मी आणि माझ्या आठवणी
समर्पन…
ज्यांनी मला जीवन प्रवाह दिला असे माझी आई-अलुकाबाई व बाप-कोंडुजी, यांच्याशिवाय ज्यांनी मला बालपणापासून घडविलं, असे माझे दादा-शामराव, वहिनी-अनुसया, दिवंगत दादा-देविदास, माझी एकुलती एक… मोठी बहीण-जनाबाई यांना सदर आत्मकलाकृती समर्पित …
मनोगत
मी महावितरण कंपनीच्या नोकरीत असतांना सामाजिक कार्यात झोकून दिल्याने सोबतच लिखाणकाम करीत होतोच. काही सामाजिक-धार्मिक पत्रिकांमध्ये अधून-मधून लेख-कथा प्रकाशित होत होत्या. माझ्या घरातील मंडळीना माझा हा छंद माहित असल्यामुळेच मी लेखाधिकारी या पदावर निवृत झाल्यावर साहजिकच ’तुम्ही काहीतरी लिहीत जा…’ असा आग्रह धरला होता. म्हणून माझी मुलं प्रज्ञाशील, संघशील, करुणा व पत्नी कुसुम यांच्या अतूट प्रेमामुळे ’मी काहीतरी लिहिलं पाहिजे’ असं मनोमन वाटायला लागलं.
निवृतीनंतरचा काळ म्हणजे भरपूर फावला वेळ. बर्याच दिवसांनी माझ्या जीवनातील कथा चितारण्याचा विचार माझ्या मनात रुंजी घालत होत्या. खरोखर, मी जेव्हा माझ्या गतस्मृतीच्या पेटार्यात डोकाऊन पाहिले तेव्हा मलाही वाटले, की माझ्या आयुष्यातील गहिरे अनुभव म्हणजे एक कादंबरी बनू शकते.
म्हणून मी माझ्या जीवनात घडलेल्या विविध प्रसंगाचे चित्रण करायचे ठरवीले. दूर दूर निघून गेलेल्या जीवनाला एकदा तरी ओथंबलेल्या डोळ्याने मागे वळून पाहण्याची उत्कंठा माझ्या मनात निर्माण झाली. मी जे जगलो ते कथानकाला जोडून सांगितले तर कुणाला निरस वाटणार नाही. म्हणून मी जीवनात घडलेला एकेक प्रसंग कथेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न करत गेलो.
मी अमोलकचंद कॉलेज यवतमाळ येथे शिकत असतांना आम्हाला वर्गात मराठीचे प्राध्यापक कळणावत सर एकदा म्हणाले होते की, ‘सर्वचजण साहित्यामध्ये जगत असतात. परंतु जे लोक ते कागदावर उमटवतात ते साहित्यिक ठरतात.’
आपलं जगणं, इतरांच जगणं, सभोवतालचं वातावरण, अनुकूल-प्रतीकूल परिस्थिती, त्याचेशी तडजोड, उद्भवणारा संघर्ष, निरीक्षण, अनुभूती इत्यादी अनेक कलाकृती कागदावर रेखाटल्या म्हणजे तो साहित्यिकाच्या रांगेत जाऊन बसतो.
मला साहित्यिक बनणे कदाचीत जमणार नाही. परंतु मी जर पूर्वीच्याच दैन्य आणि दारीद्रयामध्ये जीवन जगत राहीलो असतो, तर कदाचीत मी लिहू शकलो नसतो. कारण ते माझे रोजचेच जीवन असते. ‘रोज मरे त्याला कोण रडे !’ याप्रमाणे माझा तो जीवनप्रवास सुरु असता… त्याकाळात ज्या परिस्थितीत मी जगत होतो; हे त्या समुहाचं सार्वत्रीक जीवन होतं. सर्वचजण असे जगतात,. मग माझ्या जगण्यात आगळंवेगळं ते काय, ते मी लोकांना सांगू…?
परंतु त्यावेळचं जगणं आणि आताचं जगणं यामध्ये आमुलाग्र बदल झाला असल्यामुळे मला ते कागदावर उतरविण्यास प्रेरीत केले आहे.
पूर्वी माझ्या पायात घालायला चप्पल नव्हती, आता माझ्याकडे अनेक प्रकारचे चप्पला व जोडे आहेत.
पूर्वी मी लहानपणी शाळेत असतांना कॉटनचा खाकी हाफ पॅन्ट व पांढरा शर्ट व नंतर कॉलेजमध्ये पांढरा पैजामा व पांढरा शर्ट असा एकच पेहराव असायचा, आता माझ्याकडे कॉटनशिवाय टेरिकॉट, वुलनचे अनेक पॅन्ट, शर्ट, सफारी, कोट आहेत.
पूर्वी मला कपड्यांना इस्तरी करणे अशक्य होते, आता इस्तरी केल्याशिवाय कपडे घालत नाही.
पूर्वी मी खेड्यात साध्या घरात व शाळेत शिकायला असतांना झोपडीत राहत होतो, आज मी शहरात आलीशान फ्लॅट मध्ये राहत आहे.
पूर्वी घरातले लोक घरातील कामे करीत, आता घरातील भांडी-कपडे धुणे, टाईल्स चकाचक पुसपास करणे, पोळ्या बनविणे अशी कामे मोलकरणी करतात.
पूर्वी मी कितीतरी लांब पायी-पायी चालत होतो, आज मी स्वत:च्या स्कुटर व चार चाकी कारने चालत असतो.
पूर्वी मी स्वप्नात कार चालविल्याचा खोटा आनंद घेत होतो. आता तर प्रत्यक्षात मारुती कार चालवित खरा आनंद लुटत असतो.
पूर्वी मी आभाळात उडत जाणार्या उडानखटोल्याकडे मोठ्या कुतूहलतेने पाहत होतो, आता मुलं मला विमानात बसवून फिरवित असतात.
पूर्वी यवतमाळ शहराच्या पलीकडे कुठे जात नव्हतो, आता देशात आणि परदेशात सुध्दा पर्यटण करत असतो.
पूर्वी माझ्या दैनंदिन जीवनात माती-गोटे, चिखल-शेण, काट्याकुटयाशी सतत सामना असायचा, आज त्याच्याशी काहीही संबंध येत नाही.
पूर्वी तंबाखु घोटून खाण्याचा शौक व मित्रमंडळी सोबत घोटभर दारु पिण्याची मजा घेत होतो, आता अशा नशिली पदार्थापासून चार हात दूर आहे.
पूर्वी कष्टमय व नीरस जीवन जगत होतो, आता आरामदायक व आल्हाददायक जीवन जगत आहे.
पूर्वी मी उपेक्षीतांचं जीवन जगत होतो, आता मी सन्मानजनक जीवन जगत आहे.
पूर्वी मरमर कष्ट केल्यावरही केवळ तुटपूंजी कमाई होत असे, आता नोकरीमध्ये खाऊन-पिऊन शिल्लक पडेल इतका भरपूर पगार मिळत होता.
पूर्वी मी अंधारात किवा चिमनीच्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात पुरेसा प्रकाश शोधत होतो, आता झगमगत्या प्रकाशात डोळे दिपून जात आहेत.
पूर्वी मी उन्हाच्या गर्मीत उकडल्या जात होतो, आता एअर कंडीशन, कुलर आणि पंख्याची शितल हवा खात असतो.
पूर्वी मी बाहेर अंगणात खाली जमिनीवर, पोत्यावर अंग टाकत होतो, आता पलंगाच्या मऊशार गादीवर विसावत असतो.
पूर्वी मी चार-चौघात बोलायला घाबरा-घुबरा व्हायचो, आता स्टेजवर जाऊन आत्मविश्वासाने भाषण ठोकतो.
पूर्वी आमच्या घरात शिक्षणाचा गंध नव्हता, आता माझा लहान भाऊ-अज्याप एम.बी.बी.एस., एम.एस, लहान मुलगी-करुणा बी.ई.(कॉंपुटर ईंजिनीअर), मधला मुलगा–संघशील एम.बी.बी.एस. डी.एम.आर.डी, डी.एन.बी, (रेडिओलॉजी) झाला तर मोठा मुलगा-प्रज्ञाशील बी.एस.एल., एल.एल.बी पर्यंत शिकला असून कस्टम खात्यामध्ये असिस्टंट कमिश्नर (आय.आर एस) म्हणून लागला. म्हणजेच माझ्या घरात डॉक्टर, वकील, इंजिनीअरसारखे उच्च शैक्षणिक परंपरा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार निर्माण झाली आहे.
ज्यावेळी प्रज्ञाशील यू.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षेमधे उत्तीर्ण झाला, तेव्हा ती बातमी ‘आय.बी.एन.-लोकमत’ या मराठी बातम्याच्या टी.व्ही. चॅनलवर व निरनिराळ्या वर्तमानपत्रात झळकली होती.
विशेष सांगायचं म्हणजे ही बातमी ‘लोकमत’ या वर्तमानपत्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आवृतीमध्ये सविस्तरपणे प्रकाशीत झाली होती. आमच्या चौधरा गावातील काही मुले दु्ध विकायला सकाळीच यवतमाळला येत असतात. कुणीतरी लोकमत मधल्या बातमीत ‘चौधरा’ या गावचा आलेला उल्लेख त्यांना सांगितला. त्यावेळी त्यांच्या आनंदाला इतके उधान आले, की जातांना प्रत्येकांनी तो पेपर विकत घेऊन गावला गेलेत व लोकांना सांगायला लागलेत, की ‘आपल्या गावचा मुलगा कलेक्टर झाला…!’ त्यामुळे गावच्या लोकांचा उर अभिमानाने व गर्वाने भरुन आला होता !
अशा प्रकारचा बदल का व कसा झाला? असा बदल घडवून आणण्यात कोण-कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्यात? आजच्या पिढीला ज्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्या काही त्यांना एकाएकी व आपोआप मिळाल्या नाहीत. त्यामागे मागील पिढीचा दुर्दम्य आशावाद, त्याग, कष्ट व डॉ. बाबासाहेब आंबेडकराची शिकवण आणि प्रेरणा याचे मोठे पाठबळ आहे; ही बाब आजच्या व समोर येणार्या पिढीला कळणे आवश्यक आहे. तेव्हाच आमच्या परिश्रमाचे, कष्टाचे व त्यागाचे मोल त्यांना कळेल, असे मला वाटते. हा एक उद्देश या लिखाणामागे मी ठेवला आहे.
तसेच आजच्या काही उच्च शिक्षित पिढीचा असा समज झाला आहे की, आम्ही आमच्या अंगभूत गुणवत्ता, बुध्दीमत्ता व परिश्रमाच्या आधारावर यश मिळविले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध येतो कुठे? आम्हाला कुठे स्कॉलरशिप व राखीव जागांचा फायदा मिळाला? असा ते प्रश्न निर्माण करतात.
’खरं म्हणजे आजच्या पिढीला जे मुक्तपणे व स्वतंत्रपणे ज्या संधी उपभोगता येत आहेत; त्यामुळेच ते मोठमोठ्या पगारावर व पदावर विराजमान झालेले आहेत. तशा प्रकाराच्या संधी त्यांच्या वाडवडीलांना, जातीव्यवस्थेमुळे – आर्थिक हलाखीच्या परिस्थितीने गांजल्या गेले असल्यामुळे उपलब्ध झाल्या नव्हत्या. परंतु आंबेडकरी चळवळीच्या प्रखर तेजाने त्यांचा मार्ग प्रकाशमय झाला. त्यांना शाळा, कॉलेजात स्कॉलरशिप मिळाल्यात. त्यामुळे ते शिकू शकलेत. नोकरी व बढतीमध्ये राखीव जागा मिळाल्यात. त्यामुळे ते उच्च पदावर जाऊन पोहचलेत. परिणामत: आर्थिक परिस्थिती सुधारली. म्हणून त्यांच्या मुला-बाळांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाल्यात. ही देण केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकराचीच आहे ! हे मर्म त्यांना कळणे अत्यंत आवश्यक आहे; हाही एक उद्देश या लिखाणामागे आहे.’
जे दु:ख, कष्ट, दैनावस्था आधीच्या पिढीला भोगाव्या लागल्यात, ते आजच्या पिढीच्या वाट्याला आल्या नाहीत आणि ते येऊदेखील नयेत, म्हणून तशी कामना ठेवून आमची पिढी धडपडत आहे. परंतु काही अपवाद सोडला तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे ऋण मानायला तयार नाहीत. कारण त्यांनी आंबेडकरी साहीत्य वाचले नाहीत. आपल्या सामाजिक इतिहासाचा, पुर्वजांच्या परिस्थितीचा व कर्तृत्वाचा मागोवा घेतला नाही. म्हणून त्यांचा असा समज होत आहे.
म्हणून आजच्या व पुढे येणार्या पिढीला त्यांच्या यशोशिखराचा भक्कम असा रोवलेला पाया त्यांना दिसला पाहिजे असाही एक उद्देश या लिखाणाच्या मागे आहे.
तसेच प्रत्येकाच्या जीवनात काही तरी चांगले-वाईट, सुखकारक, दु:खदायक, मनाला चटका लावणारे, हृदयात धडकी भरणारे, हळूवार भावनेने गुंफलेले असे अनेक प्रसंग येत असतात. त्यातून मनुष्य काहीना काहीतरी शिकून पुढील आयुष्याची शिदोरी बांधत असतो. त्याचे हेच अनुभव दुसर्याला मार्गदर्शक ठरु शकतात. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा!’ हाही एक उद्देश या लिखाणामागे आहे.
खेड्यातील कमालीचे बकालपण, अस्वछता, रोगराई, लोकांची व्यसनाधिनता, त्यामुळे कुटूंबाची होणारी वाताहत, भांडण-तंटॆ; त्यामुळे उपस्थित होणारे कोर्ट-कचेर्या, पोलिसांकडून होणारी पिळवणूक व मिळणारी अपमानास्पद वागणूक, लोकांमध्ये खोलपर्यंत मुरलेली अंधश्रध्दा, अज्ञान, परंपरेचा पगडा, राजकारण, फुटीरता इत्यादी अनेक बाबींनी खेड्यातील जीवनमान दुषीत केलेले असते. म्हणून ही वास्तवता लोकांसमोर यावी हा एक उद्देश या लिखाणामागे आहे.
माझ्या या लिखाणात आलेले काही प्रसंग घरच्या लोकांना काही वेळेला सांगितले असतीलही…! परंतु ते त्रोटक स्वरुपात सांगितले होते. आता मी ते प्रसंग विस्तृतपणे, खुलून आणि मोकळ्या मनाने चितारले आहेत.
कदाचित माझे जवळचे लोक असाही आरोप करतील, की यातील काही गोष्टी तुम्ही आम्हाला कधी सांगितल्या नव्हत्या. खरं आहे ! माझ्या जीवनाची दोरी पुढे ओढत नेतांना काही नाजूक, हळुवार प्रसंग रस्त्यामध्ये आलेत; काही कळत नकळत चुका घडल्यात: त्या मी माझ्या मनाच्या एका कोपर्यात दडवून ठेवल्या होत्या, जे मी आता आयुष्याच्या अखेरच्या पर्वात उघड केले आहे. त्यांच कारण मी स्पष्टपणे न सांगता सुज्ञ वाचकवर्ग जाणू शकतात.
मी जे काही या कथानकात मांडलं ते जसं घडलं तसंच प्रांजळपणे मांडलं ! जसं जगलो – जसं भोवताल दिसलं, तसंच रेखाटलं ! मी त्यात अतिशयोक्ती किंवा कल्पनेची भरारी मारली नाही किंवा त्यात स्वत:च्या पदरचं अधिक काही टाकलं नाही. फक्त मी साहित्यिक शब्दाचा साज चढविला, बस एवढंच !
मी माझ्या आयुष्याच्या आत दडलेले आठवणीचे पानं उलगडून पाहत असतांना जे काही कडू-गोड असे प्रसंग घडलेले दिसले. त्या प्रसंगाला साजेसे असे संवाद मी कथेमध्ये कुठे कुठे टाकले आहेत. तो मुळ संवाद असेल असं मात्र म्हणता येणार नाही. कारण स्मरणशक्तीला कितीही जोर दिला तरी जसेच्या तसे ते संवाद आठवणे कठीण आहे.
मी माझ्या जीवनात बांधलेल्या भाकरीच्या फडक्याची एकेक गाठ सोडून पाहील्यावर, त्यात अनेक जिवाभावातील लोकांचा संदर्भ आला आहे. कुठे नाव प्रकट केले तर कुठे नाही ! त्यांना किंवा त्यांच्या सगे-सोयर्यांना जर कुठे खटकलेच तर ते मला उदार अंत:करणाने क्षमा करतील, अशी मी आशा बाळगतो.
माझं हे लिखाण नोकरी लागेपर्यंतच्या जीवन प्रवासाचं आहे. त्यानंतरच्या वाटचालीचं चित्रण माझ्या लिखाणात मुद्दाम येऊ दिलं नाही. कारण त्यानंतर मी हळूहळू त्या काटेरी वाटेच्या आवर्तातून बाहेर पडून माझं जीवनमान सुधारु लागलं होतं. म्हणून मी या लिखाणाला ‘अशा होत्या त्या काटॆरी वाटा! ’ या शिर्षका पुरतेच मर्यादीत ठेवले आहे.
असं ते काहिसं कष्टाचं, कधी खचलेलं, कधी उभारलेलं, कधी उत्साहाचं, कधी खुडलेलं, पण पुन:पुन्हा फुलारलेलं, कधी गर्द दु:खाचं तर कधी हळूवार सुखाचं, कधी मंद तर कधी प्रखर तेजाचं, कधी अंधाराने झाकोळलेलं तर कधी प्रकाशाने न्हाऊन निघालेलं, असं ते गतकाळातलं जीवनचित्र मी आपल्यासमोर उभं केलं…!
कधी कधी गतस्मृती आठवून आता मला हसू येतं, पण मी त्याच कारणासाठी त्यावेळी गदगदून रडलो होतो. अशी ही माझी कथा आहे.
माझ्या आठवणीचा ठेवा जोपासण्यास ज्ञात-अज्ञात असे ज्यांनी ज्यांनी मला हातभार लावला अशा सर्वांचा मी आभारी आहे.
आर.के.जुमळे
ए२-२०५ रामी हेरिटेज मुर्तीजापूर रोड, अकोला, ४४४१०४
मो.९३२६४५०५०६
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
माझं गाव म्हणजे चौधरा… अगदी लहानसं खेडं… शंभरएक घरांचं… जेथे शेती व त्यावर आधारीत काम करणारे लोकं वसती करुन राहतात, त्यालाच गाव म्हणतात ना… मग माझ्याही गावाच्या अवतीभवती शेतीच शेती होती.
या गावाचे नाव ’चौधरा’ कसे पडले हे सांगणे तसे कठीण आहे. कारण तसा काही इतिहास ऎकीवात नाही. ऎवढं मात्र खरं, की इतर गावाच्या नावाची पुनरावृती बर्याच ठिकाणी असल्याचे दिसतील, पण या गावाच्या नावासारखे नाव महाराष्ट्राच्या मराठी मुलुखात तरी कुठेही शोधून दिसत नाही. बाहेरुन गावात पदार्पन केले, की माझं मन आनंदाने फुलून यायचं. अंगात नकळत उदंड उत्साह संचारायला लागायचा. या गांवाबद्दल मला एक प्रकारचं अवर्णीय असं प्रचंड आत्मीयता व प्रेम वाटायचं.
आमच्या गावातील माणसांचा पांढर्या रंगाचं धोतर नेसलेला व कुडतं – शर्ट किंवा सदर्याला कुडतं म्हणत – आतमध्ये बंडी घातलेला, डोक्याला फाटलेल्या धोतराच्या पानाचा किंवा शेलाचा पटका बांधलेला, खांद्यावर टॉवेल किंवा शेला गुंडाळलेला असा पेहराव असायचा. बाया नऊवारी लुगडं, चोळी, गळ्यात काळी पोत, चांगल्या घरच्या असतील तर पायात चांदीची पायपट्टी, सोन्याची एकदाणी, हातात चांदीची किंवा खुराच्या पाटल्या व पायात कडे असा पेहराव असायचा. तरूण शिकलेल्या मुली मात्र पाच वारी गोल साडी, पोलका किंवा ब्लॉउज, असे कपडे वापरीत. बंजारी बायांचा मात्र वेगळा पेहराव होता.
आमच्या गावापासून एका वावराच्या अंतरावर यवतमाळकडे सरळ जाणार्या व डावीकडे बरबडा या गावला वळणार्या त्या कोपर्यात तीन-चार वावरं सामावेल असा समुद्रात असणार्या एखाद्या बेटासारखा एक डोंगर उभा होता. या डोंगराला आम्ही ‘बरड’ म्हणत होतो.
डोंगराच्या पायथ्याशी एक जुनाट व वयस्कर कडूनिंबाचं झाड आपल्या फांद्या पसरवून उभं होतं. या झाडाजवळ गोठाण होतं. तेथे आमच्या गावचा गायकी गायी जमा करून गायरानात, जंगलात चारायला घेऊन जात असे. म्हणजेच निसर्गाने आमच्या गावच्या जनावरांना जगण्याची एक प्रकारची खास व्यवस्था या डोंगर-बरडाची निर्मिती करुन केली होती, असेच म्हणावे लागेल.
एखादी स्त्री दागिनं घातल्यावर जसं तिचं देखणंपण उठून दिसते, तसंच आमचं गाव या डोंगरामुळे उठून दिसायचं. आमच्या गावचं सौंदर्य खुलवणारं ते दागिनंच होतं मुळी…! पावसाळ्यात तर हिरवळीमुळे त्याचं सौंदर्य आणखीनच विलोभनीय वाटत असे. म्हणून आम्हाला या डोंगराचा फार गर्व वाटत होता. हा डोंगर म्हणजे आमच्या गावाची ओळख हो्ती. कुणीही डोंगरापासचं ’चौधरा’ म्हटलं, की आमच्या गावाला ओळखत असत. म्हणून मला या बरडाचं फार आकर्षण होतं.
डाव्या बाजूला परशाच्या वावराला लागून दुसरा एक विस्तीर्ण पसरलेला डोंगर खरोल्याच्या जंगलापर्यंत गेला होता. आमचे गाव या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले होते.
मी यवतमाळला शिकत असतांना कधी सुट्टीत घरी आलो की मला पहिल्यांदा या बरडावर फेरफटका मारण्याची मोठी उत्सुकता लागत होती. खूप दिवसापासून या बरडाला गेलो नाही की मला सारखं अस्वस्थ वाटायचं.
मग मी आईला म्हणायचो,
‘आई, मी बरडावर चाललो.’
‘जा पण जरा पाहून जा. तेथे विंचू-काटा, सरपं असतात… आणि लवकर ये.’
‘हो. येतो लवकर…’ असं म्हणून मी बरडाकडे जायला निघायचो.
बरडाच्या खाली यवतमाळकडे जाणार्या रस्त्याने खेळण्यासाठी भरपूर जागा होती. तेथे उन्हाळा-हिवाळ्यात आम्ही मुलं गिल्ली दांडू खेळत होतो. गिल्ली हळूच उडवून तिला दांडूने जोरात मारून दूर भिरकावून देत होतो. मग गिल्ली जेथे पडली तेथून ज्याच्यावर राज असायचा तो लंगडत लंगडत यायचा.
कडूनिंबाच्या झाडाजवळून वर चढतांना एक सपाट मोकळं पठार यायचं. मग तेथून टोंगळ्याला हात टेकवत-टेकवत, तोल सावरत-सावरत डोंगरमाथ्यावर चढायला हुरुप वाटायचा. वरती माथ्यावर लहान मोठे दगडं निसर्गाने जागोजागी मांडून ठेवलेले होते. मोठमोठ्या दगडावर चढून बसायला मस्त मजा वाटत होती. डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी उंच झाडे होती.
माझ्या उंचीपेक्षाही मोठा व हाताच्या कवटात मावणार नाही; अशा त्या दगडावर येऊन बसलो. त्याला मोठे व्हायला किती वर्ष लागले असतील, नाही का ? असा विचार माझ्या मनात चमकून गेला.
मनाला शांती पाहिजे असेल, आजूबाजूला घडणार्या क्रौर्यापासून मन थिजले असेल, गोठले असेल तर या बरडाच्या दगडावर येऊन बसावं ! आनंदाचा, शीलतेचा प्रसन्न शिडकावा करणारा. हा अनुभव अत्यंत विस्मयकारी वाटत होतं !
आपल्याच मनातले विचार मोकळे करावे, आपण आपल्याशी संवाद साधावा, भाव-भावनांचा निचरा करावा असे ते जिवाभावाचे व हक्काचे ठिकाण वाटत होते.
मला तर या बरडावर यायला फार आवडत असे. माझ्या अबोल व लाजर्याबुजर्या स्वभावामुळेच मला कदाचित निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असावं.
वर डोंगरावर सागाचे, धावड्याचे, पळसाचे, टेंभराचे, भराडीचे, खैराचे, कडुनिंबाचे, येणाचे असे अनेक प्रकारचे कितीतरी झाडं होते. कुठे कुठे श्वास घेतांना गुदमरेल अशी दाट झाडी होती; तर कुठे कुठे श्वास मोकळेपणाने घेता येईल असा सपाट भाग होता.
माझ्या बाजूलाच कुणीतरी कुर्हाडीचे घाव घालून सागाच्या झाडाच्या फांद्या, फुलं, पानं असा सारा साजश्रुंगार उतरवून त्याला बोडकं करून टाकलं होतं. त्याला पाहुन माझे मन द्रवल्याशिवाय राहिले नाही. इतकं असूनही त्याच्या बुडाजवळ फुटलेली पालवी पाहून, मला वाटले खरेच कुणी कितीही घाव घातले; तरी परत फुलायचा वसा मात्र झाडं सोडीत नाहीत. फुलून पुन्हा दिमाखाने उभे होतात, जोमाने बहरतात.
मला धावड्याच्या झाडाचा डिंक अतिशय आवडायचा. तोंडात टकल्यावर त्याची चिक्कट चिक्कट चव अविट वाटायची. जास्त डिंक मिळाला, की त्याला घरी आणून विस्तवाच्या निखार्यावर भाजायचं, किंवा खायच्या तप्त तेलात तळल्यावर फुगून जायचा. त्याचा चिक्कटपणा कमी होवून मग तो आणखीच चवदार वाटायचा. म्हणून आणखी डिंक जमविण्यासाठी धावड्यांच्या झाडांचा शोध घेण्याचं वेडच मला लागून जायचं. डोंगराच्या माथ्यावरुन खाली उतरतांना दगड-गोटे, काट्या-कुट्या, पाला-पाचोळ्याला कधी तुडवत तर कधी चकमा देत, तर कधी झाडांच्या फांद्याना लोंबकळत कशीतरी कसरत करत मी त्या दाट झाडीतून खाली उतरत होतो.
झाडीमध्ये मी मित्रांसोबत मधमाश्याचे मोहळ शोधायचा. एखाद्या झाडा जवळ माशा घोंघावतांना दिसल्या, की त्या झाडावर मोहळ असलं पाहिजे असा अंदाज यायचा. मग त्या झाडाच्या गर्द फांद्याच्या आतमध्ये डोकावून पाहिलं, की काळेभोर मोहोळ अडचणीच्या व सहज दिसणार नाही अशा ठिकाणी फांदिला लटकलेले दिसायचं. त्याला झाडून लदबदलेलं सहद व पोळी खात होतो. त्याला झाडतांना गायीच्या शेणाची गोवरी पेटवून त्याचा धुपट त्या मोहळावर धरला, की माश्या उडून जात असत. त्यावेळेस फडक्याने तोंड व हात झाकून घ्यावे लागे. मग मधाचा डोळा व त्याला लागून असलेली पोळी ओरपून घेत होतो. ह्या मधावर तेथेच ताव मारीत होतो. मध पिल्यावर त्याचा जो चोथा असायचा; त्याला मेण म्हणत असत. बाया कपाळाला कुंकू लावतांना ते आधी त्या ठिकाणी लावीत असत. त्यामुळे कुंकू चिकटून बसत असे.
पोळीत मधमाश्याच्या जन्माच्या आधीच्या अवस्थेतील बारीक बारीक अळ्या असायच्या. ते खातांना दुधासारखी चव वाटायची.
एखाद्या झाडाच्या ढोलीत मधमाश्या आंत बाहेर पडतांना दिसल्या, की त्यात सातपुड्या मोहोळ असायचं. असे म्हणत की अशा मोहोळाला सात पुर्या असल्यामुळे भरपूर मध राहत. पण असे मोहोळ आम्ही कधी झाडले नाहीत.
मी डोंगराच्या खाली भोवताल दूरपर्यंत नजर टाकली. बरबड्याला पांदणीने जातांना पांडू लभानाचे वावर लागायचं. त्याच्या वावरात बिब्याचं घेरेदार झाड होतं. उन्हाळ्यात त्या झाडाजवळ मी हमखास गेल्याशिवाय राहत नव्हतो. बिब्याच्या तेलाने झाडाच्या खालची जमीन तेलकट झालेली दिसायची. कधी कधी मला बिब्याचे पिकलेले फुलं दिसायचे; ते तोडून मी खात होतो. बिब्याच्या फळाला टोचले, की त्यातून तेल निघायचं. हे तेल अंगाच्या त्वचेला लागलं, की उतून यायचं. या बिब्याला जाळल्यावर त्यातून टपटप तेल गळायचं. हे तेल औषधी म्हणून उपयोगात आणीत असत. हे तेल विड्याच्या पानात टाकून खात असत. माझे बाबा हे तेल कमरेला लावीत असे. कोणी कोणी भेगा पडलेल्या पायाला हे तेल लावीत असत. जाळलेल्या बिब्याला फोडल्यावर त्यातून बी काढले म्हणजे गोडंबी ! हे बी पोष्टिक असून खायला चवदार लागायचं. आम्ही या वावरातून किंवा जंगलातून बिबे आणून त्याला भाजून गोडंबी चविने खात होतो.बिब्याचं झाड, त्याचं फूल, फळ, तेल सारे काही कोकणातल्या काजू सारखंच होतं. त्यामुळे या दोघांची जातकूळी एकच आहे की काय, असे वाटते.
जवळच लांडग्याचं वावर दिसत होत. त्याचं मूळ नाव बंन्शी असे होते. पण त्याला लांडग्या का म्हणत होते, ते मलाही माहीत नव्हतं. तसंच किसन्याच वावर, परशाच वावर, भगवानचं वावर, गावातील लोकांची निरनिराळे घरे, अलग-अलग दिसणारा बौध्दवाडा व लभानाचा तांडा, या दोन समाजाला दुभंगणारा तो बैलगाडीचा रस्ता, रामदासच्या घराजवळचा पंचशीलचा झेंडा, शिवा-आबाजीच्या घराजवळचा खूप वयाचा, मायेचं छत्र धरुन विस्तिर्ण पसरलेला, ठसठशीत पिंपळवृक्ष, गुलाब-दादाच्या घराजवळचा व वाल्ह्याच्या खारीच्या धुर्यावरचं चिंचेचं मोठं झाड, सुखदेवच्या घराजवळचं बोरीचं झाड, श्रावणमामाच्या घराजवळील भरगच्च पानाने भरलेलं भारदस्त चिंचेचं झाड, त्याच्या बुंध्यापाशी ठेवलेलं मातामायचे दगडं, माझ्या देखण्या वाड्यासमोरचं मारुतीचं देऊळ व शेंड्यावर भगवा कापड बांधलेला उंच लाकडाचा झेंडा. असा तो आजूबाजूचा परिसर मी न्याहाळत होतो.
गावाजवळच्या शेताला लागून एक नाला – ज्याला आम्ही लवण म्हणत होतो, वाहत गेला होता. पुढे तो वाघाडी नदीला जाऊन मिळाला होता. एखाद्या वेळी सावरगडच्या किंवा
तुकाराम-काकाच्या शेतात जायचे असले, की हाच नाला ओलांडून जावे लागत होते. पावसाळ्यात हा नाला तुडूंब भरुन वाहत असे. माझ्या वावरात जातांना हा नाला लागत होता. आमच्या गावच्या बाया-पोरी धुणं धुवायला तेथे जात असत.
वाघाडी नदी लागण्यापूर्वी हा नाला ओलांडला, की समांतर अशी मळलेली आडवी-तिडवी पांढरी निमुळती पायवाट लागायची. खाली पाहिल्यावर खोल दरी दिसायची. एखाद्या वेळेस पाय घसरला की त्या खाईत पडण्याची भीती वाटायची. हा पूर्ण भाग गवताने झाकून गेलेला असायचा. त्या हिरवळीत सुगंधीत वासाचं तिखाडी गवत होतं. आम्ही त्याला चहात टाकत होतो; त्यामुळे चहाला सुध्दा सुगंधीत वास यायचा. असं ते अनोखेपणा पाहून मला निसर्गाचं मोठं नवल वाटत होतं.
तसेच ह्या नाल्याच्या काठावर कुसळी गवत दूरवर पसरलेले रहायचे. ते सुईसारखे कपड्याच्या आतमध्ये शिरुन पाया-पोटर्याला टोचत असे. आम्ही या कुसळ्या गवताचा मजेशीर प्रयोग करत होतो. ह्या कुसळ्याला वाळलेल्या पोकळ भोपळ्यामध्ये टाकून पाण्याचा शिडकावा मारल्यावर गलंडत गलंडत चालत असे.
अशा अनेक आठवणीने डोक्यात थैमान घातलेलं होतं. गतस्मृतीचा चित्रपट मनचक्षूसमोर सरकत जात होतं.
एकदा माझा मोठा भाऊ, शामराव-दादा बैल चारुन संध्याकाळी घरी येत होता. त्याला पतंग एका झाडावर लटकलेली दिसली. ती पतंग बहुदा कटलेली यवतमाळवरुन उडत उडत आली असावी. ती घेऊन घरी आला. त्याच्या हातात पतंग पाहून मी आतूर झालो होतो. मला देवून म्हणाला,
’त्याचा मांजा, केशवच्या धुर्याच्या सागावर पडला आहे. सकाळी घेऊन ये.’
मी सकाळी मांजा आणायला गेलो. तो खूप लांबच लांब होता. या झाडावरुन त्या झाडावर तोरण बांधल्यासारखा पसरलेला होता. मला तो धागा जमा करतांना खूप परिश्रम घ्यावे लागले. सर्व मांजा मी एका काडीला गुंडाळून घेतला. नंतर बरेच दिवस ती फाटेपर्यंत गोठाणावर जाऊन उडवत होतो.
गावातल्या जवळपासच्या शेतातील आंबे पाडाला आल्यानंतर उतरवून घेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडण्यापूर्वी बहुदा सर्व आंबे खुडूक होवून जात असे, पहिला पाऊस पडल्यावर आम्ही पोरं अशा झाडांच्या मागे फिरत होतो. एखाद्यावेळेस डहाळीच्या मागे किंवा पानाच्या मागे एखादा आंबा लपलेला दिसला, की आम्ही मोठे हरकून जात होतो. मग एकतर झाडावर चढून तो आंबा तोडत होतो किंवा एकामागे एक दगडं फेकून; तो आंबा पाडत होतो.
बरडाजवळ बरबड्याला जातांना सागरगोट्याचा काटेरी वेल होता. त्याच्या फळाला सुध्दा बारीक काटे होते. त्यातून सागरगोट्या काढायचे म्हणजे दिव्यच काम असायचे. ह्या सागरगोट्या आम्ही खेळण्यासाठी वापरत होतो. सागरगोट्याबाबत असे म्हणतात, की ’वरचे टरफल काटेरी असते पण आतमात्र सागरगोटा दडलेला असतो. तसाच संसार असतो नाही का?’
लांडग्याच्या वावराच्या धुर्यानं किसण्याच्या वावराला लागून मी परसाकडे जात होतो. तिकडे ज्येष्टमधाचा वेल होता. त्या वेलीला लाल रंगाच्या गोलसर आकाराचे सुंदर दिसणारे गुंजा लागत होत्या. मी त्या तोडून घरी आणत होतो. तसेच वेलाच्या काड्या खाल्ल्यावर तोंडाला सूरस चव यायची.
थोडी रात्र झाल्यावर वटवाघळं झुरर्कन इकडून तिकडे व तिकडून इकडे उडत जायचे. मग आम्ही पोरं तुराट्या हालवत त्यांना पाडायचा खेळ खेळत होतो.
सुखदेवच्या घराजवळ एक बोरीच झाड होतं. बोरं पिकल्यावर आम्ही पोरं त्या झाडावर चढत असे. हाता-पायाला, बोटाला काटे जरी बोचत असले, अंगातला कपडा जरी फाटत असला, तरी त्याची फिकीर न करता पिकलेले व गाभूरलेले बोरं शोधून खाण्यात मोठी मजा वाटत होती. तासन-तास त्या झाडावर राहण्याचा आमचा उद्योग चालायचा. त्या झाडाच्या खाली एक पडकी विहीर होती. त्या विहिरीला पाणी नव्हते. ती कचरा काडीने अर्धवट बुजवलेली होती. कधी कधी आम्ही त्या विहिरीत उडी घेऊन मजा-मस्ती करत होतो.
एकेवर्षी कुणीतरी खोडकर माणसाने किंवा कदाचित एखाद्या मुलाने या झाडावर अधरवेल आणून टाकली होती. त्यामुळे ती अधरवेल हळूहळू पसरून पूर्ण झाडाला वेढा घातला होता. ह्या अधरवेलची गोष्टच वेगळी… तिला पाने फुले नसतात. नुसती बोडकी. पिवळ्या रंगाची, बारीक दोरीसारखी. एखाद्या झाडावर या वेलाचा लहानसा तुकडा जरी टाकला, तरी ती इतकी झटपट पसरते की काही दिवसातच ती त्या झाडाला पूर्णपणे वेढून घेते. फार चिवट असते. लवकर मरत नाही. म्हणून कुणाला त्रास द्यायचा असला की, खेड्यात उपद्रवी लोक या वेलाचा हमखास उपयोग करतात.
गुलाब-दादा, त्याची बायको म्हणजे पार्वती-वहिनी, मला दिराच्या नात्याने थट्टामस्करी करायची – त्याच्या घराजवळच्या चिंचेच्या झाडाखाली आम्ही कधी कधी पत्ते खेळत होतो. भक्क्यात पैसे टाकण्याचा खेळ खेळायचो. कधी सागरगोट्या, चिंचोके तर कधी पळसाच्या पापड्याच्या चापट बिया ज्याला आम्ही पैसे म्हणत होतो – ते खेळायचो.
चिंचेचा कोवळा कोवळा बार मस्त लागायचा. घरी आणून त्याची चटनी करुन खात होतो. झाडावर चढून गाभुरलेल्या चिंचा पाहिल्या, की तोंडाला पाणी सुटायचं. त्या तोडून खाण्यात खूप मजा वाटायची.
वाल्ह्याच्या आंब्याच्या खारीत देवाचा पार होता. पाराजवळ दगडाचे दोन-तीन देव मांडले होते. त्याच्या जवळ एक लाकडाचा झेंडा रोवला होता. आम्ही त्या पारावर बसून पोळ्याच्या करीला गंजिफा खेळत होतो.
दगडाची निंबूच्या आकाराची गोल गोळी ढोपरानं ढकलत ढकलत भक्क्यापर्यंत नेणारा एक खेळ आम्ही त्यावेळी खेळत होतो. याला ‘ढोपर खेळणं’ म्हणायचो.
भोवरा फिरवण्याचा आणखी एक खेळ आम्ही खेळत होतो. लाकडी भोवर्याला सुताची दोरी गुंडाळून त्याला खाली विशीष्ट लकबीने जमिनीवर फेकायचो. त्याला टोचलेल्या अनुकूचीदार खिळ्याच्या टोकाने तो फिरायला लागायचा. त्याला एका बोटावर उचलून हाताच्या पंज्यावर घेतला, की तो हातावर फिरत राहायचा. हे कौशल्य सर्वांनाच जमत नव्हते. मी मात्र सरावामुळे या खेळात चांगलाच तरबेज झालो होतो.
तसंच एक वर्तूळ आखून त्यात भोवर्याच्या खेळात भाग घेणारे आपापले भोवरे ठेवत. जो जिंकला तो त्या वर्तूळातील एखाद्या भोवर्याला आपला भोवरा टोचेल अशा पध्दतीने फिरवून मारत असे. आणखी देवळाजवळ आम्ही कबड्डीचा व खोखोचा खेळ पण खेळत होतो. असे नानातर्हेचे खेळ आम्ही मुलं खेळत होतो.
आम्ही मुलं कधी कधी बांबूच्या कांबीला दोरी बांधून कामठ व ज्वारी किंवा बाजरीच्या धांड्याच्या सरीचा तीर बनवित होतो. तीन पायाच्या म्हणजे टेकोडयाच्या वरच्या टोकाला प्रत्येक खेळाडू मेण चिकटवीत असत. जो कोणी तीराने त्याला उडवित असे, त्याला सारे मेण मिळत असे. किंवा कामठीला मेण लाऊन त्या कामठा एकमेकांजवळ उभे ठेवत होतो. जो कोणी तीराने त्याला पाडत असे, त्याला सारे मेण मिळत असे. अशाप्रकारचे मजेशिर खेळ आम्ही खेळत होतो.
माझ्या घरासमोरील देवळाजवळ त्यावेळचा ढब्बू व भोकाचा पैसा भक्क्यात टाकण्याचा खेळ खेळत होतो. तसेच कांचेच्या गोळ्या पण भक्क्यात टाकण्याचा खेळ खेळत होतो. माझा नेम बर्यापैकी होता. म्हणून मी या दोन्ही खेळात जिंकत होतो. माझ्यापेक्षा धनपालचा नेम अचूक होता.
जमीन ओली असली की, आम्ही मुलं लोखंडी कांब जमिनीत खुपसत जाणे म्हणजे खुप्पसचा खेळ खेळत होतो. हा खेळ सहसा पावसाळ्यात खेळत होतो.
ज्ञानेश्वरच्या घराजवळ एक उंचच उंच वाढलेलं – जुनाट असं कडुनिंबाचं झाड होतं. उन्हाळ्यात त्याचे पाने झडून जात. मग त्या झाडावर सहज चढता येत होतं. त्या झाडावर कावळ्याचे घरट्यातील अंडे पाहण्यासाठी मोठी उत्सुकता वाटायची. झाडावर चढतांना कावळ्यांची जोडी कावऽऽ कावऽऽ असा कल्ला करीत, माझ्या भोवताल घिरट्या मारत. डोक्यावर टोचणे मारण्यासाठी अगदी जवळ जवळ येत. कदाचित कावळे म्हणत असतील, ‘आम्ही काडी काडी जमा करून घरटी बांधतो, अन् तुम्ही लोक आमचे घरं उध्वस्त करता ? काय म्हणून ?’
कावळ्याच्या घरट्यात कोकीळा आपलं अंड टाकीत असतात; असं मी पुस्तकात वाचंल होतं. म्हणून त्यात कोकीळेचं अंड आहे की काय, म्हणून पाहण्याची उत्कंठा लागायची.
लभान तांड्याकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूला भल्ल मोठं, विस्तीर्ण पसरलेलं पिंपळाचं झाड होतं. उन्हाळ्यात जुने पाने झडून किरमिजी रंगाचे नवीन पाने येत; तेव्हा हे झाड आणखीनच सुंदर नटलेलं दिसायचं.
हे झाड म्हणजे जसं जूनंजाणतं माणूस घरात असलं की कसं सुरक्षित वाटतं, तसच या झाडाकडे पाहिले की गावात सुरक्षित वाटायचं. या झाडाने गावातले दोन समाज विभागून टाकले होते. झाडाच्या पलीकडे लभाणतांडा तर अलीकडे बौध्द मोहल्ला. या झाडाला कोणाचाही भेदभाव नव्हता. जसे त्यांना सावली द्यायचा; तसेच आम्हाला पण द्यायचा.
पाखरं या झाडाच्या फांद्यावर बसून गुणगुणत, त्याच्या लालझुरूक फळांच आस्वाद घेत. दुपारी उन्हाच्या चटक्यापासून स्वत:चं रक्षण करीत. गायीढोरं पण या झाडाखाली दाटीवाटीने बसत. आम्ही पण या झाडाच्या सावलीत मस्तपणे खेळत होतो. त्यामुळे हे झाड जणूकाही मायेचं छत्र धरून उभं आहे, असंच वाटायचं. याच झाडावर संध्याकाळच्या वेळी पाखरांचे थवेच्या थवे किलकिलाट करतांना पाहून अंधार पडण्याची जाणीव अस्वस्थ करीत असे. रात्र झाल्यावर मात्र त्यांचा गोंगाट एकाएकी बंद झाला की गावात किर्र शांतता पसरायची.
अशा प्रकारच्या आठवणीच्या तंद्रीत मी धुंद झालो असतांना, अचानक कुणीतरी झोपेतल्या मानसाला खलंखलं हालवून ऊठवावे तसे मला झाले. मी तंद्रीतुन जागा झालो. पाहतो तर एक भला मोठा साप चार-पाच हात लांब असलेला, सळसळ करत चालला होता. माझं सर्वांग शहारुन गेलं. दरदरून घाम फुटला.
खेड्यामध्ये सापांचा सुळसुळात असतो. कधी साप चावेल याचा नेम नसतो. अनेक लोक साप चाऊन मरत असतात.
हाताच्या कवेत मावेल अशा दगडाला जोर लाऊन ढकलून पाहण्याचा मला एक छंद जडला होता. कारण त्या दगडाच्या खाली एखाद्यावेळेस विंचू तर कधी इंगळ्या तर कधी गोमी दिसायच्या. मला त्यांची फार भीती वाटायची. असं काही दिसलं, की अंगावर सरसरून काटा यायचा. तरीही त्याना पाहण्याची मोठी ओढ दाटून यायची. शेतात गेलो की, तेथेही असेच उगीच दगडं ढकलून त्याच्या खाली काय काय जीवजंतू वास्तव्य करीत असतात; ते पाहण्याचा उद्योग करत होतो.
विंचू नांगी वर करुन चालायचा. त्याच्या नांगीला अनकुचीदार सुईसारखा काटा असायचा. त्याने तो मारला की भयानक आग व्हायची. चोवीस तास पर्यंत त्याचे विष उतरत नसत. त्याला एका बारीकशा काडीने पकडून, इकडून तिकडे व तिकडून इकडे करत, त्याचेशी खेळत राहण्यात मजा वाटायची. इंगळीत तर सात विंचवाचं विष असते, असे म्हणतात. गोमीला अनेक पाय असतात. इतके की एखादा पाय तुटला; तरी गोमीचं काही बिघडत नाही, अशी म्हण आहे. एकदा मी असंच उन्हाळ्यात झाडं-झुडपं पाहत पाहत खरोल्याच्या जंगलापर्यंत गेलो होतो. तेथे एका टेंभराच्या झाडाला मस्तपैकी पिकेलेले फळं लागले होते. ते पाहून कुणाचही मन अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते तोडण्यासाठी झाडावर चढलो. चांगले तोडून हाफपॅंटच्या खिशात मावेल इतके टेंभरं तोडले. मग मी खाली ऊतरायला लागलो तर माझ्या नजरेसमोर एक लाल-झुरुक इंगळी त्या खॊडावर दिसली. त्याच क्षणी मी खाली उडी मारली. बापरे…! चावली असती तर ? मी त्या कल्पनेने इतका घाबरुन गेलो, की मला दरदरुन घाम फुटला होता. अंगावर सरसरुन काटे उभे झाले होते. कुणी म्हणतात, या इंगळीत बारा विंचवाचे विष असते. म्हणजे किती जहरी असेल !
एकदा तर मोहाच्या झाडावर माझ्यासमोर साप होता. त्यावेळी मी मोहाच्या टोळ्या जमा करण्यासाठी दूर खोसाट्यात जात होतो. मोहाचे पिकलेले फळे गोड लागत होते. ते खाऊन त्याच्या बिया वाळवून विकत होतो. त्याला टोळ्या म्हणत असत.
असे जीवावर बेतणारे काही प्रसंग येऊन गेले होते. त्या आठवणी उफाळून आल्या, की अजूनही पोटात भीतीचा गोळा उभा राहतो.
आता मला घरी येण्याचे वेध लागले होते. मी डोंगरावर आलो होतो, तेव्हा डोक्यावर सूर्य होता. आता डोंगराच्या सभोवताली गवसणी घालत असतांना सूर्य कधी मावळतीला गेला ते कळलेच नाही.
आता सूर्य पूर्णपणे आभाळात लुप्त झाला होता. आमचं सारं गाव अंधारात गुडूप होवून गेलं होतं. जणू काही सूर्याला आता काळोखाने गिळून घेतले होते की काय, असं वाटायला लागलं. माझं मन उदासिनतेनं पुर्णपणे घेरलं होतं. घराच्या अंगणात पाय टाकल्यावर मात्र उदास मनाला तरतरी आली होती.
मी ज्या गावात जन्म घेतला, लहानाचा मोठा झालो, असं ते गाव अमानवी जाती-भेदाच्या कचाट्यात सापडून हिंदू धर्माच्या रोगट संस्कारामुळे बाटोडं झालं होतं. ही गोष्ट माझ्या संवेदनशील मनाला सतत टोचत राहत होती.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
जसं प्रत्येक गावात जातीची गुंतावळ असते, तसंच आमच्याही गावात होतं. त्याला आमचे गाव थोडेच अपवाद असू शकते ? आमच्या गावाचं इतर गावापेक्षा मात्र एक ठळक वैशिष्ट्य होतं; ते म्हणजे येथे फक्त दोन जातीचे लोक राहत. अर्धे बौध्द व अर्धे बंजारी…! तिसर्या जातीचं एकही घर औषधाला सुध्दा मिळत नव्हतं.
बंजारी लोकांची संस्कृती, रितीरिवाज, पेहराव, बोलीभाषा, सणवार सगळं काही आमच्या बौध्द लोकांपेक्षा वेगळेच होते.
माणसांचा पेहराव जरी सारखा असला तरी, बंजार्याच्या बायांचा मात्र ठसठशीत उठून दिसेल असा वेगळाच होता. त्या घागरा किंवा लेहंगा घालून कमरेला कपड्याच्या कशाने बांधून घेत. हा घागरा इतका घेरदार असायचा की असं म्हणतात, ’त्यात संकटकाळात एखाद्या व्यक्तीला लपविता येत होतं’. अंगात चोळी किंवा कंचोळी घालून छातीचा पुढील भाग झाकलेला, तर मागील भाग पूर्णत: उघडा असलेला. त्याला चिंधीच्या कशाने बांधून घेतलेला. डोक्यावर रोवलेले दोन शींगे, त्यावर खालपर्यंत लोंबलेली चुनरी किवा ओढणी असा त्यांचा पेहराव असायचा.
लभानी बायांना दागिन्याची भारी हौस ! कानाच्या दोन्ही बाजूंना कानशिलावर सोडलेल्या केसाच्या बटांना चांदीसारख्या धातुचे दागिने, हातात हातभरुन पांढर्या बांगड्या, बोटात आंगठ्या, पायात पितळेचे किंवा तांब्याचे तोडे, डोक्याला मध्ये भांग, केसाच्या मागच्या बाजूला लोकरीचे लहान लहान गोंडे असे त्या विविधतेने सजायच्या. म्हणूनच स्त्रियांच्या वेशभूषा व पेहरावावरून हा समाज सहज ओळखल्या जातो.
ही जमात गो-पूजक असल्याने माणसं आपल्या नावात शेवटी सिंग असा सन्मानजनक शब्द लावत. त्यामुळेच आमच्या गावात हरसिंग, रामसिंग, चंदूसिंग भदूसिंग अशा नावाचे लोक होते. बाया तर गायी-बैलासारखे दोन शींगे आपल्या डोक्यावर रोवत आणि त्यावर ओढणी अडकवत.
पहिल्यांदा सासरी जाणारी मुलगी तांड्यातील काही नातेवाईकाच्या घरोघरी जाऊन रडण्याचा कार्यक्रम करीत. रडतांना एकमेकींचा गळा धरुन, ’याडी… हं….हिय्या…’ असे आर्त स्वरात म्हणत. तेव्हा ते करुणेनं ओतप्रोत भरलेलं दृष्य पाहून माझही मन ओघानेच हेलाऊन जात होतं.
बंजारी सुनांना सासरी फार जाच होत असतो, असे लोक सांगत. एव्हढेच नव्हे तर कुठे कुठे सासू-सासरे सुनांकडून रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय चेपून घेण्याची परंपरा असल्याचे सांगत. अशा छळवणुकीच्या कथा सासरी गेलेल्या मैत्रिणीकडून ऐकत असल्याने, पहिल्यांदा सासरी जाणार्या मुली फार घाबरत. म्हणूनच त्या केविलवाणी रडत. एकदा एक मुलगी सासरी जाण्यासाठी गाडीत बसतच नव्हती. मोठ्या मुष्किलीने तिला गाडीत बसवल्यावरही ती गाडीतून उतरण्यासाठी उडी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले होते.
त्यांच्या लग्नातल्या गमती-जमती आणखी सांगण्याजोग्या आहेत. नवरदेवाची ते भारी मजा करीत. त्याला कोयपरावर बसवून आंघोळ घालीत. त्याची आंघोळ झाल्यावर त्याच्या समोर एक माणूस येरणी – मातीचं एक पसरट भांडं, त्याच्यासमोर झुलवत. ती येरणी फोडल्यावरच त्याची त्यातून सुटका होत असे.
नवरीला कुणाच्या तरी घरी लपवून ठेवत. नवरदेव बिचारा…! तिला हुडकण्यासाठी डफडं वाजविणार्या ढाल्यासोबत तो फिरत असे. त्या डफड्याचा कडकडाट पूर्ण गावात उमटत असे.
या लोकांना लभानी किंवा गोरमाटी किंवा गोरबंजारा असेही म्हणत. गो म्हणजे गाय, र म्हणजे रक्षण किंवा राखण करणे, बनज म्हणजे व्यापार आणि बनजारा म्हणजे व्यापार करणारा. मोठ्या प्रमाणात गुरे-ढोरे यांच्याकडे असल्याने पुढे या जमातींनी बैलांच्या पाठीवर सामानाची ने-आण करण्याचा धंदा सुरु केला.
जसे त्यांचे रीतिरिवाज, सणवार, पेहराव अगदी आमच्यापेक्षा वेगळेच, तसेच त्यांची भाषा पण वेगळीच… गोरबोली…! ‘काई भिया कत जारोची ? म्हणजे काय भाऊ, कुठे चाललास ?’ काई कररोची ? म्हणजे काय करत आहेस? अशी…! आमच्या येटाळातील म्हणजेच मोहल्ल्यातील लोकांना त्यांची भाषा समजत होती. काही लोकांना बोलतादेखील यायचं. मला सुध्दा त्यांची भाषा समजायची. काही वाक्य बोलताही यायचं. पण तेवढं सराईतपणे बोलता येत नव्हतं.
ते आमचा बाट करीत असत. त्यांच्या भांड्याला किंवा भाकरीच्या फडक्याला शिवू देत नसत. त्यांना जर आम्हाला चहा-पाणी द्यायचे असले, तर त्यांचेकडे आमच्यासाठी वेगळी कप-बशी व गिलास ठेवलेले असायचे. ते आमच्याकडे कधी चहा पीत नसत किंवा काही खात नसत. त्यांना आम्हाला शिवी हासडायची असली, की ‘धेड’ असा शब्द वापरीत. हे शब्द कानावर एखाद्या तप्त गोळ्याप्रमाणे आदळले, की पायाची आग मस्तकात जायची; इतकी चीड या शब्दाची आम्हाला वाटत होती. आम्हाला शहरातील शाळा-कॉलेजात व होस्टेल मध्ये जेथे जेथे बंजारी जातीचे मुले असायचे, त्यांचेकडून असा जातीभेद जाणवला नाही. आमच्याही गावात नंतरच्या काळात मात्र हा बाट कमी कमी होत गेला.
एकदा आमच्या गावात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम होता. त्यावेळेस पुढार्यांच्या भाषणानंतर तिवसा या गावचे मनमोहन राठोड, या भजन मंडळाने भीमगिते व बुध्दगिते गायीले होते. त्यावेळेस एक बंजारी व्यक्ती बाबासाहेबांचे गाणे म्हणू शकतात, याचा मला अचंबा वाटला होता.
त्यांनी ‘सेवाभाय आणि मरयम्मा याडी’ यांच्या जीवनावर सुध्दा ‘सेवालाल महाराज की जय’ म्हणत, नागडा, थाळी व झांज वाजवत परंपरागत पध्दतीने बंजारी गीत गायले होते. त्यावेळेस अख्ख वातावरण उत्साहाने आणि चैतन्याने भारून गेलं होतं. त्यांच्या भजन मंडळाचे सर्व लोक आमच्या घरी चहा-पाणी घ्यायला आले होते. त्यात आमच्या गांवातील त्यांच्या जातीचा केशव पाटील व आणखी काही बंजारी सुध्दा होते. ह्या दोन जातीच्या मनोमीलनाचा माहौल पाहून जणू काही जातीभेदाच्या भिंती तटातट तूटत आहेत की काय, असा भास होत होता.
बंजारा समाजात अशी एक लोककथा आहे, की भगवान बुध्दाच्या काळात तपसू आणि भल्लिक हे दोघे व्यापारी-भाऊ बैलाच्या ताफ्यासह तांडा घेऊन जात असतांना भगवान बुध्द तपश्यर्या करीत असतांना दिसले; तेव्हा त्यांनी भगवान बुध्दाला सुका मेव्याचा आहार दिला. भगवान बुध्दांनी त्यांना दिक्षा दिली व ’ताडो, शिळो कर’ असा आशिर्वाद दिला. ’ताडो, शिळो कर’ याचा अर्थ, ’तुमचे दु:ख कमी होवो.’ असा आशिर्वाद देण्याची प्रथा आजही बंजारा समाजात प्रचलित आहे. म्हणून हा समाज बौध्द धर्मीय असावा, असा निष्कर्ष निघतो.
असं म्हणतात, की हे बंजारी लोक मुळत: निसर्गाची पूजा करीत होते. सूर्य आणि पृथ्वीचे ते पूजक होते. नंतरच्या काळात मात्र ते हिंदुचे देव-देवी पूजायला लागलेत.
आमच्या घरासमोर मारुतीचे देऊळ होते. खेड्यात देऊळ बांधण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी एक खास व्यवस्था केलेली असते. त्याला देवस्थान म्हणतात. देवस्थानाचे सभासद गावातील शेतकरी असतात. माझेही बाबा या देवस्थानाचे सभासद होते. या देवस्थानाच्या मालकीचे वावर असते. ते वावर मक्त्या-बटईने कुणीतरी वाहून देवाच्या खात्यात पैसा जमा करतात. या पैशाचा वापर शेतकर्यांना व्याजाने कर्ज देण्यासाठी करतात. अशाप्रकारे जमा झालेल्या पैशातून देवळाची देखभाल आणि धार्मिक कार्यक्रमासाठी करीत असतात. आमच्या गावातील हरसिंग-लभाण हे वावर वाहायचा. तोच देवळाचा पुजारी होता.
अशीच व्यवस्था शाळा व मुलांच्या शिक्षणासाठी केली असती तर…? त्यामुळे शिक्षणाचे लोन खेड्यापाड्यात सर्वदूर पसरले असते… नाही का ? पण नाही… मग लोकांना अडाणी, देवभोळेपणा व अंधश्रद्धेत कसे गुंतून ठेवता आले असते ?
देऊळाच्या गाभार्यात एक मोठा दगड ठेवला होता. त्याला मारुती म्हणत. त्याची पूजा करायला हरसिंग-लभान दर शनिवारी सकाळी यायचा. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळचं बोट नेहमी सरळ राहत होतं. ते कधी वाकत नव्हतं. त्याच बोटाने तो खायच्या तेलात शेंदूर भिजवून दगडाच्या देवाला चोपडायचा. मग नारळ फोडायचा. खोबर्याचा एक लहानसा तुकडा तेथे ठेवायचा. बाकी हजर असलेल्या लोकांना ’शिरणी’ म्हणून द्यायचा. मी त्यावेळी लहान होतो, तेव्हा शिरणी खाण्यासाठी तेथे घुटमळत राहत होतो. असेच आणखी काही लभान लोक येऊन पूजा करीत होते.
धनपत नावाचा एक राजपूत जातीचा अनाथ, तोतड-तातड बोलणारा माणूस हरसिंग लभानाच्या घरी राहत होता. तो त्यांच्याकडे गाई-ढोरांचे शेण-मूत काढण्याचं काम करत होता. तो या मारुतीला पाण्याने धुण्याचं व संध्याकाळी नित्यनेमाने दिवा लावण्याचं काम करत होता. तो दोन-चार घरच्या भाकरी मागून आणायचा व देवळात येऊन त्याचा काला करून खायचा.
आमच्या येटाळातील कोणतेही लोक हिंदुच्या देवांची पूजा करीत नसत. बाबासाहेबांनी बौध्द धम्म दिला, तेव्हापासून त्यांनी हिंदुचे देव पुजणे सोडले होते. तसेही हे बंजारी लोक आमच्या लोकांना देवळाच्या गाभार्यात येऊ देत नसत. देवाला बाट होतो असे ते म्हणत असत. आम्ही पोरं, कोणी नाही असं पाहून त्या गाभार्यात जात होतो. मग त्या दगडाच्या देवाला ‘देव काय करते ते पाहण्यासाठी’ मुद्दाम हात व पाय लाऊन पाहण्याचं कृत्य करत होतो. देवाच्या वर बांधलेल्या घंटीला लटकून झोके घेत घेत त्याला लाथा मारत होतो. असं करतांना त्या देवाची यत्किंचितही भीती वाटत नव्हती.
पूर्वी याच देवळाच्या पारावर रात्रीला आमच्या येटाळातील लोक हिंदुच्या देवाचे भजन करीत असत. कोणीतरी साधू एकतारी तंबोर्यावर भजनं म्हणायचा. या भजनात बाकीचे लोक तल्लीन होवून जायचे. गोविंदामामा पोथी वाचायचा. भजनं व पोथीवाचन संपले की लोकांना गुळाचा काळा चहा म्हणजे बिना दुधाचा चहा पाजत. बौध्द धम्म घेतल्यावर सर्वांनी हे भजनं व पोथीवाचन सोडून दिले. त्याची जागा भीम-बाबा व बुध्दाच्या भजनांनी घेतले. .
बंजाराच्या मोहल्ल्याला ‘तांडा’ असे म्हणत. त्यांचा प्रमुख नायक असतो. रुपसिंग हा ’नायक’ होता. त्यांचा उपप्रमुख म्हणजे ’कारभारी’. हा ’कारभारी’ त्यावेळी पांडू होता. तसेच गावात जसा कोतवाल गावकीचे कामे करतो, तसाच तांड्याच्या कामासाठी ’ढाल्या’ असायचा. तो तांड्यातील उत्सवात डफळी पण वाजवायचा. तांड्याचा नायक व कारभारी यांचा गुणगौरव करणारा व किंगरी सारखे वाद्य वाजविणारा आणखी एक कलावंत असायचा. त्याला ‘दाढी’ म्हणत.
माझे बाबा सांगत होता की, ‘लभानाचे काही लोक आजूबाजूच्या गावातील तालेवान लोंकांकडे चोर्या-मार्या करीत होते. धनगर लोक बकर्या-मेंढ्या घेऊन आलेत, की त्यांच्या बकर्या चोरत. कुणाच्या शेतातील कणसं, कापूस चोरत.’
मात्र त्यांच्या इतिहासात असा उल्लेख आहे, की ब्रिटीशपूर्व काळात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा बैलाच्या पाठीवर गोणी लादून या गावचा माल त्या गावच्या व्यापाराला पोहचविण्याचं काम हीच जमात करीत होती. बैलांना चारा मिळावा म्हणून डोंगर-जंगलात राहत होते. कालांतरांनी ते स्थायीक झालेत.
शहरांतील किंवा गावातील काही सधन सावकार शेतकर्यांनी कर्जाची फेड थकविल्यामुळे खेड्यातील गरीब बिचार्या लोकांचे वावरं गिळंकृत करीत. ते कुळाने, मक्त्या-बटईने लोकांना वाहायला देत. असेच आमचे गांवातील काही लोक कुळाने शेती वाहत होते. बंजारी लोक सुध्दा याच प्रकारे दुसर्यांच्या मालकीच्या शेती कसत होते. तसे हे लोक खूप कष्टीक. नंतर कुळकायदा निघाला. ‘कसेल त्याची जमीन’ अशा कायद्यामुळे ते व आमच्याही मोहल्ल्यातील काही कुळधारक शेतमालक झाले होते. कित्येक वर्षापासून जमीनदारांनी कष्टकरी शेतकरी माणसाला सालदार, महिनदार, रोजंदार, कुळधारक म्हणून वेठबिगार बनविले होते. आता ते या प्रथेतून मुक्त झाले होते.
या समाजाचा समावेश भटक्या जमातीमध्ये होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या रेट्यामुळे, त्यांच्या इंग्रजांच्या काळातील गोलमेज परिषदेच्या अथक प्रयत्नामुळे व त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या स्वतंत्र्य भारताच्या संविधानात तरतूद केल्यामुळे मागासवर्गियांना शिक्षणामध्ये सवलती व नोकरीमध्ये राखीव जागांचा फायदा मिळाला. तसा तो या समाजाला सुध्दा मिळाला. परंतु प्रस्थापित समाज व्यवस्थेने बाबासाहेबांचे हे कार्यकर्तृत्व त्यांनाच काय, एक बौध्द समाज सोडला तर कुणालाच कळू दिले नाही.
तरीपण जातीची गुंतावळ तोडण्याच महत्वाचं काम खर्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषानेच केले, ही गोष्ट कधीतरी त्यांना कळेलच…!
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
असं म्हणतात की, दुरुन डोंगर साजरं दिसते. मी जेव्हा गावाजवळील बरडावर जावून माझ्या ’चौधरा’ गावाकडे नजर टाकत होतो, तेव्हा ते चिमुकलं गाव खरोखर सुंदर दिसत होतं. पण जेव्हा गावात पाय ठेवत होतो, तेव्हा त्याचा चेहरा मात्र वेगळाच दिसायचा. ते म्हणजे त्याचं ओंगळवाणे रुप…!
गावातील अंतरंगाचं ते ओंगळवाणे दृष्य पाहून मला किळस येत असे.
माझंच गाव काय, कोणतंही खेडेगाव वसवण्यासाठी कोणतंही नियोजन केलेलं नसते. जेथे जागा मिळेल तेथे घर… नाहीतर खताचा उकीरडा किंवा खड्डा…! खेड्यातील घरांची, रस्त्यांची रचना मुळातच निटनेटकी व पध्दतशीर कधीच नसते. नाल्या-गटारं काढलेले नसतात. गावची ग्रामपंचायत खेड्यातील रचनेबाबत तेवढी संवेदनशील आणि जागृत नसते. कोणी कुठेही जागा दिसेल तेथे घर बांधावं व वाटेल तेथे खताचा खड्डा खोदावा; त्याचं सोयरसुतक कुणाला नसते.
माझ्या गावातील प्रमुख रस्ते म्हणजे एक लभान तांड्यातून – पिंपळाच्या झाडापासून पांढरी गावाकडे जाणारा. दुसरा पांढरीकडून यवतमाळ-बरबडा गावाकडे जाणारा व तिसरा जनार्दन-दाजीच्या घरापासून आलेला व माझ्या घराला लागून यवतमाळ-बरबड्याकडे जाणारा खाबुडखूबड, दगड- गोट्याचे, माती-गागर्याचे, पावसाच्या पाण्याने चिरा पडलेले तर गाडीच्या लोखंडी येटाने घासल्यामुळे खोलगट झालेले असे ते रस्ते…! जेव्हा बैलगाडीला लहान-मोठ्या दगडाच्या उटा लागत; तेव्हा बैलांना गाडी ओढतांना खूप ताण पडल्याशिवाय राहत नसे.
पायरस्ता तर बोळी-बोळीतून जाणारा… पाणी, चिखल असला, की मध्येमध्ये दगडं ठेवल्याशिवाय जाणे कठीण होत असे. मग त्या दगडावर पाय ठेवत, कसरत करत, कसंतरी चाचपडत, तोल सावरत जावे लागत असे. कधी कधी दोन घराच्या मध्ये निमुळती पायवाट असायची; तर कुठे कुपाट्याच्या बाजूने रस्ता असायचा. तेव्हा त्या कुपाटाच्या लाकूड-काड्यांचा किंवा घराच्या भिंतीचा आधार घेत मोठ्या हिकमतीने रस्ता पार करावे लागत असे. नाहीतर कधी घसरुन पडेल याचा काही नेम राहत नसे. पावसाळ्यात अशा रस्त्याने जायचं म्हणजे छातीत धस्स व्हायचं. कारण घसरन…! मग पायाचे नखे रुतवल्याशिवाय जाताच येत नव्हतं.
रात्रीला कुठे जायचं काम पडलं, की अंधारात अंदाजा अंदाजाने पाय टाकत जावे लागत असे. नाहीतर पायाला हमखास दगडाची ठेच लागायची. दुर्दैवाने अशी ठेच लागली, की तिव्र कळा येऊन जीव तळमळत असे. विंचू-सापाची भीती तर डोक्यावर सतत टांगलेली राहायची.
काळोख्या रात्रीला काय घडेल ते सांगूच नका ! एकदा अशाच भयान रात्री मोठी गंमत घडली होती. लोकांचे जेवण-खावण आटोपून झोपण्याच्या तयारीत होते. तेव्हा किसन-दादा हातात पाणी भरलेले चिंपट घेऊन पांदणीच्या रस्त्याने परसाकडे जात होता. तेव्हा त्याला दोन चमकणारे डोळे दुरून येतांना दिसले. ते पाहून तो घाबरला. त्याला वाटले बहुतेक तो वाघ असावा. म्हणून तो तसाच धावत-पळत माघारी आला. येतांना तो ‘वाघ आला, वाघ आला’ असा ओरडत होता. त्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या घरातील लोकं दाठ्ठ्याचा दरवाजा किलकिला करून घरातूनच पाहत होते. ते दोन्हीही डोळे चमकणारा प्राणी हलत-डुलत गावात शिरला. लोकांची घाबरगुंडी उडाली. किसन-दादाच्या घरासमोरूनच तो घरामागे गेला व तुळशीराम-दादाच्या बैलाच्या गोठ्यात शिरला. तेव्हा कळले की तो वाघ नसून तुळशीराम-दादाचा गोर्हा होता. अशाही काही गंमती-जमती अंधार्या रात्री घडत होत्या.
गावाची अवस्था पाहाल तर अत्यंत भकास, बकाल वाटेल असं राहत असे. गावात विज नाही, नळयोजना नाही, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, कोणाकडे शौचालय नाहीत, सिमेंट कॉंक्रिटचे तर एकही घर नाही. सारे घरं कुडामातीचे…!. शहरासारख्या कोणत्याही सुविधा नाहीत.
माझं गाव म्हणजे नुसता वणवा… म्हणजे वेदनांना घेऊन जळणारं… पोटाची आग विझविण्यासाठी वणवण पळणा़रं… कष्टांच्या खाच खळग्यातून सतत झरझरणारं… फाटक्या अन् मळलेल्या कपड्यात वावरणारं… ! माझं गाव म्हणजे नुसता वणवा… म्हणजे वेदनांना घेऊन जळणारं… पोटाची आग विझविण्यासाठी वणवण पळणा़रं… कष्टांच्या खाच खळग्यातून सतत झरझरणारं… फाटक्या अन् मळलेल्या कपड्यात वावरणारं… !
खेड्यातही राहणारे माणसंच असतात ना ! त्यांनाही मन आणि भावना असतात की नाही? चारचौघांसारख्या त्यांनाही सुखाच्या कल्पना असतात. पण किमान जीवन जगण्याच्या गरजा ते पूर्ण करु शकत नाहीत. जगण्याची कसरत करतांना त्यांचा अवघा जीव अदमुसा होत असते.
सगळीकडे कचरा पसरलेला…! पावसाळ्यात गवत-काडी उगवलेली…! पुरा रस्ता चिखलाने माखलेला…! जीव-जंतूचा वावर सुरु झालेला…! उन्हाळ्यात धुळ, खकाना व गागरा…! घरा-घरातून निघनारी धूर व त्यामुळे डोळ्याची होणारी चुरचूर आग…! जिकडे-तिकडे शेणाचा व खताचा कुबट वास…! गावाची अशी बकाल अवस्था पाहून मन कासावीस झाल्याशिवाय राहत नसे. कधी लोक रोगराईला बळी पडतील काही सांगता येत नव्हतं.
चहू बाजूंनी अंधार कणाकणानी साठू लागला, की सारा गाव अंधारात गुडूप होवून जायचा. किर्र अंधाराचं साम्राज्य सुरु झालं, की भयान वाटायचं. अशा वेळी निसर्गालाच कीव येऊन एखाद्या वेळेस विज कडकडाडून, प्रकाशझोत टाकून सारा गाव उजळून टाकत असे. तेव्हा माझ्या अंगावर क्षणभर कां होईना रोमांच उठल्याशिवाय राहत नसे.
गावातून बाहेर किंवा बाहेरुन गावात यायचं म्हणजे पांदणीशिवाय दुसरा रस्ता नव्हता. पावसाळ्यात याच पांदणीने लेंडीचे पाणी वाहत जात असे. रिमझीम पावसात याच पांदणीत किंवा आजूबाजूला कोणी परसाकडे केली, की त्या लेंडीच्या पाण्यात ती घाण इतस्तत: पसरुन जात असे. त्यावर पाय पडल्यावर फसकन ते घाण मिश्रीत पाणी अंगावर उडलं, की मन कसं कावरंबावरं होत असे. असा तो किळसवाणा प्रकार हा नेहमीचाच होता.
पाऊस असो, की नसो माणसं एकवेळ हातात चिंपटं, टमरेल घेऊन वावराच्या तासात किंवा शेताच्या धुर्यावर किंवा गावाजवळून वाहणार्या लवणावर परसाकडे जातील; पण गावातील बाया-पोरींना मात्र त्या पांदणीच्या आजूबाजूलाच, गोदरीत परसाकडे बसावे लागत होते. कोणी माणूस-पोरगा रस्त्याने येतांना दिसला, की लाजेने मान खाली घालून; तो व्यक्ती दृष्टीआड होईपर्यंत उभे राहावे लागत असे. इतकी नामूष्की त्या बायांच्या वाट्याला येत असायचं. असा हा प्रकार पाहून फार ओशाळल्या सारखं होत असे.
चिलटं डोळ्यापुढे येऊन गुणगुणायला सुरुवात करीत. कधी कधी ते डोळ्यात घुसायलाही मागेपूढे पाहत नसत. डासही कानाजवळ येऊन गुंगऽ गुंगऽऽ असा आवाज करीत असत; तर दुसरीकडे कडाकड चावा घेत असत.
ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डोबरे, सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही, जागोजागी पडलेले गुराढोरांच शेण, खताचा उकंडा, मनुष्य-प्राण्याच्या शौचाची घाण, कचरा, गवत यामुळे चिल्ट-डासाची झपाट्याने पैदास होणार नाही, तर काय होणार ?
आमच्या खेड्यात नाल्या बांधलेल्या नसल्यामुळे नहाणीचे पाणी वाहून जायला जागा राहत नव्हती; तर ते पाणी बाहेर खड्डा करुन मोरी काढत असत. तेथेच पाणी मूरत असे. खड्डा पूर्ण भरल्यावर उरलेले पाणी रस्त्यावरुन वाहत जात असे. मोरीत साचलेल्या पाण्यात अळ्या तुरुतूरु चालतांना दिसायच्या. ते पाहून कमालीची घृ्णा वाटत असे.
ग्रामपंचायतीकडे नाल्या किवा रस्ते बांधण्यासाठी किंवा कोणत्याही सुधारणा करण्यासाठी पैसे राहत नसत. कारण तेवढं घरकरापासून उत्पन्न मिळत नसे. एखाद्या योजनेचा प्रस्ताव सरकारकडे पाठवायचा तर पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त लोकवर्गणी जमा करण्याची अट सरकार घालत असे. लोकांच्या गरिबीमुळे ऎवढे पैसे उभारणं शक्य तरी होत का ?
लहान मुले कधी एकाठिकाणी बसून खातील, असं कधी होत नव्हतं. आईने चुरुन दिलेला चिमण्या पिलांचा घास ते घरात फिरुन फिरुन खाण्यात, त्यांना मोठी मजा वाटत असते. त्यामुळे अन्नाचे कणं जागोजागी विखरुन पडलेलं असायचं. तसेच चिमुकले पोरं घरात कुठेही ‘शी’ करीत. त्यावर राखड टाकून खपरेलाने खरडून खरडून काढल्यावर, ती जागा सारवेपर्यंत माशांचा घोंगाट तेथे सुरु राहायचा. गंभीर आजाराने किंवा अंगात तापाने फनफनलेला किंवा बाळंत बाईला तर बाहेर परसाकडे जाणे अशक्य होत असे. अशा वेळेस घरातल्या, अंगणातल्या किंवा कोठ्य़ातल्या एका कोपर्यात व्यवस्था करीत असत. पाळलेले गुरे-ढोरे, कुत्रे, मांजरी, कोबड्या व त्यांची पिल्ले यांची अस्वच्छता. अशा अनेक कारणामुळे डास, माश्या व जंतूचा प्रसार व्हायला काही वेळ लागत नव्हता.
आमच्या खेड्यातील पिण्याच्या पाणी तर विचारुच नका ! आमच्या मोहल्यात दगडाने बांधलेली एक सार्वजनिक विहीर, ज्ञानेश्वरच्या घराजवळ व दुसरी खाजगी विहीर चिरकुट्याच्या घराच्या आवारात होती. लभानपूर्यात आणखी एक विहीर होती. पावसाळ्यात ह्या विहिरी काठोकाठ भरुन जायच्या. हातानेही पाणी काढता येईल असं…! हे पाणी गढूळ व अत्यंत दुषीत राहत असे.
माझा मोठा भाऊ-शामराव गावचा सरपंच असल्यामुळे पंचायत समितीकडून पोटॅशियम परमंगनेटचे मिळालेले पुडे माझ्याच घरी राहत होते. त्यावेळी ते जंतु मारण्यासाठी विहिरीच्या पाण्यात टाकल्यावर त्याचा रंग लाल होवून जात असे व त्याची चव कडवट लागत असे. त्यामुळे काही बाया-माणसं मोठे कुरकूर करीत. कधी कधी काही बाया विहिरीच्या बाजूलाच कपडे धूत. पाणी भरतांना भोवतालचं सांडलेले पाणी पुन्हा झिरपत विहिरीत जात असे.
उन्हाळ्यात तर आमच्या त्रासाला पारावर राहत नसे. जवळपासच्या विहिरी कोरड्याठक पडायच्या. त्यामुळे पाण्याचं मोठं दुर्भिक्ष राहत असे. उन्हातान्हात पायपीट करुन दुरुन डोक्यावर गुंडाने, चरविने पाणी आणावे लागत असे. पाण्याच्या ओझ्याने मान मोडून गेल्यासारखी, कंबर चेचल्यासारखी व्हायची; तर पायामध्ये गोळे आल्यासारखे वाटायचे. विहिरीत उतरुन डोबर्यात जमलेलं घोट घोट पाणी बालटीत टाकावे लागे. घरातले चाटले-बुटले भरुन ठेवावे लागत असे. रात्रीला विहिरीत झर्याचं पाणी जमत; तेव्हा रात्रीला पाणी भरण्यासाठी लोकांच्या डोळ्याला डोळा लागत नसे.
एकदा तर पाण्यापायी माझ्या जीवावर बेतलं होतं. आताही त्या गोष्टीची आठवण झाली की, माझ्या अंगावर सरसरून काटे उभे राहतात.
उन्हाळ्यात मामाच्या वाडीतील विहीर आटली होती. तिला सुरुंग लावून फोडण्याचे काम सुरु होते. अशी नवलाईची एखादी गोष्ट असली की, ते पाहायला मला मोठी मजा वाटत होती. काम करणारे लोक विहिरीतील खडकात सुरुंग करतांना व स्फोट झाल्यावर विहिरीत पडलेला दगडाचा मलमा बाहेर काढतांना मी व अर्जुन विहिरीच्या काठावर बसून मन लावून पाहत होतो. सुरुंग केल्यावर त्याला वात लावली की, आम्ही पण त्या लोकांसोबत दूर पळून जात होतो. मग स्फोट झाल्याचा आवाज झाल्याबरोबर दगडाचे चीपोरे विहिरीत व विहिरीच्या बाहेर आजूबाजूला पडत.
तेवढ्यात पाणी भरायला आई आली. डोबऱ्यात जमा झालेलं झऱ्याचे घोट घोट पाणी गीलासाने बाल्टीत टाकून देण्यासाठी मी विहिरीत उतरलो होतो. त्यातच सिंदीच्या टोपल्यात दगडं भरून बाहेर काढण्याचे काम पण चालू होते. त्यावेळी अचानक टोपलं तिरकं झाल्याने त्यातील एक मोठा दगड निसटून खाली माझ्या दिशेने पडत असतांना अर्जुनचे एकाएकी लक्ष गेले.
‘मामा बाजूला सरक. दगड पडत आहे.’ असा अर्जुनचा जोरात आवाज माझ्या कानावर आदळल्याने मी झटक्यात बाजूला सरकलो. त्यामुळे मी वाचलो. नाहीतर त्या दगडाने माझ्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याशिवाय राहिला नसता.
आई पाण्यानं भरलेला गुंड उचलून डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवणार तर त्याच क्षणी अर्जुनाचा कल्ला ऐकून थबकली. एव्हाना झालेला प्रकार तिच्या लक्षात आल्यावर ती रडायला लागली. मी विहिरीतून बाहेर आल्याबरोबर तिने माझ्या दोन्ही गालाचे व कपाळाचे पटापट मुके घेतले. अर्जुनकडे कृतज्ञतेने पाहत, ‘तुयाच्यानं माहा रामराव वाचला रे… !’ असे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले.
वाल्ह्याच्या वावरात दोन विहिरी होत्या. एक त्याची स्वत:ची. या विहिरीवर बौध्द मोहल्ल्यातील लोकांना पाणी भरायला मनाई होती. त्यामुळे फक्त बंजारी लोक या विहिरीवर पाणी भरायचे.
दुसरी विहीर त्याच्या शेतात ग्रामपंचायतने खोदली होती. या विहिरीवर बौध्द मोहल्ल्यातील लोक पाणी भरत. या विहिरीजवळ लवणाच्या काठाजवळ एक पेवंडी आंब्याचं झाड होतं. आम्ही मुले लपून-छपून या झाडाचे आंबे तोडत होतो. लवणात उतरुन चुपचाप दगडं मारुन आंबे पाडत होतो. हा आंबा खोबर्यासारखा गोड लागायचा. एखाद्यावेळी कोणी त्याच्या शेतातील आंब्याचे झाडे विकत घेतले; तरी तो हा आंबा मात्र विकत नव्हता. त्याच्या शेतात लवणाजवळ आणखी एक मोठा घेरेदार आंब्याचे झाड होतं. त्याला ’कारु’ आंबा म्हणायचे. हा आंबा इतका गोड होता, की तो खाल्ल्यावर तोंडात त्याचा मधूर स्वाद कितीतरी वेळपर्यंत दरवळत राहायचा. तुपासारखा त्याचा रस लागत होता. हा आंबा पिकल्यावर सुध्दा त्याचा रंग हिरवाच दिसायचा. या प्रकारचा वैशिष्टपूर्ण आंबा माझ्या तरी कुठेही पाहण्यात आला नाही.
गावातील लोक रात्रीला देखील पाणी भरायला येत होते. नाल्याच्या पलीकडे सुखदेवच्या वावरात आणखी एक विहीर होती. लोक त्या विहिरीवर पाणी भरायला वाल्ह्याच्या विहिरीजवळून जात असत.
एका वर्षी त्याच्या आंब्याचे झाडं दादाने विकत घेतल्यामुळे मी राखण करत होतो. रात्रीला लोक आंबे तोडतील, म्हणून धास्ती वाटत होती. म्हणून मी धनपालच्या सोबत एक शक्कल लढवली. कोणी पाणी भरायला येत असतांना दिसले, की आम्ही त्या सामसूम अर्ध्या रात्रीच्या अंधारात विहिरी जवळच्या झाडावर चढून हुऽ हुऽऽ असा आवाज काढत फांद्या खलंखलं हालवीत होतो. त्यावेळी पाणी भरणारे लोक भुताटकीच्या भीतीने काही वेळ घाबरुन गेल्यासारखे वाटत होते. परंतु आम्ही रात्रभर थोडेच झाडावर थांबून हा प्रयोग करु शकत होतो? त्यामुळे लोकांच रात्रीला पाणी भरणे काही थांबलेलं नव्हतं. त्यांची पण मजबूरी होती. कारण दिवसा शेतीवाडीचे काम करणारे लोक दिवसा पाणी भरायला वेळ देवू शकत नव्हते. म्हणून ते बिचारे, रात्रीला मजबुरीने पाणी भरत होते.
बरबड्याच्या एका उघड्या देवविहिरीला भरपूर पाणी असायचे. ही विहीर नाल्याजवळ असल्याने उन्हाळ्यात सुध्दा त्याला भरपूर झर्याचा ओलावा राहत होता. ही विहीर म्हणजे एखाद्या मोठ्या डोबर्यासारखीच होती. पाणी भरतांना बरेच पाणी त्याच्या काठावर सांडत होते. मग ते खराब पाणी परत त्यात पडून मिसळत होते. शिवाय ही विहीर उंबराच्या झाडाजवळ असल्याने त्याचे फळे या विहिरीत पडत असे. मग त्या विहिरीचे पाणी घाण झाल्याशिवाय राहत नव्हते. तरीही हे पाणी गावच्या लोकांना नाईलाजाने प्यावे लागत असे.
पोवार पाटलाच्या कोठ्याजवळ केशवच्या वावरात धुर्याजवळ एक विहीरा होता. तेथे सुध्दा उन्हाळ्यात भरपूर पाणी असायचं. हा विहीरा गावापासून चार-पाच वावरं दूर होते. तेथे पण मी, आई किंवा वहिनी सोबत पाणी भरायला – कधी कधी भर उन्हात सुध्दा जात होतो. कारण सकाळी शेतात काम करून आल्यावर दुपारी वेळ मिळत होता. शिवाय उन्हाच्या तडाक्याने पाणी आणणार्यांची गर्दी कमी राहत होती. त्यामुळे नेहमीपेक्षा पाण्याचा साठा जास्त राहत होता.
काही शेतकरी बैलगाडीवर टिनाचा ड्राम बांधून त्यात बरबड्याच्या किवा पोवार पाटलाच्या विहीर्यावरुन पाणी भरून आणीत असत. मी सुध्दा कधीकधी तुळशीराम-दादाच्या किंवा मामाच्या ड्रामवर जात होतो. मग त्या ड्रामतील एक-दोन गुंड पाणी मला घरी आणण्यास सवलत मिळत होती.
मी दादाला एखाद्यावेळेस उन्हाळ्यात नहाणीतल्या उघड्या नांदीत थंड पाणी असते मणून पाणी पितांना पाहिले होते. मी त्याला म्हटले,
‘दादा हे नांदीतलं पाणी पीत नको जाऊ… त्याने रोग होतात.’ तर तो मला म्हणाला,
‘मला काही होत नाही. काही काळजी करु नको…’ आरोग्याबाबत इतकी बेफिकीरी परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांच्यात येत असावी, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.
अशा अस्वच्छतेमुळे व अशुध्द पाण्यावाटे कॉलरा, मधूरा म्हणजे टायफाईड, मलेरीया, हगवन यासारख्या अनेक आजाराचा सतत प्रादुर्भाव होत असे. त्यामुळे खेड्यातील लोक मोठ्या प्रमाणात रोगराईला बळी पडत असत.
खाजगी दवाखान्यात जायची सोय नाही. ऎवढा पैसा खर्च करण्याची त्यांची कुवत नाही. फारच पाणी गळ्यापर्यंत आले तरच नाईलाज म्हणून खाजगी दवाखान्यात जातील. पण डॉक्टरचं व औषधी-पाण्याचं बिल पाहून त्याच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिल्याशिवाय राहत नसे. हप्त्याभराची मजूरी त्यांना या खर्चापोटी द्यावे लागत होते. मग आता खावे काय, अशी त्यांना चिंता पडून जात होती.
सरकारी दवाखान्यात जावे तर तीन कोस जाणे व तीन कोस येणे…! गेलंही समजा तरी तेथे चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल; याचा काही भरोसा देता येत नव्हता. तेथील कर्मचारी रोग्यांना हिडीस-फिडीस करत असल्याचा त्यांना आलेला पूर्वानुभव ! कोणतीही बिमारी असो सर्वांनाच सोबत आणलेल्या शिशीमध्ये पिण्यासाठी भरुन दिलेले लाल पाणी व पांढर्या गोळ्या…! तेही तीन दिवसांसाठी…! बिमारी नाही बसली तर पुन्हा मजूरी पाडून सरकारी दवाखान्यात जाणे, नव्हतं परवडत त्यांना ! खेडूत लोकांना जास्त दिवस मजूरी किंवा शेतीचे कामे पडू नये म्हणून झटपट इलाज पाहिजे असते, ना ? म्हणून…! ते डॉक्टरांना म्हणतात,
‘साहेब, सूई टोचा. उद्या सकाळी मला कामावर जाता आले पाहिजे.’ पण डॉक्टरांच्या अभ्यासात सर्वानांच सूई टोचणे बसत नसेल तर त्यांनी तरी काय करावं ?
अशा सर्व अडचणीपासून दूर राहण्यासाठी गावातील लोक झाडपाला किंवा गावठी इलाज यालाच जास्त पसंद करीत असत. अंधश्रध्दाळू लोक साधुबूवाच्या फुक-फाकीला व मंत्र-तंत्रालाही बळी पडत.
मुलांच्या पण शिक्षणाची अशीच आबाळ होत होती. एकटाच मास्तर, पहिली पासून ते चौथी पर्यंत शिकवित होता. एकाच खोलीत चारही वर्ग भरत होते. तो यवतमाळवरुन जाणे-येणे करायचा. आमच्याच आवारातील कोठ्यात शाळा होती. नंतर माझ्या घराच्या बाहेर रस्त्याजवळ केशव पाटलाच्या वाड्याला लागून माती कुडाची व वर टिना असलेली एक लांब खोली असलेली शाळा बांधली होती. मग त्यात ती शाळा भरत होती.
असं या आमच्या गावाचं अवकाळी रुप पाहून मन विषष्ण होत असे. तरीहे हे गाव कसंही असो, त्याचेशी मात्र अतूट असं नातं निर्माण झालं होतं. गांवातील जवळकीच्या नात्यातून मला भावनीक उब मिळत होती. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी या गावात साठवलेल्या होत्या. या गावात नात्यागोत्याचे, दाट ओळखीचे, जिवाभावाचे माणसं राहत होते. म्हणूनच या गांवावर खूप प्रेम बसलं होतं.
पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही, की खेड्यात झाडून सारेच लोक मागासलेल्या जातीचे राहतात; हेच खेड्यातील लोकांच खरं दुखणं आहे. हेच लोक शहरातील लोकांना आयतं अन्न पुरवितात, पण स्वत: मात्र मुंग्या-माकोड्यासारखे जीवन जगून मरमर काबाडकष्ट करुन मरतात बिच्चारे… परिस्थितीने गांजल्यामुळे या लोकांची हक्काची जाणीव बोथट झाली होती.
दुसरं असं की एकही उच्चवर्णीय व्यक्ती शेतमजूरीच्या कामावर जातांना दिसत नाही. म्हणूनच खेड्यांचा विकास व दारिद्रय निर्मुलनाला कोणतेही सरकार का प्राधान्य देत नाही याचा उलगडा होतो. खेड्यापाड्यात जर उच्चवर्णीय समाज राहीला असता व तो जर असा दारिद्रय आणि दु:खात खितपत पडलेला दिसला असता न् तर खेड्यातल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने निश्चितच प्रयत्न केल्याचे चित्र दिसले असते. कारण ती त्यांची गरज असती, ना ?
असं या माझ्या आवडत्या गावाचं ओंगळवाणं रुप नष्ट होऊन एखाद्या टूमदार शहरासारखं विलोभनीय रुप कधी तरी बहाल होईल कां, कोण जाणे?
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
नुकतंच आमचं सर्वांचं जेवण आटोपलं होतं. ऊन्हाळ्यात आम्ही अंगणातच चंद्र-तार्यांच्या शितल उजेडात किंवा अंधारी रात्र असली, की दिवा-कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात सर्वजण एकत्रीतपणे जेवायला बसत होतो.
जेवण आटोपलं की, माझी बहीण-जनाबाई, ‘खाणं-घेणं रामाचं, दुखणं आलं बिनकामाचं.’ असं म्हणायची. कारण पोरी-बाळींना जेवणाचे भांडे आवरणं, घासणं, जागा झाडझूड करणं इत्यादी अनेक कामे जेवल्या जेवल्या करावे लागत होते. खेड्यातल्या मुलींना आई सांगतील तसं मुकाट्याने काम करावे लागत. त्या वडिलधार्या माणसांच्या धाकात राहत.
. जेवण झाल्यावर गप्पागोष्टी करतां करतां बाबा चिलीम ओढायचा, त्याच्या चिलिमीचं फडकं – त्याला शापी म्हणत, ती आमच्यापैकी कुणाला तरी भिजवून आणायला सांगत. शामराव-दादा बिडी ओढायचा. त्यावेळी आई, बाई, वहिनी व मला तंबाखू खाण्याची सवय होती. तंबाखाची तलफ आल्यावर किंवा जेवण झाल्यावर आई, बाई किंवा वहिनी यांच्यापैकी कोणीतरी तंबाखू घोटून देत असे. आईला जर खाण्याचा तंबाखू मिळाला नाही; तर ती चिलिमीचा बारीक तंबाखू पण खात असे. खेड्यामध्ये अशा तंबाखाच्या सवयी लहानपणापासून लागत असे.
असं खान-पान झाल्यावर अंगणातच झोपायची तयारी करावी लागत असे. हातातलं पोतं किंवा फारी जमीनीवर इकडून तिकडे फिरवून झोपायची जागा साफ-सूफ करुन घेत होतो. मग तेच पोतं त्याच्यावर असली तर गोधडी, वाकळ किंवा बाबाचं फाटलेलं धोतर, आईचं लुगडं टाकायच. अंगावर असंच काहीतरी पांघरुन ओढून घ्यायचं.
असा सर्व सोपस्कार आटोपून सातरीवर अंग टाकलं, की वर आकाशात चंद्र-तार्यांना पाहिल्याशिवाय मला झोपच लागत नसे. ते आकाशातलं विहंगम व मनोहारी दृश्य पाहून मनातले दिवसभराचे सारे मळभ हळूहळू दूर होत झाल्यासारखे वाटत असे. उघड्या आकाशातील मोजता येईना, येवढ्या चांदण्या जिकडे तिकडे चमचम करीत दिसायच्या. एखाद्या वेळेस प्रकाश देण्याचं काम या चांदण्यावर सोपवून चंद्र आसमंतात लुप्त होत असे.
आजीची खाट पाहण्यासाठी माझं मन भिरभिरत राहत असे. माझं ते रोजचं खासच आकर्षण असायचं. चार चांदण्या म्हणजे आजीची खाट व एका खाटेला लागून लागोपाठ तीन चांदण्या म्हणजे चोरं… ! ते चोर आजीची झोपण्याची वाट पाहत असत. तिच्या बाजीचे ठावे सोन्याचे असल्याने, त्यांना ते चोरायचे असतात, म्हणे ! आजीची मात्र चिंचेच्या झाडाचे पाने हातरता हातरता रात्र निघून जात होती. त्यामुळे चोरांना चोरी करण्याची संधीच मिळत नव्हती. अशी ती गोष्ट त्या ’सप्तषी’ चांदण्याबाबत सांगत असत.
वर आकाशात सर्वीकडे चमकनार्या चांदण्या-तारे मी निरखून पाहत असे. काही तेजस्वी राहत, काही लुकलुकणार्या तर काही अत्यंत मंद दिसणार्या असायच्या. मध्येच एखादा तारा सर्रकन तुटून खाली पडत असायचा.
कधी कधी एखादा चालू-बंद होणारा, लाल-पिवळा ठिपका चालतांना दिसत असे. तो चकचकणारा उजेड उडानखटोल्याचा, म्हणजेच विमानाचा दिवा असायचा.
असा तो निसर्गाचा रम्य नजारा डोळे भरुन पाहतांना रात्र कणाकणाने समोर सरकत अधिकाधिक गडद होत जात असे. मग सारा आसमंत गंभ्रीर आणि शांत होवून जात असे.
त्यातच आमच्या घराच्या वैभवशाली दिवसांच्या त्या मधूर आठवणी मनाच्या आत साठलेल्या कोपर्यातून उसळी मारुन कधी एकाएकी वर आल्या तेही कळत नसे. मग त्या मनाला उभारी देणार्या आठवणींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर सरकू लागला, की मी त्यात हरवून जात होतो.
घर म्हटले की प्रत्येकाचा जिव्हाळा अधिकच फुलून येतो. आपल्या आयुष्यातल्या अनेक कडूगोड आठवणी, घटना, प्रसंग या घराशी निगडीत झालेल्या होत्या. या घराच्या साक्षीने मी लहानाचा मोठा झालो होतो. अगदी कळत नव्हते; अशा त्या वयापासून या घराशी एक प्रकारचे जिव्हाळ्याचे अतूट नाते जुळले होते.
मी अगदी लहान होतो, तेव्हा आमचं घर कुडामातीचं होतं. कुडामातीचं घर म्हणजे गरिबीचं लक्षण मानलं जायचं. माती दगडाच्या भिंती व त्यावर टिनाचे पत्रे व खपरेल म्हणजे ऎश्वर्वाचं प्रतीक मानलं जायचं. बाबाने कुडामातीचं घर पाडून त्याठिकाणी मातीच्या भिंतीचं घर बांधल होतं. त्यामुळे गावात आमचा मान उंचावला होता.
गावात बेलदार यायचा. पण बाबाने हे काम बेलदाराकडून न करता स्वत:च देवदास-दादा, शामराव-दादा व आई-वहिनीच्या मदतीने घरीच केलं होतं. बाबाला व दादाला वाडकाम येत असल्यामुळे दरवाजे, खिडक्या, छपराचा इमला व आडं त्यांनीच बांधल्या होत्या. त्यामुळे ’घर पाहावं बांधून’ असं काही म्हणण्याची पाळी कुणावरही आली नव्हती !
नवीन घर सूर्याकडे तोंड करुन बांधलं होतं. सकाळी सूर्य निघाला, की आमचं अंगण कोवळ्या कोवळ्या सोनेरी किरणांनी न्हावून निघायचं. सूर्य मावळतीला गेला, की घराच्या सावल्या अंगणात पडायच्या. सावल्यावरून आम्ही किती वेळ झाला असेल, याचा अंदाज घेत होतो.
या घरात स्वयंपाकाची खोली होती. त्यात मातीची चूल व उल्हा मांडला होता. भाजी, दाळीला फोडणी दिल्यावर शिजविण्यासाठी तो गंज उल्ह्यावर ठेवून देत. त्यामुळे चुलीवर भाकरी करता येत होत्या. चुलीला लागून ओटा होता. या ओट्यावर बसून स्वयंपाक करता येत होतं. स्वयंपाकाचे व खाण्याचे भांडे याच ओट्यावर ठेवत.
ओट्याजवळ दोन्ही भिंतीला लागून एका कोपर्यात धान्य, कडधान्य, आंबट-गोड वड्या, उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या भाज्यांच्या खुला, हरभर्याच्या भाजीचा घोळणा असे काहीबाही खाण्याच्या वस्तू तीन-तीन मडक्याच्या उतरंडीत साठवल्या होत्या. तसेच शेवया, सरगुंडे, कुरुडे, पाषड़ं असे उन्हाळ्यात बनविलेले पदार्थ पण त्या मडक्यात ठेवल्या होत्या. मग उन्हाळ्यात हे पदार्थ आंब्याच्या रसासोबत खायला मोठी मजा यायची.
भिंतीजवळ उभे राहून पाहता येईल, अशी लहानशी खिडकी होती. तेथून तुकाराम-काकाच्या नहाणीतील उंबराचं झाड दिसत होतं. या खोलीत पाणी पिण्यासाठी पितळेचा गुंड व थंड पाण्याचं मडकं ठेवलं होतं. वर मांजरीच्या धाकानं भाकर-तुकडा बांधून ठेवण्यासाठी शिकं बांधलं होतं. मिरची-मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी दुसर्या कोपर्यात दगडाचा पाटा व लोडा ठेवला होता. लोडा म्हणजे वरवंटा !
भिंतीला लागून असलेल्या डेळीच्या खुंटीला खायच्या तेलाची शिशी अडकवलेली असायची. शिशीत सारज या प्राण्याचा काटा टाकलेला असायचा. हा प्राणी खरोल्याच्या जंगलात सापडायचा. त्याच्या अंगावर तुराटीच्या काडी सारखे अर्धाक हात लांब, अणुकुचीदार टोक असलेले काटे असायचे. संकटाच्या काळात तो हे काटे भाल्यासारखे उभे करीत. त्याचे काटे विषारी असल्याचे सांगत, तरीही त्याचे काटे तेलाच्या शिशीत टाकून ठेवायचे. त्यामुळे तेल खराब होत नाही, असे म्हणत.
त्याला लागूनच माजघर होतं. त्याचा वापर आम्ही जेवण्यासाठी व झोपण्यासाठी करीत होतो. खाली जमिनीवर सातरी टाकून आम्ही झोपत होतो. कोणी सपरीत झोपत होते. घरात पसरलेल्या मिट्ट अंधारात झोपण्याआधी एकदातरी मिणमिणत्या दिव्याच्या ज्योतीकडे पाहिल्याशिवाय डोळे पेंगाळत नसे.
आमच्या घरात कधी एकमेकांचे मन दुखावणारी चिडचिड, कमालीचा राग, टोकाचे भांडणे असे प्रकार दिसले नाहीत. आई-बाबा, दादा-वहिनी, सासा-सुना किंवा बाप-लेक कधी भांडताना दिसले नाहीत. लुटुपुटुचे भांडणे झालेच तर कधी त्याचे पडसाद उमटलेले दिसले नाहीत. असं म्हणतात की घरात शांतता नसेल तर मऊशार गादिवर सुध्दा झोप येत नाही. घरात सुख समाधान नांदत नाही. पण आम्हाला जमिनीवर सुध्दा पातळ अंथरुणावर त्यामुळेच शांतपणे झोप येत होती
या खोलीच्या मधात एका मयालीला बंगई टांगलेली होती. बंगई नारळाच्या दोरीने विणलेली होती. त्याच्यावर बसून किंवा झोपून आम्ही मस्त झुलत होतो.
अंगणातून घरात येतांना समोर वर भिंतीला बाबासाहेबांचा व भगवान बुध्दाचा फोटो टांगलेला एकदम नजरेस पडत होता. हे दोन्ही फोटो पाहिल्याबरोबर मनात नकळत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची. घरात शिरल्यावर मी पहिल्यांदा फोटोजवळ जात होतो. दादाने फोटोच्या मागे ठेवलेल्या लग्नपत्रिका, कुणाचे आलेले पत्र किंवा पावत्या असं काही वाचून पाहण्याचा मला पहिल्यांदा मोह होत होता. या फोटोच्या बाजूला माझ्या बाबाचा काळ्या कोटावर काढलेला एक लहानसा फोटो सुध्दा टांगलेला होता. एकदा फोटो काढणारा माणूस काळ्या कापडाने झाकलेला एक चौकोनी उभाट काळ्या रंगाचा डब्बा खांद्यावर घेऊन गावात आला होता. त्यावेळी बाबाने हा फोटो काढला होता. तो डब्ब्याच्या आत डोकं घालून फोटो काढतांना आम्हाला मोठं कुतूहल वाटत होतं.
खोलीच्या मध्यभागी भिंतीला लागून पीठ दळण्याचं जातं होतं. त्यावर आई किंवा वहिनी सकाळच्या पाहारी उठून ज्वारीचं पीठ किवा कण्या भरडत असे. बाबाने दाळ, ज्वारी, तांदूळ इत्यादी ठोक धान्य ठेवण्यासाठी नांदीच्या आकाराचे चार पांढर्या मातीच्या कोठ्या बनविल्या होत्या. त्या या खोलीत एका रांगेत एकमेकाला लागून ठेवल्या होत्या. त्या एखाद्या उभ्या असलेल्या पुतळ्याप्रमाणे दिसायच्या.
त्यांच्या बाजूनेच आंगधुणी म्हणजे नहाणी घरात जाण्यासाठी लाकडी चौकटीला पत्रे लावलेलं कवाड होतं. नहाणीत आंघोळीला बसण्यासाठी व धुणं धुण्यासाठी मोठी चौकोणी दगड ठेवला होता. पाणी साचविण्यासाठी मोठी नांद गाडलेली होती. आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी तेथेच चूल घातली होती.
घराच्या सपरीसमोर मोठं अंगण होतं. सपरीच्या दाठ्ठ्याला काकणाचा हार तोरणासारखा बांधला होता. हा हार बाईने चिमणीच्या दिव्याच्या ज्योतीवर काकनं वितळवून एकांत एक गुंफला होता.
अंगणाच्या समोर गायी-बैलासाठी कोठा बांधला होता. तेथूनच बाहेर जाण्यासाठी एक मोठा लाकडी दरवाजा होता. डाव्या बाजूला समोरच्या कोठ्याला लागून आणखी एक लांबलचक कोठा नहाणी घराला जोडून बांधला होता.
पूर्वी या दोन्ही कोठ्यात गाई, बकर्या व बैलजोडी बांधत असत. त्यावेळी आमच्याकडे दुभदुभत्यांची रेलचेल होती.
एका कोपर्यात शेतकामाचं व इतरकामाचं साहीत्य म्हणजे टिकाशी, फावडे, सब्बल, विळे, वखरा-डवराचे फासे, गाडीचाकाचे आकं, आरे, जू, चर्हाटं, काडवणं, डवरा, वखर, नांगर, पुराण्या, विळतं, कुर्हाडी, वासला, किकरं, पटाशी असं काहीबाही सामान तेथे ठेवलं होतं.
घरावरचं, नहाणीघराचं आणि दोन्ही कोठ्यावरचं छपर खपरेलाने झाकलं होतं. समोरच्या सपरीवर व दुकानाच्या - त्या खोलीत दुकान टाकले होते, म्हणून त्याला दुकानाची खोली म्हणत असत - या खोलीवर मात्र टिनाचे पत्रे टाकले होते. असं ते आमचं प्रशस्त घर होतं.
अंगणात एका बाजूला दगडाचं जमिनीत गाडलेलं ऊखळ होतं. सुगीत धान निघाला, की मुसळाने कांडून व सुपाने पाखडून तांदुळ तयार करीत असत. अशा हातसडीच्या तांदळाच्या भाताला मस्त सुगंध यायचा व खायला पण चवदार लागायचा.
घरात ठेवलेला दगडी पाटा व लोडा उन्हाळ्यात मात्र बाहेर अंगणात ओसरीजवळ यायचा. बाया-पोरी एका नंतर एक या पाटावर मसाला, मिरच्या वाटायच्या, तेव्हा खमंग वास सुटायचा.
दिवाळीला मोठादादा दिवणाल्या विकत आणायचा. त्यात खायच्या तेलात कापसाच्या वाती पेटवून ठेवल्यावर अंगणाबरोबरच घर, नहाणी व कोठा असा कोपरा न् कोपरा रोशनाईने उजळून निघायचा. फटाक्याच्या आतिशबाजीने तर हे अंगण आणखीच न्हावून निघत असे.
याच अंगणात वहिनी किंवा आई रोज सकाळच्या झुंजूमुंजूला उठून गंगाळात कालवलेल्या शेणाचा सडा, ओणवी होवून चिम्पटाने हाताच्या पंज्याने टाकीत होती. ती सडा टाकायला लागली, की शिंपडण्याचा आवाज झोपेतच माझ्या कानात घुमत असे; तर शेणाचा कुबट वास नकोसा होत असे. कधी कधी शेणाचा गिलावा फड्याने अंगणात पसरवीत. त्यानंतर माती कालवून संपूर्ण घर पोतार्याने सारवून टाकायची.
सडासारवण झालं, की हात-पाय धुवून चिलिमीतल्या जळलेल्या तंबाखाच्या गुलाने दात घासायचे. तोंड धुतल्यावर चूल पेटवून चहा मांडायची. चुलितल्या काड्या-गोवर्याचा धूर घरभर पसरुन नाका-तोंडात घुसत असे. मग घसा खवखव करायचा व डोळ्याची आग न् आग व्हायची.
कधी कधी गुळ, चहा-पत्ती आणायला जनार्दन-दाजीच्या दुकानात मलाच जावे लागे. तोपर्यंत घरातले सर्वजण उठून गोवरीच्या राखुंडीने किंवा लाकडाच्या कोळशाच्या भुकटीने दातं घासून व तोंड धूवून चुलीजवळ येवून बसायचे. भगून्यातला दुधाचा किंवा बिनदुधाचा काळा चहा जर्मनच्या गिलासात किंवा ताटलीत ओतून गप्पागोष्टी करत करत पिवून झाल्यावर मग आपापल्या कामाला लागायचे. चिल्ल्या-पिल्ल्यांना आई किंवा बाबा ताटलीतल्या चहाला तोंडाने फूक मारुन पाजायचे.
अवकाळी पडणार्या पावसातील टपोर्या गारा याच अंगणात आम्ही वेचून खात होतो. विजांचा कडकडात झाला, की आम्ही घरात पळत सुटायचो. आई त्यावेळी अंगणात विळा फेकायची. त्यामुळे घरावर विज पडत नाही, असे ती सांगत असे. अंधारुन आलं, की विजेच्या झोताचं अंगणात लख्ख प्रकाश पडायचं.
याच अंगणात बाई व वहिनी दिवाळीत पूर्ण अंगणभर रांगोळ्या घालीत. याच अंगणात आई धान्य वाळवीत होती. आम्ही भावंडं याच अंगणात गप्पागोष्टी मारत होतो. आमच्या खेळातल्या दंगामस्ती, मारामार्या, रुसवे-फुगवे हे सारं काही या अंगणाने पाहिलं होतं.
याच अंगणात आई नाहीतर वहिनी बाईला सोबत घेऊन लाकडी पाटावरच्या शेवया, सरगुंडे, कुरड्या, पापड्या खास आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी करायची. त्याचप्रमाणे गोड-वड्या, आंबट-वड्या, वांगे-वालासारख्या भाज्यांच्या खुलांचं वाळवण करीत होती.
याच अंगणात दादा व बाईच्या लग्नाचे मांडव घातले होते. जेवणाच्या पंगती उठल्या होत्या. मुलीला सासरी पाठवतांना आई-बाबाच्या डोळ्यात वाहणारे अश्रू या अंगणाने पाहिले होते.
या घराच्या अंगणात आम्ही लगोर्या खेळत होतो. मुली लंगडी खेळायच्या. कोळश्याने जमीनीवर रेघोट्या काढून सहा घरं बनवित. मग लंगडत लंगडत खापरी एका घरातून दुसर्या घरात पायाने ढकलत नेणे असाही एक खेळ मुलींसोबत आम्ही मुले पण खेळत होतो. या खेळाला टिकर किंवा घुईडोंगर असे म्हणत.
मुली वर खडे फेकून हाताच्या पंज्यावर किंवा ऊलट्या पंजावर झेलण्याचा खेळ खेळत. कोळश्याने जमिनीवर एक वर्तुळ आखून त्यात बांगड्याचे फुटलेले काकणं टाकून ते हळूच वर्तुळाच्या बाहेर काढण्याचा खेळ खेळत असत. तसंच जमीनीवर चौसर सारखा आणखी एक अष्टचंगाचा खेळ खेळत असत.
‘कोणी यावे टिचकी मारुन जावे, अंधा अंधा पाणी दे.’ असे म्हणत ज्याच्यावर राज आलं त्याचे डोळे झाकून म्हणत असत. दुसरा येऊन त्याच्या नाकाच्या टोकाला पकडून निघून जात असे. मग त्याचं नाक कोणी धरले, ते त्याला ओळखायचे असते. असाही एक मजेशीर खेळ खेळत होतो.
एका खेळात मुलं गोल गोल बसत होते. एकजण एखाद्या फडक्याचा सोटा घेऊन ‘मामाचं पत्र हारवलं ते मला सापडलं’ असं म्हणत भोवताल फिरायचा व पटकन कुणाच्यातरी मागे टाकायचा. एक फेरी मारुन जर त्याला दिसली नाही, तर तो सोटा उचलून त्याला उठे पर्यंत मारायचा. असा तो रंजक खेळ आम्ही खेळत होतो.
अधिक एक लपणा-झपणीचा… पहिली टीप… अमूक अमूक… दुसरी टीप अमूक अमूक… असा तो रंगतदार खेळ आम्ही खेळत होतो.
कधी कधी अंगणात बसून मुली एकमेकीच्या डोक्यातील उवा, लिक्टा किंवा लिखा काढण्यात मग्न होवून जात असत.
संध्याकाळी दिवस बुडण्याच्या आधी पोरी दिवसभर हात-पाय, तोंडावर बसलेली मातीची धूळ धुवून घेत व आरश्यात चेहरा पाहत पाहत नट्टा-पट्टा, साजश्रृंगार याच अंगणात करीत.
वावरातल्या कडब्याच्या बाडात जावून जाड जाड धांडे घेवून येत होतो.. ते तोंडाने शिलून त्याच्या पेरकांड्याला ब्लेड ने व्यवस्थित कापून घेत होतो. मग शिलका टोचून, एकमेकाला जोडून बैलबंडी, रेंगी. घर, सायकल किंवा ट्रक असं काहिबाही बणविण्यासाठी याच अंगणात किंवा कोठ्यात मी तासनतास गुंग होवून जात होतो.
कधी चिमण्या चिवचिव करत व तुरुतुर चालत अंगणात सांडलेले दाणे टिपत, तर कधी कावळे घरावर बसून कावकाव करीत; तेव्हा बाई म्हणायची,
’अवं माय…! आपल्याकडे आता पाव्हणा येणार… ! कावळ्याने तसा निरोप आणला… बाई.’
मग कावळ्याकडे पाहून,
’कोण पाव्हणा येणार ?’ अशी म्हणते न् म्हणते तर तो कावळा भुर्रकन कावकाव करत उडून जायचा.
मोठादादा एकदा मला सपरीमध्ये अभ्यासाला घेवून बसला होता. तो त्यावेळी मला म्हणाला,
‘माझ्यावर भिक मागायची पाळी आली, तरी मी तुला शिकवीन. पण तुझे शिक्षण बुडू देणार नाही.’
खरंच आहे…! आई, बाबा, दादा यांच्या दूरदृष्टी व ममत्वामुळे, तसेच बाबासाहेब आंबेडक्ररांच्या शिकवणीमुळे पिढ्यान पिढ्या डोक्यावरची शेणाची पाटी शेणाबरोबरच उकिरड्यावर फेकली गेली आणि माझ्या हाती लिहिण्याची पाटी आली, असंच म्हणता येईल.
अशा कितीतरी आठवणीं या अंगणाने, माझ्या या घराने कोरुन ठेवल्या होत्या. त्या डोळ्यासमोर आल्या की मन सैरभैर होत असे, हळवे होत असे, हलके हलके होत असे. भावनांचा निचरा होऊन मन शांत होत असे.
मला जेव्हा-केव्हा करमत नसे, तेव्हा घरातून अंगणात व अंगणातून घरात असं उगीचंच आत-बाहेर लुडबूड करत राहत होतो. घर-अंगणातल्या सुख-दु:खाचे क्षण त्यावेळी बोलके होत होते. मग ते माझ्याशी बोलू लागत. त्यातच मी हरवून जात होतो.
‘चला रे घरात… नाहीतर ओले व्हाल.’ दादाचा आवाज माझ्या कानात घुमला; तेव्हाच मी आठवणीच्या तंद्रितून जागा झालो.
आकाश कुंद झालं होतं. वारा थांबला होता. झाडाचं एकही पान हलतांना दिसत नव्हतं. अशावेळी जीवाची तगमग वाढत जात होती. श्वासाची उत्सुकता ताणली जात होती. वातावरणात उकाडा वाढत गेला होता. तेव्हा पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
एवढ्यात ढग जमा होवू लागले. ढगांनी आभाळाला वेढून घेतलं. चांदण्या बिच्चार्या… चुपचाप त्या ढगात लपून नाहीशा होत चालल्या होत्या.
पाण्याचे एकेक टपोरे शिंतोडे पडू लागले होते. घरात जावून गरमीने उकडण्यापेक्षा आणखी वाट पाहावी, म्हणून उगाच अंगावर धोतराचं पान ओढून तसाच चिडीचिप होवून झोपण्याचं सोंग घेतलं होतं. पण पाण्याचे थेंब पडणे काहीकेल्या थांबत नव्हते.
पावसाचा जोर वाढत चालला होता. हवेत गारवा जाणवत होता, अन् त्याच बरोबर मातीचा सुगंधही मोहून टाकत होता.
तसंच आम्ही पटापट उठलो. आपापली सातरी-बोथरी घेऊन घरात पळालो.
घरावर कवेलू होते. पण कुठे कुठे फुटल्यामुळे व उखड झाल्यामुळे वरून पाण्याची धार अंगावर येऊन पडायची. मग तेथून सातरी हलवावी लागे. घरातली कोरडी जागा ओली होवू नये म्हणून घरातले गंगाळ, गंज, पराती. गिलास, वाट्या जे असेल ते लहान-मोठे भांडे पाणी संगळवीण्यासाठी ठेवावे लागत असे. ते भरले की त्यातील पाणी बाहेर फेकून पुन्हा ते भांडे तेथे भरेपर्यंत ठेवावे लागत होते. असं हे एक अगावूचं काम मागे लागत होतं.
पावसामुळे घरात सर्वत्र आलेली ओल, चिकचिक, ओले कपडे, त्याचा कुबट वास हे दृष्य आमच्या पाचवीलाच पुजायला असायचं.
पाऊस येऊन गेला की, घरांच्या भिंतीतही गारवा जाणवत असे. तो गारवा अंगामध्ये भिनला की थंडीची हुडहुडी भरायची. अशा वेळेस चुलीजवळ बसून विस्तवावर हात शेकल्यावर अंगात थोडी उब भरल्यासारखी वाटायची.
असं आमच्या झोपेचं आणि त्याच बरोबर जीवनांचही खोबरं होत होतं.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
माझी बहीण-जनाबाई व मी विचार करत राहायचो, की आमचं ‘जुमळे’ आडनाव कसे पडले असेल? ‘जुमळे’ या नावाची व्युत्पत्ती ‘जमीनजुमला’ यावरुन झाली असावी असे वाटते. जमीन म्हणजे स्थायी संपत्ती व जुमला म्हणजे अस्थायी संपत्ती. त्याची राखण करणार्यास जुमलेदार असे म्हणत असल्याचा उल्लेख शिवाजी महाराजाच्या काळात होत हो्ता; असे मी इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते. म्हणून आमचा संबंध त्याकाळात राजेरजवाड्याशी असला पाहिजे. या विचाराने मग आमचा उर अभिमानाने भरुन येत होता.
तसेच जुमळे हे आडनाव इतर जातीत दिसतील; पण आमच्या समाजात मात्र नसल्यासारखेच आहेत. त्यामुळे आमच्या पूर्वजापैकी एखाद्या बाईने जुमळे आडनावाच्या शिंपी-तेली अशा जातीच्या माणसाशी घरठाव जोडला असावा. त्यामुळे जुमळे हे आडनाव तिच्या लेकरांना मिळालं, परंतु तिची जात मात्र बदलली नसावी असाही अंदाज बांधता येईल.
मी यवतमाळला शिकत असतांना माझ्या कॉलेजच्या होस्टेलमध्ये राळेगांव तालुक्यातील खडकी (सुकळी) या गावचा कृष्णा पण शिकायला होता. ही गोष्ट माझ्या बाबाला सांगितली. तेव्हा ते म्हणाले होते की, त्यांचे आजोबा-बुधाजी यांना आणखी दोन भाऊ म्हणजे विठोबा व बळीराम होते. त्यांच्यापैकी बळीरामच्या हातून पाटलाची गाय मारल्या गेल्यामूळे, तो घाबरुन रातोरात पळून गेला होता. बाबाचे आजोबा वडगांव-घाटंजी जवळील वरुड या गावला राहत असत. तसेच बल्लारशाह जवळील कळमना येथे कारुजीचं एक घर असल्याचे ऎकले होते. परंतु त्यांचेशी संबंध आला नव्हता. कदाचित त्यांच्यापैकीच पळून गेलेल्या बळीरामाचं वेल असावं; असेही बाबा सांगत होता.
पूर्वी असे निरनिराळ्या गावला राहत असलेले हे जुमळेचे कुटुब हिंगणघाट जवळील गिरड्ला भरणार्या बुवा फरीदच्या यात्रेला दरवर्षी एकदा जमत असल्याचेही बाबा सांगत होता. यात्रेवरून आल्यानंतर ‘दम दम साहेब’ म्हणून पाच घरातील धान्य गोळा करीत. ते सारे एकत्र करून शिजवून त्याचा काला करीत. त्याला ‘मलिंदा’ म्हणत. हा मलिंदा देवाचा प्रसाद म्हणून खात.
बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर यात्रेला जावून एकमेकांना भेटण्याची व मलिंदा खाण्याची ही प्रथा बंद झाली.
आमच्या कुटूंबामध्ये माझे आई-बाबा शिवाय मोठाभाऊ – शामराव, त्यापेक्षा
लहानभाऊ – देवदास, बहीण – जनाबाई नंतर मी व माझ्यापेक्षा लहानभाऊ – अज्याप असे सात जणांचा खटला होता. मोठ्यादादाचे लग्न झाले होते. वहिनीचे नाव अनुसयाबाई. लहानपणी तिला आम्ही भाभी म्हणत होतो. नंतर तिला कधी वहिनी म्हणायला लागलो, ते काही आठवत नाही. त्यांची मुले म्हणजे संघमित्रा, शुध्दोधन, अमिता, सुनिता, उमा व महेन्द्रा असं आमचं मोठं एकत्रीत कुटुब होतं.
माझ्या आईचं नाव अलुकाबाई व बाबाचे नाव कोंडू – ज्यांनी मला पहिला घास भरविला, बोबडे बोल शिकविले, दुडूदुडू चालायला शिकवले, तळहातावरच्या फोडाप्रमाणे वागवले, डोळ्यातील आसू पुसले, आजारपणात रात्रीचा दिवस केला, माझ्यावर अपार माया केली, माझं कौतुक करतांना त्यांच्या आनंदाला पारावर ऊरत नव्हता; असे माझे आई-बाबा साधे व खेडवळ वळणाचे होते. त्यांच्यामुळेच मी हे जग पाहू शकलो. माझ्या जीवनाला अर्थ मिळाला केवळ
त्यांच्यामुळेच !
आई लुगडं व चोळी घालायची तर बाबा धोतर व शर्ट घालायचा. तो एकटांगी धोतर नेसायचा. जेथे लुगडं किवा धोतर फाटलं असेल तेथे चिरुन दोन भाग करायचे. मग फाटलेला भाग काढून उरलेले दोन्हीही तुकडे एकमेकांना जोडून सुई-दोर्याने दांड भरायचे. नवीन लुगडं आणलं की, आई पहिल्यांदा घालत नव्हती तर ते वहिनी किवा कुण्यातरी जवळच्या बाईला नेसायला देत होती. नंतरच ती नेसत होती. याला घडी मोडणे असे म्हणत. ही पध्दत त्याकाळी खेड्यात प्रचलित होती.
बाबा कोणत्या गावला गेला की, डोक्याला धोतराचा पटका बांधायचा. तो कधी डोक्याचे केसं विंचरतांना भांग पाडत नव्हता; तर केसं फणीने मागे वळवायचा. त्याच्या कानावर व हाता-पायावर केसं वाढलेले होते. त्याचे कपाळ व कान मोठे सुपासारखे होते.
घरातला कर्ता पुरुष म्हणजे बाबाच. आईशिवाय त्याच्यापासून घरच्या लोकांना आधार, ताकद, शक्ती, प्रेरणा आणि जगण्याचा अतुट असा धागा ऎवढेच नव्हे तर संस्कार, कौटुंबिक परंपरा आणि संस्कृती असं काही सारंसारं मिळते. माझ्याही आई-बाबांनी आम्हाला ह्या सार्या गोष्टी भरभरुन दिल्यात. त्यांनी आमच्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांना सीमाच नाही
बाबा अगदी लहान असतांना, त्याचे आई-वडील मरगडीने मेले होते. तेव्हा तो व त्याचा मोठा भाऊ पांडू – या दोघांचा सांभाळ, त्याच्या मामाने व आईची आई म्हणजे आजीने केला होता, असे बाबा सांगत होते.
माझ्या आईला माझा मामा, मोठीआई, बाबा व गावातील काही लोक ‘लुली’ असेही म्हणत असत.
मी तिला विचारले,
‘आई, तुला लुली कां म्हणतात ?’
‘मी लहानपणी लुळ्यासारखी राहायची म्हणून मला लुली म्हणत.’ असे तिने सांगितले होते.
आई काहीच शिकलेली नव्हती. पण मी लहान असतांना तिला अभ्यासाबद्दल विचारत होतो. मी पाटीवर गणित मांडून आईला बरोबर आहे का म्हणून विचारत होतो.
‘नाही रे बाबू… चुकलं तुझं.’ असे ती म्हणायची. मी पाटीवरचं पुसून पुन्हा गणित मांडून आईला दाखवायचा.
‘आई, आता बरोबर आहे का ?’
’बरोबर आहे,’ अशी आई मग ठासून म्हणायची.
वास्तवीक आईला शिक्षण नसल्यामुळे तिला काही कळत नव्हते. परंतु माझे गणित पक्के व्हावे; म्हणून ती अशी करायची. त्यामुळे खरोखरच माझा. गणित हा विषय पक्का झाला होता. त्यात आईचा मोठा वाटा होता. मला मॅट्रीक मध्ये शंभर पैकी त्र्याहत्तर गुण मिळाले होते. तसा गणित हा विषय माझा आवडीचा होता.
निळोण्याच्या बबन गुरुजीनी एकदा कविता पाठ करुन आणायला सांगितली होती. माझं पाठांतर फार कच्च होतं. आई मला व बाईला सकाळीच कोंबड्याच्या पहिल्या बागेला उठवायची. मी डोळे चोळतच उठायचा. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात डोळे फाडून फाडून पुस्तकात पाहायचा व कविताची घोकंपट्टी करायचा. पण कविता मात्र काही केल्या पाठ होत नव्हती. मग मी मुळूमुळू रडत होतो. आईला माझी मोठी कीव यायची. मग ती म्हणायची,
’नाही पाठ होत तर राहू दे. मी तुह्या मास्तराला येऊन सांगतो… माह्या पोराला मारु नका म्हणून…’ आईच्या समजावण्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझं एकदम हलकं हलकं होवून जायच.
आई कपाळाला मेण लावून, त्यावर मोठं कुंकू लावत होती. आई काळ्या मण्याची मध्यभागी डोरले असलेली, गळ्याला पिचकी लागेल अशी ती गाठी घालायची. ती ही गाठी घोड्याच्या शेपटीच्या लांब केसात ओवत असे. त्यामुळे गाठी लवकर तुटत नाही व घोड्याच्या केसाचा मान असतो, अशी ती सांगत होती.
काही भटके लोक घोडे घेऊन आमच्या गावला राहूटीला आले की, त्यांच्या चरत असलेल्या घोड्यांच्या शेपटीचे केसं आम्ही ओढून उपडत होतो. त्यावेळी घोड्याच्या पाय झाडण्यापासून सावध राहावे लागे.
गाठी तुटत नाही हे आईचे म्हणणे ठीक आहे; पण त्याचा मान असतो हे कोडं मात्र उलगडत नव्हतं. नंतर मला आर्य आणि अनार्याच्या संघर्षाचा इतिहास जेव्हा माझ्या वाचण्यात आला तेव्हा असे कळले की, परदेशातून घोडे घेऊन आलेल्या आर्यांनी मूलनिवासी लोकांवर कहर करुन माणसांना मारले. मग ते त्यांच्या बायकांना ओढून नेत असत. ओढून नेतांना त्यावेळी सहज उपलब्ध होत असलेल्या घोड्याच्या केसाची दोरी, त्या बाईच्या गळ्यात टाकून ओढत नेत. याला ‘वहतू’ असे म्हणत. त्यांनी येतांना सोबत बायकांना आणले नव्हते. त्यामुळे ते माणसांना मारुन बायांना पळवून नेत. म्हणूनच ब्राम्हण लोक बायांना सुध्दा शुद्रांप्रमाणे वागवत असत. त्या बायांच्या मेलेल्या माणसाचे रक्त त्या बाईच्या कपाळावर लावत. तेव्हा पासून कपाळाला कुंकू लावण्याची प्रथा पडली आहे. तसेच काळा रंग हा गुलामीचे प्रतीक आहे. म्हणूनच लग्न झालेल्या बाया काळ्या मण्याची गाठी घोड्याच्या काळ्या केसात ओवून गळ्यात घालत असतात; हे त्यामागील खरं इंगीत आहे.
त्यावर्षी यवतमाळवरून अकोलाबाजारला जाणार्या रोडवर गिट्टी टाकण्याचे सरकारने कामे काढले होते. हे काम वाघाडी नदीच्या पलीकडे सावरगड गावाच्या अलीकडे बरडाजवळ चालू होते. तेथे आई, बाबा, दादा, वहिनी सकाळीच सर्वांची भाकर व एका छोट्या मडक्यात पाणी घेऊन यायचे. मी सुध्दा त्यांचे सोबत जात होतो. त्यावेळी मी अगदी लहान होतो. तेथे मी एकटा किंवा कुणातरी मुलांसोबत दिवसभर खेळत राहायचा. बाबा-दादा खदानीतून सब्बल आणि घणाचा वापर करुन दगडं काढून आणीत. त्याचे हातोड्यांनी आई, वहिनी बारीक चिपोरे करून गिट्टीचा ढीग करीत. संध्याकाळी मुकादमच्या समोर मोजून देत.
आई कधी कधी तिच्या जीवनातील गमती जमती सांगायची. असेच आईने शामराव-दादाची एक मजेशीर गोष्ट सांगितली होती.
दादा लहान असतांना खेळून खेळून दमून जायचा. मग त्याला झोप यायची.
‘मां तुह्या ‘बा’ला सांग न् की, माह्यासाठी बाभी-माभीच्या झाडाला पाळणा बांधून दे म्हणून.’ माझ्याजवळ येऊन असा म्हणायचा.
माझ्यासाठी बाबाला बाभळीच्या झाडाला पाळणा बांधून दे, असं त्याला म्हणायचं होतं. पण त्याला तसं म्हणता येत नव्हतं. तो ‘आपल्या बापा’ऎवजी ‘तुझ्या बापाला’ असा शब्दप्रयोग करुन त्याच्या सांगण्यात कळत-नकळत विनोद होत असे. मग बाबा झाडाच्या दोन फांद्याना दोरी बांधून त्याच्यासाठी झोपाळा करुन द्यायचा.
त्याची दुसरी एक गोष्ट आईने सांगितली होती. तो थंड्या पाण्याला गरम पाणी म्हणायचा व गरम पाण्याला थंड पाणी म्हणायचा. त्याची आंघोळ करतांना आई त्याच्या अंगावर गरम पाणी टाकायची. तेव्हा तो, ’थंड आहे… थंड आहे…’ असं म्हणत, तुडूंग तुडूंग नाचायचा.
दादा आईला ‘मां’ म्हणायचा व बाबाला ‘बा’ म्हणायचा. आम्ही मात्र आई व बाबा असे म्हणत होतो. अशा गोष्टी सांगितल्यावर आमची मोठी करमणूक व्हायची.
आईने आणखी एक तिच्या आयुष्यात येऊन गेलेला खडतर असा प्रसंग सांगितला होता. ती म्हणाली,
’त्याकाळी दुष्काळी परिस्थितीने लोक कावून गेले होते. दाळ-दाण्याचा एक कणही खायला मिळत नव्हता. अशावेळी कडूनिंबाचा कडूडक पाला खाऊन दिवसं काढण्याची पाळी आली होती. असंच आम्ही जंगलात काही मिळते काय, म्हणून मी, बापुरावची माय-गिरजाबाई, प्रल्हादची माय-झिबलाबाई, गोविंदादाची नवरी-पदमाबाई अशा काही बाया बोरं, चारं, आवळे, टेंभरं अशासारख्या रानमेव्याच्या शोधात खरोल्याच्या जंगलात गेलो होतो. जंगलात फिरता-फिरता कधी दिवस बुडला ते कळलेच नाही. अंधार पडायला लागला, तेव्हा आमच्या पोटात भीतीचा गोळा उभा झाला. आम्हाला रस्ता पण गवसत नव्हता. एवढ्यात देवदुतासारखा एक खरोल्याचा माणूस त्या जंगलातून जातांना दिसला. त्याने आम्हाला चौधर्याचा रस्ता दाखवीला. तवा कुठे आम्ही जेवण रातच्याला घरी आलो.’ खरंच आईने सांगितलेल्या या प्रसंगाने मला पुरते हलवून सोडले होते.
माझे बाबा लहान-सहान आजारावर घरघूती व झाडपाल्याचा उपयोग करायचा. तो चिलिमीचा कीट काढून त्याच्या भोवताल गुळ लाऊन किरम झालेल्या चिमुकल्याच्या नरड्यात बोटाने ढकलून द्यायचा किंवा शापीचे पाणी पाजायचा. चीलीमीचा किट इतका तीक्ष्ण आणि कडू असायचं की क्षणभर सुध्दा तोंडात ठेवणे कठीण जायचं. त्याने गरगर अंग फिरायचं. म्हणूनच त्याला गुळाचा लेप देत. तापावर महारुकाच्या सालीचा किंवा कडूनिंबाच्या सालीचा काढा द्यायचा. हळद, आले, सहद, लसून, रुई व उंबराच्या झाडाचं दूध असे आणखी बरेच काही औषधी त्याला माहिती होत्या. डोके दुखीवर मसाल्याच्या पानाचा टोप बांधत असे.
एकदा दयारामच्या नाताने पांढर-वांढर डोळे केले होते. त्याला बरबडा गावच्या कुपाला असलेल्या एका वनस्पतीचा रस पाजल्यावर तो बरा झाला.
बाबा एखाद्या रविवारी बाजारातून हिंगुळ व मटण विकत आणायचा. मटणात हिंगुळ टाकून तो एकटाच ही भाजी वेगळी शिजवून खात होता. इतरांना ही भाजी खायला मनाई होती. कारण फार कडक असल्याने इतरांना पचत नव्हती. हिंगुळामुळे अंगात स्फुर्ती व शक्ती टिकून राहते. ढोरासारखे कष्ट केले तरी अंग दु:खत नाही, असे म्हणत
जंतावर इंद्रायणीच्या फळाचा उपयोग करायचा. मामाच्या वावरात घोटीच्या आंब्याजवळ ह्या इंद्रायणीचं वेल होतं. हा वेल त्या घोटीच्या आंब्यावर चढत होतं. या वेलाला लालजर्द रंगाचं फळ लागायचं. ह्या फळाची चव अत्यंत कडू होती. म्हणून हे फळ घरी आणून आड्याला बांधून ठेवत व त्याचा वापर काम पडेल तेव्हा औषध म्हणून करीत असत.
त्याकाळी आम्ही कंबरमोडीच्या पाल्याचा रस काढून जखमेवर लावत होतो. असे म्हणतात की, माणसामध्ये एक प्रकारची अंगभूत प्रतिकारक्षमता असते. एखाद्या वेळेस संपूर्ण वाताहात झाली तरी देखील एखादी व्यक्ती आजारी न पडता तग धरुन राहते; याचं कारण त्याची अंगभूत प्रतिकारक्षमता ! माझ्या असं वाचण्यात आलं होतं, की अगदी लहान मुलाला पाजण्यात येणार्या आईच्या दुधातच कॅंन्सरचे रोगजंतू मारण्याचे सामर्थ्य असते. तसेच स्तनपान म्हणजे बाळाच्या भुकेची निसर्गाने केलेली तजवीज. आईच्या दुधातून मिळालेली रोग प्रतीकारक शक्ती बाळाला सुदृढ ठेवते. आजारापासून दूर ठेवते. काही मुलं दोन वर्षापर्यंत दूध पीत असतात. खेड्यातील बाया घरातलं किंवा बाहेरचं काम करतांना घरी बाळांना राखायला कोणी नसेल त्तर ती लहान बाळांना अफूचा घुटका देऊन पाळण्यात झोपून ठेवत असत. म्हणून बाबा देत असलेल्या जडीबुटीच्या औषधी मोठ्या गुणकारी होत्या, असंच म्हणता येईल.
माझे बाबा फार कष्टाळू होता. तसाच दयाळू वृतीचा पण होता. तो मांस खायचा; परंतु त्याने कधीही हिंसा केली नाही, की कधीही कोंबडा कापल्याचं मी पाहिलं नाही.
एकदा घरातल्या कोणीतरी पारध्याकडून सात-आठ बाठरं पक्षी विकत घेतले होते. त्यावेळी आमचे जेवण इरकल्याने संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी म्हणून त्या बाठरांचे पाय एकमेकाला बांधून एका पिवशीत टाकून खुंटिला लटकवून ठेवले होते. ते सर्व जीवंत होते. बाबा घरात आल्यावर त्यांना ते दिसले. त्यांची अवस्था पाहून बाबांना करुणेचा गहिवर आला. त्यांना वाडीत नेऊन, पाय मोकळे करुन सोडून दिले.
दुसर्या एका प्रसंगात, ते शहरातून गावला येत असतांना गोधणीच्या कोलामाच्या मोहाच्या वावरात एक घार एका सशाला टोचत असल्याचे पाहिले. त्यांनी सशाला घारीच्या तावडीतून सोडवून लवणाचे पाणी पाजले. सशाला तरतरी आल्यानंतर बरडावर नेऊन सोडून दिले. त्यांच्या ऎवजी दुसरा कोणी असता तर त्यांनी त्या सशाला घरी आणून शिजवून खाल्ले असते ! असा त्यांचा कनवाळू स्वभाव होता.
बाबा त्यावेळी मामाची शेती वाहत होता. तो, दोन्हीही दादा, वहिनी व आईंला सोबत घेऊन एका मुठीने शेतात काम करुन भरपूर पीक काढीत असत. जीव ओतून, मरणाचं काम करुन सोनं पीकवीत असत.
तसेच बाबा इतरही काही धंदा-व्यवसाय करत होता. कधी कधी गावोगावचे आंबे बारावरच विकत घेऊन व्यापार करत होता.
बाबा पावसाळ्यात वाडीतल्या घोटीच्या आंब्याजवळ लवणाच्या काठावर मोठ्ठाल्या पानाचे मसाल्याचे पाने तोडून यवतमाळला विकायला घेऊन जात होता.
एकदा तर त्यांनी लवणाजवळ दशरथ-मामाच्या वावराला लागून असलेल्या वाडीच्या कोपर्यात कवेलूचा कारखाना टाकला होता.
तसेच बाबाने हिवाळ्यात शिवा-आबाजीचे नाल्याजवळील शेत केले होते. त्यात वटाणा पेरला होता. हिवाळ्यातली थंडी व नाल्याचा ओलावा त्यामुळे वटाण्याचं भरपूर पीक येत होते. मग पोतेच्या पोते भरुन यवतमाळच्या बाजारात विकायला न्यायचा. शेंगा लागल्यावर, आम्ही भावंड ते राखायला आईसोबत जात होतो.
सकाळी गेल्यावर तेथे सर्वदूर धूकं पसरलेलं दिसायचं. प्रत्येक लहान-मोठ्या झाडाच्या पानावर दवाचे बिंदू जमा झालेले असायचं. त्या दवबिंदूने हातपाय ओले होत होते. या दवाचा फायदा हरभरा व वाटाण्याच्या पिकाला होत असे. म्हणून निसर्गानेच अशी व्यवस्था केली होती की काय, कोण जाणे?
त्या वाटाण्याच्या डुंग्यात दिवसभर मस्त करमत असे. एकतर नाल्याच्या काठावरील झाडावर मस्त खेळायला मिळत होतं. तेथे आजनाचे झाडं होते. त्याच्या मोठमोठ्याल्या काही फांद्या नदीच्या पात्रात तर काही जमिनीवर टेकलेले असल्यामुळे, या झाडावर चापडूबल्याचा खेळ खेळण्यात आम्ही मस्त रमून जात होतो. शिवाय वाटाण्याच्या कोवळ्यालच शेंगा खायला मिळायचं. अशा भाजलेल्या कोवळ्या लुसलुशीत शेंगा तोंडाने ओरपून खायला फारच मजा यायची.
बाबा मामाची शेती बटईने वाहत असल्यामुळेच आमची आर्थिक परिस्थिती गावातल्या इतरांपेक्षा बर्यापैकी होती. गावामध्ये रुबाब होता. आमचं घर धन-धान्याने भरलेले राहायचं. खायला-प्यायला आम्हाला चांगलं चुंगलं मिळत होतं. चांगले कपडेलत्ते घालत होतो. त्यावेळी आम्हाला झोपायला दोरीने विणलेल्या बाजा राहत होत्या. असे ते त्यावेळेसचे आमचे वैभवाचे दिवसं होते.
एखाद्या वर्षी नापिकी झाली, दुष्काळ पडला तरच आई, बाबा, दादा, वहिनी रोजमजुरी करायला बाहेर पडायचे. परंतु ऎरवी त्यांना मी कधीही कुणाच्या शेतावर मजुरीचे कामे केल्याचे पाहिले नाही.
कुळकायदाच्या भीतीमुळे मामाने त्याची शेती परत मागितली होती.
आमच्या पोटापाण्याचं एकमेव साधन निघून गेलं होतं. त्याआधी देवदास-दादाही आमच्यातून निघून गेला होता. बाबा हताश झाला होता. शामराव-दादा निराश झाला होता. जसं मेढीचा बैल बसला, की बाकीचे बैल फिरत नाहीत, तसे बाबा व दादाचे झाले होते. आमचं पूर्वीचं वैभव आता हळूहळू ओसरायला लागलं होतं.
घराच्या भिंतीला पोपडे धरून पडायला लागले होते. चिरलेल्या भिंतीचं ढेकूळ निखळून पडत चाललं होतं. आमच्या घराला एखाद्या भोंगराच्या घरासारखं दहा ठिकाणी भोकं पडत होतं. घरावरचं खपरेल इकडे तिकडे सरकून सूर्याचे किरणं थेट घरात शिरत होते. त्यामुळे त्याचे अनेक पांढरे ठिपके घरात जागोजागी पडायचे. किरणाच्या प्रकाशात धुळीचे सुक्ष्म कण तरंगत दिसायचे. ते पाहण्यात मग मी गढून जात होतो.
झोपायच्या बाजाच्या दोर्या तुटायला लागलेत. त्याचे गातं तुटून मोडकळीस आलेत. एकेक बाज चुलीत जाळायच्या कामात येऊ लागलेत. दादाने कधी नवीन बाजा बणविल्या नाहीत की, तुटलेल्या नारळाच्या दोर्या बदलल्या नाहीत.
एक बाज राहिली होती, तिच्या दोर्या तुटून झोलणा झाली होती. बाबा दोर्या ताणून ताणून बांधायचा व त्यावरच झोपायचा. खाली जमिनीवर त्याला झोप येत नव्हती. आम्ही मात्र खाली जमिनीवर झोपायची सवय केली होती.
कोठ्यातील गुरं-ढोरं गेलेत. आम्ही आता कोठ्याचा उठण्या-बसण्यासाठी व झोपण्यासाठी वापर सुरु केला. गांवच्या सरपंच पदासोबत ग्रामपंचायतीकडून मिळालेला भोंगा असलेला रेडीओ याच कोठ्यात स्थिरावला.
रोज सकाळपासून हा रेडिओ गावातील लोकांसाठी सुरु करावे लागे. सकाळी सकाळी हिंदुच्या देवाधर्माचे गाणे आकाशवाणीवर लागत असे. रेडिओ ऎकणारा फक्त हिंदुच लोक असतात की काय, इतर धर्माचे म्हणजे बौध्द, मुस्लिम, ख्रिचन, जैन असे लोक काय, गाणे ऎकत नाहीत की गाणे सुरु असतांना ते आपल्या कानात कापसाचे बोळे घालत असतात; असा समज आकाशवाणीचा झाला होता की काय, कोण जाणे ?
संध्याकाळी शेतकर्यांसाठी रेडिओवर कार्यक्रम लागायचा. ‘आमची माती आमची शेती.’ असे काही शेतीबाबत माहिती सांगणारे चांगले कार्यक्रम असायचे. माझा मामा हा कार्यक्रम सुरु झाला, की आमच्या घरासमोरील देवळाच्या पारावर येवून बसायचा व कान देवून हा कार्यक्रम संपेपर्यंत ऎकत राहायचा.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवेदक ‘रामराम मंडळी’ असा म्हणायचा. मला मोठा राग यायचा. मी त्यांना पत्र लिहून विचारले होते, ‘रामराम म्हणण्यापेक्षा नमस्कार का म्हणत नाही? कारण तुमचा कार्यक्रम ऎकणारा सर्वच रामराम म्हणणारे शेतकरी नाहीत’ तरीही त्यांनी रामराम म्हणणे काही सोडले नव्हते.
मी आकाशवाणीच्या मराठीत लागणार्या बातम्या मात्र हमखास ऎकायचा.
ह्या रेडिओमुळे आम्हाला फारच करमायचं व दादा सरपंच असल्याचा गर्व व्हायचा.
मी एका तुटलेल्या बाजीच्या दोर्या सवारून, ती बाज याच कोठ्यात टाकली होती. त्यावर कॉलेजचा अभ्यास करत होतो व डुलकी आली, की तेथेच झोपत होतो.
दुपारच्या वेळेस रेडिओवर लागलेले भावगिते ऎकण्याचा मला फार मोह व्हायचा. ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती’, ‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसांची’, ‘भातकुलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘असा बेभान हा वारा’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतद: प्रेम करावे’, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘चाफा बोलेना.’ अशा कितीतरी भावसूंदर संगीतरचना व त्या स्वरांतून पाझरणारे अप्रतीम भाव मला अतिशय मोहवून टाकत असे. हे गाणे सतत माझ्या ओठावर खेळत राहायचे.
काही हिंदी सिनेमातील गाणे पण फार आवडत असे. त्यातील संगीताची सुमधुरता, आवाजाची फेक, लयबध्दता, तिव्रता, गोडवा, कारुण्य, माधुर्य अशा रसरसतेने भरलेले गाणे तन्मयतेने ऎकत बसावे वाटे.
सुगी करायला आलेल्या बिर्हाडांनी याच कोठ्यात आश्रय घेतला होता. काही दिवस याच कोठ्यात पहिल्या-दुसर्या वर्गाची शाळा भरत होती.
अंगणासमोरचा कोठा आता राहीलाच नव्हता. कारण त्याच्या छपरावरचा लाकूड-फाटा व कवेलू, सपरीवरचे टिनं दादाने विकवाक करुन टाकले होते. कोठ्यातले गाई, बैलं, बकर्या व बैलगाडी पण दादाने विकून टाकले होते.
आई-बाबा गावोगावी फिरुन व्यापारउदीम करीत असल्यामुळे गावला फक्त दादाचे कुटुब तेवढे राहत होते.
वहिनी, तिच्या एक-दोन मोठ्या मुली आता लोकांच्या कामाला जात असत. मी व बाई सुट्ट्या लागल्या, की मजुरीचे कामे करुन दादाच्या फाटलेल्या संसाराला ठिगळं लावत होतो.
आम्हाला एक गंमत वाटायची. खेड्यात नवरा मास्तर असला, की लोक बायकोला मास्तरीन म्हणत, पाटलाच्या बायकोला पाटलीन म्हणत, सरपंचाच्या बायकोला सरपंचीन म्हणत. म्हणून आमच्या वहिनीला लोक जेव्हा सरपंचीनबाई म्हणत; तेव्हा आम्हाला हसू येत असे. आता वहिनीची अवस्था मात्र ‘पाटलाची बायको पायघोळ नेसे अन् फाटलं तुटलं की वरवर नेसे.’ अशी झाली होती.
घरामध्ये अवदसा शीरत गेली. गरिबी आता हात धुऊन मागे लागली होती. त्यामुळे आमच्याही शिक्षणाची आबाळ होत गेली.
आता घराला घरपण राहिले नव्हते. राहिल्या होत्या केवळ पडक्या भिंती ! त्याच्याकडे उदासपणे पाहात गतकाळाचे हरवलेले वैभव आम्ही शोधत होतो.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
आमच्या घरात कलाकार लोक होते. बाबाला तमाशाचा नाद होता. त्याने लोककलेचा वसा घेतला होता. देवदास-दादा सुंदर बासरी वाजवायचा. त्याला पेटी वाजवण्याचा पण शौक होता. शामराव-दादा छानपैकी पेटी वाजवायचा. तो कव्वाली व गाणे सुध्दा म्हणायचा. दादाचा आवाज पहाडी पण काळजाला पाझर फोडणारा होता.
मला व माझा लहान भाऊ-अज्यापला मात्र कोणतीही कला अवगत नव्हती. कारण आम्ही दोघेही शिक्षणात रमलो होतो. त्यामुळे आम्ही दोघेही संगीतकलेपासून कोसो दूर राहिलो. मला बासरी शिकायची फार इच्छा होत असे. पण कधी जमलेच नाही !
शामराव-दादा, प्रसिद्ध कव्वालीकार ‘नागोराव पाटनकर’ यांचा शिष्य व निस्सीम चाहता होता. आमच्या गावात भजन मंडळ होतं. दादाशिवाय, नामदेव, रामधन, किसन, उध्दव, लक्ष्मण असे त्याच्या बरोबरीच्या वयाचे काही लोक त्या भजन मंडळात होते.
दादाला गांवातील लोक ‘मास्तर’ किंवा कोणी ‘पेटकर’ म्हणायचे. त्याच्याच नावाने ते भजन मंडळ ओळखल्या जात होते. त्यांच्या भजनामध्ये नेहमीच नागोराव पाटनकरांची कव्वाली, शेरशायरी तसेच कवी राजानंद गडपायले यांनी रचलेल्या गितांचा भरपूर समावेश असायचा. दादा त्यांची कव्वाली व गिते छान गात होता.
‘थांबारे दलितांनो,
असा निष्टूर करुनिया बेत,
नका रे उचलू भिमाचे प्रेत !’ या त्याच्या कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या गाण्याने लोकांच्या डोळ्याला अक्षरश: पाणी येत असे.
नामदेव व रामधन हे दोघे आळीपाळीने तबला वाजवीत होते. नामदेव सुध्दा कव्वाली व गाणे म्हणत होता. कुणीतरी झांज वाजवत होते. बाकी लोक टाळ व चिपळ्या वाजवीत. मूळ गायकाने एक पद म्हटले, की तेच पद एकसाथ सर्वजण म्हणत असत. त्यामुळे ते गाणे काळजाला जाऊन भिडत असे.
त्यांचे भजन मंडळ आजूबाजूंच्या खेड्यापाड्यात जबरदस्त गाजले होते. इतरही गावात त्यांच्या भजनाचे कार्यक्रम होत असत. त्यांच्या भजनात आंबेडकर चळवळीतील जागृती गितांचा, भीम गितांचा व बुध्द गिते भरपूर असायचे. त्यांच्या भजनाने मनाला चटका लाऊन जायचा. खेड्यातील लोकांना तेच एक मनोरंजनाचे व जागृतीचे साधन होते. बुध्द-भिमांचे विचार, त्यांचा मोठेपणा, त्यांचे कार्य व कर्तृत्व, त्यांचा आदर्श त्या गितांतून प्रकट होत असे. त्यांच्या खणखणीत आवाजातील भजनाचा सूर सर्वत्र निनादत असे.
आणखी एक भारी या गावाचा एक आंधळा माणूस आमच्या गावाला कधी कधी यायचा. त्याला कुंडलिक बुवा म्हणायचे. तो भजन मंडळात उत्कृष्ट पेटी वाजवायचा व गाणे पण छान म्हणायचा. त्याच्या आंधळेंपणाकडे पाहून मला मोठं कौतुक वाटायचं.
त्यावेळी लग्नकार्य रात्रीला लागत असे. लग्न लागल्यावर लोकांच्या जेवणाच्या पंगती उठल्यावर, लगेच भजनाची तयारी सुरु व्हायची. भजनं ऎकण्यासाठी लोक लग्न मंडपात जमायचे. खेड्यात सोयीअभावी लग्नाला आलेल्या सर्व लोकांची झोपण्याची व्यवस्था करणे थोडेच शक्य होते ? म्हणून ते भजन ऎकण्यासाठी रात्रभर जागे राहायचे. मुलं-बाळं, म्हातारे-कोतारे तेथेच पाय दुमडून आडवे होत.
कधी कधी एखाद्या लग्नात लॉउडस्पिकर असायचा, तेव्हा गावांतले काही लोक मग घरुनच सकाळपर्यंत गाणे ऎकत राहायचे. त्यांच्या वाद्याच्या व आवाजाच्या स्वरांनी सारं आसमंत पुलकित होवून जात असे. अशावेळी त्यांच्या मनात आनंदाची पहाट उगवली नसेल, तरच नवल !
मी सुध्दा त्यांच्या भजनाच्या गाण्यांनी भारावून जात होतो. त्यामुळे मला गिते रचण्याची प्रेरणा पण मिळायची. तसा मी एकांतात बसून प्रयत्न करुन पाहत होतो. एका वहीत लिहून काढले होते. परंतु जमले की नाही, तेही कळत नव्हते. कारण ते कोणाला दाखविण्याची हिम्मत होत नव्हती. कदाचित चुकले तर…? म्हणून भिती वाटत होती. नंतर ती वही कुठे गेली कुणास माहीत ?
माझी मोठीआई-धुरपताबाईचा मुलगा-तुळशीराम, ह्याने त्याची लहान बहीण, जमुणाबाई हिचा धुमधडाक्याने लग्न केले होते. लग्नात त्याने यवतमाळवरुन बैलबंडीवर भाड्याने जनरेटर व लॉउडस्पिकर आणला होता. लग्नमंडपात व बाहेर ट्युबलाईटच्या प्रकाशाचा झगमगाट पसरला होता. त्यावेळी आम्ही पोरं लग्नात अशी सुंदर रोशनाई पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे आनंदाने उड्या मारत होतो.
लॉउडस्पिकरच्या भोंग्याचा भल्ला मोठा आवाज आणि त्यातून बाहेर पडलेल्या भीम-बुध्दांच्या एका एका गाण्याचा सुमधूर साजाने संपूर्ण गाव कसं खडबडून जागा झाल्यासारखे वाटत होते.
त्यावेळी भाकरीच्या तव्यासारखे काळ्या रंगाचे तावे होते. त्यावर सुई ठेवून तवा फिरला की भोंग्यातून गाणी उमटत असल्याचे पाहून नवल वाटत होते.
‘तब मानव तू मुखसे बोल… बुध्दम शरणम गच्छामी’. हे अंगुलीमान सिनेमाचे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. हा सिनेमा यवतमाळला लागला होता, तेव्हा शामराव-दादा गावांतील लोकांना पाहण्यासाठी घेऊन गेला होता. आम्ही पण घरातले सर्वजण गेलो होतो.
’भीमरायाने सोडीयले गाव. पहा मरणाने साधीयला डाव रे….’
’होता तो भिम माझा, कोहिनूर भारताचा, बुध्दाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा…’
‘पहा पहा मंजूळा माझ्या भिमरायाचा मळा…’
‘क्रांतीविर महापुरुष जन्मा, आले धरतीवर, भीमराव आंबेडकर, धन्य ते भीमराव आंबेडकर…’
‘जीवाला जीवाचे दान माझ्या भिमाने दिलं, झिजवूनी जिवाचं रान माझ्या भिमाने केलं…’
‘हे खरंच आहे खरं, भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय हो जगभर…’
‘श्री बुध्दाच्या चरणावरती विजयादशमी दिनी, दिक्षा दिली आम्हा भिमाने मंगल दिन तो जनी…’
‘जरी संकटाची काळरात्र होती, तरी भिमराया तुझी साथ होती…
’पहाट झाली, प्रभा म्हणाली, भीम जयंती आली, सांगा ती चांदणी येऊन खाली, वारा भिमाला घाली…’ असे लॉउडस्पिकरवर त्याकाळी नेहमी लागणारे सदाबहर गितं माझ्या मनात रुंजी घालत असत.
या लग्नात मोठी गंमतच झाली होती. जमुणाबाईला हिवरा-दरणे या गावला दिलं होतं. तिच्या लग्नाची कलती वरात रात्रीला बैलगाड्या, दमण्या, रेंग्या घेऊन निघाली होती. मी पण एका गाडीत बसलो होतो. किर्र काळोखाच्या जंगलातून, झाडाझुडपातून, नदीनाल्याने आमच्या बैलगाड्या चाकांचा खडखडात करीत, अंधार चिरत जात होत्या. अशावेळी धुरकर्याने सांगितले, की नाल्याच्या काठावर वाघ बसून आहे. त्याचे डोळे टॉर्चचा लाईट लागल्यासारखे चमकत होते. मी तर भीतीने अर्धामेला झालो होतो. तेथून काही दूर आमची गाडी निघून गेल्यावर जीवात जीव आल्यासारखे वाटले.
अशा भीतीदायक वातावरणात आमचा प्रवास सुरु असतांना; एकदा तर तहानेने तोंड सुकून आले होते. उन्हाळ्याचे दिवसं असल्यामुळे खेड्यात त्यावेळी पाण्याचे फार दुर्भिक्ष राहत होते. पाणी कुठे प्यायला मिळेल काय ? याची चिंता लागून राहीली होती. रस्त्यात असंच एक खेडं लागलं होतं. गावाच्या कोपर्यातील एका झोपडीच्या बाहेर अंगणात पाण्याने भरलेला एक माठ ठेवला होता. आम्ही गाडीतून खाली उतरून त्या झोपडीजवळ गेलो.
’कोण आहेरे… माह्या नातरांनो… ’ असा त्या झोपडीतून एका आजीबाईचा आवाज आला.
आमच्या सोबत तुळशीराम-दादाचा चुलत भाऊ, हरीभाऊ होता. तो मोठा गमत्या होता.
’थांबा रे. आजी लय चांगली आहे. ती सगळ्यांना पाणी पाजते. गडबड करु नका.’ तो तिला हरभ र्याच्या झाडावर चढवीत होता. खरंच, त्याच्या गोड-गोड बोलण्यामुळे तिच्यावर काय जादू झाली का ? पण मडक्यातलं पाणी संपेपर्यंत तिने सर्वांची तहान भागवली होती.
सकाळी सूर्य उगवल्यावर आम्ही हिवर्याला पोहोचलो. हे गाव वर्धा नदीच्या काठावर आहे. मी माझ्यासोबत आलेल्या मुलांसोबत मस्त नदीच्या पाण्यात सचैल पोहत होतो.
या गावला बाभळीचे झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याचे, मी पहिल्यांदाच पाहत होतो.
नदीच्या काठावर सिंदीचे उंच-उंच झाडं वाढले होते. पण या झाडाजवळ जाणे म्हणजे मारक्या बैलाजवळ जाण्यासारखंच कठीण काम होतं. कारण सिंदीचे अणकु्चीदार टोकं असलेले पाने व बाभळीचे मोठ्ठाले काटे – गुरांच्या कोठ्यातील गव्हाणात ठाण मांडून बसलेला कुत्रा जसा ढोरांना गवत खाऊ देत नाही व स्वत:ही खात नाही – तसेच हे पाने व काटे आमची वाट अडवून बसले होते. तरीही हिंमतीने तिथपर्यंत जाऊन दगडाने पिकलेले फळं पाडून आम्ही खात होतो.
म्हणून संत कबीराने या झाडाची उपमा देऊन समाजातील उंच वाढलेल्या लोकांबद्दल लिहीले –
’बडा हुवा तो क्या हुवा, जैसे पेड खजूर !
पंछिकोतो छाया नही, फल लागे अतीदूर !!
.बाबा तमाशात उत्कृष्ट ढोलक वाजवायचा. गळ्यामध्ये ढोलक अडकवून दोन्ही हाताच्या बोटाने वाजवत होता. हाताच्या बोटाच्या करंगळीला व अंगठ्याच्या जवळच्या तर्जनीला बारीक काडी बांधून एखाद्या सिनेमाच्या तमाश्यात जसे ढोलकी टन्… टन्… असा आवाज करत असते तसाच आवाज बाबाच्या ढोलकीतून येत होता. मग त्याच्या ढोलकीचा सुरेल व मोहक आवाज माझ्या कानात बर्याच वेळपर्यंत घुमत राहायचा.
खरं म्हणजे बाबाने तमाशात काम करु नये, ढोलक वाजवू नये; असेच माझ्या आईला व घरच्यांना वाटत असे. माझा मामा-दमडू व मोठी आई-धुर्पताबाई त्यामुळे बाबाचा तिरस्कार करीत होते. माझा लहान भाऊ-अज्याप याने तर एकदा दुकानाच्या खोलीत ठेवलेली बाबाची ढोलक बाहेर फेकून दिली होती. माझ्या मनांत मात्र तमाशातील ती रंजक कला ठसून गेली होती.
ढोलक वाजविणे ही सुध्दा एक कलाच आहे. असे म्हणतात की, सुख-दु:खाचे प्रतिबिंब सहजपणे कलेत उमटत असतात. कला ही मानवी जीवनाचा अविष्कारच नाही तर ती आपल्या सांस्कृतीक जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे, ही गोष्ट त्यावेळी कुणाच्या लक्षात येत नव्हती.
तमाशाच्या फडात आमच्या गावचा अभिमन, हा माणूस नाच्याचा काम करायचा. त्याला ’अभ्या’ म्हणायचे. तो जेव्हा मेकअप करून लुगडं नेसायचा, तेव्हा एखाद्या बाईसारखा हुबेहूब दिसायचा. स्त्रियांमधील नाजूकता व सुकूमारता त्याच्यामध्ये उठून दिसत असे. पायाला घुंगरू बांधून नाचायचा, तेव्हा त्याच्या घुंगराच्या स्वरांनी सारा परिसर उन्मादक झाल्यासारखे वाटायचे, तर प्रेक्षकांच्या चेहर्यावर उत्साहाचे भाव तरळू लागल्याचे चित्र उमटत असे.
माझा मोठेबाबा-पांडूरंग हा चोणकं वाजयायचा. तोच गवळण मधील मावशी बनून सोंग काढायचा..
हा तमाशा सुगीच्या काळात गावोगावी किंवा यात्रा-जत्रेला जात असत त्यावेळी कास्तकार व मजुरांच्या हातात पैसा खुळखूळत असल्यामुळे तमाशात चांगली कमाई होत होती.
बाहेर जाण्यापूर्वी रंगीत तालीम म्हणून गावात एक तमाशाचा प्रयोग करीत असत. हा प्रयोग सहसा महादेवच्या अंगणात रात्रीला व्हायचा. कारण तेथे लोकांना बसायला भरपूर जागा होती. गावातले तमाशाची रुची असणारे लोक पाहायला येत. आम्ही मुलं पण हमखास पाहायला जात होतो.
त्यातील नाच्याचा वेधक नृत्याचा अविष्कार, त्यांची प्रसन्न भावमुद्रा, पेहरावातील आकर्षक रंगसंगती, शृंगार व ढोलकी, चोणकं, टाळ यांचा मनोवेधक आवाज मनाला भुरळ पाडीत असे.
इतीहासात डोकाऊन पाहिलं असतां अशी माहिती मिळाली, की मुस्लिम सैनिकांच्या मनोरंजनासाठी गावकुसाबाहेरच्या लोककलावंताचे फड निर्माण केले गेले. म्हणूनच तमाशात गावकुसाबाहेर राहणारे महार, मांग या हिंदू धर्मातील जातीतील कलावंत मोठ्याप्रमाणात काम करीत असत. तमाशात बाईला नाचवित नसत, तर एखाद्या देखणा, मिसरुड न फुटलेल्या तरुणाला नाचवित असत.
तसा तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा हीन दृष्टीकोन होता. कारण सगळे तमासगीर हे अस्पृ्श्य जातीतून आले होते. म्हणून ज्यांचे जगणे अस्पृ्श्य, त्यांची कला पण अस्पृ्श्य, म्हणून गणल्या गेली होती. ऐवढेच नव्हेतर या समाजातील बाईच्या वेशात नाचणार्याला तुच्छ भाषेत ‘नाच्या’ म्हणत. परंतु ब्राह्मणाच्या माणसाला सभ्य भाषेत ‘गंधर्व’ म्हणत, असे मी ऐकले होते.
अशी म्हण आहे की, ‘बामणाच्या घरी लेवणं, कुणब्याच्या घरी दाणं तर महार, मांगाच्या घरी गाणं…!‘ स्वत:च्या कलाकृतीतून जीवनातील आनंद फुलविण्याचं उपजत कौशल्य या
महार-मांग समाजाजवळ होतं.
मांगा-महाराच्या जातीला संगीत कलेचा मोहक सुगंध होता. या जातीत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या नसानसात संगीतकला भिणलेली होती. त्यामुळे ह्या जाती म्हणजे लोककला व कलावंताची खाण होती, असेही म्हणता येईल.
मी पाहिलं की तमाशातलं गाणं, वादन, नृत्य, विनोद, कथासार खेड्यातील लोकांच रंजन करणारं होतं. ते थकल्या-भागलेल्या अडाणी व गरीब लोकांचे, दु:ख विसरुन हसवत ठेवत. असं म्हणतात, की कोणतीही यात्रा-जत्रा तमाशाशिवाय भरुच शकत नव्हती.
तमाशात गण, गवळण, लावणी, सवाल जवाब आणि वग असायचं. वगातील सोंगाड्या प्रेक्षकांमधील ताण घालवण्याचे, विरंगुळा देण्याचे, करमणूक करण्याचे कार्य करीत. तो ठसकेबाज व बोलण्यात इरसाल असायचा.
पुरुषी धाटणीचा – तोच तोचपणामुळे अभ्या नाच्यात आता काही रस उरलेला दिसत नव्हता. त्यामुळे तमाशाला उतरती कळा लागली होती. एवढ्यात एकेदिवशी साक्षात स्त्री नाचनारीन कोण्यातरी गावावरून आमच्या गावात अवतरली होती. तिचं नाव होतं कवतिकी. गावातल्याच कलावंतांना घेऊन तिने फड उभा केला होता. तिचं देखणं आणि उभारलेलं स्त्रीपण पाहून सारेच स्तंभित झाले होते. तरुण कलावंताना तर तिने वेडच लावलं. होतं. ते तिच्या मागे मागे चावटपणे गोंडा घोळत असत. एवढं मात्र खरं तिच्या स्त्रिपणामुळे तमाशाला आणखीनच ठसठशीतपणा व जिवंतपणा आला होता. परंतु हाही तमाशा बदलत्या वैचारिक वातावरणामुळे जास्त दिवस चालला नाही.
दिवाळीत गायी खेळत, त्या दिवसापासून दादा व त्याचे साथीदार दिवसभर गावात घरोघरी नाच-गाण्याचा उत्सव करुन वावरातलं पीक-पाणी काढण्यात शिणून गेलेल्या कष्टकरी लोकांचं मस्त मनोरंजन करीत असत. दिवाळीचे ते दोन-चार दिवस उत्साहाने आणि चैतन्याने ओथंबून गेल्या सारखे वाटत असे. कधी कधी आजूबाजूच्या गावला पण दौरा करुन येत असत.
खेड्यातील सांकृतीक कार्यक्रमामध्ये आणखी एक रात्रभर चालणारा लोकनृत्याचा प्रकार म्हणजे दंडार. त्यात दोन चमू समोरासमोर असायचे. त्यांच्या दोन्ही चमूमध्ये एक-दोनजण तरी बायांसारखं लुगडं किंवा साडी नेसून दंडारीत आणखी रंग भरीत असत. त्यामुळे बाया-माणसांचा संमिश्र, बिनधास्त वाटणारा नाच वेगळ्याच दुनियेत घेउन जात असल्याचा भास होत असे. टिपर्यांच्या व बासरी-डफड्यांच्या सुंदर तालावर नाचणार्यांचे पाय तालबध्दरित्या थिरकत, तेव्हा आनंदाची भरती येऊन, मन बेभान झाल्यासारख्या पाखरासारख वार्यावर उडत आहे की काय, असं वाटायचं. एक चमू टिपर्या वाजवत, नाचत-नाचत व गाणे म्हणत पुढे जात; तर दुसरा त्याचवेळी टिपर्या वाजवत, नाचत नाचत व गाणे म्हणत मागे जात. मग एक चमू पुढे तर दुसरा मागे…! असा तो दंडारीचा खेळ सकाळपर्यंत चालायचा. त्यात मध्ये मध्ये नकला व जादूच्या खेळाचा अंतर्भाव असायचा.
बाबा या जादूच्या खेळामध्ये सुध्दा तरबेज होता. तो तोंडातून कागदाची लांबलचक पट्टी दोन्ही हाताने ओढून काढायचा; तेव्हा प्रेक्षक तोंडात बोटं घालायचे. शामराव-दादा पण या दंडारीत भाग घेऊन तालबद्द नाचायचा. हा दंडारीचा लोकनृत्याचा प्रकार फारच रंजक वाटत असे.
अशा कलांकारांची खाण आमच्या कुटुंबांत वसलेली पाहून माझं मन मोहरुन जात असे.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
आमच्या चौधरा गावात शाळा नव्हती. एक-दीड कोसावर निळोणा या गावला पहिली पासून ते चौथी पर्यंतची प्राथमीक शाळा होती. हे गाव वाघाडी नदीच्या पलीकडे यवतमाळला जाणार्या रस्त्यावर होतं.
एकदा शाळा सुरु होण्यापूर्वी बबन गुरुजी आमच्या गावात आले. त्यावेळेस मी खेळत होतो.
‘अरे इकडे ये…तुझे नाव काय आहे. ?’ गुरुजींनी मला जवळ येऊन विचारले.
‘हे माह्या हातावर लिवले आहे.’ कोणी मला माझे नाव विचारले, की माझ्या उजव्या हातावर गोंदलेले नाव दाखवायला मी हुरळून जात होतो.
‘रामराव…?’
‘हो…’
‘शामरावचा भाऊ का…?’
‘हो…’
‘चल तुझ्या घरी.’ आम्ही घरी आलो. माझ्या सोबत खेळणारे मुलेही माझ्या मागेमागे आलेत.
‘याला शाळेत टाकता का ?’ गुरुजींनी माझ्या बाबाला विचारले.
‘लहान आहे. अजून त्याचा हात पाठीमागून कानाला लागत नाही, ना ?’
‘त्याची जन्म तारीख माहित आहे ?’
‘नाहीजी… कोणाला माहित ?. पण तो शिरीकुष्णदेव जलमला त्यावेळेसचा आहे.’ आई म्हणाली. म्हणून माझे पाळण्यातले नाव ‘श्रीकृष्ण’ व दुसरे नाव ‘रामराव’ असे ठेवले होते, अशी आई सांगत होती. पण पुढे रामराव, हेच नाव प्रचलीत राहिले
‘बरं मी कोतवालाच्या बुकात पाहून घेईन.’
‘उद्यापासून येरे शाळेत… चांगले कपडे घालून ये.’ माझ्या मळकट कपड्याकडे व शेंबड्या नाकाकडे पाहून गुरुजी म्हणाले.
मी मान हालवून ’हो’ म्हणालो.
गुरुजींनी गावातील आणखी काही मुलांचे नाव टाकून घेतले.
तेव्हापासून मी निळोण्याच्या शाळेत जायला लागलो.
निळोण्याची शाळा बबन गुरुजींचे वडील – पां. श्रा. गोरे यांनी आणली होती; असे मी ऎकले होते. ते मुळचे निळोण्याचे, पण नोकरी निमित्त यवतमाळला स्थायिक झाले होते. ते थोर कवी व साहित्यिक होते. त्यांची ’कात टाकलेली नागीन’ ही कादंबरी निळोण्याच्या परिसरावर-ग्रामीण जीवणावर लिहिलेली होती. त्यांची एक कविता चौथ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला. पण होती.
’उठुनी गृहिणी लगबगा,
सडा सर्माजन करीत राहतात,
मोट सुटली बैल मोकळे झाले,
गडी सारे एकत्र जमुनी आले,
बसुनी वाहत्या कडेला,
सोडू लागले न्याहरी… ही त्यांच्याच कवितेतील एक ओळ आहे.
त्याशिवाय त्यांची आणखी एक हृदयाला भिडणारी कविता म्हणजे ‘विटंबना’. ह्या कवितेतील आठवलेल्या काही ओळी येथे नमूद केल्याशिवाय मला राहवत नाही.
‘डोळे पाठ पोठ एक सोसता उपास, घातला ना मुखी कुणी उष्टा घास,
पाणी साखरेचे तोंडात टाकता, मेल्यावर मला काय रे लाजवता,
होता या कुडीत जोवरी हा जीव, केली न त्याची मनी कुणी कीव,
जित्यापणी गोडी मनात नसता, मेल्यावर का रे बंधन तोडता.’
खरेच आहे. जीवंतपणी कोणी विचारत नाहीत; पण मेल्यावर मात्र त्याच्या तोंडात पाणी टाकतात. ही जगाची रीत पाहून मला का रे लाजवता, अशी ती मृत व्यक्ती भावना व्यक्त करते. अशी कल्पना कविवर्य पां.श्रा.गोरे यांनी मांडली आहे.
त्याकाळी शिक्षणाच्या बाबतीत लोकांची ओढ फार कमी असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी असायची. म्हणून गुरुजींना आजूबाजूच्या खेड्यावर जाऊन विद्यार्थ्यांची जुळवाजूळव करण्यासाठी अतोनात परिश्रम घ्यावे लागत होते. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आमच्या पुढील शिक्षणाचा मजबूत पाया रचला गेला; असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यामुळे खरंच, त्यांचे उपकार न विसरण्यासारखे आहे.
आमचे गुरुजी एकटेच, पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिकवीत होते.
ते पांढरा शर्ट, पांढरा पैजामा व पांढरीच टोपी घालत असत. त्यावेळी प्राथमीक शाळेचे सर्वच मास्तर असाच पोषाख घालत असल्याचे दिसत असे.
आम्ही आठ-दहा मुले निळोण्याच्या शाळेत जायला एकत्र निघत होतो. त्यात माझी
मामे-बहीण चित्राबाई, सुदमताबाई, माझी मोठी बहीण-जनाबाई, इतर मुलींमध्ये सरस्वती व मुलांमध्ये भगवान, धनपाल, नाना व बंजार्याचे रामसिंग, वामन, वाल्ह्या असे होते.
शाळेत रमत गमत रस्त्याने जातांना-येतांना डोळ्यांना सुखावणारा निरव, रंगतदार, आणि रमणीय निसर्ग, आभाळात दाटून आलेले ढग, चिलकीचे व नदीचे झुळझुळणारे-खळखळणारे पाणी, पाना-फुलांनी बहरलेली झाडीवेली-झुडपं, मस्तीत उडणारे-बागडणारे, सुरेख आवाजात गुंजन करणारे व झाडांच्या फांद्यावर हवेच्या झोतात झुलणारे पक्षी पाहतांना आम्हाला खूप मजा यायची. आम्ही मुले एखाद्या उंडाळणार्या वासरासारखे मनमुराद आनंद लुटत आमच्याच मस्तीत, रस्त्याने जात होतो.
आम्ही एकमेकाशी ‘अ’ व ‘ची’ ची भाषा बोलत होतो. ‘मला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला…म’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला…म’ म्हणत असे. तसेच ‘तूला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला…तू’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला…तू’ म्हणत असे. अशी ही विचित्र भाषा बोलतांना आम्हाला इतकी सवय झाली होती, की आम्ही सहजपणे न अडखडता बोलत होतो.
कधी आम्ही एकमेकांना कोडी घालत होतो.
‘पाणी नाही पाउस नाही, रान कसं हिरवं ? कात नाही चुना नाही, तोंड कसं रंगलं ? सांग… काय…? पोपट….’
‘पांढरी बाटली हिरवं बुच. सांग… काय…? मुळा…’
‘अंधार्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण लेक असुन दोघांनी नेली. सांग… काय…? नाकातला शेंबूड…’
‘काळी गाय काटे खाय, पाणी पाहून उभी राय. सांग… काय…? वहाण… असे काहीसे कोडे असायचे.
आम्हाला शाळेत पोहचायला गावापासून एक-दीड तास तरी लागत होता ! गावातून पायवाटेने निघालो, की पहिल्यांदा लांडग्याचं वावर, त्यानंतर किसन्याचे दोन्ही वावरं, त्यापैकी एक आंब्याचं, नंतर भगवानचं वावर लागायचं. त्यानंतर गावातून पांदणीने बरडाला लागून येणारा बैलगाडीचा रस्ता लागायचा. या रस्त्याच्या डाव्या बाजूला पांडु लभानाचं, उजव्या बाजूला कचरु व मोहाचं-लंगड्या चिफसाहेबाच वावर – खेडूत लोक पोलीसठाण्याच्या मोठ्या साहेबाला चिफसाहेब म्हणत, तसा तो चिफसाहेब होता की काय कोण जाणे ? नंतर नदीच्या काठावर अलीकडे अवधुतचं वावर लागायच. पावसाळ्यात पायाच्या घोट्यापर्यंत तर कुठे कुठे टोंगळ्यापर्यंत गाडण राहायचं. अशा वेळेस धुर्याच्या काठा-काठाने किवा शेतात घुसून रस्ता पाडत असे. कुठे कुठे रस्त्यावर घसरण असायची.
रस्त्याच्या दोन्हीही काठाला पळस, पांजरा, हिवरा. बाभूळ, येण, धावडा, चिल्हाटी, भराडी, कडूनिंब इत्यादी निरनिराळ्या जातीचे पण सागाच्या जातीचे जास्त झाडं असायचे. सागाचे मोठमोठ्या पानाचा पाऊस आल्यावर डोक्यावर धरायला छत्री सारखा उपयोग होत असे. त्याच्या पानाला घासले, की रक्तासारखा घट्ट रस निघायचा.
आम्ही मुले निसर्गसौंदर्य न्याहाळत, डोळ्यात साठवत जात होतो. चिल्हाटीचा गुलाबी, बाभळीचा पिवळा, हिवर्याच्या झाडाचा पांढरा असा रंगीबेरंगी मखमली फुलोरा मनाला भुरळ पाडत असे. आजूबाजूचा हिरवेगार परिसर पाहून आमचे डोळे सुखाऊन जात असे. जणू काही डोंगर, जमिनीने हिरवा शालू पांघरलेला आहे, असच वाटायचं. एखाद्या सकवार स्त्रीच्या नाजूक छटा या हिरवळीत गुंफल्या गेल्याचा भास व्हायचा. निसर्गाचं असं मुक्त उधळण पाहून चालण्याने आलेला थकवा दूर पळून जात असे. ..
पाहा ना, हिरव्या रंगाच्या किती विविध छटा असतात ! शेतातल्या तुरीचा हिरवेपणा वेगळा, तर त्याच शेतातल्या पर्हाटीचा वेगळा ! रस्त्याच्या बाजूला ऊगवलेल्या गवताच्या प्रत्येक पात्याचा हिरवेपणा वेगळा आणि झाडांच्या पानांचासुध्दा वेगवेगळा ! शेतातल्या पिकांचा गच्च हिरवेपणा, शेताच्या धुर्याचा गर्द हिरवेपणा, नदी-नाल्याच्या तिरावरचा लुसलुशीत पोपटीपणाचा झांक असणारा हिरवेपणा, तर डोंगर-कड्यावरचा निव्वळ-फिक्कट हिरवेपणा !
निसर्गाने सुध्दा झाडा-वेलींना एक शिस्त लाऊन दिली; असंच म्हणावं लागेल ! उगवायचं, फुलायचं व परागीकरण करुन पुढील पिढी तयार करायचं; हे काम त्यांच नेटाने चालू असतं.
म्हणजेच सृष्टीमध्ये प्रत्येक जीव आणि वनस्पतीचं वंशवाढीचं व पुनर्निमीतीचं कार्य अव्याहतपणे सुरु राहते. यासाठी त्यांना नकळत एकमेकांवर अवलंबून राहिल्याशिवाय आपले अस्तित्व टिकवून ठेवता येत नाही. आहे की नाही, किमया !
डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे- निसर्गात जो सक्षम आहे, त्यालाच जगण्याचा हक्क आहे.
म्हणून आपला वंश निर्वेधपणे पुढे चालू राहावा; अशी सृष्टीतील प्रत्यके जीवांची धडपड चालू असते, नाही का ?
झाडा-फुलांना किडे, पक्षी, वारा यांच्याकडून परागीभवन करुन घ्यावे लागत असते. मग किडे, पक्षी यांना आकर्षून घेण्यासाठी आपल्या फुलां-पानांचा रंग, आकार व गंध याचा वापर करण्याची युक्ती ते वापरतात. ज्यांना जो रंग आवडतो, तो तो रंग आपल्या फुलांत भरत असतात. असे म्हणतात की मधमाशांना निळा रंग आवडतो म्हणून काही फुलांच्या जाती आपला रंग निळा करून मधमाश्यांना बक्षीस देण्यासाठी भरभरून मधाची निर्मिती करतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पळस, पांगरा, सावर या झाडांचे फुले लाल रंग धारण करीत असतात. त्याचं कारण असं सांगतात, की पक्ष्यांना लाल रंग स्वछ आणि उठून दिसत असतो. म्हणजेच पृथ्वीवरचे सर्व जीव एकमेकांचा आधार घेत घेत जीवन जगत असतात, असेच म्हणावे लागेल, नाही कां?
एवढं मात्र खरं, की फुलांच्या दृष्टीने त्यांचे हे रंग माणसाना आकर्षीत करण्यासाठी नाहीतच मुळी !. कारण फुलांना माहीत आहे, की परागीकरणात माणसाचा कोणताच उपयोग होत नाही. तरीही माणसंच फुलांच्या या वैविध्याचा मनसोक्तपणे उपभोग घेत असतात; हे त्यांना कुठे माहित असते? माणसांच्या या उपजत प्रवृतीला आम्ही मुले थोडेच अपवाद असू शकतो ?
मग आम्हीही निसर्गाच्या वर्षभर बदलणार्या चैतन्यमय स्वरूपाचं मनमुरादपणे आनंद लुटत होतो. त्याच्याठायी शिगोशिग भरलेले व नित्यनेमाने करीत असलेल्या आनंदाच्या पखरणात आमचं मन गुंतून जात असे. शेतात, धुर्यावर, डोंगरमाथ्यावर व नदी-नाल्याच्या काठावर उगवलेल्या वनराईच्या पाना-फुलांचा-फळांचा आस्वाद घेत घेत निळोण्याची शाळा कणाकणाने जवळ करीत होतो.
रस्त्याला लागून असलेल्या एखाद्या भुईमूंगाच्या वावरात कुणी नाही असं पाहून, धुर्यावरच्या काट्या सरकवून चोर पावलानं आतमध्ये घुसत होतो. त्या वावरातल्या भुईमूंगाच्या भरलेल्या शेंगाच्या डहाळ्या मुळासकट उपटून रस्ताभर खात खात जात होतो. कधी मुंगाच्या, उडदाच्या, पाटाच्या शेंगा, तर कधी वाळकं, काकड्या तोडून खात होतो.
हिवाळ्यात धान निघाल्यावर पेरलेल्या हरभरा व वटाणाच्या शेंगाचे हिरवेगार शालू नेसल्यासारखे डुंगे दिसले, की आम्ही हरकून जात होतो. मग हिरव्या घाट्यांनी भरलेला हरभरा व वटाण्याच्या शेंगाचे सोले खायची मजा येत होती.
कधी तुरीच्या तासात शिरुन हिरव्या टर्रऽऽ भरलेल्या शेंगा ओरबाडून खिश्यात भरुन घेत होतो. मग त्याचे एकट-दूकट पिवळी फुले आमच्या अंगा-खांद्यावर खेळून धिंगाणा घालत. अशा चोरलेल्या पण कष्टाने तोडलेल्या शेंगा ऎटीत, रस्ताभर खात होतो.
बैलगाडीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला वावरांच्या धुर्यावर झाडी होती. त्यात येणाचे, खैराचे, भराडीचे, धावड्याचे, सागाचे, बाभळीचे, पळसाचे, पांजर्याचे, चिल्हाटीचे, हिवर्याचे असे विविध झाडे होते. येणाच्या झाडाला हमखास रेशमाचे कोष लटकलेले दिसत. त्याला तोडून आम्ही मखमली सूत काढण्याचा प्रयत्न करीत होतो. याच कोशातून फुलपाखरं बाहेर पडत असल्याचे आम्ही पुस्तकात वाचले होते. धावड्याचा, बाभळीचा डिंक खात होतो. कडूनिंबाचा डिंक कडू लागायचा. तो पुस्तकाचे पाने चिकटवायला वापरत होतो.
झाडावर कधी बसलेले तर कधी उडत असलेले निरनिराळ्या जातीचे, रंगाचे पक्षी पाहण्यात आम्ही गुंग होऊन जात होतो. त्यांच्या सुरेख चोचीतून बाहेर पडणार्या, लयदार मंजुळ स्वरांच्या चांदण्यांनी आसमंत पुलकित झाल्यासारखे वाटत असे. त्यांच्या चमकदार रंगीबेरंगी पंखाचे पिसं पाहून आम्ही मोहीत होऊन जात होतो. असं म्हणतात, की पक्ष्यांना लाभलेल्या विविध रंगाच्या वरदानाचा उपयोग शत्रुपासून लपून राहण्यासाठी व जोडीदाराचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत असतात.
कुहूऽऽ कुहूऽऽ असा कर्णमधूर आवाज आला, की त्या दिशेने आम्ही धावत सुटायचो. कारण ही कोकीळा गर्द झाडीत किवा पाना-फांद्याने बहरलेल्या एखाद्या मोठ्या झाडावर कोणालाही दिसणार नाही; अशा अवघड जागी लपलेली आढळत असे. कदाचित आपला काळा रंग जगाला दिसू नये, म्हणूनच ती संकोचीत होती की काय ?. जवळ गेलं, की तिचा आवाज बंद होऊन जायचा. जसं तिथे कोणीच नाही का असं वाटायचं. पण तिला पाहतो नं पाहतो तर ती क्षणातच भुर्कन उडून नाहिसी व्हायची, तेव्हा आम्ही अचंबित होत होतो.
कधी कधी दुरुनच टकटक असा आवाज यायचा. जवळ जाऊन पाहिले, तर सुतार पक्षी आपल्या लांब चोचीने सारखं झाडाच्या खोडाला टोचे मारतांना दिसायचा. मग आम्ही त्याच्याकडेच पाहत थबकत होतो.
झाडावर बसलेलं एखादं पाखरु जसं शेपटी उंचावून व शेंडी फुगवून आपल्या चोचीतून मंजूळ आवाज काढायचा, शीळ घालायचा, त्याचीच नक्कल म्हणून आम्ही पण त्याच्या सारखाच आवाज काढून पाहत होतो.
निलकंठ हा पक्षी पाहायला अतिशय सूंदर दिसायचा. त्याची पोपटासारखी हिरवी हिरवी चोच मन मोहून टाकत असे. बहुदा हाच पक्षी एखाद्या वेळेस सकाळीच झुंजूमुंजूला मस्त जोरात आवाज काढून उडत जात असल्याचे मी कित्येकदा पाहिले होते. जणू काही घुंगराचा किणकिणाट करीत एखादं वासरु उंडारत जात आहे की काय, असंच वाटायचं. आम्ही त्या पक्षाला ‘किलकिला’ म्हणायचो.
कधी कधी रस्त्यावर सावली धावतांना दिसायची. वर पाहिले तर आकाशात उंच उडणार्या घार किंवा गिधाडासारख्या मोठ्या पक्षांची ती सावली असल्याचं लक्षात यायचं.. मग आम्ही त्या सावलीच्या दिशेने उगाच पळत राहत होतो.
एखाद्यावेळेस मोहाच्या झाडावर घुबड बसलेला दिसायचा. त्याची एक गंमत अन् भीती पण वाटायची. तो जाग्यावरून किंचितही न हलता फक्त आपली मान तेवढी गर्रकन अगदी पूर्णपणे फिरवून आमच्याकडे वटारलेल्या मोठ्या डोळ्याने पाहायचा. त्यावेळी सर्रकन अंगावर भीतीचे काटे उभे राहत. आम्ही जिकडे वळायचो तिकडे मान फिरवून तो पाहायचा. मग त्याची भीती वाटणार नाही तर काय ? हा घुबड २७० अंशाच्या कोनात मान कशी वळवतो, हे एक रहस्यच आहे म्हणावं ! शिवाय तो म्हणे, लहान मुलांचे कपडे नदीवर नेवून धुतो व झाडावर वाळू घालतो. ते जसजसे वाळायला लागते, तसतसे तो मुलगा वाळायला लागतो. त्याला दारू पाजली की, तो माणसासारखा बोलतो. अशा काहीतरी कथा-दंतकथा या घुबडाच्या बाबतीत खेड्यात सांगितल्या जात होत्या. खरं काय नी खोटं काय, कोणी पाहिलं ?
पावसाळाच्या तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला माकोडे आपले घरं बांधण्यात गुंग झाल्याचे दिसायचे. जमिनीच्या आतून माकोडे इतकुला मातीचा कण आपल्या तोंडात धरुन आणीत व बाहेर कणावर कण टाकून ढिग रचत असत. त्यांच ते अविरत व सततचं काम पाहतच राहावेसे वाटे. अशाच प्रकारे मुंग्या-माकोडे-उदळ्या मोठमोठे वारूळ निर्माण करीत असतील,. नाही का ?
रस्त्यात लागणार्या चिलकीचे पाणी आम्ही उडवत उडवत जात होतो. आकाशाच्या दिशेने उडणारे पाण्याचे तुषार पाहतांना मंत्रमुग्ध होऊन जात होतो.
चिलकीचे पाणी गाडी रस्त्याने वाहत वाहत थेट वाघाडी नदीपर्यंत जात असे. चिलकीत कुठे कुठे खडकावरुन ओघळत आलेले पाणी एखाद्या धबधब्यातल्या पाण्यासारखं गिरक्या घेत खाली डोबर्यात पडलं की पांढराशुभ्र फेस यायचा. हा फेस एखाद्या फुलाप्रमाणे हाताच्या ओंजळीत धरुन त्याला तोंडाने फुका मारला की विरुन जात असे किंवा कोणी जवळ उभं असलं की त्याच्या अंगावर फेकून मारण्याचा चावटपणा करत होतो. कधी कधी या वाहत्या पाण्यातूनच चालत जात होतो, दबादबा उड्या मारत होतो, तेव्हा मोठी मौज वाटायची. .
पाण्यात पोहणार्या बारीक मासोळ्यांच्या मागे आम्ही उगीच धावत होतो. खरं म्हणजे हे बेंडूकाचे पहिल्या अवस्थातील मासोळीसारखे दिसणारे पिल्ले होते. काही दिवसाने ते अर्धवट बेंडूकासारखे तर अर्धवट मासोळीसारखे दिसत. शेवटच्या अवस्थेत शेपटी गळून पूर्ण बेंडूकाचा आकार दिसायचा; तेव्हा हा क्षणोक्षणी होणारा बदल आम्हाला मोठा चमत्कारीक वाटायचा.
कधी कधी लहान-मोठे आकाराचे खेकडे दिसत, तर कधी कधी त्या चिलकीत एखादा सळसळत पोहत जाणारा साप पण दृष्टीस पडायचा. तेव्हा आमच्या अंगावर सर्रकन काटे उभे राहायचे.
पाण्यामध्ये सूर मारून नजर फिरत नाही तर झटकन इकडचे-तिकडे फिरणारे टनक कवचाचे पाणबुड्या किटकाची पोहण्याची कला पाहून थक्क होवून जात होतो तर विंचवासारखा दिसणारा पाणकिडा पाहून अंग शहारल्यासारखे होत असे.
उन्हाळ्यात रखरखत्या उन्हाच्या काहिलीने सारी झाडांची पाने झडून जात. त्या पानझडीने सारी धरती ओकीबोकी, उघडीनागडी झाल्यासारखी वाटायची. पण त्यातही काही वृक्षांच नव्या पालवीच्या दागीण्याने सजलेले देखणं रूप मनात भरल्याशिवाय राहत नसे. पळस, पांजरा व काट-सावरीचे झाडं लाल-नारिंगी रंगाच्या फुलांनी बहरुन गेल्याचं अन् बारीकशा पांढर्या फुलाने मोहरलेल्या कडूनिंबाचे मोहक दृष्य पाहून थकलेल्या मनाला नवी झळाळी प्राप्त झाल्यासारखी वाटत असे. .
सारेच पाने गळून पडलेले, पोपटाच्या चोचीप्रमाणे फुलांच्या पाकळ्याची ठेवण असलेले, गडद चकाकणार्या नारिंगी रंगाच्या फुलांनी भरभरुन वेढलेले; असे असंख्य पळसाचे झाडे सार्या रस्ताभर पाहून शिमग्याचा सण जवळ आल्याची चाहूल लागायची. तेव्हा या झाडांच असं देखणं रुप पाहून मन कसं रोमांचित होवून जात असे.
काटसावरीची पाच पाकळ्यांची. गडद गुलाबी रंगाची, मखमली स्पर्शाची फुलं मन वेधून घेतल्याशिवाय राहत नव्हते. त्याजागी आलेले बोंड फुटून आत बियांना चिकटलेले पांढर्या केसाचे लांब कापसासारखे तंतू बाहेर पडून हवेच्या झोताने उडतांना पाहिल्यावर मन मोठं प्रफुल्लीत होवून जात असे. त्याला पकडायला हात सरसावत किंवा तोंडाजवळ आले की, फूक मारून दूर भिरकावण्यात भारी मजा वाटत असे. काही लोक या काटसावरीच्या कापसाच्या कफाला चकमकीने पेटवून चिलीम ओढण्यासाठी उपयोग करीत.
कुठे कुठे रस्त्याने उलट्या भोवर्यासारखे गुळगूळीत मातीचे भक्के जागोजागी दिसायचे. त्यात बारीक गवताची लहानशी पाती हळूच टाकल्यावर त्यात विसावलेला इवलासा गुबगूबीत हत्ती काडीला तोंडाने पकडून बाहेर आलेला दिसला की आम्हाला मोठी गंमत वाटत होती.
रस्त्याच्या गुळगूळीत मातीत तुरुतूरु चालणार्या निरनिराळ्या प्क्षांच्या पायाचे ठसे एखाद्या चित्रकाराने नक्षीकाम करावे तसे दिसायचे; तर कुठेकुठे गाई-ढोरांच्या किवा एखाद्या उनाड पोरांच्या मुताच्या रेघोट्या त्या मातीवर उमटलेल्या दिसत.
कधी आमच्या समोरुन रस्त्याने एखादा सरडा तुरुतूरु धावत येऊन धुर्याकडे जातांना दिसायचा तर कधी एखादी खारुताई – खेड्यात आम्ही तिला खिराडी म्हणत होतो, ती दोन्ही पायावर उभी राहून आमच्याकडे रोखून पाहत थबकायची व क्षणातच झाडाच्या बुंध्याकडे पळत जाऊन गायप व्हायची. तिची चंचलपणा पाहून आम्हाला मोठं नवल वाटायचं.
कधी कधी झाडीतून अचानक बाहेर आलेला ससा लांब-लांब उड्या मारत आमच्या पुढून पळत जायचा. कधी अचानक आमच्या जवळूनच चिमूकले बाटरं किंवा त्यापेक्षा थोडे मोठे तितर पक्षी – ज्यांना पारधी लोक पकडीत, भुर्रकन थव्याने उडून गेले, की आमच्या जिवाचा मोठा थरकांप उडत असे.
पांडू लभानाच्या वावराला लागून असलेल्या बैलगाडीच्या रस्त्याने रांगोळीचा काचे सारखा दिसणारा दगड आम्हाला नेहमी खुणावत राहायचा. आम्ही त्याला खोदून दप्तरात टाकून घरी नेत होतो. मग त्याला बारीक करुन फडक्याने गाळून रांगोळी बनवीत होतो.
शनिवारी सकाळची शाळा असायची तेव्हा दुपारी घरी येतांना किसन्याच्या वावरातील आंब्याच्या झाडावर आम्ही चाप-डुबल्याचा खेळ खेळत होतो.
रस्त्याने जास्तीत जास्त दूर कुणाचा दगड जाऊन पडतो याची आम्ही मुले शर्यत लावत होतो.
आमच्या गावावरून निळॊण्याकडे येणारा असा हा रस्ता पायवाटेचा, तर कुठे कुठे बैलगाडीचा-खाचराचा होता. रस्त्यावर विखुरलेल्या बारीक खड्याने आमच्या पायाच्या तळव्याची आग होत होती. कधी मोठ्या दगडाला ठेच लागून खाली पडायचो किंवा पायाचे अंगठे रक्तबंबाळ व्हायचे. कधी अनवाणी पायाला काटे टोचायचे, तर कधी काट्याकुट्याने कपड्याला खोसपे लागून फाटायचे. कधी अंगाला ओरखडे पडून भळबळ रक्त निघायचे.
पावसाळ्यात बरेचदा पावसाने भीजत होतो. मग कधी सागाच्या झाडाच्या फांदीला
असणार्या दोन पानाला आणखी काही पाने जोडून त्याला छत्रीसारखा आकार देऊन डोक्यावर धरत होतो. ओल्या कपड्याने शाळेच्या वर्गात बसावे लागत असे. रस्त्याने चिखल-गाडण तुडवत जावे लागत असे. कधी कधी वाघाडी नदीला पूर येत असे; तेव्हा पूराचा भर उतरेपर्यंत तासन् तास नदीच्या काठावर थांबावे लागत असे. नदीत उतरतांना काठावरील निसरड्या रस्त्याने घसरुन पडतो की काय, अशी भीती वाटत असे.
हिवाळ्यात सकाळची शाळा असली, की थंडीने कुडकूडत रस्त्याने चालत जावे लागत असे. हिवाळ्यात माझे हातपाय खूप उलत होते. इतकं, की त्यातून रक्त निघत होते. खूप त्रास व्हायचा.. बरेच दिवस, मला हा त्रास होता. कुणी म्हणायचे, की मला वायजाळ झाला असावा. घरादारात, बाहेर जिथे-तेथे, दिवस-रात्र शेण-चिखल व माती-गागर्याशी सारखा सामना राहत असे.. गरम कपडे नाहीत, की शरिराच्या कातडीला काही तेलकट पदार्थ लावायची कोणतीही सोय नाही. त्यामुळे हात-पाय उलणार नाही, तर काय होणार ?
उन्हाळ्यात भर उन्हाने पायाला चटके लागायचे, तर उघडे हात-पाय, डोके भाजून निघायचे. पूर्ण शरीरभर घामाच्या धारा वाहत राहायचे. तोंडावर आलेला घाम खाली उतरून दोन ओठाच्या फटीतून हमखास तोंडात जायचा. मग तोंड कसं खारट खारट लागून चिक्कट होवून जात असे. घश्याला कोरड पडायची.
कधी कधी वावटळीत-गराडात सापडलो की पालापाचोळ्यासारखे आम्ही पण उडून जाऊ की काय, अशी भीती वाटायची. धुळीच्या कणांनी शरीर माखून जायचं, तर डोळे लालबूंद व्हायचे.
नदीच्या अलीकडील व पलीकडील तीरावर निळोणा गावची स्मशानभूमी होती. कधी कधी आम्हाला एखादं प्रेत गाडतांना किंवा जाळतांना दिसायचं. मग या नदीवर आलो, की आम्हाला त्याची हमखास आठवण आल्याशिवाय राहत नसे. दिवसा तेवढी नाही; पण अंधार पडला, की फारच भीती वाटायची. एखाद्या जाग्यावर दगडं नि काट्या ठेवलेले दिसले, की ती जागा एखाद्या गरोदर बाईच्या पोटासारखी फुगलेली दिसायची. म्हणजे तेथे एखादं प्रेत नुकतच गाडलं असावं याची आम्हाला तिव्रतेने जाणीव व्हायची. मग तिकडे पाहिलं नं पाहिल्यासारखे करुन भरभर पाय टाकत; आम्ही तेथून निघून जात होतो.
नदीच्या पलीकडे निळोण्याच्या शिवारापर्यंत रस्ताभर गोटेच गोटे होते. कुठेही पाय टाकला, की गोटाच-गोटा लागायचा. ह्या गोटाळ रस्त्याने जाणे म्हणजे मोठी कसरतच करावी लागत असे. केव्हा तोल जाऊन खाली पडेल किवा पायाला ठेच लागेल याचा काही नेम नव्हता. गाव जवळ जवळ आलं, की हागदोडी लागत होती. दोन्ही नाकपुड्या दाबल्याशिवाय तेथील घाण वासाला रोखता येत नव्हतं. त्यामुळे रस्ताभर दम कोंडल्यासारखे होत राहायचं. एखाद्यावेळी या हागदोडीतून जातांना शाळेच्या घंटीचा आवाज ऎकू आला, की आमची मोठीच धावपळ व्हायची.
असे हे काट्याकुट्याचे, लहान-मोठे दगडाचे, चढउताराचे खडबडीत रस्ते; उन्हातानात- पाण्यापावसात, हिवादवात दप्तर-पाटीचे ओझे घेऊन पाय तुडवत आम्ही शाळेत जात होतो. असे ते माझे शाळेचे दिवसं आठवले की, मन त्या आठवणीत हरवून गेल्याशिवाय राहत नाही.
असा हा आमच्या शिक्षणाचा मार्ग खडतर व खाचखळग्याने भरला होता.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
मी निळोण्याला शाळा शिकत असतांना चौथ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात ‘रामाच्या नांवाने कोण वाया गेले?’ अशा शिर्षकाचा एक धडा होता. त्या धड्यात दगडावर ‘राम’ असे लिहून पाण्यात सोडला, की तो दगड तरंगतो; असे लिहले होते.
त्यादिवशी हा धडा आमचे बबन-गुरुजी शिकवायला लागले होते. खरंच, दगड पाण्यावर तरंगतो का ? असं अकल्पीत कधी घडत असते का ? रामाच्या नांवात एवढी जादु आहे का ? अशा नाना प्रकारच्या प्रश्नाने माझ्या मनात प्रचंड गदारोळ माजवीला होता.
म्हणून हा प्रयोग करुन पाहण्यासाठी माझं मन अधीर झालं होतं.
निळोण्याला येतांना मध्ये वाघाडी नदी लागत होती. नदीचे पात्र मोठे होते. तिच्या तिराचा परिसर हिरव्या रंगाने, नानाविविध मखमल रान फुलांनी नटलेला होता. करकरी – कोणी याला कळलावी पण म्हणतात, या वनस्पतीचा लाल रंगाचा शेंडा व खाली पिवळा अशी रंग रचना असलेला हाताच्या बोटाइतकी लांबी असलेला फुलोरा, आमचं चित्त वेधून घेतल्याशिवाय राहत नसे.
अलीकडच्या तिरावर हिरव्यागार पानांनं लदबलेलं एक धामण्याचं झाड होतं. त्याचे गाभुरलेले बारीक फळे आंबट-तूरट लागत असे. ते आम्ही चवीने खात होतो.
अवधुतच्या वावरातून पायवाटेने वाघाडी नदीत उतरणारा निसरडा रस्ता होता. एखाद्यावेळेस पावसाची सर येऊन गेली, तर त्या रस्त्यावर घसरण तयार व्हायची. मग तोल सावरत सावरत, जवळच्या झाडाच्या फांद्याना पकडत किंवा पायाच्या बोटाचे नखं जमिनीत रुतवत नदीत उतरावे लागे.
पावसाळ्यात नदीत उतरण्यापूर्वी वरच्या बाजूला कानोसा घेऊन पुराचे लोंढे येण्याचा आवाज येतो काय, त्याचा अंदाज घेतल्यावरच आम्ही नदीत उतरत होतो.
नदीच्या पाण्यात पाय टाकला, की थंड पाण्याचा स्पर्ष सर्वांगाला उत्तेजीत करीत असे. त्या नदीच्या वाहत्या धारेचं थंड पाणी तोंडावर शिंपडून तोंड धुतल्यावर चालल्याने शरीरात आलेला थोडाफार थकवा निघून गेल्यासारखं वाटत असे. हळूच वाकून हाताच्या ओंजळीने पाणी पिल्यावर तहानेने कासावीस झालेला जीव शांत होवून जायचा. त्या पाण्याची चव ख्ररंच गोड लागायची.
माझी मोठीआई-गिरजाबाई, हिला खूप कथा येत असत. कथेच्या आमिषाने आम्ही तिच्या घरी बिड्या बांधण्याचे टेंभुर्णीचे पाने चवडून देत होतो. मग ती पाने चवडता चवडता एक-एक कथा सांगत होती. कधी भुता-खेतांच्या, चकवा-लावडीनीच्या, कधी बहीण-भावाची तर कधी राजा-राणीची तर कधी कधी मजेशीर-गमतीदार…! अशा कितीतरी गोष्टी, ती सांगत होती.
नदीचं पाणी पिण्यावरुन अशीच तिने सांगितलेली एक गोष्ट आठवली.
एका बाईची ती मजेशीर गोष्ट होती.
एक बुटका नवरा असतो. त्याची बायको पण बुटकी पण भारी बह्याड स्वभावाची असते. तिच्या बह्याडपणाला तो पार वैतागला असतो.
एकदा असंच तो तिला म्हणते, ‘लोकांच्या बायका कशा देवासारख्या राहतात?’ नवर्याचं अस बोलणं ऎकून ती देवळात जाऊन बसते. तो तिला जिकडे-तिकडे शोधत असते. शेवटी ती देवळात जाऊन बसलेली दिसते.
नवरा म्हणतो, ‘येथे कशाला येऊन बसलीस ?’
‘तुम्हीच तर म्हणाले होते की देवासारखी राहात जा. म्हणून मी येथे देवळात येऊन देवासारखी बसली. माझं काही चुकलं काय ?’
‘अवं माह्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. फारच बह्याड बाई दिसतेस तू…! लोकांच्या बायका कशा घरं चालवतात? तसं तू आपलं घर का नाही चालवत ?’ एवढं बोलून तो बाहेर निघून जातो.
झालं… तिने आपलं घर चालवायला हातात पुराणीची काडी घेतली. ‘चल घरा, चल…’ अशी तोंडाने म्हणत ती घराला ढोसायला लागली. जसं एखादं ढोर चाललं नाही की त्याला पुराणीने ढोसतात तसं. नवरा घरी आल्यावर पाहतो तर ही घराच्या भिंतीला पुराणीने टोचून टोचून जिकडे-तिकडे छिद्र पाडत होती. हे पाहून नवरा आणखीच कातावत म्हणतो, ‘हे काय करत आहेस तू ?’
‘तुम्हीच तर म्हणाला होता, की लोकांच्या बायका घर चालवतात. म्हणून मीही घराला चालवत आहे.’
‘फारच बह्याड आहे बाई तू… ! इचीबहीण इचं आता कायच करावं का ? अशी शिवी त्याच्या तोंडातून बाहेर पडली.
’जा… लोकांच्या बाया कशा बाजार करुन आणतात ? तसा तू पण बाजार करून आण…’ असं वैतागून नवरा तिला बाजारात धाडतो.
बाजार करून येत असतांना सर्व बाया वाघाडी नदीचं पाणी पितात. ही सुध्दा त्या बायाप्रमाणे पाणी पिते. या बाईच्या मनात येते, ‘किती गोड पाणी आहे या नदीचं ! गुळाच्या चवीसारखं… माहा नवरा पिला, की किती खूष होतील !’ म्हणून ती बाजारातून बुटल्यात भरुन आणलेलं तेल नदीत उबडून देते व त्यात पाणी भरून घरी नवर्यासाठी आणते. असं त्या वाघाडी नदीच्या पाण्याची गोष्ट होती. हे पाणी नदीतून जाता-येता आमच्या गावचे तमाम लोक पीत होते.
नदीच्या वाहत्या प्रवाहात थांबून आम्ही पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत होतो. नदीत कुठे चापट व पाण्यातून वर आलेले खडकं दिसायचे. कुठे पाण्याच्या वर थरच्या थर तर कुठे पाण्यात पाय फसणारे किंवा पायाला मऊ मऊ लागणारी रेती सुखावून जायची. कधी भाकरीचा एक लहानसा तुकडा पाण्यात टाकल्यावर लहान लहान मासोळ्यांचा थव्याचा थवा धावून यायचा. मग आमच्या पायाला हळूच स्पर्श करीत; तेव्हा पायाला गुदगूल्या होत. आम्ही मग त्यांच्या मागे धाऊन जाण्यात रंगून जात होतो. असं त्या पाण्यात किती खेळावं नं किती नाही, असे होऊन जात असे फ़! कुठे कुठे संथ वाहणारा, तर कुठे खळखळ आवाज करणारा प्रवाह मनाला भुरळ पाडून जात असे. नदीच्या प्रवाहाच्या खालच्या व वरच्या दिशेने दूरवर पाणीच पाणी व दोन्ही काठावरील गर्द झाडी पाहून अनामिक भीतीने आमचा जीव कावरा-बावरा होत असे. .
नदीत वार्याच्या झोताने माना डोलावणार्या पण पुराच्या पाण्याने न डगमगणार्या लव्हाळ्या आम्हाला आकर्षीत करुन जात असे. खडकाला चिकटलेला चिल्हा कधी कधी आम्हाला घसरुन खाली पाडत असे.
पोळ्याच्या सणाच्या जवळपास नदीच्या उथळ पाण्यात किंवा एखाद्या शेताच्या बदाडात गवताच्या जातीचे उंचच उंच वाढलेल्या पड्याळाचा घोळका मोठ्या दिमाखाने डोलत असलेले दिसायच्या. त्यांचे ते पांढरेशुभ्र तुरुंबे जणू काही तरूणींच्या डोक्याच्या केसाच्या बुचड्यात खोवलेले आहेत; असं ते विलोभनीय दृष्य वाटायचं. नदीकाठावर बरेच रानकांद्याचे बुडं एखाद्या कोरफडीच्या झाडासारखे दिसायचे.
दूरवर त्या नदीत टिटवीचं मन उसवून टाकणांर ‘टिटीव-टिव’ असं तिचा आकांत सुरु राहायचा. तिच्या मागे धावायला आम्हाला भारी मजा वाटायची. मग ती तुरुतुरु ओरडत पळायची. व जवळ गेल्यावर भुर्रकन उडून जायची.
कावळे व आणखी काही पक्षी पाण्यात डुबक्या मारुन आपले अंग धुतांना दिसल्यावर, ’वाह’ असे शब्द नकळत तोंडातून बाहेर पडत असे..
पांढर्या शुभ्र रंगाचे बगळे, मासे पकडण्यासाठी बराच वेळ एका पायावर एकटक ध्यान लाऊन उभे असलेले दिसले की, त्यांच्या ढोंगीपणाला खरोखरच दाद द्यावीशी वाटत असे.
कधी कधी हवेत उडणारे किंवा झाडाच्या फांदीवर बसलेले पक्षी अचानक धनुष्यबाणातून सुटलेल्या तिराप्रमाणे, नदीच्या पाण्यात असा काही सूर मारुन मासे पकडीत, की ते पाहून आम्ही थक्क होवून जात होतो !
एखाद्या वेळेस नदीच्या पाण्यात काठाजवळ पाणकोंबडी नजरेस पडे. आमची चाहूल लागली, की ती झाडीत जाऊन लुप्त होऊन जात असे. मग तिचा माग काढत कितीही शोधले तरी दिसायची नाही.
नदीत आम्ही मुले चापट दगडाचे चिपोरे पाण्यात असे काही भिरकावत असे, की तो चिपोरा दोन-चार ठिकाणी टुण…टू्ण… उड्या मारत जात असे. मग कुणाचा दगड जास्त उड्या मारत दूर जाते; याची शर्यत आमच्यात लागत असे.
असंच, एकदा पावसाळ्याचे दिवसं होते. शाळेत दुपारचा वर्ग चालू होता. उकाड्याने घाम येत होता. त्यामुळे खूप पाऊस येईल; असेच चिन्ह दिसत होते.
खरंच, काही वेळाने आभाळ भरून आल्यामुळे वर्गात थोडा अंधार पसरत चालला होता. आता जबरदस्त पाउस येईल असंच वाटायला लागलं होतं. सर्वांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटायला लागल्या होत्या आणि मनात कालवाकालव सुरु झाली होती. अशी आमची अवस्था पाहून गुरुजींनी वर्ग सोडून दिला. आम्हाला पाऊस सुरु होण्यापूर्वीच लवकर घरी जाण्यास सांगितले.
एरवी एखाद्या वेळेस खूप पाऊस आला, वाघाडी नदीला पूर आला, असे वाटले, की गुरुजी आम्हाला आमच्या गावला जाऊ देत नसत. तेव्हा ते शाळेतच आम्हाला रात्रभर थांबायला सांगत. आमच्या घरच्या लोकांना काळजी लागून जायची. कारण त्यांच्यापर्यंत निरोप पाठविण्याची काहीही सोय नव्हती.
अशावेळी गुरुजी बाब्याच्या आईला आमच्यासाठी चूण-भाकर करायला सांगत. बाब्या माझ्या वर्गात शिकायला होता. तो आणि त्याची आई असे दोघेजन निळोण्याला राहत असत. आमच्या शाळेच्या पाठीमागे त्याची शेती होती. तो ‘भाटी’ समाजाचा होता. सहसा या समाजाचे लोक शहरामध्ये राहतांना दिसतात. बाब्याचं घर खेड्यामध्ये असणं म्हणजे अपवाद वाटत होता.
कधी कधी पाऊस येऊन गेला किंवा गुरुजींना वाटले की नदीला पूर आला असेल, तेव्हा ते आमच्या सोबत नदीपर्यंत येत. पुराचं पाणी ओसरण्याचे चिन्ह दिसले, की ते तेथेच आम्हाला थांबवून ठेवत. पूर थोडा ओसरल्यावर एकतर लहान मुलांना खांद्यावर बसवून किंवा हात धरुन आम्हाला दुसर्या काठावर पोहचवून देत. खरोखरंच, मनाच्या खोल गाभार्यात रुतून बसलेली गुरुजींची ही एक अविस्मरणीय आठवण प्रगट झाली, की माझं अंत:करण भडभडून आल्याशिवाय राहत नाही.
आम्ही चौधर्याचे सर्व मुले पाटी-दप्तर घेऊन; त्या दिवशी लगबगीने शाळेच्या बाहेर पडलो. नदी पर्यंत त्या गोटाळ पांदणीने धावत, पळत सुटलो. नदी वाहत असलेल्या वरच्या बाजूला भयानक आभाळ भरुन आले होते. त्यामानाने इकडे कमी होते. परंतु ते आभाळ खाली खाली सरकत येत होते. त्यावरून वर निश्चीतच पाणी पडत असावे व पुराचे लोंढे आता लवकरच वाहत येतील; आम्ही असा कयास बांधला होता. त्या लोंढ्याचा दुरुनच गडऽऽ गडऽऽ असा आवाज पण येत होता. त्यामुळे आम्हाला भीती वाटायला लागली होती. ते लोंढे धडकण्यापूर्वीच वाघाडी नदी ओलांडून जायला पाहिजे; म्हणून जिवांच्या आकांताने आम्ही सर्व मुलं पाण्यात उतरलो. पलीकडच्या काठावर पोहचतो न पोहचतो तर आमच्या डोळ्यासमोरुन पूराच्या गढूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे धडधडऽऽ करत वाहत गेले. पाहतां पाहतां नदी पुराने टम्म फुगून गेली होती. दोन्ही थड्या भरभरून वाहू लागल्या. एका क्षणात वाढलेलं ते पुराचं अगडबंब पाणीच पाणी पाहून आमची बोबडीच वळली. आम्ही थोडासा जरी उशीर केला असता, तर आमचे काय झाले असते ? या कल्पनेने आम्ही भेदरुन गेलो होतो.
आम्ही जरी मनातून घाबरलो असलो, तरी तो पूर पाहण्यासाठी आमचे पाय मात्र थोडावेळ तेथे थबकले होते. ते अवर्णीय व विहंगम असे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतो. पुराचे ते तांडव, अथांग पाणी, अक्राळविक्राळ रुप छातीत धडकी भरवीत होती. त्या पुरात मोठमोठे उन्मळून पडलेले झाडं, खोडाचे ओंढके, पाला-पाचोळा, काड्या-फांद्या असे काहीबाही वाहून जात होते. मध्येच एखाद्या भोवर्यात सापडले, की ते गिरक्या घेऊन आंतमध्ये गुडूप व्हायचे व काही अंतरावर वर निघून परत वाहायला लागत असे. नदी पाण्याला कधी आक्रसून घेई तर कधी आणखी फुगवत असे.
थोड्यावेळाने धाडधाड पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरु झाला. आम्ही मुलांनी मोठ्या दांड्याच्या-आकोड्याच्या-जागोजागी ठिगळं असलेल्या त्या छत्र्या ऊघडून वेगवान वारा आणि बेधुंद पावसाच्या धारा झेलत, रस्ता तुडवत, मोठ्यामोठ्याने पाय टाकत गावला चालत गेलो.
खरंच, पाऊसाचे अनेक रुपे आहेत… नाही का ? कधी अल्लड बाळासारखा झेपावतो. तर कधी दुष्ट राक्षसारखा बरसतो. तर कधी सुकुमार तरुणीसारखा लचकत, मुरडत रिमझिमतो. तर कधी दानगटासारखा कोसळतो. असं त्यांच त्या त्या वेळी ते ते रुप आपल्याला भावतंदेखील!
कधी कधी श्रावण महिन्यात तर एक वेगळाच नजारा पाहायला मिळत असे. आम्हाला अभ्यासाला बालकविने रचलेली एक कविता होती.
‘श्रावण मासी, हर्ष मनाशी, हिरवळ दाटे चोहिकडे !
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे !! असे त्या कवितेचे मोहक शब्द होते. खरोखरच क्षणात पाऊस यायचा तर क्षणातच उन्ह पडल्याचे दिसायचं. त्या उन-पावसाच्या रिमझिमणार्या धारा कलत्या सूर्यप्रकाशात न्हाऊन जरतारी होत जातांना आम्ही हुरळून जात होतो. जणूकाही सूर्यकिरणांना सृष्टीचं हिरव्या शालुने सजवलेलं रूप पाहण्याचा अनावर मोह झाला की काय असं वाटायचं. त्याचवेळी क्षितीजावर अचानक इंद्रधनुष्य उमलतांना सात रंगाचं उधळण केलेलं तोरण प्रकट झालं की, ते विलोभनीय दृष्य मनात झळाळतांना उर भरुन यायचं, तर मनाचा गाभारा त्या सोनेरी प्रकाशाने उजळून निघायचं.
निसर्गाचं रुप कसं सतत बदलत असतं, नाही का ? पहाना…! जेव्हा झाडांची पानगळ सुरु होते किंवा वावरांची उलंगवाडी सुरु होते; तेव्हा आमच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्याची चाहूल लागत होती. मग अंगावरचे केस भादरलेल्या एखाद्या बोडक्या म्हशीसारखी झाडाची किंवा त्या वावराची अवस्था पाहून आमच्या मनात परीक्षेच्या भीतीची अनामीक हुरहूर दाटून यायची. हिरवेगार दिसणार्या झाडांची पाने एकाएकी पिवळी दिसू लागत. सूर्याच्या तिरपी न अडखडता थेट जमिनीवर येऊन पडत. सूर्य मावळतीला जात असतांना आकाशात जो केशरी…तांबडा… नारिंगी रंगाचा उत्सव सुरु व्हायचा; तसाच रंग या पानांना आलेला दिसायचा. मग एकेक पाने गळायला सुरु होऊन जमिनीवर नुसता सडा पडू लागायचा. असं ते ठसठसीत दृष्य अंतर्मनात साठवून जायचं.
एखाद्यावेळेस नदीच्या काठावर परसाकडे बसलो, की वाहत्या पाण्याची खळखळ पाहत असे किंवा त्यावेळेस नदीच्या पाण्यात लहान लहान दगडं फेकत असे. कुठे आवाज कमी येतो… कुठे जास्त येतो… त्यावरुन कुठे खोल पाणी आहे… कुठे उथळ पाणी आहे… याचा अंदाज घेण्याच्या खेळात आम्ही उगीच वेळ घालवित होतो.
एके दिवशी, मी असाच खेळात रमलो असतांना एकदम गुरुजी शिकवत असलेल्या त्या धड्याची आठवण जागी झाली. दगडावर ‘राम’ असे लिहून पाण्यात फेकून पाहण्याच्या त्या उर्मीने उचल खाल्ली.
मी जवळचा एक लहानसा चापट दगड उचलला. त्यावर दप्तरातील लेखणी काढून ‘राम’ असे अक्षर लिहीले व खोल पाण्यात फेकला. मला वाटलं, आता चमत्कार होईल व दगड तरंगेल. म्हणून मी उत्कंठतेने डोळे फाडून, त्याकडे पाहू लागलो. पण तो दगड पाण्यात काही तरंगला नाही, तर पटकन बुडाला !
मी आणखी एक दगड घेतला. त्यावर ‘राम’ असे लिहीले व दुसरीकडे पाण्यात फेकला. पण तोही दगड बुडाला. असा प्रयोग मी पुन:पुन्हा करुन पाहिला. पण कोणताही दगड काही केल्या पाण्यावर तरंगल्याचं मला आढळले नाही. माझे रामाच्या नांवाचे दगडं फेकण्याचे सारे परिश्रम वाया गेले. पण ‘रामाच्या नावाने कोण वाया गेले?’ याचा मला काहीही अर्थबोध झाला नाही. तेव्हा त्या धड्यातील खोटेपणा माझ्या लक्षात आला. पुस्तकात असे खोटं खोटं लिहून लहानग्या, चिमुरड्या मुलांच्या डोक्यात अशा प्रकारची अंधश्रध्दा का भरतात कुणास ठाऊक ? याचं मला आश्चर्य वाटलं.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
‘माह्या नवर्याने काही केले नाहीजी… त्यांना नेऊ नकाजी…’ अशी ती बाई आर्त स्वरात त्या पोलिसाच्या समोर आडवी होत विनवणी करत होती.
तो पोलीस यवतमाळ शहरातील- इतवारच्या भर बाजारातून - तिच्या नवर्याला जसा बैलाचे वेसण धरुन शेतकरी ओढत नेतो; तसा तो घाणेरड्या शिव्या देत, त्याची बखोटी पकडून ओढत नेत होता. त्या बाईची केविलवाणी स्थिती पाहून आम्ही सर्वच गर्भगळीत झालो होतो.
त्या बाईबद्दल मला फार कळवळा होता. कारण मी निळोण्याच्या शाळेत शिकत असतांना आम्हा चौधर्याच्या मुलांना मोठ्या आपूलकीने प्यायला पाणी द्यायची. कधी कधी तिच्या घराच्या अंगणात आम्ही दुपारच्या सुट्टीत भाकरी खात होतो.
आमची शाळा सकाळी ११ वाजता घंटी वाजली की सुरु व्हायची. अन् संध्याकाळी ५ वाजता टनऽऽ टनऽऽ घंटी वाजली की सुटायची. ही घंटी कोलामाचा एक पोरगा नित्यनेमाने वाजवायचा. एखाद्यावेळेस रस्त्यातच आम्हाला घंटीचा आवाज आला की, आमची मोठी धावपळ होत असे.
ही शाळा मारुतीच्या देवळात भरायची. हे देऊळ आकाराने मोठं व टिनाने आच्छादलेलं होतं. या टिनावर पावसाचा टपटप आवाज यायचा. उन्हाने गरम होऊन अंगातून घामाच्या धारा वाहायच्या, तर हिवा-दवात कुडकूडत – अंग चोरुन जमिनीवर तरटपट्टी टाकून बसावे लागे.
देवळाच्या मध्ये गाभारा होता. तेथे शेंदराने चोपडलेला एक मोठा दगड होता. त्याच्यावर शेंदराचे थरच्या थर जमा झाल्यामुळे चांगला फुगला होता. त्याला मारुती म्हणत. त्याच्या भोवताल बरीच रिकामी जागा होती. तेथे मागे व डाव्या-उजव्या बाजूला आमचे पहिलीपासून ते चौथी पर्यंतचे वर्ग भरत
त्या गाभार्यात वर एक घंटी बांधली होती. शनिवारी मारुतीचा दिवस असल्याने लोक या दिवशी पूजा करण्यासाठी येत. सकाळपासून लोक आधिच चोपडे झालेल्या त्या दगडाला तेलात शेंदूर भिजवून अधिकच चोपडे करीत. त्यामुळे तो दगड तुकतुकीत दिसायचा. येतांना-जातांना घंटी वाजवीत. त्यामुळे त्यादिवशी देवळात गोंधळच गोधळ राहायचा. पूजा झाल्यावर नारळ फोडत व शिरणीचा एक लहानसा तुकडा आम्हाला खायला देत. त्यामुळे त्या दिवशी प्रसाद खाण्याची मजाच मजा व्हायची.
आमच्या जातीच्या मुलांना मात्र त्या गाभार्यात चुकून जाऊ देत नसत. त्यामुळे तो देव बाटतो; असे ते सांगत. वारे… असा कसा तो देव…? आमच्यामुळे बाटणारा ! हे कोडं मात्र उलगडत नव्हतं.
चारही वर्गाला आमचे बबन गुरुजी एकटेच शिकवायचे. एका वर्गाला पाढे पाठ करायला तर दुसर्या वर्गाला धडा वाचायला सांगत. तिसर्या वर्गाला गणिते सोडवायला तर चौथ्या वर्गाला कविता पाठ करायला सांगत. अशी त्यांची मुलांना शिकविण्याची कसरत चालू राहायची. मध्येच कुणी खोडी केली, ओरडला, अभ्यास केला नाही; तर त्याच्या हातावर छडी पडायची किंवा पाठीवर धपाटा, नाहीतर पोटाचा चिमटा घेत.
मला एकदाच मार बसला होता. आम्ही मोहल्ल्यातील सर्व मुलं तुळशीराम-दादाच्या घराजवळील पडक्या घरात – खेळण्याच्या नादात त्या दिवशी शाळेत गेलो नाही. गुरुजींनी दुपारी चौधर्याचे मुलं शाळेत का आले नाहीत, ते पाहण्यासाठी एका बंजार्याच्या मुलाला पाठवीले. आम्ही खेळण्याचा मनमुरादपणे आनंद लुटत होतो. तेव्हा गुरुजींनी पाठविलेल्या त्या पोराला पाहून आमची धांदल ऊडाली. काय कारण सांगावे ते कळत नव्हते. प्रत्येकानी काही ना काही कारणे चिठ्ठीत लिहून दिले. मी लिहिले की, ‘कोणीच मुलं आली नाहीत, मग मी एकटाच कसा येऊ ?’
दुसर्या दिवशी शाळेत गेल्यावर गुरुजींनी एकेकाची हजेरी घेतली. ते आमच्यावर खूप कातावत होते. खाली पाडलेल्या बोकड्याच्या मानेवर खाटिक सुरी फिरवताना जसे इतर बोकडे तिरक्या नजरेने पहातात; तसेच आम्ही पण मास्तरकडे व मार खाणाऱ्या पोरांकडे पाहत होतो.
माझा नंबर आल्यावर मला म्हणाले,
‘का रे रामराव….? तू चिठ्ठीत काय लिहिले…? मी एकटाच कसा येऊ ? मलाच विचारतो ? कसा येऊ म्हणून…!’ असे म्हणत त्यांनी छडीने माझे हात लाल लाल करुन टाकले.
’छडी लागे चमचम विद्या येई घमघम !’ अशी त्यावेळेस म्हण होती. त्याची मला आठवण झाली. त्यामुळे आम्ही मुले निमुटपणे त्यांच्या छडीचा प्रसाद बाळकडूच्या रुपात घेत होतो. त्यानंतर मात्र मी त्यांच्या हातचा मार कधी खाल्ल्याचं आठवत नाही.
शाळेच्या समोर मैदान होतं. तेथे आम्ही कबड्डी, खोखो, लंगडी, लगोर्या असे खेळ खेळत होतो. गुरुजी आम्हाला कबड्डी, खोखोच्या खेळाचा सराव तेथेच करुन घ्यायचे. खोखो-कबड्डीच्या खेळाने चपळाई, धेर्य, चलाखी व युक्ती असे गुण अंगात भिनते असे गुरुजी सांगत म्हणून मी पण या खेळात भाग घेत होतो. गुरुजी कवायती पण तेथेच शिकवीत. आमची शाळा सुटते न सुटते, तर खेळण्याच्या ध्यासाने आमच्या अंगात नुसता उत्साह संचारायचा.
शाळेच्या पाठीमागे परसात लहानसा बगीचा लावला होता. त्यात मोगरा, गुलाब, झेंडू, अशाप्रकारचे फुलझाडं होती. यवतमाळच्या तलावाच्या बांधातून उगम पावलेला ओढा गावाला लागून शाळेजवळील उताराच्या बाजूने पुढे जाऊन वाघाडी नदीला मिळत होता. त्या ओढ्याचं पाणी बालटीने आणून झाडाला देत होतो. आमच्या शाळेच्या बाजूला चिंचेचं बरंच मोठं, भोवताल पसरलेलं डेरेदार झाड होतं.
शाळेत आम्हाला लस टोचणारे लोक आले, की आमची मोठी घाबरघुंडी उडायची. कुठे पळून जावे की काय, असे वाटत होते. लसीमध्ये कधी देविची… तर कधी कॉलर्याची … आणखी कसल्या लसी होत्या, काय माहीत ? हाताच्या दंडावर टोचायचे. ते टोचतांना हाताकडे पाहत नव्हतो. भारी आग व्हायची. डोळ्याला पाणी यायचं. एकेकाचा नंबर लागत होता. ज्याला टोचले त्याचा तो रडवलेला चेहरा पाहिला, की आमचीही पाचावर धारण बसायची. त्यावेळी तो जात्यात, तर आम्ही सुपात आहोत, असं वाटायचं. सुई टोचून झाल्यावर गुरुजी काहीतरी मजाक करुन हसवित.
आठ दिवसातून एकदा तरी आम्हाला शेणा-मातीने शाळा सारवावी लागत असे. ओढ्यातून बालटी्त पाणी भरुन दोन मुलं बालटीच्या कडीत लाकडाचं दांडूक टाकून दोन बाजूला पकडून आणीत असे. सारवण्याचं काम बहुदा शनिवारी किंवा सुट्टीच्या आदल्या दिवशी होत असे. मुली सारवण्याचं काम करीत. काही मुले तोपर्यंत बाहेर खेळत किवा बाहेर परसात ’बे…एकं बे…’ चा पाढा जोराजोरात घोकत राहायचे.
आमच्या गुरुजींचे घर यवतमाळला आठवडी बाजाराजवळ होते. वडगावला खेळायला जातांना ते आम्हाला एक-दोनदा घरी घेऊन गेले होते. म्हणून त्यांचे घर आम्हाला माहित झाले होते.
आमचे गुरुजी यवतमाळ वरून सायकलने रोज जाणे-येणे करीत होते. शनिवारी सकाळची शाळा राहत असल्यामुळे कधी कधी ते घरी न जाता शाळेतच थांबत. शाळा सुटल्यावर जेव्हा ते पायातील पैजाम्याचा खालचा टोक पायाला गुंडाळून घेऊन त्याला क्लिप बाधून घेत; तेव्हा आम्ही समजून जायचो, की गुरुजी आता जाण्याची तयारी करीत आहेत. मग ते सायकलवर टांग टागून भुर्रकन आमच्या समोरुन निघून जातांना; त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे – सायकलच्या चाकाकडे मोठ्या कुतूहलतेने पाहत पाहत दप्तरपाटी पाठीवर घेउन; आम्हीपण सारे मुलं गावला जाण्यासाठी घोळक्याने निघत होतो.
परीक्षा जवळ आली की, गुरुजी आम्हाला थांबऊन रात्रिची शाळा घेत. अशा वेळेस आम्हाला जास्तीच्या भाकरी बांधून आणावे लागत असे.
आमचे गुरुजी आम्हाला खेळ खेळायला यवतमाळ जवळ असलेल्या वडगाव या गावला बैलगाडीने घेऊन जात. वडगावला सर्व शाळेच्या अंतर्गत खेळांच्या स्पर्धा व्हायच्या. ते या खेळाचे पंच राहत. त्यामुळे आम्हाला मोठा अभिमान वाटत असे. खेळामध्ये कुणी चुकला किंवा बाद झाला, की फुर्रकन शिटी वाजवित. खेळातला एक डांव संपला, की गुरुजी आम्हाला संत्र्याच्या गोळ्या खायला देत.
आमच्या गुरुजींनी एकदा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालूक्यातील मानकापूर या गावचे हरिभाऊ गाडगे यांच्या नकलाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या काळात त्यांच्या नकला जबरदस्त गाजल्या होत्या. खेड्यापाड्यात त्यांच्या नकलांच वारेमाप कौतुक व्हायचं. ते नकलाच्या रुपाने मनोरंजनातून लोंकांचे प्रबोधन करीत असत.
खेड्यामधे कमालीची पसरलेली निरक्षरता, जातीभेद, शिवा-शीव, अस्वच्छ्ता, अंधश्रध्दा, खोट्या रुढी आणि परंपरा इत्यादी अनेक विषयावर ते लोकशिक्षण करीत असत.
आदल्या दिवशी गुरुजींनी आम्हाला नकलांच्या कार्यक्रमाबाबत सांगितले होते. त्यामुळे संध्याकाळी आमच्या गावचे काही लोक पण कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. माझा मोठा दादा –शामराव देखील आला होता. येतांना त्यांनी आमची भाकर बांधून आणली होती. कार्यक्रम संपल्यावर आम्ही त्यांचे सोबत घरी गेलो होतो.
शाळेच्या प्रांगणात एका बाजूला स्टेज टाकला होता. रात्रीला कार्यक्रम होता.
कार्यक्रमांतर्गत हरिभाऊ गाडगेंनी अनेक नकला सादर केल्या. परंतु त्यातील एक नकल मला चांगली आठवते. ती म्हणजे केळवालीची…! लुगडं नेसलेली, भांग-पट्टा केलेली, नटखट, हुबेहुब एखाद्या बाईसारखी शोभणारी, काखेत केळाचं टोपलं घेऊन, केळवालीऽऽऽ अशी ओरडत स्टेजवर अवतरली होती.
‘केळवालीऽऽऽ केळं घ्याऽ केळंऽऽ एक आणा डझन…’ तिचं ते बाईचं सोंग पाहून सर्वजण क्षणभर अवाक् झाले.
आमचे गुरुजी माझ्यावर फार माया करायचे. असा काही कार्यक्रम असला, की ते मला पुढं करायचे.
‘केळवाली स्टेजवर आली की, तू जायचं. तिला एक पैसा देऊन केळ मागायच.’ गुरुजींनी याही वेळेस मला सुचना देऊन माझ्याकडून तसं प्रात्यक्षिक करून घेतलं होतं.
‘मावशीबाई हे घ्या पैसे. मला एक केळ द्या.’ मी स्टेजवर जाऊन तिला म्हणालो.
‘घेऽऽ रे … माह्या पोरा… कोणत्या वर्गात शिकतो… तू…?’
‘चौथीत…’
‘तुहाऽऽ मास्तर कोण रे…?’
‘बबन गुरुजी…’
रडवेला चेहरा करून आर्त स्वरात सांगायला लागली. ‘मी तुह्यासारखाच लहान होती नं तेव्हा मी पण शाळेत होती. पण नंतर माह्या लहान भावाला राखण्यासाठी शाळा सोडावी लागली. म्हणून माह्यावर केळे विकण्याची पाळी आली. मुलींनो… आपल्या लहान भावाला किंवा बहिणीला राखण्यासाठी किंवा घरच्या, शेतीच्या कामासाठी शाळा सोडू नका. शिका… खूप शिका… डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे खूप शिका… शिकल्यावर आपल्या बबन गुरुजीसारखे तुम्हाला मास्तर बनता येईल. नाहीतर गावातले पटवारी, ग्रामसेवक तरी बनता येईल.’
त्यावेळी खेड्यामध्ये मास्तर, पटवारी, ग्रामसेवक हेच खेड्यातील मोठे शिकलेले लोक दिसत. त्यामुळे शिक्षणाबाबत त्यांचेच उदाहरण समोर येत असे. त्यामुळेच की काय खेड्यातील मुलांच शिक्षणाचं ध्येय अगदी मर्यादित राहत असे. ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत.’ म्हणतात तसं! त्यांचं विश्वच तेवढं असायचं. कारण त्या पुढील उच्च शिक्षण कसं घ्यावं. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, कलेक्टर व साहेब कसं बनांव; हे त्याला काहीच कळत नव्हतं.
त्या नकलेत सारखी हावभाव करुन काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगत होती. त्यात गमती-जमती, हलका-फुलका विनोद असायचा. ते पाहून लोक खदखदा हसत होते. त्यांनी खरोखरच आपल्या कलेद्वारे ‘केळवाली’चे व्यक्ती चित्रण पाहणार्यांच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभे केले होते.
तिची ती पूर्ण नक्कल संपेपर्यंत मला तेथेच बसवून ठेवायची. एक केळ संपले, की दुसरे खायला द्यायची. पुढे बसलेले मुले माझ्याकडे मिष्किलपणे पाहून ‘मजा आहे तुझी…’ असे डोळ्याने खुणावून आपल्या असुयेच्या भावना व्यक्त करत होते.
एकदा असंच त्यांच्या नकलाचा कार्यक्रम आमच्या गावापासून दोन-तीनक मैल दूर पांढरी या गावला आयोजीत केले होते. आम्ही शाळेच्या मुलांनी त्यांच्या नकला आधीच पाहिल्या असल्यामुळे पुन्हा ते पाहण्याची उत्सुकता वाढली होती. त्यामुळे आमच्या गावातील बरेच लोक ते पाहण्यासाठी आले होते. मी सुध्दा गेलो होतो. मला त्या केळवाली मावशीबाईने ओळखले. तिच्या त्या केळवालीच्या नकलेमध्ये मलाच बोलावीले होते. मग माझी केळ खाण्याची त्यावेळीसुध्दा मजाच मजा झाली होती. तेव्हापासून काही मुलं मला ’केळवाली’ म्हणून काही दिवस चिडवीत होते.
केळावरुन आठवलं… आम्ही गणेशच्या बगिच्यातील जांब चोरुन खाल्ल्याची ती गोष्ट… शनिवारी सकाळची शाळा असायची; तेव्हा आम्ही गावाच्या शेजारच्या नदीच्या पलीकडे लागून असलेल्या जांबाच्या बगिच्यात जायचो. त्याला एखादा मुलगा चार आण्याचे जांब विकत मागायचा. ते तोडण्यासाठी त्याला, ‘हे नाही. त्या झाडाचे द्या.’ असे म्हणत दूर आंतमध्ये घेऊन जायचा. मग इकडे लपून बसलेले मुलं जवळच्या झाडाचे जांब तोडून दप्तरात भरायचे. तो येतांनाची चाहूल लागली, की हे मुलं सुंबाल्या करीत होते. मग रस्त्याने घरी जातांना आम्ही ते जांब मस्त खात खात जात होतो.
शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर घरी आलो की, गाव कसं सुनं सुनं वाटत असे. कारण गावातील सारे लोक शेतात काम करायला जात होते. मग गावात आमचंच राज्य असायचं.
पोमा लभानाच्या आवाराची कवाडी काढून त्याच्या कुपाचे कोवळे कोवळे कारले तोडून आणायचो. वहिनी स्वयंपाक करुन कामाला गेल्यावर चुलीत गरम गरम राख राहत होती. त्याच राखेच्या हुपीमध्ये बाई कारले भाजायची. त्याची तिखट, मिठ टाकून मस्तपैकी चटणी बनवायची. मग शिक्यात ठेवलेल्या दवडीतील भाकर काढून कारल्याच्या चमचमीत चटणीसोबत खाण्यात काही औरच मजा यायची.
मग आमच्या घरी चित्राबाई, सुदमताबाई, जनाबाई, सरस्वती, चांगोणा, वच्छलाबाई, सिताबाई, लक्ष्मी अशा मुलींचा रंगतदार खेळ सुरु व्हायचा. कधी बाहूल्यांचा खेळ तर कधी खेळभांडे, खडे फेकणे, काकणाचा खेळ, लगोर्याचा खेळ, टिकरचा खेळ असे अनेक प्रकारचे खेळ खेळ्ण्यात मुली गुंग होवून जात असत.
एकदा तर नवरीन-नवरदेवचा जिवंत खेळ खेळले होते. गमतीचे बाहूला-बाहूली ऎवजी मला नवरदेव व एका मुलीला नवरीन बनवून खेळ मांडला होता. आमच्या दोघांचं लग्न लाऊन देण्यात त्या रमून गेल्या होत्या. लग्नानंतरच्या नवरा-बायकोचा संसार आमच्याकडून मांडून घेतला होता. अशी त्या खेळाची मुली मस्त गंमत घेत होत्या.
त्यादिवशी आमची शाळा सुटल्यावर खूप पाऊस आला होता. पाऊस उघडण्याची काही चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे घरी जावे की नाही याच विवंचनेत आम्ही थांबलो होतो. वाघाडी नदीच्या जवळून आलेले लोक वाघाडीला भयानक पूर आल्याचे सांगत होते. रात्र पण वाढत चालली होती. म्हणून आम्ही मामाची शेती सोन्या कोलाम वाहत होता – त्याच्या घरी मी बाई, चित्राबाई, व सुदमताबाई राहिलो होतो. बाकीची मुले आणखी कुठेतरी थांबले होते.
पावसामुळे थंडी पडली होती. हातपाय गारठून गेले होते. आम्हाला कोलामाच्या बायकोने हातपाय शेकण्यासाठी विस्तव पेटवून दिला. तिने भाकरी थापून आम्हाला दुरुनच जर्मनच्या कळकटल्या ताटात खायला दिले. रात्रभर तेथेच हातपाय गुंडाळून आम्ही शेकोटीजवळ झोपलो होतो. सकाळी आम्हाला बाहेर ठेवलेल्या फुटक्या बशीत चहा दिला होता. आमची राहणीमान त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली होती; तरीही हे लोक आमचा विटाळ का करीत होते ? ते काही समजत नव्हतं. शाळा शिकत असतांना अशाही काही प्रसंगांना आम्हाला सामोरे जावे लागत होते.
दुपारी जेवण्याची सुट्टी झाली, की एकतर नामदेव दुधवाला किंवा निर्मला किंवा सोमा कोतवाल असं कुणाकडे तरी भाकर खाण्यासाठी जात होतो. शीदोरीचे फडके गावला जातांना वाघाडी नदीवर धूत होतो.
आम्ही बाईची वर्ग मैत्रीन – निर्मला हिच्या घरी किंवा निर्मलाच्या घराच्या पलीकडे करंजीच्या झाडाजवळ सोमा कोतवालाचं घर होतं; तेथे जात होतो. त्यांच्या घरी दुकान असल्यामूळे त्यांचेकडून गोळ्या, बिस्किट किवा लेखणी विकत घेत होतो. तो आमच्याशी अतीव जिव्हाळ्याने बोलत असे.
कधी कधी नदीला पूर असला तर आम्ही निर्मलाच्या घरी थांबत होतो. तिने एकदा आम्हाला शेतात नेले होते. तेव्हा तिच्या शेतात भुईमूंगाच्या शेंगा काढणे सुरु होते. त्यावेळी आम्ही मस्तपैकी शेंगा खाल्ल्या होत्या.
तसं नामदेव दुध्याचं घर शाळेजवळ पण चढावावर होतं. त्याची बायको घरी असली, की आम्ही तिच्याकडेपण भाकरी खायला जात होतो. ती आम्हाला मनस्वी आवडत असे. ती दिसायला तशी काळसावळी, पण नाकीडोळी चरचर होती. ऊंचीपूरी होती. पाय झाकेपर्यंत चापून-चोपून लुगडं नेसत होती. त्यामूळे ती सडसडीत, सुंदर दिसायची. चार-चौघीत उठून दिसायची. तिच्यात गोरगोमटं रुप जरी नसलं, तरी शालिनता मात्र भरभरुन होती.
नामदेव दुधाचा धंदा करत होता. म्हणून लोक त्याला ’नामदेव दुध्या’ म्हणत. यवतमाळला तो दूघ विकण्यास जात होता. त्याच्याकडे काही म्हशी पाळलेल्या होत्या. त्याच्या घराशेजारून आम्ही शाळेत येत-जात असतांना तो नेहमी शेण-मूत काढतांना, चारा टाकतांना किंवा म्हशीच्या अंगावर पाणी टाकतांना दिसायचा.
त्याचं त्याच्या बायकोशी काय बिनसत होतं कोण जाणे ? की तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा की आणखी काहीतरी होतं… काय माहित?… पण तो तिच्या उरावर बसून तिला मारत असल्याचे आम्ही रस्त्याने जातांना बर्याचदा त्यांच्या घराच्या अंगणात पाहिले होते. तिला मारतांना आमचं संवेदनशील मन गलबलून जायचं, अन् आमच्या डोळ्याच्या कडा नकळत आसवाने भिजू लागत. मनांत वाटायचं, इतके क्रूरपणे हे माणसं वागतातच
कसे ? बाई काय केवळ त्याची बायको म्हणून त्याच्या जीवनात आली ? काय कुणी आई म्हणून तर कुणी बहिण म्हणून तर कुणी मुलगी म्हणून त्याच्या जीवनात कधी आलीच नाही ?
ती बाई त्याचा मार कसा सहन करत होती, याचे आश्चर्य वाटायचं ! आम्हाला त्याच्या बायकोची फार कीव यायची. तो दिसला की, आम्ही त्याला थर्र भीत होतो. तो दिसायला काळासा, उंचीने बायकोपेक्षा थोडा बुटका – पण कष्टानं कमावलेलं भरदार शरीर होतं त्याचं !
त्याकाळी खेड्यात घरच्या बायांना माणसं खूप राबवून घेत. माणसं बाहेरचं कितीही मरणाचं काबाडकष्ट करतील, मणभर किंवा त्याही पलीकडे जाऊन लाकडं फोडतील, जिवापलीकडंच ओझं उचलून नेतील, ऊन-पावसात, थंडी-वार्यात मरमर राबतील, शेतीचं किंवा मजूरीचे वाटेल ते कामे करतील, परंतु घरी आले, की राजे बनत होते. घरातली पडलेली एक काडी सुध्दा उचलत नव्हते.
घरची बाई मात्र बाहेरचं शेतीचं किवा मजूरीचे कामं करण्याशिवाय सकाळी झाकटीला उठून शेणाचा सडा टाकतील, पोतार्याने घर सारवतील, झाडझूड करतील, विहिरीचं पाणी भरतील, खरकटे भांडे घासपुस करतील, चूल पेटवता पेटवता फुंकणीने फु्कून, नाका-तोंडात जाणारा विस्तवाचा धूर झेलतील, चहा करुन आयतं कप माणसाजवळ नेऊन देतील, त्याच्या आंघोळीचं पाणी चुलीवर ठेवतील, तापलं की आंघोळीच्या गोट्यावर नेऊन देतील, लहान पोरांच हागलं-मुतलं काढतील, स्वयंपाक करतील, सर्वांना जेवणाचं ताटं वाढून देतील, कपडे धुतील असे कितीतरी नानातर्हेचे कामे त्यांना करावे लागत होते. तिच्या जीवाची पर्वा न करता नवरा तिला असे राबवून घेत. जणू काही तिने माणसाला जन्म देऊन मोठा गुन्हाच केला होता, की काय ?
त्या दिवशी यवतमाळच्या आठवडी बाजारात आम्ही कडूनिंबाच्या झाडाखाली उतार्यावर बसलो होतो. या उतार्यावर निळोण्याचे व चौधर्याचे लोक बसत असत; तेव्हा तो प्रसंग घडला होता.
नामदेवने काय गुन्हा केला होता काय, माहीत ? पण तो पोलीस त्याला जबरदस्तीने ओढत नेत असल्याचे आम्ही सगळे लोक निर्विकारपणे-हताशपणे पाहत होतो. ते दृष्य पाहतांना सर्वजण हळहळ करीत होते. त्या माऊलीचा त्या मारकुंड्या नवर्याबद्दल किती लळा होता; हे त्यावेळेस मला जाणवलं ! स्त्री मनातील हळुवार भावनांचे मिश्रण तिच्या अंतरी असल्याचे दिसले.
खरंच, एखादा नवरा कसाही असो, तो एखाद्या प्रसंगी हिंसक झाला, क्रूर झाला किंवा लहान मुलासारखा हट्टी, चवचाळ, खट्याळ, नाठाळ, घायाळ झाला तरी त्याच्या बायकोला सांभाळून घ्यावे लागते; याची प्रचिती मला त्या बाईच्या वागणुकीतून दिसून आले होते.
ती मायाळू बायको होती, यांत काही तिळमात्र शंका नव्हती. तिची माया पाहून माझं मन द्रवलं होतं !
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
माझा मोठेबाबा-पांडूरंग याच्या घराकडे जातांना त्याच्या घराजवळ कोपर्यात चिंचेचं झाड लागत होतं. या झाडाचं खोड भारीच जुनाट व वयस्कर झालं होतं. त्याच्या फांद्या चांगल्या भोवताल पसरलेल्या होत्या – जणू काही एखाद्या पक्षाने पंख पसरल्यासारखे दिसत होत्या. हे झाड हिरव्याकंच बारीक पानाने गच्च भरलेले दिसायचं.
हे झाड म्हणजे आम्हा मुलांना खेळण्याचं व लोकांना बसण्याचं एक सार्वजनिक ठिकाणच होतं, म्हणा ना…! मस्त करमत होतं तेथे !
या झाडापासून पांढरी या गावाकडे बैलगाडीचा रस्ता जायचा. पांदण होती ती ! मोठेबाबा गावचा कोतवाल होता; तेव्हा तो मेलेलं ढोरं याच पांदणीने ओढत नेत होता. दशरथ-मामाच्या गोटाळी वावराच्या एका कोंट्यात त्याचं कातडं सोलून विकत होता. त्याचं काम आटोपेपर्यंत भोवताल कुत्रे, कावळे व गिधाडे तेथे जमा होत. हे सर्व आगंतूक पाहूणे आधाशीपणे खाद्यावर ताव मारण्यासाठी वाट पाहात राहत होते.
पूर्वी आमच्या मोहल्ल्यातील लोक सुरे, टोपले घेऊन जायचे, म्हणे…! मेलेल्या ढोराचं मांस आणण्यासाठी…! जेवढ्या डल्ल्या घरात खाता येईल तेवढ्या खात. ऊरलेल्या दोरीवर वाळवत ठेवत. नंतर खुला करुन खात. आता ही पध्दत बंद झाली.
बाबासाहेबांनी सांगितलं की, ‘मेलेलं ढोर ओढू नका. मेलेल्या ढोराचं मास खाऊ नका.’ म्हणून आता मोहल्ल्यातील लोकांनी मेलेलं ढोर ओढणे व त्याचं मास खाणे सोडून दिले होते. मोठेबाबा कोतवाल होता, म्हणून त्याला गावकीचे कामे करावे लागत असे. त्यालाही ही कोतवालकी सोड म्हणून लोक भायच दबाव आणीत होते. दुसर्या वर्षी त्यानेही कोतवालकी सोडली होती. बरबड्याच्या काशा- होलारांनी आमच्या गावची कोतवालकी धरली होती.
बाबासाहेबांनी मळलेल्या वाटा सोडून नव्या वाटेने जायला सांगितले होते. नव्या वाटा ह्या खाचखळग्याचा व खडतर होत्या. त्यामुळेच समाज उन्नतीकडे वाटचाल करायला शिकला होता.
चिंचेच्या झाडाजवळच त्रिकोणी आकाराचं एखाद्या एकराची लांडग्याची खारी होती. उन्हाळ्यात उलंगवाडी झाली, की आम्ही मुले या खारीला खेळायचं मैदान बनवित होतो. तेथे गिल्ली-दांडू व इतर मैदानी खेळ खेळत होतो. आम्ही मुले घणमाकड गाडून त्यावर दिवसभर फिरत राहात होतो.
या चिंचेच्या झाडाच्या खोडाजवळ खाली तीन-चार दगडाला तेल-शेंदूर माखून एका रांगेमध्ये ठेवलेले होते. मध्ये इतर दगडापेक्षा एक मोठा दगडं होता. हे दगडं म्हणजेच आमच्या गावची देवी ‘मातामाय’ होती ! या मातामायच्या भोवताल हिरव्या, लाल, पांढर्या रंगाचे सुताचे धागे, लहान लहान लाकडाच्या बाहुल्या, कुंकवाचा लाल रंगाचा बुक्का, ज्वारीच्या अक्षदा असे काही-बाही नेहमीच पडलेले असायचे. कोणीतरी सकाळी येऊन त्याच्या आजूबाजूला सडा व सारवण करुन जात असायचे. वातीचा दिवा आणि दह्या-बोण्याचं ताट कोणी ना कोणीतरी बाई रोज येथे घेऊन येत होती.
आम्ही मुले या झाडाच्या खाली व झाडाच्या फांद्यावर दमछाक होईपावेतो खेळत राहायचो. चापडुबल्याचा खेळ खेळायला आम्हाला मस्त मजा यायची. या झाडाला बार म्हणजे फुलोर आला, की आम्ही तोडून त्याची चटणी करुन खात होतो. ही चटणी स्वादिष्ट आणि आंबसूर लागत असे. या झाडाला चिंचा धरल्यावर पूर्ण झाड लदबदून जायचं. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नव्हतं. मग झाडावर चढून गाभुरलेल्या चिंचा खाण्यात वेगळीच मजा यायची.
एकदा माझा लहान भाऊ-अज्याप तापाने खूप फणफणला होता. त्याला गोवर निघाला होता. आई ताटात पूजेचं सामान म्हणजे हळद, कुंकु, हिरव्या बांगड्या पिवळा कपडा, पिवळा दोरा, लाकडाची फणी, लाकडाचं बाहुलं, नारळ, दह्या-दुधाचं बोणं व कापसाच्या वातीचा दिवा घेऊन या मातामाय जवळ गेली होती. सोबत बाई पण होती.
तेथे पूजा करतां करतां आईने एक बांगडी कचकण फोडली. त्या फुटलेल्या काकणाने आईने स्वत:च्या छातीला ओरपली. त्या चिरलेल्या जागेतून रक्त वाहू लागलं. ते रक्त बोटावर घेऊन आईने मातामायच्या दगडावर शिंपडून त्याला चोपडलं.
लोक दगडाला देव समजून त्याच्या अंगाला शेंदूर व कपाळाला कुंकू लावत. शेंदूर व कुंकू, दोन्हीही लाल रंगाचं असल्याने ते रक्ताचं प्रतीक होतं. आईने तर स्वत:चं रक्तच देवीला अर्पण केलं होतं. देवीला रक्ताची चटक लागली होती. तिला कोंबडे-बकर्याचं रक्त पाहिजे होतं. आईने मातामायची भूक भागवली होती. ते दृष्य खरोखर अंगावर शहारे आणणारं होतं ! माझ्या डोळ्यापुढे अंधारीच आली होती ! आपला मुलगा आजारातून बरा व्हावा म्हणून स्वत:ला जखमी करुन घेणं हे कृत्य खरोखरंच आईच्या जगतात अनोखं असच उदाहरण असेल, नाही का ? देवीचं व्रत धरलं, की केस विचरता येत नव्हतं. अंगणात सडा टाकता येत नव्हतं. अशी कशी ही देवी जिला स्वच्छतेचं इतकं वावडं होतं !
आई कधी कधी आम्हाला बर्याच गोष्टी सांगायची. तिने एकदा सांगितलेली गोष्ट मला चांगली आठवते. ती म्हणाली,
‘तू अगदी दूधपिता असतांना पोलिसांनी आम्हाला दारुच्या बाबतीत पकडले होते. तुझे बाबा त्यावेळी वाडीतल्या लवणात घरी पिण्यासाठी मोहाची दारु काढत होते. त्यांनी काढलेल्या दारुच्या दोन शिश्या नहाणीतल्या नांदीमध्ये ठेवल्या होत्या. त्यात माझी नवीन चोळी असल्याने नांदीत भिजवत ठेवली होती.
तेवढ्यात पोलिसांची अचानक धाड पडली. त्यांनी त्या दारुच्या शिश्या व माझी चोळी जप्त केली. कोर्टात केस सुरु झाली. तुझ्या बाबाने शहरातला फाटक नावांचा ब्राम्हण वकील लावला होता. त्याकाळी ब्राम्हण जातीचेच वकील राहत होते.
त्या केसमध्ये तारखेवर हजर होण्यासाठी आम्ही सकाळीच तुला कडेवर घेऊन यवतमाळला निघालो होतो.
पावसाचे दिवसं होते. एकाएकी आभाळात ढग जमा झाले. सर्वदूर काळोख पसरत चालला होता. क्षणातच भल्या मोठ्ठाले थेंब अंगावर पडू लागले. आम्ही शेतातल्या मोहाच्या झाडाचा आसरा घेतला. तुला पोटाशी धरुन मी शेवाने लपेटून घेतलं. घोंघावणार्या वार्याचा आवाज मी म्हणत होता. जोर्याचा थंड वारा वाहत होता. कानशिलं थंडगार पडत चालले होते.
त्या धुवांधार पावसाचा सामना करत आम्ही जीव मुठीत घेऊन; त्या मोहाच्या खोडाजवळ एकमेकांना धरुन बसलो. मनात देवाचा धावा करत होतो.
‘देवा आम्हाला वाचव – सोडव या केसमधून. मी तुला नारळ फोडीन.’ अशी देवाला प्रार्थना करत होती.
विजांच्या कडकडाट व ढगांचा गडगडाट कानठळ्या बसवित होत्या. आम्हाला चांगलं पावसाने झोडपलं होतं. पावसाने ओलचिंब झालो होतो.
पाऊस थांबला. तुझ्या तोंडावरच शेव मी हळूच काढून पाहिला. तू निपचित पडून होता. हालत नव्हता की डुलत नव्हता. मला धक्काच बसला. मग मी जोरात हंबरडा फोडला. मला वाटलं, ‘माह्या रामरावने जीव सोडला.’ माझा कळवळा पाहून तुझ्या बाबाचंही काळीज कापायला लागलं.
तुझ्या बाबाने पाहिलं, की तुझी दातखूडी बसली होती. अंग थंडगार पडलं होतं. त्यांनी तुझ्या जबड्यात बोटं घालून तोंड उघडले. तुझ्या तोंडात जोराने फुंका मारल्या. तू हळूच हालचाल करु लागला. ते पाहून आमच्या दोघांच्याही जीवात जीव आला. मग आम्ही चिखल तुडवत रस्त्याने लागलो. धो-धो कोसळणार्या पावसाने नदी-नाले गढूळ पाण्याने तुडुंब भरुन वाहायला लागले होते.
यवतमाळच्या संकटमोचन देवस्थानच्या मारुती देवळाच्या पायरीवर आम्ही दोघांनीही माथा टेकवला व कोर्टात गेलो. तेथे सुनावणी झाली. आम्हा दोघांनाही पन्नास पन्नास रुपये दंड ठोठावला. घरी येतांना आम्ही मारुतीच्या पायरीवरच नारळ फोडलं. कारण देवळात जाऊन आम्हाला त्या देवाचे तोंड पाहण्याची बंदी होती ना !’
एकदा गावातल्या चिंचेच्या झाडाजवळ बाबाला दारुच्या बाबतीत पोलिसांनी पकडले होते. जनाबाई पण तेथे होती. ती लहान होती. पोलीस बाबाला मारत असल्याचे पाहिल्यावर बाईने रडून रडून आकांत मांडला होता.
तसेच एकदा बाबा वाडीजवळच्या लवणात रात्रीच्या वेळेस दारु काढत असतांना पोलीस एकाएकी आल्याचे बाबाने पाहिले. तसाच बाबा पळत सुटला. वाडीच्या काट्याच्या कुपावरुन उडी मारुन पोलिसांना चकमा दिला. अशा बिकट प्रसंगी काय काय धाडस करावे लागत होते ? अशा त्या कहाण्या ऎकून आम्ही सुन्न होत होतो.
आईने दुसरी एक गोष्ट सांगितली.
‘माहा शामराव पोटात होता. मी व तुझे बाबा कोटेश्वरच्या यात्रेला पायी-पायीच निघालो. त्यावेळी यात्रा-जत्राचं भारीच वेड होतं. देवाचं दर्शन घ्यायचं. त्याला कबूल केलेलं नवस फेडायचं. यात्रेतल्या बाजारात खरेदीची हौस भागवायची. शेतातला माल-टाल निघाल्यावर हातात दोन पैसे खुळखूळत होते.
कोटेश्वर हे देवस्थान आपल्या गावापासून आठ-दहा कोस होतं. मधात वाकी या गावला धुरपताबाई म्हणजे तुझी आका, हिच्या घरी मुक्काम केला. ही तुझ्या बाबाची चुलत बहीण होती. आम्ही कोळंबी या गावला आमराई विकत घेतली होती, तेव्हा त्यांनी पण शेजारची आमराई विकत घेतली होती.
कोटेश्वरला पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता. मंदिराच्या आवारात टिनाच्या खाली जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. आम्हीही त्या पंगतीत बसलो होतो. कुणीतरी येऊन आम्हाला कोणत्या जातीचे आहांत म्हणून विचारीत होते. आम्ही ‘महार’ असल्याचं सांगितल्यावर हातातली काठी उगारुन, दरडाऊन म्हणाला, ‘महारड्यानो, तुम्ही पंगत बाटवली. ऊठा येथून नाहीतर पाठ सोलून काढीन.’ त्याच्या भीतीने आम्ही मंडपाच्या बाहेर आलो.
थोड्यावेळाने धुवांधार पाऊस सुरु झाला. मग आमचे हाल पाहवत नव्हते. त्या भरपावसात उपासीपोटी ती रात्र कसी-बसी आम्ही जागून काढली. थंडीने अंगात हुडहुडी भरली होती. पण त्या कोटेश्वरच्या कोटी ईश्वर असलेल्या एकाही देवाला आमची किव कशी आली नाही ?’ ही गोष्ट ऎकल्यावर आम्ही गहिवरुन आलो होतो.
याच कोटेश्वरच्या यात्रेत माझी बहीण-जनाबाई हरविल्याची आणखी एक गोष्ट आई सांगत होती. ती म्हणाली,
’त्यावेळी जना लहान होती. देवदासला खायच्या पेरकांड्या आणायला सांगितल्या होत्या. ती त्याचं लक्ष नसतांना त्याच्या मागे मागे गेली व भुलली ! एका बाईने तिला रडतांना पाहून उचलून घेतले. देवदास परत आला; पण जना त्याच्या सोबत नव्हती. सारेजण चिंतेत पडले. मी आकांत मांडला. मग तिला शोधायला मी, तुझे बाबा, देवदास, सावळा या गावला राहणारी तुझी आका – तिच्या पोराचं नाव लोडबा होतं, असे सगळेजण भरयात्रेत तिला भिरभिर पाहायला लागले. ती एका अपरिचीत बाईच्या कडेवर रडत असलेली दिसली. पण ती बाई जनाला देत नव्हती. मग मी तिच्या जवळून फणकार्याने: हिसकावून घेतली. जना सापडल्यामुळे सार्यांचे चेहरे आनंदाने फुलून आले होते.’
त्यावेळी खेड्यात कॉलरा, पटकी, देवी, प्लेग असे अनेक साथीचे रोग यायचे. त्यात लोक. पटापट मरायचे.
बाबा अशीच एक गोष्ट सांगत होता.
‘त्या वर्षी गावात मरगड आली होती. उलटी हागवणीने लोक पटापट मरत होते. एकाला उचललं की दुसरा मरुन तयार राहायचा. मयती उचलायला लोक घाबरत असत. त्यातच पांड्याची नवरी म्हणजे माही भावजय पण मेली.’
गावामध्ये एकदा देवीची साथ आली होती. हा रोग लागट होता. पूर्ण गावात पसरला होता. त्या साथीत आमच्या घरामागे राहत असलेल्या दादारावचे दोन मुले एकाचवेळेस मेले होते. अनुसया वहिनी – तुळशीराम-दादाची बायको; हीला पण देवीच्या आजाराने घेरलं होतं. कपडा आंगाला चिकटत असे म्हणून तिला कडूनिंबाच्या पानावर झोपवत. यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात तिला उपचारासाठी नेले होते. ती वाचली. पण लभान तांड्यामध्ये ह्या साथीने बरेच मुलं मरण पावले होते. कारण हे लोक दवाखान्यात इलाज न करता देव-देवींच्या मागे लागले होते. आमच्या घराच्या समोरील देवळात कोंबडे, बकर्याचा बळी देण्यापूर्वी त्याची पूजा करण्यासाठी घेऊन येत. मग खारीत नेऊन त्यांना कापत.
एकदा आमच्या मोहल्ल्यातील लोक बंजार्याच्या तांड्याकडे जात होते. एका बाईच्या अंगात भूत आल्याचं लोक सांगत होते. मी सुध्दा उत्सुकतेपोटी तिकडे गेलो. पाहतो तर आमच्या गावातला गोविंदा – वार्धक्याकडे झुकलेला, पांढरी लांब दाढी वाढलेली, त्याला दाढ्यासाधु म्हणत होतो, तिला पळसाच्या फोगाने मारत तोंडाने काहीतरी बडबड करत होता. ते दृष्य पाहून अंगावर काटे आले. ती बाई जीवाच्या आकांताने रडत होती. तिचे हातपाय थरथर कापत होते. माराच्या भीतीने ती अंग चोरुन घ्यायची. तिला काहीतरी आजार झाला असावा. पण भूत-खेत उतरवण्याच्या पायी तो तिचे हाल न हाल करत होता. ते न पाहवल्यामुळे मी घरी आलो होतो.
असंच एकदा एका लभान बाईला साप चावला होता. ती केशवच्या पलीकडील वावरातून पायवाटेने येत होती. त्या रस्त्यात टोंगळभर गवत वाढलेले होते. त्यामुळे रस्ता झाकून गेला होता. अंदाजा-अंदाजाने ती एक-एक पाय ऊचलून चालत असतांना तिच्या पायाला साप चावला. ती घरी आली. त्यांनी गावातील त्या दाढ्यासाधुला साप ऊतरविण्यासाठी बोलावीले. त्याने साप उतरविण्याचा प्रयोग सुरु केला. परंतु त्याच्या मंत्राला काही यश आले नाही. कारण तिचा पाय सुजला होता. तिचे शरीर काळे-निळे पडत चालले होते. तोंडातून फेस येऊ लागला होता. मी घरी आलो न आलो, तर रडण्याच्या करुण किंकाळ्याचा आवाज माझ्या हदयाला येऊन भिडल्या. ती बाई आता मरण पावली, हे आम्हाला कळून चुकलं. खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे तिचा घात झाला होता. तसंही तिला दवाखान्यात न्यायची सोय नव्हती, म्हणा…! योग्य उपचाराअभावी तिचा अनाठायी जीव गेला. ही गोष्ट माझ्या तरल मनाला फार चाटून गेली होती.
एकदा बाबा रात्रीला बरबड्याच्या शेतातून घरी आला होता. तो घरात शिरल्यावर मी त्याला घामाघून झाल्याचं पाहिलं.
मी त्याला विचारलं. ‘बाबा, तुम्हाला एवढा घाम का आला?’
‘अरे, मला बरडाजवळ एक आगिचा मोठा लोळ उठलेला दिसला. म्हणून मी घाबरुन पळत आलो.’
त्यादिवशी भयान रात्र होती. बहुतेक अमावसेचे दिवसं असावेत. दिवसा सूर्य आग ओकत होता. म्हणून दिवसभराच्या उष्णतेने ती जमीन किंवा जमिनीत असलेले धातू तापले असावेत. त्यामुळे अधार्या रात्रीत ती उष्णता बाहेर पडत असल्याने कदाचित आग दिसत असावी, असं काहीतरी वैज्ञानिक कारण असावं; असे मला वाटत असल्याचे मी बाबाला सांगितले होते.
त्या वर्षी आमच्या शेतात भुईमूंग पेरला होता. भुईमूंगच्या शेंगा चांगल्या भरल्या होत्या. त्यादिवशी संध्याकाळी दादाने शेतात मळ्याजवळ शेंगा भाजल्या होत्या. एक अनोळखी व्यक्ती धनपाल सोबत त्या भाजलेल्या शेंगा खात असतांना मी पाहिलं. शेंगा खाऊन झाल्यावर मी हळूच धनपालला त्या अनोळखी व्यक्ती बद्दल विचारले. त्याने सांगितले की, ‘तो भगत आहे. माझ्या मामाच्या वाफगाव या गावावरून आला. आपल्या गावात एक बाई करणी करते नं. म्हणून त्याला आणलं.’
ही बातमी त्या दिवशी घरोघरी पोहचल्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी धनपालच्या घरी जत्राच भरली होती. मी पण त्याच्या घरी कुतूहलापोटी गेलो होतो.
. त्याच्या घरी वसरीत देव्हारा मांडला होता. तो एका लाकडी पाटावर उभा राहून डोळे वटारुन वटारुन पाहत होता. धोतर नेसलेला व अंगात बंडी घातलेला होता.. त्याच्या डोक्याला एखाद्या बाईसारखे लांब केस होते त्याने. ते मोकळे सोडले होते. कपाळाला त्याने कुंकू व हळद लावली होती. मी आदल्या दिवशी त्याचे पाहिलेले रुप व आताचे रुप काही वेगळेच दिसत होते.
तो अचकट-विचकट तोंड करुन अख्खा निंबू तोंडाने फोडून रस पीत होता. तोंडाने ‘जय मातामाय’ असा ओरडून कमरेचा वरचा भाग एका लयीत घुमवत होता. त्याचं ते रौद्ररुप भयानक वाटत होतं. त्याच्या भोवताल बाया जमल्या होत्या. प्रत्येकीकडे जर्मनच्या ताटात आरती, त्यात कुंकू, तेलाचा दिवा, उदबत्त्या व चिल्लर पैशाची नाणी ठेवलेले होते. कोणी म्हणत मुल-बाळ होत नाही; तर कोणी म्हणत बिमारी बसत नाही. असं काहीतरी प्रत्येकजणी आपापले गार्हानी घुमणार्या देवासमोर मांडीत होत्या.
माझ्या वहिनीने वनिताला तेथे नेले होते. वनिता – माझी पुतणी अगदी लहान होती. नुकतीच चालायला लागली होती. तिचे पोट फुगले होते. हातपाय बारीक झाले होते. तिची अनेक वेळा दीठ काढली. तिला बाबाने गावठी झाड-पाल्याचं औषधपाणी देऊन पाहिले. तिला यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात नेले. तरी तिचा आजार काही केल्या बसत नव्हता. म्हणून वहिनी त्या भगताकडे घेऊन गेली. भगताने सांगितले की, ‘गावातल्या बाईने तिला ‘करणी’ केली आहे. मातामायला दहीबोणं घेऊन जा. उपवास कर. कोंबडं काप.’ असाच इलाज तो इतर बायांना सांगायचा, तसाच वहिनीला सुध्दा सांगितला.
भगताचा हा सारा प्रकार पाहून मी थक्क झालो. ‘बुडती हे जण पाहावेना डोळा, म्हणून कळवळा येत असे.’ असा एक संत तुकारामाचा अभंग माझ्या वाचनात आला होता. मला तिथे त्या भगताला विरोध करण्याची हिंमत तर झाली नाही, पण घरी आल्यावर वहिनीला बोलल्याशिवाय राहावले नाही.
‘ह्या भगताचं ऐकून वनिता काही बरी होणार नाही. कोणत्याही रोगावर औषधीचा उपचार करावा लागतो. तो तर कोणतंही औषध देत नाही. नुसतं मातामायची भक्ती व तिला कोंबडं कापायाला सर्वानांच सांगतो. प्रत्येक रोगावर तो हाच इलाज सांगतो. यानं काय वनिता बरी होईल ? असं जर असतं तर सरकारने दवाखाने न काढता नुसते मातामायचे देव्हारे गावोगावी मांडले असते.’
मी आणखी तिला म्हटले.
‘आपल्या अवतीभवती निसर्गात ज्याकाही घडामोडी होतात, त्यामागे कोणते तरी कारण असते. ते कारण समजणे आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्याने आपल्याला दैवी चमत्कार वाटतात. आपल्या या अज्ञानाचा फायदा मग असे भगत लोक घेतात. आता त्या भगताच्या मागे लागू नको. वनिता औषधानेच बरी होईल.’ असे काहीतरी विचार मी तिला सांगितले होते. माझ्या वाचनाने मलाही थोडंफार ज्ञान अंधश्रद्धेबाबत अवगत झाले होते. खरे म्हणजे आपल्या मनातील शंका आणि भय हेच आपले शत्रु असावेत असे वाटते. तेच आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करु देत नाहीत, याचा मी अनुभव घेत होतो..
सुरेभानने मोईतूराची बायको केली होती. जवान होती. त्याच्या पहिल्या बायकोच्या नावाने तिला सुध्दा लोक हाका मारीत. गावात अशीच प्रथा होती. पहिल्या बायकोचं नाव दुसरीला मिळत असे. तशी ती नखरेल व चावट चालीची वाटत असल्याचे; बाया तिला नावे ठेवित होत्या. ती सुरेभान सारख्या गरीब व भोळ्याभाबड्या माणसासोबत खरेच संसार करील काय, असं कुणाला वाटत नव्हतं. म्हणूनच ती अंगात देवी येण्याचं नाटक रचून ढोंग तर करत नव्हती ना ?
ती जेव्हा घुमायला लागायची, तेव्हा आम्ही तीचे ते घुमणे मोठ्या कुतूहलाने पहात होतो. तिच्या भोवताल गावातल्या बाया जमा होत व काहीबाही विचारीत. ती मग अशीच घुमता घुमता हिंदी भाषामध्ये काहीतरी उत्तरे द्यायची. आम्हा मुलांना तिची अनामीक भीती वाटायची पण मजा सुध्दा यायची. खरोखरच, एका दिवशी ती निघून गेली. परत कधी आलीच नाही. गावातील लोकं म्हणूनच तिला ’पिसी’ म्हणून चिडवित होते.
आमच्या गावात दसर्याच्या दहा दिवस आधी गावात कोतवालाच्या घरी ‘इनाई’ बसवत. ही एक गावदेवी होती. ही इनाई म्हणजे शहरातील दुर्गादेवीच रुप होतं.
शेतातून बाया गाणं म्हणत म्हणत माती आणायच्या. त्याची इनाईदेवी, हत्ती किंवा वाघ, राक्षस अशा मुर्त्या बनवित असत. कधी ही देवी हत्त्यावर बसायची तर कधी वाघावर बसायची. दहा दिवस रोज तिची बाया पूजा करीत. दहाव्या दिवशी तिला नदी-नाल्यात शिरवायला घेवून जात.
‘माही लाडाची गवरा,
थालीभर पाणी नेजाजी…
‘माही झोपेची गवरा,
तिला उशी मांडी देजाजी…
‘माही भुकेची गवरा,
संग शिदोरी नेजाजी…
असे गाणे म्हणत असत. म्हणजेच त्यावेळच्या अज्ञानी समाजात काव्य किती प्रगत होतं याची प्रचिती येते. शिवाय शहरात या इनाईदेवीच्या हातात विणा हे वाद्य सुध्दा दाखविलेलं असायचं. या विण्याचे भोक्ते म्हणजेच त्याकाळचा हा कलावंत असलेला महार-मांग समाज होता; असंही म्हणता येईल…! चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ‘लेवण्याचा’ ठेका बामणाकडे असेल, पण गाण्या-बजान्याचं वेड मात्र महाराला होतं.
दसर्याच्या दिवशी मी लहान असतांना त्याकाळी भयानक असा एक प्रकार पाहिला होता. कोतवालाच्या घरी एक हल्या बांधून ठेवत. त्यावेळी भग्या कोतवाल होता. त्या हल्याच्या मानेची शीर सुर्याने कापत. त्याला मग घरोघरी फिरवत. त्याच्या मानेतून निघणार्या रक्ताने हात माखून घेत व त्या हाताच्या पंजाची छाप घराच्या भिंतीवर उमटवित. त्यामुळे घरात रोगराई येत नाही; असा त्यांचा समज होता. नंतर कोतवालाच्या घरी आणून त्या हल्याला कापत व त्याचे हिस्से पाडून लोक ते मास शिजवून खात. किती हा अघोरी प्रकार होता, नाही का ?
अशाप्रकारे गावातील लोक अंधश्रध्देमध्ये आकंठ बुडालेले असल्याचे मला दिसत होते.
मी लहान होतो. त्यावेळची ही गोष्ट आहे. मला चांगलंच आठवते…! ते उन्हाळ्याचे दिवसं होते. गावातील लोक रात्रीचे जेवण आटोपून नुकतेच झोपेच्या आहारी गेले होते. काळाकुट्ट अंधार पसरला होता. मध्येच सार्या कुत्र्यांच एका सुरात इरावनं सुरु झालं होतं. त्यांच इरावनं भीतीदायक वाटत होतं. इतक्यात जिकडे तिकडे गलबला उठला. आम्ही अंगणात झोपलो होतो. तो लोकांचा कल्ला आणि विस्तवाचा तडतड आवाज ऎकून आम्हीही खडबडून जागे झालो. पाहतो तर घराच्या पाठीमागे आगीचे लोंढेच्या लोंढे वर ऊठलेले दिसत होते. आगीच्या ठिणग्या आकाशाला जाऊन भिडत होत्या. गवताचे घरं भुरुभुरु जळत होते. लक्ष्मण मावसाच्या घराच्या पलीकडील सर्व घरांना आगीने लपटले होते. आधिच पाण्याची टंचाई, त्यात ही आग…! आग विझवायला पुरेसं पाणी नव्हतं. तरीही काही माणसे, बाया व पोरं हातात जे मिळेल ते, बालट्या, गुंडं, चरव्या, मडके, पिपे, गंजं, घागरी, टमरेल, चिंपटं, यात होतं नव्हतं तेवढं पाणी घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. कुणी उगीचच आगीवर माती फेकत होते. तरीही आग काही केल्या आटोक्यात येत नव्हती. वार्याच्या झोताने आग आणखीनच वाढत होती. आमचा अर्धा मोहल्ला तरी आगीच्या कचाट्यात सापडला होता. आगीपासून आमच्या दोन-तीन घराच्या रांगेपासून उरलेला मोहल्ला तेवढा वाचला होता. त्यात माझं घर पण वाचलं होतं.
सकाळी जिकडे तिकडे राख, जळलेला लाकूडफाटा, फुटलेले कवेलू, वाकलेले टिनं इतस्तत: पडलेले होते. ते दृष्य पाहावल्या जात नव्हतं. जे काही किटूक-मिटूक घरात होतं, ते सारं जळून खाक झालं होतं.
‘लोग टूट जाते है, एक घर बनाने मे
तुम तरस नही खाते, बस्तियां जलाने में’
असं कोणत्यातरी शायराने म्हटले आहे, ते खरंच आहे. जिवाचं रान करुन बांधलेलं हे घर कोणी आगिच्या भक्षस्थानी घातलं तर काय होईल ? मरणप्राय यातना ! दुसरं काय ?
ही आग आमच्याच समाजाच्या मोहना नावाच्या माणसाने लावली होती; अशी चर्चा गावात होती. तो दिसायला उंचापूरा, धिप्पाड व चार-चौघात उठून दिसणारा होता.
तो गावात कधी कधी काहीतरी नवीनच घेऊन यायचा. त्याने आणलेल्या वस्तू नवलाईने पाहायला, आम्ही मुले त्याच्या घरी जात होतो. आम्हाला मोठं कुतूहल वाटायचं. एकदा त्याने गाणे वाजवायचा ग्रामोफोन एका पेटीत बंद करुन आणलं होत. एका आकोड्याच्या काडीने फिरवून हवा भरायचा. त्यात असलेल्या काळ्या रंगाच्या तव्यावर सुई ठेवायचा. मग त्या भोंग्यातून गाणे उमटत असे. आम्हाला मोठी गंमत वाटायची.
पण तो समाजासोबत न राहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुध्द धर्माला विरोध करीत असल्याचे लोक सांगत असत. त्यामुळे त्याला समाजकंटक म्हणून लोक मानीत असत. तो लभानलोकांना साथ द्यायचा, असेही म्हणत असत. कारण समाजातील लोकांनी गावकीचे मेलेल ढोरं ओढण्यासारखे अपमानजनक कोणतेही कामे करणे सोडल्यामुळे लभान लोक आधिच चिडून होते.
एक दिवस पंचशील झेंड्याजवळ जात-पंचायत भरली होती. त्यात त्याला समाजविरोधी कृत्यामुळे जातीच्या बाहेर टाकले होते. म्हणून तो गावातून निघून गेला होता. तो असा का वागत होता काय माहिती ? पण मी यवतमाळला शाळा शिकत होतो, तेव्हा कधीकाळी भेटला, की माझी मोठ्या आस्थेने विचारपूस करायचा.
माझ्या मोठ्याबाबाचे पूर्ण घर जळलं होतं. त्याच्या घरी चौरंग पाटावर शेंदूर, तेल लाऊन तुकतुकीत व गोलगोल असलेले पांच दगडं ठेवले होते. ते दगडं तसेच तेथे पडून होते. त्याला पाच पांडवाचा देव म्हणत. आमच्या जुमळे घराण्याचे पूर्वज त्या दगडाला पुर्वापार पूजत आलेले होते. त्या दगडाला पाहून मोठ्याबाबाचा मुलगा, बापुराव-दादा म्हणाला, ‘आमचं घर जळत होतं, तेव्हा तू काय करत होता गा देवा….? तू का नाही आमच्या घराला वाचवलं…?’ असं म्हणून दादाने ते दगडं उचलले. एका टोपल्यात टाकले व वाघाडी नदीत जावून बुडवून आला. तेव्हापासून आमच्या घरातील सर्व देव पळून गेले, ते कायमचेच ! बाबासाहेबांची शिकवणच होती तशी !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘हजारो वर्षापासून आमचे पूर्वज देव पूजत आलेत. जत्रा-यात्रेला गेलेत, उपास-तापास केलेत, पण कोणत्याही देवाने आमची सुधारणा केली नाही. म्हणून तुम्ही हे सारे देव सोडून द्या व आपल्या मुलांना शिकवा. खूप शिकवा.’ बाबासाहेब म्हणजे आमच्या गावच्या लोकांचा ‘जीवकी प्राण’ होता ! त्यांच्या शब्दाखातर गावातील लोकांनी देव पूजने नेहमीसाठी सोडून दिले. त्यामुळेच अंधाराचे जाळे फिटून प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्यात.
वर्षोनुवर्षे अज्ञानाच्या, अंधकाराच्या गर्तेत सापडून स्वत:चे आत्मभान विसरलेल्या जातियतेचे, उपेक्षेचे चटके सोसूनही त्याविरुध्द बंड न करणार्या अशा मनाला चेतविण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. म्हणून बाबासाहेब हे खर्या अर्थाने या समाजाचे दैवत ठरले होते.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
आमच्या चौधरा गावात पोळ्याशिवाय आणखी एक सण साजरा व्हायचा; तो म्हणजे दिवाळी !
मोठादादा-शामराव बाजारातून दिवणाल्या विकत आणायचा. त्यात खायच्या तेलात कापसाच्या वाती पेटवून घराच्या कोपर्यात, अंगणात, नहाणीत व कोठ्यात नेवून ठेवायला मला सांगत होता. त्या लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशाने काही क्षणभर का होईना अंधार दूर करण्याचा प्रयत्न केल्या जात होता.
दिवाळीच्या दिवशी गाईंना खेळविण्यासाठी सजविल्या जात होते. गाई म्हणजे खेडूत लोकांची धन-संपत्ती – जसं शहरी लोकांचं सोनं-नाणं असते तसं ! गावातले सर्वजण आनंदाने हा सण साजरा करण्यात मग्न राहत होते.
गायकी सकाळी गावातल्या गायी गोठाणावर घेऊन एकत्र करायचा. तेथून तो सर्व गायी गावात घेऊन यायचा. माणसांचा गलबला, डफड्याचा व गाई-ढोरांच्या हंबरण्याचा व गळ्यातील घुंगराचा आवाज आला, की मी धावतच देवळाजवळ येऊन थांबत होतो. गायकी त्या गायी डफड्याच्या तालावर, वाजत-गाजत आमच्या घरासमोरील देवळाच्या भोवताल तीनदा फिरवायचा. गायीसोबत बकर्या व म्हशी सुध्दा राहत असत. त्यांच्या पायाने उडणारी धूळ जिकडे-तिकडे आसमंतात पसरीत असे. त्या धुळीत मोराचं पीस कुठे पडलेलं दिसलं की, मी ते पटकन उचलून वही किंवा पुस्तकात दडवून ठेवीत होतो.
आणखी एक गंमत येत होती. डफडेवाला त्याचं भलंमोठं डफडं घेऊन म्हशीच्या समोर समोर करायचा. त्या म्हशी भेदरून जावून भ्याऽऽ भ्याऽऽ करीत त्याच्या मागे लागत धावत. ते दृष्य पाहण्यात मजेशीर वाटत होते.
कोणी गजगोट्यात बारुद भरुन गाईंच्या समोर फोडत होते. त्याच्या कानठळ्या बसणार्या आवाजाने गाईंची दाणादाण उडत असे. आम्ही मुले टिकल्या फोडत होतो. बारीक बारीक फटाके पेटवून गाईच्या समोर फेकत होतो. त्यातले काही फुटत, काही फूटत नसे. काही लोक मोठे फटाके, सुतळीबॉंबच्या वाती पेटवून धमाल उडवित असत.
बाबाने घराच्या बाहेर तुकाराम-काकाच्या कोठ्याला लागून कोपर्यात खड्डा खोदला होता. तेथे रस्त्यावर पडलेलं गायी-ढोरांचं शेण आणून टाकायचा. मग दिवाळीच्या दिवशी फिरणार्या गायीच्या खुराने मस्त ते शेण तुडविल्या जावून बारीक बारीक होत असे.
गाई खेळल्यानंतर गायकी सर्व गाईंना बरडाच्या गोठाणावर घेउन जायचा. एक गाय सोडून बाकी गायींना त्याच्या साथीदारासोबत रानात चरायला पाठवून द्यायचा.
गायकी एका गायीला वाजत गाजत घेऊन गावात यायचा. दिवाळीच्या दिवशी सकाळीच शेणाचं गोधण घरोघरी अंगणात थापत असत. त्याचेवर झेंडूचे फुले टोचून ठेवत. त्याच्या भोवताल रांगोळी काढीत असत. गायकी गाय घेऊन घरी आला, की त्या गोधणावर गायीच्या पायाने गोधण व त्यावर शेणाने बनवीलेल्या मशासुर राक्षसाच्या प्रतिकाला तुडवीत असे. संध्याकाळी त्या गोधणाचे पाच पांडव तयार करुन त्यावर झेंडूचे फुले टोचून ठेवत.
मग वहिनी किंवा आई गाईची पूजा करायची. गाईच्या चारही पायावर पाणी टाकायची. गाईला पुरणपोळीचा घास द्यायची. सुपात आणलेली ज्वारीचे व पैशाचे दान गायक्याला द्यायची.
गायकासोबत बासरी वाजवणारा एक कोलाम राहायचा. तो सुंदर बासरी वाजवायचा. दुसरा एक साथीदार डफड्यावर एका हाताने थाप मारुन व दुसर्या हाताने काडीने वाजवून बासरीच्या आवाजात डफड्याचा आवाज मिसळायचा. असं ते मस्त भारावून टाकणारे वातावरण राहत असे.
त्या दिवशी जेवणात पुरणपोळी असायची. भज्याचा खमंग वास यायचा. पुरणपोळी व त्यावरील साजुक तू्पाचा वास नाकात घुमत राहायचा. सोबत कढीचा फुरका राहत असे. तसेच चकल्या, करंज्या व अनारसे असे कितीतरी पदार्थ वहिनी बनवित असे. अनारसेसाठी आठ दिवासापासूनच तयारीला लागत असे. बारीक पीठ जात्यावर दळणे, ते भिजवून त्याला एका फडक्यात बांधून ठेवणे. इतकी तयारी तिला करावी लागत असे. मग ते अनारसे एका बाजूला खाकस लाऊन तळत असे. त्याची चव खासच लागत असे. मला हे अनारसे भारी आवडायचे.
तसेच वहिनी काशी कोहळ्याचे गोड-गोड बोंडं तळायची. काशी कोहळं आकाराने लहान व एखाद्या तबकडीसारखे दिसत असे. पावसाळ्यात बहुतेक लोकांच्या घरी काशी कोहळ्याचा वेल राहायचा. एखाद्याच्या घरी नसला तर ते एकमेकाला फुकटात वाटत असत. हे कोहळे पिवळसर-लालसर झाल्यावर तोडून ठेवायचे. सण आल्यावर त्याचे बॊंडं बणवित असत. हे बोंडं दोन-तीन दिवस तरी आम्ही खात होतो. शिळे बॊंडं आणखीनच खायला रुचकर लागत.
असा तो गोडधोड जेवणाचा मस्तपैकी बेत दिवाळीच्या दिवशी राहत होता. दिवाळीच्या दिवशी घरोघरी असाच गोडधोड जेवणाचा आस्वाद सारे लोक घेत होते.
संध्याकाळी दिवस कलल्यावर पूर्ण अंगणभर बाई व वहिनी रांगोळी काढत असे. काही थेंबा-थेंबाची तर काही नक्षीची. गावात घरोघरी अशाच रांगोळी काढत. मग आम्ही चित्राबाई, सुदमताबाई यांनी काढलेल्या रांगोळ्या पाहण्यासाठी मामाच्या घरी जात होतो.
रात्रीला जेवणाच्या आधी घरातले सारेजण फटाके फोडण्यासाठी अंगणात जमत होतो. कोणी फुरफूर्या-सुरसूर्या-फुलझड्या हातात घेऊन पेटवीत तर कोणी भुईचक्र, झाडं पेटवीत. कोणी बारीक फटाके उडवीत. कोणी मोठे बॉंब फोडत तर कोणी रॉकेट उडवत.
सुरुवातीला आमची परिस्थिती चांगली होती; तेव्हा भरपूर फटाके फोडायला मिळत होते. काही आजूबाजूचे गरीब मुले फटाक्याचा आवाज आला, की पळतच यायचे. जवळपास थांबून मोठ्या कौतुकाने पाहत. न फुटलेले फटाके उचलून घेत. बौध्द धम्माच्या प्रसारामुळे नंतरच्या काळात आम्ही फटाके फोडणे जवळपास बंद केले होते.
दिवाळीच्या वेळेस यवतमाळवरुन भाजीपाला विकून बैलगाडीने गावाकडे यायला निघालो, की शहरातल्या घरोघरच्या अंगणात किंवा रोडवर लोक फटाके फोडतांना दिसत. जिकडे तिकडे फटाक्याचा आवाज कानात घुमत राहत होता. फटाक्याचा रंगिबेरंगी उजेड डोळ्याला दिपवून टाकायचा. त्यावेळी मला मोठं कुतूहल वाटायचं. जोपर्यंत गाडी शहरातून बाहेर पडत नव्ह्ती, तोपर्यंत हा अनोखा नजारा पाहायला मिळत होता. ऎकदा का गाडी शहराच्याबाहेर आली, की अंधारधूक पडून जायच. मग दुरुनच आकाशात दिसणार्या लख्ख प्रकाशाचं विहंगम दृष्य हळूहळू मंद मंद होत गेल्यावर मनाला हुरहूर वाटून जात असे. तरीही त्या अंधारलेल्या आकाशात शहराच्या दिशेने दुरुनच एखादा उजेड चमकून गेला, की स्तब्ध असलेलं मन कसं खडबडून जागे होत असे.
दिवाळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे पाडव्याला वहिनी आम्हाला बाजीवर बसवून उटण्याने आमची सकाळी सकाळी आंघोळ घालून द्यायची. त्यावेळी खूप थंडी लागत असे. थंडीने आम्ही थाटरून जात होतो.
दिवाळीत झेंडूच्या फुलाचा फार वापर व्हायचा. त्याच्या पाकळ्या काढून टाकल्यावर त्याला फोडले ,की त्यातून निघणारा गाभा आम्ही खात होतो. तो खोबर्यासारखा खायला लागत असे.
दिवाळीत मोराचे पिस गायीच्या शिंगाला बांधायचे. मला मोराच्या पिसाचं भारी वेड असायच. ते मी पुस्तकाच्या पानामध्ये जपून ठेवत होतो. फावल्या वेळात त्याच्या मुलायम केसांचा हळूवार स्पर्श गालाला कितीदा तरी लावत होतो.
मांडावसला शेतकरी शेताच्या कामासाठी नवीन गडी ठेवीत असत. शेतकर्यांसाठी हे नवीन वर्ष राहायचं. शहरात या दिवशी गुढी उभारल्याचं दिसायचं. पण आमच्या गावात मात्र गुढी उभारण्याची प्रथा नव्हती.
दसरा झाल्यावर पाचेक दिवसाने माडी पोर्णिमा यायची. खेड्यामध्ये या सणाला सुध्दा फार महत्व असायचं. शहरात याच दिवशी कोजागिरी सण म्हणून साजरा करीत असत. या दिवशी पोर्णिमा राहत असल्यामुळे रात्रीला चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश राहायचा. त्यादिवशी रात्रीचे जेवण करुन लोक बाहेर येऊन बसत. अंगणामध्ये पोरीबाळी खेळत. खेळ-गाण्याची रंगत वाढत जात असे. बाया-माणसं, पोरीबाळी एकत्र येऊन गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, गमती-जमती करणे, मनोरंजण करणे इत्यादी मौज-मजेच्या कार्यक्रमात आपले मन रमवित असत. गुणी लोकांना आपआपली कला प्रदर्शीत करण्याची संधी त्यावेळी मिळत असे. लोकांचेही त्यानिमित्ताने मनोरंजण होत असे. असे ह्या सणाचे तीन-चार दिवस धामधुमीचे संपले, की परत शेतीच्या मशागतीचे दिवसं सुरु होत असे.
खेड्यामध्ये टेलिफोन नसल्यामुळे लोकांना त्याचे कुतूहल वाटत होते. त्यावेळी दुकान, ऑफीस, सिनेमा इत्यादी ठिकाणी टेलिफोन वर लोक बोलत असल्याचे मी शहरात शिकत असतांना पाहत होतो. म्हणून मी सुध्दा माझा मित्र अर्जुन याला घेऊन टेलीफोनची नक्कल करायची ठरवलं.
मी एकीकडे माझ्या एका कानाला हात लाऊन हॅलो हॅलो म्हणत होतो. दुसरीकडे अर्जुन त्याच्या कानाला एक हात लाऊन दुसर्या हाताने जोरात हालवल्याची ऍक्टींग करत होता. मी त्याला म्हणत होतो,
’अरे, मी तुला हॅलो हॅलो म्हणतोय, तू बोलत का नाहीस ? तू काय करत आहेस ?’
‘तू सांगितल्या प्रमाणे मी हालवत आहे, ना…’ असे तो म्हणत होता.
‘अरे, तसे नाही. फोनवर बोलतांना सुरुवातीला हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ म्हणतात. नंतर बोलायचं असते.’
लोक या नकलेला पोट धरुन हसत होते.
तुळशीराम-दादा व गुलाब-दादा माडी पौर्णिमेच्या काही दिवस आधीपासूनच त्यांच्या घराच्या अंगणात जाड दोरींचा दोन्ही बाजूला दोन-दोन डेळ्या गाडून व त्यावर आडवा फाटा टाकून त्याला पाळणा बांधित असत. पाळणा इतका मोठा व उंच असायचा, की त्यावर दोन बाया किवा पोरी उभ्यानेच झोका घेत. त्यांचा झोका आभाळाच्या दिशेने उंचच उंच जायचा. झोका घेतांना बाया किवा पोरी,
‘झुनझुनू पाखरा, जा माझ्या माहेरा,
माहेरच्या वाटेनं कमानी दरवाजा…!’
असे काहीतरी गाणे म्हणत. मस्त आनंदाने बागडत व मुक्तपणे झोके घेत सुनवारी आपल्या मनातील जळमटं दूर करुन टाकत.
आम्हा मुलांना संधी मिळाली, की आम्ही सुध्दा त्या पाळण्यावर बसून झुलण्याची मजा घेत होतो.
बाया, पोरी त्यावेळेस फुगड्याचा व हाताला हात धरुन गोल गोल फिरण्याचा असा काही खेळ खेळत असत.
आम्हीही पोरं – मी, अर्जुन, धनपाल, कुंडलीक, सुखदेव, दामु, रमेश, शंकर असे कितीतरी माझ्या बरोबरीचे, माझ्या घरासमोरील देवळाच्या पारावर उजेड्या रात्री उगीच इकडल्या-तिकडल्या गप्पा-गोष्टी झाडत बर्याच रात्रीपावेस्तो मन रिझवीत होतो. कधी कधी गप्पा-गोष्टींना इतका उत यायचा, की कितीही रात्र होवून गेली; तरीही आमच्या गोष्टी संपत नव्हत्या. एखाद्या वेळेस झोपलेल्या दादाला चेव आला, की आवाराचा दरवाजा उघडून आमच्यावर मोठाच बावरायचा.
’झाल्या असतील ना गोष्टी? जा ना आपापल्या घरी… रामराव उठ,. चाल ये घरात.’ तेव्हा कुठे आमची रंगात आलेली मैफल एकाएकी तुटून जायची.
एका दिवशी मोठी आफतच आली होती. कुणाच्या डोक्यातून भन्नाट कल्पना प्रसवली, कोण जाणे ? तो म्हणाला,
’चलता का बे…? सिनेमा पाहायला…’
आता खेड्यात कुठे आला सिनेमा ? तरीपण आमच्या पुढून गेलेलं ते नवविवाहीत जोडपं पाहून, त्याच्या म्हणण्याचा रोख आमच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. ते रात्रीला जेवण करुन जुन्या घरी झोपायला जात असत. त्यात नवीन काही नव्हतं. जुनं घर लहान पडते, म्हणून त्यांनी दुसरं घर विकत घेतले होतं. ज्यांनी विकलं, त्याला समाजाने जातीबाहेर टाकले होते; म्हणून तो विकून शेतामध्ये राहायला गेला होता.
त्याने म्हणे, त्याच्या चार-पाच कुत्र्याचे गावातील लोकांच्या नावासारखे नाव ठेवले होते. कोणी त्याच्या घरापुढून जातांना दिसले की,
’ऎ पांड्या, कोंड्या, दमड्या, गोविंद्या – यारे भाकर खायला.’ असा मुद्दामच कुचेष्टेने जोराजोरात ओरडून कुत्र्यांना बोलावीत असे. अशा रीतिने वाळीत टाकणार्या म्होरक्या लोकांवर आपल्या रागाचा वचपा काढीत होता.
मग आमची सार्यांची फलटन त्याच्या घरापर्यंत गेली.
तिथे गेल्यावर एकाने घरामागील डेळीवर – घराजवळून जाणार्या एखाद्या ढोराने घासून किंवा शिंगाने भींत खराब करु नये; म्हणून अर्ध्या भिंतीपर्यंत लाकडाची डेळ गाडीत – त्यावर चढून भिंतीच्या भोकातून आतमध्ये डोकावून पाहीलं न पाहिलं तर आतून बोंबलण्याचा आवाज आला,
’कोण आहे रे, भडव्यांनो ?
ते ऎकून आमची गाळणच उडाली. तो पुढे आणखी काहीतरी शिव्या देत होता. पण ते ऎकण्यासाठी आम्ही थांबलोच कुठे ? तसंच धूम ठोकून थेट घरी आलो. अंगणातल्या सातरीवर अंग टाकलं. मोठी धाप लागली होती. छाती धडधड करत होती.
सकाळी सकाळी तो माणूस माझ्या घरी आला. दादाला सांगायला लागला.
’रातच्यानं पोट्टॆ पारावर बसतात. त्यात तुहा भाऊपण होता. हे पोट्टे माह्या घरामागच्या भोकातून पाहत होते…’
मी अंगणात तोंड धुता धुता त्याची तक्रार मुकाट्याने ऎकत होतो. लाजेने मी ओशाळलो होतो. मग दादा माझ्याकडे वळून बरसला.
’का रे, लगन करुन देऊ का तुवं ? गांडीत नाही गू, न् चालला हागाले… पुन्हा पारावर दिसला का, तंगडं मोडून ठेवीन.’ कातावलेल्या आवाजातील त्याचं खऊट बोलणं माझ्या काळजाला चिरत गेलं होतं. दादा फारच चिडला की, असं जिव्हारी झोंबणारं बोलायचा. खाली मान घालून चुपचाप ऎकण्याशिवाय दुसरं काय करु शकत होतो ? माझ्या हातून खरंच मोठी चूक घडून गेली होती, याची मला तिव्रतेने जाणिव झाली. अपराधाच्या पश्चातापाने माझे ओठ थरथरत होते. अनवधानाने का असेना, असा किळस-वात्रट किंवा चावटपणाचा प्रसंग घडून गेला की, बर्याच दिवसापर्यंत मनाला चुटचुट लागून राहत असे.
त्या दिवसापासून तेवढ्या रात्रीपर्यंत पोरांसोबत पारावर बसणे टाळत होतो.
होळीच्या सणाला तर आम्हाला रंगच चढत असे. आम्ही मुले घणमाकड गाडून त्यावर दिवसभर फिरत राहात होतो. होळी म्हणजे खेड्यातला शिमग्याचा सण ! मोठ्ठाले पोरं या घनमाकडीवर जोराजोरात फिरता फिरता अश्लील व विनोदी भाषेचा वापर करुन बोंबा मारत असत. जसं, ‘होळी रे होळी अन् पाटलाच्या xxx बंदूकीची गोळी.’ अशा प्रकारच्या त्यांच्या बोंबा असायच्या.
या घनमाकडाचा किरकिर आवाज लांब दूर पर्यंत ऎकू जात असे. याच मैदानात आम्ही होळी पेटवित होतो. होळीत पेटविण्यासाठी निरनिराळ्या आकाराच्या हाताच्या पंजाने थापलेल्या गोवर्याचा हार आधिच बनवून, वाळवून ठेवत होतो.
होळीच्या दिवशी बत्ताश्या, गाठ्या गळ्यात मिरवत, त्यातील एक एक गाठ, बत्ताशी खाण्यात मोठी फुशारकी वाटत असे.
धुळवडीच्या दिवशी पळसाच्या फुलाचा रंग एकमेकाच्या अंगावर उडविण्यात आम्ही रमून जात होतो. हा करीचा दिवस म्हणजे मौजमजेचा दिवस होता. गावातील माणसं दारुच्या धुंदीत तर्र होऊन मस्तपैकी मटणावर ताव मारुन स्वत:ला हरवून जात असत. मटणासोबत रोट्या व भात असायचा. खेड्यातील लोकांना सणासुदीलाच गव्हाचे व तांदळाचे पदार्थ खायला मिळत होते. ऎरवी रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरी व मीठ-मिरचीच राहत असे.
हा शिमग्याचा सण तर बंजारी लोकांचा मोठा महत्वाचा सण राहत असे. हा सण म्हणजे त्यांच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक, आनंददायक, रसिकता व चैतन्यमय वातावरण निर्माण करणारा राहत असे. हास्यविनोद करून तणावमुक्त होवून जात. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपतांना ही जमात सळसळत्या उत्साहात अगदी न्हाऊन निघत.
आमच्या गावात या लोकांची होळी सकाळी पेटत असे. इतर समाजाचे लोक संध्याकाळी पेटवतात व बंजारी मात्र सकाळी का पेटवतात ? यामागे कहाणी असे सांगत की, एकदा कोणत्यातरी प्रकरणात पंचायतीमध्ये आदल्या दिवशी संध्याकाळपासून न्यायनिवाडा करण्यासाठी बसले असतांना, दुसर्या दिवसाची सकाळ उजाडली. म्हणून ते सकाळी पेटवीत.
पौर्णिमीच्या उजेडात लांडग्याच्या वावरात होळी रचत. मग सकाळी सूर्य निघायच्या आधी होळी पेटवत. या दिवशी बाया माणसं गोरमाटी भाषेत लेंगी गीत गाण्यात व नाचण्यात मश्गुल होवून जात. या लेंगी गाण्यात बाया माणसांना व माणसं बायांना अश्लील भावभावनांना वाट मोकळी करुन देत. या गीतात दीर-भावजय, प्रियकर-प्रेयशी अशा नात्यातील नाजूक, शृंगारिक व भावबंधाचे वर्णन उमटलेले असे. स्त्री-पुरुषातील भावनांचे तरंग या होळीगीतातून सहज व्यक्त होत. मग त्यात नात्यागोत्याचं कोणतही बंधन राहत नसे. केवळ शृंगारीक भावनेचे रांगडे व उघडे प्रदर्शन मनसोक्तपणे होत असे. होळीची राख एकमेकांना लाऊन थट्टामस्करी, हास्यविनोद करीत घरी जात.
रंग खेळणे म्हणजे ‘फाग’. दीर-भावजय, साळा-साळी अशा थट्याच्या नात्यात रंग खेळण्याची रसिकता आणखीनच दिसून येत असे. दारू, गांजा, भांग याच्या नशेत चूर होवून हा दिवस साजरा करीत. रंग खेळतांना एखाद्याची बायको जरी दूर उचलून नेऊन तिला रंगात भिजवले, तरी तिच्या नवर्याला त्यात काहीच वावगे वाटत नसे, इतका मोकळेपणा या सणात त्यांना मिळत होता.
एकदा रात्रीच्या वेळी नाच-गाण्याचा खेळ रंगात आला असतांना लभानाच्या एका पोराने त्याच्याच जातीच्या एका पोरीला उचलून – आम्हाला प्रभावीत करण्यासाठी की काय, उन्मादाच्या मस्तीत घरातील कापसाच्या गंजीवर आणून आदळल्याचे पाहिले होते. त्यामुळे आम्ही लाजून चूर झालो होतो. श्रीकृष्णदेवाची रासलिला – कधी पाहिली नाही; पण त्यातलाच हा नमूना तर नव्हता ना; अशी पुसटशी कल्पना चाटून गेली होती.
होळीच्या पूर्वीपासूनच बाया-माणसं नायक, कारभारी व गावातील इतर लोकांकडे जावून नाच-गाणे करुन पैसे व धान्य गोळा करीत. रहदारीचा रस्ता असेल तर जाण्यार्या-येणार्यांकडून सुध्दा पैसे वसूल करीत. मग त्या पैशातून व आणखी सामुहिक वर्गणी करुन बकर्याच्या मटणाचं दूर कुठेतरी नदीकाठी किंवा एखाद्या झाडाखाली सामुहिक जेवण करीत. अशातर्हेने हॊळीत आलेला थकवा दारु पेऊन व मटण खाऊन या सणाची सांगता करीत.
खरं म्हणजे ह्या होळीमध्ये लाकडे व शेणाच्या गोवर्या जाळत असल्यामुळे किती नुकसान होत असेल; त्याची गिणती नाही ! शिवाय जिकडे तिकडे धूर पसरल्यामुळे सारं वातावरण खराब होत होते; ही बाब सण साजरे करणार्या हिंदू धर्मिय मार्तंडाच्या का लक्षात येत नाही, ते कळत नाही. असे कसे यांचे सण, की ज्यामुळे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान व अशुध्द वातावरण तयार करण्यास कारणीभूत होते ?
गावातला आणखी एक सण म्हणजे आषाडी पौर्णीमेचा – आखाडीचा सण…! या दिवशी गोड-धोड पदार्थ बनवीत. या सणाला आंब्याचा रस, रोट्या, भात, कुर्ड्या, पापड्याचा बेत राहत असे.
या दिवशी मुलीला सासरकडे राहू देत नसत. तिला माहेरी घेऊन जात. जर तिला माहेरी नेणे शक्य नसेल, तर गावातच कुणातरी नातेवाईकाकडे तिला घेऊन जात. एकदा माझ्या वहिनीला मामाच्या घरी राहत असल्याचे मी पाहिले. मला अचंबा वाटला. वहिनीला कुणी बोलले काय़ ? तिच्याशी कुणी भांडले काय ? अशा नाना शंका-कुशंकानी मला घेरले होते.
मी दादाला म्हणालो, ‘दादा वहिनी मामाच्या घरी का राहत आहे ?’
‘अरे, उद्या आखाडी आहे ना !. तिला आपल्या घरी ठेवता येत नाही. म्हणून मामाच्या घरी नेऊन ठेवले.’
तेव्हा मला कळले, की ही एक रुढी-परंपरा पूर्वापार चालत आलेली होती. त्यामागील कारण काय ते कुणाला माहित नव्हते.
नंतर मला ह्याबाबत एक गोष्ट कळली, ती ही की, या दिवशी सिध्दार्थ गौतमाची आई-महामाया हिला गर्भ प्रसवला होता. सिध्दार्थ गौतमाला पुढे बुध्दत्व प्राप्त झाले. त्यांनी समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच विज्ञान, तार्कितता व विचारशिलतेच्या आधारावर धम्म चळवळ जणमानसात राबविली व रुजवली. परंतु हिंदू संस्कृतीला या त्यांच्या तत्वाचं वावडं होतं. म्हणूनच पती-पत्नीचा संबंध त्या दिवशी येऊ नये व असा भगवान बुध्द पुन्हा जन्माला येऊ नये; म्हणूनच की काय, हिंदु धर्मात त्यांना एक-मेकांपासून दूर ठेवण्याची रुढी-परंपरा कदाचित रुजवली असावी, अशी शंका घ्यायला काही हरकत नाही.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
आमच्या चौधरा गावात सणावाराला उधान यायचं. गावातील उदास मनाच्या काळोख्या आयुष्यातही चैतन्याची सळसळ हे सणवार निर्माण करीत होते. असे म्हणतात की मनूष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. म्हणून खेड्यापाड्यातही उत्सव-सणावाराला बहर येत असल्यास नवल नाही !
पोळा किंवा दिवाळीच्या सणाला आम्ही मोठे उल्हासीत होतो. कारण याच सणाला आम्हाला नवीन कपडे घालायला मिळत असे.
या सणाच्या तोंडावर येणारा बाजार म्हणजे मुलींना, तर एक पर्वणीच असायची. त्यांना कानात घालायच्या बिर्या, टॉप्स, रिंग्ज, नाकात टाकायच्या नथण्या, बेसर, गळ्यात घालण्यासाठी गाठ्या, हार, केसाला लावण्यासाठी क्लिपा, रिबिना, हातातल्या बांगड्या, बोटातल्या आंगठ्या, पायातल्या तोरड्या असं काहीबाही सामान नटण्यासाठी खरेदी करायच्या असतात, ना ! म्हणून हा बाजार त्यांच्या मनाला भुरळ पाडत असे.
पोळा हा खेड्यातला महत्वाचा सण असतो. कारण तो खेड्याच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असतो. पाणी-पाऊस असो, ऊन-वारा असो, हीव-दव असो, दगड-धोंडे असो की दिवस-रात्र, तो शेतकर्याच्या सोबत मरमर राबत असतो. बैल म्हणजे त्यांचा सखाच म्हणा, ना ! शेतकरी बैलाला नांगर-वखर-डवर्याला जुंपतात. ते भरली गाडी ओढतात, मळणी करतात, कोणत्याही कामाचे ढिगारेचे ढिगारे उपसतात, त्यांच्या कष्टाची गणती आणि मोलच नाही ! त्यांच्याच जीवावर शेती होते. पण त्यांना पहिजे असते फक्त पोटाला चारा व पाणी अन् पाठीवरुन फिरणारा ममतेचा हात ! अशा बैलाविषयी उपकार व्यक्त करणारा हा सण चैतन्य आणि आनंदाची उधळण करीत येत असतो. श्रावण महिन्यातील सणावारामुळे होणारी गोड-धोड पदार्थाची लयलूट याच सणाने स्थिरावतो.
आदल्या दिवशी रात्रीला शेतकरी किंवा त्याचा गडी पळसाच्या पानाने तेल किंवा तुपात हळद भिजवून बैलाचे खांदे शेकत. ‘आज आवतन घ्या… उद्या जेवायला या…’ असे म्हणून बैलाला पोळ्याचे आमंत्रण देत. या दिवशी शेतकरी गड्याच्या खोळीत ओंजळीने धान्य टाकून ’खोळ भरो’ असे म्हणत. तर गडी ’वाडा भरो’ असे म्हणत. गड्याला नवीन कपडे भेट देत.
दुसर्या दिवशी सकाळी बैलांना चारल्यानंतर नदी किंवा ओढ्यावर धुत. दुपारी घरी आणून सजवित. त्यांच्या शिंगाला निरनिराळ्या रंगाचे बेगड, चमकी लावत. कपाळाला मटाट्या बांधत. कोणी वाकाच्या दोरीने बेलपाने बांधत. कोणी कोणी दोन्ही शिंगाच्या मधोमध बाजारातून विकत आणलेले बेगडाचं बार्शिंग तर कोणी कागदाचा रंगीत पंखा बांधत. कोणी त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी झूल टाकत. नाहीतर हाताचा पंजा गेरुच्या रंगात बुडवून त्याचे ठसे बैलाच्या पाठीवर उमटवित. आपापल्या ऎपतीप्रमाणे बैलाच्या सजावटीवर खर्च करीत. कोणी बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरू-घंटा बांधत. मग त्या घुंगरू-घंटाचा निनाद सारखा कानात घुणघूणत राहायचा.
पोळ्याच्या दिवशी रमेशच्या घरापासून ते शिवा-आबाजीच्या घराच्या पलीकडे जनार्दन-दाजीच्या घरापर्यंत खंबे गाडून त्यावर आंब्याचे तोरण बांधत.. त्या तोरणाच्या खाली शेतकरी किंवा त्यांचे गडी आपापले बैलं धरुन राहायचे. हरसिंग लभान नारळ फोडून पूजा करायचा. तो एका टोकावरुन दुसर्या टोकापर्यंत खोबरं, लाह्या व भिजवलेल्या हरभर्याची गोड शिरणी घेऊन वाटत वाटत जायचा.
पोळा रंगात आला की, लोकांच्या दादर्या, झडत्या सुरु होत.
कानावर हात ठेऊन कोणीतरी म्हणायचा,
‘काळ्या वावरात, कुंद्याच्या खटी,
बैल बांधले दाटोदाटी,
कोंड्या म्हणते, बुडाली शेती,
दमड्या म्हणते, लाव छातीले माती…
एक नमन गवरा पारवती…
हर बोला… हर हर महादेव…!’ तर दुसरीकडे कुणाचा तरी आवाज यायचा,
आभाळ गडगडे, शिंग फ़डफ़डे,
शिंगात पडले हो खडे…
तुही माय काढे, तेलातले वडे,
तुवा बाप खाये, हो पेढे…
. एक नमन गवरा पार्बती हर बोला हर हर महादेव…..! आणखी कुणीकडून तरी आवाज यायचा,
चाकचाडा… बैलगाडा,
बैल गेला पवनगडा,
पवनगडाहून आणली माती,
थे दिली गुरूच्या हाती,
गुरूने बनविली चकती,
दे माह्या बैलाचा झाडा…
मग जा हो, आपल्या घरा…
एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेव…..!
मग सारा पोळा एकाच सुरात ‘हर हर महादेव’ म्हणत सारा आसमंत दणाणून टाकत..
अशा प्रकारे कुणी आपल्या बुडालेल्या शेतीच्या व्यथा झडत्याच्या माध्यमातून व्यक्त करीत तर कुणी गावगाड्यातील राजकारणावर उपहासात्मक किंवा कुणाची टर उडविण्यासाठी टिकात्मक अशा झडत्या म्हणून मस्त मनोरंजन करीत. असाच हशा-मजाकीचा माहोल सारा पोलाभर दरवडत राहायचा.
पाटलाच्या घरुन गुडी यायची. एका पांढर्या कपड्यात ओल्या हळदीचा पेंड आणत. पोळ्यातील बैल धरणार्याकडे ती थोडी थोडी वाटत. लोकं ती फडक्यात बांधून तोरणावरून फेकून दुसर्या बाजूने झेलत असत. मग ही पुरचूंडी घराच्या आड्याला बांधून ठेवत. ही हळद घटसर्पासारख्या रोगावर चालते; असे ते सांगत.
तसेच एका पुरचूंडीत एक पैसा बांधून तो पैसा तोरणावरून फेकत. मग हा पैश्याची पुरचूंडी घराच्या आड्याला बांधून ठेवत. त्यामुळे इडापिडा टळय्र असा लोकांमध्ये समज होता.
गावचा पाटील मखराच्या बैलाच्या त्याच्या दोन्ही शिंगाला विस्तवाचे टेंबे बांधून घेऊन येत. त्याला पूर्ण पोळाभर फिरवीत. पूजेचे सोपस्कार आटोपले, की पोळा फुटत असे. तोरण तुटले की पोळा फुटला, असे म्हणत. मग बैलाचे कासरे हातात धरून पळापळी सुरु व्हायची. प्रत्येकजण आपापले बैल घेऊन पहिल्यांदा मालकाच्या घरी जात. मग इतर ओळखीच्या किंवा नात्यातील घरी जात.
त्यादिवशी गांवचा कोतवाल पळसाच्या फांद्या व सोबत एवढूसा मुरुम दरवाज्याच्या दोन्ही बाजूला आणून ठेवत.
शेतकरी आपल्या अंगणात गाडीचे जू टाकून ठेवत. त्याला दोन्ही टोकाला वाकाच्या दोरीने बेलपाने बांधत. तसेच गंगाळाच्या मानेला सुध्दा बेलपाने वाकाने बांधून, त्यात पाणी भरून ठेवत. पोळा सुटल्यावर बैलजोडी अंगणात आली, की घरची बाई त्याच्या चारही पायावर गंगाळातील पाणी टाकून पूजा करीत. आरतीत आणलेला पुरणपोळीचा घास बैलाच्या तोंडात टाकत. मग बैलाचे कासरे धरणार्याला पैसे देत. मालक गड्यांना आपल्या घरी जेवण-खाऊ घालत.
मी गड्या सोबत पोळ्यात जायचा. एक बैल मी धरत होतो. त्यामुळे मला पण गड्यासोबत थोडे थोडे पैसे मिळत असे. तेच पैसे मी गंजिफा खेळण्यासाठी वापरत होतो. त्याशिवाय शामराव-दादा किंवा बाबा पण काही पैसे द्यायचेत. त्यामुळे पैसेच पैसे हातामध्ये खुळखूळत राहायचे.
त्या दिवशी पोळ्याच्या सणानिमित्त गोडधोड जेवणाचा बेत राहत असे. जेवणात पुरणपोळी, तुप, कढी, भजे, भात असे काही पंचपक्वानाचे पदार्थ राहत असे.
त्या रात्री कुठेना कुठे तरी जुव्याचा अड्डा असायचा. आम्ही जेवण करुन त्याचा शोध घेत होतो. बहुदा नामदेव-काकाच्या घरी आम्ही मुलं जुवा खेळण्यासाठी जमत होतो. तेथे अर्ध्या रात्रीपर्यंत तरी जुगार चालायचा. त्याच्या घरात एकच खोली होती. तेथेच त्याचे कुटुंब झोपत असे. तो जिंकलेल्या डावापैकी काही पैसे जागेचं व पत्त्याचं भाडं म्हणून घेत असे. त्याला कट्टा म्हणत. कट्टा वसूल करण्याची तशी सर्वठिकाणी पध्दत रुढ होती. कधी कधी तो पण आमच्यासोबत खेळत असे. हारला की त्याला संताप यायचा. मग आम्हाला हाकलून द्यायचा. ‘जा…बे पोट्टेहो… आता बंद करा खेळणं… डोळ्याला जागरण न् xxxx उपास.’ असा म्हणायचा. मग आम्ही पोरं हिरमुसले होऊन घरी परत येत होतो. दुसर्या दिवशीच्या सकाळची पहाट निघण्याची वाट पाहत होतो.
सकाळी सकाळी कोंबड्याच्या बागेला लोकांच ओरडणं ऎकू यायचं. इडा-पिडा घेऊन… जायऽऽ गे मारबत…. रोगराई घेऊन जायऽऽ गे मारबत…’ ‘माशा चिल्ट, डासं, जादू-टोणे घेऊन जायगे मारबतऽऽ.’ असे ओरडत असत. शामराव-दादा देखील असंच काहीतरी म्हणायचा. एखाद्याचं कुणाशी पटत नसेल, तर तो द्वेषबुध्दीने त्या व्यक्तीचे नाव घेऊन ‘जायगे मारबत’ असेही म्हणायला मागेपुढे पाहत नसत. त्यामुळे मग भांडणाला तोंड फुटत असे. दिवस उजाडल्यावर घराच्या बाहेरच्या दरवाज्याजवळ दोन्ही बाजूने ठेवलेले पळसाच्या फांद्या उचलून खतावर घेऊन जात व तेथे रोवून देत.
पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे ’करी’चा ! हा मोठा खुषीचा दिवस ! कारण या दिवशी दारु पिणे, मटण खाणे व जुवा खेळणे बिनदिक्कत व सार्वत्रिरीत्या चालत असते.
या दिवशी मनसोक्तपणे जुवा का खेळल्या जातो, काय माहित ? जणू काही खेड्यापाड्यातील लोकांनी या जुव्याच्या व्यसनाला निरंतर चिकटून राहावे व जीवनात कमावलेलं किडूकमिडूक या जुव्यात गमावून बसवावे; असं काही समाजाच्या व्यवस्थेने ठरवून दिलं होतं की काय ? म्हणून त्या दिवशी लोकं दिवसभर जुव्याच्या नादी लागत होते. एकदा का जुव्याची लत लागली, की त्यातूने बाहेर पडणं मोठं जिकिरीचे होऊन जाते. .
त्या दिवशी सकाळपासून वाल्ह्याच्या खारीतल्या पारावर, किंवा एखाद्या पडक्या घरी, सुखदेवच्या वावरातील विहिरीजवळील कवठाच्या झाडाखाली असं कुठतरी पुन्हा आम्हां लहान मुलांची जुव्याची मैफल बसायची. तहान-भूक विसरून खेळण्यात दंग होऊन जात होतो. कधी कधी झेंडी-मुंडीचा खेळ खेळत होतो.
झेंडी-मुंडी हा मुलांचा व बायांचा एक मजेशीर खेळ होता. एका लहानश्या लाकडी ठोकळ्याला सहा बाजू असायच्या. त्याच्या एका बाजूला झेंड्याचं व दुसर्या विरुध्द बाजूला माणसाच्या मुंडीचं चित्र काढीत असत. बाकी चार बाजूला एक पासून ते चार पर्यंत टिंब काढीत. एका कागदावर असेच झेंडी, मुंडी व एक ते चार टिंबाचे चित्र काढीत. ज्यांना पैसे खेळायचे आहे; ते या चित्रावर पैसे ठेवत. मग झेंडी-मुंडीवाला एका डब्ब्यात त्या ठोकळ्याला हालवून खाली टाकायचा. जे चित्र वर येईल तो चित्रवाला पैसे जिंकत. बाकी चित्रावरचे पैसे त्या झेंडी-मुंडीवाल्याचे होत असे. मी या झेंडी-मुंडीवाल्याच्या भुमिकेत बरेच पैसे जिंकत होतो. कारण एका चित्राला पैसे देऊन उरलेले पाच चित्राचे पैसे त्याला मिळत असे.
माझी बहीण जनाबाई बहुदा मुलींसोबत हा झेंडी-मुंडीचा खेळ खेळत होती.
मुली सुध्दा पत्त्याचा जोड्या लावण्याचा खेळ खेळत. त्या कधी सीताबाईच्या घरी खेळत. तिचं घर शेवटी – शेताला लागून होतं. तिच्या घराचा आवार पाहतच राहावेसे वाटे. कारण त्या आवाराचा कूप जुईच्या वेलाने लदबदला होता. कधी त्या वच्छलाबाईच्या घरी सुध्दा पत्त्याचा खेळ खेळत.
पोळ्याच्या करीला काही मोठमोठे माणसं पण जुवा खेळतांना दिसत. दादा व बाबा मात्र कधीच जुव्याचा खेळ खेळल्याचे मी तरी पाहिले नाही.
पोळ्याच्या दिवशी किवा करीला लोकं दारु पिऊन तर्र राहात असत. तेव्हा हमखास गावात कुणाचा नाही कुणाचा, तरी मारका-झगडा होत असे. गावात भांडण-तंटा होऊ नये म्हणून कधी कधी पोलिसाची ड्युटी लागत असे. तसं पैशाचा जुगार खेळणं गुन्हा असते. परंतु पोलीस सुध्दा त्यादिवशी मुभा असल्यासारखं जुगाराच्या खेळाकडे दुर्लक्ष करीत असत.
करीच्या दिवशी गावात बकरा कापत. जितक्या लोकांनी पैसे भरले असेल तेवढे त्याच्या मटणाचे हिस्से पाडत. मग आपापला हिस्सा घ्यायचे. मग गावात जिकडे-तिकडे मटणाचा खमंग वास येत असे. मटणासोबत रोट्या-भाताचा बेत असायचा. लोकं मस्तपैकी दारु पिऊन मटणाचा आस्वाद घेत घेत बेधुंद होत. आमच्याही घरात अशीच जेवणाची मेजवाणी राहायची.
त्या दिवशी वहिनी रोट्या बनवित असे. कुठे कुठे या रोट्याला मांडे पण म्हणतात. ह्या लंब्या रोट्या रानण्यावर बनवितात. हे रानणं म्हणजे उलटी अर्धी कापलेली मातीची घागर असते. ती चुलीवर ठेवून तापवतात. गव्हाचं पीठ खूप मळावे लागते. आपटून आपटू्न त्यात पाणी टाकून पातळ कणीक केल्या जाते. हातावर घेऊन त्याला खाली धरले, की ती तुटून पडायला नको. इतकं त्याला मळावं लागते. हे काम फार कौशल्याचं असते. मग हाताला खायचं तेल लाऊन ती पातळ कणीक दोन्ही हाताने लांबवून त्या तापलेल्या रानण्यावर टाकतात. अशी रोटी खायला फार खुमासदार लागते. ह्या रोट्या बहुतेक मटण किंवा आंब्याच्या रसासोबत खात. ज्या दिवशी मटणाचा बेत नसेल, त्यावेळेस तिखट दाळीसोबत खात असत. अशा त्या खमंग स्वादाची नुसती आठवण जरी झाली तरी तोंडाला पाणी सुटते.
या दिवशी लोकं कोंबडं-बक्र्याचं मास खाण्यासाठी प्राण्यांची हिंसा करतात, दारू पिऊन मस्त झिंगतात, आपसात काहीतरी कुरापत काढून भांडतात व जुगार खेळून पैसे गमावतात. हा सण भगवान बुध्दांच्या पंचशिलेच्या तत्वातील, ’पानाती पाता वेरमनी म्हणजे मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही व ’सुरामेरय पमादठाना वेरमनी’ म्हणजे मी दारु सारख्या नशा आणणार्या पदार्थाचे सेवन करणार नाही; अशी दोन्हिही शील लोकांना तोडायला भाग पाडत असते. मग अशा त्या दिवसाला कर म्हणावे की कहर म्हणावे; तेच कळत नाही.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
देवदास-दादा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा, पण शामराव-दादापेक्षा लहान – आमच्या घरातली खरोखरच ताकद होती. तो पाहायला सुंदर होता. शरियष्टीने सुदृढ व ऊचापुरा होता. तो लिहीण्या-वाचण्यापुरतं बाराखडी शिकला होता.
आई सांगत होती. ‘देवदासला शाळेत टाकले होते; परंतु राहून-राहून आजारी पडायचा. म्हणून त्याने शाळाच सोडून दिली.’ तेव्हापासून शेतीच्या कामाचे जू त्याच्या मानेवर बसलं ते कायमचच !
सकाळी झाकटीलाच उठून ढोरांच शेणगोठा करायचा. नंतर शेतीच्या कामात गुंतून जायचा. तो घरचे बैल गायरानात किंवा जंगलात चारता चारता बासरी वाजवत राहायचा.
तो उत्कृष्ट बासरी वादक होता. संध्याकाळी जेव्हा बैलं घरी घेऊन यायचा, तेव्हा बासरी वाजवत वाजवतच यायचा. गावातील लोक दुरुनच त्याच्या बासरीचा मंजूळ आणि मोहक धुन ऎकून ‘ही देवदासची बासरी आहे’ असे त्यांच्या तॊडून सहज शब्द बाहेर पडत. इतकी त्याच्या बासरीचा आवाज लोकांच्या अंगवळणी पडली होती.
खेड्यात दोस्त-मित्र व नात्या-गोत्यातील लोकांमुळे चिकटणारे दारू, बिडी, तंबाखू सारखे कोणतेही व्यसन त्याला नव्हते. त्याचा स्वभाव पण चांगला असल्यामुळे गावातील लोकांना तो आवडायचा.
त्याच्यातील आणखी एक वाखाणण्यासारखा गुण म्हणजे नेमबाजीत त्याचा कोणी हात धरीत नव्हता. तो गोळया खेळतांना सहज व अचूक बेंदा फोडायचा. कितीही दूरची गोळी असली की बरोबर हिनदान धरुन मारायचा व आपल्या प्रतिस्पर्ध्यावर राज आणायचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली दलितांच्या सर्वांगीन उत्कर्षाची चळवळ खेड्यापाड्यात पोहोचली होती. त्यावेळी ठिकठिकाणी, गावागावात सभा होऊन समाज जागृती होत होती.
आमच्याही गावात मी लहान असतांना सभा झाली होती. सभेच्या ठिकाणी मंडप टाकला होता. सुरक्षेच्या दृष्टीने सभोवती लाकडी-बल्ल्याचा कंपाऊंड टाकला होता. त्या सभेत बौध्द पध्दतीने बहुतेक रामराव व सिता यांच लग्न लाऊन देण्यात आल्याचं मला आठवते. दयाराम आबाजीला मुलगा नसल्याने तोच त्याचा घरजावई होता.
त्यावेळी गावोगावी समता सैनिक दल स्थापन केले होते. आमच्या चौधरा गावात सुध्दा समता सैनिक दल स्थापन झाले होते. देवदास-दादा या दलाचा कॅप्टन राहिला होता. समता सैनिक दलाचा आखाडा म्हणजेच व्यायाम शाळा होती. त्यात गावातले तरुण मुलं व्यायाम करायचे, दांडपट्टा शिकायचे व मल्लखांबावर कसरत करायचे.
डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे व जागृतीमुळे गावातील समाजातील लोकांनी ढोर ओढणे, मेलेल्या ढोराचे मास खाणे, गावकीचे कामे करणे असे निच व हलक्या दर्जाचे कामे करणे सोडले होते. आता लाचारी सोडून स्वाभिमानाने व ताठ मानेने राहत होते. त्यांच्यातला स्वाभिमान व मानसन्मान जागृत झाला होता. माणसासारखे जीवन जगण्याचा ते प्रयत्न करीत होते. आपल्या मुलांना ते शाळा शिकवायला लागले होते. आता कोणी केलेला अपमान सहन करीत नसत, तर त्याला ताडकन उत्तर द्यायचेत. असे हे आमुलाग्र परिवर्तन या समाजामध्ये घडून आल्यामुळे इतर जातीयवादी समाजाचे लोक चिडून हल्ला करायचेत. त्यांना संरक्षण देण्याचे काम त्यावेळी समता सैनिक दल करायचे. म्हणून त्यावेळी खेड्यापाड्यात, गावोगावी समता सैनिक दल स्थापन झाले होते.
आमच्याही गावातील जातीयवादी लभान लोकांच्या डोळ्यात खुपायला लागले होते. त्यामुळे ते आम्हाला पाण्यात पाहत होते. मग जेव्हा-केव्हा संधी मिळेल, तेव्हा ते कुरापत काढीत. म्हणून संरक्षण देण्याचे काम त्यावेळी हा समता सैनिक दल करीत होतं.
त्या समता सैनिक दलात तरुण पोरांचा भरणा असायचा. पांढरा शर्ट, खाकी पॅंट, असा त्यांचा गणवेश असायचा. त्यांच्या हातात बांबुची किंवा वेताची काठी असायची. ते दोन-दोनच्या रांगेमध्ये घोषणा देत, मार्च करत पोलीस दलासारखे कवायत करीत निघायचे. एखाद्या कार्यक्रमस्थळी शिस्तीत चालत जायचे. त्यामुळे संपुर्ण वातावरण भारावून जात होते. समाजामध्ये विलक्षण असे बळ निर्माण व्हायचे. लोकांमधील ऊत्साह उदंड वाहत राहायचा. विरोधकांच्या मनात धडकी भरायची. समाजाचा एकोपा, उत्साह, शिस्त, बाबासाहेब व त्याच्या चळवळीप्रती निष्ठा इत्यादी गोष्टीचे त्यात प्रदर्शन असायचे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मिरवणूक निघायची, तेव्हा हे मुलं दांडपट्टा व कसरतीचे प्रात्यक्षिक करुन दाखवित. त्यावेळी पाहणार्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटायचे. जेथे जेथे सभा व्हायची, तेथे तेथे समता सैनिक दल खाकी पॅंट, पांढरा शर्ट व हातात काठी घेऊन मार्च करीत जात असत. तेव्हा विरोधकांच्या छातीत धडकी भरत असे. ह्या दलाचा आमच्या गावात व जिकडे-तिकडे दरारा निर्माण झाला होता.
यवतमाळ शहरातील पाटीपूरा येथील दादाराव नांवाचा वस्ताद समता सैनिक दलाच्या पोरांना गावातल्या या व्यायामशाळेत मल्लखांब, दंडबैठका, दांडपट्टा, कवायत, लाठीकाठी, तलवारबाजी, जंबियाबाजी, कुस्त्या इत्यादी व्यायामाचे व कसरतीचे प्रकार शिकवीत होता. त्यामुळे तरुण वर्गाचे आरोग्य धडधाकट राहून व्यसनापासून अलिप्त राहत.
मला आठवते, एकदा धामणगाव रोडवर असलेल्या बाभुळगाव या गावला प्रचंड सभा भरली होती. त्या सभेला बहुतेक चळवळीचे मोठ-मोठे पुढारी आले असावेत. कारण त्या सभेला गावोगावचे समता सैनिक दल पायी-पायी मार्च करत जात होते.
दादा आपला दल घेऊन चालला होता. मी सुध्दा त्यांचे सोबत दुडक्या चालीने जात होतो. यवतमाळवरुन बाभुळगावला जातांना लागलेला डांबरी रोड, त्याच्या दुतर्फा कडूनिंबाचे झाडं, करळगावच्या अलीकडे नागमोडी घाट, धावंडा-सागाचा घनदाट जंगल, आजूबाजूला उलंगवाडी झालेले वावरं, कुठे-कुठे गावाजवळच्या शेतातला भाजी-पाल्याचा किंवा संत्रा-पपयाचा बगीचा, त्यात मोट असलेली विहीर, दांडातून वाहत जाणारं पाणी, रोडने जाणारे एस.टी बसेस, सायकली, मोटार-गाड्या पाहून मी बुजाडून जात होतो.
एकदा गावातील दल कुठेतरी रात्रीच्या सभेला गेले होते. त्यामुळे गावात तरूण पोरं राहिले नव्हते. ही संधी साधून लभानांनी गावातील बाया-पोरं व म्हातार्या लोकांवर हल्ला केला होता.
कुणीतरी त्या सभेच्या गावाला धावत-पळत जावून दादाला सांगितले. तसाच तो दल घेऊन गावात दाखल झाला. लभानांच्या मोहल्ल्यात शिरुन आपल्या पोरांनी त्यांची दाणादाण केली होती.
आमच्या घरासमोरील मारुतीच्या देवळात त्यांच्या घरातील कपडे, गोधड्या आणून ढीग रचत व त्याला आग लावत. जिथे-जिथे ते लोक लपले असतील; तेथून शोधून काढून त्यांची धुलाई करीत. काही लोक कापसाच्या गंजीत लपलेले होते. त्यात काठी टोचली ते कुऽ कुऽऽ आवाज करीत, अशी ते गंमत सांगत असत.
बरेच लभान लोक त्याच वेळेस घरदार सोडून रातोरात पळाले होते. कोणी शेतात, कोणी जंगलात तर कोणी शेजारच्या गावला पळालेत. इतकी धास्ती समता सैनिक दलानी त्याकाळी निर्माण केली होती. काही दिवसाने वातावरण शांत झाल्यावर ते गावात परत आलेत. लहान मुले व बाया तेवढ्या त्यांच्या घरी राहिल्या होत्या. त्यांना त्रास देऊ नये अशी शिकवण समता सैनिक दलाच्या पोरांना देण्यात आली होती. त्यामुळे दादाचा गावामध्ये आदरयुक्त दरारा होता.
या दंगलीमुळे गावात तंग वातावरण झाले होते. पोलिसांनी दलाच्या काही मुलांना पकडले होते. परंतु कोणावरही गुन्हा सिध्द होऊ शकला नाही. त्यामुळे सारेच निर्दोष सुटल्या गेलेत.
आमच्या घोटीच्या वावरात एकदा भुईमूंग पेरला होता. तेथे मळा बांधला होता. त्या मळ्यावरुन दादा राखण करायचा. मी कधी-कधी त्याच्या सोबत राहत होतो. तेव्हा मला अभ्यास करायला लावायचा.
माझ्यावर तो फार जीव लावायचा.
‘चाल रामराव… आपण फिरायला जाऊ.’ असं दादाच्या तोंडून नुसतं फिरायचं नाव निघालं की माझ्या उत्साही जीवांच्या मनातला मोर थुईथुई नाचायला लागत असे.
एकदा यवतमाळ जवळील भारी किवा पारवा कुठेतरी – मला नक्की आठवत नाही; तेथे रात्रीला भजनाचा कार्यक्रम होता. हे गाव तीनक कोस असेल, तेथे मला खांद्यावर बसवून सवंगड्याच्या सोबत घेऊन गेला होता.
संध्याकाळी दादा भोरीला पकडून आणत असे. मला घेऊन वाडीमध्ये जायचा. तेथे विहिरीजवळ तिला भाजून मिठ, मिरची टाकून मस्तपैकी चटणी बनवित असे. मग ती भाकरीसोबत कुटूर कुटूर खायला जिभेची मज्जाच व्हायची !
मला भोर हा पक्षी फार आवडत असे. त्याची बारीक आणि नाजूक चोच विलक्षणिय वाटायची. त्याची ते तुरुतुरु चालणे, भुसभुसीत मातीवर उमटलेले, त्याच्या बारिक पायाच्या तीन बोटाचे एखाद्या नक्षीसारखे चिन्ह खूप सुंदर दिसत असे. त्याचे होऽ होऽऽ असा गोड आवाजाने साद घालणारा हुंकार ऎकण्यासाठी मी त्याच्या जवळ-जवळ जाऊन पाहिल्यावर भुरकन् उडत जाणारा; हा पक्षी मला नेहमीच भुरळ पाडत असे.
एकदा दादा या पक्ष्याला कसा पकडतो, ते मला पाहायचे होते; म्हणून मी त्याच्या सोबत गायरानात गेलो होतो.
त्याने एका चिल्हाटीच्या काट्याच्या झाडावर, आंत गुंतलेल्या बारीक फांद्यात लपून असलेला बारीक काट्या-कुट्या अंथरलेल्या, नारळाच्या अर्ध्या डोलाच्या आकाराचा एक खोपा शोधला. त्यात दोन पांढरेशुभ्र कांचेच्या गोळीच्या आकाराचे दोन अंडे ठेवलेले होते. त्यावरुन हा भोरीचाच खोपा आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही.
त्याने त्यावर घोड्याच्या केसाचा विणलेला फासा ठेवला.
नंतर आदल्या दिवशी टाकून ठेवलेल्या फास्यात अलगद्पणे अडकलेल्या भोरीला सोडवून तिचे पाय बांधले.
‘दादा मला पाहू दे ना…!’ मी म्हणालो.
त्याने तो पक्षी माझ्या हातात दिला. मी हा पक्षी इतक्या जवळून, हातात घेऊन यापूर्वी कधिच पाहिला नव्हता. मी तिचं ते मनोहारी आणि निरागस रुप नजरेत तनामनात साठवतांना देहभान विसरुन गेलो होतो. तिच्या पंखावरुन हात फिरवतां फिरवतां त्या रेशमी स्पर्शाचा अनुभव अत्यंत विस्मयकारी वाटत होता.
दादाने तो पक्षी परत घेऊन खांद्यावरच्या शेल्याच्या एका कोपर्यात गांठ मारुन बांधले.
पावसाळ्याच्या सुरुवातीला नाल्यामध्ये खेकडे निघत होते. एकदा दादा, बापुराव-दादा व उध्दव-काका रात्रीला बॅटर्या घेऊन खेकडे पकडायला गेले होते. त्यांनी पिपाभर भले मोठे गार खेकडे पकडून आणले होते. एक म्हण आहे की ’खेकडे एकमेकांचे पाय ओढत असतात. कुणाला वर जाऊ देत नाही’ खरंच त्या पिप्यातले कुणी खेकडे वर जायचा प्रयत्न करीत; तेव्हा दुसरे खेकडे त्यांचे पाय ओढून खाली पाडीत असत. त्यालाही वर जाऊ देत नसत व स्वत:ही जात नसत. असाच काही मानवाचा स्वभाव आहे म्हणतात, ते खरंच आहे !
उन्हाळ्यात मी दादासोबत चारं तोडायला जात होतो. त्यावेळी कुणाच्या तरी जंगलाच्या शेतात किंवा जंगलात चाराचे झाडे राहत असत. पिकलेले किंवा हिरवे पण पकलेले चारं आई, वहिनी, माझी बहीण-जनाबाई, शामराव-दादा व देवदास-दादा तोडून आणायचे. तांबूस-काळसर पडलेले पिकलेले चारं खातांना खूप मजा यायची. चारं खायला मला फार आवडत होतं.
हे तोडलेले चारं टोपले भरुन घरी आणल्यावर पिकलेले चारं घरी खायचे किंवा जास्त असल्यास यवतमाळला विकायला न्यायचे. पकलेल्या हिरव्या चारांना सडवून, त्याला हलक्या हाताने मोगरीने कांडून वाळवून घेत. मग त्याचे वरचे सालपट निघून जात. नंतर जात्यामध्ये भरडून घेतल्यावर त्यातील चारोळ्या सुपाने पाखडून, निवडून घेत. याच चारोळ्यामध्ये गूळ टाकून अखजी व इतर सणावाराला पोळी बनवित. ही पोळी खूपच चवदार आणि स्वादिष्ट लागत होती.
दादा बैलाच्या चार्याचा भारा डोक्यावर घेवून आणायचा; तेव्हा ज्वारीचे हिरवे हिरवे चांगले धांडे आमच्यासाठी घेऊन यायचा. हे धांडे उसासारखे गोड लागत होते. त्याला शिलून त्याचा गाभा चाऊन गोड रस पीत होतो.
दादा कधी कधी वाणीच्या कोवळ्या ज्वारीचा हुरडा भाजून घरी आणायचा. मग आम्ही त्याच्यावर तुटून पडत होतो. त्याच्या सोबत वावरात गेलो, की तेथेच वाळलेल्या काड्या जमा करून जाळ तयार करायचा व त्यावर कणसं निखार्याच्या हुपीमध्ये भाजायचा. भाजलेलं कणीस बाहेर काढून एका दगडावर ठेऊन दुसर्या दगडाने घासून त्यातील गरम-गरम, मऊ, लुसलुशीत दाणे बाहेर पडत. मग त्याला तोंडाने फुकून हा गरम-गरम हुरडा टमाट्या, मिरच्याच्या चटणीसोबत मिटक्या मारत आनंदाची अनुभूती घेत खात होतो.
दादा कधी वावरातच वटाण्याच्या लुसलुशीत ताज्या शेंगा तोडून भाजून द्यायचा तर कधी हिरवा हिरवा भरलेल्या घाट्याचा हरभरा उपटून हुळा भाजून द्यायचा तर कधी गव्हाच्या हिरव्यागार उंबळ्या भाजून द्यायचा. त्याच्या सोबत गेलो, की काही ना काही तरी सटर-फटर खायला मिळायचं. कधी कधी तो हरभर्याचा भारा किंवा गव्हाच्या उंबळ्या घरी आणून तुराट्या-सणकाड्यावर भाजायचा. मग आम्ही घरातले सर्वजण खाण्यासाठी धाऊन येत होतो.
दादा जंगलात ढोरं चारायला जायचा, तेव्हा घरी येतांना कटूले तोडून आणायचा. एकदा तर त्याने टेकोडे तोडून आणले होते. त्याची ओळख पटवण्यात दादा पटाईत होता. कारण काही टेकोडे विषारी पण असू असतात. ही रानभाजी डोंगराळ व लालवट मातीवर उगवतात. पावसाळ्यात उगवणार्या कुत्र्याच्या छत्रीसारखा त्याचा आकार असतो. वहिनी मग त्याची भाजी मटणासारखी चमचमीत बनवित होती. ही भाजी खातांना अविट गोडी लागत असे. या टेकोड्याला शहरात अळंबी किंवा मशरुम्स असे म्हणतात.
कोळंबी गावला आंबे घेतले, तेव्हा गंमतच झाली होती. आंब्याच्या झाडाजवळ एक विहीर होती. त्याच्या शेजारी एक मळा बांधला होता. आई, बाबा दोन-तीन वावरं दूर असेल अशा दुसर्या आमराईमध्ये राहायचे. या आमराईमध्ये दादा एकटाच राहायचा. रात्रीला जागल करायचा. मोठा हिंम्मतवान होता ! रात्रीला त्या ठिकाणी वाघ पाणी पिण्यासाठी येत असल्यामुळे मी तेथे झोपायला घाबरत होतो. म्हणून दादा मला कोळंबीला कळसस्कर आडनाव असलेल्या एका बाबाच्या नातेवाईकाकडे झोपायला घेऊन जायचा. मला पोहचवून तेवढ्या रात्रीला तो परत आमराईत जायचा. इतका तो हिंम्मतवान होता !
एकदा आमचं जुनं घर मोडून नवीन घर बांधत असतांना भिंतीतील दरातून फूसऽ फूसऽऽ… असा आवाज येत होता. ती भिंत पाडल्यावर त्यात तीन-चार हात लांब असलेला साप बाबाला दिसला. त्याने उंदीर खाल्ल्यामुळे त्याचं पोट फुगलेलं होतं. म्हणून तो सुस्त झाला होता. त्याला बाहेर काढून दादाने मारला होता.
तसंच एकदा दादाला साप डसला होता. ज्याला साप चावला त्याला ‘काडी लागली’ असे खेड्यात म्हणत असत. त्याला आमच्या घरासमोरील देवळाच्या पारावर सापाचं जहर ऊतरवणारा गावातलाच दाढ्यासाधू फिरवीत होता. हा साधू म्हणजे कपिलचा बाप-गोविंदा होता. त्यावेळी आम्हाला देऊळाच्या पारावर चढता येत होते. परंतु कुणा लभाणासमोर देऊळाच्या घुमटाच्या आंत जाता येत नव्हतं. त्याला तो साधू वाळलेली लाल मिरची खाऊ घालत होता. हातात मावेल एवढ्या दगडाने तो त्याच्या पाठीवर हलक्या हाताने मारत तोंडाने काहीतरी पुटपूटत मंत्र टाकत होता. असे मंत्र सखू-आजी पण टाकत होती. ती बाबाची कोणत्यातरी नात्यमध्ये मावशी होती. साधूच्या मंत्राच्या प्रयोगामुळे दादा बरा झाला; असेच सर्वांचा समज झाला होता. कदाचित तो साप बिनविषारी असेल म्हणून त्या साधूचं फावलं असावं. कारण अशाच दुसर्या एका प्रकरणात मात्र तो सपशेल उघडा पडला होता. साप चावलेल्या त्या बाईला मात्र तो वाचवू शकला नाही.
दादाचं लग्न कोळंबी या गावच्या यशोधराशी झालं होतं. त्याच्या लग्नात माझी नवरदेवाचा लहान भाऊ म्हणून फार वरवर झाली होती. माझ्या गावापासून कोळंबी या गावापर्यंत बैलगाडी, रेंग्या व दमण्यावर वरात नेली होती. नव्या नवरीला अजूनही नांदायला आणले नव्हते.
त्याचं लग्न होऊन एक महिना व पांच दिवस झाले होते. त्यावेळी त्याच्या जीवनातली ही जीवघेणी दुर्घटना घडली होती.
त्यादिवशी त्याने दिवसभर वाडीत खत भरला होता. वाडीत लावलेल्या वांग्याची उलंगवाडी झाली होती. त्याचे वाळलेले खोडं-फणकटं उपटले होते. तेथेच त्याने डालीने खताचे पुंजके टाकले होते. दुसर्या दिवशी त्याला भारी या गावला एका कार्यक्रमाला जायचे असल्यामुळे संध्याकाळी कपडे धुतले होते.
शामराव-दादा सारखं त्याला पण बासरीशिवाय पेटी वाजवण्याचा शौक होता. म्हणून अधुन-मधून तो शामराव-दादाची पेटी वाजवून पाहत असे.
वाडीतल्या कवेलूच्या कारखान्यावर तो व मुगलाईतील झटाळ्या गावचा मामा रात्रीला जागलीला जात असत. झाडीपट्टीतल्या मामानेच कवेलू कसं बनवायचं ते बाबाला व घरच्या लोकांना शिकवलं होतं. गावामध्ये तसं एकही कवेलूचा कारखाना नव्हता. जांब या गावावरुन आणीत असत. पण ते फार लांब पडत असे. त्यामुळे गावातच कवेलूची उपलब्धतता होत असल्यामुळे आमच्याकडे गिर्हाइकं भरपूर लागले होते.
त्या दिवशी दोघांचेही जेवणं झाल्यावर वाडीत जायची दादाने तयारी केली. पण म्हणतात ना, ’राजा शिकारीला निघाला अन् कुत्रा हागदोडीत गेला.’ त्याप्रमाणे मामाला निघता निघता चिलीमीची तलप आली. चिलीम ओढायला त्याला बराच वेळ लागतो, म्हणून दादाला तोपर्यंत पेटी वाजवायची इच्छा झाली.
म्हणून तो घरातल्या दुकानाच्या खोलीत गेला. त्यावेळी त्या खोलीत दुकान नव्हते. पण पूर्वी बाबाने तेथे दुकान टाकले होते. गावातल्या उधारीमुळे दुकान चालले नाही. त्यामुळे पुढे ते दुकान बंद पडले होते.
दादाच्या लग्नासाठी बरचसं सामान आणले होते. बाबा त्यावेळी मामाची शेती वाहत असल्यामुळे परिस्थिती चांगली होती. त्यामुळे खर्चाची काही ददात नव्हती. कारण बाबा, मोठा शामरावदादा व देवदास-दादा असे तिघेही मिळून एकोप्याने शेतातलं काम करीत असत.
त्याच्या लग्नामधील बरचसं सामान उरले होते. ते सर्व दुकानाच्या खोलीत ठेवले होते. त्यात तांदळाचे, गव्हाचे पोते होते. खायच्या व मातीच्या तेलाचा पिपा होता.
खोलीमध्ये अंधार होता. त्याने कंदील पेटविला. त्यात थोडे तेल होते. म्हणून तेल भरण्यासाठी मातीच्या तेलाचा पिपा जवळ घेतला.
पिप्यातलं तेल हापसीने ओढून भरायचं होतं. तेल भरतांना उजेड पाहिजे म्हणून कंदील न विझविता तसाच जळता कंदील आडवा करून त्यात हापसीने तेल भरायला लागला. परंतु दुर्दैवाने तो कंदील भडकला. म्हणून त्याला जोरजोरात फुंकर मारुन विझवायला लागला. पण ती आग पिप्यापर्यंत पोहचली होती. म्हणून आता आग पसरुन खोलीत भडकू नये, म्हणून त्याने पिप्याच्या कडीला पकडून बाहेर फेकायचा प्रयत्न करु लागला. पण कडी तुटून तेलाचा झेलकावा त्याच्या अंगावर आला. तसाच तोही भडकला. तो खोलीतून पळत बाहेर आला. घरासमोरच्या देवळाच्या भोवताल चक्कर मारत तसाच जळत असतांना वाडीच्या दिशेने पळू लागला. मात्र वाडीच्या फाटकाजवळ जमिनीवर खाली कोसळला. आगीचा लोळ पाहून गावातील सारे लोक चक्राऊन गेले. सर्वजण त्याच्या मागे मागे धाऊ लागले. त्याला काही लोकांनी उचलून गोविंदा-मामाच्या घराच्या अंगणात नेले. तेथे दही आणून त्याच्या अंगाला चोपडले. नंतर घरातली बाज नेऊन, त्यावर मऊ कपडे टाकून त्याला झोपविले. ती बाज उचलून त्या रात्री यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. त्याच्या सोबत गावातले बरेच लोक गेले होते. हे अकल्पीत दृष्य पाहून सार्यांची झोप उडाली होती.
दुसर्या दिवशी सकाळी मी बाई, आई, वहिनी व लहानसा अज्याप बैलगाडीने यवतमाळला निघालो. गोधणी गावच्या पलीकडील घाटावर गेलो नसेन, तर लक्ष्मन-मावसा दुरुनच येतांना दिसला. त्याला पाहून आमच्या पोटात धस्स झालं. तो गाडीजवळ आला.
’बाई, आपला देवदास गेला वं !’ असं वाक्य त्याच्या तोंडून निघते न् निघते, तर आईने हंबरडा फोडून गाडीच्या खाली उडी घेतली. तसेच गाडीला जुंपलेले आमचे दोन्हीही बैल ठक उभे राहीले. त्यावेळी एक बोढी व दुसरा सांड्या बैल होता. त्यांचाही दादावर अपार लळा होता. बरेच दिवसापासून दादा दिसत नव्हता; म्हणून की काय, त्या मुक्या जनावरांनी आपल्याला चारा-पाणी घालणारा आपला सखा आता राहिला नाही; असे जाणले असावे. म्हणूनच की काय, त्या दोन्हीही बैलांच्या डोळ्यातून बरेच दिवसापर्यंत पाणी ओघळत होते. इतका जीव दादांचा बैलावर व बैलाचा दादावर होता.
आम्ही यवतमाळला सरकारी दवाखान्याच्या आवारात आलो. दवाखान्यातून दादाचे पांढर्या धोतराने झाकलेला निर्जीव देह कडुनिंबाच्या झाडाखाली आणून ठेवला होता. आमच्या कुटुंबातील पहिल्यांदाच एक जीव गेल्याचं मी अनुभवत होतो.
आम्ही सर्वजण जिवाच्या आकांताने रडत होतो. दादाला अकाली गमावल्याचं दु:ख आई-बाबांना किती विषण्ण करणारं होतं, ते शब्दात सांगता येत नाही ! अशा कोसळलेल्या परिस्थितीत आपण किती असहाय्य आहोत, याची जाणीव मनाला असह्य होतं होती.
तरुण पोराला हरवण्याचं दु:ख कोणत्याही आई-वडीलांना पचवणं कठीणच जातं असेल. त्याच्या मरणाचा धक्का प्रचंड होता…! या प्रसंगाने त्यांना पार उन्मळून टाकले होते. शामराव-दादा व बाबांच्या जगण्यातला तर सारा उत्साह मावळून गेला होता.
त्याला गाडीत टाकून तलावफैलात बापुराव-दादाची सासुरवाडी होती – तेथे घेऊन आले. तेथेच त्याची उत्तरक्रिया केली. कारण जळलेले मृतशरीर लवकर खराब होते. म्हणून त्याचे शव गावला आणता येत नव्हतं.
दादाच्या निर्जीव देहाच्या शिडीला उचल्याबरोबर आमच्या. उरात दाटून आलेला उमाळा भडभडून बाहेर पडला. त्याला घेऊन जातांना आम्ही त्याच्या गुंडाळलेल्या प्रेताकडे सारखं पाहत होतो. शेवटी दिसेनासं झालं; ते कायमचच ! दादाच्या शरीराचं अस्तित्व तेव्हापासून आमच्या डोळ्याआड झालं. पुन्हा कधी दिसलंच नाही ! आता फक्त त्याच्या आठवणी तेवढ्या राहिल्या होत्या.
दवाखान्यातला पांढरा कोट घातलेला व छाती-पोट तपासण्याचं यंत्र गळ्यात अडकवलेला डॉक्टर पाहून आमच्याही घरात असा कोणी डॉक्टर होऊ शकत नाही का ? असा प्रश्न मला समजायला लागल्यापासून सारखा सतावीत होता. म्हणून मी माझा लहान भाउ, अज्यापच्या रुपात डॉक्टरला पाहत होतो.
दादा मेला, तेव्हा अज्याप टुणूटुणू चालत होता. तो पांदणभर रडत फिरत होता. त्याचे डोळे बहुतेक भिरभिर, त्या पांदणीच्या रस्त्याने दादाचा शोध घेत होते.
दादा मेल्यानंतर बाबाने यशोधरा-वहिनीला घेऊन आला होता. काही दिवस ती आमच्याकडे राहिली होती. ती सुध्दा आमच्या सोबत कवेलू थालायचं काम करायची. मला ती फार आवडली होती. तिने आमच्या सर्वांवर लळा लावला होता. दादा असता तर ती पण आमच्याच घरी राहिली असती. पण तो गेल्यामुळे ती सुध्दा आमच्या घराला पारखी झाली.
बाबाने तिला लग्नात केलेले दागिने परत घेतले नाही. दादाची आठवण म्हणून तिलाच ठेवायला सांगितले. ती परत गेली, तेव्हा आमच्या डोळ्याच्या कडा आपोआप ओलावल्या होत्या.
आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात जे यश मिळालं होते, त्यात दादाचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या हिंमतीने शामराव-दादा व बाबा शेतीवाडीचे कामे पार पाडीत असत. कोणत्याही कामाचा बोजा देवदास-दादा लिलया पेलत होता. पण आता शामराव-दादा व बाबाची अवस्था एखाद्या वावटळीत उन्मळून पडलेल्या झाडासारखी झाली होती. त्यांचे हात-पाय गळल्यासारखे झाले होते. खरंच आमच्या घरातली ताकद निघून गेली नि आम्ही दुर्बळ झालो होतो.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
खेड्यामध्ये खरंच एक अनोखं वातावरण अनुभवाला यायचं. माझ्या बाबा सारखे अनेक शेतकरी लोक उन्हाळ्यात आग ओगणार्या सूर्याच्या किरणाने बायका-पोरांसोबत भाजून निघत असतांना, त्याची तमा न बाळगता उन्हाळवाही करायचे. चोपुन-चापून शेतीची मशागत करुन येणार्या पावसाच्या आगमनाचं उत्सुकतेने वाट पाहत राहायचे.
आई वाळलेल्या पर्हाट्या, तुरीच्या सोंगलेल्या खुस्पटं किंवा ज्वारीचे फणकटं एकत्र ढीग रचून संध्याकाळच्या वेळी सावली पडल्यावर पेटवून द्यायची. मग तो आगीचा लोळ पाहतांना अंगावर शहारे उमटत. त्या गंजीतील किडे, माकोडे, अळ्या होरपळून मरतांना जिवाची तगमग होत होती. आजूबाजूच्या बहुतेकांच्या शेतामध्ये असेच एखाद्या जंगलाला वणवा लागल्या सारखं दृष्य दिसायचं.
एखाद्यावेळी खरंच दुरवर डोगराच्या जंगलात वणवा पेटलेला दिसला की, माझ्या मनात भीतीचा गोळा उमळायचा. कुणीतरी वाटसरु मुद्दाम पेटवीत होता किंवा कधी पेटलेली बिडी किंवा बिडी शिलगवतांना फेकलेल्या डब्बीची काडी एखाद्या वाळलेल्या गवतावर जाऊन पडली तर जंगलाला आग लागत होती. मग ती आग पुर्या जंगलभर पसरत होती. त्यामुळे लहान-मोठ्या जंगली प्राण्यांची, पक्ष्यांची, सरपटणार्या जीवांची आश्रयस्थाने नष्ट होवून जात, तेव्हा मनाला चुटचुट लागून जात होती.
गाई-ढोरांच्या कोठ्याशेजारी किंवा गावाला लागून असलेल्या वावराच्या कुंपणाजवळच्या खड्ड्यात वर्षभर जमा करुन, मुरवून ठेवलेला शेण-कचर्याचं खत बैलबंडीच्या डालीतून वाहत आणून शेतात पांच-सहा टोपले भरतील; असे ढीग टाकत. मग तो ढीग शेतामध्ये सारख्या प्रमाणात पसरून देत. मी कधी कधी लहान असतांना कुणाच्या डालीवर डाव-डाव करायला जात होतो. तेव्हा त्या खताचे बारीक बारीक कण नाका-डोळ्यात व कानात शिरत असे. बैलगाडी हाकणार्या धुरीकर्याचं गुणगुणणं, वावर येईपर्यंत कानात घुमत राहायचं.
शेतकर्यांचे डोळे जसे पावसाकडे लागलेले दिसायचे. तसेच उन्हाने रापलेली-तहानलेली माती सुध्दा मोठ्या उत्साहाने निसर्गाच्या कणाकणाला जीवनरस पुरविणार्या पावसाचं स्वागत करण्यासाठी आसुसलेली राहत होतं. पावसाच्या आगमनाने धरतीचं तन-मन कसं उत्फुल्लित होवून जात होतं.
पूर्वी मान्सूनचे वारे वाहण्यापुर्वीच म्हणजे रोहिणी नक्षत्रातच घनघोर पाउस बरसत असे. पाऊस पडला की जणू काही जमिनीची गर्भधारणा झाली असं वाटायचं. लगेचच पावसाच्या पहिल्या सरीने धरतीचा कण न् कण कधी मोहरुन जायचा; तेही कळायचं नाही. तिच्या कुशीत पहुडलेल्या बियांना नवीन नवीन लुसलुशीत कॊंब फुटून जमिनीच्या बाहेर डोकाऊन पाहतांना मन सुखावून जायचं. त्या कोंबाचं हळूच वर येणं म्हणजे हिरवीगार शालू परिधान केल्यासारखी दिसायचे. मग ते हलकाशा वार्याने दिमाखाने डोलायला लागल्या, की तो नजारा डोळ्यासमोरुन हलत नसे. कुजलेल्या पालापाचोळ्याबरोबर नवीन कोवळ्या अंकुराचा तो मस्त वास नाकात घुमत राहायचा. वेडावून टाकणारा मातीचा गंध चोहीकडे दरवळायचा. सृष्टीचा रंग बदलून जायचा. गावाचा, नद्या-नाल्याचा व वावराचा चेहरामोहरा बदलून जायचा. पांदणभर पाण्याची चिलकी वाहत राहायची. त्या पाण्यात धपकण उड्या मारत किंवा फतक फतक चालायला मोठी मजा वाटायची,
ऊन्हाळभर रखरख असलेल्या गावात व वावरात पहिल्या पावसानंतर वनस्पती भराभर उगवून वर यायला लागत. त्यात कुसळी, काशा, हराळी, कंबरमोडी, काटमाटी, बरबडी, चिकाटा, वाभिट, गोखरु, डोरली, वाघनखं, परडी, धोतरा, कामीनी, फटाके, ऎरंडी, चरोटा, रानभेंडी, पाया-पोटर्याला चिकटणारे कुत्रे, अशा कितीतरी वनस्पतीच्या जाती असायच्या.
उन्हाळ्याच्या उन्हाने रापलेल्या ह्या वनस्पती, लहान-मोठे वॄक्ष, त्यांना लपेटलेल्या हिरव्यागच्च पानांनी नटलेल्या वेली-महावेली हिरवी शालू नेसून पावसाचे एक एक थेंब झेलत, नखशिखांत भिजून दिमाखाने वावरत. विविध जातींची रंगबेरंगी भूछत्रे, उन्हाळ्यात झोप काढून पाऊस पडताच उगवून येणारे-फुलणारे विविध प्रकारचे कंद आपले अस्तित्व खुलवित.
वेलीपैकी भोवरा, दोडके, काकडी, कोहळे, भोपळे, शेलणे, उतरन, काचकोरले, असे असायचे. यातील काही वेली इतक्या झपाट्याने वर चढून जायच्या, की ते पूर्ण झाडाला वेढून घेत. मुळ झाड कोणतं तेही कळत नसे. अशा वेली कुंपण-कुपाट्यावर चढल्या, की त्याचं वाळकं रुप देखील बदलून हिरवेगार होत असे.
लोक उन्हाळ्यात आमरस चाखल्यावर आंब्याच्या कोयी उकंड्यावर किंवा इतरत्र फेकत. पावसाळ्यात त्याच्या कोंबी जोगोजागी उगवून येत. आम्ही मुले त्या चिमुकल्या झाडाला उपटून त्याला लागून असलेल्या कोयीला दगडावर घासून पुंगी बनवून वाजवत फिरायचो.
उन्हाळ्यात पळस पापड्या खेळत होतो. पावसाळा लागला की, ह्याच पापड्यातून पळसाचे कोंब जागोजागी उगवून येत. तसेच कडूनिंबाच्या पिकलेल्या लिंबोळ्याला चिंबवून आंब्य़ासारखा रस काढण्यात आम्ही मुलं पण रस घेत होतो. मग त्याचे रोप जागोजागी उगवून येत.
पावसाची चाहूल लागताच जमिनीच्या निर्जीव कुशीत पहूडलेले असंख्य जीव सुध्दा वनस्पतीसोबतच घाईघाईने बाहेर येऊ लागत. हिरव्या ओलाव्याच्या सोबतीने भराभरा वाढणारे, सैरभैर फिरणारे मुंग्या, माकोडे, किडे, कोळी, अळ्या, झुल्लरं, विंचू साप, गोमी, गोगलगायी, गांडुळं, गोसावी, काजवे, पतंग, फुलपाखरे, सोनपाखरं, गांधील माशा आणि पक्षी अशा कितीतरी प्रकारचे जीव निसर्गाशी एकरुप होत.
सापासारखा अगदी हळुहळु सरपटणारा, हाताच्या बोटापर्य़ंत लांबी पण गवताच्या काडीसारखा बारिक असणारा व लालसर दिसणारा गुबगुबीत प्राणी म्हणजे गाडूळ…! या गांडुळाचा मुख्यत: ओल्या माती-शेणात वावर असतो. हा गांडूळ जमिनीत आंत दडलेली सुपिक गुळगूळीत चिकण-माती ज्यात त्यांची विष्टा पण असते, बाहेर आणून शेतात टाकतात. त्यामुळे शेताला आपसूकच खत मिळते.
गांडुळाच्या विष्टेत शेतीस लागणारे रासायनिक पोषक अन्नद्रव्ये व सूक्ष्म जीवाणू असतात. शिवाय त्यातील वाळू, चिकण आणि बारिक माती यांच्या समतोल प्रमाणामुळे जमीन भुसभूसीत बनण्यास मदत होते. म्हणून शेतकरी गांडूळखत तयार करुन शेतात टाकतात, असे माझ्या वाचण्यात आले होते.
गोगलगाई…! लालवट रंगाचे. काही मोठे तर काही लहान लहान पिल्ले…! रस्त्यात पायाला आडवे आडवे होत चालत. मोठ्या गोगलगाईला हळूच स्पर्ष केला, की स्वत:ला एखाद्या पैशासारखा गोल गोल गुंडाळून घेत. म्हणून आम्ही त्याला पैसा म्हणत होतो. एखादी गोगलगाय दुसर्या गोगलगाईच्या पाठीवर बसून डावडाव करीत असल्याचे पाहिल्यावर आम्हाला मोठी गंमत वाटत होती.
त्यांच्या बिटूकसे पिल्लांचे गोचकेच्या गोचके जागोजागी पडलेले दिसायचे. बिच्चारी इतके पिल्ले त्यांची माय कशी देत असेल, कोण जाणे ? एका गोचक्यात शेकडोंपेक्षाही कितीतरी जास्त संख्या असेल. एकमेकांच्या अंगावर चढलेले, तरीही कुणी चिरडत नसत. कुणीही बाहेर न पडता पूर्ण ताफाच्या ताफाच पुढे सरकतांना पाहून आश्चर्यच वाटायचं. त्यांच्या या झुंडीवर एखाद्याचा किवा जनावराचा पाय पडला की, बिचार्या चेंदामेंदा व्हायच्या. त्यांच्या जीवाला माणसाच्या दृष्टीने काहीच किंमत नसायचं.
मी अशीच एक गोष्ट वाचली होती की, ’मुंगी आपल्या पिलाला सांगते, बाळ तु भिंतीच्या कोपर्या कोपर्याने चालत जा. कारण मनुष्य नावाच्या प्राण्याला आपल्याकडे पाहण्यासाठी डोळे नसतात. ते आपल्याला चिरडून टाकून पुढे जात असतात.’
तसंच इतर वेळेस कुठेही दृष्टोत्पतीस न पडणारा आणखी एक किडा म्हणजे गोसावी. हा किडा म्हणजे मखमली रेशमाच्या दाट केसांनी लपटलेला, गुबगुबीत, लालभडक व संथगतीने चालणारा हा किडा. त्याला पकडण्यासाठी आम्ही त्याच्या मागे मागे जात होतो. त्याला काही आजीबाई कुंकवाच्या डब्बीत ठेवीत. कारण त्यामुळे कुंकू लालगर्द बनते; असे त्या म्हणत. त्याच्यात काही औषधी गुण असतात असेही त्या सांगत असत. अर्धांगवायूवर रामबाण उपाय म्हणून त्याचे तेल चोळीत असत. नवदांपत्यांना उत्तेजक म्हणून त्याचा वापर करीत; असं मी ऎकलं होतं. पर्यावरणाच्या दृष्टीने हा किडा पालापाचोळा कुजवीण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाची भुमिका वठवीत.
काही सोनकिडे माणसाच्या घाणीचे गोल गोल गोळे करुन ते ढकलत ढकलत आपल्या बिळामध्ये घेऊन जातांना आम्ही पाहत होतो. त्यामुळे लहान पोरांनी किवा एखाद्या आळशी व भित्र्या मनुष्याने उघड्यावर केलेली घाण निस्तारण्याचं काम ते ईमानेइतबारे करत असत. शिवाय वावरात कुणी ‘शी’ केली की शेताला सोनखत देण्याचं काम ते करत असत. कुणी म्हणायचं, की हेच किडे रात्रीला काजवा बनूण अंधारात ऊजेड पाडण्याचं काम करीत..
अशा प्रकारचे अनेक किडे, सूक्ष्मजंतू शेतकर्याना शेतमाल पिकवीण्यासाठी जीवाभावाची मदतच करीत असतात. नजरेला न दिसणारे मातीतले अनेक जीवाणू सुकलेल्या पाल्या-पाचोळ्याचा भुगा करून व मृत प्राणी, प्राण्यांची विष्ठा अशा पदार्थाचे विघटन करून त्यातील खनिज घटक वनस्पतींना सहज मिळवून देण्याची किमया करतात. त्यामुळे मातीचा कस वाढवायला मदतच होते. जमीन सुपीक बनते. मधमाशा पण अनेक झाडांना फलोत्पादनासाठी अनिवार्य असतात. ह्या गोष्टी आपल्याला माहितच नसतात.
सोनपाखरु…! हा भोंगरापेक्षा थोडा मोठा असलेला मनमोहक, सोन्याच्या रंगाचे पंख असलेला किडा चिल्हाटीच्या रंगीबेरंगी, रेशमासारखे पाकळ्याचे छोटे-छोटे, गोल-गोल फुले व बारीक बारीक काटे असलेल्या झाडावर नेमका बसलेला दिसायचा. त्याला चिल्हाटीचे बारीक बारीक पाणे खायला बहुतेक आवडत असावे. आम्ही त्याला पकडून आगपेटीच्या रिकाम्या डब्बीत ठेवीत होतो. त्यात त्याला खायला चिल्हाटीचा पाला ठेवत होतो. डबी उघडून पाहिली की, त्यात सोपीच्या आकाराचे सोनपाखराने टाकलेले बारीक बारीक अंडे दिसायचे. बाहेर काढल्यानंतर तो उडून जाऊ नये म्हणून त्याच्या मानेला लांब सुताने बांधून वर फेकत होतो. मग तो वर उडून खाली येत असे. आम्ही अशा प्रकारे त्याची मजा घेत होतो.
रंगिबेरंगी फुलपाखरं व पिवळ्या रंगाच्या फुलपाखरांपेक्षा लहान आकाराच्या पिफोल्या या फुलांवरुन त्या फुलावर जिकडे तिकडे उडतांना नजरेस पडल्या, की आम्ही सुखाऊन जात होतो. .
तसेच पावसाळ्याच्या आगमनानंतर माकोडे-वाळव्यांना पंख फुटत. ते मोठ्या प्रमाणात जमिनीवर व आकाशात जिकडे-तिकडे प्रकाशात उडतांना दिसत. त्यांचे पंख तुटून जमिनीवर इतस्तत: पसरलेले दिसायचे. काही बुलबुल, वेडा राघूसारखे पाखरं यांना हवेतल्या हवेत अलगदपणे टिपून घेत.
पावसाळ्यात पाण्याचे डोबरे साचले, की मातीत किंवा नद्या-नाल्यात, विहिरी-झर्यात लपून बसलेले बेंडुकांच्या जाती प्रकट व्हायच्या व डरावऽऽ डरावऽऽऽ असा त्यांचा एकच कल्ला सुरु व्हायचा. रात्रीच्या सुनसान वातावरणात तर त्यांचाच आवाज सर्वदूर घुमत राहत असे.
पाऊसही किती खट्याळ ! कधी लहरी, कधी मिरगातला नाजूक, कधी हलकासा, कधी मोत्यासारखा टपटपणारा, तर कधी प्रत्येकवेळी, प्रत्येकक्षणी तो वेगळाच भासणारा…!
असा हा नटखट पाउस कधी स्त्री देहाशी झोंबाझोंबी करुन तिला ओलेचिंब करुन,. तिचं वस्त्रात लपलेलं उत्तान भाग पारदर्शक करुन वात्रटपणा करतांना दिसायचा.
आमची त्यावेळी घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे सुट्टी असली, की गावला येऊन घरखर्चाला आधार म्हणून मी व माझी बहीण जनाबाई, आई-वहिनीसोबत लोकांच्या कामाला जात होतो.
मी एकदा असंच पांढरी गावाच्या रस्त्याने श्रावणच्या वावरात भाकरी बांधून हातात विळा, फडकं व पोतं घेऊन निंदायला जात होतो. आमच्या सोबत एक-दोन बाया ज्या दुधपित्या चिल्या-पिल्याना घरी ठेऊन आल्या होत्या – त्या बिच्चार्या दुपारी आमच्या सोबत भाकर न खाता बाळांना दुघ पाजायला जात होत्या. मी असं ऐकलं होतं की आई कामात असतांना मूल झोपून राहावं म्हणून त्याला अफुची गोळी देत.
त्यावेळी जातांना आसपासच्या वावरातली ओली माती, अधूनमधून होणारा पावसाचा शिडकावा अन् हिरव्या रंगाने नटलेला परिसर अशा सार्या माहोलामध्ये रस्ताच जणू भारावून गेल्यासारखा वाटत होता. .
रस्त्याच्या धुर्यावर एक सरळ आभाळाकडे वाढलेलं, मध्यम उंचीचं मेडसिंगचं झाड होतं. त्या झाडाच्या खाली जमिनीवर पडलेल्या मोगर्यासारख्या पांढर्या फुलांच्या सड्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. वार्याच्या झुळकीने हे वन-फुले टपाटप खाली पडत होते. जणू काही आभाळातले तारे जमिनीवर अवतरले आहेत की काय, असे वाटत होते. त्या वनफुलांचा सुगंधीत वास वार्याच्या झोताने सगळीकडे पसरला होता. कदाचित त्या फुलांना वाटत असावे की माझा सुगंध सर्वत्र दरवळत राहावा. पण हवेच्या मदतीच्याशिवाय हे शक्य होतं कां ?
मी एकटाच तो नजारा पाहात तेथे घुटमळत थांबलो होतो. माझ्या सोबतचे सारे लांब दूर निघून गेले होते. त्यांच ते रोजचच होतं. त्यामुळे त्यांना त्याचं काही अप्रुप वाटत नव्हतं. मला मात्र त्या दृष्याने मोहित करुन टाकलं होतं.
संध्याकाळी परत येतांना झाडाखाली पहुडलेले सारे फुलं कोमेजून गेले होते. पण या फुलांनी दिलेला सौंदर्याचा आनंद मात्र कोमेजला नव्हता. या रस्त्याने जेव्हा-केव्हा मी जायचा, तेव्हा मला हे झाड नेहमीच खुणावत असे. त्या झाडापासून दूर गेल्यावरही मागे मागे पाहत राहावसं वाटे.
त्यावेळी निंदनासाठी एक आण्यापासून किंवा जास्त गवत वाढले असेल, तर त्यापेक्षा जास्त पैसे एका तासाचे मिळत असत. तास म्हणजे घड्याळाचे तास नव्हे तर पिकाची जी ओळ असायची त्याला तास किंवा पाथ असे म्हणत.
दोन्ही पाय मोडून किंवा खाली बसून सरकत सरकत जावून एका धुर्यापासून ते दुसर्या धुर्यापर्यंत विळ्याने गवत ऊपटून पुंजाण्यावर टाकावे लागत असे. चिखल किवा पाणी साचले असेल किंवा थुईथूई पाऊस पडत असेल तर उभ्या-उभ्यानेच किंवा ओणव्याने निंदावे लागत असे. पायाच्या पोटर्या भरुन दुखायला लागायचे. कंबर मोडल्यासारखी वाटायची. कधी कधी चिखलात रुतून बसलेला काटा हळूच पायात घुसला की जीवाची तळमळ व्हायची. पायाचे तळवे सतत मातीच्या गाडणात राहत असल्यामुळे पायाच्या दोन बोटाच्या मध्ये चिखल्या होत असे. सतत भुरभुरणार्या पावसाने माझ्या अंगावरचे सारे कपडे, केसं व उघडं आंग ओलं होत होतं. पण
पावसात ओलेचिंब होण्यातही मला मोठी अपूर्वाई वाटत होती.
नेसलेले कपडे चिखलाने भरु नये, म्हणून खराब टॉवेल, धोतराचं किंवा लुगड्याचं फडकं कमरेला गुंडाळून घ्यावे लागत असे. निंदता निंदता एखादी अंबाडीची, चरोट्याची, कुंजर्याची, काटमाटीची भाजी दिसली, की ते खुडून ओट्यात टाकत होतो. मग रात्री किंवा सकाळी त्याचीच भाजी जेवणाला होत होती.
निंदता निंदता एखाद्यावेळेस लव्हा या जातीचं हातापेक्षा जास्त उंच वाढलेलं गवत दिसलं की, तिला लगेच उपटून आम्ही. गंमत करत होतो. मग एखादी कोणी बाई गरोदर असली की, तिचं नाव घेऊन तिला मुलगा होईल की मुलगी ते ठरविण्यासाठी त्या गवताला चिरत होतो. ते सरळ चिरलं की मुलगा, जर आडवे-तिडवे चिरले की मुलगी असं काहीतरी ठोकताळे बांधत होतो. अशा काही गमती-जमतीमुळे थकलेल्या जिवाची तगमग थोडीफार कमी व्हायची.
कधी लाजरीच चिमुकलं झाड दिसायचं. त्याचे बारीक बारीक पाने पाहून मन आनंदीत होऊन जात असे. मग या झाडाला बोट लावतां क्षणीच तिचे पाने मिटून जायचे. जणू काही ती लाजेने चूर होऊन जात होती की काय, असे वाटायचे ! जशी एखादी बाई लाजून घसरलेला पदर सावरून घेते, तशी ती लाजून आपले पाने मिटवून घेत होती.
कधी कामून्याचं झाड दिसलं, की त्याचे फळे खाल्ल्याशिवाय राहत नव्हतो. मिरचीच्या झाडाएवढं वाढणारी ही वनस्पती. याला बारीक बारीक पिवळसर रंगाचं फळं लागत होते. हे फळ खायला गुळसर लागत असे.
कधी फटाक्याचं झाड दिसले, की ते तोडून पटापट फोडत होतो. बाहेरून पातळ कवच असलेले हे फळं दाबल्यावर फटकन् असा फटाक्यासारखा आवाज करुन फुटायचा. म्हणून या वनस्पतीला कदाचित फटाके असे नांव पडले असावे.
दुपारी भाकर खाऊन ओढ्याचं, झर्याचं किवा त्या वावरातील विहिरीचं किंवा घरुन मडक्यात भरुन आणलेलं पाणी पीत होतो.
आभाळात ढग जमा झाले की, ते वार्यासोबर एका जागेवरुन दुसर्या जागेवर वाहत जातांना एक वेगळाच नजारा पाहायला मिळत होता. काळे-पांढरे ढगं धूम पळतांना दिसायचे. त्याचा आकार सतत बदलत राहायचा. त्या ढगांत माणसाचं किंवा एखाद्या प्राण्याचं किंवा झाडाचं असं आणखी काहीतरी चित्रविचित्र प्रतिकृती तयार व्हायच्या व क्षणातच विरुन दुसरी प्रतिमा तयार व्हायची. असं ते विस्मयकारी दृष्य पाहतांना नजर काही केल्या हटत नव्हती.
एखाद्या वेळेस निंदता निंदता आभाळ गच्च भरून आल्यावर मनाला अनामिक हुरहूर लागत असे. आतापर्यंत न दिसणारे ढग आभाळात घिरट्या घालू लागले की पाहतां पाहतां सर्वदूर काळोख पसरत असे. इतकं की पुढचं दृष्य अंधूक दिसायला लागायचं. आणि क्षणार्धात आभाळ फाटल्यासारखा पाऊस धो-धो कोसळू लागत. लख्खकन चमकणार्या विजांच्या तारा आमच्या डोळ्यासमोर नाचत. ढगांच्या गडगडाटाने कानठळ्या बसत.
अशा वेळेस पोत्याची घोंगशी करून एखाद्या झाडाखाली किंवा त्या शेतात बांधलेल्या इरल्यात बसून पाऊस, वारा व विजेशी टक्कर द्यावे लागत असे. असंही करुन पाण्याने ओलं झालं की, थंडीने कुडकुडायला, गारठल्यासारखं होत असे. पण विजा पडत असतील, तर झाडाच्याखाली थांबू नये असे लोक सांगत. कारण विज नेमकी झाडावर पडते. त्यामुळे अनेक लोक जळून मरत.
पाऊस टपटपू लागला की हिरव्याकंच झाडांच्या इवलाल्या पानांवरून गळणार्या थेंबाचे संगीत वाजू लागत. सारं रान पावसाच्या या अजब संगीताच्या तालावर फेर धरुन नाचत.
कोसळणार्या पावसाबरोबरच पावसाळ्याच्या अनेक आठवणीने माझेही मन ओलेचिंब भिजून जात असे.
मी व अज्याप असच एकदा गांवावरून यवतमाळला जात होतो. तेव्हा आमचे खूप हाल झाले होते. गांवावरुन निघतांना आकाश निरभ्र होतं. परंतु गोधणीच्या जवळपास मात्र आतापर्यंत न दिसणारे ढग आता आभाळात घिरट्या घालू लागले होते. दिवस कलायला अवकाश होता. तरीही सर्वदूर अंधार दाटला होता. पाहता पाहता पावसाचे टपोरे थेंब झोंबायला लागले. धो धो पाऊस सुरु झाला. मुसळधार पाऊसच होता तो ! वारा, पाउस व दाट काळोख यामुळे जवळचा माणूस सुध्दा दिसेनासा झाला होता. जोर्यात वाहणार्या वार्याने वातावरणात गारवा पसरवला होता. जवळ छत्री नव्हती. त्यामुळे आम्ही ओलेचिंब भिजलो. दोघेही गोधणीच्या नाल्याच्या अलीकडे गाडीरस्त्याला लागून झाडाच्या बुंध्यापाशी थांबलो. आम्हाला खेटूनच विज चमकून गेली. विजांचा कडकडाट तर ढगांचा गडगडाट सारखा सुरु होता. त्यामुळे भीतीने कापरे भरायला लागले. नाल्याला सुरुवातीला खडखड करीत पुराचे लोंढे वाहत आले व नंतर पाहता पाहता दोन्ही थड्या पाण्याने भरून गेल्या. आम्ही ज्या रस्त्यावर थांबलो होतो; त्या रस्त्यावर पाणी चढलं होतं. त्यामुळे आम्ही मागेमागे चढावावर सरकत गेलो. पूर ओसरेपर्यंत थांबलो. अंगात थंडीने कुडकुडी भरली होती. ओल्या कपड्यानेच आम्ही होस्टेलला आलो. अशी ही पावसाची आठवण त्यावेळी मला चाटून गेली.
पाऊस कोसळणं थांबल्यावर तरारून फुललेली गवतफुले, पक्ष्यांचा पंख झटकण्याचा आवाज, सगळीकडे पसरलेला शांत ओलसर-हिरवटसर रंग, पावसाच्या गारव्यानं रंगलेलं कोवळं उन्ह, हवेच्या झुळकेने मधून मधून डोलणारे हिरवेगार सळसळते गवत अन् संध्याकाळची केशरी उन्ह हे सगळं अनुभवतांना गदगदून येत असे.
वावरात कुठेतरी कॉवऽऽ कॉवऽऽ करीत सारे कावळे एका जागी येऊन बसत. जणुकाही त्यांची महत्वाची मिटींग भरली की काय असे ते दृष्य असायचे. डोमकावळा काळा कुळकुळीत, अंगाबांध्याने सुदृढ व क्वचीत दिसायचा. इतर कावळ्यांना काही वाण नव्हती.
खेड्यात पाउस-पाण्याचा अंदाज घेणारेही काही महाभाग होते. ते वातावरणातील उकाडा, वाहणारा किंवा कुंद वारा, त्याची वाहण्याची दिशा, मुंग्या-माकोडे व चिमण्या-कावळे-पाखरांची हालचाल यावरून कमी-जास्त पावसाचा अंदाज बांधत.
शेतकरी पावसाळ्यात खरिप तर हिवाळ्यात रब्बी पिकांचा हंगाम घेतात. कधी सततचा पाउस, तर कधी जोराचा, तर कधी सरीचा वर्षाव, तर कधी झड असं पावसाचं रुप असतं. मध्ये पावसाची उघडदिप पाहिजे असते; तेव्हाच पाण्याचा निचरा होवून पिकाची वाढ होत असते. झडीमुळे सुर्य झाकलेला असतो. सूर्य किरणापासून झाडांची पाने पोषक द्रवे घेतात, पण झ्डीत ते घेउ शकत नाहीत. म्हणून पिकं खुरडतात. पिवळे फटक पडतात.
पावसाचे अनेक रुप आणि तर्हा आम्ही पाहत होतो. रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रात पडणारा तर्हेवाईक पाऊस दिसायचा, आला तर भरपूर नाहीतर अजिबात नाही असा
तो !
पुनर्वसू या नक्षत्रात पडणारा पाऊस हा जोरदार, मुसळधार व जोशपूर्ण असायचा म्हणून त्याला तरणा म्हणायचे तर पुष्य नक्षत्रात पडणारा पाऊस हा सारखा पण रिमझिम पडणारा. शेतीसाठी फारसा उपयोगाचा नसणारा. त्यात जोश नसणारा म्हणून त्याला म्हातारा म्हणायचे.
मघा या नक्षत्रात कधी खूप पाउस पडायचा. नाहीतर काहीच नाही. असं विचित्र नक्षत्र ! म्हणून लोक म्हणायचे, ‘ना लागती मघा त वर्त बघा, नाही त चुलीपाशी हागा.’ कधी इतका पाउस पडायचा की, हागायाला बाहेर जाणे पण मुश्कील होत असे. मग हा पाऊस जोरदार कडाडणारा, त्रास देणारा म्हणून सासूचा पाऊस तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस शांतपणे व शेतीला उपयोगी असतो. म्हणून सुनांचा पाऊस असे म्हणत.
उत्तरात पाउस बरसला की, ‘बरसल्या उत्तरा, भात न् खाये कुतरा.’ असे म्हणत. म्हणजे इतका विपुल धान पिकायचा.
हस्त नक्षत्रात पडणारा पाऊस हत्तीचा, शेतीला उपयुक्त असणारा. म्हणून ‘पडतील हस्त तर शेती होईल मस्त’ असे म्हटले जात होते.
चित्रा नक्षत्रात पडणारा पाऊस शेतीचे नुकसान करणारा तर स्वाती नक्षत्रात पडणारा पाऊस मस्तच असणारा. म्हणून ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ असे म्हटले जात होते.
आषाढ-श्रावणातली पोळ्याच्या जवळपासची पावसाची झड तर भारी जड जायची. बाहेर दिवसरात्र थुईथूई पाऊस पडायचा. कित्येक दिवस सूर्याचं दर्शन होत नसे. बाहेरचा कामधंदा मंदावून जात असे. मजुरांच्या मजुर्या पडायच्या. जेवणाचे फाके पडायचे. घरात सारखं कोंडून राहावे लागे.
पावसाची वावसळ आल्याने घरा-दारात सर्वीकडे चिकचिक राहात होतं. घराच्या भिंतीच्या आतून ओलावा झिरपत होता. चिखलाचे पाय घेउनच घरी यावे लागत होते. पावसाची पिरपिर, भिजलेली माती, घरात सर्वत्र आलेली ओल, चिकचिक, ओले कपडे, त्याचा कुबट वास यामुळे जीव गुदमरून जात असे. थंडीने अंग थाटरुन जायचं. मग चुलीत जाळ करुन शेकत बसावे लागे.
घरातला दाळदाणा सरुन जायचा. वावरातून अशीच एखादी काटमाट्याची, चरोट्याची किंवा मसाल्याचे पाने आणून त्याला वाफलून, तिखट मिठ टाकून खावून दिवसं कंठावे लागत असे. मुठभर पीठ असलं, तर त्याच्या भाकरी थापायच्या. ज्वारी भरडून कण्यासोबत खायच्या. आंबिल घाटा खायचा. कसेतरी कास्तकारांकडून उधार-उसणवारी करुन दाळ दाणा आणून आपले पोट भरावे लागत असे; किंवा उपास-तापास करुन कढ काढावे लागत असे. अशी झड कधी कधी एक-एक महिना राहत होती. तरीही झड काही केल्या थांबत नसे. तेव्हा कास्तकार-मजुरांचे हाल पाहावल्या जात नव्हते. घराच्या बाहेर पडणं मुष्किल व्हायचे.
पिके पिवळे फटक पडत. त्याची वाढ खुंटून जात. रोगाला बळी पडत. गवताचं टोंगळाभर पीक उगवून येत. ओला दुष्काळ पडायचा. कास्तकारांची शेती म्हणजे बिनभरवशाची ! कधी निसर्ग पाऊस झोडून ओला दुष्काळ तर कधी हुलकावणी देऊन कोरडा दुष्काळ पाडत होता. कधी रोगराई, तर कधी कीड. कधी पूर तर कधी गारपीट. कधी अतिउन्ह तर कधी अतिथंडी. एखाद्यासाली जरी निसर्गाने साथ दिली, तरी व्यापारी आणि सावकार त्यांना लुटायचे सोडत नव्हते. सरकार तर त्यांच्या दुखण्यावर कधी फुंकर घालीत असल्याचे दिसले नाही.
गावां-वावरातल्या विहिरी पाण्याने तुडूंब भरुन जात. हातानेच पाणी भरता येत होते. माझ्या मोठ्या-आईच्या अंगणातून जमिनीला कठ्ठा फुटून पाझार लागला होता. असा पाण्याचा झरा वाहतांना पाहून गंमतच वाटत होती. वावरातही त्यावेळी पाणी साचून राहत असे. दलदल तयार व्हायची. टोंगळ-टोंगळभर गाडण होत होतं. वावरात पाण्याचे झरे व चिलक्या तयार होत असे.
अशा या झडीत वाट तुडवतांना नुसता चिखल-गाटाच नाहीतर काटेही तुडवत जावे लागत होते. चिखलातील छो्ट्या-मोठ्या दगडावर पाय ठरत नसे. कसंतरी कसरत करीत शरीराचा तोल सांभाळत जावे लागत असे.
अशी ही पिरिक-पिरिक पावसाची झड कधी संपते, याचीच आम्ही वाट पाहत राहायचो.
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
मी निळोणा या गावाच्या शाळेतून चौथा वर्ग पास झाल्यावर पुढील शिक्षण कसं होईल याची आई-बाबा, दादांना चिंता लागली होती. कारण निळोण्याला पाचवी नंतरच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था नव्हती.
एकदा उन्हाळ्यात, यवतमाळच्या बाजारात बकूबाई-आत्यासोबत बाबाची भेट झाली. ती यवतमाळ जवळ असलेल्या उमरसरा या गावला राहत होती. उमरसर्याला बकूबाई व सखूबाई अशा दोघ्या बहिणी राहत होत्या. त्या माझ्या बाबाच्या चुलत नात्यामध्ये बहिणी लागत होत्या.
तिच्याकडे बाबाने आम्हा दोघा बहीण-भावाच्या शिक्षणाची गोष्ट काढली.
‘माझ्याकडे ठेव नं मामा.’ सुभद्राबाई हीने सुचवीले.
सुभद्राबाई ही आत्याची मोठी मुलगी. ती आत्यासोबत बाजारात आली होती. ती आत्याच्या घराजवळच उमरसर्याला राहत होती. तिचे लग्न झाले होते. आमचा राहण्याचा प्रश्न आता मिटला होता.
उमरसर्याला राहून मी पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले.
हे गाव यवतमाळ शहराचं शेवटचे टोक संपल्यानंतर एखाद्या मैलावर होतं.रस्त्यात एक लहानसा नाला अडवा वाहत जात होता. पावसाळ्यात त्या नाल्याला पाणी असायचे. उन्हाळ्यात आटून जायचा. त्या नाल्याच्या दोन्ही कडेला उंच-खोल अशी जमीन पसरलेली होती. अंधार पडला की या रस्त्याने जायला भीती वाटायची. गाव पण अंधारात आकंठ बुडून जायचं. घराघरात पेटवलेल्या मिणमिणत्या दिव्यांची किरणे तेवढे अंधाराला भेदून रस्त्यावर येवून पडत.
सुरुवातीला आम्ही सुभद्राबाईकडे राहत होतो. त्यानंतर आम्ही लहान आत्याकडे राहायाला गेलो. आत्याचे मुलं शामराव-सोपान व मुलगी महानंदा व सुना फुलनबाई-पारवताबाई असे सर्व एकाच घरात एकत्रीतपणे राहत होते.
तेथून आम्ही मोठ्या आत्याच्या एका खोलीत राहिलो. तिला पण दोन मुलं होते. एक वामन व दुसरा नामदेव.
त्यानंतर आम्ही बाबाने बांधून दिलेल्या एका लहानशा झोपडीत गेलो. ही झोपडी सोपान-दादाच्या घराच्या मागच्या पडवीत बांधली होती. या झोपडीत केवळ तीन-चार माणसे दाटीवाटीने झोपतील एवढीच जागा होती. बाबाने गावावरुन बैलगाडीने लाकूड-फाटा आणला होता. यवतमाळहून आणलेल्या बांबूच्या तट्ट्यावर पळसाच्या पानाच्या डाहाळ्या टाकून व्यवस्थितपणे साकारले होते. तसेच आरामशीन वरुन आणलेल्या पाट्याचा कवाड बनविला होता. त्या झोपडीत एका कोपर्यात मातीची चूल टाकून दिली. त्या चुलीला आडप करण्यासाठी मधात एक कुडाची भिंत टाकली. झोपडीच्या चारही बाजुच्या भिंतीला पळसाच्या काड्या लाऊन त्याला शेण-मातीने लिपून घेतले. अशा पध्दतीने बाबाने आमच्यासाठी एक सुंदरसं झोपडं बांधून दिलं होतं.
बाई माझ्यापेक्षा मोठी असल्यामुळे साहजिकच घरातील कर्ता म्हणून प्रपंचाची सारी जबाबदारी तिच्यावर आली होती. जे वय खेळण्या-बागडण्याचं असते; त्या वयात घर सांभाळण्याचं ओझं बाईच्या अंगावर येऊन पडलं होतं.
मी त्यावेळेस पाचव्या वर्गात शिकत होतो. यवतमाळ शहरातील म्युनिसिपल हायस्कूल या शाळेत मला बाबांनी नुकतेच टाकले होते.
वर्ग चालू असतांना चपराशी आला.
‘जुमळे कोण आहे ?’ मी ऊभा राहीलो.
‘तुला बाबुने बोलावीले.’
मी ऑफीसमध्ये गेलो. बाबुने मला एक फॉर्म दिला.
‘तुझ्या बाबाची सही उद्याच्या उद्या आणून दे.’
तो फॉर्म स्कॉलरशीपचा होता. वर्षाला पंधरा रुपये मिळणार होते. मागास जातीतील ज्यांना चौथ्या वर्गात चांगले मार्क्स मिळालेत, त्यांना ही सरकारची स्कॉलरशीप मिळणार होती. आमच्या शाळेत मी व दुसरा एक धोपे नांवाचा धोब्याचा मुलगा होता. अशा दोघांची ह्या स्कॉलरशीपसाठी निवड झाली होती.
मी पाच वाजता शाळा सुटल्यावर घरी आलो. घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. दप्तर खुंटिला अडकवून ठेवले.
‘बाबाच्या सहीसाठी गावला जात आहे.’ मी बाईला सांगितले.
माझ्या मोठ्या बहिणीचे नाव जनाबाई. तीला मी ‘बाई’ असेच म्हणत होतो. खेड्यामध्ये ‘ताई’ ऎवजी ‘बाई’च म्हणत. ती माझ्यापेक्षा मोठी होती. परंतु शिक्षणामध्ये माझ्यापेक्षा एका वर्गाने मागे होती. कारण तिला माझ्यानंतर शाळेत टाकले होते. माझा लहान भाऊ अज्याप याला राखण्यासाठी तिला ठेवले होते.
‘रस्त्यातच तुला अंधार होईल. मग कसा जाशील रे अंधारात?’
‘पण बाबाची सही उद्याच्या उद्या आणून द्यायची आहे ना?. अंधार पडला तरी जातो मी. सकाळी लवकर येईन.’ असे म्हणून मी तडक निघालो.
माझे खेडेगाव तीन-साडेतीन कोस दूर होते. त्यावेळेस गावला जाण्यासाठी पायी जाण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता.
रस्ता चांगला नव्हता. लहान-मोठे दगडं, माती-मुरमाटीचा असा तो कच्चा रस्ता होता. परंतु तो लहानपणापासून नेहमीचा जाण्या-येण्याचा असल्यामुळे अंधारात सुध्दा रस्ता चुकत नव्हता. इतकी ती वाट मळलेली होती.
झाडांझुडपातून, जंगलघाटातून, उतार-चढावातून, शेताच्या उभ्या पिकातून जाणारा… शेताच्या धुर्याधुर्याने जाणारा…,बैलगाडीच्या चाकोरीने तसेच बरडाच्या काठा काठाने जाणारा… घाटाच्या खाली. गोधणी… त्यानंतर निळोणा… मग माझं गाव चौधरा…
शेतातील काही पिके माझ्या कंबरेपर्यंत तर कुठे कुठे माझ्या उंचीएवढे वाढले होते.
सूर्य बरडाच्या आड लपत लपत खालच्या बाजूने हळूहळू सरकत चालला होता. त्याचे लालसर किरणे तेवढे दिसत होते. त्याचे अस्तित्व संपत चालल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती. हळूहळू त्याची जागा अंधारलेला काळोख आपल्या कवेत घेत होता. वारा निस्तब्ध झाला होता. पाखरं मोठ-मोठ्या झाडावर रात्रीच्या राहुटीला एकत्र जमले होते. त्यांचा बर्याच वेळापासून चाललेला किलबिलाट आता मंद होत चालला होता.
जस-जशी झाकट पडत चालली, तस-तसे माझ्या अंगावर अनामिक भीतीचे काटे उभे राहत होते. कशीतरी हिम्मत करुन मी निघालो खरा, पण आता अंधाराच्या जाणिवेने माझे सर्वांग शहारत चालले होते. हृदयाच्या ठोक्याची गती वाढतच चालली होती. छाती घाबरल्यामूळे धडधड करत होती. ती काळीकूट्ट अंधारी रात्र असल्याचे आता तीव्रतेने जाणवत होते. अमावस्या असावी कीं काय असे वाटत होते.
नाला आला की, जीवाची उलघाल होत होती. कारण काठाच्या अलीकडे व पलीकडे निमुळता व चिखल-पाण्याचा घसरता रस्ता होता. आजूबाजूच्या गवताने व पालवीने तो रस्ता झाकून गेला होता. पाय घसरुन पडू नये म्हणून पायाच्या बोटाची नखे ओल्या मातीत रुतवून हाताने जवळच्या पालवीला पकडीत होतो.
शेत ओलांडल्यावर रस्त्याच्या आजूबाजूला गर्द झाडी अन् मग नाला लागला. दिवसा निखळ आनंद देणारी पाण्याची खळखळ आता मात्र अंधार्या रात्रीत नकोशी वाटत होती. रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज शांतता भंग करुन अंधाराला सोबत करीत होता. कुठे खुडखूड वाजले, की अंगावर सरसरुन काटे उभे होत. मध्येच एखाद्या पाखराच्या फडफडण्याचा आवाज दुरुन ऎकू येत होता.. कधी कधी पाखरांच्या गुंजण्याचा आवाज मंजूळ वाटत होता तर कधी भेसूर वाटत होता.
मला प्रश्न पडायचा की, या पाखरांना अंधार्या रात्रीची भीती का वाटत नाही? माणसांनाच का वाटते? दिवसा किंवा उजॆड असतांना आपण ज्या रस्त्याने जातो, त्या रस्त्याची जेवढी भीती वाटत नाही, त्यापेक्षा त्याच रस्त्याची रात्रीला आणखी भीती वाटते. असे का ?
लहान-मोठ्या झाडा-झुडपाच्या सावल्या विचित्र दिसत होत्या. कोणीतरी उभे आहे का असे वाटत होते. जवळ गेल्यावर ती सावली असल्याचे लक्षात येत होते. कधी मध्येच काजवा ऊजेडाची उघडझाप करीत चमकून जात होता. थोडासा का होईना त्या अंधारात एखाद्या बिघडलेल्या बंद चालू होणार्या बॅटरीप्रमाणे उजेड पाडून जात होता. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार वाटत होता.
मला विंचु-काट्यांची, सापाची किंवा हिंस्त्र पशु-पक्षांची जेवढी भीती वाटत नव्हती, त्यापेक्षा भुता-खेतांची, चकव्या-लावडिनीची जास्त भीती वाटत होती. कारण अशा भीतीदायक गोष्टी लहानपणापासून खूप ऎकल्या होत्या. त्या मनाच्या एका कोपर्यात घट्ट जाऊन बसल्या होत्या. अशा भयान रात्रीला त्या हमखास बाहेर यायच्या. मग भीतीने आणखीनच कापरे भरायचे. अशा गोष्टींमध्ये काहीच तथ्यांश नसते, हे त्यावेळी मला काहीच कळत नव्हते. भगवान बुध्दांचा आत्मा नाकारणारा अनात्मवादाचा सिध्दांत व भुता-खेतांसारख्या गूढ, अद्भूत व चमत्कारिक गोष्टीला नाकारणारा, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही; असा कार्यकारणभाव किंवा प्रतित्य समुत्पादाच्या सिध्दांताचे ज्ञान त्यावेळी मला झाले नव्हते.
एक-दीड कोस मी चालून आलो असेन. शेतातल्या पायवाटेने जीव मुठीत घेऊन चाललो होतो. गोधणी गावच्या कोलामाचे, मोहाच्या झाडाचे ते शेत म्हणून ओळखले जात होते, त्या शेताच्या मधोमध मोहाच्या झाडाजवळून पायवाट जात होती. पायवाटेच्या दोन्हीही बाजूला ज्वारीचे धांडे माझ्या उंचीएवढे वाढले होते.
मी एवढ्या रात्री येण्याची इतकी हिंमत करायला नको होती, असे मला राहून राहून वाटत होते.
आतापर्यंत केवळ अर्धीच वाट चालून आलो असेन. आणखीन तेवढेच दूर जायचे होते. अजून निळोणा हे गाव यायचे होते. या गावला माझे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले होते.
त्यांतर वाघाडी नदी, बापरे ! त्या नदीतून कसा जाईन? खळखळ वाहणारी व मोठे पात्र असलेली भयावह नदी. तिच्या आलीकडील व पलीकडील काठाला मसणवटी. तिच्या थोडे दूर खालच्या बाजूला खोल असा डोह. तो डोह… तो चकवा… माझं सर्वांग शहारुन गेलं आणि अंगावर सरसरून काटे उभे राहिले. छाती धडधड करायला लागली. माझे पाय लटपटा कापायला लागले. परत जावे की काय, असाही विचार मनात चमकून गेला. पण बाबाची सही… काय करावे काही कळत नव्हते. ‘पुढे बसलो तर धूर जड अन् मागे बसलो तर सुलार!’ अशी माझी विचित्र गत झाली होती. तरीही मनाचा हिय्या करुन मी पुढे पुढे सरकत चाललो होतो.
एवढ्यात मला दुरुनच धियाऽऽ धियाऽऽ असा अस्पष्ट आवाज ऎकू येऊ लागला. मी त्या आवाजाचा कानोसा घेण्यासाठी क्षणभर थबकलो.
त्याच वेळेस पुन्हा एकदा त्या चकव्याची आठवण झाली. तो म्हणे असाच कोणत्यातरी रुपात येत असतो. आपल्यासोबत गोड गोड बोलून नदी काठावर घेऊन जातो व डोहात ढकलून देतो.
आमच्या गावात अशीच एक गोष्ट घडून गेल्याचे सांगत होते. एका नवरदेवाला रात्रीला उठवून त्याला वाघाडी नदीवर नेले होते. तेथे त्याचे कपडे काठावर उतरवून त्याला डोहात ढकलून दिले होते. खरं काय न् खोटं काय कोण जाणे!
या आठवणीने मी पार हादरून गेलो होतो. तोंड सुकून आले होते. तरीही मी आवाजाचा कानोसा घेत थबकत थबकत चालू लागलो. आता तो आवाज थोडा स्पष्ट होत जवळ येऊ लागला. चकव्याची भीती थोडी कमी झाली होती. माझ्या घाबरलेल्या जिवात जीव आल्याचे जाणवत होते. परंतु पायवाटेच्या समांतर चाललेल्या बैलगाडीच्या वाटेने तो आवाज येत होता. पुढे ह्या दोन्हीही वाटा एकत्र येऊन मिळणार होत्या. म्हणून मी झपाझप पाऊले टाकत चालायला लागलो. नाहीतर ती व्यक्ती पुढे निघून जाईल व पुन्हा मला एकट्यालाच त्या अंधार्या रात्री मार्ग तुडवत जावे लागले असते.
जेथे दोन्हीही रस्ते एकत्र येत होते तेथे मी येऊन थांबलो. ती व्यक्ती जवळ येऊ लागली. तसा तो एकदम थांबला. एवढ्या रात्री कोणी येथे उभा असेल याची त्याला कल्पना नव्हती. मला पाहून तोही घाबरुन गेला असावा.
‘कोण आहे रे ?’ असे दरडावून मला विचारले.
‘मी, रामराव.’
‘कोंड्यामामाचा कुंडा का रे? अरे बापरे, एवढ्या रात्री कसा तू ?’
‘हो, कामच होतं तसं. बाबाच्या सहीचा कागद उद्या शाळेत नेऊन द्यायचा आहे. म्हणून शाळा सुटल्यावर निघालो, पण अंधार पडला.’
‘बरं झालं, मी भेटलो, नाहीतर तू एकटा कसा गेला असतास, कुणास ठाऊक?’
धर्मा लभान. तो माझ्याच गावचा निघाला. त्याने त्याचा बैल दवाखान्यात नेला होता. दवाखाना करता करता उशीर झाला. त्यामुळे त्यालाही निघायला रात्रच झाली होती. तसे अंधारात जायची या लोकांवर नेहमीच पाळी यायची.
‘शाळा शिकायला किती कष्ट घ्यावे लागतात ! नाही, का ? पाहा ना, आमचे लभान लोक पोरांना शाळेत धाडत नाहीत. कोणी टाकले, तर ते शाळेत जात नाहीत. असे बयताड आहेत. तू मात्र किती आटापिटा करुन शिकत आहेस ! शिक बाबा. आपल्या गावचं नाव कमावून दाखव म्हणजे झालं.’
मी त्याच्या मागे मागे चालत होतो. त्याच्या सोबत बैल असल्यामुळे त्याला बैलगाडीच्या रस्त्यानेच चालावे लागत होते. पायवाट तरी बरी होती. त्यापेक्षा हा बैलगाडीचा रस्ता म्हणजे आणखीनच त्रासदायक होता. अनवाणी पाय कधी खड्ड्यात पडायचा. तर कधी ठेचाळत जायचा. निळोणा गावापासून ते वाघाडी नदीपर्यंतचा रस्ता तर निव्वळ गोटाळीचा होता. आम्ही निळोण्याला शाळेत यायचो, तेव्हा येवढा रस्ता पार करायला आमचा नाकीनऊ जीव यायचा.
तो खेडूत शेतकरी असल्यामुळे तो झपाझप लांब टांगा टाकत चालत होता. मला त्याला गाठायला त्या अंधार्या रात्री कधी कधी दुडक्या चालीने चालावे लागत होते. गाव जवळ आले, की हागदोडी-पांदण लागायची. पाय केव्हा एखाद्या पोवट्यावर पडेल याचा काही नेम नव्हता.
शेवटी गावात आलो. बाहेरून आवाराच्या कवाडाची कडी वाजवली. बाबाने कवाड उघडलं. हातातला कंदील वर घेऊन पाहायला जवळ आला. मला दारात पाहून दचकलाच.
‘अरे बाबू, तू कसा काय एवढ्या रात्री…?’
‘मी गोधणीच्या मोहाच्या वावरापर्यंत एकटाच आलो. मग धर्मा लभान भेटला. त्याच्याबरोबर आलो.’
‘एवढ्या रातच्यानं कशाला आलास गा. आला असतास सकाळ-वकाळ.’ ‘स्कॉलरशीपच्या फॉर्मवर तुमची सही पाहिजे होती ना ? तो उद्याच शाळेत नेऊन द्यायचा आहे. म्हणून आलो.’
‘आता ही काय भानगड…?’
‘मला आता दर वर्षाला पंधरा रुपये मिळणार आहेत. त्याला स्कॉलरशीप म्हणतात.’
‘हो बाबा, आपल्या आंबेडकर बाबांनी तुझ्यासारख्या हुषार मुलांना खूप शिकता यावे म्हणून मोठ्या पुण्याईचं काम केलं. ते खूप शिकलेत. मोठे झालेत. तू पण तसाच शिकून मोठा हो.’
दुसर्या दिवशी सकाळी बाबांने मला रेंगीने उमरसर्याला आणून दिले. कारण त्यादिवशी शनिवारी सकाळची शाळा होती.
मी व बाई रविवारी गावला आलो, की बाबा सोमवार्या दिवशी सकाळीच कोंबड्याच्या पहिल्या बागेला रेंगी जुतायचा. त्यावेळी कधी दाट किंवा विरळ धुक्याने अंधूक झालेल्या चंद्र-तार्यांच्या उजेडात गुलाबी बोचर्या थंडीने कुडकुडत आम्ही निघत होतो. माझी शाळा जरी अकरा वाजताची असली तरी बाईची शाळा सकाळची असल्यामुळे मला त्यांच्या सोबत फरफटत यावे लागत होते.
त्यानंतर मी कानाला खडा लावला. कोणत्याही फॉर्मवर बाबाची सही घेण्यासाठी कधिही गावला गेलो नाही. कारण मीच बाबाची सही चांगली घोटून घोटून शिकून घेतली होती. त्यामुळे मीच प्रत्येक वेळी त्यांची खोटी खोटी सही करत होतो. त्यांची खोटी सही करण्याचा वारंवार गुन्हा माझ्या जीवनाचा तेव्हापासून अविभाज्य अंग बनला होता.
एकदा बाबा मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीत काम करणारे, साहेबराव शिरसाट यांच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. ते त्यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. अशा लोकांबद्दल बाबांना फार ओढ असायची. त्यांच्या पासून मला शिक्षणाची प्रेरणा मिळावी असा त्यांचा उद्देश असायचा. मी संकोची वृतीचा असल्यामुळे मला मात्र अवघडल्यासारखे होत असे. त्यांनी मला खूप शिकण्याचा उपदेश केला होता.
खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार माझ्या बाबांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मजबूत पायाभरणी केली होती, ही गोष्ट मी कधिही विसरु शकत नाही. कारण याच मजबूत पायाच्या आधारावरती माझ्यानंतर येणारी पिढी निश्चितच शिक्षणाची भव्य-दिव्य इमारत उभी केल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढेच खरे होते !
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
उमरसर्याला बाहेरच्या गावचे मुले कुणाच्या नाही कुणाच्या तरी घरी शिक्षणासाठी राहत असत. खेड्यातील मुलांनी शहरात येऊन उच्च शिक्षण घ्यावेत; असं उमरसर्याच्या लोकांच उदात्त धोरण होतं. म्हणून राहण्याची व कुणाकुणाची जेवणाची सुध्दा व्यवस्था करीत असत. ते आम्हाला फार आपुलकीने व जिव्हाळ्याने वागवून सर्वोतोपरी मदत करीत असत. मला तर हे गाव एखाद्या कुटुंबासारखं वाटत होतं. आमच्या गावासारखं भांडण-तंटा झाल्याचं मी या गावात पाहिलं नाही.
आमचं जीवन घडविण्यामध्ये या उमरसरावासीय लोकांचा फार मोठा सहभाग आहे.
कोळंबी गावचा पांडूरंग-दादा कॉलेजचं शिक्षण घेत होता. तो उमरसर्याला अन्नपूर्णाबाईच्या घरी राहायचा. तिच्या घरचे म्हणजे आई-कौसलबाई, भाउ-विक्रम त्याला घरच्या सारखेच – आपुलकीने वागवित असत.
चिखली गावचा परशराम-दादा हा पण कॉलेजला शिकत होता. तो चोखोबा-दादाच्या घरी राहत होता.
महादेव, नाना हे सुध्दा कुणाकडे तरी राहत होते. महादेव हा छान गाणे म्हणायचा. मेहराबादचा श्रीराम व घारफळचा काळुराम हे दोघेही आमराईतल्या उमरसर्यात राहत होते. स्वयंपाक-पाण्यासाठी श्रीरामची आई होती. त्यांच्यासोबतच माझ्या मावस बहिणीचा मुलगा अर्जुन सहावीत शिकायला होता. श्रीरामची आई म्हणजे अर्जुनची सख्खी आत्या
एकदा तो, मी व माझी बहीण जनाबाई गावला जात होतो. आम्ही भगवानच्या वावरापर्यंत आलो होतो. बैलगाडीचा रस्ता संपल्यावर भगवानच्या वावरातील पायवाट लागत होती. त्या वळणावर अर्जुनचे बाबा आमच्या समोर अचानक येऊन टपकला.
आम्ही त्यांना दाजी म्हणत होतो. त्यांचा एक हात मनगटापासून मुडपलेला होता. लहानपणी त्यांचा हा हात मोडला होता, असे आम्ही ऎकले होते.
‘का रे… का आलास? मी तुला सांगितलं होतं ना की घरी येत नको जाऊ म्हणून…तरीही आलास ?’ असे दरडावून अर्जुनला बोलला.
त्याच्या उत्तराची वाट न पाहतां त्यांनी हातातल्या छत्रीनेच अर्जुनला बदडायला सुरुवात केली. त्यांनी इतके मारले की आमच्या डोळ्यातून आसू ओघळायला लागले. आम्ही दोघेही बहीण-भाऊ ‘मारु नका दाजी…’ असे म्हणून विनवणी करत होतो. पण त्यांचा हात काही केल्या आवरत नव्हता. शेवटी मारुन मारुन त्यांच्या छत्रीचा दांडा तुटून गेला ! इतका मार खाऊनही अर्जुनच्या डोळ्यातून तसुभरही थेंब बाहेर पडला नाही ! बिच्चारा…! मुकाट्याने बापाचा मार खात होता.
‘बहीण-मायमी…! हा लेकाचा सारखा घरी येतो…तिकडे त्याची शाळा पडते… चांगलं मन लाऊन शिकत नाही… त्याला म्हणलं, घरी येत नको जाऊ… पण ऎकत नाही… त्याला रट्टॆच पाहिजे.’ असं म्हणून पुन्हा धुंड्या हाताने मारत होता.
शेवटी मारुन मारुन थकला की काय, तोंडाने बडबड करत यवतमाळच्या रस्त्याने जातांना, ’त्याच्या काय हाडावर चोट आहे ?.’ असं काहीतरी पुटपुटणं त्यांच्या वैतागलेल्या तोंडातून ऎकू आले होते. मी त्या प्रसंगाने धास्तावून गेलो होतो. निस्तब्ध मनानेच आम्ही तिघेही घरी आलो.
तेव्हापासून त्याने शाळा सोडून दिली ती कायमचीच ! तीन-चार महिनेच फक्त तो शाळेत गेला होता. आत्याला पुरेसे पैसे व दाळ-धान्य त्याचा बाबा देत नव्हता. म्हणून ती सारखी अर्जुनच्या मागे कटकट लावत होती.. अर्जुनच्या बालमनाला ते सहन होत नव्हतं. म्हणून तो सारखा घरी येत होता. बापाला सांगायचा; पण बाप काही मनावर घेत नव्हता.
म्हणून त्याने .बापाच्या विरुध्द बंड पुकारले होते; पण नुकसान कोणाचे झाले ? आई-वडील थोडेच आयुष्याला पुरतात ? त्याने बापाच्या रागावर शाळा सोडून आपल्या जीवनाचं मातेरं केलं ! त्याचं अंधकारमय झालेलं भवितव्य आणखीन काजळत जाणार होतं, यात काही शंकाच नव्हती ! तो असहाय झाल्यासारखा दिसत होता. आयुष्याच्या या वळणावर खरं म्हणजे त्याला उभारी मिळायला पाहिजे होती. तो शिक्षणापायी उबगला की त्याला भविष्याची जाणीव नव्हती असं काही म्हणता येणार नाही, कारण तसा तो हुशार होता. त्याची स्मरणशक्ती दांडगी होती. पण त्याला कोणी समजून घेतलं नाही, असंच म्हणता येईल. काय नेमकं झालं कुणास
माहीत ? पण शाळा सोडल्यावर बापाने त्याला जे शेतीला जुंपलं; ते कायमचं त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत चिकटून गेल !
आम्हाला परशराम-दादा, पांडूरंग-दादा व हरिदास-दादा गणितं सोडवून द्यायला मदत करीत असत. ते आम्हाला अभ्यासामध्ये मार्गदर्शन सुध्दा करायचे. हरिदास-दादा तर परीक्षा जवळ आली, की आम्हाला सोबत घेऊन अभ्यास करायचा. कधी कधी मी त्याच्या घरी जाऊन अभ्यास करत होतो.
तो अभ्यास करण्यासाठी आम्हाला उमरसर्याच्या पलीकडील जंगलात घेऊन जायचा. तेथील झाडाच्या सावलीत किंवा एखाद्या मोठ्या झाडावर चढून एकांतात अभ्यास करत होतो. जवळूनच झुळझुळ पाण्याचा प्रवाह वाहत जात होता. तेथे आम्ही थंडगार पाणी पिऊन मन शांत करत होतो. तो नैसर्गिक परिसर पाहून आम्ही सुखावून जात होतो.
आम्ही रात्रीला प्रल्हादच्या घराच्या अंगणात बसून कंदिलाच्या उजेडात अर्ध्या रात्रीपर्यंत किंवा कंदिलातील तेल संपेपर्यंत अभ्यास करत होतो. मान वाकवून खाली पाहत पुस्तक वाचावे लागत असे. तेथेच अंगणात पुस्तक डोक्याच्या खाली घेऊन झोपत होतो. पुस्तक उशाला घेऊन झोपल्याने त्यातील अभ्यास आपोआप डोक्यात घुसत असते, असा त्यावेळी समज होता. सकाळी पुन्हा उठून अभ्यासाला भिडत होतो.
त्यावेळी एका सिनेमातील गाणे नेहमी लागायचे. त्या गाण्याच्या चालीवर आम्ही पण गमतीने म्हणत होतो.
‘अभ्यास करनेके लिये, हम सारी रात जागे।
अल्ला जाणे, क्या होगा आगे।।
उमरसरा हे एक लहानसं गाव यवतमाळ शहराच्या अर्ध्याक मैलावर जरी लागून होतं; तरी एखाद्या खेड्यासारखंच वाटत होतं. तेथील घरे भिंती-कुडाचे, कवेलू-टिनाचे होते.
गावातील सर्व घरं बौध्दांचे होते. फक्त एक घर मुसलमान तेल्याचं होतं. त्याचेकडे दुकान होत. पटकन लागणारं सामान आम्ही तेथून आणत होतो. बाकी बाजार हा यवतमाळचाच राहत होता.
यवतमाळला जातांना बदाडात एक विहीर होती. तिचं तोंड उंच होतं. पण पावसाळ्यात तेथून पाणी वाहत असल्यामुळे ही विहीर तुडुंब भरुन जात असे. मग आम्ही बादली विहिरीवर घेऊन न जाता केवळ गुंड बुडवून पाणी आणीत होतो.
तेथील पाणी आम्ही पिण्या-धुण्यासाठी वापरत होतो. कपडे धुण्यासाठी त्याच विहिरीवर येत होतो. शाळेचे कपडे आम्ही रविवारी सकाळी धूत होतो. त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे तेथे कपडे धुण्यासाठी गर्दी होत असे.
उमरसर्याच्या पलीकडे शहरात जातांना पहिल्यांदा एक कॉलेज लागायचं त्याला दातेचं कॉलेज म्हणत असत. कॉलेजचे मुले कवायत करायला उमरसर्याच्या नाल्याजवळील मैदानावर येत असत. आम्ही ते पाहण्यात गूग होत होतो.
उमरसर्याला आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात आमची परिस्थिती बर्यापैकी होती. त्यावेळी बाबा मामाची शेती वाहत होता. शेतीतील माल तो रविवारच्या बाजारात विकायला आणत असे. तेव्हा आम्ही दर रविवारी बाबाने बैलगाडीने आणलेला भाजीपाला विकण्यासाठी मदत करत होतो. ओरडून ओरडू्न बाजारातल्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यातही मजा वाटत असे. दांडी-पारड्याने भाजी गिर्हाईकाला मोजून देतांना मोठेपणाचा आव येत असे.
आई घरुन भाकर बांधून आणीत असे. बाबा मासळी बाजारात जाऊन भाजलेल्या मासोळ्या आणीत असे. आई त्याची छानशी टमाटे, कांद्याची पाल व हिरव्या मिरच्या चिरुन कच्चीच चटणी बनवित असे. मग आम्ही मस्तपैकी शिदोरी खात होतो. त्याचा स्वाद माझ्या जिभेवर बरेच दिवसपर्यंत तरळत राहत असे. मला या भाजलेल्या मासोळ्या तेव्हापासून फार आवडायला लागल्या होत्या.
बाजार ओळीच्या एका कोपर्यात करीमची चक्की होती. आमचे गावचे लोक दळण, भरडण याच चक्कीवर करीत असत. या चक्कीवर असंच एकदा बाईच्या पायाला पुराणी टोचली होती. दादाने यवतमाळला करीमच्या चक्कीवर धान भरडण्यासाठी आणले होते. ही चक्की बाजाराजवळ असल्यामुळे आमच्या गावचे लोक याच चक्कीवर येत असत. धान भरडून झाल्यावर तांदळाचे पोते गाडीवर टाकले होते. बाई पुराणीची काडी हातात घेऊन त्या पोत्यावर बसली होती. शामराव-दादा काहीतरी सामान आणायला गेला होता. बाई बसल्या बसल्या ती पुराणीची काडी खालच्या पोत्यावर टोचण्याचा खेळ खेळीत होती. असं करतांना एकाएकी ती पुराणी तिच्या पायाला वरच्या भागाला अंगठ्याजवळ टोचली. तिला भयानक वेदना होत होत्या. घरी आल्यावर शेक-निवा केला. परंतु तिच्या पायाचं दुखणं काही केल्या बसलं नव्हतं. ते पिकून आल्यामुळे तेवढी जागा टरटर फुगली होती. त्यामुळे ती जीवघेण्या वेदनेने तळमळत राहायची.
तिला दादाने सरकारी दवाखान्यात आणले. त्यांनी ती जागा बधिर न करता त्यातला पू हाताने जोरात दाबून पिळून काढला. असह्य वेदना होत असल्यामुळे बाई ढोरासारखी रडत होती. दादाने मग तिला हॉटलात नेऊन मटण खाऊ घातले होते. हे दुखणं पुन:पुन्हा उमळत असल्यामुळे तिला दोनक वर्ष तरी त्रास झाला होता.
एक वेडी बाई आमच्या दुकानाजवळ येऊन बसत असे. आई तिला तंबाखू, चुना द्यायची. अधिक टमाटे किवा काहीतरी खाण्यास देत असे. तसेच तिला पैसे पण द्यायची.
मी आईला विचारले, ‘आई, ही वेडी का झाली? ती सारखी माह्या सोन्याऽऽ माह्या सोन्याऽऽ अशी का म्हणते.’
‘तिची एक कहाणी आहे, पोरा…’ आई कहाणी सांगायला लागली.
“ती एका खेड्यात राहात होती. नवरा मेल्यामुळे रांडमुड झाली होती. तिला एक आठ-दहा वर्षाचा एकुलता एक पोरगा होता.
एके दिवशी तो आईला म्हणाला, ‘माय, मी बाजारात जाऊन येतो.’
‘जा. पण बरोबर घरी ये सोन्या…’ त्याची आई म्हणाली.
‘हो.’ असं म्हणून तो दोस्तांसोबत निघून गेला.
बस… त्याचा तो शेवटचा आवाज तिने ऎकला. तेव्हापासून तो घरी आलाच नाही. म्हणून ती दर बाजाराला येथे येऊन भिरभिर पोराला पाहत असते व सोन्याऽ सोन्याऽऽ म्हणून हाक मारत असते. पोराच्या मायेपोटी ती वेडी झाली आहे.”
आमची परीक्षा असली, की आई स्वयंपाक करुन देण्यासाठी आमच्याकडे यायची. ती आली की आम्हाला मोठ्ठा आनंद व्हायचा. आईच्या उपस्थितीमुळे वातावरण किती प्रसन्न व आनंददायी व्हायचं, ते कसं सांगू ?
कधी कधी दादा शनिवारच्या दिवशी मुक्कामाने उमरसर्याला यायचा. घरचं कोणी असलं की आम्हाला फार बरे वाटत असे. दुसर्या दिवशी दादा सोपान-दादाच्या भागिनदारीत ऊस विकत घ्यायचा. मग मी पण त्याच्या सोबत बाजारात जात होतो. दिवसभर ऊस विकता विकता रात्र व्हायची.
दिवस बुडतीला जाऊन अंधार पडायला लागला की दिवसा फुललेला बाजार कसा ओस पडल्यासारखा वाटत होता. मग सायकलचा टायर जाळून त्याच्या उजेडाने काही मुलं बाजारात फिरत असल्याचे, तेवढे दिसत होते. भाजीपाला किंवा कुणाचे पडलेले पैसे मिळतात काय, याचा ते शोध घेत होते.
त्या दिवशी रात्रीला मग दादा, सोपान-दादा व त्याचा मोठाभाऊ शामराव-दादा असे तिघांची दारु पिण्यासाठी मैफल बसायची. सोबत मटणाचा बेत असे. बाजाराचा दिवस म्हणजे सार्वत्रीक मटणाचा दिवस ! त्या दिवशी मटणाचा घरोघरी खमंग वास यायचा.
आम्हाला अडचण येऊ नये म्हणून दादाने काही दुकानदारांना सामान उधारीवर देण्यासाठी सांगून ठेवले होते. भाट्याच्या दुकानात आम्हाला धान्य व इतर किराणा सामान उधार मिळत असे. तसेच मटणाचं दुकान असलेल्या एका लक्ष्मण नावाच्या खाटकाला सुध्दा त्याने मटण उधारीवर देण्यास सांगितले होते. मी केसाची कटींग सुध्दा सरोज टॉकीजसमोरच्या एका केशकर्तनालयाकडे उधारीत करत होतो.
उमरसर्याला असतांना कधी मुलांसोबत तर कधी हरीदासदादा किवा बाईसोबत मी सिनेमा पाहायला यवतमाळला जात होतो. त्यावेळी श्याम टॉकीज, राजकमल टॉकीज व सरोज टॉकीज अशा तीन टॉकीज होत्या. मला त्यावेळी सिनेमाची भारी आवड होती. पडद्याजवळच्या रांगेमध्ये बसून सिनेमा पाहत होतो. कारण या जागेच्या तिकीटचा दर इतर जागेपेक्षा कमी राहत होता.
त्यावेळी ताजमहाल, बेटी-बेटे, दोस्ती, आरजू, बुंद जो बन गयी मोती, मेरा साया, वक्त, गंगाजमूना असे काही सिनेमे मला फार आवडले होते.
सिनेमा पाहून आलो, की रात्रभर अन् सकाळी शाळेत जातांना सुध्दा त्या सिनेमातील संवाद, चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत असे. एखाद्या वेळेस वर्गात पण मनामध्ये त्या सिनेमाची राहून राहून उजळणी होत असे. अशावेळी शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष राहत नसे. मग पुन्हा भानावर येऊन तो चलचित्र विसरुन जाण्याचा प्रयत्न करावे लागत असे.
त्यातल्या त्यात ‘दोस्ती’ या सिनेमाने तर फारच भुरळ पाडली होती. या सिनेमात लंगडा – रामू आणि आंधळा – मोहन अशा दोघांची अतूट दोस्ती होती. लंगडा छान बाजा वाजवीत होता तर आंधळा गाणे म्हणत होता. भीक मागून तो लंगड्याला शिकवीत होता. अशी त्या सिनेमाची कथा होती. कितीही अडथळे आले तरीही थांबायचं नाही, अशी शिकवण त्या कथेने दिली होती.
त्याच्या बाज्यातील ती धून माझ्या कानात शिरून सारखा अंतरंगात झिरपत होता. मी त्यामुळे पुरता वेडापिसा झालो होतो. म्हणून मी पण बाजा विकत घेऊन सिनेमातील त्या लंगड्याप्रमाणे वाजवून पाहायला मोठा आसुसलो होतो, पण काही जमले नाही.
त्या सिनेमातील गाणे तर एकाहून एक सरस वाटत होते.
‘कोई जब राह ना पाये, मेरे संग आये, के पग पग दिप जलाये… मेरी दोस्ती मेरा प्यार…’
‘चाहूंगा मै तुझे सांज सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे, आवाज मै ना दुंगा.’
‘राही मनवॉ, दु:खकी चिंता, क्यो सताती है, दु:ख तो मेरा साथी है.’
‘गुडिया हमसे रुठी रहोगी, कब तक ना हसोगी, देखोजी… किरण कि लहराइ. आयी रे आयी हसी आयी…’
‘जाने वालो जरा, मुडके देखो मुझे, एक ईन्सान हु.’
असे हे भावनांना हेलावणारे गाणे माझ्या मनात सारखे रुंजी घालत असे.
अशाच भारावलेल्या अवस्थेत मी पण सिनेमाची कथा लिहून सिनेमा काढावा; असं स्वप्न रंगवत होतो. मी कल्पनेची भरारी मारून काही गोष्टी वहीवर लिहून पाहत होतो. पण जमले नाही.
एक गोष्ट मात्र मी कागदावर चितारण्याचा प्रयत्न केला होता. गोष्ट अशी होती -
’शाळेत जाणार्या एका मुलाचे आई-वडील आंधळे असतात. भीक मागून आई-बाबा त्याला शिकवीत असतात. भीक मागतांना त्याचा बाबा वाजवायची पेटी खांद्यावर लटकवून पोटासमोर धरतो व त्याच्या सूरात एकचएक चार ओळीचं, देवाचं गाणं दोघेही म्हणत असतात.
एकदा ते मुलाला म्हणतात, ‘बाबू आम्ही मेल्यावर तू ह्या पेटीला हात लावू नको. म्हणजे तुझ्यावर भीक मागायची पाळी येणार नाही. तू शीक, बाबू… खूप शीक. अन् मोठा हो…!’
मुलगा एकेक परीक्षा पास करुन पुढच्या वर्गात जात असतांना त्याचे आई-बाबा दोघेही एकामागे एक गंभीर आजाराने मरुन जातात. मुलगा आता पोरका होतो. त्याची शाळा बुडते. जे काही झोपडीत आई-बाबाने साठविलेलं असते; ते सारं संपल्यावर खायला काहीच उरत नाही. पोटातल्या भुकेनं तो व्याकूळ होतो. अशा अवस्थेत त्याचं लक्ष टांगलेल्या पेटीकडे जाते. तो त्या पेटीकडे एकटक पाहतो. गळ्यात पेटी लटकवून आई-बाबासारखे भीक मागावे काय असा विचार त्याच्या डोक्यात चमकून जातो. पण त्याच वेळी ‘पेटीला हात लावू नको.’ असे आई-बाबाने सांगितलेले वाक्य त्याच्या कानात घुमते. एकीकडे पोटातली आग त्याला स्वस्थ बसू देत नव्हती तर दुसरीकडे भीक मागू नको; असे आई-बाबाने बजावले होते. ‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना.’ अशी त्याची बिकट अवस्था झाली होती. काम करुन कमावण्याइतपत त्याचं वय पण झालं नव्हतं. अशा अवस्थेत त्याने दोन दिवस कशी तरी कळ काढली. आता त्याचं पोट खपाटीला लागलं होतं. त्याच्या अंगात काहीच त्राण उरला नव्हता. पुन्हा त्याची नजर पेटीकडे जाते. कसातरी घुसत घुसत पेटीजवळ जातो. पेटीचा भाता फुगवतो. त्यातून सूर उमटतात. तसाच तो दचकतो. पण त्या सुरातच त्याला पुढील जीवनाचा मार्ग गवसतो. मग ती पेटी गळ्यात अडकवतो. बसत, उठत कसातरी झोपडीच्या बाहेर पडतो; भीक मागायला…!’
अर्धवट लिहिलेल्या या कथेची वही कुठे गेली, काय माहित ?
एकदा महादेव सोबत रात्रीला आम्ही तीन-चार मुलं रात्री नऊ वाजताचा सेकंड शो सिनेमा पाहायला जात होतो. महादेव हा आमच्या पेक्षा मोठा व तरूण होता. रस्ता निर्जन असल्यामुळे शुकशुकाट होता. न्यु ईंग्लिश हायस्कूल जवळून जात असतांना एक तरुण मुलगी त्या रस्त्याने एकटीच येत होती. आम्ही हातात हात घालून चाललो होतो. ती मुलगी जवळ आल्याबरोबर महादेवने मला जोरात त्या मुलीकडे ढकलले. क्षणात त्या मुलीने जोरात, ‘आईऽऽऽग.’ असा तिने केविलवाणा चित्कार केला: तेव्हा मला कसच तरी वाटलं. मुसमुसलेल्या तारूण्याचे असे हे चावट खेळ; त्या वयात चालत असतात, हे त्यावेळी मला कुठे समजत होतं ?
सिनेमा टॉकीजच्या लाकडाच्या बाकड्यात भयानक ढेकणं असायचे. घरी येतांना अंगावरच्या कपड्यातून त्यातील काही ढेकणं तरी आयात होत होते. त्यामुळे आमच्या घराच्या भिंती-दरवाजाच्या तर कुणाच्या बाजीच्या फटीत किंवा जिथे जागा मिळेल तिथे ते लपून बसत. रात्री अंथरुणावर अंग टाकलं की, या ढेकणाचा सुळसूळात सुरु व्हायचा. मग त्यांचा कचाकच चावण्याचा. कार्यक्रम सुरु झाला की, आमचाही त्यांना शोधून मारण्याचा सार्वत्रीक कार्यक्रम जिकडे-तिकडे सुरु होत असे. त्यांच्या अशा उपदव्यापामुळे शांतपणे झोप कधी लागत नसे.
अन्नपूर्णाबाईच्या घरासमोर मोकळी जागा होती. तेथे पंचशील झेंडा होता. तेथे समाजाचे सामुहीक कार्यक्रम होत असत.
पीठ दळून आणण्याचं काम बाईने माझ्यावर सोपविलं होतं. कारण बाईला वेळ मिळत नव्हता. माझ्या सकाळच्या शाळेमुळे मला शक्य व्हायचं. मी दादाने सांगून ठेवलेल्या भाट्याच्या दुकानातून ज्वारी उधारीवर घेऊन दत्तचौकाच्या अलीकडील चक्कीवर दळायला घेऊन येत होतो. तेथे असलेल्या सुपाने ज्वारी पाखडून व खडे-कचरा निवडून चक्कीवर ठेवलेल्या पिप्यात टाकून दळायला देत होतो. मग त्या पिठाचं गाठोडं डोक्यावर घेऊन उमरसर्याला येत होतो.
माझ्या आत्याच्या घरचे सर्वच लोक चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्याकडे आम्ही राहत असतांना कधी त्यांनी आमचा दुजाभाव केला नाही. फक्त त्यांना काम प्रिय होते. आम्ही त्यांनी सांगितलेले कोणतेही काम करत होतो. ‘नाही’ कधी म्हणत नव्हतो. हाच आमच्या दोघा बहीण-भावाचा स्वभावगुण त्यांना फार आवडला होता. ते बिड्या बांधत असतांना त्यांना सर्व वस्तू जाग्यावर पाहिजे असत. ठरलेल्या बिड्या तेवढ्या त्या विशिष्ट वेळात बांधून झाल्या पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असायचा. नाहीतर बिड्यामध्ये तूट येणे परवडत नसे.
‘रामराव, हे आण रे…, ते आण रे…, हे काम कर…ते काम कर …’ असं सारखं चालू राहायचं. त्यांना मध्ये मध्ये खाण्यासाठी तंबाखू सुध्दा घोटून द्यावं लागत असे. कधी त्यांचे तेंदुच्या पानाचे मुडे भिजवून द्यावे लागे, तर कधी पानं कापून द्यावे लागे.
सोपान-दादा व त्याचा भाऊ शामराव-दादा दोघेही रविवारच्या दिवशी बाजारात विकण्याचा धंदा करीत असत. शामराव-दादाचा सांबार व अद्रक विकण्याचा धंदा नेहमीचा ठरलेला होता. एखाद्या वेळेस त्यांचे सोबत सकाळीच जावे लागे. कारण तो दुकान मांडल्यावर पुन्हा सांबार व अद्रक ठोक मध्ये विकत आणण्यासाठी जात असे. तेव्हा मला दुकानात थांबावे लागत असे. कधी कधी फुलनबाई – त्याची बायको, नसली की मलाच त्याचेसोबत दिवसभर विकण्याचं काम करावे लागत असे.
सोपानदादा कधी कधी ऊस विकत घेत असे. तेव्हा त्यांचे सोबत सुध्दा राहून मला ऊस विकण्याचे काम करावे लागे.
सोपान-दादाने गोधणीकडे जाणार्या कोठ्यावर काकडीच्या वेलाचा ताटवा विकत घेतला होता. तेव्हा तो मला काकड्या तोडायला घेऊन जायचा. तेथे भरपूर कोवळ्या कोवळ्या काकड्या खायला मिळत असे. काकड्या तोडून बैलगाडी भरुन विकायला शहरात आणत असे. मग गाडीनेच फिरुन फिरुन ‘काकड्या घ्याऽऽ काकड्या… असे ओरडून गिर्हाईकांना वळवावे लागत असे.
आमच्या शेजारच्या एका घरात कांबळे नावाचे एक तरुण जोडपं राहत असे. त्यांनी ते घर भाड्याने घेतले होते. त्यांना मुल-बाळ नव्हतं. तो यवतमाळला एका सरकारी कार्यालयात नोकरीला होता. ती बाई आमच्यावर अपार जीव लावायची. ती आम्हाला बनवलेली भाजी आणून द्यायची. तेल व निंबुच्या रसात मीठ टाकून तळलेल्या हिरव्या मिरच्या आम्हाला हमखास आणून द्यायची. ह्या मिरच्या भाकरीसोबत खायला खूपच झणझणीत लागायच्या.
ते दोघेही एकमेकांच्या खोड्या करीत असत. लहान मुलं खेळतात, तसे ते एकमेकांशी दंगामस्ती करायचे. ते खेळकर जोडपं मला जबरदस्त आवडत असे. त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक क्षणाचा ते दोघेही मनसोक्त आनंद घेत जगत होते.
नंतर ते काही दिवसांनी गाव सोडून गेले होते. त्यावेळेस आमच्या घरातलं कुणीतरी आम्हाला सोडून गेलं की काय, असेच बरेच दिवसापर्यंत वाटत होतं. खरंच, त्यांच्या सारखं आपण सुध्दा जसेजसे वाढतो, जगतो तसतशी सुंदरता, खेळकरपणा आपल्या मनाच्या कोंदनात रुजवायला… भिनयायला… हवी ! असं ते आनंदी जीवनाचं गमक शिकवून गेले होते.
उमरसर्याच्या मागे नाल्याच्या पलीकडच्या वावरात आणखी एक-दोन घरं होते. त्याला जुना उमरसरा म्हणत. तेथे शेतामध्ये लक्षीबाई राहायची. तिचा मुलगा आमच्या सोबतचा मित्र होता. त्यांच्या शेतात पेवंडी बोरं होते. ते खायला आम्ही जात होतो.
एकदा मी दुपारी शाळेतून घरी येत होतो. रस्त्याने येता येता एका कुत्र्याने माझ्या पायाच्या घोट्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला. त्याचे दोन दात त्या ठिकाणी रुतले होते. त्यातून रक्त बाहेर येत होतं. रस्त्यात पडलेल्या चिंधीने ते रक्त पुसून घेतलं. चालतांना खूप त्रास होत होता. कसातरी मी घरी आलो. त्यावेळस आम्ही वामन-दादाच्या घराच्या खोलीत राहत होतो. तो घरीच बिड्या बांधत होता. मी लंगडत लंगडत येत असल्याचे पाहून त्याने विचारले.
‘पायाला काय झाले ? का लंगडत चालत आहेस ?’
‘कुत्रा चावला.’ असं मी सांगून चावलेली जागा त्याला दाखवली.
‘अरे हो..!.दोन दातं दिसत आहेत. त्याला चुना लाव.’ मी त्या जागेवर थोडासा चुना चोपडला.
‘तू मारवाडी चौकात जा. तेथे एका सोनाराच्या दुकानात कारागीर असतो. तो मंत्र टाकतो. जातांना कडूनिंबाच्या दोन-चार डहाळ्या व फूटाणे घेऊन जा. तो मंत्र टाकून खायला देतो. काही होणार नाही. घाबरु नको.’ त्याने पुन्हा बोलून धीर दिला.
मी जेवण करुन मारवाडी चौकात गेलो. सोबत फुटाणे व कडूनिंबाच्या डहाळ्या नेल्या. तेथे आजूबाजूला विचारपूस केल्यावर त्या मांत्रिकाचा शोध लागला.
‘माझ्या पायाला कुत्रा चावला.’ त्या मांत्रिकाला सांगून चावलेली जागा दाखविली.
त्याने माझ्याजवळचे फुटाणे हाताच्या मुठीत घेतले. तो तोंडाने काहीतरी पुटपुटत . फुटाण्यावर फुंक मारुन मला खाण्यास सांगितले. मी मुठीतल्या सर्व फुटाण्याचा बोकणा भरला. नंतर कडूनिंबाच्या डहाळ्या घेऊन त्या चावलेल्या ठिकाणी वरुन खाली फिरवत होता, तोंडाने काहीतरी पुटपुटत होता.
‘जा घरी आता… काही होणार नाही…’ मंत्र टाकून झाल्यावर म्हणाला.
मी घरी आलो. संध्याकाळी बाई शाळेतून घरी आली. तिला मी कुत्रा चावल्याचे सांगितले. ती पण घाबर्या-घुबर्या झाली. तिने खायच्या तेलात हळदीची पूड घालून कोमट केलं व चावलेल्या जागेवर लावली. काही दिवसांनी ती जखम बसली. पण त्याच्या खुणा मात्र कायमच्या राहिल्यात.
खरं, म्हणजे तो पिसाळलेला कुत्रा नव्हताच मुळी !. त्यामुळेच त्या मांत्रिकाचे फावले. नाहीतर त्याच्या मंत्राचा काहीही उपयोग झाला नसता ! तो जर पिसाळलेला असता, तर त्याच्या लाळेतील रेबिजचे जंतू शरिरात पसरून, मी पण पिसाळलो असतो व मरणाच्या दाराकडे माझी वाटचाल सुरु झाली असती !
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
मी त्यावेळी उमरसर्याला शिकायला होतो. शामराव-दादा कापूस विकायला यवतमाळला येणार म्हणून मला बाजाराच्या दिवशी सांगितले होते. मला वह्या घ्यायच्या असल्याने पैशाची गरज होती
संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर मी तडक धोब्याच्या दुकानावर आलो.
‘दादा आला का ?’ मी धोब्याला विचारले.
‘हो, आला आहे. त्याने तुला कापूस विकून परत येईपर्यंत थांबायला सांगितले आहे.’
या धोब्याचं दुकान आमच्या चौधरा गावच्या रस्त्यावर होतं. म्हणून तो दादाचा चांगला ओळखीचा होता.
त्याची ती पत्र्याची लहानशी टपरी होती. त्याला एकट्याला आत-बाहेर जाता येईल एवढी. त्यात टेबल व त्यावर जुन्या, फाटक्या धोतराची एकावर-एक चवड गादिसारखी रचलेली होती. त्यावर कोपर्यात लोखंडाच्या वेटोळ्यावर काळीभोर लोखंडी इस्त्री ठेवलेली होती. इस्त्रीच्या आंत पेटवलेल्या कोळशाचे लाल-लाल निखारे दिसत होते. पाठीमागे इस्त्री केलेले कपडे ठेवण्यासाठी लाकडी मळकट स्टूल होता. त्याच्या बाजूला लाकडाच्या कोळशाची चुंगडी होती. बाहेर कडूनिंबाच्या झाडाच्या बुंध्याला लागून जळालेल्या लाकडी कोळशाच्या राखेचा ढीग होता. त्याच्या जवळच दोन माणसं दाटून-चेपून बसतील, असा किरकिर करत हलणारा जुनाट लाकडी बेंच ठेवला होता. एवढंच त्याच्या धंद्याच भांडवल होतं.
टेबलावर एका कोपर्यात इस्त्रीची वाट पाहत असलेले हलकेसे पाणी शिंपडलेले गुंडाळून ठेवलेले कपडे होते. दुसरीकडे टपरीच्या एका कोपर्यात गिर्हाईकांच्या कपड्याचे गठ्ठे ठेवलेले होते. मी बाहेरच्या त्या दोन जिवाच्या बेंचवर बाजूला दप्तर ठेवून बसलो होतो.
दादाची भिरभिर वाट पाहतांना कधी रोडवर तर कधी त्या धोब्याकडे माझी नजर सारखी जायची. तो दिसायला किडकिडीत शरीरयष्टीचा, मध्यम बांध्याचा व काळासावळा होता. त्याने अंगात पांढर्या रंगाचा पूर्ण बाह्यांच शर्ट व पैजामा घातला होता. डोक्यात पण पांढरीच टोपी होती. कानात अर्धवट ओढलेल्या बिडीचं थोटूक लटकवलेली दिसायची. ती काढून इस्त्रीच्या निखार्यावर शिलगवून मधामधात तो पीत होता. तो जरी लोकांचे कपडे इस्त्री करत असेल; परंतु त्याने घातलेले कपडे मात्र इस्त्री केलेली असेल, असे वाटत नव्हते.
वाट पाहतांना हां हां म्हणता रात्र वाढत गेली; तरीही तो आला नाही. धोब्याचे दुकान बंद करायची वेळ टळून गेली होती. तरी पण तो माझ्यासाठी दुकान बंद न करता थांबला होता. तेवढ्या रात्री मी घरी एकटाच उमरसर्याला जाऊ शकत नव्हतो; म्हणून त्याने दुकान बंद करुन मला त्याच्या घरी सोबत यायला सांगितले.
त्याचं घर आठवडी बाजार जेथे भरते, त्याच्या एका रस्त्याच्या बाजूला लागून होते. त्याच्या घराजवळील भाजीपाल्याच्या कचर्याच्या घाणेरड्या वासानेच माझं स्वागत झालं. त्याचे घर व राहणीमान पाहून, तो अत्यंत गरीब असावा असे दिसत होते.
मला त्याने घरात आंतमध्ये येऊ दिले नाही. मला पडवीत थांबायला सांगितले. त्याला माझी जात माहित असल्यामुळेच तो मला दूर ठेवत होता; ही गोष्ट माझ्या लक्षात यायला वेळ लागली नाही. पण याची जात सुध्दा खालचीच आहे, हे मला शाळेत कळले होते. कारण धोबी जातीचा एक मुलगा माझ्या वर्गात होता. त्याला पण माझ्यासारखीच स्कॉलरशिप मिळत होती. म्हणजे आम्ही दोघेही खालच्याच जातीचे असतांना माझा हा धोबी बाट का धरतो, ते मात्र मला कळत नव्हते.
त्याने मला एका जर्मनच्या जुनाट ताटात गोड पाण्यात शीजवलेल्या भाकरीच्या तुकड्याचा काला खायला दिला. बहुतेक त्या ’घोटल्या’ असाव्यात. मला दिवसभराची भूक लागलेली होती. त्यामुळे तोंडातल्या तोंडात जरी घास फिरत होता, तरी भूकेची आग विझविण्यासाठी ते खाणं मला भाग होतं. दारिद्रयाचे यापेक्षा भीषण अन्य कोणते दृष्य असेल असे मला वाटत नाही. गरिबी किती जीवघेणी असते, याची साक्ष त्यावेळी मला पटली होती.
टिनाच्या पत्र्याचं त्यांचं घर होतं. आरा मशिनवर मिळणार्या लहान-मोठ्या वाकड्या-तिकड्या पाट्या व कुठे लोखंडी पत्रे लावलेले असं त्याचं लहानसं घर होतं. पडवीच्या समोर नहाणी होती. तेथून लघवीचा उग्र वास येत होता. ह्या वासाची दुर्गंधी नाकाद्वारे शिरुन डोंकं गरगरायला लागलं होतं. मच्छराचा कानाजवळ सारखा गुंगऽऽ गुंगऽऽ असा आवाज घुमत होता. कचकन चावा घेऊन पळून जात. चावता क्षणी चापट मारली, की लगेच दुसरीकडे चावा घेतल्यावर तिकडे हात जाई. अशा परिस्थितीमुळे रात्रभर झोप काही लागली नाही. सकाळीच उठून घरी आलो. कारण तयारी करुन शाळेत जायचे होते.
नंतर असे कळले होते की, दादाला कापसाचा चुकारा दलालाकडून रात्रीला फार उशिरा मिळाला होता. तो आला, तेव्हा धोब्याचं दुकान बंद झालं होतं.
एकदा मी व माझी मामे बहीण-सुदमताबाई सकाळची शाळा करुन घरी आलो होतो. त्यावेळी आम्ही मोठीआत्या-बकू, हिच्या घरी एका खोलीत राहत होतो. माझी बहीण-जनाबाई व चित्राबाई- सुदमताबाईची मोठी बहीण दुपारच्या शाळेत गेल्या होत्या.
मी शाळेचं दप्तर खुंटिला अटकवून हात-पाय धुतले. जेवायला बसतांना सुदमताबाईने गंज पाहिला. त्यात फिक्कं वरण दिसलं. पण दवडीत भाकरी नव्हत्या. त्याच वेळी तिच्या भुवया गुल्लेरच्या रबराप्रमाणे ताणल्या गेल्या. कसानुसा चेहरा झाला. आता भाकरी बनविण्याची पाळी आपल्यावर येऊन पडली, याची तिला जाणिव झाली.
तिने चूल पेटवली. त्यावर पाण्याचं आधण ठेवले. धगधगणार्या लाकडाचा धूर नाका-डोळ्यात शिरल्याने वैतागून गेली होती. गरम पाण्याने ज्वारीच्या पिठाचा उंडा भिजवला. पाणी जरा जास्तच गरम झालं असावं. ती तोंडाने हातावर राहून राहून फुका मारीत होती. हातात भाकर थापायला घेतली, की ती तुटून जायची. ती मोडून पुन्हा बनविण्याचा प्रयत्न करायची. पुन्हा तुटून जायची. यातच केसाच्या बटाने तिला त्रास देणं सुरु केलं. स्वयंपाक करतांना सुटलेले केसं, पिठाच्या हातांनी मागे सारण्याची तारांबाळ पाहतांना मला कसंच तरी वाटत होतं. .असं म्हणतात की काही गोष्टी त्या त्या जागेवर शोभत असतात. डोक्यावरचे केस, बोटाची नखे, त्याच ठिकाणी छान दिसतात – पण खाली पडलेले केस, कापलेले नखे मात्र घान वाटतात, नाही का ? असंच काहीतरी माझ्या मनात त्यावेळी येऊन गेलं होतं.
खरं म्हणजे सुदमताबाई, डोळ्यासमोर येणार्या बटा सावरता सावरता नाकीनऊ आली होती. तिचा संयम सुटत चालला होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडायला लागली. नाकाची फुरफूर वाढली. ती चित्राबाई व जनाबाई अशा दोघींवरही चांगलीच कातावत होती. ठेवणीतल्या शिव्या देत होती. मी तिच्या जवळ बसून तिची ही केविलवाणी अवस्था निमुटपणे पाहत होतो.
मला आठवते… मी लहान असतांना सुदमताबाई हिच्यासोबत खेळभांड्याचा, चाटल्या-बुटल्याचा व बाहुली-बाहुल्याचा खेळ वाडीमध्ये खेळत होतो. माझी आई-मामी आम्हाला सांगायची, की आम्ही दोघे जोडीने खूप खेळायचो. ती खोटी खोटी स्वयंपाक करायची व मला खाऊ-भातकं, भाजी व दाळ-धान्य आणण्यासाठी बाजारात जा म्हणायची. मी जायला निघालो, की थांबवून, ‘हे आणजो, ते आणजो’ अशी सांगत राहायची. मी जात पर्यंत माझा पाय काही केल्या ती त्या खोट्या चिमुकल्या घराच्या बाहेर पडू देत नव्हती. कधी कधी बाजारातून घराकडे परत आलो तरी ‘भजे आणजो, गुलगूले आणजो’ अशी तिची लांबन सुरुच राहायचं. अशी आमची गंमत पाहून माझी आई-मामी हसत राहायचे.
खरंच, लहान मुलांच भावविश्व एक वेगळंच असतं, नाही का ? लहानपणीच्या मुलां-मुलींची मैत्री किती सहज असते ! अल्लड, झर्यासारखी निखळ-निर्भेळ खळखळणारी आणि निरागस !
लहानपणी मी सुदमताबाई सोबत खेळभांडे खेळत होतो, तेव्हा ती हसत-खेळत खेळातला स्वयंपाक करायची. आता मात्र खरोखरीचा स्वयंपाक करतांना तिला रडवलं होतं ! संसार असाच असतो, नाही का ?
म्हणूनच बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात,
’अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, मग मिळते भाकर!
कश्यातरी तुटक्या-ताटक्या, जळक्या-जुळक्या भाकरी तिने बनविल्या. त्याच भाकरी आमच्या भुकेजलेल्या पोटाला गोड लागत होत्या.
संध्याकाळी चित्राबाई व जनाबाई घरी आल्यावर मी ही गोष्ट त्यांना सांगितली.
‘सयपाक करायला कसा नेट लागते, ते आता कसं कळलं…!’ अशा कडवट प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केल्या होत्या. ही गोष्ट आठवली की, मला आताही हसू येते.
नागपंचमीच्या दिवशी गावातले काही उत्साही लोक सकाळीच विक्रम-दादाच्या घरी जमत. तेथे ‘हरेरामा… राघोबारे…’ अशा बार्या म्हणत. नंतर गावाच्या बाहेर असलेल्या वारुळावर जावून ओलं नारळ फोडत. त्यावेळी आम्हाला मस्तपैकी खोबरं खायला मिळत असे. आजूबाजूला लाह्या, खोबर्याचे बारीक तुकडे व दूध शिंपडत. नागोबा वारुळाच्या बाहेर येऊन ते हे पदार्थ खातात व नारळ्याच्या दिवटीत ठेवलेले दूध पिते असा त्या लोकांचा समज होता. अशा भ्रामक समजुतीमुळे या दिवशी दूध व इतर पदार्थ किती वाया जात असेल. कुणास ठाऊक? रुढी-परंपरेच्या नांवाने ही नासाडी होत होती.
सोपान-दादाच्या घरचे सर्वचजण महाशिवरात्रीचा उपवास धरत. हा उपवास दोन दिवसाचा राहत असे. त्यांच्या घरी राहत असल्यामुळे आम्ही पण उपवास धरला होता. सकाळी उपवासाला चालणारे रताळं खाऊन कसातरी दिवस काढला. पण रात्रीला भुकेने माझ्या पोटात कावळे बोंबलायला लागल्यामुळे मी बाईला हळूच सांगितले,
‘बाई मला भूक लागली.’
‘तरी मी म्हणत होती, भुक लागेल. उपवास धरु नको. पण ऎकलं कुठे ?. बरं, मी भाकर टाकून देते. खाऊन घे.’ असं बाईने म्हणल्यावर एखाद्या फुलाप्रमाणे माझ्या चेहर्यावर हास्य फुलवून गेलं.
एकदा सावित्रीबाईच्या मुलाचा नवस फेडण्यासाठी ढुंगणापूर या देवस्थानावर आम्ही सर्वचजण पैदल गेलो होतो. ढुंगणापूरला जातांना घरी फक्त मूठभर दाळ होती. ती शिजवून बाईने मला खाऊ घातली होती. बाई मात्र त्यावेळी कटोकट उपाशी राहीली होती.
हे ठिकाण अमरावती रोडवर उमरसर्यापासून दोनक कोस दूर असेल. तेथे स्वयंपाक केला होता. देवाची पूजा झाल्यावर जेवण करुन आम्ही दुपारी परत निघालो. इतक्या दूर चालल्यामुळे पाय दुखायला लागले होते. उन्हामुळे जीवाची लाही लाही होत होती. पाणी खूप पिण्यात आल्यामुळे चालतांना पोटातले पाणी खलंखलं हालत होते. म्हणून मी रस्त्याने पोटातले पाणी उलटून तोडातून बाहेर काढून फेकत होतो. त्यामुळे मी काहीतरी चमत्कार करत आहे अशा भावनेने माझ्याकडे सर्वचजण आश्चर्याने पाहत होते.
लहान आत्या-सखूच्या मोठ्या मुलाला म्हणजे देवबाला बाहेरगावला पोलिसाची नोकरी होती. तो मारुतीचा कट्टर भक्त होता. तो गावला आला, की मला रुईचे फुलं तोडून आणायला सांगायचा. मग पाण्याचा गडवा, नारळ, तेलाची वाटी, शेंदूर व रुईचे फुलं यापैकी काही सामान माझ्याकडे देऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या मारुतीच्या मुर्तीजवळ जात होतो. मुर्ती कसली, तो शेंदूर फासलेला दगड होता! मला त्याची पूजा होईपर्यंत तेथेच थांबावे लागत होते.
बौध्द धम्म स्विकारल्यानंतरही हे लोक हिंदु धर्माचे सण, उपास-तापास व देवपूजा का करीत होते ? ते माझ्या बालमनाला काही कळत नव्हते. मी मात्र उभ्या जन्मात कोणत्याच देवाची पूजा केली नाही. आमच्या घरी कोणीच देवाला मानत नव्हते.
या गावातील जवळपास सर्वच माणसं बाया बिड्या बांधण्याचे काम करीत होते. कधी ते यवतमाळला भारत बिडी कारखाना येथे बिड्या बांधत, तर कधी उमरसर्याच्या पलीकडे असलेल्या नामदेवच्या कोठ्यावर जाऊन बांधायचे. कधी घरीच बांधत व बांधलेल्या गड्ड्या संध्याकाळी नामदेवच्या कोठ्यावर सुपामध्ये नेऊन देत. येतांना पानाचे मुडे, तंबाखू व सुताची लडी आणत असत. रात्रीला मुडे पाण्याने भिजवून ठेवत. सकाळी पानं बिड्याच्या आकारानुसार कापून फडक्यात गुंडाळून ठेवत. सुताच्या लडीचा गुंडाळा करुन घेत. बिडी बांधतांना पायाच्या बैठकीवर सूप ठेवत. त्यात कापलेल्या पानात दोन्ही हाताच्या बोटाने सुपामधील तंबाखू घेऊन गुंडाळून घेत असत. त्याला विशिष्ट पध्दतीने सूत बांधून त्याचे वरचे टोक नखाने किंवा पात्याने बंद करीत असत. ही प्रक्रिया ते शरिराच्या एका लयबद्द पध्दतीने करीत असल्याने, मी मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडे पाहतच राहत होतो. असे बांधलेल्या पंचवीस बिड्याचा एक बंडल एकत्रीत बांधून घेत. बहुतेक लोक रोज हजार ते दीडहजार बिड्या बांधत. ते या कामात सारखे व्यस्त राहायचे. म्हणून त्यांचे चिल्लर-चाल्लर कामे करण्यासाठी कोणीतरी जवळ पाहिजे असायचे. मला पण कधी कधी मुडे भिजवण्याचे, पान कापण्याचे, सुताची लडी तयार करण्याचे, पाणी आणून देण्याचे, खायला तंबाखू घोटून देण्याचे असे कितीतरी लहान-सहान कामे करावे लागत होते.
बाई पण बिड्या बांधण्याचे काम शिकली होती. ती सुट्टीच्या दिवशी कुणाच्या तरी नावाने बिड्या बांधत होती. त्याचे पैसे तिला मिळत असे. बाई कधी कधी बाहेर कुणाच्यातरी शेतामध्ये कामाला जात होती. त्यामुळे आमच्या घरखर्चाला मदत होत होती.
नाल्याजवळील झाडीतून पळसाच्या डांग्या तोडून त्याचे भारे आम्ही डोक्यावर घेऊन येत होतो. झोपडीजवळ त्याची सुड रचली होती. वाळल्यावर ते चुलीत जाळायच्या कामी येत होते.
त्या वेळी तंबाखू व बिड्यांशी सारखा संपर्क येत असे. त्याच्या त्या उग्र दर्पाचा नाका-तोंडाला सवय झाली होती.
बहुतेक बाया-माणसं चुन्यासोबत घोटलेला तंबाखू खात असत. खात असत म्हणण्यापेक्षा त्याचा गोळा तोंडाच्या ओठात दाताजवळ तासन् तास धरुन ठेवत. त्याचा रस लाळेवाटे पोटात जात असे. त्यामुळे अंगात गुंगी व तरतरी येत असे. एखाद्यावेळेस तंबाखू खायला मिळाला नाही, तर जीव कासावीस होत असे. बिडीत भरण्याचा तंबाखू व खाण्य़ाचा तंबाखू सारखाच असायचा. फक्त त्याची चव वेगवेगळी असायची. बहुतेक बाया-माणसं बिडीचा तंबाखू खात असत. काहीजण पंढरपुरी किवा वांग्या तंबाखू खाण्यासाठी वापरत असत.
सकाळी सकाळी रात्रीला भिजवलेल्या पानांना आयाताकार, पण विशिष्ट पध्दतीने कात्रीने कापून घेत. त्याची चवड रचून ओल्या फडक्याने बांधून घेत. याच पानाच्या कचर्यावर सकाळी दात घासण्यासाठी बिडीचा तंबाखू जाळत. या जाळलेल्या तंबाखाने दांत घासत. रोज सकाळी अशा भाजलेल्या तंबाखाचा उग्र वास जिकडे तिकडे पसरलेला असायचा. या भाजण्याच्या प्रक्रियेला ‘मिसरी’ असे म्हणत.. मिसरीने दांत घासल्यावर अंग फिरल्यासारखे वाटत असे.
हिवाळ्यात याच कापलेल्या पानांना जाळून हात शेकण्यासाठी उपयोग करीत.
बहुतेक माणसं बिड्या ओढत. त्यांना बिड्या विकत घेण्याची गरज पडत नसे. कारण बांधलेल्या बिड्यापैकीच ते पिण्यासाठी वापरत असत.
खेड्यामध्ये बर्याच लोकांना बिड्या ओढण्याची सवय असते. माझा दादा व बाबा पण बिडी ओढत असे. मला कधी कधी ते बिड्या आणायला दुकानात पाठवित. कधी विस्तवावर बिडी पेटवून आणायला सांगत. मोठ्यांच्या अशा काम सांगण्यामुळेच लहानांना वाईट सवयी सहज लागून जायच्या. कारण लहान मुलं मोठ्यांच अनुकरण करीत असतात, ना ! एकदा का सवय जडली, की ती मरेपर्यंत सोबत करते.
या गावात तर बिड्या बांधायचा धंदा असल्यामुळे बिड्याचा सुकाळ होता. मला पण बिडी पिण्याची अनावर इच्छा होत होती. मी एकदा बाई घरी नाही असे पाहून, लपवून ठेवलेली बिडी ओढून पाहिली. सुरुवातीला ठसका लागला.. तरीही पुन्हा ओढून पाहण्याची तिव्र इच्छा झाल्यावर परत एकदोनदा लपून-छपून बिड्या ओढण्याचा मनसोक्त आनंद लुटला होता. बिडीचा धूर नाका तोंडातून बाहेर काढायला मस्त मजा वाटत होती.
त्या दिवशी रात्रीला बाईने भाजीला फोडणी देऊन कोणत्यातरी कामासाठी आत्याबाईच्या घरी गेली होती. मला बिडीची आठवण झाल्याबरोबर माझं मन रोमांचित झालं. मी तिच संधी साधून खिशात लपवलेली बिडी घाईघाईने काढली. चुलीतल्या विस्तवावर शिलगावली. बिडी पिण्यास अधिर झालेल्या मनाने दोन-तीन झुरके मारले असतील-नसतील, तर बाई आली. माझी चोरी तिने अचानक पकडली ! ते पाहून तिचे डोळे विस्फारले. मग काय…? बाईने अशी खरडपट्टी काढली की, परत मी बिडीला कधी हात लावला नाही. मला जर बाईने फटकारले नसते, तर कदाचीत मी सुध्दा बिडी फुंकणार्यांच्या पंगतीत जाऊन बसलो असतो. त्यानंतर मात्र मी बिड्याऎवजी तंबाखू खायला लागलो होतो.
माझ्या घरी बाई, आई, वहिनी व मी तंबाखाचे सेवन करत होतो. खेड्यामध्ये हे व्यसनं सार्वत्रीक झालेले होते. मी तंबाखू दादाच्या व बाबाच्या आड लपून खात होतो. मी घरी असलो, की आई किंवा वहिनीला तंबाखू घोटून मागत होतो.
माझा लहान भाऊ अज्याप, याला मात्र तंबाखूचा वासही सहन होत नव्हता.
माझे गावच्या व उमरसर्यातील बहुतेक दोस्त-मित्रांना तंबाखाची सवय होती. आम्ही खिशामध्ये ‘चुनाळू’ बाळगत होतो. ही दोन कप्पे असलेली टिनाची डब्बी होती. एका कप्प्यात चुना असायचा तर दुसर्या कप्प्यात तंबाखू भरलेला असायचा. कोणाला तंबाखाची तलफ आली, की तो घोटलेला तंबाखू दुसर्याला पण देत असत. म्हणून गंमतीने असे म्हणत की, ‘श्रीकृष्ण म्हणे अर्जुनाला, लाव तंबाखाला चुना, तूच माझा मित्र जुना !’
तंबाखामध्ये अनेक घातक विषारी द्रवे असतात. म्हणून तंबाखाचे सेवन करणे शरीराला अपायकारक आहे; ही गोष्ट त्यावेळी कळत नव्हती. बाकीचे लोक खातात म्हणून आपणही खाल्ले तर काय बिघडते…? असेच सर्वांना वाटत असायचे.
असा समज आहे की, एकदा तंबाखाचे व्यसन लागल्यावर ते सुटू शकत नाही. परंतु दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही व्यसन सोडणे कठीण नाही. समजा एखाद्या जीवलग मित्राने आपल्याला दगा दिला तर आपण त्याचेशी असलेले संबंध तोडून टाकतो, ना ? तसेच व्यसनाशी केलेली मैत्री जर घातक असेल तर ते सोडून देणेच हिताचे असते, नाही का ? ही गोष्ट कालांतराने आपल्याला पटायला लागते.
मधूचा मोठा भाऊ महादेव याचे खूप पोट दुखत असे. त्याचे बाबा माझ्या बाबाचा नातेवाईक होता. जेव्हा त्याचे पोट उमळत असे, तेव्हा तो ढोरासारखा रडतांना दिसायचा. खरं तर तो कसातरी कण्हत, कुथत दिवसं कंठीत होता.
इतर वेळी तो गावोगावी फिरून एका काच लावलेल्या पेटीत ठेवलेले बायांचे आभूषणे विकत असे. त्यात कानातल्या बिर्या, टॉप्स नाकातले खडे, नथ बोटातल्या आंगठ्या, गळ्यातल्या गळसोळ्या, गाठ्या, पायातल्या पायपट्ट्या व मनीडोरले राहत असे. कधी कधी आमच्या गावला पण तो जात असे. एकेदिवशी त्याने घराच्या आड्याला दोरीने फाशी घेतली. त्यावेळी मी फार हळहळलो होतो.
गावातली एक व्यक्ती यवतमाळच्या बिडी कारखान्यात चहा बनवून कामगारांना विकायचं काम करायचा. त्याला घरी यायला बरीच रात्र व्हायची. तो गावात येतांना दारु पिवून हलत-डुलत व हातातील चहाच्या रिकामी केटलीला झोका देत यायचा. तेव्हा त्याचं हे विचित्र रुप पाहून गावातले कुत्रे भुंकत भुंकत त्याच्या मागे लागायचे.
मग तो त्या कुत्र्याला म्हणायचा,
‘क्यो बे मुझे पहचाना नही क्या? मै कौन हु? मै xxxx हु ।’ गणपतीला जसे वाजंत्री वाजत-गाजत घरी आणून सोडतात; तसे हे कुत्रे त्याला घरापर्यंत आणून सोडत. कुत्र्यांचा भुंकण्याचा असा आवाज आल्यावर, आम्ही समजून जात होतो की, आता xxxx ह्या व्यक्तीचं आगमण झालं असेल. मग आम्हाला हसू यायचं
रविवारच्या दिवशी उमरसर्याच्या लोकांचे बिड्याचे काम बंद राहत असे. सोमवार ते शनिवार पर्यंत त्यांचे काम चालत असे. शनिवारी संध्याकाळी त्यांना चुकारा मिळत असे.
रविवारी बाया डोक्यावर टोपलं घेऊन यवतमाळच्या बाजाराला जात असत. त्यात भाजीपाला व किराणा घेऊन येत. माणसं त्या दिवशी एकतर गावात जुगार खेळायला बसत किंवा काही लोक सकाळी बाजारात जाऊन काहीतरी ठोक मध्ये विकत घेऊन दिवसभर चिल्लरमध्ये विकण्याचा धंदा करीत असत.
हरीदास, जनार्दन, सोपान, शामराव, चोखोबा, विक्रम, महादेव, वामन, रामदास, पुंडलीक असे मोठ-मोठे माणसं रविवार्या किंवा सणासुदीच्या दिवशी जेव्हा त्यांचे बिड्या बांधण्याचे काम बंद असे, तेव्हा ते पत्त्याचा जुगार खेळत असत. आम्ही उमरसर्याच्या सर्वच मोठ्या माणसांना ‘दादा’ व बायांना ‘बाई’ असे म्हणत होतो.
आम्ही त्यांचा खेळ तासन तास पाहण्यात रमून जात होतो. ते सहसा ‘परेल’ हा खेळ जास्त खेळत असत. आम्ही सुध्दा जवळ पैसे असले की त्यांच्या सारखे लपून-छपून पत्ते खेळून पाहत होतो. त्यामुळे आम्हालाही गंजीफा खेळण्याचा नाद लागला होता. त्यात परेल, जोड्या लावणे असे काही खेळाचा प्रकार असायचा. पैसे नसले की हाताला हात बांधून नुसतेच त्यांच्या खेळाकडे पाहत बसण्यातही मन गुंतून जायचं. पैसे जिंकण्याच्या हावेपोटी गंजीफा खेळण्याचा हा नाद गोचिडासारखा चिकटून बसत असे. मला जुवा खेळतांना एक-दोनदा सोपान-दादाने पकडले होते.
‘यापुढे जुवा खेळतांना दिसला नाही पाहिजे.’ असा त्यांनी मला दम दिला होता. तरीही पत्ते खेळण्याचा नाद काही केल्या सुटत नव्हता. मी त्याला भीत होतो. तो थोडा रागिट स्वभावाचा वाटायचा. पण मनाने खूप चांगला होता.
जनार्धन-दादा एकदा बिड्याच्या चुकार्याचे सगळे पैसे हरला होता. त्यामुळे जुव्याच्या रागापाई तो एकाएकी कोणालाही न सांगता निघून गेला. त्याची बायको धाय मोकलून रडत होती. दोघेही नवरा बायको तरुण होते. त्याच्या जाण्यामुळे सर्वांच्या जीवाला घोर लागून गेला होता. सर्वच लोक चिंताग्रस्त झाले होते. गावामध्ये शोककळा पसरली होती. जिकडे-तिकडे त्याची शोधाशोध सुरु झाली होती. पण कुठेही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.
काही दिवसांनी त्याचे घरी पत्र आले. तो जुव्याचा धसका घेऊन मिलिटरी मध्ये भरती झाला होता!. त्यावेळी भारत आणि चिनच्या दरम्यान युध्द सुरु होतं. त्यामुळे त्याला लगेच सैनिकाच्या भरतीमध्ये विनासायास प्रवेश मिळाला होता.
एकेदिवशी तो सुट्टीवर गावला आला होता. आम्ही त्याला पाहायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी सोबत आणलेले गोळ्या-बिस्किटे आम्हा मुलांना खायला दिले. त्यामुळे त्याच्या घरी मुलांची रीघ लागली होती. त्याच्या येण्यामुळे आम्ही खूष होत होतो.
तो सैनिकात कसा भरती झाला, याचा किस्सा तो भेटणार्यांना रंगवून रंगवून सांगत असे. तो जेव्हा परत गेला, तेव्हा पुरा गाव त्याला सार करण्यासाठी लोटला होता.
एके दिवशी जनाबाई व चित्राबाई दुपारी शाळेत गेल्या होत्या. मी सकाळची शाळा करुन घरी आलो होतो. माझ्याशिवाय आणखी काही मुलांची शाळा सकाळची होती.
जेवण आटोपल्यावर रोज आम्ही मुले जुवा खेळण्यासाठी बसत होतो.. दुपारनंतर गावामध्ये कोणी राहत नसे. त्यामुळे आम्हाला हटकायला कुणी राहत नसल्याने आमचंच राज्य राहत असे. जुव्याच्या नादाने आम्ही मुले पुरते झपाटल्या गेलो होतो.
जुव्याचा डाव सुरु झाला. माझ्याजवळ होते नव्हते दोन-चार आणे हरवून बसलो. त्यावेळी एक, दोन, तीन, पाच, दहा असे नवीन पैसे होते. जवळचे सर्व पैसे हरल्यामुळे मी हिरमुसला झालो होतो. तरीही खेळण्याची खुमखूमी कमी झाली नव्हती.
मी विमनस्क अवस्थेत खोलीवर आलो. चित्राबाईची एक लहानशी पत्र्याची पेटी दिसली. मी त्यात हुडकायला लागलो. त्यात काही पैसे दिसले. क्षणभर ‘हे पैसे घेऊ की नाही’ असा विचार डोक्यात घोळत राहीला. पण एक मन म्हणत होते की, ‘जर पैसे जिंकले तर हे पैसे मी पेटीत ठेवून देईन.’ आणि हरलो तर… ? या विचाराने माझा थरकांप उडाला ! तरी मनाचा हिय्या करीत, माझे हात त्या पेटीत स्थिरावले. थरथरत्या हाताने मी चार आणे काढून घेतले. जन्मात कधी मी चोरी केली नव्हती; पण जुव्याचा नाद काही स्वस्थ बसू देत नव्हता.
ते पैसे घेऊन मी परत खेळायला बसलो. दुर्दैवाने ते चार आणे पण हरवून बसलो. आता काय करावे ते सुचत नव्हते. मी फार मोठा अपराध केला होता. कशाला या जुव्याच्या मागे लागलो; असं मला सारखं राहून राहून वाटत होतं. माझ्या आई-बाबाने मला येथे शाळा शिकण्यास पाठविले होते. अन् मी कोणत्या मार्गाने चाललो होतो, याची मला तिव्रतेने जाणीव व्हायला लागली. मी भीत भीत घरी आलो. आता अशा या बेचैन अवस्थेत माझं मन कुठेच लागत नव्हतं. अभ्यासावर तर मुळीच लागत नव्हतं. चित्राबाईने पेटी उघडली, तर नाही ना? ’चोराच्या मनात चांदणे म्हणतात’ तसे या काळजीने माझ्या मनाची घालमेल सुरु होई.
दुसर्या दिवशी सकाळी चित्राबाईने ती पेटी उघडून पाहिली. अन् जोरात किंचाळली…!
‘माझे चार आणे काय झाले ?’ असे म्हणून ती रडायला लागली. मी तोंडात मिठाची गुळणी धरुन बसल्यागत तीचे ते केविलवाणे रडणे – ’झाकली मूठ सव्वा लाखाची’ या म्हणी प्रमाणे, मुकाट्याने पाहत होतो. तिच्या रडण्यामुळे माझं मन आतल्याआत रक्तबंबाळ होत होतं.
बाहेरचा कोणीतरी तिचे हे पैसे चोरले असावे, असे तिला बहुदा वाटत असावे. मी हे पैसे चोरले असतील अशी पुसटशी शंका कुणालाच आली नाही. कारण माझ्यावर सर्वांचाच विश्वास होता. पण मी तिचा विश्वासघात केला; ही सल मात्र माझ्या मनाला सतत टोचत राहत होती. वरुन चांगला दिसणारा माणूस आतून जर वाईट सवयीच्या आहारी गेला असेल, तर तो चोरी सारखे अभद्र व अनैतिक कृत्याला कसा बळी पडतो; हे त्याचं ज्वलंत उदाहरण होतं. मी मनातल्या मनात कचरलो होतो. जशी एखादी अळी पान कुरतुडून कुरतुडून खाते तशी अपराधी भावना माझं मन कुरतुडून खात होतं.
त्या चार आण्याला किती महत्व होते, हे चित्राबाई हमसून हमसून रडत असतांना मी तिव्रतेने अनुभवलं होतं. जणू काही तिचं भावविश्व हरपल्यासारखं झालं होतं.
त्यानंतर जेव्हा-केव्हा माझं मन जुवा खेळण्यास अधीर व्हायचं तेव्हा मला ही गोष्ट प्रकर्षाने आठवीत असे. त्या आठवणीने मला आतल्या आत पिळल्यासारखे होत असे.
या प्रसंगाने खरंच मला खूप धडा शिकवीला होता. जीवनातला असा एखादा प्रसंग माणसाला मुळापासून हलवून आपल्या आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन जात असल्याचे मी प्रत्यक्ष अनुभवले होते ! तेव्हापासून मी या वाईट सवयीपासून परावृत होत गेलो. हा प्रसंग घडला नसता, तर कदाचित जुव्यात गुरफूरटलेला माझा जीव बाहेर पडला नसता व त्यामुळे जीवनाचे प्रयोजनच हरवले असते. माझ्या सैरभैर मनाला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. तरीही ही घटना कित्येक दिवस माझ्या काळजात पक्की रुतून बसली होती. चिखलात जन्म घेतलेलं कमळ जसं आपल्या पानावर चिखल डिकू देत नाही, तसंच व्रत मलाही पाळाला पाहिजे. असं माझं मन मला दृढनिश्चय करायला सांगत होतं.
जीवन प्रवासाच्या रुळावरुन घसरता घसरता मी खरोखरच सावरुन गेलो, असंच म्हणा ना !
20.703880
76.997093
Like this:
Like Loading...
मी व माझी बहीण, जनाबाई असे दोघे उमरसर्याला राहत असतांना शाळा सुरु झाली, की सर पुस्तकाची यादी फळ्यावर लिहून देत असत.
एखादा विद्यार्थी पास होवून पुढल्या वर्गात गेला, की तो त्या वर्गाचे पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत असे. त्याचेकडून किवा पुस्तकाच्या दुकानात जाऊन मी जुने पुस्तके विकत घेत होतो. एखाद्या पुस्तकातील पाने फाटलेले नंतर आमच्या लक्षात यायचे. कदाचीत काही मुले ते पाने परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापरत असावेत. अशावेळेस कुणाच्या तरी पुस्तकातून पाहून वहीत उतरवून घ्यावे लागत असे.
जुन्या पुस्तकांना घरी आणून आम्ही त्याला खाकी पृष्टांच कव्हर लावीत होतो. दुसर्या वर्षी ते पुस्तके एकतर बाईला देत होतो किवा तिला चालत नसले, की दुकानदाराला नाहीतर शाळेतल्या कुण्यातरी मुलाला विकत होतो.
हायस्कूलला प्रवेश घेतल्यानंतरच पाचवी पासून हिंदी व इंग्रजीचा विषय सुरु होत होता. म्हणून शिक्षकांनी वर्गात लिहून दिलेले व पाठ्यपुस्तकातील इंग्रजी विषयातील ए.बी.सी.डी मला सारखे पाठ करावे लागत असे. त्याची हुर्दुक झोपेतही राहत असे. सकाळी उठवल्यावर बाई मला सांगायची की, ‘झोपेत तू ए.बी.सी.डी म्हणत होता.’
मी त्या शाळेत उमरसर्यावरून जाणारा एकटाच होतो. कारण माझी शाळा दूर होती. बाकी मुले जसे अर्जुन, प्रल्हाद, प्रभू व इतर मुले विर वामनराव चौकाजवळ असलेल्या न्यु ईंग्लिश हायस्कूल मध्ये शिकत होते.
माझी शाळा म्हणजे त्याकाळची म्युनीसिपल हायस्कूल…! आझाद मैदानाजवळची… उमरसर्यापासून तिनक मैल दूर असेल. रोज सकाळी मी तितक्या दूर पायी जाऊन दुपारी घरी येत होतो. बाईची शाळा दुपारची असायची. ती संध्याकाळी घरी यायची. तिला चौथ्या वर्गात टाकले होते. तिची शाळा तहसील ऑफीसच्या समोर होती. नंतर पाचवी पासून ती काटेबाईच्या शाळेत गेली होती.
शाळेत जातांना दातेचं कॉलेज, नंतर विर वामनराव चौक, त्यानंतर दत्त चौक व आणखी पुढे आझाद मैदानाजवळ अलीकडे माझी शाळा होती.
रस्त्यामध्ये दाते कॉलेजच्या पलीकडे त्यावेळी यवतमाळला नावाजलेल्या बब्बी पहेलवानाचं घर होतं. तो जातां-येतांना मला नेहमी एकतर त्याच्या घराच्या आवारात किंवा रस्त्यात डुलत डुलत चालतांना किंवा दत्त चौकातील त्याच्या व्यायामशाळेत दिसायचा.
यवतमाळला त्यावेळी अधिक एक पहेलवान होता, तो म्हणजे जांबुवंत… दोघेही उंचे-पुरे होते. रस्त्याने जातांना ते सर्वांच लक्ष वेधून घेत होते. अशी त्यांची कमावलेली बलदंड देहयष्टी होती जांबुवंत पहेलवानाची व्यायामशाळा आझादमैदानाला लागून काणेच्या दवाखान्याजवळ होती. मी कधी कधी या दोन्ही ठिकाणी जावून तेथे व्यायामाचे निरनिराळे प्रकार आणि कुस्तीचे डावपेच पाहण्यात रमून जात होतो.
या दोघां पहेलवानांमध्ये विस्तव जात नव्हतं, असं मी त्यावेळी ऎकले होतं, त्यांच्या कुस्तीच्या सुरस कथा त्यावेळी मुलांच्या तोंडून ऎकत हो्तो.
एक गोष्ट, अशीच मी ऎकली होती. एकदा सरोज टॉकीजमध्ये दोघांची मस्त फ्री-स्टाईल कुस्ती सुरु झाली. सिनेमा पाहणार्या प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यापेक्षा त्यांच्या कुस्तीतच जास्त रस घेतला होता, म्हणे !
मी शाळेतून घरी येतांना दातेच्या घराजवळ मोकळ्या जागेत इंग्रजी चिंचाचं एक मोठं झाड होतं. त्या झाडाच्या लाललाल पिकलेल्या टपोर्या चिंचा मी झाडावर चढून तोडत होतो. मग त्या खात खात घरी उमरसर्याला येत होतो. तेव्हापासून इंग्रजी चिंचा मला फार आवडायला लागल्या होत्या.
एक गोष्ट मला तिव्रतेने जाणवली होती ती ही की, शहरात आल्यावर पहिलं पाऊल टाकलं; तेव्हा आपण एका वेगळ्या दुनियेत आलो आहे की काय, असं वाटलं होतं. .
शहराचा झगमगाट, श्रीमंती थाट पाहून आमच्या गावचं बकालपण हरवून बसलो होतो.
शहरात चालतांना गुळगुळीत डामराचे रस्ते दिसायचे, तर आमच्या गावात खरबरीत, दगड, मातीचे, धुळीचे रस्ते दिसायचे.
शहरात सिमेंट, कॉंक्रिटचे टूमदार बंगले दिसायचे, तर आमच्या गावात गवता-कुडाचे घरे दिसायचे.
शहरातील घरांच्या उठण्या-बसण्याचा जागा चमचमीत फरशाच्या असायच्या, तर आमच्या गावातले घरं शेणा-मातीने सारवलेले असायचे.
शहरातील घरांच्या आवाराला भिंती असायच्या, आमच्या गावातले घरांच्या आवाराला काट्या-कुट्यांचं कुंपण असायच.
शहरात एका रांगेत निटनिटके घरे वसलेले दिसायचे, तर आमच्या गावात रांग आणि निटनिटकेपणाचं वावडं होतं.
शहरात साफसफाई कर्मचारी केर-कचरा साचू देत नव्हते, तर गावात जिकडे-तिकडे कचराच कचरा नजरेस पडत असे.
शहरात खताचे उकंडे दिसत नव्हते, तर गावात जिकडे-तिकडे उकंड्याचा सुकाळ दिसायचा.
शहरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारे बांधलेल्या दिसायच्या, तर गावात सांडपाणी उघड्यावर रस्त्याने वाहत जायचे.
शहरात प्रशस्त गल्ल्या, रस्ते असायचे, तर गावात अरुंद रस्ते असायचे.
शहरात मोटारी व फटफट्या फिरतांना दिसायच्या,. तर आमच्या गावात बैलबंड्या व रेंग्या दिसायच्या.
शहरात गोल साड्या नेसलेल्या व ब्लाउज घातलेल्या चटकदार बाया दिसायच्या, तर आमच्या गावात लुगडं नेसलेल्या व चोळ्या घातलेल्या मलूल चेहर्याच्या बाया दिसायच्या.
शहरात पॅंट-शर्ट घातलेले लोक दिसायचे, तर आमच्या गावात धोतर, कुडतं व बंडी घातलेले लोक दिसायचे.
शहरात श्रीमंताचे गुबगुबीत पोरं दिसायचे, तर आमच्या गावात उघडे-नागडे, मलूल चेहर्याचे, मातीने माखलेले पोरं दिसायचे.
शहरातील लोक नळाचं शुध्द पाणी प्यायचे, तर आमच्या गावातील लोक विहिरीचं, नदी-नाल्याचे दूषित पाणी प्यायचे.
शहरात रात्रीला वीजेने ऊजळणारा लख्ख प्रकाश दिसायचा, तर आमच्या गावात अंधार गुडूप दिसायचा.
शहरासारखे असं सौख्य आमच्या गावाला कधीतरी लाभेल काय ? हा विचार शहरातून जाता-येतांना माझ्या मनात नेहमी घुमत राहायचा.
काही मुलं घरुन जेवणाचा डब्बा आणीत असत. दुपारच्या सुट्टीत ते शाळेमध्ये डब्बा खात. किंवा काही मुलं जेवायला घरी जात. मी मात्र जेवणाचा डब्बा आणत नव्हतो. तेव्हा कधी कधी दुपारी भूक लागायची. म्हणून मी खिशात पैसे असले, की मुद्दाम टांगाचौकात जात होतो. तेथे पेवंडी आंबे विकणार्या लोकांच्या गाड्या असायच्या. ते मी विकत घेऊन सालपटासकट खात खात शाळेत येत होतो. पेवंडी आंबे मला फार आवडायचे. कधी कधी मारवाडी चौकात जाऊन गरम गरम भाजलेले फुटाणे विकत घेऊन खात होतो.
दादा मला टांगा चौकातील सोडा फॅक्टरीच्या दुकानात घेऊन जायचा. या चौकात त्यावेळी घोडे जुतलेले टांगे उभे राहायचे. म्हणून त्या चौकाला टांगा चौक असे म्हणत.
पूर्वी यवतमाळला घोडा जुतलेल्या टांगा असायच्या. त्यांनी यवतमाळला सायकलरिक्षे येऊ दिले नाहीत, असे सांगितल्या जात होते. म्हणून बाकी शहरात असणारे सायकलरिक्षे मात्र यवतमाळला कधीच दिसले नाहीत. आम्ही बहुदा कुठे जायचे असले, तर पैसे वाचवीण्यासाठी पायीच जात होतो. क्वचित एखाद्या प्रसंगी टांग्यात जायचं काम पडायचं. तेव्हा मस्त मजा वाटायची.
सोडा फॅक्टरीचं दुकान शेतकरी-कामकरी पक्षाचा पुढारी असलेला जामणकर यांच होतं. दादा पण गावचा सरपंच असल्यामुळे व रिपब्लीकन पार्टीच्या खोब्रागडे गटाचा पुढारी असल्यामुळे दादाची चांगली ओळख होती. या दोन्ही पक्षाचं त्यावेळी जवळचं सख्य होतं. त्याच्या दुकानातील हिरव्या रंगाच्या शिशीत, तळाशी निळी गोळी असलेली व हिरव्या रंगाचं दिसणारं लेमन सोडा दादा मला पाजत असे.
याच चौकात एका मुसलमानाचं मटणाचं हॉटेल होतं. दादा कधी कधी मला तेथे जेवायला घेऊन जायचा. येथील मटणाची चव वेगळीच व लज्जतदार वाटत होती. त्याची आठवण झाली, की आजही त्या मटणाची चव जिभेवर तरळते.
कधी कधी पाच-दहा पैशाचे खरमुरे विकत घेऊन खात होतो. आमच्या शाळेच्या बाहेर सायकलवर थैल्या अटकवलेला खरमुरे विकणारा एक माणूस उभा असायचा. तो थैलीतले खारवलेले व भाजलेले शेंगदाणे मुठीत घेऊन हाताने चोळायचा व फूंक मारुन सालपटं निघालेले दाणे कागदाच्या पुडीत द्यायचा.
कधी कधी काचेच्या डब्ब्यातलं गुलाबी रंगाचं कापसासारखं गोल गोळा असलेलं ‘बुढ्ढीका बाल’ दिसलं की माझं लक्ष वेधून घ्यायचं. तेव्हा खिशात पैसे असले, की ते विकत घ्यायचा मोह टाळता येत नव्हतं. ते तोंडात टाकलं की अलगद विरघळून जायचं.
तहसील कार्यालयासमोर एक हॉटेल होतं. तेथील भजे मस्त खुमासदार व चटकदार लागायचे. गुलगुले पण मस्त गोड लागायचे. मी, आई, बाई किंवा आणखी कोणी आमच्या चौधरा गावावरुन काही कामानिमित्त शहरात आलो, की आम्ही घरून बांधून आणलेल्या भाकरी भज्यासोबत येथे खात होतो.
एकदा मी दुपारच्या सुट्टीत दादा गावावरुन आला का म्हणून पाहायला गेलो होतो. त्यावेळी मी याच हॉटेलमध्ये पाणी प्यायला गेलो. पाणी पिल्यावर तो जर्मनचा गिलास माझ्या हातातून टेबलावर ठेवतांना कलंडला होता. ते पाहून हॉटेलचा मालक माझ्याजवळ आला व त्याने माझ्या कानफटात थापड हाणली. ही गोष्ट नंतर मी ज्या ज्या वेळी तेथून जायचा; त्या त्या वेळी आठवायची. तेव्हा मला कसंच तरी वाटायचं.
मला सायकल शिकायची फार इच्छा झाली होती. माझा मित्र प्रभू याला सायकल चालविता येत होती. एके दिवशी त्याला मी तसे सांगितले. आम्ही दोघेही सायकलच्या दुकानात गेलो. तेथून कमी उंचीची लहान सायकल भाड्याने आणली.
तो मला रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात सायकल शिकवायला लागला. मी सायकलवर बसून पायडल मारु लागलो. तेव्हा तो पाठीमागे कॅरियरला धरुन मध्ये मध्ये हात सोडून द्यायचा. त्यामुळे मी दोन-तीनदा चांगलाच आपटलो. पडणे आणि सावरणे हा जीवनातल्या चढउताराचा एक अविभाज्य भाग असल्याचं; त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवलं. जीवनातला प्रवास सुकर करण्यासाठी काही आवश्यक त्या गोष्टी कधीतरी शिकावेच लागते. आयुष्यात काही मिळवायचं असेल, तर काही घाव सहन करावेच लागेल. अपयश पचवावेच लागेल. कारण अपयश हा तात्कालीक पराभव असतो. पण असं म्हणतात की, चालत राहिले तर इवलासा प्राणी मुंगीदेखील शेकडो मैल दूर जाते. ’आगे बढनेका नाम है जीवन और रुकने का नम है मौत’ असं काहीतरी मी हिंदी विषयाच्या पाठात शिकलो होतो, ते खरंच आहे !
म्हणून मी जिद्द सोडली नाही. शेवटी मी सायकल शिकलोच ! मग माझ्या आनंदाला पारावार ऊरला नाही !
मी आता स्वत:च भाड्याची सायकल आणून सराव करत होतो. असं म्हणतात की एखादी गोष्ट मनावर घेतली की, त्यात जीव ओतून त्याचा मोकळेपणी आनंद घेण्यातच खरी मजा वाटत असते. म्हणून मी एके दिवशी आम्ही दोघेही माझ्या गावला जाण्याकरीता भाड्याच्या सायकली घेतल्या. अकोलाबाजार रोडने आम्ही पांढरीपर्यंत गेलो. हा रोड तेव्हा गिट्टी-मुरुमाचा होता. त्यानंतरचा रस्ता माझ्या चौधरा या गावापर्यंत कच्चा दगड-मातीचा होता. त्यावेळी पावसाचे दिवसं होते. म्हणून कुठे कुठे चिखल व टोंगळाभर गाडण झाले होते. त्यामुळे सायकल खांद्यावर उचलून न्यावी लागत असे. सायकलच्या चाकाला चिखल डिकले, की सायकल जाग्यावरुन हालत नसे. मग चाकाला लागलेला चिखल काढण्यात बराच वेळ खर्ची पडायचा. आम्ही घरी आलो, तेव्हा आई-बाबा, दादा-वहिनी वावरात होते. त्यांना मी सायकल शिकल्याबद्द्ल व यवतमाळवरून गावला चालवत आणल्याचे सांगितल्यावर त्यांनाही आनंद झाला होता.
कधी यवतमाळला एखादी सर्कस आली की रात्रीला त्याचा मोठा सर्च लाईट दूर पर्यंत एका बाजूकडून दुसर्या बाजूपर्यंत गोल गोल फिरवत असत. तो घुमणारा लाईट पाहतांना आम्ही मुले हर्षभरीत होत असे.
ही सर्कस आमच्या शाळेच्या समोर आझादमैदानात राहत असे. मग सुट्टी झाली, की त्याचा तो अगडबंब तंबू लक्ष वेधून घेत असे. सायकलवर कसरत करणारे, झुल्यावर झुलणारे, वाघ, सिंह, हत्ती, वानर इत्यादी प्राण्यांना खेळवणारे रिंगमास्टर, मौतका कुव्यांत फटफटी चालवणारे आणि बुटक्या उंचीच्या जोकराचे असे चित्रविचित्र चित्र बाहेर लावलेले मी निरखून पाहत होतो. सर्कस निघून गेली, की ती जागा सुनं-सुनं वाटत असे. .
असं ते सर्कसचं दृष्य पाहिल्यावर, मी सर्कस पाहण्यासाठी बाईच्या मागे सारखा नांदा लावत होतो. मग ती ज्या दिवशी उमरसर्यातील तिच्या मैत्रीणी किंवा बाया जात त्यांच्या सोबत आम्ही पण जात होतो. मी त्या सर्कसमधील चित्तथरारक खेळात हरवून जात होतो.
याचवेळेस काळीज पिळवटून टाकणारी अशी एक घटना घडली होती. पाटीपुरा मोहल्ल्याजवळ खोज्या-मुस्लीम लोकांची मस्जिद होती. त्या मस्जिदमध्ये सामुहिक लग्नाचा कार्यक्रम चालला असतानांच मस्जिद कोसळली. या अपघातात मुलं, बाया व माणसं असे खूप लोकं मेले होते. आमच्या उमरसरा गावातून अनेक लोकं ते दृष्य पाहायला गेले होते. मी पण गेलो होतो, ते दृष्य पाहून कुणाच्या अंगावर शहारे न उठले तर नवलच ! इतका तो भयानक प्रसंग होता. या प्रसंगाने मला पुरते हेलावून सोडले होते. बरेच दिवस ते दृष्य माझ्या डोळ्यासमोर तरळत राहिलं होतं.
माझ्या शाळेच्या वर्गाची खोली त्यावर्षी रोडच्या बाजूला होती. शाळा आणि रोडच्या मध्ये पोलीस वसाहत होती. याच रोडवर जेल होता. तेथून गेलं की नेमकं लक्ष त्या जेलातील काम करणार्या कैदी लोकांकडे जायचं. त्यांच्या अंगात विशिष्ट प्रकारचा पोशाख असायचा. त्यामुळे ते लोक चटकन ओळखू येत असत. पांढर्या रंगाची बंडी आणि हॉफपॅन्ट घालून असायचे. कधी कधी त्यांचा आठ-दहा लोकांचा ताफा जेलकडून एस.टी.स्टॅंड जवळील बगिच्यात रस्त्यांना जातांना दिसायचा. तेथे ते बगिच्यात व शेतावर काम करीत असत. त्यांना राखायला त्यांच्या मागे एक प्रमुख कैदी व पोलीस राहत असे.
एकदा त्या जेलच्या आवारात खूप गलका ऎकू आला. मी त्यावर्षी आठव्या वर्गात होतो.
‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय…’
‘जोरसे बोलो, जयभीम…’
‘हिम्मतसे बोलो, जयभीम…’
‘भूमिहिनांना शेती मिळालीच पाहिजे…’
‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मील जायेगा…’ अशा त्या घोषणा जोराजोरात वर्गात ऎकू येत होत्या.
दुपारी किंवा संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी तेथे जाऊन पाहत होतो. तेव्हा तो जेलचा आवार माणसांनी तुडूंब भरलेला दिसत होता. दाटीवाटीने गर्दी केलेले ते दृष्य पाहून मी अक्षरश: भारावून जात होतो. आमच्याच सोबत रात्रंदिवस वावरणारे कोणीतरी जिव्हाळ्याचे लोक आहेत हे पाहून माझ्या अंतर्मनातील हळूवार भावना सारख्या उचंबळून येत होत्या.
तेथे खेड्यापाड्यातील लुगडे-चोळ्या घातलेले, धोतर नेसलेले म्हातारे-कोतारे, तरणाताठे बाया-माणसांनी गर्दी केली होती. काही लोकांच्या हातात निळे झेंडे होते. काही लोकांनी डोक्यात निळया टोप्या घातल्या होत्या. त्यात कोणाकोणाचे कपडे फाटलेले, जागोजागी शिवलेले, माती-घामाने मळलेले दिसत होते. कोणाच्या कडेवर लहान लहान मुलं होते; तर काही बाया आपल्या बाळांना दूध पाजीत होत्या. सर्वजण राहून राहून गगदभेदी घोषणा देत होते.
आणखी काही एसट्या, गाड्या बाया माणसाने भरभरुन तेथे येत होत्या. चार-पाच दिवस ते दृष्य सारखं दिसत होतं. काही लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं होतं, ‘हा आमच्या कष्टकरी भुमिहीनांचा सत्याग्रह आहे. आमच्या कडे शेती नाही. तेव्हा आम्हाला गुजराण करण्यासाठी सरकारने शेती दिली पाहिजे. म्हणून आम्ही सगळीकडे दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात संघर्ष करीत आहोत.’
त्यांच्यामधील एक पुढारी असाही म्हणाला होता की, ‘बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. असे सांगितले होते म्हणून आम्ही संघर्ष करीत आहोत.’ अशा प्रकारे त्यांच्या आंदोलनातील पेटत असलेली धग पाहून मी अवाक् झालो होतो.
त्यांचा सत्याग्रह संपल्यावरही काही दिवस माझ्या कानात त्या घोषणाचा निनाद घुमत राहीला होता.
शहरातील गणपती, दुग्रोत्सवाच्या वेळी मुर्त्या, रोषणाई पाहून माझे डोळे दिपून जायचे. त्यातील ऑर्केस्ट्रा, गीतगायन, नृत्य, नाटक, नकला, सिनेमा इत्यादी कार्यक्रम पाहायला मी मुलांसोबत जात होतो. बाई पण तिच्या मैत्रिणीसोबत किंवा बायांसोबत जात असे.
कधी कधी गणपती पाहतांना मी लहान होतो, त्यावेळची गोष्ठ आठवायची. गणपती शिरवित्त, त्यादिवशी आमच्या गावातील पोरी-पोरं संध्याकाळी यवतमाळला येत. मग रात्रभर एकामागे एक वाजतगाजत जाणार्या गणपतीची मिरवणूक पाहण्यात आम्ही दंग होवून जात होतो. एकेदिवशी मी असाच घेऊन जाण्यासाठी रडत होतो. त्याचवेळी माझी मामी घरी आली. मला रडतांना पाहून म्हणाली,
‘कावून रडता गा…?’
‘त्याला गणपती पाहायचे आहेत.’ आई म्हणाली.
‘एवढेच. तुमचा मोठेबाबा गणपत आहे ना गांवात. त्यालाच पाहून घ्याना…? कशाला पाय तुडवीत तीन कोस यवतमाळला जाता ?’ तिचं ते गमतीशीर बोलणे ऐकून मी उगा झालो.
एकदा माईंदे चौकात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. मी सोपानदादा सोबत तो कार्यक्रम पाहायला गेलो होतो. त्यावेळी तेथे एक मोकळं मैदान होतं.
एका गायिकेने, ‘रसिक बलमाऽऽऽ दिल क्यो लगाया तुने.’ हे जिवाच्या आकांताने गायलेली भावसंगीतातील अप्रतिम गाणं मला फार भावलं होतं.
तसंच ‘कुहुऽऽ कुहुऽऽ बोले, कोयलीया.’ हे द्वंद गीत सुध्दा त्याच गायीकेने व दुसर्या एका गायकाने अगदी गोड आणि सुरेल आवाजात म्हटले होते. कार्यक्रमाच्या मध्येच एखाद्या मुलीचा डॉंन्स होत असे. असा तो समोर चाललेला सुरेख नजारा मी डोळे भरून पाहत असतांना बेधुंद होत होतो.
एकदा मी कार्यक्रम पाहून घरी आल्यावर खूप रात्र झाली होती. तेवढ्या रात्री अभ्यास करायचा कंटाळा आला होता. सकाळी मी शाळेत जायला निघालो. रस्त्यात शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास केला नसल्याचे लक्षात आले. तेव्हा मला दरदरुन घाम फुटला. आता काय करावे, ते काही सुचत नव्हतं. मी पार धास्तावून गेलो होतो.
मी त्या घाबरलेल्या अवस्थेत शाळेच्या दरवाज्यापर्यंत गेलो. परंतु माझे पाय एकाएकी माघारी फिरले. धागा तुटलेला पतंग जसे भरकटत जाते, तसे आता माझ्या मनाचे झाले होते. मी विमनस्क अवस्थेत तसाच धामणगाव रोडने कॉटन मार्केट पर्यंत गेलो. तेथे मार्केटच्या आवारात दुर्गादेवी बसली होती. तेथे ओट्यावर तप्तर ठेऊन बसलो.
या ठिकाणी शेतकरी भुईमूगाच्या शेंगा, तुरी, ऊडीद, ज्वारी, कापूस असा शेतातला माल विकायला आणत असत. मी पण दोन-तीनदा कधी बाबासोबत तर कधी दादासोबत बैलगाडीने या ठिकाणी आलो होतो.
तेथे माल टाकण्यासाठी सिमेंटचे ओटे बांधलेले होते. त्या ओट्यावर कापूस सोडून इतर माल उबडून दलाल व व्यापार्यांची वाट पाहत बसत होतो. कापूस गोण्यामध्ये भरलेला असल्यामुळे तो उबडण्याची गरज नसे.
दलाल व व्यापारी येवून त्या मालाची हर्रास करीत असत. व्यापारी म्हणेल तो भाव दलाल तोंडाने म्हणत जायचा. शेवटी आणखी कोणी बोली बोलत नाहीत, असे पाहून दलाल एक-दोन-तीन म्हणून तो माल त्या व्यापाराला विकून टाकायचा.
संध्याकाळी त्या दलालाच्या दुकानातून मालाला आलेल्या किंमतीतून त्याची दलाली, मापार्याचा खर्च, ओट्याचं भाडं व इतर काही सरकारचे कर कापून आलेला चुकारा मिळत असे.
मला नेहमी प्रश्न पडायचा, ‘जो कष्ट उपसतो, त्याच्याच स्वप्नांचा चुराडा होतो. जो कापूस पिकवतो, तोच नागवा राहतो. असं का ?’
शेतकर्याला आपल्या मालाची किंमत का ठरविता येत नाही ? त्याने किती खर्च
केला ? त्याने बायको पोरांसह किती कष्ट उपसले ? याची काहीही किंमत नव्हती. व्यापारी बोली करेल ती किंमत त्या मालाची ठरत होती. दुसरीकडे कारखानदार मात्र आपल्या वस्तूची किंमत ठरवूनच बाजारात माल आणीत असतात. ग्राहकांना व व्यापार्यांना त्याच किंमतीत त्याची वस्तू विकत घ्यावी लागते. पण शेतकरी म्हणेल त्या किंमतीत मात्र व्यापारी व ग्राहक त्याची वस्तू विकत घेत नाहीत, असे का ? ‘आंधळा दळतोय अन् कुत्रा पीठ खातो.’ दुसरं काय ? हा विचार माझ्या मनांत सारखा घोळत राहायचा. व्यापारी लोक शेतकर्याच्या मालाचा भाव पाडूनच खरेदी करी