अशा होत्या त्या काटेरी वाटा !
December 13, 2011
*** समर्पन ***
ज्यांनी मला जीवन प्रवाह दिला असे माझी आई-अलुकाबाई व बाप-कोंडुजी, यांच्याशिवाय ज्यांनी मला बालपणापासून घडविलं, असे माझे दादा-शामराव, वहिनी-अनुसया, दिवंगत दादा-देविदास, माझी एकुलती एक… मोठी बहीण-जनाबाई यांना सदर आत्मकलाकृती समर्पित …
मनोगत
मी महावितरण कंपनीच्या नोकरीत असतांना सामाजिक कार्यात झोकून दिल्याने सोबतच लिखाणकाम करीत होतोच. काही सामाजिक-धार्मिक पत्रिकांमध्ये अधून-मधून लेख-कथा प्रकाशित होत होत्या. माझ्या घरातील मंडळीना माझा हा छंद माहित असल्यामुळेच मी लेखाधिकारी यापदावर निवृत झाल्यावर साहजिकच ’तुम्ही काही तरी लिहीत जा…’असा आग्रह धरला होता. म्हणून माझी मुल प्रज्ञाशील, संघशील, करुणा व पत्नी कुसुम यांच्या अतुट प्रेमामुळे ’मी काहीतरी लिहिलं पाहिजे’ असं मनोमन वाटायला लागलं.
निवृत नंतरचा काळ म्हणजे भरपूर फावला वेळ. बर्याच दिवसांनी माझ्या जीवनातील कथा चितारण्याचा विचार माझ्या मनात रुंजी घालत होत्या. खरोखर, मी जेव्हा माझ्या गतस्मृतीच्या पेटार्यात डोकाऊन पाहिले तेव्हा मलाही वाटले, की माझं जीवन म्हणजे एक कादंबरी बनू शकते.
म्हणून मी माझ्या जीवनात घडलेल्या विविध प्रसंगाचे चित्रण करायचे ठरवीले. दूर दूर निघून गेलेल्या जीवनाला एकदा तरी ओथंबलेल्या डोळ्याने मागे वळून पाहण्याची उत्कंठा माझ्या मनात निर्माण झाली. मी जे जगलो ते कथानकाला जोडून सांगितले तर कुणाला निरस वाटणार नाही. म्हणून मी जीवनात घडलेला एकेक प्रसंग कथेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न करीत गेलो.
मी अमोलकचंद कॉलेज यवतमाळ येथे शिकत असतांना आम्हाला वर्गात मराठीचे प्राध्यापक कळणावत सर एकदा म्हणाले होते की, ‘सर्वचजन साहित्यामध्ये जगत असतात. परंतु जे लोक ते कागदावर उमटवतात ते साहित्यिक ठरतात.’
आपलं जगणं, इतरांच जगणं, सभोवतालचं वातावरण, अनुकूल-प्रतीकूल परिस्थिती, त्याचेशी तडजोड, उद्भवणारा संघर्ष, निरीक्षण, अनुभूती इत्यादी अनेक कलाकृती कागदावर रेखाटल्या म्हणजे तो साहित्यिकाच्या रांगेत जाऊन बसतो.
मला साहित्यिक बनणे कदाचीत जमणार नाही. परंतु मी जर पूर्वीच्याच दैन्य आणि दारीद्रयामध्ये जीवन जगत राहीलो असतो, तर कदाचीत मी लिहू शकलो नसतो. कारण ते माझे रोजचेच जीवन असते. ‘रोज मरे त्याला कोण रडे !’ याप्रमाणे माझातो जीवनप्रवास सुरु असता... त्याकाळात ज्या परिस्थितीत मी जगत होतो; हे त्या समुहाचं सार्वत्रीक जीवन होतं. सर्वचजण असे जगतात,. मग माझ्या जगण्यात आगळंवेगळं ते काय, ते मी लोकांना सांगू…?
परंतु त्यावेळचं जगणं आणि आताचं जगणं यामध्ये आमुलाग्र बदल झाला असल्यामुळे मला ते कागदावर उतरविण्यास प्रेरीत केले आहे.
पूर्वी माझ्या पायात घालायला चप्पल नव्हती, आता माझ्याकडे अनेक प्रकारचे चप्पला व जोडे आहेत.
पूर्वी मी लहानपणी शाळेत असतांना कॉटनचा खाकी हाफ पॅन्ट व पांढरा शर्ट व नंतर कॉलेजमध्ये पांढरा पैजामा व पांढरा शर्ट असा एकच पेहराव असायचा, आता माझ्याकडे कॉटनशिवाय टेरिकॉट, वुलनचे अनेक पॅन्ट, शर्ट, सफारी, कोट आहेत.
पूर्वी मला कपड्यांना इस्तरी करणे अशक्य होते, आता इस्तरी केल्याशिवाय कपडे घालत नाही.
पूर्वी मी खेड्यात साध्या घरात व शाळेत शिकायला असतांना झोपडीत राहत होतो, आज मी शहरात आलीशान फ्लॅट मध्ये राहत आहे.
पूर्वी मी पायी-पायी चालत होतो, आज मी स्वत:च्या स्कुटर व चार चाकी मारुती कार मधून जात आहे.
पूर्वी मी आभाळात उडत जाणार्या उडानखटोल्याकडे मोठ्या कुतूहलतेने पाहत होतो, आता मुलं मला विमानाची तिकीटे काढून विमानात बसवून फिरवतात.
पूर्वी यवतमाळ शहराच्या पलीकडे कुठे जात नव्हतो, आता भारतातल्या मोठमोठ्या शहरात जातो.
पूर्वी माझ्या दैनंदिन जीवनात माती-गोटे, चिखल-शेण, काट्याकुटयाशी सतत सामना असायचा, आज त्याच्याशी काहीही संबंध येत नाही.
पूर्वी तंबाखु घोटून खाण्याचा शौक व मित्रमंडळी सोबत घोटभर दारु पिण्याची मजा घेत होतो, आता अशा नशिली पदार्थापासून चार हात दूर आहे.
पूर्वी कष्टमय व नीरस जीवन जगत होतो, आता आरामदायक व आल्हाददायक जीवन जगत आहे.
पूर्वी मी उपेक्षीतांचं जीवन जगत होतो, आता मी सन्मानजनक जीवन जगत आहे.
पूर्वी मरमर कष्ट केल्यावरही केवळ तुटपूंजी कमाई होत असे, आता नोकरीमध्ये खाऊन-पिऊन शिल्लक पडेल इतका भरपूर पगार मिळत होता.
पूर्वी मी अंधारात किवा चिमनीच्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात पुरेसा प्रकाश शोधत होतो, आता झगमगत्या प्रकाशात डोळे दिपून जात आहेत.
पूर्वी मी उन्हाच्या गर्मीत उकडल्या जात होतो, आता कुलर आणि पंख्याची शितल हवा खात असतो.
पूर्वी मी बाहेर अंगनात खाली जमिनीवर, पोत्यावर अंग टाकत होतो, आता पलंगाच्या मऊशार गादीवर विसावत असतो.
पूर्वी मी चार-चौघात बोलायला घाबरा-घुबरा व्हायचो, आता स्टेजवर जाऊन आत्मविश्वासाने भाषण ठोकतो.
पूर्वी आमच्या घरात शिक्षणाचा गंध नव्हता, आता माझा लहान भाऊ-अज्याप एम.बी.बी.एस., एम.एस, लहान मुलगी-करुणा बी.ई.(कॉंपुटर ईंजिनीअर), मधला मुलगा–संघशील एम.बी.बी.एस. डी.एम.आर.डी, डी.एन.बी, (रेडिओलॉजी) झाला तर मोठा मुलगा-प्रज्ञाशील बी.एस.एल., एल.एल.बी पर्यंत शिकला असून कस्टम खात्यामध्ये असिस्टंट कमिश्नर (आय.आर एस) म्हणून लागला. म्हणजेच माझ्या घरात डॉक्टर, वकील, इंजिनीअरसारखे उच्च शैक्षणिक परंपरा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार निर्माण झाली आहे.
ज्यावेळी प्रज्ञाशील यू.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षेमधे उत्तीर्ण झाला, तेव्हा ती बातमी ‘आय.बी.एन.-लोकमत’ या मराठी बातम्याच्या टी.व्ही. चॅनलवर व निरनिराळ्या वर्तमानपत्रात झळकली होती.
विशेष सांगायचं म्हणजे ही बातमी ‘लोकमत’ या वर्तमानपत्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आवृतीमध्ये सविस्तरपणे प्रकाशीत झाली होती. आमच्या चौधरा गावातील काही मुले दु्ध विकायला सकाळीच यवतमाळला येत असतात. कुणीतरी लोकमत मधल्या बातमीत ‘चौधरा’ या गावचा आलेला उल्लेख त्यांना सांगितला. त्यावेळी त्यांच्या आनंदाला इतके उधान आले, की जातांना प्रत्येकांनी तो पेपर विकत घेऊन गावला गेलेत व लोकांना सांगायला लागलेत, की ‘आपल्या गावचा मुलगा कलेक्टर झाला…!’ त्यामुळे गावच्या लोकांचा उर अभिमानाने व गर्वाने भरुन आला होता !
अशा प्रकारचा बदल काव कसा झाला? असा बदल घडवून आणण्यात कोण-कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्यात? आजच्या पिढीला ज्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्या काही त्यांना एकाएकी व आपोआप मिळाल्या नाहीत. त्यामागे मागील पिढीचा दुर्दम्य आशावाद, त्याग, कष्ट व डॉ. बाबासाहेब आंबेडकराची शिकवण आणि प्रेरणा याचे मोठे पाठबळ आहे; ही बाब आजच्या व समोर येणार्या पिढीला कळणे आवश्यक आहे. तेव्हाच आमच्या परिश्रमाचे, कष्टाचे व त्यागाचे मोल त्यांना कळेल, असे मला वाटते. हा एक उद्देश या लिखाणामागे मी ठेवला आहे.
तसेच आजच्या काही उच्च शिक्षित पिढीचा असा समज झाला आहे की, आम्ही आमच्या अंगभूत गुणवत्ता, बुध्दीमत्ता व परिश्रमाच्या आधारावर यश मिळविले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध येतो कुठे? आम्हाला कुठे स्कॉलरशिप व राखीव जागांचा फायदा मिळाला? असा ते प्रश्न निर्माण करतात.
खरं म्हणजे आजच्या पिढीला जे मुक्तपणे व स्वतंत्रपणे ज्या संधी उपभोगता येत आहेत; त्यामुळेच ते मोठमोठ्या पगारावर व पदावर विराजमान झालेले आपण पाहतो आहे, तशा प्रकाराच्या संधी त्यांच्या वाडवडीलांना, जातीव्यवस्थेमुळे - आर्थिक हलाखीच्या परिस्थितीने गांजल्या गेले असल्यामुळे उपलब्ध झाल्या नव्हत्या. परंतु आंबेडकरी चळवळीच्या प्रखर तेजाने त्यांचा मार्ग प्रकाशमय झाला. त्यांना शाळा, कॉलेजात स्कॉलरशिप मिळाल्यात. नोकरी व बढतीमध्ये राखीव जागा मिळाल्यात. त्यामुळे ते शिकू शकलेत, नोकर्या मिळाल्यात. नोकर्यात बढत्या मिळाल्यात. उच्च पदावर जाऊन पोहचलेत. परिणामत: आर्थिक परिस्थिती सुधारली. म्हणून त्यांच्या मुला-बाळांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाल्यात. ही देण केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकराचीच आहे ! हे मर्म त्यांना कळणे अत्यंत आवश्यक आहे; हाही एक उद्देश या लिखाणामागे आहे.
जे दु:ख, कष्ट, दैनावस्था आधीच्या पिढीला भोगाव्या लागल्यात, ते आजच्या पिढीच्या वाट्याला आल्या नाहीत आणि ते येऊदेखील नयेत, म्हणून तशी कामना ठेवून आमची पिढी धडपडत आहे. परंतु काही अपवाद सोडला तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे ऋण मानायला तयार नाहीत. कारण त्यांनी आंबेडकरी साहीत्य वाचले नाहीत. आपल्या सामाजिक इतिहासाचा, पुर्वजांच्या परिस्थितीचा व कर्तृत्वाचा मागोवा घेतला नाही. म्हणून त्यांचा असा समज होत आहे.
म्हणून आजच्या व पुढे येणार्या पिढीला त्यांच्या यशोशिखराचा भक्कम असा रोवलेला पाया त्यांना दिसला पाहिजे असाही एक उद्देश या लिखाणाच्या मागे आहे.
तसेच प्रत्येकाच्या जीवनात काही तरी चांगले-वाईट, सुखकारक, दु:खदायक, मनाला चटका लावणारे, हृदयात धडकी भरणारे, हळूवार भावनेने गुंफलेले असे अनेक प्रसंग येत असतात. त्यातून मनुष्य काहीना काहीतरी शिकून पुढील आयुष्याची शिदोरी बांधत असतो. त्याचे हेच अनुभव दुसर्याला मार्गदर्शक ठरु शकतात. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा!’ हाही एक उद्देश या लिखाणामागे आहे.
खेड्यातील कमालीचे बकालपण, अस्वछता, रोगराई, लोकांची व्यसनाधिनता, त्यामुळे कुटूंबाची होणारी वाताहत, भांडण-तंटॆ; त्यामुळे उपस्थित होणारे कोर्ट-कचेर्या, पोलिसांकडून होणारी पिळवणूक व मिळणारी अपमानास्पद वागणूक, लोकांमध्ये खोलपर्यंत मुरलेली अंधश्रध्दा, अज्ञान, परंपरेचा पगडा, राजकारण, फुटीरता इत्यादी अनेक बाबींनी खेड्यातील जीवनमान दुषीत केलेले असते. म्हणून ही वास्तवता लोकांसमोर यावी हा एक उद्देश या लिखाणामागे आहे.
माझ्या या लिखाणात आलेले काही प्रसंग घरच्या लोकांना काही वेळेला सांगितले असतीलही…! परंतु ते त्रोटक स्वरुपात सांगितले होते. आता मी ते प्रसंग विस्तृतपणे, खुलून आणि मोकळ्या मनाने चितारले आहेत.
कदाचित माझे जवळचे लोक असाही आरोप करतील, की यातील काही गोष्टी तुम्ही आम्हाला कधी सांगितल्या नव्हत्या. खरं आहे! माझ्या जीवनाची दोरी पुढे ओढत नेतांना काही नाजूक, हळुवार प्रसंग रस्त्यामध्ये आलेत;काही कळत नकळत चुका घ्डल्यात: त्या मी माझ्या मनाच्या एका कोपर्यात दडवून ठेवल्या होत्या, जे मी आता आयुष्याच्या अखेरच्या पर्वात उघड केले आहे. त्यांच कारण मी स्पष्टपणे न सांगता सुज्ञ वाचकवर्ग जाणू शकतात.
मी जे काही या कथानकात मांडलं ते जसं घडलं तसंच प्रांजळपणे मांडलं ! जसं जगलो – जसं भोवताल दिसलं, तसंच रेखाटलं ! मी त्यात अतिशयोक्ती किंवा कल्पनेची भरारी मारली नाही किंवा त्यात स्वत:च्या पदरचं अधिक काही टाकलं नाही. फक्त मी साहित्यिक शब्दाचा साज चढविला, बस एवढंच !
मी माझ्या आयुष्याच्या आत दडलेले आठवणीचे पानं उलगडून पाहत असतांना जे काही कडू-गोड असे प्रसंग घडलेले दिसले. त्या प्रसंगाला साजेसे असे संवाद मी कथेमध्ये कुठे कुठे टाकले आहेत. तो मुळ संवाद असेल असं मात्र म्हणता येणार नाही. कारण स्मरणशक्तीला कितीही जोर दिला तरी जसेच्या तसे ते संवाद आठवणे कठीण आहे.
मी माझ्या जीवनात बांधलेल्या भाकरीच्या फडक्याची एकेक गाठ सोडून पाहील्यावर,त्यात अनेक जिवाभावातील लोकांचा संदर्भ आला आहे. कुठे नाव प्रकट केले तर कुठे नाही ! त्यांना किंवा त्यांच्या सगे-सोयर्यांना जर कुठे खटकलेच तर ते मला उदार अंत:करणाने क्षमा करतील, अशी मी आशा बाळगतो.
माझं हे लिखाण नोकरी लागेपर्यंतच्या जीवन प्रवासाचं आहे. त्यानंतरच्या वाटचालीचंचित्रण माझ्या लिखाणात मुद्दाम येऊ दिलं नाही. कारण त्यानंतर मी हळूहळू त्या काटेरी वाटेच्या आवर्तातून बाहेर पडून माझं जीवनमान सुधारु लागलं होतं. म्हणून मी या लिखाणाला ‘अशा होत्या त्या काटॆरी वाटा! ’ या शिर्षका पुरतेच मर्यादीत ठेवले आहे.
असं ते काहिसं कष्टाचं, कधी खचलेलं, कधी उभारलेलं, कधी उत्साहाचं, कधी खुडलेलं, पण पुन:पुन्हा फुलारलेलं, कधी गर्द दु:खाचं तर कधी हळूवार सुखाचं, कधी मंद तर कधी प्रखर तेजाचं, कधी अंधाराने झाकोळलेलं तर कधी प्रकाशाने न्हाऊन निघालेलं, असं ते गतकाळातलं जीवनचित्र मी आपल्यासमोर उभं केलं…!
माझ्या आठवणीचा ठेवा जोपासण्यास ज्ञात-अज्ञात असे ज्यांनी ज्यांनी मला हातभार लावला अशा सर्वांचा मी आभारी आहे.
जयभीम !
आर.के.जुमळे
ए२-२०५ रामी हेरिटेज मुर्तीजापूर रोड, अकोला, ४४४१०४
मो.९३२६४५०५०६
Like this:
Be the first to like this post.