झालं होतं.

शाळेत येतांना मधात वाघाडी नदी लागत होती. नदीचे पात्र मोठे होते. तिच्या तिराचा परिसर हिरव्या रंगाच्या झाडाझुडपांनी, नानाविध मखमल रान फुलांनी नटलेला होता.

या तीरावरची करकरी – कोणी कळलावी पण म्हणत, ही वनस्पती शेंड्यावर लाल व खाली पिवळा असा फुलोरा, आमचं चित्त वेधून घेतल्याशिवाय राहत नसे. तसेच हिरव्यागार पानानं लदबलेल्या धामण्याच्या झाडाचे गाभुरलेले आंबट-तूरट बारीक फळे आम्ही चवीने खात होतो.

अवधुतच्या वावरातून नदीत उतरणारा निसरडा रस्ता होता. एखाद्यावेळेस पावसाची सर येऊन गेली की रस्त्यावर घसरण होत होती. मग तोल सावरत झाडाच्या फांद्याना पकडत, पायाच्या बोटाचे नखं जमिनीत रुतवत  नदीत उतरावे लागे.

पावसाळ्यात नदीत उतरण्यापूर्वी वरून पुराचे लोंढे येण्याचा अंदाज घेतल्यावरच नदीत उतरत होतो.

पाण्यात पाय टाकला की थंड पाण्याचा स्पर्श सर्वांगाला उत्तेजीत करीत असे. नदीच्या वाहत्या धारेचं थंड पाणी तोंडावर शिंपडून तोंड धुतल्यावर शरीरात आलेला थोडाफार थकवा निघून गेल्यासारखं वाटत असे. हाताच्या ओंजळीने पाणी पिल्यावर तहानेने कासावीस झालेला जीव शांत होवून जायचा. पाण्याची चव खरंच गोड लागायची.

माझी मोठीआई गिरजाबाई, हिला खूप कथा येत. त्या आमिषाने आम्ही तिच्या घरी टेंभुर्णीचे पाने चवडून देत होतो. मग पाने चवडता चवडता एकेक कथा सांगत होती. कधी भुता-खेतांच्या, कधी चकवा-लावडीनीच्या, कधी बहीण-भावाची तर कधी राजा-राणीची तर कधी मजेशीर-गमतीदार…! अशा कितीतरी गोष्टी ती सांगत होती.

तिने सांगितलेली एक मजेशीर गोष्ट माझ्या लक्षात आहे.

एक बुटका नवरा. त्याची बायको पण बुटकी. भारी बह्याड स्वभावाची. तिच्या बह्याडपणाला तो पार वैतागलेला ! एकदा असंच तो तिला म्हणतो,

‘लोकांच्या बायका कशा देवासारख्या राहतात?’ नवर्‍याचं असं बोलणं ऎकून ती देवळात जाऊन बसली. तो तिला शोधतांना शेवटी ती देवळात जाऊन बसलेली दिसते. नवरा म्हणतो,

‘येथे कशाला येऊन बसलीस?’

‘तुम्हीच तर म्हणाले होते की देवासारखी राहात जा. म्हणून मी देवळात येऊन देवासारखी बसली. माझं काही चुकलं काय?’

‘अवं, माह्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. तू फारच बह्याड आहेस…! लोकांच्या बायका कशा घरं चालवतात? तसं तू आपलं घर का नाही चालवत?’  असं म्हणून तो कामाला निघून जातो.

झालं…! तिने हातात पुराणीची काडी घेतली. ‘चल घरा, चल…’ अशी तोंडाने म्हणत, ती घराला ढोसायला लागली. जसं एखादं ढोर चाललं नाही की त्याला पुराणीने ढोसतात तसं. नवरा घरी आल्यावर पाहतो तर ही घराच्या भिंतीला पुराणीने टोचून टोचून छिद्रे पाडत होती. हे पाहून तो कातावून म्हणतो,

‘हे काय करत आहेस, तू?’

‘तुम्हीच म्हणाला होता की लोकांच्या बायका घर चालवतात. म्हणून मीही घराला चालवत आहे.’

‘इचीबहीण इचं आता कायच करावं का?’ अशी इरसाल शिवी त्याच्या तोंडातून बाहेर पडली.

‘जा… लोकांच्या बाया कशा बाजार करुन आणतात? तसा तू पण करून आण…’ असं वैतागून नवरा तिला बाजारात धाडतो.

परत येतांना सर्व बाया वाघाडी नदीचं पाणी पितात. ही सुध्दा पाणी पिते. या बाईच्या मनात येते, ‘किती गोड पाणी आहे या नदीचं ! गुळाच्या चवीसारखं…! माहा नवरा पिला की किती खुश होईल !’ म्हणून ती बुटल्यात भरुन आणलेलं तेल उबडून देते व त्यात पाणी भरून घरी आणते. अशी वाघाडी नदीच्या पाण्याची महिमा होती. हे पाणी जाता-येता आमच्या गावचे तमाम लोक आवडीने पीत.

नदीत कुठे पाण्यात तर कुठे पाण्याच्या वर खडकं दिसायचे. या खडकावर उभे राहून नदीचा परिसर न्याहाळत होतो. खडकाला चिकटलेला चिल्हा कधीकधी आम्हाला घसरुन खाली पाडत असे. रेतीचे पण कुठे पाण्याच्या आत तर कुठे पाण्याच्या वर थर जमा झालेले दिसत. या रेतीत कुठे पाय फसत तर कुठे मऊ मऊ लागत असे.

नदीच्या प्रवाहात थांबून आम्ही पाणी एकमेकांच्या अंगावर उडवीत होतो. कधी भाकरीचा तुकडा पाण्यात टाकला की लहान लहान मासोळ्यांचा थवा धावून यायचा. मग पायाला हळूच स्पर्श करीत; तेव्हा गुदगूल्या होत. आम्ही मग त्यांच्या मागे धाऊन जाण्यात रंगून जात होतो. असं त्या पाण्यात किती खेळावं नं किती नाही, असे होऊन जात असे ! कुठे कुठे संथ वाहणारा, तर कुठे खळखळ आवाज करणारा प्रवाह मनाला भुरळ पाडून जात असे. नदीच्या खालच्या व वरच्या दिशेने दूरवर पाणीच पाणी व दोन्ही काठावरील गर्द झाडी पाहून अनामिक भीतीने आमचा जीव कावरा-बावरा होत असे.

सकाळची शाळा असतांना थंडीने कुडकुडत येऊन नदीत पाय टाकला की पाणी कोमट असल्याचं जाणवत होतं. मग थंडीची भीती मनातून निघून जात होती. त्यावेळी जशा उकडलेल्या पाण्यातून वाफा भांड्याच्या बाहेर पडतात, तशाच वाफा नदीच्या पात्रातून पाण्याच्या बाहेर पडून विहरतांना दिसत. तेव्हा नदीच्या अलौकिक सौंदर्याचं दर्शन होत होतं.

नदीत वार्‍याच्या झोताने माना डोलावणार्‍या पण पुराच्या पाण्याने न डगमगणार्‍या लव्हाळ्या आम्हाला आकर्षीत करुन जात. पोळ्याच्या सणाच्या जवळपास उथळ पाण्यात गवताच्या जातीचे उंचच उंच वाढलेल्या पड्याळाचा घोळका मोठ्या दिमाखाने डोलत असलेले दिसायचे. त्यांचे पांढरेशुभ्र तुरुंबे जणू काही तरूणींच्या बुचड्यात खोवलेले आहेत, असं ते विलोभनीय दृष्य वाटायचं. नदीकाठावर बरेच रानकांद्याचे बुडं कोरफडीच्या झाडासारखे दिसायचे.

दूरवर नदीत टिटवीचं मन उसवून टाकणांर ‘टिटीवऽऽ टिव’ असा आकांत सुरु राहायचा. तिच्या मागे धावायला आम्हाला भारी मजा वाटायची. मग ती तुरुतुरु ओरडत पळायची व जवळ गेल्यावर भुर्रकन उडून जायची.

कावळे व काही पक्षी पाण्यात डुबक्या मारुन आपले अंग धुतांना दिसल्यावर, ‘वाह’ असे शब्द नकळत तोंडातून बाहेर पडत. माणसंच केवळ अंग धुतात असं नव्हे तर पक्षी सुध्दा धुतात हे पाहून आम्हाला अचंबा वाटत होता.

पांढर्‍या शुभ्र रंगाचे बगळे, मासे पकडण्यासाठी बराच वेळ एका पायावर एकटक ध्यान लाऊन उभे असलेले दिसले की त्यांच्या ढोंगीपणाला खरोखरच दाद द्यावीशी वाटत असे.

कधीकधी पक्षी अचानक धनुष्यबाणातून सुटलेल्या तिराप्रमाणे, नदीच्या पाण्यात असा काही सूर मारुन मासे पकडीत की ते पाहून आम्ही थक्क होवून जात होतो.

एखाद्यावेळेस नदीच्या पाण्याच्या काठावर पाणकोंबडी नजरेस पडे. आमची चाहूल लागली की ती झाडीत जाऊन लुप्त होऊन जायची. मग तिचा माग काढत कितीही शोधले तरी दिसायची नाही.

आम्ही मुले चापट दगडाचे चिपोरे पाण्यात असे काही भिरकावत होतो की तो चिपोरा दोन-चार ठिकाणी टुणऽ टू्णऽऽ उड्या मारत जात असे. मग कुणाचा दगड जास्त उड्या मारत दूर जाते, याची शर्यत आमच्यात लागत असे.

असंच, एकदा पावसाळ्याचे दिवसं होते. शाळेत दुपारचा वर्ग चालू होता. काही वेळाने आभाळ भरून आल्याने अंधार पसरत चालला होता. आता जबरदस्त पाऊस येईल असंच वाटायला लागलं. सर्वांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटायला लागल्या आणि मनात कालवाकालव सुरु झाली. अशी आमची अवस्था पाहून गुरुजींनी वर्ग सोडून दिला. आम्हाला पाऊस सुरु होण्यापूर्वीच लवकर घरी जाण्यास सांगितले.

एरवी एखाद्यावेळेस खूप पाऊस आला किंवा वाघाडी नदीला पूर आला तर गुरुजी आम्हाला आमच्या गावला जाऊ देत नसत.  तेव्हा ते शाळेतच रात्रभर थांबायला सांगत. आमच्या घरच्या लोकांना काळजी लागून जायची. कारण त्यांच्यापर्यंत निरोप पाठविण्याची काहीही सोय नव्हती.

अशावेळी गुरुजी बाब्याच्या आईला आमच्यासाठी चूण-भाकर करायला सांगत. बाब्या माझ्या वर्गात शिकायला होता. तो आणि त्याची आई असे दोघेजण निळोण्याला राहत. आमच्या शाळेच्या पाठीमागे त्याची शेती होती. तो ‘भाटी’ जातीचा होता. सहसा या जातीचे लोक शहरामध्ये राहतांना दिसतात. पण बाब्याचं घर खेड्यामध्ये असणं म्हणजे अपवाद वाटत होतं.

कधीकधी नदीला पूर आला असे गुरुजींना वाटले तर ते आमच्या सोबत नदीपर्यंत येत.  पुराचं पाणी ओसरण्याचे चिन्ह दिसले की ते तीरावर आम्हाला थांबवून ठेवत. पूर थोडा ओसरल्यावर लहान मुलांना खांद्यावर बसवून किंवा हात धरुन दुसर्‍या काठावर पोहचवून देत. खरोखरंच, मनाच्या खोल गाभार्‍यात रुतून बसलेली गुरुजींची ही अविस्मरणीय आठवण प्रगट झाली की माझं अंत:करण भडभडून आल्याशिवाय राहत नाही.

आम्ही चौधर्‍याचे सर्व मुले पाटी-दप्तर घेऊन लगबगीने शाळेच्या बाहेर पडलो. गोटाळ पांदणीने धावत, पळत नदीपर्यंत आलो. वरच्या बाजूला काळेभोर आभाळ दिसत होते. त्यावरून वर जबरदस्त पाणी पडत असावे व पुराचे लोंढे लवकरच वाहत येतील, असा आम्ही कयास बांधला. त्या लोंढ्याचा दुरुनच गडऽऽ गडऽऽ असा आवाज पण येत होता. त्यामुळे आम्हाला भीती वाटायला लागली. लोंढे धडकण्यापूर्वीच  नदी ओलांडून जायला पाहिजे; म्हणून जिवांच्या आकांताने सर्व मुलं पाण्यात उतरलो. पलीकडच्या काठावर पोहचतो न पोहचतो तर आमच्या डोळ्यासमोरुन पूराच्या गढूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे धडऽधडऽऽ  करत वाहत गेले. पाहता पाहता नदी पुराने टम्म फुगून गेली. दोन्ही थड्या भरभरून वाहू लागल्या. एका क्षणात वाढलेलं ते पुराचं अगडबंब पाणीच पाणी पाहून आमची बोबडीच वळली.  आम्ही थोडासा जरी उशीर केला असता, तर आमचे काय झाले असते? या कल्पनेने आम्ही भेदरुन गेलो होतो.

आम्ही जरी मनातून घाबरलो, तरी पूर पाहण्यासाठी आमचे पाय थोडावेळ तेथेच थबकले होते. पुराचे ते तांडव, अथांग पाणी, अक्राळविक्राळ रुप छातीत धडकी भरवीत होती. त्या पुरात मोठमोठे उन्मळून पडलेले झाडं, खोडाचे ओंढके, पाला-पाचोळा, काड्या-फांद्या असे काहीबाही वाहून जात होते. मधातच पुराच्या भोवर्‍यात गिरक्या घेऊन आंतमध्ये गुडूप होत व काही अंतरावरून वर निघून परत वाहायला लागत. नदी पाण्याला कधी आक्रसून घेई तर कधी फुगवत ठेवी. असं ते अवर्णीय व विहंगम दृष्य आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतो.

थोड्यावेळाने धाडधाड पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरु झाला. वेगवान वारा आणि बेधुंद पावसाच्या धारा झेलत, रस्ता तुडवत, पाटी-दप्तर हातावरच्या फोडासारखे सांभाळत, मोठ्यामोठ्याने पाय टाकत आम्ही गावला चालत गेलो.

खरंच, पावसाचे अनेक रुपे आहेत, नाही का? कधी अल्लड बाळासारखा झेपावतो, तर कधी दुष्ट राक्षसारखा बरसतो, तर कधी सुकुमार तरुणीसारखा लचकत, मुरडत रिमझिमतो, तर कधी दानगटासारखा कोसळतो. असं त्याचं त्या त्या वेळी ते ते रुप आपल्याला भावतंदेखील !

श्रावण महिन्यात वेगळाच नजारा पाहायला दिसायचा. आम्हाला बालकविने रचलेली कविता होती.

‘श्रावण मासी, हर्ष मनाशी, हिरवळ दाटे चोहिकडे !

क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे !!  असे त्या कवितेचे विलक्षण शब्द होते. खरोखरच, क्षणात पाऊस तर क्षणातच उन्ह पडल्याचे चित्र दिसायचं. त्या उन-पावसाच्या रिमझिमणार्‍या धारा कलत्या सूर्यप्रकाशात न्हाऊन जरतारी होत जातांना आम्ही हुरळून जात होतो. जणू काही सूर्यकिरणांना हिरव्या शालुने सजवलेलं सृष्टीचं रूप पाहण्याचा अनावर मोह झाला की काय, असं वाटायचं. त्याचवेळी क्षितीजावर अचानक इंद्रधनुष्य उमलतांना सात रंगाचं उधळण केलेलं तोरण प्रकट झालं की ते विलोभनीय दृष्य मनात झळाळतांना उर भरुन यायचं, तर मनाचा गाभारा त्या सोनेरी प्रकाशाने उजळून निघायचं.

निसर्गाचं रुप कसं सतत बदलत असतं ! पहाना, जेव्हा झाडांची पानगळ सुरु होते, वावरांची उलंगवाडी सुरु होते; तेव्हा आमच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्याची चाहूल लागत होती. मग अंगावरचे केसं भादरलेल्या बोडक्या म्हशीसारखी झाडाची अन् त्या वावराची अवस्था पाहून आमच्या मनात परीक्षेच्या भीतीची अनामीक हुरहूर दाटून यायची. हिरवेगार दिसणार्‍या झाडांची पाने एकाएकी पिवळी दिसू लागत. सूर्याच्या तिरपी न अडखडता थेट जमिनीवर येऊन पडत. सूर्य मावळतीला जातांना आकाशात जो केशरी, तांबडा, नारिंगी रंगाचा उत्सव सुरु व्हायचा; तसाच रंग या पानांना आलेला दिसायचा. एकेक पान गळायला सुरु होऊन जमिनीवर नुसता सडा पडू लागायचा. असं ते ठसठसीत दृष्य अंतर्मनात साठवून जायचं. काही दिवसानंतर नवीन पालवी फुटत; तेव्हा जुन्याने नव्यासाठी मार्ग मोकळा केला पाहिजे. हा निसर्ग नियम हे झाडे अव्याहतपणे पाळत असल्याचं लक्षात यायचं.

एखाद्यावेळेस नदीच्या काठावर परसाकडे बसलो की वाहत्या पाण्याची खळखळ पाहत होतो. त्यावेळेस नदीच्या पाण्यात लहान लहान दगडं फेकत होतो. कुठे आवाज कमी, कुठे जास्त, त्यावरुन कुठे खोल, कुठे उथळ पाणी आहे, याचा अंदाज घेण्याच्या खेळात आम्ही उगीच वेळ घालवित होतो.

एक दिवस असाच खेळात रमलो असतांना गुरुजी शिकवत असलेल्या त्या धड्याची आठवण जागी झाली. दगडावर ‘राम’ लिहून पाण्यात फेकून पाहण्याच्या उर्मीने उचल खाल्ली.

मी लहानसा एक चापट दगड उचलला. त्यावर ‘राम’ लिहीले व खोल पाण्यात फेकला. मला वाटलं, आता चमत्कार होईल व दगड तरंगेल. म्हणून मी उत्कंठतेने डोळे फाड-फाडून, पाहू लागलो. पण दगड पाण्यात काही तरंगला नाही, तर पटकन बुडाला !

मी आणखी दगड घेतला. त्यावर ‘राम’ लिहीले व दुसरीकडे पाण्यात फेकला. पण तोही बुडाला. असा प्रयोग मी पुन:पुन्हा करुन पाहिला. पण कोणताही दगड काही केल्या पाण्यावर तरंगल्याचं मला आढळलं नाही. माझे रामाच्या नावाचे दगडं फेकण्याचे सारे परिश्रम वाया गेले. पण ‘रामाच्या नावाने कोण वाया गेले?’ याचा मला काहीही अर्थबोध झाला नाही. तेव्हा त्या धड्यात काही ‘राम’ नाही हे माझ्या लक्षात येऊ लागलं. पुस्तकात असं खोटं-नाटं लिहून लहानग्या मुलांच्या डोक्यात अशा प्रकारची अंधश्रध्दा का भरतात, कुणास ठाऊक? याचं मला आश्चर्य वाटत होतं.

 

 

 

 

 


कथा नववी – मारकुंडा नवरा

 

‘माह्या नवर्‍याने काही केलं नाहीजी… त्यांना नेऊ नकाजी…’ अशी ती बाई आर्त स्वरात पोलिसाच्या समोर आडवी होत,  विनवणी करीत होती.

तो पोलिस यवतमाळच्या भर बाजारातून  तिच्या नवर्‍याला,  बैलाचे वेसण धरुन शेतकरी जसा ओढत नेतो; तसा तो घाणेरड्या शिव्या देत, त्याची बखोटी पकडून  ओढत नेत होता. त्या बाईची केविलवाणी स्थिती पाहून आम्ही सर्वच गर्भगळीत झालो होतो.

त्या बाईबद्दल मला फार कळवळा होता. कारण मी निळोण्याला शिकत असतांना आम्हा चौधर्‍याच्या मुलांना मोठ्या आपूलकीने प्यायला पाणी द्यायची. कधीकधी तिच्या घरी आम्ही दुपारच्या सुट्टीत भाकरी खात होतो.

आमची शाळा सकाळी ११ वाजता सुरु व्हायची. अन् संध्याकाळी ५ वाजता टनऽऽ टनऽऽ घंटी वाजली की सुटायची. ही घंटी कोलामाचा पोरगा नित्यनेमाने वाजवायचा. एखाद्यावेळेस रस्त्यातच घंटीचा आवाज आला की आमची मोठी तारांबळ उडत असे.

ही शाळा देवळात भरायची. मध्यभागी गाभारा होता. त्यात भला मोठा दगडाचा मारुती देव ठेवला होता. शेंदराच्या थरामुळे चांगलाच फुगला होता. भोवतालच्या रिकाम्या जागेत पहिलीपासून ते चौथी पर्यंतचे वर्ग भरत. ही शाळा जणू काही आमचं दुसरं घरच होतं. गुरुजी म्हणजे कुटुंब प्रमुख आणि मुलं म्हणजे भाऊबंध, असंच वाटत होतं ! आम्ही जमिनीवर तरटपट्टी टाकून बसत होतो. टिनावर पावसाचा टपटप आवाज यायचा. उन्हाने गरम होऊन अंगातून घामाच्या धारा वाहायच्या, तर हिवा-दवात अंगात थंडी भरायची.

शनिवारी मारुतीचा दिवस. या दिवशी लोक पूजा करण्यासाठी नित्यनेमाने येत. आधिच चोपडे झालेल्या दगडाला तेलात शेंदूर भिजवून अधिकच  चोपडे करीत. त्यामुळे तो दगड तुकतुकीत दिसायचा. येतांना-जातांना घंटी वाजवीत. त्यामुळे आवाजाचा गोंधळच गोधळ राहायचा.  पूजा झाल्यावर नारळ फोडत, एक तुकडा देवाजवळ ठेवून बाकी वाटत. त्यामुळे त्यादिवशी शिरणी खाण्याची मजाच व्हायची.

आमच्या जातीच्या  मुलांना गाभार्‍यात चुकूनही जाऊ देत नसत. तसं आम्हालाही अनुभवाने माहित झालं होतं की यांच्या देवळात जाऊ नये म्हणून ! कारण आमच्यामुळे देव बाटतो. ‘वाऽऽ रे… असा कसा हा बाटणारा देव !’ हे कोडं मात्र उलगडत नव्हतं.

चारही वर्गाला  आमचे गुरुजी एकटेच शिकवीत. एका वर्गाला पाढे पाठ करायला तर दुसर्‍याला धडा वाचायला, तिसर्‍या वर्गाला गणिते सोडवायला तर चौथ्याला कविता पाठ करायला सांगत. अशी त्यांची कसरत चालू राहायची. मध्येच कुणी खोडी केली, ओरडला,  अभ्यास केला नाही; तर त्याच्या हातावर छडी पडायची, पाठीवर धपाटा, नाहीतर पोटाचा चिमटा घेत.

मला एकदाच मार बसला होता. गोष्ट अशी होती की मोहल्ल्यातील सर्व मुलं तुळशीरामदादाच्या घरासमोरील पडक्या घरात खेळत होते. खेळण्याच्या नादात त्यादिवशी शाळेत जायचं राहून गेलं. गुरुजींनी चौधर्‍याचे मुलं शाळेत का आले नाहीत, म्हणून बंजार्‍याच्या मुलाला पाठवीले. आम्ही खेळण्याचा मनमुरादपणे आनंद लुटत होतो. तेव्हा त्या पोराला पाहून आमची धांदल ऊडाली. काय कारण सांगावे ते कळत नव्हते. प्रत्येकांनी काही ना काही चिठ्ठीत लिहून दिले. मी लिहिले की, ‘कोणीच मुलं आली नाहीत, मग मी एकटाच कसा येऊ?’

दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर गुरुजींनी एकेकाची हजेरी घेतली. खाली पाडलेल्या बोकड्याच्या मानेवर खाटिक सुरी फिरवताना जसे इतर बोकडे तिरक्या नजरेने पहातात; तसेच आम्ही मास्तरकडे व मार खाणार्‍या पोरांकडे पाहत होतो.

माझा नंबर आल्यावर डोळे वटारून मला म्हणाले,

‘का रे रामराव…?  तू चिठ्ठीत काय लिहिले…? मी एकटाच कसा येऊ…? मलाच विचारतो, कसा येऊ म्हणून?’ असे म्हणत त्यांनी माझे हात छडीने लाल लाल करुन टाकले.

’छडी लागे छमछम विद्या येई घमघम !’ अशी त्यावेळेस म्हण होती. त्यामुळे आम्ही निमुटपणे त्यांच्या छडीचा प्रसाद बाळकडूच्या रुपात घेत होतो. त्यानंतर मात्र मी त्यांच्या हातचा मार कधी खाल्ल्याचं आठवत नाही.

शाळेच्या समोर मैदान होतं. तेथे आम्ही खेळत होतो. गुरुजी कबड्डी, खोखोच्या खेळाचा सराव करुन घ्यायचे. या खेळाने चपळाई, धेर्य, चलाखी व युक्ती असे गुण अंगात भिनते, असे गुरुजी सांगत. आमची शाळा सुटते न सुटते, तर खेळण्याच्या ध्यासाने आमच्या अंगात नुसता उत्साह संचारायचा.

शाळेच्या पाठीमागे परसात लहानसा बगीचा होता. त्यात मोगरा, गुलाब, झेंडू, असे फुलझाडं होते. जवळून वाहणार्‍या ओढ्याचं पाणी आणून आम्ही झाडाला देत होतो. शाळेच्या बाजूला चिंचेचं मोठं  डेरेदार झाड होतं. त्याच्या भरगच्च दाट सावलीत आम्ही खेळत होतो.

शाळेत लस टोचणारे आले की आमची मोठी घाबरघुंडी उडायची. कुठे पळून जावे की काय, असे वाटत होते. त्यात कधी देवीची तर  कधी कॉलर्‍याची लस असायची.  ते टोचतांना डोळ्याला भरभरून पाणी यायचं. ज्याला टोचले त्याचा  रडवलेला चेहरा पाहून बाकीच्यांची पाचावर धारण बसायची. सुई टोचून झाल्यावर गुरुजी  मजाक करुन हासवित.

आठ दिवसातून एकदा तरी आम्ही शेणा-मातीने शाळा सारवित होतो.

गुरुजी यवतमाळवरून रोज जाणे-येणे करीत होते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने कधीकधी घरी न जाता शाळेतच थांबत. शाळा सुटल्यावर पैजाम्याचा खालचा टोक गुंडाळून त्याला क्लिप बाधून घेत; तेव्हा आम्ही समजून जायचो की गुरुजी आता जाण्याच्या तयारीत आहेत. मग ते सायकलवर टांग मारून भुर्रकन निघून जात; तेव्हा त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे मोठ्या कुतूहलतेने पाहत दप्तरपाटी पाठीवर घेऊन, आम्हीपण मुलं गावाला जाण्यासाठी घोळक्याने निघत होतो.

परीक्षा जवळ आली की गुरुजी रात्रीची शाळा घेत. गुरुजी आम्हाला खेळ खेळायला वडगाव या गावाला बैलगाडीने घेऊन जात. तेथे सर्व शाळेच्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या.  गुरुजी या खेळाचे पंच राहत. त्यामुळे आम्हाला मोठा अभिमान वाटत असे.

गुरुजींनी एकदा मानकापूर गावाचे हरिभाऊ गाडगे यांच्या नकलाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या काळात त्यांच्या नकला जबरदस्त गाजल्या होत्या. खेड्यामध्ये कमालीची पसरलेली निरक्षरता, जातीभेद, शिवा-शीव, अस्वच्छ्ता, अंधश्रध्दा, व्यसनाधीनता, खोट्या रुढी-परंपरा  इत्यादी अनेक विषयावर ते लोकशिक्षण करीत. त्यादिवशी आमच्या गावाचे लोक कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. माझा मोठादादा, शामराव देखील आला होता. कार्यक्रमात त्यांनी अनेक नकला सादर केल्या. त्यातील एक नकल माझ्या  चांगली आठवणीत आहे. ती म्हणजे केळवालीची…! लुगडं नेसलेली, भांग-पट्टा केलेली, नटखट,  हुबेहुब बाईसारखी शोभणारी, काखेत केळाचं टोपलं घेऊन,  केळऽवालीऽऽ ओरडत स्टेजवर अवतरली.

‘केळऽवाली…! केळं घ्याऽ केळं… एक आणा डझन…’  असं ती मोठ्या आवाजात म्हणाली. सार्‍यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. त्याचं बाईचं सोंग पाहून सर्वजण क्षणभर अवाक् झाले.

गुरुजी माझ्यावर फार माया करीत. असा काही कार्यक्रम असला की मला पुढं करीत.

‘केळवाली आली की तू जायचं.  तिला एक पैसा देऊन केळ मागायचं.’  गुरुजींनी मला सुचना दिल्या होत्या.

‘मावशीबाई, हे घ्या पैसे. मला एक केळ द्या.’ मी स्टेजवर जाऊन तिला म्हणालो.

‘घेऽऽ  रे… माह्या पोरा… कोणत्या वर्गात शिकतो तू?’

‘चौथीत…’

‘तुहाऽऽ मास्तर कोण आहे रे…?’

‘बबन गुरुजी…’

‘असं होय. चांगला मास्तर आहे.’

मग रडवेला चेहरा करून आर्त स्वरात सांगायला लागली.

‘मी तुह्यासारखाच लहान होती नं,  तेव्हा मीपण शाळेत जात होती. पण माह्या लहान भावाला राखण्यासाठी मला शाळा सोडावी लागली. म्हणून माह्यावर केळे विकण्याची पाळी आली.’

समोर बसलेल्या मुलींकडे पाहून म्हणाली. ‘मुलींनो… आपल्या लहान भावाला, बहिणीला राखण्यासाठी किंवा घरच्या, शेती-वाडीच्या कामासाठी शाळा सोडू नका. शिका… खूप शिका… डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे खूप शिका… शिकल्यावर गुरुजीसारखे मास्तर बनता येईल. नाहीतर पटवारी, ग्रामसेवक तरी बनता येईल.’

ते बबन गुरुजींच्याच कुणबी जातीचे होते. तरीही ते बाबासाहेब आंबेडकरांचे गुणगान करायला कचरले नाहीत. नाहीतर निळोण्यातील कुणबी लोक आमचा विटाळ करीत. एखाद्यावेळी त्यांना पाणी मागितलं की दुरूनच आमच्या ओंजळीत पाणी ओतत.

त्यावेळी खेड्यामध्ये मास्तर, पटवारी, ग्रामसेवक हेच मोठे शिकलेले लोक दिसत. त्यामुळेच की काय खेड्यातील मुलांचं शिक्षणाचं ध्येय अगदी मर्यादित राहत. कारण डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, कलेक्टर कसं बनावं, हे त्याला काहीच कळत नव्हतं.

ती नकलेत हावभाव करुन काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगत होती. त्यात गमती-जमती, हलका-फुलका विनोद असायचा. त्यामुळे लोक खदखदा हसत. तिची नक्कल संपेपर्यंत मला  तेथेच बसवून ठेवायची. एक केळ संपले, की दुसरे द्यायची. पुढे बसलेले मुलं माझ्याकडे मिष्किलपणे पाहून ‘मजा आहे तुझी…’ असे डोळ्याने खुणावून आपल्या असुयेच्या भावना व्यक्त करत. मग नकला संपल्यावर तेवढ्या रात्री दादासोबत गावाला गेलो.

एकदा त्यांच्या नकला पाहायला गावातील लोकांसोबत पांढरी गावाला गेलो. मला केळवाली मावशीबाईने ओळखले. तिने मलाच बोलावीले. मग माझी केळं खाण्याची त्यावेळीसुध्दा मजाच झाली होती. तेव्हापासून काही मुलं मला ’केळवाली’ म्हणून चिडवीत होते.

केळावरुन आठवलं, आम्ही गणेशच्या बगिच्यातील जांब चोरुन खाल्ल्याची ती गोष्ट. शनिवारी सकाळची शाळा असायची; तेव्हा आम्ही बगिच्यात जायचो. त्याला एखादा मुलगा जांब विकत मागायचा. त्याला, ‘हे नाही. ते नाही. त्या झाडाचं द्या.’ असे म्हणत दूर आंतमध्ये घेऊन जायचा. मग इकडे लपून बसलेले मुलं जवळच्या झाडाचे अर्धेकच्चे जांब तोडून दप्तरात भरायचे. तो आल्याची चाहूल लागली की हे मुलं धूम ठोकीत. मग रस्त्याने आम्ही ते जांबं मस्त खात खात जात होतो.

त्यादिवशी घरी आल्यावर गाव कसं सुनं सुनं वाटत असे. कारण सारे लोक शेतात काम करायला जात. मग गावात आमचंच राज्य असायचं.

पोमा लभानाच्या आवाराच्या कुपाचे कोवळे कोवळे कारले तोडून आणायचो. सकाळच्या स्वयंपाकानंतर चुलीत गरम गरम राख व निवे राहत होते. त्याच्या हुपीमध्ये  बाई कारले भाजायची. त्यात तिखट, मिठ टाकून मस्तपैकी चटणी बनवायची. मग शिक्यात ठेवलेल्या दवडीतील भाकर काढून कारल्याच्या चमचमीत चटणीसोबत खाण्यात काही औरच मजा यायची.

मग आमच्या घरी चित्राबाई, सुदमताबाई, जनाबाई, सरस्वती, चांगोणा, वच्छलाबाई, सिताबाई, लक्ष्मी अशा  मुलींचा रंगतदार खेळ सुरु व्हायचा. कधी बाहूल्यांचा तर कधी खेळभांडे, खडे फेकणे, काकणाचा, लगोर्‍याचा, टिकरचा असे अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात मुली गुंग होवून जात.

एकदा तर नवरीन-नवरदेवाचा जिवंत खेळ खेळले होते. गमतीचे बाहूला-बाहूली ऎवजी मलाच नवरदेव व एका मुलीला नवरीन बनवून खेळ मांडला होता. आमच्या दोघांचं लग्न लाऊन देण्यात त्या रमून गेल्या होत्या. लग्नानंतरच्या नवरा-बायकोचा संसार आमच्याकडून मांडून घेतला होता. अशी त्या खेळाची मुली मस्त गंमत घेत होत्या.

त्यादिवशी शाळा सुटल्यावर खूप पाऊस आला होता. पाऊस उघडण्याची चिन्हं दिसत नव्हते. त्यामुळे घरी जावे की नाही याच विवंचनेत आम्ही थांबलो होतो. वाघाडी नदीच्या जवळून आलेले लोक नदीला भयानक पूर आल्याचे सांगत होते. रात्र पण वाढत चालली होती. म्हणून मामाची शेती सोन्या कोलाम वाहत होता, त्याच्या घरी मी बाई, चित्राबाई, व सुदमताबाई राहिलो होतो. बाकीची मुले आणखी कुठेतरी थांबले होते.

पावसामुळे थंडी पडली होती. हातपाय गारठून गेले होते. कोलामाच्या बायकोने हातपाय शेकण्यासाठी विस्तव पेटवून दिला. तिने दुरुनच जर्मनच्या कळकटल्या ताटात भाकरी खायला दिले.  रात्रभर हातपाय गुंडाळून शेकोटीजवळ झोपलो होतो. सकाळी बाहेर ठेवलेल्या फुटक्या कप-बशीत चहा दिला. आमची राहणीमान कितीतरी चांगली; तरीही हे लोक आमचा विटाळ का करीत? ते काही समजत नव्हतं. शाळा शिकत असतांना अशाही काही प्रसंगांना आम्हाला सामोरे जावे लागत होते.

आम्ही निळोण्यात पाय टाकला की महारवाड्यातून शाळेत येत होतो. मग येतांना-जातांना सोमा कोतवाल, नामदेवदुध्या किंवा बाईची वर्गमैत्रीन निर्मला असं कुणाकडे तरी पाणी पीत होतो. दुपारी त्यांच्यापैकी कुणाकडे तरी भाकर खाण्यासाठी जात होतो.

सोमा कोतवालाकडे दुकान असल्याने त्यांचेकडून गोळ्या, बिस्किट किंवा लेखणी विकत घेत होतो. तो आमच्याशी अतीव  जिव्हाळ्याने बोलत असे. शिकणार्‍या पोरांबाबत त्याला मोठा कळवळा वाटत असे.

तसं नामदेवदुध्याचं घर शाळेच्या जवळच होतं. तो दुधाचा धंदा करत होता. म्हणून त्याला ’नामदेवदुध्या’ म्हणत. त्याच्या घराशेजारून आम्ही जात-येत असतांना तो नेहमी शेण-मूत काढतांना, चारा टाकतांना किंवा म्हशीच्या अंगावर पाणी टाकतांना दिसायचा. त्याचं घर आतून-बाहेरून पांढर्‍या मातीने सारवलेलं व अंगणात सडा टाकलेला असं चकचकीत दिसत होतं. त्यामुळे त्याच्या घराकडे पाहिल्याशिवाय आम्हाला राहवत नसे.

त्याच्या घराचं आणखी एक आकर्षण म्हणजे त्याची बायको. त्याची बायको आम्हाला फार आवडायची. मोठ्या बहिणीसारखी वाटायची. तिच्या वागण्या-बोलण्यातली शालीनता आम्हाला सुखावून जात असे. ती दिसायला काळसावळी, सडसडीत, अन् ऊंचपूरी. नाकीडोळी चरचर होती. पाय झाकेपर्यंत चापून-चोपून लुगडं नेसायची.

तरुणच जोडपं होतं ते ! त्यांच्या घरात खेळणारं-बागडणारं एखादं मुल अद्यापतरी दिसत नव्हतं.

आम्ही पोरं दुपारच्या सुट्टीत भाकरी खाण्यासाठी तिच्या घरी जात होतो. कधीकधी तिचं घर बंद असलेलं दिसायचं. त्यावेळी ती दुरूनच डोक्याच्या दोन्ही बाजूला झुकलेला वेडावाकडा गवताचा भारा आणतांना दिसायची. तिने अंगणात भारा आदळला की तिचे विस्कटलेले डोक्याचे लांबसडक काळेभोर केसं अधिकच सुंदर दिसत. मग ती आमच्याकडे पाहून खुद्कन हसत आमचं स्वागत करीत असे.

‘खूप वेळ झाला का? भाकरी खायच्या आहेत ना ! गवत आणायला गेली होती. जरा उशीरच झाला. बसा. मी पाणी आणून देते.’ असं आपुलकीने म्हणायची.

मग अंगणाच्या ओट्यावर नाहीतर घरात बसून फडक्यात बांधून आणलेल्या भाकरी खात होतो.

एकदा मनाला झिणझिण्या आणणारं दृश्य पाहून आम्हाला भोवळ आल्यासारखे वाटले. तिचा नवरा तिच्या उरावर बसून तिला उघड्यावर मारत असल्याचे आम्ही त्यादिवशी पाहिले होते. बरं झालं, तिने आम्हाला पाहिलं नाही. नाहीतर ती फार ओशाळली असती ! आणि आम्हीही लाजेखातर तिच्या घरी जाणे बंद केले असते !

काय बिनसलं होतं का? की तो दारु पिऊन होता, की तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता की आणखी काय… काय माहिती…?

हे दृश्य पाहतांना आमचं संवेदनशील मन गलबलून गेलं होतं. आमच्या डोळ्याच्या कडा नकळत आसवाने भिजू लागलं. ती बाईपण त्याचा मार कसा सहन करत होती, याचं आश्चर्य वाटायचं ! ‘नवर्‍यानं मारलं, पावसानं झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची’. अशी तिची बिकट परिस्थिती झाली असावी.

त्याची निर्दयता पाहून आम्हाला संताप आल्याशिवाय राहत नसे. तो दिसला की आम्हाला त्याची थर्र भीती वाटत होती. कारण तो भीती वाटण्यासारखाच दिसत होता. तो दिसायला काळासा, उंचीने बायकोपेक्षा बुटका, दाढीवर खुरटे केसं वाढलेले, डोळे मोठे आणि नेहमी तराळलेले ! असं जरी असलं तरी त्याचं शरीर मात्र कष्टानं कमावलेलं भरदार असं दिसत होतं.

त्याकाळी खेड्यात घरच्या बायकांना माणसं खूप राबवून घेत. माणसं बाहेरचं कितीही मरणाचं काबाडकष्ट करतील, मणभर किंवा त्याही पलीकडे जाऊन लाकडं फोडतील, जिवापलीकडचं ओझं उचलून नेतील, ऊन-पावसात, थंडी-वार्‍यात मरमर राबतील,  शेतीचं किंवा मजूरीचे वाटेल ते कामे करतील, परंतु घरी आले, की राजे बनत. घरातली पडलेली एक काडी सुध्दा उचलत नव्हते.

घरची बाई मात्र बाहेरचे, शेतीचे किंवा मजूरीचे कामे करण्याशिवाय झाकटीला उठून शेणाचा सडा टाकतील, पोतार्‍याने घर सारवतील, झाडझूड करतील, विहिरीचं पाणी भरतील, खरकटे भांडे घासपुस करतील, चूल पेटवता पेटवता फुंकणीने फु्कून  नाका-तोंडात जाणारा विस्तवाचा धूर झेलतील,  चहाचा आयता कप माणसाजवळ नेऊन देतील, त्याच्या आंघोळीचं तापलेलं पाणी नेऊन देतील, लहान पोरांचं  हागलं-मुतलं काढतील,  स्वयंपाक करतील, सर्वांना जेवणाचं ताटं वाढून देतील, कपडे धुतील असे कितीतरी नानातर्‍हेचे कामे  त्यांना करावे लागत होते. तिच्या जीवाची पर्वा न करता नवरा तिला असे राबवून घेत.

बाई आणि माणूस संसारातील दोन चाकं ! दोन्हीही सारख्या दर्जाचे असल्याशिवाय संसाराचा गाडा व्यवस्थित तरी कसा चालू शकेल? अन् त्याशिवाय त्यांची प्रगती तरी कशी होणार? असे काहीतरी विचार तेव्हा नव्हे पण नंतरच्या काळात मात्र माझ्या मनात घोंगावत असत.

त्या दिवशी यवतमाळच्या  आठवडी बाजारात आम्ही लिंबाच्या झाडाखाली उतार्‍यावर बसलो होतो. या उतार्‍यावर निळोण्याचे व चौधर्‍याचे लोक बसत. तेव्हा तो प्रसंग घडला होता.

नामदेवने काय गुन्हा केला होता, काय माहीत? पण तो पोलिस त्याला जबरदस्तीने ओढत नेत असल्याचे  आम्ही सगळे लोक निर्विकारपणे, हताशपणे पाहत होतो. ते  दृष्य पाहतांना सर्वजण हळहळ करीत होते. त्या माऊलीचा त्या  मारकुंड्या नवर्‍याबद्दल किती लळा होता, हे त्यावेळेस मला जाणवलं ! स्त्री मनातील हळुवार भावनांचे मिश्रण तिच्या अंतरी असल्याचे दिसले.

तिच्या नव-याबद्दल जरी तिरस्कार वाटत असला तरी ती मात्र खरोखरच मायाळू बायको होती, यात काही तिळमात्र शंका नव्हती. तिची माया पाहून माझं मन द्रवलं, हे काही सांगायला नको.

 


कथा दहावी – काय करत होता गा देवा…?

 

माझा मोठेबाबा, पांडू याच्या घराकडे जातांना चिंचेचं झाड लागत होतं. हे झाड खूप वयस्कर होतं. त्याच्या फांद्या जणू काही पक्षाने पंख पसरल्यासारखे विस्तीर्ण दिसत होत्या. हे झाड सदासर्वदा हिरव्याकंच बारीक पानाने गच्च भरलेले दिसायचं. तो बाराने नखशिखांत मोहरून जायचा. त्याच्यावर लोंबलेल्या चिंचा ठसठशीत दिसायच्या.

हे झाड म्हणजे आम्हा मुलांना खेळण्याचं व लोकांना बसण्याचं एक सार्वजनिक ठिकाणच होतं. मस्त करमत होतं तेथे ! या झाडाच्या जवळून पांढरी गावाकडे जाणारा रस्ता म्हणजे पांदण ! मोठेबाबा गावाचा कोतवाल. तो मेलेले ढोरं याच पांदणीने ओढत ओढत नेत होता. दशरथमामाच्या गोटाळी-वावराच्या मोंढ्यात कातडं सोलून घ्यायचा. मग यवतमाळला नेऊन विकायचा. त्याच्या भोवताल जमा झालेले कुत्रे, कावळे व गिधाडे, हे सारे आगंतूक पाहूणे खाद्यावर ताव मारण्यासाठी वाट पाहात.

कुत्र्यांना एकमेकांवर वसकतांना व भांडतांना पाहून मला मोठं नवल वाटत होतं. सारे मिळून गोडीगुलाबीने का खात नाहीत? शेवटी कुत्रेच ते…! त्यांची जातच तशी… नाही का? पण गिधाड म्हणजे निसर्गातील सफाई कामगारच !

पूर्वी आमच्या मोहल्ल्यातील लोक मेलेल्या ढोराचं मांस आणण्यासाठी सुरे, टोपले घेऊन जात. जेवढ्या डल्ल्या खाता येईल तेवढ्या खात. ऊरलेल्या दोरीवर वाळवून खुला करून ठेवीत. मी अगदी लहान असतांना आठवते की बाबा वाडीत दोरीवर मांस वाळवत ठेवायचा. मग त्या भाजून खात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की, ‘मेलेलं ढोर ओढू नका. त्याचं मांस खाऊ नका.’ त्यांनी मळलेल्या वाटा सोडून नव्या वाटेने जायला सांगितले. नव्या वाटा जरीही खाचखळग्याचा व खडतर होत्या, तरीही समाज उन्नतीकडे वाटचाल करायला शिकला होता. मोठेबाबाने नंतर कोतवालकी सोडली. बरबड्याच्या काशा होलाराने कोतवालकी धरली.

आम्ही मुले झाडाच्या खाली व फांद्यावर दमछाक होईपावेतो खेळत राहायचो. झाडाचा बार तोडून चटणी करुन खात होतो. गाभुरलेल्या चिंचा खाण्यात वेगळीच मजा यायची.

चिंचेच्या खोडाजवळ तेल-शेंदूर माखलेले दगडं एका रांगेत ठेवले होते. हे दगडं म्हणजे गावाची ‘मातामाय’ देवी ! एकदा अज्याप तापाने खूप फणफणला होता. त्याला गोवर निघाला होता. आई ताटात पूजेचं सामान: हळद, कुंकु, हिरव्या बांगड्या, पिवळा कपडा, पिवळा दोरा, काळ्या रंगाचा करदोडा, लाकडाची फणी, लाकडाचं बाहुलं, नारळ, दह्या-दुधाचं बोणं व कापसाच्या वातीचा दिवा घेऊन मातामाय जवळ आली. सोबत माझी बहिण जनाबाई पण होती.

ह्या देवीला रक्ताची चटक लागली होती. तिला लावलेलं शेंदूर व कुंकू म्हणजे रक्ताचं प्रतीक ! तिच्या समोर कोंबडे व बकरे कापत. तिची पूजा करतांना आईने एक बांगडी कचकण फोडली. फुटलेल्या काकणाने स्वत:च्या छातीला ओरपली. चिरलेल्या जागेतून रक्त वाहू लागलं. ते रक्त बोटावर घेऊन आईने मातामायच्या दगडावर शिंपडून चोपडलं. आईने तर स्वत:चं रक्तच अर्पण करून तिची भूक भागवली. ते दृष्य खरोखर अंगावर शहारे आणणारं होतं ! माझ्या डोळ्यापुढे अंधारीच आली ! आपला मुलगा आजारातून बरा व्हावा; म्हणून स्वत:ला जखमी करुन घेणं हे कृत्य खरोखरंच आईच्या जगतात अनोखं असंच उदाहरण असेल, नाही का? देवीचं व्रत धरलं की केस विचरता येत नाही. अंगणात सडा टाकता येत नाही. अशी कशी ही देवी जिला स्वच्छतेचं इतकं वावडं होतं !

आईने एक गोष्ट सांगितली. ‘माहा शामराव पोटात होता. त्यावेळी यात्रा-जत्राचं भारीच वेड होतं. देवाचं दर्शन घ्यायचं. कबूल केलेला नवस फेडायचं. शेतातला माल-टाल निघाल्यावर हातात दोन पैसे खुळखूळत. त्यातून यात्रेच्या बाजारात खरेदीची हौस भागवायची. मी व तुहा बाबा कोटेश्वरच्या यात्रेला पायी-पायीच मजल दरमजल करत निघालो.

कोटेश्वर देवस्थान आपल्या गावापासून दहा-बारा कोसाच्या पलीकडे होतं. मधात वाकी गावाला धुरपताबाई – तुही आका, हिच्या घरी मुक्काम केला. आम्ही कोटेश्वरला पोहोचलो, तेव्हा अंधार पडला होता. मंदिराच्या आवारात जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. आम्हीही त्या पंगतीत बसलो. कुणीतरी आम्हाला कोणत्या जातीचे म्हणून विचारले. आम्ही ‘महार’ असल्याचं सांगितल्यावर हातातली काठी उगारुन म्हणाला, ‘महारड्यानो, तुम्ही पंगत बाटवली. ऊठा येथून नाहीतर पाठ सोलून काढीन.’ त्यायच्या भीतीने आम्ही मंडपाच्या बाहेर आलो.

थोड्यावेळाने धुवांधार पाऊस सुरु झाला. मग आमचे हाल पाहवत नव्हते. भरपावसात उपासीपोटी ती रात्र कशी-बशी जागून काढली. थंडीने अंगात हुडहुडी भरली होती. पण त्या कोटेश्वरात कोटी-कोटीने ठाण मांडलेल्या एकाही देवाला आमची किव कशी आली नाही? असा प्रश्न मनात उमटत होता. ’आईने सांगितलेल्या अशा अनेक गोष्टीत तिने सोसलेल्या दु:खाचे दाहक चटके व असह्य मनोव्यथा ऐकून माझ्या उरात उमाळा दाटून येत असे.

त्यावेळी खेड्यात कॉलरा, पटकी, देवी, प्लेग असे अनेक साथीचे रोग येत. त्यात लोक पटापट मरत. बाबा अशीच एक गोष्ट सांगत होता. ‘त्या वर्षी गावात मरगड आली होती. उलटी, हागवणीने लोक पटापट मरत. एकाला उचललं की दुसरा मरुन तयार राहायचा. मयती उचलायला लोक घाबरत. त्यातच पांड्याची नवरी म्हणजे माही भावजय पण मेली.’

मला आठवते, गावामध्ये देवीची साथ आली होती. त्यात दादारावचे दोन मुले एकाच वेळेस मेले. अनुसया वहिनी – तुळशीरामदादाची बायको, हीला पण देवीच्या आजाराने घेरलं होतं. कपडा अंगाला चिकटतं म्हणून तिला लिंबाच्या पानावर झोपवत. यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात तिला नेले होते. ती वाचली. पण लभान तांड्यात बरेच मुलं मरण पावले. कारण ते दवाखान्यात इलाज न करता देव-देवींच्या मागे लागले होते. आमच्या घराच्या समोरील देवळात कोंबडे, बकर्‍यांचा बळी देण्यापूर्वी पूजा करण्यासाठी घेऊन येत. मग खारीत नेऊन कापत. हे पाहून मला वाटायचं की खरंच देव कोंबड्या-बकर्‍यांचा बळी मागत असेल का, की हे माणसेच आपल्या खाण्यापिण्याची सोय करीत असतील !

एकदा बंजारा बाईच्या अंगात भूत आल्याचं कळल्यावर मी सुध्दा उत्सुकतेपोटी पहायला गेलो. तेथे गोविंदा – वार्धक्याकडे झुकलेला, पांढरी लांब दाढी वाढलेली, त्याला दाढ्यासाधु म्हणत, तिला पळसाच्या फोगाने मारत तोंडाने काहीतरी बडबड करत होता. ते दृष्य पाहून अंगावर काटे आले. ती बाई जीवाच्या आकांताने रडत होती. तिचे हातपाय थरथर कापत होते. माराच्या भीतीने ती अंग चोरुन घ्यायची. तिला काहीतरी आजार झाला असावा. पण भूत-खेत उतरवण्याच्या पायी तो तिचे हाल करत होता. ते न पाहवल्यामुळे मी घरी परत आलो.

एकदा वावरातून येतांना लभान बाईला साप चावला. रस्त्यात टोंगळभर गवत वाढलेलं. त्यामुळे रस्ता झाकून गेला होता. अंदाजाने चालतांना तिच्या पायाला साप चावला. ती घरी आली. घरच्यांनी दाढ्यासाधुला बोलावीले. त्याने साप उतरविण्याचा प्रयोग सुरु केला. तिचा पाय सुजला होता. शरीर काळे-निळे पडत चालले होते. तोंडातून फेस येऊ लागला होता. परंतु त्याच्या मंत्राला काही यश आले नाही. मी घरी आलो न आलो, तर रडण्याच्या करुण किंकाळ्याचा आवाज माझ्या हदयाला येऊन भिडल्या. ती बाई मरण पावली, हे कळून चुकलं. खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याने तिचा घात झाला. तसंही तिला दवाखान्यात न्यायची सोय नव्हती, म्हणा…! योग्य उपचाराअभावी तिचा अनाठायी जीव गेला. ही गोष्ट माझ्या तरल मनाला फार चाटून गेली होती.

एकदा बाबा रात्रीला बरबड्याच्या शेतातून घरी आला. त्याला घामाघूम झाल्याचं पाहिलं. मी विचारलं. ‘बाबा, तुम्हाला एवढा घाम का आला?’

‘अरे, मला बरडाजवळ आगिचा लोळ उठलेला दिसला. म्हणून मी घाबरुन पळत आलो.’

त्यावेळी भयान रात्र होती. दिवसा सूर्य आग ओकत होता. म्हणून दिवसभराच्या उष्णतेने जमीन किंवा जमिनीत असलेले धातू तापले असावेत. त्यामुळे अंधार्‍या रात्रीत उष्णता बाहेर पडत असल्याने कदाचित आग दिसत असावी. असं काहीतरी वैज्ञानिक कारण मी बाबाला सांगितले होते.

त्यावर्षी आमच्या शेतात भुईमूंग पेरला होता. त्यादिवशी संध्याकाळी दादाने मळ्याजवळ शेंगा भाजल्या. एक अनोळखी व्यक्ती धनपाल सोबत भाजलेल्या शेंगा खात असतांना मी पाहिलं. मी हळूच धनपालला त्या अनोळखी व्यक्ती बद्दल विचारले. त्याने सांगितले की,

‘तो भगत आहे. मामाच्या गावावरून आला. आपल्या गावात एक बाई करणी करते नं म्हणून तिला वेसण घालण्यासाठी आणलं.’

ही बातमी घरोघरी पोहचल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी धनपालच्या घरी जत्राच भरली होती. मी पण कुतूहलापोटी गेलो होतो. त्याच्या घरी देव्हारा मांडला होता. तो लाकडी पाटावर उभा राहून डोळे वटारुन पाहत होता. धोतर खोचलेला व अंगात बंडी घातलेला. डोक्याचे लांब केसं मोकळे सोडले होते. कपाळाला कुंकू व हळद माखली होती. मी आदल्या दिवशी पाहिलेले रुप व आताचे रुप काही वेगळेच दिसत होते. तो अचकट-विचकट तोंड करुन अख्खा निंबू तोंडाने फोडून रस पीत होता. ‘जय मातामाय’ ओरडून कमरेचा वरचा भाग एका लयीत घुमवत होता. त्याचं ते रौद्ररुप भयानक वाटत होतं. त्याच्या भोवताल बाया जमल्या होत्या. प्रत्येकीकडे जर्मनच्या ताटाची आरती, त्यात कुंकू, तेलाचा दिवा, उदबत्त्या व चिल्लर पैशाची नाणी ठेवलेले होते. कोणी म्हणत मुल-बाळ होत नाही. कोणी म्हणत बिमारी बसत नाही. असं प्रत्येकजणी आपापले गार्‍हानी घुमणार्‍या देवासमोर मांडीत होत्या.

माझ्या वहिनीने वनिताला आणले होते. वनिता अगदी लहान होती. तिचे पोट फुगले होते. हातपाय बारीक झाले होते. तिची अनेक वेळा दीठ काढली. पण काही उपयोग झाला नाही. खेड्यात काही झालं की दोन तीन मिरच्या अंगावर ओवाळून चुलीतल्या जाळात टाकत. ठसका नाही लागला की, ‘दिठच होती बाप्पा’ असे म्हणून दीठ निघाल्याचं समाधान चेहर्‍यावर झळकवीत.

तिला बाबाने गावठी झाड-पाल्याचं औषधपाणी देऊन पाहिलं. तिला सरकारी दवाखान्यात नेलं. तरी तिचा आजार काही केल्या बसत नव्हता. म्हणून वहिनी भगताकडे घेऊन गेली. भगताने सांगितले की, ‘गावातल्या बाईने तिला ‘करणी’ केली. मातामायला दहीबोणं घेऊन जा. उपवास कर. कोंबडं काप.’ असाच इलाज तो जसा इतर बायांना सांगायचा, तसाच वहिनीला सुध्दा सांगितला.

भगताचा हा सारा प्रकार पाहून मी थक्क झालो. मला तिथे विरोध करण्याची हिंमत झाली नाही, पण घरी आल्यावर वहिनीला बोलल्याशिवाय राहावलं नाही.

‘वहिनी, ह्या भगताचं ऐकून वनिता काही बरी होणार नाही. कोणत्याही रोगावर औषधीचा उपचार करावा लागतो. तो नुसतं मातामायची भक्ती व कोंबडं कापायाला सर्वांनाच सांगतो. प्रत्येक रोगावर हाच इलाज कसा? असं जर असतं तर सरकारने दवाखाने न काढता नुसते मातामायचे देव्हारे गावोगावी मांडले असते. म्हणून आपला वेळ, पैसा व शक्ती खर्च करण्यात काहीही अर्थ नाही. आपल्या अवतीभवती निसर्गात ज्याकाही घडामोडी होतात, त्यामागे कोणते तरी कारण असते. ते समजणे आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्याने दैवी चमत्कार वाटतो. आपल्या अज्ञानाचा फायदा भगत लोक घेतात. आता भगताच्या मागे लागू नको. वनिता औषधानेच बरी होईल.’ असे काहीतरी विचार मी तिला सांगितले होते. माझ्या वाचनाने मलाही थोडंफार ज्ञान अंधश्रद्धेबाबत अवगत झालं होतं.

सुरेभानने मोईतूराची बायको केली होती. जवान होती ती ! त्याच्या पहिल्या बायकोचं नाव राधा. हिलाही राधाच म्हणत. तशी ती नखरेल वाटत असल्याने बाया तिला नावं ठेवीत. ती सुरेभान सारख्या गरीब व भोळ्याभाबड्या माणसासोबत खरेच संसार करील काय, अशी शंका घेत. म्हणूनच ती अंगात देवी येण्याचं नाटक रचून ढोंग करीत होती. गावातील लोक तिला ’पिसी’ म्हणून चिडवित. ती जेव्हा घुमायला लागायची, तेव्हा तीचे घुमणे मोठ्या कुतूहलाने पहात होतो. तिच्या भोवताल गावातल्या बाया जमा होत व काहीबाही विचारीत. ती घुमता घुमता हिंदी भाषेत बडबड करायची. आम्हा मुलांना तिची अनामिक भीती वाटायची. पण मजा सुध्दा यायची. खरोखरच, एके दिवशी ती पळून गेली.

आमच्या गावात दसर्‍याच्या दहा दिवस आधी कोतवालाच्या घरी ‘इनाई’ बसवत. ही एक गावदेवी होती. शेतातून बाया गाणं म्हणत माती आणायच्या. त्याची इनाईदेवीची मूर्ती बनवीत. दहा दिवस रोज तिची पूजा करीत. दहाव्या दिवशी तिला नदी-नाल्यात शिरवायला घेवून जात.

‘माही लाडाची गवरा, थालीभर पाणी नेजाजी…

माही झोपेची गवरा, तिला उशी मांडी देजाजी…

माही भुकेची गवरा, संग शिदोरी नेजाजी…’

असे गाणे म्हणत. म्हणजेच त्यावेळच्या अज्ञानी समाजात काव्य किती प्रगत होतं, याची प्रचिती येते. शहरात इनाईदेवीच्या हातात विणा असलेलं वाद्य मी पाहिलं होतं. या विण्याचे भोक्ते म्हणजेच त्याकाळचा कलावंत असलेला महार-मांग समाज होता, असंही म्हणता येईल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ‘लेवण्याचा’ ठेका बामणाकडे असेल, पण गाण्या-बजावण्याचं वेड मात्र महाराला होतं. म्हणूनच ‘मान घे मानाई, महाराघरची इनाई’ या खेड्यातील म्हणीवरुन महारांची कलासक्ती आणि त्यांचं गाण्याशी नातं निर्देशित करते.

दसर्‍याच्या दिवशी मी त्याकाळी भयानक प्रकार पाहिला. भुरा कोतवालाच्या घरून हल्याला वाजतगाजत हरसिंग लभानाच्या घरी नेत. त्याला त्याबाबतीत मान होता. तो पूजा करून हल्याच्या मानेवर धारदार सुरा मारायचा. मग रक्तबंबाळ झालेल्या हल्याला कोतवालाच्या घरी आणत. लोक त्याच्या मानेतून निघणार्‍या रक्ताचे आपल्या घराच्या भिंतीवर हाताच्या पंजाची छाप उमटवित. त्यामुळे घरात रोगराई येत नाही, असा समज होता. नंतर हल्याला कापत व हिस्से पाडून शिजवून खात. किती अघोरी प्रकार होता हा ! अशाप्रकारे गावातील लोक अंधश्रध्देत आकंठ बुडालेले होते.

मी लहान होतो. त्यावेळची गोष्ट आहे. मला चांगलंच आठवते. उन्हाळ्याचे दिवसं होते ते. गावातील लोक रात्रीचे जेवण आटोपून नुकतेच झोपेच्या आहारी गेले होते. काळाकुट्ट अंधार पसरला होता. मध्येच सार्‍या कुत्र्यांचं एका सुरात इरावनं सुरु झालं. त्यांचं इरावनं भीतीदायक वाटत होतं. आम्ही अंगणात झोपलो होतो. डोळ्याला डोळा लागतो न लागतो तर इतक्यात जिकडे तिकडे गलबला उठला. लोकांचा एकदम कल्ला, विस्तवाचा तडतड आणि ठीणग्याचा चट्चट् आवाज ऎकून आम्हीही खडबडून जागे झालो. पाहतो तर घराच्या पाठीमागे आगीचे लोंढेच्या लोंढे आणि धुराचे लोट ऊठलेले दिसत होते. आगीच्या ठिणग्या आकाशाला जाऊन भिडत होत्या. आकाशाचा रंग लालवट आणि धुराने काळवंडल्यासारखे दिसत होते. गवताचे घरं भुरुभुरु जळत होते. लक्ष्मणमावसाच्या घराच्या पलीकडील घरांना आगीने लपटले होते. आधिच पाण्याची टंचाई, त्यात ही आग…! आग विझवायला पुरेसं पाणी नव्हतं. तरीही माणसं-बाया, पोरं हातात जे मिळेल ते साहित्य: बालट्या, गुंडं, चरव्या, मडके, पिपे, गंज, घागरी, टमरेल, चिंपटं, यात होतं नव्हतं तेवढं पाणी घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीत होते. कुणी उगीचच आगीवर माती फेकत होते. तरीही आग काही केल्या आटोक्यात येत नव्हती. वार्‍याच्या झोताने आग आणखीनच वाढत होती. आमचा अर्धा मोहल्ला आगीच्या कचाट्यात सापडला होता. आमचे घर धरून त्या रांगेतील काही घरे वाचले होते.

सकाळी जिकडे तिकडे राख, जळलेला लाकूडफाटा, फुटलेले कौलं, वाकलेले टिनं इतस्तत: पडलेले होते. ते दृष्य पाहावल्या जात नव्हतं. जे काही किटूक-मिटूक घरात होतं, ते सारं जळून खाक झालं होतं.

ही आग आमच्याच समाजाच्या मोहना नावाच्या माणसाने लावली, अशी चर्चा गावात होती. तो दिसायला उंचापूरा, धिप्पाड व चार-चौघात उठून दिसणारा होता.

तो गावात काहीतरी नवीनच घेऊन यायचा. त्याने आणलेल्या वस्तू नवलाईने पाहायला, आम्ही मुले त्याच्या घरी जात होतो. आम्हाला मोठं कुतूहल वाटायचं. एकदा त्याने गाणे वाजवायचा ग्रामोफोन आणला होता. त्याला जोडलेल्या भोंग्यातून गाणे उमटत. आम्हाला मोठी गंमत वाटायची.

तो समाजासोबत न राहता बाबासाहेबांनी दिलेल्या बुध्द धर्माला विरोध करीत होता, असे लोक म्हणत. गावातल्या बाया, ‘आपलंच घर नि हागून भर, असा हा बुहारा मोहना पटकन मरतही नाही.’ अशा शिव्या-शाप देत.

तो लभानलोकांना साथ द्यायचा. समाजातील लोकांनी गावकीचे मेलेले ढोरं ओढण्यासारखे अपमानजनक कामे करणे सोडल्याने लभान लोक चिडून होते. म्हणून ते मोहना सारख्या माणसांना हाताशी धरत.

एक दिवस पंचशील झेंड्याजवळ जात-पंचायत भरली. त्यात त्याला समाजविरोधी कृत्यामुळे जातीच्या बाहेर टाकले होते. म्हणून तो गावातून निघून गेला.

मी यवतमाळला शाळा शिकत होतो; तेव्हा कधीकाळी भेटला की माझी मोठ्या आस्थेने विचारपूस करायचा.

माझ्या मोठ्याबाबाचे पूर्ण घर जळलं होतं. त्याच्या घरी चौरंग पाटावर शेंदूर, तेल लाऊन तुकतुकीत व गोलगोल असलेले पाच दगडं ठेवले होते. त्याला पाच पांडवाचा देव म्हणत. आमच्या जुमळे घराण्याचे पूर्वज त्या दगडाला पुर्वापार पूजत आलेले होते.

त्या दगडाला पाहून मोठ्याबाबाचा मुलगा, बापुरावदादा म्हणाला,

‘आमचं घर जळत होतं, तेव्हा तू काय करत होता गा देवा….? तू का नाही आमच्या घराला वाचवलं…?’ असं म्हणून दादाने देवं उचलले. एका टोपल्यात टाकले व वाघाडी नदीत जावून बुडवून आला. तेव्हापासून आमच्या घरातील सर्व देव पळून गेले, ते कायमचेच !

‘हजारो वर्षापासून आमचे पूर्वज देव पूजत आलेत. जत्रा-यात्रेला गेलेत, उपास-तापास केलेत, पण कोणत्याही देवाने आमची सुधारणा केली नाही. म्हणून तुम्ही हे सारे देव सोडून द्या व आपल्या मुलांना शिकवा. खूप शिकवा.’ असे बाबासाहेब समाजाला शिकवून गेले.

बाबासाहेब म्हणजे आमच्या गावाच्या लोकांचा ‘जीवकी प्राण’!  त्यांच्या शब्दाखातर गावातील लोकांनी देव पूजणे नेहमीसाठी सोडून दिले. त्यामुळेच अंधाराचे जाळे फिटून प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्यात.

 

 


कथा अकरावी – बुध्दाने पुन्हा जन्म घेऊ नये

 

आमच्या गावात पोळ्याशिवाय दिवाळीचा सन साजरा व्हायचा. शामरावदादा बाजारातून दिवणाल्या विकत आणायचा. त्यात खायच्या तेलात कापसाच्या वाती पेटवून घराच्या कोपर्‍यात, अंगणात, नहाणीत व कोठ्यात नेवून ठेवायला मला सांगत होता. त्या लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशाने क्षणभर का होईना अंधार दूर करण्याचा प्रयत्‍न केल्या जात होता.

त्यादिवशी गाईंना खेळविण्यासाठी सजविल्या जात. गाई म्हणजे खेडूत लोकांची धन-संपत्ती – जसं शहरी लोकांचं सोनं-नाणं, तसं ! गावातले सर्वजण आनंदाने हा सण साजरा करण्यात मग्न राहत. गायकी सकाळी गोठाणावर गायी जमा करून गावात घेऊन यायचा. माणसांचा गलबला, डफड्याचा, गाई-ढोरांच्या हंबरण्याचा व गळ्यातील घुंगराचा आवाज आला की मी धावतच देवळाजवळ येऊन थांबत होतो. गायकी गायींना डफड्याच्या तालावर, वाजत-गाजत देवळाच्या भोवताल तीनदा फिरवायचा. गायीसोबत बकर्‍या व म्हशी सुध्दा राहत. त्यांच्या पायाने उधळणारी धूळ जिकडे-तिकडे धिंगाणा घालीत असे.

आणखी गंमत म्हणजे डफडेवाला, डफडं म्हशीच्या समोर समोर करायचा. त्या म्हशी भेदरून भ्याऽऽ भ्याऽऽ करीत, त्याच्या मागेमागे धावत. ते दृष्य पाहण्यात मजेशीर वाटत होते. कोणी गजगोट्यात बारुद भरुन गाईंच्या समोर फोडत. त्याच्या आवाजाने गाईंची दाणादाण उडत असे. आम्ही मुले टिकल्या फोडत होतो. बारीक बारीक फटाके पेटवून गाईच्या समोर फेकत होतो. काही लोक मोठ्ठाले फटाके पेटवून धमाल उडवित.

बाबाने आवाराच्या बाहेर कोपर्‍यात खड्डा खोदला होता. तेथे गायी-ढोरांचं शेण आणून टाकायचा. मग त्यादिवशी गायीच्या खुराने शेण तुडविल्या जावून बारीक मऊशार होत असे.

गायकी एक गाय सोडून बाकीच्यांना साथीदारासोबत रानात चरायला पाठवून द्यायचा. त्या गायीला वाजत-गाजत गावात आणायचा. त्यादिवशी सकाळीच शेणाचं गोधण घरोघरी अंगणात थापत. त्याचेवर झेंडूचे फुले टोचून ठेवत. भोवताल रांगोळी काढीत. गायकी गायीच्या पायाने गोधणाला व शेणाने बनवीलेल्या मशासुर राक्षसाच्या प्रतिकाला तुडवायचा. संध्याकाळी गोधणाचे पाच पांडव बनवून त्यावर झेंडूचे फुले टोचून ठेवत.

वहिनी गाईची पूजा करून पुरणपोळीचा घास भरवायची. सुपातल्या ज्वारीचे व पैशाचे दान गायक्याला द्यायची. सोबतचा कोलाम सुमधुर आवाजात बासरी वाजवायचा. दुसरा डडांग… चीकणूक… डडांग… असा डफड्याचा आवाज काढायचा. या आवाजाने वातावरण मस्त भारावून जात होते.

त्यादिवशी जेवणात पुरणपोळी असायची. भज्याचा खमंग वास यायचा. पुरणपोळी व त्यावरील साजुक तू्पाचा वास नाकात घुमायचा. सोबत कढीचा फुरका. तसेच चकल्या, करंज्या व अनारसे असे कितीतरी पदार्थ वहिनी बनवित असे. मला अनारसे खासच आवडायचे. तसेच काशी कोहळ्याचे गोड-गोड बोंडं तळत. असा गोडधोड जेवणाचा बेत त्यादिवशी घरोघरी राहत होता. संध्याकाळी दिवस कलल्यावर अंगणभर जनाबाई व वहिनी रांगोळी काढीत. रात्रीला जेवणाच्या आधी सारेजण फटाके फोडण्यासाठी अंगणात जमत. कोणी फुरफूर्‍या… सुरसूर्‍या… फुलझड्या… हातात घेऊन पेटवीत तर कोणी भुईचक्र… झाडं… पेटवीत. कोणी बारीक फटाके उडवीत. कोणी मोठे बॉम्ब फोडत तर कोणी रॉकेट उडवत.

सुरुवातीला आमची परिस्थिती चांगली होती; तेव्हा भरपूर फटाके फोडायला मिळत. काही गरीब मुलं फटाक्याचा आवाज आला की पळतच आमच्या घराकडे येत. जवळपास थांबून मोठ्या कौतुकाने पाहत. न फुटलेले फटाके उचलून घेत.

दिवाळीच्या वेळेस यवतमाळवरुन भाजीपाला विकून बैलगाडीने गावाकडे येतांना शहरातल्या घरोघरच्या अंगणात लोक फटाके फोडतांना दिसत. जिकडे तिकडे फटाक्याचा आवाज कानात घुमत होता. त्याचा रंगिबेरंगी उजेड डोळ्याला दिपवून टाकायचा. त्यावेळी मला मोठं कुतूहल वाटायचं. गाडी शहराच्या बाहेर पडेपर्यंत हा अनोखा नजारा पाहायला मिळत होता. शहराच्याबाहेर आल्यावर अंधारधूक पडून जायचं. मग दुरुनच आकाशात दिसणार्‍या लख्ख प्रकाशाचं विहंगम दृष्य हळूहळू मंद होत गेला की मनाला हुरहूर वाटत असे. तरीही अंधारलेल्या आकाशात शहराच्या दिशेने दुरुनच एखादा उजेड चमकून गेला की स्तब्ध असलेलं मन खडबडून जागं होत असे.

दुसर्‍या दिवशी पाडव्याला वहिनी बाजीवर बसवून उटण्याने सकाळीच आंघोळ घालून द्यायची. त्यावेळी खूप थंडी लागत असे. दिवाळीत झेंडूच्या फुलाचा फार वापर व्हायचा. त्याच्या पाकळ्या काढून त्यातून निघणारा गाभा खात होतो. तो खोबर्‍या सारखा लागत असे. दिवाळीत मोराचे पिस गायीच्या शिंगाला बांधत. मला मोराच्या पिसाचं भारी वेड. त्याला मी पुस्तकाच्या पानात जपून ठेवत होतो. फावल्या वेळात त्याच्या मुलायम केसांचा हळूवार स्पर्श गालाला कितीदा तरी लावत होतो.

मांडावसच्या सणाला शेतकरी शेताच्या कामासाठी नवीन गडी ठेवीत. शेतकर्‍यांसाठी हे नवीन वर्ष राहायचं. दसरा झाल्यावर पाचेक दिवसाने माडी पोर्णिमा यायची. खेड्यामध्ये या सणाला सुध्दा फार महत्व असायचं. यादिवशी पोर्णिमा राहत असल्याने रात्रीला चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश पडायचा. रात्रीला जेवण करुन लोक बाहेर बसत. अंगणामध्ये पोरीबाळी खेळत. त्यांच्या खेळ-गाण्याने रंगत वाढत असे. बाया-माणसं, पोरीबाळी गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, गमती-जमती करणे, मनोरंजण करणे अशा मौज-मजेच्या कार्यक्रमात आपले मन रमवित. गुणी लोकांना आपापली कला प्रदर्शीत करण्याची संधी मिळत असे. लोकांचेही मनोरंजण होत असे. असे तीन-चार दिवस धामधुमीचे संपले की परत शेतीच्या मशागतीचे दिवसं सुरु होत.

खेड्यामध्ये टेलिफोन नसल्याने लोकांना कुतूहल वाटत होते. त्यावेळी शहरातील लोकं टेलिफोनवर बोलत असल्याचे मी पाहत होतो. म्हणून मी, अर्जुनला घेऊन टेलीफोनची नक्कल करायचं ठरवलं.

मी एकीकडे माझ्या कानाला हात लाऊन हॅलो हॅलो म्हणत होतो. दुसरीकडे अर्जुन कानाला हात लाऊन दुसर्‍या हाताने हालवल्याची ऍक्टींग करत होता. मी त्याला म्हणत होतो,

‘अरे, मी तुला हॅलो हॅलो म्हणतोय, तू बोलत का नाहीस?

‘तू सांगितल्याप्रमाणे मी हालवत आहे, ना…’

‘अरे, तसं नाही. फोनवर बोलतांना सुरुवातीला हॅलोऽऽ हॅलोऽऽ म्हणतात. नंतर बोलायचं असते.’       त्यावर लोक पोट धरुन हसत.

तुळशीरामदादा व गुलाबदादा माडी पौर्णिमेला अंगणात जाड दोरींचा पाळणा बांधीत. पाळणा इतका मोठा व उंच असायचा की त्यावर दोघ्याजणी उभ्यानेच झोका घेत. त्यांचा झोका आभाळाच्या दिशेने उंचच उंच जायचा. झोका घेतांना,

‘झुनझुनू पाखरा, जा माह्या माहेरा,

माहेरच्या वाटेनं कमानी दरवाजा…!’ असे काहीतरी गाणे म्हणत. त्या मस्त आनंदाने बागडत व मुक्तपणे झोके घेत. सुनवारी आपल्या मनातले जळमटं ह्यावेळी काढून टाकत. आम्हा मुलांना संधी मिळाली की आम्ही सुध्दा पाळण्यावर बसून झुलण्याची मजा घेत होतो.

काहीजणी फुगड्याचा व हाताला हात धरुन गोल गोल फिरण्याचा खेळ खेळत. त्या एकमेकींच्या कमरेला हात धरून नाचत जाऊन गाणं म्हणत.

वैदुदादा वैदुदादा घरावरी चाल गा, चाल गा…

बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा…

माही सासू म्हणते गा, म्हणते गा…

तुले खुटयाची मैस देते गा, देते गा…

असे काहीसे गाणे म्हणत; तेव्हा मी मंत्रमुग्ध होवून ऐकत असे.

आम्हीही पोरं: मी, अर्जुन, धनपाल, कुंडलीक, सुखदेव, दामु, रमेश, शंकर असे माझ्या बरोबरीचे, माझ्या घरासमोरील देवळाच्या पारावर उजेड्या रात्री उगीच इकडल्या-तिकडल्या गप्पा-गोष्टी झाडत, तंबाखू खात बर्‍याच वेळपावेस्तो मन रिझवीत होतो. कधीकधी गप्पा-गोष्टींना इतका उत यायचा की रात्र किती निघून गेली ते कळायचं नाही. तरीही आमच्या गोष्टी काही संपत नसायच्या. एखाद्या वेळेस अंगणात झोपलेल्या शामरावदादाला चेव आला की आवाराचा दरवाजा उघडून आमच्यावर बावरायचा.

‘झाल्या असतील ना गोष्टी… पोट्टे हो…? जा ना बे… आपापल्या घरी… रामराव, चाल ये घरात.’ तेव्हा कुठे आमची रंगात आलेली मैफील एकाएकी तुटून जायची.

एकादिवशी मोठी आफतच आली होती. कुणाच्या डोक्यातून भन्नाट कल्पना प्रसवली, कोण जाणे? तो म्हणाला,

‘चलता का बे…? सिनेमा पाहायला…’

आता खेड्यात कुठे आला सिनेमा? तरीपण आमच्या पुढून गेलेलं ते नवविवाहीत जोडपं पाहून, त्याच्या म्हणण्याचा रोख आमच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. ते रात्रीला जेवण करुन जुन्या घरी झोपायला जात. त्यांनी ज्यांचं घर विकत घेतलं, त्याला समाजाने जातीबाहेर टाकलं होतं; म्हणून तो शेतात राहायला गेला. त्याने म्हणे, त्याच्या कुत्र्याचे नावे गावातील लोकांच्या नावासारखे ठेवले होते. कोणी त्याच्या घरापुढून जातांना दिसले की,

‘ऎ पांड्या, कोंड्या, दमड्या, गोविंद्या यारे भाकर खायले.’ असं मुद्दामच कुचेष्टेने जोराजोरात ओरडून कुत्र्यांना बोलावीत होता. अशा रीतिने वाळीत टाकणार्‍या म्होरक्या लोकांवर तो आपल्या रागाचा वचपा काढीत होता.

मग आमची सार्‍यांची फलटन त्याच्या घरापर्यंत गेली. तिथे गेल्यावर एकाने घरामागील डेळीवर चढून भिंतीच्या भोकातून आतमध्ये डोकावून पाहीलं न पाहिलं तर आतून बोंबलण्याचा आवाज आला,

‘कोण आहे रे, भडव्यांनो…?’

ते ऎकून आमची गाळणच उडाली. तो पुढे आणखी काहीतरी शिव्या देत होता. पण ते ऎकण्यासाठी आम्ही थांबलोच होतो कुठे? तसंच धूम ठोकून थेट घरी आलो. अंगणातल्या सातरीवर अंग टाकलं. मोठी धाप लागली होती. छाती धडधड करत होती.

सकाळीच तो माणूस माझ्या घरी आला. दादाला सांगायला लागला.

‘रातच्याला पोट्टॆ पारावर बसतात. त्यात तुहा भाऊपण होता. हे पोट्टे माह्या घरामागच्या भोकातून पाहत होते…’

मी अंगणात तोंड धुतांना त्याची तक्रार मुकाट्याने ऎकत होतो. लाजेने मी पार ओशाळलो होतो. दादा मग माझ्याकडे वळून मुसळधार पावसाप्रमाणे बरसला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता.

‘का रे, लगन करुन देऊ का तुवं? गांडीत नाही गू न् चालला हागाले…! पुन्हा पारावर दिसला का तंगडं मोडून ठेवीन.’ रागावलेल्या आवाजातील त्याचं खऊट बोलणं माझ्या काळजाला चिरत गेलं. दादा फारच चिडला की असं जिव्हारी झोंबणारं बोलायचा. त्याचा एक-एक शब्द माझ्या काळजाला डंख मारून जात होता. खाली मान घालून चुपचाप ऎकण्याशिवाय दुसरं काय करु शकत होतो? माझ्या हातून खरंच मोठी चूक घडून गेली, याची मला तिव्रतेने जाणिव झाली. अपराधाच्या पश्चातापाने माझे ओठ थरथरत होते. अनवधानाने का असेना, असा किळसवाना प्रसंग घडून गेला की बरेच दिवस मनाला चुटचुट लागून जात होती.

त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला. शेतकरी जसे मोकाट जनावरं वावरात घुसू नये म्हणून कुंपण घालतात, तसेच मीही माझ्या मनाभोवती कुंपण घातलं. तेव्हापासून उशिरा रात्रीपर्यंत पारावर बसणे टाळत गेलो.

होळीचा सण म्हणजे मौजमजेचा सण ! या सणाला रंगच चढत असे. आम्ही मुलं घणमाकड गाडून त्यावर दिवसभर फिरत राहत होतो. होळी म्हणजे खेड्यातला शिमग्याचा सण ! मोठ्ठाले पोरं घनमाकडीवर जोराजोरात फिरतांना अश्‍लील व विनोदी भाषेचा वापर करुन बोंबा मारत. जसं- ‘होळी रे होळी अन् पाटलाच्या xxx बंदूकीची गोळी.’ अशा प्रकारच्या बोंबा असायच्या.

घनमाकडाचा किरकिर आवाज लांब दूर पर्यंत ऎकू जात. याच मैदानात आम्ही होळी पेटवित होतो. होळीत पेटविण्यासाठी निरनिराळ्या आकाराच्या हाताच्या पंजाने थापलेल्या गोवर्‍याचा हार आधीच बनवून, वाळवून ठेवत होतो. सकाळी निव्यावर काही लोक पाणी गरम करून आंघोळ करीत. त्याने अंगाला खाजखुजली होत नाही, असे म्हणत. होळीच्या दिवशी बत्ताश्या, गाठ्या गळ्यात मिरवीत, एक-एक गाठ, बत्ताशी खाण्यात मोठी फुशारकी वाटत असे.

धुळवडीच्या दिवशी पळसाच्या फुलाचा रंग एकमेकांच्या अंगावर उडविण्यात आम्ही रमून जात होतो. हा करीचा दिवस म्हणजे मौजमजेचा दिवस. गावातील माणसं दारुच्या धुंदीत तर्र होऊन मस्तपैकी मटणावर ताव मारुन स्वत:ला हरवून जात. मटणासोबत रोट्या, पयले व भात असायचा. खेड्यातील लोकांना सणासुदीलाच गव्हाचे व तांदळाचे पदार्थ खायला मिळत. ऎरवी रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरी व मीठ-मिरचीच राहत असे.

हा सण बंजारी लोकांचा महत्वाचा सण होता. हा सण त्यांच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक, आनंददायक, रसिकता व चैतन्यमय वातावरण निर्माण करणारा राहत असे. त्यातील हास्यविनोदाने तणावमुक्त होवून जात. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपतांना ही जमात सळसळत्या उत्साहात अगदी न्हाऊन निघत. आमच्या गावात त्यांची होळी सकाळी पेटत असे. इतर समाजाचे लोक संध्याकाळी पेटवत. पण बंजारी मात्र सकाळी का पेटवत? यामागे कहाणी सांगत की, एका प्रकरणात पंचायतीमध्ये आदल्या दिवशी न्यायनिवाडा करण्यासाठी बसले असतांना, दुसर्‍या  दिवसाची सकाळ उजाडली. म्हणून ते सकाळी पेटवीत.

पौर्णिमीच्या उजेडात गावाजवळच्या लांडग्याच्या वावरात होळी रचत. मग सकाळी सूर्य निघायच्या आधी होळी पेटवत. या दिवशी बाया माणसं गोरमाटी भाषेत लेंगी गीत गाण्यात व नाचण्यात मशगुल होवून जात. या गाण्यात बाया माणसांना व माणसं बायांना अश्‍लील भावभावनांना वाट मोकळी करुन देत. या गीतात दीर-भावजय, प्रियकर-प्रेयशी अशा नात्यातील नाजूक, शृंगारिक व भावबंधाचे वर्णन उमटलेले दिसे. स्त्री-पुरुषातील भावनांचे तरंग या होळीगीतातून सहज व्यक्त होत. मग त्यात नात्यागोत्याचं कोणतही बंधन राहत नसे. केवळ शृंगारीक भावनांचे रांगडं व उघडे प्रदर्शन मनसोक्तपणे होत असे. होळीची राख एकमेकांना लाऊन थट्टामस्करी, हास्यविनोद करीत घरी जात.

रंग खेळणे म्हणजे ‘फाग’ ! दीर-भावजय, साळा-साळी अशा थट्याच्या नात्यात रंग खेळण्याची रसिकता आणखीनच दिसून येत असे. दारू, गांजा, भांग याच्या नशेत चूर होवून हा दिवस साजरा करीत. रंग खेळतांना एखाद्याची बायको जरी उचलून तिला रंगात भिजवले, तरी तिच्या नवर्‍याला त्यात काहीच वावगे वाटत नसे, इतका मोकळेपणा या सणात त्यांना मिळत होता.

एकदा रात्रीच्या वेळी नाच-गाण्याचा खेळ रंगात आला असतांना लभानाच्या पोराने एका पोरीला उचलून उन्मादाच्या मस्तीत त्याच्या घरातील कापसाच्या गंजीवर आदळल्याचे आम्ही पाहिले होते. श्रीकृष्णदेवाची रासलिला – कधी पाहिली नाही; पण त्यातलाच हा नमूना तर नव्हता ना, अशी पुसटशी कल्पना चाटून गेली होती.

होळीच्या पूर्वीपासूनच नायक, कारभारी व इतरांकडे नाच-गाणे करुन पैसे व धान्य गोळा करीत. रहदारीचा रस्ता असेल तर जाणार्‍या-येणार्‍यांकडून सुध्दा पैसे वसूल करीत. त्या पैशातून व आणखी सामुहिक वर्गणी करुन बोकड्याच्या मटणाचं दूर कुठेतरी नदीकाठी किंवा एखाद्या झाडाखाली सामुहिक जेवण करीत. अशातर्‍हेने आलेला थकवा दारु पिऊन व मटण खाऊन या सणाची सांगता करीत.     खरं म्हणजे ह्या होळीमध्ये लाकडे व शेणाच्या गोवर्‍या जाळत असल्याने कितीतरी नुकसान होत होतं. त्याची गिणतीच नाही ! शिवाय जिकडे तिकडे धूर पसरल्याने सारं वातावरण खराब होवून जात होतं. ही बाब सण साजरे करणार्‍या धर्मव्यवस्थेच्या मार्तंडांना का कळत नाही? असे कसे यांचे सण की ज्यामुळे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान व अशुध्द वातावरण तयार करण्यास कारणीभूत होतं? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होता.

गावातला आणखी एक सण म्हणजे आषाडी पौर्णीमेचा – आखाडीचा सण…! या दिवशी गोड-धोड पदार्थ बनवीत. या सणाला आंब्याचा रस, रोट्या, पयले, भात, कुर्ड्या, पापड्याचा बेत राहत असे.

या दिवशी मुलीला सासरकडे राहू देत नसत. तिला माहेरी घेऊन जात. जर ती माहेरी जाऊ शकली नाही, तर गावातच नातेवाईकाकडे ठेवत. एकदा माझ्या वहिनीला मामाच्या घरी राहत असल्याचे पाहिले. मला अचंबा वाटला. वहिनीला कोणी बोलले काय़? तिच्याशी कोणी भांडले काय? अशा नाना शंका-कुशंकानी मला घेरले होते.

मी दादाला म्हणालो,

‘दादा, वहिनी मामाच्या घरी का राहत आहे?’

‘अरे, आखाडी आहे ना ! तिला आपल्या घरी ठेवता येत नाही. म्हणून मामाच्या घरी आहे.’

तेव्हा मला कळले की ही एक रुढी-परंपरा पूर्वापार चालत आलेली होती. त्यामागील खरं कारण काय ते कुणाला माहित नव्हतं.

नंतर मला एक गोष्ट कळली, ती ही की या दिवशी सिद्धार्थाची आई, महामाया हिला गर्भ प्रसवला. सिद्धार्थाला पुढे बुध्दत्व प्राप्त झाले. त्यांनी समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच विज्ञान, तार्कितता व विचारशिलतेच्या आधारावर धम्म चळवळ जणमानसात राबविली व रुजवली. परंतु सनातन संस्कृतीला या तत्वाचं वावडं होतं. म्हणूनच पती-पत्‍नीचा संबंध त्यादिवशी येऊ नये व भगवान बुध्द पुन्हा जन्माला येऊ नये; म्हणूनच की काय एकमेकांपासून त्यांना दूर ठेवण्याची रुढी-परंपरा कदाचित रुजवली असावी, अशी शंका घ्यायला काही हरकत नव्हती.

 

 

 


कथा बारावी – पोळ्याची कर की कहर

 

आमच्या गावात सणावाराला उधान यायचं. गावातील उदास मनाच्या काळोख्या आयुष्यात चैतन्याची सळसळ हे सणवार निर्माण करीत. रोजच्या रुक्ष जीवनात क्षणभर का होईना आनंद देऊन जात. म्हणूनच म्हणत की मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे ! त्यामुळे खेड्यापाड्यातही उत्सव-सणावाराला बहर येत असल्यास नवल नाही ! पोळा किंवा दिवाळीच्या सणाला आम्ही मोठे उल्हासीत होत होतो. कारण याच सणाला आम्हाला नवीन कपडे घालायला मिळत.

या सणाच्या तोंडावर येणारा बाजार म्हणजे मुलींना पर्वणीच असायची. त्यांना कानात घालायच्या बिर्‍या, टॉप्स, रिंग्ज, नाकात टाकायच्या नथण्या, बेसर, गळ्यात घालण्यासाठी गाठ्या, हार, केसाला लावण्यासाठी क्लिपा, रिबिना, हातातल्या बांगड्या, बोटातल्या आंगठ्या, पायातल्या तोरड्या असं काहीबाही सामान नटण्यासाठी खरेदी करायच्या असतात, ना ! म्हणून हा बाजार त्यांच्या मनाला भुरळ पाडत असे.

पोळा हा खेड्यातला महत्वाचा सण ! बैलं खेड्याच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असा प्राणी. पाणी-पाऊस, ऊन-वारा, हीव-दव, दिवस-रात्र तो शेतकर्‍याच्या सोबत मरमर राबतो. बैलं म्हणजे त्यांचा सखाच ! शेतकरी त्याला नांगर-वखर-डवर्‍याला जुंपतात. भरली गाडी ओढतात, मळणी करतात, कोणत्याही कामाचे ढिगारेचे ढिगारे उपसतात, त्यांच्या कष्टाची गणती आणि मोलच नाही ! त्यांच्याच जीवावर शेती होते. पण त्यांना पहिजे असते पोटाला चारा व पाणी अन् पाठीवरुन फिरणारा ममतेचा हात ! बैलाविषयी उपकार व्यक्त करणारा हा सण चैतन्य आणि आनंदाची उधळण करीत असतो. श्रावणातील सणावारामुळे होणारी गोड-धोड पदार्थाची लयलूट याच सणाने स्थिरावतो.

आदल्या दिवशी रात्रीला शेतकरी किंवा गडी पळसाच्या पानाने तेल किंवा तुपात हळद भिजवून बैलाचे खांदे शेकत. ‘आज आवतन घ्या… उद्या जेवायला या…’ असे म्हणून बैलाला पोळ्याचे आमंत्रण देत. त्यावेळी शेतकरी गड्याच्या खोळीत ओंजळीने धान्य टाकून ‘खोळ भरो’ तर गडी ‘वाडा भरो’ असे म्हणत. ह्यावेळी गड्याला नवीन कपडे भेट देत.

दुसर्‍या दिवशी सकाळी बैलांना चारून आणल्यावर नदी, ओढ्यावर नेवून धुत. दुपारी घरी आणून सजवित. त्यांच्या शिंगाला निरनिराळ्या रंगाचे बेगड, चमकी लावत. कपाळाला मटाट्या बांधत. कोणी वाकाच्या दोरीने बेलपाने बांधत. कोणी दोन्ही शिंगाच्या मधोमध बेगडाचं बार्शिंग तर कोणी कागदाचा रंगीत पंखा बांधत. कोणी त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी झूल टाकत. नाहीतर हाताचा पंजा गेरुच्या रंगात बुडवून, त्याचे ठसे पाठीवर उमटवित. आपापल्या ऎपतीप्रमाणे बैलाच्या सजावटीवर खर्च करीत. कोणी बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरू-घंटा बांधत. मग घुंगरू-घंटाचा निनाद सारखा कानात घुणघूणत राहायचा.

पोळ्याच्या दिवशी नेमका थुईथुई पाउस पडायचा. अशा पावसात भिजायला मजा येत होती. उदासलेल्या वातावरणात मन उत्साही होऊन जात होतं. बैलाच्या खुराने ओली माती उखरली जायची.

रमेशच्या घरापासून ते जनार्दनदाजीच्या घरापर्यंत खंबे गाडून आंब्याचे तोरण बांधत. त्याच्या खाली बैलं धरुन राहात. हरसिंगलभान नारळ फोडून पूजा करायचा. तो एका टोकावरुन दुसर्‍या टोकापर्यंत खोबरं, लाह्या व भिजवलेल्या हरभर्‍याची गोड शिरणी घेऊन वाटत जायचा.

पोळा रंगात आला की लोकांच्या दादर्‍या, झडत्या सुरु होत.

कानावर हात ठेऊन म्हणत,

‘काळ्या वावरात, कुंद्याच्या खटी,

बैल बांधले दाटोदाटी,

कोंड्या म्हणते, बुडाली शेती,

दमड्या म्हणते, लाव छातीले माती…

एक नमन गवरा पारवती… हर बोला… हर हर महादेव…!’

कोंड्या म्हणजे माझे बाबा व दमड्या म्हणजे मामा !

दुसरीकडून लगेच कुणाचा तरी आवाज यायचा,

आभाळ गडगडे,  शिंग फडफडे
शिंगात पडले हो… खडे
तुही माय काढे, तेलातले वडे
तुवा बाप खाये, हो… पेढे
एक नमन गवरा पार्बती हर बोला हर हर महादेव…!

ही दादरा संपते न संपते कुणीतरी आणखी सुरु करायचा.

चाकचाडा बैलगाडा
बैल गेला पवनगडा
पवनगडाहून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
गुरूने बनविली चकती
दे माह्या बैलाचा झाडा

मग जा हो, आपल्या घरा

एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेव…!

मग सारेच एकाच सुरात ‘हर हर महादेव’ म्हणत सारा आसमंत दणाणून टाकत. असे कितीतरी दादरे-झडत्या एकावर एक सुरु होत. अशाप्रकारे बुडालेल्या शेतीच्या व्यथा झडत्याच्या माध्यमातून व्यक्त करीत तर कुणी गावगाड्यातील राजकारणावर उपहासात्मक किंवा कुणाची टर उडविण्यासाठी टिकात्मक झडत्या म्हणत, मस्त मनोरंजन करीत. असाच हशा-मजाकीचा माहोल सारा पोळाभर दरवडत राहायचा.

पाटलाच्या घरुन गुडी यायची. पांढर्‍या कपड्यात ओल्या हळदीचा पेंड आणत. बैल धरणार्‍याकडे थोडी थोडी वाटत. ते ती फडक्यात बांधून तोरणावरून फेकून दुसर्‍या बाजूने झेलत. मग ही पुरचूंडी घराच्या आड्याला बांधून ठेवत. ही हळद घटसर्पासारख्या रोगावर चालते, असे सांगत. तसेच एका पुरचूंडीत एक पैसा बांधून तो पैसा तोरणावरून फेकत. मग ही पैशाची पुरचूंडी घराच्या आड्याला बांधून ठेवत. त्यामुळे इडापिडा टळते, असा लोकांमध्ये समज होता.

गावचा पाटील मखराच्या बैलाच्या दोन्ही शिंगाला विस्तवाचे टेंबे बांधून घेऊन येत. त्याला पोळाभर फिरवीत. पूजेचे सोपस्कार आटोपले की तोरण तोडत. तोरण तुटला की पोळा फुटला. मग बैलाचे कासरे हातात धरून पळापळी सुरु व्हायची. प्रत्येकजण आपापले बैल घेऊन पहिल्यांदा मालकाच्या घरी जात. मग इतर ओळखीच्या किंवा नात्यातील घरी जात.

शेतकरी आपल्या अंगणात गाडीचे जू टाकून ठेवत. त्याला दोन्ही टोकाला वाकाच्या दोरीने बेलपाने बांधत. तसेच गंगाळाच्या मानेला बेलपाने बांधून, त्यात पाणी भरून ठेवत. पोळा सुटल्यावर बैलजोडी अंगणात आली की घरची बाई त्याच्या चारही पायावर गंगाळातील पाणी टाकून पूजा करीत. आरतीत आणलेला पुरणपोळीचा घास बैलाच्या तोंडात टाकत. मग बैलाचे कासरे धरणार्‍याला पैसे देत. मालक गड्यांना आपल्या घरी जेवण-खाऊ घालत.

मी गड्यासोबत पोळ्यात जायचा. एक बैल धरत होतो. त्यामुळे मला पण थोडे थोडे पैसे मिळत. ह्या पैशाने मी गंजिफा खेळत होतो. त्याशिवाय शामरावदादा, बाबा पण देत. त्यामुळे पैसेच पैसे हातात खुळखूळत. त्यादिवशी गोडधोड जेवणाचा बेत असायचा. जेवणात पुरणपोळी, तुप, कढी, भजे, भात असे पंचपक्वानाचे पदार्थ राहत.

त्यारात्री कुठेना कुठे तरी जुव्याचा अड्डा असायचा. बहुदा नामदेवकाकाच्या घरी आम्ही मुलं जात होतो. तेथे अर्ध्या रात्रीपर्यंत तर कधी रात्रभर जुगार चालायचा. त्याच्या घरात एकच खोली होती. तेथेच त्याचे कुटुंब झोपत असे. तो जिंकलेल्या डावापैकी काही पैसे जागेचं व पत्त्याचं भाडं म्हणून घेत असे. त्याला कट्टा म्हणत. कट्टा वसूल करण्याची सर्वठिकाणी पध्दत रुढ होती. कधीकधी तोपण आमच्यासोबत खेळत असे. हारला की त्याला संताप यायचा. मग आम्हाला हाकलून द्यायचा. ‘जा बे पोट्टे हो… आता बंद करा खेळणं… डोळ्याला जागरण न् xxxx उपास.’ असा खऊटपणे बोलायचा. मग आम्ही पोरं हिरमुसले होऊन घरी परत जात होतो. दुसर्‍या दिवशीची पहाट निघण्याची वाट पाहत होतो.

सकाळीच कोंबड्याच्या बागेला लोकांचं ओरडणं ऎकू यायचं. ‘इडा-पिडा घेऊन… जायऽऽ गे मारबत…. रोगराई घेऊन जायऽऽ गे मारबत… माशा चिल्ट, डासं, जादू-टोणे घेऊन जायगे मारबतऽऽ.’ असे ओरडत. दादा देखील असंच काहीतरी म्हणायचा. एखाद्याचं कुणाशी पटत नसेल, तर तो द्वेषबुध्दीने त्या व्यक्तीचे नाव घेऊन, जसं – कोंड्याला घेऊन जायगे मारबत असेही म्हणायला मागेपुढे पाहत नसत. त्यामुळे मग भांडणाला तोंड फुटत असे. दिवस उजाडल्यावर दरवाज्याजवळ कोतवालाने ठेवलेल्या पळसाच्या फांद्या उचलून खतावर रोवून देत.

दुसरा दिवस म्हणजे ‘करी’चा ! हा मोठा खुषीचा दिवस ! कारण त्यादिवशी दारु पिणे, मटण खाणे व जुवा खेळणे बिनदिक्कतपणे व सार्वत्रिरीत्या चालत असे.

यादिवशी जुवा का खेळल्या जातो, काय माहित? जणू काही खेड्यापाड्यातील लोकांनी जुव्याच्या व्यसनाला निरंतर चिकटून राहावे व जीवनात कमावलेलं किडूकमिडूक गमावून बसावे; असं काही धर्मव्यवस्थेने ठरवून दिलं होतं की काय? म्हणून त्यादिवशी लोक दिवसभर जुव्याच्या नादी लागत. एकदा का जुव्याची लत लागली की त्यातून बाहेर पडणं मोठं जिकिरीचे होऊन जात असे. त्यादिवशी सकाळपासून वाल्ह्याच्या खारीतल्या पारावर किंवा एखाद्या पडक्या घरी किंवा सुखदेवच्या वावरातील विहिरीजवळील कवठाच्या झाडाखाली असं कुठंतरी आम्हा मुलांची जुव्याची मैफल बसायची. तहान-भूक विसरून खेळण्यात दंग होऊन जात होतो.

मुली सुध्दा पत्ते खेळत. त्या बहुधा जोड्या लावण्याचा खेळ खेळत. त्या कधी सीताबाईच्या तर कधी वच्छलाबाईच्या घरी खेळत. सीताबाईचं घर शेवटी होतं. तिच्या घराचा आवार पाहतच राहावेसे वाटे. कारण आवाराचा कूप जुईच्या वेलाने लदबदलेला होता. वच्छलाबाईचं घर माझ्याच घराशेजारी होतं.

कधीकधी झेंडी-मुंडीचा खेळ खेळत होतो. झेंडी-मुंडी हा मुलांचा व बायांचा मजेशीर खेळ होता. माझी बहिण जनाबाई बहुदा मुलींसोबत हा झेंडी-मुंडीचा खेळ खेळत होती.

पोळ्याच्या करीला मोठमोठे माणसं पण जुवा खेळतांना दिसत. दादा व बाबा मात्र कधीच जुव्याचा खेळ खेळतांना मी पाहिले नाही.

ह्यादिवशी लोक दारु पिऊन तर्र राहात. तेव्हा हमखास गावात कुणाचा नाही कुणाचा तरी मारका-झगडा होत असे. गावात भांडण-तंटा होऊ नये म्हणून कधीकधी पोलिसाची ड्युटी लागत असे. परंतु पोलीस सुध्दा त्यादिवशी मुभा असल्यासारखं जुगाराच्या खेळाकडे दुर्लक्ष करीत होता..

करीच्या दिवशी गावात बकरा कापून हिस्से पाडत. मग गावात जिकडे-तिकडे मटणाचा खमंग वास सुटत असे. मटणासोबत रोट्या-भाताचा बेत असायचा. लोक मस्तपैकी दारु पिऊन मटणाचा आस्वाद घेत बेधुंद होत. आमच्याही घरात अशीच जेवणाची मेजवाणी राहायची.

त्यादिवशी वहिनी रोट्या बनवित असे. कुठे कुठे रोट्याला मांडे पण म्हणत. रोट्या बनविण्याचं काम मोठं कौशल्याचं. मळलेलं पातळ कणीक हाताने लांबवून तापलेल्या रानण्यावर टाकत. ह्या रोट्या फारच खुमासदार लागत. त्या मटण किंवा आंब्याच्या रसासोबत नाहीतर तिखट दाळीसोबत खात. त्या खमंग स्वादाची नुसती आठवण जरी झाली तरी तोंडाला पाणी सुटत असे.

कधीकधी वहिनी गव्हाच्या पिठाचे ‘पयले’ बनवीत होती. ह्या पण खायला रुचकर लागत.

यादिवशी लोक कोंबडं-बकर्‍याचं मास खाण्यासाठी प्राण्यांची हिंसा करीत, दारू पिऊन मस्त झिंगत, आपसात काहीतरी कुरापत काढून भांडत व जुगार खेळून पैसे गमावत.

हा सण भगवान बुध्दांच्या पंचशिलेच्या तत्वातील, ‘पानाती पाता वेरमनी’ म्हणजे मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही व ‘सुरामेरय पमादठाना वेरमनी’ म्हणजे मी दारु सारख्या नशा आणणार्‍या पदार्थाचे सेवन करणार नाही; असे दोन्हिही शील लोकांना तोडायला भाग पाडत. मग अशा दिवसाला कर म्हणावे की कहर म्हणावे, तेच कळत नव्हतं.

 


कथा तेरावी – घरातली ताकद गेली

 

देवदासदादा म्हणजे आमच्या घरातली ताकद ! तो पाहायला सुंदर, सुदृढ व उंचपुरा होता. तो लिहीण्या-वाचण्यापुरतं बाराखडी शिकला होता. आई सांगत होती, ‘त्याला शाळेत टाकले; परंतु राहून-राहून आजारी पडायचा. मग शाळेत गेलाच नाही.’ तेव्हापासून शेतीच्या कामाचे जू त्याच्या मानेवर बसलं, ते कायमचंच !

तो उत्कृष्ट बासरी वाजवायचा. बैलं चारतांना, घरी येतांना वाजवतच यायचा. गावातील लोक दुरुनच बासरीचा मंजूळ आणि मोहक धुन ऎकून ‘ही देवदासची बासरी’ असे त्यांच्या तॊडून सहज शब्द बाहेर पडत. इतका तो आवाज लोकांच्या ओळखीचा झाला होता.

खेड्यात दोस्त-मित्र व नात्या-गोत्यातील लोकांमुळे चिकटणाऱ्या दारू, बिडी, तंबाखूच्या व्यसनापासून तो दूर होता. त्याच्या चांगल्या स्वभावामुळे तो लोकांना खूप आवडायचा. त्याच्यातील आणखी वाखाणण्यासारखा गुण म्हणजे नेमबाजीत त्याचा हात कुणी धरीत नव्हता. तो गोळ्या खेळतांना सहज व अचूक बेंदा फोडायचा. कितीही दूरची गोळी बरोबर नेम धरुन मारायचा व आपल्या प्रतिस्पर्ध्यावर राज आणायचा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. त्यावेळी गावागावात सभा होऊन समाज जागृती होत होती. आमच्याही गावात मी लहान असतांना सभा झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने सभोवताली लाकडी-बल्ल्यांचा कंपाऊंड टाकला होता. त्या सभेत रामराव व सिता यांचं लग्न बौध्द पध्दतीने लाऊन देण्यात आल्याचं मला आठवते.

इतर गावांप्रमाणे आमच्याही गावात समता सैनिक दल स्थापन झाले होते. देवदासदादा या दलाचा कॅप्टन होता. ह्या दलाच्या आखाड्यात गावातले तरुण मुलं व्यायाम करीत, दांडपट्टा शिकत व मल्लखांबावर कसरत करीत.

डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार समाजातील लोकांनी मेलेले ढोर ओढणे, त्याचे मास खाणे, गावकीचे निच दर्जाचे कामे करणे सोडले होते. त्यांच्यातला स्वाभिमान व मानसन्मान जागृत झाला होता. माणसासारखे जीवन जगण्याचा प्रयत्‍न करीत होते. मुलांना शाळा शिकवू लागले. असे आमुलाग्र परिवर्तन समाजात घडून आल्याने जातीयवादी लोक चिडून हल्ला करीत. आमच्याही गावातील लभान लोकांच्या डोळ्यात खुपू लागलं होतं. म्हणून समाजाला संरक्षण देण्याचे काम हा दल करीत असे.

ह्या दलात तरुण पोरांचा भरणा होता. पांढरा शर्ट, दोन्ही खांद्यावर पट्ट्या, दोन खिसे, खाकी फुल पॅंट, शर्ट खोवलेला, कमरेला तपकिरी रंगाचा पट्टा, पायात त्याच रंगाचा जुता, डोक्यात निळ्या रंगाची टोपी आणि हातात वेताची काठी असा गणवेश असायचा. कप्तानाजवळ शिटी असायची. हा दल कार्यक्रमस्थळी दोन-दोनच्या रांगेमध्ये घोषणा देत, पोलीस दलासारखे मार्चिंग करीत निघायचे. त्यामुळे संपुर्ण वातावरण भारावून जात होते. समाजात विलक्षण असे बळ निर्माण व्हायचे. लोकांमधील ऊत्साह उदंड वाहत राहायचा. विरोधकांच्या मनात धडकी भरायची. समाजाचा एकोपा, उत्साह, शिस्त, बाबासाहेब व त्याच्या चळवळीप्रती निष्ठा इत्यादी गोष्टीचे प्रदर्शन असायचे. ह्या दलाचा गावोगावी दरारा निर्माण झाला होता. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूक निघायची; तेव्हा मुलं दांडपट्टा व कसरतीचे प्रात्यक्षिक करुन दाखवीत. त्यावेळी पाहणार्‍यांच्या डोळ्याचे पारणे फिटायचे. यवतमाळ शहरातील पाटीपूर्‍याचा दादाराव वस्ताद पोरांना मल्लखांब, दंडबैठका, दांडपट्टा, कवायत, लाठीकाठी, तलवारबाजी, जंबियाबाजी, कुस्त्या इत्यादी व्यायामाचे व कसरतीचे प्रकार शिकवीत होता. त्यामुळे तरुण वर्गाचे आरोग्य धडधाकट राहून व्यसनापासून अलिप्त राहत.

एकदा बाभुळगाव गावाला प्रचंड सभा भरली होती. त्या सभेला बहुतेक चळवळीचे मोठं-मोठे पुढारी आले असावेत. कारण त्याठिकाणी गावोगावचे समता सैनिक दल मार्चिंग करत आले होते. दादा पण दल घेऊन चालला होता. मी दुडक्या चालीने जात होतो. जातांनाचा डांबरीरोड, दुतर्फा लिंबाचे झाडं, घाटातला नागमोडी रस्ता, धावडा-सागाचा घनदाट जंगल, उलंगवाडी झालेले वावरं, कुठे भाजी-पाल्याचा, संत्रा-पपयाचा बगीचा, मोट असलेल्या विहीरी, रोडने जाणारे बसेस, सायकली, मोटार-गाड्या पाहून मी बुजाडून जात होतो.

एकदा गावातील दल रात्रीच्या सभेला बाहेर गावाला गेले होते. त्यामुळे गावात तरूण पोरं राहिले नव्हते. ही संधी साधून लभानांनी बाया-पोरं व म्हातार्‍या-कोतार्‍या लोकांवर हल्ला केला. कुणीतरी सभेच्या ठिकाणी धावत-पळत जावून दादाला ही गोष्ट सांगितली. तसाच तो दल घेऊन सुसाट वेगाने धावत आला. गावाच्या शिवेवर येताच घोषणा सुरु केल्या.

‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की… जयऽऽ’ ‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जाएगा…’ अशा घोषणा ऐकू आल्याबरोबर आमच्या जीवात जीव आला. सारा आसमंत घोषणांच्या निनादाने भरून गेला. त्यामुळे आमच्या मोहल्ल्यातील बंद झालेले दरवाजे पटापट उघडले तर लभानांचे दरवाजे पटापट बंद झाले. आमच्या मनात प्रकाश उजळला तर त्यांच्या मनात अंधार दाटून आला. काही क्षणाआधीची परिस्थिती उलटी झाली. आता त्यांच्यावर बाजू पालटली. मग काय, समता सैनिक दल म्हणजे सळसळत्या रक्ताचे तरुणच ते ! त्यांचा उत्साह आभाळाला धडका मारू लागल्यात. त्यांच्या हातातील काठ्या तलवारीसारखे तळपू लागलेत. अंगात ‘जयभीम’चं वारं संचारलं. खूप दिवसापासूनचा लभानांच्या विटाळाने मनात धुमसत असलेला अपमान बाहेर पडू लागला. सारा दल घोषणा देत लभानपुर्‍यात शिरला. त्यांची धावाधाव-पळापळ सुरु झाली. कुणी माणसं गावाबाहेर पळू लागले. कुणी ढोल्यात, कुणी कापसाच्या गंजीत तर कुणी गाई-बैलाच्या गोठ्यात लपले. पोरांची, बायांची रडारड सुरु झाली. पोरांनी त्यांची दाणादाण उडवून दिली.

आमच्या घरासमोरील देवळाच्या मैदानावर त्यांच्या घरातील कपडे, गोधड्या आणून आग लावून होळी पेटवत. जिथे कुठे लोक लपलेले असतील; तेथून शोध घेत, त्यांची धुलाई करत. कापसाच्या गंजीत काठी टोचली की त्यात लपलेले माणसं, कुत्र्यासारखे कुईऽऽ कुईऽऽ आवाज करीत, अशी ते गंमत सांगत. पण कुणालाही फारशी इजा होईल अशी मारझोड केली नाही. बरेच लभान माणसं पळून गेले होते. इतकी धास्ती त्यांच्यात निर्माण झाली होती. लहान मुले व बाया तेवढ्या घरी राहिल्या होत्या. त्यांना कुणीही त्रास दिला नाही. कारण तशी मानवतेची शिकवण या पोरांना देण्यात आली होती. दंगलीमुळे गावात तंग वातावरण झाले होते. पोलिसांनी दलाच्या मुलांना व लभानाच्या लोकांना पकडले होते. परंतु आपसातील समझोत्यामुळे प्रकरण मिटले. तेव्हापासून ते आमच्याशी वचकूनच वागत.

दादाच्या आठवणी सांगायच्या म्हणजे – घोटीच्या वावरात भुईमूंग पेरला होता. तेथे मळा होता. दादा तेथून राखण करायचा. मी त्याच्या सोबत असलो की मला अभ्यास करायला लावायचा. माझ्यावर तो फार जीव लावायचा.

‘चल रामराव… आपण फिरायला जाऊ.’ असं दादाच्या तोंडून नुसतं फिरायचं नाव निघालं की माझ्या उत्साही जीवांच्या मनातला मोर थुईथुई नाचायला लागत असे. एकदा भारी गावाला भजनाचा कार्यक्रम होता. हे गाव तीनक कोस दूर होतं. तेथे मला खांद्यावर बसवून सवंगड्याच्या सोबत रात्रीच्या अंधारात वाट शोधत घेऊन गेला होता.

दादा बैलं चारून आला की भोर पक्षांना पकडून आणत होता. वाडीतल्या विहिरीजवळ भाजून मिठ, मिरची टाकून मस्तपैकी चटणी बनवित होता. मग भाकरीसोबत कुटूर कुटूर खायला जिभेची मज्जाच व्हायची ! मला हा पक्षी फार आवडत असे. त्याची बारीक आणि नाजूक चोच विलक्षण वाटायची. त्याचं तुरुतुरु चालणं, तीन बोटाचे नक्षीसारखे उमटलेले चिन्ह खूप सुंदर दिसत. त्याचा ‘होऽ होऽऽ‘ करणारा साद, हुंकार ऎकण्यासाठी मी जवळ जाऊन पाहत होतो; तेव्हा भुरर्कन उडत जाणारा हा पक्षी मला नेहमीच भुरळ पाडत असे.  दादा या पक्ष्याला कसा पकडतो ते पाहण्यासाठी मी त्याच्या सोबत एकदा गायरानात गेलो होतो. त्याने चिल्हाटीच्या काट्याच्या झाडावर, गुंतलेल्या बारीक फांद्यात, काट्या-कुट्या अंथरलेल्या, नारळाच्या अर्ध्या डोलाच्या आकाराचा खोपा शोधला. त्यात दोन पांढरेशुभ्र कांचेच्या गोळीच्या आकाराचे अंडे टाकलेले होते. त्यावरुन हा भोरीचाच खोपा आहे; हे कळायला त्याला वेळ लागला नाही. त्यावर त्याने घोड्याच्या केसाचा विणलेला फासा ठेवला. आदल्या दिवशीच्या फास्यात अडकलेल्या भोरीला सोडवून तिचे पाय बांधले.

‘दादा मला पाहू दे ना…!’ मी उत्सुकतेने म्हणालो.

त्याने तो पक्षी माझ्या हातात दिला. मी इतक्या जवळून, हातात घेऊन यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. मी तिचं मनोहारी आणि निरागस रुप नजरेत तनामनात साठवतांना देहभान विसरुन गेलो होतो. तिच्या पंखावरुन हात फिरविल्यावर रेशमी स्पर्शाचा अनुभव अत्यंत विस्मयकारी वाटत होता. दादाने त्या पक्षाला खांद्यावरच्या शेल्याच्या कोपर्‍यात गाठ मारुन बांधले.

पावसाळ्याच्या सुरुवातीला नाल्यामध्ये खेकडे निघत. एकदा दादा, बापुरावदादा व उध्दवकाका रात्रीला बॅटर्‍या घेऊन खेकडे पकडायला गेले होते. त्यांनी पिपाभर मोठमोठे गार खेकडे पकडून आणले. असं म्हणतात की ‘खेकडे एकमेकांचे पाय वस्ताद असतात.’ खरंच पिप्यातले खेकडे वर जायचा प्रयत्‍न करीत; तेव्हा दुसरे त्यांचे पाय ओढून खाली पाडीत. त्यालाही वर जाऊ देत नसत व स्वत:ही जात नसत. असाच काही लोकांचा स्वभाव असतो, म्हणतात.

उन्हाळ्यात आई, वहिनी, बाई व दोन्हीही दादा चारं तोडायला जंगलात जात. मीपण जात होतो. पिकलेले चारं खातांना खूप मजा यायची. असे चारं यवतमाळला नेवून विकत. अर्धे-कच्चे चारांना सडवून, मोगरीने कांडून वाळवून घेत. मग जात्यात भरडून चारोळ्या सुपाने पाखडून, निवडून घेत. याच चारोळ्यात गूळ टाकून अखजी व सणावाराला पोळी बनवून खात. ही पोळी फारच चवदार आणि स्वादिष्ट लागत होती. मोठ्याआईच्या वावरात चाराचे मुबलक झाडं असल्याने सणावाराला तिच्या घरी चाराची पोळी हमखास करीत. त्यावेळी मुद्दामच मी पोळी खायला तिच्या घरी जात होतो.

दादा बैलाच्या चार्‍याचा भारा डोक्यावर घेवून आणायचा; तेव्हा ज्वारीचे हिरवे धांडे आमच्यासाठी घेऊन यायचा. हे धांडे उसासारखे गोड लागत. दादा कोवळ्या ज्वारीचा वाणीचा हुरडा भाजून आणायचा. आम्ही त्याच्यावर तुटून पडत होतो. त्याच्या सोबत वावरात गेलो की ज्वारीचे कणसं निखार्‍याच्या हुपीमध्ये भाजायचा. त्याला दगडाने घासल्यावर, मऊ, लुसलुशीत दाणे बाहेर पडत. मग गरमागरम हुरडा टमाट्या-मिरचीच्या चटणीसोबत मिटक्या मारत खात होतो. ज्वारीच्या कणसात वाणी जातीच्या कणसाची चव दुधासारखी लागत होती आणि त्याचे दाणे पटापट निघत. दादा वटाण्याच्या लुसलुशीत ताज्या शेंगा भाजून द्यायचा तर कधी हिरव्यागार घाट्याच्या हरभर्‍याचा हुळा भाजून द्यायचा. तर कधी गव्हाच्या हिरव्यागार उंबळ्या भाजून द्यायचा. त्याच्या सोबत गेलो की काही ना काही तरी सटर-फटर खायला मिळायचं. कधीकधी घरी आणून तुराट्या-सणकाड्यावर भाजायचा. मग आम्ही घरातले सर्वजण खाण्यासाठी धाऊन येत होतो.

दादा जंगलातून कटूले तोडून आणायचा. एकदा तर त्याने टेकोडे तोडून आणले होते. त्याची ओळख पटवण्यात दादा पटाईत होता. कारण काही विषारी पण असू असतात. ही रानभाजी पावसाळ्यात छत्रीसारखा आकार असलेला डोंगराळ व लालवट मातीवर उगवित होते. वहिनी त्याची भाजी मटणासारखी चमचमीत बनवित होती. या टेकोड्याला शहरात अळंबी किंवा मशरुम्स म्हणत.

कोळंबी गावाला आंबे घेतले; तेव्हा गंमतच झाली होती. आंब्याच्या झाडाजवळ विहीर होती. शेजारी मळा होता. आई, बाबा दूरच्या दुसर्‍या आमराईत राहात. या आमराईत दिवसा दादा व मी राहत होतो. रात्रीला डोहनीतलं पाणी पिण्यासाठी वाघ येत असल्याने मी घाबरत होतो. म्हणून दादा मला गावात कळसस्कर आडनाव असलेल्या बाबाच्या नातेवाईकाकडे झोपायला नेऊन द्यायचा. मग तेवढ्या रात्रीला परत जायचा. तो रात्रभर एकटाच राहत होता. असा तो हिंमतवान होता !

कोळंबीचं नाव निघालं म्हणून आठवलं. बाबाचा कोळंबीचा नातेवाईक आमच्या गावाला जुवा खेळायला यायचा. मोठेबाबाच्या घरी जुवा भरायचा. दोघेही नवरा-बायको जुव्यात बसत. रातभर नी दिवसभर जुवा चालत होता. कधी जिंकत, कधी हारत. मुळचे तालेवान असल्याने त्यांना हरण्यात काहीही वाईट वाटत नसे.

एकदा आमचं जुनं घर मोडून नवीन बांधत असतांना भिंतीतील दरातून फूसऽ फूसऽऽ… करणारा सापाचा आवाज येत होता. त्याने उंदीर खाल्ल्यामुळे त्याचं पोट फुगलेलं होतं.  म्हणून तो सुस्त झाला होता. त्याला बाहेर काढून दादाने मारला होता. तसंच एकदा दादाला साप डसला होता. साप चावलेल्याला ‘काडी लागली’ म्हणत. त्याला देवळाच्या पारावर फिरवून गावातलाच दाढ्यासाधू मंत्र टाकत होता. हा साधू म्हणजे कपिलचा बाप, गोविंदा. दादाला वाळलेली लाल मिरची खाऊ घालत होता. दगडाने त्याच्या पाठीवर हलक्या हाताने मारत होता. साधूच्या मंत्रामुळे दादा बरा झाला, असाच सर्वांचा समज झाला. कदाचित तो साप बिनविषारी असेल.

दादाचं लग्न कोळंबी गावाच्या यशोधराशी झालं होतं. त्याच्या लग्नात नवरदेवाचा लहान भाऊ म्हणून माझी फार वरवर होत होती. माझ्या गावापासून कोळंबी गावापर्यंत बैलगाडी, रेंग्या व दमण्यावर वरात नेली होती. त्याचं लग्न होऊन एक महिना पांच दिवस झाले होते. नव्या नवरीला अजूनही नांदायला आणले नव्हते.

त्यावेळी त्याच्या जीवनातली ही जीवघेणी दुर्घटना घडली. त्यादिवशी त्याने दिवसभर वाडीत खत भरला. दादाला बासरीशिवाय पेटी वाजवण्याचा शौक होता. म्हणून अधुन-मधून तो शामरावदादाची पेटी वाजवून पाहत असे.

वाडीतल्या कौलाच्या कारखान्यावर तो व मुगलाईतील झटाळ्या गावाचा मामा रात्रीला जागलीला जात. त्या मामानेच कौलं कसं बनवायचे ते शिकविले होते. गावामध्ये तसा एकही कौलाचा कारखाना नव्हता. जांब गावावरुन कौलं आणीत. पण ते फार लांब पडत असे. त्यामुळे गावातच कौलाची उपलब्धतता होत असल्याने आमच्याकडे गिर्‍हाइकं भरपूर लागले होते.

त्यादिवशी जेवणं झाल्यावर वाडीत जायची दादाने तयारी केली. पण म्हणतात ना, ‘राजा शिकारीला निघाला अन् कुत्रा हागदोडीत गेला.’ मामाला चिलीमीची तलफ आली. चिलीम ओढायला त्याला बराच वेळ लागत होता; म्हणून दादाला तोपर्यंत पेटी वाजवायची इच्छा झाली. त्यासाठी तो घरातल्या दुकानाच्या खोलीत गेला. त्यावेळी दुकान नव्हते. पण पूर्वी बाबाने दुकान टाकले होते. गावातल्या उधारीमुळे दुकान बंद पडले होते.

दादाच्या लग्नासाठी बरचसं सामान आणले होते. बाबा त्यावेळी दमडूमामाची शेती वाहत असल्याने परिस्थिती चांगली होती. त्यामुळे खर्चाची काही ददात नव्हती. कारण बाबा, शामरावदादा व देवदासदादा असे तिघेही मिळून एकोप्याने शेतातलं काम करीत. त्याच्या लग्नातील बरचसं सामान उरले होते. ते दुकानाच्या खोलीत ठेवले होते. त्यात मातीच्या तेलाचा पिपा पण होता. खोलीमध्ये अंधार असल्याने कंदील पेटविला. पण त्यातलं तेल बुडाला टेकल्याने पिपा जवळ ओढला.

तेल भरतांना उजेड पाहिजे; म्हणून कंदील न विझविता तसाच जळता ठेवून आडवा केला व त्यात हापसीने तेल भरायला लागला. परंतु दुर्दैवाने कंदील भडकला. म्हणून त्याला जोरजोरात फुंकर मारुन विझवायचा प्रयत्न करू लागला. पण आग पिप्यापर्यंत पोहचली. आगीने खोली भडकू नये, म्हणून पिप्याच्या कडीला पकडून बाहेर फेकायचा प्रयत्‍न करु लागला. पण कडी तुटून तेलाचा झेलकावा त्याच्या अंगावर आला. तसाच तोही भडकला. मग पळत बाहेर आला. घरासमोरच्या देवळाच्या भोवताल चक्कर मारत तसाच वाडीच्या दिशेने पळू लागला. मात्र वाडीच्या फाटकाजवळ खाली कोसळला. आगीचा लोळ पाहून गावातील सारे लोक चक्राऊन गेले. सर्वजण त्याच्या मागे मागे धाऊ लागले. त्याला लोकांनी उचलून गोविंदामामाच्या घराच्या अंगणात नेले. तेथे त्याच्या अंगाला दही चोपडले. घरातली बाज नेऊन, त्यावर मऊ कपडे टाकून त्याला झोपविले. ती बाज उचलून त्यारात्री यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. त्याच्या सोबत गावातले बरेच लोक गेले होते. हे अकल्पीत दृष्य पाहून सार्‍यांची झोप उडाली होती.

दुसर्‍या दिवशी सकाळी मी बाई, आई, वहिनी व लहानसा अज्याप बैलगाडीने यवतमाळला निघालो. गोधणी गावाच्या पलीकडील घाटावर गेलो नसेन, तर लक्ष्मनमावसा दुरुनच येतांना दिसला. त्याला पाहून आमच्या पोटात धस्स झालं. तो गाडीजवळ आला. त्याला धाप लागली होती.

‘बाई, आपला देवदास…’ असं म्हणतांना त्याच्या ओठाशी आलेलं शब्द थबकले होते. डोळ्याच्या पापण्या थरथरत होत्या. मग सारा जोर एकवटून तेच वाक्य त्यानं पूर्ण केलं. ‘बाई, आपला देवदास गेला

वं !’ असे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडते न् पडते, तर आईने हंबरडा फोडून गाडीच्या खाली उडी घेतली. आमचाही कंठ दाटून आला.

गाडीला जुंपलेले दोन्हीही बैलं ठक उभे राहीले. एक बोढी व दुसरा सांड्या होता. त्यांचाही दादावर अपार लळा होता. दादा दिसत नव्हता; म्हणून मुक्या जनावरांनी आपल्याला चारा-पाणी घालणारा सखा राहिला नाही; असे जाणले असावे. म्हणूनच की काय, दोन्हीही बैलांच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. इतका जीव दादांचा बैलावर व बैलाचा दादावर होता.

आम्ही सरकारी दवाखान्याच्या आवारात आलो. दादाचा पांढर्‍या धोतराने झाकलेला निर्जीव देह लिंबाच्या झाडाखाली ठेवला होता. आमच्या कुटुंबातील पहिल्यांदाच एक जीव गेल्याचं मी अनुभवत होतो. आम्ही सर्वजण जिवाच्या आकांताने रडत होतो. पोटच्या पोराला अकाली गमावल्याचं दु:ख आई-बाबांना किती विषण्ण करणारं होतं, ते शब्दात सांगता येत नाही ! तरुण पोराला हरवण्याचं दु:ख कोणत्याही आई-वडीलांना पचवणं कठीणच आहे ! त्याच्या मरणाने त्यांना पार उन्मळून टाकले होते. त्यांच्या जगण्यातला सारा उत्साह मावळून गेला होता.

त्याला तलावफैलातील बापुरावदादाच्या सासुरवाडीला घेऊन आले. तेथेच त्याची उत्तरक्रिया केली. कारण जळलेले मृतशरीर लवकर खराब होते. म्हणून शव गावाला आणता येत नव्हतं.

दादाच्या निर्जीव देहाला शिडीबरोबर उचलतांना आमच्या उरात दाटून आलेला उमाळा भडभडून बाहेर पडला. त्याला घेऊन जातांना आम्ही गुंडाळलेल्या प्रेताकडे सारखं पाहत होतो. शेवटी दिसेनासं झालं; ते कायमचंच ! दादाचं अस्तित्व तेव्हापासून कायमचं आमच्या डोळ्याआड झालं.

दवाखान्यातला पांढरा कोट घातलेला व तपासण्याचं यंत्र गळ्यात अडकवलेला डॉक्टर आमच्याही घरात होऊ शकत नाही का? असा प्रश्‍न मला समजायला लागल्यापासून सारखा सतावीत होता. म्हणून मी माझा लहान भाऊ – अज्यापला डॉक्टरच्या रुपात पाहत होतो.

दादा मेला, तेव्हा अज्याप टुणूटुणू चालत होता. तो पांदणभर रडत फिरत होता. त्याचे डोळे बहुतेक भिरभिर, त्या पांदणीच्या रस्त्याने दादाचा शोध घेत असावे.

त्यानंतर बाबाने यशोधरावहिनीला आणले. ती आमच्या सोबत कौलं थालायची. मला ती फार आवडली होती. तिने आमच्या सर्वांवर लळा लावला होता. दादा असता तर ती आमच्याच घरी राहिली असती. पण तो गेल्यामुळे ती सुध्दा आमच्या घराला पारखी झाली. बाबाने तिला लग्नात केलेले दागिने परत घेतले नाही. दादाची आठवण म्हणून तिलाच ठेवायला सांगितले. ती परत गेली, तेव्हा आमच्या डोळ्याच्या कडा आपोआप ओलावल्या होत्या.

आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात जे यश मिळालं होतं, त्यात दादाचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या हिंमतीने शामरावदादा व बाबा शेतीवाडीचे कामे पार पाडीत. कोणत्याही कामाचा बोजा देवदासदादा लिलया पेलत होता. पण आता त्यांची अवस्था वावटळीत उन्मळून पडलेल्या झाडासारखी झाली होती. त्यांची कंबर खचली होती. हात-पाय गळल्यासारखे झाले होते. देवदासदादाच्या आठवणीने आई झुरणीला लागली होती. खरंच, आमच्या घरातली ताकद निघून गेली नि आम्ही दुर्बळ झालो होतो.

 

 


कथा चौदावी – पावसाची झड

 

खेड्यामध्ये खरंच अनोखं असं वातावरण अनुभवाला यायचं. माझ्या बाबासारखे अनेक शेतकरी उन्हाळ्यात आग ओगणार्‍या सूर्याच्या किरणाने बायका-पोरांसोबत भाजून निघत. पण त्याची तमा न बाळगता उन्हाळवाही करायचे. चोपुन-चापून शेतीची मशागत करुन येणार्‍या पावसाच्या आगमनाचं उत्सुकतेने वाट पाहत राहायचे.

आई वाळलेल्या पर्‍हाट्या, तुरीचे खुस्पटं किंवा ज्वारीचे फणकटांचे ढीग रचून संध्याकाळच्या वेळी सावली पडल्यावर पेटवून द्यायची. मग तो आगीचा लोळ पाहतांना अंगावर शहारे उमटत. त्या गंजीतील किडे, माकोडे, अळ्या होरपळून मरतांना जिवाची तगमग होत होती. आजूबाजूच्या शेतामध्ये असंच जंगलाला वणवा लागल्या सारखं दृष्य दिसायचं.

एखाद्यावेळी खरंच दुरवर डोगराच्या जंगलात वणवा पेटलेला दिसला की माझ्या मनात भीतीचा गोळा उमळायचा. कुणीतरी वाटसरु मुद्दाम पेटवीत होता की, बिडी शिलगवतांना आगपेटीच्या काडीने पेटत होता, की लाकडाच्या घर्षणामुळे पेटत होता, ते काही कळत नव्हतं. ती आग पुर्‍या जंगलभर पसरत होती. त्यामुळे लहान-मोठ्या जंगली प्राण्यांची, पक्ष्यांची, सरपटणार्‍या जीवांची आश्रयस्थाने नष्ट होवून जात; तेव्हा मनाला चुटचुट लागून जात होती.

गाई-ढोरांच्या शेणाचं खत वावरात आणून टाकत. मी लहानपणी खताच्या डालीवर डाव-डाव करायला जात होतो; तेव्हा बारीक कण नाका-डोळ्यात व कानात शिरत असे. बैलगाडी हाकणार्‍या धुरकर्‍याचं गुणगुणणं, वावर येईपर्यंत कानात घुमत राहायचं.

शेतकर्‍यांप्रमाणेच उन्हाने रापलेली-तहानलेली माती सुध्दा पावसाचे स्वागत करण्यासाठी आसुसलेली राहत होती. पावसाच्या आगमनाने धरतीचं तन-मन कसं उत्फुल्लित होवून जात होतं.

त्याकाळी रोहिणी नक्षत्रातच घनघोर पाऊस बरसत असे. ऊन्हाळभर रखरख असलेल्या शिवारात पाऊस पडला की जमिनीची गर्भधारणा झाल्यासारखे वनस्पती भराभर उगवून वर यायला लागत. काही अंकुरलेल्या चिमुकल्या रोपावर टरफलाची टोपी दिसून येई तर काही सुईसारखी सरळ बाहेर येत. त्यात कुसळी, काशा, हराळी, कंबरमोडी, काटमाटी, बरबडी, चिकाटा, वाभिट, गोखरु, डोरली, वाघनखं, परडी, धोतरा, कामीनी, फटाके, ऎरंडी, चरोटा, रानभेंडी, पाया-पोटर्‍याला चिकटणारे कुत्रे, अशा कितीतरी वनस्पतीच्या जाती असायच्या. त्यांची इवलीइवली रोपे पावसाच्या सरीबरोबर डोलतांना दिसत; तेव्हा असं वाटायचं की जणू काही त्यांना झालेला आनंद नाचूनगाऊन दाखवीत आहेत. त्या कोवळ्या अंकुराचा वास मस्त नाकात घुमायचा तर वेडावून टाकणारा मातीचा गंध चोहीकडे दरवळायचा. गावाचा, नद्या-नाल्याचा व वावराचा चेहरामोहरा बदलून जायचा. पांदणभर पाण्याची चिलकी वाहत राहायची. त्या पाण्यात धपकण उड्या मारायला किंवा फतक फतक चालायला मोठी मजा वाटायची.

लहान-मोठ्या वृक्षांना लपेटलेल्या, हिरव्यागच्च पानांनी नटलेल्या, वेली-महावेली हिरवी शालू नेसून पावसाचे एक-एक थेंब झेलत, नखशिखांत भिजून आपल्याच नादात डुलतांना दिसत. त्यांच्या खांद्यावर उमललेल्या कळ्या-फुले सूर्याकडे टकमक पाहतांना दिसत. जणू काही आपल्या बाळांना वर उचलून खेळवत असल्याचा भास व्हायचा. त्यापैकी भोवरा, दोडके, काकडी, कोहळे, भोपळे, शेलणे, उतरन, काचकोरल्या वेली इतक्या झपाट्याने वर चढून जायच्या की पाहता पाहता पूर्ण झाडाला वेढून घेत. अशा वेली कुंपण-कुपाट्यावर चढल्या की त्याचं वाळकं रुप बदलून हिरवेगार होत असे.

पावसाची चाहूल लागताच जमिनीच्या कुशीत पहूडलेले असंख्य जीव सुध्दा वनस्पतीसोबतच घाईघाईने बाहेर येऊ लागत. त्यात मुंग्या, माकोडे, किडे,  कोळी,  अळ्या, झुल्लरं, विंचू साप, गोमी, गोगलगायी, गांडुळं, गोसावी, काजवे, पतंग, फुलपाखरे, सोनपाखरं, पाणघोडे, नाकतोडे अशा कितीतरी प्रकारचे जीव निसर्गाशी एकरुप होत.

गांडूळ, अगदी गुबगुबीत दिसणारा प्राणी, आतील माती बाहेर आणून जमिन कशी सुपिक बनवीत होते. गोगलगाईला स्पर्ष केला की स्वत:ला गुंडाळून घ्यायची. जणू मेली, अशी सोंग करायची. आम्ही तिला पैसा म्हणत होतो. एक दुसरीच्या पाठीवर बसून डावडाव करतांना आम्हाला मोठी गंमत वाटायची. तीचे बिटूकसे पिल्ले रस्त्यात पायाला आडवे आडवे होत चालत. पिल्लांचे गोचकेच्या गोचके जागोजागी पडलेले दिसायचे. बिच्चारी, त्यांची माय इतके पिल्ले कशी देत असेल, कोण जाणे? एका गोचक्यात शेकडोंपेक्षाही कितीतरी जास्त संख्या असेल. त्यांचा ताफा शिस्तीत सरकतांना पाहून आश्चर्यच वाटायचं. त्यांच्या झुंडीवर पाय पडला की चेंदामेंदा होत. त्यांच्या जीवाला माणसाच्या दृष्टीने काय किंमत?

मी अशीच गोष्ट वाचली होती की ‘मुंगी आपल्या पिलाला सांगते, बाळ तू भिंतीच्या कोपर्‍या कोपर्‍याने चालत जा. कारण मनुष्य नावाच्या प्राण्याला आपल्याकडे पाहण्यासाठी डोळे नसतात. ते आपल्याला चिरडून जात असतात.’

तसंच इतर वेळेस नाही पण ह्यावेळेस दिसणारा किडा म्हणजे गोसावी. हा मखमली रेशमाच्या दाट केसांनी लपटलेला, गुबगुबीत, लालभडक व संथगतीने चालणारा. त्याला आजीबाई कुंकवाच्या डब्बीत ठेवीत. त्यामुळे कुंकू लालगर्द बनते, असे म्हणत. त्याच्यात औषधी गुण असल्याचे सांगत. अर्धांगवायूवर उपयोग करीत. नवदांपत्यांना उत्तेजक म्हणून देत. पर्यावरणाच्या दृष्टीने तो पालापाचोळा कुजवीण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भुमिका वठवीत.

काही सोनकिडे माणसाच्या घाणीचे गोळे ढकलत नेतांना पाहत होतो. कुणीतरी उघड्यावर केलेली घाण निस्तारण्याचं काम ते इमानेइतबारे करीत. कुणी म्हणायचं की हेच किडे रात्रीला काजवा बनून अंधारात ऊजेड पाडण्याचं काम करीत. म्हणूनच उपरोधिकपणे म्हणत की, ‘काजवा, तू काळाकुट्ट अंधार पडला तरच तुझा मिणमिणता उजेड प्रकाशमान भासतो. नाहीतर दिवसा तू क्षुद्र किडाच असतो.’

अशा प्रकारचे अनेक किडे शेतकर्‍यांना शेतमाल पिकवीण्यासाठी जीवाभावाची मदतच करीत. नजरेला न दिसणारे मातीतले जीवाणू सुकलेल्या पाल्या-पाचोळ्याचा भुगा करून व मृत प्राणी, प्राण्यांच्या विष्ठांचे विघटन करून त्यातील खनिज घटक वनस्पतींना मिळवून देण्याची किमया करीत. त्यामुळे मातीचा कस वाढून जमीन सुपीक बनवीत. मधमाशा पण फलोत्पादनासाठी अनिवार्य असत.

सोनपाखरु, सोनेरी रंगाचे पंख असलेला मनमोहक छोटासा पाखरू. तो रंगीबेरंगी रेशमासारखे फुले आणि बारीक काटे असलेल्या चिल्हाटीच्या झाडावर नेमका बसलेला दिसायचा. त्याला ह्या झाडाचे बारीक पाणे खायला आवडत असावे. आम्ही त्याला आगपेटीच्या रिकाम्या डब्बीत ठेवीत होतो. डबी उघडून पाहिली की त्यात सोपीच्या आकाराचे बारीक अंडे दिसायचे. आम्ही त्याला सुताने बांधून वर फेकत होतो. मग तो वर उडायचा. अशा खेळात आम्ही त्याची मजा घेत होतो.

रंगिबेरंगी फुलपाखरं व पिवळ्या रंगाच्या पिफोल्या या फुलांवरुन त्या फुलावर उडतांना नजरेस पडल्या की आम्ही सुखाऊन जात होतो. पावसाळ्याच्या आगमनानंतर माकोडे-वाळव्यांना पंख फुटत. ते मोठ्या प्रमाणात जिकडे-तिकडे उडतांना दिसत. त्यांचे पंख तुटून जमिनीवर इतस्तत: पसरलेले दिसायचे. काही पाखरं यांना हवेतल्या हवेत अलगदपणे टिपून घेत. पाण्याच्या डोबर्‍यात लपून बसलेले बेंडुकांच्या जाती प्रकट होऊन डरावऽऽ डरावऽऽऽ असा कल्ला सुरु करीत. रात्रीच्या सुनसान वातावरणात त्यांचाच आवाज सर्वदूर घुमत राहत असे.

पाऊसही किती खट्याळ ! कधी लहरी, कधी नाजूक, कधी हलकासा, कधी मोत्यासारखा टपटपणारा, तर कधी प्रत्येकवेळी, प्रत्येकक्षणी तो वेगवेगळाच भासणारा…! कधी सरसर, कधी टिपटिप, कधी रिपरिप, कधी धुवांधार-मुसळाधार, कधी बेभान-वेडापिसा-धसमुसळा, कधी अंधारलेला, कधी उन्ह-पावसाच्या खेळात दंग झालेला, कधी गडगडाट करणारा, कधी विजेच्या प्रकाशाने न्हाऊन निघणारा, तर कधी रौद्ररूप धारण करून तांडव नृत्य करणारा असा अगदी विलक्षण वाटायचा.

हा नटखट पाऊस स्त्री देहाशी झोंबाझोंबी अन् तिला ओलेचिंब करुन, तिचं वस्त्रात लपलेलं उत्तान भाग पारदर्शक करुन वात्रटपणा-चावटपणा करतांना दिसायचा. कधी तो प्रियकरासारखा गुंजारवत, कधी प्रेयसीसारखा नखर्‍यात, कधी प्रेमळ बायकोसारखा छमछम करीत, कधी आईच्या मायेसारखा हळवा होत तर कधी रागावलेल्या बापासारखा तुटून पडायचा ! असे कितीतरी रूपे पाहून सारं काही अनोखं वाटायचं.

पाऊस टपटपू लागला की हिरव्याकंच झाडांच्या इवलाल्या पानांवरून गळणार्‍या थेंबाचे संगीत वाजू लागत. सारं रान पावसाच्या या अजब संगीताच्या तालावर फेर धरुन नाचत.

आमची त्यावेळची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे सुट्टी असली की गावाला येऊन घरखर्चाला आधार म्हणून मी व जनाबाई, आई-वहिनीसोबत लोकांच्या कामाला जात होतो. मी एकदा असंच पांढरी गावाच्या रस्त्याने श्रावणच्या वावरात हातात विळा, फडकं व पोतं घेऊन निंदायला जात होतो. आमच्या सोबत एक-दोन बाया दुधपित्या चिल्या-पिल्याना घरी ठेऊन आल्या होत्या.

त्यावेळी ओली माती, अधूनमधून होणारा पावसाचा शिडकावा अन् हिरव्या रंगाने नटलेला परिसर अशा सार्‍या माहोलामध्ये रस्ताच जणू भारावून गेल्यासारखा वाटत होता. रस्त्याच्या धुर्‍यावर मेडसिंगचं झाड होतं. त्याच्या खाली पडलेल्या मोगर्‍यासारख्या पांढर्‍याशुभ्र फुलांच्या सड्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. वार्‍याच्या झुळकीने हे वन-फुले टपाटप खाली पडत होते. जणू काही आभाळातले तारे जमिनीवर अवतरले की काय, असे वाटत होते. त्याचा सुगंधीत वास वार्‍याच्या झोताने सगळीकडे पसरला होता. मी एकटाच तो नजारा पाहात घुटमळत थांबलो होतो.

संध्याकाळी परत येतांना झाडाखाली पहुडलेले सारे फुलं कोमेजून गेले. पण त्यांनी दिलेला सौंदर्याचा आनंद मात्र कोमेजला नव्हता. माझ्या तरल मनाच्या भावभावनांचा फुलोरा त्यातून दरवळत होता. माझ्या मनात विचार आला की, एका दिवसाचं आयुष्य घेऊन जगणारं हे फुलं किती आनंद देवून गेले. आपण इतकं मोठं आयुष्य घेऊन जगतो, मग आपण किती मोठा आनंद द्यायला पाहिजे, नाही का?

त्यावेळी निंदनासाठी तासाला एक आण्यापासून पैसे मिळत. चिखल-पाण्यात, ओणव्याने निंदतांना पायाच्या पोटर्‍या दुखत. कंबर मोडल्यासारखी व्हायची. कधीकधी चिखलात लपलेला काटा हळूच पायात घुसला की जीवाची तळमळ व्हायची. पायाच्या बोटाला चिखल्या होत. सतत भुरभुरणार्‍या पावसाने अंगावरचे सारे कपडे, केसं व उघडं अंग ओले होत. पण पावसात ओलेचिंब होण्यातही मोठी अपूर्वाई वाटत होती. निंदतांना अंबाडी, चरोटा, कुंजरा, काटमाटी भाजी दिसली की खुडून ओट्यात टाकत होतो.

निंदतांना लव्हा जातीचं गवत उपटून गंमत करायचो. कोण्या गरोदर बाईला मुलगा होईल की मुलगी ते पाहण्यासाठी गवताला चीरायचो. सरळ चिरलं की मुलगा, आडवे-तिडवे चिरले की मुलगी ! अशा गमती-जमतीमुळे थकलेल्या जिवाची तगमग थोडीफार कमी व्हायची.

कधी लाजरीचं चिमुकलं झाड पाहून मन कसं आनंदीत होत असे. या झाडाला बोट लावता क्षणीच पाने मिटून जायचे. जणू काही लाजेने चूर होत असल्याचे भासत होते. जशी बाई लाजून घसरलेला पदर सावरून घेते, तशी ती आपले पाने मिटवून घेत होती. कधी कामून्याचं झाड दिसलं की त्याचे फळे खाल्ल्याशिवाय राहत नव्हतो. कधी फटाक्याच्या झाडाचे पातळ कवच दाबून फटकन् फोडत होतो.

कधी पायावर मऊ माती घेऊन हाताने थापटून पाय काढून घेतला की खोपडी तयार व्हायची. ते पाहून नवनिर्मितीच्या आनंदाने मन भरून येत असे. वावरात कॉवऽऽ कॉवऽऽ करीत सारे कावळे एका जागी बसत. जणु काही त्यांची महत्वाची मिटींग भरली की काय, असं ते दृष्य दिसायचं. डोमकावळा काळा कुळकुळीत, अंगाबांध्याने सुदृढ व क्वचीत दिसायचा. इतर कावळ्यांना काही वाण नव्हती. दुपारी भाकर खाऊन ओढ्याचं, झर्‍याचं किंवा वावरातील विहिरीचं पाणी पिऊन तहान भागवीत होतो.

आभाळातले ढग वाहत जातांना वेगळाच नजारा पाहायला मिळत होता. काळे-पांढरे ढगं धूम पळतांना दिसत. त्याचा आकार सतत बदलत राहात. त्या ढगांत माणसाचं, प्राण्याचं किंवा झाडाचं असं काहीतरी चित्रविचित्र प्रतिकृती तयार होत व क्षणातच विरुन दुसरी प्रतिमा तयार व्हायची. असं ते विस्मयकारी दृष्य पाहतांना नजर काही  केल्या हटत नव्हती.

एखाद्यावेळेस आभाळ गच्च भरून आलं की मनात उदासिनतेच्या कळा पसरून अनामिक हुरहूर वाटत होती. आत्तापर्यंत न दिसणारे ढग आभाळात घिरट्या घालू लागले की पाहता पाहता सर्वदूर काळोख पसरत असे. इतकं की पुढचं दृष्य अंधूक दिसायला लागायचं आणि क्षणार्धात आभाळ फाटल्यासारखा पाऊस धो-धो कोसळू लागायचा. लख्खकन चमकणार्‍या विजांच्या तारा वाकड्या-तिकड्या होवून आमच्या डोळ्यासमोर नाचत आणि ढगांच्या गडगडाटाने कानठळ्या बसवत. अशावेळेस पोत्याची घोंगशी करून झाडाखाली किंवा शेतातल्या इरल्यात बसून पाऊस, वारा व विजेशी टक्कर देत होतो. ओलं झालेलं शरीर थंडीने कुडकुडत, गारठल्यासारखं होत असे.

कोसळणार्‍या पावसाबरोबरच पावसाच्या आठवणीने माझेही मन ओलेचिंब भिजून जात असे. मी व अज्याप असंच एकदा यवतमाळला जात होतो. तेव्हा आमचे खूप हाल झाले होते. गावावरुन निघतांना आकाश निरभ्र होतं. परंतु गोधणीच्या जवळपास मात्र ढग आभाळात जमू लागले होते. दिवस कलायला अवकाश होता. तरीही सर्वदूर अंधार दाटला होता. पाहता पाहता पावसाचे टपोरे थेंब झोंबायला लागले. धो धो पाऊस सुरु झाला. मुसळधार पाऊसच होता तो ! वारा, पाऊस व दाट काळोख यामुळे जवळचा माणूस दिसेनासा झाला होता. जोर्‍यात वाहणार्‍या वार्‍याने वातावरणात गारवा पसरवला होता. पायात चप्पल नाही की डोक्यावर छत्री नाही. आम्ही ओलेचिंब भिजलो. दोघेही झाडाच्या बुंध्यापाशी थांबलो. आम्हाला खेटूनच विज चमकून गेली. विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट सारखा सुरु होता. त्यामुळे भीतीने कापरे भरायला लागले. नाल्याला धडधड करीत पुराचे लोंढे वाहत आले व पाहता पाहता दोन्ही थड्या भरून गेल्या. अंगात थंडीने कुडकुडी भरली होती. ओल्या कपड्यानेच होस्टेलला आलो. अशी ही पावसाची आठवण मला चाटून गेली.

दुसरी आठवण म्हणजे गारपिटीची. ऐन तिन्ही सांजेची वेळ झाली होती. त्यावेळी मी घरीच होतो. लहान होतो. आभाळ भरून आलं. क्षणातच अवकाळी पावसाचा जोर वाढला. सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने सारा परिसर चिंब भिजला. त्या पाठोपाठ मोठमोठ्या जीवघेण्या गारांचा मारा सुरु झाला. सारा आसमंत थरारला. सार्‍यांची धांदल उडाली. अंगणात गारांचा सडा पडला. कुणाचे घरं पडले. भिंती पडल्या. टीनं उडले. कौलं फुटले. झोपड्यांवरचे गवत विस्कटले. शिवारातले पिकं उध्वस्त झाले. गाई-ढोरं, पाखरांना तडाखा बसला. कडब्याचा बाड विखरून पडला. बैलांचा चारा जमीनदोस्त झाला. मोठे हाल झाले लोकांचे !  ह्या गारपिटीचा तर मी धसकाच घेतला होता.

वावरातून घरी परततांना अंधारलेल्या संध्याकाळची चाहूल लागायची. मन हुरहूर करीत काटेरी, दगडा-धोंड्यांचा, चिखलाचा, उंच-सखल निसरड्या-घसरणीचा, वाहत्या पाण्यातून, झाडाझुडपातून व घाण वासाने माखलेला हागणदारीचा रस्ता तुडवीत जाणे भाग पडत असे. घराच्या ओढीने अशाही अवघड रस्त्याने जायला जरा हुरूपच येत असे.

पावसाचे अनेक तर्‍हा आम्ही पाहत होतो. रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रात पडणारा… आला तर भरपूर नाहीतर अजिबात नाही… पुनर्वसू नक्षत्रात पडणारा जोरदार, मुसळधार व जोशपूर्ण… म्हणून तरणा… तर पुष्य नक्षत्रात पडणारा सारखा पण रिमझिम… शेतीसाठी फारसा उपयोगाचा नसणारा… जोश नसणारा म्हणून म्हातारा …

मघा नक्षत्रात कधी खूप पाऊस पडायचा. नाहीतर काहीच नाही. असं विचित्र नक्षत्र !  म्हणून लोक म्हणायचे, ‘ना लागती मघा तं वरती बघा, नाही तं चुलीपाशी हागा.’ कधी इतका पाऊस पडायचा की हागायला बाहेर जाणे मुश्कील होत असे. मग हा पाऊस जोरदार कडाडणारा, त्रास देणारा म्हणून सासूचा पाऊस तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस शांतपणे व शेतीला उपयोगी म्हणून सुनांचा पाऊस म्हणत. उत्तरात बरसला की, ‘बरसल्या उत्तरा, भात न खाये कुतरा.’ असे म्हणत. म्हणजे इतका विपुल धान पिकायचा की सांगूच नका !

हस्त नक्षत्र mhaम्हणजे घटक्यातच हत्तीच्या हजार सोंडेने धारा सोडून तावून तापून जीव नकोसा झालेल्या पृथ्वीला शांत करणारा ! शेतीला उपयुक्त… म्हणून ‘पडतील हस्त तर शेती होईल मस्त’ असे म्हणत. चित्रा नक्षत्राचा शेतीचे नुकसान करणारा तर स्वाती नक्षत्राताचा मस्तच असणारा… म्हणून ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ असे म्हणत.

आषाढ-श्रावणातली-पोळ्याच्या जवळपासची झड तर भारी जड… दिवसरात्र थुईथूई… सूर्याचं दर्शन न घडवणारं… मजुरांच्या मजुर्‍या, जेवणाचे फाके पाडणारं… घरातच कोंडून ठेवणारं…

पावसाची वावसळ… घरा-दारात चिकचिक… भिंतीतून झिरपणारा ओलावा… चिखलाचे पाय घरात… पावसाची पिरपिर,.. ओले कपडे… कुबट वास… यामुळे जीव गुदमरून जात असे. थंडीने अंग थाटरुन जायचं. मग चुलीत जाळ करुन शेकत बसावे लागे.

घरातला दाळदाणा सरुन जायचा. वावरातून काटमाटी, चरोटा, मसाल्याचे पाने आणून त्यावरच दिवसं कंठावे लागत असे. मुठभर पिठाच्या भाकरी, नाहीतर ज्वारीच्या कण्या, नाहीतर आंबिल-घाटा खावे लागत असे. कसेतरी उधार-उसणवारी करुन दाळ-दाणा आणून पोट भरावे लागत असे. नाहीतर उपास-तापास करुन कळ काढावे लागत असे. अशी झड कधीकधी महिनाभर राहत होती. तरीही झड काही केल्या थांबत नसे. तेव्हा कास्तकार-मजुरांचे हाल पाहावल्या जात नसे.

वावरात पिवळे फटक, वाढ खुंटलेले, रोगाला बळी पडलेले पिके, साचलेलं पाणी, घरे, चीलक्या, दलदल, टोंगळाभर गवत पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू तराळल्याशिवाय राहत नसे.

गावा-वावरातल्या विहिरी पाण्याने तुडूंब भरुन जात. माझ्या मोठ्याआईच्या अंगणातून जमिनीला कठ्ठा फुटून पाझर लागत होता. असा झरा वाहतांना पाहून गंमतच वाटत होती.

कास्तकारांची शेती म्हणजे बिनभरवशाची ! कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. कधी रोगराई, तर कधी कीड. कधी पूर तर कधी गारपीट. कधी अतिउन्ह तर कधी अतिथंडी. निसर्ग तर सोडाच पण व्यापारी आणि सावकार सुध्दा त्यांना लुटायचे सोडत नव्हते. सरकार तर कधी त्यांच्या दुखण्यावर फुंकर घालीत असल्याचे दिसत नसे.

अशा झडीत चिखल-गाटा अन् काटेही तुडवत जावे लागे. चिखलातील छो्ट्या-मोठ्या दगडावर पाय ठरत नसे. कसंतरी कसरत करीत शरीराचा तोल सांभाळत जावे लागत असे. असा हा झडीतला पाऊस नकोसा वाटायचा; पण जेव्हा नसायचा तेव्हा मात्र तो असावा म्हणून मन आसुसलेलं असायचं.

 


कथा पंधरावी – बाबाची सही

 

मी निळोणाच्या शाळेतून चौथा वर्ग पास झाल्यावर पुढील शिक्षण कसं होईल, याची सर्वांना चिंता लागली होती. कारण त्यानंतरचं शिक्षण यवतमाळला होतं. मग तेथे कोणाकडे ठेवायचं, अशी समस्या निर्माण झाली होती.

एकदा यवतमाळच्या बाजारात बकूबाई सोबत बाबाची भेट झाली. ती उमरसरा गावाला राहत होती. या गावाला बकूबाई व सखूबाई अशा दोघ्या बहिणी राहत. त्या बाबाच्या चुलत नात्यामध्ये बहिणी लागत.

तिच्याकडे बाबाने आम्हा बहीण-भावाच्या शिक्षणाची गोष्ट काढली.

‘माझ्याकडे ठेव नं मामा.’ सुभद्राबाईने सुचवीले.

सुभद्राबाई ही आत्याची मोठी मुलगी. तिचे लग्न झाले होते. तिच्यामुळे आमचा राहण्याचा प्रश्न मिटला.

उमरसरा हे गाव यवतमाळ शहराला लागून एखाद्या मैलावर होतं. रस्त्यात आडवा नाला होता. पावसाळ्यात वाहता तर उन्हाळ्यात आटून जायचा. अंधार पडला की या रस्त्याने जायला भीती वाटायची. घराघरात पेटवलेल्या मिणमिणत्या दिव्यांची किरणे तेवढे अंधाराला भेदून रस्त्यावर येवून पडत.

सुरुवातीला आम्ही सुभद्राबाईकडे राहत होतो. त्यानंतर लहान आत्याकडे. आत्याची मुलं- शामराव, सोपान, मुलगी महानंदा व सुना- फुलनबाई, पारवताबाई असे सर्व एकाच घरात राहत. तेथून मोठ्या आत्याच्या खोलीत राहिलो. तिला पण दोन मुलं. एक वामन व  दुसरा नामदेव. त्यानंतर आम्ही सोपानदादाच्या घराच्या मागच्या पडवीत झोपडीत राहायला गेलो. ही झोपडी बाबाने गावावरुन लाकूड-फाटा आणून, पळसाच्या काड्याची भिंत, छपरावर बांबूचे तट्टे आणि पळसाच्या डाहाळ्या टाकून बांधली. भिंतीला शेण-मातीने लिपून घेतले. अशा पध्दतीने हे सुंदरसं झोपडं बनविलं.

बाई म्हणजे माझी मोठी बहिण जनाबाई. ती माझ्यापेक्षा मोठी, पण  शिक्षणामध्ये एका वर्गाने मागे. कारण तिला माझ्यानंतर शाळेत टाकले. माझा लहानभाऊ अज्याप याला राखण्यासाठी तिला ठेवले होते. आमच्या ह्या घरातील कर्ता म्हणून प्रपंचाची सारी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. जे वय खेळण्या-बागडण्याचं, त्या वयात घर सांभाळण्याचं ओझं तिच्यावर आलं. बाबांनी मला म्युनिसिपल हायस्कूलमध्ये पाचव्या वर्गात टाकले.

वर्ग चालू असतांना चपराशी आला.

‘जुमळे कोण?’ मी ऊभा राहीलो.

‘तुला बाबुने बोलावीले.’

मी ऑफीसमध्ये गेलो. बाबुने फॉर्म दिला.

‘तुझ्या बाबाची सही उद्याच्या उद्या आणून दे.’

तो फॉर्म स्कॉलरशीपचा होता. वर्षाला पंधरा रुपये मिळणार होते. मागास जातीतील ज्यांना चौथ्या वर्गात चांगले मार्क्स मिळालेत, त्यांना ही सरकारची स्कॉलरशीप मिळणार होती. आमच्या शाळेत मी व दुसरा धोपे नावाचा धोब्याचा मुलगा, अशा दोघांची निवड झाली होती. मी संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी आलो. दप्तर खुंटिला अडकवून ठेवले.

‘बाबाच्या सहीसाठी गावाला जात आहे.’ मी बाईला सांगितले.

‘रस्त्यातच अंधार होईल. मग कसा जाशील रे अंधारात?’

‘पण बाबाची सही उद्याच्या उद्या आणून द्यायची आहे ना? अंधार पडला तरी जातो मी ! सकाळी लवकर येईन.’ असे म्हणून मी तडक निघालो.

माझे गाव तीन कोस दूर होते. त्यावेळी पायी जाण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता. रस्ता चांगला नव्हता. लहान-मोठे दगडं, माती-मुरमाटीचा तो कच्चा रस्ता होता. परंतु लहानपणापासून नेहमीचा जाण्या-येण्याचा असल्याने अंधारात सुध्दा रस्ता चुकत नव्हता. इतकी ती वाट मळलेली होती.

झाडांझुडपातून, जंगलघाटातून, उतार-चढावातून, शेतातील पिकातून, शेताच्या धुर्‍याधुर्‍याने, बैलगाडीच्या चाकोरीने, बरडाच्या काठा काठाने हा रस्ता गेला होता. पहिले गोधणी, मग निळोणा, त्यानंतर माझं गाव चौधरा. यवतमाळ सोडल्यावर जंगल लागलं. घाट उतरल्यावर नाला. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेत्या. त्यातील पिके माझ्या कंबरेपर्यंत तर कुठे कुठे माझ्या उंचीएवढे.

गोधणी गाव गेल्यावर बरड लागला. सूर्य बरडाच्या आड लपत हळूहळू खाली सरकत होता. तसंतसा त्याचा आकार व लालभडकपणा वाढत जावून क्षितिजाला टेकत होता. तांबूस, जांभळे, लालसर असे चित्रविचित ढग दिसत होते. त्या प्रकाशकिरणांनी अजूनही परिसर उजाडून ठेवला होता. पण सूर्याचे अस्तित्व संपत चालल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती. त्या संधीप्रकाशात वाट दिसेनासी झाली. दूरवर चमचम करणार्‍या चांदण्या वाट दाखवीत होत्या. पण त्यादेखील लुप्त झाल्या. हळूहळू अंधारलेला काळोख सार्‍या परिसराला कवेत घेत होता. वारा निस्तब्ध झाला. पाखरं मोठ-मोठ्या झाडावर रात्रीच्या राहुटीला एकत्र जमले. त्यांचा किलबिलाट मंद होत गेला.

जसजसी झाकट पडत चालली, तसतसे माझ्या अंगावर अनामिक भीतीचे काटे उभे राहत होते. कशीतरी हिंमत करुन आलो खरा, पण अंधाराच्या जाणिवेने माझे सर्वांग शहारत चालले होते. हृदयाच्या ठोक्याची गती वाढत होती. छाती धडधड करत होती. ती काळीकूट्ट अंधारी रात्र अमावस्येची तर नसेल, अशी मनात शंका आली. शेतातल्या पायवाटेने जीव मुठीत घेऊन चाललो होतो. ते कोलामाचे शेत म्हणून ओळखल्या जात होते. शेताच्या मधोमध मोहाच्या झाडाजवळून पायवाट जात होती. पायवाटेच्या दोन्हीही बाजूला ज्वारीचे धांडे माझ्या उंचीएवढे वाढले होते.

शेत ओलांडल्यावर रस्त्याच्या आजूबाजूला गर्द झाडी अन् मग नाला. ह्या नाल्यावर जीवाची उलघाल सुरु झाली. कारण काठाच्या अलीकडे व पलीकडे निमुळता व चिखल-पाण्याचा घसरता रस्ता होता. आजूबाजूच्या गवताने व पालवीने तो झाकून गेला होता. पाय घसरुन पडू नये; म्हणून पायाच्या बोटाची नखे ओल्या मातीत रुतवून जवळच्या पालवीला हाताने पकडीत होतो.

दिवसा निखळ आनंद देणारी नाल्यातील पाण्याची खळखळ आता नकोशी वाटत होती. रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज शांतता भंग करुन अंधाराला सोबत करीत होता. कुठे खुडखूड वाजले की अंगावर सरसरुन काटे उभे होत. मधातच पाखराच्या फडफडण्याचा आवाज दुरुन ऎकू येत होता. पाखरांच्या गुंजण्याचा आवाज कधी मंजूळ तर कधी भेसूर वाटत होता. मला प्रश्‍न पडायचा की या पाखरांना अंधार्‍या रात्रीची भीती का वाटत नाही? माणसांनाच का वाटते? आपण ज्या रस्त्याने जातो, त्याची दिवसा भीती वाटत नाही, मग रात्रीलाच का वाटते?

लहान-मोठ्या झाडा-झुडपाच्या सावल्या विचित्र दिसत होत्या. कोणीतरी उभे असल्याचे पण जवळ गेल्यावर सावली असल्याचे लक्षात येत होते. कधी मधातच काजवा ऊजेडाची उघडझाप करीत चमकून जात होता. थोडासा का होईना बंद चालू होणार्‍या बिघडलेल्या बॅटरीप्रमाणे अंधारात उजेड पाडून जात होता. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार वाटत होता.

मला विंचु-काट्यांची, सापाची किंवा हिंस्त्र पशु-पक्षांची जेवढी भीती वाटत नव्हती, त्यापेक्षा भुता-खेतांची, चकव्या-लावडिनीची जास्त वाटत होती. कारण अशा भीतीदायक गोष्टी लहानपणापासून खूप ऎकल्या होत्या. त्या मनाच्या कोपर्‍यात घट्ट जाऊन बसल्या होत्या. अशा भयान रात्रीला हमखास बाहेर येत होत्या. मग भीतीने आणखीनच कापरे भरत. अशा गोष्टीत काहीच तथ्यांश नसते, हे त्यावेळी मला उमगत नव्हते. भगवान बुध्दांचा अनात्मवादाचा, भुता-खेतांसारख्या गूढ, अद्‍भूत व चमत्कारिक गोष्टीला नाकारणारा, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही, असा कार्यकारणभाव सांगणारा प्रतित्य समुत्पादाचा सिध्दांत मला माहित नव्हता.

मी एवढ्या रात्री येण्याची इतकी हिंमत करायला नको होती, असे मला राहून राहून वाटत होते. आतापर्यंत केवळ अर्धीच वाट चालून आलो असेन. आणखीन तेवढेच दूर जायचे होते. अजून निळोणा, त्यांनतर वाघाडी नदी. बापरे…! त्या नदीतून कसा जाईन? खळखळ वाहणारी व मोठे पात्र असलेली ती भयावह नदी. तिच्या काठावरील मसणवटी. तिचा खोल डोह. तो चकवा. माझं सर्वांग शहारलं. अंगावर सरसरून काटे उभे झाले. छातीची धडधड वाढली. हात-पाय लटपटा कापायला लागले. परत जावे की काय, असाही विचार मनात चमकून गेला. पण बाबाची सही… काय करावे सुचत नव्हते. ‘पुढे बसलो तर धूर जड अन् मागे बसलो तर सुलार !’ अशी विचित्र गत झाली होती. तरीही मनाचा हिय्या करुन मी पुढे पुढे सरकत चाललो होतो.

एवढ्यात मला दुरुनच धियाऽऽ धियाऽऽ असा अस्पष्ट आवाज ऎकू येऊ लागला. मी त्या आवाजाचा कानोसा घेण्यासाठी क्षणभर थबकलो. त्याच वेळेस चकव्याची आठवण झाली. तो म्हणे असाच कोणत्यातरी रुपात येतो. गोड गोड बोलून नदी काठावर घेऊन जातो व डोहात ढकलून देतो. आमच्या गावात अशीच गोष्ट घडून गेल्याचे सांगत होते. एका नवरदेवाला रात्रीला उठवून त्याला वाघाडी नदीवर नेले. तेथे त्याचे कपडे काढून डोहात ढकलून दिले. खरं काय न् खोटं काय, कोण जाणे !

या आठवणीने मी पार हादरून गेलो. तोंड सुकून आले. तरीही आवाजाचा कानोसा घेत थबकत थबकत चालू लागलो. आता तो आवाज थोडा स्पष्ट होत जवळ येऊ लागला. चकव्याची भीती थोडी कमी झाली. माझ्या घाबरलेल्या जिवात जीव आल्याचे जाणवत होते. बैलगाडीच्या वाटेने तो आवाज येत होता. पुढे ह्या दोन्हीही वाटा एकत्र येऊन मिळणार होत्या. म्हणून मी झपाझप पाऊले टाकत चालायला लागलो. नाहीतर ती व्यक्ती पुढे निघून जाईल व मला एकट्यालाच अंधार्‍या रात्री रस्ता तुडवत जावे लागेल. म्हणून मी जावून थांबलो. ती व्यक्ती जवळ आली. तो मला पाहून एकदम थांबला. तोही घाबरला असावा.

‘कोण आहे रे?’ असे दरडावून मला विचारले.

‘मी, रामराव.’

‘कोंड्यामामाचा कुंडा का रे? अरे बापरे, एवढ्या रात्री कसा रे, तू?’

‘हो, कामच होतं तसं. शाळा सुटल्यावर निघालो, पण अंधार पडला.’

‘बरं झालं. मी भेटलो. नाहीतर कसा गेला असतास, कुणास ठाऊक?’

धर्मा लभान होता तो. माझ्याच गावाचा. बैलाला घेऊन दवाखान्यात आला होता. पण उशीर झाल्याने रात्रच झाली. तसे अंधारात जायची या लोकांवर नेहमीच पाळी यायची. म्हणून त्यांना अंधाराचं काही वाटत नव्हतं.

‘शाळा शिकायला किती कष्ट घ्यावे लागतात, नाही का? पाहा ना, आमचे लभान, पोरांना शाळेत धाडत नाहीत. कोणी टाकले तर पोरं शाळेत जात नाहीत. असे बयताड आहेत, लेकायचे ! तू मात्र किती आटापिटा करुन शिकत आहेस ! शिक बाबा… आपल्या गावाचं नाव कमावून दाखव म्हणजे झालं.’

मी त्याच्या मागेमागे चालत होतो. त्याच्या सोबत बैल असल्याने त्याला बैलगाडीच्या रस्त्यानेच चालावे लागत होते. पायवाट तरी बरी होती. त्यापेक्षा हा बैलगाडीचा रस्ता म्हणजे आणखीनच त्रासदायक. अनवाणी पाय कधी खड्ड्यात पडायचा. तर कधी ठेचाळत जायचा. निळोणा गावापासून वाघाडी नदीपर्यंतचा रस्ता निव्वळ गोटाळीचा. आम्ही निळोण्याला शाळेत यायचो, तेव्हा येवढा रस्ता पार करायला आमचा जीव नाकीनऊ यायचा.

तो खेडूत असल्याने झपाझप लांब टांगा टाकत चालत होता. मला त्याला गाठायला दुडक्या चालीने चालावे लागत होते. गावाजवळ हागदोडी-पांदण लागायची. पाय केव्हा पोवट्यावर पडेल याचा नेम नव्हता. शेवटी गावात आलो. बाहेरून आवाराच्या कवाडाची कडी वाजवली. बाबाने कवाड उघडलं. हातातला कंदील वर करून पाहू लागला. मला पाहून दचकलाच.

‘अरे बाबू, तू कसा काय एवढ्या राती…?’

‘मी कोलामाच्या वावरापर्यंत एकटाच आलो. मग धर्मा लभान भेटला. त्याच्याबरोबर आलो.’

‘एवढ्या रातच्यानं कशाला आलास? आला असतास सकाळ-वकाळ.’

‘स्कॉलरशीपच्या फॉर्मवर तुमची सही पाहिजे. तो उद्याच नेऊन द्यायचा आहे. म्हणून आलो.’

‘आता ही काय भानगड…?’

‘मला वर्षाला पंधरा रुपये स्कॉलरशीप मिळणार, बाबा.’

‘हो बाबा, आपल्या आंबेडकरबाबांनी तुह्यासारख्या हुषार मुलांना खूप शिकता यावे; म्हणून मोठ्या पुण्याईचं काम केलं. ते खूप शिकलेत. मोठे झालेत. तूपण तसाच शिकून मोठा हो…’

दुसर्‍या दिवशी सकाळी बाबाने उमरसर्‍याला आणून दिले. मी व बाई गावाला आलो की बाबा सोमवार्‍या दिवशी सकाळीच कोंबड्याच्या पहिल्या बागेला रेंगी जुतायचा. त्यावेळी कधी दाट-विरळ धुक्याने अंधूक झालेल्या चंद्र-तार्‍यांच्या उजेडात, गुलाबी बोचर्‍या थंडीने कुडकुडत आम्ही निघत होतो. माझी शाळा सकाळची तर बाईची शाळा दुपारची. त्यामुळे माझ्यासाठी बाईला फरफटत यावे लागत होते.

त्यानंतर मी कानाला खडा लावला. कोणत्याही फॉर्मवर बाबाची सही घेण्यासाठी कधीही गावाला गेलो नाही. कारण त्यांची सही मीच करत होतो. त्यांची खोटी सही करण्याचा वारंवार गुन्हा माझ्या जीवनाचा तेव्हापासून अविभाज्य अंग बनला होता.

एकदा बाबा मला रिपब्लिकन पार्टीचे साहेबराव शिरसाट यांच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. अशा लोकांबद्दल बाबांना फार ओढ असायची. त्यांच्या पासून मला शिक्षणाची प्रेरणा मिळावी, असा त्यांचा उद्देश असायचा. मी संकोची वृतीचा असल्याने मला मात्र अवघडल्यासारखे होत असे. त्यांनी मला खूप शिकण्याचा उपदेश केला होता.

खरंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार माझ्या बाबांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मजबूत पायाभरणी केली होती. ही गोष्ट मी कधीही विसरु शकत नाही. कारण याच मजबूत पायाच्या आधारावरती माझ्यानंतर येणारी पिढी निश्चितच शिक्षणाची भव्य-दिव्य इमारत उभी केल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढेच खरे होते !

 

 

 

 


कथा सोळावी – कुत्रा चावला पण वाचलो

 

खरं, म्हणजे तो पिसाळलेला कुत्रा नव्हताच मुळी ! त्यामुळेच त्या मांत्रिकाचे फावले. नाहीतर त्याच्या मंत्राचा काहीही उपयोग झाला नसता !  तो जर पिसाळलेला असता, तर माझं काही खरं नव्हतं. त्याच्या  लाळेतील रेबिजचे जंतू शरिरात पसरून, मी पण पिसाळलो असतो व मरणाच्या दाराकडे माझी वाटचाल सुरु झाली असती !

त्यावेळी मी आणि जनाबाई शिक्षणासाठी उमरसऱ्याला राहत होतो. आम्हा दोघा बहीण-भावाचं जीवन घडविण्यामध्ये उमरसरावासीय लोकांचा फार मोठा सहभाग होता.

उमरसरा हे गाव यवतमाळ शहराला लागून असल्याने बाहेरील गावाचे मुले येथे शिक्षणासाठी राहत. खेड्यातील मुलांनी शहरात येऊन उच्च शिक्षण घ्यावेत; असं येथील लोकांचे उदात्त धोरण होतं. म्हणून ते राहण्याची व व्यवस्था करीत. मला तर हे गाव एखाद्या कुटुंबासारखं वाटत होतं.

कोळंबी गावाचा पांडूरंगदादा कॉलेजला शिकत होता. तो अन्नपूर्णाबाईच्या घरी राहायचा. तिच्या घरातील आई कौसलबाई, भाऊ विक्रम आणि सारेच आपुलकीने वागवीत. चिखली गावाचा परशराम हा पण कॉलेजला शिकत होता. तो चोखोबाच्या घरी राहत होता. महादेव, नाना पण शिकत होते. महादेव गाणे म्हणायचा. मेहराबादचा श्रीराम व घारफळचा काळुराम आमराईतल्या उमरसर्‍यात राहत होते. त्यांच्यासोबतच माझ्या मावस बहिणीचा मुलगा अर्जुन सहावीत शिकायला होता.

यापूर्वी आम्ही घर सोडून कुठे राहिलो नाही. त्यामुळे घरची आठवण फार सतावत असे. इतकी की कधीकधी वाटायचं की पाखरासारखे पंख असते तर उडत उडत गावाला जाऊन आलो असतो. मग सुट्ट्या पडल्या की आम्ही घरी गेल्याशिवाय राहत नव्हतो.

एकदा अर्जुन, मी व जनाबाई गावाला जात असतांना भगवानच्या वावराजवळच्या वळणावर आलो. त्यावेळी अर्जुनचे बाबा अचानक आमच्यासमोर येऊन टपकला. आम्ही त्यांना दाजी म्हणत होतो. त्यांचा एक हात मनगटापासून मुडपलेला होता. ‘का रे… का आलास? मी तुला सांगितलं होतं ना, घरी येत नको जाऊ म्हणून… तरीही आलास?’ असे दरडावून अर्जुनला बोलला. त्याच्या उत्तराची वाट न पाहता त्यांनी हातातल्या छत्रीनेच अर्जुनला बदडायला सुरुवात केली. त्यांनी इतके मारले की आमच्या डोळ्यातून आसू ओघळायला लागले. आम्ही ‘मारु नका दाजी…’ म्हणून विनवणी करत होतो. पण तो काही आवरत नव्हता. शेवटी मारुन मारुन छत्रीचा दांडा तुटून गेला ! इतका मार खाऊनही अर्जुनच्या डोळ्यातून तसुभरही थेंब बाहेर पडला नाही ! बिच्चारा…! मुकाट्याने बापाचा मार खात होता.

‘बईन मायमी…! हा लेकाचा सारखा घरी येतो… तिकडे त्याची शाळा पडते… चांगलं मन लाऊन शिकत नाही… त्याला म्हणलं, घरी येत नको जाऊ… पण ऎकत नाही…’ असं म्हणून धुंड्या हाताने मारत होता. शेवटी तोंडाने बडबड करत गेला. मी त्या प्रसंगाने धास्तावून गेलो. मुक्या मनानेच आम्ही तिघेही घरी आलो.

तेव्हापासून त्याने शाळा सोडून दिली ती कायमचीच ! आत्याला पुरेसे पैसे व दाळ-धान्य त्याचा बाबा देत नव्हता. म्हणून ती सारखी अर्जुनच्या मागे कटकट लावत होती. अर्जुनच्या बालमनाला ते सहन होत नव्हतं. म्हणून तो सारखा घरी येत होता. बापाला सांगीतलं तर बाप मनावर घेत नव्हता.

तसा तो हुशार होता. त्याची स्मरणशक्ती दांडगी होती. पण बापाने त्याला समजून घेतलं नाही. शाळा सोडल्यावर त्याला जे शेतीला जुंपलं, ते कायम त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत चिकटून गेलं ! आयुष्यात आलेली संधी हुकली की ती परत कधी येत नाही, असेच त्याच्या बाबतीत घडलं. याचं मला फार वाईट वाटत होतं.

आम्हाला परशराम, पांडूरंग व हरिदासदादा गणितं सोडवून द्यायला मदत करायचे. या सर्वांना दादा म्हणत होतो. हरिदासदादा परीक्षा जवळ आली की आम्हाला अभ्यासाला मदत करायचा.

तो आम्हाला पलीकडील जंगलात घेऊन जायचा. तेथील झाडाच्या सावलीत किंवा झाडावर चढून एकांतात अभ्यास करत होतो. जवळूनच झुळझुळ पाण्याचा प्रवाह वाहत जात होता. तेथील थंडगार पाणी पिऊन मन शांत करत होतो. निसर्गाच्या सानिध्यात एकांत मिळाला की मन कसं एकाग्र व स्थिर होत होतं. त्यामुळे अभ्यास चांगला होत होता, हे सांगायलाच नको ! त्यावेळी पुस्तकातला कण न कण वेचत बुद्धीत साठवीत होतो.

आम्ही रात्रीला प्रल्हादच्या घराच्या अंगणात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत होतो. संत तुकाराम जसे म्हणाले होते की ‘असाध्य ते साध्य, करीता सायास, कारण अभ्यास !’ हे आम्हाला तंतोतंत लागू पडत होतं. आही पुस्तक डोक्याच्या खाली घेऊन झोपत होतो. पुस्तक उशाला घेतल्याने त्यातील अभ्यास डोक्यात घुसते, असा समज होता. सकाळी पुन्हा अभ्यासाला भिडत होतो. त्यावेळी एका सिनेमातील गाणे नेहमी लागायचे. त्या गाण्याच्या चालीवर आम्ही पण गमतीने म्हणत होतो.

‘अभ्यास करनेके लिये, हम सारी रात जागे।

अल्ला जाणे, क्या होगा आगे।।

ह्या गावातील सारी घरे कुडा-मातीचे, कौलं किंवा टिनाचे होते. सर्व घरे बौध्दांचे होते. फक्त एक घर मुसलमान तेल्याचं होतं.

आमची परीक्षा आली की आई स्वयंपाकासाठी आमच्याकडे यायची. ती आल्यावर आम्हाला मोठ्ठा आनंद व्हायचा !  तिच्या उपस्थितीमुळे वातावरण किती सुरक्षित, प्रसन्न आणि आनंददायी व्हायचं ! गावाला आम्ही आईशिवाय कधी राहिलो नाही. येथे आईशिवाय राहणं म्हणजे पोरकं असल्यासारखं वाटत असे. मला आठवते, कधी अपरात्री जाग आली आणि अंधाराची भीती वाटू लागली की आईच्या कुशीत शिरत होतो. झोपेतच ती जवळ ओढून माझ्या पाठीवर हात फिरवत धीर देत होती. मग त्या मायेच्या स्पर्शाने माझी भीती कुठल्याकुठे पळून जात होती. म्हणूनच मला गावाची फार ओढ लागत होती. जशी एखादी मुलगी सासरी कितीही रमली, तरीही माहेरची ओढ काही केल्या संपत नाही, तसंच ! गावाला जायचं म्हटलं की माझं मन असंच गाईकडे जाणार्‍या वासरासारखं नाचू-बागडू लागत होतं.

सुरुवातीच्या काळात आमची परिस्थिती बर्‍यापैकी होती. त्यावेळी बाबा दमडूमामाची शेती वाहत होता. शेतीतील माल तो रविवारच्या बाजारात विकायला आणत असे. तेव्हा आम्ही भाजीपाला विकण्यासाठी मदत करत होतो. ओरडून ओरडू्न बाजारातल्या गिर्‍हाईकांचे लक्ष वेधून घेण्यातही मजा वाटत होती. दांडी-पारड्याने भाजी मोजून देतांना मोठेपणाचा आव येत असे.

बाजार म्हटलं की जिकडे तिकडे गजबज, कालवाकालव, आवाजाचा गोंगाट, मरणाची गर्दी, घाई, ओळखीच्या लोकांची आपुलकीने विचारपूस, चहा-सोडा पाजणे, बीडी-तंबाखूची देवान-घेवाण, अशा गोष्टी आल्याच ! सोड्याचं नाव निघाल्याने मला आठवते ती सोड्याची तीन चाकी गाडी, जोर लावत ढकलत जाणारा तो कळकट माणूस, दाटीवाटीने ठेवलेल्या काचेच्या बाटल्या, बाटल्यात अडकेलेली काचेची गोळी, तिला आत ढकलण्यासाठीचा रबरी बुच, बुच दाबल्यावर आसमंत चिरत जाणारा आवाज, गिर्‍हाईकाने बाटली तोंडाला लाऊन दिलेली समाधानाची ढेकर ! हे दृश्य माझ्या मनात कोरून गेलं.

आई घरुन भाकर आणीत असे. बाबा मासळी बाजारातून भाजलेल्या मासोळ्या आणायचा. आई त्याची टमाटे, कांद्याची पाल व हिरव्या मिरच्या चिरुन कच्चीच छानशी चटणी बनवीत असे. मग आम्ही भाकरीसोबत मस्त खात होतो. त्याचा स्वाद माझ्या जिभेवर बरेच दिवसपर्यंत तरळत राहत असे. मला या भाजलेल्या मासोळ्या तेव्हापासून फार आवडायला लागल्या होत्या.

बाजार ओळीच्या कोपर्‍यात करीमची चक्की होती. आमच्या गावाचे लोक दळण-भरडण याच चक्कीवर करीत. या चक्कीजवळून जातांना बाईच्या पायाला पुराणी टोचल्याची आठवण ताजी होत असे. दादाने धान भरडण्यासाठी आणले होते. भरडून झाल्यावर तांदळाचे पोते गाडीवर टाकले. बाई पुराणीची काडी हातात घेऊन पोत्यावर बसली होती. शामरावदादा सामान आणायला गेला होता. बाई बसल्या बसल्या पुराणीची काडी खालच्या पोत्यावर टोचण्याचा खेळ खेळीत होती. असं करतांना एकाएकी पुराणी तिच्या पायाला अंगठ्याजवळ टोचली. तिला भयानक वेदना होत होत्या. घरी आल्यावर शेक-निवा केला. परंतु पायाचं दुखणं काही केल्या बसलं नव्हतं. उलट पिकून आल्याने तेवढी जागा टरटर फुगली होती. त्यामुळे ती भयानक वेदनेने तळमळत होती.

तिला दादाने सरकारी दवाखान्यात आणले. त्यांनी ती जागा बधिर न करता हाताने जोरात दाबून पू काढला. असह्य वेदना होत असल्याने बाई ढोरासारखी रडत होती. दादाने मग तिला हॉटलात नेऊन मटण खाऊ घातले. हे दुखणं पुन:पुन्हा उमळत असल्याने तिला कित्येक दिवस हा त्रास झाला होता.

एक वेडी बाई आमच्या दुकानाजवळ येऊन बसत होती. आई तिला तंबाखू, चुना, टमाटे खाण्यास देत होती. तिला पैसे पण द्यायची.

मी आईला विचारले, ‘आई, ही वेडी का झाली? ती सारखी माह्या सोन्याऽऽ माह्या सोन्याऽऽ  का म्हणते.’

‘तिची एक कहाणी आहे, पोरा…’ आई कहाणी सांगायला लागली.

‘ती खेड्यात राहात होती. नवरा मेल्याने रांडमुड झाली. तिला आठ-दहा वर्षाचा एकुलता एक पोरगा होता.

एके दिवशी तो आईला म्हणाला, ‘माय, मी बाजारात जाऊन येतो.’

‘जा. पण बरोबर घरी ये, सोन्या…’

‘हो.’ असं म्हणून तो दोस्तांसोबत निघून गेला.

बस… त्याचा तो शेवटचा आवाज तिने ऎकला. तेव्हापासून तो घरी आलाच नाही. म्हणून ती दर बाजाराला येऊन भिरभिर पोराला पाहत असते व सोन्याऽ सोन्याऽऽ म्हणून हाक मारत असते. पोराच्या मायेपोटी ती वेडी झाली.’

कधीकधी दादा शनिवारी मुक्कामाने यायचा. घरचं कोणी असलं की आम्हाला फार बरे वाटत असे. दुसर्‍या दिवशी दादा सोपानदादाच्या भागिनदारीत ऊसं विकत घ्यायचा. मीपण ऊसं विकायला त्यांना मदत करीत होतो.

दिवस बुडतीला जाऊन अंधार पडायला लागला की दिवसा फुललेला बाजार कसा ओस पडल्यासारखा वाटायचा. मग सायकलचा टायर जाळून त्याच्या उजेडाने काही मुलं बाजारात फिरतांना तेवढे दिसत. भाजीपाला किंवा पडलेल्या पैशाचा ते शोध घेत.

त्यादिवशी रात्रीला मग दादा, सोपानदादा व त्याचा मोठाभाऊ शामरावदादा असे तिघांची दारु पिण्यासाठी मैफल बसायची. बाजाराचा दिवस म्हणजे सार्वत्रीक मटणाचा दिवस ! मटण घ्यायला कमेल्यात गेलं की ओट्यावर बकर्‍याची कातडी सोलून उलटे टांगलेले, मुंडी नसलेलं धुडं दिसायचे. असं ते दृश्य पाहिल्यावर वाटायचं की बकर्‍यांनी माणसाला कापून त्याला जर उलटं टांगलं तर माणसाची काय अवस्था होईल? कल्पनाही करवत नाही.

कमेलात पाऊल टाकल्याबरोबर मटण विकणार्‍यांची कावकाव पहिल्यांदा ऐकू यायची. नुसता गलबला. कुणी भाऊ, कुणी दादा, काका असे नातं दाखवून गिर्‍हाईकाला हाका मारीत. ‘इकडे या. मटण पहा. कसं ताजं. आत्ताच कापलं. अस्सल बोकड्याचं.’ असे म्हणून आपापल्या मटणाची तारीफ करीत आणि गिर्‍हाईकाला पटविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. काहींचे बांधलेले गिर्‍हाईकं असत. गिर्‍हाईक दुसरीकडे गेला की एकमेकांचे उणे-दूणे काढत. ‘काय भाऊ, ते शिळे मटण घेता.’ असे म्हणत. मग धारदार चापट सुरीने मांसाचे लचके तोडून पारड्यात टाकत. जाड बुंध्याच्या ठोकळ्यावर बारीक तुकडे करून गिर्‍हाईकाला देत. असं त्यांचं काम नवख्या माणसाला मोठं नवलाईचं वाटत असे.

त्यादिवशी घरोघरी मटणाचा खमंग वास यायचा. बाई मिरची-मसाला भाजून पाट्यावर वाटायला दोन घराच्या सामटीतून आत्याच्या घरी जायची. मग झणझणीत फोडणी द्यायची. त्या मटणाची चव काही विचारूच नका. मस्त चवदार…! हातबोट पुसून खाण्यासारखी !

दादाचे दुकानं ठरलेले होतं. किराणा भाट्याच्या दुकानात, कपडे सिंदीच्या दुकानात, मटण लक्ष्मण खाटकाकडे, शिलाई भाऊराव टेलरकडे, कटींग सरोज टॉकीजसमोरच्या केशकर्तनालयाकडे. आम्हाला अडचण येऊ नये म्हणून दादाने या दुकानदारांना सांगून ठेवले होते. त्यामुळे ते आमच्याकडून नगदी पैसे घेत नसत. कपडे मात्र दादाच घेऊन द्यायचा. बाकी सामान उधारीवर घ्यायला आम्हाला मुभा होती.

अन्नपूर्णाबाईच्या घरासमोर मोकळी जागा होती. तेथे पंचशील झेंडा होता. तेथे समाजाचे सामुहीक कार्यक्रम होत असत.

पीठ दळून आणण्याचं काम बाईने माझ्यावर सोपविलं होतं. मी भाट्याच्या दुकानातून ज्वारी उधारीवर घेऊन दत्तचौकाच्या चक्कीवर येत होतो. तेथे सुपाने पाखडून व खडे-कचरा निवडून दळत होतो. मग पिठाचं गाठोडं डोक्यावर घेऊन घरी येत होतो.

माझ्या आत्याच्या घरचे लोक चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्याकडे आम्ही राहत असतांना कधी दुजाभाव केला नाही. फक्त त्यांना काम प्रिय होते. आम्ही त्यांनी सांगितलेले कोणतेही काम करत होतो. ‘नाही’ कधी म्हणत नव्हतो. हाच आमच्या दोघा बहीण-भावाचा स्वभावगुण त्यांना आवडला होता. ते बिड्या बांधत असतांना सर्व वस्तू त्यांना जाग्यावर पाहिजे असत. ठरलेल्या बिड्या तेवढ्या विशिष्ट वेळात बांधून झाल्या पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असायचा. नाहीतर बिड्यामध्ये तूट येणे परवडत नसे.

‘रामराव, हे आण रे, ते आण रे, हे कर, ते कर,’ असं सारखं चालू राहायचं. त्यांना तंबाखू घोटून द्यावं लागत असे. कधी तेंदुच्या पानाचे मुडे भिजवून, तर कधी पानं कापून द्यावे लागे.

सोपानदादा व त्याचा भाऊ शामरावदादा रविवारच्या बाजारात धंदा करीत. शामरावदादाचा सांबार-अद्रक विकण्याचा धंदा ठरलेला होता. त्यांचे सोबत मीपण सकाळीच जात होतो. तो सांबार-अद्रक ठोकमध्ये आणायला जायचा, तेव्हा मला दुकानावर बसावे लागे. फुलनबाई – त्याची बायको आल्यावर मला सुट्टी व्हायची. सोपानदादा ऊसं घ्यायचा. तेव्हा त्याचे सोबत मला विकण्याचे काम करावे लागे.

एकदा सोपानदादाने गोधणीकडे जाणार्‍या कोठ्यावर काकडीच्या वेलाचा ताटवा विकत घेतला होता. तेव्हा तो मला काकड्या तोडायला घेऊन जायचा. तेथे कोवळ्या कोवळ्या काकड्या खायला मिळत असे. काकड्या तोडून बैलगाडीत भरुन शहरात विकायला आणत असे. मग गाडीनेच फिरुन ‘काकड्या घ्याऽऽ काकड्या… असे ओरडून गिर्‍हाईकांना सांगावे लागत असे.

आमच्या शेजारी भाड्याने कांबळे नावाचे तरुण जोडपं राहत असे. तो यवतमाळला सरकारी कार्यालयात नोकरीला होता. ती बाई आमच्यावर अपार जीव लावायची. ती आमच्यासाठी बरेचदा बनविलेली भाजी आणून द्यायची. तेल आणि निंबुच्या रसात मीठ टाकून तळलेल्या हिरव्या मिरच्या हमखास आणून द्यायची. ह्या मिरच्या भाकरीसोबत खायला खूपच झणझणीत लागायच्या.

ते दोघेही एकमेकांच्या खोड्या करीत. लहान मुलं जसे खेळतात, तसे दंगामस्ती करीत. त्यांना मुल-बाळ नव्हतं. म्हणून कदाचित दु:खं विसरण्यासाठी ते लहान मुल बनून खेळण्या-बागडण्याची हौस भागवीत असावेत. त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक क्षणाचा ते दोघेही मनसोक्त आनंद घेतांना मला मोठं कौतुक वाटायचं. त्यामुळे मला ते जोडपं जबरदस्त आवडलं होतं.

जेव्हा ते गाव सोडून गेले, त्यावेळेस आमच्या घरातलं कुणीतरी सोडून गेलं की काय, असेच वाटत होतं. खरंच, त्यांच्या सारखंच आपण खेळकरपणा आपल्या मनाच्या कोंदनात रुजवायला, भिनयायला हवा ! हसण्या-खेळण्याने माणसाचं जीवन होतं, सुसह्य आणि उल्हासित ! त्यामुळे क्षणभर का होईना दु:खाचा विसर पडतो. असं ते जीवनाचं गमक मला शिकवून गेले.

उमरस‍र्‍याच्या मागे नाल्याच्या पलीकडच्या वावरात आणखी एक-दोन घरं होते. त्याला जुना उमरसरा म्हणत. तेथे शेतामध्ये लक्षीबाई राहायची. तिचा मुलगा आमच्या सोबतचा मित्र होता. त्यांच्या शेतात पेवंडी बोरं होते. ते खायला आम्ही जात होतो.

एकदा मी दुपारी शाळेतून घरी येत होतो. रस्त्याने येता येता पाठीमागून कुत्रा कसा आला कळलेच नाही. त्याने माझ्या पायाच्या घोट्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला; तेव्हा कुठे कळले. त्याचे दोन दात रुतले होते. त्यातून रक्त बाहेर येत होतं. रस्त्यात पडलेल्या चिंधीने रक्त पुसून घेतलं. चालतांना खूप त्रास होत होता. कसातरी लंगडत लंगडत घरी आलो. त्यावेळस आम्ही वामनदादाच्या घराच्या खोलीत राहत होतो. तो घरीच बिड्या बांधत होता.  मी लंगडतांना त्यानं पाहिलं.

‘रामराव, काय झालं रे?  लंगडून का राहिलास?

‘कुत्रा चावला, दादा.’ असं सांगून चावलेली  जागा त्याला दाखवली.

‘अरे हो…! त्याला चुना लाव.’ त्याने दिलेला चुना मी चोपडला.

‘तू  मारवाडी चौकात जा. तेथे सोनाराच्या दुकानात  कारागीर असतो. तो मंत्र टाकतो. जातांना लिंबाच्या दोन-चार डहाळ्या व फूटाणे घेऊन जा. तो मंत्र टाकून खायला देतो. काही होणार नाही. घाबरु नको.’ त्याने बोलून मला धीर दिला.

मी जेवण करुन मारवाडी चौकात गेलो. तेथे आजूबाजूला विचारपूस केल्यावर मांत्रिकाचा शोध लागला.

‘माझ्या पायाला कुत्रा चावला.’ त्या मांत्रिकाला सांगून चावलेली जागा दाखविली.

त्याने माझ्याजवळचे फुटाणे हाताच्या मुठीत घेतले. तो तोंडाने काहीतरी पुटपुटत फुटाण्यावर फुंक मारुन मला खाण्यास दिले. मी सर्व फुटाण्याचा बोकणा भरला. नंतर लिंबाच्या डहाळ्या घेऊन चावलेल्या ठिकाणी वरुन खाली फिरवत होता आणि  तोंडाने काहीतरी पुटपुटत होता.

‘जा घरी आता… काही होणार नाही…’

मी घरी आलो. संध्याकाळी बाई शाळेतून घरी आली. तिला मी सांगितले. ती घाबर्‍या-घुबर्‍या झाली. तिने खायच्या तेलात हळदीची पूड घालून कोमट केलं व चावलेल्या जागेवर लावलं. काही दिवसांनी ती जखम बसली. पण त्याच्या खुणा मात्र कायमच्या राहिल्यात.

 

 

 

 

 


कथा सतरावी – घसरता घसरता सावरलो

 

त्या प्रसंगाने खरंच मला खूप धडा शिकविला. जीवनातला एखादा प्रसंग माणसाला मुळापासून हलवून आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन जाते म्हणतात. तसंच मी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. तेव्हापासून मी वाईट सवयीपासून परावृत होत गेलो. हा प्रसंग घडला नसता, तर कदाचित माझ्या जीवनाचे प्रयोजनच हरवले असते. ही घटना कित्येक दिवस माझ्या काळजात पक्की रुतून बसली होती. बोटात शिलक घुसावी व ती जागा सारखी सलत राहावी, तशी ही गोष्ट मला सलत राहत होती.

ही गोष्ट कथन करण्यापूर्वी काही आठवणी सांगितल्याशिवाय मला राहवत नाही.

त्यादिवशी कापूस विकून दादा मला पैसे देणार होता. म्हणून शाळा सुटल्यावर मी तडक धोब्याच्या दुकानावर आलो.

‘दादा आला का?’ मी धोब्याला विचारले.

‘हो. आला. त्याने तुला थांबायला सांगितले.’

त्याची पत्र्याची टपरी आमच्या चौधरा गावाच्या रस्त्यावर होती. दूरवरून चालून येतांना थकवा आल्यावर लोक येथे लिंबाच्या झाडाखाली विसावा घेत. म्हणून तो चांगला ओळखीचा झाला होता.

मी बाहेर बेंचवर दप्तर ठेवून बसलो. दादाची भिरभिर वाट पाहतांना कधी रोडवर तर कधी धोब्याकडे नजर जायची. त्याच्या कानात अर्धवट ओढलेल्या बिडीचं थोटूक लटकवलेलं होतं. तो निखार्‍यावर शिलगावून मधामधात पीत होता.

वाट पाहतांना, हां हां म्हणता रात्र वाढत गेली. तरीही दादा आला नाही. धोब्याचे दुकान बंद करायची वेळ टळून गेली. तरी पण तो इतकावेळ थांबला होता. तेवढ्या रात्री मी उमरसर्‍याला एकटा जाऊ शकत नव्हतो; म्हणून त्याने दुकान बंद करुन त्याच्या सोबत यायला सांगितले.

त्याचं घर आठवडी बाजाराच्या कोपर्‍यात होतं. घराजवळ आलो; तेव्हा भाजीपाल्याच्या कचर्‍याच्या घाणेरड्या वासानेच माझं स्वागत झालं. त्याचं घर व राहणीमान पाहून तो अत्यंत गरीब असावा असे वाटत होते.

त्याने मला घरात न येऊ देता पडवीत थांबायला सांगितलं. त्याला माझी जात माहित असल्यानेच मला दूर ठेवत होता. पण त्याने मला तसंच वार्‍यावर न सोडता घरी आणले, हेही काही कमी नव्हतं. धर्मव्यवस्थेने त्याला बाट करायला शिकविले; पण त्याच्यात माणुसकी जिवंत होती.

त्याची जात खालचीच, हे मला शाळेत कळले होते. कारण धोब्याचा मुलगा माझ्या वर्गात शिकत होता. त्याला माझ्यासारखीच स्कॉलरशिप मिळत होती. आम्ही दोघेही खालच्याच जातीचे असतांना तो माझा बाट का धरतो, ते मला कळत नव्हते.

त्याने मला जर्मनच्या जुनाट ताटात भाकरीच्या घोटल्या खायला दिल्या. मला दिवसभराची भूक लागली होती. त्यामुळे तोंडातल्या तोंडात जरी घास फिरत होता, तरी भूकेची आग विझविण्यासाठी ते खाणं मला भाग होतं.

टिनाच्या पत्र्याचं लहानसं घर, पडवीच्या समोर तट्ट्याची नहाणी होती. तेथून लघवीचा येणारा उग्र वास सहन होत नव्हता. मच्छराचा गुंगऽऽ गुंगऽऽ आवाज व त्याच्या चावण्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही. सकाळीच उठून घरी आलो.

आल्या-आल्या बाई चिंतातूर स्वरात म्हणाली,

‘कुठे होता रे… रात्रभर…’

‘अवं बाई… दादाची वाट पाहिली. तो आलाच नाही. मग धोबी… घरी घेऊन गेला. तेथेच थांबलो.’

‘जेवला होता का तसाच झोपला उपाशी…?’ पुन्हा काळजी तिच्या चेहर्‍यावर उमटली.

’हो… घोटल्या खाल्ल्या…’

’बरं झालं…! नाहीतर माझ्या जीवाला किती घोर लागून गेला होता, म्हणून सांगू… !’ असं म्हणून पायावर चढलेला विंचू झटकून टाकावा तसं तिने काळजी झटकून टाकली. नंतर कळले की दादाला कापसाचा चुकारा दलालाकडून फार उशिरा मिळाला. म्हणून लवकर आला नव्हता.

तसंच मी व माझी मामेबहीण, सुदमताबाई सकाळची शाळा करुन घरी आलो. त्यावेळी आम्ही मोठीआत्या, बकू हिच्या घरातील एका खोलीत राहत होतो. माझी बहीण व चित्राबाई – सुदमताबाईची मोठी बहीण, दुपारच्या शाळेत गेल्या होत्या.

मी शाळेचं दप्तर खुंटिला अडकवून हात-पाय धुतले. जेवायला बसतांना सुदमताबाईने गंज पाहिला. त्यात फिक्कं वरण दिसलं. पण दवडीत भाकरी नव्हत्या. त्याचवेळी तिच्या भुवया गुल्लेरच्या रबराप्रमाणे ताणल्या गेल्या. आता भाकरी बनविण्याची पाळी आपल्यावर आली हे तिला कळून चुकलं.

तिने कुरकुरत चूल पेटवली. धगधगणार्‍या लाकडाचा धुराने वैतागून गेली. भाकर थापायला लागली की तुटून जायची. ती मोडून पुन्हा करायची. पुन्हा तुटून जायची. यातच केसाच्या बटाने तिला त्रास देणं सुरु केलं. तिचे सुटलेले केसं, भरलेल्या पिठाच्या हातांने मागे सारण्याची तिची तारांबाळ पाहतांना मला कसंच तरी वाटत होतं. ती रडकुंडीला आली. चित्राबाई व जनाबाईला ती ठेवणीतल्या शिव्या देत होती. मी तिच्याजवळ बसून तिची ही केविलवाणी अवस्था निमुटपणे पाहत होतो.

मला आठवते, मी लहान असतांना सुदमताबाईसोबत खेळभांड्याचा, चाटल्या-बुटल्याचा व बाहुली-बाहुल्याचा खेळ वाडीमध्ये खेळत होतो. त्यावेळी आम्ही दोघे जोडीने खूप खेळायचो. ती खोटी खोटी स्वयंपाक करतांना मला बाजार आणायला जा म्हणायची. मी जायला निघालो की थांबवून, ‘हे आणजो, ते आणजो’ अशी सांगत राहायची. मी जातपर्यंत माझा पाय काही केल्या बाहेर पडू देत नव्हती. कधीकधी परत आलो तरी ‘भजे आणजो, गुलगूले आणजो’ अशी तिची लांबन सुरुच राहायची. अशी आमची गंमत मामी सांगायची.

लहानपणी ती हसत-खेळत खेळातला स्वयंपाक करायची. आता मात्र खरोखरचा स्वयंपाक करतांना तिला रडवलं होतं ! कशातरी तुटक्या-ताटक्या, जळक्या-जुळक्या भाकरी तिने बनविल्या. त्याच भाकरी आमच्या भुकेजलेल्या पोटाला गोड लागत होत्या. संध्याकाळी दोघ्यांही बाईंना ही गोष्ट सांगितली. ‘सयपाक करायला कसा नेट लागते, आता कसं कळलं…?’ अशा कडवट प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केल्या. ही गोष्ट आठवली की आताही मला हसू येतं.

नागपंचमीला गावातले उत्साही लोक झाकटीलाच विक्रमदादाच्या घरी जमत. तेथे ‘हरेरामा… राघोबारे…’ अशा बार्‍या म्हणत. नंतर वारुळावर जावून नारळ फोडत. आजूबाजूला लाह्या, खोबर्‍याचे बारीक तुकडे व दूध शिंपडत. नागोबा वारुळाच्या बाहेर येऊन खातो व नारळ्याच्या दिवटीतले दूध पितो, असा समज. अशा भ्रामक समजुतीमुळे दूध व इतर पदार्थ किती वाया जात असेल, कुणास ठाऊक? रुढी-परंपरेच्या नावाने ही नासाडी होत होती.

सोपानदादाच्या घरचे महाशिवरात्रीचा उपवास धरत. त्यांच्या घरी राहत असल्याने आम्ही पण उपवास धरला. सकाळी रताळं खाऊन कसातरी दिवस काढला. पण रात्रीला माझ्या पोटात कावळे बोंबलायला लागले. आता ढोर मरेल केव्हा अन् कावळ्याचा उपास सुटेल केव्हा, असं मला झालं. मी बाईला लहानसं तोंड करून हळूच म्हटले,

‘बाई, भूक लागली.’

‘तरी मी म्हणत होती… रामराव, उपवास नको धरु. तुला सोसणार नाही. पण ऎकलं कुठं?’

‘बरं, भाकर टाकून देते. खाऊन घे.’ असं म्हणल्याबरोबर माझ्या चेहर्‍यावर हास्य फुलवून गेलं.

एकदा सावित्रीबाईच्या मुलाचा नवस फेडण्यासाठी ढुंगणापूर देवस्थानावर पैदल गेलो. हे ठिकाण दोनक कोस दूर होतं. शेतातून पायरस्त्याने वडगाव, लोहारा व ढुंगणापूरला गेलो. जातांना घरी मूठभर दाळ होती. ती शिजवून बाईने मला खाऊ घातली. बाई मात्र कटोकट उपाशी होती.

तेथे स्वयंपाक केला. देवाची पूजा झाल्यावर जेवण करुन दुपारी परत निघालो. इतक्या दूर चालल्याने पाय दुखत होते. उन्हामुळे जीवाची लाही लाही होत होती. पाणी जास्त पिल्याने चालतांना पोटातले पाणी हालत होते. म्हणून उलटून फेकत होतो. त्यामुळे मी काहीतरी चमत्कार करत आहे, अशा भावनेने माझ्याकडे सर्वजण पाहत होते.

देवबा, सखूआत्याचा मोठा मुलगा. तो पोलिस होता. मारुतीचा कट्टर भक्त. तो मला रुईचे फुलं तोडून आणायला सांगायचा. मग हे फुलं, पाण्याचा गडवा, नारळ, तेलाची वाटी, शेंदूर असे काही सामान माझ्याकडे देऊन मारुतीजवळ जात होतो. मला पूजा होईपर्यंत तेथेच थांबण्याची शिक्षा होत होती.

बौध्द धम्म स्विकारल्यानंतरही हे लोक जुनेच सण, उपास-तापास व देवपूजा का करीत होते? ते मला कळत नव्हतं. मी मात्र उभ्या जन्मात कोणत्याच देवाची पूजा केली नाही. आमच्या घरी कोणीच देवाला मानत नव्हते.

या गावातील बाया-माणसं बिड्या बांधण्याचे काम करीत. कधी यवतमाळला भारत बिडी कारखान्यात, तर कधी नामदेवच्या कोठ्यावर जाऊन बिड्या बांधत. कधी घरीच बांधून कोठ्यावर नेऊन देत. येतांना पानाचे मुडे, तंबाखू व सुताची लडी घेऊन येत. रात्रीला मुडे पाण्याने भिजवून ठेवत. सकाळी पानं कापून फडक्यात गुंडाळून ठेवत. सुताच्या लडीचा गुंडाळा करुन घेत. बिडी बांधतांना पायाच्या बैठकीवर सूप ठेवत. त्यात कापलेल्या पानात दोन्ही हाताच्या बोटाने सुपामधील तंबाखू भरून, विशिष्ट पध्दतीने सूत बांधून, वरचे टोक नखाने किंवा पात्याने बंद करीत. ही प्रक्रिया शरिराच्या लयबद्द तालाने करीत असल्याने, मी मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडे पाहतच राहत होतो. ते या कामात खूप व्यस्त राहत. म्हणून त्यांचे चिल्लर-चाल्लर कामे करण्यासाठी कोणीतरी जवळ असलं की त्यांना बरं वाटायचं. त्यामुळे तंबाखू घोटून देण्यापासूनचे अनेक कामे करावे लागत होते.

बाई पण हे काम शिकली होती. ती सुट्टीच्या दिवशी कुणाच्यातरी नावाने बिड्या बांधत होती. त्याचे पैसे तिला मिळत. बाई कधीकधी कुणाच्या शेतात कामाला जात होती. त्यामुळे घरखर्चाला मदत होत होती. सुट्टीच्या दिवशी नाल्याजवळील झाडीतून पळसाच्या डांग्या तोडून, भारे डोक्यावर घेऊन येत होतो. झोपडीजवळ सांदीत सुड रचून वाळल्यावर चुलीत जाळत होतो.

असंच एकदा मोळ्या घेऊन येतांना आई पण होती. ती आमच्या समोर होती. आम्ही मागे पडलो. त्यावेळी पोलिस आडवा होऊन तिला दरडावून विचारपूस करीत होता. आई घाबरली. तेवढ्यात मी आलो. तो पोलिस दुसरा तिसरा कोणी नसून विक्रमदादा होता. तो नुकताच ड्युटी करून आला होता. आम्ही मोठ्या माणसांना ‘दादा’ व बायांना ‘बाई’ म्हणत होतो.

‘काय झालं दादा?’ मी त्याला दादा म्हटल्यावर आई एकदम चमकली.

‘ही कोण?’ तो म्हणाला.

‘माझी आई…!’

‘असं होय. मला माहीतच नाही. घाबरू नको, आई…! मी विक्रम…’ हे ऐकून आईची भीती निघून गेली. अशी त्याने आईची गंमत केली होती.

त्यावेळी तंबाखू व बिड्यांशी सारखा संपर्क येत असे. त्याच्या उग्र वासाचा नाका-तोंडाला सवय झाली होती. बहुतेकजण चुन्यासोबत घोटलेल्या तंबाखूचा गोळा तासनतास ओठात धरुन ठेवत. त्याचा रस लाळेवाटे पोटात गेल्याने अंगात गुंगी व तरतरी येत असे. एखाद्यावेळी तंबाखू खायला मिळाला नाही, तर जीव कासावीस होत असे.

हिवाळ्यात कापलेल्या पानांचा शेकण्यासाठी उपयोग करीत. सकाळी त्यावर तंबाखू जाळत. त्याचा उग्र वास जिकडे तिकडे पसरायचा. या प्रक्रियेला ‘मिसरी’ म्हणत. त्याने दांत घासल्याने अंग फिरल्यासारखे वाटत असे.

बहुतेक माणसं बिड्या ओढत. ही सवय सर्वांनाच जडलेली असते. माझा दादा व बाबा पण बिडी ओढत. मला कधीकधी बिड्या आणायला दुकानात पाठवित. कधी विस्तवावर बिडी पेटवून आणायला सांगत. मोठ्यांच्या काम सांगण्यामुळेच लहानांना वाईट सवयी सहज लागून जायच्या.

मला पण बिडी पिण्याची अनावर इच्छा होत होती. मी एकदा बाई घरी नसतांना बिडी ओढून पाहिली. सुरुवातीला ठसका लागला. तरीही पुन्हा तिव्र इच्छा झाल्यावर लपून-छपून बिड्या ओढण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बिडीचा धूर नाका-तोंडातून बाहेर काढायला मस्त मजा वाटत होती.

त्यादिवशी रात्रीला बाई भाजीला फोडणी देऊन आत्याबाईच्या घरी गेली. मला बिडी पिण्याची अनावर आठवण झाल्याबरोबर माझं मन रोमांचित झालं. मी लपवलेली बिडी घाईघाईने काढली. चुलीतल्या विस्तवावर शिलगावली. दोन-तीन झुरके मारले असतील, नसतील, तर बाई अचानक आली. माझी चोरी तिने पकडली ! मी इतका ओशाळलो की सांगूच नका ! मग काय…? बाईने अशी खरडपट्टी काढली की परत मी बिडीला कधी हात लावला नाही. मला जर बाईने फटकारले नसते, तर कदाचित मीही बिडी फुंकणार्‍यांच्या पंगतीत जाऊन बसलो असतो. त्यानंतर बिड्याऎवजी तंबाखू खायला लागलो.

माझ्या घरी बाई, आई, वहिनी व मी तंबाखाचे सेवन करत होतो. खेड्यामध्ये हे व्यसनं सार्वत्रीक झालेले होते. मी दादा व बाबाच्या आड लपून खात होतो. मी घरी असलो की आई किंवा वहिनीला घोटून मागत होतो. त्यात त्यांचा जिव्हाळा व मायेचा ओलावा पाझरायचा. माझा लहान भाऊ अज्यापला मात्र तंबाखूचा वासही सहन होत नव्हता.

माझे दोस्त-मित्र तंबाखू खात होते. आम्ही खिशामध्ये ‘चुनाळू’ बाळगत होतो. ही दोन कप्पे असलेली टिनाची डब्बी. एका कप्प्यात चुना तर दुसर्‍या कप्प्यात तंबाखू. कोणी तंबाखू खात असला की तो घोटलेला तंबाखू दुसर्‍याला देत होता. म्हणून गंमतीने म्हणत की, ‘श्रीकृष्ण म्हणे अर्जुनाला, लाव तंबाखाला चुना, तूच माझा मित्र जुना !’

तंबाखात अनेक घातक विषारी द्रवे असतात. म्हणून तंबाखाचे सेवन करणे शरीराला अपायकारक आहे, ही गोष्ट त्यावेळी कळत नव्हती. बाकीचे लोक खातात म्हणून आपणही खाल्ले तर काय बिघडते…? असेच सर्वांना वाटायचे.

गावातली एक व्यक्ती बिडी कारखान्यात चहा बनवून कामगारांना विकत होता. त्याला घरी यायला रात्र व्हायची. तो येतांना दारु पिवून हलत-डुलत व हातातील चहाच्या केटलीला झोका देत यायचा. तेव्हा त्याचं हे विचित्र रुप पाहून गावातले कुत्रे भुंकत आणि त्याच्या मागे लागत. मग तो कुत्र्याला म्हणायचा, ‘क्यो बे… मुझे पहचाना नही क्या…?’ गणपतीला जसे वाजंत्री वाजत-गाजत घरी आणून सोडतात, तसे हे कुत्रे त्याला घरापर्यंत आणून सोडत. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्यावर आम्ही समजून जात होतो की आता xxxx ह्या माणसाचं आगमण झालं असेल. मग आम्हाला हसू यायचं

शनिवारी चुकारा मिळाला की खुशीत राहत. त्याचवेळी एक बाई फुटाणे, चकल्या विकायला आणत होती. ते घेऊन घरी येत. मग मुलं खुश होत. बाई पण आणायची; तेव्हा मीपण खुश होत होतो.

रविवारी बिडीचे काम बंद असे. बाया त्यादिवशी डोक्यावर टोपलं घेऊन बाजाराला जात. त्यात भाजीपाला व किराणा भरून आणत. माणसं एकतर गावात जुगार खेळायला बसत किंवा काहीजण बाजारात जाऊन धंदा करीत. हरीदास, जनार्दन, सोपान, शामराव, चोखोबा, विक्रम, महादेव, वामन, रामदास, पुंडलीक असे मोठ-मोठे माणसं, त्यादिवशी पत्त्याचा जुगार खेळत.

महादेव – जो पत्ते खेळतांना कधीकधी दिसायचा, त्याच्याबाबतीत विशेष सांगायचं म्हणजे तो पोटदुखीने ढोरासारखा रडत होता. त्याने घराच्या आड्याला फाशी घेतली. त्यावेळी मी फार हळहळलो. त्याचे बाबा माझ्या बाबाचा नातेवाईक लागत होता.

त्यांच्या जुगाराच्या अड्ड्याजवळ मुलांसोबत मीपण कुतूहलतेने पाहत राहायचो. आम्ही त्यांचा खेळ तासनतास पाहण्यात रमून जात होतो. ते सहसा ‘परेल’चा खेळ जास्त खेळत. आम्ही सुध्दा लपून-छपून खेळत होतो. त्यामुळे आम्हालाही गंजीफा खेळण्याचा नाद लागला होता. पैसे जिंकण्याच्या हावेपोटी हा नाद गोचिडासारखा चिकटून बसत असे. मला जुवा खेळतांना एक-दोनदा सोपानदादाने पकडले होते.

‘यापुढे जुवा खेळतांना दिसला नाही पाहिजे.’ असा त्यांनी दम दिला. तरीही पत्ते खेळण्याचा नाद काही केल्या सुटत नव्हता. मी त्याला भीत होतो. तो जरी रागिट स्वभावाचा वाटला तरी तो मनाने खूप चांगला होता.

जनार्धनदादा बिड्याच्या चुकार्‍याचे पैसे हरला होता. त्यामुळे जुव्याच्या रागापाई तो एकाएकी कोणालाही न सांगता निघून गेला. त्याची बायको धाय मोकलून रडत होती. दोघेही नवरा बायको तरुण होते. त्याच्या जाण्यामुळे सर्वच लोक चिंताग्रस्त झाले होते. गावामध्ये शोककळा पसरली होती. जिकडे-तिकडे त्याची शोधाशोध सुरु झाली. पण कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.

काही दिवसांनी त्याचे घरी पत्र आले. तो जुव्याचा धसका घेऊन मिल्ट्रीत भरती झाला. त्यावेळी भारत आणि चिनच्या दरम्यान युध्द सुरु होतं. त्यामुळे त्याला लगेच सैनिकाच्या भरतीमध्ये विनासायास प्रवेश मिळाला होता.

एकेदिवशी तो सुट्टीवर आला. तेव्हा त्यांनी गोळ्या-बिस्किटे आम्हा मुलांना दिले. त्याच्या येण्यामुळे आम्ही खुश झालो होतो. तो सैनिकात कसा भरती झाला, याचा किस्सा रंगवून रंगवून सांगत होता. तो जेव्हा परत जायला निघाला, तेव्हा पुरा गाव त्याला सार करण्यासाठी लोटला होता.

त्यादिवशी जनाबाई व चित्राबाई शाळेत गेल्या होत्या. मी सकाळची शाळा करुन आलो. जेवण करून आम्ही मुले जुवा खेळण्यासाठी बसत होतो. दुपारनंतर मोठी माणसं गावात दिसत नसत. त्यामुळे आमचंच राज्य राहत होतं. जुव्याच्या नादाने आम्ही मुले पुरते झपाटल्या गेलो होतो. डाव सुरु झाला. माझ्याजवळ होते-नव्हते पैसे हरवून बसलो. त्यावेळी एक, दोन, तीन, पाच, दहा असे नवीन पैसे होते. जवळचे सर्व पैसे हरल्याने मी हिरमुसला झालो. तरीही खेळण्याची खुमखूमी कमी झाली नव्हती.

मी विमनस्क अवस्थेत खोलीवर आलो. चित्राबाईची लहानशी पत्र्याची पेटी दिसली. मी त्यात हुडकायला लागलो. त्यात काही पैसे दिसले. क्षणभर ‘हे पैसे घेऊ की नाही’ असा विचार डोक्यात घोळत राहीला. पण एक मन म्हणत होतं की, ‘पैसे जिंकले की हे पैसे पेटीत ठेवून देईन.’ आणि हरलो तर…? या विचाराने माझा थरकांप उडाला ! तरी मनाचा हिय्या करून, माझे हात त्या पेटीत स्थिरावले. थरथरत्या हाताने चार आणे काढून घेतले. जन्मात कधी चोरी केली नव्हती; पण जुव्याचा नाद काही स्वस्थ बसू देत नव्हता.

पुन्हा खेळायला बसलो. दुर्दैवाने हरलो. आता काय करावे सुचत नव्हतं. मी फार मोठा अपराध केला होता. कशाला जुव्याच्या मागे लागलो, असं सारखं राहून राहून वाटत होतं. माझ्या आई-बाबाने शाळा शिकण्यास पाठविले. अन् मी कोणत्या मार्गाने चाललो, याची तिव्रतेने जाणीव झाली. मी भीत भीत घरी आलो. आता बेचैन अवस्थेत माझं मन कुठेच लागत नव्हतं. अभ्यासावर तर मुळीच लागत नव्हतं. चित्राबाईने पेटी उघडून पाहिलं तर नाही ना? असा विचार मनात घोळायचा. ‘चोराच्या मनात चांदणे’ म्हणतात, त्याप्रमाणे माझ्या मनाची घालमेल सुरु होई. माझा जीव सारखा धाकधूक करीत होता.

चित्राबाईने दुसर्‍या दिवशी पेटी उघडून पाहिली. अन् जोरात किंचाळली…! ‘माझे चार आणे काय झाले?’ असे म्हणून रडायला लागली. मी तोंडात मिठाची गुळणी धरुन बसल्यागत तीचे केविलवाणे रडणे मुकाट्याने पाहत होतो. तिच्या रडण्याने माझं मन आतल्याआत रक्तबंबाळ होत होतं.

बाहेरच्यांनी चोरले असावे, असे तिला वाटले. कुणालाही माझ्यावर शंका आली नाही. कारण सर्वांचाच माझ्यावर विश्वास होता. पण मी विश्वासघात केला. ही सल माझ्या मनाला टोचत होती. जशी अळी पान कुरतुडून कुरतुडून खाते, तशी अपराधाची भावना माझं मन कुरतुडून खात होतं. वरुन चांगला पण आतून वाईट सवयीच्या आहारी गेल्यावर, तो चोरीसारखे अभद्र व अनैतिक कृत्याला कसा बळी पडतो, हे त्याचं ज्वलंत उदाहरण होतं.

त्या चार आण्याला किती महत्व, हे तिच्या हमसून हमसून रडण्याने अनुभवलं होतं. जणू तिचं भावविश्व हरपल्यासारखं झालं होतं. त्यानंतर जेव्हाकेव्हा माझं मन जुवा खेळण्यास अधीर व्हायचं, तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने आठवीत होती. त्या आठवणीने आतल्या आत पिळल्यासारखे होत होते.

पण जीवनाच्या रुळावरुन घसरता घसरता मी खरोखरच सावरुन गेलो.

 

 


कथा अठरावी – सत्याग्रह

 

मी शाळेत असतांना आजूबाजूच्या घडामोडीवर सहज लक्ष जायचं. माझी शाळा आझाद मैदानाच्या समोर असल्याने तेथील घडामोडी माझ्या नजरेस पडल्याशिवाय राहत नसे.

या मैदानात टॉऊनहॉलला लागून स्टेज आणि टिळकांचा पुतळा होता. शहरातल्या मोठमोठ्या सभा आणि नाटकं याच ठिकाणी होत. त्याच्या पायथ्याशी आम्ही पोरं मधल्या सुट्टीत कांचे खेळत होतो.

एकदा असाच मोठा शामियाना या मैदानात उभारला होता. काहीतरी कार्यक्रम होता. तेथे फळवाले, चहावाले असे बरेचसे विक्रेते आजूबाजूला दुकानं थाटून बसले होते. त्यावेळी आमची मधली सुट्टी होती. आम्ही मुलं मैदानात खेळत असतांना अशीच बस आली. त्यातून इंग्लीश गोरे माणसं-बाया उतरले. खेळ सोडून आम्ही त्यांना पाहायला झुंबड केली. गोरे-परदेशी लोक म्हटले की त्यांचे आकर्षणच वाटायचं.

मला आठवते, त्यांनी सारेच्या सारीच केळी विकत घेतल्याने विकणाऱ्यांचे टोपले रिकामे झाले. नाहीतर ऐरवी त्यांना दिवसभर माशा मारत बसावे लागले असते. मात्र अव्वाच्यासव्वा पैसे घेऊन त्यांनी लुबाडल्याचं आम्ही पाहिलं; तेव्हा खरं म्हणजे रागच आला होता.

कधी सर्कस आली की रात्रीला मोठा सर्चलाईट दूरपर्यंत फिरवत. तो घुमणारा लाईट पाहतांना आम्ही मुले हर्षभरीत होत होतो. ही सर्कस याच मैदानात बस्तान मांडत असे. मी मधल्या सुट्टीत पाहायला जात होतो. त्याचा तो अगडबंब तंबू माझं लक्ष वेधून घेत असे. सायकलवर कसरत करणारे, झुल्यावर झुलणारे, वाघ, सिंह, हत्ती, वानर इत्यादी प्राणी व रिंगमास्टर, मौतका कुवां आणि जोकराचे चित्र मी निरखून पाहत होतो.    असं ते सर्कसचं दृष्य बाहेरून पाहिल्यावर, प्रत्यक्ष सर्कस पाहण्यासाठी मी बाईच्या मागे सारखा नांदा लावत होतो. मग ती ज्या दिवशी तिच्या मैत्रीणी-बाया जात, त्यांच्या सोबत आम्ही पण जात होतो. मी सर्कसमधील चित्तथरारक खेळात हरवून जात होतो.

याचवेळेस काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. पाटीपुराजवळ खोज्या-मुस्लीमांची मस्जिद होती. तेथे सामुहिक लग्नाचा कार्यक्रम चालला असतानांच इमारत कोसळली. या अपघातात खूप लोक मेले. हा समाज जन्मजातच श्रीमंत असल्याचे मी ऐकले होते. यांचे मेनरोडवर मोठमोठे लोहा-लोखंडाचे दुकानं होते. यांच्याकडे भरपूर पैसा असल्याने पैसा पैश्याकडे जात असते असे जे म्हणतात, ते खरंच आहे. मृत्यू कोणालाही सोडत नाही, मग तो श्रीमंत असो की गरीब, राजा असो की रंक ! आमच्या उमरसरा गावातून अनेक लोक ते दृष्य पाहायला गेले होते. मीपण गेलो होतो. मी खिडकीतून आतमध्ये पाहिलं; तेव्हा एकाला एक लागून अनेक प्रेतं तेथे ठेवलेले दिसले. ते दृष्य पाहून अंगावर शहारे न उठले तर नवलच ! इतका तो भयावह प्रसंग अंगाचा थरकाप उडवणारं होतं. बरेच दिवसपर्यंत ते दृष्य माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं.

maमला सिनेमा पाहण्याचं वेड जडलं होतं. एखादा नवीन सिनेमा लागला की त्याचे पोस्टर लावलेली ढकलगाडी रस्त्याने फिरत. ते पाहून माझं कुतूहल वाढत असे. त्यावेळी श्याम, राजकमल व सरोज अशा तीन टॉकीज होत्या. मग मी कुणासोबत तरी सिनेमा पाहायला जात होतो. पडद्याजवळच्या रांगेत बसून पाहत होतो. कारण हे तिकीट इतर जागेपेक्षा कमी राहत असे. त्यावेळी ताजमहाल, बेटी-बेटे, दोस्ती, आरजू, बुंद जो बन गयी मोती, मेरा साया, वक्त, गंगाजमूना असे काही सिनेमे मला फार आवडले होते.

सिनेमा पाहून आलो की रात्रभर अन् सकाळी शाळेत जातांना त्यातील संवाद, चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत. एखाद्यावेळेस वर्गात पण मनामध्ये त्याची राहून राहून उजळणी होत असे. अशावेळी शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष राहत नसे. मग पुन्हा भानावर येऊन तो चलचित्र विसरुन जाण्याचा प्रयत्‍न करीत होतो. त्यातल्या त्यात ‘दोस्ती’ या सिनेमाने तर मला भुरळ पाडली होती. या सिनेमात लंगडा, रामू आणि आंधळा, मोहन अशा दोघांची अतूट दोस्ती होती. लंगडा बाजा वाजवायचा, तर आंधळा गाणे म्हणायचा. भीक मागून लंगड्याला शिकवीत होता. अशी त्या सिनेमाची कथा होती.

त्याच्या बाज्यातील धून माझ्या कानात शिरून अंतरंगात झिरपत होती. मी पुरता वेडापिसा झालो होतो. मीपण बाजा विकत घेतला अन् वाजवून पाहायला आसुसलो, पण नाही साधलं. त्या सिनेमातील गाणे एकाहून एक सरस होते. भावनांना हेलावणारे हे गाणे माझ्या मनात सारखे रुंजी घालत.

अशाच भारावलेल्या अवस्थेत मीपण कथा लिहून सिनेमा काढावा; असं स्वप्न रंगवत होतो. मी कल्पनेची भरारी मारून काही शब्द, वाक्य वहीवर लिहून पाहत होतो. पण नाही जमलं. एक कथा मी कागदावर चितारण्याचा प्रयत्‍न केला. ती अशी होती –

‘शाळेत जाणार्‍या मुलाचे आई-वडील आंधळे असतात. ते भीक मागून पोट भरतात. त्याचे बाबा भात्याची पेटी पोटासमोर धरून वाजवायचा व दोघेही एकमेकांच्या सूरात सूर मिसळून देवाचं गाणं म्हणायचे. एकदा मुलाला म्हणतात, ‘बाबू, आम्ही मेल्यावर तू पेटीला हात लावू नको. म्हणजे तुझ्यावर भीक मागायची पाळी येणार नाही. तू शीक बाबू… खूप शीक. अन् मोठा हो…!’

मुलगा एकेक परीक्षा पास करुन पुढच्या वर्गात जातो. पण एकेदिवशी त्याचे आई-बाबा एकामागे-एक गंभीर आजाराने मरुन जातात. मुलगा पोरका होतो. त्याची शाळा बुडते. जे काही आई-बाबाने झोपडीत साठविलेले असते; ते संपल्यावर खायला काहीच उरत नाही. पोटातल्या भुकेनं तो व्याकूळ होतो. अशा अवस्थेत त्याचं लक्ष टांगलेल्या पेटीकडे जाते. तो पेटीकडे एकटक पाहतो. तिला घेऊन भीक मागावे काय, असा विचार त्याच्या डोक्यात शिरतो. तो कमालीचा अस्वस्थ होतो. त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येते. सारा चेहरा निराशेने काळवंडून जातो. एक मोठा श्वास सोडतो. नजर वर करून शून्यात पाहतो. डोळे मिटतो. परत डोळे उघडून पेटीकडे पाहतो. पेटी त्याला खुणावत असते. पण त्याच वेळी ‘पेटीला हात लावू नको.’ असे आई-बाबाने निक्षून सांगितलेले शब्द त्याच्या कानात घुमते. एकीकडे पोटातली आग त्याला स्वस्थ बसू देत नाही तर दुसरीकडे भीक मागता येत नाही. ‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना.’ अशी त्याची बिकट अवस्था होते. काम करुन कमावण्याइतपत त्याचं वय झालेलं नसतं. अशा अवस्थेत कसातरी दोन दिवस कळ काढतो. आता त्याचं पोट खपाटीला लागते. त्याच्या अंगात काहीच त्राण उरत नाही. पुन्हा त्याची नजर पेटीकडे जाते. कसातरी घुसत-घुसत जाऊन पेटीचा भाता फुगवतो. त्यातून भेसूर सूर उमटतात. तसाच दचकतो. पण त्या सुरातच त्याला पुढील जगण्याचा मार्ग गवसतो. मग पेटी गळ्यात अडकवतो. बसत, उठत झोपडीच्या बाहेर पडतो. भीक मागायला…! पोटाची खड्गी भरायला !’ अर्धवट लिहिलेल्या या कथेची वही कुठे गेली, काय माहित?

एखाद्यावेळी गंमत पण घडत होती. त्यादिवशी असंच झालं. महादेव सोबत आम्ही तीन-चार मुलं रात्रीला नऊ वाजताचा सेकंड शो सिनेमा पाहायला निघालो. महादेव आमच्या पेक्षा मोठा व तरूण होता. रस्ता निर्जन असल्याने शुकशुकाट होता. न्यु इंग्लीश हायस्कूल जवळून रमत-गमत जातांना तरुण मुलगी एकटीच येत होती. आम्ही हातात हात घालून चाललो होतो. ती मुलगी जवळ आल्याबरोबर महादेवने मला त्या मुलीकडे इतकं जोरात ढकललं की त्याचक्षणी मी तिला जाऊन भिडलो. त्या मुलीने जोरात, ‘आईऽऽऽग.’ असा केविलवाणा चित्कार केला. तेव्हा मला कसंच तरी वाटलं. मुसमुसलेल्या तारूण्याचे असे हे चावट खेळ त्या वयात चालत असतात, हे त्यावेळी मला कुठे समजत होतं?

सिनेमा टॉकीजमधील विशेष लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे तेथील ढेकणं ! वारुळातल्या मुंग्या बाहेर पडतांना जशी रीघ लागते, तसेच बाकड्यावर बसले रं बसलं की ढेकणांचा वावर सुरु व्हायचा. मग सिनेमा पाहतांना तर चावतच. शिवाय घरी येतांना अंगावरच्या कपड्यातून आयात पण होत. त्यामुळे आमच्या घराच्या भिंती-दरवाजात, बाजीच्या फटीत किंवा जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे लपून बसत. रात्री अंथरुणावर अंग टाकलं की या ढेकणाचा तमाशा सुरु व्हायचा. मग त्यांचा कचाकच चावण्याचा कार्यक्रम सुरु झाला की आमचाही त्यांना शोधून मारण्याचा सार्वत्रीक कार्यक्रम सुरु व्हायचा. त्यांच्या अशा उपद्व्यापामुळे शांतपणे झोप कधी लागत नसे. बरं, गावाला गेल्यावर आतातरी मेले असतील असे वाटायचे. पण कशाला मरतात? दोन महिने तरी रक्त न पिता जिवंत राहतात, असे मी ऐकले होते. माणसाचं रक्त पिणे हेच त्याचं अन्न ! त्याला चिरडलं की नुसतं रक्त निघायचं.

तसाच आणखी एक त्रास लिचडाचा ! हा प्राणी लहानसा, गुबगुबीत, कापसासारखा पांढर्‍या शुभ्र रंगाचा, अंगातल्या कपड्याच्या शिवणीत लपून बसायचा. मग तो चावला की ती जागा खाजवत असे. कदाचित एकच एक कपडा न धुता वारंवार घालत असल्याने म्हणा किंवा सिनेमा टॉकीजच्या संसर्गामुळे म्हणा किंवा बिडी बांधणीच्या वातावरणामुळे म्हणा, अशा कोणत्या कारणाने हे प्राणी पैदा होत, ते कळत नव्हतं. पण उमरसर्‍याचे हे दोन वैशिष्ट्य मात्र नेहमी माझ्या लक्षात राहिले.

माझ्या वर्गाची खोली रोडच्या बाजूला होती. शाळा आणि रोडच्या मध्ये पोलीस वसाहत होती. तेथे बाजूला जेल होता. तेथून गेलं की नेमकं कैद्यांकडे लक्ष जायचं. त्यांच्या अंगातल्या पोशाखावरून चटकन ओळखू येत. पांढर्‍या रंगाची बंडी आणि हॉफपॅन्ट घातलेले असायचे. कधीकधी त्यांचा आठ-दहा लोकांचा ताफा जेलकडून बसस्टॅंड जवळील बगिच्यात रस्त्यांने जातांना दिसायचा. तेथे शेतीचे कामे करीत. त्यांना राखायला त्यांच्या मागे एक प्रमुख कैदी व पोलिस राहत. त्यांची दीनवाणी अवस्था पाहून ‘नको रे बाबा हा जेल’ असं वाटायचं.’

एकदा जेलच्या आवारात खूप गलका ऎकू आला.

‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जयऽऽ’

‘जोरसे बोलो, जयभीम…’

‘हिम्मतसे बोलो, जयभीम…’

‘भूमिहिनांना शेती मिळालीच पाहिजे…’

‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मील जायेगा…’ अशा घोषणा जोराजोरात ऎकू येत होत्या. शाळा सुटल्यावर मी जाऊन पाहिले. तेव्हा जेलचा आवार माणसा-बायांनी तुडूंब भरलेला दिसला. दाटीवाटीने गर्दी केलेले दृष्य पाहून मी अक्षरश: भारावून गेलो. आमच्याच सोबत रात्रंदिवस वावरणारे कोणीतरी जिव्हाळ्याचे लोक आहेत, हे पाहून माझ्या अंतर्मनातील हळूवार भावना उचंबळून आल्या होत्या.

तेथे खेड्यापाड्यातील लुगडे, धोतर नेसलेले म्हातारे-कोतारे, तरणाताठे बाया-माणसांनी गर्दी केली होती. काहींच्या हातात निळे झेंडे होते. काहींनी डोक्यात निळया टोप्या घातल्या होत्या. कोणाकोणाचे कपडे फाटलेले, जागोजागी शिवलेले, ठिगळं लावलेले, माती-घामाने मळलेले दिसत होते. कुणाच्या कडेवर लहान मुलं होते तर काही बाया त्यांना दूध पाजीत होत्या. ते राहून राहून गगदभेदी घोषणा देत. आणखी काही एसट्या, पोलिसगाड्या बाया माणसाने भरभरुन तेथे येत. मग घोषणा सुरु होत. सारा परिसर दणाणून जात होता. चार-पाच दिवस ते दृष्य सारखं दिसत होतं. एकाला विचारल्यावर तो म्हणाला,

‘हा कष्टकरी-भुमिहीनांचा सत्याग्रह आहे. आमच्याकडे शेती नाही. तेव्हा आम्हाला गुजराण करण्यासाठी सरकारने शेती दिली पाहिजे. म्हणून आम्ही दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात संघर्ष करीत आहोत.’ त्यांच्यामधील दुसरा म्हणाला,

‘बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. असे सांगितले. म्हणून आम्ही हक्कासाठी संघर्ष करीत आहोत.’ आणखी तिसरा म्हणाला,

‘हात पसरल्याने भिक मिळते. हक्क मिळत नाही. म्हणून हा संघर्ष.’ अशी त्यांच्या आंदोलनात पेटत असलेली  धग पाहून मी अवाक् झालो. असा तो सत्याग्रह मी शाळकरी जीवनात पहिल्यांदा पाहिला. त्यांचा सत्याग्रह संपल्यावरही काही दिवस माझ्या कानात त्या घोषणाचा निनाद घुमत होता.

 


कथा एकोणिसावी – डोळे खाडकन उघडले

 

मी यवतमाळ शहरात पाऊल टाकलं; तेव्हा एक गोष्ट तिव्रतेने जाणवली, ती ही की आपण वेगळ्याच दुनियेत आलो. हे शहर आणि माझं खेडं यात जमीनअस्मानाचं अंतर असल्याचं दिसलं.

शहरात मोटारी-फटफट्या, गुळगुळीत डामराचे रस्ते, सिमेंट काँक्रीटचे टुमदार बंगले, एका रांगेत वसलेले, चमचमीत फरशीचे, आवाराला भिंती… तर आमच्या खेड्यात बैलबंड्या-रेंग्या, खरबरीत-दगड-माती-धुळीचे रस्ते, गवता-कुडाचे, शेणा-मातीने सारवलेले, काट्या-कुट्याच्या कुंपणाचे घरं…

शहरात साफसफाई, सांडपाण्याचे गटारे, प्रशस्त गल्ल्या, नळाचे शुध्द पाणी, वीजेचा लख्ख प्रकाश… तर गावात केरकचरा-खताचा उकंडा, उघड्यावरच सांडपाणी, अरुंद रस्ते, दूषित पाणी, अंधाराचे साम्राज्य…

शहरात गोल साड्या, घट्ट ब्लाउज, सुंदर केसाच्या चटकदार बाया, पॅंट-शर्ट घातलेले माणसं, श्रीमंताचे गुबगुबीत पोरं… तर गावात लुगडं, ढीलं-ढालं चोळ्या, विस्फारलेल्या बटाच्या निस्तेज बाया, धोतर-कुडतं-बंडी घातलेले माणसं, उघडे-नागडे, मलूल चेहर्‍याचे, मातीने माखलेले पोरं…

शहराचा झगमगाट आणि श्रीमंती थाट पाहून आमच्या गावचं बकालपण हरवून बसलो होतो. शहरासारखं सौख्य आमच्या गावाला कधीतरी लाभेल काय? हा विचार माझ्या मनात नेहमी घुमत राहायचा.

मी व जनाबाई, दोघेही बहिण-भाऊ उमरसर्‍याला राहायला आल्याबरोबर आमची शाळा सुरु झाली. जे विद्यार्थी पुढल्या वर्गात जात, त्यांची पुस्तके अर्ध्या किंमतीत घेत होतो. नाहीतर विजय बुक डेपो मधून पाऊन किंमतीत घ्यायचो.

माझी शाळा, त्याकाळची म्युनीसिपल हायस्कूल…! आझाद मैदानाजवळची… उमरसर्‍यापासून तिनक मैल दूर… रोज सकाळी वह्या-पुस्तकांची थैली कधी हातात तर कधी खांद्यावर टाकून तितक्या दूर पाय तुडवत जात होतो. बाईची चौथीची प्राथमिक शाळा तहसील ऑफीसच्या समोर होती. पाचवीपासून काटेबाईच्या शाळेत गेली.

पाचवीपासून हिंदी व इंग्रजीचा विषय सुरु झाला. शिक्षकांनी ए.बी.सी.डी पाठ करायला सांगितले होते. त्याची हुर्दुक झोपेतही राहत होती. सकाळी उठवल्यावर बाई सांगायची की, ‘झोपेत तू ए.बी.सी.डी म्हणत होता.’ येथे गुरुजींना ‘सर’, हजेरी देतांना ‘येस सर’ म्हणणे ह्या सार्‍या गोष्टी मला नवीनच होत्या. आमच्या निळोण्याच्या शाळेत असं काही नव्हतं.

उमरसर्‍याला एकच विहीर होती. ती यवतमाळच्या रस्त्यावर बदाडात होती. पावसाळ्यात तुडुंब भरायची. सुट्टीच्या दिवशी कपडे धुवायला याच विहिरीवर येत होतो.

शाळेत जातांना बब्बी पहेलवानाचं घर लागत होतं. तो एखाद्यावेळी डुलत डुलत चालतांना दिसायचा. आणखी दुसरा जांबुवंत पहेलवान होता. दोघेही उंच-पुरे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारे. जांबुवंतची व्यायामशाळा काणेच्या दवाखान्याजवळ तर बब्बीची दत्त चौकात होती. मी तेथील व्यायामाचे प्रकार आणि कुस्तीचे डावपेच पाहण्यात रमून जात होतो. या दोघात विस्तव जात नसल्याचं ऎकलं होतं. त्यांच्या कुस्तीच्या सुरस कथा मुलं सांगत. एकदा सरोज टॉकीजमध्ये दोघांची मस्त फ्रीस्टाईल कुस्ती सुरु झाली. सिनेमा पाहणार्‍यांनी सिनेमापेक्षा त्यांच्या कुस्तीतच जास्त रस घेतला होता, म्हणे !

मी घरी येतांना दातेच्या घराजवळच्या इंग्रजी चिंचाच्या झाडाचे लाललाल पिकलेल्या टपोर्‍या चिंचा तोडत होतो. मग खात खात घरी येत होतो. तेव्हापासून इंग्रजी विषयापेक्षा इंग्रजी चिंचाच जास्त आवडायला लागल्या होत्या.

मला नेहमी ब्रूक बॉंड टीची लाल रंगाची, दोन चाकी गाडी, खाकी ड्रेस घातलेला माणूस ढकलतांना दिसायचा. दुसरा देखणा माणूस – तो साहेब असावा, सूट-बुटातला, हातात हँड बॅग असलेला चालतांना दिसायचा. दुकान आलं की आत जायचा. मग नोकर चहाचे पुडे काढून दुकानात घेऊन जायचा. मला जेव्हाकेव्हा ही गाडी दिसायची; तेव्हा माझं लक्ष तिकडे हमखास वळायचं.

आणखी घंटीचा आवाज आल्यावर समजून जात होतो की, होय न होय ही रसवंतीच असली पाहिजे. ही तीन चाकी गाडी, त्यावर चरक आणि उसाचे पेंडके ठेवलेले. कधी चरकाच्या दांड्याला माणूस फिरवायचा तर कधी बैल फिरवायचा.

मला कधी रस्त्याच्या कडेने घोळका दिसायचा. काही तरणाबांड, पांढरे शुभ्र कपडे घातलेले, देखणे पोरं-पोरी खांद्यात भात्याची पेटी अडकवून एका सुरात गाणे म्हणायचे. ते लहान लहान पुस्तिका वाटत. त्यात येशू ख्रिस्ताचा उपदेश असायचा. रस्त्यावर येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याचा हा अनोखा प्रकार मला फार भावला.

सरकारी दवाखान्याजवळील रोडच्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली पांढर्‍या रंगाच्या कापडावर, पालखट मांडून, कपाळावर उभं गंध लावलेला, अंगात पांढराशुभ्र शर्ट घातलेला व एकटांगी धोतर नेसलेला, डोक्यात टोपी व खांद्यावर शेला ओढलेला ज्योतिष्य बसलेला दिसायचा. तेथे लाकडी काड्याच्या पिंजर्‍यात पोपट, पाकिटाची चवड, निरनिराळ्या देवाच्या तसबीर्‍या, लिहिण्याची पाटी, लेखणी व पंचाग ठेवलेले दिसायचे. मला त्याचं मोठं कुतूहल वाटायचं. मी ते पाहायला थोडावेळ तरी थबकत होतो. जाणार्‍या-येणार्‍याकडे पाहात तो, ‘ज्योतिष्य पहा, भविष्य पहा’ असं हलक्या आवाजात बोलायचा. त्याच्याकडे गिर्‍हाईक आला की त्याचा पेहराव पाहून तसा बोलायचा. ‘या साहेब, भाऊ, दादा’ असं म्हणायचा. पैसे टाकले की पिंजर्‍यातील पोपटाला बाहेर काढायचा. पोपट उगीच पाकिटाच्या भोवती फिरायचा. मग एक पाकीट चोचीत धरून बाजूला ठेवायचा. ज्योतिष्य पाकिटातील कागद बाहेर काढून त्यात पाहात भविष्य सांगायचा. ते सारं पाहून मला मोठी गंमत वाटायची.

तसंच मला एक दृश्य नेहमी दिसायचं. रस्त्याने माणसाची विष्ठा बादलीत घेऊन जाणारी बाई किंवा माणूस ! कधी ती बादली हातात तर कधी डोक्यावर… एखाद्यावेळी छोट्याशा ढकलगाडीत ती बादली असायची. हे दुरूनच दिसलं की आम्ही जवळून जात नव्हतो. त्या विष्ठेचा घाणेरडा वास यायचा. नाक दाबून जात होतो. हे लोक कसे काम करीत असतील, याचं आश्चर्य वाटायचं आणि कीव पण यायची. घाणीतून अवतरलेलं शहराचं हे दुसरं रूप पाहून मनाला झिणझिण्या येत होत्या. आमच्या खेड्यात असं नव्हतं. कुणीही कुणाची विष्ठा घेऊन जात नव्हतं. खरं म्हणजे कुणीही घरात संडास करीत नव्हतं तर ते बाहेर जात. बाया गोद्रित, माणसं वावरात, धुर्‍यावर किंवा लवणाच्या काठावर… शहरात तर वेगळंच पाहिलं. घाण आपण करावी अन् साफ मात्र दुसर्‍यांनी करावी ! किती विचित्रपणा होता, हा !

मला आठवतं, तो म्हणजे चिरफाड बंगला. हा बंगला माझ्या शाळेच्या रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर नव्हता; पण एखाद्यावेळी मी उगीच दुसऱ्या रस्त्याने जात होतो. तेथून जातांना माझा जीव वर-खाली व्हायचा. पण मला त्याचं नेहमी कुतूहल वाटायचं. चार भिंतीच्या आत प्रेत असलं की बाहेर लोकांची गर्दी व पोलिस दिसत. या ठिकाणाला बंगला का म्हणत, ते मला उमगत नसे. पण ज्या फाटक्या माणसाकडे राहण्यासाठी घर नाही, अशा माणसाला निदान शेवटच्या क्षणी तरी बंगल्याचं सुख मिळावे; म्हणून या वास्तूला बंगला तर म्हणत नसावे ना, असा विचार माझ्या मनात यायचा.

एखाद्यावेळी टांगाचौकात पेवंडी आंबा विकत घेऊन सालपटासकट खात होतो. हे आंबे मला फार आवडत. कधीकधी मारवाडी चौकात जाऊन गरम गरम भाजलेले फुटाणे घेऊन खात होतो. शाळेच्या बाहेर खरमुरे विकणारा माणूस ‘खरमुरेऽऽ’ असा लयबद्ध आणि विशिष्ट आवाजात ओरडायचा. त्याने चोळून फुक मारलेले खरमुरे पाच पैशात विकत घेऊन खात होतो. हे खारवलेले शेंगदाणे खूप छान लागत. कधीकधी काचेच्या डब्ब्यातलं गुलाबी रंगाचं कापसासारखं गोल गोळा असलेलं ‘बुढ्ढीका बाल’ घ्यायचा मोह टाळता येत नव्हता. तोंडात टाकलं की अलगद विरघळून जायचं.

शहरातील गणपती, दुर्गोत्सवाच्या वेळी मुर्त्या, रोषणाई पाहून माझे डोळे दिपून जायचे. त्यातील ऑर्केस्ट्रा, गीतगायन, नृत्य, नाटक, नकला, सिनेमा इत्यादी कार्यक्रम पाहायला मी जात होतो.

गणपती पाहतांना लहानपणची गोष्ठ आठवायची. ज्यादिवशी गणपती शिरवित, त्यादिवशी आमच्या गावातील पोरी-पोरं संध्याकाळी यवतमाळला येत. रात्रभर वाजतगाजत जाणार्‍या गणपतीची मिरवणूक पाहण्यात आम्ही दंग होवून जात होतो. एकेदिवशी मी गणपती पाहायला जाण्यासाठी रडत होतो. त्याचवेळी जनामामी आमच्या घरी आली. मला रडतांना पाहून म्हणाली,

‘कावून रडता गा…?’

‘त्याला गणपती पाहायचे आहेत.’ आई म्हणाली.

‘हात्त… तिच्या. एवढंच…! काय बाप्पा…! त्या नासुकल्या गणपतीसाठी रडता…? तुमचा मोठेबाबा गणपतबुवा आहे ना गावात. त्यालाच पाहून घ्याऽऽ ना…? त्याला पाहिलं काय न् गणपती पाहिलं काय, सारखंच…! कशाला पाय तुडवत तीन कोस यवतमाळला जाता अन् तीन कोस परत येता?’ तिचे ते गमतीशीर बोलणं ऐकून मी उगामुगा झालो होतो.

एकदा माईंदे चौकात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. मी सोपानदादासोबत पाहायला गेलो होतो. त्यावेळी तेथील मोकळ्या मैदानात दुर्गादेवी बसली होती. एका गायिकेने, ‘रसिक बलमाऽऽऽ दिल क्यो लगाया तुने.’ हे जिवाच्या आकांताने गायलेली भावसंगीतातील अप्रतिम गाणं मला फार भावलं होतं. तसंच ‘कुहुऽऽ कुहुऽऽ बोले, कोयलीया.’ हे द्वंदगीत अगदी गोड आणि सुरेल आवाजातलं मनाला भिडलं होतं. मधामधात मुलींचा डॉंन्स. असा तो सुरेख नजारा डोळे भरून पाहतांना बेधुंद होत होतो. जणू मी सिनेमाच पाहत आहे, असा भास होत होता.

त्यावेळी कार्यक्रम पाहून घरी आल्यावर खूप रात्र झाली. तेवढ्या रात्री अभ्यास करायचा कंटाळा आला होता. सकाळी शाळेत जायला निघालो. रस्त्यात शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास केला नसल्याचे लक्षात आले. तेव्हा दरदरुन घाम फुटला. आता काय करावे, काही सुचत नव्हते. मी पार धास्तावून गेलो.

मी घाबरलेल्या अवस्थेत शाळेच्या आवारापर्यंत गेलो. परंतु माझे पाय एकाएकी माघारी फिरले. सापळ्यात अडकलेल्या उंदरासारखी माझी अवस्था झाली. त्यातून कसं निघावं, तो मार्ग सापडत नव्हता. धागा तुटलेला पतंग जसा भरकटतो, तसेच माझ्या मनाचे झाले होते. मी विमनस्क अवस्थेत धामणगाव रोडने कॉटन मार्केटपर्यंत गेलो. तेथे आवारात दुर्गादेवी बसली होती. मी दुर्गादेवीकडे पाहिलं. मनात आलं, तिला माझी व्यथा सांगितली असती. पण जाऊ द्या ! ती निर्जीव आहे, ना !

मन कुठं स्थिर राहतं. तो भूतकाळात शिरतं. या ठिकाणी शेतकरी भुईमूगाच्या शेंगा, तुरी, ऊडीद, ज्वारी, कापूस असा शेतातला माल विकायला आणत. मीपण दोन-तीनदा कधी बाबासोबत तर कधी दादासोबत आलो होतो, ते सारं आठवलं. तेथे माल टाकण्यासाठी सिमेंटचे ओटे बांधलेले होते. त्यावर माल उबडून दलाल व व्यापार्‍यांची वाट पाहत बसत होतो.

दलाल व व्यापारी मालाची हर्रास करीत. व्यापारी म्हणेल तो भाव दलाल तोंडाने म्हणायचा. शेवटी एक-दोन-तीन म्हणून माल विकून टाकायचा. दलाल आणि व्यापारांच असं साटंलोटं आमच्या काही लक्षांत येत नव्हतं. माल शेतकर्‍याचा आणि विकायचा तो दलाल. जणू काही तोच मालक ! हे पाहून मला वाटे, शेतकर्‍यांचं जीवन म्हणजे मुंगीसारखं ! कष्टांनं जिवापेक्षा जड असलेला एकेक कण कोठारात नेऊन टाकावा. पण कुणीतरी फस्त करून आपल्याला उपाशी ठेवावं ! संध्याकाळी दलाल मालाला आलेल्या किंमतीतून दलाली, मापार्‍याचा खर्च, ओट्याचं भाडं, सरकारचे कर असं सटरफटर कापून आलेला बाकीचा चुकारा देत होता.

मला नेहमी प्रश्‍न पडायचा, ‘जो कष्ट उपसतो, त्याच्याच स्वप्नांचा चुराडा होतो. जो कापूस पिकवतो, तोच नागवा राहतो. असं का?’ शेतकर्‍याला आपल्या मालाची किंमत का ठरविता येत नाही? त्याने किती खर्च केला? त्याने बायको-पोरांसह किती कष्ट उपसले? याची काहीही किंमत नव्हती. घामात भिजवून काढलेला माल डोळ्यादेखत मातीमोल भावात विकल्या जात होता. तेव्हा काळजाचं पाणी पाणी होत होतं. दुसरीकडे कारखानदार आपल्या वस्तूची किंमत ठरवूनच बाजारात आणत होता. पण शेतकरी आपल्या वस्तूची किंमत ठरवू शकत नव्हता. असं का? व्यापारी शेतकर्‍याच्या मालाचा भाव पाडूनच खरेदी करीत व एकदा का त्यांच्या ताब्यात गेला की त्याच्या किंमती भराभर वाढत. अशीही गंमत मी त्यावेळी पाहत होतो. अशा अनेक निरुत्तर प्रश्‍नाच्या गराड्यात मी सापडलो होतो.

मी दुर्गादेवीच्या अवतीभवती फिरुन वेळ काढत होतो. शाळा सुटण्याची वेळ झाल्यावर घरी जाण्यास निघालो. कुणाला दिसू नये, म्हणून दुरुनच नजर टाकून पाहत पाहत घरी गेलो.

दुसर्‍या दिवशी तीच गत झाली. दप्तर घेऊन शाळेत न जाता रेल्वे स्टेशनवर गेलो. तेथून दोन जिवाची शकुंतला रेल्वेगाडी झुकूडऽऽ झुकूडऽऽ करत मुर्तिजापूरला जात होती. स्टेशनवर फक्त इंजिन होतं. त्यात एक माणूस टोपल्यानं दगडी कोळसा भरत होता. दुसरा फावड्याने धगधगत्या विस्तवात टाकत होता. त्याचसोबत इंजिनमध्ये पाणी भरत होता. म्हणजे या इंजिनचं खाणंपिणं चालू होतं. कोळशाच्या जळणाचा दर्प चरचरीत वाटत होता. दुरूनच मांगगारुड्यांच्या वस्तीतला कलकल ऐकू येत होता. मी या रेल्वेस्टेशनचं दृश्य पहात फिरत होतो. एवढ्यात उमरसर्‍याच्या शामरावदादाने – ज्याच्या घरी मी राहत होतो, त्याने पाठीमागून आवाज दिला. तो कोठून आला, काय माहीती? मात्र त्याचा आवाज ऎकून माझी पाचावर धारण बसली.

‘अरे, रामराव… इकडे कुठे फिरत आहेस? शाळेत गेला नाहीस?’

मी काहीच बोललो नाही. शाळेत न जाता मी इकडे फिरत आहे; हे त्याने ओळखले. मला त्याने खडसावले. खोटं कधी लपून राहत नाही. कधीतरी बाहेर येतंच. तसंच माझं झालं. मी शाळेत का जात नाही म्हणून तो खोदून खोदून विचारत होता. त्याच्या समोर मी बोलायला घाबरत होतो.

‘तुझी खरोखरच काय अडचण आहे, ते सांग. म्हणजे दूर करता येईल. तुझ्या माय-बापाने शिकून मोठा होशील, म्हणून मोठ्या आशेने तूला पाठविलं. तू शिकला नाहीस, तर तूला काबाडकष्ट करण्यात जीवन घालवावे लागेल. आम्ही शिकलो नाही, म्हणून बिड्या बांधत आहे. त्यातच आमचं जीवन बर्बाद होत आहे. तू असा करु नको. चांगला शीक म्हणजे नोकरी लागेल. त्यामुळे तुझं जीवन सुखात जाईल.’ असा तो समजवण्याच्या सुरात एका दमात बोलून गेला.

त्याच्या बोलण्याचा माझ्याही मनावर परिणाम झाला. त्याच्या शब्दातून अतीव कळवळा झिरपत असल्याचे मला जाणवत होते. खरोखरच, आई-बाबाने मला येथे शिकायला पाठविले आणि मी कोणत्या मार्गाने जात आहे, या गोष्टीची तिव्रतेने जाणीव झाली. माझं मन हेलावलं. त्याला मी शाळेत का जात नाही, ते डोळ्यात पाणी आणून सांगितलं. माझं मन इंजिनच्या कोळशाप्रमाणे आतल्याआत जळत होतं. घुसमटत होतं. पण त्यांनी आधार दिल्याने माझ्या मनाला थोडी उभारी आली.

‘घरी चल. मी चिठ्ठी लिहून देतो. ती मास्तराला दाखव म्हणजे काही करणार नाही.’ असा धीर दिला. त्याच्या मागेमागे मी घरी गेलो. घरी गेल्यावर त्यांनी चिठ्ठीत लिहीले की, ‘हा मुलगा खेड्यातून शिकायला आला. तो माझ्या घरी राहतो. तो गेल्या दोन दिवसापासून आजारी होता. त्यामुळे शाळेत येऊ शकला नाही. तरी त्याला क्षमा करावी.’

ही चिठ्ठी मी वर्गशिक्षकाला दिली. ती वाचत असतांना मी त्यांच्या चेहर्‍याच्या हावभावाकडे डोळे रोखून अधिरतेने पाहत उभा होतो. वाचून झाल्यावर, ‘ठीक आहे. बस जागेवर.’ असे म्हणाले.

त्याचवेळेस माझ्या डोक्यावरचं सारं ओझं खाडकन उतरलं. मला आता हलकं हलकं वाटायला लागलं. मी हर्षभरीत होऊन माझ्या जागेवर येऊन बसलो. माझं अंधारलेलं जीवन आता उजळू लागलं. या प्रसंगाने माझी जीवननौका कुठेतरी भरकटण्याआधी माझे डोळे खाडकन उघडले, म्हणून बरं झालं !

 

 


कथा विसावी – पैसे हरविले

 

मी सोपानदादाच्या कार्डावरचं रेशन आणायला उमरस‍र्‍याला निघालो. शामरावदादाने दिलेली वीस रुपयाची नोट पैजाम्याच्या खिशात टाकली. परत नोट व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. कमरेच्या करदोड्याला बांधलेली किल्ली चाचपडून पाहिली. ती पण जाग्यावर होती. मग मी निश्चिंत झालो. किल्ली हरवू नये म्हणून करदोड्याला बांधत होतो. खेड्यातील लोक असेच करीत.

आम्हाला रेशनच्या कार्डावर धान्य घ्यावे लागे. हे दुकान कधी सावरगड तर कधी घोडखिंडीला असायचं. दोन कोस दूर… तेथून ओझं घेऊन यावे लागे.

रस्त्याने जातांना मला झाडं-झुडपं पाहण्याचा छंद जडला होता. नदी-नाल्याच्या काठाकाठाने मी हिरवळ न्याह्याळीत जायचा. तेथे उगवलेल्या इवलाशा वनस्पतीचे पानं, फुलं तोडून वहीत ठेवत होतो. वाळल्यावर त्याचं रुप वेगळंच दिसायचं.

नदी-नाल्याने फिरायला मोठी मजा वाटायची. मी लहानपणी खेकडे पकडायला गावातल्या पोरांसोबत जात होतो. लवणाला पावसाळ्याचा पहीला पूर आला की आम्ही पोरं हातात लोखंडी सळई घेऊन खेकडे धरण्याच्या मोहिमेवर निघत होतो. लवणाच्या काठाकाठाने दरं असायचे. त्यात डोकावून पाहिले की लपलेले दिसायचे. आमची चाहूल लागताच बाहेरचे खेकडे पटकन दरात घुसत. आम्ही दराच्या वरच्या बाजूने सळई रोवायचो. मग त्यांना आत जाता येत नसल्याने, पकडणे सोपं व्हायचं. कधी लक्ष नसले की खेकडे नांगीच्या चिमटीत आमच्या हाताचे बोट पकडून चावा घेत. कधीकधी साप दिसला की घाबरून दूर पळून जात होतो. पकडलेले खेकडे घरी आणून आई मस्त रस्सेदार भाजी करुन द्यायची.

कधीकधी मी बरबडा गावाच्या नाल्यानं जायचो, तेव्हा दरात काळेभोर डोकडे लपलेले दिसायचे. याच नाल्याच्या देव-विहिर्‍याजवळ उंबराचे झाड होते. पिकलेल्या लालजर्द उंबरांना फोडून आत दडून बसलेल्या इवल्या इवल्या पाखरांना फुंकेने उडवून खाण्यात मोठी मजा वाटायची. हे फळ ओल्या अंजिरासारखे दिसत. त्यामुळे या दोघांची जातकुळी एकच असावी. उंबराच्या झाडाला कधी फूल धरल्याचं मी पाहिलं नाही. फुलाशिवाय फळधारणा होणे, हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल ! झाडाच्या सालीला अनकुचीदार दगडाने टोचले की चीक निघायचा. तो आम्ही जांघेच्या किंवा गळ्याच्या सुजेवर, गलगंडावर लावत होतो.

मी त्यादिवशी असाच रमत गमत जात होतो. सूर्याच्या कडक उन्हाने घाम येत होता. एखादी हलकीसी वार्‍याची झुळूक आली की मस्त थंडगार वाटत असे. झाडाच्या सावली सावलीने मी माझ्याच धुंदीत जात होतो. वाघाडी नदी ओलांडल्यानंतर निळोण्याची शीव लागली. माझं चौथीपर्यंतचे शिक्षण याच गावात झालं. यवतमाळला जातांना-येतांना याच रस्त्याची पायधूळ लागत होती. त्यामुळे या नदीच्या, गावाच्या, रस्त्याच्या बर्‍याच स्मृती खोलवर जुळल्या होत्या. भूतकाळातील आठवणीत कधी मी गढून गेलो, ते मला कळलेही नाही.

शाळेत असतांना बबन गुरुजी नागपंचमीच्या दिवशी नागाचे चित्र पाटीवर काढून आणायला सांगत.      सोबत दुध, लाह्या फुटाने व नारळ घेऊन येत होतो. गुरुजी फळ्यावर नागाचे चित्र काढत. त्याची पूजा करीत. नारळ फोडून मुलांना प्रसाद वाटत. लाह्या, फुटाने दुधात भिजवून बाहेर फेकत. त्यात निव्वळ दुधाची व लाह्या-फुटाण्याची नासाडी होत होती. निदान शाळेतल्या शिक्षकांनी तरी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून मुलांवर चुकीचे संस्कार टाकायला नको होते, असं मला समजायला लागल्यापासून प्रकर्षाने जाणवलं होतं.

गुरुजी आम्हाला वाघामाईच्या टेकडीवर डब्बा पार्टीसाठी घेऊन जात. त्यावेळेस आम्ही खूप हुरळून जात होतो. ही टेकडी शाळेपासून दूर होती. चालतांना आजूबाजूचे झाडं व शेतातील डोलणारे पीक पाहून आमचं मन मोहीत होऊन जात असे. टेकडीच्या पायथ्याशी शेंदूर लावलेला दगड होता. त्याची आख्यायीका लोक सांगत. पूर्वी या परिसरात घणदाट जंगल होतं. वर मोठमोठे घराएवढाले दगडं होते. त्याला कपारी होत्या. याच गुहेत वाघं राहत.

एक बाई रोज वाघाची पूजा करायला टेकडीवर जात होती. तेव्हा टेकडीवर चढणे-उतरण्यासाठी तिला खूप त्रास होत होता. म्हणून तिने वाघामायला विनंती केली,

‘तू पायथ्याशी राहायला ये.’

तेव्हा वाघामाय म्हणाली,

‘हो. मी खाली येते. पण मी येतांना मागे फिरून पाहू नको.’

ती बाई खाली उतरत असतांना वाघामाय तिच्या मागोमाग येऊ लागली. वाघामायच्या येण्यामुळे गडऽऽ गडऽऽ असा आवाज येऊ लागला. म्हणून तिने मागे फिरून पाहिले, अन् खाली कोसळून मेली. म्हणून तेव्हापासून वाघामाय खालीच आहे. तो दगड म्हणजे वाघामाय ! अशी ती कथा होती.

आम्ही एकमेकांचा आधार घेत, झाडांच्या फांद्या धरत, टोंगळ्यावर हात टॆकवत, हसत खेळत वर चढत गेलो. वर जाऊन भाकरी खाल्ल्या. वनभोजनात मस्त मजा आली. तेथील दगडावर चढून बसलो. पूर्वी वाघ ज्या कपारीत राहत, त्यात आम्ही डोकावून पाहत होतो. आम्ही भोवताल फिरुन खाली न्याहाळत होतो. यवतमाळला जाणारा रस्ता, निळोण्याची शाळा, वाघाडी नदी व आमच्या गावाचा  रस्ता दिसत होता.

आणखी गोष्ट आठवली. माझी चौथ्या वर्गाची परीक्षा तळेगावला झाली. ती बोर्डाची होती. आईने कथेतल्या भुकलाडू-तहानलाडू सारखे दोन दिवस पुरेल इतक्या गोड पापड्या, शंकरपाळे, अनारसे व करंज्या बनवून दिल्या. बाबाने काही मुलांसोबत बैलगाडीने पोहचवून दिले. मी चांगल्या मार्काने पास झालो. गुरुजी माझ्यावर खुश झाले. माझ्या घरचे सारेच आनंदीत झाले.

निळोणा गाव गेल्यावर गोधणी गावाच्या रस्त्याने निघालो. दोन शेताच्या धुर्‍याच्या मधोमध हा बैलगाडीचा रस्ता होता. हा नाल्यासारखाच खोल होता. पावसाळ्यात मस्त झुळझुळ पाणी वाहत राहायचं. मग पाणी उडवत जातांना मोठी मजा वाटत असे. थोडं दूर जात नाही तर एका ठिकाणी एकदम माझे पाय थबकले. मी त्यावेळी कसा घाबरलो, याची आठवण आल्याबरोबर हसू आलं. त्यावेळी मी व बाबा या रस्त्याने चाललो होतो. धुर्‍यावर हिरवेगार झाडे दाटीवाटीने उभे होते. पावसाळ्याचे दिवसं असल्याने वातावरणात ओलसरपणा आला होता. शेतातील ज्वारीचे हिरवेकंच धांडे पोटर्‍यावर आले होते. आम्ही दोघेही आपल्याच धुंदीत रपारप पाय टाकत जातांना बाबाला अचानक अगदी डोक्याच्या वर झाडाच्या फांदीला साप लटकलेला दिसला. बाबा तसाच ओरडला.

‘अरे, थांब रामराव…  फांदीवर साप आहे.’

मी वर पाहिले, तर एक लांबलचक साप झाडाच्या फांदीवर दिसला. त्या सापाला पाहून माझे शरीर क्षणभर थरारले. थोडावेळ निरखून पाहिल्यावर रस्त्याच्या कडेने आम्ही निघून गेलो. त्यानंतर गोधणीची शीव लागली. याच गावात मला विंचू चावल्याची गोष्ट आठवली.

माझा मोठेबाबा तेंदूच्या पानाचा ठेका घेत होता. ही पाने बिडी बांधण्यासाठी उपयोगात आणत. उन्हाळ्यात गावातील लोक पुडके बांधण्याचे काम करीत. शेतीचे कामे संपल्यावर खेड्यात दुसरे कामे राहत नसल्याने त्यांना हा रोजगार मिळायचा. हे काम पावसाचे पाणी पडेपर्यंत चालत होता. गावातल्या बाया झाकटीला उठून जंगलात-वावरात जात. दुपार होण्याच्या आधीच पानाचं भलंमोठं गठूडं डोक्यावर घेऊन येतांनाचं दृष्य जिकडे-तिकडे दिसायचं. मग घरातले सारेचजण पाने चवडण्याच्या कामाला भिडत. पळसाच्या बारीक वाकाने पुडे बांधत. शेतकरी या वाकाचे चर्‍हाट, दोरखंड बनवून शेतीच्या कामाला वापरीत. गायीढोरांची दावण याचीच करीत. बैलाने शेतातला माल खाऊ नये; म्हणून त्याच्या तोंडाला ज्या मुसक्या बांधत, त्या याच वाकाचे. पोळ्याला बैलाला सजवितांना कपाळावर ज्या मठाट्या बांधत, त्या सुध्दा याच वाकाचे.

पाने चवडतांना काही बुजरूक बाया, माणसं राजा-राणी, बहीण-भावाच्या रंजक कथा सांगत. कथा सांगून त्या बदल्यात काम करुन घेत, असा तो हिशोब असायचा. आम्ही सहसा मोठ्याआईच्या कथा ऐकायला जात होतो. माझी मोठी आई – गिरिजाबाई. तिच्या कथा सरस राहत. तिची एक कथा संपली की दुसरी ऐकावशी वाटे. जणू अरेबियन नाईट्सच्या कथा ! मी या कथांचा इतिहास वाचला; तेव्हा दंग झालो. इराणचा शहरयार राजा स्त्री जातीवर सूड उगविण्यासाठी रोज एका स्त्रीशी विवाह करून सकाळी तिला मारून टाकत असे. एकदा वजिराची मुलगी शाहराजाद हिची पाळी आली; तेव्हा ती राजाला चातुर्याने अशा कथा सांगत होती की दुसरी कथा ऐकण्यासाठी तिला जिवंत ठेवावे लागे.

तिच्या एका कथेची मला अजूनही आठवण आहे. ती म्हणजे चिलिया बाळाची ! ही कथा ऐकून आम्ही अक्षरशः रडत होतो. इतकी ती दु:खाने ओतप्रत भरलेली होती. एका बाईच्या दान-धर्माची ख्याती सर्वदूर पसरलेली असते. म्हणून देवाला तिची परीक्षा घ्यायची असते. देव तिच्या घरी पाच गोसाव्याच्या रुपात येतो. ती बाई दरवाज्यात आलेल्या गोसाव्यांना दान देण्यासाठी सुपात धान्य घेऊन येते. गोसावी तिला म्हणतात,

‘माते, आम्हाला खूप भूक लागली. आम्हाला चमचमीत जेवणाची इच्छा झाली. तेव्हा जेवणात मास खाऊ घाल.’ तिला गावात कुठेही मास मिळत नाही. ती निराश होते. पाहुण्यांना मास कसं खाऊ घालू, या विवंचनेत पडते.

तिला बाहेर खेळतांना तिचा चिलिया बाळ दिसते. तिच्या एकुलत्या-एक बाळाचं मास जेवू घालू की काय, असा अघोरी विचार तिच्या मनात येते. ती हृदयावर दगड ठेवून बाळाला हाक मारते. ज्याला तळहातावरील फोडाप्रमाणे वाढवीलं, त्यालाच मारायला उठल्यावर तिच्या जीवाला काय वाटलं असेल? पण तिचा नाईलाज झाला. तिच्या मनात उमटलेल्या भावना ती दाबून ठेवते.

बाळ घरात आल्यावर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधते. हातात धारदार मोठा सुरा घेऊन त्याचं गोजिरवाणं मुंडकं एका दणक्यात उडवते. मुंडकं परातीत झाकून ठेवते. त्याची आठवण राहावी म्हणून ! उरलेल्या नाजूक आणि कोमल अवयवाचे तुकडे करतांना तिचं मन हळवं होत जातं. मनात आतापर्यंत कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर येतो. तसं तिच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहायला लागतात. त्या आसवांच्या पाण्यात ती बाळाला शिजवते. शिजणार्‍या भांड्यातून बाळाचं रडणं ऐकू येतं. तेव्हा तिचं काळीज आणखीनच फाटते. स्वयंपाक झाल्यावर ताटं वाढते. गोसावी म्हणतात,

‘माते, तुझ्या बाळाला बोलव. त्याला घेऊन आम्ही जेवणार.’ माता काळजीत पडते. ती म्हणते,

‘तो जिवंत नाही. त्याचंच मास मी तुम्हाला खाऊ घालत आहे.’

‘तू, माता आहेस की वैरीण? तू आपल्या बाळाला मारून आम्हाला खाऊ घालतेस?’ असं म्हणून तिला दूषण देवून जेवायला नकार देतात.

‘तू, बाळाला बोलव, तेव्हाच आम्ही जेवू.’ असा ते हट्ट धरतात.

ती काकुळतीला येऊन परत परत विनंती करते. पण ते ऐकत नाहीत. शेवटी तिच्या तोंडून चिलिया बाळाचा उच्चार होतो आणि काय आश्चर्य ! आईचा आवाज ऐकून बाळ दुडूदुडू धावत येतो. त्याला जिवंत पाहून तिला खूप आनंद होतो. अशी ती गोष्ट ! विशेष सांगायचं म्हणजे – बाळाला हाक मारतांना, त्याला कापताना, शिजवताना मोठीआई अधूनमधून विशिष्ट लयीत गाणं म्हणायची. त्यामुळे आमच्या हृदयात दाटून यायचं आणि नकळत डोळ्यातून आसवं टपकायला लागत. तिची कथा संपली की कधी आमच्या चेहर्‍यावर क्षणभर आश्चर्य आणि समाधान फुलत असे, तर कधी दु:खात डुबून जात होतो. तिची सांगण्याची कसब खरंच वाखाणण्याजोगी होती. कधी चटकदार, चित्तवेधक, विनोदी, तर कधी कारुण्यांनी भरलेली असायची.

संध्याकाळी लांडग्याच्या वावरात सारेजण पुडके घेऊन येत. या जागेला बाड म्हणत. तेथे प्रत्येकांचे पुडके मोठेबाबा मोजून घ्यायचा. वहीवर लिहून घेण्याचे काम मलाच करावे लागे. कारण नाही त्याला किंवा त्याचा मुलगा गुलाब, ह्याला लिहीता-वाचता येत होतं. शनिवारपर्यंतच्या पुडक्यांचा हिशोब करुन चुकारा द्यायचा. एकतर मालक नाहीतर त्यांचा चक्कर पैसे घेऊन यायचा. गावोगावी जाऊन देखरेख करणार्‍या नोकराला चक्कर म्हणत.

पुड्याचा ठेका यवतमाळचा चंदुशेठ किंवा नथवाणी किंवा डायाभाई यापैकी कोणीतरी धनदांडगा मारवाडी घ्यायचा. हा मालक जीप घेऊन गावात आला की आम्ही मुले जीपच्या मागेमागे मातीची धूळ नाका-डोळ्यात घेत पळत होतो. तो येतांना आम्हा मुलांना पेपरमिंटच्या गोळ्या वाटायचा; तेव्हा तो आम्हाला खूप दयाळू वाटायचा. जमा झालेले पुडके उन्हाने वाळवून ढिग रचून ठेवत होतो. शेवटी हंगाम संपल्यावर किंवा पुडके जास्त जमा झाल्यावर बारदान्यात भरुन मालकाच्या गोदामावर पोहचवून देत होतो. या कामाच्या बदल्यात मोठ्याबाबाला कमिशन मिळायचं. मोठेबाबा हेच काम दुसर्‍याही गावात करीत होता. त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी घरीच राहत होतो. मग तो मलाच घेऊन जात होता.

एकदा भरदुपारी मी मोठेबाबासोबत गोधणीला गेलो होतो. तेथे त्याने बाड घेतला होता. तहानेने माझे तोंड सुकून आले होते. भुकेने कासावीस झालो होतो. मोठेबाबाला सांगितल्यावर तो मला कोलाम पोडातल्या एका घरी घेऊन गेला. त्या घरात एक कोलाम बाई पुडे बांधीत होती.

‘माह्या पोराले भाकर-चटणी देवं बाई… चालून चालून दमला बिच्चारा… कडाडून भूक लागली त्याला.’ मोठेबाबा तिला म्हणाला.

तिने घरातून अर्धी ज्वारीची भाकर व मिरची, मिठ व कांदा आणून दुरूनच माझ्या हातावर टाकली. मी भकाभका खाल्ल्यावर पोटाची आग थोडीफार विझली. तिला पाणी मागितल्यावर बाहेरच्या कुडाजवळचा जर्मनचा गिलास आणायला सांगितला. तो खास आमच्यासारख्या अस्पृष्य लोकांसाठी ठेवला होता. तो मी आणल्यावर तिने घरातून आणलेलं पाणी दुरुनच ओतलं. मी पाणी मुकाट्याने गटागटा पिलो. तिची राहणीमान गचाळल्या-गबाळल्या सारखी होती. तरीही ती कां बाट करत होती? ते कळत नव्हतं. जातीभेदाचे असे विषारी फळे अगदी लहानपणापासून मी चाखत होतो.

मग आम्ही पुडक्याच्या बाडात गेलो. तेथील काम पाहून दणाणून गेलो. पण कामाला घाबरायचं नसतं. हे मी अनुभवाने शिकलो होतो. थोडं थोडं जरी उरक केला तर कधीतरी संपून जातं, हे मला माहित होतं. मग आम्ही पुडके फेरण्याचे काम सुरु केले. हे काम फार सांभाळून करावे लागत असे. कारण अवकाळी पाऊस येऊन गेला की पुड्याच्या खाली विंचू राहत. थोडं जरी लक्ष नसलं की कधी डंख मारेल याचा नेम नसायचा. तरीही एका विंचवाने डाव साधलाच ! माझ्या पायाला डंख मारुन कुठे गायब झाला, कळलंच नाही. विंचू चावल्याबरोबर सारे देव आठवायला लागले. मरणाची आग होत होती. पाय दगडासारखा जड झाला होता. पायाला मुंग्या आल्यासारखे वाटत होते. वेदनेची कळ मेंदूपर्यंत गेली होती. मी ठणाण… रडायला लागलो. तिव्र वेदनेने तळमळत होतो.

मोठ्याबाबाने एका कोलामाला बोलाविले. तो कांदा आणि पाणी घेऊन आला. त्याने सगळा कांदा खायला दिला. तोंडाने मंत्रासारखे पुटपुट करुन माझ्या पायावर हात फिरवून गिलासात फूंक मारत होता. नंतर पाणी पिण्यास दिले. तरीही त्याच्या मंत्रा-तंत्राने विष उतरल्याचं जाणवलं नाही. मी संध्याकाळी तसाच लंगडत लंगडत गावाला आलो. रात्रभर भयानक त्रास झाला. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ठणक होती. त्यांनतर हळूहळू वेदना कमी होत गेल्या. विंचवाचं विष चोविस-तीस तासापर्यंत राहतं, असं म्हणतात. त्यावेळी पहिल्यांदाच मी हा जीवघेणा वेदना अनुभवत होतो. दुसर्‍या दिवशी हळूहळू तिसर्‍या प्रहारापर्यंत बरे वाटायला लागले.

एकदा यवतमाळला जवाहरलाल नेहरू आले होते. त्यांची सभा नॉर्मल स्कूलच्या मैदानावर भरली होती. त्यावेळी शामरावदादा मला घेऊन आला होता. खूप गर्दी होती. त्यागर्दीत मुंगीच्या पावलाने सरकत सरकत दादाने मला स्टेजजवळ नेले होते. तरीही दिसत नव्हते. म्हणून मला उचलून खांद्यावर घेतले. मग माझं डोकं दादाच्या डोक्यापेक्षा उंच झालं, तेव्हा कुठे दिसले. पुढील जीवनात मी जी काही उंची गाठू शकेन, त्याला दादाच्या खांद्याचा आधार निश्चितच असेल, हे त्यावेळी कदाचित मला कळलं नसेल !

मी अशाच आठवणीच्या धुंदीत असतांना उमरसरा कधी आलं, ते कळलंच नाही. गावात आलो. अंगण कसं गोठानासारखं खराब झालं होतं. झोपडीच्या दरवाज्याचं कुलूप करदोड्याला बांधलेल्या किल्लीने काढून आत शिरलो. घरात नजर फिरविली. घर रखरख झालेलं दिसत होतं. भिंतीचे पोपडे निघाले होते. शाळेत असतांना याच झोपडीत मी व जनाबाई राहत होतो. तेव्हा बाई हे घर सारवून चकचक ठेवत होती. अंगणात रोज सडा टाकत होती. त्यामुळे अंगण कसं साफसूफ राहत होतं.

चालून चालून मी पार थकून गेलो होतो. जमिनीवर पोतं टाकून शिणलेल्या अंगाला व मरगळलेल्या मनाला झोकून दिलं. घटकाभर आराम केला. पोटात भूक पेटली होती. एका मातीच्या गाडग्यात काळेभोर उडीद दिसले. बाई कुणाच्या वावरात शेंगा तोडायला जायची; तेव्हा वाटणीत शेंगा मिळत. तेच गाडग्यात भरून ठेवायची. चूल पेटवून जर्मनच्या गंजात मुठभर उडीद शिजवले. एखाद्यावेळी बाई नसली की मी उडीद नाहीतर तुरीच्या घुगर्‍या तेल, मीठ, तिखट टाकून शिजवत होतो. त्यानेच माझी भूक भागवीत होतो. याहीवेळेस तसेच करून पोटाची आग विझवली.

मग मी सोपानदादाच्या घरी रेशनकार्ड घेण्यासाठी जाणार, तेव्हा खिशात हात घातला. दादाने दिलेली वीस रुपयाची नोट खिशात दिसली नाही. मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यापुढे अंधारीच आली. दिवसाढवळ्या काळोख पसरल्यासारखं वाटलं. तो काळोख झरझर माझ्या मनात शिरला. मी अस्वस्थ झालो. डोळ्यातून घळघळ पाणी वाहायला लागलं. पुन:पुन्हा खिसा चाचपडून पाहत होतो. कुठे पडली कूणास माहीत? क्षणभर डोक्याला हात लावून बसलो. वीस रुपये म्हणजे परिस्थितीच्या मानाने त्याची किंमत फार मोठी होती. अंगातलं सारं अवसान गळून गेलं. माझे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. माझी स्थिती नदीतल्या पुराच्या भोवर्‍यात सापडल्यासारखी झाली. दादाला काय सांगणार या विवंचनेत सापडलो होतो. मी पुन्हा पाय तुडवत विमनस्क अवस्थेत चौधर्‍याला परत गेलो. दादाला पैसे हरविल्याबद्दल मोठ्या हिंमतीने सांगितले.

‘दादा, तू दिलेले पैसे माझ्या खिशातून कुठेतरी पडले. त्यामुळे रेशन आणता आले नाही.’ असं चाचरत चाचरत बोलतांना खालचा ओठ दाताखाली दाबत, त्याच्या प्रत्युत्तराची वाट पाहत थांबलो. मला वाटले, दादा माझ्यावर भयानक रागावेल. पण झालं उलटंच ! त्याने मला धीर देत म्हटले,

‘असू दे…! हरविले तर हरविले…! काही वाईट वाटून घेऊ नको.’ दादा मोठ्या मनाचा ! त्याने मला दडपणातून बाहेर काढले. मग मला गहिवरुन आल्याशिवाय राहविलं नाही.

 

 

 

 


कथा एकविसावी – शेती परत केली

 

माझ्या आईला एकच भाऊ व एकच बहीण… दोघेही गावातच… तसे म्हटले तर गावगाड्यात विविध नाती एकमेकांत गुंफल्या जाऊन मोठा गोतावळा निर्माण होतो. दूरच्या ठिकाणचे नातेवाईक एकमेकांच्या आधाराने गावात येऊन राहतात. हीच परिस्थिती आमच्याही गावात होती.

माझ्या आईचे नातेवाईक म्हणजे भाऊ… दमडू, त्याच्या पहिल्या बायकोचा भाऊ… उध्दव, धर्मा, सुरेभान, सुखदेव व नामदेव, आईची बहीण… धुरपताबाई, तिचे जावई… विठोबा आणि फकीरा, मावसभाऊ… रामदास, त्याचा भाऊ… सुरेभान व एकनाथ, त्याचे जावई… नामदेव, त्याचे भाऊ… सुखदेव व महादेव. बाबाचे नातेवाईक म्हणजे मोठा भाऊ… पांडू, मामेबहीण… झिबलाबाई, तिचा जावई… जनार्दन व मोहना, दोन भाऊ… डोमा व गोविंदा, मोठीआई गिरजाबाईचा भाऊ… विठ्ठल, लहान भाऊ… तुळशिदास, कोणत्यातरी नात्यातील मावशी… सखू, तिचे मुले… भिका व तुकाराम. मामा… शिवा, त्याचा भाऊ… शंकर, लक्ष्मण, चिरकुटा. असा कितीतरी गोतावळा गावात वसला होता. एवढं मात्र खरं, की एका पिढीतलं सख्ख नातं नंतरच्या पिढीत मात्र दूरचं बनत जातं.

माझ्या मोठ्याआईचं घर शेवटी होतं. तिच्याकडे गायी-म्हशीचं दुधदूभतं होतं. म्हैस जनली की तिच्या दुधाचं चिक आटऊन, त्यात गुळ टाकून खायला देत होती. ती बाजाराच्या दिवशी लोणी विकायला न्यायाची तेव्हा आईसोबत मीपण जात होतो.

दमडूमामाचं घर आमच्या घराजवळ होतं. मामाचं आडनाव ‘पाटील’. मी कोणत्यातरी पुस्तकात वाचलं की ज्याने गाव वसवले, त्याच्याकडे त्या गावाचं पाटीलपद जातं. त्यामुळे मामाने ‘चौधरा’ गाव वसवले होते की काय, म्हणून त्याला पाटील म्हणत ! मामा उंचपुरा. धडधाकड व मोठ्या चेहर्‍याचा. त्याचं कपाळ पण मोठं. धोतर नेसायचा. अंगात पूर्ण बाह्याचं कुडतं अन् आतमध्ये बांडी.. बांडीत चिलिमीचं सामान… डोक्याला शेलाचा पटका…

मामासारखे तुच्छतादर्शक नावे इतरही काही लोकांचे होते. महारा-मांगानी असेच नावे ठेवली पाहिजेत, असा धर्मव्यवस्थेचा दंडक होता, म्हणे ! आमच्या पिढीत मात्र हिंदू देव-देवतांची नावे आलीत. नावातील हे परिवर्तन कदाचित बदलत्या वातावरणामुळे झाले असावे.

तसेच कुणाचं सरळ नाव घेतच नसत. दमडूला दमड्या, कोंडूला कोंड्या, शामरावला शाम्या, रामरावला राम्या अस्सं… कुणाच्या व्यंगावर किंवा खिजवण्यासाठी वेगळंच काहीतरी नावे ठेवीत. जसे चंदूला एक डोळा नव्हता म्हणून भोकन्या, तुळशीदास गोरा, म्हणून गांजर्‍या, बन्सीला लांडग्या, हरसिंगला हुंडरा, भदुला दातर्‍या… नावाच्या बाबतीत अशा गमतीजमती दिसून येत.

माझा मामा तसा शांत व अबोल स्वभावाचा. तो कुणाच्या अध्यामध्यात पडत नव्हता. आपण बरं नं आपलं घर बरं, असा स्वभाव ! तो कुणाशी भांडल्याचं मी कधीच पाहिलं नाही. तो निर्व्यसनी. कधी दारुला हात लावला नाही की जुव्यात बसला नाही. तो चिलीम मात्र ओढायचा. चिलीम ओढणे, बिडी पिणे, तंबाखू-विड्याचं पान खाणे ह्या सवयी नसणारा व्यक्ती खेड्यात बियाला मिळत नव्हता. त्यामुळे या व्यसनाचं कुणाला काही सोयरसुतक वाटत नव्हतं.

मामा तसा गावातला श्रीमंत आसामी म्हणून गणल्या जात होता. गावातले लोक त्याला ‘सावकार’ म्हणत. त्याचा व्यवसाय म्हणजे सालईच्या झाडाचा तबला, चाटी, ढोलक, डग्गा, मृदंगाच्या पायल्या व आलीच्या झाडाचा चाटू किंवा पळी बनवून शहरात विकणे, हा होता. खेड्यात त्यावेळी लाकडाच्या चाटूचा उपयोग स्वयंपाकासाठी करीत.

गावकरू त्याला मानसन्मान देत. तो अक्षरओळखी पलीकडे शिकला नव्हता. तरीही वाचनाच्या छंदामुळे चांगलं वाचता येत होतं. डॉ. आंबेडकर व भगवान बुध्दाच्या पुस्तकांचा वाचन करायचा. त्यामुळे त्याला धम्माचं ज्ञान अवगत होतं. ज्ञानाच्या गोष्टी सांगायचा. पोर्णिमेला उपवास धरायचा. समाजाच्या पंचायतीत न्याय-निवाडा करायचा. मामाची पहिली बायको सखु, मरण पावली होती. जनाबाई मामाची दुसरी बायको. चित्राबाई व पंचफुलाबाई ह्या मामीच्या सावत्र मुली. दुसर्‍या मामीला सुदमताबाई, हिरा व मनोशोधन असे तीन मुलं…

गावात दर बुधवारी व पोर्णिमेला पंचशील झेंड्याजवळ संध्याकाळी प्रार्थना व्हायची. हा झेंडा सुखदेवकाकाच्या घरासमोरच्या जागेत रोवला होता. गावातील बौध्दपुर्‍यातील सारेजण न चुकता प्रार्थनेला येत. शामरावदादा त्रिशरण-पंचशील म्हणायचा. त्याच्या पाठोपाठ लोक म्हणत. साखरेची शिरणी वाटत. आंबेडकर जयंतीला गावात मिरवणूक काढीत व रात्रीला गावजेवण ठेवत.

बाबा मामाचं चौदा-पंधरा एकराचं शेत मक्त्या-बटईने वाहत होता. हे शेत गावाला लागून होतं. लवणाच्या अलीकडील शेताला वाडी म्हणत. त्यात आंब्याचे दोन झाडं होते. पलिकडच्या वावरात घोटी व आंबीन असे दोन आंब्याचे झाडं होते. आंबीनचं वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा कच्च्यापणी खूप आंबट तर पिकल्यावर इतका गोड लागायचा की रसात साखर टाकायची गरज पडत नसे. रस पण घट्ट असायचा. मामाची दुसरी शेती वाघाडी नदीजवळ होती. तिला ‘बाभळीचं वावर’ म्हणत. ती शेती सुरुवातीला बाबा वाहत होता. नंतर निळोण्याचा कोलाम वाहायचा.

त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती चांगली होती. बाबा फार कष्टिक आणि हरहुन्नरी होता. देवदासदादा, शामरावदादा व बाबा या तिघांच्या जोडीने शेतातून सोन्यासारखे पीक काढत. त्यांच्यासोबतच आई व वहिनी पण खूप काम करीत. बाबा निरनिराळे प्रयोग करून आधुनिक पध्दतीने शेती करायचा.

मला वावरात-वाडीत खूप करमायचं. आईच्या मागेमागे जात होतो – जसे गाईच्या मागे वासरु जाते, तसं ! कोणी सोबत नसलं तरीही मी एकटाच खेळत बसायचो. शेतात भरपूर टमाटे पीकवीत. आम्ही ‘भेदरं’ म्हणत होतो. झाडाचे पीकलेले, लाललाल भेदरं मी हिरोती-मिरची पावडर आणि मिठासोबत मटकावत खात होतो.

      बाबा टमाटे यवतमाळच्या बाजारात घेऊन जायचा. त्याशिवाय अमरावतीला एस.टी.बसने दलालाकडे पाठवायचा. इतक्या मोठ्या प्रमाणात बाबा टमाटे पीकवीत होता. भाजी मंडईतील व्यापारी गंमतीने ‘चौधरं पीकलं रे…’ असे म्हणत.

पावसाळ्यात लेंडीने वाहत येणारे गोदरीतलं पहिलं पाणी अडवून वाडीत वळवत होता. या पाण्यात पांदणीतलं ढोरांच शेणमूत, मानवाची विष्टा असं पोषक खत असायचं. त्यामुळे पिकाच्या जोमदार वाढीला खूप मदत व्हायची. बाबा वाडीला बोरी-निवडुंगाच्या झाडाचं काटेरी कुंपण घालायचा.

झाडीपट्ट्यात जसे भाताची रोवणी करीत. तशीच रोवणी करून भरपूर पीक घेत होता. कधी साध्या धानाशिवाय वासाचे व काळ्या रंगाच्या तांदळाचे पीक पण काढत होता. एकदा बाबाने आम्हा सर्वांना धानाची रोवणी करण्यासाठी हाकलत नेले होते. पावसाच्या भुरभूरणार्‍या पाण्यात व जमिनीतल्या चिखलात पाय तुडवत रोवणी करतांना सारं अंग शिणून गेलं होतं. म्हणून ही आठवण मी विसरलो नाही. याच गाडणात मातीखाया साप दिसला. त्याला दोन्ही बाजूला तोंड असल्याने दुतोंड्या साप म्हणत. दोन्ही बाजूने बोलणार्‍या माणसाला याच दुतोंड्या सापाची उपमा देत.

एकदा शेतात टरबुजं, आलू, लसून असेही पिक घेतले होते. त्याशिवाय कांदे, वांगे, मिरच्या, भेंडी, मका, गहू, वटाणे, हरभरा असे पिक नेहमीच घेत. गव्हाच्या ओंब्या, वटाणे व हरभरा भाजून त्याचा हूळा खायला मस्त मजा यायची. तोंडी लावायला हिरव्या मिरच्या व टमाट्याची चटणी असली की त्याचा स्वाद विचारुच नका ! कुपाजवळ मांडव टाकून वाल लावला होता. दोन-तीन पोते वालाच्या शेंगा दर हप्त्याकाठी निघत. कधीकधी मधाचे मोहळ दिसत. आई गड्याकडून झाडून घेत होती. मग मध खाण्याची आमची मजाच मजा व्हायची.

मेथी, पालक, आंबटचुका, चंदनबटवा, सांबार, वांगे, भेंडी, वालाच्या शेंगा, हिरव्या मिरच्या असा भाजीपाला बैलगाडीने विकायला नेत. मीपण जात होतो. बाजारातल्या लाईनमध्ये पोते हातरुन विकायला ठेवत. दिवसभर माल खपविण्याची लगबग सुरु राहायची. गिर्‍हाइकाला दांडीपारड्याने मोजून देणे व त्याप्रमाणे पैसे घेऊन गल्ल्यात टाकणे या कामाचा मोठा हुरूप यायचा.

बाबा बाजारातून बकर्‍याचं मटण किंवा बाममासोळी आणायचा. घरी पोहचल्यावर मस्त जेवणाचा बेत असायचा. बाबाला केणं-वधडी आवडायची. हे बकर्‍याच्या आतड्याचं टाकावू मटण असल्याने स्वस्त राहत. आईला रक्ती आवडायची. ती तव्यावर सातरुन चटणी बनवायची. दादा खुर-मुंडी तुराट्या-सणकाड्याच्या जाळावर भाजून घ्यायचा. मग त्या मटणाची चव विचारूच नका ! सकाळी उरलेल्या मटणाचा व भाताचा दादा चाकण बनवायचा. असं ते चविष्ट पदार्थ खाण्यात मजा यायची. रात्रीला एखाद्यावेळेस झोपेमुळे जेवलो नसेल, तर त्याची कसर सकाळी भरून काढत होतो.

घरी परत जातांना रात्र व्हायची. मी आईच्या मांडीवर झोपून जायचा. शहरातून जातांना मी दिव्यांचा झगमगाट पाहत राहायचा. हरनामसिंगच्या कोठ्यापर्यंत हा उजेड असायचा. मग पुढे आमच्या सोबतीला अंधार राहायचा. हरनामसिंगच्या कोठ्यावर विहीर होती. तेथे गाडी सोडून गडी बैलांना पाणी पाजायचा. मग आमची गाडी अंधारातच दगडं ठेचाळत गावाकडे निघायची. बैलांना अंधारात बरोबर वाट दिसत होती. गडी बैल हाकतांना राहून राहून ‘धिये, धिये, हां, हो…’ असा आवाज द्यायचा. ही बैलांसोबत संवाद साधण्याची भाषा होती. त्यामुळे बाकीचे जरी झोपले, तरी आपला धुरकरी मात्र जागा आहे असे बैलांना संकेत पोहचत असावे. त्या निरव वातावरणात धुरकर्‍याचा हुंकार, बैलाचा फसफसणारा दम, गाडीचा कचकच, बैलाच्या खुरांनी उडणार्‍या गोट्यांचा, गाडीच्या येटाने ठेचाळलेल्या दगडांचा, रातकिड्यांचा किर्र, फडफडणार्‍या पाखरांचा, सळसळणार्‍या फांद्या-पानांचा, झुळझूळणार्‍या वार्‍याचा, खळखळणार्‍या पाण्याचा नाद सोबतीला असायचा.

वाघाडी नदी आल्यावर गडी टोंगळभर पाण्यात गाडी घेऊन जायचा. तेथे मानेवर जू असतांना निस्तब्ध शांततेत बैलाना पाणी पिऊ द्यायचा. बैलं पाणी प्यायल्या लागले की गडी हळूवार शिट्टी वाजवून, होऽ होऽऽ म्हणत धीर द्यायचा; नाहीतर थोडा जरी आवाज आला की बैलं कावरेबावरे होत.

शेंबडीच्या वावरात भुईमूंगाची राखण करण्यासाठी आई-बाबा जागलीला जात. मीपण त्यांच्या मागे लागत होतो. त्यादिवशी लवण ओलांडताना पाण्यात साप दिसला. बाबाजवळ कंदील होता. तो पुढे गेला, आई मागे राहिली. ‘आई, साप.’ असं मी ओरडताच ती थबकली. बाबाने हुसकावल्यावर तो हटला. विहिरीजवळच्या मळ्यावर आम्ही झोपत होतो. आई-बाबा झाकटीलाच उठून गोष्टी सांगण्यात रमून जात. मी झोपेतच त्यांच्या गोष्टी ऎकत राहत होतो.

एकदा बाबा आले नव्हते. मी व सुदमताबाई आईसोबत जागलीला आलो. आमची सकाळची शाळा होती. आंघोळ करतांना आई विहिरीचं पाणी बालटीने काढून आमच्या अंगावर टाकत होती. मला खूप मजा वाटत होती. म्हणून मी आईला आणखी आणखी पाणी टाकायला सांगत होतो.

‘आता होते. रे…!’ अशी आई म्हणत होती, मी तिचं ऎकत नव्हतो. शेवटी तिने रागातच बालटी माझ्या डोक्यावर आपटली. मग डोक्याला लागले की काय, म्हणून माझं डोकं खूप वेळपर्यंत चोळत बसली. आईच्या रागापाठोपाठ वात्सल्याची पण फवारणी होत होती.

वाडीमध्ये विहीर होती. ती दगडाने बांधली होती. तिला भरपूर पाणी राहायचं. पावसाळ्यात तिचे पाणी हातपुरतेच असायचे. पलीकडल्या वावरात दुसरी विहीर खोदली. एका ठिकाणी वासनचा वेल पसरला होता. हा वेल जेथे जास्त असेल, तेथे भरपूर पाणी लागते, असा बाबांनी शोध लावला होता. कारण त्याची मुळे जमिनीतल्या पाण्यापर्यंत खोल जात असल्याने, हा वेल ऊन्हाळ्यात सुध्दा हिरवेगार राहत. या विहिरीला खरोखरच भरपूर पाणी लागले होते.

दोन्ही वावराच्या मधात नाला होता. त्याला ‘लवण’ म्हणत. या लवणासोबत एक आठवण जूळली होती. आमच्याकडे गाईढोरं, बकर्‍या होते, त्यावेळेसची ही गोष्ट आहे. एका बकरीला लहानसं पिल्लू होतं. बकरीच्या पायाला मार लागल्याने, ती लंगडत होती. ती जास्त दिवस जगणार नाही, म्हणून दादाने विकायचा विचार केला. एकेदिवशी गावातील लोकांना मटणासाठी बकरी पाहिजे होती. त्यावेळी सणासुदिला किंवा बाजाराच्या दिवशी लोक पैसे जमा करुन बकरी-बकरा विकत घेत. त्याला कापून मटणाचे हिस्से पाडत. अशाप्रकारे गावातच मटण उपलब्ध करुन खाण्याची ती प्रथा होती.

बकरीचा सौदा झाला. सकाळी भग्या कोतवाल व मोठेबाबा आले. दोघेही खाटकासारखं काम करीत. त्यांनी आल्या-आल्या बकरीच्या थानाला झोंबणार्‍या पिल्लाला दूर करून खुंट्याला बांधलं. मग बकरीच्या मानेचं दावं सोडलं. त्यावेळी तिची स्निग्ध प्रेमळ नजर पिल्लाकडे निरखून पहात होती. भग्या तिचा कान धरून ओढू लागला. मोठेबाबा तिच्या पाठीवर चापटा मारून हाकलत होता. तरीही झटका देऊन पिलाजवळ गेली आणि पिल्लाच्या डोक्याला जिभेने चाटलं. पुन्हा एकदा पिल्ल्याकडे वात्सल्याने पाहून घेतलं. तिला घेऊन जातांना, ती मोठ्या करूण आवाजात बेंबटत होती. पिल्लू म्याऽ म्याऽऽ करत ओरडत होतं. त्या दृष्यानं माझं मन गहिवरुन आलं होतं. तिच्या मानेचं दावं सुटलं, पण मानेवर सुरी चालणार, हे तिला कुठे माहित होतं?

मी पिल्लाला घेऊन वाडीत गेलो. लवणाच्या काठावरच्या पिवर वेलाचा चारा तिला खाऊ घालत होतो. हा पाला बकर्‍यांचं आवडतं खाद्य ! ती खाता खाता माझ्याकडे पाहून हळूच ओरडायची. तिच्या आईला कापणार असे चिन्ह तिला दिसत होते की, काय माहित? मी मनातल्या मनात कल्पना करत होतो की आता तिचे चारही पाय धरुन खाली पाडले असेल. तिच्या मानेवर धारदार सुरा फिरत असेल. तेव्हा ती जिवाच्या आकांताने ओरडत असेल. तडफडत असेल. आपल्या चिटुकल्या कोकराच्या आठवणीने कासावीस झाली असेल. माझ्या पिल्लाला कोण दुध पाजील? असे विचार तिच्या उरात दाटून येत असेल. अशा कल्पनेने माझं काळीज तुटत चाललं होतं. आमच्या घरी हिस्सा घेतला होता. आम्ही जेवायला बसलो, aअन् बकरीची एकदम आठवण झाली. तेव्हा हळहळून गेलो. मग आम्ही मटण खाल्लेच नाही. त्या प्रसंगाची आठवण झाली की आताही माझं अंत:करण हेलावून जाते.

पावसाळ्यात लवणाला खूप पाणी असायचं. धो धो पाऊस आला की पूर यायचा. पुराचं पाणी वाडीत घुसत असे. बाबा या काठावरुन दुसर्‍या काठावर जाण्यासाठी लाकडाच्या मयाली टाकून पूल तयार करायचा. बांध टाकून पाणी अडवायचा. त्या पाण्यात तागाच्या सणकाड्या टाकून फिलवत. त्याचे दोरखंड बनवीत. आई खळ्यावर पडलेल्या ज्वारी-तुरीचा मातेरा येथेच धुवून घेत होती. बाबा विहिरीवर व लवणाच्या काठावर भुडकं बांधायचा. दोन डेळीच्या आधाराने लांब फाट्याला नट, बोल्टने कसून तराफा तयार करायचा. त्याला एका बाजूला पिपा व दुसर्‍या टोकाला जड दगड बांधलेला असायचा. यालाच ’भुडकं’ म्हणत. त्याने पाणी काढून दांडाने पिकाला देत.

मी कागदाचा जहाज बनवून दांडाच्या वाहत्या पाण्यात सोडत होतो. जहाज कसं डोलत डोलत वाहत जाते, ते पाहत त्याच्या मागेमागे फिरत होतो. एखाद्यावेळी मधातच दांड फुटला की,

‘अरे बाबू, दांड फुटला का रे?’ असा आवाज आला की मी त्याचा शोध घेऊन मातीने बुजवीत होतो. मग तो दिवस कसा गेला, ते कळत नव्हते.

बाबाला पैशाची चणचण पडायची, तेव्हा तो इतर शेतकर्‍यांप्रमाणे सावकाराचे कर्ज काढीत होता. तसं शेतकर्‍याला नेहमीच कर्जाची गरज भासत होती. कारण त्यांच्या जवळ पैसा असा संगळून राहत नसे. पीक हातात आलं की कर्जाची परतफेड करण्यासाठीच सारे पैसे संपून जात. मग लागवडीला हातात पैसा राहत नसे. नापिकी, लग्नकार्य, सण-उत्सव, मरणा-धरणाचा प्रसंग, रोगराई-बिमारी, मुलांचे शिक्षण, देव-धर्म, यात्रा अशा अनेक कारणासाठी सतत कर्ज घ्यावे लागत होते. कर्ज थकले की पुन्हा मिळत नसे. बॅंका तर कर्जाचा पुरवठा कधीच करीत नसत. त्यामुळे सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. सावकार अव्वाच्या सव्वा व्याज आकारीत. त्यांची व्याजाची पध्दत सवाईची-दिडीची राहत होती. सावकार शेती गहाण करुन घेत. कर्ज थकले की सातबार्‍याच्या उतार्‍यावर आपल्या नावाची नोंद करुन शेत ताब्यात घेत.

काही दलाल, अडते व्यापारी सुध्दा कर्ज देत. शेतातला माल विकल्यावर कर्ज व व्याजाची रक्कम कापून उरलेले पैसे देत. काहीजण हप्‍त्याच्या कालावधीसाठी कर्ज देत. त्यांना वार म्हणत. बाबाला आकस्मीकरित्या पैसे पाहिजे असले की तो यवतमाळच्या शाहू किंवा त्याच्या बाबाकडून वाराने कर्ज घ्यायचा. त्यांचा व्याजाचा दर जास्त राहत होता. एखाद्याने कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली, तर पठाणी पध्दतीने वसूली करीत.

त्यावेळी ‘कसेल त्याची जमीन’ असा कुळकायदा निघाला होता. जे शेती कुळाने कसत, त्यांच्या नावाने शेती होऊ लागली होती. त्यामुळे मामा घाबरला होता. त्याला वाटले कायद्यानुसार शेती बाबाच्या नावाने होईल. म्हणून तो शेती परत मागत होता. परंतु बाबा द्यायला तयार नव्हता.

‘मी माझ्या नावाने शेती करुन घेणार नाही. शेत तुमचंच राहील. पण मला वाहू द्या. त्याच्या भरोशावर मी बायको-पोरं पोसत आहे.’ असे बाबा कळकळीने म्हणायचा. आईला या वादात काही बोलता येत नव्हतं. कारण इकडे घरचा माणूस व तिकडे भाऊ ! म्हणजे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी तिची बिकट परिस्थिती झाली होती. तरीही मामी पुढेपुढे होऊन माझ्या आईशी भांडत राहायची. जिभेला हाड नसल्यासारखे घालूनपाडून बोलायची. मग दोघ्या नंदा-भावजयीचं कडाक्याचं भांडण व्हायचं. एकमेकीला घाणेरड्या शब्दात शिव्याशाप द्यायच्या. ‘तुवं असं होईल, तुवं तसं होईल.’ या पध्दतीने…! खेड्यातील शिव्या अशाच घाणेड्या. बायाच्या तोंडात पालथी पड, आडवी पड, हेकड्या तोंडाची, कुत्रीन, डुकरीन, तुया तोंडात अळ्या पडतील, पटापट मरशील अशा लाखोली वाहायच्या. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ म्हणून बरे ! नाहीतर बायांच्या शापाने जर तसे घडलं असते; तर जगात हाहाकार माजला असता !

माणसाच्या शिव्या सांगूच नका ! शिव्या देतांना कधी त्यांना लाज-शरम वाटत नसे. फारच घाणेरड्या…! अश्लील…! आई-बहिणीच्या उद्धार करणार्‍या ! स्त्री-पुरुषाच्या नाजुक अवयवांचा मनसोक्त वापर ! लेकाचा, साला, अबे-काबे, भोसडीचा, तुह्या मायलाऽऽ तुह्या बहीणीलाऽऽ, अशा प्रकारच्या शिव्या… ह्या शिव्या सारेचजण दैनंदिन जीवनात भावनेच्या अभिव्यक्तीसाठी नि:संकोचपणे वापरत. ह्या शिव्या खेडूत भाषेत एकजीव झाल्या होत्या, जसं पाण्यात मीठ एकजीव होते तसं ! या भाषेचं कुणाला काही वाईट वाटत नव्हतं. इतकंच नव्हे तर त्या उच्चारतांना कधी लाज-शरम वाटत नव्हती.

दोघ्या नंदा-भावजयाचं भांडण मामा मुकाट्याने पाहत राहायचा. त्याला बहीण-भाच्यांबद्दल माया, कळवळा नसेल असे कसं म्हणता येईल? पण त्याचं मामीसमोर काही चालत नव्हतं.

बाबाचं एक वाक्य मला नेहमी आठवते. तो म्हणायचा, ‘सोन्याची सुरी झाली, म्हणून मी काय पोटात मारुन घेऊ?’ त्यांचही खरंच होतं, म्हणा ! कारण आमच्याकडे तसं उदरनिर्वाहाचं शेतीशिवाय दुसरं साधनच नव्हतं. त्यावर दादाने तोडगा काढला. आम्हाला नाममात्र किंमतीत शेत देऊन बाकी तुमच्या नावावर करुन घ्या. बाबा याही गोष्टीला तयार झाला नव्हता. शेवटी बाबावर कमालीचं दडपण आलं. मारून मुटकून तयार केल्यासारखं…. मामाने चार एकर शेमडीचं भरकाड वावर बाबाच्या नावाने करुन दिलं. असं ते भाडणाचं कारण होतं. त्यामुळे आमच्या मधील नाते-संबंधाला तडा गेले होते.

शेवटी मामाला शेती परत केली. ह्या शेताबद्दल कमालीचा जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे बरेच दिवस आम्हाला काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. सारखी हुरहुर वाटत राहायची. पांदणीच्या रस्त्याने जाता-येतांना वाडीकडे लक्ष गेलं की उरात उमाळा दाटून यायचा.

आमच्या पोटापाण्याचं एकमेव साधन निघून गेलं. त्याआधी देवदासदादाही निधनामुळे कायमचा निघून गेला. बाबा हताश झाला. आमचं पूर्वीचं वैभव आता हळुहळु ओसरायला लागलं.

 


कथा बाविसावी – विंचवाचा पाऊस

 

‘धांव… रामराव ! अंधार पडत आहे.’  जनाबाईचा आवाज काळजीने कांपत होता. मग आम्ही दोघेही बहिण-भाऊ पटातल्या बैलावानी सुसाट वेगाने धावत सुटलो. तसा हा रस्ता बैलगाडीचा अन् सपाट होता. तरानातले रस्ते असेच. आमच्या डोंगरासारखे दाट झाडीचे, चढ-उताराचे, दगड-गोट्याचे, दर्‍याखोर्‍याचे भयान वाटणारे नसतात. आम्हाला रस्त्यात एकही चिटपाखरु किंवा काळं कुत्र दिसलं नाही. इतका तो रस्ता सामसूम झाला होता. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला शेत्या पसरलेल्या होत्या. बाभळीचे झाडं-झुडपं हिरव्या बारीक पानांनी व पिवळ्या फुलांनी नटलेले दिसत. एक-दोन ठिकाणी तुरळक नाले लागले. त्याचा खोलगट भाग व झाडीमुळे भीती वाटत होती. नाल्यातल्या पाण्यात बुडणार्‍या सूर्याचे तिरपे किरणे पडले होते. त्यात झाडाच्या सावल्या झिरपलेल्या दिसत होत्या.

आम्ही देवगावला बसमधून उतरलो; तेव्हा सूर्य क्षितिजाला जावून टेकला होता. त्याने सोनेरी, तांबडे, लाल, पिवळे असे निरनिराळे रंग उधळलेले होते. त्या किरणांचा तेवढा उजेड पडला होता. हा उजेड जसंजसा अंधुक व्हायला लागला, तसतशी आमची छाती धडधड करायला लागली. सळसळत येणारा संध्याकाळचा गार वारा अंगाला झोंबत होता.

या गावाला जायचं म्हणजे देवगावपर्यंत बसने, तेथून पैदल… हे गाव दोनक कोस दूर असेल. पूर्वी आम्ही दोन-चारदा येऊन गेलो. पण रस्ता तेवढा दाट ओळखीचा झाला नव्हता. आम्ही गावाजवळ आलो; तेव्हा अंधार पडला होता. पळता-पळता दमासून गेलो होतो. कमालीचा थकवा आला होता. घशाला कोरड पडली होती. एकाठिकाणी रस्त्याच्या कडेला मांडवात कंदिलाचा उजॆड दिसला. आम्ही त्याला उसळगव्हानबद्दल विचारले. तो म्हणाला,

‘थोडावेळ थांबा. मीपण येतो. बैलाला चारा घालतो..’ हे ऐकून आमच्या मनातली भीती पळाली. तो जर नसता, तर आम्ही एवढ्या अंधारात कसे गेलो असतो, या कल्पनेने धास्तावून गेलो. आता आम्ही सुटकेचा श्वास सोडला. त्याने बैलाला कडबा टाकला. हातात कंदील घेऊन आम्हाला म्हणाला,

‘माह्या मागेमागे या.’ कंदिलाच्या उजेडात पायरस्त्याने आम्ही त्याच्या मागेमागे जाऊ लागलो. येथूनच उसळगव्हानचा रस्ता फूटला होता.

‘कोणाकडे जाता?’

‘बाबाकडे… त्याने पाटलाचा ऊस घेतला.’ बाई म्हणाली.

‘हो… का? मी पाटलाचा गडी आहे. तुमचे बाबा ऊसाच्या मळ्यात. चला…’ तो म्हणाला.

बाबा गावोगावी भटकंती करायचा. तो आमराई, उसाचा मळा, पपई, जांबा-संत्राचा बगीचा विकत घ्यायचा. त्याच्यासोबत ‘विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर’ म्हणतात, तसं आई व लहान भाऊ, अज्याप असे तिघे राहत. मी व बाई उमरसर्‍याला शिकायला होतो. हे गाव माझ्या भावजयीचं माहेर पण होतं. तिचा एकूलता एक भाऊ येथे राहत होता. त्याला कुष्ठरोग झाला होता. आई-बाप वारल्याने ते एकटेच राहत.

वहिनीच्या आईचे मरण्यापूर्वी दोन्ही डोळे गेले होते. त्यांना तसं चांगलं दिसत होतं. पण झावर-झावर दिसते, म्हणून त्यांनी वैद्याकडे गावठी उपचार घेतले. त्याच्या औषधाने त्या दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या झाल्या. बरं झालं, आई त्या वैद्याकडे गेली नाही. कारण तीदेखील त्यांच्या सांगण्यावरुन जाणार होती. पण तिला फुरसत न मिळाल्याने राहून गेलं. नाहीतर… आई पण आंधळी झाली असती…! या कल्पनेने आम्ही घाबरलो होतो. तिच्यावर घोंघावणारं संकट टळल्याने, आम्हाला काळजी राहिली नव्हती.

या गावाला बाबाने पाटलाकडून ऊसाशिवाय कांदे, वाळलेल्या मिरच्या विकत घेऊन ट्रकने यवतमाळला विकायला आणले होते. तेथे भाड्याची खोली करुन हा माल भरला होता. बाजाराच्या दिवशी कांदे व मिरच्या विकायला दादा गावावरून यायचा. तेव्हा तो मला सोबत घ्यायचा. त्यावेळी ढिगातला कांदा बराचसा सडला होता. त्यामूळे खूप घाण वास यायचा. हे सडलेले कांदे निवडून फेकून द्यावे लागत असे. नाहीतर सडके कांदे दुसर्‍यांना सडविल्याशिवाय राहत नसे. म्हणून चांगल्या लोकांनी वाईट लोकांच्या संगतीला राहू नये, अशी शिकवण या कांद्याच्या उदाहरणाने मिळत होती.

आम्ही पोहचलो, तेव्हा अज्याप एकटाच झोपडीत कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात अभ्यास करत होता. तो त्यावेळेस दुसरीत होता. आई-बाबा ऊसं विकायला गेले होते. त्यांना घरी यायला बरीच रात्र झाली होती. सकाळी उठलो. मी ऊसाचा मळा पाहून हरखून गेलो. आई-बाबा सकाळपासूनच ऊस तोडण्याच्या कामाला जुंपले होते. त्यावेळी थंडीचे दिवसं होते. आईने हिरवेगार व उंच वाढलेला ऊस विळ्याने तोडून आम्हाला खायला दिला. त्यादिवशी आई-बाबा पुलगावच्या बाजारात उसं घेऊन गेले होते. मीपण त्यांच्यासोबत गाडीवर बसून गेलो होतो.

जेवतांना भाकर कचर कचर लागत होती. म्हणून आईला विचारले,

‘आई, भाकर कचर कचर का लागते?’

‘हे पीठ तुह्या बाबाने चक्कीवरुन विकत आणले. ते खाली सांडलेले असल्याने कचर कचर लागते.’      एकदा अज्यापच्या शाळेतल्या मित्राने बाबाला हे पीठ विकत घेतांना पाहिले. तेव्हा मित्राने म्हटले,

‘हे पिठ मांग-महार खातात. तुम्ही कशाला विकत घेता?’ त्यामुळे अज्याप ओशाळला होता.

त्यानंतर जवळच्या बोरवघळ गावाला बाबाने संत्रा, पपई व आमराई विकत घेतली. तेव्हा पपया, संत्रा व आंबे खायची मजाच मजा यायची. बगिच्यात बाबाने झोपडी बांधली होती. अज्याप तेथून उसळगव्हानला शाळेत जाणे-येणे करायचा. पपयाच्या फळाने झाडं लदबदलेले असायचे. बाबाने गावातला मुलगा पपया राखायला व तोडायला गडी म्हणून ठेवला होता. आम्ही मस्तपैकी पिकलेली पपई तोडून खात होतो. कारण झाडाला पिकलेली पपई फारच गोड लागत होती.

बाबाने भाड्याच्या बैलगाडीने पपया यवतमाळला विकायला आणल्या होत्या. तेव्हा मी त्याच्यासोबत बैलगाडीवर बसून तितक्या लांब आलो होतो. तसेच त्याने संत्राचा बगीचा पण विकत घेतला होता. आम्ही मोठ-मोठे पिकलेले संत्रे तोडून खात होतो. त्या बगिच्याचा मालक गावचा पाटील होता. बाबा पाटलीनबाईला सांगायचा,

‘माह्ये पोरं आलेत, मालकीनबाई.’

‘कवा आलेत?’

‘आलेत काल रातच्याला.’ बाबाने असं सांगितल्यावर ती तिच्या घरची तेलाची चपचप रस्सेदार, चवदार भाजी आमच्यासाठी गड्याच्या हाताने पाठवून द्यायची. आम्ही ती भाजी मग मस्त चाटूनपुसून खात होतो.

बगिच्यात विहीर होती. त्या विहिरीत गड्याने मला पोहायला शिकवले होते. मग तासनतास पोहत राहायला मला भारी मजा वाटायची. शेवटी आई खूप रागावित होती.

‘झालं असेन न पोहणं? आता निघ नं बाहेर.’ आई म्हणायची.

मी त्यापुर्वी विहिरीत कधी पोहलेलो नव्हतो. वाघाडी नदीच्या डोहात मात्र पोहत होतो.

नंतर पपईचा बगीचा विकत घेतला. आम्ही तेथे राहायला गेलो होतो. विहिरीचे पाणी बगिच्याला त्याचा गडी मोटेने द्यायचा. पाण्याने भरलेली मोट विहिरीच्या बाहेर आली की पोट फुगलेल्या गर्भार बाईसारखी दिसायची. हौदात पाणी ओतल्यावर बाळंत झालेल्या बाईसारखी मोकळी झालेली दिसत होती. बैलं खाली उताराने जाणे, पाठोपाठ भरलेली मोट येणे, बैलं मागेमागे चढावावर सरकत जाणे, रिकामी मोट विहिरीच्या आत जाणे, असं हे चक्र पाहून मी पण चक्रावून जात होतो. यालाच राहाटगाडगे म्हणतात, असे मी ऐकले होते.

गंमत म्हणजे मला त्यावेळी विंचू चावला होता. झालं असं की, रात्रीच्या वेळी आईने फोडणीसाठी कांदा द्यायला सांगितला. मी मळ्यावरच्या डेळीला टांगलेल्या टोपलीत हात टाकला. त्याबरोबर काहीतरी सणकण चावल्याचं जाणवलं. मी बाबाला सांगितल्यावर त्याने कंदिलाने पाहिले, तर त्यात विंचू होता. त्यानेच माझ्या बोटाला डंख मारला होता. मरणाच्या वेदना होत होत्या. मी रडायला लागलो. बाबाने गावातून मोहाची दारु आणून मला पाजली. त्या नशेत मी रात्र कशीतरी काढली. विंचू चावण्याची ही माझी दुसरी वेळ होती. त्यापूर्वी गोधणीला मुड्याच्या बाडात मुडे फेरतांना चावला होता.

त्यानंतर आमराई घेतली. बाबाने येथेही झोपडी व मळा बांधला होता. आम्ही रात्रीला उघड्या मळ्यावर झोपत होतो. दिवसभराच्या उन्हामुळे रात्रीला उकाडा होत असे. हवा कुंद होई. झाडाचं पान हालत नसे. उकाड्याने जिवाची तगमग होत होती. आकाशाचा भला मोठा आवाका व वैभव पाहून जीव गुदमरल्यासारखं वाटत होतं. मग असंख्य तार्‍यांचा चमचम करणारा सुंदर नजारा पाहत, वार्‍याची झुळूक आलीच तर त्याच्या गारव्यात व झाडाची सळसळ ऐकतच मी झोपी जात होतो. खरंच अंधार जर नसता तर हे चंद्र, तारे तरी दिसले असते का? अंधारामुळेच या चंद्र-तार्‍यांना महत्व आले. म्हणजेच दु:खामुळे सुखाला गोडी आली, असेच म्हणावे लागेल.

सकाळी अगदी झुंजुमुंजूला जाग आली, की आकाशात प्रखर तेजाने तळपणारा शुकतारा हसत असल्याचा भास होत होता. मग त्यासमवेत लुकलूकणार्‍या तार्‍यांना पाहण्यात मन तल्लीन होऊन जात असे. पहाटवारा झुळझुळ वाहायला लागायचा. मंद गारवा उघड्या अंगाला स्पर्शून जायचा. मग पाखरं अवतीभोवती निरनिराळ्या स्वरात गुंजन करत झोपू देत नव्हते. सूर्याच्या कोवळ्या बिंबाचे स्वागत करतांना पक्षी बेहोश होवून वार्‍यासंगे डोलणार्‍या झाडांच्या फांदीवर बसून गात; तेव्हा अख्खा परिसर मंत्रमुग्ध होवून नवचैतन्य पसरल्याचे भासत होते.

वानरांचा कळप आंब्याची मोठी नासाडी करीत. बाबाने कोलामाला राखायला ठेवले होते. तो आल्यावर बाबाला त्याच्याजवळ घटकाभर बसल्याशिवाय करमत नव्हतं. मग दोघेही चिलीम ओढत गप्पागोष्टी करीत. त्याच्या जवळ मोठी तिरकामठ होती. त्यात तो लहानसा दगड ठेवून वानराच्या दिशेने नेम धरुन मारायचा. कितीही उंच झाडावर वानर बसलेला असला; तरीही त्याचा दगड तेथपर्यंत पोहचत असे. त्यामुळे वानरं घाबरुन पळून जात. बाबाने आम्हालाही रबराच्या गुल्लेर बनवून दिल्या होत्या. त्याने आम्हीपण पाखरांना व वानरांना हाकलत होतो.

वानराच्या हालचालीकडे मी निरखून पहात होतो. कळपात भड्या राहायचा. त्याची भरीव शरीरयष्टी, भरदार जाड मांड्या, दणकट हात, काळेशार तोंड आणि तेवढेच काळेशार कान व चेहर्‍याभोवती गच्च भरलेले सोनेरी पांढरे केस व लांब शेपटी पाहून मन थक्क होवून जात असे. थबकत थबकत चालतांना त्याची शेपटी गोल वळसा घेऊन त्याच्याच पाठीवर टेकत होती. चालतांना त्याचा बेधडकपणा, जागृतपणा खुलून दिसायचा. त्यावरून तो कळपाचा नायक असावा हे समजायला वेळ लागत नसे. ‘हूपऽऽ हूपऽऽ’ आवाज करत तो या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत राहायचा. बाकीचेही वानरं धडाधड उड्या मारीत होते. त्यांच्या वजनाने फांदी खालीवर होत असे.

बाया जशा एकमेकींच्या डोक्यातील उवा पाहून नखाने मारत. तसेच ह्या वानरी पण एकमेकांच्या अंगावरचे केसं बोटाने सारत, गोचिडी-उवा शोधून तोंडात पटकन घालत. शांतवेळी वानरी आपल्या पिल्लांना मोकळे सोडत. मग हे पिल्ले चिऽऽ चिऽऽ आवाज करीत इकडून तिकडे व तिकडून इकडे उड्या मारत एकमेकांशी किलोंट्या करीत. खेळून दमले की आईच्या कुशीत शिरत. ते वानरीनच्या पोटाला घट्ट बिलंगून राहत. मग तिने कितीही जोराने उंचावरुन उडी मारली, तरीही पिल्लू पडत नसे.

असाच वानरांचा कळप जांब या गावाच्या आमराईत पण येत होता. त्यावर्षी बाबाने पेरुचा बगीचा व नंतर आमराई विकत घेतली होती. हे गाव उमरसरयावरून तिनक कोस दूर होतं. तेवढ्या दुरुन आम्ही रस्ता तुडवत पायीपायी येत होतो. सुरुवातीला चालतांना हुरुप यायचा. पण नंतर थकून जायचं. आईच्या भेटीची ओढ राहत असल्याने हा थकवा विसरुन जात होतो.

बाबाने बगिच्यात झोपडी बांधली होती. तेथे भाजीपाल्याचं माळवं होतं. आई ताजे ताजे टमाटे, वांगे, मिरची तोडून व मस्तपैकी खुडखूडी भाजी बणवायची. भाकरीसोबत इतकी स्वादिष्ट लागायची की विचारूच नका ! या बगिच्यात पण मोट होती. मालक यवतमाळचा फाटक वकील… तो ब्राम्हण होता. बाबा या वकिलाकडेच कोर्टाची कामे करीत असल्याने बाबाच्या ओळखीचा होता.

जांबाचा मोसम संपल्यावर आमराई विकत घेतली. ही आमराई चार-पाच वावरं दूर होती. मी आणि बाई आंबे राखायला जात होतो.

बोरवघळची आमराई पुलगाव-देवगाव रोडवर असल्याने जाणारे-येणारे आमराईत येत. त्यांना पाडाचे किंवा माचात पिकलेले आंबे विकत होतो. हौसी पोरं-पोरी आंबे खातांना एकमेकांची चेष्टा करीत. आम्ही पण भाकरी सोबत पिकलेले आंबे चुरपून चुरपून खात होतो. कधीकधी बाबा पिकलेले पण अर्धवट सडलेले आंबे देत होता. त्यातील सडलेला भाग सोडून बाकीचा खात होतो.

पिकलेल्या आंब्याचे टोपले डोक्यावर घेऊन हिरपूर गावाला वाट तुडवत विकायला नेत होतो. या गावाला बाबाचा नातेवाईक उकंडा राहत होता. शनिवारी घारफळच्या बाजारात जात होतो. ओझ्याच्या भाराने मान मोडल्यासारखी व्हायची. डोकं चेचल्यासारखं व्हायचं. पाय अतोनात दुखायचे. पायाच्या पोटर्‍या भरुन यायच्या तर पाठ व कमर वाकून जायची. तहानेने व भूकेने जीव कासाविस होई. असे हालहाल होत असे. कधी डोक्यावरुन टोपलं उतरते, त्याक्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. याच घारफळच्या बाजारात यवतमाळचा तंबाखूचा धंदा करणारा मारवाडी व्यापारी यायचा. तो दुसर्‍या दिवशी रविवारी यवतमाळच्या बाजारात दुकान मांडायचा. बाबा त्याच्याजवळ आमच्यासाठी खाऊ, पैसे किंवा आणखी काहीतरी वस्तू पाठवित असे.

उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा यवतमाळच्या बाजारात जात होतो; तेव्हा कच्च्या आंब्याची ओळ दिसायची. त्यावेळी रायत्याच्या आंब्याची आठवण ताजी होत होती. सर्व आंबे उतरल्यावरही हा आंबा पावसाच्या आगमनाची वाट पाहत होता. जशी एखादी उपवास करणारी बाई, चद्राचं मूख पाहिल्याशिवाय जेवत नाही; तसंच या आंब्याचं होतं की काय, कॊण जाणे?

ह्या आंब्याचे वैशिष्ट्ये म्हणजे पाडाला आल्यावरही नरम पडत नव्हता; तर कच्च्या आंब्यासारखा दणकट, भरलेला व हिरवागार दिसत होता. खायला आंबट… असा आंबा रायते बणविण्यासाठी खासच असतो. त्याला भाव पण चांगला येतो. म्हणून उशीरा तोडत. त्यावर चांगली कमाई झाली होती.

एकदिवस एकाएकी ढग आभाळात घिरट्या घालू लागले होते. वातावरण कसं मोहक झालं होतं. अवकाळी पावसाचे टपोरे थेंब टपटपू लागले होते. आंब्याच्या झाडांच्या इवलाल्या पानांत थेंबाचे संगीत वाजू लागले होते. सारी आमराई पावसाच्या या अजब संगीताच्या तालावर फेर धरुन नाचू लागली होती. मध्येच वाराधून, वावटळ-गराड सुट्लं होतं. विजा चमकत होत्या. चांगल्या टपोर्‍या गारांचा पाहता पाहता सातरा खाली पडल्या होत्या. जमीन पांढर्‍या शुभ्र गारांनी झाकल्या गेली होती. थंडगार वातावरणाने अंगात हुडहुडी भरली होती. थंडी व चिखलाने वैतागून गेलो होतो, रात्रीला मी व बाई गावातल्या ओळखीच्य